इ.पू.सहावे शतक हे मानवी इतिहासातील अत्यंत महत्त्वाचे शतक आहे.वैचारिक जागृती हे या कालाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. हिंदुस्थानातच नव्हे तर इतर भागातही वैचारिक क्षेत्रात या वेळी महत्त्वपूर्ण घटना घडल्या. इराणमध्ये झरतुष्ट्र व चीनमध्ये कन्फ्युशियस यांनी आपल्या विचारांचा प्रभाव पाडण्यास सुरुवात केली होती.या कालातच हिंदुस्थानातही फार मोठा बदल प्रकषनि घडत होता.धार्मिक क्षेत्रात औपनिषदिक विचारांमुळे अगोदरच नवे विचारांकुर आले होते.यज्ञमूलक हिंदू धर्मावर उपनिषत्कारांनी हल्ले चढविले होते. उपनिषदांतील विचार ब्रह्मन्,आत्मन्,मुक्ती, कर्म, मानव,ईश्वर,जगत् जीवात्मा,परमात्मा आदींभोवती केंद्रित झाले होते.हळूहळू यज्ञयाग, संस्कार व विधी यांचा कंटाळा येऊ लागला होता.आत्मज्ञानप्राप्तीसाठी ज्ञानमार्ग श्रेष्ठ असून त्यासाठी तत्त्वचिंतन आवश्यक आहे हा विचार वाढून आधिभौतिक सुखापेक्षा आध्यात्मिक बल वाढविण्यासाठी काही लोक धडपडत होते. चिरंतन सुखासाठी व दुःखविमोचनासाठी ब्रह्मज्ञानप्राप्ती आवश्यक आहे,हे मान्य होऊ लागले होते.सर्वसामान्य माणसास यज्ञयागाचे क्लिष्ट स्वरूप आकलन होत नव्हते. उपनिषत्कारांनी एवढी जागृती करूनही रूढ झालेले यज्ञयाग,लोकांचा देवदेवतांवरील विश्वास,वर्णाश्रमव्यवस्था या गोष्टी कमी होत नव्हत्या.त्यामुळे सर्व समाज संभ्रमावस्थेत होता. या वेळी अनेक जण वेगवेगळे विचार मांडीत होते.बरेच संप्रदाय प्रचलित होऊ लागले होते. संदेहवादी,तर्कवादी,भौतिकवादी,मूलतत्त्ववादी इत्यादी साठाहून अधिक संप्रदाय सुरू झाले होते.अशा या कालातच जैन व बौद्ध या धर्माचा उदय झाला.
जैन धर्म
जैन धर्म हा हिंदुधर्माचाच एक भाग आहे,अलग झालेली एक शाखा आहे,असे अनेक जण समजतात;मात्र जैनधर्मीयांना ही गोष्ट मान्य नाही.याबाबत 'वैदिक संस्कृतीचा विकास' या ग्रंथामधील तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे मत पुढीलप्रमाणे आहे :"सर्व हिंदू व जैन तत्त्वज्ञान व्यापक अर्थाने एकच आहे. कर्मसिद्धांत व मोक्षसिद्धांत हे सर्व हिंदू तत्त्ववेत्त्यांचे समान आहेत.
आचार,व्यवहार, भाषा,कला,वाड् मय,ध्येयवाद अभिरुची इत्यादी सांस्कृतिक समानता इतर हिंदूंप्रमाणेच जैनांत सापडते.(तळटिप - १ पाली वाङ्मयानुसार बौद्ध धर्माच्या उदयकाली असे ६२ संप्रदाय अस्तित्वात होते,तर जैन मतानुसार त्यांची संख्या ३६३होती.
जैन समाज एका व्यापक हिंदू संस्कृतीच्या छत्राखालीच वावरत आहे,असे निश्चितपणे म्हणता येते." जैन मतानुसार हा धर्म अतिप्राचीन असून या धर्मात होऊन गेलेल्या एकूण २४ तीर्थंकरांपैकी वर्धमान महावीर हा शेवटचा तीर्थंकर होय.मात्र या धर्माचे महावीराच्या अगोदरचे स्वरूप स्पष्ट नाही. त्यामुळे महावीरालाच जैनधर्मसंस्थापक मानले जाते.या चोवीस तीर्थंकरांपैकी पहिल्या ऋषभ तीर्थंकरांपासून बावीस तीर्थंकरांविषयी विशेष माहिती उपलब्ध नाही.मात्र ब्रह्मांड पुराण, भागवत पुराण,स्कंद पुराण,महाभारत या ग्रंथांमध्ये जैन तीर्थंकरांचे उल्लेख आहेत. महावीराअगोदरचा तेविसावा तीर्थंकर पार्श्वनाथ हा होय.पार्श्वनाथाबद्दल एकूण माहिती गौतम बुद्धाप्रमाणेच आहे.सुरुवातीचे आयुष्य अत्यंत सुखासीन व ऐषआरामात घालविणाऱ्या पार्श्वानाथाने तिसाव्या वर्षी गृहत्याग करून ज्ञानप्राप्ती (कैवल्य) करून घेतली व पुढील सर्व आयुष्य संन्यस्तवृत्तीने घालविले.सत्य,अहिंसा,अस्तेय व अपरिग्रह ही चार तत्त्वे पार्श्वनाथाने दिली.पार्श्वनाथ हा बनारसचा राजा अश्वसेन याचा पुत्र होता.त्याने प्रभावती नावाच्या राजकन्येशी विवाह केला.या पार्श्वनाचे कार्यच पुढे २५० वर्षांनी महावीराने स्वतःकडे घेतले व जैन धर्मास स्पष्ट व पद्धतशीर स्वरूप दिले.
वर्धमान महावीर
इ.पू.५९९ च्या सुमारास महावीराचा जन्म वैशालीच्या कुंदग्राम नावाच्या उपनगरात झाला. त्याच्या वडिलांचे नाव सिद्धार्थ व आईचे नाव त्रिशला असे होते.वडील ज्ञातृक-क्षत्रिय घराण्यातील प्रमुख व सुखवस्तू गृहस्थ होते.आई त्रिशला ही वैशालीचा लिच्छवी सरदार चेटक याची बहीण होती,तर चेटकाची मुलगी बिंबिसाराला दिली होती.आईवडील धार्मिक वृत्तीचे व पुनर्जन्मावर विश्वास ठेवणारे होते. उपोषण व व्रतवैकल्ये करूनच त्यांनी देहत्याग केला.महावीराचे प्रभावती नावाच्या सुंदर मुलीशी लग्न झाले व तिजपासून त्यास अनोज्जा ही कन्याही झाली.आई वडिलांच्या मृत्यूचा त्याच्यावर मोठा परिणाम झाला व महावीराने वयाच्या तिसाव्या वर्षीच वडील बंधू नंदिवर्धन यांच्या संमतीने गृहत्याग केला.
संन्यस्त राहून त्याने कडक तपस्या आरंभिली. १२ वर्षे शक्ती व ज्ञान यांच्या प्राप्तीसाठी घोर तपश्चर्येने त्याने इंद्रियदमनाचे कष्ट सोसले, दिगंबरवृत्ती स्वीकारली.शेवटी जूपालिका नदीच्या काठी एका जुन्या मंदिरात तपश्चर्या करीत असतानाच त्यास (तळटिप - १. ऋषभ हा नाभिराज व परूदेवी यांचा मुलगा,गादीवर आल्यानंतर एकदा नर्तकी नाचत असतानाच ती गतप्राण झाल्याचे पाहून त्याने संसारत्याग केला. मुलाला गादीवर बसवून त्याने तपश्चर्या केली व कैवल्यपद प्राप्त केले. २.या बावीस तीर्थंकरांची नावे ऋषभ,अजित,संभव,अभिनंदन,
सुमती, पद्मप्रभू,सुपार्श्व,चंद्रप्रभू,पुष्पदंत,शीतल,श्रेयांस, वासुपूज्य,विमल,अनंत,धर्म,शांती,कुंभू,अरह, मल्ली,
मुनिसुव्रत,नमी व नेमी)
केवलज्ञानप्राप्ती झाली,ईप्सित मिळाले,त्याने सर्व इंद्रियावर ताबा मिळविला तो जितेंद्रिय झाला.
त्यामुळेच त्यास 'जिन','अर्हत','जेता', 'निग्रंथ' अथवा 'बंधनविरहित'असे म्हणतात व त्याचे अनुयायी 'जैन' या नावाने ओळखले जाऊ लागले. पुढील जीवनाची सुमारे ३० वर्षे वर्धमान महावीराने आपल्या विचारांचा प्रसार करण्यात घालविली.त्याच्या धर्मास जैन धर्म नाव मिळाले.दया,क्षमा व शांती यांचा सुरेख संगम त्याच्या ठिकाणी झाला होता.मोठमोठ्या घराण्यांशी त्याचा संबंध आला होता.विदेह,अंग, मगध,मिथिला,कोसल या भागांत त्याने धर्मप्रचार हिरिरीने केला.पार्श्वनाथाने दिलेल्या सत्य, अस्तेय,अहिंसा,अपरिग्रह या चार तत्त्वांमध्ये ब्रह्मचर्य हे पाचवे तत्त्व त्याने घातले. या पाच व्रतांना 'धर्माज्ञा' किंवा 'महाव्रते' असे म्हणतात.गृहस्थाश्रम्यांनी (श्रावक) व संन्यस्तांनी पाळावयाची वेगवेगळी व्रते असून गृहस्थाने बारा व्रते पाळवयाची आहेत.त्यांपैकी पहिल्या पाच व्रतांना 'अणुव्रत', सहा ते आठ व्रतांना 'गुणव्रत' व शेवटच्या चार व्रतांना 'शिक्षाव्रत' असे म्हणतात.
मगधाच्या राज्यकर्त्यांनी जैन धर्माला मोठा आश्रय दिला होता.शेवटी वयाच्या ७२ व्या वर्षी पाटणा जिल्ह्यातील पावापूर येथे इ.पू. ५२७ मध्ये महावीर मरण पावले.' मृत्युसमयी त्याचे सुमारे १४००० अनुयायी होते.
महावीराची शिकवण व जैन धर्माची मूलतत्वे
महावीराने ब्रह्मचर्यास जास्त महत्त्व दिले होते म्हणूनच त्याने पार्श्वाच्या चार नियमांत पाचवा ब्रह्मचर्य हा नियम घातला.या पाच नियमांसच 'धर्माज्ञा' अथवा 'महाव्रते' असे म्हणतात. वर्धमान आत्मक्लेश महत्त्वाचा मानतो.
पाच तत्त्वांचे पालन करावे व दिगंबर राहून धर्मप्रचार करावा,तसेच 'जगा व जगू द्या'अशी आज्ञा त्याने अनुयायांना दिली आहे.'वेद अपौरुषेय आहेत' हे जैन धर्मास मान्य नाही.वेद,वैदिक यज्ञयाग, विधी,विश्वनिर्माता परमेश्वर या कल्पना जैनधर्मीयांना अमान्य आहेत.
परमेश्वरापेक्षा आत्मा महत्त्वाचा असून विशुद्ध आत्मा हाच परमात्मा होय.मुक्तात्मा हाच परमेश्वर व पूर्णावस्थेप्रत गेलेला आत्मा म्हणजेच जिन किंवा जैन असे ते मानतात.जिनपद मिळविण्यासाठी इंद्रियांवर ताबा मिळविणे व केवलज्ञान मिळविणे आवश्यक असून,ती अवस्था पाच अवस्थांतून गेल्यानंतर प्राप्त होते.या पाच अवस्था म्हणजे मतिज्ञान,श्रुतिज्ञान,अवधिज्ञान,
मनःपर्यायज्ञान व केवलज्ञान या होत.केवलज्ञानप्राप्तीनंतर भूत, वर्तमान,तसेच भविष्य काळांतील ज्ञानप्राप्ती होते.जीव मुक्त ( तळटिप - १. पांच तत्त्वे :- १) सत्य - सत्याचा पुरस्कार,२) अहिंसा - काया, वाचा व मनाने कोणालाही दुखवू नये.३) अस्तेय - न दिलेली कोणतीही वस्तू घेऊ नये. ४) अपरिग्रह स्वार्थी वृत्ती असू नये.
कसलाही संचय करू नये. ५) ब्रह्मचर्य - ब्रह्मचर्य पाळावे.
२. काही जण महावीर ख्रिस्तपूर्व ५४६ मध्ये मरण पावला,असे मानतात.)
होतो व व्यक्ती अर्हत् अवस्थेस पोहोचते.पृथ्वी व जीव स्वयंभू व अनादी असून जीव व अजीव किंवा चल व अचल् तसेच आत्मा व देह यांच्या संयोगामुळे सर्व व्यवहार व संसार चालू आहेत. विश्वनिर्मितीस परमेश्वर कारणीभूत नाही.जीव व कर्म यांचा संयोग पूर्वीपासून असून कर्मापासून जीव स्वतंत्र झाला की तो मोक्षाप्रत जातो.ही जीवमुक्ती घडवून आणणे हे धर्माचे कार्य आहे व त्यामुळेच जीवाची शुद्धी व तेजही स्पष्ट होईल. थोडक्यात,जैन धर्माचे सर्व सार व केन्द्रबिंदू आत्मा हाच आहे.हा आत्मा वा जीव कर्मापासून मुक्त झाला म्हणजे मोक्ष मिळतो,असे जैनधर्मीय मानतात.यासाठीच शरीरक्लेश वा आत्मक्लेश याने आत्मशुद्धी व जीवमुक्ती होईल,असे ते समजतात.जन्ममरणाच्या फेऱ्यांतून सुटण्यासाठी त्रिरत्नांचे आचरण आवश्यक मानले जाते. :
"सम्यग्दर्शन-ज्ञान-चारित्र्याद् हि मोक्षमार्गः।" 'तत्त्वार्थाधिगमसूत्र' या ग्रंथात उमास्वामींनी यांना 'रत्नत्रय' असे म्हटले आहे. सम्यक् दर्शन,सम्यक् ज्ञान व सम्यक् चारित्र्य हीच ती त्रिरत्ने होत व हाच मोक्षमार्ग होय.सम्यक् चारित्र्य म्हणजेच सत्य,अहिंसा,अस्तेय,अपरिग्रह व ब्रह्मचर्य या पाच आज्ञांचे पालन होय.गृहस्थाश्रमी,संन्यासी व श्रावक यांनी या नियमांचे पालन करावे.
आवश्यकतेपेक्षा जास्त असलेल्या संपत्तीचा दानधर्म करावा.अहिंसा हे जैन धर्मातील महत्त्वाचे मूलतत्त्व.सर्वच ठिकाणी आत्मा आहे, त्यामुळेच अत्यंत क्षुद्र जीवाचीही हिंसा त्याज्य मानली जाते.प्राणिहत्या हे महापाप,मग ते प्राणी कितीही लहान वा क्षुद्र असोत.त्यामुळेच पाण्यातील जीवही पोटात जाऊ नयेत म्हणून पाणी गाळून पिणे,
हवेतील जीवाणूंची हत्या होऊ नये म्हणून हवा गाळून शोषण करणे,रात्री न भटकणे,शेती न करणे,वरचेवर उपवास करणे, या गोष्टी जैन पाळतात.मृत्यू चुकत नाही, यासाठीच आत्मक्लेश व शरीरक्लेश घ्यावे. आमरण अन्नत्याग करावा व इहलोक सोडावा, यासच 'सल्लेखना' म्हणतात. त्रिरत्नांनी मोक्षमार्गाची वाटचाल करावी व आत्म्याची जन्ममरणापासून मुक्ती करावी. यालाच अर्हत् असे म्हणतात.अशा 'अर्हता'मुळे 'सिद्धशील' निःस्वार्थीपणे राहणे,हिंसा टाळणे, सत्य बोलणे,यावरच जैन धर्म आधारला आहे, असे म्हणावे लागेल.अशा या जैन धर्माची सर्व माहिती आज उपलब्ध असलेल्या प्राचीन व पवित्र अशा ४५ ग्रंथात दिलेली आहे. हे ग्रंथ प्राकृत व अर्धमागधी भाषेत असून त्यांमध्ये अनेक तत्त्वबोधक कथा व टीकावाङ्मयही आहे. जैन धर्मग्रंथास 'पूर्व' म्हणतात.पूर्वामध्ये महावीराची वचने आहेत.भद्रबाहू या आचार्याने जैन वाङ् मय नष्ट होईल या भीतीने पाटलीपुत्र येथे धर्मपरिषद भरविली.पुढे वलभी येथेही पाचव्या शतकात एक परिषद झाली.आज या धर्माचे एकूण ११ पूर्व आहेत.आचार्य भद्रबाहूच्या काळी जैन धर्मातील मतभेद वाढले व त्यातूनच जैनधर्मात परस्परविरोधी असे दोन पंथ निर्माण झाले.इ.स.७९ च्या सुमारास हे दोन गट स्पष्ट झाले.श्वेतांबर व दिगंबर हे ते दोन पंथ होत.
श्वेतांबरपंथी जैन श्वेत वस्त्र वापरतात, परिषदेने मान्य केलेले धर्मग्रंथ प्रमाण मानतात. स्त्रियांनाही प्रयत्न केल्यास मुक्ती मिळू शकते, असे मानतात.सर्व केस काढणे,भिक्षा मागून उपजीविका करणे,इतर व्रत- वैकल्ये करणे, अशा प्रकारे जीवन आचरतात.दिगंबरपंथियांपेक्षा हे लोक कमी कर्मठ असून सुधारक प्रवृत्तीचे आहेत.त्यांना जिनसाधु असे म्हणतात.या उलट दिगंबर जैन दिशा हेच वस्त्र मानून नग्नावस्थेत वावरतात,अत्यंत कडकरीत्या व्रतवैकल्ये करतात. स्त्रियांना मोक्ष अप्राप्य आहे, असे मानतात. केस उपटून, संन्यस्त राहून, शरीरक्लेश घेतात. हातात मयूरपुच्छ बाळगतात व ओंजळीने पाणी पितात.
अशा प्रकारे हे लोक कर्मठ व सनातन वृत्तीचे आहेत. या दिगंबरांना 'जिनऋषी' असे म्हणतात.
जैन धर्माचा प्रसार व ऱ्हास
चोविसावा तीर्थंकर वर्धमान महावीर तत्कालीन अनेक राजकीय घराण्यांशी संबंधित असल्याने त्याच्या धर्मास राजाश्रय मिळाला.वैशालीचा राजा चेटक,वत्स देशाचा राजा उदयन,तसेच शिशुनाग वंशातील श्रेणिक राजा व त्याचा मुलगा हे सर्व श्रावक होते.तसेच मगध राजा नंद याचा जैन धर्मास पाठिंबा होता.तसेच मौर्य सम्राट चंद्रगुप्त हा तर भद्रबाहूचा शिष्य बनला होता. अशोकाचा नातू संप्रती हाही जैन बनला. कलिंगाचा खारवेल जैनच होता.
या सर्वांनी अनेक विहार बांधले व जैन धर्माचा प्रसार केला. तसेच हिंदू धर्मातील क्लिष्टतेस कंटाळलेला समाज तिकडे आकर्षित झाला.वैशाली,मगध, गुजरात सौराष्ट्र,
अंग,विदेह,दख्खन इत्यादी भागांतील बऱ्याच लोकांनी हा धर्म स्वीकारला. साधी व सोपी शिकवण,अर्धमागधी -
सारख्या सोप्या भाषेचे माध्यम,यज्ञयागाचा अभाव,
जातिभेद व अवडंबर यांचा अभाव असा हा धर्म असल्याने त्याचा प्रसार व प्रचार सहजासहजी झाला.मात्र बौद्ध धर्माच्या तुलनेने या धर्मास तितकशी साथ मिळालेली दिसत नाही.यास प्रमुख कारण म्हणजे या धर्मातील कर्मठता होय.
या धर्माच्या आज्ञेप्रमाणे जीवन जगणे सर्वसामान्य माणसास आवडेनासे झाले.तसेच पुढे राजाश्रयही मिळाला नाही.त्यामुळेच हा धर्म मोठ्या प्रमाणावर पसरू शकला नाही.तसेच बौद्ध धर्मप्रचारकांसारखे प्रचारकही या धर्मास मिळू न शकल्याने हा धर्म हिंदुस्थानाबाहेरही जाऊ शकला नाही.दिग्विजय करण्याचा वा हिंदुस्थानाबाहेर धर्म पसरविण्याचा प्रयत्नही या धर्माच्या अनुयायांनी केलेला नव्हता.भारतामध्ये मात्र इस्लामपूर्व काळातील जैन धर्म हा एक प्रभावी धर्म होता.चंद्रगुप्त मौर्याने (प्राचीन भारत इतिहास आणि संस्कृती,डॉ.गो.बं.
देगलूरकर,अपरांत,प्रकाशक चिंतामणी पराग पुरंदरे)
जैनधर्मप्रसारास मोठे साहाय्य केले.देशाच्या पश्चिम व दक्षिण भागांतही हा धर्म पसरला. आठवा आचार्य भद्रबाहू हा बिहारमध्ये मोठा दुष्काळ पडल्यामुळे अनेक अनुयायांसह म्हैसूरमध्ये आला व श्रवणबेळगोळ येथे राहिला.त्यामुळे दक्षिणेत प्रसार सहज शक्य झाला.या धर्माच्या लोकांनी व्यापार,कला, तत्त्वज्ञान या क्षेत्रांतही मोठी मोलाची कामगिरी बजाविली आहे.