* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

८/८/२४

अभ्यासपूर्ण नोंदी / Scholarly Notes

प्राणी कोणता का असेना,पाळीव कुत्रा असो नाहीतर जंगली हत्ती,नुसते त्यांच्यासमोर उभे राहून संवाद साधला जात नाही,तर त्यांना प्रतिसाद देणे तितकेच महत्त्वाचे असते.त्यांना प्रतिसाद दिला,की तुमचा संवाद पूर्ण होतो.इतर सगळ्यांसारखाच प्राण्यांमध्ये संवाद हा दोन्ही बाजूंनी,विचारांची,संभाषणाची देवाणघेवाण करून होतो.जर तुम्ही त्यांना प्रत्युत्तर दिले नाहीत,तर संवाद पूर्ण होत नाही.इतकी ही साधी गोष्ट आहे,पण लक्षात लवकर येत नाही.प्रत्युत्तर द्यायला एखादी नजरदेखील पुरेशी असते.निकटचा संबंध असलेल्या प्राण्याकडे तुम्ही नुसता कटाक्ष जरी टाकला तरी पुरत असले,तरी तसाच कटाक्ष अनोळखी प्राण्यासाठी आव्हान दिल्यासारखा होऊ शकतो.तुम्ही बोलताना ज्या आविर्भावात आपले शब्द वापरता त्याच आविर्भावात,त्याच स्वरात तुम्ही चार शब्द बोललात तरी देखील पुरते.इतरही काही घटक विचारात घेण्यासारखे आहेत.माणसांसारखेच आदर दाखवणे महत्त्वाचे असते.तुमच्या मनातील भाव प्राण्यांना बरोबर कळतो,विशेषतः जर तुम्ही विरोधी किंवा आक्रमक असाल तर त्यांच्या लगेच लक्षात येते. खुल्या मनाने सामोरे जाणे, हे प्रगती करण्यासाठी आवश्यक आहे.

त्याबरोबरच संयम आणि चिकाटीदेखील तितकीच महत्त्वाची आहे.सगळ्यात गंमत म्हणजे तुम्ही योग्य मार्गावर आहात,हे तुम्हाला लगेच कळते.माझ्यावर विश्वास ठेवा,कोणालाही हे करता येईल आणि त्याने खूपच समाधान मिळते. त्यासाठी कोणत्या अतिमानवी शक्तीची आवश्यकता नाही.


 शास्त्रज्ञांनी असा शोध लावला आहे,की प्राण्यांना केवळ पन्नासच्या आसपास शब्द कळू शकतात.पण म्हणून त्यांच्याशी न बोलणे किंवा संवाद साधण्याचा प्रयत्नदेखील न करणे चुकीचे आहे.केवळ मनुष्यच एकमेकांशी संवाद साधू शकतात,असा विचार करणे पूर्णपणे चूक आहे.दोन जीवांमधला संवाद हा भाषेच्या मर्यादा ओलांडून जातो शब्द पोहोचले नाहीत तरी भाव नक्की पोहोचतो.


काही पिल्लांच्या पायाचे ठसे खोल खाईच्या फारच जवळ होते,असे मला वाटले.हत्ती जेव्हा फिरत असतात,तेव्हा ते फारच कमी वेळा सरळ रेषेत चालतात.एकमेकांशी धक्काबुक्की करत, ढकलत त्यांचा खेळ सुरू असतो.

तरीही ह्या खोल खाईजवळदेखील ते अगदी आरामात आत्मविश्वासाने गेलेले दिसत होते.'कोबस राथ' नावाच्या पशुवैद्याने तो कळप आमच्याकडे आणला होता.त्याच्या बोलांची मला एकदम आठवण झाली.तो मला म्हणाला होता,की एखादे माकड ब्रीफकेस घेऊन जाऊ शकणार नाही,अशा ठिकाणी देखील हत्ती जातात.


हत्तींची एक अशी पक्की धारणा असते, की बाकी सगळ्या प्राणिमात्रांनी त्यांना मान दिला पाहिजे.ते कोठे जात असतील तर बाजूला होऊन त्यांना वाट करून दिली पाहिजे.स्विमिंग पूलच्या भोवती डिनरसाठी बसलेले परदेशी पाहुणे आणि जंगलातील एखाद्या तळ्याशेजारी बसलेली बबून माकडे ह्यात हत्तींच्या दृष्टीने काहीच फरक नाहीये.


हत्ती जरी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला असले तरी त्यांची वास घेण्याची शक्ती इतकी तीव्र असते की वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने आलेला अगदी मंद वास देखील ते ओळखू शकतात.


नर हत्तींना त्यांच्या इच्छेविरुद्ध काहीही करायला लावलेले आवडत नाही.


आयुष्याचा सगळ्यात मोठा विरोधाभास आहे तुम्हाला जेव्हा जंगलात काहीतरी खास बघायची वेळ येते तेव्हा तुम्ही कॅमेरा घरी ठेवलेला असतो.


जंगलाचा भाग होऊन जाणे आजूबाजूच्या वातावरणात मिसळून जाणे आणि कशाचीही अपेक्षा न करणे.माझी अंत:प्रेरणा मला सांगत होती,की हत्ती जवळच आहेत त्याचवेळी नाना जवळच्या झाडीतून बाहेर आली.तिच्या पाठोपाठ बाकीची हत्ती देखील बाहेर आले.ते मला प्रत्यक्ष दिसायच्या आधीच मला त्यांची उपस्थिती जाणवली होती.नंतर माझ्या असे लक्षात आले, की हा अनुभव उलट्या पद्धतीनेदेखील अनुभवायला येतो.कधी कधी त्यांचा शोध घेत असताना मला असे जाणवायचे,की ते आसपासच्या भागात अजिबात नाहीयेत. दुसरीकडे कोठेतरी आहेत.मला ते दिसायचे नाहीत म्हणून नाही,तर त्यांच्या अनुपस्थितीत जंगल एकदम रिकामे वाटायचे.


एक दोन आठवडे सवय झाल्यावर मला ह्याचा अंदाज येऊ लागला.काही दिवसांनी योग्य परिस्थितीत त्यांना शोधणे खूपच सोपे जाऊ लागले.हत्ती आजूबाजूच्या जागेत आपल्या उपस्थितीचा ठसा उमटवतात आणि त्यांचे ह्यावर पूर्ण नियंत्रण असते.जेव्हा त्यांना आपण कोठे आहोत हे कोणालाही कळू द्यायचे नसायचे तेव्हा मी अक्षरशः त्यांच्यामध्ये असलो,तरीही मला काहीही पत्ता लागायचा नाही.


काही वेळ ह्यावर थोडे संशोधन आणि प्रयोग केल्यावर काय घडते आहे,ते माझ्या लक्षात आले. सिंह गर्जना करतो ती आपल्या कानांना ऐकू येते;कारण ती आपल्या श्रवणक्षमतेच्या टप्यात असते.हत्तींच्या कळपाचे दीर्घ रेंगाळणारे आवाज मानवी श्रवणक्षमतेच्या खालच्या पट्टीत असल्याने ते आपल्याला ऐकू येत नाहीत. आजूबाजूच्या जंगलात ते मैलोन्मैल पसरतात. जरी मला ऐकू येत नसले तरी ते मला जाणवत होते.तिथे हत्ती आहेत,असे ते सगळ्या जगाला त्यांच्या भाषेत सांगत होते.


हत्तींच्या सहवासात असताना माझ्या मनात येणाऱ्या भावनांचे मला नवल वाटत असे,कारण या भावना माझ्या नसून त्यांच्या मनातल्या भावना आहेत असे मला वाटत होते.कोणत्याही भेटीचा भाव काय असावा हे ते हत्ती ठरवायचे.


अभ्यासपूर्ण महत्वाची नोंद - मी एका दिवशी काही कामासाठी डर्बनला गेलो होतो.मी परत आलो तेव्हा सातही हत्ती घराभोवती गोळा झालेले पाहून मला आश्चर्य वाटले.जणू ते स्वागतसमितीचे सभासद असून माझी अपेक्षेने वाट पाहत होते.योगायोग असेल म्हणून मी ह्या घटनेचा जास्त विचार केला नाही.पुढच्या ट्रीपच्या वेळी हे परत घडले.काही दिवसांनी माझ्या हे लक्षात आले,की मी केव्हा जाणार आणि केव्हा परत येणार आहे ते त्यांना पक्के ठाऊक असायचे.(एक यार्ड म्हणज ३ फुट)


(द एलेफंट व्हिस्परर - लॉरेन्स अँथनी ! ग्रँहम स्पेन - अनुवाद - मंदार गोडबोले - मेहता पब्लिसिंग हाऊस )


त्या रात्रीत कळप दोन गटात विभागला गेला होता.

अभयारण्यात पोचल्यावर त्या दोघांची एकत्र भेट झाली ते तिथे कसे भेटले असतील हे मानवाच्या आकलनाच्या बाहेर आहे.संपूर्ण काळोखात कोणतेही दिशादर्शक यंत्र किंवा रेडिओ बरोबर नसताना बरोबर एकाच ठिकाणी एकाच वेळी पोहोचणे अशक्यप्राय वाटते दोन्ही गट एकमेकांपासून जवळ जवळ सात मैल लांब जाऊन दाट जंगलात एका ठिकाणी एकावेळी एकत्र आले हा प्रसंग पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की हत्तीपाशी अनाकलनीय संपर्काची साधने आहेत.ते आपल्या पोटातून मानवाला ऐकू येणार नाही,अशा फ्रिक्वेन्सीचा ध्वनी काढतात. जो कित्येक मैलांपर्यंत ऐकू येतो.हत्तींना त्यांच्या मोठ्या कानांमुळे तो संदेश पकडता येतो.नव्या सिद्धांताप्रमाणे अशी शक्यता आहे की ते आपल्या पायांद्वारे जमिनीतील कंपने ऐकू शकतात जे असेल ते खरे,पण ह्या अफलातून प्राण्यांची काही इंद्रिये आपल्यापेक्षा फार अधिक प्रगत आहेत.काही दिवसांनी मात्र... सगळे जरा अतीच झाले. मी जोहान्सबर्गच्या विमानतळावर होतो आणि माझे परतीचे विमान चुकले.चारशे मैलांवर ( एक मैल म्हणजे सुमारे १.६ किलोमिटर म्हणजे जवळपास ६०० ) किलोमीटर' थुला थुला' मध्ये सगळा कळप माझ्या घराकडे निघाला होता तो अचानक थांबला,वळला आणि झाडीत नाहीसा झाला.नंतर आमच्या लक्षात आले,की माझे जेव्हा विमान चुकले त्याच वेळी हे घडले.दुसऱ्या दिवशी मी घरी पोहोचलो तेव्हा कळप परत घराभोवती जमा झाला होता.

ह्या सगळ्यामध्ये काहीतरी विलक्षण गोष्ट आहे, ह्याचा माझ्या मनाने स्वीकार केला होता.माझ्या मर्यादित बुद्धीला आकलन होण्यापलीकडची ही काहीतरी शक्ती होती.

हत्तींची एकमेकांशी संवाद साधण्याची शक्ती अतिशय अविश्वसनीय असते हे सिद्ध झाले आहे.हत्ती आपल्या पोटातून जो गुरगुरण्याचा आवाज काढतात,तो मानवी कानांच्या ऐकण्याच्या क्षमतेच्या खालच्या पट्टीत काढलेला असतो.तो आवाज पुष्कळ अंतरापर्यंत ऐकू येतो;पण आपल्या कानांना ऐकू येत नाही. देवमासे ज्या फ्रिक्वेन्सीमध्ये आवाज काढतात त्याच्या जवळचीच ही फ्रिक्वेन्सी आहे.काही लोक म्हणतात हे स्पंदन जगभर सगळीकडे पसरते,कोठेही ऐकू येऊ शकते.


हा कमी फ्रिक्वेन्सीतला आवाज कमीतकमी कित्येकशे मैल दूर ऐकू जातो,असे आता शास्त्रज्ञ मानू लागले आहेत.

हे जर खरे असले तर ह्याचा अर्थ हत्ती आफ्रिका खंडातील इतर अभयारण्यातील हत्तींबरोबर संवाद साधू शकतात.एक कळप दुसऱ्या कळपाशी संवाद साधतो,

दुसरा तिसऱ्याशी,असे करत संदेश त्यांच्या संपूर्ण भूभागात पसरू शकतो.जसा आपण दूरध्वनीवर लांबपर्यंत संवाद साधू शकतो तसे.


केटी पेन नावाच्या 'कॉर्नेल युनिव्हर्सिटी'तील 'एलेफंट लिसनिंग प्रोजेक्ट'वर काम करणाऱ्या (हत्तींच्या संभाषणाचे संशोधन करणारा प्रकल्प) शास्त्रज्ञ स्त्रीने हत्तींच्या पोटातून येणाऱ्या ह्या आवाजाच्या लहरींचा शोध लावला.हा शोध अतिशय महत्त्वाचा होता.हत्तींच्या वर्तणुकीविषयी आपला संपूर्ण दृष्टीकोन ह्या शोधाने बदलला.जन्मजात मिळणाऱ्या हुशारीमध्ये आणि लांबवर संभाषण करू शकण्याच्या क्षमतेमध्ये महत्त्वाचे नाते आहे. उदाहरणार्थ,एखाद्या बेडकाची संभाषण करण्याची क्षमता केवळ डराव करण्याची आहे, कारण त्याला फक्त आपल्या तळ्यापुरतीच संभाषण करण्याची गरज असते.

त्याला त्यापेक्षा जास्त आपला आवाज पसरवण्याची गरज नसते.पण हत्ती अतिशय दूरवर संवाद साधू शकतात,त्याने हे सिद्ध होते,की आपल्याला वाटले होते त्यापेक्षा हे महाकाय प्राणी जास्त पुढारलेले आहेत.

आपल्याला आधी वाटले होते त्यापेक्षा ते खूपच अधिक हुशार आहेत.जर तुम्हाला ह्याबद्दल शंका असेल तर पुढील गोष्टीवर विचार कराःहत्तींना काही निरर्थक गुरगुरण्याचा आणि हुंकारण्याचा आवाज दूरपर्यंत पाठवायची गरजच काय? केवळ त्यासाठी त्यांनी आपली ही संभाषणक्षमता विकसित केली असेल का? नक्कीच नाही. उत्क्रांती अतिशय निर्दयी आहे.जगण्यासाठी जे

गरजेचे नसेल ते केव्हाच जनुकातून नाहीसे होते. हत्ती ह्या अतिशय विकसित झालेल्या,दूरवर संभाषण करण्याच्या क्षमतेचा काही विशेष उद्देशाने उपयोग करतात- एकमेकांशी आणि दुसऱ्या कळपाशी सुसंगतपणे संभाषण करू शकण्यासाठी.मग त्यांच्या विश्वात काय घडत आहे,माणसे त्यांच्याशी कशी वागत आहेत,हे ते इतरांना सांगत असतील का? त्यांची बुद्धिमत्ता लक्षात घेता माझ्या मनात अजिबात शंका उरली नाहीये,नक्की असेच घडते आहे.


तुम्हाला हे लक्षात घ्यावे लागेल की प्राणीविश्वात 'संवाद' हा वाऱ्याच्या झुळुकीप्रमाणे एकदम सहज साधला जातो. मानवाने आपल्यावर लादून घेतलेल्या बंधनांमुळेच सुरुवातीला मला त्या प्राण्यांना समजावून घेणे जरा अवघड गेले.


आपल्या पूर्वजांना अंत:प्रेरणेने माहिती असलेल्या गोष्टी शहरातल्या गोंगाटात आपण विसरून जातो.जंगलात जीवनाचा प्रवाह अव्याहतपणे सुरू असतो आणि त्याची स्पंदने आपल्याला ऐकू येऊ शकतात; एवढेच नाही तर आपण त्यांना प्रतिसाददेखील देऊ शकतो.


आपण हे देखील लक्षात घेतले पाहिजे, की प्रत्येक गोष्ट आपल्याला समजेलच असे नाही. प्रगत विज्ञानाला उलगडा करून सांगता येणार नाही,अशा काही शक्ती हत्तींना अवगत आहेत. हत्ती एखादा कॉम्प्युटर दुरुस्त करू शकणार नाहीत,पण ते भौतिक आणि आधिभौतिकरीत्या अशा प्रकारे संवाद साधू शकतात,की ते पाहून बिल गेट्ससुद्धा आश्चर्याने थक्क होईल.काही गोष्टींमध्ये ते मानवाच्या खूपच पुढे आहेत.


वनस्पतींच्या आणि प्राण्यांच्या विश्वात काही अशा गोष्टी आहेत,ज्यांचे अवलोकन करणे अशक्य आहे.काही गोष्टी अशा असतात,ज्या तुमच्या डोळ्यांसमोर घडतात;पण तरीही तुम्हाला त्यांची कारणमीमांसा सांगता येत नाही.


पुष्कळ वर्षांपूर्वी मी एका शिकाऱ्याला शिकारीचा माग घेताना पाहिले होते.एखाद्या ब्रह्मचारी नरांच्या कळपातले एकुलते एक नर इम्पाला हरीण मारायचा त्याच्याकडे परवाना होता.पण त्या दिवशी त्याला फक्त माद्यांबरोबर फिरणारे नर दिसत होते.आश्चर्यकारक म्हणजे हे शिकार न करता येण्याजोगे नर त्याच्यासमोर अगदी बिनधास्तपणे उभे होते,त्यांना जगात कशाचीही फिकीर नव्हती.मागे ब्रह्मचारी कळपातले नर मात्र जिवाच्या भीतीने पळ काढत होते.हे कसे बरे घडत असेल? आपल्याला ह्याचे उत्तर ठाऊक नाही.आमच्यातले रुक्ष रेंजर ह्याला मर्फीचा नियम म्हणतात-मर्फीच्या नियमानुसार आपल्याबरोबर जे काही वाईट घडणार असेल ते घडतेच.जेव्हा तुम्हाला एखाद्या प्राण्याला भूल द्यायची असेल,तेव्हा ते कधीच सापडत नाहीत. हे थोडेसे गूढ रहस्य आहे.कदाचित वाऱ्याबरोबर त्यांना निरोप पोहोचत असेल.

माझ्या माहितीतल्या एका प्राण्यांचा माग काढणाऱ्या म्हाताऱ्या ट्रॅकरच्या मते,असेच काहीतरी घडते.त्याचे सगळे आयुष्य जंगलात गेले आहे.तो मला सांगत होता की त्याच्या गावातली माकडे जेव्हा फार धीट होऊन अन्न चोरायला लागतात किंवा मुलांना घाबरवायला किंवा चावायला लागतात तेव्हा बहुधा एखाद्या माकडाला गोळी घालून बाकीच्यांना घाबरवायचे ठरवले जाते."पण ही माकडे फार हुशार असतात." तो आपल्या कपाळावर बोटाने टकटक करत म्हणाला,"ज्या क्षणी तुम्ही बंदूक आणायला उठता,तेव्हा ती माकडे तिथून नाहीशी होतात.आम्ही आजकाल मोठ्याने 'बंदूक' किंवा 'माकड' असे शब्दही वापरायचे टाळतो,नाहीतर माकडे जंगलातून बाहेरदेखील येत नाहीत.जेव्हा धोका असतो, तेव्हा त्यांना न ऐकता सुद्धा कळते."


हे खरे आहे.पण थक्क करणारी बाब म्हणजे हे वनस्पतींच्या बाबतीतदेखील खरे आहे. 'थुला थुला'मधला आमचा लॉज हा आमच्या घरापासून साधारण दोन मैल अंतरावर आहे.ह्या लॉजच्या अवतीभवती बाभूळ आणि इतर स्थानिक वृक्षांची गर्दी आहे.जेव्हा एखादे हरीण किंवा जिराफ ह्या झाडांची पाने खातो तेव्हा त्या बाभळीला लगेच कळते,की आपल्यावर हल्ला होतो आहे.आणि मग ते झाड आपल्या पानांमध्ये 'टॅनीन' नावाचे एक द्रव सोडते, ज्यामुळे पानांची चव कडवट होते. मग ते झाड आपल्या

भोवतालच्या वातावरणात एक ठरावीक दुर्गंध सोडते,

ज्यामुळे बाकीच्या बाभळीच्या झाडांना पण धोका लक्षात येतो.मग बाजूच्या झाडांना लगेच तो धोका समजतो आणि ती देखील 'टॅनीन द्रव' निर्माण करायला सुरुवात करतात.आता तसे बघायला गेले तर झाडात काही मेंदू किंवा मज्जासंस्था नसते,मग हे गुंतागुंतीचे निर्णय कोण घेत असेल? अधिक महत्त्वाचे म्हणजे असा निर्णय का घेतला जात असेल? कोणतेही भावनाविरहित असलेले झाड आपल्या शेजाऱ्याच्या सुरक्षिततेबद्दल एवढ्या सगळ्या त्रासांतून का बरे जात असेल? जर मेंदूच नसेल तर त्याला आपले कुटुंब किंवा शेजारी हे सगळे कसे बरे कळत असतील?


सूक्ष्मदर्शकयंत्राखाली बघता प्रत्येक सजीव प्राण्यात केवळ काही रसायने आणि खनिजे एकत्र आलेली दिसतात.पण जे सूक्ष्मदर्शकाखाली दिसत नाही त्याचे काय? सगळ्या जीवित प्राण्यांत दिसणारी जी अमोघ ऊर्जा आहे-जी बाभळीपासून हत्तींपर्यंत सगळ्यांच्यात दिसते ती मोजता येईल का?


माझ्या कळपाने मला शिकवले,की ती ऊर्जा नक्कीच अनुभवता येते.चराचर सृष्टीतल्या प्रत्येक प्राणिमात्रातल्या आत्म्याबद्दलची जाणीव आणि त्याचे औदार्य हत्तींच्या जगात ओसंडून वाहत आहे.हत्ती हे भावनापूर्ण,एकमेकांची काळजी घेणारे आणि अतिशय बुद्धिमान प्राणी आहेत.माणसांबरोबर चांगले संबंध असलेले त्यांना हवे असतात.ही त्यांची गोष्ट आहे.त्यांनी मला शिकवले,की प्रत्येक प्राणिमात्राच्या जगण्याच्या आणि आनंदी राहण्याच्या यात्रेत प्रत्येक आयुष्य अनमोल आहे.आपण,आपले कुटुंब आणि आपली जमात,एवढ्या संकुचित मनोवृत्तीपेक्षा,आयुष्यात बरेच काही अधिक महत्त्वाचे असते.


हत्ती शांत उभे होते,फक्त मधूनमधून कान हलवत स्वतःला जमेल तेवढे थंड करत होते. एखाद्या जाड बाईच्या स्कर्टच्या आकाराएवढे हत्तींचे कान मोठे असतात.त्यामुळे त्यांच्या शरीराचे तापमान थंड राहायला मदत होते. त्यांच्या कानामागच्या त्वचेत त्यांच्या धमन्यांमध्ये कित्येक गॅलन रक्त वाहत असते आणि कान हलवल्यामुळे पंख्यासारखा परिणाम होऊन ते रक्त थंड होते,त्यामुळे शरीराच्या तापमानाचे नियमन होते.



जंगलात काम करणारा कोणीही रेंजर तुम्हाला सांगेल,की ज्या दिवशी तुम्ही एखाद्या गेंड्याला भूल देऊन दुसरीकडे घेऊन जाण्यासाठी बाहेर पडाल,त्या दिवशी कितीही शोधले तरी तुम्हाला एकही गेंडा दिसणार नाही. अगदी आदल्या दिवशीच तुम्हाला चहूकडे गेंडे दिसलेले असतील.जणू त्यांना ठाऊक असते की,तुम्ही त्यांच्या मागावर आहात,आणि ते नाहीसे होतात.पुढच्या आठवड्यात तुम्हाला जेव्हा एखाद्या गव्याला भूल द्यायची असेल,तेव्हा तो तुम्हाला न सापडलेला गेंडा तुमच्यासमोर उभा असेल. 


पुस्तकातून वाचता …वाचता …वेचलेले..। 


६/८/२४

आपली किमंत - Your price

न्यूयॉर्कच्या ब्रूक्लीन प्रांतातल्या झोपडपट्टीत मायकेल जॉर्डनचा जन्म झाला त्याला चार बहिणी होत्या आणि त्यांच्या वडिलांची कमाई संपूर्ण कुटुंबासाठी पुरेशी नव्हती.त्यांचे शेजारी पण खूप गरीब होते.तिथल्या वातावरणात मायकेल जॉर्डनला त्याचे भविष्य अंध:कारमय दिसत होते.आत्मचिंतनात हरवलेल्या मायकेलला त्याच्या वडिलांनी पाहिले  आणि त्यांनी त्याच्यासाठी काहीतरी करण्याचा निर्णय घेतला.१३ वर्षाच्या जॉर्डनला वडिलांनी वापरलेल्या जुना एक कपडा दिला आणि त्याला विचारले "हा कपडा किती किमतीचा असेल?"

  

जॉर्डन उत्तरला असेल डॉलरचा वडील म्हणाले,याला तू कुणाला तरी २ डॉलरला विकू शकशील का?"


 हा जर २ डॉलरला विकलास तर आपल्या कुटुंबासाठी ती खूप मोठी मदत होईल.जॉर्डनने डोके खाजवले आणि म्हणाला,मी प्रयत्न करतो पण यशाची खात्री देऊ शकत नाही.जॉर्डनने कपडा स्वछ धुतला,उन्हात वाळवला.

त्याच्याकडे इस्त्री नव्हती,म्हणून त्याने तो कपडा अंथरुणाखाली ठेवला.दुसऱ्या दिवशी एका गर्दीच्या ठिकाणी कपडा विकायला घेऊन गेला.५-६ तासांच्या प्रतीक्षेनंतर एका गिर्हाईकाने तो कपडा जॉर्डन कडून २ डॉलरला विकत घेतला.जॉर्डन आनंदाने धावतच घरी आला. १० -१२ दिवसांनंतर त्याचे वडील म्हणाले, जे कापड तू २ डॉलरला विकलेस त्याला १० डॉलर किम्मत येईल का रे?"


जॉर्डन म्हणाला कसं शक्य आहे? २ डॉलर मिळताना नाकी नऊ आले.वडील म्हणाले प्रयत्न तरी करून बघ.खूप वेळ विचार केल्यानंतर जॉर्डनला आयडिया सुचली.त्याने त्याच्या चुलत भावाच्या मदतीने जुन्या धुतलेल्या कापडावर डोनाल्ड डक आणि मिकी माउस ची चित्रे रंगवली,आणि ज्या शाळेत श्रीमंत मुलं शिकतात अशा शाळेच्या बाहेर शाळा सुटण्याच्या वेळेत जाऊन कपडा विकायला उभा राहिला. 


एका मुलाला ती चित्रे असलेला कपडा खूप आवडला.

त्याने आई जवळ कडून हट्ट करून तो कपडा जॉर्डन कडून १० डॉलरला विकत घेतला. शिवाय आईने जॉर्डनचे कौतुक केले आणि अजून १० डॉलर त्याला टीप दिली. 


२० डॉलर ही मोठी रक्कम होती,जवळ जवळ त्याच्या वडिलांच्या महिन्याच्या पगारा इतकी.जेंव्हा जॉर्डनने वडिलांना २० डॉलर दिले आणि ते त्याला कसे मिळाले याची कहाणी सांगितली तेंव्हा वडील आनंदले आणि अजून एक वापरलेला कापडा त्यांनी जॉर्डनला दिला आणि म्हणाले, हा कपडा तू २०० डॉलरला विकू शकशील का?आता यावेळी जॉर्डनने वडिलांचे चॅलेंज कुठलेही आढेवेढे न घेता आत्मविश्वासाने स्वीकारले. २-३ महिन्यानंतर सुप्रसिद्द चित्रपट  "Charlie's Angels" ची  नायिका Farah Fawcett न्यूयॉर्क मध्ये तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आली.प्रेस कॉन्फरन्स नंतर जॉर्डन सुरक्षारक्षकां मार्फततिच्यापर्यंत पोहोचला आणि त्याने तिला कापडावर सही करण्यासाठी विनंती केली.

त्याचा निरपराध चेहरा पाहून तिने लगेचच कापडावर सही केली.आता जॉर्डन मोठमोठ्याने ओरडू लागला, "Miss Farah Fawcett ने सही केलेले कापड घ्या, Miss Farah Fawcett ने सही केलेले कापड घ्या.थोड्याच वेळात ते कापड त्याने ३०० डॉलरला विकलं.तो जेंव्हा घरी आला आणि सर्व हकीकत वडिलांना सांगितली आणि ३००डॉलर त्यांच्या हातात दिले,तेंव्हा वडिलांच्या डोळ्यात अश्रू आले.ते म्हणाले,मला तुझा अभिमान आहे,तू करून दाखवलस.


 रात्री जेंव्हा जॉर्डन वडिलांच्या शेजारी झोपला तेंव्हा वडिलांनी जॉर्डनला विचारले,"बाळा,तीन जुने कपडे विकण्याच्या अनुभवातून तू काय शिकलास? जॉर्डन म्हणाला,जिथे प्रबळ इच्छा असेल तिथे मार्ग नक्की दिसतो.वडिलांनी त्याला घट्ट जवळ घेतले आणि म्हणाले,तू जे सांगतोस ते काही चूक नाही,पण माझा हेतू वेगळा होता.मला तुला दाखवून द्यायचं होतं की,ज्या जुन्या कपड्याची किंमत १ डॉलर सुद्धा नाही त्याची किंमत आपण वाढवू शकतो,तर बोलणाऱ्या,

चालणाऱ्या,विचार करणाऱ्या माणसांचं काय?


आपण काळे सावळे असू किंवा गरीब असू, आपली किंमत पण वाढू शकते.वडिलांच्या या वाक्याने जॉर्डन खूपच प्रभावित झाला.वापरलेल्या जुन्या कापडाला जर मी प्रतिष्ठा देऊ शकतो,तर स्वतःला का नाही? स्वतःला कमी पणा घेण्यात काहीच हित नाही.

त्यानंतर जॉर्डनला वाटू लागलं, की माझं भविष्य खूप सुंदर आणि उज्वल असेल.काही वर्षांनी मायकेल जॉर्डन उत्कृष्ट बास्केटबॉल खेळाडू बनला.


भेट एका वाढदिवसाची...


मी सुचेता.आज माझा वाढदिवस.सचिन सकाळीच म्हणाला,"आज काही करू नकोस,मी लंचला बाहेर घेऊन जातोय तुला एक वेगळीच ट्रीट आहे."लग्नाला दहा वर्षे झालीत,सचिनला मी चांगलीच ओळखते.काहीतरी जगावेगळे अनुभव देण्यात किंवा मजेशीर प्रसंग उभे करण्यात तो माहीर होता.मुले चार वाजल्यानंतर शाळेतून येणार म्हणजे आमची लंच फक्त दोघांचीच असणार होती.दोघेही बारा वाजता बाहेर पडलो.सचिनने गाडी भरधाव सोडली होती.मध्येच विचारात मग्न झाला की गाडी स्लो होत होती.मी मनात समजून गेले की हा आज एक वेगळाच अनुभव किंवा रोमांचक प्रसंग घडवणार.

गाडी एका नवीन मॉलच्या पार्कींग मधे उभी करून आम्ही लिफ्टमधे शिरलो.सचिनने पाचव्या मजल्याचे बटण दाबलेले मी पाहीले.एकदम वरचा मजला.. तिथे तर मल्टीप्लेक्स असणार,क्वीक बाईट्सचे स्टॉल असणार.तिथे काय वाढदिवस करायचा.. 


एवढ्यात पाचवा मजला आला.खाण्यापिण्याचे वेगवेगळे स्टॉल दोन्ही बाजूनी सजले होते.सचिन कुठेही न पहाता भरभर चालत होता.शेवटी एका बंद दारासमोर आलो वर पाटी होती, 


"Dialogue in the dark" आश्चर्यात पडले.

अंधारातील संभाषण ?


खाण्याच्या स्टॉलचे नाव विचित्र वाटले.दार उघडून आत गेलो तर फक्त एक काऊंटर व त्या मागे टाय सूट मधला एक माणूस.टेबल खुर्च्या वगेरे कांहीच दिसत नव्हते आम्हाला पहाताच तो लगबगीने पुढे आला, "वेलकम सचिन सर,हॅप्पी बर्थ डे टू यू मॅडम" याचा अर्थ सचिन अगोदरच याला भेटून सर्व ठरवून आला होता. "सर,मॅडम यु आर अवर स्पेशल गेस्टस टुडे काय घेणार ते ठरवा." त्याने काऊंटर वर नेत आमच्या समोर मेनू कार्ड ठेवले.

सचिनने ते माझ्याकडे सरकवले.मी गोंधळले होते.टेबलवर बसण्या आधीच ऑर्डर द्यायची प्रथा पहिल्यांदाच अनुभवत होते.काहीतरी विचित्र वाटत होते.हसऱ्या मुद्रेने सचिन माझी मजा पहात होता.मी ऑर्डर दिली आणि तो माणूस आम्हाला घेऊन निघाला.

एक दरवाजा उघडला समोर एक छोटासा बोळकंडी सारखा रस्ता दिसला. दोघे किंवा तिघेच जातील एवढाच रुंद.आम्ही त्याच्या मागोमाग निघालो.पहिले वळण आले आणि बाहेरून येणारा उजेड खूपच कमी झाला.त्या पॅसेजमधे दिवे अजिबात नव्हते.आणखी एक दोन वळणांनंतर अंधार खूपच वाढला.मी सचिनचा हात घट्ट पकडून दुसऱ्या हाताने भिंतीला स्पर्शत चाचपडत चालले होते.सचिन माझ्या हातावर थोपटत मला धीर देत होता.

पुढच्या वळणानंतर डोळ्यात बोट घातले तरी दिसणार नाही असा मिट्ट काळोख होता पण हवा मोकळी व थंड येवू लागली होती.बहुदा आम्ही एका हॉलमध्ये पोचलो होतो.


"संपत" त्या माणसाने हाक मारली.


"येस सर," अंधारातच उत्तर आले.कुणीतरी जवळ आल्याची चाहूल लागली.


"हे आपले आजचे स्पेशल गेस्ट,मॅडमचा बर्थडे आहे. गीव्ह देम स्पेशल ट्रीट.ऑर्डर मी घेतलीच आहे.त्याना टेबलवर ने."


"येस सर,"अंधारातच आवाज आला.आता संपत आमचे हात धरून त्या अंधारातून नेत होता.खुर्ची ओढल्याचा आवाज आला त्याने माझा हात खुर्चीच्या पाठीवर ठेवला.तसाच सचिनचाही ठेवला असावा.आम्ही बसलो.मी समोरच्या टेबलवर हात फिरवून अंदाज घेतला.या मिट्ट काळोखात जेवण दिसणार कसे आम्ही जेवणार कसे ही कसली सचिनची जगावेगळी पार्टी असे कितीतरी प्रश्नांचे काहूर मनात उठले होते.असा कधी बर्थडे असतो का?पण त्याच्यावर माझा विश्वास होता.

काहीतरी निश्चित वेगळेपणा जाणवणार व मला अतिशय आश्चर्यात तो टाकणार याची खात्री वाटत होती.


पुढ्यात प्लेटस् मांडल्याचे आवाजावरून समजले.वेटर्सचे येणे जाणे चाहुलीने समजत होते.संपतने हात पकडून दोन्ही डिश कुठे आहेत ते दाखवले.चमचा हातात दिला.

एवढ्यात मागवलेले पदार्थ आल्याचे त्यांच्या घमघमाटाने माहीत पडले."वाढतो" म्हणत संपत एक एक पदार्थ डिश मधे वाढू लागला.सर्व झाल्यावर म्हणाला "मी वाढले आहे.आपल्याला कांही दिसणार नाही पण वास आणि स्पर्शाचा उपयोग करून जेवायची एक वेगळीच मजा येईल व तुम्हाला आनंद देईल याची खात्री देतो."त्या अंधारात मी चाचपडत रोटी तोडली,अंदाजाने एका भाजीत हात घातला पहिला घास तोंडात गेला.मग चार पाच घास असेच अंदाज घेण्यात गेले.डाव्या हाताने मी प्लेट पकडली होती. त्यामुळे प्रत्येक पदार्थाची जागा उजव्या हाताला समजू लागली होती.आणि अहो आश्चर्यम् आता त्या अंधारात देखील जेवण मी सहज जेवू शकत होते. हा आगळा अनुभव पदार्थांची मजा तर देतच होता पण या खेळाचा आगळा आनंद आम्ही दोघे पुरेपूर अनुभवत होतो.सचिन कोणत्या पदार्थाचा घास घेतोय हे मी विचारले की तोही विचारायचा.केव्हा आमचे उत्तर एकच असायचे केव्हा वेगळे असायचे हा खेळ खरच जाम मजा देत होता.त्या मिट्ट काळोखात स्पर्श, वास आणि आवाज हेच काम करत होते. मधुनच संपत भाज्या वाढत होता.आम्हाला त्या संपल्या की आहेत हे समजत नव्हते पण त्याला दिव्य दृष्टी असल्या सारखा तो आमची बडदास्त ठेवत होता,शेवटी स्वीटडिश आली ती मात्र त्याने आमच्या हातात दिली.माझा वाढदिवस, अंधारातील जेवणाचा,तो ही मजा देऊन गेला. कदाचित कँडल लाईट डिनर पेक्षाही मजा आली होती."आपण जाणार असाल तेव्हा सांगा,मी आपल्याला बाहेर घेऊन जाईन."संपतने सांगीतले तसा सचिन म्हणाला,"अरे बिल तर बाहेरच द्यावे लागणार,चल निघू आपण."


संपतने माझी खुर्ची हळुवार सरकवली.माझा हात पकडला.तसाच सचिनचाही पकडला असावा.तो आम्हाला घेऊन सराईता सारखा तो काळोख कापत बाहेर निघाला.पॅसेजमधे आल्याचे सहज समजले.हात आपोआप पॅसेजच्या भिंतीवर गेला.दोन वळणानंतर अंधुक प्रकाश दिसू लागला आणि संपतचा हात सोडून आता आम्ही चालू शकत होतो. 


काउंटरच्या दालनात पोचलो.सचिन बिल देण्यासाठी गेला.आमची काळजी घेणाऱ्या संपतचे आभार मानण्या साठी पाठमोऱ्या संपतला मी हाक मारली.संपत वळला. त्याच्याकडे पहाताच मी जागच्या जागीच थिजले.

संपतच्या डोळ्यांच्या जागी फक्त खाचा होत्या.तो ठार आंधळा होता.


"येस मॅडम,"काय बोलू तेच समजेना.पण सहानभूतीने भरलेले शब्द निघालेच, "संपत या स्थितीतही तू छान आदरातिथ्य केलेस.कायम लक्षात राहील." मॅडम तुम्ही जो अंधार आज अनुभवलात तो आम्हाला रोजचाच आहे. पण आम्ही त्याच्यावर विजय मिळवलाय.


We are not disabled,we are differently able people.We can lead our life without any problem with all joy and happiness as you enjoy."


आम्ही अपंग नाही,आम्ही वेगळे असे सक्षम लोक आहोत.आम्ही आमचे जीवन कोणत्याही समस्येशिवाय सर्व आनंदाने आणि आनंदात जगू शकतो जसे तुम्ही आनंद घेत आहात."


माझ्या सहानुभूतीने भरलेल्या बोलण्याची मलाच लाज वाटली.सहानभुतीची गरज नसलेला एक सशक्त माणूस मला सचिनने भेटवला होता. असा वाढदिवस होणे नाही.सचिन तुझा मला अभिमान वाटतो.सचिन बिल देऊन माझ्याकडे आला.बिल माझ्या हातात दिले.नेहमी सचिनच्या खर्चावर पाळत ठेवणारी मी बिल पहायला गेले तो तळटिपेवर लक्ष गेले. 


We do not accept tips, Please think of donating your eyes, which will bring light to somebody's life.


आम्ही टिप्स स्वीकारत नाही,कृपया तुमचे डोळे दान करण्याचा विचार करा,ज्यामुळे कोणाच्या तरी आयुष्यात प्रकाश येईल.


एका इंग्लीश मेसेजचा स्वैर अनुवाद आहे.

लेखक - अनामिक

वाचता..वाचता..वेचलेले 


४/८/२४

बीज अंकुरे अंकुरे/Seed sprouts sprouts..

जुलै महिन्याचा लेखाजोखा.।।।


माझं सर्व बालपण सातारा जिल्ह्यातल्या म्हसवड नावाच्या छोट्याशा खेडेगावात आजीच्या सहवासात गेलंइथे घडलेल्या गमती - जमती,कथा - व्यथा आणि माझ्यावर झालेले भले - बुरे परिणाम;हे सर्व मी माझ्या पुस्तकात काहीही न लपवता मांडलं आहे. 


माझ्या आजीचं नाव लक्ष्मीबाई...!


नावाप्रमाणेच ती होती.कपाळावर जुन्या रुपयाच्या कॉइन एवढं भलं मोठं कुंकू,नाकात बांगडीला लाजवेल एवढी मोठी नथ, काठापदराचं लुगडं घालून ती अशी चालायची; जसा राज घराण्यातला हत्ती निघाला आहे...! 


म्हणायला अशिक्षित,पण व्यवहार चातुर्य PHD झालेल्या माणसाला लाजवेल असं ...


तोंडानं फटकळ,पण मायेचा जिवंत झरा हृदयात घेऊन फिरायची... 


गावात जबरदस्त दरारा...! 


एके दिवशी तिकडे तिचे वडील वारले आणि इकडे माझा जन्म झाला...त्यावेळच्या भाबड्या कल्पनेनुसार,एका माऊलीने तिला सांगितले.'आगं लक्साबया... रडु नगो बाये,पांडुरंगाचे पोटी तुजा बापच जलमाला आलाय...!'


पांडुरंग माझ्या वडिलांचे नाव... ! 


झालं,तेव्हापासून माझी आजी मला तिचा बापच समजायला लागली,आणि तेव्हापासून माझे विशेष लाड आणि कोड कौतुक सुरू झालं. अख्खा गाव तिला मामी म्हणायचा,तिला घाबरायचा.... पण तिच्या प्रेमाने लाडावलेला मी तिला लहानपणी "ए लक्षे" म्हणून हाक मारायचो.... आजीचे वडील तिला याच नावानं हाक मारायचे,नातू पण त्याच नावाने हाक मारतो,म्हणजे खरोखरच आपला बापच नातवाच्या रूपाने जन्माला आला आहे,यावर आता शिक्कामोर्तब झालं... ! 


तिचा "बाप" असण्याचा,मग पुढे मी पुरेपूर फायदा घेतला.


करारी आणि कठोर बाई हि,परंतु कोणत्याही गरिबाच्या अडल्या नडल्या मदतीला ही सर्वात प्रथम पुढे येई.

सर्वांनाच हिच्याबद्दल आदरयुक्त भीती होती.गावातल्या श्रीमंतापासून ते गरिबातल्या गरीब घरापर्यंत कोणाच्याही घरात ती डायरेक्ट घुसायची...घरात जिथे उंच जागा सापडेल तिथे ती पायावर पाय टाकून बसायची,आणि इकडे तिकडे पहात,पदराची दोन टोकं हाताच्या चिमटीत पकडत,स्वतःला वारा घालत, घरातल्या लोकांची हजामत करायची. हतरून पांगरून आजुन काडली न्हाईत ? 


शेळ्याच्या लेंड्याच हित पडल्यात...घरच नीट सारवलं न्हायी...गाई म्हशीचं श्यान उचलायला का तुजा बा येणार हाय का ए...? सुना म्हशीवानी खाऊन फुगल्यात... 

ए टवळे डोक्याला त्याल लाव कि....का तमाशात नाचायला जायचं हाय ? डोक्यावर पदुर घ्यायला तुज्या आईनं शिकावलं न्हाय का तुला,व्हय गं ए उंडगे...! इतभर गजरा आणि गावभर नखरा...


तिची टकळी चालू असायची...तिच्या तावडीतून कुणीच सुटायचं नाही.येणारा जाणारा प्रत्येक जण तिची नजर चुकवून जायचा...! यावेळी मी तिचा पदर धरून,डाव्या हाताने चड्डी सावरत  शर्टाच्या उजव्या बाहीला शेंबूड पुसत सर्व काही पहात असे.चड्डी माझ्या मापाची मला कधीच मिळाली नाही. 


थोडी मोटी दे... वाडतं वय हाय... अजून मोटी दे.... हांग आशी... म्हणत दुकानदाराला माझ्या चड्डीची ऑर्डर आजीच द्यायची...


डावा हात हा फक्त चड्डी सांभाळण्यासाठी असतो आणि उजवा हात शेंबूड पुसण्यासाठी... त्या वयात हाताचे इतकेच उपयोग मला माहित होते.तर सर्व उणीदुनी काढून झाल्यानंतर,पदरानं घाम पुसत,म्हातारी बिनदिक्कतपणे त्या घरात ऑर्डर सोडायची... ए टवळे,च्या टाक जरा मला... तुमाला आक्कल शिकवून दमले बया मी,

तुमच्यापेक्षा गाडव बरं...वर तीच कांगावा करायची...! चहा येईपर्यंत, माझी नाकाची फुरफुर चालूच असायची... 


समद्या गावाचा शेंबूड तुलाच आलाय का काय मुडद्या ? असं म्हणत वैतागून उठत;ती मला दरा दरा ओढत घराबाहेर नेत,माझं नाक पदरात धरून असं शिंकरायची,

की मृत्यु परवडला.... ! 


अजून थोडा जोर लावला असता,तर तीने माझा मेंदूच बाहेर काढला असता...


तुजं आसं हाय,शेंबूड आपल्या नाकाला,आन् रुमाल देतंय लोकाला...असं स्वतःशी पुटपुटत, मला कडेवर घेऊन ती परत घरात यायची. 


यानंतर कान नसलेल्या,फुटक्या कपात,किंवा चार ठिकाणी चेंबलेल्या फुलपात्रात चहा यायचा. बऱ्याच वेळा जर्मनच्या "भगुल्यात" च्या यायचा... बशी नसली तर...  आम्ही मग हा "च्या" गोल ताटात भरून भुरके मारत प्यायचो... आज जाणवतं,हा खऱ्या अर्थाने सोहळा होता..!आता कुठे आहे हे फुलपात्र?  ते जर्मनचं भांडं आणि तो कान नसलेला फुटका कप?


मी शोधतोय ...! 


आईच पत्र हरवलं... हा खेळ आम्ही लहानपणी खेळायचो,हे फुलपात्र... ते जर्मन चे भांडं आणि कान नसलेला फुटका कप सुद्धा तसाच हरवलाय... ! माणसं शिकत गेली आणि या जुन्या गोष्टी पुस्तकाच्या पानात दबून गेल्या... आठवण म्हणून  ठेवलेल्या पिंपळाच्या जाळीदार पानासारख्या...! आता या गोष्टी दिसतात फक्त जुन्या बाजाराच्या दुकानात... नाहीतर,चेहऱ्यावर सुरकुत्यांची जाळी घेऊन,अंताकडे वाटचाल करणाऱ्या म्हाताऱ्या माणसांच्या मनात...!!!


तर;बऱ्याच वेळा फुलपात्रातून किंवा फुटलेल्या कपातून, बशीत चहा सांडेस्तोवर दिला जायचा..फुलपात्र आणि कप सोडून बशी सुद्धा चहानं भरलेली असायची... !


डाव्या हाताने चड्डी,उजव्या हाताने नाक सांभाळताना....

मला चहा प्यायलाच जमायचं नाही,मग माझी म्हातारी एक घोट स्वतः प्यायची,  एक घोट मला पाजायची... !हा चहा पिताना, माझ्या घशातून घुटुक घुटुक आवाज येत असावा... मला माहित नाही. 


पण यातही माझ्या आजीला कौतुक... 


बगा गं बायांनो,"माजा बाप" कसा घुटुक घुटुक च्या पितो,तुमाला दावते... म्हणत ती अजून चार फुलपात्रे नाक दाबून मला चहा पाजायची... 


पुढे डोक्यावरून पाणी गेलं... 


रडत खडत शिकलो.... त्यानंतर मोठ्या मुश्किलीने डॉक्टर झालो...पुढच्या खाचखळग्यातून वाटा काढत चालत राहिलो... 


आयुष्यातली सगळी पानीपते हरलो... तरीही पुढे कष्ट करून मनातला "विश्वासराव" जिवंत ठेवला... ! आयुष्याच्या एका टप्प्यावर आंतरराष्ट्रीय संस्थेत कामाला लागलो... आर्थिक स्थैर्य आलं.मग अनेक उच्चभ्रू लोकांशी / ऑफिसशी संपर्क येऊ लागला. 


सुरुवातीला... "खेड्यातनं आलंय येडं,आन भज्याला म्हनतंय पेडं ...." अशी माझी अवस्था होती.खेड्यातला येडा मी....  तिथले मॅनर्स आणि एटिकेट्स शिकण्याचा प्रयत्न करू लागलो. चकचकीत आणि महागड्या कपांमध्ये चहा मिळू लागला... 


भल्या मोठ्या कपामध्ये / मगमध्ये सांडणार नाही,अशा पद्धतीने निम्माच चहा किंवा कॉफी असायची... ! पुढे मी सरावलो... एकदा हि माझी खडूस म्हातारी... बऱ्याच वर्षांनी माझ्या घरी आली.... आंतरराष्ट्रीय संस्थेतील महाराष्ट्राचा प्रमुख मी.... 


तिला एका मोठ्या पांढऱ्या स्वच्छ कपामध्ये मी तिला चहा दिला...कपाला सोन्याचीच वाटावी, अशी सोनेरी रंगाची नक्षी होती...शिकलेले मॅनर्स सांभाळत,भल्या मोठ्या कपामध्ये;सांडणार नाही अशा पद्धतीने तिला निम्मा चहा दिला होता. विहिरीत वाकून बघावं,तसं तीनं कपात वाकून बघितलं...कपातला अर्धा चहा बघून ती खवळली.... तिच्या स्वभावानुसार ती बोलली.... 'येवडासा च्या ? ल्हान पोरगं हेच्यापेक्षा जास्त मुततंय... तू कंनच्या कंपनीत काम करतूय रं...?  सायबाला म्हणावं पाच धा रुपय पगार जास्त दे...घरात आलेल्या पावण्यांना कप भरून च्या पाजू दे...!' पाच लाख रुपये दरमहा कमावणाऱ्या माझ्यासारख्या माणसाच्या तोंडात माझ्याच म्हातारीने सणसणीत चपराक हाणली. 


मलाही राग आला,गावाकडे चेंबलेल्या फुलपात्रात आणि फुटक्या कपात च्या पिणारी माजी म्हातारी,आज इतक्या मोठ्या,सुंदर सोनेरी नक्षीच्या कपात चहा पीत आहे, नातवाचं हिला काहीच कौतुक नाही...??? 


मी तिला हे बोलून दाखवलं. 


यावर जोरदार पलटवार करत म्हातारी म्हणाली, ' गप ए शेंबड्या... तूजा कप किती छोटा हाय, का मोटा हाय.... त्याला सोन्याची का चांदीची नक्षी हाय,त्याला किंमत नसती... या कपातून तू काय देतू,किती देतू,कोनच्या भावनेनं देतू त्याला जास्त किंमत आसती...!' 


आंतरराष्ट्रीय संस्थेमध्ये दरवर्षी "मॅनेजमेंट" या विषयावर किमान चार सेमिनार असतात... असे मागील दहा वर्षात मिळून मी ४० सेमिनार अटेंड केले असतील...तू काय देतो,किती देतो,कोणत्या भावनेनं देतो त्याला जास्त किंमत असते... ! सेमिनार मध्ये किती कळलं मला माहित नाही... पण माझ्या म्हातारीने दोन मिनिटात मॅनेजमेंटचं सर्व सार सांगितलं...!


हातातला कप माझ्या हातातच राहिला... तिच्याकडे भारावून मी पाहत राहिलो... "कपावरची" सोनेरी नक्षी आता तिच्या "कपाळावर" उमटलेली मला भासली... !!! 


गोष्ट तशी छोटी पण लाखमोलाची...!!!


'ए चेंगट बेण्या...  माजा कप आक्का भर... बशीत च्या सांडला पायजे बग...' तिच्या या वाक्याने मी भानावर आलो आणि बशीत सांडेस्तोवर च्या तिच्या कपात "वतला".समाधानाने तिच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या हसल्या.यानंतर बशीत सांडलेला चहा तिने घरातल्या तुळशी वृंदावनाच्या मातीत टाकला, थोडा चहा एका प्लेटमध्ये टाकून ती प्लेट तीने घराबाहेर ठेवली.आता कपात पुन्हा निम्माच चहा उरला.हा निम्मा चहा तिने बशीत ओतून समाधानानं भुरके मारत पिला.म्हातारीला मी पुन्हा वैतागून म्हणालो,'म्हातारे,मी तुला आधी कपात निम्माच चहा दिला होता, तू इकडे तिकडे ओतून निम्माच चहा पिलास.... मग मला मघाशी संपूर्ण कप सांडेपर्यंत का भरायला लावलास ?' 


यावेळी ती, न चिडता भावुक होत म्हणाली... 'माज्या बाळा,आपून इतकं कमवायचं... इतकं कमवायचं...

की ते सांडून कपाभायेर येऊन बशीत पडलं पायजे...

पन बशीत जे पडंल त्ये मात्र आपलं नसतंय...त्ये आस्तय प्राणी,पक्षी, गुरांचं... त्ये त्यांना वाहायचं...' 


'द्येव आपल्याला कप भरून देतो,पण म्हनुन आपुन अख्खा कप प्यायचा नसतो....निम्मा कप समाजातल्या गोरगरिबांसाटी आसतो... निम्म्या कपाचं दान तिथं करायचं आस्तय बबड्या...' माझ्या गालावरून खरबरीत हात फिरवत तिनं माणुसकीची व्याख्या सांगितली. 


कुठं गं शिकलीस हि जगण्या आणि जगवण्याची कला.??

 


माझ्या डोळ्यातून अश्रू ओघळले... 

मला तिचे पाय धरायचे होते... 


पण मला हे नक्की माहीत होतं,की मी तीचे पाय धरताना;पाठीत धपाटा घालून ती मला म्हणेल, ' न्हाई भजं खायाला मी तुला आट आनं द्येनार न्हाई हां मुडद्या,लय नाटकं नगों करुस...' 


पाच लाख दरमहा कमावणारा मी.... 

तरीही आज "भजं खायाला" माझ्याकडे आठ आणे नाहीत... गरीब कोण...?  श्रीमंत कोण...?


माझ्याकडे पैसा होता; पण तिच्याकडे लक्ष्मी...!!! 


गोष्ट तशी छोटी पण लाखमोलाची...!!!


एकदा ती मला म्हणाली होती,'मेल्यावर बिन बोलवता बी "खांदा" द्यायला समदं गाव जमतंय,  पन भुकेजलेल्या जित्त्या माणसाला आणि जनावराला आपल्या जवळची कोरभर भाकर आणि "कांदा" कुनी देत न्हाय…'खांदा दिवून पुन्य मिळवन्या पेक्षा...जित्या मानसाला "भाकर आनं कांदा" दीवून पुन्य मिळव..


आपल्याला दगडातला द्येव् व्हायचाच न्हायी ...चालता बोलता मानुस व्हयाचं हाय...! 


आंतरराष्ट्रीय संस्थेचा प्रमुख मी... Management आणि Humanity या विषयावर माझ्याकडे पारितोषिके आहेत. Doctor for Beggars या कामामध्ये मला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मिळून एकूण ३००० पेक्षा जास्त पुरस्कार आहेत. माझे हे सर्व पुरस्कार आणि पारितोषिके एका पारड्यात.... आणि माझ्या म्हातारीचे विचार एका पारड्यात.... ! 


कसं कोण जाणे... पण तीचंच पारडं खाली जातं... ! तिच्या विचारांचं वजन नेहमीच जास्त भरायचं. "ओझं" "भार" आणि "बोजा" हे; वरवर "वजन" या शब्दाचे समानार्थी शब्द वाटतात. खरंतर तिघांचेही अर्थ वेगळे आहेत. मनाविरुद्ध अंगावर पडतं ते ओझं...

नाईलाजाने वाहिला जातो तो भार...इच्छा नसतानाही लादला जातो तो बोजा...पण,

मनापासून आणि आनंदाने खांद्यावर वागवलं जातं ते वजन...! माझी अशिक्षित म्हातारी,विचारांचं धन डोक्यावर घेऊन...खऱ्या अर्थाने लक्ष्मी होते...आणि,इतकं सर्व मिळवून माझी झोळी रिक्त राहते....आणि हातात काही नसून,माझी म्हातारीच श्रीमंत होऊन जाते...!!! 


अशीच एकदा ती मला म्हणाली होती, 'नारळाच्या झाडागत बोंबलत उच्च नगो होवूस... शेळ्या मेंढ्या ह्यांच्या तोंडाला तुजी पानं लागून त्यांची भूक भागंल,असं दोन फुटाचं बुटकं झाड हो...' दुसऱ्यासाटी तू किती झुकतोस, यावर आपली उंची ठरत्ये माज्या सोन्या..." 


तिची ही वाक्ये ऐकून माझ्या अंगावर शहारे आले होते...! 


डाव्या हाताने मग मी चड्डी सांभाळत उजव्या हाताने नाकाचा शेंबूड पुसत... मी पुन्हा लहान होतो आणि पुन्हा तिच्या पदराखाली जातो... पुन्हा पुन्हा तिच्या पदराखाली जातो...आणि दरवेळी हा पदर मला माणुसकीच्या रस्त्यावर घेऊन येतो, एखाद्या दिशादर्शकासारखा ...!!! 

तिच्या फाटक्या पदराची हि पताका;  हेच माझं भरजरी वस्त्र आहे...!!!


गोष्ट तशी छोटी पण लाखमोलाची...!!!


ती जायच्या अगोदर काही दिवस मला म्हणाली होती...'खेड्यातली ल्वोकं फुलपात्रातून च्या देत्यात यात तुला गावंडळपना वाटतू ना ... ?' 


मी खाली मान घालून गप्प बसलो. 


यावर तिने तिच्या भाषेत,फुलपात्र या शब्दाचा व्यापक अर्थ सांगितला तो असा...


प्रत्येकाजवळ स्वतःचं असं एक भांडं...एक पात्र असतं.हे पात्र कधी रिकामं असतं... तर कधी भरलेलं असतं.

ज्याच्याकडे हे रिकामं पात्र असतं त्याला हिणवू नये कधीच...कदाचीत स्वतः कडचं सर्वस्व पोरा बाळांना देऊन माघारी फिरला असेल तो...कधी आई होऊन... कधी बाप होऊन...आई बापाचं भांडं दिसायला रिकामं दिसलं तरी ते पात्र कायम Full च असतं...!

आपल्या ताटातली भाकरी जेव्हा आपण दुसऱ्याला देतो... तेंव्हा दिसायला ताट रिकामं दिसतं... पण खऱ्या अर्थाने ते तेव्हाच भरलेलं असतं... आणि तुमचं पात्र आपोआप Full होतं. घेण्यात आनंद आहे बाळा... पण देण्यात समाधान...! आपण घ्यायचं सुद्धा असतं आणि द्यायचं सुद्धा...कधीतरी एखाद्याची भूक उसनी घेऊन, त्याच्या चेहऱ्यावरचा "आनंद" आपण घ्यायचा... आणि त्याला भाकर देऊन, आपल्या मनातलं "समाधान",त्याच्या मुखात ठेवायचं....! 'हितं तुजं भांडं रिकामं दिसंल... पन तवाच तुजं पात्र Full होतंय गड्या...!' 


गोष्ट तशी छोटी पण लाखमोलाची...!!!


खाटेवर  पडलेल्या आजीचे क्षीण झालेले, सुरकुतलेले हात मी माझ्या दोन्ही हातात घेतले...या हातांवर आपोआप अश्रूंचा पाऊस झाला... आणि तिच्या चेहऱ्यावरच्या भेगाळलेल्या जमिनीवर, एक अंकुर उगवून आला...."डॉक्टर फॉर बेगर्स...!!!"


माझी हि आजी..."लक्ष्मी" होऊन माझ्या पदरात आली...अक्षय विचारांचे धन देऊन मला श्रीमंत बनवून; अक्षय होऊन गेली... ! ती गेली तो दिवस होता "अक्षय तृतीया".... हा योगायोग नक्कीच नव्हता...!!! ती माझं पात्र... फुल्ल करून गेली... अक्षय्य करून गेली...! 

आता चेंबलेलं का असेना... जुनं का असेना... फुटकळ का असेना... पण हेच "फुलपात्र"; मी रोज याचकांच्या चरणी रीतं करतो... परतताना मात्र माझं हे पात्र तुम्ही सर्वजण पुन्हा Full करता... परत परत Full करता...आणि Full झालेलं हे "फुलपात्र"; मी जपून ठेवतो,दरिद्री नारायणाची उद्याची पूजा मांडण्यासाठी...!!! 


आणि म्हणून आजचा हा लेखाजोखा आपल्या पायाशी सविनय सादर !


या महिन्यात झालेल्या कामाचा आढावा आता विस्तृत सांगत नाही... 


फक्त इतकंच सांगेन,या महिन्यात जे अंध,अपंग - विकलांग,भिक मागणारे लोक सापडले, अशांना हातगाडी,वजन काटे,कापडी पिशव्या विकायला देऊन, छोटे छोटे व्यवसाय काढून देऊन व्यवसायाचं एक साधन त्यांच्या चरणी अर्पण केलं आहे... हाच मी वाहिलेला नैवेद्य... ! भीक मागणाऱ्या पालकांची मुलं किंवा खुद्द भीक मागणारी मुलं,यांना एकत्र करून सॉक्स बुट आणि युनिफॉर्म पासून शाळा कॉलेजेच्या त्यांच्या फिया भरल्या आहेत.१५जुलैला जेव्हा ही मुलं दप्तर - रेनकोट घेऊन शाळेत निघाली, त्यावेळी मला त्यांच्यात, आयुष्यातला "विठ्ठल" शोधायला निघालेला वारकरी दिसला...


इथेच झाली माझी वारी, आणि म्हणून विठ्ठला मी आलोच नाही  पंढरपुरी...!!


रस्त्यावरील याचकांना रस्त्यावरच वैद्यकीय सेवा दिल्या,रस्त्यावर जे जमत नाही अशा गंभीर रुग्णांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. 


आषाढी एकादशीला पंढरपुरात हातातले टाळ तिकडे दुमदुमत होते... मला इथे ते आजारी याचकांच्या धडधडणाऱ्या हृदयात ऐकायला आले... माझा स्तेथोस्कोप आज टाळ झाला ...! 


काय गंमत आहे पहा, "वि-ठ्ठ-ल" नाम स्मरण हे हृदयाशी निगडित आहे... शास्त्रोक्त पद्धतीने केलेल्या नामस्मरणास "विठ्ठल क्रिया" असं म्हटलं जातं.पंढरीच्या राजा,आम्ही इथेच बसून रोज "विठ्ठल क्रिया" केली...! हात हे उगारण्यासाठी नाही... उभारण्यासाठी असतात..." हे ज्या वृद्ध याचकांनी मला रस्त्यावर शिकवलं,मी त्यांनाच गुरु मानुन त्यांच्या चरणांवर नतमस्तक झालो... ! 


त्यांच्या विचारांच्या उजेडात,माझी प्रत्येक अंधारी रात्र मग "पौर्णिमा" झाली...!


आज खूप वर्षांनी विचार करतो.... भिकाऱ्यांच्या डॉक्टर /भिक्षेकर्‍यांचा डॉक्टर/डॉक्टर फॉर बेगर्स... याचं बीज नेमकं आहे कशात... ?


खडकाळ जमिनीत सुद्धा तृण उगवतं...कुणीही बीज न रोवता बांधावर एखादं बाभळीचं / रानफुलाचं झाड उगवतं...याला ना खत लागत ना मशागत... तरीही ते फोफावतं...सावली देण्याची त्याची पात्रता नसेलही,पण शेळ्या मेंढ्यांचं खाद्य होण्यात ते धन्यता मानतं...!


खडकाळ ... भेगाळ का असेना .... पण माझी म्हातारीच माझी जमीन झाली...आणि माझं बीज इथेच अंकुरलं...


माझ्याच म्हातारीच्या भाषेत सांगायचं तर;मला अफाट,

पण खारट समुद्र व्हायचंच नाही...मला व्हायचंय एक छोटंसं, पण गोड पाण्याचं तळं... जिथं कोणाची तरी तहान भागेल...शेतकऱ्याचं बीज पिकेल...! त्यावेळी माझ्या थेंबा थेंबाने गाणं म्हणावं.... बीज अंकुरे अंकुरे...!!!


३१ जुलै २०२४


डॉ.अभिजीत सोनवणे-डॉक्टर फॉर बेगर्स

सोहम ट्रस्ट पुणे


२/८/२४

पक्षी मानवांचे बेट / ISLAND OF BIRD HUMANS

३०.०७.२४ या लेखातील शेवटचा भाग ..


टिआहआन्कोच्या मातीतून मानव आणि इतर प्राणी त्याने बनवले आणि त्यांच्यात जीव ओतला.त्यांना त्याने भाषेची देणगी दिली.चालीरीती,कला शिकवल्या आणि आकाशमागनि जगातल्या निरनिराळ्या मातीत पोहोचवून त्यांना त्या त्या भागात वस्ती करायला सांगितले.


काही काळाने त्याच्या सूचनेप्रमाणे काम चालू आहे की नाही,त्यात त्यांना यश प्राप्त होत आहे की नाही हे पाहण्यासाठी वीरकोचा आणि त्याचे त्यांना सहकारी जगप्रवासाला निघाले.म्हाताऱ्याचा वेश करून ॲन्डीज पर्वत आणि किनारपट्टीवर फिरत असताना त्यांचे कधी कधी चांगले स्वागत झाले,कधी नाही.

काचा या ठिकाणी त्याचा फार अपमान झाला आणि खवळून त्याने तिथल्या डोंगराच्या कड्यालाच प्रचंड आग लावली.बघता बघता तो देशच अग्निच्या भक्ष्यस्थानी पडायला लागला.तिथल्या कृतघ्न लोकांनी त्याची क्षमा मागितल्यावरच त्याने एका क्षणात सर्व आग विझवून टाकली.


सल्ला देत,सूचना करीत वीरकोचाने पुढे प्रवास सुरू केला.अनेक ठिकाणी लोकांनी त्याची मंदिरेही बांधली.शेवटी सागराच्या लाटांवर आरूढ होऊन तो महासागरावर अदृश्य झाला.मी परत येईन असे सांगायला तोही विसरला नव्हता.


स्पॅनिश लोकांनी मध्य व दक्षिण अमेरिकेवर कब्जा केला तेव्हा वीरकोचाची वीरगाथा सर्वत्र त्यांच्या कानावर पडली.आकाशमार्गाने आलेल्या धिप्पाड गोऱ्या लोकांबद्दल तोपर्यंत कोणीच कधी ऐकले नव्हते.चकित होऊन सर्व क्षेत्रात मानवप्राण्याला मार्ग दाखवणाऱ्या सूर्यपुत्रांच्या कथाही त्यांनी ऐकल्या.या प्रत्येक कथेत सूर्यपुत्र निश्चित परत येणार होते हे आश्वासन होतेच.


अमेरिका खंडाला जुन्या संस्कृतींचे माहेरघर म्हणत असले तरी या खंडाची जाणीव झाली आहे ती गेल्या हजार वर्षांतच.


मागावर वस्त्र विणण्याची कला अवगत नसताना ५००० वर्षांपूर्वी इंका लोक कापूस का पिकवत होते हे गूढच आहे.


माया लोकांना चाक माहीत होते.त्यांनी रस्तेही बांधले पण चाकाचा उपयोग कधीच केला नाही.


ग्वाटेमालातील टिकल येथील पिरॅमिडमध्ये हिरव्या जेडचा पाचपदरी नेकलेस सापडणे हा चमत्कारच! एव्हढ्यासाठी की हा दगड फक्त चीनमध्येच मिळतो.


ओलमेक जमातीच्या सुरेख शिरस्त्राणे घातलेल्या अप्रतिम मूर्तीचे कौतुक तिथेच जाऊन करायला पाहिजे.त्यापैकी एकही मूर्ती जगातल्या कुठल्याही म्युझियममध्ये आढळणार नाही.कारण? कारण जगात बांधलेला एकही पूल या मूर्तीचे वजन पेलू शकणार नाही.


आजपर्यंत ५० टनांच्या वर वजन उचलू शकतील अशा क्रेन्स अस्तित्वात नव्हत्या. हल्ली हल्ली काही शेकडो टन वजन उचलण्याची क्षमता असलेल्या क्रेन्स आपण बनवायला लागलो आहोत.पण आपले पूर्वज ? काही वेळा तर वाटते की आपल्या पूर्वजांना प्रचंड शिळा पर्वत कपारींवर नाहीतर दऱ्याखोऱ्यात नेण्याचा मुलखावेगळा छंदच असावा.


इजिप्शियन लोकांनी पिरॅमिडचे दगड अस्वानच्या खाणीतून काढून नेले.ईस्टर आयलंडमधील लोकांनी त्यांचे प्रचंड पुतळे दूरदूरच्या खाणींपासून सध्याच्या जागांवर नेले.टिआहुआन्को येथे सापडलेले काही राक्षसी दगड कुठल्या खाणीतून काढले त्याचा उलगडाच होत नाही.आपले पुराणकालीन पूर्वज जरा चक्रमच वाटतात नाही? प्रत्येक गोष्टीत स्वतःचा छळ करून घ्यायची बहुधा आवडच असावी त्यांना. नाहीतर दगडांच्या खाणीपासून दूर दूर,नको नको त्या दऱ्याखोऱ्यात नाहीतर पर्वतांवर असे पुतळे उभारण्याची काही गरज पडली होती का त्यांना?


आपल्याला वाटतात तेवढे ते खरोखर मूर्ख असतील का? त्यांची भव्य मंदिरे,पिरॅमिडस्, मूर्ती वगैरे सर्व त्यांना खाणींजवळच बांधता आले असते,मग ते त्यांनी का केले नाही? कारण प्रत्येक ठिकाणच्या आख्यायिका सांगतात की,ही कामे अमुक ठिकाणीच व्हायला पाहिजेत म्हणून !


इंकांचा कुझको येथील सुप्रसिद्ध किल्ला सहज सुचले म्हणून त्या जागेवर बांधला नसणार;

आख्यायिकाच सांगत होत्या की ती जागा पवित्र होती म्हणून! दुसरी गोष्टही निश्चित.भविष्यकालीन अंतराळ संशोधनाला चालना देणाऱ्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी या पौराणिक इमारतीखाली,

अवशेषांखाली, अजून दडून असल्याच पाहिजेत.


आपल्याला जितकी दूरदृष्टी आहे तितकी दूरदृष्टी हजारो वर्षांपूर्वी पृथ्वीला भेटी देणाऱ्या अंतराळवीरांना नक्कीच होती. त्यांना संपूर्ण खात्री होती की एक दिवस पृथ्वीवरील मानव स्वतःच्या कौशल्याने, स्वतःची बुद्धी वापरून अंतराळात पाऊल टाकेल म्हणून!


आपल्या पृथ्वीवरील बुद्धिमान जमाती आपल्यासारख्याच जीवन जगणाऱ्या, बुद्धिमान असणाऱ्या,अनंत अवकाशातील जमातींशी संपर्क सांधण्याच्या प्रयत्नात आहेत;हे ऐतिहासिक सत्य आहे.कुठल्या ग्रहांवर अशा जमाती असण्याची शक्यता आहे,आपण अंतराळात कुठे संदेश पाठवावेत,आपल्या संदेशाचे उत्तर १०० वर्षांत मिळेल की १००० की १०००० वर्षांत याची थोडीशीही कल्पना नसताना आज आपण रेडिओ लहरींद्वारा अज्ञात अशा परग्रहांवरील बुद्धिमान जमातींशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करीत आहोत.


पण ही सर्व माहिती आपल्या पृथ्वीवरच दडून आहे का? गुरुत्वाकर्षणाचे परिणाम नष्ट करणे,अणू -

परमाणु,ॲन्टिमेंटर या सर्व गोष्टींवर आपले प्रयोग चालू आहेत;पण पृथ्वीवर सर्वत्र दडलेले हजारो वर्षापूर्वीचे आधुनिक तंत्रज्ञान शोधण्याचा आपण कितीसा प्रयत्न करीत आहोत? हजारो वर्षांपासून मानवाचा स्वतःचे अस्तित्व राखण्याचा,सुधारण्याचा जो प्रयत्न चालू आहे त्याचे खरे समर्थन एकच आहे. भूतकाळापासून शिकणे,अनंत विश्वातील आपले स्थान जाणून घेणे व इतर अशाच बुद्धिमान जमातींशी हात मिळवणे. 


अंतराळावर स्वारी चढवण्याचे प्रयत्न करणे हाच मानवजातीचा प्रयत्न राहील,तेव्हाच पृथ्वीवर शांतता नांदेल आणि स्वर्गाची दारे उघडतील.अंतराळ संशोधनाचे निष्कर्ष हाती आले की पृथ्वीवरील आपापसातील युद्धे किती मूर्खपणाची आहेत याची सर्वांनाच जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही.सर्व देश एकोप्याने परग्रहांवरील स्वारीसाठी आपले आधुनिक तंत्रज्ञान वापरायला सुरुवात करतील;तेव्हा पृथ्वीवरील इतर प्रश्न त्यामानाने किती क्षुल्लक आहेत याची जाणीव होऊन,विश्वातील पृथ्वीचे स्थान शोधण्याचा प्रयत्न मार्गाला लागेल.एकदा का अंतराळाची कवाडे उघडली की मानवाचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे.जगात शांतता व सुव्यवस्था स्थापन करण्याचे 'देवांचे' वचन त्याच वेळी प्रत्यक्षात उतरेल.(देव?छे! परग्रहावरील अंतराळवीर !,

बाळ भागवत,मेहता पब्लिशिंग हाऊस..) कल्पनाविश्वात रममाण होण्याचा हा प्रकार आहे असे ज्यांना वाटत असेल त्यांना थॉमस मानचे एक वाक्य सांगावेसे वाटते. 


'संशयी माणसाचे महत्त्व एकच ! त्याला कोणतीही गोष्ट अशक्य वाटत नाही.'


समाप्त…


वाचता वाचता वेचलेले.. काही अभ्यासू नोंदी..


जव्हारची स्वारी : मे १६७२ च्या सुमारास मोरोपंत पिंगळे दहा हजार स्वारांसह जव्हारच्या स्वारीसाठी रवाना.शिवाजी महाराज या वेळी नेमके कुठे होते हे सांगणारं विश्वसनीय साधन उपलब्ध नसलं,तरी ते मोरोपंतांना सुरतजवळ येऊन मिळतील असा एका इंग्रजी पत्रात उल्लेख (शिवकालीन पत्रसारसंग्रह क्रमांक १४७४) जयराम पिंडे यांच्या 'पर्णालपर्वत ग्रहणाख्यानामा'तही तसा उल्लेख.जव्हारचे राज्य कोळी राजा विक्रमशाह याच्या ताब्यात तर रामनगर सोमशाहच्या ताब्यात होते.हे दोघेही चौथिया राजा म्हणून ओळखले जात.दमण प्रांत या वेळी गुजरातच्या सुलतानाच्या ताब्यात होता. परंतु तेथील प्रजा मूळ हिंदू राजाला त्याने आपणाला कसलाही त्रास देऊ नये म्हणून उत्पन्नाचा चौथा हिस्सा देत असे.

म्हणून हे चौथिया राजे.१५९९ पासून हा प्रांत पोर्तुगीजांच्या ताब्यात आला तरीही हे राजे हा चौथ वसूल करत.त्याबदल्यात या राजांनी आपल्या प्रजेचे चोर-दरोडेखोरांपासून रक्षण करावे अशी अट पोर्तुगीजांनी त्यांना घातली होती.१६७० मध्ये राजा विक्रमशाहाने सोमशाहाविरुद्ध बंड पुकारले आणि पोर्तुगीजांनी दमणची चौथाई आपणास द्यावी अशी मागणी केली.पोर्तुगीजांनी नकार देताच त्याने या मुलखातील गावं लुटली.

रामनगरच्या राजाला त्याचा बंदोबस्त करता आला नाही.त्यामुळे पोर्तुगीजांनी ही चौथाई मान्य केली.पुढं सोमशाहाने पोर्तुगीजांच्या मदतीने विक्रमशाहाविरुद्ध हत्यार उपसले.त्याची अनेक गावं लुटली तरीही त्याला विक्रमशाहाचा बीमोड करता आला नाही.डिसेंबर १६७१ मध्ये कोळीराजाच्या विरुद्धच्या या लढाईत आपणाला मदत करावी अशी विनंती पोर्तुगीजांनी शिवाजीमहाराजांना केली.याच संधीची वाट पाहात असलेल्या शिवाजीमहाराजांनी मोरोपंतांच्या नेतृत्वाखाली फौजा रवाना केल्या. या फौजांनी ५ जून रोजी विक्रमशाहाचा पराभव केला.जव्हार स्वराज्यात आले शिवाय मोरोपंतांनी १७ लाखाचा खजिना ताब्यात घेतला.जव्हारची सीमा नाशिकला लागूनच होती. तिथून सुरत फक्त १०० मैल.विक्रमशाह तिथून मोगलांच्या आश्रयास पळून गेला.


मोरोपंत पुढे सोमशाहवर म्हणजे रामनगरवर चालून गेले.ते येत असल्याची खबर कळताच घाबरून गेलेला सोमशाह आपल्या बायका- मुलांसह गणदेवीपासून आठ मैलांवरच्या चिखली गावी पळून गेला.१६ जून ते १४ जुलैच्या दरम्यान रामनगर मराठ्यांच्या ताब्यात आलं.

सुरत इथून फक्त साठ मैलांवर. शिवाजीराजा असा अगदी सीमेवर येऊन धडकल्याने सुरतेत पळापळ सुरू झाली होती. तिथल्या सुभेदारानं सुरतेचे दरवाजेही बंद करून टाकले होते.



शिवाजीराजांचे वकील : १६७२ मध्ये पोर्तुगीजांशी चौथाईच्या वसुलीबाबत बोलणी करण्यासाठी शिवाजीराजांनी पाठवलेले ते वकील म्हणजे पितांबर शेणवी,जिवाजी शेणवी आणि गणेश शेठ.१६७७ मध्ये रामनगर आणि कोळी राजांचा संपूर्ण मुलूख शिवाजीराजांच्या ताब्यात आला.त्यानंतर दमणच्या सीमेवर सैन्य ठेवून दमणला लुटारूंचा उपद्रव होणार नाही याची काळजी शिवाजीराजांनी घेतली आणि त्या बदल्यातल्या चौथाईची मागणी पोर्तुगीजांकडे केली.ही मागणी रास्त असल्याचे दमणच्या नगपालिकेने ठरविले आणि त्याबाबत पोर्तुगीज विजरईसही कळविण्यात आले.१० जानेवारी १६७८ रोजी विजरईने शिवाजीराजांचा हा हक्क मान्य केला व तसे त्यांना कळविले.त्यापूर्वी १५ सप्टेंबर १६७७ रोजी त्याने वसईच्या जनरलला लिहिलेल्या पत्रात आज्ञा केली आहे की 'चौथाईची रक्कम वसूल करून ठेवावी व चौथिया राजांशी ह्या बाबतीत जसा करार केला होता तसाच करार शिवाजींशी करावा.पण शिवाजीस द्यावयाची चौथाईची रक्कम त्याने रामनगरचे संपूर्ण राज्य हस्तगत केल्यापासूनच द्यावी.त्यापूर्वी देऊ नये.' त्यानंतर हे वकील बोलणी करण्यासाठी आले होते.त्याबाबत कॅरे यांनी ही नोंद केली आहे.पण तारीख चुकली आहे.वसईचा कॅप्टन दों मानुयेल लोबु द सिल्व्हैर यांच्याकडे चौथाईसंबंधाने विचारविनिमय करण्यासाठी शिवाजीराजांनी मे १६७७ मध्ये आवजीपंत ह्याला पाठवले होते. ही चौथाई शिवाजीराजांना देण्याचे पोर्तुगीजांनी कबूल केले परंतु अनेक सबबी सांगत पोर्तुगीजांनी ही रक्कम अखेरपर्यंत दिली नाहीच.उलट सदर रकमेपैकी तेरा हजारांपेक्षा अधिक रुपये गुप्तपणे रामनगरकरास दिले.तेही शिवाजीराजांविरुद्ध लढा सुरू ठेवण्यासाठी.ह्याचा उल्लेख गोव्याच्या हंगामी गव्हर्नरच्या दि.१२ मे १६७८च्या पत्रात आढळतो.पण लिस्बन येथील आज्युदच्या ग्रंथसंग्रहालयातील एका हस्तलिखितानुसार दमण प्रांतातील चौथाईचे उत्पन्न दरसाली १२९९५ असुर्प्या असून त्यापैकी १८९८असुर्प्या वतनदारासंबंधीचा खर्च वजा जाता चौथिया राजास ९०७७ असुर्प्या राहतात,अशी ४ जून १६८३ ची नोंद आहे.ह्यावरून शिवाजीराजास पोर्तुगीजांकडून चौथाईबद्दल दरवर्षी ही रक्कम येणे होते.१६८१ च्या अखेरपर्यंत ह्या चौथाईपैकी अनामत ठेवलेली रक्कम ११७३८असुर्प्या होते अशीही नोंद आढळते.ह्यावरून १६८१ पर्यंत ही रक्कम वसूल झाली नव्हती असे दिसून येते.असरफी हा 'सेराफिन' ह्या पोर्तुगीज चांदीच्या नाण्याचा अपभ्रंश.एक रुपया म्हणजे १.४ सेराफिन तर १० रुपये म्हणजे १३ सेराफिन.