* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१९/१२/२२

येमेडोड्डीचा नरभक्षक.. थरारक शिकार कथा..

म्हैसूर प्रांतातल्या कडूर जिल्ह्यामध्ये,येमेडोड्डीचं जंगल येतं.'बाबाबुडान' नावानं ओळखल्या जाणाऱ्या साडेसहा हजार फूट उंच पर्वतराजीच्या पूर्वेकडे पसरलेल्या डोंगररांगा या येमेडोड्डीच्या जंगलाच्या सभोवती आहेत.याच्या सीमेवर 'मडुक' नावाचं चहुबाजूंनी जंगलानं वेढलेलं एक अतिशय सुंदर सरोवर आहे.या सरोवरापासून पाण्याचा एक अरुंद पाट निघून,तेवढ्याच अरुंद जंगलवाटेसोबत ईशान्येकडे दहा मैल जाऊन, बिरूर नावाच्या एका छोट्या शहराच्या उत्तरेला तीन मैलांवरच्या एका छोट्या तलावाला मिळतो.


ह्या सर्व परिसरात वन्य प्राण्यांचं अस्तित्व खूप मोठ्या प्रमाणावर आहे,इथे गाईगुरांचे कळपही बरेच आहेत.

त्यांना सकाळी चरायला नेऊन संध्याकाळी परत आणलं जातं.असं असल्यावर इथे भरपूर वाघ नसतील, तरच नवल. इथे मुबलक आढळणारी रानडुकरं,सांबर व चितळ हे खरं वाघाचं मुख्य खाद्य,परंतु शिकारीपेक्षा गुरांना मारणं सोपं असल्यानं हे वाघ कालांतरानं गुरांची शिकार करू लागतात,आणि वाघ गुरं मारणारच,म्हणून गुराखीही फारशा गांभीर्यानं त्याची दखल घेत नसत.


 दररोज एखादी तरी गाय किंवा बैल मारला जायचा.

बिबळे वासरं,शेळ्या आणि गावातली कुत्री मारायचे.बिरूर गावातली ही नित्याचीच बाब होती.


वाघांपेक्षा बिबळे संख्येने कमी होते व वाघांच्या भीतीनं,ते वाघांचं वास्तव्य असलेल्या ठिकाणी न राहता,सहसा गावाच्या वेशीच्या आसपासच असायचे.


१९४६ च्या सुरुवातीला एक लहान नर वाघ इथे दिसू लागला.संध्याकाळी गाईगुरं परत येताना, बिरूरच्या वेशीवरच,त्यानं वासरं,शेळ्या,मेंढ्या उचलायला सुरुवात केली.


वाघ जनावरं मारताना त्यांची मान मोडतात,

कधीकधी मोठ्या आकाराचे बिबळे,ज्यांना स्थानिक भाषेत 'तेंदू' म्हणून ओळखलं जातं,तेही याच पद्धतीनं शिकार करतात,त्यामुळे हे काम बिबळ्याचंच असावं असा समज होता परंतु एकदा एका जवान गाईला मारताना त्याला एका गुराख्यानं पाहिलं आणि तो वाघच असल्याचं स्पष्ट झालं.


हा वाघ कुठल्याही देशी किंवा विदेशी शिकाऱ्याच्या गोळीला बळी न पडता झपाट्यानं वाढत गेला,

त्याचबरोबर तो अधिकच धाडसी आणि धूर्त बनला.

पुढच्या अठरा महिन्यांत त्यानं दर आठवड्याला दोन किंवा कधीकधी तीन गुरं मारली.हा तिथल्या गुराख्यांची मोठी डोकेदुखी होऊन बसला होता.


ह्या वाघाच्या उपद्रवाच्या बऱ्याच बातम्या माझ्यापर्यंत पोहोचल्या होत्या.१९४८ सालच्या अखेरीस माझा मित्र आल्फी रॉबर्टसन लवकरच इंग्लंडला परत जाणार होता.

त्याला भारतातील एक आठवण म्हणून वाघाचं एखादं कातडं मिळालं तर हवं होतं.आम्ही बिरूरला काही दिवस राहिलो,तर त्या उपद्रवी वाघालाही मारता येईल आणि आल्फीला कातडंपण मिळेल असा विचार करून मी मित्रांबरोबर - येमेडोड्डीला जायचं ठरवलं.


बंगलोरहून आम्ही निघालो.आम्हाला १३४ मैल अंतर जायचं होतं.त्या दिवशी नेमका मला ऑफीसमधून निघायला वेळ लागला आणि आम्ही संध्याकाळी उशिरा निघालो.रस्ते बरेच खराब होते.बंगलोरपासून ८६ मैलांवर तिपतूर इथे आमच्या गाडीला एक अपघात झाला. आम्ही माझ्या मित्राच्या गाडीनं जात होतो, गाडीही तोच चालवत होता.एका सपाटशा दगडावरून गाडीचं चाक गेलं,ते दगडाच्या पुढच्या भागावरून जाताना त्याचा मागचा भाग उचलला गेला आणि गाडीच्या मागच्या बाजूला असलेल्या पेट्रोलच्या टाकीवर तो खाड्कन आपटून टाकीला चांगली नऊ इंचांची चीर गेली. टाकीतलं आठ गॅलन पेट्रोल गळून रस्त्यावर सांडलं आणि गाडी जागेवर बंद पडली. आमच्याजवळ जादाचं पेट्रोल नव्हतं,पण प्रायमस स्टोव्ह होता आणि त्याला लागणाऱ्या पॅराफिन तेलाच्या दोन बाटल्या होत्या,शिवाय फुटपंपही होता.आम्ही त्या पंपाच्या नळीचं एक टोक एका बाटलीत घातलं, तोंडानं दुसऱ्या टोकातून तेल ओढून घेत ते कॉरबुरेटरला जोडलं व गाडी चालू करून तिपतूरमध्ये पोहोचलो.तिथे किरकोळ दुरुस्ती करणारा एकच माणूस होता.त्याला आम्ही उठवलं.एका घराबाहेर आम्हाला एक पॅराफिनचा रिकामा डबा मिळाला.त्या डब्याच्या पत्र्यानं त्या पेट्रोलच्या टाकीची चीर आम्ही झाकून दुरुस्त करून घेतली.तिपतूरच्या एकमेव पेट्रोलपंपापर्यंत गाडी ढकलत नेल्यावर आम्हाला कळलं,की तिथलं पेट्रोल संपलं आहे आणि नवीन साठा दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत येईल.आम्ही चांगलेच अडकलो होतो.दुसरा पंप सोळा मैलांवरच्या आर्सीकेरी गावात होता.तिथपर्यंत जाण्यापुरतं पेट्रोल मागायला आम्ही एकदोन ट्रक ड्राइव्हरनाही उठवलं.त्यांना अवाच्यासवा पैसेही देऊ केले, पण "आमच्याही गाड्यांमधलं पेट्रोलही संपलंय आणि आम्ही पण उद्या येणाऱ्या पेट्रोलच्या गाडीची वाट बघतोय," असं त्यांनी आम्हाला सांगितलं.


आता मात्र आम्ही आमची सदसद्विवेकबुद्धी, चांगुलपणा गुंडाळून ठेवला.आम्ही तो मघाचचा डबा आणि एक रबरी नळी घेतली आणि तिपतुरच्या निद्रिस्त रस्त्यांवरून लपतछपत निघालो.एका गल्लीत आम्हाला एक फोर्ड गाडी उभी दिसली.त्या गाडीचा मालक जागा झाल्यास त्याच्यावर नजर ठेवायला मी आल्फीला सांगितलं आणि आवाज न करता हळूच त्या गाडीच्या पेट्रोलच्या टाकीचं झाकण उघडलं. रबरी नळीचं एक टोक टाकीत घालून दुसऱ्या टोकातून तोंडानं पेट्रोल ओढून मी ते माझ्या मांडीत धरलेल्या डब्यात जमा केलं.असं पुन्हा एकदा करून जमा झालेलं पेट्रोल घेऊन आम्ही घाईनं गाडीशी आलो.पेट्रोल आणि उरलेलं पॅराफिन एकत्र करून आम्ही गाडी सुरू केली आणि आसंकिरीला आलो.


या सगळ्या गोंधळामुळे बिरूरला पोचायला आम्हाला सकाळचे साडेसात वाजले.गावातून आम्ही जंगलाच्या दिशेनं साधारण दोन मैल गेलो असू,रस्त्याच्या कडेला लागून असलेल्या एका मोकळ्या जागेत आम्हाला बरीच गिधाडं जमलेली दिसली.माझा मित्र फोटो काढू लागला, तोपर्यंत मी ती गिधाडं जमण्याचं कारण बघायला गाडीतून उतरलो.एक तरुण बैल तिथे मरून पडला होता.


त्याच्या गळ्यावरच्या सुळ्यांच्या खुणा बघून,हे काम बिबळ्याचं आहे,हे स्पष्ट होतं.त्याच्या मानेचे मणके मोडलेले असते,तर तो वाघानं घेतलेला बळी आहे,असं नक्की झालं कारण 


वाघांची जनावर मारायची पद्धत तशी असते.

दुसरं म्हणजे बैलाच्या पोटाकडचा भाग खाल्लेला होता आणि आतडी तशीच आत होती.म्हणजे बैलाला बिबळ्यानंच मारलं होतं.वाघ स्वच्छतेचे भोक्ते असतात.खाणं सुरू करायच्या आधी ते जनावराच्या पोटातील घाण खाण्यात मिसळू नये म्हणून,त्याचा मागचा भाग फाडून त्याची आतडी काढून ती दहाएक फूट अंतरावर नेऊन ठेवतात.


इतक्या लगेच आमचं नशीब उघडलं,म्हणून आम्ही खूश झालो.गिधाडांपासून संरक्षण करण्यासाठी रस्त्याच्या कडेच्या झुडुपांमधून आम्ही काही फांद्या तोडून तो मेलेला बैल झाकला आणि त्या झुडुपांमध्येच आम्हाला लपून बसता येईल,अशी एक छान जागा तयार केली. आता संध्याकाळी हा बिबळ्या नक्की सापडेल आणि गाडीमुळे रात्री झालेल्या त्रासाची भरपाई होईल,या विचारानं आल्फीलाही बरं वाटलं.


तिथून काही अंतरावर जाऊन आम्ही खाल्लं. रात्री जागरण करायचं असल्यानं झोप काढली. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आम्ही त्या मेलेल्या बैलाशी आणि आम्ही केलेल्या लपणाशी आलो. त्या बैलावर झाकून ठेवलेल्या फांद्या आम्ही बाजूला केल्या.आल्फी रायफल,

टॉर्च,पाण्याची बाटली आणि ब्लॅकेट घेऊन लपणात शिरला.मी गाडी घेऊन बिरूरला परत जायच्या बेतात होतो, तेवढ्यात एक गुराखी धापा टाकत तिथे आला आणि अर्ध्या तासापूर्वी,मैलभरापेक्षा कमी अंतरावर,

वाघानं आपली दुभती गाय मारल्याची खबर त्यानं दिली.


वाघाला मारून त्याचं कातडं मिळवायचं,का बिबळ्याला मारून त्याचं - हा निर्णय मी आल्फीवर सोपवला.आम्ही केलेली तयारी बघता बिबळ्याला नक्की मारता येणार होतं,वाघाला मारता येईलच याची खात्री नव्हती;परंतु आल्फीनं वाघाला मारायचं ठरवलं.आम्ही लपण करायला वापरलेलं सर्व साहित्य काढून गाडीत भरलं आणि वेगानं गाडी चालवत निघालो. जाताना त्या गुराख्यालाही आम्ही सोबत घेतलं. त्यानं सांगितलेल्या ठिकाणी गाडी थांबवून आम्ही गाडीतलं लपणाचं सर्व साहित्य बरोबर घेतलं आणि गाय जिथे मारली होती,तिथे चालत निघालो.


आम्हाला फार लांब जायला लागलं नाही. जेमतेम तीन फर्लांगावर ती मेलेली गाय पडली होती.तिची मान मोडली होती आणि नाकातून अजूनही फेसाचे बुडबुडे येत होते.गुराख्यामुळे किंवा गाईंबरोबर जवळच चरत असलेल्या म्हशींमुळे असेल,वाघ एक लचकाही न तोडता निघून गेला होता.


सहा वाजले होते व झपाट्यानं अंधार पडू लागला होता.दुर्दैवानं जवळपास एकही झाड किंवा लपून बसता येईल अशी जागा नव्हती. आमच्यापुढे दोनच पर्याय होते.एकतर गाईला इथंच सोडून परत जायचं,नाहीतर जमिनीवरच कुठेतरी बसून,वाघ परत येईल,तेव्हा त्याच्यावर गोळी झाडायची जोखीम पत्करायची.


आल्फीला काहीही करून इथेच थांबायचं होतं. शेवटी आम्ही गुराख्याच्या मदतीनं आजूबाजूच्या काही फांद्या व आमच्याजवळचं साहित्य घेऊन एक ओबडधोबड लपण तयार केलं आणि साडेसहा वाजता आम्ही सगळेच त्यात घुसलो.


आता जवळजवळ पूर्ण अंधार पडत आला होता. पंधरा मिनिटांतच पंचवीस यार्डावरची ती मेलेली गाय दिसेनाशी झाली.अमावस्येची अंधारी रात्र होती.चांदण्यांच्या मंद प्रकाशात आम्हाला अगदी जवळचंच,जरा जरा दिसत होतं;पण गाय मात्र दृष्टीस पडत नव्हती.


एक तास गेला आणि साधारण अर्ध्या मैलावरून एका कोल्ह्याची कोल्हेकुई ऐकू आली.तो विचित्र आवाजात ओरडत होता.कोल्हे सहसा टोळीनं गावाच्या किंवा शहराच्या वेशीजवळ आढळतात. रात्री ते वस्तीत शिरून,काही खायला मिळतंय का,हे बघतात.रात्री होणारी त्यांची कोल्हेकुई सर्व भारतीयांना ओळखीची आहे.


असा एकटा फिरणारा कोल्हा मात्र,जरा वेगळ्या आवाजात ओरडतो.अशा एकट्या कोल्ह्याबाबत बरंच काही लिहिलं गेलं आहे आणि बरेच काही समज,आख्यायिका,अंधश्रध्दा आहेत.यातल्या दोन महत्त्वाच्या समजांपैकी एक म्हणजे - हा कोल्हा वाघ किंवा बिबळ्या,जास्त करून वाघाबरोबर असतो तो आपल्या विचित्र ओरडण्यानं वाघाला शिकार कुठे असेल,याची जाणीव करून देतो व त्याचा मोबदला म्हणून, वाघाचं खाणं झाल्यावर,त्यातला वाटा मिळवतो.


 दुसरा समज म्हणजे - एका ठरावीक वाघाबरोबरच हा जोडी जमवतो.त्याच्यापासून सुरक्षित अंतरावर राहात तो आपल्या खाण्याची सोय करतो.यातलं काहीही खरं असलं तरी, एका कोल्ह्याची कोल्हेकुई म्हणजे वाघ किंवा बिबळ्या जवळपास असल्याचं चिन्ह आहे,हा अनुभव मी भारतातल्या अनेक जंगलांमध्ये घेतला आहे.


म्हणून त्या रात्री तो कोल्हा ज्या पद्धतीनं ओरडला,

त्यावरून आम्हाला गाईला मारणाऱ्या वाघाची वर्दी मिळाली.त्यानंतर दहाच मिनिटं गेली असतील,त्या गाईच्या पलीकडच्या बाजूनं 'ओऊंघ' 'ओऊंघ' असा वाघाच्या ओरडण्याचा आवाज आला. वाघ खरंच आला होता. मी आल्फच्या मांडीला हलकेच ढोसले,पण तोही तयारच होता.थोडा वेळ गेला आणि झुडुपात किंचित खसफस झाली. त्यापाठोपाठ एक धप्पसा व काहीतरी ओढल्याचा आवाज आला. 

 आल्फीने टॉर्चचे बटण दाबले,परंतु सभोवतालच्या अंधारात दुर्दैवानं टॉर्चचा प्रकाशझोत मेलेल्या गाईवर नेमका पडायच्या ऐवजी गाईच्या डावीकडे पडला.तेवढा इशारा त्या वाघाला पुरेसा होता.गुरगुर करत एका क्षणात तो उडी मारून झाडीत नाहीसा झाला.


वाघ आता परत येणार नव्हता आणि तिथे थांबणं व्यर्थ होतं,हे माहीत असूनही आम्ही तासभर तिथे थांबलो.

त्यानंतर मैलभर अंतरावरच्या डोंगराच्या माथ्यावरून आम्हाला वाघाच्या ओरडण्याचा अस्पष्टसा आवाज आला. आम्ही जरा निराश होऊन आवराआवर केली आणि गाडीपाशी आलो,तर आल्फीला गाडीची किल्लीच सापडेना.ती सापडेपर्यंत रात्रीची लिंगडहळ्ळीहून बिरूरला जाणारी बस आम्हाला ओलांडून पुढे गेली.

आम्ही तिच्यामागोमाग जात बिबळ्याला मारण्यासाठी जे लपण केलं होतं, तिथपर्यंत आलो.तेव्हा,समोर आम्हाला जे दृश्य दिसलं,ते पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो. बसच्या दिव्यांच्या उजेडात,आपण मारलेल्या बैलाला खात बसलेल्या बिबळ्याचे डोळे चमकत होते.बसच्या ड्रायव्हरनं ते पाहून करकचून ब्रेक मारत बस थांबवली.


बस थांबताना उडालेल्या धुरळ्यात मी आणि आल्फी गाडीतून खाली उतरून धावत बसच्या पुढे आलो.

आम्हाला तो बिबळ्या पलीकडचं शेत अर्ध ओलांडून जाताना दिसला.आल्फीनं गोळी झाडली. बिबळ्या जोरात 'गर्रर्र' आवाज करत हवेत उसळला आणि अतिशय वेगानं ते शेत ओलांडत नाहीसा झाला.


आम्ही चूक केली होती,पण आता त्याचा विचार करून काही फायदा नव्हता... आम्ही आल्फीला खाली उतरवून बसच्या मागोमाग गाडी घेऊन तिथून निघून जायला हवं होतं.दोन्ही गाड्या निघून गेल्याचं पाहून काही मिनिटातच तो बिबळ्या भक्ष्यावर परत आला असता आणि सहजपणे आल्फीच्या गोळीला बळी पडला असता.खरंतर माझ्याकडूनच योग्य सल्ला दिला गेला नव्हता आणि आता बिबळ्याही जखमी होऊन पळाला होता.ते अत्यंत धोकादायक होतं.


जे घडून गेलं,त्याचा जास्त विचार न करता आम्ही बिरूरला टूरिस्ट बंगल्यावर परत आलो. सकाळी उठून आम्ही परत त्या ठिकाणी गेलो.जरा आजूबाजूला हिंडून पाहिल्यावर आम्हाला एक पुसटसा रक्ताचा माग सापडला.


शेत संपून झुडुपांचं गचपण सुरू झालं,तसा रक्ताचा माग जास्त स्पष्टपणे दिसू लागला.पण आता आमच्यापुढे एक वेगळीच समस्या उभी राहिली.बिबळ्याच्या एका बगलेत गोळी लागली होती,त्यातून रक्त वाहू लागायला थोडा वेळ लागल्यानं सुरुवातीचा माग अस्पष्ट होता.


उर्वरीत कथा पुढील भागात.. ( अपुर्ण )


नरभक्षकाच्या मागावर - केनेथ अँडरसन

अनुवाद - संजय बापट


१७/१२/२२

अहो ! कसली पेनं विकताय ?

"हे पेन मी विकत घेतले,पण हे चालत नाही."

"त्याला मी काय करणार? "अहो,तुम्ही मालक आहात ना या दुकानाचे?मग हे पेन चालत नाही तर ती तुमची जबाबदारी नाही?"


"पेनबाबत कोणतीही गॅरंटी नाही हे मी तुम्हाला कालच सांगितले होते."

 "ते बरोबर आहे हो,पण म्हणून काय एकाच दिवसात…?"

"त्याला इलाज नाही. कारण पेन ही अशीच असतात."

"काय राव... मग कशाला विकताय असली पेनं?" 


ज्या काळामध्ये पहिल्यांदा पेन ही वस्तू बाजारात आली त्यावेळेस अशीच परिस्थिती होती.पेनं विक्रेत्याचे आणि ग्राहकाचे असेच संभाषण होत असे.अशाच एका दुकानामध्ये जॉर्ज नोकरीला होता. तो होता हिशेब वगैरे लिहायला.पण मधून मधून त्याला गिन्हाईकही बघावे लागे.कधी कधी तर गिन्हाईक अगदी तावातावाने येत असे.अशा वेळेस जॉर्ज ते पेन त्याला काही प्रमाणात दुरुस्त करून देत असे.खरं तर जॉर्जता हा छंद जडला होता. तो आपल्या फावल्या वेळेत खराब झालेली पेनं दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत असे. हे करता करता त्याला त्यातील काही त्रुटी आढळल्याही होत्या.त्यामुळे त्याला ही पेनं दुरुस्त करता येवू लागली होती. जॉर्जच्या या छंदामुळे लोकदेखील त्या दुकानातूनच पेन खरेदी करू लागले होते. कारण इतरत्र पेन खराब झाल्यास दुरुस्त करण्याची कोणतीही सोय नव्हती.


बघता बघता जॉर्जच्या मालकाचे दुकानही चांगले चालू लागले.आणि जॉर्जने पेन दुरुस्त करण्यामध्ये प्रावीणाही मिळवले.आता जॉर्जला पेनमध्ये कोणकोणत्या त्रुटी राहिल्या आहेत,हे पूर्णपणे कळले होते त्यामुळे त्याच्या मनामध्ये असे आले की आपण जाऊन पेन निर्माण करणाऱ्या कंपनीलाच ही गोष्ट सांगायची आणि जर त्यांनी मान्य केले तर त्यांच्याच कंपनीमध्ये नोकरीही मागायची.जॉर्ज या गोष्टीवर विचार करू लागला आणि एके दिवशी त्याच्या मनामध्ये एक वेगळाच विचार आला. आपल्याला आढळलेल्या सर्वं त्रुटी पेन निर्मात्यांना सांगण्याऐवजी आपणच जर उत्तम दर्जाचे पेन तयार करू शकलो तर ? या एका कल्पनेने जॉर्जची झोपच उडाली.आपण एक उत्तम दर्जाचे पेन निर्माण करू शकू हा त्याच्याजवळ विश्वास होता.पण त्यासाठी लागणारे भांडवल नव्हते.


पण जॉर्जने ठरविले की,आपण ही जोखीम घ्यायची.तो त्या दृष्टीने तयारीला लागला आणि स्वतःच्या आडनावाची 'पार्कर' कंपनी त्याने काढली.बघता बघता 'पार्कर' पेन जगप्रसिद्ध झाले आणि जॉर्ज पार्कर नावारूपाला आला. 


काय,एका सामान्य माणसाची ही गगनभरारी अचंबित करून टाकते ना? अहो,ही भरारी घेण्याची क्षमता तुमच्या-आमच्यातही आहे बरं का.पण आपण खरंच गांभीर्याने त्याकडे पाहत नाही.आता या जॉर्ज पार्करकडे असे कोणते गुण होते असे तुम्हाला वाटते?पहिली गोष्ट म्हणजे केवळ कामापुरते काम न करता अधिक काहीतरी करण्याची वृत्ती आणि मानसिकता असणे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. या वृत्तीलाच इंग्रजीमध्ये Initiative असे म्हणतात. 'इनीशिएटिव्ह' म्हणजे स्वत:हून स्वयंस्फूर्तीतून एखादी गोष्ट करण्याची वृत्ती.ही वृत्ती जॉर्जमध्ये होती.म्हणून त्याला कोणीही न सांगता त्याने आपण पेन दुरुस्त करू शकू काय,याचा विचार केला.जॉर्जकडे दुसरा महत्त्वाचा गुण होता आणि तो म्हणजे लोकांना काहीतरी उत्तम द्यायचे. अलीकडे आपली मानसिकता बदलत चालली आहे.म्हणूनच लोक पैसे मिळविण्यासाठी काहीही करतात.त्यामध्ये वेळप्रसंगी दुसऱ्याला फसवावे लागले तरी चालेल अशी वृत्ती ठेवतात. पण अशाप्रकारची वृत्ती काही कामाची नाही. कारण अशा वृत्तीचे लोक फार काळ टिकू शकत नाहीत.म्हणून जे लोक स्वतःच्या कामापासून ते आपण दुसऱ्याला देत असलेल्या गोष्टीपर्यंत दर्जाचा विचार करतात.त्यांना कधीही अपयश येत नाही.


पार्करमध्ये असलेला तिसरा महत्त्वाचा गुण म्हणजे जोखीम घेण्याची वृत्ती.या पुस्तकामध्ये हा गुण अनेक ध्येयवेड्यांमध्ये आपल्याला आढळून येईल.जर जॉर्जने त्याचा फॉर्म्युला एखाद्या पेन विक्रेत्याला विकला असता तर कदाचित त्याला त्यासाठी पैसेही मिळाले असते आणि त्या कंपनीमध्ये नोकरीही.पण जॉर्जने तसे केले नाही.कारण त्याला त्याच्या फॉर्म्युल्यामध्ये विश्वास होता आणि त्यामुळेच आपण आपल्याजवळ काही नसतानाही हे सुधारित पेन स्वतःच तयार करूया,अशी जोखीम तो घेऊ शकला.


अर्थात जॉर्जमधील गुण आपल्यामध्ये विकसित करण्यासाठी आपल्याला काही पेन दुरुस्त करण्याचे तंत्रच अवगत व्हायला पाहिजे असे नाही.आपण जे काम करतो त्यापेक्षा अधिक आणि वेगळे आपण करू शकतो काय,हे शोधले पाहिजे. एखाद्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीने त्याचे काम संपल्यावर जर समजा,

ॲक्युप्रेशरही पद्धती शिकायची ठरविली आणि जर त्यामध्ये तो तज्ज्ञ झाला तर लोक त्याच्याकडे आपोआप येऊ लागतील. 

अर्थात हे एक साधे उदाहरण मी तुम्हाला दिले. जर तुमच्यामध्ये नवीन काहीतरी करण्याची ऊर्मी असेल तर निश्चितपणे तुम्हाला काहीतरी शोधून काढता येऊ शकेल.त्याचप्रमाणे जॉर्जमध्ये असणारा दर्जादेखील तुम्ही तुमच्या कामामध्ये आणू शकता.


भरारी ध्येयवेड्यांची - डॉ.प्रदीप पवार

१५/१२/२२

गॅलिलेई गॅलिलिओ Galilei Galileo (१८ फेब्रु.१५६४ - ८ जाने.१६४२)

केप्लरचा समकालीन असलेला गॅलिलेई गॅलिलिओ एक बंडखोर वैज्ञानिक म्हणूनच उदयास आला.आधुनिक विज्ञानाचा तसेच प्रयोगशील विज्ञानाचा प्रणेता म्हणूनच त्याच्याकडे पाहिले जाते.


सूर्याभोवती पृथ्वी फिरते या कोपर्निकसच्या सिद्धांताचा पाठपुरावा गॅलिलिओने केला.त्यासाठी त्याने जो त्रास सहन केला तो कोपर्निकसच्या वाट्याला आला नाही.कारण कोपर्निकसचे पुस्तक तो मृत्यूशय्येवर असताना प्रसिद्ध झाले.त्यामुळे नंतरच्या वादाला त्याला तोंड द्यावे लागले नाही. 


गॅलिलिओ केवळ कोपर्निकसच्या सिद्धांताचा पाठपुरावा करून थांबला नाही,तर धर्माधिष्ठीत दृष्टिकोनातून आलेल्या विचारांना निरीक्षण आणि प्रयोगाच्या आधारे त्याने तपासायला सुरुवात केली.बहुसंख्य धर्माधिष्ठीत विचार इसवीसनापूर्वी होऊन गेलेल्या महान तत्त्ववेत्त्या ॲरिस्टॉटलचे होते.


ॲरिस्टॉटलच्या विचारपद्धतीमध्ये निरीक्षण आणि तर्काला वाव होता पण प्रयोगाला अजिबात स्थान नव्हते.नेमका हाच धागा पकडून गॅलिलिओने विश्वाबद्दलच्या परंपरेच्या ज्ञानाला अक्षरशः तडे दिले.


१८ फेब्रु.१५६४ रोजी इटलीतील पिसा येथे जन्मलेल्या या वैज्ञानिकाने पिसा विद्यापीठामध्ये वैद्यकीय अभ्यास सुरू केला.याच विद्यापीठात वयाच्या सव्वीसाव्या वर्षी गणिताचा अध्यापक म्हणून नंतर तो रुजूही झाला.१५९२ मध्ये त्याने पदुआ विद्यापीठात नोकरी पत्करली.पदुआ विद्यापीठात असताना तापमान मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणाचा अर्थात थर्मामीटरचा त्याने शोध लावला.


(गॅलिलिओ बहुसंख्यांकांना 'दुर्बिणीचा शोध लावणारा'अशी चुकीची माहिती आहे.त्याने थर्मामीटरचा शोध लावला हे माहीतच नाही.)


हॉलंडमधील चष्मे बनवणाऱ्या हॅन्स लिपरशेंनी दोन भिंगे एकासमोर एक धरून पाहिले असता दूरच्या वस्तू जवळ दिसू लागल्या.या भिंगांना त्यांनी नळकांड्यात बसवले आणि जगातील पहिल्या दुर्बिणीचा शोध सन १६०८ मध्ये लागला.जो लिपरशे यांनी आपल्या नावे केला. या दुर्बिणीचा वापर प्रामुख्याने जहाजावर दूरचे पाहण्यासाठी आणि युद्धाच्या वेळेस शत्रूसैनिकांची हालचाल पाहण्यासाठी केला जाऊ लागला.


गॅलिलिओला दुर्बिणीच्या शोधाची बातमी कळाल्यानंतर त्याने स्वतःची दुर्बिण तयार करायला सुरुवात केली आणि १६०९ मध्ये स्वतःची एक दुर्बिण विकसित केली.आपली दुर्बिण पृथ्वीवरच्या वस्तू पाहण्यापेक्षा त्याने आकाशाकडे रोखली.आकाशात दिसणारा सर्वात मोठा गोल,चंद्र त्याने आपल्या दुर्बिणीच्या क्षेत्रात घेतला.चंद्राचे निरीक्षण करायला त्याने सुरुवात केली.आणि काय आश्चर्य ! उघड्या डोळ्यांनी अत्यंत सुंदर आणि मोहक दिसणाऱ्या चंद्राचा पृष्ठभाग त्याला खडबडीत दिसला.चंद्रावरील खड्डयांचे,डोंगर दऱ्यांचे निरीक्षण त्याने वारंवार केले.चंद्राच्या निरीक्षणातून जे दिसले त्याची रेखाटने त्याने काढली.आज आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून फोटोग्राफी केली तर चंद्रावर दिसणारे खड्डे आणि गॅलिलिओचे रेखाचित्र प्रचंड साम्य दर्शविते. 


यावरून गॅलिलिओची निरीक्षणक्षमता किती प्रगल्भ होती याची प्रचिती येते.आकाशात चांदण्यांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत सुंदर दिसणारा चंद्र ओबडधोबड आहे.ही कल्पना धर्माधिष्ठीत विचारसरणीला मान्य होण्यासारखी नव्हती.पण वस्तुस्थिती मात्र तशीच होती.


गॅलिलिओने नंतर आपली दुर्बिण गुरू ग्रहाकडे रोखली.दि. ७ ते २४ जाने.१६१० अखेर गुरू ग्रहाचे त्याने निरीक्षण केले.सुरुवातीला त्याला गुरुभोवती तीन चांदण्या दिसल्या.त्या चांदण्या रोज आपली जागा बदलत असल्याचे त्याच्या निदर्शनास आले.दरम्यान १४ तारखेनंतर चौथी चांदणी त्याच्या दृष्टीपथात आली. या सर्व चांदण्या गुरू ग्रहाभोवती फिरत असल्याचे त्याचे निरीक्षण सांगत होते.गॅलिलिओने त्यांना गुरूचे उपग्रह म्हणून संबोधले.


गुरूच्या या चार उपग्रहांचा शोध गॅलिलिओने लावला.म्हणूनच गुरुच्या या चार उपग्रहांना 'गॅलिलियन उपग्रह' असे नाव मिळाले.आयो, युरोपा, गैनिमीड आणि कॅलिस्टो हेच ते गुरूचे सर्वात मोठे चार उपग्रह.


आज आधुनिक तंत्रज्ञानाने मानवाला ज्ञात असलेले जवळजवळ ६३ उपग्रह गुरूला आहेत. म्हणजे ६३ चंद्र गुरू ग्रहाला आहेत.पृथ्वीला एकच उपग्रह की जो चंद्राच्या रुपाने फिरत आहे.पृथ्वीला एकच चंद्र आहे म्हणून तर संकष्टी महिन्यातून एकदा येते.आपण जर गुरू ग्रहावर असतो तर महिन्यातून ६३ संकष्ट्या कराव्या लागल्या असत्या.एक संकष्टी सोडेपर्यंत दुसरी आणि दुसरी सोडेपर्यंत तिसरी अशा ६३ संकष्टया.आपण तरी एवढ्या संकष्ट्या केल्या असत्या का?याचा एकविसाव्या शतकात करणार नाही तर केव्हा करणार? संकष्टी सोडण्याच्या वेळेस चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राला ओवाळून जेवतात.चंद्राचा उगवण्याचा आणि जेवणाचा काय संबंध? इतर दिवशी चंद्र उगवत नाही का ?चंद्र रात्री १२ वाजता उगवत असता तर जेवायचे थांबला असता का ? या प्रश्नांची उत्तरे आपण शोधायची नाही तर काय युरोपियन देशांनी ? गॅलिलिओ यानाने सन १९८९ रोजी गुरू ग्रहाच्या दिशेने मार्गक्रमण केले.सन १९९५ रोजी गुरू ग्रहाभोवती फिरून गॅलिलिओ यानाने त्या महान खगोल वैज्ञानिकाला सलाम ठोकला.. 


नंतर गॅलिलिओने शुक्र ग्रहाच्या निरीक्षणाला सुरुवात केली.दुर्बिणीतून शुक्राला पाहिल्यावर चंद्रासारख्याच कला त्याला दिसल्या.शुक्राच्या कलांचे निरीक्षण केल्यावर गॅलिलिओच्या लक्षात आले की शुक्र सुद्धा सूर्याभोवती फिरत असला पाहिजे.


गॅलिलिओने आपली दुर्बिण नंतर तळपणाऱ्या सूर्याकडे रोखायला सुद्धा मागेपुढे पाहिले नाही.निरीक्षणाची आवड निर्माण झाल्यानंतर व्यक्ती ध्येयाने प्रेरित होऊन कशी काम करत राहते याचे गॅलिलिओ हे एक उत्तम उदाहरण आहे. 


दुर्बिणीतून सूर्याचे निरीक्षण केल्यानंतर त्याला सूर्याच्या पृष्ठभागावर काळे डाग असल्याचे दिसले.


ज्या सूर्याला धर्माने देवत्व बहाल केलेले होते,त्या सूर्यावर काळे डाग आहेत हे सांगणे किती धाडसाचे असेल याची कल्पना करा.गॅलिलिओने ते जाहीरपणे सांगायचे धाडस केले.आजही एकविसाव्या शतकात सत्य सांगायचे धाडस आपण किती करतो याचे आत्मपरिक्षण केले तर गॅलिलिओच्या महानतेची कल्पना येते.


प्रस्थापित समजुतींना त्याने फारच मोठा धक्का या सर्व निरीक्षणाच्या माध्यमातून दिलेला होता.निरीक्षणे कशी करायची असतात याचा परिपाठच गॅलिलिओने नंतरच्या वैज्ञानिक जगताला घालून दिलेला होता.


खगोलातील या सर्व निरीक्षणावर आधारित 'दि स्टारी मेसेंजर' (The Starry Messenger) हे पुस्तक गॅलिलिओने मार्च १६१० मध्ये प्रसिद्ध केले.या पुस्तकाच्या प्रतीसुद्धा हातोहात खपल्या. या पुस्तकामुळे खगोलशास्त्राला मोठी चालना मिळाली.गॅलिलिओ प्रसिद्धीच्या झोतात आला.गॅलिलिओची व्याख्याने ऐकण्यास ठिकठिकाणी प्रचंड गर्दी होऊ लागली.


गॅलिलिओ केवळ खगोलाची निरीक्षणे करून थांबला नाही तर त्याने इतर दैनंदिन व्यवहारातही आपली कल्पनाशक्ती वापरली.तो ज्यावेळेस चर्चमध्ये प्रार्थनेला जात असे त्यावेळेस त्याला तिथे एक झुंबर हलत असलेले दिसे.हलत असलेल्या झुंबरावरून त्याच्या लक्षात आले की झुंबराला एका ठिकाणापासून त्याच ठिकाणी परत येण्यासाठी लागणारा कालावधी सारखाच आहे.घरातील दिवा त्याने त्याच पद्धतीने पाहिला आणि निरीक्षणे नोंदवली.दिव्याचा दोलनकाळ हा दिव्याच्या वस्तुमानावर नसून त्याच्या लांबीवर अवलंबून आहे,हा निष्कर्ष त्याने काढला.ज्या काळात वेळ मोजण्यासाठी घड्याळासारखे साधन उपलब्ध नव्हते त्या काळात त्याने लंबकाच्या घड्याळाचे तत्त्व शोधून काढले


त्यानंतर हायजीन या शास्त्रज्ञाने लंबकाची घड्याळे शोधून काढली.लंबकाची घड्याळे १९९० पर्यंत घराघरामध्ये टांगलेली असायची. 


म्हणजे गॅलिलिओ घराघरात पोहोचला होता. फक्त त्याच्या विचारांनी लोकांच्या मनात घर केलं नाही हाच काय तो फरक.


इटलीमधील चर्चमध्ये टांगलेला लँप ऑफ गॅलिलिओ आजही त्या महान वैज्ञानिक तत्त्वाची आठवण करून देत आहे.


तर्क लढवून निष्कर्ष काढण्याच्या प्रचलित असलेल्या ॲरिस्टॉटलच्या पद्धतीला गॅलिलिओने प्रयोगाच्या रूपाने छेद दिला.वैज्ञानिक दृष्टिकोनातील प्रयोगाचे महत्त्व सांगणाऱ्या पिसाच्या झुकत्या मनोऱ्यावरील त्याचा प्रयोग सर्वसामान्यांना अचंबित करणारा ठरला.


ॲरिस्टॉटलसहीत सर्वसामान्यांची अशी धारणा होती की,समान उंचीवरून दोन वेगवेगळ्या वजनाच्या वस्तू खाली सोडल्या तर जास्त वजनदार वस्तू लवकर जमिनीवर पोहचेल.गॅलिलिओने या विचाराचा छडा लावायचे ठरवले.


इटलीतील पिसाच्या झुकत्या मनोऱ्यावर तो गेला.एका मदतनीसाच्या जवळ त्याने दोन वेगवेगळ्या वजनांच्या वस्तू दिल्या आणि इटलीवासियांना मनोऱ्याखाली जमायला सांगितले.इशारा मिळताच दोन्ही वस्तू मदतनीसाने एकाच वेळी सोडल्या.ॲरिस्टॉटलला चूक ठरवत गॅलिलिओने प्रयोगाच्या सहाय्याने स्वतःचे विधान प्रचलित केले


'असमान वजनांच्या वस्तूंना खाली येण्यासाठी लागणारा वेळ सारखाच असतो.' 


प्रयोगाचे महत्त्व हे निर्विवाद आहे.प्रयोगच सत्याचा पुरावा देऊ शकतात हे गॅलिलिओने सिद्ध करून दाखवले.

वैज्ञानिक दृष्टिकोनातील एक महत्त्वाचे वैशिष्ट्य गॅलिलिओने अधोरेखित केले.गॅलिलिओने नंतर खाली पडणाऱ्या वस्तूंचा वेग क्रमशः वाढत जातो हेही सिद्ध करून दाखविले.


या संशोधनाबरोबरच ज्या वादात गॅलिलिओला धर्मपीठाकडे जावे लागले तो वाद होता टॉलेमीचा पृथ्वीकेंद्रित आणि कोपर्निकसचा सूर्यकेंद्रित सिद्धांत यांच्या दरम्यानचा.सन १६१३ पासून गॅलिलिओने कोपर्निकसच्या सूर्यकेंद्रित सिद्धांताचा पुरस्कार करायला सुरुवात केली. ठिकठिकाणी तो या विषयावर भाषणे देत सुटला.


७ फेब्रु.१६१४ ला एका धर्मगुरूने रोमच्या कार्डिनल मिलिनोला पत्र लिहिले.'पृथ्वी स्थिर नाही'असे धर्मविरोधी वक्तव्य गॅलिलिओ करतो अशी तक्रार त्याने केली. 


बायबल या धर्मग्रंथात ज्या गोष्टीला अधिष्ठान प्राप्त झालेले होते,त्या टॉलेमीच्या पृथ्वीकेंद्रित सिद्धांताला गॅलिलिओ विरोध करत होता.धर्माला ही बाब निश्चितच खटकणारी होती.धर्मसंस्थेला ही बाब ढवळाढवळ वाटली.१६१६ मध्ये गॅलिलिओला ख्रिश्चन धर्मगुरू पोपनी धमकी दिली आणि सांगितले की सूर्यकेंद्रित सिद्धांताचा पुरस्कार करू नकोस.धमकी मिळूनसुद्धा गॅलिलिओने जाहीर सभांमध्ये सूर्यकेंद्रित सिद्धांताचा पुरस्कार सुरुच ठेवलेला होता.सन १६३२ मध्ये त्याने 'सूर्यकेंद्रित सिद्धांत आणि पृथ्वीकेंद्रित सिद्धांत या दोन सिद्धांतामधील द्वंद्व' (Dialogue concerning the two chief world systems) या नावाचे पुस्तक प्रसिद्ध केले. सदर पुस्तकामध्ये त्याने सूर्यकेंद्रित सिद्धांताचा पुरस्कार केलेला होता.


हे लिखित स्वरुपातील विचार धर्माला सहन झाले नाहीत.


गॅलिलिओला धर्माच्या न्यायालयापुढे बोलविण्यात आले.७ सप्टें.१६३२ ला प्रकृती ठीक नसल्यामुळे तो १५ फेब्रु. १६३३ ला न्यायालयापुढे हजर झाला.गॅलिलिओला बाजू मांडण्याची संधी न्यायालयाने मोठ्या उदार अंतःकरणाने दिली.बहुतेक त्यांचा न्याय आधीच ठरलेला असावा.न्यायालयाने त्याला दोषी ठरवले आणि त्याच्या सर्व साहित्यावर बंदी घालण्याचा हुकूम दिला.कालांतराने त्याला तुरूंगवासाची शिक्षा देण्यात आली.त्रास असहाय्य झाल्यावर आणि इतर संशोधनासाठी वेळ मिळावा या हेतूने गॅलिलिओ दोन पावले मागे सरकला.त्याने धर्माची आणि पर्यायाने धर्मगुरू पोप यांची गुडघे टेकून माफी मागितली. 'मी चुकलो' अशी कबुलीही त्याच्याकडून वदवून घेण्यात आली.पण हा बंडखोर शास्त्रज्ञ स्वतःशीच पुटपुटला 'तरी ती (पृथ्वी) फिरतेच.'


सन १९९२ ला ख्रिश्चन धर्मगुरू पोप जॉन पॉल द्वितीय यांनी गॅलिलिओ प्रकरणाची छाननी करण्यास सुरुवात केली.अर्थात सूर्याभोवती पृथ्वी फिरते हे एव्हाना सिद्धही झालेले होते.अखेर पोपनी गॅलिलिओ संदर्भात धर्माने केलेली चूक मान्य केली.आणि ३१ ऑक्टो. १९९२ रोजी पोप जॉन पाल द्वितीय यांनी गॅलिलिओला चर्च दिलेल्या अन्यायी वागणुकीसंदर्भात संपूर्ण जगाची माफी मागितली. 


गॅलिलिओचा मृत्यू झाला १६४२ साली.चर्चने माफी मागितली १९९२ साली.म्हणजे गॅलिलिओच्या मृत्यूनंतर ३५० वर्षानंतर त्याची माफी मागितली.असा न्याय असतो धर्मसंस्थेचा ! सत्य सांगितले अथवा वस्तुस्थिती निदर्शनास आणल्यानंतर कौतुक करण्याऐवजी शिक्षा दिली जाते आणि सत्य सांगणाऱ्याच्या मृत्यूनंतर ३५० वर्षानंतर चुकीच्या शिक्षेबद्दल माफी पण मागितली जाते.असा न्याय आपल्याला चालेल का? असा न्याय असतो धर्मसंस्थेचा ! धर्माधिष्ठीत विचारप्रणालीचा !!


एका अर्थाने ख्रिश्चन धर्म बरा असे मी म्हणतो.कारण गॅलिलिओच्या मृत्यूनंतर ३५० वर्षानंतर का होईना त्यांनी जगाची माफी मागितली.उशीरा का होईना त्यांना शहाणपण सुचले. 


परंतु भारतीय समाजामध्ये ज्या थोर विभूतींनी, समाजसुधारकांनी माणसाला माणसात आणले, माणूसकीने वागवण्यास सांगितले,त्यांची माफी आमच्या धर्माने आणि धर्माच्या वारसदारांनी आजही मागितलेली नाही.छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केवळ ते शूद्र आहेत म्हणून नाकारला.बहुजनांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देणाऱ्या म.फुलेंच्या अंगावर मारेकरी घातले.स्त्रियांना शिकवणाऱ्या सावित्रीबाईंच्या अंगावर शेण,चिखल फेकले,अवहेलना केली. शाहू महाराजांनी दीन-दलितांना मानाची पदे दिली म्हणून त्यांना बदनाम करण्याचे षड्यंत्र रचले.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या उच्च विद्याविभूषित समाजसुधारकाची केवळ ते शूद्र होते म्हणून कुचेष्टा केली.


या सर्वच महामानवांनी सुचविलेल्या सुधारणा आज सर्वमान्य झाल्या आहेत.मात्र त्यांच्या धर्माने आजतागायत त्यांची माफी मागितलेली नाही.


गॅलिलिओवर झालेल्या अन्यायाचे प्रायश्चित्त म्हणून सध्याचे धर्मगुरू पोप बेनेडिक्ट यांनी गॅलिलिओचा पुतळा २००८ मध्ये चर्चच्या भिंतीमध्ये उभा केलेला आहे. 


आमच्या धर्माला प्रायश्चित म्हणून असे किती पुतळे बसवावे लागतील याची गणतीच न केलेली बरी. 


१६३२ साली गॅलिलिओचे डोळे गेले. दुर्बिणीतून सूर्याची निरीक्षणे केल्यावर हा परिणाम झालेला असणं स्वाभाविक आहे.वैज्ञानिक स्वतःच्या ऐहिक सुखासाठी न झटता समाजासाठी झटत असतो.हे आजच्या स्वकेंद्रित झालेल्या समाजाने लक्षात घेणे गरजेचे आहे.

खगोलवैज्ञानिकांसाठी फार मोठा वैज्ञानिक इतिहास मागे ठेवून ८ जाने. १६४२ रोजी या महान वैज्ञानिकाची प्राणज्योत मालवली.


इतिहास,विज्ञानाचा,खगोलाचा अथवा सामाजिक असो,त्या इतिहासाकडून प्रेरणा घेऊन पुढे प्रगती करायला शिकले पाहिजे.पण प्रामुख्याने महाराष्ट्राच्या इतिहासाचे वारंवार विकृतीकरण धर्माच्या माध्यमातून केले जात आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मुस्लिमद्वेष पसरविण्याचे काम केले जात आहे. माणसामाणसांमध्ये,धर्माधर्मामध्ये, जाती-जातींमध्ये अंतर वाढवण्यात काही विघ्नसंतोषी व्यक्ती आणि संघटना काम करत आहेत.त्यांच्या अतिरंजीत भूलथापांना तरुण वर्ग बळी पडतो आणि दंगली करण्यास उद्युक्त होतो. इतिहास हा प्रेरणा घेण्यासाठी असतो,दंगली घडविण्यासाठी नसतो.


गॅलिलिओला शिक्षा केली म्हणून आज कोणी चर्चविरोधात आंदोलने करत नाहीत.हे महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींनी विचारात घ्यायला पाहिजे. छत्रपती शिवरायांचा खरा इतिहास वाचला पाहिजे.ते खरोखर मुस्लिमद्वेष्टे होते का? त्यांचा आरमारप्रमुख दौलतखान, तोफखानाप्रमुख इब्राहीमखान,विश्वासू नोकर मदारी म्हेतर,हिरोजी फर्जंद,वकील काजी हैदर,हेरप्रमुख बहिर्जी नाईक असे सर्व जातीधर्मातील सवंगडी त्यांच्यासाठी जीवावर उदार होते.शिवाजी महाराजांचे राज्य धर्माधिष्ठीत कधीच नव्हते.


युरोपमध्ये गॅलिलिओनंतर प्रबोधनाच्या चळवळीने जोर पकडला आणि युरोप आज एकविसाव्या शतकामध्ये तंत्रज्ञानाच्या बाबतीत इतरांच्या पुढे प्रचंड वेगाने गेलेला आहे.आम्ही मात्र आजही इतिहासाच्या विकृतीकरणामध्ये गुंग आहोत.


माणसामाणसांतील अंतर वाढवत आहोत.एक माणूस म्हणून,एक भारतीय म्हणून वैचारिक प्रगल्भपणा आत्मसात करणे गरजेचे आहे.त्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागणे आपणा सर्वांच्याच फायद्याचे आहे.


१३ डिसेंबर २०२२ या लेखामधील पुढील व शेवटचा भाग.. धन्यवाद


समाप्ती…!

१३/१२/२२

विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ.. अल्बर्ट आईनस्टाईन Albert Einstein(१४ मार्च १८७९ - १८ एप्रिल १९५५)

विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो त्या अल्बर्ट आईनस्टाईन यांनी १९०५ साली 'अनॅलन दर फिजीक' या जर्मन नियतकालिकात दर दोन महिन्याच्या अंतराने भौतिकशास्त्रावरील तीन शोधनिबंध प्रसिद्ध केले.या शोधनिबंधांनी ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अक्षरशः क्रांती घडवून आणली,आणि भौतिकशास्त्राच्या प्रगतीला मोठी चालना मिळाली.


 'विशिष्ट सापेक्षतावादाचा सिद्धांत','फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट' आणि 'ब्राऊनियन मोशन' हे ते शोधनिबंध होत.

आईनस्टाईनच्या या क्रांतिकारी शोधांना २००५ साली शंभर वर्षे पूर्ण झाली.या निमित्ताने युनेस्को,आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र संघटना,भारतीय भौतिकशास्त्र संघटना आणि इतर संस्थांनी २००५ हे वर्ष जागतिक भौतिकशास्त्र वर्ष म्हणून साजरे केलेले होते. 


१४ मार्च १८७९ ला जर्मनीतल्या उल्म या गावी पौलीन आणि हरमन या दांपत्यापोटी जन्मलेले हे मूल मोठेपणी ॲटमबॉम्बच्या माध्यमातून 


सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेले विज्ञानातील सूत्र ऊर्जा बरोबर वस्तुमान गुणिले प्रकाशाच्या वेगाचा वर्ग (E = mc2) शोधून काढू शकेल असं स्वप्नातही वाटले नसेल. 


शाळेतल्या औपचारिक शिक्षणात आईनस्टाईनचे फारसे लक्ष लागलेले नव्हते.पण निसर्गामध्ये घडत असलेल्या घटना आणि त्यामधील गणिती संबंधांबद्दल मात्र त्यांच्या मनात कुतूहल होते.माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर झुरीच येथील स्विस नॅशनल पॉलिटेक्निकच्या प्रवेश परीक्षेमध्ये नापास झालेला हा मुलगा दुसऱ्या प्रयत्नात पास होऊन पदवी प्राप्त करू शकला.स्वतःच्या पाल्यांना साचेबद्ध पद्धतीने पास व्हायला लावणाऱ्या,स्वतःची महत्त्वाकांक्षा पाल्यावर लादणाऱ्या तसेच नापासांच्या बाबतीत नकारात्मक दृष्टिकोन ठेवणाऱ्या सध्याच्या बहुसंख्य पालकांना विचार करायला लावणारी ही घटना आहे.पदवी नंतर १९०२ मध्ये बर्न शहरात स्विस पेटंट ऑफिसमध्ये पेटंट तपासणीस अर्थात कारकून म्हणून आईनस्टाईन नोकरीला लागला.सदर नोकरीमध्ये मिळालेला बराचसा मोकळा वेळ त्यांनी संशोधनासाठी वापरला होता याची प्रचिती १९०५ मध्ये लागलेल्या तीन शोधनिबंधांमध्ये दिसून आली.


सतराव्या शतकातील न्यूटनच्या संशोधनानुसार वस्तुमान,लांबी आणि काल हे स्थिर आहेत.ते कोणावरही अवलंबून नाहीत म्हणजे ते निरपेक्ष आहेत.या सिद्धांताला छेद देत आईनस्टाईनने वस्तुमान,लांबी आणि काल हे सुद्धा सापेक्ष आहेत आणि ते वेगावर अवलंबून आहेत हे प्रतिपादन केले.हाच आईनस्टाईनचा विशिष्ट सापेक्षतावादाचा सिद्धांत म्हणून रूढ झाला.


 त्या सिद्धांतानुसार गतीतील वस्तूचे वस्तुमान वाढते,लांबी कमी होते आणि काल मंदावतो. 


प्रकाशाचा वेग सेकंदाला तीन लाख कि.मी.आहे. जर गतीतील वस्तू प्रकाशाच्या वेगाने निघाली तर तिचे वस्तुमान अनंत होते.तिची लांबी शून्य होते तर तिच्यासाठी काल थांबतो.विशिष्ट सापेक्षतावादातून निघालेले निष्कर्ष विलक्षण आहेत. 


आजही सर्वांना आश्चर्यचकित करायला लावणारे आहेत.हे सर्व परिणाम आपल्या रोजच्या जीवनात अनुभवाला येत नाहीत.कारण वेगावर असलेली मर्यादा.


आईनस्टाईनच्या सापेक्षतावादाच्या सूत्रानुसार जर एखादी वस्तू सेकंदाला दोन लाख साठ हजार किलोमीटर इतक्या वेगाने निघाली तर तिचे वस्तुमान दुप्पट होते तर लांबी आणि काल निम्मा होतो.


सापेक्षतावादाच्या या सिद्धांतातूनच ऊर्जेसंदर्भातील सूत्राने (E=mc2) जन्म घेतला आणि वस्तुमान आणि ऊर्जा यातील द्वैत संपुष्टात आणले.त्या काळात ऊर्जा समस्येने ग्रासलेल्या जगताला एक दिलासा मिळेल असे वाटले होते.परंतु प्रत्यक्षात ऊर्जेचा विध्वंसक कारणासाठी वापर झाला.


जर एक किलो कोळशाचे पूर्ण ऊर्जेत रुपांतर केले तर त्या ऊर्जेपासून १०० वॅटचा बल्ब २० कोटी वर्षे चालू ठेवता येऊ शकतो.संपूर्ण जगाला हादरवणारा अणुबॉम्बही या समीकरणाचीच निष्पत्ती आहे.


पहिल्या महायुद्धामध्ये जर्मनीने घेतलेल्या सहभागाच्या विरोधात आईनस्टाईनने आवाज उठवला होता आणि धर्माने ज्यू असल्याने हिटलरच्या रोषालाही त्याला सामोरे जावे लागले होते.ते टाळण्यासाठी १९३२ मध्ये त्याने जर्मनीला रामराम ठोकला आणि अमेरिकेतील प्रिस्टन येथील Institute for Advanced Studies. मध्ये प्राध्यापक म्हणून रूजू झाला


हिटलर अणुबॉम्ब बनवण्याच्या प्रयत्नात आहे. याची कुणकुण लागल्यानंतर आईनस्टाईनने अमेरिकेचे त्यावेळचे राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट यांना पत्र लिहून जर्मनीवर केवळ दबाव म्हणून अणुबॉम्ब निर्मितीची आवश्यकता प्रतिपादन केली.रुझवेल्टनी लगेच अणुबॉम्ब निर्मितीसाठी ओपनहिमर यांच्या नेतृत्त्वाखाली 'मॅनहटन' योजनेची घोषणा केली.आणि जगातील पहिल्या अणुबॉम्बची पाहिली अणूचाचणी १६ जुलै १९४५ ला मेक्सिकोच्या वाळवंटात झाली.त्या अणुचाचणीची विध्वंसकता बघितल्यानंतर मॅनहटन योजनेमध्ये सामील असलेले सर्व शास्त्रज्ञ अचंबित झाले.'सदर अणुबॉम्बचा वापर करू नकाच पण जर करणारच असाल तर तेथील जनतेला त्याची पूर्वकल्पना द्या' अशी आईनस्टाईनने केलेली कळकळीची विनंती सुद्धा धुडकावून लावत अमेरिकन राष्ट्राध्यक्ष टुमन यांनी ६ आणि ९ ऑगष्ट १९४५ ला जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी या शहरावर अणुबॉम्ब टाकले.प्रचंड मानवी संहार घडवला आणि दुसरे महायुद्ध संपुष्टात आणले. या घटनेने आईनस्टाईन खूप दुःखी झाले आणि त्यांनी आपले उर्वरीत आयुष्य शांततेचा प्रसार आणि अण्वस्त्रविरोधी प्रचारामध्ये घालवले.हिरोशिमा आणि नागासाकीच्या घटनेनंतर आजतागायत कुठेही अणुबॉम्बचा वापर झालेला नाही.तसा प्रयत्न कुणी केलाच तर सर्व जग विनाशाच्या खाईत लोटले जाईल.हे त्रिकालाबाधित सत्य आहे. सन १९५२ साली इस्त्रायलचे राष्ट्राध्यक्ष पॉल वाईझमन यांच्या मृत्यूनंतर त्या राष्ट्राचे राष्ट्राध्यक्षपद आईनस्टाईन यांना देऊ करण्यात आले होते.परंतु त्याला त्यांनी स्पष्ट नकार दिला. 


यासंदर्भात आईनस्टाईन म्हणाले की, 'Equations are more important to me than politics, because politics is for the present but an equation is something for eternity'.


थोडक्यात राजकारण क्षणभंगूर आहे.गणित आणि पर्यायाने विज्ञान शाश्वत आहे.याचा अर्थ राजकारणाला कमी लेखण्याचा नसून विज्ञानाप्रती निष्ठा व्यक्त करण्याचा आहे. आईनस्टाईनचा दुसरा शोधनिबंध प्रकाश विद्युतीय परिणामाच्या (फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट) स्पष्टीकरणावर होता.त्याने दाखवून दिले की विशिष्ट धातूवर प्रकाश टाकला असता त्या धातूपासून इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात.परंतु त्यासाठी त्या प्रकाश कणांत विशिष्ट अशी कमीतकमी पातळीपर्यंची ऊर्जा असणे आवश्यक आहे.


याच संशोधनाबद्दल त्यांना १९२१ सालचे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. 


सापेक्षतावादाच्या सिद्धांताने जरी खळबळ उडवून दिलेली असली तरी नोबेल कमिटी तो स्वीकारण्यामध्ये साशंक होती.त्यामुळे ते संशोधन पारितोषिकाविनाच राहिले. 


आईनस्टाईनचा तिसरा शोधनिबंध ब्राऊनियन मोशनवर होता.पाण्यातील अतिशय सूक्ष्म कणांच्या अखंडपणे चाललेल्या हालचालीसंबंधी होते.त्यांनी दाखवून दिले की पाण्याचे रेणू अविरतपणे त्याच्यातील सूक्ष्म कणांवर आदळतात.परिणामी त्या कणांची वेड्यावाकड्या मार्गांनी अखंडपणे हालचाल चालू असते.


१९१५ मध्ये आईनस्टाईनने व्यापक सापेक्षतेचा सिद्धांत मांडला.त्यालाच आईनस्टाईनचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत म्हणतात. दूरच्या ताऱ्यापासून निघालेले प्रकाशकिरण सूर्याजवळून जाताना सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाने वक्र होतात अथवा मार्ग बदलतात.व्यापक सापेक्षतेच्या सिद्धांतातून हा निष्कर्ष मिळतो.या सिद्धांताची प्रचिती आर्थर एडिग्टन या शास्त्रज्ञाने २९ मे १९१९ रोजी झालेल्या सूर्यग्रहणाच्या वेळी दाखवून दिली.सूर्याच्या पलीकडे असलेला तारा पृथ्वीवरच्या निरीक्षकाला दिसणार नाही असे वाटते.कारण प्रकाश सरळ रेषेत जातो,तो आपला मार्ग बदलत नाही.परंतु गुरुत्वाकर्षणाने प्रकाश आपला मार्ग बदलतो आणि तो पृथ्वीवरील निरीक्षकाकडे वक्र मार्गाने पोहोचतो. हा वक्र मार्ग तसाच पाठीमागे वाढवला तर निरीक्षकाला सूर्यापलीकडील ताऱ्याची जागा बदललेली दिसेल आणि तो तारा स्पष्ट दिसेल.सूर्यग्रहणाच्यावेळेस असे सूर्यापाठीमागील तारे पाहता येतात.


आईनस्टाईनने आपल्या सिद्धांतात स्थलाच्या तीन आणि कालाची एक मिती जोडून एक चौकट तयार केली,यालाच स्थलकालाची चौकट म्हणतात.आईनस्टाईनची महानता यामध्ये आहे की आधी गणिती माध्यमातून 'असे असले पाहिजे' हे सांगायचे आणि नंतर प्रयोगातून ते इतरांनी सिद्ध करायचे.आईनस्टाईन म्हणतात की,'विश्वाबद्दल अनाकलनीय गोष्ट ही आहे की ते आकलनीय आहे आणि विश्वातील सर्व घटना या निसर्ग नियमाने बद्ध असतात.' म्हणून सर्व विज्ञानशाखांच्या उगमस्थानाचे धागेदोरे भौतिकशास्त्राच्या कोणत्या ना कोणत्या भागात सापडत असतात.भौतिकशास्त्राची कथा ही मानवी प्रयत्नांची अत्यंत खळबळजनक यशोगाथा आहे.विज्ञानाचे वर्चस्व असलेल्या विसाव्या शतकात प्रतिभा,क्षमता,मानसिक प्रगल्भता आणि बुद्ध्यांक या सर्वच बाबतीत अल्बर्ट आईनस्टाईन महान ठरले...


अणुबॉम्ब,अवकाश प्रवास,पुंजवाद,इलेक्ट्रॉनिक्स हे जे आधुनिक युगातील वैज्ञानिक मापदंड मानले जातात त्यातील प्रत्येकावर आईनस्टाईन यांनी ठसा उमटवला आहे.विसाव्या शतकात जगाचा जो चेहरामोहरा बदलून गेला त्याचे श्रेय त्या शतकातील मूलभूत विज्ञानात झालेल्या संशोधनाकडे जाते.कारण या संशोधनामुळेच तंत्रज्ञानात प्रचंड प्रगती करता आली.आईनस्टाईन या वैज्ञानिक प्रगतीचे उद् गाते होते. 


१८ एप्रिल १९५५ रोजी प्रिस्टन येथे या प्रतिभावंताचा मृत्यू झाला आणि जग एका महान वैज्ञानिकाला मुकले.


११ डिसेंबर या लेखातील पुढील भाग…

११/१२/२२

भारताचा पहिला उपग्रह यांच्या नावे सोडण्यात आला.आर्यभट्ट Aryabhatt (इ. स. ४७६)

बिहारमधील पाटणा येथील या खगोलशास्त्रज्ञाने 'आर्यभट्टीय' अर्थात 'आर्य सिद्धांत' हा पहिला ग्रंथ लिहिला.श्लोक स्वरूपामध्ये आणि भाषेमध्ये असल्यामुळे या ग्रंथाचे यशापयश हे अर्थ काढणाऱ्यांच्यावरच अवलंबून राहिले. पृथ्वी स्वतःभोवती फिरते असे मानणाऱ्या या प्रतिभावंत शास्त्रज्ञाला तत्कालिन तथाकथित भारतीय पंडितांनी वेडा ठरवले आणि बिहारमधून हाकलून दिले नंतर केरळमध्ये गेल्यावर त्यांनी आपल्या संशोधनास तेथे वाट मोकळी करून दिली.भारताने १९७५ साली अंतराळात सोडलेला पहिला उपग्रह 'आर्यभट्ट' या नावानेच ओळखला जातो. ही भारतीयांनी आर्यभट्ट या महान शास्त्रज्ञाला दिलेली मानवंदनाच होय.


वराहमिहिर (इ. स. ४९० )


वराहमिहिर यांनी 'पंचसिद्धांतिका' हा खगोलावर आधारीत ग्रंथ लिहिला.सृष्टीचमत्कार,पदार्थाचे गुणधर्म आणि त्यांचा व्यवहारातील उपयोग यावर स्वतंत्रपणे विचार करणारा हा पहिला भारतीय शास्त्रज्ञ.वराहीसंहिता आणि बृहज्जातक हे त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत.


ब्रम्हगुप्त (इ. स. ५९८)


ब्राह्मस्फुटसिद्धांत लिहिणाऱ्या ब्रह्मगुप्ताचा जन्म गुजरातमध्ये झाला.भास्कराचार्यांनी 'गणकचक्रचूडामणी' म्हणून यांचा मोठा गौरव केलेला आहे. 


भास्कराचार्य (इ. स. १११४)


'लीलावती' आणि 'सिद्धांतशिरोमणी' ग्रंथ लिहिणाऱ्या या भारतीय खगोलवैज्ञानिकाने गणितामधील शून्याची उपलब्धी सर्व जगाला दिली असे मानतात.या ग्रंथातील उदाहरणे काव्यमय आणि संस्कृत भाषेमध्ये आहेत.


डॉ. सुब्रह्मण्यम् चंद्रशेखर 

(१९ ऑक्टो. १९१० २१ ऑगस्ट १९९५)


भारताचे पहिले नोबेल पारितोषिक प्राप्त शास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही. रामण यांचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. एस. चंद्रशेखर पुतणे होते.जन्माने भारतीय परंतु अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारलेल्या चंद्रशेखर यांनी १९८३ सालचे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक प्राप्त केले होते.ताऱ्यांचे स्वरूप आणि त्यांची निर्मिती या त्यांच्या संशोधनाला हा पुरस्कार मिळालेला होता.


खगोलशास्त्रातील त्यांचे योगदान 'चंद्रशेखर मर्यादा' या नावाने प्रचलित आहे.श्वेतबटू ताऱ्यांचे वस्तुमान सूर्याच्या वस्तुमानाच्या १.४४ पट झाले की तारे आकुंचन पावण्यास सुरुवात होते आणि शेवटी त्या ताऱ्याचे न्यूट्रॉन ताऱ्यामध्ये अथवा कृष्णविवरामध्ये रुपांतर होते.यालाच चंद्रशेखर मर्यादा म्हणतात.हे संशोधन त्यांनी १९३० साली प्रसिद्ध केले होते..


डॉ. चंद्रशेखर यांच्या स्मरणार्थ 'चंद्रा एक्स रे' ही प्रयोगशाळा कोलंबिया अवकाशयानाच्या सहाय्याने दि.२३ जुलै १९९९ रोजी अंतराळात निरीक्षणासाठी सोडण्यात आलेली होती.पृथ्वीवर सापडलेल्या एका अशनीचे 'अशनी १९५८ चंद्रा' असेही नामकरण करण्यात आले आहे.खगोलशास्त्रज्ञाला पाश्चिमात्य किती मान देतात याचा तरुणांनी विचार करण्याची आवश्यकता आहे.भाषा, प्रांत, जात, धर्म, देश यांच्यापलीकडे वैज्ञानिक पोहोचलेले असतात.


आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय खगोलशास्त्रज्ञ

डॉ. जयंत नारळीकर (१९ जुलै १९३८) 


आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय खगोलशास्त्रज्ञ. बनारस हिंदू विश्वविद्यापीठातून त्यांनी १९५७ मध्ये बी.एस्सी.

पदवी प्राप्त करून नंतर इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठातून पीएच. डी. पदवी संपादन केली.

विश्वविख्यात खगोलशास्त्रज्ञ फ्रेड हॉएल यांनी स्थापन केलेल्या Institute of Theoretical Astronomy मध्ये त्यांनी १९९२ पर्यंत संस्थापक सदस्य म्हणून जबाबदारी सांभाळली. 


१९८८ मध्ये पुणे येथे स्थापन झालेल्या IUCAA (Inter University Center for Astronomy and Astrophysics) संस्थेचे संस्थापक संचालक म्हणून डॉ. नारळीकर कार्यरत राहिले.सैद्धांतिक भौतिकशास्त्र, खगोलभौतिकशास्त्र तसेच विश्वरचनाशास्त्र हे डॉ.नारळीकरांचे संशोधनाचे विषय आहेत. मूलभूत संशोधनासमवेत विज्ञान लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या कार्यातही त्यांचा मोठा वाटा आहे.आकाशाशी जडले नाते,खगोलशास्त्राचे विश्व,व्हायरस इ. त्यांची पुस्तके वाचकांच्या पसंतीस उतरलेली आहेत.


स्थिर विश्वनिर्मितीच्या सिद्धांताचे १९९३ मध्ये फ्रेड हॉएल,जेफरी बर्बिज आणि डॉ. नारळीकर यांनी पुनरूज्जीवन केले आणि 'स्थिरवत स्थितीचे विश्व' (Quasi Steady State Cosmology) या नावे नवीन सिद्धांत रूढ केला.


९ डिसेंबर २०२२ मधील लेखातील पुढील भाग..