* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२८/११/२४

लोकप्रिय नेता पेरिक्लीस popular leader pericles

पर्शियनांनी आशिया जिंकून घेतला आणि आता त्यांनी आपली गिधाडी दृष्टी युरोपाकडे वळविली.एजियन समुद्राच्या पलीकडे ग्रीस देश होता,भूमध्यसमुद्रात आपले दात खोल रूतवीत ग्रीस उभा होता. पर्शियातल्याप्रमाणे ग्रीस देशांतही आर्यन शाखेचेच लोक होते.आर्यांच्या त्या सर्वत्र पसरण्याच्या वेळीच हे आर्य इकडे येऊन ग्रीस देशात घुसले.तेथील मूळच्या रहिवाश्यांची त्यांनी हकालपट्टी केली आणि नंतर स्वतःच्या संस्कृतीचा आरंभ केला. 


फोनिशियनांपासून ते नौकानयन शिकले.एजियन समुद्र ओलांडून आशियामायनरच्या किनाऱ्यावर त्यांनी अनेक वसाहती वसविल्या.नकाशात तुम्ही पाहाल तर तुमच्या तत्काळ ध्यानात येईल,की एजियन समुद्र हा एक अरुंद जलमार्ग आहे.अनेक बेटे या रस्त्यावर वाटोवाट उभी आहेत.जणू त्यांनी सेतूच बांधला आहे. दंतकथा रचणाऱ्या ग्रीकांनी ही बेटे ईश्वराने तिथे का रोवली,याची दोन कारणे दिली आहेत;ग्रीकांनी यांच्यावरून पावले टाकीत जावे म्हणून देवाने ही बेटे ठायी ठायी उभी केली,हे एक कारण; दुसरे कारण म्हणजे एका खंडातून दुसऱ्या खंडात जाणाऱ्या प्रवाशांनी वाटेत विसावा घ्यावा म्हणून ही बेटे प्रभूने उभी केली होती,या बेटांमुळे फार प्राचीन काळापासून ग्रीकांनी आशियाशी संबंध ठेवला होता.आणि त्यामुळे ते पाश्चिमात्यांस पौर्वात्यांचा परिचय करून देणारे बनले. पौर्वात्त्यांसाठी ते पाश्चिमात्यांचे दुभाष्ये बनले.ते पूर्वेचा अर्थ पश्चिमेस विशद करणारे आचार्य झाले.


ग्रीक लोक व आशियातील लोक यांच्यात व्यापार चाले. तदनुषंगाने लढायाही होत.त्या शेकडो युद्धांचा भीषण इतिहास आपणास नको आहे.परंतु त्यातील ट्रोजन वॉर हे महायुद्ध,हे होमरने आपल्या काव्यामुळे अमर करून ठेवले आहे.आंधळा महाकवी होमर ! दोन रानटी जातींतील क्षुद्र भांडणांचा विषय घेऊन अमर सौंदर्याचे महाकाव्य त्याने जगाला दिले.


या ग्रीक लोकांचे खरोखर एक अपूर्व वैशिष्ट्य होते.ज्या ज्या वस्तूला ते स्पर्श करीत,तिचे ते शुद्ध शंभर नंबरी सोने करीत.साध्या वस्तूला स्पर्श करून तिचे काव्याच्या शुद्ध सुवर्णात ते परिवर्तन करीत.ही दैवी देणगी,ही अद्भुत कला त्यांच्या ठायी कशी आली,ते सांगणे कठीण.त्यांच्या देशाच्या विशिष्ट भौगोलिक रचनेमुळे हा गुण त्यांच्या अंगी आला,असे अर्वाचीन इतिहासकार सांगतात.ग्रीस हे द्वीपकल्प आहे.हा देश शेकडो लहानलहान दऱ्याखोऱ्यांमुळे विभागला गेला आहे. प्रत्येक खोरे दुसऱ्या खोऱ्यापासून सभोवतालच्या डोंगरपहाडांनी सुरक्षित असे आहे.कधीकधी समुद्राचा बाहूही रक्षणार्थ आला आहे.याप्रमाणे पृथक् पृथक् अशा त्यांच्या शाखा झाल्या.त्या त्या खोऱ्यांत जीवनाचा विकास करीत ते राहिले.लहान वस्तूंतही पूर्णता ओतायची कला ते शिकले.निर्दोष भावगीते,निर्दोष नाटके,निर्दोष भांडी,निर्दोष शिल्प,निर्दोष मंदिरे सर्वत्र परिपूर्णता आहे.परंतु ग्रीक लोकांप्रमाणेच इतर ठिकाणीही असणाऱ्या लोकांना अशी भौगोलिक रचना मिळालेली का नाही? मिळालेली आहे,परंतु ग्रीक लोकांप्रमाणे पूर्णता,हा ज्ञान-विज्ञान-कलांचा अभिनव विलास व विकास त्यांना दाखविता आलेला नाही. प्रामाणिकपणाने म्हणावयाचे झाले तर आपणास असेच म्हणावे लागेल,की ग्रीक हे सौंदर्योपासक का झाले,ज्यू हे शांतीचे उपासक का झाले,याचे कारण सांगता येणार नाही.ग्रीकांची मनोरचना अपूर्व होती.त्यांची मनोरचना वैशिष्ट्यपूर्ण होती.त्यांना निर्मितीत जेवढा आंनद वाटे तेवढाच विध्वंसातही वाटे.त्यांना मेळ,सुसंवादित्व आवडे;परंतु त्यांच्या राजकीय जीवनात मात्र कधीच मेळ नसे.तिथे नेहमीच विसंवाद व भांडणे.ते संयमाचा नि नेमस्तपणाचा उपदेश करीत,परंतु भांडणे शोधण्यात नेहमी वेळ दवडीत.ते देवांशी बोलत,संवाद करीत आणि इकडे शेजाऱ्यांना फसवीत व लुबडीत.ग्रीक लोक उदात्तता व मूर्खपणा यांचे मिश्रण होते.एस्पायलॅस हा त्यांचा सर्वांत मोठा नाटककार.परंतु स्वतः

जवळच्या दैवी नाट्यकलेचा त्याला अभिमान वाटत नसे.आपण एक शिपाईगडी आहोत,यातच त्याला सारा पुरुषार्थ वाटे. ग्रीक लोकांना युद्धासाठी म्हणून युद्ध आवडे.जणू तो त्यांचा एक आनंद होता! विध्वंसनाचा,मारणमरणाचा आनंद ! सौंदर्यासाठी ज्याप्रमाणे ते सौंदर्याची पूजा करीत,त्याप्रमाणेच लढण्यासाठी म्हणून लढत.ते प्रतिभावंत;परंतु जंगली असे लोक होते.कलेमध्ये अद्वितीय होते,

दैवी होते.परंतु परस्परांशी वागताना जंगलीपणाने वागत.एखाद्या पुतळ्याचे बोट जरा बिघडले,तर ते त्यांना अक्षम्य पाप वाटे.परंतु युद्धकैद्यांची बोटे तोडणे त्यांना थोर कर्म वाटे,देशभक्तीचे कर्म वाटे.


ग्रीस देशात अनेक नगरराज्ये होती.अशा या नगर राज्यात तो देश विभागला गेला होता.प्रत्येक राज्य स्वतंत्र होते.प्रत्येक दुसऱ्याचा नाश करू पाहात होते. परंतु त्यांचे द्वेषमत्सर कितीही असले,तरी ओबडधोबड स्वरूपाची व स्थूल प्राथमिक पद्धतीची अशी लोकशाही त्यांनी निर्माण केली यात शंका नाही.प्रथम त्यांनी राजांना नष्ट केले.नंतर मूठभर प्रतिष्ठितांची सरदार वर्गाची सत्ता त्यांनी नष्ट केली.ख्रि.पू.सातव्या शतकातच अथेन्समध्ये पूर्ण लोकसत्ता होती.ती लोकसत्ता सर्वसामान्य जनतेची नव्हती,तर असामान्य जनतेची वरिष्ठ वर्गाची होती.


अथेन्समधील फक्त एकपंचमांश लोकांनाच तेथील लोकसभेत वाव होता.ज्यांचे आईबाप अथीनियन असत,त्यांनाच त्या लोकसभेत प्रवेश असे. उरलेल्या चारपंचमांश लोकांत परके असत,गुलाम असत,गुन्हेगार असत;आणि स्त्रियांना तर सार्वजनिक व राजकीय कामांत संपूर्णपणे प्रतिबंधच होता.या सर्वांना सर्वसाधारणपणे शूद्र असे संबोधण्यात येई,असंस्कृत रानटी लोक असे समजण्यात येई.ग्रीस देशातील ही लोकशाही अशा प्रकारे जरी प्राथमिक स्थितीतील असली तरी,तिच्यामुळे पर्शियनांच्या उरात धडकी भरली.ग्रीक लोक या लोकशाहीमुळे वाईट उदाहरण घालून देत आहेत;उद्या आपल्या अंगलट येणारा नवीन पायंडा पाडीत आहेत असे त्यांना वाटले. ग्रीकांचा लोकशाहीचा प्रयोग यशस्वी झाला,तर अनियंत्रित सत्तेचा पायाच उखडला जाईल अशी भीती पर्शियन साम्राज्यवाद्यांस वाटू लागली.लोकशाहीचे पुरस्कर्ते ग्रीक लोक म्हणजे प्राचीन काळचे बोल्शेव्हिक होते.त्या ग्रीकांना जिंकून घेण्याचे पर्शियनांनी निश्चित केले.लोकशाहीचा हा धोका नष्ट करण्याचे त्यांनी ठरवले.ग्रीस देशावर स्वारी करायला त्यांना चांगले कारणही सापडले.आशिया मायनरमध्ये ज्या ग्रीक वसाहती होत्या.त्यांनी क्रोशियसच्या पुढारीपणाखाली मागे एकदा पर्शियनांवर हल्ला चढविला होता.म्हणून त्या ग्रीक वसाहतींचा मायदेश असलेल्या ग्रीस देशावर हल्ला करून सूड घेणे अत्यंत न्याय्य आहे,असे पर्शियनांनी ठरवले.ग्रीस देशावरील डरायसाची स्वारी,माराथॉनची लढाई,इर्सिसची दहा सैन्ये बरोबर घेऊन आलेली टोळधाड,थर्मापिली येथील लिओनिदास यांचा शौर्यधैर्यात्मक प्रतिकार,या खिंडीतील त्याने मांडलेले अभंग ठाण,सालमिसाच्या सामुद्रधुनीमध्ये थेमिस्टक्लिसने लढविलेले डावपेच,प्लाटिआ येथील लढाईत पर्शियनांचा झालेला पराभव,

इत्यादी गोष्टी इतक्या वेळा सर्वत्र सांगितल्या गेल्या आहेत,की त्या पुन्हा सांगण्यात फारसे स्वारस्य नाही.लष्करी डावपेचांची ज्यांना आवड आहे,आपल्या मानवबंधूंना मारण्यासाठी लष्करी हालचाली कशा कराव्यात,शत्रूस कसे कोंडीत धरावे हे समजून घेण्याची ज्यांना आवड आहे,माणसे मारण्याची सुंदर कला ज्यांना शिकायची आहे,त्यांनी समर चमत्कारांचे ते रक्ताळलेले व क्रूर इतिहास वाचावेत.कोणत्याही ग्रीस देशाच्या इतिहासात या गोष्टींची इत्थंभूत वर्णने आढळतील.एक गोष्ट समजली म्हणजे पुरे,की या युद्धात अखेरीस ग्रीकांनी इराण्यांचा पूर्ण पाडावा केला.


पूर्वेकडून आलेले ते प्राणघातकी संकट नष्ट केल्यावर पुन्हा ग्रीक लोक आपापसांत कुरबुरी करू लागले. लहान शहरे अथेन्सचा द्वेष करीत,अथेन्स स्पार्टाला पाण्यात पाही आणि स्पार्टा सर्वांचाच हेवादावा करी. पर्शियनांनी जर कदाचित पुढे पुन्हा हल्ला केला तर त्यांना नीट तोंड देता यावे म्हणून सर्व ग्रीक नगरराज्यांनी एक संरक्षणसमिती नेमली होती.या समितीचे प्रमुखपण अथेन्सकडे होते.या संरक्षण समितीचे काम नीट चालावे म्हणून प्रत्येक नगरराज्याने आरमारी गलबते तरी द्यावी किंवा पैसा तरी पुरवावा असे ठरले होते.येणारा सारा पैसा डेलॉस येथील ॲपॉलोच्या मंदिरात ठेव म्हणून ठेवण्यात येई.डेलॉस हे एजियन समुद्रातील एक बेट होते.या संरक्षण समितीला 'डेलॉससंघ' असेही संबोधिले जाई.जसजसे दिवस जाऊ लागले,तसतसे संरक्षण समितीच्या कामात मंदत्व येऊ लागले,कोणी फारसे लक्ष देईना,कोणी आरमारी गलबते पाठविना,तर कोणी पैसे देईना.अथीनियन हे प्रमुख असल्यामुळे जमलेल्या पैशातून ते स्वतःसाठीच गलबते बांधू लागले. तोंडाने अर्थात ते म्हणत,की या आरमाराचा उपयोग सर्व ग्रीस देशाच्या रक्षणार्थच होईल.


जमा झालेल्या पैशाचा अधिकच मुक्तहस्ते उपयोग करता यावा म्हणून डेलॉस येथील तिजोरी आता त्यांनी अथेन्स येथेच आणिली आणि अशा रीतीने अथेन्स जणू साम्राज्यच बनले.


काही सभासद नगरराज्यांनी आता उघडपणेच पैसा देण्याचे नाकारले.परंतु अथेन्सने त्यांच्याविरुद्ध आपले आरमार पाठविले आणि त्यांना शरण आणले.अशा रीतीने स्वेच्छेने दिलेल्या किंवा सक्तीने उकळेल्या वार्षिक पैशांची जवळजवळ वीस लक्ष रुपये रक्कम जमा होई.त्या काळात वीस लक्ष रुपये म्हणजे लहान रक्कम नव्हती.या पैशाचा अथेन्सने फार चांगला उपयोग केला.

जगातील नामांकित कलावंतांना अथेन्सने आमंत्रण दिले,त्यांना उदार आश्रय दिला.अथेन्स मातीच्या झोपड्यांचे एक गाव होते.परंतु आता ते संगमरवरी पाषाणांचे व सोन्या-चांदीचे अमरनगर झाले. मातीचे जणू महाकाव्य झाले! हे सारे योजनापूर्वक घडवून आणारा लोकशाही पक्षाचा लोकप्रिय पुढारी पेरिक्लीस हा होय.


पेरिक्लीस हा अथेन्समधील एका सरदाराचा मुलगा होता.

पेरिक्लीसचा बाप पर्शियनांशी झालेल्या लढायात लढला होता.

आईकडून तो क्लेस्थेनीस घराण्यातील होता.अथेन्समध्ये लोकशाही स्थापण्याऱ्यांपैकी क्लेस्थेनीस हा एक होता.ग्रीक लोकांचा जो शिक्षणक्रम असे,तो सारा पेरिक्लीसने पुरा केला.

व्यायाम,संगीत,काव्य,अलंकारशास्त्र,तत्त्वज्ञान,सारे विषय त्याने अभ्यासले.लहान वयातच राजकारणाची आवड त्याला लागली.

त्या विषयात तो रमे.त्याच्या अनेक आचार्यांपैकी सुप्रसिद्ध तत्त्वज्ञानी झेनो हा एक होता.झेनोची वाणी दुधारी तरवारीप्रमाणे होती.तो कोणत्याही विषयावर दोन्ही बाजूंनी तितक्याच समर्पकतेने व परिणामकारकपणे बोलू शके.पुढे यशस्वी मुत्सद्दी होण्याची महत्त्वाकांक्षा धरणाऱ्या तरुण पेरिक्लीसला अशा वादविवादपटू बुद्धिमान गुरूंजवळ शिकायला सापडले ही चांगलीच गोष्ट झाली.परंतु पेरिक्लीसचा सर्वांत आवडता आचार्य म्हणजे अनॅक्झेगोरस हा होता.अनॅक्झेगोरस हाही मोठा तत्त्वज्ञानी होता. तो थोडासा अज्ञेयवादी होता.या जगाचा कारभार भांडखोर व क्षुद्र वृत्तीचे देव चालवीत नाहीत;

होमरच्या महाकाव्यातील देवताही चालवीत नाहीत;तर परमश्रेष्ठ अशी चिन्मयता जगाचा कारभार चालवीत आहे.असे तो म्हणे.अनॅक्झेगोरस विज्ञानातही फार पुढे गेलेला होता.मनुष्यांच्या डोळ्यांना सूर्य जरी बचकेएवढा दिसत असला,

तरी तो खरोखर फारच प्रचंड आहे.असे तो म्हणे.सूर्याचा आकार निदान पेलापॉनेसच्याइतका म्हणजे शंभर चौरस मैलांचा

तरी असला पाहिजे,असा त्याने अंदाज केला होता.ज्या प्रदेशात ग्रीक राहात होते,तो प्रदेश खरोखरच फार लहान होता.

पेरिक्लीस अशा गुरुजनांजवळ शिकला.जेव्हा त्याचे शिक्षण संपले त्या वेळेस विश्वाच्या पसाऱ्याचे जरी त्याला फारच थोडे ज्ञान असले तरी त्याच्या स्वतःच्या शहरातील राजकारणाचे मात्र भरपूर ज्ञान होते.तो उत्कृष्ट वक्ता होता.प्रतिपक्षीयांची मते तो जोराने खोडून टाकी.विरुद्ध बाजूने मांडलेल्या मुद्यांची तो राळ उडवी.

त्याचे अशा वेळचे वक्तृत्व म्हणजे मेघांचा गडगडाट असे,विजांचा कडकडाट असे.अशा वेळेस कोणीही त्याच्यासमोर टिकत नसे.

परंतु पेरिक्लीस एकदम राजकारणात शिरला असे नाही.प्रथम त्याने लष्करात नोकरी धरली.ज्याला जीवनात यशस्वी व्हावयाचे असेल,त्याने लष्करी पेशाची पायरी चढणे आवश्यक असते.आणि पुढे त्याचे सार्वजनिक आयुष्य सुरू झाले.गरिबांचा पुरस्कर्ता म्हणून तो पुढे आला. स्वभावाने तो भावनाशून्य व जरा कठोर होता.तो अलग राहणारा,दूर राहणारा,जरा अंहकारी असा वाटे.तो विसाव्या शतकातील जणू वुड्रो वुइल्सन होता.प्रथम प्रथम लोकांचा विश्वास संपादणे त्याला जड गेले. पुराणमतवादी पक्षाचा किर्मान हा त्याचा प्रतिस्पर्धी होता.किर्मान अधिक चळवळ्या व गुंडवृत्तीचा होता.हा किर्मान गरिबांना मेजवानीस बोलावी.स्वतःच्या फळबागांतील फळे गोळा करायला,त्या बागांतून खेळायला तो गरिबांना परवानगी देई.रस्त्यांतून जाताना त्याचे गुलाम वस्त्राचे गड्ढे घेऊन त्याच्या पाठोपाठ येत असत.आणि रस्त्यात जे जे कोणी वस्त्रहीन दिसत, ज्यांच्या अंगावर फाटक्या चिंध्या असत,त्यांना किर्मान वस्त्रे वाटीत जाई.पेरिक्लीसने हे सारे पाहिले.(मानव जातीची कथा हेन्री थॉमस,अनुवाद- साने गुरुजी,मधुश्री पब्लिकेशन) लोकप्रियता मिळविण्याच्या युक्त्या त्याने ओळखल्या.तोही तसेच करू लागला.अत्यंत विपन्न व निराधार लोकांना तो पैशांच्या देणग्या पाठवू लागला. 


लोकसभेला जे हजर राहतील,त्यांनाही तो पैसे देई. राज्यकारभारात जे प्रत्यक्ष भाग घेतील त्यांनाही तो बक्षिसी देई.लोकप्रियतेचा काटा लवकरच पेरिक्लीसच्या बाजूला झुकला आणि जवळजवळ चाळीस वर्षांपर्यंत, मरेपर्यंत... त्याने लोकांवरील आपले प्रभुत्व व वजन राखले.पेरिक्लीसशी कसे वागावे ते त्याच्या विरोधकांस समजत नसे.प्रक्षुब्ध अशा वादविवादाच्या प्रसंगी सारे हमरीतुमरीवर आले असतानाही तो मनाचा तोल सांभाळू शके,विनोदी वृत्ती राखू शके.तो कधी प्रक्षुब्ध होत नसे.स्वतःच्या मनावर त्याचा अपूर्व ताबा होता.प्लुटार्कने पेरिक्लीसविषयीची एक आख्यायिका दिली आहे.त्या आख्यायिकेने पेरिक्लीसच्या स्वभावावर चांगलाच प्रकाश पडतो. एकदा तो मुख्य बाजारपेठेतून-फोरममधून जात होता. रस्त्यात विरुद्ध पक्षाचा एक राजकारणी पुरुष त्याला भेटला…!


उर्वरित भाग पुढील भागात..!


अथेन्सचा लोकप्रिय लोकशाही पक्षनेता पेरिक्लीस..! 



२६/११/२४

उत्तम संभाषण कला / An easy way to learn

मी जवळपास त्याचा प्रत्येक मुद्दा मान्य केला.त्याला सहानुभूती दाखवली.असे वागणारा आमच्या कंपनीचा कोणताच प्रतिनिधी त्याला भेटला नव्हता.त्यामुळे आमची चांगली मैत्री झाली.मी ज्या कारणासाठी त्या माणसाला भेटायला गेलो होतो तो विषय मी पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या भेटीतही निघाला नाही आणि अखेरीस चौथ्या भेटीनंतर मात्र त्याने पूर्ण टेलिफोन बिल भरले आणि टेलिफोन कंपनीच्या इतिहासात प्रथमच असे घडले की,त्या नाठाळ ग्राहकाने पब्लिक सर्व्हिस कमिशनमधून आमच्या विरुद्ध केलेल्या सगळ्या केसेस मागे घेतल्या.तो स्वतःला शूरवीर समजत होता याबद्दल शंका नाही.संस्थेविरुद्ध तो त्याचे सार्वजनिक हक्क मागत होता,असे त्याला वाटत होते; पण प्रत्यक्षात त्याला मान्यता,मोठेपणा व महत्त्व हवे होते.कंपनीविरुद्ध तक्रार करून त्याला त्याचे महत्त्व ठसवायचे आहे,पण जेव्हा टेलिफोन कंपनीच्या प्रतिनिधीनेच त्याला खूप महत्त्व दिले,त्याच्या मतांची कदर केली,त्याच्या तक्रारींकडे सहानुभूतीपूर्वक पाहिले, तेव्हा त्याच्याकडून त्याला महत्त्व प्राप्त झाले आणि त्याच्या तक्रारींचे बुडबुडे हवेत विरून गेले.


फार वर्षापूर्वी एके सकाळी ज्युलियन डेटमरच्या ऑफिसमध्ये एक रागावलेला ग्राहक एखाद्या वादळाप्रमाणे शिरला.ज्युलिअन डेटमन हे डेटमर वुलन कंपनीचे संस्थापक होते.संपूर्ण जगाला टेलरिंग व्यवसायात वुलन पुरवणारी सगळ्यात मोठी कंपनी म्हणजे ही कंपनी.मि.डेटमर त्या ग्राहकाविषयी सांगत होते,या ग्राहकाकडे आमची काही बाकी होती,पण त्याने ती नाकारली.तो खोटे बोलत होता.म्हणून आमच्या क्रेडिट विभागाने त्याने पैसे दिलेच पाहिजे असा आग्रह धरला.अशा अर्थाची बरीच पत्रे त्याला पाठवल्यानंतर एक दिवस तो घाईघाईने माझ्या ऑफिसमध्ये आला.आणि म्हणाला की,तो पैसे परत करणार नाही आणि इथून पुढे तो डेटमर वुलन कंपनीकडून एका पैशाचेही सामान विकत घेणार नाही.कित्येकदा मध्ये बोलण्याचा मोह होऊनही,तो आवरुन, आम्ही शांतपणे त्याचे म्हणणे ऐकून घेतले.कारण त्यामुळे परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता होती. शेवटी त्याचे बोलणे संपल्यावर जेव्हा तो काही ऐकण्याच्या मनःस्थितीत आला तेव्हा मी शांतपणे म्हणालो,मी तुमचा आभारी आहे की,शिकागोला येऊन तुम्ही आमच्यावर उपकार केले आहेत.कारण,आमच्या क्रेडिट विभागावर तुम्ही रागावले असाल,तर इतरही चांगले ग्राहक रागावू शकतात आणि हे आमच्यासाठी हिताचे नाही.कदाचित नेमके हेच त्याला हवे होते. कुठल्यातरी लहानशा कारणावरून तो नाराज झाला होता आणि त्याबद्दलच मला सांगण्यासाठी खास शिकागोपर्यंत आला होता.मी त्याचे सर्व ऐकून घेऊन वर त्याचीच माफी मागत होतो.मला असे वाटत होते की त्याचे म्हणणे खरे असावे.कारण,त्याला फक्त स्वतःचेच अकाउंट बघायचे होते.आमचे क्लार्क्स हजारो ग्राहकांची अकाउंट्स सांभाळतात.पण तरीही त्याला हवा असलेला प्रतिसाद आणि त्याच्या भावना खऱ्या होत्या हे मी मान्य केले.मी त्याला इतर काही दुकानांची नावे त्याला आता आमच्याकडून काही घ्यायचे नसल्यास सुचवली.पूर्वी आम्ही दुपारचे जेवण एकत्र घेत असू म्हणून त्या दिवशीसुद्धा मी त्याला जेवायला बोलावले. त्याने ते आमंत्रण काहीसे नाराजीनेच स्वीकारले,पण जेवणानंतर त्याने मला पूर्वीपेक्षाही मोठी ऑर्डर दिली. तो अतिशय चांगल्या मनःस्थितीत परत गेला आणि त्याने आमचे संबंध पूर्वीसारखेच राहावेत अशी इच्छा व्यक्त केली.त्याने पुन्हा एकदा बिले व चेक्स तपासल्यानंतर एका बिलाबद्दल चूक झाल्याचे मान्य करून क्षमा मागून त्याचा चेक आम्हाला पाठवला.


त्याच्या मुलाला डेटमरचे मधले नाव दिले आणि त्यानंतर बावीस वर्षे म्हणजे आमरण तो मित्र आणि ग्राहक म्हणून कायम डेटमरच्या संबंधात राहिला.


एडवर्ड बॉक नावाचा एक गरीब परदेशी मुलगा काही वर्षापूर्वी बेकरीच्या काचा पुसत असे.रोज आपल्या बास्केटमध्ये कोळशाच्या थांबलेल्या वॅगन्स जिथे कोळसे उतरवतात तेथील गटारांमध्ये पडलेले तुकडे वेचून आणून तो आपल्या घरातील इंधनाची गरज भागवत असे.तो शाळेत सहाव्या इयत्तेपर्यंतही शिकू शकला नव्हता.पण हाच मुलगा पुढे अमेरिकन वृत्तपत्राच्या इतिहासात गौरवल्या गेलेल्या काही यशस्वी संपादकांपैकी एक म्हणून प्रसिद्ध झाला.त्याच्या या करिअरची सुरुवात या प्रकरणात सांगितलेली तत्त्वे वापरून त्याने कशी केली? ती एक मोठी कथा आहे.तेरा वर्षांचा असताना त्याने शाळा सोडली आणि तो वेस्टर्न युनियनमध्ये शिपायाची नोकरी करू लागला; पण तरीही तो शिक्षणाला क्षणभरही विसरला नाही. उलट स्वतःच्या मनाने अभ्यासाला सुरुवात केली.त्याने मोठमोठ्या अमेरिकन माणसांच्या चरित्रांचा ज्ञानकोश विकत घेण्याइतके पैसे जमवले.त्यासाठी कधी भाड्याचे पैसे वाचवले,तर कधी अर्धपोटी राहिला,आणि नंतर त्याने अत्यंत अभिनव अशा काही गोष्टी केल्या.त्याने त्यात मोठ्या माणसांच्या जीवनाविषयी वाचले व त्यांना पत्रे लिहून पुस्तकाव्यतिरिक्त अधिक माहिती जाणून घेतली.तो एक उत्तम श्रोता बनला.त्याने त्याकाळचे प्रेसिडेंट जनरल जेम्स गारफिल्डना पत्र लिहून विचारले, आपण लहानपणी कॅनॉलवर टो-बॉय म्हणून काम केले, असे मी जे वाचले हे खरे का ? गारफिल्डनी त्या

पत्राचे उत्तर दिले.त्यानंतर त्याने जनरल ग्रांटना काही विशिष्ट लढायांबद्दल विचारले आणि ग्रांटनी स्वतः नकाशे काढून त्याला सगळे समजावले आणि या अवघ्या चौदा वर्षांच्या मुलाला जेवायला बोलावून सबंध संध्याकाळ एकत्र व्यतीत केली.थोड्याच दिवसांत या शिपायाने अनेक प्रसिद्ध व्यक्तींशी संपर्क साधला - राल्फ वॉल्डो इमर्सन,ऑलिव्हर वेंनडेल होम्स,लाँग फेलो,मिसेस अब्राहम लिंकन,लुईसा मे अलकॉट, जनरल शर्मन आणि जेफरसन डेव्हिस.दर सुट्टीत तो त्यांना भेटायला जात असे व त्याचे तेथे यथेच्छ स्वागत होत असे.पत्रव्यवहारापलीकडे जाऊन मिळवलेल्या त्याच्या या अनुभवांमुळे त्याच्यात प्रचंड आत्मविश्वास निर्माण झाला.त्याचीसुद्धा समाजात काहीतरी किंमत आहे,याची त्याला जाणीव झाली.ह्या सर्वांमुळे त्याच्यात जिद्द जागी झाली,

महत्त्वाकांक्षा निर्माण झाली आणि त्याच्या आयुष्याला आकार आला.या प्रकरणातील तत्त्वांमुळेच,ती आचरणात आणल्यामुळेच एडवर्ड बॉकला हे यश मिळाले होते.


पत्रकार आयझेंक मॅरेकोसनने शेकडो ख्यातनाम व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या.त्याच्या मते,अनेक लोक आपली चांगली छाप पाडू शकत नाहीत.कारण,ते नीट लक्ष देऊन ऐकण्यात कमी पडतात.आपल्याला आपले मत मांडायचे आहे,या सततच्या विचारामुळे त्यांचे लक्ष ऐकण्यावर केंद्रित होऊ शकत नाही.चांगले बोलणाऱ्या लोकांपेक्षा चांगले ऐकणारे लोकच जास्त लोकप्रिय असतात;पण ऐकण्याची क्षमता असणे इतर चांगल्या गुणांप्रमाणेच दुर्मीळ आहे.फक्त महत्त्वाच्या मोठ्या लोकांनाच उत्तम श्रोते आवडतात असे नाही,तर सामान्य लोकांनासुद्धा श्रोतेच आवडतात.रीडर्स डायजेस्टमध्येही एकदा म्हटले होते की,जेव्हा लोकांना श्रोते हवे असतात,तेव्हा ते डॉक्टरांना बोलावतात.


सिव्हिल वॉरच्या सर्वात कठीण दिवसांमध्ये लिंकननी स्प्रिंगफिल्ड (इलिऑनिस) मधील आपल्या जुन्या मित्राला पत्र लिहिले की,

वॉशिंग्टनला काही दिवसांसाठी येऊन मला भेट,कारण मला माझ्या काही समस्यांवर चर्चा करायची आहे.लिंकनच्या या जुन्या शेजाऱ्याला व्हाईट हाउसमध्ये बोलावले गेले आणि लिंकन कित्येक तास त्याच्याशी बोलत राहिले.गुलामांच्या मुक्ततेच्या जाहीरनाम्याविषयी चालू असणाऱ्या या चर्चेत लिंकन स्वतःच या जाहीरनाम्याचे समर्थन करणारे व विरुद्ध बाजूचे असे दोन्ही प्रकारचे मुद्दे मांडून एकटेच वादविवाद करत होते.नंतर त्यांनी त्यांची निंदा करणारी काही पत्रे व वर्तमानपत्रातील कात्रणे वाचून दाखवली. काहींना गुलामांच्या मुक्ततेबद्दल भीती वाटत होती,तर काहींचे मत असे होते की लिंकन यांनी गुलामांना मुक्त करायला हवे.खूप वेळ बोलून झाल्यानंतर लिंकननी त्या आपल्या जुन्या शेजाऱ्याचा गुड नाइट म्हणून निरोप घेतला.त्याचे मतसुद्धा विचारले नाही.इतका वेळ लिंकन स्वतःएकटेच बोलत होते,जणू काही ते त्याच्या मनाला त्याच्या वागण्याची सफाई देत होते.तो जुना मित्र म्हणाला,या बोलण्यानंतर त्याला खूप बरे वाटले. लिंकनला कोणाचाही सल्ला नको होता.तर फक्त सहानभूतीने व मित्रत्वाच्या नात्याने त्याचे ऐकणारा, त्याचे मन हलके होईल असा एक श्रोता हवा होता. एखाद्या संकटात असणाऱ्या कोणालाही हेच हवे असते. त्रस्त ग्राहकांनासुद्धा,असमाधानी मालकाला आणि दुखावलेल्या मित्रालासुद्धा याचीच गरज असते.


आधुनिक काळातील सर्वात उत्तम श्रोता म्हणजे सिग्मंड फ्रॉईड.फ्रॉईडच्या व्यक्तिमत्त्वाने भारावून गेलेला एक माणूस म्हणतो,माझी व त्याची भेट अत्यंत संस्मरणीय होती.इतर कोणातही नसलेले काही सद्गुण मला त्याच्यात दिसले.

समोरच्याचे ऐकताना तो चित्त एकाग्र करून ऐकतो.त्याचे डोळे अगदी शांत असतात. आवाज अत्यंत हळू व प्रेमळ असतो.चेहऱ्यावर फारसे भाव नसतात;त्याने संपूर्ण लक्ष देऊन मी जे बोललो ते ऐकले.ते विशेष चांगले नव्हते,

तरीसुद्धा त्याचे त्याने कौतुक केले.लक्षपूर्वक ऐकणे म्हणजे काय याचे हे अतिशय उत्तम उदाहरण आहे.स्वतःबद्दल अव्याहतपणे बडबडत राहून कोणाचेच काहीही न ऐकणाऱ्या माणसाची लोक टिंगल करतात किंवा त्याला टाळतात किंवा त्याचा तिरस्कार करतात.समोरचा माणूस काही बोलत असतानाच तुमच्या डोक्यात एखादी कल्पना आलीच,तर त्याचे बोलणे संपायची वाटही न पाहणारी,त्याचे वाक्य मध्येच तोडून सरळ बोलत सुटणारी काही ख्यातनाम माणसेही या जगात आहेत.दुर्दैवाने,अशी माणसे आहेत.अशी माणसे खूपच कंटाळवाणी असतात.त्यांचा अहंकार आणि मीपणा यामुळे ते समोरच्याला नकोसे होतात.फक्त स्वतःचा विचार करणारे लोक स्वतःबद्दलच जास्त बोलतात. 


प्रदीर्घ काळापर्यंत कोलंबिया विद्यापीठाचे प्रेसिडेंट असणारे डॉ.निकोलस म्हणतात,स्वतःचा विचार करणारे लोक मूर्ख व अशिक्षित असतात.त्यांना थांबवायचा कितीही प्रयत्न केला,तरी त्यांचे मी-मी करणं काही संपतच नाही.


एक उत्तम श्रोता नक्कीच उत्तम संभाषण करू शकतो. लोकांच्या बोलण्यामध्ये तुम्ही रस घेतलात तर ते तुमच्या बोलण्यात रस घेतीलच.ज्यांची उत्तरे देणे आवडेल, असेच प्रश्न लोकांना विचारा.त्यांना त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या यशाबद्दल बोलण्यास प्रोत्साहन द्या.


तुमच्याशी बोलणाऱ्या माणसांना तुमच्यामध्ये किंवा तुमच्या समस्यांमध्ये फारसा रस नसतो,तर त्यांना स्वतःमध्ये व स्वतःच्या समस्यांमध्ये अधिक रस असतो, हे कधीच विसरू नका.अस्मानी संकटात कुणाचे किती नुकसान झाले;कोणावर कुठले दुःख ओढवले यापेक्षा कुठल्याही माणसाला स्वतःची दातदुखी अधिक महत्त्वाची वाटत असते.आफ्रिकेतील चाळीस भूकंपांच्या धक्यांपेक्षा एखाद्याच्या मानेवरचे गळू हे त्याच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे असते.कोणाशीही संवाद साधताना ही गोष्ट विसरू नका.


उत्तम श्रोता बना.इतरांना स्वतःबद्दल बोलण्यास प्रोत्साहन द्या. २४.११.२४ या लेखातील शेवटचा भाग..


२४/११/२४

उत्तम संभाषण कला/An easy way to learn

ही वर्षांपूर्वीची घटना का मी ब्रिज खेळणाऱ्यांच्या एका पार्टीला गेलो होतो.मला ब्रिज खेळता येत नाही आणि तेथे आणखी एक स्त्री बसली होती,तिलाही बहुधा ब्रिज खेळता येत नव्हते.तिला असे माहिती होते की,मी लॉवेल थॉमसचा व्यवस्थापक होतो आणि मी त्याच्याबरोबर युरोपभर प्रवास केला आणि त्याची भाषणे तयार करण्यासाठी साहाय्य केले होते.ती म्हणाली,कार्नेगी तुम्ही आजवर अनेक प्रेक्षणीय स्थळांना भेट दिली,त्या सर्व स्थळांचे वर्णन मला तुमच्या तोंडून ऐकायचे आहे.आम्ही सोफ्यावर बसलो.

ती म्हणाली की,ती व तिचे पती नुकतेच आफ्रिकेतून परतले होते.

आफ्रिक्रा? मी जोरात म्हणालो - किती मस्त ! मला आफ्रिकेला जाण्याची तर खूप दिवसांपासून इच्छा आहे,पण काही जमलं नाही. मी एकदाच चोवीस तासांसाठी अल्जायर्सला गेलो होतो. मला तुझ्या सहलीबद्दल सांग प्लीज ! तू खरंच खूप लकी आहेस ! तुझा हेवा वाटतो खूप.मी अशी स्तुती केल्यावर ती पंचेचाळीस मिनिटे बोलत राहिली.मी कुठे जाऊन आलो किंवा मी जगप्रवासात काय केले,याविषयी तिने काहीच विचारले नाही. वास्तविक तिला माझ्या जगप्रवासाबद्दल ऐकण्यात तसा काही रस नव्हता.तिला गरज होती ती एका उत्तम श्रोत्याची.त्यामुळे तिचा इगो सुखावला जाणार होता.आता हे तिचे वागणे विचित्र होते का? मुळीच नाही.बहुतांश लोक असेच तर वागतात.


असंच आणखी एक उदाहरण पाहू.मला भेटलेला तो एक प्रख्यात वनस्पतीशास्त्रज्ञ होता.न्यू यॉर्कमधील एका प्रकाशकाने नाइट पार्टी आयोजित केली होती.त्यामध्ये तो आला होता.माझं आणि त्याचं यापूर्वी कधीच बोलणं झालं नव्हतं.पण त्याच्याशी संवाद साधणे मला खूप भावले.मी त्याचे बोलणे अगदी मनापासून ऐकू लागलो. तो परदेशातल्या नानाविध झाडांबद्दल आणि रोपट्यांवरील नवीन प्रयोगांविषयी,होम-गार्डन्सबद्दल मला माहिती देत होता.त्याने मला बटाट्यांच्या दुर्मिळ प्रकाराबद्दलही मजेशीर माहिती दिली.माझ्या घरातल्या बागेच्या समस्यांवरसुद्धा उपाय सांगितले.


त्या डिनर पार्टीत अनेक पाहुणे आले होते.पण मी पार्टी-एटिकेट्स बाजूला ठेवले.अन्य कोणाशीही बोललो नाही मी.कितीतरी तास मी फक्त त्या इसमाशीच बोलत राहिलो.मध्यरात्र झाली.प्रत्येकाला गुडनाइट केले आणि मी घरी निघालो.त्या वनस्पतीतज्ज्ञाने मला डिनरसाठी बोलावले,त्याने माझे मनापासून कौतुक केले.माझ्याशी गप्पा मारल्याने तो किती खूश झालाय आणि मी किती चांगला माणूस आहे वगैरे वगैरे.शेवटी तो म्हणाला की, आजपर्यंत भेटलेल्या सर्वांमध्ये मीच सर्वोत्तम संवाद कुशल होतो.मी सर्वोत्तम संवादपटू ? कसा काय बरं? चार-पाच वाक्यांशिवाय मी तज्ज्ञाशी अन्य काहीच तर बोललो नव्हतो.कारण वनस्पतीशास्त्र याविषयी मला काहीच ज्ञान नव्हते.प्राणिशास्त्राबद्दलही मी अज्ञानीच होतो.पण तो जे बोलत होता.


ते मी शांतचित्ताने ऐकून घेतले.मी अगदी प्रामाणिकपणे स्वारस्य घेऊन त्याचे ऐकले आणि हेच त्याला खूप आवडले.त्यामुळेच तो उल्लसित झाला.


दुसऱ्याचे बोलणे ऐकणे म्हणजे त्याचा योग्य तो सन्मान करणे होय.जॅकवुड फोर्डच्या स्ट्रेंजर्स इन लव्ह या पुस्तकामध्ये तो म्हणतो की,दुसऱ्याची स्तुती मन लावून ऐकणारे संख्येने अगदी कमी मानवप्राणी असतात.मी तर त्याच्यापेक्षाही थोडे पुढे गेलो होतो.मी त्यांची अगदी मनापासून स्तुती केली.त्याचे बोलणे एकाग्रतेने ऐकले आणि मुक्तकंठाने त्याला दादही दिली.


मी त्यांना सांगितले की,त्यांचे बोलणे मनोरंजक तर आहेच पण अत्यंत उपयुक्तही आहे.आणि मला त्यातून काही मोलाच्या सूचनाही मिळाल्या होत्या.त्यांचे ज्ञान मला मिळाल्यामुळे मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. त्यांच्याबरोबर शेतात भटकायला,कुत्र्याला पुन्हा भेटायला मला खूप आवडेल.


यामुळेच कदाचित ते मला संवादकुशल समजले असतील.खरंतर मी फक्त श्रवणभक्ती केली होती. ज्याच्यामुळे त्यांना बोलण्यास प्रोत्साहन मिळाले.


उद्योग व्यवसायातील मुलाखती यशस्वी कशामुळे होतात ? यशस्वी बिझिनेस मीटिंगमागे काही विशेष रहस्य असते का? इलिअटच्या मते,तुमच्याशी बोलणाऱ्याचे बोलणे तुम्ही लक्षपूर्वक ऐकणे हेही समोरच्याला खूष करणारे असते.

इलिअट स्वतः एक उत्तम श्रोता असून अमेरिकेतील महान कादंबरीकार हेन्री जेम्स त्याच्याबद्दल बोलताना म्हणतात-डॉ. इलिअटचे लक्षपूर्वक ऐकणे म्हणजे फक्त मौन नव्हते, तर क्रियाशीलतेचा तो एक वेगळा प्रकार होता.तो पाठ सरळ ठेवून अगदी ताठ मांडी घालून बसत असे, हाताची घडी घालून ती मांडीवर टेकवत असे.बाकी कुठलीही हालचाल नाही.फक्त हाताचा अंगठा गोलाकार फिरवीत असे.कधी जोरात,तर कधी हळूहळू.

त्याच्याशी संभाषण करणाऱ्या व्यक्तीकडे तोंड करून तो बसत असे.त्याच्याकडे एकटक बघत,संपूर्ण चित्त एकाग्र करून,तो बोलणे ऐकत असे.बोलणाऱ्याला पूर्णपणे व्यक्त झाल्याचे समाधान त्याच्या या कृतीमुळे निश्चितच मिळत असे आणि ते त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असे.हे शिकायला मोठ्या विद्यापीठाची गरज आहे असे तुम्हाला वाटते का? काही मोठे व्यावसायिक खूप मोठे भाडे देऊन दुकानासाठी मोठी जागा घेतात.खूप घासाघीस करून कमीतकमी किमतीत वस्तू मिळवतात.दुकानाच्या आकर्षक सजावटीसाठी खूप खर्च करतात.हजारो डॉलर्सच्या जाहिराती करतात आणि त्यांच्या दुकानातील काही विक्रेते लोकांना नीट बोलूही देत नाहीत,त्यांच्याशी वादविवाद करतात,त्यांना त्रास देतात आणि शेवटी त्यांना दुकानातून बाहेर घालवतात.


शिकागोमधील एका डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये त्यांच्या उद्धट विक्रेत्यामुळे,एक मौल्यवान,हजारो डॉलर्स वर्षाला खर्च करणारा ग्राहक दुकानाकडे पाठ फिरवून निघाला होता.त्या विक्रेत्यामध्ये समोरच्याचे ऐकून घेण्याचे कौशल्य नव्हते.मिसेस डगलस या शिकागोमध्ये आमचे क्लासेस घ्यायच्या.त्या स्टोअरच्या सेलमधून त्यांनी एक कोट विकत घेतला.घरी आल्यावर त्यांच्या लक्षात आले की,कोटाच्या अस्तराला एक भोक होते.दुसऱ्या दिवशी दुकानात जाऊन त्यांनी कोट बदलून मागितला.ते तर दूरच राहिले,त्या विक्रेत्याने सरळसरळ त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले.तो म्हणाला,

हा कोट तुम्ही खास सेलमधून विकत घेतला आहे.जवळच्या भिंतीवर लावलेला बोर्ड त्यांना दाखवत तो म्हणाला,एकदा विकलेला माल परत बदलून मिळणार नाही.तुम्ही हा कोट शिवून वापरू शकता.


मिसेस डगलसने विचारण्याचा प्रयत्न केला,की असा फाटका माल तुम्ही विकायला ठेवलाच कसा? पण तो त्यांना काही बोलूच देईना.तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला.मिसेस डगलस संतापल्या होत्या.त्या दुकानातून निघून जाण्याच्या बेतात होत्या आणि परत त्या दुकानाचे नावही काढायचे नाही असे त्यांच्या मनात येत होते. तेवढ्यात त्या दुकानाचा मॅनेजर आला.तो त्यांना फार पूर्वीपासून ओळखत होता.त्याने त्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकून घेतले.तो कोट पाहिला आणि तो म्हणाला - प्रत्येक वर्षाअखेरीस आम्ही जो स्पेशल सेल लावतो, त्यात विकलेला माल परत घेत नाही;पण हे तत्त्व सदोष वस्तूंसाठी लागू पडत नाही.

आम्ही तुम्हाला त्या कोटाचे अस्तर नीट करून किंवा दुसरे लावून नक्कीच परत मिळेल किंवा तुम्हाला पैसे हवे असतील,तरीही आम्ही ते परत देऊ.विक्रेत्याच्या आणि मॅनेजरच्या वागण्यात जमीन अस्मानाचा फरक होता! त्या मॅनेजरने त्या दुकानाच्या सर्वांत जुन्या आणि एकनिष्ठ ग्राहकाला कायम ठेवण्यामागे त्या मॅनेजरचे किती मोठे कौशल्य कामी आले होते.


लक्षपूर्वक ऐकणे हे सर्वच घरगुती आघाड्यांवर जसे उपयुक्त ठरते,तसेच ते उद्योगजगतातसुद्धा उपयोगी असते.न्यूयॉर्क येथील मिसेस एस्पोसिटो यांच्या मुलांना त्यांच्याशी बोलावेसे वाटते तेव्हा त्या हातातले काम सोडून त्यांचेच ऐकतात.त्यावेळी इतर कशालाही त्या महत्त्व देत नाहीत.एका संध्याकाळी मुलाबरोबर, रॉबर्टबरोबर डायनिंग टेबलपाशी गप्पा मारताना रॉबर्टच्या मनात अचानक काय आले कोणास ठाऊक! पण तो एकदम त्यांना म्हणाला,मॉम,तुझे माझ्यावर खूप प्रेम आहे,मला माहितीए ! मिसेस एस्पोसिटो हे ऐकून गहिवरून गेल्या व म्हणाल्या- अर्थातच ! मला तू खूप आवडतोस यात काहीच शंका नाही.रॉबर्ट म्हणाला,मला असे का वाटते माहितीए ? कारण,जेव्हा कधी मी तुझ्याशी काही बोलायला येतो,तेव्हा तू हातातले काम थांबवून माझे बोलणे काळजीपूर्वक ऐकतेस.(उत्तम संभाषणकला अवगत करण्याचा सहजसोपा मार्ग,मित्र जोडा आणि प्रभावशाली बना,डेल कार्नेगी,

मंजुल प्रकाशन) कायम इतरांची उणीदुणी काढणारा एखादा सराईत टीकाकार शांतपणे,लक्षपूर्वक ऐकणारा श्रोता मिळाला,तर मात्र नमते घेतो.जणू असा श्रोता महाविषारी कोब्रा नागासारखे सतत फूत्कार टाकणाऱ्या टीकाकाराचेही सगळे विष सहजी पचवून टाकत असतो.याबाबतीतली एक मोठी गंमतशीर सत्यघटना आता पाहा.काही वर्षापूर्वी न्यूयॉर्क टेलिफोन कंपनीचा एक ग्राहक त्यांच्या सेवेला सतत नावे ठेवत असे. त्यांच्याशी उद्धटपणे वागत असे.तो फोन मुळापासून उपटून टाकीन,अशा धमक्या देतो.तो त्याला आलेली बिले चुकीची आहेत असे सांगून ती भरायला कांकूं करतो.वर्तमानपत्रात त्यांच्याविरुद्ध पत्रे लिहिणे,पब्लिक सर्व्हिस कमिशनकडे अनेक तक्रारी करणे याबरोबर एकदा त्याने टेलिफोन कंपनीच्या विरोधात कोर्टात केसेस दाखल केल्या.शेवटी कंपनीने तेथील एका संकटविमोचन अधिकाऱ्याला नाठाळ ग्राहकाकडे पाठवला.त्याने त्याच्या सगळ्या तक्रारी शांतपणे ऐकल्या.त्याला जेवढे गरळ ओकायचे तेवढे ओकू दिले आणि त्यातील आनंद खुशाल उपभोगू दिला.एवढेच नाही,तर त्याचे सगळे म्हणणे कबूल केले.


हा संकटविमोचन अधिकारी सांगत होता,तो सुमारे तीन तास आग ओकत होता आणि मी फक्त ऐकत होतो. असे तब्बल चार वेळा झाले आणि मग चौथ्या भेटीनंतर ग्राहकांच्या हितासाठी त्यांनी सुरू केलेल्या संस्थेचा मी सभासद झालो.त्या संस्थेचे नाव होते,टेलिफोन सबस्क्रायबर्स प्रोटेक्टिव्हअसोसिएशन.आजतागायत मी त्या संस्थेचा सभासद आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे मी आणि तो यांच्याशिवाय या जगात दुसरा कोणीच या संस्थेचा सभासद नाही.


उर्वरित राहिलेला भाग पुढील लेखामध्ये…!



२२/११/२४

पाखरांची विश्रामगृह / Resting house of birds

 रशियन लेखक 'व्लादिमीर अर्सेनीव' यांनी 'देरसू उझाला' या प्रवासवर्णनात  पक्ष्यांची निरिक्षणे आणि नोंदी टिपल्या आहेत.झाडं जशी दाट होतात तशी खोली वाढत जाते.त्यापुढं माणसं खुप खुजी वाटतात. तशा खोलीत पाखरं निर्धास्तपणे झाडावर आसरा घेतात.   " सकाळी पक्षी भरभर खात होते.आता नाही.नाहीतर संध्याकाळी यावेळेला पक्ष्यांची नुसती गडबड उडालेली असते.पण आता जंगलात स्मशान शांतता पसरली होती.जणूकाही कोणाच्यातरी आज्ञेनुसार सर्व पक्षी लपून बसले होते.यामधून लेखकाला धोक्याची चाहूल लागली होती.त्यानंतर प्रचंड बर्फवृष्टी झाली.निसर्गातील संकटे अगोदर पक्ष्यांना कळतात त्यानंतर माणसाला.


माती झाडांना जीवनरस पुरविते म्हणून पानं,फुलं, फळं टवटवीत दिसतात.या झाडांवर पक्ष्यांचं गोकुळ  नांदत असतं.झाडं आणि पाखरं ही निसर्गातील काव्यचित्र.पाखरं बियांचा प्रसार करून जंगल वाढवितात.हीच झाडं पाखरांना भरवतात.झाडं आकाशाकडे झेपावतात अन् पाखरं झाडाकडे.वडा- पिंपळाच्या हिरव्या गर्द झाडीत हारोळ्या लपून बसतात. त्यांना पिकलेली रसाळ फळं खूप आवडतात.पाखरांच्या येण्यानं झाडंही सुखावत असतात.पाखरांना झाडांचा लळा लागला की,ती फार दूर जात नाहीत.झाडं ही पक्ष्यांची निवासस्थानं आहेत.सुगरण पक्ष्यांची घरटी झाडाच्या फांदीवर झुलताना अनेकदा पाहिली.हळदीनं माखलेल्या सुगरण तिथं नांदायला येतात.कवयित्री 'बहिणाबाई चौधरी' त्यांच्या घरट्याला 'बंगला' म्हणतात.बंगल्यातून वावरणारी ही पाखरं कुणाला आवडणार नाहीत!झाडांचं आणि या पाखरांचं एक अतूट नातं असतं. जिव्हाळा ओतपोत भरलेला असतो. पावसाळ्यातील दिवस या पक्ष्यांच्या सहवासाने मंतरलेले असतात. सप्टेंबर महिन्यातील त्यांच्या हालचाली घरट्यासह कागदावर उतरवणं सोपं जातं.काटेरी झाडावर त्यांची घरटी झुलू लागतात.विहिरी,जलाशयाच्या काठावरची झाडं त्यांच्या आवाजानं जागी होतात.त्या झाडावरच्या फांद्या घरट्यासाठी जागा देतात. (पक्षी येती अंगणी या पुस्तकाचे लेखक माणिक पुरी यांच्या निरीक्षणा खालील नोंदी..)

  

 एका झाडावर अनेक घरटी झुलताना दिसतात. 'सुगरणवस्ती' म्हणावी लागेल.पक्षीकुळातील घरट्यांचा एक उत्तम नमुना म्हणून या घरट्याचं बारकाईनं निरीक्षण केलं जातं.काही ठिकाणी या पक्ष्यांची दोन मजली घरटी पाहायला मिळतात.अवघड घरटं सोप्या पद्धतीने विणत जातात.इंद्रायणी माळावरील पळसाच्या झाडावरची घरटी सूर्यकिरणात स्वतःला न्याहाळतात.पावसाचं पाणी पिऊन गवताची पाती तरारून येतात.या गवतामुळे तिच्या पिलांना उब मिळते.झाडावरच्या झुलणाऱ्या पाळण्यात तिची लेकरं लहानाची मोठी होतात.पावसाळा आला की,या झुलणाऱ्या बंगल्याची आठवण येते.


 चोरट्या रानवाटा घाणेरीच्या झाडांनी झाकून जातात.त्यांची उग्र वासाची फूलं  कुणाला आवडत नाहीत.रंगीबेरंगी पाकळ्या डोकावत चित्रकाराला आकर्षित करतात.माळरानावरील या झाडाजवळ 'चंडोल' पक्ष्यांची घरटी दिसून येतात.तरोट्याचं पिक माजतं पण या पक्ष्याच्या पिलांना खेळवतं सुद्धा.निसर्गातील रंगसंगतीमुळे त्यांची वीण लवकर कळत नाही.

पोटाच्या साह्याने खोलगट भाग करून त्याभोवती रंगीत,मातकट खड्यांचा ढीग तयार करतात. उघड्यावरचं घरटं मोडून पडलेल्या संसारासारखं दिसतं.पण ती हिमतीनं संसार करते.त्या घरट्यात मऊ गवत आणते.बाळासाठी अस्तर बनविते.त्यात खड्याच्या रंगाची अंडी उबवते.घरट्याशेजारची झाडं हळूहळू मोठी होतात.त्यांची घरटी झाकोळून जातात. दोघेही अंडी उबवतात.पिलांना भरवतात.


काही चंडोल पक्ष्यांची घरटी उघड्या जागेवरही पाहायला मिळतात.ती गवताच्या आडोशानं वावरतात. रानवाटेवरची त्यांची छबी फारच मनमोहक असते.मी अनेक वेळा या पक्ष्यांना पाहिलय.त्यांच्या घरट्याचं निरिक्षण केलय.हे पक्षी सुगरण पक्ष्यासारखी साहित्याची जमवाजमव करत नसल्याचं दिसतं.


 पक्षीनिरीक्षक 'किरण मोरे' यांनी 'माळरानावरील चंडोल' या पुस्तकात चंडोल पक्ष्यांच्या घरट्याच्या नोंदी अचूकपणे केल्या आहेत.त्या पक्ष्याविषयीचा माहितीपट सुद्धा बनविला आहे.


 खुरटी गवताची रानं,माळरान,पडीक जमिनी या भागात  पक्ष्यांची घरटी आणि वीण पाहायला मिळते.जनावरांच्या पायांनी ही घरटी उध्वस्त होतात.माळरान म्हटलं की जनावरांचं कुरण.पण तिथे या पक्ष्यांचा संसार असतो हे कुणाच्या ध्यानीमनीही नसतं.'चंडोल' पक्ष्यापेक्षाही 'टिटवी' घरटं तयार करण्यासाठी आळशी असते. 'माळटिटवी' तर खड्यांच्या आश्रयाने घरटं बनविते.उन्हाळ्यातील दिवसात तिची पिलं अंड्यातून बाहेर येतात.तिला घरट्यासाठी झाडपाणाची गरजच भासत नाही. 'डॉ. संदीप साखरे' यांनी माळटिटवीच्या घरट्याचं बारकाईनं निरीक्षण करून नोंदी घेतल्या आहेत.मागील पाच वर्षापासून त्यांनी माळटिटवीचा पाठलाग केलाय.नर-मादा संबंध.नर-पिलं संबंध.नर-शेजारील कुटुंब.नर- टिटवी कुटुंब.नर-इतर पक्षी सहसंबंध.नर -प्राणी सहसंबंध.

माळटिटवीच्या पक्षीकुळाचा मोठा आवाका घेऊन त्यांनी काम कलं आहे. माळटिटवी-जंगली प्राणी सहसंबंध.माळटिटवी-

पाळीव प्राणी सहसंबंध. माळटिटवी- माणूस सहसंबंध. माळटिटवी- यंत्र सहसंबंध.


 टिटवी आपल्या घरट्यापासून दूर उभी राहते.तिचं परिसरातल्या घडामोडीवर बारकाईनं लक्ष असतं.कधी लंगडत चालते.कधी आरडा-ओरडा करते.कधी आक्रमक होते.घरट्याचं संरक्षण करते.या पक्ष्यांची घरटी पाहण्यासाठी एका जागेवर जास्त वेळ बसावं लागतं.एकदा घरटी सापडली की,पुढच्या नोंदी करणं सोपं जातं.

  

 घाणेरीची झाडं मोठी झाली की,बुलबुल पक्ष्यांना घरटी करायला जागा देतात.काशिद,करंज,कडूलिंब,डाळिंब, काही झुडपातून बुलबुल पक्ष्यांची घरटी दिसून येतात. वाटीच्या आकाराचं घरटं बनवितात.कापसाच्या झाडावरही त्यांची घरटी पाहता येतात.

कापसावरील हिरव्या आळ्या पिलांना भरवताना पाहिलय.त्यांची घरटी फांदीच्या दुबुळक्यात पक्की बसलेली.वानराच्या पिलानं आईच्या कुशीत चिटकुन बसावं अगदी तशीच ही घरटी दिसत होती.इंद्रायणी माळावर या पक्ष्यांची वीण पाहायला मिळते.


माझे मित्र 'भारत ठोंबरे' आणि 'नितीन बाभळे' यांच्यासोबत लोणावळ्याला जाण्याचा योग आला. पहाटेच्या वेळी डोंगर उतारावरून उतरताना झाडांची विविधता अनुभवत होतो.तेवढ्यात घरट्यातून 'बुलबुल' खाली उतरला.त्याने एका फुलपाखराचा पाठलाग केला. चोचीत पकडून घरट्याकडे झेपावला.मला वाटायचं परभणीतील बुलबुल आणि लोणावळ्यातील बुलबुल मध्ये काही फरक असेल.परंतु तसा फरक काही आढळला नाही.पक्षीतज्ञ 'विद्याधर म्हैसकर' यांनी बुलबुल पक्ष्यावर 'एक बुलबुल म्हणाला' ही कादंबरी लिहिली आहे.एखाद्या पक्ष्यावर स्वतंत्र अशी कादंबरी लिहिणारे लेखक फारच कमी.


   प्रसिद्ध लेखक 'धनगोपाल मुखर्जी' यांनी कबुतर पक्ष्याच्या जीवनाविषयी कादंबरी लिहिली आहे. त्याचा हिंदी अनुवाद 'तालेवर गिरि' यांनी 'चित्र-ग्रीव एक कबूतर की कहानी' या नावानं प्रसिद्ध केला आहे.ही वाचणीय कादंबरी.आपलं आयुष्य सुंदर करण्यासाठी पक्षी सुद्धा महत्त्वाचे आहेत.भौतिक सुविधा मिळवून माणसं श्रीमंत होत नसून पहाटेच्या किरणात पक्ष्यांचा किलबिलाट ऐकला की जीवन सार्थक झाल्याचं समाधान लाभतं.


गावातील वड,पिंपळ अशा झाडावर कावळे वास्तव्यास येतात.

काही गावालगतच्या  झाडावरही त्यांची वस्ती पाहायला मिळते.त्यास 'काकागार' असे म्हणतात. परंतू त्या झाडावर त्यांची काही घरटी दिसतात. विणीच्या काळात वेगवेगळ्या झाडावर घरटी करताना दिसतात.काड्या ओबडधोबड रचून घरटं बनवितात.घरट्याला आकर्षितपणा नसतो.


जसं सुगरण पक्ष्यांच्या घरट्याला 'खोपा' म्हटलं जातं तसं कावळ्याच्या घरट्याला कोटरे म्हणतात.अनुभवी कावळ्यांची कोटरे लवकर होतात.घरटी तयार करताना एक कावळा घराभोवती पहारा देतो.


अनेक वेळा निरीक्षण करूनही 'कोकिळा' कावळ्याच्या घरट्यात अंडी कशी घालते हे पाहता आलं नाही.हुशार कावळ्याला ती फसवते.


आंब्याच्या झाडावरची कावळ्याची घरटी अनेकदा पाहिली.त्यांची भांडणं व्हायची.एकदा घरट्याची जागा निश्चित झाली की त्यांचा संसार सुखानं चालतो.दुरूनही ही घरटी सहज ओळखता येतात.

'चिमणी' आणि 'कावळा' हे पक्षी सर्वपरिचित.या पक्ष्यांभोवती बालपणीच्या रंगीत आठवणी गुंतलेल्या असतात.त्यांची घरटी पाहताना बालपण आठवतं.गावालगत त्यांची घरटी आढळतात तशी जंगलातही. त्यांच्या घरट्याच्या उंचीवरून पावसाचा अंदाज बांधला जातो.म्हणून कावळ्याला 'हवामानशास्त्रज्ञ' असं नाव पडलं असावं.जशी 'काकागार' तशी 'सारंगागार'.बगळ्यांच्या रातनिवार्‍याला सारंगागार म्हटलं जातं.उजळ आंबा परिसरातील झाडं,नांदेड रेल्वे स्थानकाबाहेरील झाडं, परभणी बसस्थानकाशेजारील झाडं बगळ्याच्या आवाजानं आनंदून गेलीली.तिथं त्यांची घरटी पाहायला मिळतात.दिवसभर त्यांच्या आवाजानं तेथील वातावरणात हिरवेपणा जाणवतो.पक्ष्यांची सीट पडल्यामुळे झाडांचे खोड कोलाज केल्यासारखे भासतात.त्या परिसरात या सीटमुळे नाकाला झोंबणारा वास येतो.वर्षानुवर्षे या झाडावर त्यांची वस्ती पाहायला मिळते.जनावरांच्या पाठीमागे तुरुतुरु चालणारे जमिनीवरचे पांढरे ढगच! हिरव्या झाडांवर बगळ्यांची रांग उतरते तेव्हा वर्गातल्या हिरव्या फळ्यावरची पांढरी अक्षरं वाटतात.घरट्यातली  त्यांची पिलं माना वर उचलत तेव्हा मी बोटावर उभा असतो.आकाशातील पांढरी नक्षी पुढं सरकताना मी रस्त्याच्या कडेला एकटाच असतो.

   

लेखक 'आनंद विंगकर' यांच्या 'अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट' या कादंबरीत कावळ्याचे वेगवेगळे संदर्भ आणि टिपणं वाचून भारावून जातं. कादंबरी वाचकाला कवेत घेऊन पुढं सरकते.पक्षीतज्ज्ञ 'मारुती चितमपल्ली' यांच्या 'आनंददायी बगळे' या पुस्तकातून बगळे डोकावतात.


मी एकदा 'शिंजीर' पक्ष्याचं घरटं बघितलं.बाभळीच्या झाडावर लटकलेलं.वाऱ्यासोबत हेलकावे खात. चिमणीपेक्षा लहान असणारा पक्षी. या पक्ष्याने पुन्हा एकदा माझ्या आयुष्यात डोकावून पाहावं असं मला सारखं वाटतं.


 'गिधाड' पक्ष्यांची घरटी उंच झाडावर असतात.परंतू वृक्षतोडीमुळे त्यांची निवासस्थाने नष्ट होत आहेत. परिसरातील काही झाडं या पक्ष्यांसाठी राखीव ठेवणे काळाची गरज झाली आहे.लहानपणी पाहिलेले गिधाड पक्षी आज शोधूनही सापडत नाहीत.


 'शिंपी' पक्ष्याचं घरटं अनेकदा पाहिलय.वडाच्या पानात ती विसावतात.पानाला कापसासारख्या धाग्यापासून शिवतात.

आतील भागात मऊ अस्तर तयार करून त्यात अंडी उबवतात.एकदा वडाची फांदी तोडून शाळेच्या पाठीमागील बाजूस टाकली तेव्हा घरटं आढळलं.त्यात अंडी नव्हती.

नुकतच घरटं तयार केलं होतं.त्यानंतर शिंपीचा आवाज वडाभोवती घुटमळत राहिला.काही दिवसांनी तो आवाज कानावर आला.माझी नजर पानाकडं भिरभिरली.एक पान आतील बाजूस झुकलेलं दिसलं.त्यात शिंपी बसलेला होता.ते पाहून मला खूप आनंद झाला. एक घरटं पाहून आश्चर्य वाटलं. कापसाच्या झाडाचे ३ - ४ पानं एकत्रित शिवून घरटं तयार केलेलं.कापसाच्या आतील बाजूकडून प्रवेशद्वार होतं.पाखराची कारागिरी पाहून थक्क झालो. कापसाच्या पानाला ठराविक अंतरावर छिद्रे पाडून त्यांना धाग्यांनी एकत्रित केलं होतं.तो शिंपी आजही आठवतो.जशी काही पक्ष्यांची घरटी रानावनात पाहायला मिळतात तशी घरातही. घरात वावरणारी चिमणी आठवते.

फोटोच्या पाठीमागे,मातीच्या भिंती,परसातली झाडं चिमण्यांच्या आवाजानं जागी होतात. तिच्या पिलांचा चिवचिवाट घरभर पसरतो.तिचं घरटं करणं सुरू असतं तेव्हा घरभर कचरा पडलेला असतो. दुपारच्या वेळी घरातली चिमणी शाळेत असते तेव्हा या चिमण्यांची सोबत असते.घरातला फेकून दिलेला कचरा तिच्या घरट्याला सावरतो.सगळ्यांचं बालपण चिमणीच्या आवाजानं समृद्ध झालेलं.अशा चिमणीच्या विश्रामगृहाला शासकीय विश्रामग्रहासारखी घरघर लागलीय.मूठभर तांदळाच्या अनुदानावर तिचं जगणं सुसह्य होतं.सिमेंटच्या घरातही तिला राहायला आवडतं. डाळिंबाचं झाड घराच्या अंगणाची शोभा वाढवित होतं. त्या झाडावर सूर्यपक्ष्याचं घरटं झुलत होतं.नाव 'सूर्यपक्षी' पण घरट्यावर सूर्यकिरणं पडत नसत.


पिंपळ कुळातील काही झाडावर 'काळा शराटी' या पक्ष्याचं घरटं उठून दिसतं.मी वडाच्या झाडावर या पक्ष्यांची घरटी पाहिली आहेत.घरटी शेंड्यावर दिसायची.काड्यावर काड्या ओबडधोबड रचलेल्या. दरवर्षी त्याची डागडुजी करून तेच घरटं वापरत असत. बाभळीच्या झाडावरही एक घरटं आढळलं होतं.झाडं आणि पाखरं आयुष्यभराची सोबती असतात. आभाळातली नक्षी अलगदपणे झाडावर उतरते अन् झाडं प्रफुल्लित होतात.

सुतार,पोपट,पिंगळा,धनेश या पक्ष्यांच्या ढोली आकर्षित करतात.

तांबट वाळलेल्या फांदीला घरटं कोरतो.'रंगीत रायमुनिया' खुरट्या झाडाझुडपात घरटं विणते.'भिंगरी' चिखलाच्या गोळ्यापासून कपारीला घरटं बनविते.त्या चिखलात लाळ मिसळून मजबूत करते.'रोहित' पक्ष्यांची मातीची घरटी असतात.पण अजून बघितली नाहीत.मोर,तित्तिर,पक्ष्यांची घरटी गवतातून आढळतात. 'पारवा' इमारतीच्या आडोशानं घरटं तयार करतात. 'खंड्या' नदीच्या,ओढ्याच्या काठानं घरटं पोखरतो. 'ब्राह्मणी घार',

'कापशी घार','समुद्र गरुड','घार' अशा शिकारी पक्ष्यांची घरटी उंच झाडावर पाहायला मिळतात.टिबुकली,चांदवा,बदक यांची घरटी पाण्यातल्या वनस्पतीवर किंवा जलाशयाच्या काठानं पाहायला मिळतात. 'कोकिळा' घरटं तयार करतच नाही. कावळ्याच्या घरट्यात अंडी घालून मोकळी होते.पक्षीनिरीक्षकांना पाखरांची विश्रामगृह खुणावतात. पाखरं ही निसर्गातील विरामचिन्हे वाटतात.त्यांच्याजवळ थोडसं थांबल्याशिवाय पुढं जावसं वाटत नाही. पाखराशिवाय निसर्गचित्र पूर्ण होतच नाही.