* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१७/१०/२२

★अशिक्षित डॉक्टर.. सर्जन मिस्टर हॅमिल्टन..

एक केप टाउनचा अशिक्षित माणूस जो एकही इंग्रजी शब्द वाचू किंवा लिहू शकत नव्हता,

ज्याने आयुष्यात कधी शाळेचा चेहरा पाहिला नव्हता ... त्याला मानद मास्टर ऑफ मेडिसिन देऊन सन्मानित करण्यात आले.


केप टाऊन मेडिकल युनिव्हर्सिटी जगात पहिल्या क्रमांकावर आहे,असे म्हटले जाते की जगातील पहिले बायपास ऑपरेशन या विद्यापीठात झाले.


..आणि २००३ मध्ये...


एका सकाळी जगप्रसिद्ध सर्जन प्राध्यापक डेव्हिड डेंट यांनी विद्यापीठाच्या सभागृहात घोषणा केली.


"आज आम्ही सर्वात जास्त शस्त्रक्रिया करणाऱ्या माणसाला वैद्यकशास्त्रातील मानद पदवी देत ​​आहोत."


या घोषणेने प्राध्यापकाने "हॅमिल्टन" गायले आणि संपूर्ण सभागृह उभे राहिले.  

हॅमिल्टनला सर्वांनी शुभेच्छा दिल्या ...


या विद्यापीठाच्या इतिहासातील हे सर्वात मोठे स्वागत होते.


हॅमिल्टनचा जन्म केपटाऊनमधील दुर्गम गावात सनीतानी येथे झाला.त्याचे आईवडील मेंढपाळ होते.लहानपणी त्यांनी शेळीचे कातडे घातले आणि दिवसभर अनवाणी डोंगरांवर फिरले.  


वडील आजारी पडल्यानंतर हॅमिल्टन केपटाऊनला आले.त्यावेळी विद्यापीठाचे बांधकाम चालू होते.तो विद्यापीठात मजूर म्हणून रुजू झाला.त्याने तेथे अनेक वर्षे काम केले.दिवसभराच्या कामानंतर तो जे काही पैसे घरी मिळेल ते पाठवायचा,आणि तो स्वत: खाली संकुचित होऊन मोकळ्या मैदानात झोपायचा. त्यानंतर त्याला टेनिस कोर्टचे मैदान देखभाल कामगार म्हणून नियुक्त करण्यात आले.हे काम करता करता तीन वर्षे निघून गेली.


मग.. आश्चर्यकारक घटना घडली..


त्याच्या आयुष्याला एक विचित्र वळण लागले, आणि तो वैद्यकीय शास्त्रातील अशा टप्प्यावर पोहचला ज्या ठिकाणी अजून कोणीही पोहोचले नव्हते.


ती सोनेरी सकाळ होती,प्रोफेसर रॉबर्ट जॉयस जिराफांवर संशोधन करत होते.त्याने ऑपरेटिंग टेबलवर बेशुद्ध जिराफ ठेवला.


पण ऑपरेशन सुरू होताच जिराफने डोके हलवले.जिराफची मान घट्ट पकडण्यासाठी त्यांना एका बळकट माणसाची गरज होती.  

प्राध्यापक 'हॅमिल्टन' लॉनवर काम करत थिएटरमधून बाहेर आले.तो एक मजबूत निरोगी तरुण आहे हे पाहून प्राध्यापकाने त्याला बोलावले आणि जिराफ पकडण्याचे आदेश दिले.हे ऑपरेशन आठ तास चालले.

ऑपरेशन दरम्यान,डॉक्टरांनी चहा आणि कॉफीचा ब्रेक घेतला. तर "हॅमिल्टन" जिराफची मान पकडून उभा होता.ऑपरेशन संपल्यावर हॅमिल्टन शांतपणे निघून गेला.


दुसऱ्या दिवशी प्राध्यापकाने पुन्हा हॅमिल्टनला बोलावले. तो आला आणि जिराफची मान पकडून उभा राहिला.त्यानंतर ती तिची रोजची दिनचर्या बनली.हॅमिल्टनने अनेक महिने दुप्पट काम केले आणि कधीही जास्त पैसे मागितले नाहीत,आणि तक्रार केली नाही.


प्राध्यापक रॉबर्ट जॉयस त्याच्या चिकाटी आणि प्रामाणिकपणामुळे प्रभावित झाले आणि हॅमिल्टनला टेनिस कोर्टमधून 'लॅब असिस्टंट' म्हणून बढती मिळाली.  


आता त्याने विद्यापीठाच्या ऑपरेटिंग थिएटरमध्ये शल्यचिकित्सकांना मदत करण्यास सुरुवात केली.ही प्रक्रिया वर्षानुवर्षे चालू राहिली.


१९५८ मध्ये त्यांच्या आयुष्यात आणखी एक वळण आले.या वर्षी डॉ.ख्रिश्चन बर्नार्ड विद्यापीठात आले आणि हृदय प्रत्यारोपणाचे ऑपरेशन सुरू केले.हॅमिल्टन त्यांचे सहाय्यक बनले,या ऑपरेशन दरम्यान सहाय्यक ते अतिरिक्त सर्जनकडे गेले.


आता डॉक्टर ऑपरेशन करायचे आणि ऑपरेशननंतर हॅमिल्टनला शिवणकामाचे काम देण्यात आले.त्याने उत्तम टाके केले. त्याची बोटे स्वच्छ आणि तीक्ष्ण होती.  

तो दिवसाला पन्नास लोकांना शिलाई करायचा.  

ऑपरेटिंग थिएटरमध्ये काम करत असताना त्याला शल्य चिकित्सकांपेक्षा मानवी शरीर अधिक समजले,म्हणून वरिष्ठ डॉक्टरांनी त्याला शिकवण्याची जबाबदारी सोपवली.त्यांनी आता कनिष्ठ डॉक्टरांना शस्त्रक्रियेचे तंत्र शिकवायला सुरुवात केली.तो हळूहळू विद्यापीठातील सर्वात महत्वाचा व्यक्ती बनला. ते वैद्यकीय शास्त्राच्या अटींपासून अपरिचित होते परंतु सर्वात कुशल सर्जन असल्याचे सिद्ध झाले.


त्यांच्या आयुष्यातील तिसरा टर्निंग पॉईंट १९७० साली आला,जेव्हा या वर्षी यकृतावर संशोधन सुरू झाले आणि त्यांनी शस्त्रक्रियेदरम्यान यकृताची धमनी ओळखली ज्यामुळे यकृत प्रत्यारोपण सुलभ झाले.


त्याच्या निरीक्षणांनी वैद्यकीय विज्ञानातील महान मनांना आश्चर्यचकित केले.


आज जेव्हा जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात एखाद्या व्यक्तीचे यकृताचे ऑपरेशन होते आणि रुग्ण त्याचे डोळे उघडतो,नव्या आशेने पुन्हा जिवंत होतो,तेव्हा या यशस्वी ऑपरेशनचे श्रेय थेट "हॅमिल्टन"ला जाते.


हॅमिल्टनने प्रामाणिकपणा आणि चिकाटीने हे स्थान मिळवले. ते केपटाऊन विद्यापीठाशी ५० वर्षे संबंधित होते,त्या ५० वर्षात त्याने कधी सुट्टी घेतली नाही.


तो रात्री तीन वाजता घरातून निघायचा, 

विद्यापीठाकडे १४ मैल चालत जायचा आणि अगदी ठीक सहा वाजता ऑपरेशन थिएटरमध्ये प्रवेश करायचा.लोक त्यांची घड्याळे त्यांच्या वेळेनुसार दुरुस्त करत असत.


त्याला हा सन्मान मिळाला जो वैद्यकीय शास्त्रात कोणालाही मिळाला नाही.


वैद्यकीय इतिहासाचे ते पहिले निरक्षर शिक्षक होते.


आपल्या आयुष्यात ३०,००० शल्यचिकित्सकांना प्रशिक्षण देणारे ते पहिले निरक्षर सर्जन होते.


२००५ मध्ये त्यांचे निधन झाले आणि त्यांना विद्यापीठात पुरण्यात आले.


यानंतर, पदवी मिळाल्यानंतर त्याच्या थडग्याला भेट देणे, छायाचित्र काढणे आणि नंतर त्यांच्या सेवेच्या कामावर जाणे विद्यापीठाने शल्य चिकित्सकांना अनिवार्य केले.

 "तुम्हाला माहित आहे की त्याला हे पद कसे मिळाले?"


  " फक्त 'हो..' "


ज्या दिवशी त्याला जिराफची मान पकडण्यासाठी ऑपरेटिंग थिएटरमध्ये बोलावण्यात आले होते,जर त्याने त्या दिवशी नकार दिला असता,जर तो म्हणाला असता,'मी मैदान देखभाल कामगार आहे,माझे काम जिराफची मान पकडणे नाही', 

तर ... विचार करा..!


 तेथे फक्त एक "होय" आणि अतिरिक्त आठ तासांची मेहनत होती,ज्यामुळे त्याच्यासाठी यशाची दारे उघडली गेली आणि तो सर्जन झाला.


 " जेव्हा आपल्याकडे काम शोधावे लागते तेव्हा आपल्यापैकी बरेच जण आपले संपूर्ण आयुष्य नोकरीच्या शोधात घालवतात."


जगातील प्रत्येक नोकरीचा एक निकष आहे आणि नोकऱ्या फक्त त्या लोकांसाठी उपलब्ध आहेत जे निकष पूर्ण करतात.जर आपल्याला काम करायचे असेल तर आपण काही मिनिटांत जगातील कोणतेही काम सुरू करू शकतो आणि कोणतीही शक्ती देखील आपल्याला रोखणार नाही.


हॅमिल्टनला हे रहस्य सापडले होते, 

त्याने नोकरीऐवजी काम करण्याला महत्त्व दिले.  

अशा प्रकारे त्याने वैद्यकीय विज्ञानाचा इतिहास बदलला.


कल्पना करा,जर त्याने सर्जनच्या नोकरीसाठी अर्ज केला तर तो सर्जन बनू शकेल का? 

 कधीही नाही.पण,त्याने जिराफची मान पकडली आणि सर्जन झाला.


बेरोजगार लोक अपयशी ठरतात कारण आम्ही फक्त नोकरी शोधतो,नोकऱ्या नाही.  


ज्या दिवशी आपण "हॅमिल्टन" प्रमाणे काम करायला सुरुवात करू, आपण यशस्वी आणि महान मानव बनू ..!


आमचे मार्गदर्शक,आदरणीय डॉ सुधीर सरवदे,  प्राध्यापक बालरोगविभाग,CPR,(थोरला दवाखाना) कोल्हापूर यांच्या व्हॉट्सऍप वरुन साभार..


१६/१०/२२

आत्ताचा क्षण जगण्यातच जगण्याचे मर्म दडलेले आहे....! " वॉल्डन "

चौकट व थडगे यामध्ये काही फुटांचे अंतर असतं.हे हेन्री डेव्हिड थोरोचे वाक्य मनापासून विचार करायला लावणारं..माझ्यासाठी ते जीवनतत्त्व होतं.त्यानंतर माझी हेन्री डेव्हिड थोरो यांच्याबाबत वाचण्यासाठी मनाची घालमेल सुरू झाली. परभणीचे आमचे दादासाहेब मनोहर सुर्वे यांनी वॉल्डनबद्दल काही माहिती दिली. या पुस्तकाबद्दल काही मनोरंजक माहिती सांगितली. मी लगेच मधुश्री पब्लिकेशन यांचे 'वॉल्डन' आदरणीय लेखक जयंत कुलकर्णी यांनी अनुवादित केलेले पुस्तक मागवले व वाचण्यास सुरुवात केली. पुस्तक वाचत असताना ते समजून घेत असताना सत्कार्णी वेळ जात होता व त्याचबरोबर माझ्यातील मीपणाही जात होता. डॅनियल गोलमन यांनी लिहिलेलं इमोशनल इंटेलिजन्स या पुस्तकानंतर मला हे पुस्तक वाचण्यास व समजून घेण्यास वेळ लागला.पण तो वेळ माझ्यासाठी महत्त्वपूर्ण होता.


इतरांची पावले सूर्यास्ताला घराकडे वळतात पण माझी डोंगर माथ्याकडे सूर्यास्त पाहण्यासाठी वळतात. गावातील गडबड गोंधळात मी पार मागे पडलोय, पण मला सूर्यास्त दिसतो आणि माझ्या शांत-निवांत आयुष्यासाठी तो रेंगाळू शकतो हेच माझ्यासाठी खूप आहे.या वाक्याचा मी बराच वेळा विचार केला. कारण मला पुढे बराच विचार करायचा होता..!


जितराबावर बसून त्याचा फडशा पाडणाऱ्या गिधाडांना पाहून आपल्या मनात शिसारी येते पण ते मढ़ खाऊन ते गिधाड मोठे होते,उडते, हे पाहून आपल्याला भविष्याचा वेध घ्यायचा आहे हेच जीवनसत्य यातून आपल्याला सांगायचे आहे.


निसर्गात जीवांची संख्या इतकी प्रचंड व अद्भुत आहे की या भुकेच्या यज्ञात अनेक जीवांची आहुती देण्यास त्याला सहज परवडते. एक जीव दुसऱ्या जीवाचे भक्ष असतो आणि तो अजून कुठल्यातरी. पण या पृथ्वीतलावर जे अपघात व युद्ध होतात त्याच्या तुलनेत याचे महत्व अल्प (किंवा जास्त ) असावे. सुज्ञ माणूस या सगळ्याला निसर्गाचा निरागसपणा समजतो. औषधांमध्ये विषांचाही काही उपयोग असतो आणि सर्व जखमांमुळे मृत्यू ओढवत नाही हेही समजून घेतले पाहिजे.अनुकंपेचा पाया बऱ्याच वेळा अस्थिर असतो त्यामुळे त्यावर अवलंबून किती निर्णय घ्यायचे याचा निर्णय एखाद्याला घ्यावा लागतो. अनुकंपा आणि दया हे त्यांच्या जागी ठीक आहेत. आपण एखाद्याच्या मृत्यूबद्दल शोक करू शकतो पण मृत्यू' वर आपण प्रेमच केले पाहिजे..! पान नंबर ३०६ वरील हा उतारा मला जीवनाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याचा दृष्टिकोन देऊन गेला.


ज्या माणसाचे विचार सूर्याबरोबर धावतात त्याचा दिवस हि निरंतर सकाळचं असते मग घड्याळात काहीही वेळ सांगो किंवा कामाला जाणारे काहीही सांगोत मी जागा झालो की माझी सकाळ होते आणि पहाट माझ्यात भिनते. झोपेचे,आळसाचे पांघरून फेकून देणे ही एक नैतिक सुधारणाच आहे असे मी मानतो. या नविन विचाराने मी प्रभावित झालो.


सद्गुण एखाद्या टाकून दिलेल्या पोरक्या मुलासारखे कधीच एकटे राहात नाहीत. ते तुमच्या जवळ असले की इतर चांगल्या गोष्टीही तुम्हाला चिकटतातच. कन्फ्युशियसचे हे तत्वज्ञान किती खरं आहे. मला याची जाणीव झाली.


प्रयत्न केले तर आपण आपल्या स्वतःचा कडेच एका त्रयस्थ पण निरोगी नजरेने पाहू शकतो. थोडेसे अजून प्रयत्न केले तर आपले कर्म आणि त्यापासून मिळणारे फळ या दोन्ही पासून आपण अलिप्त राहू शकतो. तसेच झाले की चांगले आणि वाईट या दोन्ही गोष्टी आपण निर्विकारपणे पाहू शकतो. आपण निसर्गाशी पूर्ण एकरूप होत नाही. नाहीतर मी खाली ओढ्यात वाहणारी एखादी काटकी असलो काय किंवा वरून त्या काटकीकडे पाहणारा, पाऊस पाडणारा इंद्र असलो काय, काहीच फरक पडत नाही ही अप्रतिम वाक्ये मनाची ठाव घेणारी आहेत.


या पुस्तकात मला कीटकशास्त्र ही वाचावयास मिळाले. किर्बी आणि स्पेन्सच्या कीटक शास्त्राच्या पुस्तकानुसार कित्येक कीटक असे आहेत. जे पुर्ण वाढल्यावर तोंडही हलवीत नाहीत. जे काय खायच आहे ते त्यांनी अळीच्या स्वरूपात असतानाच खाऊन घेतले असते. या पुस्तकाच्या लेखकांनी याबाबतीत त्यांचे एक निरीक्षण लिहिले आहे,ते म्हणतात जवळ जवळ सर्व कीटकांचा आहार अळी असताना असतो त्यापेक्षा खूपच कमी असतो. उदा. खादाड अळीचे जेव्हा फुलपाखरांत रूपांतर होते तेव्हा त्याचे बोट मधाच्या अर्ध्या थेंबानेही भरते. फुलपाखरांच्या पंखाखाली दिसणारे त्याचे शरीर हे त्या आळीचे शिल्लक असलेले रूप आहे. या उरलेल्या अवयवांमध्ये बिचाऱ्या फुलपाखराला कधीकधी खाण्याचा मोह पडत असावा. हे सर्व वर्णन माझ्यासाठी अविस्मरणीय होते...


भूक लागलेली नसताना केवळ जिभेचे चोचले पुरवण्यासाठी अन्नग्रहण करून आनंद मिळवलेला नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडायची नाही. यासाठी माणसे अन्नांच्या खमंग चवीला जबाबदार धरतात. पण माझ्या बाबतीत म्हणाल तर पदार्थाच्या चवीने मला त्या पदार्थांची अनुभूती घेता येते त्यासाठी मी चवीचा अत्यंत ऋणी आहे. चव भुकेसाठी प्रेरणादायी आहे आणि भुकेने मला प्रेरणा मिळते. माझ्या बुद्धिमत्तेच्या वाढीमध्ये व प्रतिभा स्फुरण्यामागे जंगलातील डोंगरांमध्ये वेचून खाल्लेल्या बेरींचाही वाटा आहे हे सांगण्यास मला बिलकुल कमीपणा वाटत नाही. आपला अंतरात्मा त्याचा स्वतःचा गुलाम नाही त्यामुळे होते काय, आपण बघतो पण आपल्याला खऱ्या अर्थाने दिसत नाही. आपण ऐकतो पण आपल्याला ऐकू येत नाही. आपण खातो पण आपण त्याचा आनंद घेत नाही. जो माणूस चवीने खातो तो खादाडखाऊ होऊच शकत नाही आणि जो अन्नाचे सेवन चवीने करीत नाही तो खादाडखाऊ शिवाय दुसरा काही होत नाही. मॅथ्यू यांच्या वाचनामध्ये थोडासा बदल करून सांगितलं गेलं आहे की तुम्ही ग्रहण करीत असलेल्या अन्नाने तुम्हाला कधीच अपचन होत नाही, तुम्ही ते किती भूक असताना खाता यावर ते अवलंबून असते. किती अन्न खाता आणि कुठल्या प्रतीचे खाता यावर काही अवलंबून नाही, ते तुम्ही किती श्रध्देने, आनंदाने खाता यावर त्याचे पचन अपचन अवलंबून आहे. थोडक्यात काय, अन्न हे पूर्णब्रह्म आहे यावर तुमची श्रद्धा हवी. यासारख्या सरळ साध्या सांगितलेल्या अनेक श्रद्धा या पुस्तकात जागोजागी आहेत. या श्रद्धेपुढे मी नतमस्तक आहे.


तो माणूस खरा नशीबी,

ज्याने त्याच्यातील पशु, 

मनातील आंधारे जंगल तोडून,

 त्याला हाकलून दिले आहे...


पृथ्वी म्हणजे काही इतिहासाचा एक उडालेला टवका नाही ना दगड मातीचे एकमेकांवर रचलेले थर,जशी पुस्तकांची पाने एकमेकांवर रचलेली असतात. शास्त्रज्ञ आणि साहित्यिक या टक्क्याचा आणि पानांचा अभ्यास करतीलही पण पृथ्वी म्हणजे एक जिवंत काव्य वृक्षांच्या पानांसारखे जी फळाफुलांच्या आधीच फांद्यांवर फुटतात.पृथ्वी म्हणजे काही जिवाष्म नव्हे पृथ्वी सजीव आहे. किंबहुना पृथ्वीचे आयुष्य पाहता मला तर वाटते त्यावरील सर्व जीवसृष्टी ही एक बांडगुळच आहे.अशा या पृथ्वीला वेदना दिल्या तर तिच्या एका हुंदक्या सरशी तिच्यात गाडली गेलेली मढी एका झटक्यात बाहेर पडतील. तुम्ही धातूच्या सुंदर मूर्ती ओताल,मला त्याही आवडतात पण या वाहणाऱ्या वाळूत जे मला आकार व कला पाहायला मिळतात तेच मला भावतात व ते पाहून मी अगदी खूश होऊन जातो. नुसते आकारच नाही तर तो निसर्ग ही कुंभाराच्या हातातील माती प्रमाणे त्याला पाहिजे तो आकार देऊ शकतो, किंवा घेऊ शकतो त्याची मला जास्त मजा वाटते. हे पृथ्वीचे जीवन वर्णन मनाला बरंच काही सांगून गेल.


या पुस्तकामुळे माझ्या मध्ये व माझ्या दृष्टिकोनामध्ये बदल होण्यास सुरूवात झाली आहे. शेवटी या पुस्तकातील वाक्याने मी मला जाणीव झालेला निरोगी दृष्टिकोन आपल्या समोर सादर करून मी अल्प विश्रांती घेतो.


मधुश्री पब्लिकेशन,हेन्री डेव्हिड थोरो,आदरणीय लेखक जयंत कुलकर्णी या सर्वांचा मी मनःपूर्वक आभारी आहे व त्यांना धन्यवाद देतो.अतिशय साध्या सोप्या भाषेत अवघड अशी जगण्याची जीवन पद्धत समजावून सांगितली आहे. त्यामुळेच मी वॉल्डेन व तिथे असणाऱ्या व वैविध्यपूर्ण निसर्गाचा पक्षी प्राण्यांचा माझ्या आत्म्यापासून प्रवास करु शकलो.


मनुष्याला फक्त स्वतःचा किनारा माहीत होता आणि त्याला समुद्र पार करण्याची नव्हती गरज..!


विजय कृष्णात गायकवाड

१४/१०/२२

ॲरिस्टार्कस - इसवी सनापूर्वीचा सूर्यकेंद्रित सिद्धांताचा पुरस्कर्ता…

सॅमोसचा ॲरिस्टार्कस Aristarchus of Samos 

(इ. स. पूर्व ३१०-२३०) 


ग्रीक खगोलविज्ञानामध्ये ऑरस्टार्कसचे स्थान फार महत्त्वाचे आहे. ग्रीसमधील सॅमोस या गावच्या ॲरिस्टार्कसने आकाशातील ताऱ्यांचा वेध घेत आपली निरीक्षणे नोंदविली. 'पृथ्वी सूर्याभोवती फिरते' असे सांगणारा हा पहिला खगोलविंद.अनेक प्रकारची गणिते करून त्याने पृथ्वीपासून चंद्र आणि सूर्याचे अंतर शोधून काढले. 'सूर्य चंद्रापेक्षा अठरापट दूर असला पाहिजे' हा त्याचा तर्क,तसेच 'सूर्य चंद्रापेक्षा ५८३२ पेक्षा अधिक तर ८००० पेक्षा कमी पटींनी मोठा असला पाहिजे' हा त्याचा निष्कर्ष,

वस्तुस्थितीपेक्षा त्याचे निष्कर्ष वेगळे असले तरी दूरच्या वस्तूंचा वेध कोणत्याही साधनसामग्री अभावी घेणे आणि ते मांडणे हे फार महत्त्वाचे आहे. कारण असल्या निरर्थक निरीक्षणांचा आपल्या जीवनाशी,रोजीरोटीशी काय संबंध?असे वाटणारा वर्ग पूर्वी होता.आजही आहे आणि पुढेही तो असणार आहे. ग्रहमालेचा केंद्र पृथ्वी नसून सूर्य आहे.हे त्याच्या सिद्धांताचे मुख्य सूत्र होते.त्याने आपल्या 'On the Sizes and Distances of the Sun and Moon या ग्रंथात नोंदविलेली निरीक्षणे आजही विचार करायला लावणारी आहेत.चंद्राला सूर्यापासून प्रकाश मिळतो तो स्वयंप्रकाशित नाही.यासारखी त्याची निरीक्षणे आज जरी फार नावीन्यपूर्ण वाटत नसली तरी इसवीसनापूर्वीच्या त्यांच्या कल्पनाशक्तीची जाणीव निश्चितच करून देणारी आहेत.अपोलो १५ यान चंद्रावर ज्या विवराजवळ उतरलेले होते त्या विवराला ॲरिस्टार्कसचे नाव देऊन त्याच्या स्मृती चिरंतन करून ठेवलेल्या आहेत. या विवराचा व्यास आहे ४० किलोमीटर आणि खोली आहे ३.७ किलोमीटर..


सफर विश्वाची - डॉ.नितीन शिंदे 

१२/१०/२२

"ओ मिस्टर ! पुस्तक विकत घ्यायचे आहे काय ?"

"ओ मिस्टर ! पुस्तक विकत घ्यायचे आहे काय? इथं नुसती पुस्तके चाळायला हे काही प्रदर्शन नव्हे" पुस्तक दुकानाचा मालक अगदी तावातावाने बोलत होता.


"अहो पण पुस्तक घ्यायचे आहे म्हणूनच चाळतोय ना?" पंचविशीतला नारायण त्या दुकानदाराला म्हणाला.


"पण आमच्याकडे तशी पद्धत नाही. पुस्तक पाहिजे असेल तर निवडा,विकत घ्या आणि चला, इथं उगाच जागा अडवून उभे राहू नका."


नारायण,ज्याचा श्वासच पुस्तक होता, त्या दुकानदाराच्या वर्तणुकीने फारच दुःखी झाला. अवघ्या तेरा वर्षाच्या बालवयात नारायणने आपल्या शाळेच्या ग्रंथालयातील सर्व पुस्तके वाचून काढली होती.अगदी हलाखीचे बालपण,वडिलांचे छत्र अडीच वर्षाचा असतानाच हरपलेले आणि आईच्या काबाडकष्टातून साकारलेले जीवन,अशा प्रतिकूल परिस्थितीतून वाट काढणाऱ्या या मुलाचे आयुष्य वेगवेगळ्या लेखकांच्या लेखणीतून फुलत होते. स्वामी विवेकानंदांच्या कार्याने प्रभावित झालेल्या नारायणने लहानपणी साठविलेले पैसे खाऊसाठी न वापरता त्यातील सत्तावीस रुपये विवेकानंदाचे समग्र वाङ् मय कोलकत्याहून मागविण्यासाठी पाठवून दिले होते. याच नारायणला आज एक दुकानदार हटवत होता.


नारायण दुकानाची पायरी उतरला. त्याने मागे वळून दुकानाकडे पाहिले आणि आपणही मुंबईमध्ये असेच दुकान काढायचे,असे विचार त्याच्या मनामध्ये दुकानाची बांधणी करू लागले. अर्थात पंचविशीतल्या या तरुणाला ही काही सहजी शक्य होणारी गोष्ट नव्हती. कारण त्यासाठी लागणारी कोणतीच गोष्ट नारायणजवळ नव्हती. पण निदान नारायणने यानिमित्ताने त्याच्या मनातील या इच्छेचे बी पेरले होते.


जसा नारायणला पुस्तकांचा छंद होता, तसाच इंग्रजी सिनेमांचाही होता.. साधारण १९४८ साली एक दिवस तो मुंबईतील स्ट्रॅन्ड नावाच्या चित्रपटगृहामध्ये इंग्रजी सिनेमा पाहायला गेला. त्या चित्रपटगृहामध्ये शिरताना त्याची नजर तेथील एका रिकाम्या कोपऱ्याकडे गेली आणि या कोपऱ्यात जर आपण दुकान काढू शकलो तर? असा एक विचार त्याच्या मनात विजेप्रमाणे चमकून गेला. नारायणच्या मनातली विचार चक्रे फिरू लागली आणि दुसऱ्याच दिवशी,मुंबईतील त्यावेळी पंचावन्न चित्रपटगृहांचे मालक असलेल्या केकी मोदी यांच्या कार्यालयात त्यांच्यासमोर "जाऊन तो उभा राहिला. केकी मोदींसारख्या मोठ्या व्यक्तीसमोर नारायणने हा प्रस्ताव मांडला. नारायण अपरिपक्क आहे. त्याला पुस्तक व्यवसायाची कसलीही माहिती नाही हे मोदींच्या तात्काळ लक्षात आले पण त्यांना नारायणामध्ये काहीतरी विशेष असल्याचे जाणवले आणि त्यांनी नारायणचा प्रस्ताव स्वीकारला आणि अशाप्रकारे टी.नारायण शानभागच्या जीवनातील सुवर्णदिन उगवला आणि १९४८ साली नोव्हेंबर महिन्यात 'स्ट्रॅन्ड बुक स्टॉल' स्ट्रॅन्ड चित्रपटगृहामध्ये सुरू झालाही.


पुस्तकांची आवड असलेल्या नारायण शानभागांकडे त्यावेळेस पुस्तके विकत घेण्यासाठी केवळ ४५०/- रुपये होते, पण त्यांच्यातील चोखंदळ वृत्तीमुळे त्यांनी त्या भांडवलातूनही अतिशय निवडक अशी पुस्तके आपल्या स्टॉलवर ठेवली आणि बघता बघता नारायण शानभागांच्या स्ट्रॅन्ड बुक स्टॉलचे नाव अतिशय उच्चशिक्षित आणि उच्चभ्रू मंडळींमध्ये घेतले जाऊ लागले. नारायण शानभागांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते त्यांच्या स्टॉलवरील पुस्तके लोकांना मुक्तपणे हाताळायला द्यायचे आणि त्याहूनही विशेष गोष्ट म्हणजे ते प्रत्येक ग्राहकाला पुस्तकांच्या मूळ किमतीवर २० टक्के सूट द्यायचे.स्वतःसाठी केवळ किमान नफा घेऊन बाकीचे ग्राहकांना परत करायचे तत्त्व शानभागांनी पहिल्या दिवसापासून आजवर निष्ठेने पाळले आहे.


स्ट्रॅन्डमधील पुस्तके,तिथे मिळणारी सवलत,पुस्तके चाळायला मिळत असलेले स्वातंत्र्य आणि अतिशय आदराने वागणारा मालक यामुळे शानभागांची अतिवेगाने मुखप्रसिद्धी होऊ लागली आणि अगदी यशवंतराव चव्हाणांपासून ते त्या काळात केंद्रीय अर्थमंत्री असलेले टी.टी. कृष्णम्माचारींपर्यंत वेगवेगळ्या स्तरातील अनेक व्यक्ती स्ट्रॅन्डमध्ये आपली वर्णी लावू लागल्या. शानभाग यांच्या आरंभीच्या ग्राहकांपैकी एक होते सर अंबालाल साराभाई,त्यानंतर त्यांचे चिरंजीव प्रख्यात परमाणू शास्त्रज्ञ विक्रम साराभाई आणि त्यानंतर त्यांचे लाडके शिष्य डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम किमान ४० वर्षे स्ट्रॅन्ड मध्ये येत असत. 


एकदा तर चक्क पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी आपल्या मुंबई भेटीत स्ट्रॅन्ड मध्ये भेट देण्याचे ठरविले आणि शानभागांच्या सूचनेवरून रात्री १०.३० वाजता लाल दिव्याच्या गाडीतून सायरनचा आवाज न करता नेहरूंनी स्ट्रॅन्डला भेट दिली आणि आपल्या पसंतीची पुस्तके खरेदी केली. पुढे नेहरूंच्या विनंतीवरून शानभाग स्वतः दिल्लीला जाऊन नेहरूंना पुस्तके देत असत. पण गंमत म्हणजे त्यांनाही ते २०% सूट देत होते. एके दिवशी पंडितजी शानभागांना म्हणाले की, देशाच्या पंतप्रधानासही २०% सवलत का देतोस? त्यावर शानभाग म्हणाले, "आपण देशाचे राज्यकर्ते आहात. सर्व अद्ययावत माहिती आपल्यासाठी तयार ठेवणे,एक नागरिक म्हणून माझे कर्तव्य आणि आणि इतरांना देतो त्याप्रमाणे आपल्यालाही सवलत देताना मला आनंद होतो. '


अशाप्रकारे चांगली चांगली आणि दुर्मीळ पुस्तके समाजाला उपलब्ध करून देण्याचे काम गेली जवळजवळ पंचावन्न वर्षे शानभाग नित्यपणे करत आहेत.त्यांनी अगणित वाचक निर्माण केले,पुस्तक विकत घेण्याची सवय त्यांनी लोकांना लावली आणि त्यांच्या या कारकिर्दीचा गौरव करण्यासाठी त्यांना राष्ट्रपती अब्दुल कलामांच्या हस्ते 'पद्मश्री' हा बहुमान देण्यात आला आहे. केवढी ही भरारी ! एका सामान्य कुटुंबात जन्मलेला नारायण केवळ आपली आवड आणि आपण ठरविलेले ध्येय याचा सातत्याने पाठपुरावा करतो आणि भारतातला 'पद्मश्री' हा बहुमान मिळालेला पहिला पुस्तक विक्रेता होतो, ही काही साधी गोष्ट नाही.


म्हणून नारायण शानभागसारख्या व्यक्तींच्या जीवनाकडून आपणही काहीतरी घेतले पाहिजे. मुळात ध्येयवेडे व्हायला पाहिजे.त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि ध्येय प्राप्त करण्यासाठी सातत्य ठेवले पाहिजे. शानभागांच्या जीवनप्रवासाकडे जर पाहिले तर आपल्या लक्षात येईल की,ठरवलं तर आपणही आपल्याला वाटेल ते साध्य करू शकतो. फक्त आवश्यकता आहे 'स्वतःमध्ये विश्वास असण्याची. '


भरारी ध्येयवेड्यांची - डॉ.प्रदिप पवार

विठ्ठल मारुती कोतेकर 



१०/१०/२२

...आणि देवदूत हसला...! लिओ टाॅलस्टाॅयची ही एक अतिशय प्रसिद्ध व सुरस कथा.

एकदा यमदेवाने आपल्या एका दूताला पृथ्वीवर पाठवलं.एका स्त्रीच्या मृत्यूनंतरच्या गतीचं कार्य त्याच्यावर सोपवलं होतं..तो तिथे पोचला पण...थोडा संभ्रमात पडला.त्या स्त्रीची तीन लहान जुळी ( खरंतर तिळी म्हणतात त्यांना) बाळं रडत होती..त्यांचे बाबा तर खूप आधीच देवाघरी गेले होते,आणि आता आईविना ती अनाथ होणार होती.हे सर्व बघून देवदूताला दया आली तो त्या स्त्रीला आपल्याबरोबर न घेता रिकाम्या हाताने यमदेवाकडे आला, व सर्व परिस्थिती सांगितली ती ऐकून यमराज भडकले, तू काय स्वतःला परमेश्वर समजतोस का?? प्रत्यक्ष परमेश्वरसुद्धा निसर्गनियमांमध्ये हस्तक्षेप करत नाही.मग तू कोण एवढा मोठा लागून गेलास?त्या स्त्रीचा मृत्यू तर अटळ आहे.मी दुसर्‍या दूताकरवी ते काम करीनच पण आता तुला मात्र मी सांगितलेल्या आज्ञेची पूर्तता न केल्याचं फलित म्हणून शिक्षा भोगण्यासाठी पृथ्वीवर जावं लागेल,व जोपर्यंत तू स्वतः तीनवेळा मूर्खपणा करत नाहीस व स्वतःच्या मूर्खपणावर स्वतःच हसणार नाहीस तो पर्यंत तुझी सुटका होणार नाही...तू इथे परत येऊ शकणार नाहीस.(इथे मला एक महत्वाची गोष्ट  सांगाविशी वाटते की,दुसर्‍याच्या चुका व मूर्खपणावर तर अहंकारी माणूस हसतो पण स्वतःच्या मूर्खपणावर हसण्यासाठी तेवढं धैर्य लागतं..) दूत शिक्षा भोगण्यास तयार होता..यमलोकातून त्याला जमिनीवर वस्त्रहीन अवस्थेत हाकललं गेलं.त्याच सुमारास समोरुन एक चर्मकार येत होता.थंडीचे दिवस (व तीसुद्धा रशियातली थंडी) येऊ घातले होते,म्हणून आपल्या बायको व मुलांसाठी गरम कोट व ब्लँकेटस् खरेदी करण्यासाठी तो बाजारात चालला होता.त्याने या वस्त्रहीन देवदूताला बघितलं त्याला दया आली व त्याने घरातील लोकांऐवजी ह्या माणसासाठीच कपडे,ब्लँकेट वगैरे खरेदी केलं व नंतर अचानक त्या चर्मकाराला काय वाटलं देवजाणे तो दूताला म्हणाला,"अशा घरदार नसलेल्या अवस्थेत तू कसा काय जगणार आहेस?" माझ्या घरी चल काही दिवस...! माझी पत्नी तुला बघून चिडचिड करेल पण तू मनाला लावून घेऊ नकोस..काही दिवसांनी सगळं ठीक होईल.त्या दूताला घेऊन तो आपल्या घरी आला ( आता मजा बघा हं!  त्या चर्मकारालाही माहीत नव्हतं,आपण कुठल्या व्यक्तीला घरी नेत आहोत ना त्या पत्नीला समजलं की आपल्या घरी या मनुष्याच्या रुपात कोण आलाय ! ) त्याची ओळख करुन देत चर्मकाराने सांगितलं हा काही दिवस आपल्याकडेच राहणार आहे.घरी आलेल्या आगंतुकाला बघून पत्नीचं टाळकंच सरकलं,त्याच्या समोरच म्हणाली, "इथं आपल्याला गिळायला अन्न नाहीय त्यात भरीस भर म्हणून ही ब्याद का मागे लावून घेतलीय?"

...आणि देवदूत पहिल्यांदा हसला..चांभाराला आश्चर्य वाटलं ती तुला एवढं बोलली आणि तू त्यावर हसत आहेस?? त्यावर देवदूत म्हणाला अशाप्रकारच्या अजून दोन घटना झाल्यावर व त्यावर मी हसल्यानंतर ह्याचं उत्तर देईन..! आजच्या घटनेवर दूत हसला कारण पत्नीला हे माहीत नव्हतं की तिच्या पतिराजांनी ज्याला घरी आणलं आहे तो सामान्य मनुष्य नसून त्याच्यामधे दैवी शक्ती आहे..ज्याच्या पदस्पर्शाने पुढील काही दिवसांतच त्यांचं भाग्य उजळणार आहे...मनुष्याचे विचार किती सीमित व स्वार्थी असतात ना? (हम उतना ही देख लेते हैं जितना हमें ऊपरी तौर पर दिखता हैं नियती के मन में तो कुछ और ही होता हैं ) पत्नीला आपल्या मुलांसाठी गरम कोट व ब्लँकेट न घेतल्याचं दुःख होतं.. जो खो गया उसे देख रही थी जो मिला हैं उसका क्या??उसका तो अंदाज ही नहीं है-मुफ्त ! घर में एक देवदूत आया है।


सात दिवसांतच देवदूत चांभाराचं सर्व कसब शिकला...व देवदूताने बनविलेले चामड्याचे बूट एवढे लोकप्रिय झाले,की जो-तो त्यांची स्तुती करु लागला. देवदूताच्या कौशल्यामुळे हळूहळू तो चांभार धनवान होऊ लागला.अवघ्या सहा महिन्यांत तर त्याची अशी ख्याती पसरली की ह्या चांभारासारखे बूट कोणीही बनवू शकत नाही.अन्य देशांतील राजांचेही जोड बनविण्याचे काम चांभाराकडे येऊ लागले व घरामधे अपार संपत्ती येऊ लागली.दिवस-महीने-वर्ष पुढे सरकत होती..एकदा असं झालं.. सम्राटाचा एक अधिकारी आला..चांभाराकडे  कातडं सोपवलं व म्हणाला हे खूप दुर्मीळ व महागडं कातडं आहे..तुझी कारीगरी सम्राटांना पसंत आहे म्हणून सम्राटांनी तुझ्याकडे हे कातडं आपले बूट बनवण्यासाठी दिलं आहे. चूक झाली झाली तर सम्राट क्षमा करणार नाहीत.लक्षात ठेव सम्राटाच्या पायाकरीता बूट बनवायचे आहेत  स्लीपर नाही..! अधिकार्‍याने स्पष्टपणे खडसावले..! (रशियामधे मृत व्यक्तीला स्लीपर  घालून स्मशानांत नेण्याची प्रथा होती) 

चांभारानेसुद्धा देवदूताला बजावलं हे बघ,सम्राटांच्या पायाकरीता या दुर्मीळ कातड्याचे बूट बनवायचे आहेत. स्लीपर नव्हे व कातडं सुद्धा बूटाच्या मापापुरतेच आहे..काही गडबड झाली तर नसती आफत ओढवेल...एवढं निक्षून सागूंनही देवदूताने स्लीपरच बनवल्या..चांभाराने त्या बघितल्यावर तो इतका क्रोधीत झाला व देवदूताला काठीने झोडपून काढले.. तू मला फासावर लटकवणार आहेस का? इतके वेळा बजावले तरी तू स्लीपर का बनवल्यास?देवदूत जोरजोरात हसू लागला...! तेवढ्यात सम्राटाचा अधिकारी आला व म्हणाला बूट नको स्लीपर बनव...

आपल्या सम्राटांना कालच देवाज्ञा झाली आहे उद्या त्यांचा अंत्यविधी आहे...

( भविष्य अज्ञात असतं व आपण गतकाळातील अनुभवांवर जगत असतो.काल सम्राट असताना बूटासाठी आटापिटा होता.... आज स्लीपर हवी आहे.)

..चांभाराने लगेच त्या स्लीपर दिल्या ... अधिकारी निघून गेल्यावर चांभार देवदूताच्या पाया पडून क्षमा मागू लागला.. मी तुला उगाच मारले...देवदूताने शांतपणे सांगितलं अरे, ह्यात तुझा काहीही दोष नाहीय मी माझ्या कर्माची शिक्षा भोगतोय.आज दुसर्‍यांदा देवदूत हसला कारण भविष्य अज्ञात आहे व आपण विनाशी इच्छांच्या मागे धावत सुटलो आहोत. साध्या घटनांमधेसुद्धा चिडचिड,त्रागा करत बसतो.मृत्यूघटीका समीप असताना जीवनाचे गणित बांधत रहातो व नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच असतं..

देवदूताला जाणवू लागलं त्या तीन अनाथ मुलींचं भवितव्य काय? हा अनाठायी विचार मी करत होतो...!

काही दिवसांतच तिसरी घटना घडली....या चांभाराकडे

एका धनाढ्य घराण्यातील वृद्ध स्त्री आली व बरोबर  तीन सुंदर युवती आल्या..तीनही युवतींचे लग्न ठरलं होतं त्यांच्यासाठी उत्तम चढावांचे जोड बनवून हवे होते.देवदूताने तीन मुलींना पाहताक्षणीच ओळखलं ह्याच त्या तीन मुली होत्या ज्यांच्या मृतप्राय आईकडे बघून त्याला दया आली व नियतीमधे स्वतःहून केलेल्या हस्तक्षेपामुळे तो आज शिक्षा भोगत होता.त्या तिघीजणी अतिशय सुंदर व समृद्ध दिसत होत्या.देवदूताला उत्सुकता वाटली त्यांच्या बरोबर जी वृद्धा आली आहे ती कोण आहे? वृद्ध स्त्रीला विचारल्यावर तिने सांगायला सुरुवात केली.ह्या मुली माझ्या समोरच रहात होत्या.ह्यांची आई लहानपणीच देवाघरी गेली.ती अतिशय दारिद्र्यात दिवस कंठत होती. तिच्या पश्चात् ह्या मुलींचं कसं होणार? मला दया आली व ह्या तिघींना मी दत्तक घेतलं, मलाही संतान नव्हती. मी स्वतःच्या मुलींप्रमाणे ह्यांचं पालनपोषण केलं व आता सम्राटाच्या राजपुत्रांशी ह्या तिघीजणी विवाहबद्ध होणार आहेत...हे ऐकल्यावर..देवदूत तिसर्‍यांदा व शेवटचं हसला....त्याने चांभाराला स्वतःच्या हसण्याचं कारण सांगायला सुरुवात केली.


आज जर त्या तीन मुलींची आई जिवंत असती तर ह्या तिघीजणी दारिद्र्यात खितपत पडल्या असत्या..पण आता आई नसल्याने वृद्ध स्त्रीला दया आली, व तिच्या संपत्तीला वारस मिळाला व तिघीजणींनी समृद्धी उपभोगली..तसेच वृद्ध स्त्रीला संतानसुख मिळालं...!

देवदूताने सांगितलं मी चुकलो होतो..नियती ही माझ्यापेक्षा सूत्रबद्ध व योग्य आहे.तिच्या कार्यामधे मी  हस्तक्षेप केल्याने मला जी शिक्षा मिळाली होती ती आज पूर्ण झाली...आता मी तुझा निरोप घेतो.......!


एवढं बोलून तो

देवदूत पाहता-पाहता तिथून अदृश्य झाला...!


कथा जरी इथे संपली असली तरी त्याचा सारांश मात्र कायम आपल्याबरोबर ठेवायचा आहे...!


लेखक - अज्ञात