ज्यूल्स व्हर्न याने काल्पनिक विज्ञानकथा लिहिल्या असे पूर्वी वाटत असले तरी आता तसे म्हणण्याचे धाडस कोणी करील असे वाटत नाही.विज्ञानाच्या काटेकोर चौकटीत आपल्या सर्व गोष्टी बसवून ज्यूल्स व्हर्न याने कथा वाङ्मयाची नवीन प्रथा पाडली.त्याच्या प्रतिभेने भूमंडळ,
आकाश,सागर या सर्व ठिकाणी संचार केला होता आणि तो असा विलक्षण द्रष्टा होता की एकोणिसाव्या शतकात जन्म घालवूनही त्याने विसाव्या शतकातील रेडिओ,
सिनेमा, विमान यासारखे शोध कल्पनेने हेरून ठेवले होते.
पण त्याच्या काल्पनिक भराऱ्या कधीच सत्यसृष्टीत उतरलेल्या आहेत.८० दिवसात कशाला?आता आपण ८६ मिनिटातच पृथ्वी प्रदक्षिणा करू शकत.! या गोष्टीला जितका काळ जावा लागला त्याहूनही कमी काळ आता आपण करीत असलेल्या अंतराळ प्रवासाला लागणार आहे.
समजा की १५० वर्षांनी एका अज्ञात सूर्याच्या दिशेने पृथ्वीवरील अंतराळयानाने झेप घ्यायचे ठरविले.
आज प्रवाशांना घेऊन जगपर्यटन करणाऱ्या प्रचंड बोटीएवढे ते अंतराळयान असेल.जवळ जवळ एक लाख टन वजनाचे,त्यापैकी ९९८०० टन वजन इंधनाचेच असेल.अंतराळात पुढे प्रवास करीत राहणाऱ्या यानाचे वजन राहील २०० टन.अशक्य वाटते? आज आपण पृथ्वीभोवती फिरत असतानाच एकेक भाग जोडून जोडून प्रचंड अंतराळयान बांधू शकतो.पण २५-३० वर्षांतच याचीही आवश्यकता राहणार नाही.त्यावेळी आपण चंद्रावरसुद्धा एखादे प्रचंड अंतराळयान बांधून ते तिथून सोडायची व्यवस्था करू शकू,आजच्या इंधनाचा मोठा भाग पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेच्या बाहेर पडण्यासाठी फुकट जातो आहे.फोटॉन रॉकेटसचा शोध म्हणूनच जोरात चालू आहे.ती वापरून उडवलेली अंतराळयाने जवळ जवळ प्रकाशवेगाने जातील.फोटॉन रॉकेटसच्या इंधनावर उडणाऱ्या यानांचा उपयोग आपल्या सूर्यमालेच्याही कक्षा भेदून अंतराळ स्वारीसाठी आपण करू शकू.
नुसती कल्पनाही मनाला धक्कादायक वाटते ना?पण आज आपण अंतराळ युगाच्या उंबरठ्यावर उभे असलो तरी काही वर्षांपूर्वी हीच परिस्थिती होती हे लक्षात घ्यायला काहीच हरकत नाही.ज्यावेळी आपल्या पूर्वजांनी पहिली आगगाडी,पहिली मोटार,पहिले विमान पाहिले, आपल्या मागच्या पिढीने प्रथमच हवेतून आलेले संगीत ऐकले किंवा रंगीत टीव्ही पाहिला,त्या त्या काळात या अभूतपूर्व अशाच घटना होत्या. आपण पहिले अंतराळ उड्डाण पाहिले, उपग्रहाद्वारे प्रक्षेपित केलेली चित्रे पाहिली, बातम्या ऐकल्या.मग आपले नातू,पणतू वेगवेगळ्या सूर्यमालांवर प्रवास करतील आणि मोठमोठ्या तंत्रज्ञान महाविद्यालयात अज्ञात विश्वाचे संशोधन करतील यात अशक्य वाटण्याजोगे काय आहे? ज्या अज्ञात ताऱ्याच्या दिशेने आपले अंतराळयान जात असेल त्याची ग्रहमाला,
त्या ग्रहांचे ग्रहमार्ग,त्यांच्या जागा,त्यांची गुरुत्वाकर्षणे यांचा अभ्यास अंतराळ यात्रिक करीत असतीलच.
अर्थातच ज्या ग्रहावरील परिस्थिती सर्व दृष्टींनी जास्तीत जास्त पृथ्वीसारखी असेल त्याच ग्रहावर उतरण्याचा निर्णय अंतराळयानाचा प्रमुख घेईल.
आपण असेही समजू की ८००० वर्षांपूर्वी पृथ्वीवरील संस्कृती जितपत सुधारलेली होती, तितपतच सुधारलेल्या अवस्थेत त्या ग्रहावरील जमाती असतील.अर्थात उतरण्याआधीच या सर्व गोष्टींची निश्चिती अंतराळयानावरील यंत्रे केल्याशिवाय राहणार नाहीत.तिथे पोहोचेपर्यंत आपले इंधन संपत आले असेल तर उतरण्यासाठीही अशीच जागा निवडावी लागेल की जिथे युरेनियमसारख्या द्रव्याचा भरपूर साठा असेल.कुठल्या पर्वतराजीवर युरेनियमचा साठा असेल त्याची नोंदही यंत्रे करतीलच.आणि शेवटी आपले अंतराळयान त्या ग्रहावर उतरेल.आपले अंतराळवीर पाहतील त्या ग्रहावरील दगडी आयुधे बनविणाऱ्या,भाले फेकून शिकार करणाऱ्या,
शेळ्या-मेंढ्यांचे कळप बाळगणाऱ्या व घरगुती वापरासाठी ओबडधोबड मातीची भांडी बनविणाऱ्या जमाती.! आपण अशा संस्कृतीबद्दल इतिहासात फक्त वाचलेलेच असते.पण आपले प्रचंड अंतराळयान उतरल्यावर आणि त्यातून उतरलेले अंतराळवीर पाहिल्यावर त्या मागासलेल्या जमातीतील लोकांवर किती जबर परिणाम होईल,त्यांना किती दहशत बसेल याची काही कल्पना ? धूर व ज्वाळा सोडत आपले प्रचंड अंतराळयान उतरलेले पाहिल्यावर ते भीतीने जमिनीत तोंडे खुपसतील.डोळे वर करून बघण्याचे धैर्यही त्यांना होणार नाही.आपले अंतराळयान उतरल्यावर त्यातून मुखवटे घातलेले अंतराळवीर उतरतील.त्यांच्या डोक्यांवर शिरस्त्राणे (हेलमेट्स) व शिंगे (सन्देशासाठी अँटिना) असतील.ते उड्या मारल्यासारखे चालतील. (कंबरेला बांधलेल्या छोट्या अग्निबाणांच्या सहाय्याने) रात्रीसुद्धा दिवसासारखा स्वच्छ प्रकाश पाडतील.(सर्चलाईटसच्या सहाय्याने) मध्येच आपण करीत असलेल्या स्फोटांच्या दणक्यांनी तिथल्या लोकांची पाचावर धारण बसेल.(निरनिराळ्या खनिजांच्या शोधासाठी आपण करीत असलेले चाचणी स्फोट) आणखी विचित्र प्राणी आणि कीटक घरघर करीत, निरनिराळे आवाज करीत उडताना पाहून ते भीतीने थरथरा कापतील.(हेलिकॉप्टर्स व इतर अनेक कामांना उपयोगी पडणारी छोटी छोटी वाहने.)
लपून छपून आपल्या अंतराळवीरांवर त्या जमातीतले लोक लक्ष ठेवून राहतील. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपले अंतराळवीर त्यांची नेमून दिलेली कामे कष्ट घेऊन चोख करीत राहतील.या 'देवांपासून काही धोका तरी दिसत नाही,एवढे लक्षात आल्यावर ते काही तरी भेटवस्तू घेऊन आपल्या अंतराळवीरांना भेटायला येतील.
कॉम्प्युटरच्या सहाय्याने आपले अंतराळवीर झपाट्याने त्यांची भाषा शिकतील आणि त्यांना समजावतील की ते देव वगैरे नाहीत.त्यांच्यासारखीच माणसे आहेत पण दुसऱ्या ग्रहावरून आलेली!पण या सत्य बोलण्याचा परिणाम त्यांच्यावर होणेच शक्य नाही.हे सत्य त्यांच्या आकलनाबाहेरचे असेल.त्यावर ते विश्वासच ठेवणार नाहीत. त्यांना एकच गोष्ट पटलेली असेल की हे अंतराळवीर दुसऱ्या ताऱ्यांवरून आले, आकाशमार्गाने आले.हे निरनिराळे चमत्कार करीत आहेत,सर्व शक्तिमान आहेत,तेव्हा ते देवच असले पाहिजेत.देव नाहीत तर कोण असतील? अंतराळवीरांनी मदतीचा पुढे केलेला हात हातात घेण्याचे भानही त्यांना राहणार नाही आणि त्यांच्यावर झालेल्या आक्रमणाची उमजही त्यांना होऊ शकणार नाही.यानंतर काय काय घडेल याची कल्पना करणे तसे अवघडच असले तरी काही गोष्टी निश्चितच घडतील.तिथल्या जमातीतल्या काही लोकांचा तरी विश्वास हे अंतराळवीर संपादन करतील. युरेनियमसारख्या द्रव्यांनी झालेल्या स्फोटांनी कुठे एखादा प्रचंड खड्डा वगैरे पडला असेल तर तो शोधायची कामगिरी त्यांना सांगितली जाईल.कारण परतीच्या प्रवासासाठी त्यांना त्याचीच आवश्यकता असेल.त्या जमातीतल्या एखाद्या बुद्धिमान माणसाला हे अंतराळवीर 'राजा' म्हणून घोषित करतील आणि आपल्याशी कधीही संपर्क जोडण्यासाठी त्याला एक रेडिओ सेटही देतील. राजाच्या शक्ती प्रदर्शनाचा तो एक तऱ्हेचा राजदंडच असेल.समाजसुधारणा, संस्कृती,नीति यांच्या साध्या साध्या कल्पना, साधे साधे नियम आपले अंतराळवीर त्यांना शिकवतील की ज्यामुळे त्यांची सुधारणा झपाट्याने होण्यास मदत होईल.अंतराळवीर अशा जमातीचा पाया घालतील की तिची नैसर्गिकपणे प्रगती होण्यासाठी जितका काळ जाणार असेल त्यातला बराचसा काळही वाचेल. नैसर्गिक उत्क्रांतीतील एक पायरी गाळूनच ही छोटी नवी जमात प्रगती करून घेईल.
आपल्या स्वतःच्या अनुभवावरून ही जमात अंतराळ प्रवास करण्याइतकी प्रगत होईपर्यंत किती काळ जाईल हे आपल्याला माहीत आहेच.!
मग आपले अंतराळवीर पृथ्वीवर परत यायची तयारी करायला लागतील.त्यांच्या तेथील अस्तित्वाच्या स्वच्छ खुणा ते मागे ठेवतील पण शास्त्रे,
तंत्रविज्ञान,गणित या विषयात प्रगत झाल्यावरच तेथील जमातींना उलगडतील अशा त्या खुणा असतील.आपण परत निघाल्यावर 'देवांनी' परत जाऊ नये असा हट्ट त्या ग्रहावरील लोकांनी करणे आणि तो हट्ट पाहून त्यांचे समाधान करण्यासाठी, 'आम्ही पुन्हा परत येऊ' असे वचन आपल्या अंतराळवीरांनी त्यांना देणे या गोष्टी अगदी स्वाभाविकपणे घडतील आणि मग आपली अंतराळयाने पुन्हा एकदा आकाशात झेप घेतील व त्यांच्या नजरेआड होतील.मग ती जमात आनंदाने बेहोष होईल,कारण त्यांचे 'देव' त्यांच्यात राहून गेलेले असतील. त्यांच्या या अनुभवांवरून ते काव्ये रचतील, महाकाव्ये रचतील,पिढ्यानपिढ्या त्यांच्या आधारे देवांच्या भेटीची स्मृती नष्ट होऊ दिली जाणार नाही.
अंतराळवीरांची प्रत्येक गोष्ट पवित्र म्हणून जतन केली जाईल.तोपर्यंत लिहिण्याची कला त्यांनी आत्मसात केलेली असेल तर देवांच्या विलक्षण चमत्कारिक,गूढ आणि पारलौकिक भेटीचा संपूर्ण वृत्तांत लिहिला जाईल.देव 'आम्ही नक्की परत येऊ' असे सांगून गेले आहेत हे लिहायला कोणीच विसरणार नाही.त्यात जी चित्रे काढली जातील ती सुवर्णाची झळाळी असणारे कपडे घातलेल्या व उडत्या रथातून आलेल्या देवांची असतील. त्यातल्या गोष्टी सागर आणि जमिनीवर प्रवास करणाऱ्या देवांच्या रथांबद्दलच्या आणि त्यांच्याकडे असणाऱ्या विजेसारखा गडगडाट करणाऱ्या अस्त्रांबद्दल असतील. त्यांच्यामधले शिल्पकार हातोडा आणि छिन्नी घेऊन खडकांवर चित्रे खोदायला सुरुवात करतील.ते खडकांवर चितारतील ती अंतराळवीरांसारखा पोषाख घातलेल्या, डोक्यावर शिरस्त्राणे व अँन्टिना असलेल्या, छातीवर पेट्या बांधलेल्या देवांची चित्रे! चेंडूसारख्या गोल यानांवर बसून उडणाऱ्या देवांची चित्रे! प्रकाशकिरण सोडणाऱ्या छोट्या काठ्या (लेसर गन्स) आणि विविध आकारातील जंतू आणि कीटक की ज्यांचा संबंध होता देवांच्या निरनिराळ्या वाहनांशी!
आपल्या कल्पनाशक्तीला काही अंतच नाही.तेव्हा त्यानंतर त्या ग्रहावर काय काय घडेल, याचीसुद्धा आपल्याला कल्पना करता येईल. ज्या जागेवर आपले अंतराळयान उतरले असेल ती जागा पवित्र म्हणून घोषित केली जाईल. नंतर तर ते यात्रेचे ठिकाणच बनेल.त्या जागांवर मंदिरे,पिरॅमिडस् बांधले जातील.ही बांधकामे अर्थातच आपल्या अंतराळवीरांनी घालून दिलेल्या कोणत्या तरी खगोलशास्त्राच्या नियमानुसारच होतील.जमाती जमातीमधली युद्धे कधीच थांबणारी नसतात.तेव्हा कदाचित अशा युद्धात या सर्व जागा हळुहळू उदध्वस्तही होतील,लोक देशाधडीला लागतील आणि या पवित्र वास्तूंवर जंगलांचे आक्रमण होईल.
नाहीतर भूकंप,महापूर यासारख्या नैसर्गिक आपत्तींनी ही बांधकामे जमिनीखाली गाडली जातील.अनेक पिढ्यांनंतरचे संशोधक पुन्हा या सर्व गोष्टी शोधून काढतील आणि त्यांचा अर्थ लावायचा प्रयत्न करतील.
अमेरिकेची प्रचंड आरमारी जहाजे प्रथमच दक्षिण समुद्रात शिरल्यावर किंवा कोर्टेससारखा रानटी स्पॅनिश सैन्याधिकारी दक्षिण अमेरिकेत उतरल्यावर काय हाहा:कार माजला होता,हा इतिहास आपल्याला तसा ताजा आहे.त्यामुळेच आपले अंतराळवीर जेव्हा एखाद्या अज्ञात ग्रहावर आक्रमण करतील तेव्हा तिथल्या संस्कृतीवर,तिथल्या मागासलेल्या जमातींवर किती जबरदस्त परिणाम होईल याची,अंधुकशी का होईना,पण आपण कल्पना करू शकतो.
भविष्यकाळात नजर टाकेपर्यंत आपल्याला आपला भूतकाळ नीट समजू शकत नाही हे जे म्हटले आहे त्याचे कारण असे की आज आपण अशाच कुठल्या तरी पल्ल्यावर उभे आहोत. ज्यांचा अर्थ आजपर्यंत लागत नव्हता अशा गूढ आणि रहस्यमय गोष्टी आज आपल्याला पृथ्वीवर सापडत आहेत.हजारो वर्षांपूर्वी जे अंतराळवीर असेच आपल्या पृथ्वीवर उतरले होते त्यांनीच मागे ठेवलेल्या या अंधुकशा खुणा आहेत का? या प्रश्नाचे उत्तर आता शोधलेच पाहिजे.
हे मान्य आहे की या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला आपल्या भूतकाळातच घेऊन जात आहेत;पण आपल्या भविष्यकालीन योजनांशी ही उत्तरे अगदी निगडित आहेत.या प्रश्नांची उत्तरे शोधेपर्यंत आपले भविष्यकाळातील यश आपल्यापासून दूर पळणार आहे.म्हणूनच या महत्त्वाच्या कोड्यांची उकल करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
३ मार्च २०२३ या लेखातील पुढील भाग..