३.१ ॲनॅटॉमी
इ.स.१५४३ या वर्षानं वैज्ञानिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली आणि जुन्या ग्रीक संकल्पनांना मूठमाती दिली.याच वर्षी निकोलस कोपर्निकस या पोलिश खगोलशास्त्रज्ञानं पृथ्वी नव्हे तर सूर्य हा आपल्या सूर्यमालेच्या केंद्रस्थानी आहे आणि पृथ्वीप्रमाणेच इतर काही ग्रहही वर्तुळाकार कक्षेत सूर्याभोवती फिरत असतात असं ठणकावून सांगितलं.
त्याच वर्षी १५४३ मध्ये आधुनिक विज्ञानाचा पाया रचणारं आणखी एक महत्त्वाचं दुसरंही पुस्तक प्रकाशित झालं. त्या पुस्तकाचा लेखक होता,बेल्जियमचा ॲनॅटॉमिस्ट अँड्रेस व्हेसायलियस (१५१४-१५६४) आणि त्या पुस्तकाचं नाव होतं 'दे कॉर्पोरिस ह्युमानी फॅब्रिका' (ऑन द स्ट्रक्चर ऑफ द ह्यूमन बॉडी)!
व्हेसायलियस हा एक जिगरी माणूस होता. माणसाचा मृतदेह बघून कधी कुणाला आनंद होईल का? पण असा आनंद होणारा व्हेसायलियस या नावाचा एक माणूस खरंच होऊन गेला! व्हेसायलियसचं सुरुवातीचं शिक्षण ब्रसेल्समध्येच झालं.आता त्याला वैद्यकशास्त्राचा अभ्यास करायचा होता आणि त्या काळी यासाठीचा सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे पॅरिसमध्ये येणं हा होता.साहजिकच व्हेसायलियसनं आता १५३१ साली,वयाच्या १८ व्या वर्षी ब्रसेल्समधलं आपलं घर सोडून पॅरिस विद्यापीठाचा रस्ता धरला.तिथे त्याला शिकवायला सिल्व्हियस नावाचा गेलनचा शिष्य होता.सिल्व्हियसचा अर्थातच गेलनच्या तत्त्वांवर प्रचंड विश्वास होता.गेलननं सांगून ठेवलेली प्रत्येक गोष्ट तो ब्रीदवाक्य मानायचा.पण हे सगळं व्हेसायलियसला मात्र पटायचं नाही.
आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो इटलीला गेला.तिथे त्याला मोंडिनोनं आधी केलेल्या कामाबद्दल कळलं आणि पुरातनकाळापासून जे चालत आलंय त्यावरच विश्वास न ठेवता आपणही स्वतंत्रपणे संशोधन करून या सगळ्या गोष्टी पडताळून पाहू शकतो असं त्याच्या लक्षात आलं आणि तिथेच त्यानं हेच आपल्या जीवनाचं ध्येय ठरवून टाकलं.आता त्याला माणसाच्या शरीराचं विच्छेदन स्वतः करून बघायचं होतं. प्रत्येक गोष्ट स्वतः करून बघितल्याशिवाय त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही हे त्याचं त्यामागचं तत्त्व असे.पण त्याला अशी संधी मिळणं अशक्यच होतं.त्या काळचा धार्मिक विचारांचा पगडा बघता असं करायच्या प्रयत्नात त्यालाच जाळलं किंवा फासाला लटकावलं गेलं असतं! मग अशा परिस्थितीत मानवी शरीराबद्दलची आपली उत्सुकता कशी पुर्ण करणार?अभ्यास करण्यासाठी मानवी प्रेतं कुठून आणणार? त्या काळी जास्तीत जास्त स्मशानात माणसाच्या शरीराच्या कुठून तरी मिळालेल्या अवशेषांमधून उरलेली हार्ड व्हेसायलियसला तपासायला मिळायची, एवढंच ! व्हेसायलियस आणि त्याचा एक मित्र मग सदोदित या हाडांच्या मागावर असायचे! एके दिवशी एकदा त्यांना पॅरिस शहराच्या परिसरात एक प्रेत दिसलं.
गिधाडांनी त्याचे लचके तोडलेले असले तरी त्या प्रेतातली हाडं आणि त्या हाडांमधले स्नायू या गोष्टी मात्र अजून शिल्लक होत्या. ते बघताच व्हेसायलियस आणि त्याच्या मित्राला हर्षवायूच झाला! माणसाच्या शरीराचा सांगाडा मिळायची संधी त्यांच्यासमोर चालून आली होती.पण तेव्हा दुपारचं लख्ख ऊन होतं. साहजिकच त्यांना कुणीतरी बघायची दाट शक्यता होती,त्यामुळे घाईघाईत त्यांनी त्या प्रेताच्या सांगाड्याचा काही भागच कसाबसा काढून घेतला.पण व्हेसायलियसनं रात्री पुन्हा तिथे येऊन त्या प्रेतातला मेंदू काढून घेतला आणि आपल्या घरी घेऊन आला.पण असे अवयव घरी आणलेले कुणी पाहिलं तर काय, म्हणून दिवसाउजेडीही त्याला आपल्या घरी हा अभ्यास करणं शक्य नव्हतं.कारण त्या काळी दिवसा काम करायचं तर दारंखिडक्या सताड उघड्या ठेवून घरात सूर्यप्रकाश येईल अशा बेतानं काम करावं लागायचं.अजून विजेचे कृत्रिम दिवे यायचे होते.या सगळ्या गोष्टींमुळे रात्रीच्या वेळी एका छोट्याशा खोलीत मेणबत्तीच्या मिणमिणत्या प्रकाशात व्हेसायलियसनं त्या प्रेताच्या सांगाड्यामधली सगळी हाडं माणसाच्या शरीरात असतात तशी रचून ठेवली.
तो असं करू शकायचं कारण म्हणजे माणसाच्या शरीराचा आणि त्यातल्या हाडांचा व्हेसायलियसनं इतका दणदणीत अभ्यास केला होता,की आता कुठलंही हाड तो डोळे बंद करून नुसत्या स्पर्शावरून ओळखू शकत होता ! शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वयाच्या २२ व्या वर्षी व्हेसायलियसला इटलीमधल्या पडुआ भागातल्या राजानं तिथल्या विद्यापीठात प्राध्यापकाचं काम करण्यासाठी आमंत्रित केलं. व्हेसायलियसनं पाच वर्षं ते काम केलं.तिथेही डोळ्यांना दिसतील आणि सिद्ध होऊ शकतील अशाच गोष्टी तो कटाक्षानं शिकवे.त्याच्या आधीचे शिक्षक पाठ्यपुस्तकात दिलेल्या माहितीच्या आधारे आंधळेपणानं विद्यार्थ्यांना शिकवायचे.त्या पद्धतीवर अर्थातच गेलनच्या विचारांचा पगडा होता.पण व्हेसायलियसचं मात्र तसं नव्हतं.तो अतिशय विचारपूर्वक शिकवे. त्याच्या आधीचे प्राध्यापक विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी माहिती सांगायचे आणि मग दुसऱ्याच माणसाला प्राण्यांचं शरीरविच्छेदन करायला बोलवायचे.हे शरीर
विच्छेदन सुरू असताना फक्त त्याचं वर्णन हे शिक्षक करायचे.पण व्हेसायलियस मात्र स्वतःच प्राण्यांच्या शरीराचं विच्छेदन करायचा आणि त्याचे विद्यार्थी त्या टेबलच्या भोवती गोळा होऊन शिकायचे.त्या काळी अर्थातच मानवी शरीराचं विच्छेदन करायला परवानगी नसायची,त्यामुळे प्राण्याच्या शरीराचं विच्छेदन करून शिकायचं आणि त्यावरून माणसाच्या शरीरात काय असेल याचा अंदाज बांधत बांधत उपचार करायचे,असा द्राविडी प्राणायाम चाले! या आधीचे सगळेच डॉक्टर्स आणि ॲनॅटॉमिस्ट हेच करत आले होते. पण कोणत्याही प्राण्याची रचना आणि माणसाच्या शरीराची रचना यात काही फरक असेल की नाही? शिवाय,आधी होऊन गेलेल्या हिप्पोक्रटस,गेलन या लोकांनीही बरेचसे अनुमान प्राण्यांच्या शरीरावरूनच काढले होते.त्यामुळेच व्हेसायलियसला हे फरक किंवा आधीच्या शिकवण्यातल्या चुका प्रकर्षानं लक्षात येत होत्या आणि आपण पिढ्यान् पिढ्या चुकीचं शिकत आलो आणि आपल्याला आताही चुकीचंच शिकवावं लागत आहे.
ही खंत त्याच्या मनात फार बोचत होती.एका न्यायाधीशाला व्हेसायलियसचं काम आवडलं आणि त्यानं देहदंडाच्या शिक्षेनंतर मृत झालेल्या आरोपींची प्रेतं व्हेसायलियसला त्याच्या शरीरविच्छेदनाच्या कामासाठी मिळावीत अशी १५३९ साली व्यवस्था केली.त्यामुळे व्हेसायलियसला आता अभ्यास करायला मुबलक मृतदेह मिळणार होते! त्यानं तसा जबरदस्त अभ्यास केलाही.
या सगळ्यातून व्हेसायलियसनं स्वतःच्या निरीक्षणांतून चारच वर्षांत १५४३ साली 'दे ह्युमॅनी कॉर्पोरिस फॅब्रिका' हे नितांत सुंदर पुस्तक लिहिलं. या पुस्तकाची दोन वैशिष्ट्यं होती.एक तर त्या काळी छपाईची कला व्यवस्थित नावारूपाला आली होती.त्यामुळे या पुस्तकाच्या हजारो प्रती युरोपभर पाठवता येणं शक्य झालं होतं.आणि दुसरं म्हणजे या पुस्तकात स्वच्छ,नेटक्या आणि अप्रतिम आकृत्या काढलेल्या होत्या.त्या आकृत्या त्यानं त्या वेळचा इटलीमधला प्रसिद्ध चित्रकार टायटन याचा शिष्य जँ स्टिव्हॅझून फॉन कॅल्कॅर या गुणी चित्रकारानं काढलेल्या होत्या. या चित्रांमध्ये मानवी शरीर नैसर्गिक अवस्थांमध्ये दाखवलं होतं.त्यातले अवयव आणि स्नायूंची रचना खूपच अचूक आणि चांगल्या प्रकारे दाखवली होती.पण हा ग्रंथ प्रकाशित करू नये असं व्हेसायलियसच्या मित्रांचं मत होतं.कारण व्हेसायलियसनं माणसाच्या शरीराविषयी इतक्या खोलात जाऊन अभ्यास केला आहे आणि त्यापुढे जाऊन त्याविषयी ग्रंथ लिहिला आहे.असं तत्कालीन सत्ताधाऱ्यांना समजलं असतं तर व्हेसायलियसचं काही खरं नव्हतं! पण तरीही व्हेसायलियसनं या सगळ्या गोष्टींकडे लक्ष न देता त्याचा ग्रंथ बाहेर काढलाच.हा ग्रंथ तब्बल ७ खंडांचा मिळून बनलेला होता.काही दिवसांनी त्यानं या ग्रंथाची क्विक रेफरन्ससारखी एक छोटी आवृत्तीही काढली.त्यानं नंतर इतरही काही पुस्तकं लिहिली.१५३८ साली व्हेसायलियसनं व्हेनिसेक्शन किंवा रक्त काढणं याविषयी एक पत्र लिहून ते छापलं.तोपर्यंत कोणत्याही माणसाला आजार झालेला असताना त्याच्या शरीरातून भरपूर रक्त वाहू दिलं की तो माणूस बरा होतो असा ब्लडलेटिंग या नावानं ओळखला जाणारा समज अगदी प्रचलित होता. पण हे करत असताना त्या माणसाच्या शरीराच्या कुठल्या भागातून रक्त वाहू द्यावं याविषयी मात्र संभ्रमच होता.
कुठून रक्त वाहू द्यायचं हे त्या माणसाला कुठला आजार झाला आहे त्यावरून ठरवावं,आणि त्या आजाराच्या जवळच्या भागातून हे रक्त काढलं जावं असं गेलनचं मत होतं.पण इतर काही जणांना मात्र त्या माणसाच्या शरीरातून कुठूनही अगदी थोडं रक्त वाहू दिलं तरी चालण्यासारखं होतं.अमुक अमुक ठिकाणातूनच ते गेलं पाहिजे असं काही बंधन नसतं असं त्यांना वाटे.
व्हेसायलियसनं या बाबतीत मात्र गेलनची बाजू उचलून धरली. त्यासाठी त्यानं माणसाच्या शरीरातल्या अवयवांच्या आकृत्या काढून या सगळ्या प्रकाराचं नीट विश्लेषणही केलं.
त्यानंतर गेलनचा सगळा अभ्यास मृत माणसांच्या शरीरावर प्रयोग न करता मृत प्राण्यांच्या शरीरावर प्रयोग करून बेतलेला आहे हे व्हेसायलियसच्या लक्षात आलं.त्यामुळे मग त्यानं गेलननं लिहिलेल्या प्रबंधांवर पुन्हा नव्यानं काम केलं आणि त्यात असलेल्या अनेक चुका प्रसिद्ध केल्या. पण काही गेलन समर्थकांनी व्हेसायलियसवर त्याचंच म्हणणं चुकीचं असल्याचा आरोप केला. पण अशा गोष्टींनी डगमगून जाणाऱ्यांपैकी व्हेसायलियस अजिबात नव्हता.त्यानं आपलं काम तसंच पुढे सुरू ठेवलं.आता तर त्यानं आपल्या संशोधनाच्या आधारे मोंडिनो दे लुझी आणि ॲरिस्टॉटल यांच्या काही गैरसमजांवरही तोफा डागल्या.
गेलन आणि या दोघांनी माणसाच्या अनेक विधानं केली होती.ती साफ चूक असल्याचं व्हेसायलियसनं दाखवून दिलं. उदाहरणार्थ,माणसाच्या हृदयाला चार झडपा असतात आणि माणसाच्या शरीरातल्या रक्तवाहिन्यांचा उगम यकृतात होत नसून, हृदयात होतो हेही व्हेसायलियसनं प्रथमच सिद्ध केलं.१५४३ साली त्यानं जेकब करेर वॉन गेबवायलर नावाच्या ब्रसेल (स्वीत्झर्लंड) मधल्या कुप्रसिद्ध माणसाच्या प्रेताचं जाहीररीत्या शरीरविच्छेदन केलं.त्यातून त्यानं आपल्या वेगवेगळ्या संकल्पनांचं जाहीर प्रात्यक्षिकच दिलं.त्याचा सांगाडा अजूनही 'अनॅटॉमिकल म्युझियम ऑफ ब्रसेल'मध्ये जपून ठेवला आहे. हा जगातला सर्वात जुना डिसेक्शन केल्यानंतर जपून ठेवलेला सांगाडा आहे..! काही काळानंतर पाचव्या चार्ल्स राजानं त्याच्या दरबारात डॉक्टर म्हणून काम बघण्यासाठी व्हेसायलियसला आमंत्रण दिलं.व्हेसायलियसनं हे आमंत्रण स्वीकारलं,या काळात त्याचा सगळा वेळ सैनिकांबरोबर प्रवास करणं,त्यातल्या जखमी सैनिकांवर औषधोपचार करणं,प्रेतांचं शरीरविच्छेदन करणं आणि राजाच्या मित्रपरिवारापैकी कुणी विचारलेल्या वैद्यकीय गोष्टींशी संबंधित असलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधणं यात जाई.याच काळात व्हेसायलियसनं औषधी वनस्पती आणि त्यांचा वैद्यकशास्त्रात होणारा वापर यावरही एक प्रबंध लिहिला.त्यावरही धार्मिक कारणांवरून टीकेची झोड उठली. राजानं त्याला कडक शिक्षा द्यावी अशी लोकांकडून मागणी व्हायला लागली.१५५१ साली राजानं खरंच या आरोपांमध्ये तथ्य आहे का आणि त्याचा धार्मिक प्रथांवर काही अनिष्ट परिणाम घडतो आहे का,हे तपासण्यासाठी एक समिती नेमली.त्या समितीला व्हेसायलियस निर्दोष असल्याचं आढळलं.पण तरीही व्हेसायलियसवर होत असणाऱ्या टीकेचं प्रमाण काही कमी झालं नाही.त्यातल्या काही टीकेची पातळी तर अगदी हास्यास्पदच होती.'सजीव' अच्युत गोडबोले अमृता देशपांडे व मधुश्री पब्लिकेशन उदाहरणार्थ,एकानं लिहिलं होतं,की गेलनची सगळी मतं बरोबरच होती.
पण गेलनच्या काळापासून आजच्या युगापर्यंत माणसाच्या शरीरातच बदल झालेले आहेत आणि जर असे बदल झालेले असतील तर त्याला बिचारा गेलन तरी काय करणार? त्यामुळे त्याची मतं त्या वेळच्या माणसांच्या दृष्टीनं बरोबरच होती. व्हेसायलियसचंच यात चुकलं आहे! चार्ल्स राजानं पदत्याग केल्यावर त्याचा मुलगा फिलिप्स (दुसरा) याच्या कृपाछत्राखाली व्हेसायलियसचं काम अगदी छान सुरू होतं. आता त्याच्या 'दे ह्युमॅनी कॉर्पोरिस फॅब्रिका' या ग्रंथाची दुसरी आवृत्तीही बाजारात आली होती.तसंच त्याला सरकारतर्फे उर्वरित आयुष्यासाठी निवृत्तिवेतन मिळणार होतं.१५६४ साली व्हेसायलियस एका धार्मिक स्थळाच्या यात्रेला गेला.त्यावेळी जेरुसलेमला पोहोचल्यावर त्याला एक निरोप मिळाला.त्यात म्हटलं होतं, की त्याचा मित्र आणि शिष्य फैलोपियस याच्या मृत्यूमुळे पडुआ विद्यापीठात वैद्यकशास्त्र शिकवायला आता कोणीच उरले नव्हतं.ही जागा व्हेसायलियसनं घ्यावी अशी विनंती त्याला करण्यात आलेलीहोती.व्हेसायलियसनं ती विनंती स्वीकारली खरी.पण तिथे जात असताना समुद्रातून येणाऱ्या वादळी वाऱ्यानं त्याची तब्येत पार खच्ची करून टाकली .हे इतक्या वेगाने घडलं की त्यातच त्याचा मृत्यू झाला. ..अपुर्ण