* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: शोध वेश्यांमधल्या शहाणपणाचा / The search for wisdom among prostitutes

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

२४/८/२५

शोध वेश्यांमधल्या शहाणपणाचा / The search for wisdom among prostitutes

तुम्ही जगाला दुसऱ्याच्या दृष्टिकोनातून पाहू शकत नाही आणि बदलू शकत नाही. - लीना कोकले


आजार आहे,एवढीच माहिती उपलब्ध होती.तो कसा पसरतो,

कोणाकडून पसरतो,त्याच्यापासून बचाव कसा करायचा,ही साथ ताबडतोब आटोक्यात कशी आणायची,या सगळ्यांबाबत गोंधळलेपण होतं.त्यामुळे समाजात अशा बाधित लोकांना बहिष्कृत जीवन जगायला लावलं जात होतं.त्यामुळेच सर्वप्रथम एड्ससंबंधित माहिती गोळा करणं महत्त्वाचं आहे,हे

एलिझाबेथ यांनी ओळखलं आणि आपल्या काही सहकाऱ्यांसोबत त्यांनी या कामात झोकून दिलं - आणि तिथेच एका अर्थाने 'विस्डम ऑफ व्होअर्स'च्या प्रवासालाही सुरुवात झाली.यूगांडासारखे आफ्रिकेतले देश,तसंच इंडोनेशिया आणि आग्नेय आशियाई देशांतील स्त्री वेश्या,पुरुष वेश्या,भाड्याने मिळणारी कोवळी मुलं-मुली,त्यांचे भडवे,त्यांची गिऱ्हाइकं, ड्रग्जचा भूमिगत व्यापार,त्यांना प्रतिबंध करू पाहणारे प्रामाणिक पोलिस आणि इतर अधिकारी,एड्सच्या रुग्णांना आणि अमली पदार्थांच्या व्यसनी लोकांना पुन्हा सरळ मार्गावर आणण्याचा प्रयत्न करणारे कार्यकर्ते यांच्याशी संपर्क साधत अन् त्यांच्याकडून एड्ससंबंधी माहिती खणून काढत एलिझाबेथ यांचं काम सुरू झालं.


त्याशिवाय अलीकडे ज्यांना 'एलजीबीटी' म्हणून ओळखलं जातं त्या समुदायातील व्यक्तींसोबतही या विषयावर चर्चा करण्याची गरज आहे,हेही एलिझाबेथ यांच्या लक्षात आलं;पण अर्थातच हे काम सोपं नव्हतं. त्या काळी बहुतेक देशांमध्ये समलैंगिक संबंध हा कायद्याने गुन्हा होता.त्यामुळे समलिंगी व्यक्ती उघडपणे समाजात वावरत नसत.तसंच वेश्यांच्या आणि अमली पदार्थांचं सेवन व विक्री करणाऱ्यांच्या जगातही बाहेरच्या व्यक्तीला सहज प्रवेश मिळणं अशक्य होतं. नको त्या चौकशा करणाऱ्या अशा व्यक्तीकडे संशयाने बघितलं जाई आणि भलत्या गोष्टीत नाक खुपसणं हे थेट जिवावर बेतणं होतं.या जगाचे नीतिनियम पूर्ण वेगळे होते.प्रवेश करणं दूरच,पण या पाताळ जगताचे दरवाजे किलकिले करून त्यात डोकावणं हेच एक अवघड काम होतं.पण याच जगाला एड्सचा विळखा पडलेला असल्यामुळे एलिझाबेथ यांच्या दृष्टीने त्या जगात प्रवेश करणं अत्यावश्यक होतं.पण या सर्वांचा विश्वास संपादन करत एलिझाबेथ यांनी इंडोनेशिया, थायलंड,हाँगकाँग,भारत तसंच आफ्रिकेतील काही देशांमध्ये अशा विविध समुदायांसोबत संपर्कच नव्हे,तर मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले.त्यासाठी त्यांनी केलेली भटकंती आणि कष्ट वाचून आपली छाती दडपून जाते.


त्यातली काही उदाहरणं बोलकी आहेत.इंडोनेशियात 'वारिया' नावाचा एक प्रकार असतो.स्त्रैण पुरुष असा त्याचा अर्थ आहे.परालिंगी (ट्रान्सजेंडर) किंवा परावेषधारी (ट्रान्सव्हेस्टाइट) असं त्यांना इतरत्र म्हटलं जातं.'वारिया' हे स्त्रीवेष करून अनेकदा वेश्याव्यवसाय स्वीकारतात.

इंडोनेशियात एचआयव्हीग्रस्तांची संख्या वाढीस लागल्याचं सर्वप्रथम 'वारियां'मुळेच उघड झालं. सर्वप्रथम १९९७ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात सहा टक्के वारिया एचआयव्ही बाधित असल्याचं उघड झालं.पण पुढे २००० साली जेव्हा पुन्हा सर्वेक्षण केलं गेलं तेव्हा त्यात मात्र या 'वारियां'चा काहीच उल्लेख नव्हता.ही बाब किती गंभीर आणि धोकादायक ठरू शकते याची एलिझाबेथ यांना जाणीव होती.असं का झालं असावं याचा शोध घेण्यासाठी त्यांनी वारियांचीच मदत घेण्याचं ठरवलं.लेन्नी,नॅन्सी,आयनेस या वारियांमुळे एलिझाबेथ यांना त्यांच्या गूढ जगात प्रवेश मिळाला आणि त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळेच सर्वेक्षणातील त्रुटी लक्षात आल्या.माहिती मिळवण्यासाठी एलिझाबेथ जेव्हा या समुदायाची वस्ती असलेल्या ठिकाणी जायच्या तेव्हा तिथे सहज उपलब्ध असणाऱ्या आणि काम नसणाऱ्या वारियांशी किंवा वेश्यांशी त्या बोलायच्या.आयनेस नावाच्या वारियाने यातला फोलपणा त्यांच्या लक्षात आणून दिला.ज्या वारियांकडे कामच नाही ते एड्सबद्दल किंवा सेक्शुअल कॉन्टॅक्टच्या पॅटर्नबद्दल कशी माहिती देणार? माहिती मिळवण्यासाठीदेखील एलिझाबेथ यांना अशा 'शहाणपणा'चा उपयोग झाला.


अशा अनेक घटनांवरून एलिझाबेथ यांना जाणवलं,की योग्य उपाय करण्यासाठी योग्य माहिती हवी,आणि योग्य माहिती मिळवायची असेल तर योग्य माणसांशीच बोलावं लागेल,योग्य तेच प्रश्न विचारावे लागतील आणि उत्तरंही अचूकपणे नोंदवावी लागतील,तरच अशा माहितीच्या आधारे बनवलेले अहवाल पुढील उपाययोजनेसाठी मार्गदर्शक ठरू शकतील.या जगात वावरू लागल्यावर एड्सच्या सर्वेक्षणातल्या तसंच उपायांमधल्या इतरही अनेक त्रुटी समोर येऊ लागल्या. सर्वेक्षणाच्या फॉर्मवर लोकांच्या वर्गीकरणासाठी जे पर्याय उपलब्ध होते ते पुरेसे नसल्याचं एलिझाबेथ यांच्या लक्षात आलं.तसंच अनेकदा लोकांना अशा ठराविक वर्गीकरणात बसवणं अवघड असतं हेही कळून चुकलं.अशा अनेक चुकांचा पाढाच एलिझाबेथ यांनी या पुस्तकात मांडला आहे.त्यातून आपल्या यंत्रणेला रोगाच्या नियंत्रणाचं काम करण्याची इच्छा असते की नाही,असा प्रश्न आपल्यापुढे उभा राहतो.दुसरीकडे,बऱ्याचदा अचूक मिळालेल्या माहितीचाही योग्य वापर केला जात नसल्याची खंत एलिझाबेथ या आफ्रिकेच्या उदाहरणासहित व्यक्त करतात.जगातील एकूण एचआयव्हीबाधित लोकांपैकी दोन तृतीयांश लोक आफ्रिकेतील काही मोजक्या देशांत राहतात.या वास्तवाला जबाबदार असणाऱ्या परिस्थितीची चिरफाडही एलिझाबेथ यांनी आपल्या भटकंतीतल्या अनुभवावरून केली आहे.एचआयव्ही हा असुरक्षित लैंगिक संबंधातून होणारा रोग आहे आणि बहुतेक एचआयव्ही

बाधित आफ्रिकेत राहतात,या दोन्हींतील कार्यकारणभाव समजून त्यानुसार उपाययोजना करण्याऐवजी तिथली राजकारणी मंडळी 'वांशिक भेदभावा'चं राजकारण करण्यात गुंग होती,असं एलिझाबेथ म्हणतात. त्यामुळे समस्येला सामोरं जाण्याऐवजी पश्चिमी देश केवळ वंशवादातूनच असे आरोप करत असल्याचा प्रचार करण्यातच तेथील राजकारण्यांनी वेळ वाया घालवला.

त्यामुळे रोगाचा प्रसार कमी होण्याऐवजी वाढतच राहिला,असं त्यांचं म्हणणं.हे म्हणणं त्या ज्या अनुभवांवरून मांडतात ते प्रत्यक्ष पुस्तकातूनच वाचण्याजोगे आहेत.


तळागाळात भटकल्यामुळे रोगाचं मूळ कशात आहे याचं नेमकं भान एलिझाबेथ यांना आलेलं दिसतं. त्यामुळे वर्ल्ड बँकेलाही त्यांची चूक साधार पटवून देण्यास त्या मागेपुढे बघत नाहीत.

एड्सचा प्रसार होण्यास गरिबी आणि स्त्री-पुरुष असमानता या गोष्टी कारणीभूत असल्याचं वर्ल्ड बँकेचं म्हणणं अमान्य करून एड्सच्या प्रसारामागे 'सेक्स आणि ड्रग्ज' हीच दोन मुख्य कारणं आहेत,असं त्या ठासून सांगतात. एलिझाबेथ यांचं आणखी एक निरीक्षण अतिशय महत्त्वाचं आहे.त्या म्हणतात 'जेव्हा जेव्हा संयुक्त राष्ट्र किंवा एखादा धनाढ्य पाश्चिमात्य देश एखाद्या कार्यासाठी आर्थिक मदत जाहीर करतात तेव्हा संबंधित क्षेत्रात कुत्र्याच्या छत्र्यांप्रमाणे सेवाभावी संस्था उगवतात.बहुतेकदा राजकीय व्यक्तींशी साटंलोटं असणाऱ्या संस्था या आर्थिक मदतीचा मलिदा खातात आणि प्रत्यक्षात नियोजित कार्याला काडीभरही हातभार लागत नाही.आग्नेय आशियातले देश किंवा आफ्रिकेतले शासकीय अधिकारी अशा सेवाभावी संस्थांचा उल्लेख अतिशय शिवराळ भाषेत करतात. एलिझाबेथही या संस्थांना 'साखरेला लागलेल्या मुंग्या' असं म्हणतात आणि एड्ससोबत अशा संस्थांच्या नियंत्रणासाठी उपाय सुचवतात.


या सगळ्या चर्चेत पुस्तकाच्या शीर्षकानुसार एड्सवर नियंत्रणासाठी वेश्यांचं शहाणपण काय सांगतं याबद्दलही वाचकांना उत्सुकता असेल.वेश्या,समलिंगी लोक आणि एचआयव्हीबाधित लोक यांनी शिकवलेल्या शहाणपणातून शिकत एलिझाबेथ यांनी एड्सचा प्रसार रोखण्यासाठी काही सोपे उपाय सुचवले आहेत.त्यांच्या मते या उपायांनी एड्सचा प्रसार अगदी सहज थांबवता येऊ शकतो.उदाहरणादाखल सांगायचं,तर वेश्यावस्तीत जागोजागी कंडोम्सची व्हेंडिंग मशिन बसवणं किंवा गरीब वस्तीत कंडोम्स सहज आणि विनामूल्य उपलब्ध करून देणं हा त्यातला मुख्य आणि सोपा उपाय. देहविक्रय करणाऱ्यांना एड्सच्या धोक्याची जाणीव करून देऊन ग्राहकाला कंडोम वापरायला लावण्यास भाग पाडणं हा दुसरा महत्त्वाचा उपाय.पण एड्सचा प्रसार इतक्या सोप्या उपायांनी रोखला जाऊ शकतो हे मान्य झालं तर बहुराष्ट्रीय औषधनिर्मात्यांची पंचाईत होईल,हा मुख्य प्रश्न आहे. दुसरीकडे,एड्सचं भूत जागं ठेवलं तरच त्यांना संशोधनासाठी अनुदान मिळणार असतं.खरं म्हणजे असं अनुदान देणाऱ्या संस्था ही औषधं स्वस्तात उपलब्ध करून देण्याची अट औषध कंपन्यांवर घालत असतात.पण संशोधनाचा खर्च फुगवून सांगून या अटीला बगल दिली जाते,याकडे एलिझाबेथ आपलं लक्ष वेधतात. सरकारी आणि स्वयंसेवी संस्थांच्या पातळीवर एड्स नियंत्रणासाठी सुरू असलेलं काम हे बऱ्याचदा त्या नियंत्रणात अडथळा ठरत असल्याचं एलिझाबेथ यांनी केलेल्या भटकंतीतून आणि त्यातून काढलेल्या निष्कर्षातून समोर येतं.


... तर अशी ही एलिझाबेथ यांनी एड्सच्या शोधात केलेली भटकंती.एड्सग्रस्तांची माहिती गोळा करत आफ्रिका आणि आग्नेय आशियाच्या तळागाळात फिरताना त्यांना खऱ्या अर्थाने समाजाचं दर्शन झालं. त्यांच्याच शब्दांत सांगायचं, तर 'आय एक्स्प्लोअर्ड द अंडरबेली ऑफ दीज पॉप्युलेशन्स !' त्यांचा हा प्रवास आपल्यालाही डोळस करत जातो.