लेबर डेच्या सुट्टीला अजून दोन आठवडे होते.रॅफेल सेमीज कोडी ऊर्फ रॉफ आणि त्याचा चुलतभाऊ जूनियर,हे दोघं रॉक्सीज आईस्क्रीम पॅलेसमध्ये बसले होते.दोघंही बदाम आईस्क्रीम खात होते,बटरस्कॉच सायरपनं झाकलेलं,आणि वर अक्रोडांचे तुकडे घातलेलं.मेक्सिकोच्या आखातावरून कुंद,दमट आलेली हवा फ्लॉरिडा पॅन्हॅडलच्या उष्णतेनं आणिकच जड झाली होती.गाव होतं क्लेव्हिल्,अॅलाबामा.पावसाची आशा जागवतीलसे ढगही नव्हते आकाशात.आईस्क्रीम पॅलेसमध्ये शिरणारा प्रत्येक जण अंगाला घामानं चिकटलेले कपडे सोडवत बसलेला असायचा.
"काय गरमी आहे!" एक पातळसा सूट पेहेरलेला माणूस आत येत म्हणाला.
"हो! आग्या मुंग्यांपेक्षा गरम !" एक शेतकरी हसत उत्तरला.
जूनियर आणि रॅफेलला उन्ह-उकाड्याचा धाक नव्हता. जूनियरला तर चिकोबी नदीतला महाकाय अजगर पाहायची इच्छा होती.गेल्या शतकभरात शेकडो स्थानिक लोकांनी चिकोबीच्या डोहात काहीतरी गूढ, अजस्र,सापासारखा जीव पाहिला होता म्हणे.मोठी प्रसिद्ध दंतकथा होती ही,त्या भागातली.
रॅफ नाराज होता. "ए! माझे आईबाबा मारतील मला. त्यांना वाटतं की तू मला बहकवतोस."
('वारुळ पुराण',माधव गाडगीळ',ई.ओ.विल्सन,अनुवाद - नंदा खरे,मनोविकास प्रकाशन )
असं. मग तर झालं?" जूनियरपाशी रॅफच्या अडचणींना उत्तरं होती."आपण त्यांना सांगू नोकोबी तलावात मासे पकडायला जातो आहोत,
दोन दिवसांनी सकाळी आठला जूनियर आला.दोन्ही मुलांनी रॅफच्या आईला भरघोस आश्वासनं दिली,अमुक करू आणि तमुक करणार नाही,अशी.मग दोघही सायकली घेऊन बाहेर पडले.गावाच्या वायव्येला जायचं होतं.फार वाहतूक नव्हती.दोन टोमॅटो लादलेल्या ट्रक्स फक्त भेटल्या,गावाकडे जाणाऱ्या.जॉन्सनच्या शेताजवळ दोघांनी सायकली झुडपांत लपवल्या आणि ते जंगलकडेच्या ओढ्यात उतरले.बुटांच्या लेसेस बांधून गळ्यात अडकवल्या.पँटी गुडघ्यांपर्यंत दुमडल्या.छान वाटत होतं,बारीक खड्यांवरनं वाहणाऱ्या थंड,स्वच्छ पाण्यात.ओढ्यासोबत दोघं चिकोबी नदीला भेटायला जात होते.छोटेछोटे मासे किनाऱ्याजवळच्या गवतात लपायला पळत होते.एक चिखलातलं कासव पाठीवरचं शेवाळ सांभाळत दगडासारखं बसलं होतं.एक बारका साप झाडाच्या फांदीवरनं पाण्यात उडी मारून पळून गेला.एक लाल खांदे असलेली घार कर्कश ओरडत उडाली. "घरटी बांधायचा मोसम संपलाय." रॅफ म्हणाला. त्याच्या ओळखीची होती या जंगल-ओढ्याची प्रजा.मैलाभरात ओढा रुंदावला व गुडघ्यांपेक्षा खोल झाला.जवळ कॅट्टेल पाणगवत होतं.
पाण-ओक,सायप्रेस वगैरे नेहमीचे वृक्ष होते,विरळ पसरलेले.मुलं ओढ्यातला चिखल टाळून चालत होती. "दलदल सांभाळ!" जूनियर म्हणाला.रॅफेल त्याच्या मागून चालायला लागला.काही गडबड झालीच,तर जूनियर आधी अडकेल !
लवकरच खुद्द चिकोबी नदी आली.संथ,सुस्त वाहणारी. सकाळच्या उन्हात हिरवी निळी,चंदेरी लाटा असलेली. पाण्यातल्या काड्या संथपणे चालणाऱ्या माणसाच्या वेगानं वाहत होत्या.मध्येच किनाऱ्याची जमीन उंच चढत गेली.उंचीवरच्या झाडांवरून कळत होतं,की मोठ्यात मोठे पूरही तिथे पोचत नव्हते.या टेकाडाच्या नदीकडच्या बाजूला तेज उतार होता,झाडी नसलेला आणि पिवळट मातीचा.इतर तीन बाजूंचे उतार मात्र जास्त सपाटसर होते.या टेकाडाजवळ 'तमालपत्रा'च्या झाडांना बांधून ठेवलेल्या पाचसहा होड्या होत्या.झाडी उंच होती. म्हणजे पाणी चढलं तरी बांध्यांना काही न होता होड्या पाण्यावर तरंगल्या असत्या.या भागात पाणी चढणं-उतरणं नेहमीचं होतं,आणि बांधायची पद्धतही सगळ्यांच्या ओळखीची होती.
जूनियर एका बोटीजवळ जाऊन तिला बांधणारा दोर सोडू लागला.तिच्यात दोन वल्ही आणि बसायला फळीही होती.
"कुणाची रे?" रॅफनं विचारलं. "कुणास ठाऊक." जूनियर गाठ सोडत म्हणाला.रॅफनं त्याच्या हातावर हात ठेवला. "ए! चोरायची नाही आहे, बोट!" "चोरतं कोण आहे ? उसनी घेतो आहोत,आपण पोटोमो धक्क्यावर ठेवून देऊ.नेहमीच करतात असं,सगळे जण." खरं तर जूनियरच्या या बोलण्यावर रॅफचा विश्वास नव्हता. पोटोमोपासून इतक्या वर प्रवाहाच्या उलटं वल्हवत आणणं अवघड होतं.पण बोटीच्या मागे आऊटबोर्ड मोटर बसवायला जागा होती,आणि आणि मजा येत होती! खुद्द चिकोबी नदी जवळ होती,आणि एखादे वेळी तो अजगरही आसपासच होता !
रॅफ जूनियरपेक्षा लहान होता,आणि "मला ह्यानं भरीला पाडलं" म्हणणं सोपं होतं. मग जूनियरनं काय तो बचाव दिला असता.
जूनियरनं बोट सोडवली,आणि चिखलातून ओढत, ढकलत दोघांनी ती प्रवाहात नेली.आता दोघही उड्या मारून चढले.बोटीत,किनाऱ्याला धरून धरून ते प्रवाहासोबत वल्हवत होते.संपूर्ण नदीवर इतर एकही बोट नव्हती,ना खाली जाणारी,ना वर जाणारी.
"नेहमी दोनतीन जण तरी मासे पकडताना दिसतात." जूनियर म्हणाला. "बाबांनी आणलं होतं मला आणि ताईला एकदा."
"आश्चर्यच आहे,आज कोणी नाही हे.किती छान जागा आहे! मासेही भरपूर असणार." रॅफ म्हणाला.
"चिखल ! चिखलाला कंटाळतात सगळे जण.बहुतेक लोक चिकोबी टाळून दक्षिणेला एस्कांबिया नदीत जातात.तिच्यावर धक्के वगैरेही जास्त आहेत."
रॅफ नदीकडेचं जंगल पाहत होता.चांगलं दाट होतं. एका मासेमाराचं झोपडं दिसलं,तेही रिकामं.एका झाडाच्या फांदीला एक दोर बांधला होता."पोरं लटकून, झोके घेऊन उड्या मारतात पाण्यात." जूनियर म्हणाला.
ओंडक्यांवर दोनतीन कासवं बसली होती,उन्हं खात. बोट जवळ आल्यावर पाण्यात शिरली.
एक साप किनाऱ्याकडे पोहत गेला.किनाऱ्याच्या वाळूत एक निळसर बगळा माशांची वाट पाहत ध्यानस्थ उभा होता.दोन बदकं सरळ रेषेत उडत गेली,नदीच्या खालच्या भागाकडे.एक गिधाड उष्ण हवेसोबत चकरा मारत उंच,उंच जात होतं.ठिपक्यासारखं दिसेल इतकं उंच गेलं ते.
दोन लांब दुहेरी शेपट्यांचे घारींसारखे पक्षी नदीपलीकडच्या झाडीवर विहरत होते. "स्वॉलोटेल घारी असतील त्या!" रॅफ म्हणाला. "मी पहिल्यांदाच पाहतो आहे. झाडांवरचे साप खातात त्या."
जूनियर,रॅफ,दोघंही वर पक्षी पाहत होते,पण खरं लक्ष होतं नदीकडे,चिकोबीचा अजगर दिसायच्या आशेनं. दिवसाढवळ्या दिसणं कठीण होतं,पण तरी आशा असतेच ना! आणि एकाएकी दार उघडावं तसं कडेचं जंगल उघडलं.वाळूच्या पट्ट्यावर धक्क्याला बांधलेली एक लहानशी बोट होती.मागे एक पायवाट,पन्नास पावलं आतल्या एका घराकडे जाणारी.रंगवलेलं नव्हतं घर.लाकडी आणि टिनाचं छत असलेलं.एका बाजूच्या फळ्या ताज्या दिसत होत्या,नव्यानं ठोकलेल्या.जोतं तीन पायऱ्या उंच होतं.एक लहानसा व्हरांडा.दारालगत एक खिडकी.तिच्यावर बोट वाळूत टेकली,
शिल्लक भाग पुढील लेखामध्ये…