रॅफेल सेमीज कोडी ऊर्फ 'रॅफ'.सरासरीपेक्षा लहानखुरा,एकांडा,अंतर्मुख मुलगा.वडील ऐन्स्ली कोडी पेशानं मेकॅनिक,निम्न मध्यमवर्गी.आई मार्शिया सेमीज.माहेरची श्रीमंत.ऐन्स्लीच घर, दुकान,सगळं सेमीज लोकांनी मुलीला आंदण म्हणून दिलेलं.पण ऐन्स्लीचं उत्पन्न जेमतेम.घरी टीव्हीसुद्धा नाही.
क्लेव्हिल्शेजारच्या नोकोबी परिसरात पिकनिकला जाणं,ही मुख्य करमणूक.
या पिकनिक्समधून भेट झाली फ्रेडरिक आणि 
अॅलीशिया नॉर्व्हिल् या विनापत्य जोडप्याशी. फ्रेडरिक फ्लॉरिडा राज्य विद्यापीठात परिसरशास्त्राचा प्राध्यापक.त्याची पिकनिकही काही प्रमाणात तरी नोकोबी परिसरातल्या लॉग-लीफ पाईन वृक्षांनी नटवलेल्या कुरणांचा अभ्यास करण्यासाठीची.
फ्रेडरिकला लवकरच जाणवलं,की रॅफला नोकोबी परिसराची सखोल माहिती आहे.लवकरच फ्रेडरिकचा रॅफसाठी 'फ्रेडकाका' झाला,आपल्या जीवसंग्रहात रस घेणारा.रॅफच्या संग्रहात अनेक सॅलामँडर पाणसरडे होते - उभे पट्टेदार,ठिपकेदार, आडवे पट्टेदार.कोरस बेडूक होते,कंगव्याच्या दातांवर नखानं आवाज काढतात,तसा आवाज करणारे.चकचकीत निळे चतुरकिडे होते. मोठाले लबर जातीचे नाकतोडे होते, ज्यांना हातावर येऊन बसायला शिकवता येतं.
रॅफ फ्रेडकाकाला कहाण्या सांगतो - प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या,किड्यांच्या.काही कहाण्या स्वतःच्याही. बाबांना रॅफनं शिकारी होऊन हवं असतं,तर रॅफला प्राणी-पक्षी मारण्यात रस नसतो.आपला मुलगा 'बायल्या' असल्यान बाप नाराज,आणि रॅफ अधिकाधिक एकांडा आणि अंतर्मुख होत जाणारा.
आईवडिलांमधला तणाव.दोघं घटस्फोट तर घेणार नाहीत? वडील बायलेपणावरून मारणार तर नाहीत?वडील सहज हिंस्र होणारे,रॅफचे वडील पाच फूट आठला जरा कमी.वजन फक्त एकशे तीस पौंड.
कोण्या मोठ्या माणसाशी मारामारी झाली,तर काय करतील?
प्रश्न गैरलागू होता.वडिलांच्या खिशात मोठा चाकू असायचा.वेळीअवेळी एका छोट्या चौकोनी दगडानं ते धार लावत असायचे.पिकअप ट्रकच्या पुढच्या कप्प्यात ०.२२ पिस्तूल असायचं.मध्येच एक ब्लॅकजॅक सोटा काढून दाखवायचे.कुठून सोटा येतो,हे रॅफला कधी कळायचंच नाही.पण ही सारी शस्त्रास्त्रं कधी वापरावी लागल्याचं रॅफच्या ऐकिवात नव्हतं,ना पुढे कधी ऐकू आलं.
पण ह्या साऱ्यातनं रॅफ आतून मजबूत होत गेला.
आईचा वेगळाच प्रकार.सेमीज लोक अमेरिकन यादवी युद्धात प्रसिद्धी मिळवलेल्या अॅडमिरल रॅफेल सेमीजच्या चुलत घराण्यातले.यादवी युद्धात दक्षिणेकडून लढलेल्यांचं दक्षिण यूएसएत कौतुक फार तर आई रॅफला सांगायची,"मुला,आपले लोक कोण होते,हे नेहमी लक्षात ठेव.तुला जीवनात खूप मदत लागेल,आणि इथे दक्षिणेत मोठं नाव महत्त्वाचं असतं."तिला रॅफ इतर कुठे वास्तव्याला जाईल,हे सुचतच नसे !
या मानानं फ्रेडकाकांशी बोलणं रॅफला सोपं जायचं.
"मला पूर्ण नोकोबी परिसराचा नकाशा काढायचा आहे,कुठे कोणते जीव सापडतात त्याचा.मग पुढे सगळं झीबाक अरण्य तपासायचं आहे.कोणाला ठाऊक,मला काही नव्या जीवजाती सापडतील, नव्या सापांचे फोटो काढता येतील."
या झपाट्यानं फ्रेडकाकाही सावध झाला.
"रॅफ,एक सल्ला देतो, महत्त्वाचा.जरा दमानं घे. नव्या,माणसांना अनोळखी जीवजाती असतील तिथे.पण टप्प्याटप्प्यानं चलू या.तू अजून लहान आहेस.प्राणिसृष्टी,वनस्पतीसृष्टी आधी शिकून घे. आणि जे काही करशील,ते सांभाळून कर.विषारी सापांपासून सांभाळ.पाण्यापासून दूर रहा.जूनियर किंवा कोणी शाळेतले मित्र सोबत घेत जा.नोकोबी मस्त जागा आहे,
पण तू धड राहिलास तरच अभ्यास करता येईल ना!"
"हो, सर!"
उत्तर फार लवकर आल होत.पण फ्रेडकाका करू शकत होता तेवढं त्यानं केलं होतं.
नोकोबी परिसर म्हणजे मुख्यतःनोकोबी सरोवराचा परिसर.हे बाराशे एकरांचं सरोवर अजून माणसाच्या हाती लागलं नव्हतं.त्याच्याभोवती माणसांचा स्पर्शही न झालेलं लॉग-लीफ पाईन जंगल होत..
 त्याच्याभोवती यांच्या सरोवरालगतचा भाग विरळ,कुरणासारखा होता.तर जरा पश्चिमेला दाट अरण्य होतं.तो भाग विल्यम झीबाक राष्ट्रीय उद्यान म्हणून राखीव केला गेला होता.नोकोबी सरोवराच्या दक्षिण टोकाचा एक जवळपास सुटा वाटणारा भाग घुबडतलाव म्हणून ओळखला जायचा.
नोकोबी सरोवर आणि विल्यम झीबाक राष्ट्रीय उद्यान यांच्यामधली जमीन जेप्सन कुटुंबाची होती. हे कुटुंब खरं तर आज क्लेव्हिलजवळ राहतही नव्हतं.कुठेतरी उत्तरेला होतं.त्याच्या शाखा-उपशाखाही सगळ्या उत्तरेत पसरल्या होत्या. सगळ्या जेप्सनांमध्ये वादावादी होती.आणि नोकोबी जमीन विकायची कोणालाच घाई नव्हती. क्लेव्हिलचे बिल्डर-डेव्हलपर्स मात्र नोकोबी परिसर विकाऊ व्हायची वाट पाहात असायचे.पर्यावरणवाद्यांनाही नोकोबी परिसरात रस होता. त्या भागात अनेक दुर्मिळ जीवजाती होत्या.काही तर नष्ट होण्याच्या बेतातल्या होत्या.
सर्वांत प्रसिद्ध होते लाल तुऱ्यांचे सुतारपक्षी;मोठ्या लाँग-लीफ पाईन्सच्या उंचावरच्या ढोल्यांमध्ये राहणारे.आकारानं मोठे होते जांभळे साप.सातेक फुटांपर्यंत वाढू शकणारे हे साप काळपट-जांभळे असायचे.कासवांच्या बिळात राहात ते अनेक लहानसहान प्राणी खायचे,अगदी आपल्याच जातीची पिल्लंही खायचे.लहान जीवांमध्ये होत्या 'मोल' - सापसुरळ्या.वीतभरही नाही.पाय जेमतेम. खरं तर चिलखतधारी गांडुळांसारखे.हे निसर्गशास्त्रज्ञ सोडून कोणाला दिसतही नसत.
तीन प्रकारच्या मुंग्याही भेटायच्या.एक जात कासवांच्या बिळांमध्ये राहून कोळ्यांची अंडी खायच्या.दुसरी एक जात पाईन वृक्षांवर जगायची, आणि लाल तुऱ्यांच्या सुतारांना अन्न पुरवायची.ते सुतार पक्षी मुख्यतः या मुंग्यांवरच जगायचे.तिसरी जात नोकोबी-घुबड सरोवरांजवळ वारुळं रचून राहायची.खुद्द फ्रेडकाकांना नोकोबीत रस होता तो वेगळ्याच कारणानं.वणवे आणि त्यांचा जंगलांवरचा परिणाम,हे फ्रेड आणि अॅलीशियांचं अभ्यासाचं क्षेत्र. फ्रेडकाका सांगतात.
माणसांनी मधेमधे केले नाही,तर विजांमुळे वणवे पेटतात,आणि तेही वारंवार.वणवे जमिनीलगतच्या काडीकचऱ्यातून सावकाश पसरत जातात.
वेगवेगळ्या प्रकारांची सगळी झाडं हे सहन करतात. नुसतं सहन नाही करत,तर त्यांना दर काही वर्षांनी अशा जाळपोळीची गरज असते.आम्ही जुन्या वणव्यांचे पुरावे तपासले.
असं दिसलं की,वणवे पेटू दिले नाहीत तर मूळ झाडांचे प्रकार मागे पडून बाहेरची झाडझडप त्या जागी आक्रमण करतात.दहाएक वर्षांमध्ये सगळं जंगल स्लॅश-पाईन,लॉब् लॉली पाईन,वॉटर-ओक, लॉरेल-ओक,स्वीटगम,आणि तसल्या झाडाझुडपानी गच्च भरून जात.याचा काडीकचरा जमिनीच्या जरा वर दाट थर घडवतो.खेळत्या हवेनं तो लवकरच कोरडा पडतो,आणि नंतर येणारे वणवे वेगानं पसरतात.अशा जोमदार अग्निप्रलयांत लहान झाडं नष्ट होतात.हे वणवे रस्ते आणि ओढे ओलांडून दूरवरच्या जीवसृष्टीचं नुकसान करतात.
लाँग-लीफ पाईन कुरणं मात्र वारंवारचे मंद वणवे भोगत स्थिरावतात.मग त्यांच्यात भरपूर प्रकारचे प्राणी आणि वनस्पती वाढू लागतात.आगींचं चक्र थांबवलं,
तर मात्र हे स्थैर्य हरवतं,आणि पुन्हा स्थिरावायला खूप वेळ लागतो.एखाद वेळी तर जुनी जीवसृष्टी पार संपूनही जाते.
तर रॅफ हे सारं फ्रेड आणि अॅलीशियांकडून शिकायला लागला.तो बॉय स्काऊटही झाला, आणि जंगलात वावरायच्या पद्धती,तिथे पाळायची पथ्यं त्यानं शिकून घेतली.या साऱ्यानं तो जबाबदार नागरिक झाला.
पशुपक्ष्यांना न मारणारा,जीवसृष्टी सांभाळणारा झाला.('वारुळ पुराण',माधव गाडगीळ',ई.ओ.विल्सन,
अनुवाद - नंदा खरे,मनोविकास प्रकाशन)
जमीन श्रमांचा मोबदला देते,म्हणून शेतकरी तिच्यावर प्रेम करतात.शिकारी जंगलांमधून त्यांना शिकार मिळते,म्हणून त्यांच्यावर प्रेम करतात. रॉफचं नोकोबीवरचं प्रेम केवळ नोकोबीसाठी होतं. त्या क्षेत्रानं त्याला जगाकडे पाहायची एक दृष्टी दिली,शाळेत आणि घरी सांगितल्यापेक्षा वेगळी. त्याला एक मोठं संदर्भचित्र दिसू लागलं,ज्यात मनुष्यजात,तो स्वतः,हे भाग होते.हळूहळू हे चित्र स्पष्ट होत गेलं.निसर्ग माणसांच्या जगाबाहेर नाही. माणसं निसर्गात बेटं घडवून जगतात.