असा बराच काळ लोटला.खार्टुम विद्यापीठातल्या प्राणीवैद्यक विभागातील एका प्राध्यापकाने इल्सेला बोलवून घेतलं.त्याची आणि इल्सेची जुनी ओळख होती. सुदानमधल्या पूर्व सहारातील उंटांवर संशोधन करण्यासाठी इल्सेला शिष्यवृत्ती मिळेल,अशी त्याने व्यवस्था केली होती.सुदानमध्ये उंटांना अजूनही महत्त्व होतं.इल्सेला शिष्यवृत्ती देणारे प्राध्यापक म्हणजे जागतिक किर्तीचे उंटतज्ज्ञ बक्री होते.उंटांवरचं संशोधन कसं असावं,याचे त्यांनी ठरवून दिलेले मापदंड जगन्मान्य होते.त्यांना एक उंटसंशोधन केंद्र प्रस्थापित करायची इच्छा होती.पण उंटांवर जीवन अवलंबून असलेली जगातली कुठलीही जमात कधीच एका जागी फार काळ मुक्कामास नसते,हे पाहता संशोधनकेंद्र नेमकं कुठे प्रस्थापित करावं,याबद्दल त्यांचा निर्णय होत नव्हता.मात्र,इल्सेचा आणि त्यांचा अभ्यास परस्परपूरक असल्याचं दिसल्यावर बक्री,त्यांचा साहाय्यक डॉ. मुहम्मद फादी आणि इल्से यांनी सुदानच्या हद्दीतल्या सहारात जीपमधून शेकडो कि.मी.चा प्रवास केला. त्या भागात त्यांना रशैद बेदूंच्या टोळ्या भेटल्या.त्यांच्याशी बोलण्यातून त्यांना उंटांच्या कळपांची रचना कशी असते,ते कुठल्या वनस्पतींवर जगतात,त्यांच्या प्रजजनातल्या पद्धती आणि अडचणी, त्यांचे विविध आजार आणि त्यांवरचे पारंपरिक उपचार,इत्यादी विषयींची माहिती मिळाली. रशैद बेदू एकोणिसाव्या शतकात सौदी अरेबियातून सुदानमध्ये आले.त्यांनी निरनिराळ्या कामासाठी उंटांचे वेगवेगळे प्रकार आपलेसे केले.त्यांनी अरबस्तानामधून येताना आणलेले उंट आकाराने छोटे,काटक आणि भरपूर दूध देणारे होते.याशिवाय ते स्थानिक मातकट तपकिरी रंगाच्या उंटांची पैदास करू लागले.या उंटांच्या मांसाला (हलीम) इस्लामी जगात खूप मागणी असल्यामुळे हे उंट ते कैरोला कत्तलखान्यात पाठवत असत.याशिवाय ते शर्यतीच्या उंटांचीही पैदास करत होते.इल्सेचा हा अभ्यास चालू असतानाच सुदानमध्ये बंड झालं.सर्वच परकियांचे रहिवास परवाने रद्द झाल्याचं जाहीर करण्यात आलं.
तेव्हा तिला अमेरिकेत परतावं लागलं.परतल्यानंतर इल्सेने एका शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला.संशोधनासाठी तिने 'उंटांच्या सामाजिक,आर्थिक प्रभावाचे आणि उंटपालनाच्या व्यवस्थापनाचे संशोधन'असा विषय निवडला होता.या विषयावर तोपर्यंत फारसं संशोधन झालेलं नव्हतं.तिने मिळवलेल्या उंटविषयक माहितीत तिला दिसून आलं, की उंटपालनात जगात भारत आघाडीवर होता. भारतात केवळ भटक्या जमातीच उंटपालन करत होत्या असं नाही;तर शेतीला जोडधंदा म्हणूनही उंट पाळले जात होते.
भारतातल्या उंटांची संख्या दहा लाखांहून अधिक होती; तिथे 'नॅशनल रिसर्च सेंटर ऑन कॅमल' या संस्थेमार्फत उंटांवर संशोधनही सुरू होतं.इथल्या अभ्यासाचा फायदा आफ्रिकी देशांमधील उंटपालनाला होऊ शकला असता.
इल्सेचा हा प्रस्ताव मान्य झाला.त्याचवेळेस तिच्या पतीला गॅरीला फुलब्राइट शिष्यवृत्ती मिळाली;तो पुण्याला डेक्कन कॉलेजात रुजू झाला;त्यांच्या मुलांना पुण्यातच शाळेमध्ये प्रवेश मिळाला;आणि इल्सेचं कुटुंब पुण्यात राहायला लागलं.कामानिमित्त पुण्यातून राजस्थानात ये-जा करण्याचं तिने ठरवलं.बिकानेर इथल्या उंटसंशोधन केंद्राशी ती आधीपासूनच संपर्कात होती.तिथून तिला भारतीय उंटांबद्दल जी माहिती मिळाली त्यानुसार सोमालिया आणि सुदान या देशांनंतर भारतात जगातील सर्वाधिक उंट होते.इतके उंट असलेल्या देशात उंटांचं प्रजनन,उंटपालन आणि उंटांवर ज्यांची उपजीविका अवलंबून आहे अशा जमाती यांबद्दल कुठेही,कसलेही लेखी अहवाल उपलब्ध नव्हते.
नाही म्हणायला १९०८ साली प्रसिद्ध झालेल्या राजपुताना गॅझेटीअरमध्ये एक नोंद होती -
'मारवाडमध्ये रेबारी,ज्यांना रायका असंही म्हटलं जातं, त्यांची संख्या सुमारे ३.५% आहे. हे उंटपालनावर जगतात.' त्या नोंदीत शंकर-पार्वतीच्या कथेचाही उल्लेख होता.मात्र याव्यतिरिक्त,राष्ट्रीय उंटसंशोधन केंद्राच्या वार्षिक अहवालात किंवा अलिकडच्या काळातल्या उंटांवरच्या शोधनिबंधांमध्ये सुद्धा उंटपालन, उंटप्रजनन यांचा इतिहास हाती लागत नव्हता.भारतात उंटपालन कधी,केव्हा आणि कसं सुरू झालं,उंट कसे माणसाळवण्यात आले,त्या काळात त्यांचा कसा आणि कशासाठी वापर केला गेला,
त्यांच्या प्रजननपद्धतीत काही सुधारणा केल्या गेल्या का,असे अनेक प्रश्न अनुत्तरितच होते. इल्से हे सारे प्रश्न घेऊन बिकानेरच्या 'नॅशनल रिसर्च सेंटर ऑन कॅमल' इथे दाखल झाली.
हे संशोधनकेंद्र बिकानेरच्या एका बाह्य उपनगरात आहे. इथे एक उंटपालन केंद्र आहे.त्यात भारतातल्या विविध प्रजातींचे उंट आहेत.कानावर लांब केस असलेले बिकानेरी उंट; मंदगतीने हालचाली करणारे कच्छी उंट; चपळ,लांब पायांचे जैसलमेरी उंट, इत्यादी.यातले कच्छी उंट सर्वाधिक दूध देतात;तर बिकानेरी उंट ओझं वाहण्यासाठी सगळ्यात जास्त उपयुक्त ठरतात. याशिवाय तिथे अरबस्तानातून भेट म्हणून आलेले उंटही होते.हे सगळे उंट सुदृढ होते.त्यांची व्यवस्थित देखभाल होत असल्याचं त्यांच्या सुस्थितीवरून जाणवत होतं.हे उंट वेगवेगळ्या प्रयोगांसाठी वापरले जात होते.कृत्रिम रेतन पद्धतीने गर्भधारणा करण्याचं तंत्र उंटांच्या बाबतीत यशस्वीपणे राबवलं जात होतं.त्याशिवाय 'गर्भ कलमा'चं तंत्र पूर्णत्वास नेण्याचे प्रयोगही या ठिकाणी सुरू होते.
इल्सेला उंटपालांना,त्यातही रायकांना भेटण्याची इच्छा होती.
केंद्राचे संचालक डॉ. खन्ना यांनी तिची ही विनंती मान्य केली.
आणि इल्से प्रथमच एका रायकाला भेटली.त्यावेळी इल्सेला कुठल्याही भारतीय भाषेचा गंध नव्हता.त्यामुळे केंद्रातील कुणीतरी दुभाषाचं काम करत असे.त्या रायकाचं नाव काणाराम असं होतं. "तुमचे उंट कुठं आहेत?" तिने काणारामला पहिला प्रश्न विचारला. "असतील तिकडं कुठंतरी !" पश्चिमेच्या दिशेने हात करत तो म्हणाला.त्या पहिल्या उत्तरानेच इल्सेवर थक्क व्हायची पाळी आली होती.तिच्या चेहेऱ्यावरील विस्मय पाहून तो दुभाषा म्हणाला- "त्याचे उंट इथेच कुठेतरी वीस-पंचवीस किलोमीटरच्या परिसरात चरत असतील.इथलं उंटपालन याचप्रकारे चालतं.फक्त पावसाळ्यात शेतं पिकल्यानंतर उंटांना एकत्र करून गावात आणलं जातं.उंट दिवसाआड पाण्यासाठी गावात परत येतात.इथं उंटांची शिकार करणारे प्राणी नाहीत.या भागात कुणी उंट चोरतही नाही;शिवाय प्रत्येक उंटाच्या पुठ्ठ्यावर त्याच्या गावाची निशाणी उमटवलेली असतेच.समजा एखादा उंट भरकटलाच तर त्याची बातमी त्या निशाणीवरून गावकऱ्यांना कळवली जाते किंवा कुणीतरी त्या उंटाला गावात आणून सोडतो.शिवाय रायका त्या उंटाच्या पावलांच्या ठशावरून त्याचा माग काढू शकतात; ते त्यासाठी प्रसिद्ध आहेत. ही कला ज्यांना अवगत आहे.
त्यांना 'पगरी' म्हणतात. 'पग' म्हणजे तळपायाचा ठसा.एवढंच नाही तर उंटीण गाभण आहे की नाही, हे सुद्धा त्यांना पायाच्या ठशावरून कळतं."
ही नवी माहिती पचवणं इल्सेला जरा कठीण गेलं.तिने मग दुभाषामार्फत पुढचा प्रश्न विचारला-तुझ्याकडं किती उंट आहेत ?"
"आम्ही तिघं भाऊ आहोत.आमच्या कुटुंबाकडं तीनशे उंट आहेत."
त्यावर इल्सेनं विचारलं, "तीनशे उंट बाळगायचे तर त्यांचा काही उपयोग होत असणार?"
"हो! यातले ८०% उंट माद्या आहेत.त्यांना पिल्लं आहेत.आम्ही ती पिल्लं पुष्करच्या जत्रेच्या वेळी उंटांच्या बाजारात विकतो."
"या उंटांचा इतर काही गोष्टींसाठी तुम्ही वापर करता कां,म्हणजे त्याचं दूध काढणे वगैरे ?" इल्सेने विचारलं.
यावर नकारार्थी मान हलवत काणाराम म्हणाला,"ते कसं शक्य आहे? ते तर दूरवर हिंडत असतात ना? आमच्याकडे एक म्हैस आहे.गायही आहे.त्यांचं दूध आम्ही घरात वापरतो.त्यातून उरतं ते मग विकतो."
आणि उंटाचं मांस - ते तुम्ही खाता का?" हा प्रश्न इल्सेने विचारताच दुभाषानेच मान नकारार्थी हलवत म्हटलं,हा प्रश्न विचारणं म्हणजे रायकांचा अपमान करण्यासारखं आहे.ते हिंदू आहेत आणि ते शाकाहारी आहेत.या प्रश्नाचा त्यांना धक्का बसेल.तेव्हा पुन्हा ही बाब इथं कुणासमोरही बोलू नका.यावर इल्सेने त्या दुभाषाची माफी मागत,तो विषयच बदलला.याच संभाषणात तिला उंटाचा आणखी एक व्यावहारिक उपयोग समजला.रायकांच्या लग्नात उंटांचा हुंडा म्हणून वापर केला जातो.काणारामला लग्नात एक नर उंट आणि २१ माद्या उंट हुंडा म्हणून मिळाल्या होत्या.त्या घटनेला बराच काळ होऊन गेला होता. अलिकडे उंटांचा हुंडा म्हणून वापर बंद झाला होता. त्यावेळी या गावात दोन हजार उंट होते.बदलत्या काळाबरोबर रायकांच्या तरुण पिढीचं उंटप्रेम ओसरू लागलं होतं.एवढे उंट बाळगूनही उंटीणीचं दूध अगदी क्वचित पिण्यासाठी वापरलं जातं.त्याची विक्री केली जात नाही.त्यापासून चीज किंवा दहीही बनवलं जात नाही.ते उंटांच्या पिल्लांसाठीच ठेवलं जातं.उंटांच्या केसांपासून गालिचे आणि उबदार पांघरूणं बनवली जातात;त्यांच्या दोऱ्या वळून चारपाईची नवार म्हणून वापरल्या जातात.उंटांची लीद वाळू आणि मातीत मिसळून भिंती उभारण्यासाठी आणि भिंतीचा गिलावा म्हणून वापरल्या जातात.मेलेल्या उंटांची हाडं कुटून खत करतात.त्यांच्या कातड्यांपासून पिशव्या बनवल्या जातात.नर उंटांना अंगमेहेनतीची कामं करावी लागतात. ओझी वाहणं,गाडे ओढणं,मोटेने पाणी काढणं,वगैरे. तसंच,सीमा सुरक्षा दल सीमेवर पहारा करण्यासाठी उंटांचा वापर करतं.रायकांचं काम उंटपालन करणं; आणि ज्यांना उंटांची गरज असते त्यांना उंट विकणं. राजस्थानी दंतकथांमधून,पारंपरिक प्रेमकथांमधूनही उंटाला फार महत्त्वाचं स्थान होतं.
रायकांशिवाय इतर जमातीही उंट पाळतात.तेव्हा दुभाषामार्फत इल्सेने त्यांच्या मुलाखती घ्यायला सुरुवात केली.तिला कुठेच वेगळी माहिती मिळेना.अनेक गावांना तिने भेटी दिल्या;अखेरीस नोखा नावाच्या गावातल्या रायकांनी तिला 'त्यांचे पूर्वज जैसलमेरच्या महाराजांच्या उंटाची देखभाल करायचे.'अशी माहिती दिली.इतर उंटपालांमध्ये मुस्लिमांचा समावेश होता.ते मात्र उंटांचं दूध प्यायचे.त्यांच्या मते हे दूध खूप पौष्टिक असतं.ते दिवसात तीन वेळा उंटणींचं दूध काढत होते.दररोज प्रत्येक उंटीण आठ ते दहा लिटर दूध देते.ही मुस्लिम उंटपाल मंडळी उंटांच्या शर्यतीसुद्धा आयोजित करतात; तर काही जण उंटांना नाचायला आणि इतर कसरती करायला शिकवतात.उंटाचं मांस मात्र इथेही खाल्लं जात नव्हतं.राजस्थान पिंजून काढताना इल्सेला माहिती मिळाली,की बिकानेरच्या महाराजांनी १८८९ मध्ये एक उंटांची सैन्यतुकडी उभारली होती.त्या तुकडीत ५०० उंटस्वारांचा समावेश होता.
महाराज गंगासिंहांच्या या सैनिकी तुकडीचं नाव 'गंगा रिसाला' असं होतं.ही तुकडी ब्रिटिशांनी चीन,इजिप्त,सोमालीलँड (सोमालिया)आणि अफगाणिस्तानात युद्ध आणि गस्तीच्या कामासाठी वापरली होती.गंगासिंहांच्या राजवाड्याचं आता पंचतारांकित हॉटेलमध्ये रूपांतर झालेलं होतं.जे कागदपत्र उरले होते,त्यांना हात लावताच त्यांचे तुकडे होत होते.ती कागदपत्रं खूप काळजीपूर्वक हाताळून इल्सेला पुढील माहिती मिळाली 'या संस्थानात फार पूर्वीपासून उंटांच्या टोळ्या पाळण्याची प्रथा आहे.या भागात दळवळणाचं दुसरं साधन नसल्यामुळं ही प्रथा पडली.ब्रिटिशांच्या काळात मांडलिक बनल्यानंतर या तुकड्यांसाठी काही कायदे बनवले गेले.रायकांना संस्थानाच्या भूमीत उंट चारायची परवानगी हवी असेल तर प्रत्येक कळपाबरोबर ५० सरकारी उंटांचा समावेश करावा लागेल,अशी अट त्यात होती.रायका याचा गैरफायदा घेतात,असं महाराजांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी ही उंट तुकडीच बरखास्त केली.'
ही माहिती मिळूनही इल्सेचं समाधान झालं नव्हतं. रायकांचे आणि उंटांचे परस्परसंबंध कसे निर्माण झाले, याचं कोडं सुटण्यासाठी हवी असलेली माहिती काही तिला मिळत नव्हती.तिने उंटांचा कळपही बघितला नव्हता.गावकऱ्यांकडचे उंट तिला दिसत;पण चरायला सोडलेल्या कळपांचं दर्शन होत नव्हतंच.त्यात हा भाग भारत-पाकिस्तान सीमेच्या जवळ होता;शिवाय ती परदेशी;त्यामुळे तिला वाळवंटात हिंडून उंटाचे कळप शोधणं किंवा त्यांचं निरीक्षण करणं शक्य नव्हतं.अशा परिस्थितीत,डॉ.देवराम देवासी या रायका तरुणाशी तिची ओळख झाली.त्याने नुकतीच बिकानेर विद्यापीठामधून प्राणीवैद्यकाची पदवी मिळवली होती. विद्यापीठाची पदवी मिळविणाऱ्या मोजक्या रायकांपैकी तो एक होता.
डॉ. देवरामची ओळख झाल्यानंतर खऱ्या अर्थाने इल्सेच्या संशोधनाला दिशा मिळाली.इल्से १९९१ मध्ये प्रथम या भागात आली. नंतर पाच-सहा वर्षं ती पुण्याहून ये-जा करून रायकांचा अभ्यास करत होती. दरम्यान तिच्या पतीची इथल्या शिष्यवृत्तीची मुदत संपली आणि तो अमेरिकेत निघून गेला.नंतर शालेय शिक्षण संपवून मुलंही गेली.इल्सेला मात्र उंट आणि रायकांनी पछाडलं होतं.तिने पुण्याहून आपला मुक्काम हलवला.आता ती साद्री,
जैसलमेर आणि जोधपूर इथे राहू लागली.तिच्या कुटुंबाशी हळूहळू तिचा संपर्क कमी कमी होऊ लागला आणि अखेर संपला.ती उंटांमध्ये अधिकाधिक गुंतत गेली. हिंदी बोलू लागली.
राजस्थानातच राहू लागल्यावर तिने उंटांचा अधिक अभ्यास सुरू केला.राजस्थानामधील उंटांमध्ये एक रहस्यमय आजाराची साथ आली.त्यामुळे रायकांचं जीवन विस्कळीत होऊ लागलं.रायकांची नवी पिढी उंटांना दुरावू लागली,तेव्हा गुरांचीच डॉक्टर असलेल्या इल्सेने त्या रोगाचा छडा लावायचा निश्चय केला.त्या रोगाचं मूळ कारण शोधून त्यावर औषधोपचार केले.
राजस्थानातले उंट मांसासाठी चोरून बांग्लादेशमध्ये नेले जात होते.त्या चोरट्या मार्गाचाही तिने शोध घेतला. अधिकृतरित्या बांग्लादेशी हे नाकारत होते.त्याच सुमारास भारताच्या सीमा सुरक्षा दलाने हा चोरटा व्यापार करणाऱ्यांना पकडलं.त्या काळात बांगलादेशी सैनिकांनी गोळीबारही केला.या बातम्या मग वृत्तपत्रात झळकल्या; आणि हा चोरटा व्यापार चव्हाट्यावर आला.इल्सेने तिचं आयुष्यच आता भारतीय उंट आणि रायका यांच्या सेवेस वाहून घेतलं आहे.एक जर्मन पशुवैद्य सुरक्षित आणि आरामाचं जीवन सोडून पुरातत्व उत्खननात भाग घ्यायला जाते,तिथे प्रथमच उंट बघते, मग उंटांच्या प्रेमाने झपाटून दुर्गम वाळवंटांमध्ये वावरू लागते हे सगळंच अगम्य आणि अद्भुत वाटतं. म्हणूनच आदरानं म्हणावंसं वाटतं,'हॅट्स ऑफ टूयू, इल्से'!
माझे जीवनातील ध्येय केवळ जगणे नाही तर भरभराट करणे आहे; आणि काही उत्कटतेने, काही करुणेने, काही विनोदाने आणि काही शैलीने असे करणे.- माया अँजेलो
समाप्त धन्यवाद ..!