निसर्गाची चक्रीयता दर्शविणाऱ्या कोणत्याही चित्रात झाडं मुख्यस्थानी असतात.त्यांच्यामुळे परिसंस्था संतुलित होत असल्याचे जाणवते.
प्रकाश संश्लेषणातून हायड्रोकार्बनची निर्मिती होते,ज्यामुळे झाडांची वाढ होऊ शकते.
खोड,फांद्या आणि मुळातून झाडे त्यांच्या आयुष्यात सुमारे बावीस टन कार्बन-डाय-ऑक्साईड साठवून ठेवू शकतात.झाड वठले की बुरशी आणि सूक्ष्मजीवांमुळे विघटन प्रक्रिया चालू होते आणि पुन्हा हा तेवढाच बावीस टन कार्बन-डाय-ऑक्साईड वातावरणात हरितगृह वायू (ग्रीन हाऊस गॅस) म्हणून सोडला जातो. 
या कारणामुळे हवामान बदलाच्या कारणांमध्ये लाकूड जाळण्याचे योगदान नाही,असे तटस्थ असल्याचे मानले जाते. 
द हिडन लाईफ ऑफ ट्रीज,पी ट र वो ह्ल ले बे न
अनुवाद - गुरुदास नूलकर,अरविंद घनश्याम पाटकर
 मनोविकास प्रकाशन
हा वायू सूक्ष्मजीवांकडून उत्सर्जित झाला काय किंवा घरातल्या शेकोटीतून निघाला काय,दोन्ही सारखेच आहे.पण शेकोटीपेक्षा जंगलातील प्रक्रिया खूपच क्लिष्ट असते.जंगल हे एक कार्बन-डाय-
ऑक्साईडची पोकळी (व्हॅक्यूम) आहे,असे म्हणता येईल.इथे वातावरणातून कार्बन-डाय-ऑक्साईडचे शोषण सतत चालू असते आणि त्याचा साठा झाडातून केला जातो.वठलेल्या झाडातून थोड्याफार प्रमाणात हा वायू पुन्हा वातावरणात गेला तरी बहुतांश भाग हा त्या परिसंस्थेतच बंदिस्त राहतो.वठलेल्या झाडाच्या खोडाचा भुगा होईपर्यंत ते करतडले जाते.आणि उरलासुरला जैविक माल पावसामुळे जमिनीत जिरतो. 
जमिनीत खोलीप्रमाणे तापमान घटत जाते त्यामुळे हा माल जसजसा खाली जातो तसतशी विघटन प्रक्रिया जवळ जवळ थांबून जाते.आणि उर्वरित कार्बन-डाय-ऑक्साईड शेकडो वर्ष जैविक मालाच्या रूपाने मातीत बंदिस्त होतो.लाखो वर्षाने त्या एकवटलेल्या जैविक मालाचा दगडी कोळसा होणार असतो.आज उत्खनन केली जात असलेली खनिज इंधने ही सुमारे तीनशे दशलक्ष वर्षांपूवींची वठवलेली झाडे आहेत.त्या काळात आजच्या झाडांपेक्षा ती वेगळी दिसत असे.
सहा फुटापर्यंत खोडाचा घेर आणि शंभर फुटी उंच असलेली वनस्पती फर्न किंवा हॉर्स टेलसारखी दिसत असे.बहुतेक झाडे दलदलीमध्ये वाढत होती आणि वठली की पाण्यात पडून राहायची.त्यामुळे त्यांची कुजण्याची प्रक्रिया अतिशय संथ होती.
हजारो वर्षांनी कुजून रूपांतरित झालेल्या जैविक मालाचा जाड थर,त्याला 'पीट' म्हणतात,होत असे व त्यावर दगडाची खडी जमून ते दाबले जात असत.
याचा परिणाम म्हणजे पीटचे रूपांतर कोळशात होत असे.याचा अर्थ आजचे वीजप्रकल्प जीवाश्मयुक्त झाडे जाळून वीजनिर्मिती करीत आहेत. 
या प्रकल्पांतून उत्सर्जित होणारा कार्बन डाय-
ऑक्साईड आपण आजच्या झाडांना त्यांच्या पूर्वजांप्रमाणेच मुक्तपणे शोषू दिला तर किती छान होईल नाही का? मग त्याचा साठा मातीतच होत जाईल.आज कोळसा होण्याची प्रक्रिया जवळजवळ बंद पडली आहे,कारण मोठ्या प्रमाणावर जंगलतोड करून लाकडाचा औद्योगिक वापर केला जातो.पण यामुळे मातीवर उबदार सूर्यप्रकाश पडतो आणि सूक्ष्मजीवांना खोलपर्यंत जैविक मालाचे विघटन करता येते.पूर्वी जमिनीत खोलवर जो कार्बन-डाय-
ऑक्साईड बंदिस्त होऊन त्याचा पुढे कोळसा बनायचा,तो कार्बन-डाय-ऑक्साईड आता विघटनामुळे पुन्हा हवेत सोडला जातोय.जितकी वृक्षतोड होते तितका कार्बन-डाय-ऑक्साईड वातावरणात सोडला जातो आणि कार्बन-डाय-
ऑक्साईडचे जितके उत्सर्जन घरातल्या शेकोटीतून होते तितकेच जंगलांमधल्या जमिनीवरून होऊ लागले आहे.त्यामुळे आपल्या भागातील जमिनीखालचे कार्बन साठे ज्या गतीने वाढले त्याच गतीने घटत आहेत. 
तरीही जंगलातून चालताना तुम्हाला कोळसा निर्मिती प्रक्रियेची प्राथमिक अवस्था दिसून येईल. जमिनीत थोडं खोदलं तर फिकट रंगाचा थर लागेल.इथपर्यंत वरच्या भागाच्या मातीत भरपूर कार्बन साठवलेला असतो.आणि या अवस्थेत जंगलाला राहू दिलं तर कोळसा वायू आणि खनिज तेल उत्पादनाची सुरुवात होते. अभयारण्य आणि सुरक्षित जंगलातून हे असंच चालू असतं.युरोपमध्ये रोमन आणि सेल्ट राज्य असतानाही जंगलतोड चालू होती,त्यामुळे आपल्या जगलातून आज जो जैविक मालाचा अभाव आहे, हा फक्त अर्वाचीन वृक्षतोडीमुळे नाही.
सर्व वनस्पती आपले आवडते खाद्य अशाप्रकारे वातावरणातून सतत काढून घेत असतात,असं करणं हे मूर्खपणा नाही का? समुद्रातील शैवाल (अल्गी) सुद्धा वातावरणातला कार्बन-डाय-ऑक्साईड काढून टाकतात.आणि इथेही कार्बन-डाय-ऑक्साईड त्यांच्या मृत्यूनंतर समुद्राच्या तळाशी जातो आणि तिथे कार्बनचे पदार्थ तयार होतात.लाखो वर्ष या प्रक्रियेतून,जलचरांचे मृतदेहातून आणि प्रवाळांनी उत्सर्जित केलेल्या कॅल्शियम कार्बोनेटमधून वातावरणातील कार्बन-डाय-ऑक्साईडचा प्रचंड मोठा साठा समुद्रामध्ये आहे.भूशास्त्रातील कार्बोनिफेरस युगामध्ये कोळशाची निर्मिती चालू झाली तेव्हा वातावरणात कार्बन-डाय-ऑक्साईडचे प्रमाण आजच्यापेक्षा नऊ पट जास्त होते.यानंतर प्राचीन जंगलांमधून आणि इतर काही प्रक्रियेतून हे प्रमाण कमी झाले पण तरीही ते आजच्यापेक्षा तिप्पट होते. 
वातावरणातील कार्बन-डाय-ऑक्साईड संपून जाईपर्यंत जंगल परिसंस्थांची कार्बन साठवण्याची प्रक्रिया चालू राहील का?आज उपभोगाच्या संस्कृतीमुळे या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची काहीच गरज नाही.कारण पृथ्वीवरील कार्बन-डाय-ऑक्साईड शोषण आणि उत्पादातील फरक आपणच उलटवला आहे.इथले सर्व कार्बन साठे आपणच संपवत आहोत.खनिज तेल,वायू आणि कोळशाचा ऊर्जेसाठी आणि उब देण्यासाठी अति वापर होत आहे.त्यातून पृथ्वीचा कार्बन साठा पुन्हा प्रचंड प्रमाणात वातावरणात जात आहे.हे हवामान बदलाच्या पथ्यावर पडते,कारण हरितगृह वायूंना आपण पुन्हा वातावरणात सोडून त्यांची एका प्रकारे सुटका करीत आहोत.पण एवढी घाई करू नका. 
आज वातावरणातील कार्बन-डाय-ऑक्साईडमुळे जंगलांना अधिक पोषण मिळत आहे हे काही प्रमाणात खरं आहे.हल्ली जंगलातील जैविक मालाच्या मापनात असे दिसते की,झाडांची वाढ पूर्वीपेक्षा अधिक वेगाने होत आहे.
लाकूड उत्पादनाच्या आकडेवारीत आज आपल्याला बदल करावा लागतो,कारण काही दशकांपूर्वीपेक्षा आजचे प्रमाण एक तृतीयांशने वाढलेले दिसते.हो का? पण जर तुम्ही झाड असाल तर संथ वाढ होणे हेच योग्य असते.शेतीमध्ये वापरात असलेल्या खतांच्या अतिरिक्त नत्रामुळे भरभर वाढ होते,ती झाडांच्या आरोग्याला पूरक नाही.म्हणून कमी कार्बन-डाय-ऑक्साईडमुळे झालेली संथ वाढ हाच झाडांसाठी दीर्घायुष्याचा मार्ग आहे मी जंगल व्यवस्थापन विज्ञानाचे शिक्षण घेत असताना असे शिकलो की,वयस्कर झाडांपेक्षा लहान वयाच्या झाडांची वाढ अधिक वेगाने होते.हे आजही खरे आहे आणि यामुळेच जंगले भरभर पुनरुज्जीवित होतात.
पुनरुज्जीवित ? पण याचा अर्थ जुनी झाडे काढून त्या जागी नवीन लागवड करणे.जंगल मालकांची संघटना आणि व्यावसायिक लागवड करणाऱ्या प्रतिनिधींच्या मते असे केल्यानेच लाकडामध्ये योग्य प्रमाणात कार्बन-डाय-ऑक्साईड साठवला जातो.साधारण साठ ते एकशे वीस वर्ष झाली की झाडाची कार्बन साठा करण्याची क्षमता कमी होत जाते, पण प्रजातीप्रमाणे हे बदलते.मग ते झाड या वयानंतर लाकडासाठी तोडले जाण्यास योग्य ठरवले जाते, कारण ते आता वृद्ध झालं.चिरतरुण अवस्थेची मानवी कल्पना आपण झाडांना तर लावली नाही? 
कारण खरंतर एकशे वीस वर्षांच्या झाडाचे मानवी जीवनकालावधीच्या तुलनेत जेमतेम शाळकरी वय संपत आलेले असते.पण ही जुनी वैज्ञानिक गृहितकं एका ताज्या अभ्यासाच्या आधारे पूर्णपणे चुकीची ठरली असल्याचे दिसते.
जगातील अनेक राष्ट्रांच्या शास्त्रज्ञांनी एका संशोधनात विविध खंडातील सात लाख वृक्षांचा अभ्यास केला.यातून आश्चर्यकारक गोष्ट समोर आली ती म्हणजे,झाड वयस्कर झालं म्हणजे ते अशक्त,नाजूक आणि असमर्थ झालंय असं अजिबात नाही,उलट जितकं झाड वयस्कर तितकी त्याची वाढ वेगाने होते.
तीन फुटाहून अधिक घेर असलेल्या झाडात त्यांच्या अर्धा घेर असलेल्या झाडापेक्षा तिप्पट वेगाने जैविक मालाचे उत्पादन होते. उलट त्यांच्यामध्ये तरुण झाडांपेक्षा अधिक ऊर्जा आणि उत्पादन क्षमता असते.आपल्या दृष्टीने हवामान बदल रोखण्यासाठी हे महत्त्वाचे आहे.या अभ्यासानंतर नवीन लागवड करून जंगलांचे पुनरुज्जीवन करण्याची पद्धत बरोबर नाही,असे सांगितले गेले पाहिजे.फार फार तर असे म्हणता येईल की झाडांचे वय वाढते तसे त्यांच्या लाकडाचे मूल्य कमी होत जाते.वयस्कर झाडांच्या खोडातून बुरशी धरण्याची शक्यता वाढते आणि विघटन प्रक्रिया सुरू होऊ शकते.
पण यामुळे झाडाच्या वाढीचा वेग मात्र जराही कमी होत नाही.हवामान बदलाच्या लढाईत शस्त्र म्हणून झाडांचा वापर करायचा असेल तर त्यांना वयस्कर होऊ देणं,हेच इष्ट आहे. निसर्गसंवर्धन करणाऱ्या संस्था हेच मागत आहेत.