सीझरही वेळ न गमावता इजिप्तकडे निघाला.तिथे पोहोचताच त्याला दिसलेली पहिली वस्तू म्हणजे भाल्याच्या टोकांवर असलेले पॉपचे शीर! इजिप्तमधील त्याच्या मित्रांनी त्याचा त्रास वाचविला.
जावयाला ठार मारण्याची त्याची चिंता संपली.जावयाच्या शिराची भेट इजिप्तमधील त्याच्या मित्रांनी त्याला दिली।
पॉपे मेला.पण त्यामुळे यादवी संपली असे मात्र नव्हे, जगाच्या नाना भागांत त्याचे अनेक मित्र,नाना प्रकारची कृष्णकृत्ये करीत होते;बंडाची भाषा बोलत होते.पण त्यांची खोड मोडण्यापूर्वी तो इजिप्तमध्येच टॉलेमीचे राजघराणे नीट व्यवस्थित करण्यासाठी थोडा थांबला. टॉलेमी वारला,तेव्हा त्याच्यामागे त्याच्याच नावाचा एक मुलगा होता व आर्सिनी आणि क्लिओपाट्रा नावाच्या दोन मुली होत्या.ही तिन्ही मुले सिंहासनासाठी झगडत होती.
क्लिओपाट्रा हिने सीझरची मदत मागितली.त्या वेळी सीझर चौपन्न वर्षांचा होता.त्याला टक्कल पडले होते व मधूनमधून फिट्सही येत असत.क्लिओपाट्रा तारुण्याच्या ऐन भरात होती! तिचे वय अवघे एकवीस वर्षांचे होते.सीझरने तिची विनंती एकदम मान्य केली व तिला इजिप्तची निःशत्रू राणी केले.
सीझर हा रोममधला अत्यंत हुशार व पाताळयंत्री मुत्सद्दी होता.पण तो जगातील अत्यंत हुशार अशा एका नारीच्या हातातील बाहुले बनला। रोमला परतून तेथील आपसातील यादवी बंद करण्याऐवजी तो इजिप्तमध्येच कित्येक महिने रेंगाळत राहिला.
क्लिओपाट्रा हिचे कोमल बंधन तोडणे,तिच्या मंत्रमुग्धतेतून मुक्त होणे, त्याला जड जात होते.आयुष्याच्या सायंकाळी आरंभिलेल्या त्या अनंगरंगात तो दंग आला! तिने त्याला नील नदीत नौकाविहार करण्यास चला,म्हणून विनविताच तो कबूल झाला.राजशाही नौका सिद्ध झाली.ती जणू तरता राजवाडाच होती! तिच्यावर नारिंगी व शेंदरी पडदे सोडण्यात आले होते नौकेचा नाळ सोन्याचा होता,
वल्ही चांदीची होती,पन्नास वल्हेवाले डुबुकडुबुक करीत वल्ही मारीत,तेव्हा त्यांची चांदीची टीके कशी चमकत ! पूर्वी कोणत्याही मर्त्य मनुष्याने अनुभविले नसेल अशा साम्राज्याच्या स्वप्नात तो स्वतःला विसरून गेला! तो मनात म्हणत होता,मी आता इटलीत जाईन,काल्पूर्नियाशी काडीमोड करीन, क्लिओपाट्रा हिला आणीन व मग देवाच्या दयेने आम्ही उभयता रोम,इजिप्त व सारी पृथ्वी यांचे स्वामी होऊ.मी पूर्वी धर्माचार्य असता केलेली देवाची सेवा देव थोडेच विसरतील? ते माझे स्वप्न पुरे करतीलच."
सीझर क्लिओपाट्रा हिच्या चाहुपाशात स्वप्नसृष्टीत रमला;
इजिप्तमधील सुंदरीच्या हातातल्या बांसऱ्यांवरील गीतवादन तो ऐकत होता.पण तिकडे पॉपचे मित्र काही स्वस्थ बसले नव्हते.
त्यांनी निरनिराळ्या रोमन प्रांतांत बंडाळ्या उभ्या केल्या.खुद्द रोम शहरही बंड करून उठले.सीझर वेळीच न उठल्यास व त्याने तिकडे लक्ष न दिल्यास त्याचेही डोके पॉपेच्या डोक्याप्रमाणेच भाल्याच्या टोकावर नाचविण्यात येण्याचा संभव दिसू लागला.
म्हणून त्याने मोठ्या नाखुशीने इजिप्तमधील मेजवान्या, सुखोपभोग व विलास आणि उंची वस्त्रे टाकून देऊन रणवेश (चिलखत व शिरस्त्राण) धारण केला.क्लिओपाट्रा हिच्या पोटात गर्भ वाढत होता. निघताना त्याने तिला 'बाळ जन्माला येताच मी तुला घेऊन जाईन'असे अभिवचन दिले.
सीझर एकदम रोमला गेला नाही.आपण इजिप्तमधील सुखोपभोगात रंगलो,दंग झालो याबद्दल त्याला लाज वाटत होती.त्याच्या मित्रांची व चाहत्यांची तो इजिप्तमधील रणांगणावर मोठमोठे विजय मिळवील अशी अपेक्षा होती.पण त्याने केवळ एकच विजय मिळविला.आणि तोही कोठे? तर इजिप्तच्या राणीच्या विलासमंदिरात ! क्लिओपाट्रा हिच्या सदिच्छांहून अधिक भरीव असे काहीतरी रोमला घेऊन जावे अशी त्याची मनीषा होती.म्हणून आशियामायनरमधील एका बंडखोर प्रांतावर पॉन्टवर त्याने स्वारी केली व फारशी तकलीफ न पडता तेथील बंडाचा मोड केला.नंतर आपण पूर्वीचेच प्रतापी सीझर आहोत हे रोमन जनतेला पटविण्यासाठी आपल्या विजयाचे वर्णन 'मी आलो,मी पाहिले आणि मी विजय मिळविला!' या तीन सुप्रसिद्ध गर्विष्ठ व अहंमन्यतापूर्ण वाक्यांत पाठविले.जणू मर्त्यांशी दोन शब्द बोलण्याची कृपा करणाऱ्या एखाद्या देवदूताचेच ते शब्द होते! तो रोमला यावयास सिद्ध झाला.त्याच्या आशियातील विजयाची वार्ता आधीच पोहोचली होती.ती ऐकून रोमन जनता वेडी झाली.तिने त्याचे भव्य स्वागत केले.आणखी दहा वर्षे आपणच हुकूमशहा राहणार असे घोषवून त्याने क्लिओपाट्रा हिला आणण्यासाठी लवाजमा व लष्कर पाठवून दिले. ती आपल्या बाळाला घेऊन आली.तिने त्याचे नाव 'सीरियन' म्हणजे 'छोटा सीझर' असे ठेवले होते. तिजबरोबर तिची बहीण आर्सिनो हीही आली होती; पण पाहुणी म्हणून नव्हे तर कैदी म्हणून.सीझरने आपल्या विजयी मिरवणुकीत त्या अभागिनीला शृंखला घालून रोमन लोकांसमोर मिरविले व मग ठार केले. क्लिओपाट्रा हिच्या मर्जीसाठी म्हणून त्याने हे नीचतम कृत्य केले.काल्पूर्विया हिच्याशी काडीमोड करण्याचे धैर्य त्याला झाले नाही.क्लिओपाटा हिच्यासाठी त्याने टायचर नदीच्या पैलतीरी भव्य प्रासाद बांधला व आपणास केवळ रोमची राजा-राणी म्हणून नव्हे; तर देवदेवता मानून जनतेने भजावे,पूजावे यासाठी दोघे कारस्थाने करू लागली.
सीझरने स्वतःचे एक मंदिर बांधिविले व त्यात आपले दोन पुतळे उभे केले.त्याची पूजाअर्चा करण्यासाठी व तिथे यज्ञयाग करण्यासाठी त्याने पुजारी नेमले व सीझरच्या नावे घेतलेले शपथ 'जोव्ह' देवाच्या नावे घेतलेल्या शपथेइतकीच पवित्र,असे फर्मान काढले. खेळाच्या निरनिराळ्या मिरवणुकी निघत,त्यात इतर देवदेवतांच्या चित्रांप्रमाणे आपलेही चित्र पाहिजे,असे त्याने आज्ञापिले.आणि हे जे आपले अमर मानसन्मान तो करून घेत असे,त्यात क्लिओपाट्राही सहभागी असे.
'अजिंक्य देव,ज्यूपिटर ज्यूलियस' याच्या चित्राशेजारी किंवा पुतळ्याशेजारी 'व्हीनस देवतेची दिव्य बहीण क्लिओपाट्रा' हिला 'प्रेमदेवता व्हीनस हिची बहीण' म्हणून संबोधी.
देवत्वाचा मान स्वतःकडे घेण्याची सीझरची वृत्ती पृष्कळ रोमनांना आवडली नाही,त्यांना या गोष्टीचा राग आला. पण सीझरने देवत्व घेतल्याबद्दल त्यांना जितका राग आला,त्यापेक्षा जास्त राग तो रोमचा राजा होऊ पाहत होता,याबद्दलच त्यांना आला.त्याने आपल्यासाठी एक सुवर्णसिंहासन तयार करण्याची आज्ञा दिली व मुकुट धारण करण्यासाठी योग्य संधीची तो वाट पाहात बसला.ही संधी एका रोमन सणाच्या वेळी आली,असे त्याला वाटले.लोकांची नाडीपरीक्षा करण्यासाठी अर्धवट गमतीने व अर्धवट गंभीरपणे त्याने त्या दिवशीच्या उत्सवात मार्क ॲन्टोनी याला खेळात राजा करावे असे सुचविले.तद्नुसार ॲन्टोनी राजा झाला.खेळातलाच राजा;पण आजूबाजूच्या जनतेला राजाचा खेळ आवडला नाही.
सीझर दुरून सर्व पाहत होता.त्याने जाणले की,मुकुट धारण करण्याची वेळ अजून आली नाही.म्हणून त्याने तो बेत पुढे ढकलला व रोमन रिपब्लिकचे अनियंत्रित राजशाही रोमन साम्राज्यात परिवर्तन करण्याला परिपक्व वेळ अजून आली नाही,हे ओळखून वाट पाहण्याचे ठरविले.
दरम्यान स्पेनमध्ये पाँपेच्या इनायस व सेक्स्टस नामक दोघा मुलांनी रोमविरुद्ध म्हणजेच सीझरविरुद्ध बंड केले व ते दिवसेंदिवस वाढणार असे दिसू लागले.उपेक्षा करून चालण्यासारखे नव्हते,म्हणून सीझरला पुन्हा एकदा सैन्याचे आधिपत्य घेणे भाग पडले.त्याने स्पेनमधील पुंडावा मोडला व पाँपेच्या दोन्ही मुलांना ठार केले.सीझरने रोमला परत येताच आमरण हुकूमशाही जाहीर केली.त्याने याप्रसंगी अत्यंत भयंकर चूक केली. पॉपेच्या मुलांवर मिळविलेल्या विजयाप्रीत्यर्थ होणाऱ्या सार्वजनिक उत्सावांत तो स्वतःचा सत्कार करून घेणार होता.
त्याचा हा अहंकार अक्षम्य होता.क्षुद्रतेचे प्रदर्शन असह्य होते.रोमन लोकांनी आतापर्यंत खूप सहन केले. पण आपसांतील यादवीमुळे झालेल्या रोमनांच्याच कत्तलीप्रीत्यर्थ होणारा सत्कार समारंभ त्यांना असह्य वाटला.आपल्याच बांधवांचे रक्त सांडल्याबद्दल व शिरकाण केल्याबद्दल ऐट मारणे हे त्यांच्या मते माणुसकीला काळिमा फासणारे होते.
देव कधी चुकत नाही या विश्वासाने सीझर सत्कार समारंभाची योजना पुरी करण्याच्या खटाटोपास लागला.ख्रि. पू. ४४ सालच्या मार्चच्या पंधरा या तारखेस तो सिनेट हाऊसमध्ये आला तेव्हा तो अत्यंत आंनदी दिसत होता.कारण,रोमबाहेरील सर्व रोमन प्रांतांचा रोमन सम्राट म्हणून त्याची नेमणूक त्या दिवशी सिनेटरांकडून होणार होती.त्यानंतर खुद्द रोमचा सम्राट म्हणून त्याच्या नावाने द्वाही फिरण्यास कितीसा अवकाश होता? पण...!
हातांत मुकुट घेऊन सिनेटर आपल्या स्वागतार्थ पुढे येतील अशा आशेने सिनेटहाऊसमध्ये पाऊल टाकणाऱ्या सीझरला मुकुट प्रदानाऐवजी खंजिरांच्या तेवीस प्रहारांची सलामी मिळाली!
सीझरवर प्राणांतिक प्रहार करणाऱ्यांत त्याचे पुष्कळ जिव्हाळ्याचे स्नेहीही होते.त्यांतील एक प्रमुख कटवाला ब्रूटस हा आपलाच अनौरस पुत्र आहे असे सीझरला वाटण्यास भरपूर पुरावा होता.
इतिहासाच्या ग्रंथांमध्ये सीडारचे वर्णन 'एक थोर व मोठा मुत्सद्दी असे करण्यात येत असते.पण इतिहासकारांनी वाहिलेली स्तुतिसुमनांजली दूर करून सीझरचे खरे स्वरूप पाहिल्यास काय दिसेल? तो पक्का गुंड व खुनी, बुद्धिमान खुनी होता.तो प्रचंड प्रमाणावर कत्तली करण्याच्या योजना आखणारा कर्दनकाळ होता.तो वेडा पीर होता.त्याच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेसाठी एकट्या रोम शहराला एक लक्ष साठ हजार लोकांना मुकावे लागले!त्याचे जीवन म्हणजे रोमन लोकांना खरोखर शापच होता.पण तो मेला तरीही रोमन लोकांना हायसे वाटले नाही.सीझरचा खून होताच त्याची जागा बळकावण्यासाठी अनेक गुंड पुढे आले.रोमची मालकी मिळविण्यासाठी आपल्याच बांधवांच्या कत्तली करीत राहणे,पुष्कळ प्रमुख रोमन पुढाऱ्यांचा अनेक वर्षेपर्यंत एकच धंदा होता.
२१.०१.२५ या लेखातील शेवटचा भाग…!