* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: ३.८ मज्जासंस्था-१ / 3.8 Nervous system-1

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१३/१/२५

३.८ मज्जासंस्था-१ / 3.8 Nervous system-1

शिवाय,मज्जातंतू हे हृदयातून न निघता ते मेंदूतून निघतात हे सांगून ॲरिस्टॉटल कसा चूक होता हेही सांगितलं.याबरोबरच हालचालींसाठी लागणारे मज्जातंतू (मोटर नर्व्हज) आणि संवेदनेसाठी लागणारे मज्जातंतू (सेन्सरी नर्व्हज) हे वेगळे असतात हेही हिरोफिलसनं दाखवून दिलं.त्यानं डोळ्यांतल्या दृष्टिपटलापासून (रेटिनापासून) निघणाऱ्या मज्जातंतूंचा

(ऑप्टिक नर्व्हज) शोध घेतला.हिरोफिलस सार्वजनिक शवविच्छेदन करे. दूरदूरहून अनेक लोक ते बघण्यासाठी येत.


नर्व्हज सिस्टिम (मज्जासंस्था)


ग्रीकांचा वारसा नंतर रोमनांनीही चालू ठेवला. हिरोफिलसनंतर जवळपास ५०० वर्षांनंतर म्हणजे इ.स. १३०-२०० च्या दरम्यान गेलन (Galen) नावाचा एक प्रसिद्ध डॉक्टर आणि वैज्ञानिक होऊन गेला.ग्रीस आणि रोम या दोन्ही ठिकाणी त्याचं वास्तव्य होतं.गेलन याला मात्र आपल्या मेंदूतच आपलं मन दडलेलं आहे याची खात्री होती.त्या काळी माणसाच्या मृतदेहाचं विच्छेदन करणं हा त्या माणसाचा मृत्यूनंतर होणारा अपमानच आहे असं मानलं जाई.त्यामुळे त्यानं अनेक डुकरं, माकडं आणि गुरंढोरं यांचं विच्छेदन केलं.त्यानं डुकराच्या मेंदूपासून त्याच्या अवयवांपर्यंत जाणारे त्या अवयवांच्या हालचालीसाठी उपयुक्त असणारे मोटर नर्व्हज आणि त्या अवयवांच्या संवेदनांसाठी उपयुक्त असे सेन्सरी नर्व्हज कापून टाकले आणि ते कापल्यावर त्यांच्यावर काय परिणाम होतात यांच्या निरीक्षणांची बारकाईनं टिपणं करून ठेवली.पाठीच्या कण्यापासून (स्पानयल कॉर्ड) निघणाऱ्या मज्जातंतूंप्रमाणे त्यानं अनेक मज्जातंतू एकएक करत कापायला सुरुवात केली.कुठला मज्जातंतू कापल्यावर शरीरातल्या कुठल्या भागावर काय परिणाम होतो हे गेलनला बघायचं होतं. स्वरयंत्राकडे जाणारा मज्जातंतू जर कापला तर आवाजच करता येत नाही हे त्यानं न्याहाळलं होतं. गेलननंतर साधारणपणे १३०० वर्षांनी लिओनार्दो दा विंची (इ.स.१४५२-१५१९) नं काही महत्त्वाची विच्छेदनं केली आणि मेंदूतल्या टिश्यूजचं महत्त्व दाखवून दिलं,त्यानं बैलाच्या मेंदूतल्या पोकळीमध्ये वितळलेलं मेण ओतलं,ते सेट होऊ दिलं आणि नंतर मेंदूचं विच्छेदन करून आजूबाजूच्या टिश्यूजचं निरीक्षण केलं.मज्जातंतू हे मेंदूपर्यंत येऊन संपुष्टात येतात हे त्यानं शोधून काढलं. मेंदूच्या या भागाला कालांतरानं

'बॅलॅमस' असं म्हणायला लागले.


लिओनार्डोच्याच काळी व्हेसॅलियस (इ.स.१५१४-१५६४) नावाचा एक शरीरशास्त्रज्ञ होऊन गेला.त्यानं नुकत्याच मारलेल्या अनेक प्राण्यांचे मेंदू तपासले.मेंदू हाच आपल्या सगळ्या कृतीच्या आणि भावनांच्या केंद्रस्थानी असतो या निष्कर्षापर्यंत तोही येऊन पोहोचला.


मेंदूच्या पोकळीत एक द्रवपदार्थ भरलेला असतो आणि तो मेंदूमधून संदेश पोहोचवण्यासाठी उपयोगी पडतो असं देकार्तनं सांगितलं.या मेंदूतल्या द्रवपदार्थाला तो 

ॲनिमल स्पिरिट असं म्हणे.मनात जेव्हा शरीरामधल्या एखाद्या विशिष्ट भागाची हालचाल घडवून आणायची इच्छा होते तेव्हा मेंदूचा त्या विशिष्ट द्रवपदार्थानं भरलेला भाग मन एका ठरावीक दिशेनं वाकवते.त्यामुळे मेंदूतलं द्रव त्या दिशेच्या मज्जातंतूंमधून वाहायला लागतं. 


त्यामुळे त्या मज्जातंतूंच्या आजूबाजूचे स्नायू फुगतात आणि हालचाल करायला लागतात अशी देकार्तची थिअरी होती.अशा तऱ्हेनं देकार्तनं त्याचं हायड्रॉलिक यांत्रिक मॉडेल मांडलं.शरीरातल्या नर्व्हजमध्ये असलेल्या झडपांच्या (व्हॉल्व्हज) मुळे हा द्रवपदार्थ मज्जातंतूंमध्ये किती येतो आणि त्यातून तो किती बाहेर पडतो हे नियंत्रित होतं अशी त्याची थिअरी होती. उदाहरणार्थ,आपण जर एखाद्या शेकोटीत पेटलेल्या आगीत हात नेला तर आपल्या त्वचेजवळचे रिसेप्टर्स हे उत्तेजित होऊन मेंदूतल्या पोकळीजवळची झडप उघडली जाते आणि त्यामुळे तो द्रवपदार्थ तिथल्या मज्जातंतूंमध्ये वाहायला लागतो.त्यामुळे आपल्या तिथल्या स्नायूंना सूचना मिळून आपण हात बाजूला घेतो असं देकार्तनं मांडलं.पण ही हात चटकन काढून घेण्याची क्रिया खूप विचारपूर्वक केलेली नसते.ती जवळपास क्षणार्धात म्हणजे आपोआपच होते.म्हणून यांना रिफ्लेक्स ॲक्शन म्हणायला लागले.देकार्तनं आपले स्नायू हे मज्जातंतूमध्ये शिरणाऱ्या द्रवपदार्थामुळे हालचाल करतात असं जे हैड्रॉलिक मॉडेल मांडलं ते चूक असल्याचं लुइगी गॅल्व्हनी (१७३७ ते १७९८) या इटालियन शास्त्रज्ञानं दाखवून दिलं.स्नायूंना किंवा त्यांना जोडलेल्या मज्जातंतूंना जर विद्युतप्रवाह दिला तर ते स्नायू हालचाल करू शकतात,त्यात गेलेल्या द्रवपदार्थामुळे नाही हे त्यानं बेडकांवर केलेल्या प्रयोगांवरून सिद्ध केलं.


मन आणि मेंदू यांच्यातला संवाद हा मेंदूतल्या पोकळीजवळ असणाऱ्या पिनियल ग्लँडमध्ये होतो असं देकार्तनं मांडलं.मेंदू हा बराच सममितीय (सिमिट्रिक) असतो.पण त्यात मध्यभागी असणारा पिनियल ग्लैंड नावाचा एक भाग मात्र एकटाच असतो.त्याला जोडीदार नसतो.फार पूर्वीपासून माणसाला याविषयी कुतूहल होतं.आत्मा इथंच वास्तव्य करतो असं पूर्वीच्या हिंदू साधूंना वाटायचं.पण देकार्तनं वेगळंच मत मांडलं.आज मात्र ४०० वर्षांनंतर देकार्तची थिअरी फारशी कुणी गंभीरपणे घेत नाही.


मेंदू हा एकसंध आहे की त्याचे अनेक भाग असून,ते शरीराच्या वेगवेगळ्या गोष्टी नियंत्रित करतात याविषयीचा एक वाद मेंदूविज्ञानात अनेक वर्षं रंगणार होता.त्या नाट्यातलं एक पात्र होतं थॉमस विलीस (Thomas Willis १६२१-१६७५).थॉमस हा देकार्तचा समकालीन होता.रॉयल सोसायटीचा संस्थापक असलेल्या विलीसनं रॉबर्ट हुकला आपला मदतनीस म्हणून नेमलं होतं.विलीसनं माणसाच्या मेंदूचे अनेक भाग किंवा कप्पे असतात असं मानलं.

स्मृती,इच्छा, कल्पनाशक्ती या वेगवेगळ्या गोष्टी मेंदूतल्या वेगवेगळ्या भागांमुळे नियंत्रित होतात असं विलीस म्हणे.विलीसनं ॲ्नॅटॉमी ऑफ द ब्रेन' नावाचं पुस्तक लिहिलं.त्या वेळचा प्रसिद्ध ड्राफ्ट्समन आणि आर्किटेक्ट आणि लंडनमधल्या सेंट पॉलच्या कॅथिड्रलचा रचनाकार ख्रिस्तोफर रेन यानं विलीसच्या पुस्तकाकरता चित्रं काढली होती.आजचं मेंदूविज्ञान विलीसनं मानलेले कप्पे जसेच्या तसे फारसे जरी मानत नसले तरी मेंदूतले वेगवेगळे भाग वेगवेगळ्या गोष्टी नियंत्रित करतात हे त्याचं म्हणणं मात्र मान्य करतं.यामुळेच न्यूरॉलॉजी हा विषय सुरू झाला आणि खरं म्हणजे हा शब्दही विलीसनंच पहिल्यांदा वापरला.यामुळेच मेंदूच्या तळाशी असलेल्या रोहिण्यांना विलीसच्या सन्मानार्थ 'सर्कल ऑफ विलीस' या नावानं ओळखलं जातं.


जोहॅन्स पुर्किंजे


मेंदूच्या रचनेविषयी आपल्याला जे समजलं त्यात चेकोस्लाव्हियाचा प्रोफेसर जोहॅन्स पुर्किजे (Johannes Purkinje) १७८७ -१८६९) याचा खूपच मोठा वाटा आहे.मेंदूकडे सूक्ष्मदर्शकातून बघून त्याबद्दल टिपणं करणारा तो पहिलाच शरीरशास्त्रज्ञ होता. माणसांच्या बोटांच्या ठशांचा अभ्यास केल्याबद्दलही त्याला प्रसिद्धी मिळाली होती.मेंदूच्या खालच्या आणि मागच्या बाजूला सेरेबेलम (Cerebellum) नावाचा एक भाग असतो.सेरेबेलममुळे आपण आपला तोल राखू शकतो आणि सगळ्या हालचालीचं सुसूत्रीकरण करू शकतो. सेरेबेलममधल्या एका पेशीचं वर्णन प्रथम पुर्किंजेनं केलं त्यानं वर्णन केलेली ही पेशी खूपच गुंतागुंतीची होती.ही पेशी इतर मज्जापेशींबरोबर चित्रविचित्र तऱ्हेनं जोडली गेलेली होती.पुर्किंजेनं ही पेशी शोधल्यामुळे या पेशीला 'पुर्किंजे पेशी' असं म्हणायला लागले.एका पुर्किंजे पेशीला इतर २ लाख पेशींकडून संदेश येत असतात.ही पेशी खूप मोठीही होती.मानवी केसाएवढी ती जाड होती.पुर्किंजेनं शोधलेली ही पेशी सेरेबेलममधल्या इतर पेशींपेक्षाही सहापट मोठी होती.ही पेशी मोठी असल्यामुळेच त्या काळीही पुर्किंजे ती न्याहाळून त्याचं वर्णन करू शकला होता.आपल्या शरीरात एकूण अशा २.६ कोटी पुर्किंजे पेशी असतात असा कोणीतरी अंदाज बांधला आहे.या पेशी मेंदूत इतर ठिकाणीही विखुरलेल्या असल्या तरी मुख्यत्वेकरून त्या सेरेबलमध्येच सापडतात.


या सगळ्या संशोधनामुळे पुर्किंजेला त्या काळात इतकी अफाट प्रसिद्धी मिळाली होती,की युरोपबाहेरील लोक त्याला पत्र पाठवताना पाकिटावर फक्त पुर्किंजे,युरोप एवढाच पत्ता लिहीत असत आणि अर्थातच पुर्किंजेला ती पत्रं मिळत असत..


११.०१.२५  या लेखातील शेवटचा भाग...