उत्क्रांती आणि मानवशास्त्राच्या संशोधनक्षेत्रात डार्विन-वॉलेसनंतर नाव येतं ते डॉ.युजीन धुबुआचं. १९ व्या शतकाच्या अखेरीस त्याने उत्खननांतून लावलेल्या एका क्रांतिकारी शोधाने त्याचं नाव या क्षेत्रात अजरामर झालं.
वैयक्तिक पातळीवर मात्र या संशोधनाची त्याला फार मोठी किंमत मोजावी लागली.त्याच्या खडतर प्रवासाबद्दल...
▶ डॉ.युजीन द्युबुआ हे नाव मानवशास्त्राच्या इतिहासात प्रसिद्ध आहे ते त्यांनी लावलेल्या एका शोधामुळे.कपी (एप) आणि मानव यांच्यातील हरवलेल्या दुव्याचा हा शोध 'जावा मॅन' म्हणून प्रसिद्ध आहे.लहानपणापासूनच युजीननी हा दुवा शोधण्याचं वेड बाळगलं होतं.त्यासाठी त्यांनी अपार मेहनत आणि धडपड केली.युजीन यांनी आपलं ध्येय गाठण्यासाठी अपरंपार त्याग केले.युजीन द्युबुआचा जन्म २८ जानेवारी १८५८ चा.हे वर्ष विज्ञानातल्या एका महत्त्वाच्या कालखंडातलं आहे. त्याच वर्षी डार्विन-वॉलेस यांनी उत्क्रांतिवाद मांडला. त्याआधी दोन वर्षं,म्हणजे १८५६ साली जर्मनीत निअँडर खोऱ्यात काही मानवी अवशेष मिळाले होते.हाच निअँडरथल मानव.या शोधामुळे उत्क्रांतीच्या वादाची तीव्रता वाढीस लागली होती.पुढे डार्विननी १८७१ साली 'डिसेंट ऑफ मॅन' हा ग्रंथ प्रसिद्ध करून आपल्या 'ओरिजिन ऑफ स्पेसीज' या ग्रंथाने पेटवलेल्या वणव्यात तेल ओतलं.अशा काळात युजीन द्युबुआचा जन्म झाला.त्या वेळी हा मुलगा मानवशास्त्रात आणि उत्क्रांतिवादात संशोधनपूर्वक भर टाकेल असं कुणालाही वाटलं नसेल.
युजीनचे वडील जाँ जोसेफ बाल्थाझार द्युबुआ आजच्या भाषेत बोलायचं तर वैद् होते.ते पारंपरिक ज्ञान वापरून औषधं देत.ते बऱ्यापैकी लोकप्रिय असावेत,कारण ते हॉलंडच्या दक्षिण भागातल्या आयस्डेन या खेड्याचे नगरपाल म्हणून काम करत होते.तिथेच युजीनचा जन्म झाला होता.त्याच्या वडिलांच्या मेयरपदास कधीही कुणी आव्हान दिलेलं नव्हतं.त्यांच्या घराण्याचं बोधवाक्य 'सरळ आणि सामुग्रीची वर्तणूक' अशा अर्थाचं होतं. हे घराणं सनातनी आणि धार्मिक वृत्तीचं होतं.
युजीन वैद्यकीय शिक्षण घेत असताना डार्विनच्या विचारांचा परिणाम होऊन निरीश्वरवादी आणि कट्टर नास्तिक बनला.तेव्हा त्याच्या धाकट्या भावाचं आणि त्याचं कडाक्याचं भांडण झालं होतं;पण त्याच्या आई-वडिलांना आपला मुलगा यौवनोन्मादात बहकलाय आणि तो काही काळाने ताळ्यावर येईल अशी आशा वाटत होती.वैद्यकात पदवी मिळवल्यानंतर युजीन एका मुलीकडे आकृष्ट झाला;पण त्या मुलीने एका चिनी वैद्यक विद्यार्थ्यांशी लग्न ठरवलं.त्याने युजीनला काहीसं नैराश्य आलं आणि तो अॅना गट्ठरीडा लोयेंगाशी लग्न ठरवून मोकळा झाला.अॅना ही साधीसुधी मुलगी होती. ती अतिशय सुंदर दिसायची.तिची वृत्ती खेळकर होती. मात्र,तिला कसलीही महत्त्वाकांक्षा नव्हती.
नवऱ्याबरोबर राहावं,मौजमजा करावी,संसार फुलवावा आणि घर सजवावं यापलीकडे तिच्या मनात कसलेही विचार येत नसत.तिच्या दृष्टीने युजीनचं संशोधन हा त्याला बढती मिळण्यासाठीचा एक आवश्यक भाग होता.
युजीन दहा वर्षांचा असताना प्रथम डार्विनच्या विचारांशी त्याचा परिचय झाला.त्या वेळी कार्ल व्होग्ट या ख्यातनाम जर्मन जीवशास्त्रज्ञाने युरोपभर एक व्याख्यान दौरा काढला होता.डार्विन-वॉलेस उत्क्रांतिवाद जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला होता.त्या व्याख्यानाचा वृत्तान्त दुसऱ्या दिवशी युजीनने त्यांच्या बागेतल्या आपल्या एका आवडत्या वृक्षाच्या फांदीवर बसून वाचला होता.त्या काळात उत्क्रांतिवादाने युरोपला ढवळून काढलं होतं.त्यामुळे शाळकरी पोरांनादेखील त्याची तोंडओळख झालेली होती.व्होग्टने सादर केलेले पुरावे दहा वर्षांच्या युजीनला कितपत कळले असतील हे सांगणं तसं अवघड आहे; पण डार्विनच्या विचारांनी आणि उत्क्रांतीच्या बाजूच्या पुराव्यांनी तो प्रभावित झाला हे निश्चित.व्होग्टच्या व्याख्यानाच्या त्या एका वृत्तपत्रीय बातमीने युजीनच्या पुढील आयुष्याची दिशा ठरली,असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.युजीनने यामुळेच उच्च शिक्षणासाठी विज्ञानशाखेची निवड केली.
वैद्यकाची पदवी घेतल्यानंतर त्याने उत्क्रांतीकडे लक्ष वळवलं.त्याच सुमारास,म्हणजे जुलै १८८७ मध्ये मॅक्स लोहेस्ट या बेल्जियन भूशास्त्रज्ञाने आपल्या सहकाऱ्यांच्या साहाय्याने बेल्जियममधल्या 'स्पी' या गावाजवळ निअँडरथल मानवाचे दोन सांगाडे उघड केले.या शोधांवरून फार वाद झाला.त्याने एकीकडे युजीन फार अस्वस्थ झाला.आपण वैद्यकातील पदवी घेऊन चूक केली,आता डार्विनच्या सिद्धांताचा अभ्यास आपण कसा करणार,एप व मानव यांतला हरवलेला दुवा शोधायचं वयाच्या दहाव्या वर्षांपासून जपलेलं आपलं स्वप्न केव्हा पूर्ण करणार,या विचारांनी त्याला चैन पडेना.याच काळात त्याने हैकेलचं 'हिस्टरी ऑफ क्रिएशन' हे पुस्तक वाचायला घेतलं.त्यातला एक मुद्दा त्याला फारच आवडला - मानव आणि इतर प्राण्यांमधील महत्त्वाचा फरक म्हणजे स्वरयंत्र.जर मानवाला स्वरयंत्र कसं प्राप्त झालं हा प्रश्न सुटला तर मानवी उत्क्रांतीचं कोडं सहज उलगडता येईल,असं हैकेलचं म्हणणं होतं..
युजीनने सस्तन प्राण्यांच्या घशातील अस्थींवर याआधीच संशोधन सुरू केलं होतं.माशांच्या श्वसन कल्ल्यांमध्ये सुधारणा होत होत एके काळी पाण्यातून ऑक्सिजन वेगळा करणारी यंत्रणा मानवात ध्वनी निर्माण करू लागली,या निष्कर्षाप्रत तो आला होता.
त्याने हा सिद्धांत मांडण्यापूर्वी त्याचे प्राध्यापक आणि वरिष्ठ सहकारी मॅक्स फुरब्रिंगर यांच्याकडे तपासायला म्हणून दिला.
तेव्हा फुरब्रिंगरनी ती कल्पना त्याआधीच व्याख्यानांमधून मांडल्याचा दावा केला.ते ऐकल्यावर 'माझ्या प्रबंधात अधिक सुधारणा करायला हव्यात' असं सांगून युजीनने प्रबंध परत घेतला आणि तो वेळकाढूपणा करू लागला.फुरब्रिंगर आपल्या संशोधनावर आज ना उद्या डल्ला मारणार याची जाणीव झाल्यावर युजीनने विद्यापीठातील नोकरीचा राजीनामा द्यायचं ठरवलं;पण त्यापूर्वी त्याने खूप विचार केला. त्याच्यावर आता बायको आणि मुलीची जबाबदारी होती.तरीही,आपण जर एप आणि मानव यांच्यातील हरवलेला दुवा शोधून काढला तर आपल्याला कीर्ती मिळेल आणि फुरब्रिंगरच्या दडपणास आपण यशस्वीपणे तोंड देऊ शकू असं त्याला वाटू लागलं.
हा दुवा कसा आणि कुठे सापडेल यावरही युजीनने खूप विचार केला होता.हा दुवा सापडत नाही याचं कारण या क्षेत्रातल्या संशोधकांनी त्याचा शोध घेण्याचा पद्धतशीर प्रयत्न केलेला नाही अशी त्याची खात्री पटलेली होती.निअँडरथल मानव खूपच उत्क्रांत होता; तो जवळ जवळ माणूसच होता;यामुळेच पूर्वीच्या काळी कुठल्या तरी विकाराने हाडांमध्ये विकृती निर्माण झालेल्या माणसांचे हे सांगाडे असावेत,असं मत त्या काळात प्रचलित होऊ लागलं होतं.काही शास्त्रज्ञ याला विरोध करत असत.त्यांच्यामते निअंडरथल मानव हा आजच्या मानवाचा पूर्वज असला तरी त्याच्यात आणि आधुनिक मानवात फारसा दुरावा नव्हता. (आता निअँडरथल मानव ही मानवी वंशवृक्षाची आपल्या
सारखीच एक प्रगत शाखा होती आणि ३० ते ३६ हजार वर्षांपूर्वी ती नष्ट झाली असं मानण्यात येतं.)
इतरांनी पद्धतशीरपणे प्रयत्न केला नाही,त्यामुळे त्यांना योग्य ठिकाणी शोध करता आला नाही,असं युजीनला वाटलं खरं;
पण त्याला तरी योग्य ठिकाण कसं सापडणार होतं ? तो डार्विनभक्त होता हे आपण पाहिलंच. 'डिसेंट ऑफ मॅन' या ग्रंथात डार्विननी पहिला मानव विषुववृत्तीय पर्जन्यारण्यात अस्तित्वात आला असावा,अशी शक्यता वर्तवलेली होती.
त्यामुळे युरोपमध्ये शोध घेणाऱ्या संशोधकांना मानवाचं मूळ सापडणं शक्य नाही असं युजीनला वाटू लागलं होतं. डार्विन यांच्या मते चिंपांझी आणि गोरिला सापडतात त्या आफ्रिकेच्या विषुववृत्तीय भागामध्ये माणसाचा शोध घेतला गेला तर ते अधिक फायदेशीर ठरण्याची शक्यता होती.
युजीनला हे म्हणणं तत्त्वतः मान्य असलं,तरी आफ्रिकेत शोध घेऊ नये असं त्याला वाटत होतं.याला एक वेगळंच कारण होतं.चिंपांझी आणि गोरिलांमध्ये नर हा मादीपेक्षा आकाराने जवळजवळ दुप्पट मोठा असतो.त्याचे सुळे खूप तीक्ष्ण आणि लांब असतात. तसंच चेहऱ्याची अतिशयोक्त वाढ झाल्याने या नरांचे चेहरे खूप बटबटीत दिसतात.कुठल्याही प्रचलित आदिम मानव जमातींमध्ये निसर्गाने स्त्री-पुरुष यांच्यामध्ये इतका भेदभाव केलेला नाही,असं युजीनचं म्हणणं होतं. त्यामुळे मानवी पूर्वजांचा शोध घेण्यासाठी आफ्रिकेत जाण्यास तो तितकासा उत्सुक नव्हता.
त्या काळात रिचर्ड लिडेकर या ब्रिटिश पुराजीव शास्त्रज्ञाला हिमालयातील शिवालिक टेकड्यांमध्ये काही अवशेष मिळाले होते.यांत एपसारखे प्राणी होते. यांना सुरुवातीस 'ट्रॉग्लोडायटिस सिव्हालेन्सिस' असं नाव देण्यात आलं होतं; पण त्यांचं एपशी असलेलं साम्य,तरीही आधुनिक कपींमध्ये आणि त्यांच्यामधे असलेला फरक स्पष्ट व्हावा म्हणून लिडेकरनी त्यांचं नाव 'अँथ्रपोपिथेकस सिव्हालेन्सिस' असं बदललं होतं. म्हणजे 'मानवाप्रमाणे दिसणारे शिवालिकमधील कपी.' मात्र,त्या काळात नेदरलँड आणि ब्रिटन यांचं सख्य नव्हतं.युजीन डच असल्याने ब्रिटिश वसाहत असलेल्या भारतात त्याला मोकळेपणाने वावरता येईल याची खात्री देता येत नव्हती.
याच वेळी डच ईस्ट इंडिजमध्ये (म्हणजे आताचा इंडोनेशिया) कपींचे अवशेष मिळू लागले होते. या भूप्रदेशात विषुववृत्तीय अभयारण्य होतं.तिथे युजीन द्युबुआ मोकळेपणाने वावरू शकणार होता.याच सुमारास कार्ल मार्टिनने रादेन साल्हेला सापडलेल्या मानवी अवशेषात आणि भारतात सापडलेल्या अवशेषात साम्य होतं.दोन्ही अवशेष एक लाख वर्षांपूर्वीचे होते,आणि यामुळे १८७६ साली आल्फ्रेड रसेल वॉलेस यांनी प्रसिद्ध केलेल्या 'द जिओग्राफिकल डिस्ट्रिब्युशन ऑफ अॅनिमल्स' या ग्रंथातील माहितीची सत्यता पडताळून पाहता येत होती.वॉलेसनी नकाशावर जावा बेटाच्या पूर्वेस एक रेषा आखली.या रेषेच्या पश्चिमेकडे जावा-बाली बेटांपासून ते भारतापर्यंत एकमेकांशी साम्य असलेले सस्तन प्राणी सापडतात,तर या रेषेच्या पूर्वेस ऑस्ट्रेलियातील शिशुधानी प्राण्यांशी साम्य असलेले प्राणी सापडतात.ही वॉलेस रेषा बाली आणि लोंबोक या दोन बेटांच्या मधून जाते.
याचा अर्थ डच ईस्ट इंडिजमध्ये सुमात्रापर्यंत मानवासह इतर सस्तन प्राण्यांचे अवशेष असणार हे यूजीनच्या लक्षात आलं आणि तो लष्करी वैद्यकीय अधिकारी होण्याचा निर्णय घेऊन पत्नी व मुलीसह जावाला जाण्यास निघाला.त्यासाठी त्याने चालू नोकरीतलं वरिष्ठ व्याख्यातापद आणि काही वर्षांत प्राध्यापक बनण्याची खात्री,यावर पाणी सोडायचं ठरवलं.
(हटके भटके,निरंजन घाटे,अज्ञाताचा शोध घेत फिरणाऱ्या अवलियांच्या कहाण्या,समकालीन प्रकाशन)
युजीनच्या या निर्णयाला त्याच्या वडिलांचा आणि मित्रमंडळींचा विरोध होता; पण अॅनाने मात्र लगेच जावाला जायची तयारी सुरू केली होती.युजीन फुरनिंगरचा निरोप घ्यायला गेला.त्या विभागातील त्याचे इतर सहकारीही त्या वेळी उपस्थित होते.
सर्वांनीच युजीनचं मन वळवायचा प्रयत्न केला;पण अत्यंत
धीरोदात्तपणे युजीन म्हणाला,"तुम्ही निवृत्त झाल्यावर मी प्राध्यापकपद भूषवणार आहे,हे मला मान्य असलं तरी डच ईस्ट इंडिजमध्ये जाऊन निखळलेला मानवी दुवा मीच शोधायला हवा असं मला वाटतं.इथे राहून प्राण्यांची आणि माणसांची शवं तपासणं,त्यांचं विच्छेदन करणं,त्यावर शोधनिबंध लिहिणं आणि प्राध्यापक बनणं अवघड नाही हे मला मान्य आहे;पण त्यात कसलंच आव्हान नाही." फुरब्रिंगरनी त्याचा राजीनामा स्वीकारला.द्युबुआ कुटुंबाचा डच ईस्ट इंडिजचा प्रवास सुरू झाला तेव्हा त्यांची मुलगी युजिनी सात महिन्यांची होती आणि अॅनाला पुन्हा दिवस गेलेले होते.
गर्भारपणातल्या उलट्या आणि बोट लागणं यामुळे प्रवासात अॅनाचे फार हाल झाले. युजीन मात्र ठणठणीत होता.तो माले भाषा शिकत होता.तसा तो भाषातज्ज्ञही होताच.तो इंग्रजी,फ्रेंच,
लॅटिन,ग्रीक आणि जर्मन भाषा मातृभाषेइतक्याच सफाईने लिहू व बोलू शकत होता. त्यात आता मालेची भर पडली.
११ डिसेंबर १८८७ ला द्युबुआ कुटुंब सुमात्रा बेटावरील पाडांग बंदरात उतरलं.पाश्चात्त्यांना पहिल्यांदा जेव्हा आशियाई भूप्रदेशाचं दर्शन घडतं तेव्हा आवाज,धूळ आणि अस्वच्छता यामुळे ते अस्वस्थ होतात.द्युबुआ कुटुंबही याला अपवाद नव्हतं.त्यातच अॅना छोट्या युजिनीचं संगोपन आणि येणारं बाळंतपण यामुळे रडकुंडीस आली.बरं,नवरा आपल्या वैद्यकीय कर्तव्यांमुळे सतत कामात गुंतलेला आणि सुटीदिवशी पुरातन हाडांच्या शोधात फिरणारा.मुलीला स्थानिकांवर सोपवताना अॅनाचा जीव वरखाली व्हायचा.विषुववृत्तीय पर्जन्यारण्याच्या प्रदेशात पाश्चात्त्यांचा सर्वांत मोठा शत्रू म्हणजे हिवताप.त्याच्याशीही सामना करणं भागच होतं.द्युबुआ प्रथम सुमात्रा बेटावर आले तेव्हा पावसाळा चालू होता.इतका जबरदस्त पाऊस आणि असं कुंद, बाष्पभारित वातावरण त्यांनी यापूर्वी कधीच अनुभवलेलं नव्हतं.शिवाय चिखल हादेखील त्यांच्या दृष्टीने एक नवाच अनुभव ठरला होता.
शिल्लक भाग पुढील लेखामध्ये…!