मुंबई शहरात तसंच उपनगरांत माझे अनेक परिचित आहेत.हा बहुधा माझ्या साहित्याचा वाचकवर्ग आहे.मात्र मित्र हाताच्या बोटांवर मोजण्याइतके आहेत.सुमंतभाई माझे मित्र आहेत.तसं आमच्या वयात खूप अंतर आहे. त्यांची पहिली भेट नवेगावबांध येथे १९७५ सालच्या डिसेंबर महिन्यात झाली.अशीच ती कडक थंडीची सायंकाळ होती.माझ्या अभ्यासिकेत मी वाचत बसलो होतो.इतक्यात माझ्या शिपायानं एक ओळखपत्र आणून दिलं. त्यावर लिहिलं होतं,सुमंत शहा,बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचा सभासद,मी लगेच बाहेर आलो,तो माझ्या
समोर एक वृद्ध गृहस्थ उभे होते.चणीनं बुटके.किंचित स्थूल.प्रवासामुळे कपडे मळलेले.बरोबर एक सडपातळ,
गोरी,वयस्क स्त्री होती.ती त्यांची पत्नी असावी.
बसस्टँडवरून आलेल्या हमालाच्या डोक्यावर एक भली मोठी काळी ट्रंक होती.तो अजून उभा होता.ट्रंक जड झाल्यामुळं तो जरा अस्वस्थ झाला होता.मी त्या दोघांना घरात बोलावलं.हमालाला ती ट्रंक घराच्या व्हरांड्यात ठेवायला सांगितलं.नंतर बैठकीच्या खोलीत बसून चहा-पाणी झालं. त्यांना म्हटलं,"आपण प्रवासानं थकून आलात. आता चांगलं गरम पाण्यानं स्नान करा.विश्रांती घ्या.मी थोड्या वेळानं विश्रामगृहावर तुम्हाला घेण्यासाठी येईन.आज जेवण माझ्याकडं करा."
त्यावर ते म्हणाले,"आपण कशाला त्रास घेता. आमच्याजवळ रेशन बॉक्स आहे.स्टोव्ह आहे. आम्ही स्वतः स्वयंपाक करून जेवण करू."
"ते उद्या करा. आज माझे आपण पाहुणे.
त्या दोघा पति-पत्नीचा चेहरा उजळला.अशा थकलेल्या अवस्थेत देखील त्यांच्या चेहऱ्यावरचं स्मित पाहून मला आनंद झाला.या भेटीनंतर अनेक वर्षांनी ते एकदा ह्या पहिल्या भेटीची मला आठवण करीत म्हणाले."
चितमपल्ली साहेब,वुई लव्ह यू.तुम्ही तसे मोठे सुंदर आहात असं नव्हे, तुमच्या अंतःकरणाच्या सौंदर्यानं आम्ही तुमच्यावर फिदा झालो."
आज या गोष्टीला पंधरा वर्षे लोटली.पण माझा सुमंत
भाईंना यत्किंचितही विसर पडला नाही.त्यांना मराठी येत नाही अन् मला गुजराती.आम्ही भेटलो की इंग्रजीत बोलतो.तर कधी हिंदीत.त्यांनी माझं लेखन वाचलं नाही.ते अधून-मधून बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या जर्नलमध्ये 'व्हॅली ऑफ फ्लॉवर' विषयी किरकोळ टिप्पणी लिहितात.ते फुलांचे उत्कृष्ट फोटोग्राफर आहेत 'व्हॅली ऑफ फ्लॉवर'चा पहिला परिचय त्यांच्याकडून झाला.
वयाच्या साठाव्या वर्षी ते मुंबईतील एका शिपिंग कंपनीमधून सेवानिवृत्त झाले.पण हिमालयातील 'व्हॅली ऑफ फ्लॉवर'ला ते वयाच्या बाविसाव्या वर्षापासून भेट देतात.पहिल्यांदा एकटे जायचे. नंतर लग्न झाल्यावर पत्नीसह.अगदी एका वर्षाच्या आपल्या मुलाला ते घेऊन जाऊ लागले. एखाद्या पवित्र स्थळाला जावं तसं हे तिघं दरवर्षी नियमितपणे 'व्हॅली ऑफ फ्लॉवर'ला जात.परवा मुलाचं लग्न झालं.सूनही मिळाली ती निसर्गावर प्रेम करणारी.आता ते चौघे जातात.मुंबईला माझं क्वचितच जाणं होतं.तिथं एखादी ग्रंथयात्रा भरली किंवा पुस्तकाचं प्रदर्शन भरलं तर पुस्तक खरेदी करायला मी जातो.तसे सुमंतभाई ग्रंथप्रेमी नाहीत.वृत्तपत्र सोडलं तर फारसं काही वाचत नाहीत.भाभीजींना मात्र वाचनाची आवड आहे. त्यांच्या संग्रही चांगली गुजराती पुस्तकं आहेत. वेळ मिळाला,तर दुपारच्या वेळी एखादं गुजराती मासिक वाचताना दिसतात.माझ्या ग्रंथप्रेमाविषयी त्यांना आदर आहे.नवेगावबांधला आले तेव्हा माझा खाजगी ग्रंथसंग्रह पाहून उभयतांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं.
सुमंतभाईंना पत्रानं कळवितो की,मी अमूक तारखेला अमूक गाडीनं मुंबईला पोचत आहे.गाडी धाडधाड करीत व्हीटी स्टेशनवर पोचते.माझी छाती धाडधाड होते.
सुमंतभाई नक्की स्टेशनवर असतील काय?कारण प्लॅटफॉर्मवर उतरल्यावर तिथल्या जनप्रवाहामुळं मी निराश होतो.दोन्ही बाजूंनी लोक मला धक्का देत निघून जात असतात.मी सुमंतभाईंना पाहत असतो. तोच ते दुरून येताना दिसतात.पांढरा शुभ्र पायजमा,अंगात तसाच कुडता,पायात चप्पल, चांदीसारखे दिसणारे केस व्यवस्थित विचरलेले,गुळगुळीत दाढी केलेली.हसतमुखानं ते जवळ येऊन हातात हात घेऊन स्वागत करतात.तेव्हा कुठं माझा जीव भांड्यात पडतो.टॅक्सीनं त्यांच्या लेमिंग्टन रोडवरील 'शक्ती सदन' या घरी पोचतो.भाभीजी आमची वाटच पाहत असतात.मग गप्पागोष्टी करीत चहा होतो.
नंतर स्नान केल्यावर मला प्रसन्न वाटू लागतं.तोपर्यंत भाभीजींनी नाश्ता तयार करून टेबलावर मांडलेला असतो.मला मधुमेह आहे हे माहीत आहे.नाश्त्याला मेथ्या घातलेलं थालिपीठ असतं. मला मुंबईत ग्रंथखरेदीला जायचं असतं.सकाळी दहा वाजता जेवण करून मी ग्रंथजत्रेत सुमंतभाईंबरोबर जाई ते रात्री परत येई.फक्त तिथं सोडायला आणि रात्री घ्यायला सुमंतभाई जत्रेच्या गेटपर्यंत येत.तिथून ते परत जात.आत येऊन त्यांनी कधीही ग्रंथ पाहिले नाहीत किंवा चाळलेही नाहीत.
दिवसभर मी प्रत्येक स्टॉलमध्ये जाऊन इंग्रजी,हिंदी,मराठी भाषेतील ग्रंथ पाहत, चाळीत,आवडलेलं पुस्तक खरेदी करी. रात्रीपर्यंत चांगली पाच- पन्नास पुस्तकं मी निवडलेली असत.माझ्या खांद्यावरची शबनमबॅग
पुस्तकांनी भरून गेलेली असे.ब्रीफकेसही.पुस्तकांचं तसं वजन फार असतं.नेमकं त्या ब्रीफकेसचं हँडल तुटून जाई.मी ती बगलेत धरून गेटवर त्यांची वाट पाहत उभा असे.मला म्हणायचे, "झाली का पुस्तक खरेदी?तुटली वाटतं ब्रीफकेस.आणा ती माझ्याकडे." ती वजनदार ब्रीफकेस बगलेत मारून ते पुढं चालू लागत.विनोदानं म्हणत,"कधी काळी तुम्ही फार मोठे लेखक झाला,तर माझी आठवण काढाल ना? तुमच्या ग्रंथाचं ओझं वाहून नेणारा म्हणून. मात्र तुमचं मला नेहमीच स्मरण होईल.
एका थोर माणसाची पुस्तकं बाहून नेण्याचं आपणाला भाग्य मिळालं म्हणून."माझ्या ग्रंथवेडा बद्दलची ही त्यांची टीकाटिपणी असे.एकदा रात्री मला नित्याप्रमाणं घ्यायला ते आले नाहीत.पुस्तकाचं भलं मोठं ओझं झालेलं.माझ्या ओळखीच्या स्टॉलवर ती पुस्तकं ठेवली.बरीच रात्र झाली.
स्टॉलमधील गृहस्थ म्हणाले,"साहेब, आता कुठं जाता? इथंच थांबा अन् सकाळी जा."त्या सज्जन गृहस्थानं दोन बाकं एकमेकांना जोडून त्यावर सतरंजी अंथरून दिल्यावर मी दिव्याच्या उजेडाचा त्रास होऊ नये म्हणून कपाळावर आडवा हात ठेवून झोपी जाण्याचा प्रयत्न करत होतो.मुंबई कधी शांत नसते. अहोरात्र ती गजबजलेली दिसते.जवळच्या स्टेशनवर येणाऱ्या- जाणाऱ्या गाड्यांच्या शिट्ट्यांचा आवाज येई.रस्त्यावरील बसगाड्या, मोटारींचा हॉर्न वाजे.मुंबई शहर मला कधी आवडलं नाही.त्याविषयी कधी आकर्षणही वाटलं नाही.
परंतु तिथं ग्रंथयात्रा भरे.चांगल्या ग्रंथांची आंतरराष्ट्रीय कीर्तीची प्रदर्शनं भरत. वर्षानुवर्षं ज्या पुस्तकांची मला आतुरतेनं वाट पाहावी लागे ती इथं मिळून जात.ती मिळाल्यावरचा आनंद एखाद्या ग्रंथप्रेमीलाच समजू शकेल.पहाटे केव्हातरी डोळा लागला.
कुणीतरी मला हाक मारून जागं करीत होतं. माझी झोप कावळ्यासारखी.मी लगेच जागा झालो.तो समोर सुमंतभाई उभे.म्हणाले,"अरे, तुमची आम्ही किती वाट पाहिली याल म्हणून, पण आला नाहीत.भाभीजीनं मला रात्रभर झोपू दिलं नाही.ती सारखं मला कोशीत होती की, तुम्हाला रात्री घ्यायला मी गेलो नाही म्हणून.मी चक्क ती वेळ विसरलो.थोडा आळस केला."
घरी आल्यावर भाभीजी म्हणाली,"सुमंतभाई मोठे विसरभोळे आहेत.घरीही त्यांचं असंच चालतं.त्यांना मिळालेला एखादा चेक किंवा ड्राफ्ट ते कुठंतरी ठेवतोल अन् विसरून जातील. मग त्या शोधात त्यांचा वेळ जातो.
मला ते शोधून द्यावं लागतं."शेवटी सुमंतभाई कबूल करायचे.ते गंमतीनं म्हणायचे,"चितमपल्ली साब ! शी इज माय हजबण्ड अँड आय एम हर वाईफ !"
"ते आहेच खरं.साऱ्या प्रवासात त्यांना सामानाची काळजी नसते.हमालाशी कसं बोलावं कळत नाही.तिकिटं सांभाळून ठेवीत नाहीत.मी जर त्यांच्च्याबरोबर प्रवासाला नसेन,तर ते आपल्या ठिकाणी कधीच पोचणार नाहीत.
तिकिटांचं आरक्षण मीच करायचं.खिडकीजवळ उभं राहून मी तिकिटं काढायची,ते हसत म्हणतात कसं, 'अगऽऽ, पुरुषांची रांग भली मोठी असते. स्त्रियांची रांग पहा.फक्त तीन-चार स्त्रिया रांगेत उभ्या आहेत.तेव्हा तूच तिकिटं काढ ना !" पण भाभीजी हे सारं हसण्यावारी नेतात.त्यांना सुमंतभाईंचा स्वभाव माहीत झाला आहे.त्या आपल्या नवऱ्याला पुरेपूर ओळखतात.पण खरं म्हणजे ती एकमेकांत कशी एकजीव झाली आहेत.राधा कृष्ण बनते.कृष्ण राधा होतो. दसऱ्याच्या दिवसांत गुजराती समाजात दुर्गापूजा मोठ्या उत्साहानं साजरी केली जाते.
सुमंतभाई एखादा दिवस तो सोहळा पाहायला मला बरोबर नेतात.तिथं गेल्यावर मन प्रसन्न होतं.
साऱ्या नवोढा माहेरवासिनी जमल्या आहेत.त्यांत वयात आलेल्या लाडक्या लेकीही आहेत. आधीच त्या रूपवान.
त्यात तारुण्याचा बहर अन् ह्या साऱ्यांना शोभेल असा साजशृंगार,अन् गात फेर धरीत एका लयीत टिपऱ्या खेळत आहेत. त्या लयबद्ध नृत्याकडं मी कितीतरी वेळ भान हरपून पाहत असे.मला भरतपूर पक्षिअभयारण्य व
त्यातील दिवस आठवले.तिथं माझं चांगले महिनाभर वास्तव्य होतं.तिथल्या चौहान या वनाधिकाऱ्याशी चांगलीच ओळख झाली.असाच काहीतरी सोहळा होता,
म्हणून त्यानं मला घरी जेवायला बोलावलं होतं.
सायंकाळची वेळ. त्यांच्या घराच्या अंगणात तरुण मुलं-मुली टिपऱ्या खेळत होती.माझा मित्रही त्यांच्यात समाविष्ट होता.थोड्या वेळानं ते सारे विश्रांतीसाठी थांबले.दुसऱ्या फेरीत चौहान म्हणाले,"चला चितमपल्ली साहेब,घ्या या टिपऱ्या.खेळा तरी बघू." मी प्रयत्न केला. दोघा-तिघा मुलींच्या टिपऱ्या माझ्या बोटांवर बसल्या,तेव्हा मी तो नाद सोडून दिला.एका प्रेक्षकाची भूमिका घेऊन त्यांच्या टिपऱ्या खेळतानाचं लयबद्ध नृत्य पाहत राहिलो.
आता इतकी वर्षं झालीत,परंतु गुजराती साडी ल्यालेल्या,
त्यांच्या काठावर हत्ती,घोडे,हरीण आणि सिंह यांची चित्रं रेखाटली आहेत,भरघोस पदर आहे,त्या साडीचा रंग मांजिठा म्हणजे लालभडक आहे.हे सारं पुढं येऊन मला ज्ञानेश्वरांची विराणी आठवतेय.
हत्ती घोडे हरण सिंहाडे ।
तैसे हे गुजराति लुगडे गे माये ॥१॥
पालव मिरवित गाईन ।
शेलापदरी धरून राहीन ॥२॥
बाप-रखुमादेवीवरू विठ्ठल सावळा ।
तेणे मज माजिठा दिला साऊळा ॥३॥
सकाळी लवकर उठून सुमंतभाईंबरोबर मी हँगिंग गार्डनला फिरायला जात असे.प्रामुख्यानं तिथं फिरायला यायची ती मंडळी गुजराती,जैन, मारवाडी,पारशी समाजातील असायची.गार्डन लहान,त्यामुळं तिथल्या तिथं लोक प्रदक्षिणा घालत.घाईनं कुणी चालत तर कुणी पळत असत.सारे सुखवस्तू घरातील.त्यामुळं शरीरानं गोल,जाड आणि मोठे असत.शेक्सपिअरनं एका ठिकाणी त्याला अशी माणसं आवडत असल्याचा उल्लेख केला आहे.
हँगिंग गार्डनच्या रस्त्याच्या कडेनं गुलाबी बहावा असा भरगच्च फुललेला असे.झाडाला एकही पान नाही.नुसती फुलंच फुलं.खाली गुलाबी पाकळ्यांचा सडा पडलेला.
फुलांच्या मंद गंधानं मी भावाकुल होत असे.कधी अमलतासाचं शिल्प उभं राही.हातभर लांबीच्या काळसर- तपकिरी पिकलेल्या शेंगा वृक्षावर एखाद्या बासरीसारख्या लोंबत आहेत.झाडावर कोवळी इवलीशी लाल लाल नाजूक पानं फुटत आहेत, साऱ्या झाडावर सोन्यासारखे फुलांचे झुंबर लोंबत आहेत,काही फुलली आहेत,तर काही गोलाकार कळ्यांवर आहेत.सोनवर्खी फुलं तर किती सुंदर दिसायची.ह्या फुललेल्या वृक्षांकडं पाहिलं की,मला सुंदर गुर्जर तरुणींच्या चेहऱ्याची आठवण व्हायची अन् असे चेहरे पाहिले की, सर्वांगानं बहरलेला अमलतास आठवायचा.मी सुमंतभाईंकडं गेलो अन् एक-दोन दिवसांचा मुक्काम असला,तर लवकुमार खाचर या पक्षितज्ज्ञाला जेवायला बोलवायला सुमंतभाई विसरायचे नाहीत.लवकुमार राजकोटचे राजपुत्र. धर्मकुमारसिंह या विख्यात पक्षिशास्त्रज्ञांचे ते शिष्य.ते वन्यजीव निधी या संस्थेतील निसर्गशिक्षणाचे प्रमुख होते.पहिल्यांदा लवकुमारांची ओळख सुमंतभाईंनीच करून दिली.नंतर आम्ही एकमेकांचे मित्र झालो. जगप्रसिद्ध छायाचित्रकार आश्विन मेहता यांची ओळख सुमंतभाईंनीच मुंबईतील एका मुक्कामात करून दिली.त्या वेळी त्यांनी नुकताच एका खाजगी कंपनीतील व्यवस्थापक ह्या हुद्याचा राजीनामा दिला होता.स्वतःचा छोटासा फ्लॅट होता.दोन सुंदर गोंडस मुली होत्या.असं मध्येच भरल्या संसारात नोकरी सोडून फोटोग्राफीचा छंद घेतलेला.मेहताबाईंनी सुमंतभाईंजवळ किंचित नापसंतीही दर्शविली.त्या व्यवहारी होत्या.कलाकार म्हणून ते श्रेष्ठ असतील,परंतु कुटुंबाची त्यावर उपजीविका होईल की नाही याबद्दल साशंक होत्या.त्यांचं काही चुकलं नव्हतं.त्यांच्या संग्रही असलेली उत्तम उत्तम छायाचित्रं पाहिली.नुकतेच ते 'झाड' या विषयावर जहांगीर आर्ट गॅलरीमधील प्रदर्शनाच्या तयारीत होते.वृक्षाचं प्रत्येक छायाचित्र म्हणजे सुंदर काव्य होतं.वृक्षाविषयी इतके संवेदनशील मन कुणाचं पाहिल्याचं आठवत नाही.झाडांविषयीची सखोल चिंतनशीलता त्यांच्या छायाचित्रांत डोकावत होती.समुद्राविषयी मला विलक्षण आकर्षण आहे.पश्चिम सागरकाठी मी पायी फिरलो आहे.समुद्राचं अभूतपूर्व सौंदर्य अनुभवलं आहे.तेच सौंदर्य त्यांच्या एका,
समुद्रकिनारा ह्या छायाचित्रप्रदर्शनात आढळून आलं.[शब्दांचं धन-मारुती चितमपल्ली,साहित्य प्रसार केंद्र,सीताबर्डी,नागपूर] तसंच त्यांनी दगडा-धोंड्याच्या छायाचित्रांतून शिळांचं जे शिल्प उभं केलं होतं ते देखील अद्वितीय होतं.जहांगीर आर्ट गॅलरीत हे प्रदर्शन पाहताना पार्श्वभूमीवर डमरूची मनोहर साथ दिली होती.वाटत होतं की,ते संगीत दगडातून तर येत नाही!नंतर या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कलाकारानं मुंबई शहर सोडलं आणि ते नौसारी इथं स्थायिक झाले.त्यानंतर त्यांना मी तिथं भेटायला गेलो होतो,परंतु भेट झाली नाही.पत्रं लिहिली,परंतु पत्राची उत्तरं येत नाहीत.सकाळी भाभीजी मंडईत नियमितपणे
जातात.भाजीपाला,फळं विकत आणतात.पण मी जितके दिवस असेन तितके दिवस रजनीगंधाची फुलं आणायला विसरत नाहीत.रोज मला त्या रजनीगंधाच्या सुगंधी फुलांचा गुच्छ द्यायला विसरत नाहीत.मुंबईहून परत जायच्या दिवशी तर मला रजनीगंधाचा मोठा गुच्छ भेट म्हणून देतात.ती फुलं नवेगावपर्यंत मी सांभाळून आणतो.
साऱ्या प्रवासात त्या फुलांचा गंध साथ करीत असतो.शेवटी मी नवेगावबांधावरील माझ्या निवासस्थानासमोर रजनीगंधाच्या फुलांचा ताटवा लावला,रोज ती फुलं फुलतात.साऱ्या आसमंतात त्यांचा सुवास दरवळत असतो.ती फुललेली फुलं पाहिली की भाभीजींची आठवण होते.एखाद्या जपानी बाहुलीसारख्या त्या माझ्या दृष्टीसमोर दिसू लागतात.म्हणतात कशा,
"भाईसाब,आजकाल तुम्ही मुंबईला आमच्याकडं येत नाही?" खरं आहे तिचं.आता मुंबईत माझं फारसं जाणं होत नाही. आता त्यांचा मुलगा मोठा झालाय.घरात सून आलीय.त्यांना देखील आता मुलंबाळं झालीत, घर लहान झालं.ह्या भरल्या घरात पाहुणा म्हणून जायला मलाच संकोच होतो.पण मुंबईत गेलो, तर त्यांना भेटल्याशिवाय राहत नाही.असंच कधीतरी अवेळी त्यांच्या घराची घंटा वाजवितो. भाभीजी दार उघडायला येतात.आता खूप थकल्या आहेत.डायनिंग टेबलाजवळ बसून त्यांच्याबरोबर गप्पा मारतो.तेवढ्यात भोपळ्याचं थालिपीठ तयार करून ते भाभीजी लोण्याबरोबर एका थाळीत देतात.त्यांना माहीत आहे. हॉटेलमध्ये खात नसल्यानं मी सकाळपासून उपाशी असणार! तिच्या हातचं ते अंगठ्या एवढं जाड,
गरम थालिपीठ खाताना मला अन्नपूर्णची आठवण होते.आता रजनीगंधाची फुलं पाहिली की,त्या वृद्ध पति-पत्नीची आठवण होते.खरेदी केलेल्या एका एका ग्रंथाची आठवण होते.त्या ग्रंथात खुणेसाठी मी रजनीगंधाची फुलं ठेवली आहेत.त्या ग्रंथालादेखील फुलांचा वास लागला आहे.लौकिक दृष्टीनं माझं तिचं कसलंही नातं नाही.पण मनात येतं पूर्वसंचित असेल,तर प्रार्थना करीन की,मी पुत्र म्हणून तिच्या पोटी जन्माला यावं.