* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

९/१२/२२

सर आयझॅक न्यूटन Issac Newton (१६४२ - १७२७) १७ व्या शतकातील महान शास्त्रज्ञ..!

गॅलिलिओचा मृत्यू झाला आणि त्याच वर्षी इंग्लंडमध्ये सतराव्या शतकातील एका महान वैज्ञानिकाचा जन्म झाला. त्याचं नाव होतं आयझॅक न्यूटन


गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतामुळे सर्वमान्य असलेल्या या व्यक्तिमत्त्वाने दोन शतकांपर्यंत गणित,पदार्थविज्ञान,

खगोलशास्त्र यात मौलिक अशी भर टाकली.


सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटन बसला असताना,झाडावरून सफरचंद खाली पडले आणि न्यूटनला गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत सुचला.अशी एक आख्यायिका प्रसिद्ध आहे.सफरचंद खाली पडत असलेले न्यूटनच्या आधीही आणि न्यूटनच्या काळातही अनेकांनी पाहिलेले असणार.पण सिद्धांत सुचण्यासाठी लागणारी प्रगल्भता ही काही जणांकडेच असते.गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत त्याला १६६६ मध्ये सुचला आणि जवळपास १६८७ मध्ये 'प्रिन्सिपिया' या पुस्तकाच्या माध्यमातून प्रकाशित केला.


'विश्वातील कोणत्याही दोन वस्तूतील आकर्षण हे त्या दोन वस्तूंच्या वस्तुमानाशी समप्रमाणात आणि त्यांच्या अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते' हा त्याचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. 


या गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताने पदार्थविज्ञान आणि खगोलविज्ञानाच्या क्षेत्रामध्ये अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर प्रकाश टाकला.


न्यूटनच्या गतीविषयक नियमांनी

खगोलविज्ञानाला चालना दिली.


 'कोणतेही बाह्य बल कार्यरत नसेल तर स्थिर वस्तू स्थिर आणि गतिमान वस्तू त्याच गतीमध्ये राहते ' हा न्यूटनचा गतीविषयक पहिला नियम


सर्व ग्रह सूर्याभोवती का फिरतात याचे उत्तर या नियमामुळे मिळाले.ग्रहांची निर्मिती ज्यावेळेस झाली,त्यावेळेस त्यांना जी गती मिळाली त्या गतीने ते आजतागायत फिरताहेत.कृत्रिम उपग्रह,अंतराळ स्थानक,हबल दुर्बिण इतर मानवनिर्मित वस्तू न्यूटनच्या या पहिल्या नियमानुसारच अंतराळात फिरत आहेत.कृत्रिम उपग्रहांना फिरण्यासाठी कोणत्याही प्रकारचे इंधन लागत नाही.


एका ठराविक उंचीवर पोहोचल्यानंतर त्यांना जी गती दिली जाते,त्याच गतीत ते कायमस्वरुपी फिरत राहतात.न्यूटनचा गतीचा तिसरा नियम  दोन वस्तूमधील क्रिया- प्रतिक्रिया संदर्भात आहे. 


'प्रत्येक क्रियेला समान आणि विरूद्ध अशी प्रतिक्रिया असते' 


या नियमाच्या उपयोगानेच अवकाश संशोधनाचा पाया घातला होता.रॉकेट अंतराळात सोडण्यासाठी या नियमाचा उपयोग मानवाला करता आला.


टीव्ही,मोबाईलद्वारे संदेशवहन हे उपग्रहांच्यामुळेच आज शक्य झालेले आहे.मोबाईलवर तासन् तास बोलणारे न्यूटनचे या तंत्रज्ञानाबाबतीतील ऋण व्यक्त करण्यासाठी वेळ काढतील असं वाटत नाही.


७ डिसेंबर २०२२ या लेखामधील पुढील भाग..




७/१२/२२

फिलिपो ब्रूनो : धर्माच्या भयानक शिक्षेला सामोरा गेलेला एक प्रतिभावंत खगोलवैज्ञानिक..

फिलिपो ब्रूनो Philipo Bruno 

(१५४७ - १६००) 


हा प्रबोधनकाळातील इटालियन तत्त्ववेत्ता,

नेपल्सजवळील 'नोला' या गावी जन्मलेला हा एक स्वतंत्र विचाराचा खगोलशास्त्रज्ञ.ब्रूनोकडे एक आधुनिक विज्ञानाचा हुतात्मा म्हणून पाहिले जाते.धर्मपंडितांशी त्याचे कधीही पटले नाही. १५८३ मध्ये त्याने 'On the Infinite Universe and its Worlds' हे पुस्तक प्रसिद्ध केले.कोपर्निकसच्या सूर्यकेंद्रित सिद्धांताचा पुरस्कार करत पुढचे भाष्यही त्याने केले.


विश्वाचे केंद्र पृथ्वी तर नाहीच पण सूर्य तरी मानावा की नाही याबद्दल मला शंका उत्पन्न होते.या विश्वात पृथ्वीसारखे दुसरे विश्व असण्याची आणि दुसरे सूर्य असण्याची शक्यता त्याने वर्तवली.सोळाव्या शतकात त्याने मांडलेले विचार आधुनिक विज्ञानाशी सुसंगतच होते.पण ब्रूनोचे हे क्रांतिकारी विचार धर्मसंस्थेला मानवले नाहीत.धर्मविरोधी पाखंडी मतांबद्दल त्याला १९ फेब्रु.१६०० मध्ये रोमच्या चौकामध्ये जाहीररीत्या जाळण्यात आले. 


एवढी अमानुष आणि भयंकर शिक्षा देण्यास धर्म अजिबात कचरत नाही.सत्य सांगण्याची एवढी जबरदस्त शिक्षा असते आणि ती वैज्ञानिकांनी त्या काळात भोगलेली आहे.प्रबोधनाच्या काळामध्ये वैज्ञानिकांना किती हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या असतील याची कल्पना येते. दुसरी पृथ्वी असण्याची शक्यता धर्माला एवढी खटकण्यासारखी का होती? 


कारण दुसरी पृथ्वी असणे म्हणजे आपल्यापेक्षा दुसरे कोणीतरी श्रेष्ठ असणे.आपल्या धर्मापेक्षा दुसरा धर्म श्रेष्ठ असणे.आपल्या धर्मगुरूपेक्षा दुसरा कोणीतरी श्रेष्ठ असणे,हे ज्या धर्माला मानवत नाही तो धर्म किंवा असे धर्म मानवतावादाची शिकवण खरंच राबवत होते का?


आजही धर्माचा प्रचंड अभिमान उराशी बाळगणारे 'मानवता' धर्म आचरणात आणणार आहेत की नाही? हाच खरा सवाल आहे.


५ डिसेंबर २०२२ या लेखामधील पुढील भाग..








५/१२/२२

जोहानस केप्लर Johannes Kepler (१५७१ - १६३०)

टायको ब्राहेने कोपर्निकसचा सिद्धांत चूक ठरवण्यासाठी मदतनीस म्हणून घेतलेल्या केप्लरने मात्र कोपर्निकसचीच बाजू घेतल्याचे त्याच्या निरीक्षणावरून दिसते. 


कोपर्निकसचा सिद्धांत पूर्वापार चालत आलेल्या टॉलेमीच्या सिद्धांतापेक्षा नक्कीच सोपा आणि सुटसुटीत आहे याची प्रचिती केप्लरला येत होती.


कोणत्याही तऱ्हेचे लौकिक सुख लाभलेले नसताना,सतत निरीक्षण,सत्यज्ञानावरती श्रद्धा या त्याच्या वैशिष्ट्यामुळे त्याने खगोलविज्ञानात मोलाची भर घातलेली आहे.केप्लरची कल्पनाशक्ती विलक्षण होती.ग्रहांच्या गतीचे नियम त्याने शोधून काढले.

त्याच्या पहिल्या नियमाप्रमाणे ग्रह सूर्याभोवती दीर्घवर्तुळाकृती कक्षेत फिरतात आणि सूर्य त्या कक्षेच्या नाभीस्थानी असतो.दुसऱ्या नियमाप्रमाणे ग्रहांची गती ही त्यांच्या कक्षेत वेगवेगळी असते किंवा ग्रह समान काळात समान क्षेत्रफळ पार करतात. ग्रहाला स्थान १ पासून २ पर्यंत जाण्यासाठी जेवढा कालावधी लागतो तेवढ्याच कालावधीत तो स्थान ३ पासून ४ पर्यंत जातो.त्यामुळे ग्रह ज्यावेळेस सूर्याजवळ असेल त्यावेळेस त्याचा वेग जास्त असतो.हे दोनही नियम त्याने १६०१ मध्ये शोधून काढले.१६१८ मध्ये त्याने शोधून काढलेला तिसरा नियम ग्रहांचे सूर्यापासूनचे अंतर आणि ग्रहाला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी लागणारा कालावधी यांच्यातील संबंधावर आधारित आहे.

तिसऱ्या नियमाप्रमाणे ग्रहांच्या सूर्यापासूनच्या अंतराचा वर्ग आणि त्यांच्या प्रदक्षिणाकाळाचा घन हे नेहमी प्रमाणात असतात.याच केप्लरच्या नियमांमुळे न्यूटनला गुरुत्वाकर्षणाची सिद्धता तपासून पाहता आली.पृथ्वीवर राहून दुसऱ्या ग्रहांच्या कक्षेबद्दलचे नियम केवळ निरीक्षणावरून शोधून काढण्यासाठीची केप्लरची कल्पनाशक्ती आणि शोधकता किती प्रगल्भ असेल याची कल्पना येते.


३ डिसेंबर २०२२ मधील लेखाचा पुढचा भाग..

३/१२/२२

टायको ब्राहे Tycho Brahe (१४ डिसें. १५४६ - २४ ऑक्टो. १६०१)

कोपर्निकसच्या मृत्यूनंतर तीन वर्षांनी आणखी एका खगोलवैज्ञानिकाचा प्रवेश झाला.तो म्हणजे टायको ब्राहे.डेन्मार्कचा राजा फ्रेड्रिक याच्या मदतीने टायकोने संशोधनास सुरुवात केली. कोपर्निकसच्या सिद्धांताला विरोध करणारा हा एक खगोलविंद,सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी फिरते असे सांगणाऱ्या कोपर्निकसकडे त्यावेळेस पुरावा नव्हता.पुराव्याशिवाय केलेले विधान हे गृहितकच मानले पाहिजे.ते सत्य म्हणता येणार नाही असे विज्ञान सांगते.


त्यामुळे ओसियांडरने कोपर्निकसच्या पुस्तकामध्ये केलेल्या प्रस्तावनेतील विधान आक्षेपार्ह म्हणता येणार नाही.


परंतु तसे मत असण्यामागची भूमिका चुकीची आहे.पृथ्वीकेंद्रित सिद्धांताला धार्मिक विचारवंतांनी पुरस्कृत करून प्रतिष्ठा मिळवून दिलेली होती.धर्मामध्ये जे सांगितलेले आहे त्याला विरोध करणे योग्य नाही ही भूमिका व्यवहार्य नाही.किंबहुना ती समाजाला घातकही आहे.


टायको ब्राहेने कोपर्निकसच्या सिद्धांताला विरोध धार्मिक दृष्टिकोनातून केलेला नव्हता तर तो स्वतः केलेल्या निरीक्षणावर आधारित होता. आकाशनिरीक्षणासाठी एक परिपूर्ण वेधशाळा त्याने डेन्मार्कमधील यूरानिबोर्ग येथे वसवली होती.


११ नोव्हें.१५७२ साली शर्मिष्ठा तारकासमूहातून झालेल्या तारकास्फोटाच्या त्याने केलेल्या नोंदी आजही खगोल अभ्यासकांना उपयुक्त ठरत आहेत.त्या तारका स्फोटाला 'टायकोचा सुपरनोव्हा' असे संबोधले जाते.


टायकोच्या मताप्रमाणे सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना स्पष्ट दिसत असताना,सूर्य स्थिर आहे हे कोपर्निकस कशाच्या आधाराने म्हणू शकतो ? कोपर्निकसच खरे तर चुकीचा आहे हे ठरविण्यासाठी त्याने ग्रह ताऱ्यांच्या असंख्य नोंदी ठेवल्या.त्या निरीक्षणावरून गणिताच्या मांडणीतून'एक दिवस कोपर्निकसला खोटा ठरवेन' हा आत्मविश्वास त्याच्याकडे होता. गणिताच्या मांडणीसाठी त्याने जोहानस केप्लरला मदतनीस म्हणून घेतले.नवतारा, धूमकेतू,वेधसाधने इ. विषयावर टायकोने विपुल लेखन केले असून त्याचे 


समग्र लिखाण १५ खंडामध्ये प्रसिद्ध झालेले आहे. 


निरीक्षणसामग्री आणि टायकोचा अनुभव याचा फायदा होईल या उद्देशाने केप्लरने तऱ्हेवाईक आणि भांडखोरवृत्तीच्या टायको बरोबर जुळवून घेत आपले संशोधनाचे काम सुरु ठेवले. 


वर्षभरात टायकोचे निधन झाले.पण मृत्यूसमयी केप्लरकडून आश्वासन घेतले की निरीक्षण करून कोपर्निकसला एक दिवस चूक ठरवेनच.


१ डिसेंबर २०२२ लेखामधील पुढील भाग..




१/१२/२२

जाणून घेऊ शास्त्रज्ञांचा प्रेरणादायी व अलौकिक जीवन प्रवास..

ॲरिस्टॉटल Aristotle (इ. स. पूर्व ३८४-३२२) ॲरिस्टॉटल इसवीसनापूर्वी होऊन गेलेला एक फार मोठा ग्रीक तत्त्ववेत्ता होता.जगज्जेत्ता राजा ओळखल्या गेलेल्या 'अलेक्झांडर द ग्रेट' चा ॲरिस्टॉटल गुरू,सृष्टीचे निरीक्षण करणे आणि तर्कशास्त्र,तत्त्वज्ञान,नीतिशास्त्र,राजकारण अशा विविध विषयावर आपले विचार मांडण्याचे महत्त्वाचे काम ॲरिस्टॉटल करत होता.आपल्या शौर्याच्या जोरावर जग जिंकायला निघालेल्या या अलेक्झांडर राजाने बहुतांश ठिकाणी प्रभुत्व मिळविलेले होते.अशा या जगज्जेत्त्या राजाचा गुरूसुद्धा महानच असला पाहिजे हा विचार सर्वसामान्यांच्यात दृढ झालेला होता. अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर त्याचे राज्य शतकभरसुद्धा टिकले नाही.पण ॲरिस्टॉटलच्या विचाराने मात्र सोळाव्या शतकापर्यंत आपले वर्चस्व अबाधित राखले.विचारांमध्ये किती सामर्थ्य आणि ताकद असते हे इतिहासाने वेळोवेळी दाखवून दिलेले आहे.अर्थात तो विचार योग्य असो अथवा अयोग्य…!


क्लॉडियस टॉलेमी Claudius Ptolemy

 (इ. स.१२७ ते १६८)


इसवीसनानंतर ज्या खगोलशास्त्रज्ञाने आपल्या सिद्धांताचा ठसा सोळाव्या शतकापर्यंत उमटवला त्याचे नाव क्लॉडियस टॉलेमी,टॉलेमीने 'अल्मागेस्ट' नावाच्या पुस्तकामध्ये पृथ्वीकेंद्रित सिद्धांत मांडलेला होता.पृथ्वी स्थिर आहे आणि पृथ्वीभोवती सूर्यासहित सर्व विश्व फिरत आहे हाच त्या सिद्धांताचा गाभा..


दुसऱ्या शतकात मांडलेल्या या सिद्धांताने सोळाव्या शतकापर्यंत न अडखळता मजल मारलेली होती.धर्माचे अधिष्ठान पृथ्वीकेंद्रित सिद्धांताला मिळाल्यामुळे विरोध करण्याचे अथवा तपासण्याचे सामर्थ्य सर्वसामान्यांच्यात नव्हते.भूगोलविषयक आठ पुस्तके टॉलेमीने लिहिली आहेत.तसेच माहीत असलेल्या स्थळांचे बिनचूक नकाशेही त्याने तयार केले होते.


आज आपण आनंदी,सुखी,आयुष्य जगत आहोत.हे सुखी आयुष्य जगत असताना अनेक ज्ञात अज्ञात महान लोकांनी आश्चर्यकारक,प्रेरणादायी,सर्वोच्च असे जीवन जगून आपल्याला सुखाच्या सावली प्रदान केली.त्या सर्वांचा जीवन प्रवास जाणून घेत असताना.

आपण जर दुःखात असलो,तर त्या दुःखाचे रूपांतर सुखात होते व आपण जर सुखात असलो तर सुखाचे रूपांतर दुःखात होते.हे सर्व जाणून घेत असतानाच मनापासूनच अचंबित,अलौकिक व अविस्मरणीय भावना व्यक्त व प्रकट होतात.


निकोलस कोपर्निकस,सॅमोसचा ॲरिस्टार्कस,

ॲरिस्टॉटल,क्लॉडियस टॉलेमी,टायको ब्राहे,जोहानर केप्लर,गॅलिलेई गॅलेलियो,फिलीपो ब्रूनो,आयझॅक न्यूटन,अल्बर्ट आईन्स्टाईन,आर्यभट्ट,वराहमिहीर,ब्रह्मगुप्त,

भास्कराचार्य,डॉ.सुब्रह्मण्यम चंद्रशेखर,डॉ.जयंत नारळीकर यांच्या बद्दल जाणून घेणार आहोत.

(सफर विश्वाची - डॉ.नितीन शिंदे,नाग-नालंदा प्रकाशन)


१४.१०.२०२२ रोजी ॲरिस्टार्कस,२१.११.२०२२ रोजी निकोलस कोपर्निकस,यांचा जीवन प्रवास समजून घेतलेला आहेच.उर्वरित या लेखामधून पुढे जाणून घेवू.


क्रमशः