बेडूक जरी विणीच्या काळात अधिक आवाज करीत असले,तरी एकदा तो काळ निघून गेल्यावरही ते समूहानं गात असतात.यात मादी बेडकांचा सहभाग नसतो.सामूहिक गान हे नेहमीच लयबद्ध आणि श्रवणीय असतं.बेडकांच्या अशा लयबद्ध आवाजामुळं झोप येत नाही,म्हणून तो थांबविण्यासाठी आपल्या कुळांना रात्रभर काठ्या आपटण्याची सूचना देणाऱ्या जमीनदाराची गोष्ट आपण ऐकली असणार.त्याला झोप न येण्याची अनेक कारणं असू शकतील,बेडकांच्या आवाजाचं निमित्त मात्र झालं.
श्रवण महिन्यात मी एकदा चंद्रपूर जिल्ह्यातील आलापल्लीनजीकच्या कन्हाळ गावच्या वनविश्रामगृहात मुक्कामाला होतो.हमरस्त्यापासून एखादा किलोमीटर आत असलेलं हे विश्रामगृह पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंची शोभेची झाडं पाहता-पाहता विश्रामगृहाच्या परिसरात आपण कधी पोहोचतो, लक्षात येत नाही.समोर सुंदर बाग.लांबच लांब व्हरांड्याच्या छपरावर विविध रंगांच्या फुलांच्या बेली वाढलेल्या.विश्रामगृहापासून गाव दूर आहे;परंतु या गावाची हिरवीगार भातशेतं आजूबाजूला पसरलेली दिसतात.डाव्या बाजूला एक छोटं तळं आहे.ते विश्रामगृहाच्या खिडकीतून स्पष्ट दिसतं.तळ्यावरून एक मार्ग कोठारी जंगलाकडं जातो.या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी घनदाट अरण्याला सुरुवात होते.समृद्ध जंगल कसं असतं याचा प्रत्यय मला त्या रस्त्यावर चालत जाताना येई.सागाची झाडं विपुल असली तरी अधूनमधून धावडा,साजा,
बिजा ही झाडंही दिसायची.बांबूच्या बेटांमुळं मात्र जंगलाला खरा घनदाटपणा प्राप्त झाला होता.पावसामुळं सारी वनश्री अंघोळ केल्याप्रमाणं वाटे.या वाटेनं मी रोज पक्षिनिरीक्षण करीत जायचा.
या जंगलाचं दर्शन विश्रामगृहातूनही होई.
इथून वीस-पंचवीस किलोमीटर अंतरावर कोठारीचं जंगल आहे.या जंगलात चिरा दगड (फॉसिल) सापडतो. तो हातोड्यानं फोडला की दोन थरांत मासे,बेडक्या, शंख,शिंपले आणि वनस्पती यांच्या अवशेषांचे ठसे दिसून येतात.जमिनीत गाडलेले व त्यांची टोकं दिसत असलेले राक्षस दगडही (वूड फॉसिल) जिकडं-तिकडं विखुरलेले आढळून येतात.जंगलातील पाउलवाटेनं हे सारं पाहात,नमुने गोळा करीत हिंडण्यात एक आगळावेगळा आनंद वाटे.वर्षा ऋतूतील जंगलाचं सौंदर्य पर्यटकांना सहसा पाहायला मिळत नाही.ते मी रोज अनुभवीत होतो.हिरव्या रंगाच्या छटांची जिकडं-तिकडं उधळण केल्यासारखी वाटे.श्रावणातला पाऊसही तसा लहरी.क्षणात पडे,क्षणात उघडे.
त्या दिवशी रात्री पावसाला सुरुवात झाली.बाहेर किर्र अंधार.
खिडकीतून पाहिलं,तर आकाश ढगांनी भरलेलं. ग्रह-नक्षत्रांच्या दर्शनानं एरवी उंच वाटणारं आकाश ढगांनी खाली आल्यासारखं वाटतं.जंगलात विलक्षण शांतता होती.रातकिड्यांचंही अस्तित्व जाणवत नव्हतं. अशा वेळी रात्री उडणारी पाखरंदेखील झाडाच्या अंधाऱ्या ढोलीत डोळे मिटून बसलेली असतात. झाडांची रुंद पानं हलतात.त्यांवर पडणाऱ्या थेंबांचा आवाज येतो.परंतु हे सारे नाद लवकरच अंधारात विरून जातात.त्या अंधाराची विस्मयजनकता मधूनच चमकणाऱ्या काजव्यांमुळं प्रतीत होते.
अशा विलक्षण शांततेचा अनुभव कधी शहरवासीयांना येत नाही.आभाळ आल्यामुळं हा अंधार अनेक पटींनी वाढला होता.जंगलात तर तो शतपटीनं वाढतो,मी शांतपणे डोळे मिटले,
तेव्हा तर या अंधाराचे सहस्र बाहू माझ्या डोळ्यांपुढं नाचत होते.मी मनोमन प्रार्थना करीत होतो,की ही शांतता आता भंगू दे.
हळूहळू शेजारच्या तळ्यातून बेडकांचं डरांऽव डरांऽव गाणं ऐकू येऊ लागलं.त्या आवाजात नेहमीची कर्कशता नव्हती.त्यात मृदुता आली होती.मंद गतीनं आवाज येत होता.पाखरांच्या एखाद्या समूहगायनासारखं वाटत होतं. त्या आवाजानं काही क्षणात अंधारातील भयानकता निघून गेली.मला वाटलं,जणू याच आवाजाचा तिथं अभाव होता.तो आता सुरू झाला होता.त्या आवाजात एक प्रकारची लयबद्धता होती.सुरुवातीला राणा बेडक्यांच्या समूहाचा आवाज येऊ लागला. नंतर भेक-टोड बेडकांचा मोठा आवाज येऊ लागला.राणा आणि भेक यांची जणू जुगलबंदी चालू झाली.हे आवाज मध्येच थांबत. एखादा भेक आवाज काढू लागताच त्याला इतरांची साथ मिळे.नंतर दोन्ही प्रकारचे बेडूक गाऊ लागत.हे आवाज कानांवर येत असता मला कधी तरी झोप लागली.पहाटे मी जागा झालो.
पाऊस थांबला होता.शुक्ल पक्षातील ती पहाट असल्यामुळं चंद्रप्रकाश ढगांतून पाझरत होता.त्यामुळं बाहेर अंधूक प्रकाश दिसत होता.तळ्यातील पाणी चमकत होतं.इतक्यात बेडकांच्या समूहगायनाला पुन्हा सुरुवात झाली.परंतु मध्येच त्या सुरात न सामावणारा एका बेडकाचा चिरकलेला आवाज ऐकू येत होता.
मी अंथरुणात उठून बसलो. उशाजवळचा कमांडर टॉर्च घेऊन तळ्याच्या दिशेनं प्रकाशाचा झोत टाकला.
बेडकांचे पिवळ्या चश्म्यासारखे दिसणारे अनेक डोळे प्रकाशात सुवर्णमण्यांसारखे चमकू लागले. निळ्या-हिरव्या पाण्याच्या पृष्ठभागावर नक्षत्रांचं प्रतिबिंब पडल्यासारखं वाटत होतं.तेवढ्यात एक साप एका बेडकाला गिळत असताना मला दिसला.त्या बेडकाला त्याचं भान नसावं.कारण मृत्यूच्या जबड्यात असताना देखील समूहगायनाला साथ देण्यास तो विसरत नव्हता.
अनादी काळात पाखरं अजून जन्माला आली नव्हती, तेव्हापासून हे बेडूक पावसाळ्यातील अंधाराचं भय कमी करीत आदिमानवाला साथ देत आले आहेत.
नवेगावबांध इथं असताना पावसाळ्यात मी काजवे पाहायला सरोवराकाठी जाई.झाडांवर बसलेल्या असंख्य काजव्यांच्या प्रकाशाकडं पाहता-पाहता मला बेडकांचं गाणं ऐकू येई,विस्तृत आणि शांत सरोवराकाठी हे बेडूक समूहगान गाऊ लागले,की त्यांचा आवाज पाण्यावरून दूरपर्यंत ऐकू येई.जलाशयावरील अंधार, काजव्यांच्या प्रकाशामुळं दृश्यमान झालेल्या झाडांची पाण्यात पडलेली सुंदर प्रतिबिंब,विलक्षण शांतता आणि या शांततेतून स्रवणारं बेडकांचं गान असं एक अभूतपूर्व विश्व माझ्यासमोर साकारलेलं दिसे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पात एक डेड्रा म्हणजे बेडूक खोरं आहे.पावसाळ्यात माझा मुक्काम या खोऱ्याजवळच्या कोकटू वनविश्रामगृहात असे.अतिवृष्टीमुळं मेळघाटातील पाचही नद्या दुथडी भरून वाहू लागल्या, की रस्ते बंद व्हायचे.कित्येकदा मला दहा-पंधरा दिवस या नद्यांतील पाणी ओसरेपर्यंत विश्रांतिगृहातच राहावं लागे.अशा वेळी मी रोज बेडूक खोऱ्यापर्यंत चालत जाई अन् तिथल्या एखाद्या मोठ्या दगडावर बसून खोऱ्याकडं पाहात राही.तिथल्या हत्तीएवढ्या शिळांवरून पावसाचं पाणी धो धो वाहताना शुभ्र वर्णाचे तुषार उडत. खोऱ्याजवळून जाणारी कोकटू नदीदेखील बेफाम वाहात असे.अशा वाहणाऱ्या नदी-नाल्यांना एक नाद असतो.तो नाद ऐकत बसलो असताना अचानक बेडकांचं गाणं सुरू होई.खोऱ्यात मोठमोठे राणा बेडूक आणि कलिंगडाच्या आकाराएवढे भेक होते.तिथल्या झाडांवर रंगीबेरंगी वृक्षमंडूकदेखील होते.आलटून पालटून त्यांचं सामूहिक गान चालू असे.वृक्षमंडूकांचा तर पाखरांच्या किलबिलाटासारखा आवाज येई.(पाखरमाया,मारुती चितमपल्ली,साहित्य प्रसार केंद, सीताबर्डी,नागपूर )
सायंकाळी या गानाला नदी,नाले,ओहोळ आणि आजूबाजूचे जलप्रपात यांचा नाद साथ देई.त्यात वाऱ्याबरोबर सळसळणाऱ्या झाडांचा संमिश्र संथ आवाजही असे.पावसाळ्यात कुठल्याही जंगली जनावरांचा अथवा पाखरांचा आवाज येत नाही. जाणवंत,ते बेडकांचं गाणं.एकदा असाच मी कोकणात पनवेलजवळच्या कर्नाळा गावी होतो.कोकणातील जंगलातील,तसेच भातशेतीमधील बेडकांचा अभाव पाहून मला आश्चर्य वाटे. बेडकांचं गान तर क्वचितच ऐकू येई.
पावसाचे दिवस.रात्री आठ वाजता कर्नाळा इथं थांबणारी बस त्या दिवशी आलीच नाही.मला पनवेलला जायचं होतं.शेवटची बस रात्री दहाला होती.मी माझ्या वनकर्मचाऱ्यांबरोबर बोलत बोलत थांब्यावर बसची वाट पाहात असता - दूर जंगलात ओढ्याच्या काठाकाठानं जाणारा एक टेंभा दिसला.वनकर्मचारी त्याकडं पाहात सांगत होते की,अलीकडे रात्रीच्या अंधारात असा एक टेंभा फिरताना दिसतो.कोकणात भुतं फार.कर्नाळा इथं राहणाऱ्या वन-कर्मचाऱ्यांना तोच संशय आला होता. त्यामुळं रात्रीचं कोणी बाहेर पडत नसे.तो पेंढा आता बराच दूर गेला.पण नंतर एक वळण घेऊन आमच्या दिशेनं येऊ लागला.माझ्यासोबतचे वनकर्मचारी गप्प झाले.हळूहळू येणाऱ्या टेंभ्याकडं मी पाहात होतो.अधूनमधून तो टेंभा वर-खाली होई.कधी पार ओढ्याच्या पाण्यावर येई. जवळ येताच माझ्या बॅगेतील टॉर्च काढून मी प्रकाशाचा झोत त्यावर टाकला. एका माणसानं तो टेंभा हातात धरला होता.उघडीनागडी व्यक्ती अंधारात स्पष्ट दिसत नव्हती.फक्त टेंभा तेवढा दिसायचा.
मी त्याला दरडावून विचारलं,
"कोण आहे रे? अशा रात्री टेंभा घेऊन जंगलात काय करतोस?"
ती व्यक्ती जवळ आली. मी त्याला ओळखलं. तो रानसईचा ठाकर होता. तो जवळ येत म्हणाला,
"सायब, मी बेडूक पकडीत होतो,जी."
त्याच्या खांद्याला झोळी होती,तीत त्यानं पकडलेले बेडूक ठेवलेले होते.
ते सारे बेडूक मी परत जंगलात सोडून दिले.आणि 'पुन्हा जंगलात पाय ठेवू नकोस' अशी सक्त ताकीद त्याला दिली.मग माझ्या सारं लक्षात आलं.त्या वेळी कोकणात एक नवीन धंदा ऊर्जितावस्थेला येत होता.तो म्हणजे बेडूक पकडून पनवेलमधील व्यापाऱ्यांना विकण्याचा. व्यापारी त्या बेडकांच्या टांगा तोडून परदेशांत खाद्य म्हणून पाठविण्याचा उद्योग करीत.परंतु या उद्योगामुळं कोकणातील बेडकांची संख्या कमी झाली.त्यामुळं डास वाढले.
भाताच्या पिकांवर कीड पडू लागली.कारण या डासांवर आणि किडीवर बेडूक उपजीविका करीत. त्यामुळं त्यांवर नियंत्रण राही.पुढं पर्यावरणवाद्यांनी याविषयी खूप आरडाओरडा केल्यावर हा धंदा बंद झाला;परंतु निसर्गातील संतुलन नाहीसं झालं,ते पुन्हा सांधता आलं नाहीच.नवेगावबांध येथील माझ्या निवासस्थाना
समोरील बागेत हौदातील कमळाच्या पानांवर तीन प्रकारचे राणा बेडूक आढळून यायचे. तिथल्या आंब्याच्या झाडावर वृक्षमंडूक होते.हिरव्या, तसेच सोनेरी रंगाचे,लहान आकाराचे हे मंडूक मोठे सुंदर दिसायचे.पावसाची चिन्हं दिसली,की हे मंडूक आवाज करू लागत.चश्म्यासारख्या डोळ्यांचे भले मोठे भेक मंडूकदेखील होते.सायंकाळ झाली,की ते चक्क घरात प्रवेश करीत.छायाला आणि तिच्या आईला ते अजिबात भीत नसत.हे बेडूक घरातील डास जणू तोंडात ओढून घेत.पाऊस पडू लागताच विविध प्रकारच्या दहा-बारा बेडकांच्या या टोळक्याचं गाणं सुरू होई.
पुढं पुढं ते गाणं कमी कमी होई.परंतु त्यांच्या पिलांची संख्या वाढलेली असे.बेडकांना खाण्याकरता चारपाच फूट लांबीची धामण बागेत फिरताना दिसली,की छाया पळत घरात येई.फुटक्या बांबूचा आवाज करून त्या धामणीला मी जंगलात हुसकावून देई.कधी कधी बेडूक पकडण्यासाठी ही धामण मोठ्या चपळतेनं पाण्यात पोहताना दिसे.धामण क्वचितच बेडूक खाताना दिसे. मात्र कावळे आणि घारी हे त्यांचे खरे शत्रू होते.कधी रानमांजरदेखील बेडकाची शिकार करताना दिसे.
या जगात बेडकांवर खरं प्रेम कुणी केलं असेल,तर ते हायकू लिहिणाऱ्या जपानी कवींनी.हायकू वाचताना बेडकांचं कधी न जाणवलेलं सौंदर्य मला अनुभवता येतं.बेडूक गातात,हे मला पहिल्यांदा या कवींनी सांगितलं आहे.
तू गातोस तर छान ! परंतु नाचून दाखवशील काय? :
Elegant singer Would you further
Favour us
With a dance.... O frog?
-Issa
तिन्हीसांजेची वेळ.जिकडंतिकडं शांत आहे.दूरवरून बेडकांच्या पिलांच्या गाण्याचा आवाज कानी येतोय. :
Standing still at dusk
Listen... in far
Distances
The song of froglings!
-Buson
वसंत ऋतूनंतर पावसाचं आगमन होतं.तेव्हा बेडूक गाऊ लागतात.त्यांचे ते उदास सूर ऐकून वाटतं,की ते कोणाविरुद्ध तक्रार करीत असावेत.
When spring is gone,none
Will so grumpily
Grumble
As these chirping frogs.
-Yayu
हीच तक्रारीची भावना दुसऱ्या एका कवीनं सांगितली आहे:
Day darken! frogs say
By day.. bring light! Light!
they cry By night. Old grumblers!
-Buson
पहिल्यांदा मी जेव्हा यती बनलो,तेव्हा या बेडकांनी पूर्वीचीच जुनी गाणी गायली :
Since I first became
A hermit,
The frogs have sung Only of old age
-Issa
तिन्हीसांजा झाल्यात.चंडोलांचा थवा आकाशात गातोय, तर बेडकांचा कळप धरतीवर.गाण्याच्या कलेत कोण वरचढ आहे,याची जणू पैजच लागली आहे,पहा :
Frog-school competing
With lark-school
Softly at dusk In the art of song....
-Shiki
बेडूक लहान असताना पाखरांप्रमाणं गातात.परंतु उन्हाळा संपून पावसाचं आमगन होताच ते म्हाताऱ्या कुत्र्यासारखे भुंकू लागतात :
As froglets
They sang like birds…
Now summer is gone
They bark like old dogs
-Onitsura
त्या रात्री मी पल्याडलं शेत विकून टाकलं.रात्रभर मला झोप आली नाही.तेव्हा बेडकांचे आवाज ऐकत पडून राहिलो :
That night when I had
Sold my lower
Field... I lay
Wakeful from frog-calls.
-Hokushi
पावसाचे थेंब नवीन पालवीवर आवाज करीत पडू लागले,तसे वृक्षमंडूक हलकेच उठून मंद सुरात गाऊ लागतात :
A tree frog softly
Begins to trill
As rain drops
Spatter the new leaves
-Rogetsu.