पिसाट हत्ती म्हटलं,की एक जबरदस्त, भीतिदायक व धिप्पाड हत्ती डोळ्यासमोर येतो.परंतु पानापट्टीचा हा हत्ती तसा लहानखुरा, साधारण साडेसात-आठ फूट उंच असावा.भारतीय हत्तीच्या पुढच्या पायाच्या ठशाच्या परिघाला दोनने गुणले,की त्याच्या उंचीचा,काही इंचांच्या फरकानं अंदाज बांधता येतो.या हत्तीची उंची फार नसली,
तरी तो धाडसी,कपटी आणि कावेबाज होता आणि त्याला मनुष्यप्राण्याचा अत्यंत तिरस्कार होता.संधी मिळेल,तेव्हा त्यांच्यावर हल्ला करायची त्याला आवड होती.
हा ज्या कळपात वाढला,त्याचा संचार कावेरी नदीकाठावरच्या वोडापट्टी वनक्षेत्रात असायचा.याच वनक्षेत्रात पानापट्टी गाव होतं.इथे बरेच गाईगुरांचे गोठे होते.असं म्हणतात,की
पिसाटायच्या आधी अगदी तरुण असताना हा हत्ती जरा जास्त उत्साही आणि आगाऊ होता.कळपातल्या हत्तिणींकडे त्याचं जरा जास्तच लक्ष असायचं.हे जेव्हा त्या कळपाच्या प्रमुखाच्या लक्षात आलं,तेव्हा त्यानं चीत्कार करून आपली नापसंती दर्शवली.त्याकडे जेव्हा दुर्लक्ष केलं गेलं,तेव्हा मात्र तो कळपाचा सुळेवाला प्रमुख त्याला कळपातून हाकलून द्यायला पुढे आला,तर हा त्याच्याशी झुंज घ्यायला उभा राहिला.त्यांची जबरदस्त झुंज झाली.
तो कळपाचा प्रमुख वयाने अनुभवानं आणि वजनानंही भारी होता,त्यामुळे झुंजीत या तरुण हत्तीनं चांगलाच मार खाल्ला.शेवटी हार खाऊन त्यानं पलायनाचा मार्ग स्वीकारला.त्या सर्वच दृष्ट्या भारी हत्तीच्या जबरदस्त सुळ्यांनी त्याला भरपूर जखमा झाल्या होत्या.आणि त्या झुंजीत त्याचा एक सुळा तुटला होता.त्याला आता साधारण अठरा इंच लांबीचा एकच सुळा राहिला होता.
तुटलेल्या सुळ्याच्या व अंगभर झालेल्या जखमांच्या वेदना,वर झुंजीत हार झाल्यामुळे व कळपातून हाकलले गेल्याने झालेला अपमान ह्या साऱ्यामुळे ह्या हत्तीला अनावर संतापही आला होता,कळपापासून तुटल्याचं दु:खही होत होतं.तो कळपाच्या आजूबाजूनं हिंडत राहिला, पण कळपात परत जायची हिंमत मात्र त्याला झाली नाही.दिवसेंदिवस तो अधिकच चिडचिडा व तिरसट बनत गेला.
एक दिवस जंगलातल्या रस्त्याच्या एका वळणावर अचानक एक बैलगाडी त्याच्यासमोर आली.ठेकेदारानं तोडलेले बांबू घेऊन ती चाललेली होती.एकदम समोर आलेली बैलगाडी पाहून तो बिथरला.त्याच्या मनात खदखदणारा सर्व संताप एकदम उफाळून आला.रागानं बेभान होत,तो सरळ त्या बैलगाडीवर चालून गेला. हल्ला करायला येणारा हत्ती पाहून घाबरलेल्या गाडीवानानं जीव वाचवायला गाडीतून उडी मारत धूम ठोकली.त्या वजनदार बैलगाडीचं जू मानेवर असल्यानं ते बैल मात्र काहीच करू शकत नव्हते.
या पिसाटानं आधी त्या बैलगाडीच्या चिरफळ्या उडवल्या,
त्यानंतर त्यानं आपला मोहरा बैलांवर वळवला.एका बैलाच्या लांबलचक वळणदार शिंगाभोवती आपल्या सोंडेचा विळखा घालून त्यानं त्याला उचललं आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या भरावावर अक्षरशः भिरकावून दिलं. दुसऱ्या दिवशी तो बैल जेव्हा सापडला,
तेव्हा त्याचं ते शिंग मुळापासून उपटलं गेलं होतं, त्याच्या पुढच्या पायाचं हाड मोडून ते तिथल्या मऊसर जमिनीत खोलवर रुतून तो बैल जागेवरच अडकून पडला होता.
दुसऱ्या बैलाला त्या हत्तीनं सुळ्यानं भोसकलं होतं,पण तो बैल मानेवरचं मोडलेलं जू घेऊन तसाच पळाला म्हणून वाचला होता.
त्यानंतर हत्तीचे प्रताप दिवसेंदिवस वाढतच गेले.नदीकडे जाणाऱ्या कितीतरी दुर्दैवी जिवांना त्यानं पायाखाली चिरडून मारलं होतं किंवा सोंडेत धरून एखाद्या झाडावर आपटून त्यांचा पार चेंदामेंदा केला होता.
या हत्तीची व माझी पहिली भेट अपघातानं झाली.
पानापट्टीपासून साधारण चार मैलांवर, कावेरी नदीच्या काठावर,होगेनाईकल म्हणून एक ठिकाण आहे. तिथे मी एका शनिवार - रविवारी मासेमारी करायला गेलो होतो.
महासीर मासे किंवा एखादी मगर मिळाली तर बघावं, असा माझा विचार होता.तो पिसाट त्या सुमारास तिथे नसून कळपामागे नदी ओलांडून पलीकडे गेलाय,असं मी ऐकलं होतं.
दुसऱ्या दिवशी खास काही मासेमारी झाली नाही,म्हणून मी चहा घ्यायला फॉरेस्ट बंगल्याकडे परत येत होतो.वाटेत मोराच्या केका माझ्या कानावर पडल्या.मोराच्या मांसाची चविष्ट मेजवानी करण्याचा मोह पडून मी माझी शॉटगन घेतली.त्यात पक्ष्यांना मारण्यासाठी वापरतात, ज्याला 'बर्ड शॉट' म्हणतात,अशी दोन काडतुसं भरून,जिथून मी मोराच्या केका ऐकल्या होत्या, तिथे निघालो.माझ्या सावजाचा शोध घेत सावधपणे पावलं टाकत मी मैलभर पुढे जाऊन, कावेरी नदीला मिळणाऱ्या चिनार नावाच्या ओढ्याच्या कोरड्या पात्रात आलो.त्या मऊ वाळूवरून चालत जाताना रबरी तळ असलेल्या माझ्या बुटांचा अजिबात आवाज होत नव्हता.समोरच्या काठावरच्या झुडुपांच्या पलीकडे मला मोराचा पंख फडफडवल्याचा आवाज येत होता. मी चवड्यावर चालत नाला पार करीत होतो,तर अचानक एका कर्णकर्कश्श तुतारीचा आवाज त्या शांततेला चिरत गेला आणि एक भलामोठा हत्ती अवघ्या पन्नास यार्डावर झाडाझुडुपांना तुडवत बाहेर येत माझ्यावर चाल करून येताना मला दिसला.
हत्ती झपाट्यानं अंतर कापू शकतात.मी कितीही जोरात पळालो,तरी माझी सुटका अशक्य होती. त्यातून मी जिथे होतो तिथे खाली मऊ वाळू आणि काटेरी झुडुपं होती,
त्यामुळे मला जोरात पळताही आलं नसतं.माझ्यापुढे आता एकच पर्याय होता.मी माझी शॉटगन उचलली आणि हत्तीच्या वर वळलेल्या सोंडेवर नेम धरत दोन्ही नळ्यांतून दोन गोळ्या एकापाठोपाठ एक झाडल्या.
गोळीबाराचा झालेला आवाज व त्या गोळ्या लागल्यानं झालेला दंश यामुळे रागानं, धमकावण्याच्या पवित्र्यात तुताऱ्या फोडत काही काळ तो तिथेच थांबला.ती संधी साधत मी माझी रिकामी बंदूक घेऊन आलेल्या रस्त्यानं धूम ठोकली.आपण इतक्या वेगानं धावलो, यावर माझाच विश्वास बसत नव्हता.फॉरेस्ट बंगल्यावर पोहोचताच मी तिथून माझी रायफल घेतली आणि तिथे परत धाव घेतली;पण ते चिनार ओढ्याचं पात्र सुनसान होतं.तो पिसाट ओढा ओलांडून पलीकडे गेला होता.अंधार पडू लागल्यानं मी त्याच्या मागावर मात्र गेलो नाही.दुसऱ्या दिवशी मला कामानिमित्त बंगलोरला परतणं आवश्यक असल्यानं आमची सलामीची फेरी हत्तीच्या हवाली करून मी परत गेलो.
हत्तीनं मिळवलेल्या सुप्रसिद्धीची सरकारने दखल घेऊन त्याला पिसाट म्हणून घोषित केलं.एवढंच नव्हे.तर तसा सरकारी फतवा काढून दवंडीही पिटली व त्याला मारण्यासाठी पाचशे रुपयांचं बक्षीस जाहीर केलं.
त्याच परिसरातील एक शिकारी सद्गृहस्थ मोठ्या धाडसानं या हत्तीला मारून बक्षीस मिळवायला पुढे आले.त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दलची मला नंतर कळलेली हकीगत अशी : एक जरा जुनीशीच ५०० ची दुनळी रायफल घेऊन हे गृहस्थ पानापट्टीत दाखल झाले.त्यांना मिळालेल्या माहितीनुसार त्या हत्तीचा वावर,मी चिनार ओढ्याच्या पात्रात जिथे त्या हत्तीच्या पायाखाली तुडवला जाताजाता वाचलो होतो, त्या वोडापट्टी वनक्षेत्रातच होता.या चिनार ओढ्याचा वायव्येकडचा तीर ही वोडापट्टी वनक्षेत्राची सीमा.पलीकडच्या तीरापासून पेन्नाग्राम वनक्षेत्र सुरु होतं.
या गृहस्थांनी दोन दिवस या हत्तीचा शोध घेतला, परंतु त्यांच्या पदरी निराशाच आली.तो हत्ती चिनारचा परिसर आणि वोडापट्टी वनक्षेत्राच्या बाहेर जात नाही,म्हणून तिसऱ्या दिवसाची रात्र त्यांनी पलीकडच्या पेन्नाग्राम वनक्षेत्राच्या दोन मैल आत काढायची ठरवली.त्यांनी दोन तंबू ठोकले.अधिक सुरक्षा म्हणून त्यांनी दोन्ही तंबूंभोवती वर्तुळाकार शेकोट्या पेटवल्या.भरपूर लाकूडफाटा हाताशी ठेवून शेकोट्या रात्रभर पेटत्या ठेवण्याच्या सूचना रात्री पहारा करणाऱ्यांना दिलेल्या होत्या.
रात्री सर्व जंगल शांत असल्यानं हे गृहस्थ व त्यांच्या
बरोबरच्या सर्व माणसांना लवकरच गाढ झोपा लागल्या.
भल्या पहाटे हत्तीचं जेव्हा तिथे आगमन झालं, तेव्हा शेकोट्या विझत येऊन फक्त निखारे उरले होते.सहसा हत्ती किंवा कुठलंही जनावर आगीच्या जवळ नाही,परंतु ते पांढरे तंबू पाहून बहुधा तो पिसाट बिथरला असावा आणि तंबू उद्ध्वस्त करायची उर्मी त्याला दाटून आली असावी.त्या विझत आलेल्या शेकोट्यांमधून काळजी -
पूर्वक वाट काढत तो आत आला आणि मोठ्यानं चीत्कार करत त्या तंबूंवर चालून गेला.
अचानक झालेल्या त्या आवाजानं झोपेतून जागे झालेल्या लोकांना तो चालून येत असलेला हत्ती दिसला,तेव्हा एकच हलकल्लोळ उडाला.सगळे सैरावैरा पळत सुटले.
तंबूतल्या त्या शिकारी सद्गृहस्थाला आपली दुनळी वापरायची जराही संधी मिळाली नाही.हत्तीच्यापायाखाली
तंबू जमीनदोस्त झाला.हत्तीनं तंबूच्या पार चिंध्या केल्या.
तंबूच्या कापडात गुरफटून अडकलेल्या त्या शिकाऱ्या -
भोवती आपल्या सोंडेचा विळखा घालून हत्तीनं त्याला एखाद्या विजयी वीरासारखं उचलून घेतलं.त्याला जवळच्या मोकळ्या जागेत घेऊन जात त्याने त्याला मातीत दूर रगडलं,दोन्ही पायांनी तुडवत त्यानं त्याचा इतका चेंदामेंदा केला,की त्याचा रक्तबंबाळ असा पार लोळागोळा झाला.शेवटी बहुधा हत्तीला रक्ताचा वास आवडला नसावा,कारण त्याने त्याला पुन्हा सोंडेत धरून उचललं आणि भिरकावून देऊन तो परत वोडापट्टी वनक्षेत्रात निघून गेला.
या घटनेचा परिणाम असा झाला,की सरकारनं बक्षिसाची रक्कम दुप्पट म्हणजे १००० रुपये केली.मी आता हत्तीबरोबरची दुसरी फेरी सुरु करणार होतो.
मी पानापट्टीला पोहोचल्यावर जिथे ती दुर्दैवी घटना घडली होती,त्या जागेला भेट दिली. शेकोट्यांची वर्तुळं भेदून आत येताना त्या हत्तीनं दाखवलेल्या धाडसानं मी अचंबित झालो.जिथे त्या हत्तीनं त्या शिकाऱ्याला पायाखाली चिरडलं होतं,त्याच्या खुणा त्याठिकाणी स्पष्ट दिसत होत्या.मृतदेहाचे अवशेष मात्र गिधाडांनी फस्त केले होते.
मी पानापट्टीला परत आलो.जवळच असलेल्या गोठ्याचा जो मालक होता,तो माग काढण्यात वाकबगार होता.मी हत्तीला शोधण्यासाठी त्याची मदत मागितली.चिनार ओढ्याच्या वाळूमध्ये त्या हत्तीच्या वावराच्या भरपूर खुणा होत्या.खरा प्रश्न त्यातले ताजे ठसे कोणते,हा होता आणि ते समजणं अशक्य होतं.तो वोडापट्टीच्या वनक्षेत्रात कुठेतरी किंवा वाटेतील छोट्या टेकड्या ओलांडून आधी सांगितल्याप्रमाणे चार मैलांवर असलेल्या कावेरी नदीकडे गेला असण्याचीही शक्यता होती.
वोडापट्टीच्या बाजूचा ओढ्याचा तीर,ओढ्यापासून
दोन मैल अंतरापर्यंत एका विशिष्ट, उंच वाढणाऱ्या गवतानं व्यापलेला होता.या गवताचे देठ काही ठिकाणी दहा फूट उंच होते त्यांच्या वरच्या टोकांना,उसाला
असतात.तसे, सुंदर दिसणारे तुरे होते.त्यावर पहाटे पडलेले दवबिंदू उगवत्या सूर्याच्या किरणांत चमचमत होते.ते दृश्य नितांत सुंदर,अगदी परीकथेत असतं,तसं दिसत होतं;परंतु त्या गवतात शिरण्याचा धोका मात्र त्यामुळे पटकन लक्षात येत नव्हता.ह्या गवताचे देठ एवढे उंच वाढलेले असतात,की जेमतेम एक यार्ड अंतरापर्यंतच तुम्हाला दिसतं.त्यातून चालायचं,तर तुम्हाला एका हातानं गवताचे देठ बाजूला करत व दुसऱ्या हातात रायफल धरूनच जावं लागतं.अशा त्या उंच वाढलेल्या गवतात जर हत्तींचा कळप असला,तर त्यातल्या एखाद्या हत्तीला हात लावता येण्याएवढा तो जवळ आला,तरच तो तुमच्या लक्षात येणं शक्य झालं असतं.
तो गवताचा पट्टा १०० ते २०० यार्ड असा कमीजास्त रुंद होता.या जागी डोंगर थेट ओढ्याला येऊन भिडला होता आणि तिथे उंचच उंच बांबूचं रान माजलं होतं.या गच्च रानातून जाणं गवतातून जाण्याएवढंच धोकादायक होतं. मोडून पडलेल्या बांबूच्या अणकुचीदार फांद्यामुळे चालणं अतिशय जिकिरीचं व कष्टदायक होत होतं.वारा सुटला की,ते उंच बांबू वाकून डोलायचे आणि त्यांच्या हिरव्या-पिवळ्या पानांची सळसळ व्हायची.आम्ही पुढील संपूर्ण चार दिवस त्या उंच रानगवतात व बांबूच्या रानातून त्या हत्तीचा शोध घेत पायपीट केली.डोंगराच्या पलीकडे पार कावेरी नदीपर्यंत आम्ही गेलो,परंतु आम्हाला कुठेही हत्तीचा ताजा माग आढळला नाही.
पाचव्या दिवशी दुपारी परत आम्ही कावेरी नदीशी होतो.
नदीच्या काठानं वरच्या दिशेला जात शोध घ्यायचं मी ठरवलं.या काठावर उंच वाढणारे मुठी किंवा मुथी म्हणून ओळखले जाणारे वृक्ष होते.कावेरी नदीच्या पात्राकडे जाणाऱ्या त्यांच्या अजस्र मुळांवरून कशीबशी पावलं टाकत,मधूनच येणाऱ्या त्या तुरेवाल्या उंच रान गवतातून चालत,अनंत अडचणींचा सामना करत आम्ही साधारण तीन मैल गेलो.आणि तिथे आम्हाला हत्तीच्या पावलाचे ताजे ठसे मिळाले. नदीपलीकडच्या कोइंबतूर जिल्ह्यातून तो हत्ती त्या दिवशी सकाळीच नदी ओलांडून आला होता.त्या ठशांची मापंही त्या पिसाट हत्तीच्या ठशांशी मिळतीजुळती होती.आता त्याचा माग काढणं सोपं होतं.त्या हत्तीच्या प्रचंड वजनानं गवत,बांबू व जमिनीवरच्या झाडोऱ्यात रुतलेली त्याची पावलं स्पष्ट दिसत होती.
त्याचा माग काढत आम्ही एक छोटीशी टेकडी चढून पलीकडे गेलो.तिथे आम्हाला शेणाचा एक ढीग पडलेला दिसला.आम्ही त्याला हात लावून पाहिलं,अगदी ताजं शेण जेवढं उबदार लागतं, तेवढं ते उबदार नव्हतं.म्हणजे ते अगदी ताजं नव्हतं.आम्ही तसेच चालत जात एका खोलशा दरीत उतरलो.इथं परत एक शेणाचा ढीग होता. त्यालाही आम्ही हात लावून पाहिला,तोही एवढा ताजा वाटला नाही.याचा अर्थ आमचं सावज अजून काही अंतर आमच्या पुढे होतं.
आम्ही धडपडत समोरचा चढ चढलो.त्यापुढे अजून दोन टेकड्या आम्ही ओलांडल्या आणि आम्हाला दिसलं,की तो हत्ती अचानक वळून कावेरी नदीच्या दिशेनं गेला होता.ते पाहून हा हत्ती आम्हाला चुकवून कावेरी नदी ओलांडून परत पलीकडे गेला,तर आमच्या हातातून निसटेल,अशी आम्हाला भीती वाटू लागली. आम्ही जमेल तेवढ्या वेगानं पुढे निघालो.इथे आम्हाला परत एक शेणाचा ढीग दिसला,
हा मात्र उबदार होता आणि तिथली जमीन हत्तीनं केलेल्या मूत्रविसर्जनानं ओली झाली होती. त्याचबरोबर थोडे फेसाचे बुडबुडेही तिथे दिसत होते,म्हणजे तो हत्ती फार दूर नव्हता.त्यापुढे मात्र तो हत्ती कावेरी नदी ओलांडून रायफलच्या पल्ल्यापलीकडे जायच्या आत त्याला गाठायची शर्यत लागल्यासारखे आम्ही धावत निघालो. वाटेत आम्हाला नुकत्याच खाली पडलेल्या फांद्या दिसल्या.हे साहेब निवांत चरत नदीकडे चालले होते.
पुढे तीव्र उतार होता,पाणी वाहात असल्याचाही आवाज येऊ लागला.आम्ही नदीकाठाशी पोहोचत आल्याचं आम्हाला कळलं.आणि लगेचच झाडांमधून आम्हाला चमचमतं पाणी दिसलं.आम्ही नदीकाठाशी होतो.
सावधपणे आवाज न करता आम्ही पुढे गेलो.पुढे मऊ वाळू होती,तिथे आमच्या लक्षात आलं,की आम्हाला वाटलं होतं,तसा हा हत्ती नदी ओलांडून पलीकडे गेलाच नव्हता.अचानक विचार बदलून तो नदीच्या वरच्या दिशेला असलेल्या एका गवताळ कुरणाकडे गेला होता.त्याच्या पायाखाली गवताची कोवळी पाती खाली ओलसर जमिनीत दाबली गेली होती आणि त्या खळग्यातून अजून पाण्याचे बुडबुडेही येत होते.
आम्ही अजून दीडशे यार्ड पुढे गेलो.तिथे नदीला एक फाटा फुटला होता.आम्ही तिथपर्यंत पोहोचलो आणि आम्हाला पाणी उडवल्याचे आणि हत्ती सोंडेत हवा आत ओढताना येतो, तसे आवाज येऊ लागले म्हणजे हत्ती पाण्यात डुंबत होता.
जो काही थोडासा वारा वाहात होता,तो सुदैवानं आमच्या दिशेला येत होता.नीट दिसावं म्हणून आम्ही काही फांद्या व त्या उंच रानगवताची पाती बाजूला करून पाहिलं,तसा आम्हाला तो हत्ती दिसला.तो पाण्यात आडवा कुशीवर पडून लोळत होता,पण त्याचं तोंड आमच्या विरुद्ध दिशेला होतं.
अशा परिस्थितीत तो हत्ती पिसाटच आहे,की कावेरी नदीच्या काठांवरच्या हत्तींच्या अनेक कळपांपैकी एक आहे - हे ठरवणं अवघड होतं.आम्ही त्याच्यावर लक्ष ठेवून थांबलो.
पुढच्या पाचच मिनिटांत पाण्याचे फवारे उडवत, सोंडेतून फुरफुरण्याचे आवाज काढत तो एकदम उठून उभा राहिला व निवांतपणे तो फाटा ओलांडून पलीकडे जाऊ लागला.हा सर्व वेळ त्याचं तोंड आमच्या विरुद्ध दिशेलाच होतं, त्यामुळे आम्ही त्याला दोन सुळे आहेत का एक, हे पाहू शकत नव्हतो.आता पटकन जर काही केलं नाही, तर तो पलीकडच्या रानगवतात नाहीसा झाला असता. मी बोटं जुळवून एकापाठोपाठ एक दोन चुटक्या वाजवल्या.
हत्तींची श्रवणशक्ती तीव्र असते.(नरभक्षकाच्या मागावर,संजय बापट) मी वाजवलेल्या चुटक्यांचा छोटासा आवाज त्या हत्तीला ऐकू आला आणि तो गर्रकन वळला.हाच होता तो पानापट्टीचा पिसाट.
त्याच्या तुटलेल्या डाव्या सुळ्याचं थोटूक आणि उजवा वर वळलेला दुसरा सुळा स्पष्टपणे दिसत होता.आपले बारीक डोळे फिरवत त्यानं एका सेकंदात आम्हाला पाहिलं.त्याची सोंड आत वळली,त्याची छोटीशी शेपटी ताठ होऊन वर आली.दाटून आलेल्या तिरस्कारानं व रागानं बेभान होत नदीपात्रातल्या पाण्यातून तो आमच्यावर धावून आला.
माझी ४०५ रायफल एकदाच बोलली.त्या वजनदार भारी गोळीनं वर वळलेल्या सोंडेखाली त्याच्या कंठाचा वेध घेतला.एक रक्ताचा फवारा त्याच्या कंठातून उडाला.पळून जायला तो बाजूला वळला,तेव्हा मी झाडलेल्या अजून दोन गोळ्या - एक कपाळात व दुसरी सुपासारख्या कानामागे त्याला वर्मी लागल्या.
तो भलामोठा अजस्र देह क्षणभर जागेवरच खिळला.नंतर थरथरत त्या उथळ पाण्यात धाडकन कोसळला.
कोइंबतूरच्या बाजूला असलेल्या पोनाची मलाई शिखरामागे मावळत्या सूर्याच्या किरणात त्या उथळ नदीपात्रातलं पाणी लालेलाल झालं.
समाप्त..