* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: पुस्तकातील नोंद / Book Entry 

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

७/१/२५

पुस्तकातील नोंद / Book Entry 

१६७२ च्या सुमारास कोल्हापूर जिल्ह्यातल्या नेसरीजवळच्या एका छोट्याशा वाडीवर एक स्त्री प्रवाशांच्या राहण्याजेवण्याची सोय करत होती हे ध्यानात येतं.असा स्वतंत्र व्यवसाय करणारी त्या काळातली ती स्त्री हा खरंच अभ्यासण्याचा विषय आहे.त्या काळात वसईत तयार होणारी साखर ही इराण आणि अफगाणिस्तानात निर्यात होत होती हे वाचलं की भारतातल्या साखर उद्योगावर नवा प्रकाश पडतो.त्या काळात मुंबईत हॉटेल आणि खाणावळ होती यात नवल काय? कारण तशी सोय तर अगदी हुक्केरीतही होती आणि तिचा लाभ ॲबेकॅरेनं घेतला होता हे आपल्याला समजतं.एकूणच त्या काळातही हा व्यवसाय किती भरभराटीला आला असेल हे लक्षात येतं.


कॅरेजवळ काही घड्याळं होती आणि त्यापैकी काही गजराची घड्याळं होती.


कॅरे त्याच्या सम्राटांचे काही आदेशाने गोपनीय कागद भारतात घेऊन आला होता.इथल्या त्यांच्या प्रशासनाला ते द्यायचे होते.


व्हर्जिल'मधील एक प्रसिद्ध वाक्य (खरं तर हे वाक्य 'व्हर्जिल'मधलं नाही.ते वाक्य असं : 'जोपर्यंत तुमच्या सोबत नशीब असते तोपर्यंत तुमच्या मित्रांची संख्या कायम असते.पण तेच नशीब झाकोळते तेव्हा तुम्ही एकटेच असता.')


कोल्बेर : फान्सच्या राजाचा मुख्य कारभारी.


हायमाय रोझरी : येशू आणि मेरीचु प्रार्थना घरी किंवा चर्चमध्ये तीन धर्मगुरूंच्या उपस्थितीत केली जाते.ही प्रार्थना विवाह,

नामकरण किंवा धार्मिक सणादिवशी करतात.या प्रार्थनांचं संकलन असलेलं पुस्तक म्हणजे रोझरी.रोझरी ही लॅटिन शब्द असून त्याचा अर्थ गुलाबाचा मुकुट' किंवा 'गुलाबाचा हार',रोझरी ही कॅथॉलिक चर्चमध्ये डोमिनिकन जपमाळेतील मणी मोजत प्रार्थना करण्याची पद्धत.आजच्या ख्रिस्ती जगात बहुतेक ख्रिस्ती लोक हे प्रार्थनेसाठी रोझरीची म्हणजे जपमाळेची पद्धतच वापरतात.ह्यात रोमन कॅथॉलिक पंथीय अग्रेसर आहेत.इतर ख्रिस्ती पंथीय व प्रोटेस्टंट पंथीयांनुसार ही पद्धत शास्त्रानुसार नाही,म्हणून ती ते नाकारतात.


 लेंट : ख्रिश्चन धर्मातील उपवासाचे व्रत.ॲश वेन्सडे ते ईस्टरपर्यंत चाळीस दिवसांच्या अगोदर हे व्रत पाळले जाते.लेंट म्हणजे पुनरुत्थान दिवसाच्या अगोदर येणारे चाळीस दिवस.लेंटचा पहिला दिवस म्हणजे 'राखेचा बुधवार'.


बारबेरी चाचे : समुद्रीचाचे म्हणजे समुद्रावरील लुटारू.हे किनाऱ्याजवळून जाणारी जहाजं अडवून किंवा त्यावर प्रवेश करून खलाशांना धमकावतात.जहाजावरील मालाची लूट करतात. हल्ली अशी जहाजं ओलीस ठेवून खंडणी मागण्याचा प्रयत्न केल्याची अनेक उदाहरणे आहेत.आफ्रिकेच्या किनारपट्टीचा काही भाग आणि नायजेरिया अशा प्रकारासाठी कुप्रसिद्ध होता.गेल्या काही वर्षांत सोमालिया आणि एडनचे आखात अशा चाचेगिरीचं केंद्र बनले आहे.आशिया खंडात इंडोनेशिया,मलेशिया, थायलंडच्या किनाऱ्यालगत आणि मलायाच्या आखातात असे प्रकार वारंवार घडतात. जगभरातील अशा चाच्यांच्या हल्ल्यांची नोंद ठेवणारे आणि जहाजांना सावध करणारे अँटिपायरसी केंद्र मलेशियात आहे.तिथून अशा चाच्यांची माहिती जहाजांच्या कप्तानांना दिली जाते आणि संरक्षणही पुरविले जाते.


पाम संडे : ईस्टर संडेच्या एक आठवडा अगोदर साजरा केला जाणारा ख्रिश्चन सण,जेरूसलेम नगरीत येशूचा प्रवेश आणि त्यानंतरची मेजवानी तसेच येशूचे बलिदान याची सुरुवात झावळ्यांच्या या रविवारने होते.म्हणून याला 'झावळ्यांचा रविवार'असे म्हणतात.नव्या करारातील चारही शुभवर्तमानामध्ये याचा उल्लेख.


पिस्टोइल्स : सोन्याचे स्पॅनिश नाणे.१९३६ मध्ये याचे मूल्य साधारण सव्वा आठ रुपये होते.


क्राऊन : इक्यूज इतक्या किमतीचे नाणे. इक्यूजसाठी संदर्भ टीपा : प्रकरण तीन.


लीग : अंतर मोजण्याचे एकक.एक लीग म्हणजे दोन मैल सातशे त्रेचाळीस यार्ड इतके अंतर. अर्थात ३.८ किलोमीटर.


पियास्ट्री : मध्य आशियातील एक चलन. इटालीमध्ये सोळाव्या शतकात चांदीच्या किंवा धातूच्या थाळीसाठी वापरला जाणारा शब्द. त्यालाच पुढे चलन हा अर्थ मिळाला.एक पियास्ट्री म्हणजे पौंडचा शंभरावा भाग.१९५० पासून हे चलन जॉर्डनमध्ये चलनात आहे.१९९३ पर्यंत तुर्कीतही ते चलनात होते.नंतर ते चलनातून बाद करण्यात आले.तुर्कीतील लियारा किंवा लिरा या चलनाचा शंभरावा भाग ही त्याची किंमत होती.


हरिकेन वादळ : पश्चिम पॅसिफिक महासागरात तयार होणारे वादळ.समुद्रावर तयार होऊन जमिनीकडे येणाऱ्या चक्रीवादळांना हिंदी महासागरात 'सायक्लोन' वायव्य पॅसिफिकमध्ये 'टायफून' आणि ईशान्य पॅसिफिक व अटलांटिक महासागरात 'हरिकेन' म्हणतात.ही उष्णकटिबंधीय चक्रीवादळं तीव्र कमी दाबाचे केंद्र आणि त्याच्याभोवती वेगाने फिरणारी हवा यांच्यामुळं तयार होतात.ही चक्रीवादळं जेव्हा जमिनीवर पोहोचतात तेव्हा प्रचंड वेगानं वारे वाहू लागतात आणि बहुधा पाऊसही पडतो.ही वादळे नॉर्थइस्टर,युरोपियन विंडस्टोन आणि ध्रुवीय अपभार यांच्या तुलनेत वेगळया औष्णिक प्रणालीद्वारे तयार होतात.


असेंशन डे : ख्रिस्ती लोकांमध्ये पुष्कळ उत्सव आहेत.त्यांना खूप महत्त्वही आहे. ईस्टर हा सर्वांत महत्त्वाचा सण. याशिवाय असलेले सण म्हणजे लेंट,होली,वीक,असेंशन, डे, ट्रॅन्सफिग्यूरेशन ऑफ अवर लॉर्ड,पेंटेकॉस्ट, ट्रिनिटी संडे,कॉपर्स ख्रिस्टी,अडव्हेंट,सेंट जॉन दि बॉप्टिस्टचा आणि सेंट मायकेलचा उत्सव.


अलेक्झांड्रेटा : अलेप्पोपासून ११५ किलोमीटरवरचे तुर्कस्थानातील ठिकाण.


हरकारा : मध्ययुगीन कालखंडात कागदपत्रांची ने-आण करण्याचं काम हरकारे करत असत.ही पत्रे लवकरात लवकर पोहोचवणे आवश्यक असे.यासाठी हरकाऱ्यांना लहानपणापासूनच तसे शिक्षण दिले जात असे.हिंदुस्थानात असे हरकारे तयार करण्यात पुढाकार घेतला तो मुघल सम्राट अकबराने.त्याबाबची नोंद अबुल फझलने त्याच्या 'ऐन ए अकबरी'त केली आहे.हे हरकारे गुप्तहेर म्हणूनही काम करत.अकबराच्या राज्यात असे हजार हरकारे असल्याची नोंद अबुल फझलनं केली आहे. इ.स.१५८० मध्ये जेझुईट पाद्री फादर मोन्त्सेराने अकबराच्या दरबाराला भेट दिली होती.त्यानेही अकबराच्या या हरकाऱ्यांची आणि त्यांना दिल्या जात असलेल्या शिक्षणाची नोंद आपल्या प्रवास वर्णनात केली आहे.तो लिहितो की अशा लोकांच्या पायात शिशापासून तयार केलेले बूट घातले जात आणि त्यांना एका जागेवर थांबून टाचा कुल्ल्याला लागतील अशा प्रकारे जलद धावण्याचा सराव करायला लावत. (यावरूनच मराठीत 'जलद पळणे' या अर्थाचा वाक्प्रचार अस्तित्वात आला. तो म्हणजे 'ढुंगणाला पाय लावून पळणे.') अशा जलद धावू शकणाऱ्या लोकांमार्फतच त्या काळात कागदपत्रे पाठवली जात.या लोकांना म्हणत हरकारे.इराणवरून भारतात येणाऱ्या अशा हरकाऱ्यांविषयी बातीस्त ताव्हेर्निये या प्रवाशानेही अनेक नोंदी केल्या आहेत.हा फ्रेंच व्यापारी सतराव्या शतकात अनेकदा भारतात येऊन गेला होता.भारतातल्या अशा हरकाऱ्यांची नोंद दुसरा एक फ्रेंच प्रवासी तेवनो यानंही केली आहे.मराठेशाहीतही असे हरकारे असत.त्यांना म्हणत,काशीद किंवा जासूद.


दरवेशी : अस्वलाच्या नाकात वेसण घालून त्याचे खेळ करणारा.मलंग.


आलू बुखार : पहाडी प्रदेशात येणारे एक रसयुक्त फळ.बीजयुक्त असणारे हे फळ लाल, काळ्या,पिवळ्या आणि हिरव्या रंगांचे असते. आंबट गोड चवीच्या या फळाची साल अगदी पातळ असते.याचा रस आंबवून मद्य तयार करतात.हे फळ वाळवूनही खाल्ले जाते.यात रोगप्रतिकारक शक्ती जास्त असते.बद्धकोष्ठतेवर हे फळ गुणकारी आहे.


बार्ली : आपल्याकडे क्वचित वापरले जाणारे धान्य. मूत्र मार्गातील बिघाडावर बार्लीचे पाणी दिले जाते.गव्हाच्या दाण्यापेक्षा थोडे मोठे असणारे बार्लीचे पांढरट दाणे भिजवून त्यांना मोड आणले की त्यात जे माल्टोज तयार होते ते अनेक स्वीटनरमध्ये वापरले जाते.बार्लीमधील फायबर आतड्यामधून अन्न पुढे सरकायला मदत करते,शिवाय त्यातले उपयुक्त बॅक्टेरिया वाढवते.त्यामुळं पोटाच्या सर्व विकारांवर विशेषतः अतिसार आणि पोटदुखीवर बार्ली उत्तम. बार्लीच्या सेवनाने कोलेस्टेरॉल आणि मधुमेह आटोक्यात राहण्यास मदत होते.हृदयरोगालाही प्रतिबंध होतो.मोड आणून शिजवून किंवा पीठ करून बार्लीचा वापर अनेक पदार्थांत केला जातो.


अबा : अरबी पोशाखात लांब बाह्यांचा लांबलचक पांढरा सदरा विशेष प्रचारात होता. त्याला म्हणत, 'अबा.' केसापासून तयार केलेला हा झगा सणावारी उपयोगात आणत.


 काठवट : काठवट किंवा काटवट म्हणजे स्वयंपाकासाठीची लाकडी परात.आंब्याच्या मऊ लाकडांपासून ही तयार केली जात असे.


गोंडोला : गोंडोला म्हणजे वेत आणि गवतापासून बनवलेली हौदासारखी मोठी पाटी. तिला बाहेरून डांबर लावलेलं असते.या गोंडोलात एकावेळी दोन-तीन लोक बसू शकत होते.आपल्याकडे जशी काहिल असते तसाच हा गोंडोला.व्हेनिस शहरातील कालव्यातून वाहतूक करणारी बोट.


धो : याला 'डाव' असेही एक नाव.एक डोलकाठी व त्रिकोणी शीड असलेली जुन्या पद्धतीची अरबी होडी.गुलामांचा व्यापार करण्यासाठी ती वापरण्यात येत असे.अरबी समुद्रात आढळणारे हे धो दोनशे टनी असत.


डिंगी : एक लहान नाव.अंदाजे तीस फूट लांब पण अतिशय अरुंद अशी रबरी होडी.हिचा मागचा भाग नाळीप्रमाणे चिंचोळा असून ती जलदगतीने नेता येते.मुंबईवर हल्ला करण्यासाठी आलेल्या अजमल कसाबने मुंबईच्या किनारपट्टीवर उतरण्यासाठी अशीच छोटी डिंगी वापरली होती.पाकिस्तानातून येताना तो 'कुबेर' जहाजातून आला होता आणि नंतर अशी छोटी डिंगी त्याने वापरली होती.


 खंबायत : गुजरातचा सुलतान बहादूरशहा यानं दीव हे बेट पोर्तुगीजांच्या हवाली केले होते.या भागालाच युरोपीय लोक 'कॅम्बे' म्हणत.कच्छ व काठेवाडमधला भूभाग यात अंतर्भूत होता.हा सगळा भाग गुजरात राज्याचा होता.खंबायतचे आखात म्हणून तो ओळखला जात होता.


इक्यू : युरोपीय देशातले आणि फ्रान्समधले जुने चलन.सहाव्या लुईच्या काळात ते चलनात आले. सोन्याच्या या नाण्याचा आकार नवव्या लुईच्या काळात म्हणजे सन १२९९ मध्ये वाढवण्यात आला.लॅटिन भाषेत 'इक्यू' म्हणजे ढाल. सोन्याच्या या नाण्यांवर फ्रान्सच्या सैन्यातील ढालीचे चित्र असे.त्यामुळे ही नाणी 'इक्यूज' या नावानं ओळखण्यात येऊ लागली.नंतरच्या काळात ही चांदीचीही केली जाऊ लागली आणि काळानुसार त्यांची किंमतही बदलत गेली.


 फॅदम : नाविक मापनातलं एक परिमाण. समुद्राची खोली मोजण्यासाठी ते वापरले जाते. एक फॅदम म्हणजे सहा फूट अर्थात १.८२९ मीटर.


अब्बासी : पर्शियाचा राजा शहा अब्बास पहिला ह्याच्या नावाने सन १६२९ मध्ये काढण्यात आलेले चांदीचे नाणे.यानंतर शहा अब्बास दुसरा याच्या नावाने काढण्यात आलेले हे नाणे.१६४२ ते १६६६ पर्यंत चलनात होते.एक अब्बासी म्हणजे सोळा ते अठरा पेन्स अर्थात दोन रुपये. हे नाणे पर्शियातून भारतात आले होते.


तुर्बान : अल्बानियन तुर्की फेझ टोपी.तांबड्या रंगाची गोंडे असणारी,कोनाकृती,पण वर सपाट, वाटोळी अशी टोपी.


गॅली : समुद्र आणि नदी ह्यातील लढाईसाठी वापरले जाणारे लढाऊ गलबत.वल्ह्यांनी चालविलेली उथळ पाण्यात वापरली जाणारी युद्धनौका.पोर्तुगीजांच्या आगमनापासून ते अठराव्या शतकाच्या मध्यापर्यंत पश्चिम किनाऱ्यावर वापरात होती.'चौकोनी शिडांचे दोन डोलकाठ्यांचे अरबी जहाज' असे याचे वर्णन रेव्ह.हॉवर्ड नाकज्न यांनी केले आहे. व्यापारी माल असलेल्या जहाजावर समुद्रात काही


वहाणी : व्यापारी माल असलेल्या जहाजावर समुद्रात काही संकट ओढवले तर खलाशी जहाजातला माल लुटारुंच्या हाती लागू नये म्हणून समुद्रात फेकून देतात.याला म्हणतात वहाणी. 


समल वारे : पर्शियन आखातात उन्हाळ्यात वाहणारे कोरडे वारे.यामुळे धुळीची वादळे तयार होतात. अरेबियन उच्चार 'समल' असला तरी पर्शियन आखातात यांना म्हणतात 'शमल'. तुर्कस्थानात या वादळांना म्हणतात 'सॅमिएल' वारे.


 संजाणी चाचे : संजाणी हे चाचे काठेवाड आणि कच्छ किनारपट्टीवरचे रहिवासी होते. मलबारच्या किनारपट्टीबरोबरच सुरतकडेही

त्यांचा वावर असे.वाघेल चाचेही काठेवाडचेच. संजाण्यांना 'संघार' आणि वाघेलांना 'वाघेर' असेही म्हणतात. हे दोन्हीही चाचे बहुधा मुसलमान होते. 'गॅझेटिअर ऑफ द बॉम्बे प्रेसिडेन्सी' नुसार संजाणी आणि वाघेल हे प्रामुख्याने गुजराथच्या किनारपट्टीवर वावरत.


कारमेलाईन मठ : इस्त्राईलमधील स्थानिक आणि प्रवाशांनी सन १११५ मध्ये स्थापन केलेले प्रार्थनास्थळ.एलायजाच्या पाण्याच्या झऱ्या शेजारी माऊंट कारमेल यांनी हा मठ स्थापन केला.एलायजा हे हिब्रू प्रेषित होते.कदाचित बायबलमध्ये आलेले एलियास हे नाव याचाच अपभ्रंश असावे.एलियासचा पाण्याचा झरा हा तेल जेरिकजवळ असून तो ख्रिस्तपूर्व ८००० वर्षांपूर्वीचा असल्याचे सांगण्यात येते.कारमेल यांनी स्थापन केलेल्या या मठाचे नियम जेरूसलेमचे धर्मगुरू सेंट अल्बर्ट यांनी तयार केले.सन १२६६ मध्ये पोप ओनोसिस तिसरे यांनी या नियमांना कायदेशीर रूप दिले.या माऊंट कारमेल यांना ख्रिश्चन मोनॅस्टिसिझमचा 'अध्यात्मवादी जीवनपद्धतीचा जनक'समजतात.


मदर थेरेसा : स्पॅनिश नन आणि कारमेलाईट मठाच्या सुधारक. ( सन १५१५ ते १५८२) गूढ,अध्यात्मवादी लेखनासाठी त्या प्रसिद्ध होत्या.


सेंट फ्रान्सिस : मठांच्या इतिहासात फान्सिस ऑफ ॲ सिसी यांना खूप महत्त्वाचे स्थान. ख्रिस्तसद्' जीवन,त्याग आणि सेवेचा अखंड ध्यास.धर्मतत्त्वांचं सखोल ज्ञान,रसाळ पण विवेचक विवरण या गुणांसाठी प्रसिद्ध.सन ११८१ मध्ये इटलीत जन्म.एसिसी इटली इथे ३ ऑक्टोबर १२२६ रोजी मृत्यू,ख्रिश्चन चर्च दुरुस्त करण्याचे कार्य.१ जुलै १२२२ रोजी संत म्हणून मान्यता.पर्यावरण व प्राणी यांचा संरक्षक संत म्हणून प्रसिद्ध.


सेंट डॉमनिक: डॉमनिकन मठाचा संस्थापक असलेला स्पॅनिश साधू,(सन ११७० ते १२२१) मठवासीयांनी धर्माच्या तत्त्वज्ञानाचं तसेच विधिनियमांचं सखोल ज्ञान मिळवून पाखंडीपणाला आळा घालावा या मताचा पुरस्कर्ता.


बाप्तिस्मा : बाप्तिझो हा मूळ ग्रीक शब्द.त्याचा अर्थ 'धुणे',ख्रिस्ती होणं म्हणजे नव्याने जन्म घेणे.ख्रिश्चन धर्मानुसार याचे तीन टप्पे, मनुष्याला नीतिमत्त्व प्राप्त करणे,पवित्रीकरण आणि पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा.पाण्याचा बाप्तिस्मा हा यातला प्रमुख विधी.ह्या विधीत आपलं आयुष्य देवाला अर्पण केले जाते.तशी कबुली दिली जाते.पाण्यात डुबकी घेण्याचा विधी.असा पवित्र विधी करून चर्चचे सदस्यत्व दिले जाते.


सेंट थॉमस : भारतात आलेला पहिला ख्रिश्चन धर्म प्रसारक,येशूच्या बारा अनुयायांपैकी एक. इ.स.५२ मध्ये भारतात आगमन.केरळमध्ये सात चर्चची स्थापना.तमिळनाडू जवळील एका टेकडीवर इ.स.७२ मध्ये यांना ठार मारण्यात आले.तिसऱ्या शतकातील 'ॲक्टस् ऑफ थॉमस' या ग्रंथात थोडा वेगळा उल्लेख.यानुसार ते जेरूसलेमहून भारतात आले.कुषाण राजा गोंडोफेरस याच्या राज्यात कारागीर म्हणून रुजू, यांच्या नावाची एक टेकडी चेन्नई येथे.२ डिसेंबर १९६४ रोजी भारतीय टपाल खात्याने यांच्यावरचे तिकीट काढले आहे.


 मामुलीपट्टण : मामुलीपट्टण हे गाव नकाशावर दिसत नाही.कदाचित हे अंकलेश्वर जिल्ह्यातील पनोली गाव असावे.


सुरतेचा सुभेदार : शिवाजी महाराजांनी सुरत लुटली तेव्हा तिथे असणारा मुघल सुभेदार होता इनायतखान.नंतर औरंगजेबाने त्याची तिथून उचलबांगडी केली आणि सुरतेला नवा सुभेदार नेमला.त्याचे नाव घियासुद्दीनखान.हा जानेवारी १६७२ पासून १२ नोव्हेंबर १६७७ पर्यंत या पदावर कार्यरत होता.


खोजा मिनाझ : कॅरे यांनी व्यापाऱ्यांच्या प्रमुखाचं नाव दिले नसले तरी तो हाच असावा.हा धर्मांतरित ख्रिस्ती होता.याने बादशहाला पत्र लिहिले म्हणून घियासुद्दीननं त्याला जोड्याने आणि दांडक्याने मारल्याची नोंद दि.१४ ऑक्टोबर १६७२ च्या एका इंग्रजी पत्रात आली आहे.


मिरजन : कारवारच्या दक्षिणेला २८ मैलांवर असलेले ठिकाण.


यावरून एक गोष्ट माझ्या लक्षात आली की मी समजत होतो तसं ते गोपनीय पत्र वाचण्याची संचालकांची अजिबात इच्छा नव्हती.उलट तो लखोटा गुप्त मार्गानं व्हाईसरॉयच्या हाती लवकर कसा पडेल यासाठीच त्यांची धडपड चालली होती.त्यामुळं मी त्यांचं म्हणणं मान्य केलं.पण तरीही एक काळजी घेतलीच.तशी ती घेणं माझ्या सुरक्षिततेसाठी गरजेचंही होतं.हे पत्र संचालकांच्या हाती देताना त्याची पोहोचपावती घेतली आणि त्यावर या दोन्ही संचालकांच्या सह्यांबरोबरच कॅप्युचिन फादरचीही सही घेतली. नाहीतर उद्या गोपनीय असा शाही लखोटा फोडणं,त्याची दुसरी प्रत तयार करणं,तो लखोटा व्हाईसरॉयऐवजी इतरांच्या ताब्यात देणं असे अनेक आरोप माझ्यावर होऊ शकले असते आणि तसं करणं हा राजद्रोह होता हे मला समजत होतं.त्या शाही पत्राची मी घेतलेली पोहोचपावती अशी होती.


पोहोचपावती


खाली सह्या करणारे आम्ही असे जाहीर करतो की,ॲबे कॅरे यांनी व्हाईसरॉय यांच्या नावे एक शाही लखोटा फ्रान्सच्या सम्राटांकडून आणला आहे सद्यःपरिस्थितीत तो त्यांना पोहोचवणे अवघड आहे.म्हणून आम्ही चर्चेअंती पुढीलप्रमाणे कृती करत आहोत.सदरचा गोपनीय लखोटा या शहरातील प्रतिष्ठित अशा रेव्ह.फादर ॲम्ब्रुझ या कॅप्युचिनी फादरच्या उपस्थितीत आणि त्यांच्या स्वाक्षरीनिशी उघडण्यात आला.सम्राटांच्या पत्राची दुसरी प्रत गुप्त लिपीत तयार करून तो पुन्हा सीलबंद करण्यात आला व मूळ पत्र अँबे कॅरे यांना परत करण्यात आले.पत्राची केलेली दुसरी प्रत सुरतवरून अन्य गोपनीय मार्गाने व्हाईसरॉय यांच्याकडे पोहोचवण्याची व्यवस्थाकरण्यात आली.सम्राटांचे आदेश आणि इच्छा व्हाईसरॉय यांना लवकरात लवकर समजाव्यात म्हणून ही दक्षता घेण्यात आली आहे.पत्राची केलेली दुसरी प्रत ही गुप्त लिपीत असल्यामुळं त्यातील मजकूर अन्य कोपलेली समजणार नाही याचीही दक्षता घेण्यात आली आहे.सदरची पोहोच पावती ही दि.१२ नोव्हेंबर १६७२ रोजी सुरत येथील फ्रेंच वखारीत सहीशिक्क्यानिशी करण्यात येत आहे.


स्वाक्षरी :

गेस्टन.

बेरॉन.


संचालक रॉयल फ्रेंच कंपनी,सुरत

स्वाक्षरी : ब्रदर ॲम्बुझ द प्रिव्हिली कॅप्युचिन,सुरत


आम्ही त्या गावात मुक्काम केला तेव्हा शिवाजी राजांचे काही अधिकारी मला येऊन भेटले मी परकीय प्रवासी होतो आणि या भागातून परवान्याशिवाय प्रवास करणे धोक्याचं होतं.

माझ्याकडे जर परवाना नसेल तर काही ना काही भेट वस्तू मिळेल अशी अपेक्षा ठेवूनच बहुदा ते आले असावेत. पण मी माझ्याकडे असलेला परवाना दाखवताच त्यांची भाषा बदलली.त्यांच्या हातावर काहीतरी टेकवून मी त्यांची बोळवण केली.


हेलकरी : पशुवधगृहात ज्याच्या ताब्यात शेवटी जनावरे जातात तो मजूर किंवा हमाल.हेल म्हणजे भाडे किंवा वाहतुकीचे मोल.असं भाडं किंवा मजुरी घेऊन वाहतूक करणारे ते हेलकरी.


जव्हारची स्वारी : मे १६७२ च्या सुमारास मोरोपंत पिंगळे दहा हजार स्वारांसह जव्हारच्या स्वारीसाठी रवाना.शिवाजी महाराज या वेळी नेमके कुठे होते हे सांगणारं विश्वसनीय साधन उपलब्ध नसलं,तरी ते मोरोपंतांना सुरतजवळ येऊन मिळतील असा एका इंग्रजी पत्रात उल्लेख (शिवकालीन पत्रसारसंग्रह क्रमांक १४७४) जयराम पिंडे यांच्या 'पर्णालपर्वत ग्रहणाख्यानामा'तही तसा उल्लेख.जव्हारचे राज्य कोळी राजा विक्रमशाह याच्या ताब्यात तर रामनगर सोमशाहच्या ताब्यात होते.हे दोघेही चौथिया राजा म्हणून ओळखले जात.दमण प्रांत या वेळी गुजरातच्या सुलतानाच्या ताब्यात होता. परंतु तेथील प्रजा मूळ हिंदू राजाला त्याने आपणाला कसलाही त्रास देऊ नये म्हणून उत्पन्नाचा चौथा हिस्सा देत असे.म्हणून हे चौथिया राजे.१५९९ पासून हा प्रांत पोर्तुगीजांच्या ताब्यात आला तरीही हे राजे हा चौथ वसूल करत.

त्याबदल्यात या राजांनी आपल्या प्रजेचे चोर-दरोडेखोरांपासून रक्षण करावे अशी अट पोर्तुगीजांनी त्यांना घातली होती.१६७० मध्ये राजा विक्रमशाहाने सोमशाहाविरुद्ध बंड पुकारले आणि पोर्तुगीजांनी दमणची चौथाई आपणास द्यावी अशी मागणी केली.पोर्तुगीजांनी नकार देताच त्याने या मुलखातील गावं लुटली.

रामनगरच्या राजाला त्याचा बंदोबस्त करता आला नाही.त्यामुळे पोर्तुगीजांनी ही चौथाई मान्य केली.पुढं सोमशाहाने पोर्तुगीजांच्या मदतीने विक्रमशाहाविरुद्ध हत्यार उपसले.त्याची अनेक गावं लुटली तरीही त्याला विक्रमशाहाचा बीमोड करता आला नाही.

डिसेंबर १६७१ मध्ये कोळीराजाच्या विरुद्धच्या या लढाईत आपणाला मदत करावी अशी विनंती पोर्तुगीजांनी शिवाजीमहाराजांना केली.याच संधीची वाट पाहात असलेल्या शिवाजीमहाराजांनी मोरोपंतांच्या नेतृत्वाखाली फौजा रवाना केल्या. या फौजांनी ५ जून रोजी विक्रमशाहाचा पराभव केला.

जव्हार स्वराज्यात आले शिवाय मोरोपंतांनी १७ लाखाचा खजिना ताब्यात घेतला.जव्हारची सीमा नाशिकला लागूनच होती. तिथून सुरत फक्त १०० मैल.विक्रमशाह तिथून मोगलांच्या आश्रयास पळून गेला.मोरोपंत पुढे सोमशाहवर म्हणजे रामनगरवर चालून गेले.ते येत असल्याची खबर कळताच घाबरून गेलेला सोमशाह आपल्या बायका- मुलांसह गणदेवीपासून आठ मैलांवरच्या चिखली गावी पळून गेला.१६ जून ते १४ जुलैच्या दरम्यान रामनगर मराठ्यांच्या ताब्यात आलं.सुरत इथून फक्त साठ मैलांवर. शिवाजीराजा असा अगदी सीमेवर येऊन धडकल्याने सुरतेत पळापळ सुरू झाली होती. तिथल्या सुभेदारानं सुरतेचे दरवाजेही बंद करून टाकले होते.


महमूदी : गुजरातचा सुलतान महमूद बेगडा याच्या कारकीर्दीत (१४५८-१५११) पाडण्यात आलेले नाणे.एक रुपया म्हणजे अडीच महमुदी. बागलाणच्या राजानं सुरतेच्या व्यापाऱ्यांसाठी सोळाव्या शतकात मुल्हेर टाकसाळीत पाडलेले चांदीचं नाणे.फॅक्टरी रेकॉर्डनुसार ७८२७ महमूदी म्हणजे १००० सणगरी पगोडे.१पॅगोडा म्हणजे साडेतीन रुपये,म्हणजेच एक रुपाया म्हणजे सव्वा दोन महमूदी.


शिवाजीराजांचे वकील : १६७२ मध्ये पोर्तुगीजांशी चौथाईच्या वसुलीबाबत बोलणी करण्यासाठी शिवाजीराजांनी पाठवलेले ते वकील म्हणजे पितांबर शेणवी,जिवाजी शेणवी आणि गणेश शेठ.१६७७ मध्ये रामनगर आणि कोळी राजांचा संपूर्ण मुलूख शिवाजीराजांच्या ताब्यात आला.त्यानंतर दमणच्या सीमेवर सैन्य ठेवून दमणला लुटारूंचा उपद्रव होणार नाही याची काळजी शिवाजीराजांनी घेतली आणि त्या बदल्यातल्या चौथाईची मागणी पोर्तुगीजांकडे केली.ही मागणी रास्त असल्याचे दमणच्या नगपालिकेने ठरविले आणि त्याबाबत पोर्तुगीज विजरईसही कळविण्यात आले.१० जानेवारी १६७८ रोजी विजरईने शिवाजीराजांचा हा हक्क मान्य केला व तसे त्यांना कळविले.

त्यापूर्वी १५ सप्टेंबर १६७७ रोजी त्याने वसईच्या जनरलला लिहिलेल्या पत्रात आज्ञा केली आहे की 'चौथाईची रक्कम वसूल करून ठेवावी व चौथिया राजांशी ह्या बाबतीत जसा करार केला होता तसाच करार शिवाजींशी करावा.पण शिवाजीस द्यावयाची चौथाईची रक्कम त्याने रामनगरचे संपूर्ण राज्य हस्तगत केल्यापासूनच द्यावी.त्यापूर्वी देऊ नये.' त्यानंतर हे वकील बोलणी करण्यासाठी आले होते.त्याबाबत कॅरे यांनी ही नोंद केली आहे.पण तारीख चुकली आहे.वसईचा कॅप्टन दों मानुयेल लोबु द सिल्व्हैर यांच्याकडे चौथाईसंबंधाने विचारविनिमय करण्यासाठी शिवाजीराजांनी मे १६७७ मध्ये आवजीपंत ह्याला पाठवले होते. ही चौथाई शिवाजीराजांना देण्याचे पोर्तुगीजांनी कबूल केले परंतु अनेक सबबी सांगत पोर्तुगीजांनी ही रक्कम अखेरपर्यंत दिली नाहीच.उलट सदर रकमेपैकी तेरा हजारांपेक्षा अधिक रुपये गुप्तपणे रामनगरकरास दिले.तेही शिवाजीराजांविरुद्ध लढा सुरू ठेवण्यासाठी.ह्याचा उल्लेख गोव्याच्या हंगामी गव्हर्नरच्या दि.१२ मे १६७८च्या पत्रात आढळतो.पण लिस्बन येथील आज्युदच्या ग्रंथसंग्रहालयातील एका हस्तलिखितानुसार दमण प्रांतातील चौथाईचे उत्पन्न दरसाली १२९९५ असुर्प्या असून त्यापैकी १८९८असुर्प्या वतनदारासंबंधीचा खर्च वजा जाता चौथिया राजास ९०७७ असुर्प्या राहतात,अशी ४ जून १६८३ ची नोंद आहे.ह्यावरून शिवाजीराजास पोर्तुगीजांकडून चौथाईबद्दल दरवर्षी ही रक्कम येणे होते.१६८१ च्या अखेरपर्यंत ह्या चौथाईपैकी अनामत ठेवलेली रक्कम ११७३८असुर्प्या होते अशीही नोंद आढळते.ह्यावरून १६८१ पर्यंत ही रक्कम वसूल झाली नव्हती असे दिसून येते.

असरफी हा 'सेराफिन' ह्या पोर्तुगीज चांदीच्या नाण्याचा अपभ्रंश.एक रुपया म्हणजे १.४ सेराफिन तर १० रुपये म्हणजे १३ सेराफिन.


माहीम : मुंबईच्या मूळच्या सात बेटांपैकी एक बेट.जुने माहीम किंवा महिकावती ही तेराव्या शतकात होऊन गेलेल्या राजा भीमदेवाची राजधानी.हे जुने माहीम उर्फ केळवा माहीम म्हणजेच महिकावती मुंबईपासून साठ किलोमीटरवर पालघरजवळ आहे.


केळवा : पालघरच्या दक्षिणेस बारा किलोमीटरवरचे सध्याच्या पालघर जिल्ह्यातील गाव.महिकावती उर्फ केळवा माहीम गावचाच भाग असलेल्या या गावाला हे नाव पडले आहे ते तिथल्या केळीच्या बागायती पिकांमुळे.इथे भुईकोट आहे.


ऱ्हनोलस: ऱ्हनो हे पोर्तुगालमधील एक राज्य. तिथे जन्मलेले पोर्तुगीज या नावाने ओळखले जात.


अशेरी : शिलाहार वंशीय भोजराजाने बांधलेला सध्याच्या पालघर जिल्ह्यातील दुर्ग.सागाच्या घनदाट जंगलाने वेढलेला हा किल्ला. जहाजबांधणीत या लाकडांची खूप उपयुक्तता असल्यानं इतिहासकाळात या गडाला खूप महत्त्व.चौदाव्या शतकात हा गड महिकावतीच्या राजा बिंबदेवाच्या ताब्यात आला.पोर्तुगीजांनी वसईत बस्तान बसवल्यानंतर १५५६ मध्ये अशेरीवर हल्ला करून तो जिंकला.गडावर अनेक बांधकामे केली.१६८३ ते १६८७ या चार वर्षांत हा किल्ला संभाजीराजांच्या कबजात होता.नंतर तो पुन्हा पोर्तुगीजांकडे आला.१७३७ च्या वसई वेढ्यात तो पुन्हा चिमाजीअप्पांनी स्वराज्यात आणला.


दुर्गाडी : आदिलशाहीत असणारा हा मुलूख शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला तो २४ ऑक्टोबर १६५७ रोजी.जवळचेच कल्याण बंदर ताब्यात आल्यामुळे त्यांनी इथे किल्ला बांधण्याचे ठरवले.

आबाजी महादेवांना हा किल्ला उभारत असताना अमाप द्रव्य सापडले.त्यातून याची बांधणी झाली.दुर्गेची कृपादृष्टी समजून याचे नाव दुर्गाडी ठेवण्यात आले.याच्याजवळच शिवाजी महाराजांनी आपली गोदी उभारली होती.तिथे लढाऊ जहाजांची निर्मिती केली जायची. त्यासाठी महाराजांनी पोर्तुगीजांची मदत घेतली होती.याच आरमाराने पुढे मुंबईच्या इंग्रजांवर, वसईच्या पोर्तुगीजांवर आणि जंजिऱ्याच्या सिद्दीवर दहशत बसवली.शिवाजी महाराजांनी भारतीय आरमाराचा पाया घातला तो याच दुर्गाडीजवळ.


इंग्रज अनुवादकाच्या मते हा 'माहुली' असावा. माहुलीचा उच्चार कोकणी स्वरात केल्यास त्याचा अपभ्रंश झाल्यास मलंग असा होतो.मलंगचा शेवटचा राजा म्हणजे अहमदनगरच्या निजामाचा अखेरचा वारस 'हुसेन' असावा.त्यानं हा किल्ला गुजरातच्या सुलतानाकडून घेतला होता.हा मलंगचा अखेरचा सत्ताधीश.हा किल्ला अहमदनगरजवळच आहे.१६७० मध्ये तो मराठ्यांनी जिंकला. अलंग, मलंग आणि मलंग ही दुर्गत्रयी. कदाचित हा कल्याणजवळील मलंगगड असावा,हाजी मलंगगड.


दुर्ग म्हणजेच शिवाजीराजांचा दुर्गाडी असावा. दुर्गाडी ते वसई हे अंतर पायी गेल्यास नऊ तासांचे आहे.कॅरेनं केलेलं दुर्गचं वर्णन दुर्गाडीशी अगदी मिळतंजुळतं आहे.त्याच्या म्हणण्यानुसार वसईपासूनचे त्याचे अंतर एक दिवसाचेच आहे.


साष्टी : मुंबई बेटाच्या साष्टी बेटापासून वेगळे झाले आहे.पश्चिमेची वसईची खाडी व पूर्वेची उत्तरेकडचा टेकड्यांनी व्यापलेला भाग.या टेकड्यांमधून मिठी,पोईसर,दहिसर अशा नद्या उगम पावतात.

त्यामुळे या बेटावर अरीय नदीप्रणाली तयार झाली आहे.अशाच बेटावर मुंबई आणि ठाणे वसले आहे.पश्चिमेला मिठी नदी आणि माहीमची खाडी तर पूर्वेला एका लहानशा नदीमुळे तसेच दलदलीच्या भागांमुळे मुंबई बेट हे ठाण्याची खाडी ही साष्टी बेटाला मुंबईच्या मुख्य भूभागापासून अलग करते. 


पार्दाव : पोर्तुगीजांनी पाडलेले एक सोन्याचे नाणे.किमतीत होणाऱ्या ऱ्हासामुळे नंतर ते चांदीचे पाडण्यात येऊ लागले.

भारतातील पोर्तुगीज साम्राज्यात 'शेराफिन' हे चांदीचे नाणे होते.त्याला 'पोर्तुगीज पार्दाव' किंवा 'पार्दाव शेराफिन' असे म्हणत.संस्कृत 'प्रताप' शब्दावरून 'पार्दाव' हे नाव घेण्यात आले असावे. शाहरूखचा राजदूत अब्दुररझाकने प्रतापचे किंवा पार्दावचे १४४३ मध्ये असलेले मूल्य दिले आहे.त्यानुसार :


३ जितल (तांबे) म्हणजे एक टार (चांदी)


६ टार म्हणजे एक फनम (सोने)


१० फनम म्हणजे १ प्रताप


२ प्रताप म्हणजे १ वराह


वर्थेमा ह्याने १५०४ ०५ मध्य दिलेले मूल्य असे :


१६ कास ह्यकॅश (म्हणजे १ टेअर ह्यचांदी)


१६ टेअर म्हणजे १ फनम (सोने)


२० फनम म्हणजे १ पार्दाव


जिरॉल्ड : ॲन्जिअर दि. ७ जून १६७२ ते दि. २५ सप्टेंबर १६७५ अखेर मुंबईचा गव्हर्नर.


चौल : अलिबागच्या दक्षिणेस अठरा किलोमीटरवर असलेले सातवाहनकालीन बंदर. याला 'मूर्तजाबाद' असेही म्हटले जात असे.चौल रेवदांडा ही जोडगोळी समजली जाते.मूळच्या चौलच्या दोन-तीन पाखाड्या स्वतंत्र करून रेवदांडा आकारास आले.याचे पौराणिक नाव होते चंपावती आणि रेवती,खौल,चंपावतीनगर, चावोल,चिमोलो,चिवल,चिवील,चेऊल,चेमुली,चौले,जयमूर,तिमूल,शिऊल,सिबोर,सिमुल, सेमुल्ल,सैमूर या नावानंही चौल ओळखले जाते. दोन हजार वर्षांपूर्वीच्या टॉमेलीच्या 'पेरिलिप्स ऑफ एरिथ्राईन सी' या ग्रंथातही याचा उल्लेख. त्या वेळच्या जगात भरभराटीला आलेल्या या शहराचा व्यापार इजिप्त,ग्रीस,चीन आणि आखातातील अनेक देशांशी होता.१६७० मध्ये हे शिवाजीराजांच्या ताब्यात आले.येथे रेशमाचा व्यापार मोठ्या प्रमाणात होता.नीळ अफू हेही इथून परदेशात जात असे.

दक्षिणेतील सर्वांत मोठी बाजारपेठ म्हणून चौलचा उल्लेख होत असे.या बंदरात घोड्यांचा व्यापारही चाले.


खांदेरी : जंजिरा जिंकण्याचा एक प्रयत्न म्हणून शिवाजी महाराजांनी १६७२ मध्ये येथे किल्ला उभारण्यास घेतला.पण इंग्रज आणि सिद्दी यांनी एकत्र येत तो प्रयत्न हाणून पाडला.१६७९ मध्ये दीडशे शिबंदी आणि १४ लहान बंदुकांसह शिवाजीमहाराजांनी मायनाक भंडारीला पुन्हा पाठवले.त्यानं इथं किल्ला बांधला.इंग्रजांनी त्यालाही विरोध केला.तेव्हा झालेल्या लढाईत मराठ्यांनी इंग्रजांची तीन जहाजं काबीज केली आणि त्यांचा पराभव केला.फ्रान्सिस थॉर्प यानं बेटावर उतरण्याचा प्रयत्न केला.परंतु तो आणि त्याचे दोन सहकारी मारले गेले.ऑक्टो.१६७९ मध्ये इंग्रजांशी झालेल्या दुसऱ्या लढाईवेळी दौलतखानानं ६० जहाजं घेऊन इंग्रजांच्या 'रिव्हेंज' आणि 'हंटर' या मोठ्या युद्धनौकांसह इतर सात लहान जहाजांवर हल्ला केला. इंग्रजांचा दारुण पराभव केला.त्यांचे 'डोव्हल' हे जहाज पळवून आणलं.


उंदेरी : अलिबागपासून चार किलोमीटरवरचं बेट.शिवाजी महाराजांविरुद्ध लढताना इंग्रज आणि सिद्दीने इथे बांधकाम केले.पण १६ जानेवारी १६८० रोजी इंग्रजांनी माघार घेत मराठ्यांशी तह केला आणि खांदेरी बेट मराठ्यांकडे राहू दिले.पण उंदेरी सिद्दीकडेच राहिलं.


अलमेडा : ऐंशी फूट लांब आणि सहा ते सात फूट रुंद असणारी नदीतील नाव.अत्यंत वेगवान प्रवास हे याचं वैशिष्ट्य.गोवा आणि मध्य आशियात या वापरल्या जात होत्या.


चौलचा सुभेदार : आबाजी महादेव.१६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण,भिवंडी घेतले. तेव्हा तिथला सुभेदार म्हणून याची नेमणूक करण्यात आली.त्यापूर्वी तो शिवाजी महाराजांचा हेजीब असल्याचा उल्लेख.(राजवाडे खंड १७, लेखांक १०) डफने आबाजी महादेवाचा उल्लेख आबाजी सोनदेव असा केल्याने अनेकांनी त्यालाच कल्याणचा सुभेदार समजण्याची चूक केली आहे.आबाजी महादेव आणि आबाजी सोनदेव या दोन वेगळ्या व्यक्ती आहेत.मराठी कागदातून कल्याणचा सुभेदार म्हणून उल्लेख आला आहे तो आबाजी महादेवाचा.(पेशवे दप्तर खंड ३१,लेखांक २४ व २४ अ)


पेनी : सर्वांत कमी किमतीचं चलनी नाणे.


 अष्टमी : चौलपासून वीस किलोमीटरवर असलेले कुंडलिका नदीकाठचे बंदर.


काळवण : रायगड जिल्ह्यातील दासगावपासून सात किलोमीटरवरचे गाव.


सिद्दी : जंजिरेकर सिद्दी.१६७० मध्ये सिद्दी कासिम,सिद्दी संबूळ आणि सिद्दी खैरियत यांनी जंजिरा किल्ल्याचा प्रमुख असलेल्या सिद्दी फत्तेखानाविरुद्ध कट करून त्यास कैद केले ते जंजिरा शिवाजीराजांच्या ताब्यात देण्याचा सुगावा लागला म्हणून.फत्तेखानास कैद केल्यानंतर त्यांनी विजापूरकरांचे स्वामित्व झुगारून देऊन मोंगलांचं स्वामित्व स्वीकारले.तेव्हा सिद्दी कासिमला जंजिऱ्याचा मुख्य किल्लेदार नेमण्यात आले.फेब्रुवारी १६७१ मध्ये दंडा राजपुरीतील सर्व मराठा शिबंदी होळीच्या उत्सवात दंग असताना कासिमनं खैरियतच्या मदतीने किल्ल्यावर हल्ला केला आणि तो जिंकलाही.ही घटना १३ किंवा १४ फेब्रुवारी १६७१ ची.


पंचधारा: पंचधारा हे गाव दासगाव जवळ असावे.परंतु आता या नावाचं गाव नकाशावर दिसत नाही.दासगावजवळ सावित्री नदीला चार उपनद्या येऊन मिळतात.काळ,गांधारी,घोड आणि नागेश्वरी.

कदाचित,कॅरे म्हणतो त्या पाच नद्या याच असाव्यात.परंतु इथून समुद्र बारा ते पंधरा लीगवर आहे.कॅरे लिहितो तितका जवळ नाही.या दासगावपासून समुद्र तो म्हणतो इतक्या जवळ नाही.

दासगाव महाडच्या दक्षिणेला १० किलोमीटरवर आहे.


मारें : सावित्री आणि गांधारी काठावर वसलेलं आजचे महाड.


निलोफर डोंगररांग: कॅरे म्हणतो ती निलोफर डोंगररांग म्हणजे पोलादपूर जवळची डोंगररांग असावी.त्याने चुकीचे नाव लिहिले आहे.


खेड : रत्नागिरी जिल्ह्यातलं खेड.


 रसाळगड : खेडच्या पश्चिमेला बारा मैलांवर असणारा रसाळगड.(संगमेश्वरच्या पश्चिमेस सहा मैलांवरचा प्रचितगड तथा उचितगड,राग्वा असेही याचे एक नाव. येथेही धान्यसाठा केला जात असावा.) कॅरेच्या या नोंदीवरून शिवकालीन 'गडछावणी' आणि 'कारसाई' या दोन करांची कल्पना येते.


 गरम पाण्याचे झरे : संगमेश्वरपासून नऊ मैलांवर अरवलीमध्ये व सहा मैलांवर तुरळ गावाजवळ गरम पाण्याचे झरे आहेत.


पीटर मंडी: इंग्लंडच्या कॉर्नवॉलचा रहिवासी. नोकरीच्या शोधार्थ १६२८ मध्ये इंग्लंडहून भारतात आला ईस्ट इंडिया कंपनीत नोकरी. जानेवारी १६३४ मध्ये भारतातून परत गेला.


विजयदुर्ग : हा किल्ला खारेपाटण गावाजवळचा नसून कॅरेने वर्णन केले आहे ते विजयदुर्ग किल्ल्याचे.खारेपाटण समुद्रकिनाऱ्यापासून ३० किलोमीटर आत असले,तरी या नदीला तिच्या मुखापाशी विजयदुर्गची खाडी असेच म्हणतात. अकराव्या शतकाच्या अखेरीस शिलाहार घराण्यातील राजा भोज यानं बांधलेला हा किल्ला सुरुवातीस बहामनी नंतर आदिलशाहीत होता.ऑक्टोबर १६६४ च्या सुमारास शिवाजी महाराजांनी तो जिंकला.खारेपाटण गावाजवळ एका टेकडीवर एक छोटा किल्ला होता.त्याचे तट आणि बुरुज इ.स.१८५० मध्ये पाडून टाकण्यात आले.


राहुजी सोमनाथ : मार्च १६६१ मध्ये राजापूर ताब्यात आल्यानंतर शिवाजी महाराजांनी नेमलेला कुडाळचा सुभेदार,(पत्रसारसंग्रह क्रमांक ९४८) राहुजीला सुभेदार नेमल्याचा उल्लेख दि.२३ जुलै १६६३ च्या पोर्तुगीज व्हाईसरॉयने लिहिलेल्या पत्रातही आला आहे.


बिचोलीम : गोवा राज्यातील एक शहर. तालुक्याचं ठिकाण.कोकणी भाषेत या शहराला म्हणतात दिवचल,

दिवाळ,दिव्य किंवा डिकोली तर मराठीत डिचोली.पणजीपासून तीस किलोमीटर अंतरावर.पोर्तुगीज दप्तरात याचं नाव येते ते भतग्राम म्हणून.


रूस्तुम इ जमान : आदिलशाही सरदार रणदुल्लाखानाचा मुलगा.


जेम्स ॲडम्स या कौन्सिल सदस्याला आणि सॅम्युअल वॉकरला व्हाईसरॉयच्या भेटीसाठी जिरॉल्ड ॲन्जिअरनी पाठवले होते.हे वॉकर कौन्सिलचे सचिव होते आणि हे दोघे मैत्री करार करण्यासाठी गोव्यात आले होते.परंतु हा करार मान्य करू नये अशी शिफारस व्हाईसरॉयने प्रिन्स रिजंट ऑफ पोर्तुगाल यांना केली होती.इंग्रज जो करार करण्यासाठी गोव्याला आले होते तो कदाचित १६६१ चा तह असावा.माहीम आणि मुंबईच्या काही भागांवर इंग्रजांना ताबा मिळवायचा होता आणि याला पोर्तुगीजांचा विरोध होता.


१६७२ च्या सुमारास कोल्हापूर जिल्ह्यातल्या नेसरीजवळच्या एका छोट्याशा वाडीवर एक स्त्री प्रवाशांच्या राहण्याजेवण्याची सोय करत होती असा स्वतंत्र व्यवसाय करणारी त्या काळातली ती स्त्री 


दिवसभराच्या प्रवासानं आम्ही खूप थकलो होतो.ऊनही जास्तच होतं.दुपारी तीनच्या सुमारास आम्ही 'नेसरी'( कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील गाव.गडहिंग्लजच्या दक्षिणेस दहा मैलांवर.घटप्रभा नदीच्या उत्तरेस एक मैलांवर.) गावाजवळ होतो.दिवसभर खूपच दमछाक झाल्यानं तिथंच थांबलो.शहर अगदी मोकळ्या अशा ऐसपैस जागेवर वसलं होतं.

संपूर्ण शहराला दगडी तटबंदी होती.इथं घोडदळाच्या काही तुकड्याही तैनात केलेल्या दिसल्या.बादशहाच्या मृत्यूच्या बातमीमुळं काही दगाफटका होऊ नये,कटकारस्थानं होऊ नये किंवा बंड होऊ नये म्हणून ही दक्षता घेण्यात आली होती.मला या शहरात चार रुपयांची जकात मागितल्यानं थोडी वादावादीही झाली.अखेर ती जकात भरून आम्ही पुढचा प्रवास सुरू ठेवला अगदी सूर्य मावळेपर्यंत.रात्री आम्ही एका मोठ्या गावात पोहोचलो.या गावाचं नाव होतं 'जबरी.(नेसरी पासून आठ किलोमीटर वर असणारे ही जांभूळवाडी )


याही गावाला दगडी तटबंदी होती.रात्रीचं जेवण आणि मुक्कामासाठी माझे सेवक मला इथल्या सभ्य स्त्रीच्या घरी घेऊन गेले.तिनं माझं अगदी आपुलकीनं स्वागत केलं आणि तिच्या घरीच मुक्काम करण्याची विनंती केली.तिला तीन मुलीही होत्या.अत्यंत देखण्या आणि नम्र.त्या मुलींनी माझी सगळी चौकशी केली.मला काय हवं नको ते पाहिलं.एका मुलीनं जेवणासाठी कोंबडी,तांदूळ,

अंडी,तेल,तूप असं सगळं सामान आणलं.या साहित्याला माझ्या नोकरांना तिनं स्पर्शही करू दिला नाही.तर दुसरीनं स्वयंपाकासाठी लाकूड,पाणी,भांडी आणि निखारे आणले.या दोघींची ही गडबड सुरू असताना तिसरी माझी झोपण्याची व्यवस्था करत होती.तिनं आमच्यासाठी गाद्या घातल्या. उशी आणि पांघरुणाची व्यवस्था केली.तीही अगदी नीटनेटकी.या छोट्याशा खेड्यात राहण्या-जेवणाची इतकी स्वच्छ आणि आटोपशीर व्यवस्था पाहून मी अचंबितच झालो होतो.अगदी जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा एखाद्या मोठ्या शहरातसुद्धा अशा सोयीसुविधा मला मिळाल्या नसत्या.

विशेष म्हणजे इथं राहणारे लोक फक्त जनावरांचे कळप सांभाळतात. (बहुधा कॅरेचा मुक्काम धनगरवस्तीवर पडला असावा.)


अगदी अलीकडच्या काही वर्षांपर्यंत हुक्केरी हे एक मोठं शहर होतं. त्याच्या अंतर्गत अनेक छोटी शहरं होती.इथला महसूलही मोठा होता. शिवाय इतरही अनेक फायदे होते.इथल्या सुभेदाराला खूप सोयीसुविधा होत्या इथं. इथं सुभेदार म्हणून विजापूरच्या आदिलशहानं रूस्तुम इ जमानला नामजद केलं होतं.या भागात शिवाजीराजांच्या कुरबुरी वाढल्या होत्या. इथले काही प्रदेशही त्यांनी ताब्यात घेतले होते. अंगी असणारं धाडस आणि ते योजत असलेल्या नव नव्या युक्त्या यामुळं त्यांना सतत यश मिळत होतं.अनेक युक्त्याप्रयुक्त्या करून ते शत्रूला बरोबर अडचणीत आणत असत.कधी गनिमीकाव्यानं तर कधी अगदी समोरासमोर हल्ला करत असत.प्रसंगी दोन पावलं मागंही जात असत.ते आपल्या सैन्याला खूप जपत असेत विनाकारण त्यांचे प्राण संकटात टाकत नसे.कधी धूर्तपणाची खेळी करून तर कधी समोरच्या सरदाराला एखादं मोठं अमिष दाखवून ते आपला डाव साधत असत.त्यांची प्रत्येक चाल अगदी आश्चर्यकारक अशीच असे.रूस्तुम इ जमान मोठ्या सैन्यासह चालून येत असल्याच्या खबरा शिवाजीराजांना अगोदरच लागल्या होत्या.तरीही तो राज्याच्या सीमेपर्यंत येईतोवर त्यानी कोणतीही हालचाल केली नव्हती.त्याला अगदी सहज येऊ दिलं होतं. त्याच्या सैन्याला अन्न,पाणी,घोड्यांना चारा कसलीही रसद मिळणार नाही अशा ठिकाणापर्यंत येऊ द्यायचं त्याचं धोरण होतं.अशी रसद त्याच्यापर्यंत पोहोचणार नाही याची दक्षता शिवाजीराजांनी घेतली होती.जेव्हा आपल्या सैन्यासह रूस्तुम इ जमान अगदी जवळ आला तेव्हा शिवाजीराजांनी आपला एक सरदार त्याच्याकडे पाठवला.या सरदारावर शिवाजीराजापाची कामगिरी सोपविली होती आणि तो रुस्तुम इ जमानचा मित्र होता.हा सरदार स्वराज्यात येण्यापूर्वी विजापूरच्या दरबारातच होता.त्याच्याकडून झालेल्या एका चुकीमुळे त्याला तिथून हाकलून लावण्यात व्याल होत.नंतर तो शिवाजीराजांच्या आश्रयाला आला होता.हा सरदार अतिशय हुशार होता, चाणाक्ष होता.अशा वाटाघाटी करण्यात त्याचा हातखंडा होता.समोरच्याला तो आपल्याला हवा तसा निर्णय घ्यायला भाग पाडत असे असा त्याचा लौकिक होता.शत्रूला बोलतं करण्यात कुणीही त्याचा हात धरू शकत नव्हता. याला त्याच्यावर सोपविलेले काम नीट समजावून देत शिवाजीराजांनी शत्रुच्या गोटात पाठवून दिले. रूस्तुम इ जमाननं त्याचं अगदी प्रेमानं आगत स्वागत केलं.त्या दोघांत बराच वेळ बोलणीही झाली.

शिवाजीराजांच्या सरदारानं आपल्याला हवं ते त्याच्या गळी उतरवलं.सद्यःस्थितीत शिवाजीराजांवर विजय मिळवणं अतिशय कठीण आहे याचं भान ठेवून रूस्तुम इ जमाननं त्याच्याकडून आलेली ३०००० पॅगोडा ची भलीभक्कम रक्कम भेट म्हणून स्वीकारली आणि आपलं सैन्य मागं घेतलं.खरं तर अतिशय चातुर्यानं हा निर्णय घ्यायला त्याला भाग पाडण्यात आलं होतं. (५ मे १६६० च्या एका डच पत्रानुसार आपलं सैन्य मागं घेण्यासाठी रूस्तुमजमाननं शिवाजीराजांकडून ४०००० पॅगोडाची लाच घेतल्याचा उल्लेख आहे.) परंतु ही गोष्ट विजापूरच्या अदिलशहापासून फार दिवस लपून राहिली नाही.त्यानं रूस्तुम इ जमानला विजापुरच्या दरबारात बोलावून घेतलं आणि त्याचा शिरच्छेद केला.या सगळ्या घडामोडीत रूस्तुम इ जमानच्या मुलाचा हात नसल्याची खात्री पटल्यावर अदिलशहाने हुक्केरीचा सरदार म्हणून त्याची नियुक्ती केली. पण त्याच्या अधिकारावर मात्र मर्यादा घालण्यात आली रूस्तुम इ जमानकडे असणारे महसूल वसुलीचे आणि इतर महत्त्वाचे अधिकार बादशहानं काढून घेतले होते.यानंतर त्यानं दुसरा एक सरदार मोठ्या सैन्यासह शिवाजीराजांवर पाठवून दिला.शिवाजीशी लढाई करण्यासाठी त्याला सर्व त्या सुविधा पुरविल्या होत्या.


१६४० मध्ये डयूक ऑफ बॅनान्झा यांना चौथा जॉन म्हणून पोर्तुगालच्या सिंहासनावर बसवताना फ्रेंचांची मदत झाली होती.स्पेनबरोबरच तीस वर्षं चाललेल्या युद्धात पोर्तुगालला मदतही केली होती.स्पेनच्या ताब्यात साठ वर्षं असलेल्या या ड्यूकला फ्रेंचांनी सोडवून आणले होते. पोर्तुगालच्या समुद्र किनारपट्टीचे संरक्षण करण्यासाठी १६४१ मध्ये एक जहाजही फ्रेंचांनी तुगुस येथे तैनात केले होते.१६६३ मध्ये इंग्लंडचा चार्ल्स दुसरा आणि कॅरिन ऑफ बॅनान्झा यांचा विवाह फ्रान्सलाच संपन्न झाला होता.तेव्हाच पोर्तुगालला पाठिंबा देण्यासाठी एक गटही तयार करण्यात आला होता.१६६८ मध्ये स्पेन आणि पोर्तुगालमध्ये शांतता करार झाला होता.


रायबाग : कर्नाटकातल्या बेळगाव जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण.


पोन्टीफिसॅलिबस : बिशप यांनी धारण केलेली धार्मिक मानचिन्हे,वस्तू आणि परिधान केलेली किमती वस्त्रे.


बांबुर्डे : डिचोलीच्या उत्तरेस १५ किलोमीटर.


मेदिन : या नावाचे गाव नकाशात नाही,पण रामघाटाच्या पूर्वेस असलेले तिलारी नदीच्या खराडी या उपनदीकाठी मुळस नावाचे गाव आहे.


सरदार : कर्नाटक आणि गोवा राज्याच्या सीमेवरचा हा प्रदेश.हा परिसर चंदगड तालुक्यातील पारगडचा असावा.चंदगडपासून ३० किलोमीटरवरचा पारगड ७३८ मीटर उंच आहे.पारगडचे पहिले किल्लेदार होते तानाजी मालुसरे.कॅरे ज्यावेळी तिथे आला होता तेव्हा तानाजी मालुसरे हयात नव्हते.


रामघाट : कॅरे ज्या पर्वतातल्या अवघड वाटेनं गेल्याचे लिहितो तो पारगडाजवळचा रामघाट.


चंदगड : कोल्हापूर जिल्ह्यातील तालुक्याचे गाव.बेळगावपासून ४० किलोमीटर. इथे एक गढी असल्याचा उल्लेख कॅरेने केला आहे.त्याने हे विजापूर राज्यातले पहिले शहर असा उल्लेख केला आहे.


 अरक : मद्याचा एक प्रकार.पोर्तुगीजांनी काजू बोंडापासून मद्य तयार करण्यास सुरुवात केली. प्राथमिक उर्ध्वपातनातून तयार होणाऱ्या मद्याला 'अरक' म्हटले गेले.डोना अरक यांच्या नावावरून हे नाव रूढ झाले.दुसऱ्या आणि तिसऱ्या उर्ध्वपातनाने त्यातील फ्यूझेल तेल लवणे काढून टाकण्यात येतात.फेसाळलेल्या काजूरसापासून ही दारू तयार केली जाते म्हणून तिला फेन (म्हणजे फेस) म्हणत असत.हीच आजची फेणी. काजूचा हंगाम फेब्रुवारी ते मे असतो.१०० किलोग्रॅम काजू बोंडापासून ४० ते ५० लीटर रस निघतो.त्यापासून सात ते आठ लीटर अरक आणि नंतर तीन ते चार लीटर फेणी मिळते. सोळाव्या शतकाच्या सुरुवातीस काजूची लागवड हिंदुस्थानच्या पश्चिम किनारपट्टीवर मुख्यतःगोव्यापासून दक्षिणेकडे केली जात होती.


नेसरी : कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील गाव.गडहिंग्लजच्या दक्षिणेस दहा मैलांवर,घटप्रभा नदीच्या उत्तरेस एक मैलावर.


दुसरा अली आदिलशहा : मृत्यू दि. २४ नोव्हेंबर १६७२.गादीवर आला सहा वर्षांचा सिकंदर अदिलशहा.हा मुहम्मद आदिलशहाचा नातू तर दुसऱ्या अली आदिलशहाचा मुलगा.


जबरी : नेसरीपासून आठ किलोमीटरवर असणारी ही जांबूळवाडी.


टर्नी : खानापूरपासून सात आणि हलकर्णीपासून पाच किलोमीटरवरचे तेरणी.


कॅनापूर : हे हलकर्णीजवळचे खानापूर. हुक्केरीपासून ११ तर नेसरीपासून २५ किलोमीटरवर.बेळगाव जिल्ह्यातले खानापूर वेगळे.


हुक्केरी : बेळगाव जिल्ह्यातले तालुक्याचे ठिकाण.


 पॅगोडा : देवळाचे चित्र असलेले सोन्याचे नाणे. हिंदूंच्या देवळांना युरोपियन पॅगोडा म्हणत. म्हणून या होनाचे नाव पॅगोडा.सन १८१८ मध्ये एका पॅगोडाची किंमत ८ कास किंवा ४२ फलम होती.तो साडेतीन रुपयांबरोबर होता.फलम म्हणजे पुतळीपेक्षा कमी किमतीचे नाणे.याची किंमत तीन रुपये.१० फलम म्हणजे एक होन. एका पुतळीची किंमत चार रुपये.भारतातील सोन्याचे आणि चांदीचे असलेले हे नाणे मद्रासमध्ये १८१८ च्या सुमारास चलनात होते.८ कास म्हणजे १ फनम तर ८२ फनम म्हणजे एक पॅगोडा.त्यावर्षी रुपया हे प्रमाणभूत नाणे केले होते.म्हणून पॅगोडाची किंमत साडेतीन रुपये होती.२० कास म्हणजे १ फलूस तर ४ फलूस म्हणजे १ फनम.असे ४२ फनम म्हणजे १ पॅगोडा.

विजयनगर,अर्काट,मद्रास,डच,फ्रेंच आणि डॅनिश वसाहती यांची नाणी पॅगोडा म्हणून प्रचलित होती.विजयनगरच्या पॅगोडाचे वजन ३.३० ग्रॅम होतं.दक्षिण भारतात प्रचलित असलेले फनम हे लहान नाणे मल्याळममध्ये ते 'फनम' तर तमिळमध्ये 'पनम' म्हणून ओळखले जाई.संस्कृतमध्ये त्याला म्हणत 'पण'.दखनी

भाषेत ते झाले फनम.प्राचीन काळापासून चलनात असलेले सोन्याचे हे नाणे नंतर चांदीचे झाले.


महंमद खान : रूस्तम इ जमानचा मुलगा. आदिलशहाचा सरदार.कॅरेने याचा उल्लेख तरुण रूस्तुम इ जमान असा केला आहे.


मेंटल : शालीसारखे वस्त्र.


डॉम वास्को मास्करेन्हास कोंडे दे ओबीडिअस :३ सप्टेंबर १६५२ रोजी लिस्बनवरून गोव्यात आलेला व्हाईसरॉय. अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेचा आणि गुणवत्तेचा माणूस.पण व्हाईसरॉय म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटवण्यापूर्वीच त्याच्या विरोधात बंड पुकारले गेले.डॉम ब्रान्झ द केस्ट्रो व त्याच्या सहकाऱ्यांनी उभ्या केलेल्या त्याच्या विरोधातल्या चळवळीमुळे २२ ऑक्टोबर १६५३ नंतर त्याला आपले पद गमवावे लागले आणि सत्ता 'डॉम ब्रान्झ द केस्ट्रो'च्या हाती आली.२०.दि.२३ मार्च १६५५ रोजी लिस्बनवरून गोव्याकडे निघालेला व्हाईसरॉय डॉम रॉड्रिगो लोबो दे सिल्हेरिया कोंडे द सार्जदोस हा मार्मागोवा येथे पोहोचला तो १९ ऑगस्ट १६५५ रोजी.त्याचा पदग्रहण समारंभ २३ ऑगस्टला झाला असावा.त्यानंतर राजा डॉम जॉन यांच्या आदेशानुसार त्याने बंडवाल्यांविरुद्ध कारवाई सुरू केली.परंतु हा व्हाईसरॉयच ३ जानेवारी १६५६ रोजी ख्रिस्तवासी झाला तोही अगदी संशयास्पद स्थितीत.त्याच्यावर बंडखोरांनी विषप्रयोग केला होता.


खवासखान : हा हबशी होता.विजापूरचा मुख्य वजीर खान मुहम्मदाचा दुसरा मुलगा.


सलगम : कोबी,नवलकोल,फुलकोबी या प्रकारातील वनस्पती.या प्रजातीच्या एकूण १५० जाती असून भारतात त्यापैकी ११ जाती.हिची मुळे मांसल असून हिचा कोवळा पाला भाजीसाठी वापरतात.उत्तरेकडील समशीतोष्ण प्रदेशात हिची लागवड मोठ्या प्रमाणात होते. हिचे मूलस्थान मध्य ते पूर्व आशिया.भारतात पंजाब व उत्तर प्रदेशात लागवड केली जाते. याला तांबडा मुळा असेही म्हटले जाते.


अथणी : बेळगाव जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण. एप्रिल १६७६ मध्ये शिवाजी महाराजांच्या सैन्याने हे शहर लुटले होते.


बेझोर किंवा पाद जहर : मध्ययुगीन कालखंडात विषावर उतारा म्हणून उपयोगात आणला जाणारा दगड.या प्राणीजन्य दगडात विषनाशक गुणधर्म असतात असा समज असल्याने याला खूप मागणी होती.फारसी भाषेत याला म्हणतात पाद जहर.याचा अर्थ प्रतिविष.भारतातील बेझोरचा व्यापार हा पोर्तुगीजांच्या हातात होता.अल बिरूनी या इतिहासकाराने आपल्या 'किताब अल जमाहिर'मध्ये याविषयी नोंद केली आहे.बेझोर हा एक प्राणीजन्य दगड असून तो बकरी,मेंढी, गाय अशा तृणभक्षी प्राण्यांच्या पोटात तयार होतो.या प्राण्यांनी खाल्लेल्या व न पचलेल्या अन्नाभोवती तयार झालेले आवरण म्हणजे हा बेझोर.माकडाच्या पोटातही असे बेझोर तयार होत असतात.तो दुर्मीळ समजला जातो.हा मक्कासरच्या बेटावरील माकडांच्या एका विशिष्ट जातीतच तयार होतो.सन १५७५ मध्ये ॲब्रोईस पारे नावाच्या फ्रेंच वैद्यानं बेझोर हा विषनाशक असतो हा समज दूर केला.परंतु आधुनिक काळातील गुस्ताफ अरहेनियस व ॲण्डू बेनसन यांनी आर्सेनिक मिश्रित द्रव्यात बेझोर टाकले असता या द्रव्यातील विष काढून टाकता येते हे सिद्ध केले आहे.


तेलसंग : बेळगाव जिल्ह्यातल्या अथणी तालुक्यातले गाव.


 तिकोटा : विजापूरजवळचे गाव.


शिवाजीराजांचे हेर तर सगळ्या हिंदुस्थानभर पसरलेले होते.त्यामुळं विजापुरात घडत असलेली प्रत्येक घटना त्याला समजत होतीच. परंतु तरीही तो गप्प होता.त्याच्याकडून लढाईची तयारी सुरू असल्याची कसलीच खबर नव्हती.मुघलांनी जशी तयारी सुरू केली होती तसली कुठलीच तयारी त्यांच्याकडून सुरू नव्हती. कदाचित त्याला अशा प्रकारच्या तयारीची गरजच नसावी.त्याची तयारी वेगळीच असायची.सिकंदर,

अलेक्झांडरप्रमाणं त्याचं आपल्या सैन्याला सांगणं असे.त्यानं आपल्या लोकांना सांगितलं होतं की शत्रू जितका विलासी आणि वैभवशाली असेल.त्याचं ऐश्वर्य आपल्याला दिपवून टाकत असेल तितकीच त्याच्यात धमक आणि धैर्य यांचा तुटवडा असतो.शिवाजीराजांनी कधीच विलासी जीवनाला आणि ऐश्वर्याला थारा दिला नव्हता. त्यांचं घोडदळ मुघलांसारखं सोन्याचांदीनं सजलेलं नव्हतंच. त्याच्या मावळ्यांकडं असत फक्त चिलखत आणि जिरेटोप. त्यांच्या जोडीला असणारी तलवार हाच खरा सैनिकांचे अलंकार असं त्यांचं मत होतं.तो कधीही समोरासमोरचं युद्ध करत नसे. त्याचा भर असे तो शत्रुची कोंडी करण्यावर.शत्रुसैन्याची फसवणूक करण्याच्या अनेक युक्त्या ते लढवत असत.


सुंता विधी : यहुदी व इस्लाम धर्मांनी आणि ख्रिश्चन धर्मातील काही पंथांनी 'सुंता' या पद्धतीला धार्मिक मान्यता दिली आहे.ही प्रथा केव्हापासून सुरू झाली हे सांगता येत नसले तरी सुरुवातीला धातूंच्या शस्त्रांऐवजी दगडाच्या हत्यारांनी सुंता केली जायची.

यावरून ही प्रथा अश्मयुगापासून अंमलात आणली जात असावी. यहुदी धर्मग्रंथानुसार हा विधी मूल जन्माला आल्यानंतर आठव्या दिवशी समारंभपूर्वक करावा असे म्हटले आहे.यहुदी लोक या विधीला 'ब्रिथ मिलाह' असे म्हणतात.ईश्वर आणि ज्यू लोक यांच्यात झालेला हा करार आहे असे ते मानतात.सुंता हा शब्द 'सुन्नत' या अरबी शब्दाचा अपभ्रंश आहे.सुन्नतचा अर्थ आहे 'तरिका' म्हणजे पद्धत.सुंता हा बोलीभाषेतला शब्द असला तरी त्यासाठीचा मूळ अरबी शब्द आहे 'खतना'. हा शब्द 'खतान' पासून तयार झाला आहे.अरबस्थानात जन्माला आलेले ज्यू,ख्रिश्चन आणि इस्लाम हे तीनही धर्म मूळ पुरुष प्रेषित हजरत इब्राहिम (अब्राहम) यांच्या वंशातील प्रेषितांनीच प्रस्थापित केले आहेत.यात सर्वप्रथम 'खतना' करणारे प्रेषित इब्राहिम होते.इमाम मालिकी यांनी संपादित केलेल्या 'मुअत्ता हदीस' या ग्रंथात याचा उल्लेख.ही खतनाची प्रथा प्रेषित इब्राहिमपूर्व काळात हिब्रू जमातीत रूढ होती.ती इजिप्तमध्येही होती असा हदीसमध्ये उल्लेख. एका हदीसमध्ये ग्रीक गणिती पायथागोरस इजिप्तला गेला असताना त्याला 'खतना' करून घ्यायला लागल्याचा उल्लेख. महमंद पैगंबरांनी मुलाच्या जन्मापासून आठव्या दिवसानंतर खतना करणे योग्य असल्याचे म्हटले आहे.टॉमस ह्युजिस संपादित 'डिक्शनरी ऑफ इस्लाम'मध्ये खतना करून घेतलेल्या पाच प्रेषितांची नावे आहेत तर 'दरें मुख्तार' नावाच्या हदीसच्या पुस्तकात अशा १७ प्रेषितांची नावे आहेत.जफर शरिफ लिखित 'कानून इ इस्लाम' या १८३२ मध्ये लिहिलेल्या पुस्तकातील पाचव्या प्रकरणात भारतीय मुसलमानांत असणारे सुंता करण्याचे विधी आणि समारंभ सविस्तरपणे दिले आहेत.


गोवळकोंडा : गोवळकोंड्याचा सहावा बादशहा सुलतान अब्दुल्ला कुत्बशाह हा दि.२१ एप्रिल १६७१ रोजी मरण पावला.त्याला वारस नव्हता. तीन मुलीच होत्या.त्याची दुसरी मुलगी औरंगजेबाचा मुलगा सुलतान महंमदाची बायको, याच सुलतान महंमदाला राजद्रोहाच्या आरोपाखाली औरंगजेबानं ग्वाल्हेरला कैदेत ठेवलं होतं.मृत्यूपूर्वी कुत्बशाहनं गादीचा वारस म्हणून आपला सगळ्यात लहान जावई अबुल हसनची घोषणा केली होती.त्या वेळी झालेल्या संघर्षात सेनापती सय्यद मुजफ्फरच्या मदतीनं अबुल हसन गादीवर आला होता.याचवेळी शिवाजी महाराजांनी निराजी रावजी यांना गोवळकोंड्याला पाठवले होते.कदाचित या वेळच्या सत्तासंघर्षात त्यानं अबुल हसनला गादीवर येण्यात मदत केली असावी.त्यामुळंच या नव्या कुत्बशाहनं सालीना एक लक्ष होनांची खंडणी कबूल केली होती.त्यातलेच सहासष्ट हजार होन निराजीरावांसोबत त्यानं पाठवूनही दिले होते.ही खंडणी घेऊन दि.२१ मे १६७२ रोजी निराजी रावजी रायगडी परतले होते. त्यासंबंधानं कॅरेनं हे लिहिलं आहे.


परिशिष्ट १


वास्को द गामा भारतात आला तो १४९७ च्या अखेरीस.

त्यानंतरच्या पन्नास वर्षांत पोर्तुगीज वसाहती स्थापन होत गेल्या.त्यांच्या रक्षणासाठी किल्ले उभारले गेले.हिंदी महासागरावर त्यांचे वर्चस्व प्रस्थापित झाल्यानंतर महासागर प्रवेश करावयाचा झाला तर त्यांची परवानगी घ्यावी लागे.जर असा परवाना नसेल तर ते जहाज पोर्तुगीज जप्त करत किंवा बुडवून टाकत.मुघल आदिलशाही आणि कुतुबशाहीलाही हे परवाने घ्यावे लागत.

सतराव्या शतकाच्या सुरुवातीस डच आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं भारतात प्रवेश केला तशी पोर्तुगीज सत्तेला उतरती कळा लागली.भारतातल्या पोर्तुगीज सत्तेचे नियंत्रण गोव्यातून केलं जाई.गोव्याच्या व्हाईसरॉयलाच 'विजरई' असंही म्हणत.जर एखादा विजरई मरण पावला तर पोर्तुगालच्या सम्राटाकडून दुसरा नियुक्त होईपर्यंत जो एक किंवा अनेक अधिकारी इथला कारभार बघत असत त्यांना म्हणत 'गव्हर्नदोर' किंवा 'गव्हर्नर'.


हिंदुस्थानातल्या असे पोर्तुगीज विजरई आणि गव्हर्नर.सदर पुस्तकात या लोकांचा उल्लेख झाला आहे.तो १६७२ ते १६७४ एवढ्याच कालावधीचा.म्हणून या कालावधीतील विजरई आणि पोर्तुगीजांची यादी.


१.आंतोनियु द मेलु ई कास्त्रू,लुईस द मिरांद येरिंकिस,मानुयल कोर्तिरियाल द सांपायु दि.७ नोव्हेंबर १६६८ ते २२ मे १६७१ या कालावधीतील हंगामी गव्हर्नर


२.लुईस द मेंदोस फुर्तादु ई आल्बुकेर्कि,कॉदि द लावत्हादील: २२ मे १६७१ ते ३० ऑक्टोबर १६७७ पर्यंतचे विजरई.


भारत आणि पूर्वेकडील प्रदेशातील प्रवास खंड १ (सन १६७२ ते १६७४ ) बार्थ लेमी ॲबेकॅरे,अनुवाद-संपादन सदानंद कदम,दीपा माने-बोरकर,प्रकाशक-अक्षर दालन,कोल्हापूर ( संत ज्ञानेवर माऊली सार्वजनिक वाचनालय,टोप मधून वाचण्यासाठी मिळालेले पुस्तक )


'मॅट्रिक फेल विजय' पुस्तकांच्या विश्वात..