कुमाऊँचे नरभक्षक - जिम कॉर्बेट,अनुवाद - वैशाली चिटणीस,डायमंड पब्लिकेशन्स,३१.०७.२३ या लेखातील पुढील भाग वेळच्या वेळी क्रमशः प्रकाशित केले जातील.
काडतुसांमधल्या काळ्या पावडरीमुळे निर्माण झालेल्या धुरामुळे मला काही दिसत नव्हतं.माझा नेम बहुधा एखाद्या खडकावर किंवा पालापाचोळ्यावर लागला असल्याचं माझ्या माणसांनी मला सांगितलं.त्याच जागेवर बसून मी रायफलमध्ये पुन्हा बार भरला.मी आधी ज्या जागेवर नेम धरला होता,त्याच्या खाली, गवतात मला हालचाल दिसत होती.तिथेच मला घोरूलचा पार्श्वभाग दिसला.ते गवतातून पूर्ण बाहेर आलं आणि त्याने डोंगरउतारावरून खाली गडगडत यायला सुरुवात केली.अर्ध्यावर खाली आल्यावर ते घनदाट गवतात दिसेनासं झालं.त्याच्या या धडपडीमुळे गवतात पडलेल्या दोन घोरूलांना सावधगिरीचा इशारा मिळाला आणि त्या गवतातून बाहेर येऊन ती वर, डोंगराच्या दिशेने धावायला लागली.
आता ती अधिक जवळच्या टप्प्यात होती.माझ्यासमोरच्या पानांमधून मी नीट लक्ष केंद्रित केलं.त्या दोघांपैकी आकाराने मोठ्या असलेल्या घोरूलाचा वेग कमी व्हायची वाट बघायला लागलो.तो कमी होताच,मी त्याच्या पाठीत गोळी झाडली.
त्याबरोबर दुसऱ्या घोरूलाने त्याने तिरपं वळून डोंगराच्या दिशेने धावायला सुरुवात केली,तेव्हा मी त्याच्यावर गोळी झाडली.
कधी कधी असं होतं.अशक्य वाटणारी एखादी गोष्टदेखील करणं शक्य होऊन जातं.फारशा आरामदायी नसलेल्या,काहीशा अडचणीच्या जागेत पडून,वरच्या दिशेने ६० अशाच्या कोनात २०० यार्डावर गळ्याचा फक्त लहानसा पांढरा ठिपका दिसत असलेल्या त्या घोरूलवर गोळी झाडल्यावर नेम बरोबर लागण्याची दहा लाखात एकदेखील शक्यता नव्हती.पण तरीही त्या गोळीचा नेम बरोबर लागला आणि निमिषार्धात ते घोरूल मरून पडलं,
डोंगरकडांवरून घरंगळत,छोट्या दऱ्या आणि दगड पार करत ते त्याच्या दोन साथीदारांजवळ येऊन पडलं.त्या दोन साथीदारांमुळे वाटेमधलं गवत दबल गेलं होतं.अशा पद्धतीने त्या दरीत ती तीन जनावर आमच्या पुढ्यात येऊन पडली.
रायफलचा अशा पद्धतीने वापर झालेला कधीच बघितलेला नसल्यामुळे आश्चर्यचकित झालेल्या त्या माणसांचे चेहरे बघणं मोठं आनंददायक होतं.त्या क्षणी सगळे जण जणू त्या नरभक्षकाला विसरले आणि तिन्ही घोरूल उचलून नेण्यासाठी गडबडगोंधळ करू लागले.
आमची ही मोहीम अनेक अर्थानी यशस्वी ठरली. घोरूलचं मांस मला सगळ्यांनाच देता तर आलंच,पण त्याचबरोबर सगळ्या गावाचा विश्वास जिंकता आला. माणसांना शिकारकथांमध्ये असलेलं औस्तुक्य कधीच कमी होत नाही.त्यामुळे माझ्याबरोबर आलेल्या तीन माणसांनी घोरूल सोलून त्याचे वाटे करताना आपल्या कल्पनाशक्तीला पूर्ण वाव दिला.मोकळ्या जागेत बसून नाश्ता करत असताना मी एका मैलावरून घोरूलला कशी गोळी घातली होती,माझ्या जादूच्या रायफलने घोरूलांना नुसतं मारलंच नव्हतं,तर माझ्या पायाशीदेखील कसं आणून टाकलं होतं याची वर्णनं ऐकून त्या तिघांच्या भोवती जमलेल्या गर्दीने टाकलेले सुस्कारेही मला ऐकू येत होते.
मला कुठे जाण्याची इच्छा होती आणि त्यासाठी किती माणसं सोबत लागणार होती,असं गावच्या प्रमुखाने मला दुपारच्या जेवणानंतर विचारलं.माझ्यासोबत शिकारीला आलेल्यांमधल्या दोघांची निवड तिथे चकरा मारणाऱ्या उत्साही लोकांच्या गर्दीतून मी केली. नरभक्षक वाघिणीने केलेल्या शिकारीची सगळ्यात अलीकडची दुर्दैवी घटना जिथे घडली होती,त्या जागेची पाहणी करण्यासाठी मी त्यांना घेऊन निघालो.
या डोंगराळ भागात हिंदू लोक राहतात आणि ते मृतदेहाचं दफन करतात.त्यांच्यामधल्याच कुणाला तरी नरभक्षक वाघाने अशा पद्धतीने मारलेलं असतं,तेव्हा मृत व्यक्तीचं दफन करण्यासाठी तिच्या नातेवाइकांना तिच्या शरीराचा थोडासा भाग - मग तो अगदी हाडाचा एखादा तुकडा का असेना मिळवणं क्रमप्राप्त असतं. त्या महिलेचा दफनविधी अजून व्हायचा होता.आम्ही त्या जागेवर जायला निघालो,तेव्हा तिच्या शरीराचा मिळेल तो भाग घेऊन येण्याची तिच्या नातेवाइकांनी आम्हाला विनंती केली.
मला अगदी लहानपणापासूनच वाचनाचा,जंगलातल्या खुणांचा अर्थ लावण्याचा छंद आहे.ती महिला जेव्हा मारली गेली होती,तेव्हा तिथे उपस्थित असलेले साक्षीदार मला भेटले होते,पण साक्षीदारांवर नेहमीच विसंबून राहता येत नाही.उलट जंगलातल्या खुणा याच घडलेल्या घटनेच्या खऱ्याखुऱ्या नोंदी असतात.घळीच्या बाजूने,झाडाच्या दिशेने आल्याने वाघीण इतरांना दिसू शकली नसण्याची शक्यता असल्याचं त्या ठिकाणी पोहोचल्यावर आणि जमिनीवर एक नजर टाकल्यावर माझ्या लगेचच लक्षात आलं. झाडाच्या खाली असलेल्या घळीत प्रवेश करून पाहणी केल्यावर मला जमिनीवर तिच्या पायांचे ठसे दिसले.ते खालच्या दिशेला असलेल्या दोन मोठ्या दगडांच्या दिशेने गेले होते.त्या ठशांवरून ती वाघीण असल्याचं आणि तिच्या आयुष्याचा सर्वोत्तम काळ संपून उतरणीचा सुरू झाल्याचं दिसून येत होतं.शिकारीच्या वेळी वाघीण दरीतून वर येऊन,झाडापासून साधारण दहा यार्ड अंतरावर दगडाच्या मागे थांबून,ती महिला झाडावरून खाली उतरण्याची वाट बघत राहिली होती. त्या महिलेची हवी होती तेवढी पानं सगळ्यांच्या आधी तोडून झाली होती.ती साधारण दोन इंची फांदीच्या आधाराने खाली उतरत असतानाच वाघीण सरपटत पुढे आली होती आणि मागच्या पायांवर उभं राहून तिने त्या महिलेचे पाय पकडले होते आणि ओढत तिला घळीत नेलं होतं.त्या दुर्दैवी महिलेने फांदीला किती घट्ट धरून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला होता,ते त्या फांदीकडे बघून समजत होतं.झाडाच्या खडबडीत सालीला तिच्या तळहाताच्या कातडीचा घासला गेलेला भाग लागला होता.
वाघिणीने तिला जिथे मारलं होतं, तिथे त्यांच्यामध्ये झालेल्या झटापटीच्या खाणाखुणा दिसून येत होत्या;साकळलेल्या रक्ताचा एक मोठा डाग दिसत होता.तिथून माग घेत आम्ही निघालो.
सुकलेले डाग दीपर्यंत आणि नंतर पलीकडच्या बाजूला गेलेले दिसत होते.दरीतून बाहेर पडल्यावर पुढे एका झुडपात ती जागा सापडली,जिथे वाघिणीने आपली शिकार खाऊन टाकली होती.
नरभक्षक वाघ वा वाघीण माणसाचं डोकं,हात आणि पाय खात नसल्याची एक लोकप्रिय समजूत आहे,पण ती चुकीची आहे.
नरभक्षकांच्या खाण्यामध्ये व्यत्यय आणला नाही,तर ते रक्ताळलेल्या कपड्यांसह सगळं खात असल्याचं मी एका प्रसंगी बघितलं आहे.अर्थात,ती एक वेगळीच कहाणी आहे.तिच्याबद्दल पुन्हा कधीतरी !
या जागेवर आम्हाला त्या महिलेचे कपडे आणि काही हाड मिळाली.ते सगळं आम्ही आमच्यासोबत आणलेल्या स्वच्छ कापडात गुंडाळून घेतले.एकूण शरीराचा भाग म्हणून ती हाडं अगदी थोडी असली,तरी ती दफन विधीसाठी पुरेशी होती.आता या महिलेच्या अस्थी गंगामातेला अर्पण करता येणार होत्या.
चहा घेतल्यानंतर मी आणखी एका दुर्घटना स्थळाला भेट दिली.एका सार्वजनिक रस्त्यामुळे मुख्य गावापासून वेगळा झालेला तो काही एकरांचा परिसर होता.या जागेच्या मालकाने रस्त्यालगतच,पण डोंगरावर स्वतःसाठी एक झोपडी बांधली होती.त्याला चार वर्षांची मुलगी आणि सहा वर्षांचा मुलगा होता.तो,त्याची बायको,तिची धाकटी बहीण आणि त्याची दोन मुलं असे सगळे तिथे राहत होते.त्याची बायको आणि तिची बहीण एक दिवस सकाळी घरापासून थोडं वर, डोंगरावर गवत कापत असताना अचानक वाघीण तिथे आली होती आणि तिने त्या माणसाच्या बायकोला ओढून नेलं होतं.तिची धाकटी बहीण त्या वाघिणीमागे जवळजवळ १०० यार्डाचं अंतर हातात काठी उगारून, हवं तर मला घेऊन जा,पण माझ्या बहिणीला नेऊ नको.असं ओरडत धावत गेली होती.तिचं हे धाडसी कृत्य गावामधले लोक बघत होते.त्या मृत बाईला शंभरेक यार्डापर्यंत वाहून नेल्यानंतर वाघिणीने तो मृतदेह खाली ठेवला होता आणि तिच्या पाठलागावर असलेल्या तिच्या बहिणीकडे वळली होती.मोठ्याने डरकाळ्या फोडत वाघिणीने बहिणीच्या दिशेने उसळी मारताच बहीण मागे वळली होती आणि डोंगरउतारावरून वेगाने धावत,रस्ता ओलांडत गावाच्या दिशेने धावत सुटली होती.डोंगरावर काय घडलं होतं,ते तिला गावातल्या लोकांना सांगायचं होतं.त्यांनी तो सगळा प्रकार बघितला असल्याचं तिला माहीतच नव्हतं.प्रचंड वेगाने धावत आल्यामुळे तिला श्वास घेता येत नव्हता.ती प्रचंड घाबरली होती. 'काय आणि कसं सांगू' असं तिला झालं होतं.त्यामुळे तिचं सगळंच बोलणं असंबद्ध होतं.
त्यानंतर वाघिणीने ओढून नेलेल्या बाईची सुटका करण्यासाठी गावातली काही माणसं ताबडतोब बाहेर पडली होती.ती रिकाम्या हाताने परत येईपर्यंत या बहिणीची वाचा गेली होती.
मला ही सगळी गोष्ट गावात सांगण्यात आली होती.मी त्या झोपडीच्या दिशेने जाण्यासाठी डोंगर चढायला सुरुवात केली,तेव्हा ती बहीण कपडे धुवत होती.तिची वाचा जाऊन जवळजवळ वर्ष झालं होतं.तिच्या डोळ्यात दिसणारी बेदना वगळता,मला ती अगदी नॉर्मल वाटली.मी तिच्याशी बोलण्यासाठी थांबलो आणि तिच्या बहिणीला मारणाऱ्या वाघिणीच्या शिकारीसाठी मी आलो असल्याचं तिला सांगितलं.हे ऐकल्यावर तिने दोन्ही हात जोडले आणि माझ्या पायांना स्पर्श करण्यासाठी ती खाली वाकली.तिच्या या वागण्याने मला ओशाळल्यासारखं झालं,पण तिचं हे वर्तन मी समजू शकत होतो.मी तिथे नरभक्षक वाघिणीला मारण्याच्या उद्देशाने गेलो होतो खरा,
पण ती त्याच परिसरात दुसऱ्यांदा शिकार करत नसल्याची तिची ख्याती होती.एकदा खाऊन टाकलेल्या शिकारीकडेही ती पुन्हा परतत नसे.शेकडो चौरस मैल परिसरात तिचा वावर होता.त्यामुळे माझं उद्दिष्ट पूर्ण करणं,म्हणजे गवताच्या भाऱ्यामध्ये सुई शोधण्यासारखं होतं.
या मोहिमेसाठी नैनितालला येताना मी कितीतरी गोष्टी ठरवल्या होत्या.त्यांतली एक करायचा प्रयत्नही केला होता,पण ती माझ्या आवाक्याबाहेरची असल्याचं लक्षात आल्यामुळे पुन्हा ती करायला प्रवृत्त झालो नव्हतो.कुमाऊँमध्ये आलेली ही पहिलीच नरभक्षक वाघीण असल्यामुळे ज्याच्याशी सल्लामसलत करता येईल,असं तिथे कुणीही नव्हतं,पण तरीही काहीतरी करणंही आवश्यक होतं.त्यामुळे वाघीण दिसण्याची शक्यता असलेल्या ज्या ज्या जागा गावकऱ्यांनी सांगितल्या होत्या,त्या सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत धुंडाळत मी पुढचे तीन दिवस मैलोमैल फिरलो.
इथं मला थोडं विषयांतर करून प्रचलित झालेल्या एका अफवेचं खंडन करायचं आहे.ती अशी की,या आणि अशा अनेक प्रसंगी मी एका खेडुत बाईचा पोशाख करून जंगलात जातो,नरभक्षक वाघांना माझ्याकडे आकर्षित करून घेतो आणि कोयत्याने किंवा कुऱ्हाडीने त्यांना मारून टाकतो.काही वेळा मी एखादी साडी गुंडाळून गवत कापणं किंवा झाडावर चढून पानं तोडणं हे प्रकार केले आहेत,हे खरं आहे, पण या युक्त्या काही यशस्वी झालेल्या नाहीत.दोन प्रकरणांमध्ये मी ज्या झाडांचा आसरा घेतला होता, तिथपर्यंत वाघाने माझा पाठलाग केला होता.त्यांपैकी एकदा तो दगडामागे लपला आणि दुसऱ्या वेळी एका तुटून पडलेल्या झाडामागे लपून राहिला.या दोन्ही प्रकरणांमध्ये त्याने मला गोळी चालवण्याची संधी दिली नाही.
असो.मूळ विषयाकडे येऊ या.आता वाघिणीने हा परिसर सोडल्याचं दिसत असल्यामुळे पालीच्या लोकांची नाराजी पत्करून मी १५ किलोमीटर पूर्वेला असलेल्या चंपावतला जायचं ठरवलं.त्यासाठी सकाळी लवकर प्रवासाला सुरुवात केली.
धुनघाट इथं नाश्ता केला आणि सूर्यास्तापर्यंत चंपावतला पोहोचलो.या प्रवासामधले सगळे रस्ते अतिशय असुरक्षित मानले जात होते.एका गावातून दुसऱ्या गावात किंवा एका बाजाराच्या ठिकाणाहून दुसऱ्या बाजाराच्या ठिकाणी जायचं असेल,तर लोक मोठ्या समूहाने जात. धुनघाटहून निघालो,तेव्हा आम्ही आठ जण होतो. वाटेतल्या गावांमधले लोक आम्हाला येऊन मिळत गेले आणि चंपावतला पोहोचलो,तेव्हा आम्ही ३० जण झालो होतो.