एलिझाबेथ पिसानी
जगभर भटकणारी एलिझाबेझ पिसानी एड्सचा अभ्यास करत असताना वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांना सामोरी गेली.या प्रवासात उमजलेल्या नव्या माहितीच्या आधारे एड्सबाबतच्या जागतिक समजाला नवा अर्थ देणाऱ्या या लेखिकेची गोष्ट.
▶ वेश्याव्यवसाय हा जगातला फार मोठा आणि बहुतेक देशांत अवैध मानला जाणारा व्यवसाय. त्यामुळेच या व्यवसायातल्या स्त्रियांचं अनुभवविश्व समाजोपयोगी ठरू शकेल,हा विचार आजवर कुणी केला नव्हता.किंबहुना एलिझाबेथ पिसानी यांनाही हा विचार आपणहून सुचला नव्हता.मग ही कल्पना त्यांच्या डोक्यात कशी आली आणि एड्सचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने वेश्यांचं हे शहाणपण समजून घेण्यासाठी त्यांनी काय उटारेटा केला त्याची हकीकत म्हणजे 'विस्डम ऑफ व्होअर्स' हे पुस्तक.
कोण या एलिझाबेथ पिसानी? एलिझाबेथ यांनी 'संसर्गजन्य रोगांचा प्रसार'या विषयात संशोधन करून डॉक्टरेट मिळवली आहे.१९९५ पासून त्या एड्स कसा रोखता येईल यासाठी वर्ल्ड बँक, यूएनएड्स,वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि अशाच इतर काही आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहकार्याने काम करताहेत.चीन,इंडोनेशिया,
द युनायटेड किंग्डम, अमेरिका आणि इतर काही देशांच्या आरोग्य (विशेषतः एड्स प्रतिबंधक) योजनेच्या सल्लागार म्हणून त्या काम करतात.त्यांनी अभिजात चिनी भाषा आणि वैद्यकीय सांख्यिकी (मेडिकल डेमोग्राफी) या विषयांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलाय.हे सगळं करण्याआधी त्या रॉयटर्स,द इकॉनॉमिस्ट आणि एशिया टाइम्सच्या परदेशस्थ वार्ताहर म्हणून जगभर हिंडत असत.अशाच एका भटकंतीत त्या आशियातल्या वेश्यांच्या संपर्कात आल्या.या महिलांशी बोलताना त्यांना एड्सच्या रोगाचा विळखा सर्वप्रथम जाणवला आणि हेही लक्षात आलं,की या वेश्यांकडेच एड्सवर मात करण्याचे अल्पखर्चिक उपाय आहेत.पण आजवर जगाने त्यांच्या या शहाणपणाकडे पुरेसं लक्ष दिलेलं नाही.त्यानंतर सुरू झाला या शहाणपणाकडे जगाचं लक्ष वेधण्यासाठीचा प्रवास.
वडील जगप्रवासाला निघाले होते,तर आई यूरोप भटकायला बाहेर पडली होती.या भटकंतीचा वारसा एलिझाबेथ यांना त्यांच्या आई-वडिलांकडून मिळाला.
त्यांचे भटकंतीतच त्या दोघांची ओळख झाली आणि पुढे त्यांनी लग्नही केलं.त्यामुळे एलिझाबेथ म्हणतात,
'प्रवासाची आवड,अनोळखी व्यक्तींशी गप्पा मारण्याची अन् नव्या ठिकाणाबद्दल माहिती मिळवण्याची आवड माझ्यात आई वडिलांमुळेच निर्माण झाली असावी.मी त्यांचीच मूलगी.त्यामुळे ही मुलगी बहतेकदा घरी नसते.ती कोणत्याही देशात असू शकते.ती जसे देश बदलते तसेच व्यवसायही ! तरीही या मुलीला तिचे आई-वडील सगळ्या उद्योगांमध्ये भक्कम पाठिंबा देतात.' पंधरा वर्षांच्या असताना एलिझाबेथ आपल्या एका मैत्रिणीला भेटायला युरोपहून हाँगकाँगला गेल्या.या मैत्रिणीसोबत त्या हाँगकाँगच्या गल्लीबोळांत हिंडल्या.नाना देशांतून आलेल्या प्रवाशांबरोबर,तसंच वेश्यांबरोबर बिअरबारमध्ये गप्पा मारत त्या हाँगकाँगच्या निशाचर जीवनात रमल्या.पुढे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्या रॉयटर्स न्यूज एजन्सीमध्ये वार्ताहर म्हणून रुजू झाल्या.त्यांना पहिलं पोस्टिंग मिळालं ते हाँगकाँगमध्येच.लोकांमध्ये मिसळून काम करू इच्छिणाऱ्या भटक्या एलिझाबेथ यांच्यासाठी ही नोकरी म्हणजे वरदान होतं.रॉयटर्सची प्रतिनिधी म्हणून काम करताना एलिझाबेथ चीन आणि अति पूर्वेतील अनेक महत्त्वाच्या घडामोडींच्या साक्षीदार ठरल्या.एकीकडे एलिझाबेथ यांनी चीनमधील वेश्यावस्त्यांना भेट देऊन त्यांची दुःखं जगासमोर आणण्याचं काम केलं,तर दुसरीकडे बाली बेटात ओरांग उटांच्या संवर्धनासाठी चाललेल्या प्रयत्नांना सुरुंग लावणाऱ्या चोरट्या शिकाऱ्यांच्या कारवाया उघड केल्या.कंबोडियातला हुकुमशहा पॉल पॉट याच्या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या कृत्यांचं वार्तांकनही त्यांनी या काळात केलं.
दहा हजार कवट्यांच्या ढिगांबद्दल सहाशे शब्दांत लिहून ते सगळं विसरून जायचं आणि पुढच्या घटनेचं वार्तांकन करायचं याचा त्यांना वीट आला.यातून पुढे काय साध्य होणार,हा प्रश्न सतावू लागला. या कामातली निरर्थकता जाणवू लागली.
याच काळात भारत,चीन,इंडोनेशिया,हाँगकाँग या देशांमधून भटकताना वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणारे विविध प्रश्न त्यांना जाणवू लागले. लोकसंख्या नियंत्रण,त्यामागचं राजकारण,वाढता वेश्याव्यवसाय;
अफू,गांजा आणि रासायनिक अमली पदार्थांचा वाढता प्रसार;धर्माचा कुटुंबनियोजनाला होणारा विरोध;खऱ्या-खोट्या नसबंदी शस्त्रक्रिया जागोजाग भरवली जाणारी कुटुंबनियोजन उपचार शिबिरं असं बरंच काही त्यांनी जवळून अभ्यासलं.याच काळात पत्रकारितेच्या पुढे जाऊन रोगप्रसार आणि नियंत्रण या विषयात एलिझाबेथ यांना रस वाटू लागला. 
लोकसंख्यावाढीवरच रोगप्रसाराचं आणि इतरही अनेक प्रश्नांचं भवितव्य अवलंबून असल्याचं त्यांना जाणवू लागलं होतं.त्यामुळे त्यांनी 'द लंडन स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसिन'मध्ये 'वैद्यकीय जनसांख्यिकी'च्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला.(अज्ञाताचा शोध घेत फिरणाऱ्या अवलियांच्या कहाण्या,हटके,भटके,निरंजन घाटे,समकालीन प्रकाशन ) या संस्थेमध्ये शिकत असतानाचा एक किस्सा एलिझाबेथ यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बरंच काही सांगून जातो.पुढे एड्सच्या नियंत्रणसाठी त्यांनी जे काम केलं त्याची मुळं त्यांच्या या वृत्तीत दिसून येतात.संस्थेतलं पहिलं व्याख्यान वैद्यकीय सांख्यिकीच्या वेगवेगळ्या पद्धतींच्या माहितीबद्दल होतं.ते संपल्यावर व्याख्यात्याने प्रश्न केला : "धूम्रपान आणि फुफ्फुसांचा कर्करोग यांचा संबंध प्रस्थापित करणारं सर्वेक्षण पार पडल्यानंतरही धूम्रपान आणि फुफ्फुसांचा कर्करोग यांचा संबंध आहे,ही सूचना सिगरेटच्या पाकिटावर छापावी,हा निर्णय घ्यायला अमेरिकेच्या सर्जन जनरलने चौदा वर्ष का लावली?" त्यावर एलिझाबेथ म्हणाल्या, "हा प्रश्नच मुळी चुकीचा आहे.कळीचा प्रश्न हा आहे,की ब्रिटिश-अमेरिकी तंबाखू उत्पादकांनी आणि तंबाखूजन्य पदार्थ निर्मात्यांनी गेल्या चौदा वर्षांत अमेरिकी सिनेटच्या निवडणुकांमध्ये किती पैसा गुंतवला?" समस्येच्या मुळाशी जाण्याची आणि त्या समस्येशी जोडले गेलेले अनेक अदृश्य हितसंबंध समजून घेण्याची हीच क्षमता एलिझाबेथ यांना पुढे एड्सवर काम करताना उपयोगी पडली.एलिझाबेथ यांनी हा शिक्षणक्रम पूर्ण केला,तोपर्यंत वैद्यकीय सांख्यिकी क्षेत्रात दोन गट पडले होते.एक परंपरावादी,तर दुसरा चळवळ्या गट.परंपरावादी गटाचं म्हणणं, आपले निष्कर्ष योग्य त्या अधिकारी व्यक्तीकडे सोपवा.मग पुढे त्याचं काय होतं यात लक्ष घालायचं कारण नाही.दुसरा गट म्हणत होता, एखाद्या प्रश्नाचा निष्कर्ष काढून झाल्यावरही त्या प्रश्नाचा मागोवा घेत रहा;तो निष्कर्ष एखादी समाजविघातक बाब प्रकट करणारा असेल तर त्या बाबीवर बंदी येईपर्यंत लढत रहा.एलिझाबेथ यांना या दुसऱ्या गटाचं म्हणणं खुणावत होतं.याच सुमारास 'लंडन स्कूल ऑफ हायजिन'च्या अभ्यासक्रमात एड्स या विषयाचा समावेश झाला. खरं तर १९८० नंतरच्या दशकातच एड्सबद्दल चर्चा सुरू झाली होती.हळूहळू त्या रोगाचा आणि लैंगिक संबंधांचा परस्परसंबंध स्पष्ट होऊ लागला.तसंच इंजेक्शनच्या साहाय्याने अमली पदार्थ टोचून घेणाऱ्या व्यक्तींमध्येही एड्सचा प्रसार होतो,हेही उघड होऊ लागलं.हा विषय अभ्यासक्रमात येताच एलिझाबेथ यांनी त्याची विशेष विषय म्हणून निवड केली आणि पुढे तोच विषय त्यांचं जीवितध्येय बनलं.त्यानंतरची म्हणजे १९९६ नंतरची त्यांची भटकंती ही एड्स प्रसार आणि त्याला आळा घालण्याचे उपाय यांच्या अभ्यासासाठीच झालेली दिसते.त्या काळात अजूनही एड्सच्या संशोधनात फारशी प्रगती झालेली नव्हती.फक्त तो विषाणुजन्य
आजार आहे,एवढीच माहिती उपलब्ध होती. 
तो कसा पसरतो,कोणाकडून पसरतो, त्याच्यापासून बचाव कसा करायचा,ही साथ ताबडतोब आटोक्यात कशीआणायची,या सगळ्यांबाबत गोंधळलेपण होतं.
त्यामुळे समाजात अशा बाधित लोकांना बहिष्कृत जीवन जगायला लावलं जात होतं.त्यामुळेच सर्वप्रथम एड्ससंबंधित माहिती गोळा करणं महत्त्वाचं आहे,हे एलिझाबेथ यांनी ओळखलं आणि आपल्या काही सहकाऱ्यांसोबत त्यांनी या कामात झोकून दिलं- आणि तिथेच एका अर्थाने 'विस्डम ऑफ व्होअर्स'च्या प्रवासालाही सुरुवात झाली.युगांडासारखे आफ्रिकेतले देश, तसंच इंडोनेशिया आणि आग्नेय आशियाई देशांतील स्त्री वेश्या,पुरुष वेश्या,भाड्याने मिळणारी कोवळी मुलं-मुली,त्यांचे भडवे,त्यांची गिऱ्हाइकं, ड्रग्जचा भूमिगत व्यापार,त्यांना प्रतिबंध करू पाहणारे प्रामाणिक पोलिस आणि इतर अधिकारी, एड्सच्या रुग्णांना आणि अमली पदार्थांच्या व्यसनी लोकांना पुन्हा सरळ मार्गावर आणण्याचा प्रयत्न करणारे कार्यकर्ते यांच्याशी संपर्क साधत अन् त्यांच्याकडून एड्ससंबंधी माहिती खणून काढत एलिझाबेथ यांचं काम सुरू झालं.त्याशिवाय अलीकडे ज्यांना 'एलजीबीटी' म्हणून ओळखलं जातं त्या समुदायातील व्यक्तींसोबतही या विषयावर चर्चा करण्याची गरज आहे, हेही एलिझाबेथ यांच्या लक्षात आलं;पण अर्थातच हे काम सोपं नव्हतं.
संपुर्ण…उर्वरित…पुढील भागात...!!