* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

३/६/२४

नवयुगाचे तीन पुरस्कर्ते Three advocates of the new age...

पेट्रार्क,जोहान्स हस,जॉन बॉल


पेट्रार्क - प्राचीन ग्रीक व रोमन संस्कृतींचा ख्रिश्चन जगात झालेला पुनर्जन्म म्हणजे नवयुग असे सर्वसाधारणपणे समजण्यात येते.चौदाव्या शतकात केव्हातरी युरोपियनांस मातीत गाडलेले सौंदर्य आढळले.ते ते शोधू लागले.

उत्खनन सुरू झाले.ग्रीक लोकांनी तयार केलेले अप्रतिम पुतळे उपलब्ध झाले.पुन्हा एकदा या अप्रतिम शिल्पवस्तू निळ्या नभाखाली नीट मांडून ठेवण्यात आल्या.जुन्या मठातील ग्रंथालये धुंडाळण्यात येऊ लागली.जुन्या कचऱ्यात, गळाठ्यांत,रद्दीत रत्नांचे संशोधन होऊ लागले. धुळीने भरलेल्या कपाटात,पेट्यांत वगैरे पुस्तके सापडू लागली.


एसचायल्स,प्लेटो,रिस्टोफेन्स,सिसरो,होरेस, ल्युक्रेशियस इत्यादी थोर आचार्यांचे ग्रंथ मिळाले. ग्रीक लोकांच्या हास्याचा,आनंदाचा व विनोदाचा ध्वनी चौदाव्या शतकात पुन्हा युरोपच्या कानावर आला.गंभीर व चंबूसारखे तोंड करणारे सुतकी युरोप पुन्हा एकदा हसायला व विचार करायला शिकले. 


युरोपीय जनता दुसऱ्या देशांकडे,जातींकडे व काळाकडे पाहू लागली,तिचे डोळे उघडले; संकुचित,बंद मने जरा मोठी झाली,उघडली. चौदाव्या शतकातील युरोपियन लोक आपल्या उच्च शिक्षणासाठी साऱ्या जगातील ज्ञान घेऊ लागले.त्यांनी साऱ्या जगाचे जणू विद्यापीठच बनविले ! चिनी लोकांपासून ते छापण्याची कला व कागदांचा उपयोग शिकले,अरबांपासून बीजगणित व वैद्यक शिकले व प्राचीन ग्रीकांपासून तत्त्वज्ञान व काव्य शिकले.प्राचीन लोकांचे देव पुन्हा एकदा मानवात वावरायला लागले,मानवांशी हसायला,खेळायला व बोलायला आले.पुढच्या जन्मातील सुखासाठी अनिश्चित अशा भविष्य काळातील सुखासाठी ताटकळत बसण्यापेक्षा या जगातच प्रत्यक्ष सुख कसे मिळवावे,हे ते सांगू लागले.बहुतेक इतिहासात नवयुगाचे हे अशा अर्थाचे चित्र बहुधा आढळते व ते फारसे खोटे असते असेही नाही;पण ते अपुरे असते. झोपी गेलेल्या युरोपीय हृदयांत प्राचीनांचे ज्ञान-विज्ञान पुन्हा जिवंत झाले,एवढाच नवयुगाचा अर्थ नव्हता.नवयुग हे त्रिविध बंड होते;१.अज्ञानाविरुद्ध,२.असहिष्णुतेविरुद्ध,

३.छळ व जुलूम यांविरुद्ध अज्ञानाविरुद्ध बंडाचा झेंडा पेटार्क नामक पंडिताने उचलला; असहिष्णुतेविरुद्ध झेंडा धर्मोपदेशक जोहान्स हस याने उचलला;छळ व जुलूम यांविरुद्ध झेंडा प्रसिद्ध चळवळ्या जॉन बॉल याने उचलला.या तिघांचे जीवन थोडक्यात पाहू या.नवयुग या नावाने ज्ञात असलेल्या क्रांतीमध्ये जे तीन प्रवाह होते,ते या तिघांनी उचलून घेतले होते.


डान्टे मरण पावला.तेव्हा पेट्रार्क तेरा वर्षांचा होता.त्याचे पूर्ण नाव फॅन्सिस पेटार्क १३०४ मध्ये अरेझ्झी गावी त्याचा जन्म झाला.त्याचा बाप फ्लॉरेन्समधील प्रतिष्ठित नागरिक होता, पण त्याला तिथे हद्दपार करून ठेवण्यात आले होते.ज्या अल्पसंख्य पक्षाला मागाहून डान्टे मिळाला,त्याच पक्षाचा पेटार्कचा बापही होता; वयाच्या पंधराव्या वर्षी पेटार्कला कायद्याचा अभ्यास करण्यासाठी फ्रान्समधील माँटपेलियर विद्यापीठात घालण्यात आले.

कायद्याकडे त्याच्या मनाचा ओढा नव्हता;पण बापाचा धंदा पुढे चालविण्यासाठी तो कायदेपंडित होणार होता. तो इतर वाचन करी,काव्य करी.त्याने लॅटिनचा सांगोपांग अभ्यास केला होता;पण तत्कालीन युरोपियन विद्यार्थ्यांप्रमाणे त्यालाही ग्रीकचा गंधसुद्धा नव्हता.१३२६ साली त्याचा बाप वारला,तेव्हा तो ॲव्हिगनॉन येथे धर्मोपदेशक झाला.१३२७ सालच्या एप्रिलच्या सहाव्या तारखेस ॲव्हिगनॉनमधील एका चर्चमध्ये लॉरा नावाच्या तरुणीशी त्याची गाठ पडली,त्या वेळी तो तेवीस वर्षांचा हवा.लॉराचे लग्न झालेले होते. या तरुण कवीकडे - पेट्रार्ककडे तिचे मन आकर्षिला होते.ती त्याच्या भावना व वासना चेतवी,उचंबळवी,पेटवी; पण ती त्याला स्वतःच्या अधिक जवळ येऊ देत नसे.ती त्याला दुरून-दुरूनच खेळवी.त्यांची पहिली भेट झाली, त्या क्षणापासून लॉराने पेट्रार्कच्या मनावर व प्रतिभेवर सत्ता मिळविली.ती त्याच्या काव्याची स्वामिनी होती.त्याच्या सुनीतांमुळे ती अमर झाली आहे.नवयुगातील अत्यंत मनोहारिणी स्त्री म्हणून ती ओळखली जाते.चौदाव्या शतकातील या भावनाशून्य सुंदरीच्या सन्मानार्थ भावनाप्रधान तरुण आजपर्यंत भावनोत्कट काव्याच्या राशी निर्माण करीत आले आहेत.लॉराने जरी पेट्रार्कचे मन सर्वस्वी व्यापिले होते,तरी इतर स्त्रियांच्या बाबतीतही तो काही आंधळा नव्हता.

त्याला त्याच्या एका पूजकाने एक बेवारशी मूल अर्पण केले.दुसऱ्या एकाने एक बेवारशी मुलगी दिली व पोपच्या खास फर्मानाने पुढे ही मुले कायदेशीर मानली गेली.पेट्रार्क ॲव्हिगनॉन येथे १३३३ पर्यंत राहिला.नंतर तो प्राचीन काळातील सौंदर्य मिळविण्यासाठी आपल्या पहिल्या दीर्घ यात्रेवर निघाला.विनवुड रीड आपल्या ग्रंथात म्हणतो, "त्याने ग्रंथ धुंडाळण्याचे युग सुरू केले."पॅरिस,घेट,

लीज,कोलेन,रोम इत्यादी शहरी तो गेला.त्याने जुने हस्तलिखित लॅटिन ग्रंथ शोधून काढले व त्याच्या नकला करून घेऊन ते जुने ज्ञान व ते प्राचीन विचार त्याने आत्मसात करून घेतले.मॅटरजिकच्या 'निळा पक्षी' या पुस्तकात दोन जिज्ञासू भावंडांचे मृत बंधू जिवंत होतात. 


त्याप्रमाणे लॅटिन वाङ्मयातील प्राचीन वागीश्वर पेट्रार्कच्या स्मृतीचा जादूचा स्पर्श होताच जणू पुन्हा जिवंत झाले ! पेट्रार्कने सिसरो व सेनेका यांना पत्रे लिहिली;जणू ते त्याचे समकालीनच होते! शेकडो शतके ओलांडून तो आपल्या सहानुभूतिपूर्ण दृष्टीने त्यांना भेटला, त्यांच्याबरोबर त्यांच्याच भाषेत बोलला,त्यांचेच वाक्य सांप्रदाय वापरू लागला.जरी तो कॅथॉलिक चर्चचा धर्मनिष्ठ पुत्र होता,तरी तो प्राचीन ज्ञानमंदिराचा व प्राचीन धर्माचाही चाहता व उद्गता बनला.ईश्वराच्या तोंडावरील मध्ययुगीन बुरखा दूर करून त्याने ख्रिस्त केवळ दुःखमूर्ती नसून आनंदमूर्तीही आहे असे दाखवून युरोपला चकित केले. दुःखमूर्ती ख्रिस्त म्हणजे हास्यमूर्ती व विनोदमूर्ती बँकसचा जुळा भाऊ असे त्याने दाखविले.सौंदर्यासाठी ही भूतकाळातील यात्रा करण्यात पेट्रार्कची बरीच वर्षे गेली.नंतर तो लोकांपासून दूर अशा व्हॉक्लूज येथील भव्य व भीषण पर्वतांमधील एका दरीत घर करून राहिला व तिथे त्याने आपले शेष आयुष्य अत्यंत शांतपणे घालविले,प्राचीनांच्या काव्याचा अभ्यास केला आणि संगीत व नादमाधुर्य हे त्यांचे गुण आपल्या काव्यात आणले.वाङ्मयात त्याने एक नवीनच तार छेडली व मध्ययुगीन विचाराच्या छंदाला एक नवीन,तेजस्वी आणि उत्कट जोड दिली.मरण वा नरकयातना या विषयीच काव्ये करीत बसण्याऐवजी तो जीवनाविषयी व प्रेमाच्या आनंदाविषयी लिहू लागला.

झोपून उठल्याप्रमाणे जग त्याची ही गीते ऐकू लागले व टाळ्या वाजवून त्याची वाहवा करू लागले. पेट्रार्क जरी अवलियासारखा - संन्याशासारखा राहत होता, तरीही त्याला ही स्तुती आवडली नाही,असे नाही.ही स्तुती लाभावी म्हणून त्याने खटपट केली,प्रयत्न केले.तो सर्व प्रकारच्या संगीताचा भोक्ता होता.टाळ्यांचे तद्वतच स्तुती करणाऱ्या जिभेचेही संगीत त्याला आवडे.आपल्या लिखाणात जरी तो अधिकाऱ्यांची टिंगल करी, तरी प्रत्यक्ष वागताना मात्र तो त्यांच्याशी सौम्यपणानेच नव्हे;तर जरा आदबीनेही वागे. अधिकारीही त्याच्या साहित्यिक टिंगलीबद्दल स्मित करीत;पण खासगी वागणुकीत तो नमून वागे,म्हणून ते त्याचा मानसन्मान व उदोउदो करीत,पेट्रार्कचा देह,तसाच आत्मा कॅथॉलिक चर्चच्या प्रेमळ व वत्सल बाहुपाशात सुरक्षित असेतोपर्यंत त्याचे मन प्राचीनांच्या पुष्पवाटिकेत हिंडत-फिरत राहिले तरी चिंता नाही, असे ते अधिकारी म्हणत.त्याची ज्ञानाची तहान व रोमन वाङ्मयावरील त्याची उत्कट प्रीती या गोष्टी वगळल्या,तर पेट्रार्क धोकेबाज नव्हता. 


तो सनातनी,समतोल वृत्तीचा व शहाणा गृहस्थ होता.तो इतका साळसूद व भरवसा ठेवण्यालायक गृहस्थ होता की,तो काही वेडेवाकडे करील अशी कोणाला शंकाही येण्याची शक्यता नव्हती.पॅरिसच्या विद्यापीठाने त्याला प्राध्यापक म्हणून बोलाविले;पण नेपल्सचा राजा रॉबर्ट याच्या अध्यक्षतेखाली व्याख्यानमाला गुंफण्यासाठी आलेले आमंत्रण त्याला अधिक महत्त्वाचे वाटले. 


विद्यापीठातल्यापेक्षा प्रासादातला मानसन्मान त्याला अधिक आकर्षक वाटला.नेपल्सच्या वाटेवर रोम शहरी त्याचे सार्वजनिक स्वागत करण्यात आले.त्याला विजयमाला अर्पण करण्यात आली.श्रेष्ठतम कवी म्हणून त्याचा गौरव करण्यात आला.तो अर्वाचीन जगातील पहिला राजकवी होय.


त्याच्या आयुष्यातील शेवटच्या भागात तर त्याच्यावर मानसन्मानाची नुसती वृष्टी झाली! परंतु या काळात त्याच्या वाट्यास दुःखेही आली. इ.स.१३४८मध्ये त्याची स्फूर्तिदेवता लॉराही मेली.युरोपातील काळ्या प्लेगने तिचा बळी घेतला.प्लेगने सर्वत्र कहर उडविला होता.थोड्या वर्षांनी याच रोगाला त्याचा एकुलता एक मुलगाही बळी पडला.याच साथीत त्याचे काही जिवाभावाचे मित्रही मेले.तो पुन्हा एकदा पुस्तकात शिरला;त्याने वाङ्मयात बुडी मारली.तो असा एक आश्रम काढू इच्छित होता की,तिथे ख्रिश्चन धर्मातील ज्ञानवैराग्यांबरोबरच प्राचीन काळातील मुक्त विचार व मोकळी संस्कृती यांची ही पूजा - अर्चा व्हावी; प्राचीन धर्म व ख्रिस्ती धर्म दोन्ही तिथे भेट व एकत्र नांद शकावेत.पण हे स्वप्न अशक्य आहे असे त्याला आढळून आले व त्याने तो नाद सोडून दिला.त्यावेळेस जगभर क्रांतिकारक वारे वाहू लागले होते.थोडावेळ पेट्रार्कही या क्रांतीच्या वातचक्रात सापडला,पण थोड्याशा अनुभवानंतर तो क्रांतीच्या लाटातून बाहेर पडला.त्याचा आत्मा प्रत्यक्ष सृष्टीत, आसपासच्या प्रत्यक्ष जीवनात रमत नसे; तर काव्यात रमत असे,वाङ्मयात विहरत असे.१३७४ च्या १८ जुलैला तो मरण पावला.मरताना त्याने आपले पवित्र मस्तक एका पुस्तकाच्या उशीवर ठेवले होते.


जोहान्स हस - पेट्रार्कचे नवयुग म्हणजे शाब्दिक क्रांती होती.त्याने रोमन वाङ्मय उजेडात आणले व त्याच्या अनुयायांनी ग्रीक साहित्य उजेडात आणले.चिनी लोकांची छापण्याची कला युरोपात वाढत होती.जर्मनीत गुटेम्बर्ग व हॉलंडमध्ये कोस्टर यांनी या कलेत शोध लावले.पुस्तके छापली जाऊ लागली,मृत भूतकाळ सजीव होऊ लागला,

पुस्तकांचा प्रसार होऊ लागल्यामुळे ज्ञान बहुजन समाजात जाऊ लागले.युरोपला आपल्या थोर साहित्यिक वारशाची जाणीव झाली. 


मध्ययुग रानटी युद्धात गुंतलेले होते.युद्धात गुंतलेल्या जगाला वाचण्याची सात्विक व सांस्कृतिक करमणूक लाभली.तलवार बाजूस ठेवून पुस्तक हातात घ्यावयास मानवजात प्रथमच शिकत होती.


नवयुगाची ही पहिली स्थिती.अज्ञानाविरुद्ध बंड ही नवयुगातील पहिली महत्त्वाची गोष्ट,दुसरी स्थिती म्हणजे असहिष्णुतेविरुद्ध बंड येथे शब्दांशी तितकेसे काम नसून प्रत्यक्ष कृतीशी काम होते.मध्ययुगातील असहिष्णू धर्मवेडेपणाविरुद्ध बंड उभारण्यामधील अग्रेसर वीर म्हणून जोहान्स हस याचा गौरव केला पाहिजे.हस हा बोहेमियन होता.तो प्रेगच्या विद्यापीठात प्राध्यापक होता.त्याला चर्चचे ठरीव विधिनिषेध पचेनात.

बायबलमधील शब्द न् शब्द तो विश्वासार्ह मानीत नसे.त्याचा ख्रिस्ताच्या शिकवणीवर विश्वास होता,पण बायबलमधील चमत्कारांचा काही उपयोग नाही,असे तो म्हणे. तो भटांभिक्षुकांच्या विरुद्ध होता.मधल्या उपाध्यायांच्या लुडबुडीशिवायही ईश्वर भक्तांच्या प्रार्थना समजू शकतो,असे तो म्हणे.पोपांच्या थाटमाटावर तद्वतच चर्चच्या उद्धटपणावर व धर्मांधतेवर तो टीका करी.तो जॉन वुक्लिफचा मित्र व अनुयायी होता.जॉन वुक्लिफने लॅटिनमधील बायबलचे इंग्रजीत भाषांतर केले होते.चर्चने सांगितलेला अर्थ डोळे मिटून ऐकण्याऐवजी मित्र जनतेने बायबल स्वतः वाचून पाहावे म्हणून त्याने त्याचा इंग्रजीत अनुवाद केला होता.पदद‌लितांच्या हक्कांसाठी तो झगडे, त्या काळात युरोपातील भूमीपैकी तिसरा हिस्सा जमीन चर्चच्या मालकीची होती.ही सारी जमीन शेतकऱ्यांस परत दिली जावी असे हस म्हणे.आद्य ख्रिश्चन लोकांतले बंधुभाव व साम्यवाद पुन्हा येऊ देत,असे तो उपदेशी.थोडक्यात बोलायचे तर जोहान्स हा यथार्थपणे ख्रिश्चन होऊ पाहत होता.यामुळे संघटित चर्च त्याला शत्रू मानू लागले व चर्चचे अधिकारी त्याला पाण्यात पाहू लागले. इ.स. १४१२ मध्ये आर्चबिशपने जॉन वुक्लिफची दोनशे पुस्तके जाळून टाकली व हसला धर्मबाह्य केले.त्याने सारे प्रेग शहरच जणू कायदेबाह्य ठरविले.पण हस डगमगला नाही. आपले काम हाती घेऊन तो पुढे जात होता.त्या वेळी रोमन कॅथॉलिक चर्चचे दोन पोप असत. एक रोम येथे व दुसरा ॲव्हिगनॉन येथे. कॅथॉलिक धर्माला दुहीचा रोग मधूनमधून जडत असे,तसाच रोग या वेळेस जडला होता.असे तट पडल्यामुळे पृथ्वीवर ईश्वराचा एक प्रतिनिधी असण्याऐवजी दोन प्रतिनिधी झाले.वेल्स लिहितो,"प्रत्येक जण आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या अनुयायांना शाप देई,त्यामुळे थोडक्यात सांगायचे झाल्यास सारेच जणू नरकाचे धनी झाले। !"


इ.स.१४१५ मध्ये कॉन्स्टन्स येथे धर्मोपाध्यायांचा मेळावा जमला.चर्चमधली दुही मिटावी म्हणून ही परिषद भरली होती.या परिषदेसाठी हसलाही आमंत्रण देण्यात आले होते.


या लेखातील पुढील भाग…०५.०६.२४ या लेखामध्ये…!







१/६/२४

जंगलाचा शिष्टाचार..! Etiquette of the jungle..!

जंगलांमध्ये एक अलिखित शिष्टाचार असतो.यामध्ये झाडांच्या पेहराव आणि वागणुकीच्या नियमसूची असतात.या नियमांप्रमाणे सगळ्या झाडांना आपला पोशाख आणि सर्वमान्य वागणूक ठेवावी लागते.एक प्रगल्भ,चांगली वर्तणूक असणारा पानझडी वृक्ष असा दिसतो,


त्याचा बुंधा सरळसोट आकाशाकडे झेपलेला असतो आणि त्यांच्या लाकडी तंतूंची मांडणी नियमित व शिस्तबद्ध असते.मूळ सर्व दिशेला सारखीच पसरलेली असतात आणि झाडाखालीच जमिनीत गेलेली असतात. तरुणपणी झाडाच्या फांद्या बुंध्यापासून आडव्या पसरलेल्या आणि आखूड असतात. त्या फांद्या आज वठून गेलेल्या असतात.

त्या जागेवर लाकूड आणि साल धरलेलं असतं आणि त्यामुळे आता प्रौढ झाडाचा बुंधा उंच आणि नितळ दिसू लागतो.झाडाच्या वरच्या भागात नजर टाकली तर त्याची प्रमाणबद्ध वाढ झालेली छत्री दिसते.

वरच्या भागातल्या फांद्या आकाशाच्या दिशेने वाढत असतात. असं वाटतं की झाड आभाळाकडे साकडं मागत आहे.अशाप्रकारे प्रमाणबद्ध वाढ झालेल्या झाडाला दीर्घायू लाभू शकतं. जंगलातल्या सूचीपर्णी वृक्षांनाही हाच शिष्टाचार लागू असतो पण त्यांच्या वरच्या भागातल्या फांद्या साधारण जमिनीला समांतर असतात किंवा जराशा जमिनीकडे वळलेल्या असतात.पण या सगळ्यांचं काय प्रयोजन असेल ? झाडाला सौंदर्याची जाण असेल की काय? ते मला नक्की सांगता येणार नाही पण एक मात्र निश्चित की अशा प्रकारच्या आदर्श वाढीमुळे झाडाला स्थिरता मिळते.प्रत्येक विशालवृक्षाच्या छत्रीला वादळी वारे,अफाट पाऊस आणि बर्फाचे वजन अशा गोष्टींना तोंड द्यावं लागतं.अशा परिस्थितीत उन्मळून पडू नये म्हणून झाडाला मुळांचा भक्कम आधार असावा लागतो.त्यासाठी मुळं जमिनीला आणि दगडांना घट्ट पकडून ठेवतात.पण शेंड्याला तीव्र फटका लागला की तो बुंध्यातून खालपर्यंत पोहोचतो.


काही वेळा याची तीव्रता २२० टनाहून जास्त असू शकते.बुंध्यात कुठेही कमकुवत भाग असला तर तिथे झाड मोडू शकते.पण प्रमाणबद्ध वाढीच्या झाडांना हा फटका सहन करता येतो कारण त्यांच्या शरीरातून धक्क्याचा प्रवाह समान होतो आणि कोणत्याही एका भागाला जास्त धक्का लागत नाही.


जी झाडं त्यांचा अलिखित शिष्टाचार पाळत नाहीत त्यांना मात्र धोका असतो. 


उदाहरणार्थ,एखाद्याचं खोड वाकलेलं असेल तर त्याला साधं उभं राहायलाही त्रास होतो. त्याच्या छत्रीचं वजन बुंध्याकडून समप्रमाणात पेललं जात नाही आणि झाड एका बाजूला झुकतं.त्या बाजूने झाड पडू नये यासाठी त्याला तिथल्या लाकडाची अधिक वाढ करावी लागते.ही वाढ यातल्या वाढीच्या वर्तुळांमध्ये गडद रंगाची दिसते.इथे हवा कमी असते आणि लाकडाची घनता अधिक असते.दुपाखी बुंधा असलेल्या झाडांना तर अधिक धोका असतो.फाटा बनत असताना जणू दोन बुंदे एकत्र वाढत असल्याचा भार झाडावर पडतो.दोन्ही बुंधे आपल्या फांद्या आणि छत्री वाढविण्यात व्यस्त असतात. वादळी वाऱ्यामध्ये दोन्ही बुंधे वेगळ्या दिशेने हलतात आणि झाडाच्या मुख्य बुंध्यावर प्रचंड ताण पडतो.जर फाटा इंग्रजी u अक्षरासारखा असेल तर फार धोका नसतो. पण जर का झाडाचा फाटा अक्षरासारखा असला तर मात्र वादळात झाडावर मोठं संकट येऊ शकतं.हा फाटा सर्वांत कमकुवत जागेवर,म्हणजेच त्याच्या जोडापाशी मोडू शकतो.आणि जर असं झालं तर त्याचा झाडावर प्रचंड ताण पडतो.तुटलेल्या भागावर झाड लगेच लाकूड आणि सालाची वाढ सुरू करतात.पण हे नेहमीच यशस्वी होत नाही.त्याच्या आधी किटाणूंची लागवड झाली की जखमेतून काळं द्रव्य बाहेर येत राहतं.पण त्याहून वाईट म्हणजे तुटलेल्या फाट्यामध्ये पाणी साठून राहतं आणि बुंध्यात जाऊ लागतं.काही काळातच बुंधा तुटून जातो आणि झाड अधिकच अस्थिर होतं.असं झाड फारफार तर एक-दोन दशकं जिवंत राहतं कारण कधी भरून न आलेल्या या जखमेवर सूक्ष्म किटाणूंचं सतत आक्रमण चालूच असतं.जंगलातली काही झाडं तर शिष्टाचाराच्या पूर्ण विरोधातच वागतात.


झाडाच्या इतर भागाने कष्टाने सरळसोट वाढ केल्यानंतरही त्याच्या काही फांद्या केळी सारख्या बाहेर येतात.काही वेळा जंगलाचा एक भाग शिष्टाचार पाळत नाही.याला काय म्हणावं? हा भाग निसर्गाचे नियम धाब्यावर टाकतोय की काय? नक्कीच नाही! कारण हे निसर्गाचं प्रयोजन असतं,ज्यामुळे काही झाडांत अशी वाढ होते.


उदाहरणार्थ,एका विशिष्ट उंचीनंतर डोंगरावर झाड दिसत नाहीत.तिथल्या तीव्र उतारावर वाढणारी झाडंही अशाच प्रकारे शिष्टाचार न पाळून बंडखोरी करतात.या उंचीवर थंडीत बर्फाचे ढीग रचले जातात.

ते अस्थिर असतात कारण उतारावरून अगदी संथ गतीने ते खाली सरकत असतात.हे मोठे ढिगारे जेव्हा सरकतात तेव्हा रोपटी आणि लहान झाडं त्यांच्यामुळे वाकली जातात, तरीही झाडं मरत नाहीत.पण दहा-एक फूट वाढलेल्या झाडांची खोडं मात्र दुखावली जातात.काही वेळेला खोड तुटून जातं.जी तुटत नाहीत ती खोडं तिरकस राहतात. झाडाची वाढ वरच्या टोकातून होत असल्यामुळे वर वाढणारं खोड सरळ आकाशाकडे जाऊ लागतं आणि खालचा भाग मात्र वाकडाच राहतो.बर्फाचा जोर काही वर्ष असाच सुरू राहिला तर झाडाचं खोड एखाद्या तलवारीसारखं वक्राकार दिसू लागतं.काही वर्षांनी जेव्हा खोड धष्टपुष्ट होतं त्यानंतर मात्र बर्फाचा लोड त्याला सावरता येतो पण तोपर्यंत बुंध्याचा खालचा भाग तलवारी सारखाच असतो आणि वरचा मात्र सरळसोट.बर्फ नसलेल्या डोंगर उतारावरच्या झाडांनाही अशाच प्रकारचा ताण पडू शकतो.इथे मातीच काही वेळा खाली सरकत असते.यामुळे झाडं थोडी खाली सरकतात आणि तशीच सरळ आकाशाकडे वाढू लागतात.अशी खूप बदल झालेली झाडं अलास्का आणि सायबेरियात दिसतात. 


जागतिक तापमान वाढीमुळे इथला बर्फ वितळत आहे.इथली माती भुसभुशीत असल्यामुळे झाडं अस्थिर होतात.प्रत्येक झाड वेगळ्या दिशेला ढकललं गेलं असल्यामुळे इथली जंगलं कशीही वाढलेली दिसतात.शास्त्रज्ञ यांना 'दारूडी जंगलं' म्हणतात.

जंगलाच्या कडेला वाढणाऱ्या झाडांसाठी मात्र नियम थोडे शिथिल केलेले असतात.इथे सूर्यप्रकाश बाजूनेही येऊ शकतो.कारण शेजारी मोकळी जागा किंवा एखादा तलाव असतो जिथं झाडांनी सूर्यप्रकाश अडलेला नसतो. 


छोट्या झाडांना आणि रोपट्यांना त्या दिशेने वाढता येतं.पानझडी वृक्ष याचा नक्कीच फायदा करून घेतात.जर आपल्या मुख्य खोडाची वाढ जमिनीला जवळजवळ समांतर केली तर त्यांना आपला पसारा तीस फुटांपर्यंत वाढवता येतो.अर्थातच जोरदार बर्फवृष्टीमध्ये फांद्या मोडण्याची त्यांना भीती असतेच.

कारण फांद्यांच्या टोकाला बर्फाचं वजन पडतं आणि फांदीचा तरफा होऊन तुटण्याची शक्यता वाढते.

तरीही अल्पायुषी असूनही सूर्यप्रकाशाच्या उपलब्धतेमुळे आपली प्रजा वाढवणं झाडाला शक्य होतं.पानझडी वृक्ष जसे सूर्यप्रकाशाकडे झेप घेतात तसे मात्र सूचीपर्णी वृक्ष अजिबात करत नाहीत.

त्यांची वाढ सरळ तरी होते नाहीतर खुंटलेली राहते.

गुरुत्वाकर्षणाच्या विरोधातच त्यांची वाढ चालू असते.त्यामुळे मोठी झाडं सरळसोट वाढतात आणि स्थिरावतात.त्यांच्या काही फांद्या जमिनीला समांतर फक्त जाणवतील किंवा दिसतील एवढ्याच जाडीचे बुंधे घेऊन पसरलेले असतात,सूर्यप्रकाश शोधण्याच्या प्रयत्नात ! पण त्यांना तेवढीच काय ती परवानगी असते.याचा अपवाद म्हणजे पाईन झाड. आपला सगळा घेर ते बेफिकिरीने सूर्यप्रकाशाकडे वाढवतात.

कदाचित त्यामुळेच सूचीपर्णी जंगलात पाईनची झाडं सर्वाधिक तुटलेली दिसतात.


१७.०३.२४ या लेखातील पुढील लेख...



..मित्र माधव गव्हाणे (सॉक्रेटिस) माझ्यासाठी सावलीचं झाडं..!

३०/५/२४

राणी : एक माकडीन Queen: A monkey

एकदा जवळच्या दुर्गा टेकडीवर तिथल्या कर्मचाऱ्यांनी तात्पुरता पिंजरा बांधून त्यात माकडाची जोडी कुठून तरी पैदा करून ठेवली होती.ती बॉनट जातीची माकडं होती.

ही माकडं महाराष्ट्रात आणि दक्षिण भारतातील राज्यां-

मधेही आढळतात.ही मंडळी शाकाहारी असली तरी कधी कधी कोळी,कोळ्यांची जाळी आणि काही कीटकही आनंदाने गट्टम करतात.दुर्गा टेकडीवर फिरायला येणारे नागरिक या माकडांना केळी, सफरचंदं वगैरे खायला घालत.तिथले कर्मचारीही कधी कधी पपई,अंजीर अशी चविष्ट फळं आवर्जून माकडांसाठी आणत.टेकडीवर दिवसा माणसांची जाग असे,पण रात्री मात्र माकडं त्या पिंजऱ्यात एकटीच असत.


एका रात्री गावभर भटकणाऱ्या रानटी कुत्र्यांनी त्यांच्या जबड्यांनी त्या तकलादू पिंजऱ्याच्या जाळ्या तोडून टाकल्या आणि त्या निष्पाप माकडांवर हल्ला चढवला.

त्या रानटी हल्ल्यामधे नराचा जागीच मृत्यू झाला.मादीही गंभीर जखमी झाली.सकाळी निरोप मिळाल्या मिळाल्या आम्ही टेकडीवर जाऊन पोहोचलो.माकडिणीची अवस्था पाहून काळजात चर्र झालं.उजव्या हाताच्या जागी फक्त हाड शिल्लक राहिलं होतं. कुत्र्यांनी तिचा हात पिंजऱ्या

बाहेर ओढून त्याभोवतीच्या मांस आणि कातडीचा फडशा पाडला होता.खूप रक्त गेलं होतं;पण कशी कोण जाणे,ती अजूनही जिवंत होती.त्या वेळी तिथे कामावर असलेल्या आलेल्या गोरख नेवाळेने तिला हलकेच पोत्यामध्ये गुंडाळलं आणि स्कूटरवर माझ्या मागे बसला.पार्कवर आल्यावर त्या मादीला खाली झोपवून नीट तपासलं. खांद्याच्या सांध्यातून हाड मोकळं झालं. ताबडतोब औंधच्या सरकारी दवाखान्याचे प्राण्यांचे डॉक्टर सोनटक्के यांना बोलावणं पाठवलं.तेही तातडीने आले.अँटिबायोटिक्स, इंजेक्शनं,गोळ्या,ड्रेसिंग सगळं यथासांग पार पडलं.दोन दिवस तिला सलाइनवर ठेवलं.त्या वेळी आमच्याकडे नारायण शिंदे नावाचा वैदू समाजातला वॉचमन कामावर होता.त्यालाही जडी-बुटीची बऱ्यापैकी जाण होती.त्याने मावळातल्या जंगलातून शोधून आणलेल्या कुठल्या तरी औषधी झाडपाल्याचा लेप बनवून तिच्या हाताला लावला.पहिले दोन दिवस ती जगते की वाचते याची खात्री नव्हती.नेवाळे दिवसरात्र तिच्यासोबत बसून होता.


सोयरे वनचरे-अनिल खैरे-राणी : आमच्या मर्कट परिवारातली आद्य स्त्री-समकालीन प्रकाशन


पण तिसऱ्या दिवशी सकाळी ती आपणहून उठली.

नेवाळेने तिला एक केळं सोलून दिलं,ते तिने अधाशीपणे खाल्लं.आम्हाला खूपच आनंद झाला.एवढ्या जीवघेण्या हल्ल्यानंतरही ही माकडीण बचावली होती.तिच्या जीवावरचा धोका टळला होता.तीन-चार आठवड्यांत राणीच्या खांद्याची जखम पूर्णपणे भरून आली. अंगात शक्ती यायला आणखी बराच वेळ लागला.जीवघेण्या हल्ल्यानंतर एक हात कायमचा गमावूनही ती आश्चर्यकारकरीत्या पूर्ण बरी झाली.तिचं नाव आम्ही राणी ठेवलं.दुर्गा टेकडीवरच्या प्रस्तावित पण नंतर रद्द झालेल्या प्राणिसंग्रहालयासाठी तयार केलेले चार-पाच ट्रान्झिट केज,चार चाकं असलेले एखादा प्राणी मावेल असे पिंजरे आमच्याकडे पडून होते.त्यातले दोन पिंजरे जोडून आम्ही राणीसाठी पिंजरा तयार केला.त्या पिंजऱ्याच्या मागच्या बाजूला आणखी एक पिंजरा जोडून फीडिंग केज बनवला.राणी एकटीच असल्यामुळे तिचा वेळ कसा जाणार हा प्रश्न होता.त्यामुळे मोठ्या पिंजऱ्यामधे तिच्यासाठी मोटरसायकलच्या टायरचा झोका बांधला.राणीचा दिवसभराचा वेळ झोक्यावरच जात असे.सकाळ-संध्याकाळ तिला थोड्या वेळासाठी पिंजऱ्याबाहेर काढत असू.संपत पुलावळे नावाचा हुशार कर्मचारी पिंजरा झाडून स्वच्छ करण्याचं,तिच्या खाण्यापिण्याचं काम मन लावून करत असे.


पिंजऱ्यामधे एकटी-दुकटी राहणारी माकडं लवकरच कंटाळतात.त्यांना सतत एंगेज ठेवणं गरजेचं असतं.

राणीला विरंगुळा म्हणून आम्ही सुरुवातीला एक भला मोठा ओंडका पिंजऱ्यातल्या एका कोपऱ्यात उभा केला.तो ओंडका तिथे का ठेवलाय हे तिला बरोबर कळलं.तिने त्या ओंडक्यावर आपली शिल्पकला सुरू केली.दिवसभर आपल्या दातांनी ती ओंडका कुरतडत बसे.ती काय करते याची आम्हाला उत्सुकता होती.

थोड्याच दिवसांत तिने त्या ओंडक्याच्या मध्य भागात स्वतःला बसण्याजोगी खोबणी तयार केली.त्यानंतर रोज रात्री ती त्या खोबणीमधे जाऊन झोपत असे. तिच्याइतकं क्रिएटिव्ह माकड मी आजवर पाहिलेलं नाही.राणीच्या खांद्याची जखम बऱ्यापैकी भरत आली होती. 


एखादा अवयव गमावल्यानंतर माणसाला जसा फँटम लिम्बचा त्रास होतो,तसाच प्राण्यांनाही. आपला एक हात आता नाही,हे विसरायला होऊन त्या हाताचा उपयोग करायला गेलं की अपघात होतो.याला म्हणतात फँटम लिम्ब.राणीलाही सुरुवातीला त्याचा त्रास झाला.एकदा संध्याकाळी संपतने पिंजऱ्याची साफसफाई करण्यासाठी राणीला बाहेर काढलं आणि एका फांदीवर ठेवलं. फांदीवरून उतरून ती माझ्या जवळ येऊ लागली.पण लक्षात न येऊन तिने फांदी धरायला आपल्या नसलेल्या हाताचा,म्हणजे फँटम लिम्बचा आधार घेतला आणि तिचा साफ तोल गेला.माझं तिच्याकडे लक्ष असल्याने मी तिला वरच्यावर झेललं म्हणून बरं.आणखी एक-दोन वेळा राणी फँटम लिम्बमुळे गडबडली;पण तीन-चार महिन्यांच्या उपचारांनंतर तिचा फँटम लिम्ब सिंड्रोम पूर्णपणे बरा झाला.तीन पायांवर उड्या मारण्यात ती चांगलीच पटाईत झाली.


राणी महाउद्योगी होती.अधूनमधून एखाद्या संध्याकाळी आम्ही तिला पिंजऱ्याबाहेर काढत असू.आमच्यापैकी कोणाच्या तरी खांद्यावर बसून ती पार्कचा फेरफटका करायची.एकदा माझ्या खांद्यावर बसून तिची सैर चालू होती.सहज चाळा म्हणून माझ्या शर्टाच्या खिशाला लावलेलं पेन तिने काढून घेतलं.अमेरिकेच्या प्रसिद्ध क्रॉस कंपनीचं लाइफटाइम गॅरंटी असलेलं ते महागडं पेन होतं.माझ्या मेव्हण्याने मला वाढदिवसानिमित्त भेट दिलेलं.राणीने पेन घेतल्या घेतल्या माझे सहकारी एकदम सावध झाले.तिच्या हातातून पेन काढून घेण्यासाठी ते सरसावलेले बघून मी मोठ्या घमेंडीत त्यांना म्हटलं,

"अरे,हे क्रॉस कंपनीचं पेन आहे.त्यात कसलाही बिघाड होत नाही.काही काळजी करू नका." माझं वाक्य संपायच्या आतच कटकन पेन तुटल्याचा आवाज आला.लाइफटाइम गॅरंटीवाल्या क्रॉस पेनचं मुंडकं राणीने तिच्या दातांनी एका झटक्यात तोडलं होत.सगळ्यांची हसून हसून पुरेवाट झाली.ते लाइफटाइम गॅरंटीवालं तुटकं पेन आजही आमच्या जुन्या सामानात चिरनिद्रा घेत आहे.तीन पायांची राणी हा आमच्या पार्कमधला पहिला सस्तन प्राणी होता. 


आमचं पहिलं माकडही तीच होती.त्यामुळे आम्हा पार्कवरच्या मंडळींची आणि पार्कला भेट द्यायला येणाऱ्या बालगोपाळांची ती अतिशय लाडकी होती.मी रोज सकाळी पार्कच्या मेन गेटवर दूध आणि पेपर आणण्यासाठी जायचो, तेव्हा राणीसाठी घरून काही तरी खाऊ नेत असे.तिला खायला द्यायचं,तिच्याशी गप्पा मारायच्या आणि घरी परतायचं हा राणी आल्यापासूनचा माझा दिनक्रम ठरून गेला होता. राणीही माझी वाट बघत असायची.पण एके दिवशी मात्र भलतंच घडलं.त्या दिवशी मी राणीसाठी शेंगा घेतल्या होत्या.खिशातल्या शेंगा तिच्या हातात दिल्या.त्यातल्या बऱ्याच खाली पडल्या.काही पिंजऱ्याच्या आत,तर काही पिंजऱ्याबाहेर.

पिंजऱ्याबाहेरच्या शेंगा तिला देण्यासाठी मी खाली वाकून गोळा करू लागलो आणि अचानक एक प्रचंड वेदनेची कळ डोक्यामधून अंगभर पसरली.डोळ्यांपुढे अंधारी आली;पण काही क्षणातच मी स्वतःला सावरलं. घाबरून राणीकडे पाहिलं आणि अक्षरशः गर्भगळितच झालो.

माझ्या डोक्यावरच्या दाट कुरळ्या केसांचा पुंजका तिच्या हातात होता. दूध- पेपर वगैरे सोडून मी थेट घर गाठलं. आरशात पाहिलं तर माझ्या डोक्यावरचा केसांचा एक गोल पॅच गायब झाला होता.दाट कुरळ्या केसांमध्ये छोटं गोल टक्कल पडलं होतं.पण नशिबाने तिची नखं माझ्या टाळूला लागली नव्हती.वेदना होत होत्या त्या केस उपटले गेल्यामुळे.पण त्या अवस्थेतही माझं ते विनोदी रूप बघून प्रतिभा आणि तेजसबरोबर मलाही हसू आवरत नव्हतं.

त्या दिवशी माझ्या टकलाची सुरुवात झाली ती झालीच.


पण राणीने त्या दिवशी असं का केलं? खरं तर ते कोडंच आहे.आपण फक्त अंदाज बांधू शकतो. खरं काय ते फक्त राणीलाच माहीत.पण माझ्या मते मी वाकलेलो असताना दिसणारे माझे कुरळे केस पाहून तिला त्यांच्याशी खेळण्याची इच्छा झाली असणार.शेंगा उचलाव्यात त्या सहजतेने ती माझे केस हाताने पकडायला गेली आणि झालं भलतंच.त्याआधी तिने कधीही पार्कमध्ये कुणाला इजा केली नव्हती आणि त्यानंतरही कधी केली नाही.दोन अडीच वर्षं राणी आमच्या पार्कवर मजेत राहिली.पुढे सेंट्रल झू ॲथॉरिटीने अपंग प्राण्यांना प्रदर्शनार्थ ठेवण्यास बंदी केल्यावर आम्ही तिला कात्रजच्या वन्यप्राणी अनाथालयात हलवलं.तिथेही ती खूप वर्ष समाधानाने राहिली.राणीच्या संगतीचं गारुड आमच्या सर्वांच्या मनावर कायम राहिलं. त्यामुळेच आमच्याकडे त्यानंतर आलेल्या आणखी एका माकडिणीचं नाव आम्ही 'राणी'च ठेवलं. 



२८/५/२४

एका बोकडाचा बळी Victim of a buck

मार्च महिन्याच्या शेवटच्या दिवशी इबॉटसन पौरीवरून परत आला व दुसऱ्याच दिवशी सकाळी आम्ही ब्रेकफास्ट घेत असताना आम्हाला काही माणसं सांगत आली की रुद्रप्रयागपासून वायव्येला (जिथे आम्ही जिनट्रॅपमध्ये त्या बिबळ्याला मारलं होते.त्या ठिकाणापासून १ मैलांच्या अंतरावर) एका बिबळ्याचे कॉल्स सातत्याने ऐकायला येतायत.या गावाच्या उत्तरेला अर्धा मैल अंतरावर एका मोठ्या पहाडाच्या कडेचा बराच प्रदेश ओबडधोबड जमीनीचा होता आणि तिथे खूप गुहा आणि शिळा होत्या.

त्याचबरोबर तिथे पूर्वीच्या लोकांनी खणलेल्या तांब्याच्या खाणीमुळे तयार झालेले मोठाले खड्डे होते आणि इथे सर्वत्र झुडुपी जंगल माजलं होतं.काही ठिकाणी विरळ तर काही ठिकाणी एकदम दाट ! हे जंगल गावाच्या बाहेर डोंगर उतारावरच्या शेतीपर्यंत पसरलं होतं.


माझा फार दिवसांपासून कयास होता की जेव्हा म्हणून हा बिबळ्या रुद्रप्रयागच्या आसपास असतो तेव्हा तो या भागाचा लपण्यासाठी वापर करत असावा.त्यामुळे मी ह्या भागात जरा उंचशा जागा बघून बऱ्याच वेळा फेरफटका मारला होता की जिथून तो ऊन खात असताना मला दिसेल.ही बिबळ्यांची शिकार करण्याची नेहमीची पद्धत आहे कारण ही त्यांची आवडती सवय आहे; फक्त थोडा संयम व अचूक नेमम असला तरी पुरेसं ठरतं.जेवण लवकरच उरकून मी आणि इबॉटसन आमच्या ०.२७५ रायफली घेऊन आणि एका माणसाच्या हातात छोटासा दोर देऊन निघालो.गावातच आम्ही एक बोकड खरेदी केला (माझे आतापर्यंत खरेदी केलेले सर्व बोकड ह्या बिबळ्याने मारले होते.)


शेळ्यांची एक वाट गावापासून निघून सरळ डोंगरावरून जात त्या ओबडधोबड भागात शिरत होती.तिथून ती डावीकडे वळत होती व डोंगराच्या कडेकडेने १०० यार्ड जात नंतर डोंगराच्याच अंगाने वळत पलीकडे जात होती. इथे ह्या पायवाटेच्या वरच्या बाजूला झुडपी जंगल तर खालच्या बाजूला गवताळ भाग होता. पायवाटेवरच्या वळणावरच पण पायवाटेपासून दहा वार्ड खाली आम्ही एक मजबूत खुंट ठोकून बोकड बांधून टाकला. ह्यानंतर आम्ही शंभर-दीडशे यार्ड खाली उतरलो व तिथे असलेल्या मोठमोठ्या खडकांमागे आमची जागा घेतली.कॉल देण्याच्या दृष्टीने हा बोकड आतापर्यंतच्या सर्व बोकडांमध्ये सर्वात चांगला होता,जोपर्यंत तो कॉल देत होता तोपर्यंत आम्हाला डोळ्यात तेल घालून झुडुपांच्या दिशेला बघण्याची गरजच नव्हती.कारण आम्ही त्याला नीट बांधल्यामुळे त्या बिबळ्याने त्याला उचलून लांब घेऊन जाण्याची शक्यताच नव्हती.


आम्ही आमच्या जागा त्या खडकांमागे घेतल्या तेव्हा सूर्याचा लालभडक गोळा केदारनाथच्या वरच्या हिमाच्छादित शिखरांपासून हातभर वर होता.साधारण अर्ध्या तासानंतर,आम्ही काही काळ सावलीत आलो असताना तो बोकड अचानक ओरडायचा थांबला.थोडं बाजूला सरकून गवताच्या आडून मी बघितलं तेव्हा मला दिसलं की कान ताठ करून तो एका झुडुपाच्या दिशेने बघतोय.त्याने जोरजोरात डोकं हलवलं आणि त्याला बांधलेला दोर पूर्ण ताणला जाईपर्यंत मागे सरकला.


बोकडाच्या ओरडण्यामुळे आकर्षित होऊन बिबळ्या तिथे आला होता हे निश्चित आणि ज्याअर्थी बोकडाला कळण्याच्या आत त्याने झडप मारली नव्हती,त्या अर्थी त्याला काहीतरी संशय आला होता.टेलिस्कोपिक साईट्स मुळे इबॉटसनचा नेम माझ्यापेक्षा अचूक असणार होता.त्यामुळे मी त्याला जागा करून दिली.रायफल खांद्याला लावून तो जेव्हा पालथा पडला तेव्हा मी त्याला हळू आवाजात सांगितलं की तो बोकड ज्या झुडुपाकडे बघतोय त्या झुडुपाचं नीट निरीक्षण कर. बोकडाला बिबळ्या दिसत होता त्या अर्थी इवॉटसनलाही तो दिसायला हवा होता.


मिनिटभर टेलिस्कोपला डोळे लावून बघितल्यानंतर त्याने नकारार्थी डोकं हलवून रायफल खाली ठेवली आणि मला जागा करून दिली.मघाशी ज्या स्थितीत तो बोकड होता तसाच अजूनही होता.त्याच्याकडून झुडपाच्या दिशेचा अंदाज घेऊन मीही काही मिनिटं तिथे नजर केंद्रित केली पण मलाही काहीच दिसू शकलं नाही.दुर्बीण बाजूला केल्यानंतर मला जाणवलं की अंधार जलद पडतोय आणि बोकडही आता पुसटसा दिसायला लागलाय. आम्हाला तर बरंच दूर जायचं होतं.आता आणखी काही वेळ थांबणं उपयोगाचं तर नव्हतंच पण धोकादायकही होतं.त्यामुळे चटकन उठून मी इबॉटसनला सांगितलं की आता निघायला हवं.ओरडण्याचं थांबल्यावर त्या बोकडाने या क्षणापर्यंत तोंडातून एकही आवाज काढला नव्हता.आता आम्ही त्याचा दोर सोडला आणि तो एका माणसाकडे देऊन व त्याला पुढे ठेवून आम्ही गावाच्या दिशेला लागलो.त्या बोकडाच्या गळ्याभोवती याआधी कधी दोर बांधला गेला नसावा.आता त्याने हिसडे द्यायला सुरुवात केली.माझा आतापर्यंतचा अनुभव असा होता की एखाद्या बोकडाला अशा प्रकारे जंगलात बांधल्यावर जेव्हा सोडलं जातं तेव्हा तो भीतीमुळे म्हणा किंवा सोबतीची गरज असल्यामुळे म्हणा गळ्यात दोरी नसताना सुद्धा तो एखाद्या इमानी कुत्र्याप्रमाणे आपल्या मागे येतो,त्यामुळे मी त्या माणसाला बोकडाला मोकळं सोडायला सांगितलं.

पण या बोकडाच्या काही निराळ्याच कल्पना असाव्यात कारण दोरी काढली गेल्याबरोबर तो वळला व पायवाटेवरून पळायला लागला.हा बोकड कॉल देण्याच्या बाबतीत खूपच चांगला होता आणि त्याला जपणं महत्त्वाचं होतं.त्याने एकदा बिबळ्याला आकर्षित केलं होतं व पुन्हा करण्याची शक्यता होती.त्यात परत आम्ही आताच त्याच्यासाठी चांगले पैसेही मोजले होते त्यामुळे आम्हीही त्याचा पाठलाग सुरू केला.वळणावर तो डावीकडे पळत गेला आणि दिसेनासा झाला. त्याच्याच मार्गाने आम्ही डोंगराच्या कडेकडेने जात पाठलाग चालू ठेवला.तरीही बोकड न दिसल्याने आम्हाला वाटलं की त्याने गावात जायला जवळचा रस्ता पकडला असेल.

त्यामुळे आम्ही माघार घेतली.मी सर्वात पुढे होतो. आम्ही त्या वाटेवरून शंभर यार्ड गेलो असू तेवढ्यात वाटेवर काहीतरी पांढुरकी आकृती दिसली. 


उजेड अगदी कमी होता.त्यामुळे आम्ही सावधपणे जवळ गेलो तेव्हा आम्हाला दिसलं की तोच बोकड आहे.त्याचे पाय आणि डोकं वाटेवरच राहील अशा स्थितीत तो पडला होता आणि फक्त याच अवस्थेत तो खाली गडगडत जाऊ शकत नव्हता.त्याच्या गळ्यातून रक्त ठिबकत होतं आणि जेव्हा मी त्याच्या शरीरावर हात ठेवला तेव्हा त्याचे स्नायू अजूनही आचके देत होते.दुसऱ्या कोणत्याही बिबळ्याने बोकड मारून अशा पद्धतीने पायवाटेवर टाकून दिला नसता.जणू काही हा बिबळ्या आम्हाला चिडवत होता,

'बघा तुम्हाला तुमचा बोकड पाहिजे ना? घ्या..... आणि आता अंधार पडलाय,तुम्हाला खूप अंतर कापायचंय,तेव्हा तुमच्यापैकी कोण गावापर्यंत जिवंत जातोय तेच बघू!'


सुदैवाने माझ्याकडे आगपेटी होती,जर ती नसती तर मला नाही वाटत की आम्ही तिघेच्या तिघे गावापर्यंत सुखरूप पोचलो असतो.एक काडी ओढायची,

आजूबाजूला घाबरी नजर टाकायची आणि पटापट चारपाच पावलं टाकायची अशा प्रकारे ठेचकाळत,

धडपडत आम्ही शेवटी गावापासून हाकेच्या अंतरावर पोचलो.आमच्या हाकेसरशी हातात कंदील व पाईनच्या मशाली घेऊन माणसं आम्हाला घ्यायला आली. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला तो तसाच आढळला पण आमचा पाठलाग करतानाचे नरभक्षकाचे माग मात्र मला मिळाले!


१४.०४.२४ या लेखमालेतील पुढील भाग…


वाचन नसलेली पिढी म्हणजे आशा नसलेली पिढी


(भारतीय अभियंत्याच्या पत्राचा उतारा)


"शांघायला जाणाऱ्या फ्लाइटवर,झोपेच्या वेळी, केबिनचे दिवे बंद होते;मी लोकांना iPads वापरून जागे करताना पाहिले,मुख्यतः आशियाई;ते सर्व गेम खेळत होते किंवा चित्रपट पहात होते.खरंतर मी तो पॅटर्न पहिल्यापासून पाहिला.जेव्हा मी फ्रँकफर्ट आंतरराष्ट्रीय विमानतळावर होतो तेव्हा माझ्या लक्षात आले की बहुतेक जर्मन प्रवासी शांतपणे वाचत होते किंवा काम करत होते,तर बहुतेक आशियाई प्रवासी खरेदी करत होते आणि किंमतींची तुलना करत हसत होते.आजकाल अनेक आशियाई लोकांना बसून पुस्तके वाचण्याचा धीर नाही. 

एकदा,एक फ्रेंच मित्र आणि मी एका रेल्वे स्टेशनवर ट्रेनची वाट पाहत होतो आणि या मित्राने मला विचारले: "सर्व आशियाई चॅट किंवा इंटरनेट का सर्फ करतात,परंतु कोणीही पुस्तके का वाचत नाही?".


मी आजूबाजूला पाहिले,आणि खरंच ते होते. 

लोक फोनवर बोलतात,मजकूर संदेश वाचतात, सोशल मीडियावर सर्फ करतात किंवा गेम खेळतात.

ते मोठ्याने बोलण्यात किंवा सक्रिय असल्याचे ढोंग करण्यात व्यस्त आहेत;गहाळ असलेली एकमेव गोष्ट म्हणजे शांतता आणि विश्रांतीची भावना. ते नेहमी अधीर आणि चिडखोर, रागावलेले आणि तक्रार करणारे असतात...


प्रसारमाध्यमांच्या मते,चीनमध्ये सरासरी व्यक्ती प्रतिवर्षी केवळ ०.७ पुस्तके,व्हिएतनाममध्ये ०.८ पुस्तके,भारतात १.२ पुस्तके आणि कोरियामध्ये प्रतिवर्षी पुस्तके वाचतात. केवळ जपान पाश्चात्य देशांशी तुलना करू शकतो ज्यात प्रति व्यक्ती प्रति वर्ष ४० पुस्तके आहेत; एकट्या रशियामध्ये प्रति व्यक्ती प्रति वर्ष ५५ पुस्तके आहेत.२०१५ मध्ये,४४.६% जर्मन लोक आठवड्यातून किमान एक पुस्तक वाचतात – नॉर्डिक देशांसाठी समान संख्या.आकडेवारी दर्शवते की वाचन नापसंत होण्याची तीन मुख्य कारणे आहेत.


-एक म्हणजे लोकांची खालची संस्कृती (शिक्षण नव्हे).त्यामुळे लोक नेहमी भेटल्यावर खूप बोलतात आणि कंटाळा न येता दिवसभर गप्पा मारतात.ते नेहमी इतर लोकांच्या कथांबद्दल उत्सुक असतात,सतत सामाजिक नेटवर्क अद्यतनित करतात आणि संप्रेषणाच्या महत्त्वपूर्ण गरजा असतात.


दुसरे म्हणजे,त्यांना लहानपणापासून वाचनाची चांगली सवय लावली जात नाही.त्यांच्या पालकांना पुस्तके वाचण्याची सवय नसल्याने तरुणांना त्यांच्या जीवनाच्या सुरुवातीपासूनच त्यांच्या संगोपनात तसे वातावरण मिळत नाही. लक्षात ठेवा, मुलाचे व्यक्तिमत्त्व प्रामुख्याने कुटुंबाद्वारे घडवले जाते.


तिसरे म्हणजे 'परीक्षाभिमुख शिक्षण',त्यामुळे लहान मुलांना बाहेरची पुस्तके वाचायला वेळ आणि ऊर्जा मिळत नाही.बहुतेक ते पुस्तके देखील वाचतात,म्हणून ते परीक्षांसाठी असतात.जुन्या अभ्यासपद्धतीच्या वातावरणामुळे अभ्यासाची सवय लागणे,पदवी मिळवणे आणि नंतर वाचन करणे बंद झाले.


इस्त्राईल आणि हंगेरी हे जगातील सर्वाधिक वाचले जाणारे दोन देश आहेत.इस्रायलमधील सरासरी व्यक्ती वर्षाला ६४ पुस्तके वाचते. मुलांना समजायला लागल्यापासून,जवळजवळ प्रत्येक आई आपल्या मुलांना शिकवते:"पुस्तके हे शहाणपणाचे भांडार आहेत,जे पैसे,खजिना आणि शहाणपणापेक्षा अधिक मौल्यवान आहेत जे कोणीही तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही.


हंगेरीमध्ये सुमारे २०,००० लायब्ररी आहेत.आणि ५००​​ लोकांमागे सरासरी एक लायब्ररी आहे; लायब्ररीत जाणे हे कॉफी शॉप किंवा सुपरमार्केटमध्ये जाण्याइतकेच चांगले आहे.हंगेरी हा जगातील सर्वात लक्षणीय पुस्तके वाचणारा देश आहे,ज्यात दरवर्षी दशलक्ष लोक नियमितपणे वाचतात,देशाच्या लोकसंख्येच्या एक चतुर्थांशपेक्षा जास्त.ज्यू हे एकमेव लोक आहेत जे निरक्षर नाहीत; 

भिकाऱ्यांकडेही नेहमी पुस्तक असते. त्यांच्या दृष्टीने पुस्तके वाचणे हा लोकांचा न्यायनिवाडा करण्याचा उत्कृष्ट गुण आहे.जे लोक वाचतात त्यांची विचार करण्याची पद्धत खूप वेगळी असते आणि त्यांच्याकडे चमकदार कामगिरी नसली तरी त्यांची मानसिकता खूप चांगली असते.पुस्तकांचा केवळ व्यक्तीवर परिणाम होत नाही;त्याचा समाजावर परिणाम होतो.ज्ञान ही शक्ती आहे आणि ज्ञान ही संपत्ती आहे. जो देश किंवा व्यक्ती पुस्तके वाचणे आणि ज्ञान संपादन करणे याला महत्त्व देतो तो नेता असेल.


एक महान विद्वान एकदा म्हणाले: "एखाद्या व्यक्तीच्या विचारांच्या विकासाचा इतिहास हा त्याचा वाचन इतिहास आहे.किती लोक पुस्तके वाचतात आणि कोणत्या प्रकारची पुस्तके निवडतात हे ठरवते की समाजाचा विकास होईल की मागे राहील."


लक्षात ठेवा: वाचनाशिवाय शर्यत ही आशा नसलेली शर्यत आहे.