* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: ३.८ मज्जासंस्था-१ / 3.8 Nervous system-1

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

११/१/२५

३.८ मज्जासंस्था-१ / 3.8 Nervous system-1

नर्व्हजच्या माध्यमातून शरीरातल्या संवेदनांचे मार्ग झाडांची मुळं आणि फांद्या यांसारखी सगळ्या शरीरात पसरलेली असतात.अलेसांड्रो बेनेडिट्टी १४९७


या विश्वात मेंदूइतकी गुंतागुंतीची आंतररचना असणारी कुठलीच यंत्रणा सापडणं जवळपास अशक्यच आहे. जरी दोन माणसांचे मेंदू वरवर सारखेच दिसत असले तरी त्यात असंख्य भावनांचे कल्लोळ,आशानिराशेचा लपंडाव, राग,लोभ,वासना,आनंद,दुःख,नैराश्य अशा अनेक भावनांच्या छटा या सगळ्या गोष्टी उमटत असतात हे बघून थक्क व्हायला होतं.आपण ज्या तऱ्हेनं विचार करतो,ज्या तऱ्हेनं नव्या गोष्टी शिकतो,कलेचा आनंद घेतो,आपली बुद्धी,आपला स्वभाव आणि आपले मूड्ज यांचे पडसाद एवढ्या छोट्याशा अवयवात घडत असतात हे या विश्वातलं एक आश्चर्यच आहे.


या मेंदूची रचना कशी आहे? या प्रश्नानं माणसाला हजारो वर्षांपासून चकवलं आहे.पण ही रचना कळणार कशी? मग माणसांनी मेलेल्या माणसांच्या कवटीला भोक पाडून मेंदूचं निरीक्षण करायला सुरुवात केली.हे सगळं ४००० वर्षांपूर्वीपासून चालू झालं.पण त्या काळी आपला आत्मा हा मेंदूत नसून आपल्या हृदयात वास्तव्य करतो असंच लोकांना वाटायचं.अति प्राचीन काळी इजिप्तमध्ये माणूस मेल्यानंतर त्याचं हृदय बराच काळ जपून ठेवलं जाई.पण मेंदू मात्र नष्ट करण्यात येई! नाकाच्या मागच्या बाजूला कवटीला एक मोठं भोक पाडून त्यातून तो मेंदू खरवडून काढून मग तो फेकून देत. तसं केलं नाही तर मेंदूचा भाग कुजून जाईल म्हणून ते हा उपद्रव्याप करायचे.त्या वेळच्या इजिप्शियन सर्जन्सनी थोडंफार जे लिहून ठेवलंय त्यावरून त्या काळी लोकांच्या मेंदूविषयी काय कल्पना होत्या हे लक्षात येतं.


एडविन स्मिथ (Edwin Smith) नावाच्या माणसाला सापडलेला पपायरस (Papyrus) हा याविषयीचा इतिहासातला सर्वात जुना दस्तऐवज ख्रिस्तपूर्व २५०० मधला आहे. तो बहुधा इम्होटेप (Imhotep) यानं लिहिला असावा असं म्हटलं जातं.

डोक्याला आणि हातापायाला जखमा झाल्या आहेत अशा ४८ रुग्णांची वर्णनं यात आहेत.एडविन स्मिथ या इजिप्तच्या इतिहासकाराच्या हाती जेव्हा ही वर्णनं पडली.तेव्हा त्यानं १८६२ साली ती लक्झर (Luxor) हून परत आणली.पण त्याला त्यांचा अर्थ न लागल्यामुळे त्यांचं महत्त्वही कळलं नव्हतं.पण १९३० साली जेम्स ब्रेस्टेड (James Brested) या शिकागो ओरिएंटल इन्स्टिट्यूटच्या डायरेक्टरनं जेव्हा बारकाईनं बघितलं तेव्हा हा ५००० वर्षांपूर्वीचा दस्तऐवज असल्याचं त्याच्या लक्षात आलं.यात ज्या केसेसचं वर्णन केलं होतं त्यातल्या सहाव्या केसमध्ये मेंदूच्या कार्याबद्दल खूपच महत्त्वाची माहिती होती.त्यात मेंदूवरची आवरणं (मॅब्रेन्स),मेंदूमधला सेरेब्रोस्पायनल द्रवपदार्थ याबद्दल माहिती होती.या पपायरसमध्ये आणखीही खूप माहिती होती.मेंदूच्या एका भागाला दुखापत किंवा जखम झाल्यावर शरीराच्या विरुद्ध बाजूचे अवयव कसे लुळे पडतात याविषयीही लिहिलं होतं.मेंदूला एका विशिष्ट ठिकाणी इजा झाल्यावर त्याचा बोलण्यावर कसा परिणाम होतो याचंही त्यात विवेचन केलं होतं.


 १८६० साली डॉ.पॉल पिअरे ब्रोका यानं आपल्या मेंदूतला कुठला भाग आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवतो हे शोधून काढलं.पण साधारण ५००० वर्षांपूर्वी इजिप्शियनांनी ते ओळखलं होतं !


आपल्या शरीराचा हृदयाइतकाच किंवा त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचा अवयव म्हणजे मेंदू आहे हे माणसाला कळायला हजारो वर्षं जाणार होती. 


ग्रीक विचारवंतांमध्येही मेंदू,आत्मा आणि मन यांच्याविषयी कुतूहल होतंच.ख्रिस्तपूर्व ५१० मध्ये अल्केमॉन (Alcmaeon) नावाचा एक विचारवंत राहायचा.पायथँगोरसचा हा शिष्य होता.त्यानंच सर्वप्रथम विच्छेदनाची (डिसेक्शन) कल्पना मांडली. त्याला मेंदूचं महत्त्व सगळ्यात पूर्वी कळलं होतं. आपल्याला ज्या जाणिवा (सेन्सेशन्स) होतात त्यांचं केंद्रस्थान मेंदूतच आहे हे त्यानं ओळखलं होतं.त्यानं एका प्राण्याचा डोळा काढला आणि डोळ्यांपासून संदेश कसा आणि कुठे जातो याचा त्यानं मागोवा घेतला तेव्हा तो संदेश मेंदूपर्यंत जातो हे त्याच्या लक्षात आलं. अल्कॅमेऑनची काही मतं मात्र गंमतशीरच होती. 


आपल्या मेंदूतल्या रक्तवाहिन्या पूर्णपणे भरलेल्या असल्या की आपल्याला झोप येते आणि त्या रिकाम्या झाल्या म्हणजे आपल्याला जाग येते असं काहीसं चमत्कारिक मत तो मांडत असे.तसंच आपल्या डोळ्यांत अश्रूप्रमाणेच अग्नीही असतो असंही तो म्हणे! गंमत म्हणजे त्यानं ऑप्टिकल नर्व्ह बघितली असूनही आपल्या सेन्सेसमधून मेंदूपर्यंत संदेश हवेतून प्रवास करतात असं तो म्हणे !


हिप्पोक्रेट्सलाही हृदयापेक्षा मेंदूच महत्त्वाचा वाटे. मेंदूमधूनच सुख,दुःख,वेदना,आनंद,हास्य,द्वेष वगैरेंसारख्या भावना निर्माण होऊन आपल्यासमोर प्रगट होतात असं तो म्हणे.मेंदूमुळेच आपण विचार करू शकतो,बघू आणि ऐकू शकतो,सुंदर आणि कुरूप किंवा सुखकर आणि दुःखदायी किंवा चांगलं आणि वाईट यांच्यात फरक करू शकतो असंही तो म्हणे.आपण वेडे आहोत की शहाणे,आपल्याला कशाची भीती आणि चिंता वाटते,आपल्याला झोप येते का नाही आणि आली तर कशी आणि केव्हा,

आपल्यामध्ये विसरभोळेपणा कसा येतो आणि आपण गोष्टी लक्षात कशा ठेवतो याचं रहस्य मेंदूतच दडलं आहे असं त्यानं म्हणून ठेवलं होतं. इतक्या पूर्वी आधुनिक प्रयोगशाळा आणि उपकरणं नसताना त्यानं हे म्हणून ठेवावं हे एक आश्चर्यच होतं.


आपली कारणमीमांसा आपल्या मेंदूत,आपला आत्मा आपल्या हृदयात तर आपली भूक आपल्या पोटात दडलेली असते आणि या सगळ्या गोष्टी आपल्या पाठीतल्या कण्यातल्या 'मॅरोज'नं एकमेकांशी जोडलेल्या असतात,आपल्या भावना रक्तवाहिन्यांमधून वाहतात असं प्लेटोला वाटायचं.आपल्या स्मृती या मेणाच्या ब्लॉकसारख्या असतात,त्यावर आपण काही कोरलं तर जसं ते टिकून राहतं तशीच आपली स्मृती असते आणि मेण जसं लवकर वितळतं तसंच काहींच्या लक्षात फारसं राहात नाही असं तो म्हणे.पुढे सतराव्या शतकात जॉन लॉक आणि विसाव्या शतकातला बिहेवियरिस्ट (वर्तनवादी) मानसशास्त्रज्ञ जॉन वॉटसन (John Watson) हे दोघंही असंच काहीतरी मांडणार होते.आपला अनुभव आपल्या मनाच्या कोऱ्या पाटीवर जे लिहीत असतो त्यातूनच आपलं ज्ञान वाढतं असं त्याचं म्हणणं होतं.(सजीव-अच्युत गोडबोले,अमृता देशपांडे,मधुश्री पब्लिकेशन)


ख्रिस्तपूर्व ३८४-३२२ च्या दरम्यान ॲरिस्टॉटल हा प्लेटोचाच शिष्य एक मोठा तत्त्वज्ञ म्हणून प्रसिद्ध होता.ॲरिस्टॉटलला मेंदूपेक्षा हृदय जास्त महत्त्वाचं वाटे. किडे,अळ्या,शेलफिश आणि अनेक खालच्या प्राण्यांमध्ये धडधडणारा हृदयासारखा अवयव होता, पण त्यांना मेंदू आहे का हे मात्र स्पष्ट होत नव्हतं. त्यांच्या शरीरातल्या सगळ्या रक्तवाहिन्या हृदयाकडेच धाव घेत होत्या.

स्पर्श केल्यावर हृदय कसं एकदम झटका लागल्यासारखं आखडतं,पण मेंदूला स्पर्श केल्यावर तसं काहीच होत नाही हेही ॲरिस्टॉटलनं न्याहाळलं होतं.कोंबडीचं डोकं कापल्यावरही ती काही काळ का होईना पण पळू शकते हे त्यानं बघितलं तेव्हा तर मेंदूपेक्षा हृदयच जास्त महत्त्वाचं आहे आणि तेच शरीराला नियंत्रित करतं,त्यातच आपल्या आत्म्याचं वास्तव्य असतं याबद्दल त्याची खात्री पटली.मेंदूचं महत्त्व हृदयाएवढं नक्कीच नाही आणि रक्त थंड करणं हेच मेंदूचं काम आहे असंही त्याचं मत बनलं.त्याच्या मते मनासकट इतर अनेक गोष्टींना हृदय हेच जबाबदार होतं.ॲरिस्टॉटलचा प्रभाव हा मानवी संस्कृतीवर एवढा जबरदस्त पडला,की त्यामुळेच माणूस मनाचा संबंध किंवा त्यातल्या भावनांचा संबंध हा अजूनही हृदयाशी जोडतो.

त्यामुळेच प्रेमी माणसं एकमेकांना दिल देऊन बसतात वगैरे.अनेक शतकांनंतर शेक्सपीअरनं 'मर्चेंट ऑफ व्हेनिस' मध्ये याविषयी दोन ओळी लिहिल्या होत्या.आपली कल्पनाशक्ती कशात वास्तव्य करते?हृदयात की मेंदूत? असा त्यात त्यानं सवाल केला होता.


ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकात शरीररचनाशास्त्राचा (ॲनॅटॉमी) पितामह समजला जाणारा हिरोफिलस (Herophilus) ख्रिस्तपूर्व ३३५-२८०) आणि हिरोफिलसचा तरुण वारस इरँसिस्ट्रस(Erasistratus) या शरीररचनाशास्त्रज्ञांनी हजारो मानवी शरीरांचं शिवविच्छेदन केलं आणि मज्जातंतू नर्वस या रक्तवाहिन्यांपेक्षा वेगळा असतात हे दाखवून दिलं.


शिल्लक राहिलेला भाग पुढील लेखांमध्ये…