१९५० साली मांडलेली कृत्रिम बुद्धिमत्तेची संकल्पना आज प्रत्यक्षात आलेली दिसते. आपल्या हातातल्या भ्रमणध्वनीपासून ते मंगळावर जाणाऱ्या यानांपर्यंत आणि खेळ खेळणाऱ्या संगणकांपासून ते विनाचालक वाहनांपर्यंत आज सर्वत्र कृत्रिम बुद्धिमत्ता आपली अनिवार्यता पटवून देत आहे. विश्व व्यापून दशांगुळे उरणाऱ्या या कृत्रिम बुद्धिमत्तेचा इतिहास,प्रवास आणि भविष्याचा आढावा घेणारा हा लेख.
कृत्रिम बुद्धिमत्ता,आर्टिफिशियल इंटेलिजन्स 'एआय'चा उल्लेख आजच्या काळात सहजपणे होऊ लागला आहे.
ह्या संज्ञा जनमानसात प्रचलित होत आहेत.अमेझॉनची 'अलेक्सा', ॲपलचे सिरी सारखे मदतनीस,आपल्या प्रश्नांची उत्तरे द्यायला तत्पर आहेत,तर आंतरजालावर आपल्याला कोणत्या वस्तू खरेदी करायला आवडतील याचा अंदाज लावण्यापर्यंत,आधुनिक जगात आपल्या अवतीभोवती कृत्रिम बुद्धिमत्ता सर्वत्र आढळत आहे..
मानवनिर्मित प्रज्ञ- यंत्रमानवाच्या अस्तित्वाचा उल्लेख ग्रीक पौराणिक कथांमध्येही आल्याचे आढळते.ग्रीक तत्त्वज्ञ ऑरिस्टॉटलने तर्कशुद्ध विचार करण्याचा युक्तिवाद (सिलॉजिजम) सर्वप्रथम केला.त्यात दोन किंवा अधिक स्वीकृत विधानांवरून,तर्कशुद्ध निष्कर्ष पद्धतशीरपणे काढला जातो आणि त्या आधारे तिसरे किंवा नवीन तार्किक विधान मांडले जाते. मनुष्याला जन्मजात मिळणाऱ्या बुद्धिमतेच्या क्षमतेचा स्वतःला दाखला देणारा तो महत्त्वपूर्ण क्षण होता.
ॲरिस्टॉटलने प्रस्तुत केलेल्या संकल्पनेपासून सुरुवात झाली असली,तरी ज्या स्तरावरील कृत्रिम बुद्धिमत्ता आजच्या काळात विचारात घेतली जाते आणि विकसित होत आहे.त्याचा इतिहास केवळ गेल्या शतकातला आहे.
१९५०च्या दशकात शास्त्रज्ञ,गणितज्ञ आणि तत्त्वज्ञांच्या समुदायाने कृत्रिम बुद्धिमत्तेची संकल्पना केली.त्यात ब्रिटिश तरुण बहुज्ञ अॅलन ट्युरिंग होते,ज्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेची गणितीय शक्यता शोधली.त्यांनी असा प्रश्न उपस्थित केला की,
'समस्या सोडवण्यासाठी आणि निर्णय घेताना मनुष्य उपलब्ध माहिती तसेच,कारणांचा आधार घेतात,तर यंत्रे तसे का करू शकणार नाहीत?'
१९५० साली 'कम्प्यूटिंग मशिनरी अँड इंटेलिजन्स' ह्या शोधनिबंधात त्यांनी बुद्धिमान यंत्रे कशी तयार करत येतील आणि त्यांच्या बुद्धिमत्तेची चाचणी कशी करावी,
ह्यांची तार्किक चर्चा केली.ट्युरिंगची संकल्पना तात्त्विकरीत्या योग्य असली,तरी कार्य सुरु करताना अनेक अडथळे आले.संगणकांना मूलभूतपणे बदलण्याची सर्वप्रथम आवश्यकता होती; कारण १९४९ पर्यंत वापरात असलेले संगणक,
आज्ञावली कार्यान्वित करू शकत होते,परंतु ते साठवण्याची तरतूद त्यांच्यात नव्हती.थोडक्यात सांगितलेले कार्य संगणक करू शकत होते परंतु काय केले ते स्मृतीत ठेवण्याची क्षमता त्यांच्यात नव्हती. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे,संगणक अत्यंत खर्चिक होते.केवळ प्रतिष्ठित विद्यापीठे आणि मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांनाच ह्या अनोख्या क्षेत्रात पाऊल टाकण्याचे धारिष्ट करणे शक्य होते.
तसेच,प्रज्ञ यंत्र निर्मितीची संकल्पना निधी स्रोतांना पटवून देणाऱ्या समर्थकांची आवश्यकता होती.
संज्ञा बोध आणि आकलन (कॉग्निटिव्ह) विज्ञानावर संशोधन करणारे कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रवर्तक,जॉन मॅक् कार्थी आणि मार्विन मिन्स्की कृत्रिम बुद्धिमत्तेचे जनक म्हणून ओळखले जातात.त्यांनी दिलेली व्याख्या अशी आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता ही यंत्रांची विशिष्ट कार्य करण्याची क्षमता आहे,ज्यासाठी मानवी बुद्धिमत्तेची आवश्यकता असते.
१९५६ साली डार्टमाउथ परिषदेत,मॅक् कार्थी यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेवर मुक्त चर्चेसाठी विविध क्षेत्रांतील प्रमुख संशोधकांना एकत्र आणले. एका मोठ्या सहयोगी प्रयत्नाची कल्पना करून, कृत्रिम बुद्धिमत्ता ही संज्ञा त्यांनी,त्याच परिषदेत तयार केली.संज्ञानात्मक शास्त्रज्ञ मार्विन मिन्स्की तंत्रज्ञानाच्या भविष्याबद्दल आशावादी होते;परंतु कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राबद्दल प्रमाणित पद्धती निश्चित करण्यासाठी परिषदेत अपेक्षेप्रमाणे यश मिळू शकले नाही.तरीही कृत्रिम बुद्धिमत्ता साध्य करण्यायोग्य आहे ह्या विचारावर एकमत झाल्यामुळे संशोधनाने वेग घेतला.
१९५७ ते १९७४ हा कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राच्या भरभराटीचा काळ होता.जलद,वापरायला सुलभ आणि अधिक माहिती संचयित करणारे संगणक तयार होत होते,जे तुलनात्मक स्वस्त होते.यंत्र स्वयंअध्ययनाच्या ( मशीन लर्निंग) तर्कात सुधारणा होऊन,कोणती समस्या सोडवण्यासाठी कोणता तर्क उपयोगात आणायचा,ते ठरवता यायला लागले.हर्बर्ट सायमन,जॉन शॉ आणि अॅलन नेवेल ह्यांनी तयार केलेल्या 'जनरल प्रॉब्लेम सॉल्व्हर च्या साहाय्याने समस्या सोडवल्या जाऊ लागल्या,तर जोसेफ वायझेनबॉम यांनी तयार केलेल्या 'एलायझा' ह्या चॅटबॉटला बोलीभाषेचा अर्थबोध होत होता.
ह्या यशामुळे काही सरकारी संस्थांची खात्री पटली आणि कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधनासाठी त्यांनी निधी मंजूर केल्यामुळे आशा आणि अपेक्षा उंचावल्या.सरकारी संस्थांना अशा यंत्रांमध्ये अधिक स्वारस्य होते,जे बोलीभाषेचे लिप्यांतर आणि भाषांतर कर शकतील,तसेच अपक्व माहितीवर (रॉ डेटा) प्रक्रिया करतील. भाषा आकलनाची मूळ तत्त्वे जरी तयार झाली असली,तरी नैसर्गिक भाषाप्रक्रियेचे (नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग) अंतिम उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बराच लांबचा पल्ला गाठायचा होता.
संवाद साधण्यासाठी एका शब्दाचे अनेक अर्थ, त्याबरोबरच संदर्भ जाणून घेणे आवश्यक असते. सगळ्यांत मोठी समस्या अशी होती.काही ठोस करण्यासाठी तितक्या ताकदीच्या संगणकीय शक्तीचा अभाव त्यामुळे यंत्राद्वारे भाषानुवाद करण्यासाठी अपेक्षित यश मिळाले नाही.
त्यानंतर अडथळ्यांचे डोंगर उभे राहायला लागले आणि संशोधनाची गती मंदावली.कृत्रिम बुद्धिमत्तेचे दोन प्रमुख संशोधक,रॉजर रॉन्क आणि मार्विन मिन्स्की ह्यांनी व्यापारी समूहांना असा इशारा दिला होता,की
कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधनकार्याचा उत्साह अनियंत्रित होत असल्यामुळे १९८०च्या दशकात नैराश्याची लहर उठेल.
ह्युबर्ट ड्रेफस यांनी भूतकाळातील कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधनाच्या सदोष गृहीतकांवर प्रकाश टाकला आणि १९६६ च्या सुरुवातीला अचूक भाकीत केले,की कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधनाची पहिली लाट सार्वजनिक आश्वासनांची पूर्तता करण्यात अपयशी ठरेल.
नोम चॉम्स्कींसारख्या समीक्षकांनी असा युक्तिवाद केला,की कृत्रिम बुद्धिमत्ता आंशिक प्रमाणात सांख्यिकीय तंत्रावर अवलंबून असल्याने संशोधन अयोग्य दिशेने जाण्याची शक्यता आहे.
१९७४ ते १९८० दरम्यान संशोधनासाठी मंजूर होणाऱ्या निधीत घट झाली.पर्यायाने संशोधनाचा वेग थंडावला,
टीका होऊ लागली,वातावरण निराशाजनक झाले.त्यामुळे हा काळ 'कृत्रिम बुद्धिमत्तेचा शीतकाल' समजला जातो.
कृत्रिम बुद्धिमत्ता समुदायात निराशावादाने सुरवात होऊन त्याला श्रृंखलाक्रियेचे स्वरूप आले.त्याचे पर्यवसान कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात उल्लेखनीय संशोधन न होण्यात झाले.
विकासकांनी दिलेली अवाजवी आश्वासने, वापरकर्त्यांच्या अवास्तव अपेक्षा आणि जाहिरातबाजीचा अतिरेक कारणीभूत झाला. काही वेळा नवीन तंत्रज्ञान उदयाला येण्याआधी त्याचा प्रमाणाबाहेर उदोउदो होतो,तसेच काहीसे झाले.कृत्रिम बुद्धिमत्तेवर अवलंबून असेलेले अब्जावधी डॉलर्सचे उद्योग-व्यवसाय कोसळू लागले.
१९८०च्या दशकात गणितीय तर्काचा विस्तार होऊन तंत्रज्ञानासाठी दिल्या जाणाऱ्या निधीत वाढ झाल्यावर उत्साह पुन्हा सळसळायला लागला.१९९०च्या दशकात कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल आस्था वाढत जाऊन आशावाद निर्माण झाला.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात असे उतार-चढाव आले,तरीही यशस्वी तंत्रज्ञान विकसित होत आहे.'शीतकाल' कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राला मिटवू शकला नाही.ती अल्पकालीन स्थिती होती.आज हजारो अनुप्रयोग (अॅप्लिकेशन) कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संकल्पनेवर विकसित झाले आहेत.
१९९०च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान मोठ्या प्रणालींचा घटक म्हणून वापरले जाऊ लागले.पूर्वी विज्ञानकल्पनेच्या क्षेत्रात असणाऱ्या किंवा वाङ्मयाच्या कपोलकल्पित कक्षेत असलेल्या अनेक नवकल्पनांचे वास्तवात रूपांतरण गेल्या काही दशकांमध्ये झाल्याचे प्रकर्षाने जाणवते.
यंत्रांना किती आणि काय-काय शिकवायचे त्याला कधीतरी मर्यादा येतील,त्यामुळे मानवासारखी विचारशक्ती आणि बुद्धिमत्ता जर यंत्रांमध्ये निर्माण करायची असेल,तर यंत्राच्या स्वयं-अध्ययनाची आवश्यकता भासायला लागली.जॉन हॉपफील्ड आणि डेव्हिड रुमेलहार्ट यांनी गहन अध्ययन (डीप लर्निंग) तंत्र लोकप्रिय केले,ज्यामुळे संगणकांना पूर्वानुभवरून शिकणे शक्य झाले.
मोठ्या प्रमाणातील मजकूर,प्रतिमा,ध्वनिफीत, चित्रफीत यांसारख्या असंरचित माहितीचा संचय यंत्रे गहन स्वाध्यायात करतात.मानवाच्या साहाय्यातेशिवाय पूर्वीचे संदर्भ आणि विद्यमान माहितीच्या आधारे यंत्रे स्वअध्ययन करण्यासाठी सक्षम होतात.
विशेषज्ञ तंत्राचे (एक्स्पर्ट सिस्टिम) जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संगणकशास्त्रज्ञ एडवर्ड फीगेनबॉमने मानवाच्या निर्णयप्रक्रियेसदृश तज्ज्ञ प्रणाली सादर केली.
एखाद्या क्षेत्रातील तज्ञाने ठरावीक परिस्थितीत दिलेल्या प्रतिसादाचे रूपांतर संगणक प्रणालीत केले,तर तीच प्रणाली वापरून तज्ज्ञ नसलेली कोणतीही व्यक्ती सल्ला देऊ शकेल,असा त्यामागचा हेतू होता. उद्योग-व्यवसायांमध्ये तज्ज प्रणाली मोठ्या प्रमाणात वापरल्या जाऊ लागल्या.
काय बदल झाला असेल ज्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राला पुन्हा सोन्याचे दिवस आले असतील,असा प्रश्न मनात येतो.आज्ञावली लिहिण्याचे तंत्र बुद्धिमान झाले?की संगणक प्रणाली तयार करणारे अधिक बुद्धिमान झाले? असे दिसून येते,की संगणकाचे स्मृति-तंत्र सुधारित झाले.
संगणकाची माहिती संचयनाची मर्यादा कृत्रिम बुद्धिमत्ता विकासाला मागे खेचत होती.गॉर्डन मूर ह्यांनी निर्धारित केलेल्या 'मूर नियमानुसार संगणकाची संचयनक्षमता आणि गती दरवर्षी दुप्पट होते.परंतु,मूरने वर्तवलेला वेग आणि संचय प्रत्यक्षात साध्य करण्यासाठी विलंब होत होता.जवळपास तीस वर्षांच्या कालखंडानंतर तंत्रज्ञानाने मूरच्या नियमाला गाठले.
तर्क-वितर्काच्या आधारे कृत्रिम बुद्धिमत्ता संगणकाला विवेकी कार्यासाठी सक्षम करते. १९९७ साली,
'आयबीएम'ने बुद्धिबळात निपुण विशेषज्ञ प्रणालीचा महासंगणक 'डीप ब्लू' निर्माण केला.रशियन ग्रॅण्डमास्टर गॅरी कास्परोव्हला शह देऊन हरवणाऱ्या पहिल्या संगणकाने इतिहास रचला.कृत्रिमरीत्या बुद्धिमान निर्णय घेण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले गेल्याने,हा सामना सुप्रसिद्ध झाला.
सॉफ्टवेअर विकसित करून विंडोज कार्यप्रणालीवर कार्यान्वित केले.बोलीभाषेचा अर्थ लावण्याच्या दृष्टीने अजून एक पाऊल पुढे पडले.रोबोटिक्स शास्त्रज्ञ सिंथिया ब्रेझिल ने तयार केलेला यंत्रमानव 'किस्मत',
भावना ओळखण्यात आणि प्रदर्शित करण्यात यशस्वी ठरला.
२००५ ते २०१९ दरम्यान वाक् आणि भाष्य अभिज्ञान,
स्वचलित यांत्रिक प्रक्रिया (रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन),
वस्तु-आंतरजाल (इन्टरनेट ऑफ थिंग्स),सक्षम निवासस्थान (स्मार्ट होम) तत्सम तंत्रज्ञानाला गती मिळाली.
भाषांतर,संगणकीय प्रतिमा ओळखणे,खेळात निष्णात संगणकप्रणाली यांत बहुतांश प्रगती आणि यश २०१० पासून मिळाले.
२०१२ साली संशोधन आणि उद्योग-व्यवसायांना यंत्र- स्वयंअध्ययन क्षेत्रात स्वारस्य निर्माण झाल्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेकरिता होणाऱ्या गुंतवणूक आणि निधीत आकस्मिक वाढ झाली.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षमतेला संगणकीय शक्तीच्या (वेग आणि संचय) पातळीवर आणल्यावर तंत्र हाताळू शकणार नाहीत अशी कोणतीच समस्या उरणार नाही,असे वाटायला लागले. ह्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधनात आलेल्या उतार-चढावांच्या कारणांना पुष्टी मिळते.
आपण सध्या 'बिग डेटा'च्या युगात आहोत. आपल्याकडे प्रचंड प्रमाणात माहिती गोळा करण्याची क्षमता आहे;परंतु त्यावर प्रक्रिया करणे किचकट आणि गुंतागुंतीचे असते.
मूरचा नियम कदाचित तंतोतंत साध्य होत नसेल;परंतु संगणकीय विदा (डेटा) जमा होण्याचा वेग मंदावलेला दिसत नाही.
निरीक्षण,विश्लेषणक्षमता,समस्यांची उकल, अध्ययन हे कृत्रिम बुद्धिमत्तेचे वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म समजले जातात.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने प्रणाली तयार करताना,
गणिती तार्किक पद्धती बुद्धिमत्तेत विलीन होते.ह्या संयोगामुळे अपक्व माहितीमधील वैशिष्ट्य ओळखून,
विश्लेषण करून,प्रतिरूप देता येते.
यंत्र जर मनुष्याची स्वभाववैशिष्ट्ये,क्षमता आणि बौद्धिक शक्ती वेगाने स्वतःत निर्माण करू शकले,तर त्याच्यात कृत्रिम बुद्धिमत्ता आहे असे म्हणता येईल.कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने मानवी बुद्धीप्रमाणे विचार करणारा संगणक, कार्य करणारा संगणक-नियंत्रित यंत्रमानव किंवा सॉफ्टवेअर तयार करता येते.
काही यंत्रे केवळ एकाच विशेष कार्यासाठी तयार केली जातात.कार्याचा विशिष्ट उद्देश समजून घेऊन ते साध्य करण्यासाठी अशी यंत्रे समर्थ असतात उदाहरणार्थ बुद्धिबळात खेळी ओळखून सर्वोत्तम संभाव्य चाल ठरवणारी संगणक प्रणाली तर,काही यंत्रणा साठवलेल्या माहितीच्या आधारे साजेशी गाणी,प्रेक्षणीय स्थळे सुचवतात.
आपल्या घरापासून ते रस्त्यावरच्या गाड्यांपर्यंत सगळीकडे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होत असल्याचे दिसत आहे.आपल्या दैनंदिन जीवनावर आणि कार्यावर यंत्रे आणि संगणकांचा परिणाम होत आहे.प्रभाव पडत आहे.कृत्रिम बुद्धिमत्तेचे महत्व वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे,त्यात नजीकच्या काळात झपाट्याने होणारी उत्क्रांती.स्वचलित यांत्रिक प्रक्रिया (रोबोटिक्स) आणि वस्तु आंतरजाल या तंत्रज्ञानांच्या साहाय्याने आंतरजालग्राही साधने (वेव-एनेबल्ड डिव्हायसेस) स्वतः आकलन करू शकतील,असे कौशल्य त्यांच्यात निर्माण केले जात आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्र व्यापक होत आहे.अनेक शाखा- उपशाखांमध्ये विस्तारित होत आहे. तंत्रज्ञान,बैंकिंग,क्रय-विक्रय,शिक्षण,कृषिउद्योग, विज्ञान,आधारभूत संरचना (इन्फ्रास्ट्रक्चर),ऊर्जा अशा अनेक क्षेत्रांकरिता फलदायी ठरत आहे. अनेक अत्याधुनिक अनुप्रयोगांना कृत्रिम बुद्धिमत्तेचा आधार असल्याचे गृहीत धरले जात आहे.
वैद्यकीय क्षेत्रात,लक्षणांवरून रोगनिदान करण्यापासून,
औषधोपचार आणि शस्त्रक्रियेसंबंधित प्रक्रियेपर्यंत फार मोलाची मदत होत आहे.यंत्राच्या साहाय्याने शल्यचिकित्सा करताना किमान छेद देऊन शस्त्रक्रिया करणे संभव होत आहे.तसेच,रुग्णांचे अहोरात्र निरीक्षण करून त्यांना अखंड आरोग्यसेवा देण्यासाठी यांत्रिक मदतनीस म्हणजे चालते-फिरते यंत्रमानव तयार केले जात आहेत.
बैंक आणि वित्तीय संस्थांमध्ये कोट्यवधींची उलाढाल होत असते.तिथल्या आर्थिक व्यवहारांवर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने लक्ष ठेवले जात आहे.डेबिट / क्रेडिट कार्डावर संशयास्पद किंवा अनपेक्षित व्यवहार आढळले, तर गैरव्यवहारांचा शोध घेणे आणि वेळीच आळा घालणे शक्य झाले आहे.
खेळ आणि मनोरंजन क्षेत्राने तर फारच भरारी घेतली आहे.आपली आवड ओळखून साधने, गाण्यांचा अल्बम आपल्यासाठी तयार करतात. चित्रपट,मालिका सुचवतात.शिवाय आंतरजालावर खेळताना इतर खेळाडूंची आवश्यकता पडत नाही.कारण त्यांची जागा बॉट्सनी घेतली आहे.चित्रालेख (ग्राफिक्स) आणि 'चेतनीकरण'(ॲनिमेशन) प्रगत झाल्यामुळे आभासी वास्तव (व्हर्च्युअल रिअँलिटी) विश्व आपल्या पसंतीप्रमाणे आपल्याला आपल्या उभे करता येते.
मासिक मराठी विज्ञान परिषद पत्रिका,नोव्हेंबर २०२२
वैशाली फाटक-काटकर,माहिती - तंत्रज्ञान तज्ञ
भाग - १