विशुद्ध करणारे नवयुगाचे वारे जरी अशा रीतीने वाहू लागले,तरी अद्यापि मध्ययुगातील दुष्टतेचे भूत पश्चिम युरोपच्या मानगुटीस बसलेच होते.हे वारे आले,तरी हे दुष्ट धुके पश्चिम युरोपच्या मुखमंडलास आच्छादून राहिलेच होते.पंधराव्या शतकभर फ्रान्स,
जर्मनी,इटली, स्पेन,बोहेमिया,इत्यादी देशांत हजारो स्त्री-पुरुषांस जिवंत जाळण्यात येत होते.मानवी चरबी सर्वत्र जळत होती व तिची घाण चोहोंकडे भरून राहिली होती. धर्मांध आचार्यांना टीकेचे तोंड बंद करण्यास फारच सोपा उपाय सापडला होता.तो म्हणजे टीकाकारांना ठार मारण्याचा.जे जे चर्चशी सहमत नसत,अगर ज्यांची ज्यांची संपत्ती पाहून पोप-प्रभृतींचा स्वार्थ जागृत होई, त्या साऱ्यांना जिवंत जाळून त्यांची धनदौलत जप्त करण्यात येई!चर्चशी सहमत नसणारे तेवढेच नव्हेत, तर राजकीय गुन्हेगारही 'नास्तिक' म्हणून जाळण्यात येत असत.पोप व राजे हातात हात घालून जात होते.
राजधर्माला धर्माचा व धर्माला राजाचा पाठिंबा असे. राजाविरुद्ध वर्तन ईश्वराविरुद्धच समजण्यात येई.जणू ईश्वरच राजांना अभिषेक करतो.असे मानण्यात येत असे.चर्चने मान्यता दिलेल्या शासनसंस्थेस विरोध करणे हे देहान्त शिक्षेचा गुन्हा करण्यासारखे गणण्यात येई.हा गुन्हा केवळ शासनसंस्थेविरुद्ध नसे,तर चर्चच्याही विरुद्ध असे.जोन ऑफ आर्कची जीवितकथा समजून घेण्यासाठी चर्च व स्टेट यांच्यातील हे परमैक्य लक्षात ठेवणे आवश्यक आहे.चर्चचे अधिकारी त्याला धार्मिक गुन्हा समजत,तो हातून घडल्यावर त्या काळच्या रिवाजाप्रमाणे धार्मिक गुन्ह्याच्या सदराखाली तिचा खटला चालणे क्रमप्राप्तच होते व नास्तिक म्हणून तिला जाळण्यात येणार हेही ठरलेलेच होते.आजच्या चिकित्सक मनाला जोन ऑफ आर्कचे सारे जीवन विश्वासार्ह वाटत नाही;पण पंधराव्या शतकातल्या भोळ्या श्रद्धाळू मनाला तिचे जीवन विचित्र वाटत नसे आणि तत्कालीन परिस्थितीत तिला ज्या प्रकारचे मरण आले,त्या प्रकारचेच येणे साहजिक होते.
मध्ययुगात प्रत्येकजण देवदूतांशी बोले,प्रत्येकाचा चमत्कारांवर विश्वास असे.पॅरिसमध्ये रिचर्ड नावाचा कोणी एक साधू होता,तो आपणास स्वर्गाचा अप्रत्यक्ष आवाज ऐकू येतो व आपणास देवाच्या इच्छेचा अर्थ समजतो असे म्हणे.त्याने साऱ्या पॅरिस शहराला वेड लावले.श्रद्धाळू धर्मभावनांना वाटे की,पॅरिसमध्ये त्याने जणू समुद्रच उंच बनविला! दुसरा एक कार्थेलाईट पंथी थॉमस कॉनेटा नावाचा साधू होता,तो स्वर्गातील देवदूतांनी आपणास धर्माची किल्ली दिली आहे,असे म्हणे.फ्रान्समध्ये व बेल्जियममध्ये त्याच्या प्रवचनास पंधरा ते वीस हजारांपर्यंत श्रोते जमत.ब्रिटनीमधील पिएरेटीनामक एक स्त्री आपल्या बंधुभगिनींस म्हणे, "मी नेहमी ख्रिस्ताशी बोलत असते." एका फ्रेंच धनगराचा एक मुलगा होता,त्याच्या अंगातून रक्ताचा घाम बाहेर येई,असे सांगत.ज्यांच्या अंगात येते,असे स्त्री-पुरुष प्रत्येक प्रांतात असत.आपण स्वर्गातील आत्म्यांशी सदैव बोलतो असे हे स्त्री-पुरुष मानीत व इतरांना मानवयास लावीत.
स्वर्गातील देवदूतांशी व आत्म्यांशी बोलता येते,अशा प्रकारच्या चमत्कारमय कथा छोटी जोन ऑफ आर्क आपल्या आईच्या तोंडून नेहमी ऐके.तिची आई धर्मशील होती.जोनला लिहिता-वाचता येत नव्हते.ते तिला शिकविण्यात आले नव्हते.
धार्मिक दंतकथा व पऱ्यांच्या गोष्टी हेच तिचे शिक्षण. तिला या गोष्टी खऱ्या मानायला शिकविण्यात आले होते.फ्रेंच इतिहासकार मायचेलेट म्हणतो, "चर्चच्या भिंतीजवळ ती जन्मली होती.
चर्चमधील घंटांच्या नादावर ती पाळण्यात आंदुळली जाई,
झोपविली जाई. तिचे मन व तिची बुद्धी ही दंतकथांवर पोसली गेली होती.या सर्वांचा परिणाम म्हणजे,तीच एक जिवंत दंतकथा बनली.तिच्या बापाच्या घराजवळच जंगल होते, त्या जंगलात पऱ्या राहतात असे मानण्यात येई.वर आकाशात नाचणाऱ्या मेघमालांवर किंवा तेजस्वी रथात बसून देवदूत उडत्या पळत्या मेघांमधून जात आहेत, असे तिला दिसे.जेव्हा तिचा बाप शेतात काम करीत असे आणि आई घरकामात मग्न असे,तेव्हा उंबऱ्यावर बसून ती गावातील सारे आवाज ऐकत राही.सर्वांचा मिळून एक संमिश्र संमीलित आवाज होई.अतिमधुर व स्वप्नमय अशी ती अस्पष्ट वाणी तिला गुंगवी. 'माझ्याशी बोलणाऱ्या देवदूतांचाच नव्हे का हा आवाज ? हो, तोच.' असे तिला वाटे.परलोक व इहलोक यांची सीमान्त - रेषा कोठे,कशी,कोण काढणार? स्वर्ग व पृथ्वी जणू एकमेकांशी मिळूनच गेली आहेत व शेजारची माणसे रस्त्यावर एकत्र येऊन भेटतात,बोलतात, त्याप्रमाणे स्वर्गीय देवदूत व मानव एकमेकांस भेटू शकतील.परस्परांशी बोलू शकतील असे तिच्या बालनिर्मळ कल्पनेस वाटे.स्वयंपाकघरांतून आईने हाक मारणे जितके साहजिक,तितकेच देवदूतांनी बोलावणे वा हाक मारणेही साहजिक असून त्यांत चमत्कार वगैरे काही नाही,असे तिला वाटे. इतकेच नव्हे;तर उलट देवदूत देवाच्या या पृथ्वीवरील लेकरांबरोबर कधी बोलत नाहीत असे तिला कोणी सांगितले,असते तर तो मात्र तिला चमत्कार वाटला असता.थोडक्यात सांगायचे तर जोन अशा जगात जगत होती की,तिथे सत्य व असत्य, खरे व काल्पनिक यांत फरक करणे तिला अशक्यप्राय होते.देवदूत आपणास भेटावयास येऊ शकतील व आपणासही त्यांना भेटण्यासाठी वर नेले जाणे शक्य आहे,असे तिला वाटे.
ती अशा काल्पनिक पऱ्यांच्या सुंदर जगात,स्वतःच्या कल्पनारम्य जगात जगत होती.तिच्या या जगात प्रत्यक्ष सृष्टीतील एकच कुरूपता होती,एकाच दुष्ट गोष्टीचा डाग होता व ती म्हणजे,
इंग्रजांनी चालविलेली चढाई होय. फ्रेंच लोक इंग्रजांना 'देवाचा शाप' म्हणत,'नतद्रष्ट व प्रभुशापित लोक' मानीत.हे शापित इंग्रज फ्रान्सच्या दुर्दैवी राज्यावर हल्ले चढवीत होते,सारा प्रदेश उद्ध्वस्त करीत होते;इंग्रज टॉमी फ्रेंच शेतकऱ्यांची पिके कापून नेत होते,त्यांच्या घरादारांची राखरांगोळी करीत होते, गुरेढोरे पळवून नेत होते.कधीकधी मध्यरात्री आसपासच्या गावांहून आश्रयार्थ येणाऱ्या अनाथ स्त्री-पुरुषांच्या व मुलाबाळांच्या आक्रोशाने ती जागी होई.एकदा तिच्या आई-वडिलांसहित या लुटारूपासून रक्षणार्थ पळून जावे लागले.जेव्हा ती आई-वडिलांसहित परत आली,तेव्हा त्यांना काय आढळले? सारा गाव बेचिराख झाला होता,जोनचे घर लुटले गेले होते,चर्चची होळी शिलगलेली होती ! स्वर्गातील देवदूतांचा चांगुलपणा व फ्रान्सची अगतिक दयामय स्थिती या दोन गोष्टी त्या लहान किसानकन्येच्या जीवनात जणू जळजळीतपणे लिहिल्या गेल्या होत्या.
या दोनच गोष्टी तिला दिसत होत्या.बाकी साऱ्याचा तिला जणू विसर पडला होता! 'फ्रान्स- माझा हा फ्रान्स देवाचा लाडका आहे.
माझ्या भूमीवर देवदूतांचे प्रेम आहे' असे तिच्या आईने तिच्या मनावर सारखे बिंबवले होते. फ्रान्सच्या पवित्र भूमीवरून लुटारू इंग्रज डाकूस घालवून देण्यासाठी देवदूत शक्य तितके सर्व करतील अशी तिची श्रद्धा होती;आणि अशी एक भविष्यवाणी सर्वत्र प्रसृत झाली होती की,एक तरुण कुमारी फ्रान्सला वाचवील.जादूगार मर्लिन व 'मी देवदूतांशी बोलते' असे सांगणारी ॲव्हिगगॉनची पवित्र बाई मेरी या दोघांनी हे भविष्य केले होते.आणि जोन आकाशाकडे दृष्टी लावून देवदूत फ्रान्समधून इंग्रजांना घालवून देणारा उद्धारकर्ता कधी पाठवितात.याची वाट पाहत बसे,ती या स्वप्नातच जणू मग्न असे.आणि उन्हाळ्यातील तो पवित्र दिवस आला होता.सारे श्रद्धाळू लोक त्या दिवशी उपवास करीत होते.
पूर्वी कधी आली नव्हती,इतकी स्वर्ग व पृथ्वी ही जवळ आली होती व जोनला भास झाला की, आसपासच्या निःस्तब्ध व पवित्र शांततेतून आपणास कोणीतरी हाक मारीत आहे.मुख्य देवदूत मायकेल याचा तो आवाज होता. मायकेल काय सांगत होता? तो म्हणाला, "जोन, तू चांगली मुलगी हो व नेहमी चर्चमध्ये जात जा." तिला जरा भीती वाटली;पण आश्चर्य वाटले नाही.देवदूत इतरांशी बोलतात असे तिने ऐकले होते.
मग आपणाशी तो का नाही बोलणार,असा विचार तिच्या मनात आला.सेंट मायकेल हा तिला काही परका नव्हता.त्याची गोष्ट तिला माहीत होती.त्याचे चित्रही तिने पाहिले होते.गावातील धर्मोपाध्यायाने सांगावे, त्याप्रमाणे मायकेलने आपणास सांगितले असे तिला वाटले, 'चांगली मुलगी हो व चर्चमध्ये जात जा', असे मायकेलने सांगितले यात आश्चर्य ते काय ?
देवदूत आपणाशी बोलतात हा भ्रम तिला दिवसेंदिवस अधिक सत्य वाटू लागला.तिला आणखी देवदूत भेटू लागले.
मायकेलनंतर सेंट मार्गराइट व सेंट कॅथेराइन यांनी तिला भेटी दिल्या.जोनला त्यांचा परिचय होताच, तिला त्यांच्या मूर्ती जर हवेत दिसताच त्यांच्या चित्रांवरून तिने त्यांना पटकन ओळखले.
जोनला देवदूत प्रथम भेटले,त्या वेळी ती केवळ तेरा वर्षांची होती.ते तिच्याशी रोज बोलत.कधीकधी ते दिवसातून अनेकदा येत व बोलत.तिला ते स्पष्टपणे दिसत व त्यांचे आवाज स्पष्ट ऐकू येत.
चर्चमधील घंटा वाजत,तिला त्यांच्या मूर्ती दिसत व आवाज ऐकू येत. प्रथम प्रथम हे देवदूत तिच्याशी सामान्य गोष्टींबाबतच बोलत.
एके दिवशी देवदूत मायकेल तिला म्हणाला, 'फ्रान्सच्या राज्याविषयी मला दया वाटते,हे ईश्वराच्या कन्ये,आपला गाव सोडून फ्रान्सच्या साह्यार्थ जाण्याची तुझी पाळी आली आहे." मायकेलने तिला 'ईश्वराची कन्या' हे नाव दिले होते.पुन्हा दुसऱ्या एका वेळी 'तू फ्रान्सचे राज्य योग्य राजाला ज्या राजाचा कायदेशीर हक्क आहे,त्याला परत दे'असे त्याने तिला आग्रहाने सांगितले.
मर्लिनचे भविष्य खरे होणारसे दिसू लागले.डॉमरेमी गावची किसान कन्या जोन 'फ्रान्सची संरक्षणकर्ती' म्हणून प्रभूकडून निवडली गेली व हळूहळू जोनलाही तेच आपले जीवितकार्य,
असे वाटू लागले.ती शाळेत शिकलेली नव्हती.तिचे जीवन श्रद्धामय होते.तिची स्वतःची उत्कट इच्छा तिला जणू स्वच्छ,
स्पष्ट व मूर्त अशी दिसत होती.ती मध्ययुगातील प्रतिभासंपन्न बालिका होती,कविहृदयाची कन्यका होती.तिच्या मनातील विचारांनी जणू मूर्तरूप घेतले,त्यांना जणू पंखच फुटले ! तिला आपलेच विचार देवदूतांच्या स्वरूपात वर आकाशात दिसू लागले व ते प्रभूची आज्ञा तिला समजावून देऊ लागले.प्रभूची कोणती आज्ञा ? प्रभूचा कोणता आदेश ?
"तुझे घरदार सोड,सारी प्रिय आप्तमंडळी सोड,व जोन ! फ्रान्सच्या राजाच्या मदतीला जा",असा आदेश तिला ऐकू आला. तेव्हा तिने थरथरत विचारले,"मी एक क्षुद्र मुलगी आहे.मला घोड्यावर बसता येत नाही,लढावे कसे हेही माहीत नाही."तेव्हा सेंट मायकेलने तिला सांगितले, "रॉबर्ट डी बॉड्रिकोर्ट याच्याकडे जा.तो डॉमरेमी गावचा व व्हॉकूलर्स शहराचा स्वामी आहे.तो तुला सारी मदत देईल,माणसे देईल,साधने देईल.मग तू चिनॉन येथे जा. तिथे फ्रान्सच्या गादीचा वारस - तो भित्रा डॉफिन सातवा चार्लस्,जो देशाचा अनभिषिक्त राजा एका राजवाड्यात राहत आहे."जोन देवदूतांच्या सांगीप्रमाणे वॉड्रिकोर्टकडे गेली.पण तो साशंक होता.तो तिला मदत करीना.
तथापि,सामान्य जनता तिच्याभोवती गोळा झाली, तिच्या मदतीला आली.ते मध्ययुगातील श्रद्धाळू ख्रिश्चन होते.त्यांचा तिच्या सांगण्यावर विश्वास बसला.देवदूत वगैरे सर्व त्यांना खरे वाटले.
लोकांनी तिला एक घोडा विकत घेऊन दिला व हत्यारी लोकांची एक टोळीही तिच्याबरोबर दिली.जनतेचा हा उत्साह पाहून बॉड्रिकोर्टही शेवटी उत्साहित झाला व त्याने जोनला एक समशेर बक्षीस दिली.आणि इ.स. १४२९च्या वसंत ऋतूच्या प्रारंभी सतरा वर्षांची ही किसानकन्या जोन पुरुषाच्या पोशाखात आपल्या सैनिकांसह दुःखीकष्टी फ्रान्सचे दुःख दूर करण्यासाठी,मायभूमीच्या जखमा बऱ्या करण्याच्या ईश्वरदत्त जीवनकार्यासाठी निघाली.
फ्रान्सचा कायदेशीर राजा सातवा चार्लस हा चंचल वृत्तीचा,
दुबळा,मूर्ख,भोळसट व श्रद्धाळू असा असंस्कृत मनुष्य होता.
जोन त्याच्यासामोर आली तेव्हा त्याचे दरबारी लोक त्याच्याभोवती होते;पण राजा कोणता हे ओळखण्यास तिला अडचण पडली नाही,कारण तो राजवाड्यातील अत्यंत कुरूप पुरुष होता.
तो पंधराव्या शतकातील सर्व प्रकारच्या धार्मिक चमत्कारांवर व भोळसट कथांवर विश्वास ठेवणारा होता.त्याला जोनने आपली सर्व कथा निवेदन करताच, त्याचा तिच्यावर एकदम विश्वास बसला.मर्लिनचे व ॲव्हिगॉनच्या मेरीचे ते भविष्य त्यालाही स्फूर्ती देते झाले. 'एक कुमारी फ्रान्सला वाचवील' असे ते भविष्य होते,व त्याच्यासमोर ती कुमारी उभी होती.ती ईश्वराच्या आज्ञेने संबद्ध व राजाला विजय आणि मुकुट देण्याला सिद्ध होती.त्या किसान- किशोरीची ती उत्कट इच्छा सातव्या चार्लस राजाचीही इच्छा झाली.देवदूतांच्या,म्हणजेच तिच्या मनाच्या योजनेप्रमाणे तिला दोन गंभीर कर्तव्ये पार पाडायची होती.एक शापित इंग्रजांच्या हातून ऑर्लिन्स शहर मुक्त करणे व दुसरे, डॉफिनला हीम्स शहरी नेऊन राजा करणे,फ्रान्सचा फ्रान्सच्या राजघराण्यातला - पहिला ख्रिश्चन राजा क्लोव्हिस याला ज्या पवित्र तेलाने राज्याभिषेक करण्यात आला होता,त्याच तेलाने ती डॉफिनलाही राज्याभिषेक करू इच्छित होती.
ऑर्लिन्स येथील कुमारी जॉन ऑफ आर्क : फ्रान्सची माता,मानवजातीची कथा,हन्री थॉमस,अनुवाद - साने गुरुजी
राजाने जोनचे ईश्वरदत्त कार्य मान्य केले व तिला सेनापती नेमले.जे काही सैन्य तो आपल्या निशाणाभोवती गोळा करू शकला,त्याचे आधिपत्य तिच्याकडे देण्यात आले.स्त्रियांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढणे,ही त्या काळात काही अपूर्व गोष्ट नव्हती.
अमीन्सच्या लढाईत तीस स्त्रिया जखमी झाल्या होत्या.
बोहेमियातील जोहान्स हस याच्या अनुयायांतील कित्येक स्त्रियांनीही लढाईत भाग घेतला होता.मध्ययुगातील असा एकही वेढा नसेल,की ज्यात एखाद्या स्त्रीने अपूर्व शौर्य गाजविले नव्हते - नाव केले नव्हते.जोनची लष्करी मदत घेणे ही गोष्ट चार्लसला चमत्कारिक वाटली नाही.त्याला ती गोष्ट साहजिक वाटत होती.त्याच्या दृष्टीने तिच्यात अनैसर्गिक असे काहीच नव्हते.जुन्या करारातील डेबोरा,जूडिथ व जेल या स्त्रिया त्याला आठवल्या.त्या स्त्रियांनी ईश्वराच्या मदतीने इस्रायलचे शत्रू पराभूत केले होते.तशीच आज ही जोन उभी राहिली होती.फ्रान्सच्या शत्रूना जिंकण्यासाठी देवदूतांनीच तिलाही बोलाविले होते. देवदूत मायकेल तिला मार्ग दाखवीत तिच्यापुढे चालला होता..तिच्या दोहो बाजूस सेंट कॅथेराइन व सेंट मार्गराइट होते.अशा रीतीने प्रभूचा आदेश पार पाडण्यासाठी निघालेली ही संस्फूर्त किसानकन्या इंग्रजांना हाकून देण्याच्या कामी आपणास नक्की मदत करील,
असे राजाला वाटले.तिने आठ हजार सैन्य उभे केले.त्या काळात आठ हजार सैन्य म्हणजे काही अगदीच लहान नव्हते.हे सैन्य बरोबर घेऊन ऑर्लीन्स शहराला वेढा घालणाऱ्या इंग्रजांवर तिने चाल केली. हिमधवल चिलखत घालून व काळ्या-काळ्या घोड्यावर स्वार होऊन सैन्याच्या अग्रभागी चालणाऱ्या या तरुणीची धीरोदात्तता,तशीच निर्भयता,पाहून जनता चकित झाली.
तिने तलवार व कुऱ्हाडी बरोबर घेतल्या होत्या.तिच्या हातात एक श्वेत ध्वज होता व त्यावर देवांची आणि देवदूतांची रंगीत चित्रे काढलेली होती.ती त्यांना स्वर्गातून उतरलेली अभिनव वीरांगना भासली.पण ती स्वभावाने युद्धप्रिया नव्हती.लढल्याशिवाय इंग्रजांना फ्रान्समधून घालवून देता आले तर किती छान होईल,असे तिला वाटत होते. तिने " मी आपल्या हातातल्या तलवारीने कोणासही मारणार नाही." अशी प्रतिज्ञा केली होती.ऑर्लीन्सला आल्यावर तुम्ही येथून जा असे तीन शब्दांचे पत्र तिने इंग्रजांस लिहिले.
ऑर्लीन्सच्या लढाईचा वृत्तांत सर्वांस माहीतच आहे. जोनने शेवटी इंग्रजांवर जय मिळविला.तो विजय म्हणजे चमत्कार नव्हता.
इंग्रजांचा सेनापती टाल्यॉट शूर; पण मतिमंद होता.त्याचे सैन्यही दोन-तीन हजारच होते व त्यात पुष्कळ फ्रेंचही होते.हे दोन-तीन हजार सैन्य आसपासच्या किल्लेकोटांच्या रक्षणार्थ अनेक ठिकाणी पांगलेले होते.हे किल्ले ऑर्लीन्सच्याभोवती होते.या पांगलेल्या सैन्यात दळणवळण नसल्यामुळे जोनला आपल्या संरक्षक सैन्यासह ऑर्लीन्स शहरात प्रवेश करता आला.फ्रेंच व इंग्रज दोघांसही जोनचे सैन्य संस्फूर्त वाटे.त्यांचा सेनानी जोन नसून जणू प्रत्यक्ष मायकेल होता,असे त्यांना वाटे. मग फ्रान्समधून इंग्रजांना हाकलून देण्यासाठी अवतरलेल्या या मायकेलच्या हल्ल्यासमोर कोण टिकणार?अर्थातच इंग्रजांचा पूर्ण मोड होणार,ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट होती.फ्रेंच सैनिक इंग्रज सैनिकांसारखेच दुष्ट व हलकट होते.युद्धाच्या उदात्ततेचे काव्य त्यांच्याजवळ नव्हते.युद्ध म्हणजे फायद्याचे,आनंदाचे काम असेच त्यांनाही वाटे.चाच्यांप्रमाणे किंवा डाकूंप्रमाणे त्यांनाही युद्ध ही एक लुटालुटीची बाब आहे असेच प्रामाणिकपणे वाटे.शिपाई सभ्य असणे वा सदृहस्थ असणे,ही गोष्ट केवळ अशक्य आहे;असे ते प्रांजळपणे कबूल करीत. युद्ध हा त्यांचा धंदा होता व त्या धंद्याला अनुरूप असे उघडउघड पशुत्वाचे प्रकार करण्यास ते मागेपुढे पाहत नसत.ऑर्लीन्स येथील जोनच्या सैन्याचा सेनापती ला हायर एकदा म्हणाला, "ईश्वर सैन्यात दाखल झाला,तर तोही दुष्ट व नीच बनल्याशिवाय राहणार नाही."
पण अदृश्य देवदूतांचा अंश अशी जोन तिथे असल्यामुळे तिच्या अस्तित्वामुळे त्या सैनिकांतही जरा पावित्र्य आले.ते पवित्र शिपाई बनले.फ्रेंच शिपाई बनले. फ्रेंच सैन्यातील शेवटच्या शिपायापर्यंत सारे खरोखरच मानीत की,देवदूत आपल्या बाजूने लढत आहेत व इंग्रज सैनिकांसही तसेच वाटत होते.काही इंग्रजांना असे वाटत होते की,जोनच्या बाजूने देवदूत लढत नसून सैतान व भुते लढत आहेत.पण एका गोष्टीची इंग्रजांना खात्री होती ते अजिंक्य अशा सैन्यांशी लढत होते.पृथ्वीवरच्या शक्तींचा मुकाबला करण्यास इंग्रज तयार होते.पण स्वर्गातल्या वा नरकातल्या शक्ती विरुद्ध लढण्यास त्यांना बळ नव्हते.थोडक्यात म्हणजे फ्रेंचांच्या सैन्याधिकामुळे तद्वतच दैवी शक्तीच्या भीतीमुळे इंग्रज ऑलॉन्समधून हाकलले गेले.
शिल्लक भाग पुढील लेखामध्ये…