ही एक घरगुती किरकोळ शोकांतिका आहे. कार्ल आणि ॲन त्यांच्या पाच वर्षांच्या मुलीला, लेस्लीला नवे कोरे खेळणे,व्हिडिओ गेमशी कसे खेळावे हे दाखवत आहेत;
पण लेस्ली त्या खेळण्याशी खेळू लागताच तिला मदत करायला उत्सुक असलेल्या पालकांनी तिला केलेली अति मदत आड येऊ लागली.दोन्ही बाजूंनी परस्पर
विरोधी फर्माने बरसू लागली.
"अगं, उजवीकडे,उजवीकडे... थांब. थांब. थांब!" ॲन लेस्लीची आई कळकळीने सांगू लागली.बिचारी लेस्ली ओठांवर जीभ टेकवून, विस्फारलेल्या डोळ्यांनी जसजशी आईच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी धडपडू लागली तसतसा आईचा आवाज अधिकच उत्सुक आणि चिंतातुर होऊ लागला.
"बघितलंस? तू सरळ रेषेत जात नाहीयेस... डावीकडे जा! डावीकडे!" कार्लने,मुलीच्या वडिलांनी तुटकपणे हुकूम सोडला.
मध्यंतरी 'काय म्हणावं याला !' अशा आविर्भात डोळे कपाळाकडे वळवत ॲन मध्ये टपकली आणि ओरडून म्हणाली "थांब. थांब!"
लेस्ली ना आपल्या आईला खुश करून शकली ना वडिलांना.ताणामुळे तिचा चेहरा रडवेला झाला आणि डोळे पाण्याने डबडबले.
लेस्लीच्या आसवांकडे कानाडोळा करीत तिचे आई-बाबा किरकोळ कारणावरून भांडत राहिले. "ती हा दांडा इतका उंच नेत नाहीये!" आई भडकून बाबांना सांगू लागली.
लेस्लीच्या गालांवरून आसवं ओघळू लागली. तरीही दोघांपैकी एकानेही अशी काही हालचाल केली नाही की,लेस्लीला कळावे की,त्यांना तिची काळजी आहे.तिचे रडणे त्यांच्या लक्षात आले आहे.शेवटी तिनेच आपली आसवं हाताच्या पालथ्या पंजांनी पुसावीत म्हणून हात उचलताच तिच्या वडिलांनी फटकारले,"ठीक आहे,पुन्हा तुझा हात दांड्यांवर ठेव बघू... तुला काही शिकायचंच नाही.ठीक,उचल वर!" आणि तिची आई ओरडली, "हं,अगदी जरासे बाजूला घे!" परंतु आता लेस्ली हलके हलके हुंदके देत आपल्या तीव्र मनोवेदनेत बुडून गेली.
अशा क्षणी मुलं गहन धडे शिकतात.कदाचित लेस्लीने या दुःखद संभाषणाअंती असा निष्कर्ष काढला असेल की,आपले आई-बाबा,इतकेच काय इतर कोणालाही तिच्या भावनांची पर्वा नाही.जेव्हा अशा घटना बालपणी वारंवार घडतात,अगणित वेळा घडतात तेव्हा त्या अत्यंत मूलभूत असा भावनिक धडा शिकवतात जो आयुष्यभरात - कणीच विसरता येत नाही.
कौटुंबिक जीवन ही आपल्याला भावनिक अध्ययन शिकवणारी पहिली शाळा असते. या भट्टीत आपण तावून सुलाखून निघताना हे शिकत असतो की,स्वतःबद्दल कोणत्या भावना बाळगाव्यात आणि इतर आपल्या भावनांना कशा प्रतिक्रिया देतील.या भावनांबद्दल कसा विचार करावा आणि आपल्याजवळ प्रतिक्रिया करण्याचे कोणते पर्याय उपलब्ध आहेत, आपल्या आशा आणि भय कसे व्यक्त करावे आणि इतरांच्या आशा आणि भय कसे समजून घ्यावे.पालक त्यांच्या मुलांना प्रत्यक्ष काय सांगतात किंवा त्यांच्याशी कसे वागतात केवळ एवढ्याच गोष्टीतून हे भावनिक प्रशिक्षण मिळत नसते तर ते स्वतःच्या भावना हाताळताना आणि नवरा-बायको म्हणून परस्परांशी वागताना मुलांसमोर कोणता आदर्श ठेवतात यातूनही घडत असते.या बाबतीत काही पालक उपजत उत्तम भावनिक शिक्षक असतात,तर इतर मात्र या बाबतीत भयानक क्रूर असतात.पालक आपल्या मुलांना कसे वागवतात यासंदर्भात शेकडो अभ्यास केले गेले आहेत ते कठोर शिस्तपालनाचे आग्रही आहेत की, मुलांच्या भावना समजून घेण्याइतके समंजस आहेत,
त्यांच्याशी थंड तटस्थपणाने वागतात की, मायेची उब देतात,अशा अनेक गोष्टींचा मुलांच्या भावविश्वावर खोल परिणाम होत असतो जो आयुष्यभर टिकून राहतो.अगदी अलीकडेच असा स्पष्ट अहवाल प्राप्त झाला आहे की, भावनिक बुद्धिमत्ता असलेले पालक मुलांसाठी वरदानरूप असतात.एक जोडपे आपल्या बालकाशी प्रत्यक्षपणे कसे वागते,याच्या जोडीला ते त्यांच्या परस्परांच्या भावना कसे हाताळते ही बाब त्यांच्या मुलाना फार जबरदस्त धडे शिकवत असते;कारण मूलं शिकण्यात हुशार असतात आणि कुटुंबात घडणाऱ्या सूक्ष्मातिसूक्ष्म भावनिक देवाणघेवाणीशी ते एकरूप होत असतात.
वॉशिंग्टन विद्यापीठात कॅरोल हुवेन आणि जॉन गॉटमन यांच्या नेतृत्वाखाली एका संशोधन चमूने,पालक आपल्या मुलांना कसे हाताळतात, वागतात याविषयी जोडप्या परस्पर घडणाऱ्या आंतरक्रियांचे सूक्ष्म विश्लेषण केले तेव्हा त्यांना आढळून आले की,जी जोडपी वैवाहिक जीवनात भावनिकपातळीवर सक्षम होती तीच त्यांच्या मुलांच्या भावनिक चढ- उतारादरम्यान त्यांना परिणामकारक मदत करू शकत होती.
एखाद्या कुटुंबाची पहिली भेट तेव्हा घेतली गेली जेव्हा त्यांचे एखादे मूल फक्त पाच वर्षांचे होते आणि त्यानंतर ते मूल नऊ वर्षांचे झाल्यावर त्यांना पुन्हा भेट दिली गेली.
पती-पत्नी एकमेकांशी कसे बोलतात याचे निरीक्षण करण्याव्यतिरिक्त या संशोधनकर्त्यांनी या गोष्टीचेही निरीक्षण केले की,त्या कुटुंबात आई किंवा वडील त्यांच्या लहान मुलांना व्हिडिओ गेमसारखे खेळणे वापरायला कसे शिकवतात. यात लेस्लीच्या कुटुंबाचाही समावेश होता.वरवर पाहता ही बाब निरुपद्रवी वाटू शकते;परंतु पालक आणि मुलं यांच्यात कोणते भावनिक प्रवाह वाहत आहेत याचा बोध करून देणारी ही अत्यंत प्रभावशाली बाब ठरली.काही आई-वडील वरील उदाहरणातील ॲन आणि कार्लसारखी उद्दाम,घमंडी,मुलांच्या अजाणपणा
विषयी सहनशील नसलेली,रागाने भडकून उठणारी किंवा तुच्छतेने आवाज चढवणारी,तर काही त्यांच्या मुलांना 'शंखोबा, मूर्ख' म्हणून त्यांना खाली बघायला लावणारी होती.थोडक्यात लग्न संबंधाला खिळखिळे करणाऱ्या इतरांचा तिरस्कार आणि तुच्छ मानण्याच्या त्याच वृत्तीला बळी पडलेले होते.इतर काही पालक आपल्या मुलांच्या चुका शांतपणे,धीर धरून सहन करणारे,स्वतःच्या इच्छा बळजबरीने त्याच्यावर लादण्याऐवजी त्याला त्याच्यापरीने तो खेळ शिकता यावा म्हणून मदत करणारे होते.
व्हिडिओ गेम खेळायला शिकवणे ही बाब पालकांच्या भावनिकशैलीचे नेमके मोजमाप करणारे समर्थ साधन ठरले.अतिसर्वसामान्य असणाऱ्या तीन भावनिक अकार्यक्षम बालसंगोपन शैली पुढीलप्रमाणे आहेत :
• मुलांच्या भावनांकडे सपशेल दुर्लक्ष करणे असे पालक मुलांच्या भावनांना किरकोळ शुल्लक समजतात किंवा असा वैताग मानतात जो दूर होण्यासाठी त्यांना वाट पाहावी लागणार आहे.ते मुलांच्या अशा भावुक क्षणांचा उपयोग करून मनाने त्यांच्याजवळ जाऊ शकत नाहीत किंवा त्यांना भावनिकपातळीवर सक्षम होण्याचे धडेही देऊ शकत नाहीत.
अति मोकळीक देणे : मुलाला काय वाटत आहे याची असे पालक नोंद घेतात,परंतु ते असे मानतात की,आपल्या भावनिक वादळाला मूल जसे तोंड देत आहे तसे देऊ द्यावे,अगदी ते इतरांना मारत असले तरीही.मुलांच्या भावनांकडे दुर्लक्ष करणाऱ्या पालकांप्रमाणेच हे पालक
देखील त्यांच्या मुलाला,दुसरी पर्यायी भावनिक प्रतिक्रिया काय असू शकेल हे दाखवून देण्याची तसदी क्वचितच घेतात.मुलाची प्रत्येक इच्छा,भावनिक अस्वस्थता कमी करण्यासाठी त्याला काही लालूच देतील किंवा त्याने दुःखी होऊ नये वा रागावू नये म्हणून त्याच्याशी 'तू असे केलेस/केले नाहीस तर तुला अमुक देऊ" अशी सौदेबाजी करतात.
• अवमानात्मक वागणे,मुलाला काय वाटत आहे याबद्दल आस्थेवाईकपणा न दाखवणे : असे पालक खासकरून नापसंती दाखवणारे असतात,त्यांची टीका तसेच शिक्षा दोन्हीही कठोर असतात. उदा. ते फर्मान सोडतील की, मुलाने आपला राग अजिबात दिसू देता कामा नये आणि त्याने थोडीदेखील चिडचिड केली की, त्याला शिक्षा देतात.मूल आपल्या बाजूने काही खुलासा देण्याचा प्रयत्न करीत असते तेव्हा ते त्याच्यावर रागाने ओरडतात,"मला उलटून बोललास तर खबरदार,"असा दम देतात."
शेवटी पालकांचा एक प्रकार असाही आहे जे त्यांच्या मुलांच्या अशा हळव्या क्षणी त्यांच्याशी असे वागतात जसा एखादा भावनिक प्रशिक्षण देणारा किंवा गुरू वागतो.अशा प्रसंगांना मुलांना भावनिक शिक्षण देण्याची संधी समजून ते अशी एकही संधी दवडत नाहीत.ते त्यांच्या मुलांच्या भावनांचा पुरेसा गंभीरपणे विचार करून नेमके कशामुळे तो अस्वस्थ झाला आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करतात. ("टॉमीने तुला दुःखावले म्हणून तु रागावलायस का?" मुलाच्या भावनांची विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्यासाठी सकारात्मक मार्गानी त्याला मदत करतात. "त्याला मारण्याऐवजी पुन्हा तुला त्याच्यासोबत खेळावेसे वाटेपर्यंत तू एकटाच एखाद्या खेळण्याशी खेळ की!")
पण पालकांना मूलांचे असे परिणामकारक भावनिक प्रशिक्षक बनता यावे यासाठी मुळात त्यांना स्वतःला भावनिक बुद्धिमत्तेच्या मूलभूत तत्त्वांचे सखोल ज्ञान असायला हवे.मुलांना दिला जावा असा एक मूलभूत भावनिक धडा म्हणजे भावनांमधील भेद कसा ओळखावा.जो पिता स्वतःच दुःखाच्या सागरात गटांगळ्या खात आहे तो त्याच्या मुलाला हे समजावून सांगू शकणार नाही की, एखादे नुकसान झाल्यावर होणारा शोक आणि एखादा दुःखद चित्रपट पाहताना वाटणारे दुःख आणि त्या मुलाला ज्याच्याबद्दल काळजी वाटते त्याच्याबाबतीत काही वाईट घडल्यास जाणवणारे दुःख यात काय अंतर आहे.भावनांच्या या सूक्ष्म छटांव्यतिरिक्त इतर गुंतागुंतीच्या भावनांबद्दल अशीच सूक्ष्म जाण जागवावी लागते.उदा. दुखावलेल्या भावनांतून राग जन्म घेतो.मूल जसजसे वयाने वाढू लागते तसतसे विशिष्ट भावनिक धडे शिकण्याच्या त्याच्या सज्जतेत आणि ती त्याची त्यावेळची गरजही असते भावनिक त्याच्या - बदल होत जातो.आपण प्रकरण ७ मध्ये पाहिल्यानुसार जे पालक आपल्या बालकांच्या भावनांशी ताळमेळ साधतात.अशी मुले समभावाचे धडे अर्भकावस्थेतच गिरवू लागतात.जरी काही भावनिक कौशल्ये अशी असतात की,ज्यात मित्रांच्या संगतीत काही वर्षे घालवल्यानंतरच पारंगत होता येते,तरीही भावनिक पातळीवर कार्यक्षम असलेले पालक त्यांच्या मुलांनी भावनिक बुद्धिमत्तेची पुढील मूलतत्त्वे शिकावीत म्हणून बरेच काही करू शकतात- त्यांच्या भावना कशा ओळखाव्या,त्यांना कसे हाताळावे आणि कसा लगाम घालावा,समभाव बाळगणे आणि त्यांच्या नातेसंबंधात उद्भवणाऱ्या भावना हाताळणे.अशा पालकांच्या मुलांवर होणाऱ्या असाधारण परिणामांचा आवाका फार मोठा असतो.वॉशिंग्टन विद्यापीठातील चमूला आढळून आले की,आपल्या भावना हाताळू न शकणाऱ्या पालकांच्या तुलनेत जे पालक कुशलतेने आपल्या भावना हाताळू शकतात त्यांची मुलं चांगली प्रगती करतात,पालकांप्रति जास्त आपुलकी दाखवतात आणि त्यांच्या पालकांसाठी अधिक ताण निर्माण करीत नाहीत; पण याहीपलीकडे जाऊन ही मुलं स्वतःच्या भावनांना चांगल्याप्रकारे हाताळू शकतात. (इमोशनल इंटेलिजन्स,भावनिक बुध्दिमत्ता,
डॅनिअल गोलमन,अनुवाद-प्रा.पुष्पा ठक्कर,साकेत प्रकाशन.) अस्वस्थ झाल्यावर स्वतःला शांत करण्यात यशस्वी होतात आणि कमी प्रमाणात अस्वस्थ होतात.अशी मुलं शारीरिक पातळीवरदेखील अधिक शिथिल,शांत असतात,त्यांच्या रक्तात ताण निर्माण करणारे स्त्राव कमी पातळीवर असतात.शिवाय भावनिक उद्दीपन सुचवणारी इतर शारीरिक चिन्हेदेखील कमी असतात. आपण प्रकरण ११ मध्ये पाहिलेच आहे की, अशी स्थिती आयुष्यात पुढेही टिकून राहिली तर चांगल्या शारीरिक आरोग्याच्यादृष्टीने तो शुभसंकेत असतो.इतर काही सामाजिक लाभही आहेत.त्यांच्या सोबत्यांना ते जास्त आवडतात,त्यांच्यात लोकप्रिय असतात,शिक्षक त्यांच्याकडे अधिक कुशल मुलं या दृष्टिकोनातून पाहतात.पालक तसेच शिक्षकांच्यादृष्टीने अशा मुलांमध्ये उद्धटपणा किंवा आक्रमकपणा सारख्या वर्तनविषयक समस्या फारशा नसतात.शेवटी,काही बोधात्मक फायदेही आहेत-अशी मुलं चांगल्याप्रकारे लक्ष देऊ शकतात.त्यामुळे साहजिकच ते चांगले शिकणारे असतात.त्यांचा बुद्धिगुणांक स्थिर असूनही ज्या पाच वर्षीय मुलांचे पालक चांगले भावनिक प्रशिक्षक होते,
ती मुलं तिसरीत पोहोचेपर्यंत गणित आणि वाचनात उच्चगुणांक मिळवू लागली.शालेय अध्ययनात तसेच एकंदर आयुष्यात उपयोग व्हावा म्हणून मुलांना भावनिक कौशल्ये शिकवणे किती महत्त्वाचे आहे हे स्पष्ट करण्यासाठी हा एकच बळकट मुद्दा पुरेसा आहे. तर अशारीतीने ज्या मुलांचे पालक भावनिकदृष्ट्या कुशल असतात त्यांच्या मुलांना मिळणारे विशेष,आकस्मिक फायदे आश्चर्यजनक आहेत, अगदी थक्क करणारे आहेत त्यांची व्याप्ती भावनिक बुद्धिमत्तेच्या व्याप्तीपलीकडे आहे.