* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: ऑगस्ट 2025

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

३०/८/२५

हे राम / hey ram

२ ऑक्टोबर १८६९ रोजी महात्मा गांधींचा जन्म झाला आणि ३० जानेवारी भारताच्या सेवेत घालविली. अत्यंत श्रेष्ठ प्राचीन संस्कृतीने परिभूषित असा हा महान १९४८ रोजी त्यांचे निर्वाण झाले ! ७९ वर्षांतील जवळजवळ ५५ वर्ष महात्माजींनी देश सुमारे दीडशे वर्षे ब्रिटिशांच्या बंधनांत होता.या कालखंडात भारताची अस्मिता हरवलेली होती.येथील जनता परकीयांच्या सेवेत मग्न झालेली होती आणि त्यातच तिला समाधान वाटत होते.भारतातले ऐतिहासिक चैतन्य आणि आत्मा नष्टप्राण होऊ लागलेला होता.ही पराधीनता नष्ट केल्याखेरीज भारताचा पुनर्जन्म होणार नाही,भारताची अस्मिता जागृत होणार नाही आणि भारताला स्वतःचे उज्वल भवितव्य घडविता येणार नाही,म्हणून महात्माजींनी भारताच्या राजकीय कुरुक्षेत्रात पदार्पण केले आणि सतत पन्नास वर्षे ब्रिटिश राज्यसत्तेशी अपूर्व झुंज देऊन भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले.जागतिक इतिहासात आजवर जे जे युगपुरुष होऊन गेले त्यात महात्माजींचे स्थान फारच वरचे आहे.महात्माजींनी भारताचा इतिहास घडविला हे तर खरेच,परंतु जगाच्या इतिहासालादेखील त्यांनी नवे वळण लावले.

जगाचा भूगोल बदलत नसतो,बदलत असतो तो इतिहास आणि हा इतिहास माणूस घडवीत असतो.
जीवनकलहाचा संघर्ष हा केवळ पोटापाण्याचा आणि जीवनावश्यक सुखसोयींच्या उपलाभावर उभा नसून तो संघर्ष खरा मानवांच्या सुष्ट आणि दुष्ट प्रवृत्तीवर आणि अंतःप्रेरणेवर अवलंबून असतो असे महात्माजींनी सांगितले.

भारताचे राजकीय बंधन सोडविताना अथवा तोडताना महात्माजींच्या डोळ्यापुढे,जगात जेथे जेथे मानवांची सत्तेच्या आणि संपत्तीच्या बळावर पिळवणूक चाललेली आहे,ते देश आणि ते प्रदेश उभे होते.

माणूस माणसाचा वैरी का होतो याचे सूक्ष्म संशोधन महात्माजींनी हयातभर केले.ते करीत असता अविनाशी आणि चिरंतन सत्याचे स्वरूप कसे असू शकते या आध्यात्मिक तत्त्वाचा त्यांनी मागोवा घेतला. सत्याच्या मागोमाग हिंसा आणि अहिंसेचेही तत्त्वज्ञान त्यांनी संशोधिले.माणूस माणसाची हिंसा का करतो ? मानवाच्या इतिहासाच्या प्रारंभापासून माणूस माणसाचा वैरी झाला आहे,ते का?

महाभारतकाळात कुरुक्षेत्रावर याच एका प्रश्नाने अर्जुनाला मोह घातला होता.भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला पडलेल्या या प्रश्नाचे १८ अध्यायांची भगवद्‌गीता सांगून निराकरण केले.महात्माजींचे जीवन, महात्माजींचा आयुष्यक्रम,महात्माजींचे सत्याचे आणि अहिंसेचे प्रयोग,महात्माजींचे अध्यात्मपूर्ण राजकीय तत्त्वज्ञान या सर्व विषयांचा आपण अभ्यास करू लागलो म्हणजे वाटते की भारत हा खरोखर अत्यंत भाग्यशाली देश आहे की जेथे भगवान राम कृष्ण जन्मले.जेथे भगवान बुद्ध जन्मले.जेथे भगवान शंकराचार्य जन्मले,जेथे महात्माजी नेहरू जन्मले.जेथे सावरकर आंबेडकर जन्मले ! आणि एक दिवस भारताचा आजपर्यंत कधीही न मावळलेला ब्रिटिश साम्राज्याचा सूर्य कायमचा अस्तंगत झाला.स्वातंत्र्य मिळाले पण ते मिळताना भारताचे विभाजन झाले. हिंदुस्थान आणि पाकिस्तान अशी भारताची दोन शकले झाली.स्वातंत्र्य मिळाले ते रक्तलांच्छित ठरले.उत्तरेच्या सरहद्दीवर आणि पूर्वेच्या सीमेवर हिंदू मुसलमानांचे दंगे झाले.
हिंदू निराश्रितांचे मैल मैल काफिले स्वतंत्र हिंदुस्थानात येण्यासाठी वाटचाल करू लागले.ज्या जमिनीत पिढ्यान् पिढ्या जगले,वाढले ती मायजमीन सोडून त्यांना जीवाच्या भीतीने इकडे यावे लागले.त्यांचे घर उद्ध्वस्त झाले ! ज्या जमिनीवर त्यांनी पिढ्यान् पिढ्या मातृवत् प्रेम केले त्या जमिनीवर कृतज्ञतेचे दोन अश्रू गाळून त्यांना इकडे मनाविरुद्ध यावे लागले. त्यांच्या संसाराची वाताहत झाली.या रणधुमाळीत अनेक कुटुंबेच्या कुटुंबे नष्ट झाली,नामशेष झाली.
स्वतंत्र भारताची सीमारेषा ही रौद्र तांडवाची अग्निरेषा आणि रक्तरेषा ठरली ! एका ताटात भाऊ-भाऊ म्हणून घास घेणारे हिंदू आणि मुसलमान हे आता उत्तरपूर्व आणि पश्चिम सीमेवर एकमेकांचे वैरी ठरले.पंजाब पेटला, सिंध पेटला,बंगाल पेटला ! महात्माजींना ते पाहवले नाही! अरे,ज्या ध्येयासाठी,भारताच्या ज्या संपूर्ण स्वातंत्र्यासाठी आपण एवढी हयात घालविली त्याची अशी माती माती व्हावी,हे पाहून तो वृद्ध महात्मा अंतःकरणात खचला ! काय मागितले,
कशासाठी झुंज दिली,आणि काय पदरात पडले ! तिकडे नौखाली पेटलेली होती! हिंदू आणि मुसलमान हातात जळते पलिते घेऊन एकमेकांच्या घरादारांना,खोपट्या झोपड्यांना आगी लावत पिसाटासारखे धावत होते! ती आग शांत करावी,त्या आगीने होरपळून निघालेल्या निराधार,निष्पाप,
निराश्रितांचे अश्रू पुसावेत म्हणून हा वयोवृद्ध आणि तपोवृद्ध महात्मा बाहेर पडला.

मानवधर्माला जेव्हा जेव्हा ग्लानी येते तेव्हा तेव्हा त्याला संजीवन देण्यासाठी महात्माजींसारखे योगिराज द्रष्टे अवतरत असतात.परपीडा जाणून घेणारे,परपीडेची यातना समजणारे महात्माजी एक अत्यंत थोर वैष्णवजन होते! मानवतेला आणि मानवाला सत्याचे, अहिंसेचे,साधनशुचितेचे आणि मांगल्याचे अधिष्ठान लाभावे म्हणून महात्माजींनी एकेक श्वास वेचला होता! एखाद्या नंदादीपासारखे ते जन्मभर तेवत होते,स्वतःला जाळून घेत दुसऱ्याला प्रकाश देत होते !

३० जानेवारी १९४८! ती अशुभ सायंकाळ! नित्याप्रमाणे अचूक पाच वाजता बापूजी प्रार्थनेला निघाले.प्रार्थनेच्या व्यासपीठाजवळ येत असतानाच एका क्रूर,निर्दय,अमानुष पिस्तुलातून थाङ् थाङ् तीन गोळ्या सुटल्या आणि ७९ वर्षांचे बापूजी कोसळले!

बिर्ला भवनाच्या आवारात एकच आर्त आकांताची आरोळी उठली, 'बापूजी कोसळले! बापूजी गेले! महात्माजी आम्हांला सोडून गेले!' ही काळीकमित्र अशुभवार्ता साऱ्या भारतातच नव्हे तर साऱ्या जगात हा हा म्हणता पसरली बापूजी गेले। महात्माजी गेले! Gandhiji is dead! या बातमीवर सुरुवातीला कुणाचाच विश्वास बसला नाही.प्रार्थनेसाठी निघालेल्या वृद्ध गांधीजींवर पिस्तूल रोखून गोळ्या झाडून महात्माजींचा वध केला गेला होता! 

उरात त्या तीन गोळ्या बसताच रक्ताची चिळकांडी उडाली! ते रक्त आपल्या उजव्या हाताने झाकून ठेवीत महात्माजी खाली कोसळताना म्हणाले, "हे परमेश्वरा!
त्याला क्षमा कर! हे राम !" आणि ती दिव्य अमरज्योत बिर्ला भवनाच्या आवारात अकस्मात शांत झाली मालवली गेली,स्वर्गस्थ झाली !

गांधी नावाचे महात्मा...

काळाच्या वाळूवर आपल्या पावलांचे ठसे उमटविणाऱ्या कीर्तिमान देशभक्तांच्या स्फूर्तिदायक कथांनी देशाच्या इतिहासाची पाने भरलेली असतात.
क्वचित प्रसंगी त्यात अतिशयोक्तीही असते.अशा तेजःपुंज वीरपुरुषांनी आपला असा एक काळ गाजविलेला असतो.

त्याच इतिहासाच्या पुस्तकावरून असेही आढळून येते की या देशभक्तांचे अनुकरण करणारे असंख्य अनुयायी त्यांच्या मागून येतात.या देशभक्तांनी घालून दिलेल्या मार्गाचा अवलंब करणे एवढेच आपले कर्तव्य आहे असे ते समजतात.या अनुयायांचा सर्व काळ,
होऊन गेलेल्या नेत्यांचे गोडवे गाण्यातच निघून जातो.

कारण या तथाकथित अनुयायांना स्तुती,प्रार्थना,गाणे, बोलणे,घोषणा देणे,ओरडणे,यांखेरीज अन्य मार्ग अवगत नसतो.तेच आपले कर्तव्य आहे असे समजून स्वतःथोडेफार आपल्या नेत्यांच्या,त्यांच्या तत्त्वज्ञानाच्या व काही मर्यादित प्रमाणात जगाच्या उपयोगी पडल्याच्या भावनेत ते असतात.

कदाचित म्हणूनच जीवनाच्या प्रगतीसंबंधी शेक्सपिअरच्या मॅक्बेथमधील एक सुभाषित अर्थवाही वाटते.त्याचा मथितार्थ असा की,कुणा एका मूर्खाने सांगितलेली सुखदुःखाने मिश्रित परंतु अर्थहीन अशी बडबड म्हणजे जीवनगाथा. Life is a story told by an idiot full of sound and fury signifying nothing. गांधीजींच्या बाबतीत हे असे घडू नये. आणि तसे घडत असेल तर त्यापासून सावध होण्याचे मार्गही आम्ही धुंडाळले पाहिजेत.

३० जानेवारी १९४८ रोजी निधन पावलेल्या महात्म्याला आपण ज्या तर्हेने सत्कारीत आहोत त्या पद्धती धोकादायक निशाणी ठरणाऱ्या आहेत.भाषणे, पुतळे,रस्त्याचे नामकरण आणि सदिच्छा बस्स,पुष्कळ झाले हे! याहूनही अनेक गोष्टी आहेत.थोडक्यात म्हणजे आम्ही तोंडाने बोलतो,डोळ्याने पाहतो,परंतु हृदयाचा ओलावा मात्र आढळत नाही.

गांधी नावाचे महात्मा,संपादक - रॉय किणीकर,
साहाय्यक - अनिल किणीकर 

आम्ही भारतवासीयांनी,विशेषतः सध्याच्या तरुण पिढीने,जी उद्याच्या भारताचा वारसा सांगणार आहे, विशेष लक्षात ठेवले पाहिजे,गांधीजींचा वारसा हा साधा व सोपा नाही.आम्हां सगळ्यांकडून चांगले तेच मागणारे ते एक ऐतिहासिक अभिमानाचे लेणे आहे.निव्वळ आनंददायी शब्द व सदिच्छा यांहून अधिक उच्चतर असे ते लेणे आहे.गांधी म्हणजे मूर्तिमंत चैतन्य.आणि आपणा सर्वांना जर गांधीजींच्या तत्त्वज्ञानाशी प्रामाणिकपणा दाखवायचा असेल तर आपणही क्रियाशील बनले पाहिजे.आणि या क्रियाशील वृत्तीकरिता प्रेरणा हवी असेल तर ती 

कवी लाँगफेलोच्या सामर्थ्यशाली व हेतूपूर्ण शब्दात आढळते - "सतत कार्य हेच आपले ध्येय ठेवा, कोणतेही कार्य अंत:करणापासून करा. देवाला साक्षी ठेवून करा." पुन्हा प्रश्न निर्माण होतो.त्याचे उत्तर एक किंवा अनेकही असू शकतील.प्रश्न असा की,आम्ही कोणते कार्य करावे? कोणते? केव्हा? व कसे? या प्रश्नाचे उत्तर जरी मोठे लांबलचक असले तरी ते साधेच आहे.आमच्या प्रत्येक कार्यात,प्रत्येक ठिकाणी गांधीजींच्याप्रमाणेच सत्याचा प्रकाश आपल्या पाठीशी असावा.याचाच अर्थ असा की,आम्ही नेहमी चांगले तेच केले पाहिजे.जरी ते सोईचे नसले,किंवा कायद्याचे नसले तरीसुद्धा !

सत्याच्या या प्रकाशात आपल्याला असे आढळून येते की,आनंदी जिणे जगण्याकरिता माणसाने अंतःकरणाने निर्हेतुक प्रेम करावे लागते.आपल्या सहकाऱ्यावरील प्रेमामुळे आपण सत्याकडे ओढले जातो.जगण्याची आणि विचार करण्याची अशी पुढे एक पायरी गाठली जाते की,जिथे परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवायचा असतो.या सगळ्या गोष्टी घडायच्या तर दूषित पूर्वग्रह नष्ट झाले पाहिजेत व आपला सर्वार्थाने ख्रिस्ताच्या पुढील सुवर्णतुल्य शब्दांवर विश्वास पाहिजे, "जे या धरतीची मनापासून सेवा करतात तेच यशाचे खरे मानकरी आहेत."ज्या वेळी आम्ही कार्याला सुरुवात करू तेव्हा व गांधीजींच्या आनंददायी जगाची अभिलाषा धरू तेव्हा,उद्या,पुढच्या आठवड्यात,पुढच्या महिन्यात या शब्दांना काही अर्थ उरणार नाही. सुरुवातीची खरी वेळ आत्ताच आहे.
आज आत्ता या क्षणी,कारण दुसरी एखादी वेळ म्हणजे पुन्हा विलंब होणार.या चांगल्या कामाची सुरुवात कोण करणार? आपले शेजारी? भाईबंद? का मित्र ? नव्हे.सर्वांत सोपा आणि उत्तम मार्ग म्हणजे या कार्यांचे सर्वप्रथम उदगाते तुम्ही स्वतः आहात.तुम्हीच वाचक आहात.कारण फार फार वर्षांपूर्वी एका विद्वान माणसाने आपल्याला सांगितले होते

"हृदयात चांगुलपणा असेल तर स्वभावात सौंदर्य येते.स्वभावात सौंदर्य असेल तर घरात सुसूत्रता येते.जर घर सुघटित असेल तर राष्ट्रात शिस्त येते. शिस्तीचे राष्ट्र जगाच्या शांततेत भर घालते."

आपल्याला जे काही जीवनमृत्यूचे तत्त्व माहीत आहे त्या दृष्टीने विचार करता गांधीकथेचा उत्तरार्ध दुःखद आणि लाजिरवाणाच होता असे म्हणावे लागेल.
नाहीतर त्यांच्यानंतर आलेल्या आमच्या पिढीत.मनात आणले तर दुःखाचे अन्य कशात तरी रूपांतर करण्याचे सामर्थ्य खचितच आले असते.आपल्याला हे माहीत आहे की देवाला प्रिय अशा व्यक्तीचे अस्तित्व पर्ण पुष्प वृक्ष यांच्यातून सत्यरूपाने वास करीत असते.या सत्यस्वरूपी वृक्षाचा अंश त्यांच्यात असल्याने चिरंतन जगण्याची उमेद बाळगून असे महात्मे मृत्यूला हसत असतात.लोकांनी वृक्षावर प्रेम करून त्याविषयी कष्ट घेतले तर चांगली फळे प्रसवतात.गांधीजीवनकथेत आणखी एखादी भर टाकायची ठरवली तर आपण सर्वांनी कष्टाळू माळ्याच्या भूमिकेतून वेगाने कार्यरत झाले पाहिजे.

जर आम्ही असे वागलो तर पुढील काळातील स्त्री पुरुष गांधीजीवनकथा पुढीलप्रमाणे वाचतील,
"कोणे एके काळी गांधी नावाचा एक मनुष्य होऊन गेला.त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांनी त्यांचे कार्य असे काही पुढे नेले की जणू काय त्याचा मृत्यू घडलाच नाही आणि तो चिरंजीव अमर ठरला !"

"महात्माजींविषयी नवीन आणि वेगळे असे आज काय सांगता येईल? उत्तुंग पर्वताचे शिखर,खळाळता रे सप्तसागर किंवा लखलखणारी नवलाख नक्षत्रे यांच्याविषयी तरी असे काय नवीन आणि वेगळे सांगता येणार आहे? तो पर्वत,ते सप्तसागर आणि ती नक्षत्रे यांचे दर्शन घडताच मानवाच्या मनाचे हात अपार श्रद्धेने आपोआप जुळतात,तसेच महात्माजींच्या नामोच्चारानेही होते.भव्य पर्वताची उदात्तता,सागर तळाशी अंथरलेली निगूढ एकांतता,नक्षत्रांचे मांगल्य आणि अचल निष्ठा या साऱ्या श्रेष्ठ सद्गुणांचा समन्वय म्हणजेच महात्माजी!"

रॉय किणीकर...



२८/८/२५

बेडकांचं गाणं / frog song

बेडूक जरी विणीच्या काळात अधिक आवाज करीत असले,तरी एकदा तो काळ निघून गेल्यावरही ते समूहानं गात असतात.यात मादी बेडकांचा सहभाग नसतो.सामूहिक गान हे नेहमीच लयबद्ध आणि श्रवणीय असतं.बेडकांच्या अशा लयबद्ध आवाजामुळं झोप येत नाही,म्हणून तो थांबविण्यासाठी आपल्या कुळांना रात्रभर काठ्या आपटण्याची सूचना देणाऱ्या जमीनदाराची गोष्ट आपण ऐकली असणार.त्याला झोप न येण्याची अनेक कारणं असू शकतील,बेडकांच्या आवाजाचं निमित्त मात्र झालं.


श्रवण महिन्यात मी एकदा चंद्रपूर जिल्ह्यातील आलापल्लीनजीकच्या कन्हाळ गावच्या वनविश्रामगृहात मुक्कामाला होतो.हमरस्त्यापासून एखादा किलोमीटर आत असलेलं हे विश्रामगृह पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंची शोभेची झाडं पाहता-पाहता विश्रामगृहाच्या परिसरात आपण कधी पोहोचतो, लक्षात येत नाही.समोर सुंदर बाग.लांबच लांब व्हरांड्याच्या छपरावर विविध रंगांच्या फुलांच्या बेली वाढलेल्या.विश्रामगृहापासून गाव दूर आहे;परंतु या गावाची हिरवीगार भातशेतं आजूबाजूला पसरलेली दिसतात.डाव्या बाजूला एक छोटं तळं आहे.ते विश्रामगृहाच्या खिडकीतून स्पष्ट दिसतं.तळ्यावरून एक मार्ग कोठारी जंगलाकडं जातो.या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी घनदाट अरण्याला सुरुवात होते.समृद्ध जंगल कसं असतं याचा प्रत्यय मला त्या रस्त्यावर चालत जाताना येई.सागाची झाडं विपुल असली तरी अधूनमधून धावडा,साजा,

बिजा ही झाडंही दिसायची.बांबूच्या बेटांमुळं मात्र जंगलाला खरा घनदाटपणा प्राप्त झाला होता.पावसामुळं सारी वनश्री अंघोळ केल्याप्रमाणं वाटे.या वाटेनं मी रोज पक्षिनिरीक्षण करीत जायचा.

या जंगलाचं दर्शन विश्रामगृहातूनही होई.


इथून वीस-पंचवीस किलोमीटर अंतरावर कोठारीचं जंगल आहे.या जंगलात चिरा दगड (फॉसिल) सापडतो. तो हातोड्यानं फोडला की दोन थरांत मासे,बेडक्या, शंख,शिंपले आणि वनस्पती यांच्या अवशेषांचे ठसे दिसून येतात.जमिनीत गाडलेले व त्यांची टोकं दिसत असलेले राक्षस दगडही (वूड फॉसिल) जिकडं-तिकडं विखुरलेले आढळून येतात.जंगलातील पाउलवाटेनं हे सारं पाहात,नमुने गोळा करीत हिंडण्यात एक आगळावेगळा आनंद वाटे.वर्षा ऋतूतील जंगलाचं सौंदर्य पर्यटकांना सहसा पाहायला मिळत नाही.ते मी रोज अनुभवीत होतो.हिरव्या रंगाच्या छटांची जिकडं-तिकडं उधळण केल्यासारखी वाटे.श्रावणातला पाऊसही तसा लहरी.क्षणात पडे,क्षणात उघडे.


त्या दिवशी रात्री पावसाला सुरुवात झाली.बाहेर किर्र अंधार.

खिडकीतून पाहिलं,तर आकाश ढगांनी भरलेलं. ग्रह-नक्षत्रांच्या दर्शनानं एरवी उंच वाटणारं आकाश ढगांनी खाली आल्यासारखं वाटतं.जंगलात विलक्षण शांतता होती.रातकिड्यांचंही अस्तित्व जाणवत नव्हतं. अशा वेळी रात्री उडणारी पाखरंदेखील झाडाच्या अंधाऱ्या ढोलीत डोळे मिटून बसलेली असतात. झाडांची रुंद पानं हलतात.त्यांवर पडणाऱ्या थेंबांचा आवाज येतो.परंतु हे सारे नाद लवकरच अंधारात विरून जातात.त्या अंधाराची विस्मयजनकता मधूनच चमकणाऱ्या काजव्यांमुळं प्रतीत होते.


अशा विलक्षण शांततेचा अनुभव कधी शहरवासीयांना येत नाही.आभाळ आल्यामुळं हा अंधार अनेक पटींनी वाढला होता.जंगलात तर तो शतपटीनं वाढतो,मी शांतपणे डोळे मिटले,

तेव्हा तर या अंधाराचे सहस्र बाहू माझ्या डोळ्यांपुढं नाचत होते.मी मनोमन प्रार्थना करीत होतो,की ही शांतता आता भंगू दे.


हळूहळू शेजारच्या तळ्यातून बेडकांचं डरांऽव डरांऽव गाणं ऐकू येऊ लागलं.त्या आवाजात नेहमीची कर्कशता नव्हती.त्यात मृदुता आली होती.मंद गतीनं आवाज येत होता.पाखरांच्या एखाद्या समूहगायनासारखं वाटत होतं. त्या आवाजानं काही क्षणात अंधारातील भयानकता निघून गेली.मला वाटलं,जणू याच आवाजाचा तिथं अभाव होता.तो आता सुरू झाला होता.त्या आवाजात एक प्रकारची लयबद्धता होती.सुरुवातीला राणा बेडक्यांच्या समूहाचा आवाज येऊ लागला. नंतर भेक-टोड बेडकांचा मोठा आवाज येऊ लागला.राणा आणि भेक यांची जणू जुगलबंदी चालू झाली.हे आवाज मध्येच थांबत. एखादा भेक आवाज काढू लागताच त्याला इतरांची साथ मिळे.नंतर दोन्ही प्रकारचे बेडूक गाऊ लागत.हे आवाज कानांवर येत असता मला कधी तरी झोप लागली.पहाटे मी जागा झालो.


पाऊस थांबला होता.शुक्ल पक्षातील ती पहाट असल्यामुळं चंद्रप्रकाश ढगांतून पाझरत होता.त्यामुळं बाहेर अंधूक प्रकाश दिसत होता.तळ्यातील पाणी चमकत होतं.इतक्यात बेडकांच्या समूहगायनाला पुन्हा सुरुवात झाली.परंतु मध्येच त्या सुरात न सामावणारा एका बेडकाचा चिरकलेला आवाज ऐकू येत होता.


मी अंथरुणात उठून बसलो. उशाजवळचा कमांडर टॉर्च घेऊन तळ्याच्या दिशेनं प्रकाशाचा झोत टाकला.


बेडकांचे पिवळ्या चश्म्यासारखे दिसणारे अनेक डोळे प्रकाशात सुवर्णमण्यांसारखे चमकू लागले. निळ्या-हिरव्या पाण्याच्या पृष्ठभागावर नक्षत्रांचं प्रतिबिंब पडल्यासारखं वाटत होतं.तेवढ्यात एक साप एका बेडकाला गिळत असताना मला दिसला.त्या बेडकाला त्याचं भान नसावं.कारण मृत्यूच्या जबड्यात असताना देखील समूहगायनाला साथ देण्यास तो विसरत नव्हता.


अनादी काळात पाखरं अजून जन्माला आली नव्हती, तेव्हापासून हे बेडूक पावसाळ्यातील अंधाराचं भय कमी करीत आदिमानवाला साथ देत आले आहेत.


नवेगावबांध इथं असताना पावसाळ्यात मी काजवे पाहायला सरोवराकाठी जाई.झाडांवर बसलेल्या असंख्य काजव्यांच्या प्रकाशाकडं पाहता-पाहता मला बेडकांचं गाणं ऐकू येई,विस्तृत आणि शांत सरोवराकाठी हे बेडूक समूहगान गाऊ लागले,की त्यांचा आवाज पाण्यावरून दूरपर्यंत ऐकू येई.जलाशयावरील अंधार, काजव्यांच्या प्रकाशामुळं दृश्यमान झालेल्या झाडांची पाण्यात पडलेली सुंदर प्रतिबिंब,विलक्षण शांतता आणि या शांततेतून स्रवणारं बेडकांचं गान असं एक अभूतपूर्व विश्व माझ्यासमोर साकारलेलं दिसे.


मेळघाट व्याघ्र प्रकल्पात एक डेड्रा म्हणजे बेडूक खोरं आहे.पावसाळ्यात माझा मुक्काम या खोऱ्याजवळच्या कोकटू वनविश्रामगृहात असे.अतिवृष्टीमुळं मेळघाटातील पाचही नद्या दुथडी भरून वाहू लागल्या, की रस्ते बंद व्हायचे.कित्येकदा मला दहा-पंधरा दिवस या नद्यांतील पाणी ओसरेपर्यंत विश्रांतिगृहातच राहावं लागे.अशा वेळी मी रोज बेडूक खोऱ्यापर्यंत चालत जाई अन् तिथल्या एखाद्या मोठ्या दगडावर बसून खोऱ्याकडं पाहात राही.तिथल्या हत्तीएवढ्या शिळांवरून पावसाचं पाणी धो धो वाहताना शुभ्र वर्णाचे तुषार उडत. खोऱ्याजवळून जाणारी कोकटू नदीदेखील बेफाम वाहात असे.अशा वाहणाऱ्या नदी-नाल्यांना एक नाद असतो.तो नाद ऐकत बसलो असताना अचानक बेडकांचं गाणं सुरू होई.खोऱ्यात मोठमोठे राणा बेडूक आणि कलिंगडाच्या आकाराएवढे भेक होते.तिथल्या झाडांवर रंगीबेरंगी वृक्षमंडूकदेखील होते.आलटून पालटून त्यांचं सामूहिक गान चालू असे.वृक्षमंडूकांचा तर पाखरांच्या किलबिलाटासारखा आवाज येई.(पाखरमाया,मारुती चितमपल्ली,साहित्य प्रसार केंद, सीताबर्डी,नागपूर )


सायंकाळी या गानाला नदी,नाले,ओहोळ आणि आजूबाजूचे जलप्रपात यांचा नाद साथ देई.त्यात वाऱ्याबरोबर सळसळणाऱ्या झाडांचा संमिश्र संथ आवाजही असे.पावसाळ्यात कुठल्याही जंगली जनावरांचा अथवा पाखरांचा आवाज येत नाही. जाणवंत,ते बेडकांचं गाणं.एकदा असाच मी कोकणात पनवेलजवळच्या कर्नाळा गावी होतो.कोकणातील जंगलातील,तसेच भातशेतीमधील बेडकांचा अभाव पाहून मला आश्चर्य वाटे. बेडकांचं गान तर क्वचितच ऐकू येई.


पावसाचे दिवस.रात्री आठ वाजता कर्नाळा इथं थांबणारी बस त्या दिवशी आलीच नाही.मला पनवेलला जायचं होतं.शेवटची बस रात्री दहाला होती.मी माझ्या वनकर्मचाऱ्यांबरोबर बोलत बोलत थांब्यावर बसची वाट पाहात असता - दूर जंगलात ओढ्याच्या काठाकाठानं जाणारा एक टेंभा दिसला.वनकर्मचारी त्याकडं पाहात सांगत होते की,अलीकडे रात्रीच्या अंधारात असा एक टेंभा फिरताना दिसतो.कोकणात भुतं फार.कर्नाळा इथं राहणाऱ्या वन-कर्मचाऱ्यांना तोच संशय आला होता. त्यामुळं रात्रीचं कोणी बाहेर पडत नसे.तो पेंढा आता बराच दूर गेला.पण नंतर एक वळण घेऊन आमच्या दिशेनं येऊ लागला.माझ्यासोबतचे वनकर्मचारी गप्प झाले.हळूहळू येणाऱ्या टेंभ्याकडं मी पाहात होतो.अधूनमधून तो टेंभा वर-खाली होई.कधी पार ओढ्याच्या पाण्यावर येई. जवळ येताच माझ्या बॅगेतील टॉर्च काढून मी प्रकाशाचा झोत त्यावर टाकला. एका माणसानं तो टेंभा हातात धरला होता.उघडीनागडी व्यक्ती अंधारात स्पष्ट दिसत नव्हती.फक्त टेंभा तेवढा दिसायचा.


मी त्याला दरडावून विचारलं,


"कोण आहे रे? अशा रात्री टेंभा घेऊन जंगलात काय करतोस?"


ती व्यक्ती जवळ आली. मी त्याला ओळखलं. तो रानसईचा ठाकर होता. तो जवळ येत म्हणाला,


"सायब, मी बेडूक पकडीत होतो,जी."


त्याच्या खांद्याला झोळी होती,तीत त्यानं पकडलेले बेडूक ठेवलेले होते.


ते सारे बेडूक मी परत जंगलात सोडून दिले.आणि 'पुन्हा जंगलात पाय ठेवू नकोस' अशी सक्त ताकीद त्याला दिली.मग माझ्या सारं लक्षात आलं.त्या वेळी कोकणात एक नवीन धंदा ऊर्जितावस्थेला येत होता.तो म्हणजे बेडूक पकडून पनवेलमधील व्यापाऱ्यांना विकण्याचा. व्यापारी त्या बेडकांच्या टांगा तोडून परदेशांत खाद्य म्हणून पाठविण्याचा उद्योग करीत.परंतु या उद्योगामुळं कोकणातील बेडकांची संख्या कमी झाली.त्यामुळं डास वाढले.

भाताच्या पिकांवर कीड पडू लागली.कारण या डासांवर आणि किडीवर बेडूक उपजीविका करीत. त्यामुळं त्यांवर नियंत्रण राही.पुढं पर्यावरणवाद्यांनी याविषयी खूप आरडाओरडा केल्यावर हा धंदा बंद झाला;परंतु निसर्गातील संतुलन नाहीसं झालं,ते पुन्हा सांधता आलं नाहीच.नवेगावबांध येथील माझ्या निवासस्थाना

समोरील बागेत हौदातील कमळाच्या पानांवर तीन प्रकारचे राणा बेडूक आढळून यायचे. तिथल्या आंब्याच्या झाडावर वृक्षमंडूक होते.हिरव्या, तसेच सोनेरी रंगाचे,लहान आकाराचे हे मंडूक मोठे सुंदर दिसायचे.पावसाची चिन्हं दिसली,की हे मंडूक आवाज करू लागत.चश्म्यासारख्या डोळ्यांचे भले मोठे भेक मंडूकदेखील होते.सायंकाळ झाली,की ते चक्क घरात प्रवेश करीत.छायाला आणि तिच्या आईला ते अजिबात भीत नसत.हे बेडूक घरातील डास जणू तोंडात ओढून घेत.पाऊस पडू लागताच विविध प्रकारच्या दहा-बारा बेडकांच्या या टोळक्याचं गाणं सुरू होई.


 पुढं पुढं ते गाणं कमी कमी होई.परंतु त्यांच्या पिलांची संख्या वाढलेली असे.बेडकांना खाण्याकरता चारपाच फूट लांबीची धामण बागेत फिरताना दिसली,की छाया पळत घरात येई.फुटक्या बांबूचा आवाज करून त्या धामणीला मी जंगलात हुसकावून देई.कधी कधी बेडूक पकडण्यासाठी ही धामण मोठ्या चपळतेनं पाण्यात पोहताना दिसे.धामण क्वचितच बेडूक खाताना दिसे. मात्र कावळे आणि घारी हे त्यांचे खरे शत्रू होते.कधी रानमांजरदेखील बेडकाची शिकार करताना दिसे.


या जगात बेडकांवर खरं प्रेम कुणी केलं असेल,तर ते हायकू लिहिणाऱ्या जपानी कवींनी.हायकू वाचताना बेडकांचं कधी न जाणवलेलं सौंदर्य मला अनुभवता येतं.बेडूक गातात,हे मला पहिल्यांदा या कवींनी सांगितलं आहे.


तू गातोस तर छान ! परंतु नाचून दाखवशील काय? :


Elegant singer Would you further


Favour us


With a dance.... O frog?


-Issa


तिन्हीसांजेची वेळ.जिकडंतिकडं शांत आहे.दूरवरून बेडकांच्या पिलांच्या गाण्याचा आवाज कानी येतोय. :


Standing still at dusk 


Listen... in far 


Distances


The song of froglings!


-Buson


वसंत ऋतूनंतर पावसाचं आगमन होतं.तेव्हा बेडूक गाऊ लागतात.त्यांचे ते उदास सूर ऐकून वाटतं,की ते कोणाविरुद्ध तक्रार करीत असावेत.


When spring is gone,none 


Will so grumpily


Grumble


As these chirping frogs.


-Yayu


हीच तक्रारीची भावना दुसऱ्या एका कवीनं सांगितली आहे:


Day darken! frogs say 


By day.. bring light! Light! 


they cry By night. Old grumblers!


-Buson


पहिल्यांदा मी जेव्हा यती बनलो,तेव्हा या बेडकांनी पूर्वीचीच जुनी गाणी गायली :


Since I first became 


A hermit,


The frogs have sung Only of old age


-Issa


तिन्हीसांजा झाल्यात.चंडोलांचा थवा आकाशात गातोय, तर बेडकांचा कळप धरतीवर.गाण्याच्या कलेत कोण वरचढ आहे,याची जणू पैजच लागली आहे,पहा :


Frog-school competing 


With lark-school


 Softly at dusk In the art of song....


-Shiki


बेडूक लहान असताना पाखरांप्रमाणं गातात.परंतु उन्हाळा संपून पावसाचं आमगन होताच ते म्हाताऱ्या कुत्र्यासारखे भुंकू लागतात :


As froglets


They sang like birds…


 Now summer is gone


 They bark like old dogs


-Onitsura


त्या रात्री मी पल्याडलं शेत विकून टाकलं.रात्रभर मला झोप आली नाही.तेव्हा बेडकांचे आवाज ऐकत पडून राहिलो :


That night when I had 


Sold my lower 


Field... I lay 


Wakeful from frog-calls.


-Hokushi


पावसाचे थेंब नवीन पालवीवर आवाज करीत पडू लागले,तसे वृक्षमंडूक हलकेच उठून मंद सुरात गाऊ लागतात :


A tree frog softly


 Begins to trill


 As rain drops 


Spatter the new leaves


-Rogetsu.

२५/८/२५

नोकोबीनिवासी / Resident of Nokobi

रॅफेल सेमीज कोडी ऊर्फ 'रॅफ'.सरासरीपेक्षा लहानखुरा,एकांडा,अंतर्मुख मुलगा.वडील ऐन्स्ली कोडी पेशानं मेकॅनिक,निम्न मध्यमवर्गी.आई मार्शिया सेमीज.माहेरची श्रीमंत.ऐन्स्लीच घर, दुकान,सगळं सेमीज लोकांनी मुलीला आंदण म्हणून दिलेलं.पण ऐन्स्लीचं उत्पन्न जेमतेम.घरी टीव्हीसुद्धा नाही.
क्लेव्हिल्शेजारच्या नोकोबी परिसरात पिकनिकला जाणं,ही मुख्य करमणूक.

या पिकनिक्समधून भेट झाली फ्रेडरिक आणि 
अ‍ॅलीशिया नॉर्व्हिल् या विनापत्य जोडप्याशी. फ्रेडरिक फ्लॉरिडा राज्य विद्यापीठात परिसरशास्त्राचा प्राध्यापक.त्याची पिकनिकही काही प्रमाणात तरी नोकोबी परिसरातल्या लॉग-लीफ पाईन वृक्षांनी नटवलेल्या कुरणांचा अभ्यास करण्यासाठीची.

फ्रेडरिकला लवकरच जाणवलं,की रॅफला नोकोबी परिसराची सखोल माहिती आहे.लवकरच फ्रेडरिकचा रॅफसाठी 'फ्रेडकाका' झाला,आपल्या जीवसंग्रहात रस घेणारा.रॅफच्या संग्रहात अनेक सॅलामँडर पाणसरडे होते - उभे पट्टेदार,ठिपकेदार, आडवे पट्टेदार.कोरस बेडूक होते,कंगव्याच्या दातांवर नखानं आवाज काढतात,तसा आवाज करणारे.चकचकीत निळे चतुरकिडे होते. मोठाले लबर जातीचे नाकतोडे होते, ज्यांना हातावर येऊन बसायला शिकवता येतं.

रॅफ फ्रेडकाकाला कहाण्या सांगतो - प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या,किड्यांच्या.काही कहाण्या स्वतःच्याही. बाबांना रॅफनं शिकारी होऊन हवं असतं,तर रॅफला प्राणी-पक्षी मारण्यात रस नसतो.आपला मुलगा 'बायल्या' असल्यान बाप नाराज,आणि रॅफ अधिकाधिक एकांडा आणि अंतर्मुख होत जाणारा.

आईवडिलांमधला तणाव.दोघं घटस्फोट तर घेणार नाहीत? वडील बायलेपणावरून मारणार तर नाहीत?वडील सहज हिंस्र होणारे,रॅफचे वडील पाच फूट आठला जरा कमी.वजन फक्त एकशे तीस पौंड.
कोण्या मोठ्या माणसाशी मारामारी झाली,तर काय करतील?

प्रश्न गैरलागू होता.वडिलांच्या खिशात मोठा चाकू असायचा.वेळीअवेळी एका छोट्या चौकोनी दगडानं ते धार लावत असायचे.पिकअप ट्रकच्या पुढच्या कप्प्यात ०.२२ पिस्तूल असायचं.मध्येच एक ब्लॅकजॅक सोटा काढून दाखवायचे.कुठून सोटा येतो,हे रॅफला कधी कळायचंच नाही.पण ही सारी शस्त्रास्त्रं कधी वापरावी लागल्याचं रॅफच्या ऐकिवात नव्हतं,ना पुढे कधी ऐकू आलं.

पण ह्या साऱ्यातनं रॅफ आतून मजबूत होत गेला.

आईचा वेगळाच प्रकार.सेमीज लोक अमेरिकन यादवी युद्धात प्रसिद्धी मिळवलेल्या अ‍ॅडमिरल रॅफेल सेमीजच्या चुलत घराण्यातले.यादवी युद्धात दक्षिणेकडून लढलेल्यांचं दक्षिण यूएसएत कौतुक फार तर आई रॅफला सांगायची,"मुला,आपले लोक कोण होते,हे नेहमी लक्षात ठेव.तुला जीवनात खूप मदत लागेल,आणि इथे दक्षिणेत मोठं नाव महत्त्वाचं असतं."तिला रॅफ इतर कुठे वास्तव्याला जाईल,हे सुचतच नसे !

या मानानं फ्रेडकाकांशी बोलणं रॅफला सोपं जायचं.

"मला पूर्ण नोकोबी परिसराचा नकाशा काढायचा आहे,कुठे कोणते जीव सापडतात त्याचा.मग पुढे सगळं झीबाक अरण्य तपासायचं आहे.कोणाला ठाऊक,मला काही नव्या जीवजाती सापडतील, नव्या सापांचे फोटो काढता येतील."

या झपाट्यानं फ्रेडकाकाही सावध झाला.

"रॅफ,एक सल्ला देतो, महत्त्वाचा.जरा दमानं घे. नव्या,माणसांना अनोळखी जीवजाती असतील तिथे.पण टप्प्याटप्प्यानं चलू या.तू अजून लहान आहेस.प्राणिसृष्टी,वनस्पतीसृष्टी आधी शिकून घे. आणि जे काही करशील,ते सांभाळून कर.विषारी सापांपासून सांभाळ.पाण्यापासून दूर रहा.जूनियर किंवा कोणी शाळेतले मित्र सोबत घेत जा.नोकोबी मस्त जागा आहे,

पण तू धड राहिलास तरच अभ्यास करता येईल ना!"

"हो, सर!"

उत्तर फार लवकर आल होत.पण फ्रेडकाका करू शकत होता तेवढं त्यानं केलं होतं.

नोकोबी परिसर म्हणजे मुख्यतःनोकोबी सरोवराचा परिसर.हे बाराशे एकरांचं सरोवर अजून माणसाच्या हाती लागलं नव्हतं.त्याच्याभोवती माणसांचा स्पर्शही न झालेलं लॉग-लीफ पाईन जंगल होत..

 त्याच्याभोवती यांच्या सरोवरालगतचा भाग विरळ,कुरणासारखा होता.तर जरा पश्चिमेला दाट अरण्य होतं.तो भाग विल्यम झीबाक राष्ट्रीय उद्यान म्हणून राखीव केला गेला होता.नोकोबी सरोवराच्या दक्षिण टोकाचा एक जवळपास सुटा वाटणारा भाग घुबडतलाव म्हणून ओळखला जायचा.

नोकोबी सरोवर आणि विल्यम झीबाक राष्ट्रीय उद्यान यांच्यामधली जमीन जेप्सन कुटुंबाची होती. हे कुटुंब खरं तर आज क्लेव्हिलजवळ राहतही नव्हतं.कुठेतरी उत्तरेला होतं.त्याच्या शाखा-उपशाखाही सगळ्या उत्तरेत पसरल्या होत्या. सगळ्या जेप्सनांमध्ये वादावादी होती.आणि नोकोबी जमीन विकायची कोणालाच घाई नव्हती. क्लेव्हिलचे बिल्डर-डेव्हलपर्स मात्र नोकोबी परिसर विकाऊ व्हायची वाट पाहात असायचे.पर्यावरणवाद्यांनाही नोकोबी परिसरात रस होता. त्या भागात अनेक दुर्मिळ जीवजाती होत्या.काही तर नष्ट होण्याच्या बेतातल्या होत्या.

सर्वांत प्रसिद्ध होते लाल तुऱ्यांचे सुतारपक्षी;मोठ्या लाँग-लीफ पाईन्सच्या उंचावरच्या ढोल्यांमध्ये राहणारे.आकारानं मोठे होते जांभळे साप.सातेक फुटांपर्यंत वाढू शकणारे हे साप काळपट-जांभळे असायचे.कासवांच्या बिळात राहात ते अनेक लहानसहान प्राणी खायचे,अगदी आपल्याच जातीची पिल्लंही खायचे.लहान जीवांमध्ये होत्या 'मोल' - सापसुरळ्या.वीतभरही नाही.पाय जेमतेम. खरं तर चिलखतधारी गांडुळांसारखे.हे निसर्गशास्त्रज्ञ सोडून कोणाला दिसतही नसत.

तीन प्रकारच्या मुंग्याही भेटायच्या.एक जात कासवांच्या बिळांमध्ये राहून कोळ्यांची अंडी खायच्या.दुसरी एक जात पाईन वृक्षांवर जगायची, आणि लाल तुऱ्यांच्या सुतारांना अन्न पुरवायची.ते सुतार पक्षी मुख्यतः या मुंग्यांवरच जगायचे.तिसरी जात नोकोबी-घुबड सरोवरांजवळ वारुळं रचून राहायची.खुद्द फ्रेडकाकांना नोकोबीत रस होता तो वेगळ्याच कारणानं.वणवे आणि त्यांचा जंगलांवरचा परिणाम,हे फ्रेड आणि अ‍ॅलीशियांचं अभ्यासाचं क्षेत्र. फ्रेडकाका सांगतात.

माणसांनी मधेमधे केले नाही,तर विजांमुळे वणवे पेटतात,आणि तेही वारंवार.वणवे जमिनीलगतच्या काडीकचऱ्यातून सावकाश पसरत जातात.

वेगवेगळ्या प्रकारांची सगळी झाडं हे सहन करतात. नुसतं सहन नाही करत,तर त्यांना दर काही वर्षांनी अशा जाळपोळीची गरज असते.आम्ही जुन्या वणव्यांचे पुरावे तपासले.

असं दिसलं की,वणवे पेटू दिले नाहीत तर मूळ झाडांचे प्रकार मागे पडून बाहेरची झाडझडप त्या जागी आक्रमण करतात.दहाएक वर्षांमध्ये सगळं जंगल स्लॅश-पाईन,लॉब् लॉली पाईन,वॉटर-ओक, लॉरेल-ओक,स्वीटगम,आणि तसल्या झाडाझुडपानी गच्च भरून जात.याचा काडीकचरा जमिनीच्या जरा वर दाट थर घडवतो.खेळत्या हवेनं तो लवकरच कोरडा पडतो,आणि नंतर येणारे वणवे वेगानं पसरतात.अशा जोमदार अग्निप्रलयांत लहान झाडं नष्ट होतात.हे वणवे रस्ते आणि ओढे ओलांडून दूरवरच्या जीवसृष्टीचं नुकसान करतात.

लाँग-लीफ पाईन कुरणं मात्र वारंवारचे मंद वणवे भोगत स्थिरावतात.मग त्यांच्यात भरपूर प्रकारचे प्राणी आणि वनस्पती वाढू लागतात.आगींचं चक्र थांबवलं,
तर मात्र हे स्थैर्य हरवतं,आणि पुन्हा स्थिरावायला खूप वेळ लागतो.एखाद वेळी तर जुनी जीवसृष्टी पार संपूनही जाते.

तर रॅफ हे सारं फ्रेड आणि अ‍ॅलीशियांकडून शिकायला लागला.तो बॉय स्काऊटही झाला, आणि जंगलात वावरायच्या पद्धती,तिथे पाळायची पथ्यं त्यानं शिकून घेतली.या साऱ्यानं तो जबाबदार नागरिक झाला.
पशुपक्ष्यांना न मारणारा,जीवसृष्टी सांभाळणारा झाला.('वारुळ पुराण',माधव गाडगीळ',ई.ओ.विल्सन,
अनुवाद - नंदा खरे,मनोविकास प्रकाशन)

जमीन श्रमांचा मोबदला देते,म्हणून शेतकरी तिच्यावर प्रेम करतात.शिकारी जंगलांमधून त्यांना शिकार मिळते,म्हणून त्यांच्यावर प्रेम करतात. रॉफचं नोकोबीवरचं प्रेम केवळ नोकोबीसाठी होतं. त्या क्षेत्रानं त्याला जगाकडे पाहायची एक दृष्टी दिली,शाळेत आणि घरी सांगितल्यापेक्षा वेगळी. त्याला एक मोठं संदर्भचित्र दिसू लागलं,ज्यात मनुष्यजात,तो स्वतः,हे भाग होते.हळूहळू हे चित्र स्पष्ट होत गेलं.निसर्ग माणसांच्या जगाबाहेर नाही. माणसं निसर्गात बेटं घडवून जगतात.

२४/८/२५

शोध वेश्यांमधल्या शहाणपणाचा / The search for wisdom among prostitutes

तुम्ही जगाला दुसऱ्याच्या दृष्टिकोनातून पाहू शकत नाही आणि बदलू शकत नाही. - लीना कोकले


आजार आहे,एवढीच माहिती उपलब्ध होती.तो कसा पसरतो,

कोणाकडून पसरतो,त्याच्यापासून बचाव कसा करायचा,ही साथ ताबडतोब आटोक्यात कशी आणायची,या सगळ्यांबाबत गोंधळलेपण होतं.त्यामुळे समाजात अशा बाधित लोकांना बहिष्कृत जीवन जगायला लावलं जात होतं.त्यामुळेच सर्वप्रथम एड्ससंबंधित माहिती गोळा करणं महत्त्वाचं आहे,हे

एलिझाबेथ यांनी ओळखलं आणि आपल्या काही सहकाऱ्यांसोबत त्यांनी या कामात झोकून दिलं - आणि तिथेच एका अर्थाने 'विस्डम ऑफ व्होअर्स'च्या प्रवासालाही सुरुवात झाली.यूगांडासारखे आफ्रिकेतले देश,तसंच इंडोनेशिया आणि आग्नेय आशियाई देशांतील स्त्री वेश्या,पुरुष वेश्या,भाड्याने मिळणारी कोवळी मुलं-मुली,त्यांचे भडवे,त्यांची गिऱ्हाइकं, ड्रग्जचा भूमिगत व्यापार,त्यांना प्रतिबंध करू पाहणारे प्रामाणिक पोलिस आणि इतर अधिकारी,एड्सच्या रुग्णांना आणि अमली पदार्थांच्या व्यसनी लोकांना पुन्हा सरळ मार्गावर आणण्याचा प्रयत्न करणारे कार्यकर्ते यांच्याशी संपर्क साधत अन् त्यांच्याकडून एड्ससंबंधी माहिती खणून काढत एलिझाबेथ यांचं काम सुरू झालं.


त्याशिवाय अलीकडे ज्यांना 'एलजीबीटी' म्हणून ओळखलं जातं त्या समुदायातील व्यक्तींसोबतही या विषयावर चर्चा करण्याची गरज आहे,हेही एलिझाबेथ यांच्या लक्षात आलं;पण अर्थातच हे काम सोपं नव्हतं. त्या काळी बहुतेक देशांमध्ये समलैंगिक संबंध हा कायद्याने गुन्हा होता.त्यामुळे समलिंगी व्यक्ती उघडपणे समाजात वावरत नसत.तसंच वेश्यांच्या आणि अमली पदार्थांचं सेवन व विक्री करणाऱ्यांच्या जगातही बाहेरच्या व्यक्तीला सहज प्रवेश मिळणं अशक्य होतं. नको त्या चौकशा करणाऱ्या अशा व्यक्तीकडे संशयाने बघितलं जाई आणि भलत्या गोष्टीत नाक खुपसणं हे थेट जिवावर बेतणं होतं.या जगाचे नीतिनियम पूर्ण वेगळे होते.प्रवेश करणं दूरच,पण या पाताळ जगताचे दरवाजे किलकिले करून त्यात डोकावणं हेच एक अवघड काम होतं.पण याच जगाला एड्सचा विळखा पडलेला असल्यामुळे एलिझाबेथ यांच्या दृष्टीने त्या जगात प्रवेश करणं अत्यावश्यक होतं.पण या सर्वांचा विश्वास संपादन करत एलिझाबेथ यांनी इंडोनेशिया, थायलंड,हाँगकाँग,भारत तसंच आफ्रिकेतील काही देशांमध्ये अशा विविध समुदायांसोबत संपर्कच नव्हे,तर मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले.त्यासाठी त्यांनी केलेली भटकंती आणि कष्ट वाचून आपली छाती दडपून जाते.


त्यातली काही उदाहरणं बोलकी आहेत.इंडोनेशियात 'वारिया' नावाचा एक प्रकार असतो.स्त्रैण पुरुष असा त्याचा अर्थ आहे.परालिंगी (ट्रान्सजेंडर) किंवा परावेषधारी (ट्रान्सव्हेस्टाइट) असं त्यांना इतरत्र म्हटलं जातं.'वारिया' हे स्त्रीवेष करून अनेकदा वेश्याव्यवसाय स्वीकारतात.

इंडोनेशियात एचआयव्हीग्रस्तांची संख्या वाढीस लागल्याचं सर्वप्रथम 'वारियां'मुळेच उघड झालं. सर्वप्रथम १९९७ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात सहा टक्के वारिया एचआयव्ही बाधित असल्याचं उघड झालं.पण पुढे २००० साली जेव्हा पुन्हा सर्वेक्षण केलं गेलं तेव्हा त्यात मात्र या 'वारियां'चा काहीच उल्लेख नव्हता.ही बाब किती गंभीर आणि धोकादायक ठरू शकते याची एलिझाबेथ यांना जाणीव होती.असं का झालं असावं याचा शोध घेण्यासाठी त्यांनी वारियांचीच मदत घेण्याचं ठरवलं.लेन्नी,नॅन्सी,आयनेस या वारियांमुळे एलिझाबेथ यांना त्यांच्या गूढ जगात प्रवेश मिळाला आणि त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळेच सर्वेक्षणातील त्रुटी लक्षात आल्या.माहिती मिळवण्यासाठी एलिझाबेथ जेव्हा या समुदायाची वस्ती असलेल्या ठिकाणी जायच्या तेव्हा तिथे सहज उपलब्ध असणाऱ्या आणि काम नसणाऱ्या वारियांशी किंवा वेश्यांशी त्या बोलायच्या.आयनेस नावाच्या वारियाने यातला फोलपणा त्यांच्या लक्षात आणून दिला.ज्या वारियांकडे कामच नाही ते एड्सबद्दल किंवा सेक्शुअल कॉन्टॅक्टच्या पॅटर्नबद्दल कशी माहिती देणार? माहिती मिळवण्यासाठीदेखील एलिझाबेथ यांना अशा 'शहाणपणा'चा उपयोग झाला.


अशा अनेक घटनांवरून एलिझाबेथ यांना जाणवलं,की योग्य उपाय करण्यासाठी योग्य माहिती हवी,आणि योग्य माहिती मिळवायची असेल तर योग्य माणसांशीच बोलावं लागेल,योग्य तेच प्रश्न विचारावे लागतील आणि उत्तरंही अचूकपणे नोंदवावी लागतील,तरच अशा माहितीच्या आधारे बनवलेले अहवाल पुढील उपाययोजनेसाठी मार्गदर्शक ठरू शकतील.या जगात वावरू लागल्यावर एड्सच्या सर्वेक्षणातल्या तसंच उपायांमधल्या इतरही अनेक त्रुटी समोर येऊ लागल्या. सर्वेक्षणाच्या फॉर्मवर लोकांच्या वर्गीकरणासाठी जे पर्याय उपलब्ध होते ते पुरेसे नसल्याचं एलिझाबेथ यांच्या लक्षात आलं.तसंच अनेकदा लोकांना अशा ठराविक वर्गीकरणात बसवणं अवघड असतं हेही कळून चुकलं.अशा अनेक चुकांचा पाढाच एलिझाबेथ यांनी या पुस्तकात मांडला आहे.त्यातून आपल्या यंत्रणेला रोगाच्या नियंत्रणाचं काम करण्याची इच्छा असते की नाही,असा प्रश्न आपल्यापुढे उभा राहतो.दुसरीकडे,बऱ्याचदा अचूक मिळालेल्या माहितीचाही योग्य वापर केला जात नसल्याची खंत एलिझाबेथ या आफ्रिकेच्या उदाहरणासहित व्यक्त करतात.जगातील एकूण एचआयव्हीबाधित लोकांपैकी दोन तृतीयांश लोक आफ्रिकेतील काही मोजक्या देशांत राहतात.या वास्तवाला जबाबदार असणाऱ्या परिस्थितीची चिरफाडही एलिझाबेथ यांनी आपल्या भटकंतीतल्या अनुभवावरून केली आहे.एचआयव्ही हा असुरक्षित लैंगिक संबंधातून होणारा रोग आहे आणि बहुतेक एचआयव्ही

बाधित आफ्रिकेत राहतात,या दोन्हींतील कार्यकारणभाव समजून त्यानुसार उपाययोजना करण्याऐवजी तिथली राजकारणी मंडळी 'वांशिक भेदभावा'चं राजकारण करण्यात गुंग होती,असं एलिझाबेथ म्हणतात. त्यामुळे समस्येला सामोरं जाण्याऐवजी पश्चिमी देश केवळ वंशवादातूनच असे आरोप करत असल्याचा प्रचार करण्यातच तेथील राजकारण्यांनी वेळ वाया घालवला.

त्यामुळे रोगाचा प्रसार कमी होण्याऐवजी वाढतच राहिला,असं त्यांचं म्हणणं.हे म्हणणं त्या ज्या अनुभवांवरून मांडतात ते प्रत्यक्ष पुस्तकातूनच वाचण्याजोगे आहेत.


तळागाळात भटकल्यामुळे रोगाचं मूळ कशात आहे याचं नेमकं भान एलिझाबेथ यांना आलेलं दिसतं. त्यामुळे वर्ल्ड बँकेलाही त्यांची चूक साधार पटवून देण्यास त्या मागेपुढे बघत नाहीत.

एड्सचा प्रसार होण्यास गरिबी आणि स्त्री-पुरुष असमानता या गोष्टी कारणीभूत असल्याचं वर्ल्ड बँकेचं म्हणणं अमान्य करून एड्सच्या प्रसारामागे 'सेक्स आणि ड्रग्ज' हीच दोन मुख्य कारणं आहेत,असं त्या ठासून सांगतात. एलिझाबेथ यांचं आणखी एक निरीक्षण अतिशय महत्त्वाचं आहे.त्या म्हणतात 'जेव्हा जेव्हा संयुक्त राष्ट्र किंवा एखादा धनाढ्य पाश्चिमात्य देश एखाद्या कार्यासाठी आर्थिक मदत जाहीर करतात तेव्हा संबंधित क्षेत्रात कुत्र्याच्या छत्र्यांप्रमाणे सेवाभावी संस्था उगवतात.बहुतेकदा राजकीय व्यक्तींशी साटंलोटं असणाऱ्या संस्था या आर्थिक मदतीचा मलिदा खातात आणि प्रत्यक्षात नियोजित कार्याला काडीभरही हातभार लागत नाही.आग्नेय आशियातले देश किंवा आफ्रिकेतले शासकीय अधिकारी अशा सेवाभावी संस्थांचा उल्लेख अतिशय शिवराळ भाषेत करतात. एलिझाबेथही या संस्थांना 'साखरेला लागलेल्या मुंग्या' असं म्हणतात आणि एड्ससोबत अशा संस्थांच्या नियंत्रणासाठी उपाय सुचवतात.


या सगळ्या चर्चेत पुस्तकाच्या शीर्षकानुसार एड्सवर नियंत्रणासाठी वेश्यांचं शहाणपण काय सांगतं याबद्दलही वाचकांना उत्सुकता असेल.वेश्या,समलिंगी लोक आणि एचआयव्हीबाधित लोक यांनी शिकवलेल्या शहाणपणातून शिकत एलिझाबेथ यांनी एड्सचा प्रसार रोखण्यासाठी काही सोपे उपाय सुचवले आहेत.त्यांच्या मते या उपायांनी एड्सचा प्रसार अगदी सहज थांबवता येऊ शकतो.उदाहरणादाखल सांगायचं,तर वेश्यावस्तीत जागोजागी कंडोम्सची व्हेंडिंग मशिन बसवणं किंवा गरीब वस्तीत कंडोम्स सहज आणि विनामूल्य उपलब्ध करून देणं हा त्यातला मुख्य आणि सोपा उपाय. देहविक्रय करणाऱ्यांना एड्सच्या धोक्याची जाणीव करून देऊन ग्राहकाला कंडोम वापरायला लावण्यास भाग पाडणं हा दुसरा महत्त्वाचा उपाय.पण एड्सचा प्रसार इतक्या सोप्या उपायांनी रोखला जाऊ शकतो हे मान्य झालं तर बहुराष्ट्रीय औषधनिर्मात्यांची पंचाईत होईल,हा मुख्य प्रश्न आहे. दुसरीकडे,एड्सचं भूत जागं ठेवलं तरच त्यांना संशोधनासाठी अनुदान मिळणार असतं.खरं म्हणजे असं अनुदान देणाऱ्या संस्था ही औषधं स्वस्तात उपलब्ध करून देण्याची अट औषध कंपन्यांवर घालत असतात.पण संशोधनाचा खर्च फुगवून सांगून या अटीला बगल दिली जाते,याकडे एलिझाबेथ आपलं लक्ष वेधतात. सरकारी आणि स्वयंसेवी संस्थांच्या पातळीवर एड्स नियंत्रणासाठी सुरू असलेलं काम हे बऱ्याचदा त्या नियंत्रणात अडथळा ठरत असल्याचं एलिझाबेथ यांनी केलेल्या भटकंतीतून आणि त्यातून काढलेल्या निष्कर्षातून समोर येतं.


... तर अशी ही एलिझाबेथ यांनी एड्सच्या शोधात केलेली भटकंती.एड्सग्रस्तांची माहिती गोळा करत आफ्रिका आणि आग्नेय आशियाच्या तळागाळात फिरताना त्यांना खऱ्या अर्थाने समाजाचं दर्शन झालं. त्यांच्याच शब्दांत सांगायचं, तर 'आय एक्स्प्लोअर्ड द अंडरबेली ऑफ दीज पॉप्युलेशन्स !' त्यांचा हा प्रवास आपल्यालाही डोळस करत जातो. 







२२/८/२५

शोध वेश्यांमधल्या शहाणपणाचा / The search for wisdom among prostitutes


एलिझाबेथ पिसानी

जगभर भटकणारी एलिझाबेझ पिसानी एड्सचा अभ्यास करत असताना वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांना सामोरी गेली.या प्रवासात उमजलेल्या नव्या माहितीच्या आधारे एड्‌सबाबतच्या जागतिक समजाला नवा अर्थ देणाऱ्या या लेखिकेची गोष्ट.

▶ वेश्याव्यवसाय हा जगातला फार मोठा आणि बहुतेक देशांत अवैध मानला जाणारा व्यवसाय. त्यामुळेच या व्यवसायातल्या स्त्रियांचं अनुभवविश्व समाजोपयोगी ठरू शकेल,हा विचार आजवर कुणी केला नव्हता.किंबहुना एलिझाबेथ पिसानी यांनाही हा विचार आपणहून सुचला नव्हता.मग ही कल्पना त्यांच्या डोक्यात कशी आली आणि एड्सचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने वेश्यांचं हे शहाणपण समजून घेण्यासाठी त्यांनी काय उटारेटा केला त्याची हकीकत म्हणजे 'विस्डम ऑफ व्होअर्स' हे पुस्तक.

कोण या एलिझाबेथ पिसानी? एलिझाबेथ यांनी 'संसर्गजन्य रोगांचा प्रसार'या विषयात संशोधन करून डॉक्टरेट मिळवली आहे.१९९५ पासून त्या एड्स कसा रोखता येईल यासाठी वर्ल्ड बँक, यूएनएड्स,वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि अशाच इतर काही आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहकार्याने काम करताहेत.चीन,इंडोनेशिया,
द युनायटेड किंग्डम, अमेरिका आणि इतर काही देशांच्या आरोग्य (विशेषतः एड्स प्रतिबंधक) योजनेच्या सल्लागार म्हणून त्या काम करतात.त्यांनी अभिजात चिनी भाषा आणि वैद्यकीय सांख्यिकी (मेडिकल डेमोग्राफी) या विषयांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलाय.हे सगळं करण्याआधी त्या रॉयटर्स,द इकॉनॉमिस्ट आणि एशिया टाइम्सच्या परदेशस्थ वार्ताहर म्हणून जगभर हिंडत असत.अशाच एका भटकंतीत त्या आशियातल्या वेश्यांच्या संपर्कात आल्या.या महिलांशी बोलताना त्यांना एड्सच्या रोगाचा विळखा सर्वप्रथम जाणवला आणि हेही लक्षात आलं,की या वेश्यांकडेच एड्सवर मात करण्याचे अल्पखर्चिक उपाय आहेत.पण आजवर जगाने त्यांच्या या शहाणपणाकडे पुरेसं लक्ष दिलेलं नाही.त्यानंतर सुरू झाला या शहाणपणाकडे जगाचं लक्ष वेधण्यासाठीचा प्रवास.

वडील जगप्रवासाला निघाले होते,तर आई यूरोप भटकायला बाहेर पडली होती.या भटकंतीचा वारसा एलिझाबेथ यांना त्यांच्या आई-वडिलांकडून मिळाला.
त्यांचे भटकंतीतच त्या दोघांची ओळख झाली आणि पुढे त्यांनी लग्नही केलं.त्यामुळे एलिझाबेथ म्हणतात,
'प्रवासाची आवड,अनोळखी व्यक्तींशी गप्पा मारण्याची अन् नव्या ठिकाणाबद्दल माहिती मिळवण्याची आवड माझ्यात आई वडिलांमुळेच निर्माण झाली असावी.मी त्यांचीच मूलगी.त्यामुळे ही मुलगी बहतेकदा घरी नसते.ती कोणत्याही देशात असू शकते.ती जसे देश बदलते तसेच व्यवसायही ! तरीही या मुलीला तिचे आई-वडील सगळ्या उद्योगांमध्ये भक्कम पाठिंबा देतात.' पंधरा वर्षांच्या असताना एलिझाबेथ आपल्या एका मैत्रिणीला भेटायला युरोपहून हाँगकाँगला गेल्या.या मैत्रिणीसोबत त्या हाँगकाँगच्या गल्लीबोळांत हिंडल्या.नाना देशांतून आलेल्या प्रवाशांबरोबर,तसंच वेश्यांबरोबर बिअरबारमध्ये गप्पा मारत त्या हाँगकाँगच्या निशाचर जीवनात रमल्या.पुढे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्या रॉयटर्स न्यूज एजन्सीमध्ये वार्ताहर म्हणून रुजू झाल्या.त्यांना पहिलं पोस्टिंग मिळालं ते हाँगकाँगमध्येच.लोकांमध्ये मिसळून काम करू इच्छिणाऱ्या भटक्या एलिझाबेथ यांच्यासाठी ही नोकरी म्हणजे वरदान होतं.रॉयटर्सची प्रतिनिधी म्हणून काम करताना एलिझाबेथ चीन आणि अति पूर्वेतील अनेक महत्त्वाच्या घडामोडींच्या साक्षीदार ठरल्या.एकीकडे एलिझाबेथ यांनी चीनमधील वेश्यावस्त्यांना भेट देऊन त्यांची दुःखं जगासमोर आणण्याचं काम केलं,तर दुसरीकडे बाली बेटात ओरांग उटांच्या संवर्धनासाठी चाललेल्या प्रयत्नांना सुरुंग लावणाऱ्या चोरट्या शिकाऱ्यांच्या कारवाया उघड केल्या.कंबोडियातला हुकुमशहा पॉल पॉट याच्या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या कृत्यांचं वार्तांकनही त्यांनी या काळात केलं.

दहा हजार कवट्यांच्या ढिगांबद्दल सहाशे शब्दांत लिहून ते सगळं विसरून जायचं आणि पुढच्या घटनेचं वार्तांकन करायचं याचा त्यांना वीट आला.यातून पुढे काय साध्य होणार,हा प्रश्न सतावू लागला. या कामातली निरर्थकता जाणवू लागली.

याच काळात भारत,चीन,इंडोनेशिया,हाँगकाँग या देशांमधून भटकताना वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणारे विविध प्रश्न त्यांना जाणवू लागले. लोकसंख्या नियंत्रण,त्यामागचं राजकारण,वाढता वेश्याव्यवसाय;
अफू,गांजा आणि रासायनिक अमली पदार्थांचा वाढता प्रसार;धर्माचा कुटुंबनियोजनाला होणारा विरोध;खऱ्या-खोट्या नसबंदी शस्त्रक्रिया जागोजाग भरवली जाणारी कुटुंबनियोजन उपचार शिबिरं असं बरंच काही त्यांनी जवळून अभ्यासलं.याच काळात पत्रकारितेच्या पुढे जाऊन रोगप्रसार आणि नियंत्रण या विषयात एलिझाबेथ यांना रस वाटू लागला. 

लोकसंख्यावाढीवरच रोगप्रसाराचं आणि इतरही अनेक प्रश्नांचं भवितव्य अवलंबून असल्याचं त्यांना जाणवू लागलं होतं.त्यामुळे त्यांनी 'द लंडन स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसिन'मध्ये 'वैद्यकीय जनसांख्यिकी'च्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला.(अज्ञाताचा शोध घेत फिरणाऱ्या अवलियांच्या कहाण्या,हटके,भटके,निरंजन घाटे,समकालीन प्रकाशन ) या संस्थेमध्ये शिकत असतानाचा एक किस्सा एलिझाबेथ यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बरंच काही सांगून जातो.पुढे एड्सच्या नियंत्रणसाठी त्यांनी जे काम केलं त्याची मुळं त्यांच्या या वृत्तीत दिसून येतात.संस्थेतलं पहिलं व्याख्यान वैद्यकीय सांख्यिकीच्या वेगवेगळ्या पद्धतींच्या माहितीबद्दल होतं.ते संपल्यावर व्याख्यात्याने प्रश्न केला : "धूम्रपान आणि फुफ्फुसांचा कर्करोग यांचा संबंध प्रस्थापित करणारं सर्वेक्षण पार पडल्यानंतरही धूम्रपान आणि फुफ्फुसांचा कर्करोग यांचा संबंध आहे,ही सूचना सिगरेटच्या पाकिटावर छापावी,हा निर्णय घ्यायला अमेरिकेच्या सर्जन जनरलने चौदा वर्ष का लावली?" त्यावर एलिझाबेथ म्हणाल्या, "हा प्रश्नच मुळी चुकीचा आहे.कळीचा प्रश्न हा आहे,की ब्रिटिश-अमेरिकी तंबाखू उत्पादकांनी आणि तंबाखूजन्य पदार्थ निर्मात्यांनी गेल्या चौदा वर्षांत अमेरिकी सिनेटच्या निवडणुकांमध्ये किती पैसा गुंतवला?" समस्येच्या मुळाशी जाण्याची आणि त्या समस्येशी जोडले गेलेले अनेक अदृश्य हितसंबंध समजून घेण्याची हीच क्षमता एलिझाबेथ यांना पुढे एड्सवर काम करताना उपयोगी पडली.एलिझाबेथ यांनी हा शिक्षणक्रम पूर्ण केला,तोपर्यंत वैद्यकीय सांख्यिकी क्षेत्रात दोन गट पडले होते.एक परंपरावादी,तर दुसरा चळवळ्या गट.परंपरावादी गटाचं म्हणणं, आपले निष्कर्ष योग्य त्या अधिकारी व्यक्तीकडे सोपवा.मग पुढे त्याचं काय होतं यात लक्ष घालायचं कारण नाही.दुसरा गट म्हणत होता, एखाद्या प्रश्नाचा निष्कर्ष काढून झाल्यावरही त्या प्रश्नाचा मागोवा घेत रहा;तो निष्कर्ष एखादी समाजविघातक बाब प्रकट करणारा असेल तर त्या बाबीवर बंदी येईपर्यंत लढत रहा.एलिझाबेथ यांना या दुसऱ्या गटाचं म्हणणं खुणावत होतं.याच सुमारास 'लंडन स्कूल ऑफ हायजिन'च्या अभ्यासक्रमात एड्स या विषयाचा समावेश झाला. खरं तर १९८० नंतरच्या दशकातच एड्सबद्दल चर्चा सुरू झाली होती.हळूहळू त्या रोगाचा आणि लैंगिक संबंधांचा परस्परसंबंध स्पष्ट होऊ लागला.तसंच इंजेक्शनच्या साहाय्याने अमली पदार्थ टोचून घेणाऱ्या व्यक्तींमध्येही एड्सचा प्रसार होतो,हेही उघड होऊ लागलं.हा विषय अभ्यासक्रमात येताच एलिझाबेथ यांनी त्याची विशेष विषय म्हणून निवड केली आणि पुढे तोच विषय त्यांचं जीवितध्येय बनलं.त्यानंतरची म्हणजे १९९६ नंतरची त्यांची भटकंती ही एड्स प्रसार आणि त्याला आळा घालण्याचे उपाय यांच्या अभ्यासासाठीच झालेली दिसते.त्या काळात अजूनही एड्सच्या संशोधनात फारशी प्रगती झालेली नव्हती.फक्त तो विषाणुजन्य
आजार आहे,एवढीच माहिती उपलब्ध होती. 

तो कसा पसरतो,कोणाकडून पसरतो, त्याच्यापासून बचाव कसा करायचा,ही साथ ताबडतोब आटोक्यात कशीआणायची,या सगळ्यांबाबत गोंधळलेपण होतं.
त्यामुळे समाजात अशा बाधित लोकांना बहिष्कृत जीवन जगायला लावलं जात होतं.त्यामुळेच सर्वप्रथम एड्ससंबंधित माहिती गोळा करणं महत्त्वाचं आहे,हे एलिझाबेथ यांनी ओळखलं आणि आपल्या काही सहकाऱ्यांसोबत त्यांनी या कामात झोकून दिलं- आणि तिथेच एका अर्थाने 'विस्डम ऑफ व्होअर्स'च्या प्रवासालाही सुरुवात झाली.युगांडासारखे आफ्रिकेतले देश, तसंच इंडोनेशिया आणि आग्नेय आशियाई देशांतील स्त्री वेश्या,पुरुष वेश्या,भाड्याने मिळणारी कोवळी मुलं-मुली,त्यांचे भडवे,त्यांची गिऱ्हाइकं, ड्रग्जचा भूमिगत व्यापार,त्यांना प्रतिबंध करू पाहणारे प्रामाणिक पोलिस आणि इतर अधिकारी, एड्सच्या रुग्णांना आणि अमली पदार्थांच्या व्यसनी लोकांना पुन्हा सरळ मार्गावर आणण्याचा प्रयत्न करणारे कार्यकर्ते यांच्याशी संपर्क साधत अन् त्यांच्याकडून एड्ससंबंधी माहिती खणून काढत एलिझाबेथ यांचं काम सुरू झालं.त्याशिवाय अलीकडे ज्यांना 'एलजीबीटी' म्हणून ओळखलं जातं त्या समुदायातील व्यक्तींसोबतही या विषयावर चर्चा करण्याची गरज आहे, हेही एलिझाबेथ यांच्या लक्षात आलं;पण अर्थातच हे काम सोपं नव्हतं.

संपुर्ण…उर्वरित…पुढील भागात.‌..!!

२०/८/२५

स्वागत असे स्विकारा /Accept as welcome

या पत्रांवर आम्हा दीडशे विद्यार्थ्यांच्या सह्या होत्या.नंतर आमच्या लक्षात आले की,लेखकमंडळी त्यांच्या कामात खूप व्यग्र असतात,

त्यामुळे व्याख्यान तयार करण्यात त्यांचा खूप वेळ जाईल म्हणून आम्ही त्यांच्या कामाच्या पद्धतीवरील प्रश्न असणारी एक प्रश्नावली तयार केली व ती प्रत्येक पत्रासोबत पाठवली.


त्या सगळ्या लेखकांनाही पद्धत आवडली.यामुळे ते सर्वच लेखक खूप प्रभावित झाले आणि आम्हाला उदंड प्रतिसाद मिळाला.


थिओडर रूझवेल्टच्या मंत्रिमंडळात खजिनदार म्हणून कार्यरत असलेला सचिव लेस्की शॉयाचे मन हीच पद्धत वापरून मी वळवले,तसेच अ‍ॅटर्नी जनरल ब्रायन,फ्रँकलिन रूझवेल्ट वगैरेसारख्या मान्यवर लोकांनाही भाषणाला बोलावले आणि अर्थात ही पद्धत वापरून मी माझ्या जाहीर भाषण कलेच्या कोर्ससाठीही अशा अनेक मोठमोठ्या लोकांना विद्यार्थ्यांशी बोलायला बोलावले.आपले कौतुक करणारी माणसे आपल्यापैकी सगळ्यांनाच मग ते कारखान्यात काम करणारे कामगार असोत,

ऑफिसमध्ये काम करणारे कारकून असोत किंवा अगदी सिंहासनावर बसलेला राजा असू दे सगळ्यांनाच आवडतात.जर्मन कैसरचेच उदाहरण घ्यायचे झाले,तर पहिले महायुद्ध संपण्याच्या सुमारास कैसर हा संपूर्ण जगाच्या दृष्टीने अत्यंत निर्दयी आणि तिरस्करणीय माणूस होता.त्याचा देशसुद्धा त्याच्या विरोधात होता.स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तो हॉलंडला पळून गेला.

त्याच्याबद्दल लोकांच्या मनात इतका संताप खदखदत होता की,शक्य असते,तर लोकांनी त्याला उभा चिरला असता आणि जाळून टाकला असता.या सगळ्या रणधुमाळीमध्ये एका छोट्या मुलाने कैसरला एक अतिशय साधे;पण मनापासून आणि कुठलाही हेतू मनात न बाळगता पत्र लिहिले.त्या पत्रात कैसरबद्दल आदर व कौतुक ओतप्रोत भरलेले होते.त्यात लिहिले होते की,लोकांना काहीही वाटले, तरी माझ्या राजावर मी नेहमीच प्रेम करीत राहीन.या पत्रामुळे कैसर अंतर्बाह्य हेलावला व त्याने त्या छोट्या मुलाला भेटीसाठी निमंत्रण पाठवले.तो मुलगा आईबरोबर आला आणि कैसरने त्या मुलाच्या आईबरोबर लग्न केले.तुम्हाला काय वाटते,त्या छोट्या मुलाने कधी हाउ टू विन फ्रेंड्स पुस्तक वाचले असेल का? त्याला हे त्याच्या अंतर्मनातून समजले !


लोकांसाठी काही तरी करून,त्यांच्यासाठी झीज सोसून आपण मित्र जोडू शकतो.वेळ,ऊर्जा,निःस्वार्थी भाव आणि वैचारिक प्रगल्भतेच्या मदतीने तुम्ही लोकांशी जिव्हाळ्याचे नाते जोडू शकता.प्रिन्स ऑफ वेल्स असताना ड्युक ऑफ विंडसरने दक्षिण अमेरिकेला जाण्याचा बेत केला.जाण्यापूर्वी काही महिने आधी खूप मेहनतीने स्पॅनिश भाषा शिकण्याचा त्याने प्रयत्न केला, कारण त्याला तेथे स्पॅनिश भाषेमध्ये भाषण करायचे होते आणि असे केल्यामुळे दक्षिण अमेरिकेतील लोकांचा तो खूप लाडका झाला.


गेली काही वर्षे मी माझ्या मित्रमंडळींच्या वाढदिवसाच्या तारखा नोंदवून घेतो.हे मी कसे करतो? माझा ज्योतिषशास्त्रावर खरेतर अजिबात विश्वास नसला तरीही मी समोरच्या माणसाला विचारतो की, 'जन्मतारखेशी माणसाच्या स्वभावाचा काही संबंध आहे,हे तुला पटते का?' मग पुढे मी विचारतो की,तुझा जन्मदिवस आणि महिना सांगशील का? मग जर उत्तर आले की,'नोव्हेंबर २४' तर मग मी ते लक्षात ठेवून टिपून घेतो.प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला मी माझ्या कॅलेंडरवर त्या तारखांपुढे नावे लिहून ठेवतो,त्यामुळे आपोआपच त्या-त्या व्यक्तीचा वाढदिवस माझ्या लक्षात राहतो.

मला विसर पडत नाही आणि मग नाताळचा दिवस येतो तेव्हा माझ्यावरही शुभेच्छांचा वर्षावच होतो. मला कोणीच विसरू शकत नाही.जर आपल्याला मित्र जोडायचे असतील,तर आपण लोकांशी खूप उत्साहाने व चैतन्याने बोलले पाहिजे.


जेव्हा तुम्हाला कोणी फोन करते तेव्हा हेच मानसशास्त्र वापरले पाहिजे.तुमचा 'हॅलो' उच्चार असा पाहिजे ज्यामुळे समोरच्याला हे जाणवेल की,तुम्हाला त्याच्या फोनमुळे किती आनंद झाला आहे.अनेक कंपन्यांच्या टेलिफोन ऑपरेटरला चैतन्यपूर्ण आणि मार्दवाने बोलण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाते.त्या टेलिफोन ऑपरेटरशी बोलल्यावर ग्राहकाला असे वाटले पाहिजे;नव्हे त्याची खात्री पटली पाहिजे की,या कंपनीला आपल्याबद्दल आत्मीयता वाटते.उद्या फोनवर बोलताना आपण हे नक्कीच लक्षात ठेवू.


समोरच्यामध्ये प्रामाणिकपणे रुची दाखवली,तर तुम्हाला फक्त मित्रच मिळतात,असे नव्हे,तर तुमच्या कंपनीला निष्ठावान ग्राहकसुद्धा मिळतात. न्यू यॉर्कमधील नॅशनल बँकेने प्रसिद्ध केलेल्या अंकात,मॅडोलिन रोझडेल नावाच्या एका ठेवीदाराने पुढील पत्र प्रकाशित केले.


'मला तुम्हाला हे मनापासून सांगावेसे वाटते की,मी तुमच्या स्टाफचे खूप कौतुक करते.प्रत्येक जण अगदी अदबीने वागतो आणि मदतीला सदैव तत्पर असतो. रांगेत खूप वेळ उभे राहिल्यानंतर कर्मचाऱ्यांकडून इतकी प्रेमळ वागणूक मिळणे खरोखरच किती आनंददायी असते.गेल्या वर्षी माझी आई हॉस्पिटलमध्ये पाच महिने अ‍ॅडमिट होती,तेव्हा वारंवार मला बँकेत यावे लागत असे.मी बऱ्याचदा मेरी पेट्रसेलोकडे जात असे.ती आत्मीयतेने माझ्या आईच्या तब्येतीची चौकशी करत असे.' मिसेस रोझडेल कधी तरी या बँकेपासून लांब जाईल का? तुम्हाला काय वाटते ?


एका कार्पोरेशनचा गुप्त अहवाल तयार करण्याची कामगिरी न्यू यॉर्क शहरातील एका मोठ्या बँकेतील कर्मचारी चार्ल्स आर.

वॉल्टर्सवर सोपवली होती. याबद्दलची अचूक माहिती देऊ शकणारा फक्त एकच माणूस त्याला माहिती होता.वॉल्टर्सकडे खूप कमी वेळ होता.त्या माणसाने मि.वॉल्टर्सला प्रेसिडेंटच्या ऑफिसमध्ये नेऊन बसवले.नेमकी त्याचवेळी एक तरुण स्त्री आत डोकावली व तिने प्रेसिडेंटला सांगितले की, त्या दिवशी त्याला द्यायला तिच्याकडे तिकिटे नव्हती.


"मी माझ्या बारा वर्षांच्या मुलासाठी तिकिटे गोळा करत आहे," प्रेसिडेंटने मि.वॉल्टर्सला खुलासा केला.


मग मि.वॉल्टर्सने त्याच्यावर सोपवलेल्या कामाबद्दल सांगितले आणि तो प्रेसिडेंटला प्रश्न विचारू लागला. मात्र,प्रेसिडेंट अगदीच थातूरमातूर उत्तरे देत होता. त्याची उत्तरे अगदीच सर्वसामान्य व अस्पष्ट होती. त्याला काही बोलायची इच्छा नव्हती.आणि स्पष्ट दिसत होते की,तो कशानेच बधणार नव्हता. मुलाखत अत्यंत अपुरी व निष्फळ ठरली.


मि.वॉल्टर्स म्हणाले की,मी आता हताश झालो होतो; पण मग मला त्याचा बारा वर्षांचा मुलगा... त्यासाठी हवे असलेले स्टॅम्प्स... हे सगळे आठवले.आमच्या परदेश विभागाकडे होणाऱ्या पत्रव्यवहारामुळे आमच्याकडे अनेक वेगवेगळे स्टॅम्प्स होते;अगदी सातासमुद्रापलीकडचे !


दुसऱ्या दिवशी मी पुन्हा प्रेसिडेंटशी संपर्क करून त्याला सांगितले की,माझ्याकडे त्याच्या मुलाला हवी असणारी अनेक तिकिटे आहेत.मग मात्र त्याची वागणूक एकदम बदलून गेली.'माझ्या जॉर्जला हे खूप आवडेल,'असे म्हणत त्याने माझ्या हातातून तिकिटे लगबगीने घेतली व म्हणाला की,केवढा मोठा खजिनाच जणू माझ्या हाती लागला आहे! आम्ही सुमारे अर्धा तास फक्त तिकिटांबद्दलच बोललो.मी मुलाचे फोटोही पाहिले आणि मग मात्र एक तास त्याने मला हवी असलेली माहिती देण्यात खर्च केला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या वेळी मी त्याला तसे करण्याबद्दल एकदाही सुचवले नाही.त्याला माहिती असणाऱ्या सगळ्या गोष्टी त्याने मला स्वतःहून सांगितल्या.त्याच्या काही साहाय्यकांशी बोलून अजूनही काही माहिती त्याने अहवाल,

आकडेमोडीचे पेपर्स,पत्रव्यवहार या सगळ्या पुराव्यांनिशी माझ्या हाती सोपवली.मला जणू खूप मोठे घबाडच मिळाले होते !


आणखी एक उदाहरण बघा.


फिलाडेल्फियामधील एक गृहस्थ सी. एम. नाफळे आमच्या क्लासमध्ये दाखल झाले होते.ते एका फार मोठ्या संस्थेला इंधन पुरवण्याचे कंत्राट मिळवण्याच्या प्रयत्नात अनेक वर्षांपासून होते;पण ती संस्था नेहमीच त्यांना हुलकावण्या देऊन दुसऱ्या शहरातून इंधन खरेदी करत होती.एकेदिवशी रात्री क्लासमध्ये नाफळे यांच्या मनातील संताप बाहेर पडला व त्यांनी दुकानांच्या साखळी-पद्धतीला खूप शिव्या घातल्या व या संस्था म्हणजे देशाला कलंक आहे वगैरे वगैरे सांगितले;पण तरीही एका गोष्टीचे त्यांना आश्चर्य वाटत होते की,तो त्यांना इंधन का विकू शकत नव्हता? मग मी त्यांना सुचवले की,आता आपण काही वेगळ्या युक्त्या वापरून पाहू.त्यानुसार आम्ही स्टेजवर एक वादविवाद स्पर्धा घेतली.फक्त कोर्समधील विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या त्या स्पर्धेचा विषय होता, जगभर पसरलेली दुकानांची साखळीपद्धत देशासाठी विधायक आहे की विघातक ?


मी नाफळे यांना नकारात्मक बाजू मांडायला सांगितले आणि मग ते सरळ दुकानांच्या साखळी पद्धतीच्या संस्थेच्या उच्च अधिकाऱ्यांकडे गेले.त्यांना म्हणाले की,आज मी तुमच्याकडे इंधन विकायला आलेलो नाही;पण मला तुमची जरा मदत हवी आहे.मग त्यांनी त्यांच्या वादविवाद स्पर्धेबद्दल सांगितले आणि तुमच्याशिवाय अधिक चांगले माहीतगार कोण असू शकेल? मलाही वादविवाद स्पर्धा जिंकायची आहे आणि जर तुम्ही मला मदत केलीत,तर मी तुमचा शतशः ऋणी राहीन असे सांगितले.


मि. नाफळेच्या तोंडून पुढची गोष्ट ऐका -


"मी त्या माणसाला मला फक्त एक मिनिट वेळ दे असे विनवले.मग तो मला भेटणार एवढेच फक्त निश्चित झाले.जेव्हा मी त्याला माझे म्हणणे सांगितले,तेव्हा तो माझ्याशी एक तास सत्तेचाळीस मिनिटे बोलला.नंतर त्याने आणखी एका उच्च पदस्थाला बोलावले,ज्याने दुकानांच्या साखळी-पद्धतीवर पुस्तक लिहिले होते. नंतर त्या अधिकाऱ्याने लगेचच 'नॅशनल चेन स्टोअर असोसिएशन'ला पत्र लिहिले व त्या पुस्तकाची एक कॉपी माझ्या स्पर्धेच्या तयारीला मदत होण्याच्या दृष्टीने पाठवायला सांगितली.त्याच्या मते दुकानांची साखळी पद्धत म्हणजे मानवतेच्या दृष्टिकोनातून निष्काम सेवाभावी पद्धत होती आणि त्याला या कार्याबद्दल ज्वलंत अभिमान होता.

बोलताना ते तेज त्याच्या डोळ्यांमधून ओसंडून वाहत होते आणि त्यामुळे माझेही डोळे चांगलेच उघडले.कारण मी चेनस्टोअरकडे या दृष्टिकोनातून कधीच पाहिले नव्हते.त्या अधिकाऱ्याने माझा संपूर्ण दृष्टिकोनच बदलून टाकला.


जेव्हा मी जायला निघालो,तेव्हा त्याने मला स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आणि स्पर्धेच्या निकालाबाबत उत्सुकता दाखवली.जाता जाता तो म्हणाला की,आता तू मार्च महिन्यात मला भेट.कारण त्या वेळी मी तुला इंधनाची ऑर्डर देऊ शकेन.माझ्यासाठी हा एक चमत्कार होता. ज्या दिवशी एका शब्दानेही मला ऑर्डर देण्याविषयी मी त्याला सुचवले नव्हते,त्या दिवशी त्याने मला ऑर्डर देण्याबद्दल सांगितले.मी त्याच्यामध्ये,त्याच्या कामामध्ये जेव्हा प्रामाणिक स्वारस्य दाखवले,त्याच्यासमोरील समस्यांची आपुलकीने दखल घेतली,तेव्हाच त्याने माझ्यामध्ये व माझ्या उत्पादनांमध्ये स्वारस्य दाखवले."


मि.नाफळे, तुम्ही सांगितलेली गोष्ट नवी नाही.प्रसिद्ध रोमनकवी सायरस याने पुढील विधान लिहून ठेवले आहे,'आपण इतरांमध्ये रुची दाखवतो,तेव्हा इतर लोक आपल्यात रुची दाखवतात.'अत्यंत प्रामाणिकपणे दुसऱ्यांच्या सुख-दुःखात स्वारस्य दाखवणे हे मानवी नात्यांच्या संदर्भात खूप हितकारी आहे आणि त्यामुळे त्या दोन व्यक्तींचा फायदाच होत असतो.


मार्टीन गिन्सबर्ग न्यू यॉर्कमधील लाँग आयलंड येथे राहत होता.

आमच्या कोर्समध्ये त्याने त्याच्या आयुष्यावर एका नर्सचा खोलवर प्रभाव कसा पडला व त्यामुळे तिने त्याच्यामध्ये विशेष रस कसा दाखवला त्याची गोष्ट सांगितली त्या दिवशी 'थैंक्स गिव्हिंग डे' होता.दहा वर्षांचा मी शहरातील एका हॉस्पिटलमध्ये बिछान्यावर पडून होतो.माझ्यावर दुसऱ्या दिवशी मोठी शस्त्रक्रिया होणार होती.आता पुढचे दोन महिने वेदनेने विव्हळत मला बिछान्यावरच पडून राहावे लागणार होते,याची जाणीव मला अस्वस्थ करत होती ! माझे वडील पूर्वीच वारले होते.माझी आई आणि मी एका छोट्या घरात राहत होतो आणि लोकांच्या दयेवर जगत होतो.माझी आई त्या दिवशी मला भेटायला येऊ शकणार नव्हती.


जसजसा दिवस पुढे सरकू लागला तसतसे मला खूप एकाकी,

निराश वाटू लागले.मला खूप भीती वाटत होती. माझी आई एकटीच घरी काळजी करत बसली असणार.तिच्याबरोबर जेवायला कोणी नसणार आणि तिच्याकडे तेवढे पैसेपण नव्हते की,तिला 'थैंक्स गिव्हिंग डे'ला जेवण बाहेर घेणे परवडले असते,हे विचार मला छळत होते.माझ्या डोळ्यांमध्ये अश्रू जमा झाले.ते दिसू नये म्हणून मी उशीत डोके खुपसले आणि माझ्या अश्रूना मोकळी वाट करून दिली.मी मूकपणे रडत होतो;पण त्यामुळेच माझ्या वेदना असह्य झाल्या होत्या.


हे सगळे दुरून पाहणारी एक तरुण शिकाऊ नर्स माझ्याजवळ आली.तिने मला सांगितले की,तीसुद्धा माझ्यासारखीच एकाकी होती,कारण तिला दिवसभर काम करायचे होते,त्यामुळे तीसुद्धा घरी जाऊ शकत नव्हती,मग तिने मला विचारले की,आपण दोघांनी जेवण बरोबर घ्यायचे का? मग तिने जेवण आणले. त्यामध्ये टर्कीच्या स्लाइसेस,कुस्करलेला बटाटा, कॅनबेरी सॉस,

आइस्क्रीम आणि आणखीही काही गोड पदार्थ होते.ती माझ्याशी बोलत राहिली आणि माझी भीती,एकाकीपणा पळून गेला.खरेतर तिची ड्युटी दुपारी चार वाजता संपत होती;पण ती माझ्यासाठी रात्री अकरा वाजेपर्यंत थांबून राहिली.आम्ही काही वेळ खेळलो. शेवटी मला झोप लागल्यावरच ती गेली.


कित्येक 'थैंक्स-गिव्हींग डेज' आले आणि गेले;पण प्रत्येक थैंक्स-गिव्हींग डेला मला तोच दिवस आठवतो. मला स्पष्ट आठवतंय... किती भयभीत निराश आणि एकाकी वाटत होतं मला त्या दिवशी ! पण एका अनोळखी माणसानं मला प्रेम आणि आपलेपणा दिला.म्हणूनच मी सर्व काही सहन करण्यासाठी तयार झालो.इतरांनी तुम्हाला मदत करावी असं वाटतं का? आपल्यावर निर्व्याज प्रेम करणारे मित्र असावेत असं वाटतं का? आपणही इतरांच्या उपयोगी पडावं असं तुम्हाला वाटतं का? मग,या सिद्धान्ताचा नेहमी उपयोग करा. इतरांमध्ये नेहमी रस घ्या….!!


संपुर्ण….!!