बोट वाळूला टेकली.
२३.०७.२५ या लेखातील लेख पुढे सुरु….
आणि मुलांनी उतरून तिला आणखी आत ओढलं, धक्क्याकडे.मुलानी वर पाहिलं,तर पुढ्यात चार पावलांवर बेडूक-बाबा !
सहा फुटापेक्षा उंच.चेहरा,शरीर रोडसर.वय चाळीसच्या आसपास, पण चेहरा उन्हातान्हानं रापल्यामळे पन्नाशीचा दिसणारा. 
डोळे,तोंडाजवळ खोल घळ्या पडल्यासारखा, काळवंडलेला चेहरा.मेकॅनिकसारखे ओव्हरॉल्स अंगावर.खांद्यापासून पँटला आधार देणारे पट्टे. भरपूर खिसे.पुसट,धुवट,फिकट निळं डेनिम कापड. फिकट तपकिरी शर्ट,पूर्ण बाह्यांचा.
काहीतरी लिहिलेली बेसबॉल खेळताना घालतात तसली टोपी.केसांचा मागे लोंबणारा बुचडा आणि नीटनेटकी दाढी.
पायांत काही नाही,आणि हातात बंदूक,दोन पोरांवर रोखलेली. "काय हवं आहे,इथं ?" मोठ्यानं खेकसला.
"सर! आम्ही बॉय स्काऊट्स आहोत.आम्हाला ही ट्रिप घ्यायला सांगितली,म्हणून तुम्हाला भेटायला आलो." जूनियर सफाईनं खोटं बोलला.
बेडूक-बाबाच्या चेहऱ्यावरचा निर्लेप भाव तसाच राहिला.बंदूक मात्र खाली केली.मग बंदुकीने नदीकडे जा,चालते व्हा,असं दाखवलं.रॅफला काहीतरी सुचलं, "काय छान जागा आहे,सर, तुमची ! झाडं, फुलं,फुलपाखरं,पक्षी.आम्हाला जाताना दिसलं सगळं."
अर्धा मिनीट बेडूक-बाबा गप्प राहिला.मग मोठ्यानं म्हणाला, "हो ना! म्हणून तर कोणी इकडे आला, तर उडवून टाकतो मी!"
जूनियरनं नव्यानं प्रयत्न केला
"जातो सर,आम्ही.पण एकदा ओल्ड बेन दिसेल का? जगातला सगळ्यात मोठा मगर आहे,
म्हणतात,बारा फूट!"
"चौदा." आता बंदूक जमिनीकडे रोखलेली होती, आणि आवाज नेहमीचा,सौम्य झाला होता. जूनियरला बेडूक-बाबाची नस सापडली होती–ओल्ड बेन् चा पालक असण्याचा गर्व ! 
"चौदा फूट.पूर्वी आणखीन मोठ्या मगरीही असायच्या इथे.मारून टाकल्या सगळ्या.पण ओल्ड बेन् नाही दिसणार तुम्हाला.फक्त रात्रीच बाहेर पडतो तो.आणि इथे माझ्या आसपासच राहतो.मी सांभाळतो त्याला.खाऊ घालतो - कॅफिश आणि बेडकं."
या भागात सगळ्यांना माहीत होती बेडूक-बाबाची पद्धत.एक ट्रकचा हेडलाइट घेऊन रात्री बेडूक-बाबा बेडकं पकडायचा.पोटोमो धक्क्याजवळच्या पेट्रोल पंपावर बेडकांच्या तंगड्या विकायचा.
पायीच यायचा,बोटीनं नाही.बेडकांच्या तंगड्या विकून आलेल्या पैशांनी खरेदी करायचा–तीही न बोलता. दोनचार मिनिटांचे सौदे सगळे,की निघाला.सगळे दुकानदार,त्यांची गिऱ्हाइकं बिचकून असायचे. घाबरायचे.
पुन्हा बेडूकबाबा गप्प झाला.जूनियरनं त्याला खूष करायचा शेवटचा एक प्रयत्न करायचं ठरवलं. "आम्ही निघतोच आहोत,पण तुम्ही चिकोबी अजगर पाहिला आहे का हो कधी?"
बेडूकबाबाची नजर पोरांवरच होती,पण काहीतरी जरासं बदललं होतं.त्यानं ओठ हलवले आणि त्यांवर जीभ फिरवली.म्हणाला, "पाहिलाही असेल, आणि नसेलही." एवढं बोलायची सवय नसावी. जरा दम खाऊन म्हणाला,
"काहीतरी भलंथोरलं दिसतं,अंधार पडताना. ऐकूही येतं.मगर नक्कीच नाही आहे.स्टर्जन मासाही नाही,माणसाएवढं.उडी मारतं पाण्याबाहेर.मोठा मोरी-मासा असेल.समुद्रातनं उलटा वर आलेला.मोठ्या,नव्या ओंडक्याएवढा.
नसेलही.एवढ्या मोठ्या मोऱ्या उड्या नाही मारत.पाण्याखालूनच हल्ला करतात."
रॅफला माहीत होतं,मोरी मासे गोड्या पाण्यात येतात,आणि माणसांवर हल्लेही करतात. जूनियरचा मात्र विश्वास नव्हता.
बेडूक-बाबाची नजर दूर,नदीवर गेली.स्वतःशीच बोलल्यासारखा तो म्हणाला,"काहीतरी पाहिलं आहे. काहीतरी ऐकलं आहे."
पोरं गप्प होती,पुढे काहीतरी ऐकायला उत्सुक होती.पण बेडूक-बाबा मूळ स्वभावावर आला होता,घुमा आणि घाबरवणारा.
जा!" "आता चालते व्हा.पुन्हा तुमच्यापैकी कोणी इकडे दिसला,तर पस्तावाल.
दोघं मागे मागे चालत बोटीकडे गेले.माना खाली, दबकत, दुबकत, "हो सर ! हो सर!" म्हणत बोटीत शिरले,आणि पोटोमो धक्क्याची वाट धरली.
धक्का गाठल्यावर बोट जमिनीवर ओढून खांबाला बांधली,आणि दोघं पुलाजवळच्या एका प्रचंड ओक वृक्षाजवळ जाऊन बसले.नॅप् सॅकमध्ये रॅफच्या आईनं दिलेलं खायचं सामान होतं.दाण्याची चटणी आणि स्ट्रॉबेरी जॅम लावलेली सँडविचेस होती. सफरचंदं आणि हर्शीच्या चॉकलेटचे बार होते.
खाऊन झाल्यावर दोघे पोटोमो रोडनं निघाले.रेल्वे लाईन गाठून उलटं नदीपार गेले.कधी स्लीपर्सवर चालत,तर कधी दाट जंगलातून वाट काढत. सत्तावीस नंबरचा रस्ता गाठून क्लेव्हिल्ला घरी पोचले.दुसऱ्या दिवशी जाऊन सायकली परत आणायचं ठरलं–आणि आजच्या दिवसातलं कोणालाही,काहीही, कधीही सांगायचं नाही,अशी दोघांनी शपथ घेतली.घरी कळलं असतं,तर पुन्हा कधी फिरायला जायची परवानगी मिळालीच नसती ! थकले होते दोघेही,पण खूष होते.
रात्री जेवताना रॅफनं चिकन,भेंडी आणि कॉर्नब्रेडवर चांगला हात मारला.आईनं विचारलं,
नोकोबीच्या सहलीबद्दल."ठीक!" रॅफ म्हणाला. "पण जूनियरला निसर्गाबद्दल फार माहीत नाही आहे. सापांना घाबरतो तो".
पुढच्या काही दिवसांमध्ये दोघांनी मित्रांपुढे ती सहल वाढवून,फुगवून सांगितली.दोघेही आपापलं शौर्य सांगायला विसरले नाहीत.बोट चोरल्याचं मात्र  दोघांनी दोनतीन खास मित्रांनाच सांगितलं !
—-- समाप्त