* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१८/९/२२

पाऊस एक चिंतन ..!

मनुष्याला फक्त स्वतःचा किनारा माहीत होता आणि त्याला समुद्र पार करण्याची नव्हती गरज..!


भूक लागलेली नसताना केवळ जिभेचे चोचले पुरवण्यासाठी अन्नग्रहण करून आनंद मिळवलेला नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडायची नाही. यासाठी माणसे अन्नांच्या खमंग चवीला जबाबदार धरतात. पण माझ्या बाबतीत म्हणाल तर,पदार्थाच्या चवीने मला त्या पदार्थाची अनुभूती घेता येते त्यासाठी मी चवीचा अत्यंत ऋणी आहे. चव भुकेसाठी प्रेरणादायी आहे आणि भुकेने मला प्रेरणा मिळते. माझ्या बुद्धिमत्तेच्या वाढीमध्ये व प्रतिभा स्फुरण्यामागे जंगलातील डोंगरांमध्ये वेचून खाल्लेल्या बेरींचाही वाटा आहे हे सांगण्यास मला बिलकुल कमीपणा वाटत नाही. आपला अंतरात्मा त्याचा स्वतःचा गुलाम नाही त्यामुळे होते काय, आपण बघतो पण आपल्याला खऱ्या अर्थाने दिसत नाही. आपण ऐकतो पण आपल्याला ऐकू येत नाही. आपण खातो पण आपण त्याचा आनंद घेत नाही. जो माणूस चवीने खातो तो खादाडखाऊ होऊच शकत नाही आणि जो अन्नाचे सेवन चवीने करीत नाही तो खादाडखाऊ शिवाय दुसरा काही होत नाही. मॅथ्यू यांच्या वाचनामध्ये थोडासा बदल करून सांगितलं गेलं आहे. की तुम्ही ग्रहण करीत असलेल्या अन्नाने तुम्हाला कधीच अपचन होत नाही.तुम्ही ते किती भूक असताना खाता यावर ते अवलंबून असते. किती अन्न खाता आणि कुठल्या प्रतीचे खाता यावर काही अवलंबून नाही. ते तुम्ही किती श्रध्देने, आनंदाने खाता यावर त्याचे पचन- अपचन अवलंबून आहे. थोडक्यात काय,अन्न हे पूर्णब्रह्म आहे यावर तुमची श्रद्धा हवी. 


पृथ्वी म्हणजे काही इतिहासाचा एक उडालेला टवका नाही ना दगड मातीचे एकमेकांवर रचलेले थर, जशी पुस्तकांची पाने एकमेकांवर रचलेली असतात. शास्त्रज्ञ आणि साहित्यिक या टवक्याचा आणि पानांचा अभ्यास करतीलही पण पृथ्वी म्हणजे एक जिवंत काव्य वृक्षांच्या पानांसारखे जी फळाफुलांच्या आधीच फांद्यांवर फुटतात. पृथ्वी म्हणजे काही जिवाष्म नव्हे. पृथ्वी सजीव आहे;किंबहुना पृथ्वीचे आयुष्य पाहता मला तर वाटते त्यावरील सर्व जीवसृष्टी ही एक बांडगुळच आहे.अशा या पृथ्वीला वेदना दिल्या तर तिच्या एका हुंदक्या सरशी तिच्यात गाडली गेलेली मढी एका झटक्यात बाहेर पडतील. तुम्ही धातूच्या सुंदर मूर्ती ओताल,मला त्याही आवडतात पण या वाहणाऱ्या वाळूत जे मला आकार व कला पाहायला मिळतात तेच मला भावतात व ते पाहून मी अगदी खूश होऊन जातो.नुसते आकारच नाही तर तो निसर्ग ही कुंभाराच्या हातातील माती प्रमाणे त्याला पाहिजे तो आकार देऊ शकतो, किंवा घेऊ शकतो त्याची मला जास्त मजा वाटते.


हेन्री डेव्हिड थोरो निसर्ग म्हणूनच जगलेला माणूस 

('वॉल्डन' जयंत कुलकर्णी यांच्या पुस्तकातील) थोरोने मनस्वीपणे जगलेले हे जीवन वर्णन..


पाऊस व मानवी जीवनातील स्थित्यंतर


सुमारे साडेसात कोटी वर्षांपूर्वी एकपेशीय सजीव (पहिला जीव पाण्यात जन्माला आला.) या सजीवांनी जीवन जगत असताना केलेल्या संघर्षातून अनुभव घेऊन आपला चतुरपणा गाठला, तेव्हा प्रथम वनस्पती आणि प्राण्यांसारखे बहुपेशीय सजीव अस्तित्वात आले‌.हे सुरुवातीचे बहुपेशीय सजीव म्हणजे एकपेशीय सजीवांचे, एकमेकांशी सैलसरपणे जोडलेले मोठे समूहच होते.सुरुवातीचे असे हे समूह केवळ शेकडो किंवा हजारो पेशींचे, तुलनेने लहानच असे समूह होते. मात्र सातत्याने असे एकमेकांशी जोडून राहण्याचे उत्क्रांतीच्या दृष्टीने होणारे फायदे या चतुर पेशींना काही काळातच समजले आणि या ज्ञानाचा उपयोग करत,या पेशींना,लक्षावधी,कोट्यावधी आणि अगदी अब्जावधींचे समूह करत, एकमेकांची सामंजस्यपूर्ण व्यवहार करणाऱ्या पेशींच्या संस्था उभारल्या. एका पेशीचा आकार अतिसूक्ष्म,मानवी डोळ्यांना न दिसणारा असला, तरी पेशींनी चतुरपणे जमवलेल्या या समूहांचा आकार डोळ्यांना न दिसणार्‍या एखाद्या ठिपक्यापासून ते एखाद्या मोठ्या कातळाएवढा असू शकतो.मानवी डोळ्यांना या सुस्थापित पेशीसमूहांचे जसे आकलन होते, त्यानुसार जीवशास्त्रज्ञांनी त्यांचे वर्गीकरण केले‌ जसे की,हा उंदीर,तो ससा,तो हत्ती.मानवी डोळ्यांना ससा,हा 'एक' सजीव म्हणून दिसत असला,तरी तो प्रत्यक्षात, अत्यंत सुसंगत आणि कार्यक्षम रीतीने एकमेकांशी जोडल्या गेलेल्या अब्जावधी पेशींचा समूहच असतो.अशा उत्क्रांतीची उपयुक्त माहीती 'जादूई वास्तव' रिचर्ड डॉकिन्स,अनुवाद - शंतनु अभ्यंकर या पुस्तकात वाचण्यास मिळते.


मृगाआधी पाऊस पडतो रोहिणीचा, भावाआधी पाळणा हाले पाठच्या बहिणीचा..."


अशी एक म्हण आहे ते आपल्या पूर्वजांनी अनुभवानी, प्रत्यक्ष निरीक्षणातून निर्माण केलेली आहे.


पाऊस सर्व जिवांना जीवंत ठेवणारा अविभाज्य घटक, निसर्गाचे संवर्धन,जिवांना जीवाची माणसांना माणसाची ओळख करून देणारा..!


कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील टोप गावातील मी रहिवासी लहानपणापासून पाऊस बघत आलेलो, त्यात भिजत आलेलो. जगण्यासाठीच्या मूलभूत गरजा आहेत. त्या गरजेतील महत्त्वाची गरज हा पाऊस पूर्ण करतो. साधारणतः १९८० ते १९९० च्या दशकात त्यावेळी मी लहान होतो. काही वयोवृद्ध लोकांच्याकडून पावसात बद्दल ऐकत होतो. पाऊस साधारणता त्यावेळी वेळच्यावेळी व नक्षत्राच्या अनुषंगाने पडत होता. मुबलक प्रमाणात पिके यायची लोकांच्या चेहऱ्यावरती व जीवनात आनंद ओसंडून वाहत होता. 


 वयोवृद्ध माणसं सांगत होती.त्याकाळी दहा-बारा दिवस सलग अहोरात्र पाऊस पडायचा. बाहेर जाताच येत नसायचं. मग आम्ही घरात बसून शेतीच्या मशागतीच्या अनुषंगाने लागणाऱ्या अवजारांची निर्मिती व डागडुजी करीत असायचो. पाऊस 'मी' म्हणायचा या पडणाऱ्या पावसामुळे घरातील सर्वच सदस्य शेती हा मुख्य जीवन जगण्याचा स्तोत्र असल्याकारणाने पावसाळ्यामध्ये शेतामध्ये काहीच काम नसायचं. मग आम्ही घरातील सर्वजण एकत्र बसून चर्चा विनिमय करायचो. या विषयांमध्ये आजारपण,सामाजिक,आर्थिक, शिक्षण, अध्यात्म, नीतिमत्ता, माणसाशी माणसासारखं वागण्याची मूल्य यावरती सुसंवाद व्हायचा.पाऊस कमी झाल्यानंतर शेतीची मशागत करण्याच्या अनुषंगाने काय करता येईल. हा विषय ही प्रामुख्याने असायचा.


पावसासंदर्भात निसर्गाकडून काही संदेश मिळायचे जसे की,कावळ्याने मे महिन्याच्या काळात बाभुळ, सावर अशा काटेरी झाडांवर घरटे केले तर पाऊस कमी पडतो आणि आंबा, करंज या वृक्षांवर केले तर त्या वर्षी पाऊस चांगला येतो, हा जंगलातला अनुभव आहे. कावळ्याने झाडाच्या पूर्व दिशेने घरटे केले तर पाऊस चांगला पडणार. पश्चिमेला केले तर पाऊस सरासरीएवढा पडणार. दक्षिण-उत्तरेला केले तर पाऊस अत्यंत कमी पडणार.आणि झाडाच्या शिखरावर केले तर अवर्षणपर्वाची ती नांदी होय. सहसा कावळा झाडाच्या शिखरावर घरटे करीत नाही.आणि केले तर ती अत्यंत दुर्मीळ घटना असते. यातून दुष्काळाचे अगदी डोळस संकेत मिळू शकतात.


यापेक्षाही मनोरंजक बाब म्हणजे कावळिणीने अंडी किती घातली,यावरूनही जुन्या काळात पावसाचा अंदाज बांधला जात असे. तिने सुमारे चार अंडी दिली तर पाऊस चांगला पडतो. दोन अंडी दिली तर कमी पाऊस. एकच अंडे दिले तर अतिशय कमी. आणि जमिनीवर अंडी दिली तर अभूतपूर्व दुष्काळाचे आगमन ठरलेले.मारुती चितमपल्ली यांच्या पुस्तकातील नोंदी सत्य असल्याची ग्वाही द्यायचे.


मी त्या वेळेला सातवीला शाळेला होतो. त्यावेळच्या पावसामध्ये सर्व ओढे,वेगळी तुडुंब भरून वाहत असायचीत. मग मी व माझ्यासारखी काही उनाड पोरं वेताळमाळाच्या पलिकडे 'घोलामध्ये' फिरण्यासाठी,उनाडक्या करण्यासाठी जात असू. पावसात भिजल्यानंतर कपडे बदलणे वगैरे काही प्रकार नसायचेत. पाऊस असल्यामुळे ते उन्हात वाळवण्याचा प्रश्नच नव्हता.आम्ही कधी कधी सहजच झाडावर चढायचो.ही झाडे कुणाच्यातरी मालकीची असायचीच.झाडावर मजा म्हणून चढण्यासाठी परवानगी आम्ही घेतच नव्हतो‌. ती कधी मिळालीच नसती. मग आम्ही ते झाड आमच्या मालकीचे समजून झाडावरती चढून दंगा करायचो. मग हे सर्व करत असताना. मग आमचा दंगा ऐकून झाडाच्या मालकांकडून शिव्या सोबत मार ही मिळायचा. पण लहान असल्यामुळे मन निकोप निर्मळ होते. त्यामुळे राग व अपमान असा कधी आम्हाला वाटलाच नाही. कदाचित त्यावेळेला पावसात भिजून मिळालेले ते ज्ञान असाव. शाळेत असताना पावसामध्ये वनभोजनाचा कार्यक्रम आनंदाने साजरा केला जायचा. अभ्यास नाही, पाठांतर नाही, शिक्षकांचा मार नाही.फक्त निसर्गाच्या सोबत मनमोकळं जीवन जगणं, निसर्ग समजून घेणं हाच त्यामागचा हेतु असायचा.


पावसात भिजण बंद झालं हळूहळू पाऊसही कमी झाला. आणि मनातील निकोप, निर्मळ, संवेदनशील प्रेमळ भावनिक जागा स्पर्धेने,इर्षेने घेतली.


मग काही वर्षांनी फक्त नुसताच मोठा झालो. कारण वडीलधारी सांगतील तेच ऐकावं लागायचं. पावसात भिजून खेळले जाणारे सर्व खेळ बंद झाले. त्याचं कारण विचारलं असता घरात एकच सांगण्यात आलं. तू आता घोडा झाला आहेस. बारक्या पोरांसारखे काय खेळतोयस? आमच्या जीवनातून जसा पाऊस कमी झाला. आमचं निर्मळ भिजणं कमी झालं. तसंच मोकळ व मुक्त जगणंही संपलं.


बौद्धिक परीक्षा देण्यासाठी अभ्यासक्रमातील पुस्तके व शाळा यांच्याशी जोडला गेलो. निसर्ग नियमानुसार वाढ व विकास होत होता. पण अजूनही जाणीवेतून जगणं जमत नव्हतं. किंवा तसा कधी विचार केला नव्हता. मग ती बौद्धिक परीक्षा देण्यासाठी असणारी पुस्तके व शाळा सोडली. जशी प्रत्येकाला कधी ना कधी शाळा सोडावी लागते.'मी शाळा सोडून फार वर्षे झालेली आहेत. पण शाळेने अजूनही मला सोडलेले नाही. कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आम्ही जोडलेले आहोतच'.मग घरची जबाबदारी आली. पाऊस पडतच होता. पावसाळ्यामध्ये जवळपास घर पावसाने गळते.आमचे घर जरा जास्तच गळत होते. त्यामुळे मला फार दुःख व्हायचे. पाऊस पडायला नको असं वाटायचं. असा वरवरचा विचार करत मी तरुण झालो.


असं म्हणतात घराशिवाय खिडकी नाही. आणि पुस्तकाशिवाय प्रकाश नाही. आणि पुस्तक माझ्या आयुष्यात आले.


जुनी पुस्तके!

जुनी पुस्तके,

उनाड स्वतंत्र पुस्तके,

विस्थापित पुस्तके!

पक्षांच्या थव्यासारखी माझ्या दारी अवतरली.

रंगबिरंगी पिसे असलेली विविध पुस्तके!

त्यांचे प्रकार वेगळे नावे वेगळी!

ग्रंथालयातील शिष्ठ आणि माणसाळलेल्या

पुस्तकात यांची मजा नाही.

या अचानक गवसलेल्या पुस्तकांमध्ये

एखादा जिवापाडाचा मित्र मिळून जातो

आयुष्यभर सोबत करण्यासाठी.

- व्हर्जिनिया वुल्फ

(जसे मला वॉल्डन मिळाले!) 

- जयंत कुलकर्णी.


आणि मी न थांबता अविरतपणे वाचत राहिलो. आणि पुस्तक वाचत असताना. एका ठिकाणी पुस्तकांने मला थांबवले.'चाकोरी व थडगं यातील फरक फक्त काही फुटांचा असतो.असे थोरो यांनी म्हटलेले वाक्य वाचले आणि मी अचंबित झालो. आणि एका क्षणी खलील जिब्रानला झालेली जाणीव मलाही जाणवू लागली.'झाडाचं एक जरी पान सुकून पिवळं झालं तरी त्यामागे समग्र वृक्षाचं मौन जाणतेपण उभं असतं.' (द प्रॉफेट) आणि मी संपुर्ण हादरलो. दररोज सूर्य उगवतो व मावळतो. त्यामध्ये नावीन्य असं काही नसतं. पण सूर्य उगवताना व मावळताना हेन्री डेव्हिड थोरो तिथे नेहमीच थांबायचेत. मग मी ही पुस्तकांच्या सोबत निसर्गाला समजून घेऊ लागलो.आता मी तरुण झालो.


''तुम्ही एकाच नदीत पुन्हा पुन्हा पाऊल टाकू शकत नाहीत;तुम्ही एकदा पाऊल टाकलं की पुन्हा पाऊल टाकेपर्यंत तिचं स्वरूप बदललेलं असतं.'' - हेरॅक्लिटस' मी वयाने अनुभवाने मोठा होत होतो. दरवर्षी पाऊस येतच होता. पण आता पावसाची मला भीती वाटत नव्हती. मी दुःखी होत नव्हतो. निसर्गाचेही न बदलणारे नियम असतात. हे मी आतापर्यंत स्वीकारलं होतं.जो पाऊस मला लहानपणी माझ्यासारखाचं उनाड व लहान वाटायचा. तोच पाऊस मला आता तरुण जबाबदार वाटत होता. पावसात भिजल्यानंतर खूप मनापासून आनंद व्हायचा. पाऊस पडत असताना जमिनीवर, झाडावर होणारा आवाज मनाला एक प्रकारची शांतता देऊन जायचा. पाऊस निसर्ग, झाडांशी, पाना फुलांशी, सर्व सजीव निर्जीव सर्वांशीच सुसंवाद साधायचा. एक मनस्वी व आनंदी जीवन जगण्याचा मार्ग पावसाने दाखवला होता.आपण आपलं काम अविरतपणे करत राहायचं.हे आता मनापासून पटलं होतं.

माणूस जगत असताना त्याच्या होणार्‍या अवस्था पावसाची मैत्री केली की समजतात.


"माणसाच्या तहानेला जी चव असते. तीच चव पाण्याला असते." लहानपणापासून मी पाण्याला बघत आहे. पाणी बदललेलं नाही मीच बदललेलो आहे.


आपण श्वास घेण्यासाठी जी हवा घेतो त्यासाठी विश्वामध्ये ज्या प्रचंड हालचाली घडून येतात ते कळल्यावर श्वास घेणे हा शब्दशः श्वास रोखून धरणारा अनुभव ठरतो. जादू या पुस्तकातील अनुभवावर आधारित एक वाक्य..! 


मी आता आयुष्याच्या मध्यावर आलेलो आहे. या जीवनाने निसर्गाने मोकळ्या हाताने दिले आहे. हे सर्व समजून घेण्यासाठी वाचना बरोबर चिंतन मनन ही आवश्यक आहे.कारण "कोणीही तुमच्या मेंदूत सत्य ओतणार नाही. हे तुम्हाला स्वतःसाठी शोधायचे आहे."

असं नोम चोम्स्की याने सांगितले आहे.


गर्दीच्या रस्त्यावर चालताना पादचाऱ्यांना एकमेकाचे धक्के लागतात, पण त्याहीपेक्षा दाटीने उडताना पक्षी कधी एकमेकांवर आदळताना दिसत नाहीत. कारण गर्दीत असूनही प्रत्येकाने आपले वैयक्तिक क्षेत्र जपलेले असते. त्या क्षेत्रात दुसरा पक्षी घुसखोरी करत नाही. कळपात उडत असताना प्रत्येकाला आपल्या पुढच्या, मागच्या, बाजूच्या पक्षाचे नैसर्गिक भान असते. त्यामुळे कळपाने वेग वाढवला वा कमी केला तरी प्रत्येक जण त्यांच्याशी जुळवून घेतो, त्यामुळे तो कळप एकसंध उडतो हे जाणवते. आपल्या पुढच्या व आजूबाजूच्या पक्षातील गतिबदल अल्पांशात शेजाऱ्याला कळतो. त्यामुळेच मोठ्या कळपातील उडतानाची लहर १५ मिलीसेकंदापेक्षा कमी वेळा हाललेली दिसते. पक्षिगाथा या पुस्तकाने मला वैयक्तिक क्षेत्र जपायला सांगितले व मी तसा प्रयत्न करत आहे.


कुठलाही पक्षी आपला स्वभाव कधीच बदलत नाही. निसर्गाने घालून दिलेल्या नियमावर तो आयुष्यभर चालत असतो. आपल्याला ही माणूस म्हणून निसर्गाचे नियम पाळावेत लागतील. निसर्ग आपल्याला जपतो. आपणही निसर्गाला जपलं पाहिजे.


गेली दोन-तीन वर्षे पाऊस महापुराचे दर्शन घडवत आहे. हवामान खात्याचा अंदाज रक्तदाब वाढवत आहे. जीवाची घालमेल होत आहे. हे सत्य आहे. पण सर्व जीव जगण्यासाठी पाऊस अविरतपणे पडत आहे. व मानवी संवेदनशील भावना जपत आहे. पाऊस हा पडत असताना आपण आनंदी जीवन कसं जगावं ह्याबद्दल सांगत आहे. मी ते कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न करत आहे.


आता पाऊस पडतो. महापूर येतो नदीच्या पात्रातील पात्राबाहेर आलेले पाणी पाहून आपल्याला जगवणाऱ्या पाण्याचे हे रौद्ररूप बघून मनाला भीती वाटते. पूर्वीच्या नक्षत्राप्रमाणे 'हमखास' लागणारा पाऊस लागत नाही. मग विचार केला.पुर्वी कावळ्याने मे महिन्याच्या काळात बाभुळ, सावर अशा काटेरी झाडांवर घरटे केले तर पाऊस कमी पडतो आणि आंबा, करंज या वृक्षांवर केले तर त्या वर्षी पाऊस चांगला येतो. पण आता पूर्वीसारखी झाडचं राहील नाहीत तर कावळा आपली घरटी कुठून बांधणार..!

 

पूर्वी पडणाऱ्या पावसावर शेती उत्तम प्रमाणात माणसाला जगवत होती. सध्या माणूस धोक्यात आहे. कारखान्यामध्ये वापरणारे पाणी हे वापरून झाल्यानंतर सांडपाण्याच्या रूपात बाहेर पडते. पण या सांडपाण्यामुळे इतर जीव नामशेष होत आहेत. "सांडपाणी पिल्यामुळे बिचार्‍या मधमाशांना आपलं झाडावरील घर सापडत नाही.कारण मेंदू मधील 'लक्षात' ठेवण्याच्या ठिकाणावर हे सांडपाणी काम करत व ते घर त्यांच्या लक्षात राहत नाही."


अलीकडे पाऊस पडून महापुर मोठ्या प्रमाणात येत आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूसोबत,पाळीव प्राण्यांचे मृत्यू, जन्मभर काबाडकष्ट करून उभा केलेल्या अनेक स्वप्नातील घरांमध्ये पाणी जात आहे. लहानपणी पाऊस लागत होता. इतक्या प्रमाणात महापूर येत नव्हता. म्हणजेच कोणत्याही नदीचे पाणी पात्राबाहेर येत नव्हते. पण अलीकडे नदीच पाण्याखाली जात आहे. याचे बारकाईने निरीक्षण केले. काही जुन्या जाणत्या लोकांना विचारलं तर यातून एकच निष्कर्ष निघतो. स्वतःच्या स्वार्थासाठी आपण केलेला हस्तक्षेप, वाळू उपसा केल्यामुळे नदीचे पात्र वाढलं. त्या नदीच्या जवळच आपण घर बांधलीत. आपण नदीतच राहायला गेल्यामुळे नदीच सहज आपल्या घरात राहायला येते.


आपला एक स्वभाव आहे पाणी नदीत चांगलं दिसते. कधी कधी ते नदीच्या थोडं बाहेर आले तरी चालते. त्या ठिकाणी आपण पिकनिकला जाऊ शकतो. कधी कधी आपण सहज म्हणून पावसात भिजायला जातो धबधब्याखाली त्यावेळी आपण मजा करायला गेललो असतो. पण हेच पाणी जेव्हा नदी सोडून आपल्या घरात येतं. त्यावेळेला आपल्याला ते पाणी व तो पाऊस नको असतो. पाऊस सगळ्यांनाच हवा आहे. पण तो माणसानी सांगेल तेव्हा व तेव्हडाच ...


या जमीनीवर जे पाणी आहे त्यापैकी ३ टक्केच पाणी पिण्यायोग्य आहे.१ टक्के जमीनीत २ टक्के जमीनीवर नदी,विहीर या स्वरुपात यातीलही थोडं पाणी गढुळ आहे. 


पाऊस कमी जास्त पडण्यामागे नैसर्गिक कारण आहे.का मानवी कारण आहे. याचा आपण गंभीरपणे विचार केला पाहिजे.ग्लोबल वार्मिंग हे तर आपल्याकडेच बोट दाखवते. झाडे लावा झाडे जगवा असा सुंदर सुविचार लिहिलेल्या. ट्रकामध्येच झाडे तोडून लाकडे भरलेली असतात. हा जो वागण्यातील व बोलण्यातील विरोधाभास आहे. तो एक दिवस आपला कपाळ मोक्ष करणार !


झाड लावली पाहिजेत झाड व जगवली पाहिजेत.पुर्वीची जी आहेत ती झाडे तोडली नसली पाहिजेत.


अलीकडेच एक गवा आमच्या गावाच्या आसपास फिरत होता. तो एक दिवस आमच्या गावांमध्ये आला होता. माणसं भिऊन गप गुमान घरात बसलेली आहेत. त्याच्या नावानं बोटं मोडत आहेत.पण तो आपला कुटुंबापासून कळपापासून बाजूला झाल्यामुळे निराश व बिथरलेला आहे. केव्हातरी रात्री त्याला जंगलाच्या दिशेने त्याच्या आधिवासात सोडण्याचे प्रयत्न वनविभाग,रेस्क्यू टिम व पोलीस मिळून करत होते. तो आज ना उद्या आपल्या कुटुंबात परत जाईल. आपण पुन्हा मोकळा श्वास घेऊ. पण माणसांनी जंगल तोडून जंगलात घर बांधली. तर जंगलातले प्राणी जाणार कुठे?


काही गोची व्हायची असेल तर ती होतेच' हा मर्फीचा मजेशीर नियम जगप्रसिद्ध आहे."लोणी लावून टाकलेला ब्रेडचा स्लाईस नेमका लोण्याच्या बाजूलाच जमिनीवर पडतो", हाही मर्फी चा आणखी एक नियम


 शेवटी जादूई वास्तव या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे निसर्गात भलंबुरं जे जे घडतं तेते साधारण समप्रमाणात घडत या विश्वाला ना मन आहे, ना जाणीव,ना व्यक्तिमत्व.त्यामुळे तुम्हाला व्यक्तीश: खुश करायला गोष्टी घडत नसतात. त्या आपल्या ओघाने घडत असतात, त्यात काही वेळा त्या सुखकारक तर काही वेळा दुःखकारक असतात एवढंच. आपल्याला त्या चांगल्या-वाईट कशाही वाटोत, आपल्या वाटण्यामुळे घटितांची वारंवारता बदलत नाही. हे पचणं खूप कठीण आहे.पाप्यांच्या पदरी वेदना आणि पुण्यवानांना सुखाचं वरदान ची कल्पना गोंजारायला खूप खूप सोयीची आहे. पण दुर्दैवाने या विश्वाला तुमच्या सोयीशी काही सोयरसुतक नाही. 


तुम्ही संध्याकाळी तुमच्या बागेत बसता आणि सूर्यास्त पाहता. त्यावेळी तुम्हाला आकाश रंगीबेरंगी दिसतं आणि ते तुम्हाला आवडतं. आता हे रंग कशामुळे उद्भवतात, तर हवेच्या प्रदूषणामुळे, जितकी हवा प्रदूषित तितके सूर्यास्ताच्या वेळी जास्त रंग दिसतात. मानवाने आपले उद्योग असेच सुरू ठेवले तर आपली पृथ्वी आपल्याला याहूनही जास्त रंगाची उधळण असलेले सूर्यास्त दाखवेल,हे नक्की.


 'द बायोलॉजी ऑफ बिलीफ' हे पुस्तक वाचत असताना वरील सत्य वास्तव डोळ्यासमोर उभे राहिले.


 इतरांची पावले सूर्यास्ताला घराकडे वळतात पण माझी डोंगर माथ्याकडे सूर्यास्त पाहण्यासाठी वळतात. गावातील गडबड गोंधळात मी पार मागे पडलोय,पण मला सूर्यास्त दिसतो आणि माझ्या शांत-निवांत आयुष्यासाठी तो रेंगाळू शकतो हेच माझ्यासाठी खूप आहे.


निसर्गात जीवांची संख्या इतकी प्रचंड व अद्भुत आहे की या भुकेच्या यज्ञात अनेक जीवांची आहुती देण्यास त्याला सहज परवडते. एक जीव दुसऱ्या जीवाचे भक्ष असतो आणि तो अजून कुठल्यातरी..! पण या पृथ्वीतलावर जे अपघात व युद्ध होतात त्याच्या तुलनेत याचे महत्व अल्प ( किंवा जास्त ) असावे. सुज्ञ माणुस या सगळ्याला निसर्गाचा निरागसपणा समजतो. औषधांमध्ये विषांचाही काही उपयोग असतो आणि सर्व जखमांमुळे मृत्यू ओढवत नाही हेही समजून घेतले पाहिजे. अनुकंपेचा पाया बऱ्याच वेळा अस्थिर असतो त्यामुळे त्यावर अवलंबून किती निर्णय घ्यायचे याचा निर्णय एखाद्याला घ्यावा लागतो. 


प्रयत्न केले तर आपण आपल्या स्वतः कडेच एका त्रयस्थ पण निरोगी नजरेने पाहू शकतो.थोडेसे अजून प्रयत्न केले तर आपले कर्म आणि त्यापासून मिळणारे फळ या दोन्ही पासून आपण अलिप्त राहू शकतो. तसेच झाले की चांगले आणि वाईट या दोन्ही गोष्टी आपण निर्विकारपणे पाहू शकतो. आपण निसर्गाशी पूर्ण एकरूप होत नाही. नाहीतर मी खाली ओढ्यात वाहणारी एखादी काटकी असलो काय किंवा वरून त्या काटकीकडे पाहणारा, पाऊस पाडणारा इंद्र असलो काय, काहीच फरक पडत नाही. 


निसर्ग हा एक शिक्षित आणि नि:पक्षपाती शिक्षक आहे, असा शिक्षक जो मूलभूत विचार देतो आणि कुठल्याच मताची री ओढत नाही; निसर्ग ना जहालवादी आहे ना पुराणमतवादी. चंद्रप्रकाश सुसंस्कृत असतो आणि त्यावेळी जंगलीही असतो.


हेन्री डेव्हिड थोरोचे हे विचार,विचार करायला लावणारे व मानवी संवेदना जागे करणारे आहेत.


"ज्या झाडाच्या सावलीत बसण्याचा आपला विचार नसेल.अशी झाड आपण लावली पाहिजेत." 'संन्यासारखा विचार करा' म्हणून सांगणारे हे

पुस्तकातील जीवनतत्त्व बरचं काही सांगून जातं.


पावसाला समजून घेणे म्हणजे स्वतःला स्वतः समजून घेणं.मानवी जीवन जगत असताना जीवनामध्ये होणारे चढ - उतार,क्लेश, दुःख, नैराश्य, त्याचबरोबर आनंद,सौख्य, समाधान या मानवी भावभावना आहेत. या सर्व भावना पावसाशी जोडलेल्या आहेत. कारण पावसानं आपलं संपूर्ण जीवन भरून टाकलेलं आहे.


आत्ताच तुम्ही श्वास घेतलात त्यातला नायट्रोजनचा अणू कधीतरी एका छोट्या डायनोसोरने नाकावाटे सोडला होता.' द गॉड डिल्यूजन रिचर्ड डॉकिन्स' या पुस्तकातील वैज्ञानिकता सिध्द करणार हे वाक्य हेच सांगत आहे.कि पहिला पडलेला पाऊस ही आपली ओळख आहे.व ही ओळख पाऊस चिरंतन आपल्या सोबत बाळगत राहील. आपलं आणि पावसाचं हे जीवाभावाच नातं फार पुरातन आहे


"इतिहास शोधायला निघालो की इतिहास जवळच सापडतो.आपला इतिहास हा 'पाऊसच' आहे."


"जलसंवाद मासिक सप्टेंबर २०२२ मध्ये प्रकाशित झालेला लेख सर्व संपादकीय मंडळाचे आभार व धन्यवाद..!

१६/९/२२

भावस्पर्शी मनाला चटका लावणारी गोष्ट..!

" मला तुमचा चेहरा लक्षात ठेवायचा आहे जेणेकरुन मी जेंव्हा तुम्हाला स्वर्गात भेटेन तेव्हा तुम्हाला ओळखू शकेन आणि पुन्हा एकदा आभार मानू शकेन."


जेंव्हा नायजेरियन अब्जाधीश फेमी ओटेडोला यांना टेलिफोन मुलाखतीत रेडिओ प्रेजेंटरने विचारले, "सर तुम्हाला कोणत्या गोष्टीने जीवनातील सर्वात आनंदी माणूस बनवले आहे?"


फेमी म्हणाले:


 "मी आयुष्यातील आनंदाच्या चार टप्प्यांतून गेलो आणि शेवटी मला खऱ्या आनंदाचा अर्थ समजला."


पहिला टप्पा संपत्ती आणि साधन जमा करण्याचा होता. पण या टप्प्यावर मला हवा तसा आनंद मिळाला नाही.


मग मौल्यवान वस्तू गोळा करण्याचा दुसरा टप्पा आला. पण या गोष्टीचा परिणामही तात्पुरता असतो आणि मौल्यवान वस्तूंची चमक फार काळ टिकत नाही हे माझ्या लक्षात आले.


त्यानंतर मोठा व्यवसाय मिळविण्याचा तिसरा टप्पा आला.तेव्हा मी नायजेरिया आणि आफ्रिकेत ९५ टक्के डिझेल पुरवठा करत होतो.मी आफ्रिका आणि आशियातील सर्वात मोठा जहाज मालक होतो.पण इथेही मला कल्पनेतला आनंद मिळाला नाही.


चौथा टप्पा तेंव्हा आला जेंव्हा माझ्या एका मित्राने मला २०० अपंग मुलांसाठी व्हीलचेअर घेऊन देण्याची विनंती केली.


मित्राच्या विनंतीवरून मी लगेच व्हीलचेअर विकत घेतल्या.


पण मित्राने आग्रह धरला की मी त्याच्यासोबत जाऊन स्वतः व्हीलचेअर मुलांच्या हाती द्यावी. म्हणून मी मित्रा सोबत गेलो.


तिथे मी स्वतःच्या हाताने त्या अपंग मुलांना व्हील चेअर दिल्या. त्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाची चमक मला दिसली. त्या मुलांना मी व्हीलचेअरवर बसून फिरताना आणि मजा करताना पाहिले.जणू ते पिकनिक वर आले आहेत आणि जॅकपॉट जिंकत आहेत.


मला यात खरा आनंद वाटला. मी तेथून निघत असताना एका मुलाने माझे पाय धरले. मी हळूवारपणे माझे पाय सोडवायचा प्रयत्न केला पण त्या मुलाने माझ्या चेहऱ्याकडे पाहत माझे पाय घट्ट पकडले.


मी खाली वाकून त्या मुलाला विचारले "तुला आणखी काही हवे आहे का?"


या मुलाने मला दिलेल्या उत्तराने मला आनंद तर दिलाच पण जीवनाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोनही पूर्णपणे बदलला.  


तो मुलगा म्हणाला:


 " मला तुमचा चेहरा लक्षात ठेवायचा आहे जेणेकरून मी जेंव्हा तुम्हाला स्वर्गात भेटेन तेव्हा तुम्हाला ओळखू शकेन आणि पुन्हा एकदा आभार मानू शकेन."


तुमचा चेहरा पुन्हा पाहण्याची इच्छा करणारे कोणी आहेत का ?


… अज्ञात 


१४/९/२२

एक छोटी घटना,जी बरचं काही सांगून जाते…

रात्र झाली होती. घोड्यावर स्वार होऊन एक प्रवासी समुद्राकडे निघाला होता.रस्त्याच्या कडेला एक खानावळ लागली. स्वार थांबला. घोड्यावरून उतरला. एका झाडाच्या बुंध्याला त्याने घोडा बांधला आणि खानावळीत प्रवेश केला.'समुद्र सफरीवर जाणाऱ्या सर्वांच्याच अंतकरणात माणसांवर विश्वास असतो. रात्रीच्या प्रहरांवर विश्वास असतो.'


मध्यरात्र झाली. सगळे जण गाढ झोपेत होते. एक चोर आला आणि त्यानं त्या प्रवासाचा घोडा पळवून नेला.


सकाळ झाली प्रवासी जागा झाला. त्याला दिसून आलं की आपला घोडा नाहीसा झाला आहे. त्याला फार वाईट वाटलं ' कोणातरी माणसाच्या मनात घोडा चोरावा असं येतं याचा त्याला मोठा खेद झाला‌‌. 'खानावळीत निवासाला असलेले एकामागून एक त्याच्या भोवती जमले आणि बोलू लागले‌


पहिला सहनिवासी म्हणाला " तबेल्या बाहेरच घोडा बांधलास हे मूर्खपणाच नाही काय ? "


दुसरा म्हणाला," घोड्याला पायबंद घातला नाहीस हे त्याहून मूर्खपणाच आहे."


तिसरा बोलला," समुद्रापर्यंत येण्यासाठी घोडा वापरावा हे खरंतर खुळेपणाचं आहे."


चौथा म्हणाला," खुशालचंद सुस्त माणसांना पायी चालायचं जीवावर येतं. अशी माणसं घोडी विकत घेतात."


सर्वांच सर्व ऐकूण प्रवाशाला फार अचंबा वाटला. तो म्हणाला," मित्रहो, माझा घोडा चोरीला गेला यात माझा अपराध कोणता ते सांगायला तुमच्यात अहमहमिका लागली आहे. पण काय आश्चर्य ! ज्यानं माझा घोडा चोरला त्याच्यावर कसलाही ठपका तुम्ही ठेवत नाही."


 ' द प्रॉफेट ' खलील जिब्रान यांच्या पुस्तकातून


 


१२/९/२२

जाणून घेऊ पक्षांचे जीवन ..

आश्चर्यकारक अचंबित सर्वोत्तम जगण्याच्या नोंदी असणारे 'पक्षीगाथा' हे पुस्तक..!


वायुगतिकी ( aerodynamics ) च्या नियमांनुसार फुलपाखराला उडता यायला नको. तरीही ते उडतं. माहित आहे असं का?


कारण फुलपाखराला हे नियम माहीतच नाहीत.


आमचे परममित्र माधव गव्हाणे साहेब त्यांच्यासोबत नेहमी सुसंवाद होतो न चुकता.पक्षिगाथा' या पुस्तकातील नोंदीच्याबद्दल आमच्यात चर्चा झाली. पक्ष्यांचे जग खूपच वेगळं व आश्चर्यकारक जीवनाशी निगडित असते. त्यातील नोंदी ऐकत असताना. मी त्यांच्याकडून त्या पुस्तकांचा फोटो मागून घेतला. व ते पुस्तक लगेच मागवून घेतले.


सरपटणार्‍या प्राण्यांचे युग डायनासॉर आणि टेरोसॉर यांच्या अचानक नाहीशी होण्यासोबत संपुष्टात आले. त्यानंतर सुरू झाले सध्याचे सस्तन प्राण्यांचे युग. या युगाच्या सुरुवातीपासूनच (सुमारे ६३ दशलक्ष वर्षापूर्वी) पक्षांच्या निर्मितीला सुरुवात झाली.आजच्या अनेक पक्षांचे पूर्वज १३ दशलक्ष वर्षापूर्वी अस्तित्वात होते. सुमारे २ दशलक्ष वर्षांपूर्वीचा हा काळ पक्षी जातींचा अतिशय भरभराटीचा काळ मानला जातो. या काळात सुमारे ११,६०० पक्ष्यांच्या जाती अस्तित्वात असाव्यात.या काळानंतर एकीकडे माणसाचा विकास झाला. तर दुसरी पृथ्वीच्या वातावरणात व पृष्ठभागात मोठे बदल होऊ लागले. यामुळे अनेक जाती नष्ट झाल्या,तर अनेक जातींमध्ये मोठे बदल झाले. आजच्या घडीला पक्ष्यांच्या ८.५०० जाती अस्तित्वात आहेत. आणि ८०० प्रकारच्या नष्ट झालेल्या जातींचे वर्णन वेगवेगळ्या पुराव्यांवरून करण्यात आले आहे.


वर सांगितल्याप्रमाणे पक्षांची नाजूक शरीर रचना व ठिसूळ हाडे यांच्यामुळे त्यांचे जीवाश्म सापडणे कठीण जाते. त्यामुळे गेल्या १४० दशलक्ष वर्षात किती पक्षांच्या जाती जन्माला आल्या आणि नष्ट झाल्या याचा अंधुकसा अंदाजही आपल्याला बांधता येत नाही. जीवाश्माच्या इतिहासाचे तज्ञ ब्रॉडकॉर्ब यांच्या मते 

आदिपक्षापासून आजपर्यंतचे सर्व पक्षी मिळून सुमारे १,६३४,००० जाती असाव्यात! आपल्याला माहीत असणाऱ्या पक्ष्यांच्या जातीचे प्रमाण किती नगण्य आहे तेवढेच आपण यावरून समजून घेऊ या..


या पुस्तकाची सुरुवातच इतकी भारदस्त आहे.कि 'जिवंत मनात' संवेदनशील,भावनिक पातळीवर नैसर्गिक व्यक्तिमत्व बहरते.


या अनुषंगाने काही महिन्यांपूर्वी गन्स,जर्म्स अँड स्टील जेरेड डायमंड यांनी लिहिलेल्या पुस्तकात (आरंभ रेषेपर्यंत मागे जाणे)

जे पुस्तक मानव जातीचा तेरा हजार वर्षाचा संक्षिप्त इतिहास सांगते.


मानवाने पशूंच्या मोठ-मोठ्या प्रजातींचा केलेला समूळ संहार.आज आपण मोठ्या सस्तन प्राण्यांचा खंड म्हणून आफ्रिकेस ओळखतो. आफ्रिकेच्या सेरेंगेटी मैदानी प्रदेश आणि एवढ्या नसल्यातरी आधुनिक युरेशियातही अशियाई गेंडे, हत्ती, वाघ आणि युरोपियन मूस ( फताड्या शिंगाचे हरीण ),अस्वले अशा मोठ्या सस्तन प्राण्यांच्या बर्‍याच प्रजाती आहेत.( क्लासिकल युगात म्हणजे ख्रिस्तपूर्व ८ वे शतक ते इ.स.५ वे/६ वे शतक या काळात युरोपात सिंहसुद्धा होते.) परंतु ऑस्ट्रेलिया/न्यू गिनी येथे तसे मोठे सस्तन प्राणी आजच्या घडीला नाहीत, फक्त हा १०० पौंडी कांगारू जेवढे आहेत. परंतु पूर्वी तिथे विविध प्रजातींच्या महाकाय सस्तन प्राण्यांचे कळप होते. त्यात महाकाय कांगारू आणि डिप्रोटोडोन्ट म्हणजे गेंड्यांसारखे दिसणारे, परंतु कांगारूंसारखे पोटावरील पिशवीत पिल्लाला ठेवणारे प्राणी होते तसेच आकारानं गायीएवढे परंतु पोटावरील पिशवीत पिल्लू ठेवणारे बिबळेही होते. त्याशिवाय ४०० पौंड वजनाचे शहामृगासारखे न उडणारे पक्षी होते. एक टन वजनाचा सरडा, महाकाय अजगर, जमिनीवर राहणाऱ्या मगरी असे फार मोठे सरपटणारे प्राणी तिथे होते. परंतु ऑस्ट्रेलिया/न्यू गिनीत मानवाचे आगमन झाल्यावर हे सर्व महाकाय प्राणिजग (मेगाफॉन) अदृश्य झाले.


चला आता पाहू या पुस्तकातील नोंदी ज्या पक्षीजगत आपणास समजून सांंगतील.


पक्ष्यांच्या हृदयाची धडधड त्याच्या आकारावर आणि त्याच्या कार्य पद्धतीवर अवलंबून असते. मोठ्या पक्ष्यांचे ह्रदय सावकाश धडधडते. शहामृगाच्या हृदयाचे ठोके मिनिटाला केवळ ३८ असतात, तर बहुतेक गान पक्ष्यांचे ( song birds ) ठोके मिनिटाला २०० - ५०० पर्यंत असतात.


पक्ष्यांच्या त्वचेवर ग्रंथीच नसतात. त्यामुळे त्यांना घाम येत नाही. शरीर गरम झाल्यास ते धापा टाकतात किंवा सावलीत जातात.


आधुनिक पक्ष्यांना दात नाहीत. प्राचीन काळात त्यांच्या पूर्वजांना त्यांच्या काळात दात होते, पण उत्क्रांती होताना उडतानाचे वजन कमी असावे म्हणून दात गेले. मात्र काही पक्ष्यांच्या चोचीच्या कडेला दातरे असतात. त्याचा उपयोग चावण्यासाठी होत नसून भक्ष्य धरून ठेवण्यासाठी होत असावा. अंड्यातील पक्षाच्या पिलाला एक 'दात'असतो. अंड्याचे कवच फोडून बाहेर येण्यासाठी त्याचा वापर केला जातो. पण तो खरा दात नाही. अंड्याबाहेर आल्यावर काही दिवसातच तो गळून जातो.


पक्ष्यांना जीभ असते, पण तिला फारसे रुची ज्ञान नसते. कारण त्यांच्या रुचिकलिका जेमतेम ३० ते ७० असतात. माणसाला ९००० च्या आसपास रुचिकालिका असतात. त्यामुळे त्याला जिव्हालौल्य विविध चवींचे-असते. पाळीव कोंबड्यांना त्या थोड्या जास्त म्हणजे २५० ते ३५० असतात. पोपटाच्या जाड जिभेवर सर्वाधिक म्हणजे ४०० रुचिकालिका असतात. पक्ष्यांना खारट चव चांगली कळते, पण त्यांना तुरट-गोड मधला फरक कळत नाही. काही जातींच्या पक्षांना आहारातील पुरक क्षार हवे असतात. पक्ष्यांना दात नसल्याने चावण्याचा प्रश्न नसतो. खाद्य सरळ गिळले जाते.


पक्ष्यांची पिसे केरॅटिनपासून तयार होतात. हे एक वजनाला हलके पण भक्कम आणि लवचिक असे प्रथिन असते. पक्ष्यांची चोच, नखे यामध्ये केरॅटिन असते. आपल्या नाकात आणि केसातही केरॅटिन असते. पिसांची संख्या जातीनुसार वेगळी असते.

हमिंगबर्डला हजाराहून कमी पिसे असतात तर अमेरिकन व्हिसलिंगला २५०० हून अधिक असतात.


पाणपक्षी शरीर जलरोधी करण्यासाठी तेल पसरवतो. पुष्कळ पक्ष्यांच्या शेपटीच्या बुडाला तैलग्रंथी असतात. त्यातून येणारे तेल तो आपल्या चोचीने सर्वांगावर लावतो. मात्र त्याचे अंग तेलाने माखले गेले असेल तर त्याला उडता वा पोहता येत नाही. त्यामुळे मृत्यू अटळ. समुद्रात सांडलेल्या तेलामुळे अशी वेळ येते.


पावसाळ्यात पक्षी भिजल्यास अंग फडफडवून पाणी उडवून लावतात. इतर वेळी जलाशयाच्या कडेला, इथे तिथे साचलेल्या पाण्यात उतरून पक्षी अंग ओले करून जागच्याजागी थरथरुन स्वतःला स्वच्छ करतात. कधीकधी पक्षी धुलीस्नान स्नान करतात. मातीने अंग माखुन नंतर थरथरून ती धूळ झटकून टाकतात. पंखात साचलेले तेल ते अशा पद्धतीने हटवतात. पिसात घुसलेले किडे मुंग्या उडवून लावतात. लहानपगी पिले घरट्यात असतानाच त्यांच्या शरीरावर उवा किंवा तत्सम कीटक चढतात. हे किटाणू पक्षांच्या उर्वरित आयुष्यात तिथे राहतात. तरीही ते त्रासदायक होत नाहीत. पण पक्षी आजारी अशक्त झाला तर मात्र कीटाणूंची वाढ अधिक होते. सामान्यत: पक्षी या किटाणूंना चोचीने काढून टाकतात.धूलिस्नानही उपयोगी असते. नीलपंखासारखे पक्षी मुंग्या मध्ये सोडतात किंवा मुंग्यांना उचलून पिसांमध्ये सोडतात किंवा मुंग्यांना तिथे रगडतात. मुंग्यामधील फॉर्मिक ॲसिड जंतुनाशक असते. हे पक्ष्यांचे मुंगीस्नान.मैना, जंगलमैना, कोतवाल व इतर पक्षी मुंगी स्नान करताना आढळल्याच्या आहेत.


शिकारी पक्ष्यांची दृष्टी अतिशय तीक्ष्ण असते. त्यामुळेच ते फार दुरूवरून आपली शिकार ओळखतात.केस्ट्रेल पक्षी माळावर चालणाऱ्या उंदराला दीड कि.मी. उंचीवरून देखील अचूक हेरतो. आफ्रिकेतील मार्शल गरुडाची नजर केस्ट्रेलपेक्षाही अधिक तीक्ष्ण असते. एकदा एका टेकडीवर बसलेल्या गरुडाने सुमारे साडेसहा दूर असलेला.गिनीफाऊल पक्षी हेरून त्यावर झपाट्याने घेतलेली झेप बघितल्याची नोंद आहे. माणसाला साधारणपणे एक कि.मी. च्या पलीकडून गिनीफाऊल दिसू शकत नाही. हे वाचून पक्ष्यांचे निसर्गाशी असणारे नाते पाहून मी नतमस्तक झालो.


मानवी डोळ्याचे स्वच्छमंडल ( Cornea ) किंचित वक्राकार असते. पण पक्षाच्या डोळ्याचे स्वच्छमंडल अगदी सपाट असल्याने त्याच्या दृकपटलाचे क्षेत्र व्यापक होते. माणसाच्या दृकपटलापेक्षा त्याचे दृकपटल पाच पटीने अधिक प्रकाशमान असतो. माणसाच्या प्रत्येक डोळ्यात एक असा बिंदू असतो की जिथे दृष्टी सर्वात तीक्ष्ण असते. ससाण्याच्या प्रत्येक डोळ्यात मात्र असे दोन बिंदू असतात. त्यामुळे त्याचे दृष्टीज्ञान मानवी डोळ्यापेक्षा आठपटींनी अधिक असते.


काही पक्ष्यांची, विशेषतः सागरी पक्षी, सफाई करणारे पक्षी, रात्री शिकार करणाऱ्या पक्षांचे नाक अधिक तीक्ष्ण असते. गिधाडांचे नाक बंद करून त्यांना सोडले असता ते मृत जनावरपर्यंत पोहोचण्यास असमर्थ झाले.स्टॉर्म पेट्रेलसारखे २५ कि.मी. दूर असलेले खाद्य हुंगू शकतात. याचा फायदा घेत समुद्री पक्ष्यांचा शोध घेणारे 'चुम' नावाने ओळखले जाणारे घाणेरड्या वासाचे द्रव्य सागराच्या पृष्ठभागावर शिंपडतात. त्या वासाने हे पक्षी तिथे पोहोचतात.


भरगच्च जंगलात मरून पडलेला प्राणी दिसत नाही पण टर्की गिधाड सडलेल्या मांसाची दुर्गंधी जाणून तिथे पोचते. जर्मनीच्या पोलीस खात्याने ढिगाऱ्याखाली गाडले गेलेल्या प्रेतांचा शोध घेण्याकरता प्रशिक्षित टर्की गिधाडांची मदत घ्यायला सुरुवात केली आहे.


इंग्रजी भाषेत बावळट माणसाला पक्षी बुद्धीचा ( Bird brained ) म्हणून संबोधले जाते पण हे पक्ष्यांना अन्याकारक आहे. कारण त्यांचे अन्नशोधाचे कौशल्य लांब अंतरावरचे अचूक स्थलांतर पाहिले. तर त्याच्या बुद्धिमत्तेला नावे ठेवता येणार नाहीत पक्षांना किचकट गोष्टी शिकवता येतात तर काही न शिकवता बाह्यसाधने वापरून शिकतात.


एखादी अळी वा फुलपाखरू खाल्ल्याने त्रास होतो हे लक्षात आल्यावर पुन्हा त्या अळी वा फुलपाखराला तोंड लावत नाहीत. काही भडक रंग धोकादायक असतात हेही त्यांना अनुभवाने कळते. हेरिंग गल पक्षी सिंपले चोचीत घेऊन उंच जातात व त्या शिंपा दगडावर आपटतात तेव्हा त्यातून कालव खायला मिळतात हे त्यांना समजते.


जपानमधील काही शहरातील कावळे रस्त्यावरच्या रहदारीचे दिवे लाल असताना तिथे अक्रोड टाकतात.हिरवे दिवे लागले की रहदारी सुरु होऊन अक्रोड फुटतात.पुन्हा दिवे लाल झाले की रहदारी थांबल्यावर ते तुकडे गोळा करतात.यावरुन त्यांची निरीक्षणशक्ती लक्षात येते.


आफ्रिकन गिधाडे शहामृगाच्या अंड्यावर दगड टाकून अंडे फोडताना दिसले आहेत.लॅमरगीअर हाडे घेऊन उडतात व ती हाडे दगडावर आपटतात व फुटल्यावर आतील मगज खातात. पाम कोकॅटू झाडाच्या पोकळ बुंध्यावर बाहेरुन काठी आपटून आत किडाकीटक दडलेला आहे का याचा अंदाज घेतो.हायसिंथ मकाव कठीण कवचीच्या बिया तोडताना चोचीला इजा होऊ नये म्हणून ती बी पानात गुंडाळून तीवर दाब देतो.


गेल्या ३०० वर्षात किमान ८० प्रजाती नामशेष झाल्या आहेत.१८५० ते १९०० काळात ४५ प्रजाती नष्ट झाल्या तर १८६५ ते १९०७ दरम्यान २१ प्रजाती संपल्या. आता तर वर्षाला एक याप्रमाणे त्यांचा अस्त होत आहे.


" मारुती चितमपल्ली यांच्या निळावंती पुस्तकातील एक नोंद आर्क्टिक टर्न हा कुररी जातीचा पक्षी उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवाचा प्रवास करतो आणि पुन्हा उत्तर ध्रुवाकडे परततो. त्याचा एकूण प्रवास पस्तीस हजार किलोमीटर लांबीचा होतो.


घुबडांची एक जोडी एक हेक्टर शेतजमिनीचं कीटक आणि उंदीर यापासून रक्षण करते. याशिवाय ते फुलांचे परागीकरण आणि बियांचं स्थलांतर करतात.


वैयक्तिक क्षेत्र जपा..!


गर्दीच्या रस्त्यावर चालताना पादचाऱ्यांना एकमेकाचे धक्के लागतात, पण त्याहीपेक्षा दाटीने उडताना पक्षी कधी एकमेकांवर आदळताना दिसत नाहीत. कारण गर्दीत असूनही प्रत्येकाने आपले वैयक्तिक क्षेत्र जपलेले असते. त्या क्षेत्रात दुसरा पक्षी घुसखोरी करत नाही. कळपात उडत असताना प्रत्येकाला आपल्या पुढच्या, मागच्या, बाजूच्या पक्षाचे नैसर्गिक भान असते. त्यामुळे कळपाने वेग वाढवला वा कमी केला तरी प्रत्येक जण त्यांच्याशी जुळवून घेतो, त्यामुळे तो कळप एकसंध उडतो हे जाणवते. आपल्या पुढच्या व आजूबाजूच्या पक्षातील गतिबदल अल्पांशात शेजाऱ्याला कळतो. त्यामुळेच मोठ्या कळपातील उडतानाची लहर १५ मिलीसेकंदापेक्षा कमी वेळा हाललेली दिसते.


पक्ष्यांच्या शरीरात दोन जैविक घड्याळ असतात. त्यांना बायोलॉजिकल क्लॉक म्हणतात त्यानुसार ते स्थलांतराची अचूक वेळ निवडतात. अलीकडच्या संशोधनात पक्ष्यांच्या शरीरातील सुपर ऑक्साईडमुळे त्यांना पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र दिसते असे कळले आहे. त्यांच्या डोळ्यात प्रकाशग्राही क्रिप्टोक्रोम नावाचे द्रव्य असते. ते जैविक होकायंत्राचे काम करते. सुपर ऑक्साईड त्याच्याशी अभिक्रिया घडवते. सुपर ऑक्साईड विषारी असते. शरीरातील त्याचे प्रमाण अल्प असते. पण तेवढे जैव होकायंत्राचे काम करून घेण्यासाठी पुरेशी असते.


गेली अनेक वर्षे रुपेरी पडदा गाजवणारा गुप्तहेर ००७ जेम्स बॉंड आपल्याला माहित आहे.इयान फ्लेमिंग या लेखकाचा तो मानसपुत्र.इयान फ्लेमिंग एकदा वेस्ट इंडिज बेटातील जमैका येथे गेले असता त्यांचे शेजारी 'जेम्स बाँड हे पक्षी शास्त्रज्ञ' होते त्यांनी ' फिल्ड गाईड ऑफ बर्ड्स ऑफ द वेस्ट इंडीज' हे पुस्तक लिहिले होते.इयान फ्लेमिंगच्या हातात ते पुस्तक पडल्यावर त्यातील पक्ष्यांकडे नाही तर त्या लेखकाच्या नावाने ते प्रभावित झाले व त्यांनी आपल्या माणसपुत्राचे नाव ठेवले.- "जेम्स बाँड"


जपानमधील बुलेट ट्रेनचा इंजिनियर राजी नकात्सु आहे.तो पक्षिनिरीक्षक आहे‌‌.त्या ज्ञानाचा उपयोग त्याने बुलेट ट्रेनचे डिझाइन बनवताना केला. खंड्या हवेतून म्हणजे कमी प्रतिकाराच्या माध्यमातून पाण्यात म्हणजे अधिक प्रतिकाराच्या माध्यमात प्रवेश करतो त्या वेळी ना पाणी उसळते ना आवाज. त्यासाठी त्याच्या चोचीला श्रेय द्यावे लागते. बुलेट ट्रेनला अशा तऱ्हेच्या परिस्थितीला तोंड द्यावे लागते. नकात्सूने ट्रैनची रचना करताना तिची रचना खंड्यांच्या चोचीसारखी केली. ही ट्रेन कमी प्रतिकाराच्या उघड्या हवेतून अधिक प्रतिकाराच्या बोगद्यात प्रवेश करताना जो आवाज करण्याची शक्यता होती ती त्याने गाडीच्या नाकाची रचना खंड्यांच्या चोचीसारखी करून खूपच कमी केली.


गाडीने वीज ग्रहण करण्यासाठी काही डब्यांवर पेंटाग्राफ बसवावे लागतात.ते पेंटाग्राफसुध्दा खुप आवाज करत.तो कमी करण्यासाठी घुबडाच्या शरीररचनेचा अभ्यास उपयोगी पडला.घुबल आपल्या शेजारून उडत गेले तरी त्याच्या पंखांचा आवाज होत नाही.हे साध्य होते त्याच्या प्राथमिक पिसांच्या रचनेमुळे.त्यामुळे एकच मोठा हवेचा भोवरा तयार न होता असंख्य छोटे भोवरे तयार होऊन आवाज कमी होतो.त्याने पेंटोग्राफची रचना त्या धर्तीवर केल्याने त्यांचा भणभणाट कमी झाला. निसर्गात दडलेले विज्ञान उपयोगी पडते ते असे.



जाता जाता 


हे पुस्तक म्हणजे निसर्ग,प्राणी,पक्षी व माणसांच्या एकोपाचा जीवन संदर्भ ग्रंथ आहे.जो ग्रंथ समस्त मानव समाजाने वाचलाच पाहीले.यातील नोंदी नाविन्यपूर्ण आहेत.पक्षी आपल्याशिवाय राहू शकतात.पण आपण राहू शकत नाही.'प्रवास' या पुस्तकातील माणसाचे व पक्षाचे संवेदनशील नाते दृढ करणारे आहे.आपल्या उत्क्रांतीमध्ये पक्षांची भुमिका महत्वाची आहे.


इतर नोंदी ज्या पक्षांबाबत अदभुत ज्ञान देतात.


'प्रवास'(अच्युत गोडबोले,आसावरी निफाडकर,मधुश्री पब्लिकेशन)पुस्तकातील ही नोंद विचार करायला लावणारी आहे.


कुठलाही पक्षी आपला स्वभाव कधीच बदलत नाही. निसर्गाने घालून दिलेल्या नियमावर तो आयुष्यभर चालत असतो पक्षांचा स्वभाव आणि त्याची दिनचर्या यांचा अभ्यास केला तर ते ठराविकच पद्धतीने वागताना आपल्या लक्षात येते.उदा. ठराविक हंगामात काही पक्षी स्थलांतरित होतात.ठराविकच झाडावर आपलं घरटं बांधतात, अन्नाच्या वेळाही त्यांच्या साधारणपणे ठरलेल्या असतात. त्यांच्या या सवयीचा उपयोग आपल्याला दिशादर्शक म्हणून होऊ शकतो ही कल्पना खलाशांना आली.आणि त्यांनी त्यांचा अभ्यास चालू केला. दिशादर्शकाचा असा कोणताही पर्याय उपलब्ध नसताना पक्षी हे आपल्याला मार्गदर्शन करू शकतात ही कल्पना खरोखरच भन्नाट होती मुख्य म्हणजे विश्वासार्ह होती. समुद्री पक्षी जर चोचीत मासे घेऊन उडत असतील, तर जवळपास जमीन नक्कीच आहे याची खलाशांना खात्री पटायची.कारण पक्षी चोचीत मासे आपल्या पिलांसाठी घेऊन जातात आणि ती पिल्ले जमिनीवरच असतात.काही पक्ष्यांची उडण्याची क्षमता जास्त नसते. त्यामुळे ते जमिनीपासून फार लांब जात नाहीत. हा ही स्वभाव खलाशांच्या लक्षात आला होता.फ्लॉकी - वल्गॲडर्सन नावाचा एक दर्यावर्दी होता. आईसलंडच्या शोधाचे श्रेय यालाच दिलं जातं. तो आपल्याबरोबर रावेन नावाचे पक्षी घेऊन जायचा. जमीन जवळ आली आहे अशी शंका आली की पिंजऱ्यातला एक पक्षी सोडला जायचा जर जमीन जवळ असेल तर तो पक्षी जमिनीच्या दिशेने उडत जायचा आणि मग वल्गॲडर्सन आपल्या बोटी त्या पक्षाच्या मागोमाग न्यायचा. पण जमीन जवळपास नसेल तर मात्र तो पक्षी बोटीवरच घिरट्या घालून परत बोटीवर उतरायचा.पक्षांचे असे सर्वोत्तम स्थान आहे मानवी जीवनातील..!



'शरीर' (अच्युत गोडबोले,अमृता देशपांडे,मनोविकास प्रकाशन) पुस्तकातील ह्या दोन नोंदी अभ्यासपूर्ण व वाचणीय आहेत.बेडूक कुठलीही हालचाल करणारी गोष्ट चटकन टिपू शकतो;अशी ती गोष्ट म्हणजे माशा किंवा किडे असतील तर त्यांच्यावर झडपही घालू शकतो; पण त्या बेडकासमोर मेलेली माशी असेल तर तो उपाशी असला तरीही तिच्याकडे ढुंकूनही बघत नाही.आणि हे 'मेलेला प्राणी मी खात नाही' अशा स्वाभिमानामुळे नव्हे तर ती माशी काहीच हालचाल करत नसल्यामुळे ती त्याला जाणवत नाही म्हणून !


मुख्य चवी पाचच आहेत.गोड,आंबट,खारट,कडू आणि उमामी शेवटची मूळ चव ही उमामी आहे. हा मूळ जपानी भाषेतला शब्द जसाचा तसा वापरला गेलाय, कारण ही चव आता नव्यानंच वैज्ञानिकांना सापडली आहे.उमामी या शब्दाचा अर्थ स्वादिष्ट असा होतो.ग्लुटामेट या अमायनो ॲसिडची ही चव आहे.हिचं वैशिष्ट्य म्हणजे, या चवींच माणसाला चक्क व्यसन लागू शकतं!ही चव म्हणजेच चायनीज पदार्थांमध्ये सर्रास वापरल्या जाणाऱ्या 'मोनोसोडियम ग्लुटामेट ( अजिनोमोटो ) रसायनामुळे येते.


या पुस्तकाची १०० पानांची पृष्ठ संख्या आहे.सोहम क्रिएशन अँड पब्लिकेशन यांचे प्रकाशन आहे.तर दिगंबर गाडगीळ हे लेखक आहेत.


विजय गायकवाड

९/९/२२

एक छोटी गोष्ट जगणं मोठंं करुन सांगणारी..!

एका श्रीमंत माणसाला साक्षात अनुभवाविषयी विलक्षण आकर्षण असते.एके दिवशी तो एका सुंदर बेटाची आपल्या राहण्यासाठी निवड करतो.तिथे तो अनेक वर्षे राहतो.निसर्गाच्या सहवासात आपण इथे खूप वर्षे राहिलो,आता आपण आपल्या मुळ ठिकाणी परत जायला हवे असे त्याला वाटायला लागते.खरे तर तो त्या बेटावर तब्बल तीस वर्षे राहिलेला असतो.जेव्हा तो परत आपल्या मूळ स्थानी येतो. तेव्हा निरनिराळ्या माध्यमातील लोक-पत्रकार त्याची मुलाखत घेण्यासाठी त्याच्या बंगल्यावर येतात. ज्या बेटावर तो श्रीमंत वास्तव्याला असतो, ते बेट खरोखरीच अप्रतिम असते, सगळे त्याला विचारायला लागतात..ते निसर्गरम्य बेट कसे आहे? तीस वर्षाच्या या बेटावरील अनुभवाविषयी सविस्तर सांगा ना? या बेटावरील जंगली जनावरांचा तुम्हाला काही अनुभव आला का? या बेटावरचे पर्यावरण व ऋतूचक्र कसे होते? बदलत्या हवामानाचा तुम्हाला त्रास झाला नाही का? इतकी वर्षे तुम्ही या बेटावर राहिलात, त्या बेटाच्या वैशिष्ट्यांविषयी, निसर्गसौंदर्यांविषयी विस्ताराने सांगा ना? असे एक ना अनेक प्रश्न लोकांनी त्या श्रीमंत माणसाला विचारले. त्याने ते सगळे प्रश्न ऐकले आणि तो म्हणाला - अरे देवा, इतके ते बेट निसर्गरम्य व सुंदर होते, मी हे जर आधी जे ऐकले असते, तर त्या बेटाचा, तिथल्या निसर्गाचा-बदलत्या ऋतुचक्राचा मी अधिक मनापासून अनुभव घेतला असता.!


पत्रकार जेव्हा त्याला सारे प्रश्न विचारतात,तेव्हा त्याला त्या बेटाविषयी कुतूहल वाटायला लागते. मग त्याच्या लक्षात येते की, आपण त्या बेटावर तीस वर्षे राहिलो खरे, पण प्रत्यक्षात आपले त्या बेटाशी काहीच नाते नव्हते,आपण तसे काहीच पाहिले नाही,ना कुठला विशिष्ट अनुभव घेतला‌. आपण फक्त ऋतुचक्र ढकलत, तिथे जगत राहिलो.


पुस्तकातील ही एक छोटी गोष्ट जीवनातील मोठी गोष्ट सांगून जाते.आपल्या बाबतीतही असं होतं का?

चला जरा आपण विचार करू..।


नाही तर 'चांदण्यात भिजायचं राहून जायचं..'