* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२०/५/२४

व्हर्जिनिया हॉल…Virginia Hall...

महिला - अबला की सबला,स्त्रीमुक्ती,अशा विषयांवरून आजही आपल्याकडे चर्चा झडताना,

आंदोलनं होताना दिसतात.खरं तर हा वादाचा मुद्दा नाहीच किंवा नसावा.पण लोकांना वाद घालायची सवयच असते असे मानून इतर क्षेत्रांतील या वादाकडे आपण दुर्लक्ष करू या. 


इतर क्षेत्रांत जरी महिलांच्या कार्यक्षमतेबाबत वाद घातले जात असले,तरी गुप्तहेर जगतात मात्र सर्वोत्तम हेर म्हणून स्त्रियांना मानाचं स्थान आहे.हेरगिरीतील स्त्रियांचं कर्तृत्वही तसचं मोठं आहे.अशाच एका कर्तृत्ववान महिला हेराचं नाव आहे व्हर्जिनिया हॉल.त्यांच्या कर्तृत्वाचा थोडक्यात परिचय आपण येथे करून घेऊ.

( अमेरिकेची सी.आय.ए.- पंकज कालुवाला, परममित्र पब्लिकेशन,ठाणे )


व्हर्जिनियाचा जन्म बाल्टीमोर,मेरीलँड येथला. जन्मतारीख १ एप्रिल १९०६.ती आपल्या बालपणी इतर सामान्य मुलींपेक्षा नक्कीच वेगळी होती.जिज्ञासू,चौकस स्वभावाच्या व्हर्जिनियाला आपल्या आजूबाजूच्या जगात काय चालले आहे हे जाणून घ्यायची अदम्य उत्सुकता असायची.ज्ञानपिपासू असलेल्या व्हर्जिनियाने फ्रेंच,

इटालियन आणि जर्मन या भाषा शिकून घेतल्या होत्या.ते शिक्षण रॅडक्लिफ आणि बार्नार्ड कॉलेजातून तसेच पॅरिस व व्हिएन्ना येथे पूर्ण केले होते.ते पूर्ण होईपर्यंत १९२१ हे वर्ष उजाडलं.त्याच वर्षी ती अमेरिकेला परत आली.अमेरिकेत येऊन ती स्वस्थ बसली नाही.तेथे जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीत पुन्हा फ्रेंच तसेच अर्थशास्त्र शिकण्यासाठी तिने प्रवेश घेतला.त्यानंतर १९३० च्या सुरुवातीला ती पोलंडची राजधानी वॉर्सा येथल्या अमेरिकी दूतवासात क्लर्क म्हणून रुजू झाली.


तरुण आणि हुशार माणसांना महत्वाकांक्षा या असतातच.

व्हर्जिनियाही त्याला अपवाद नव्हती.तिची महत्त्वाकांक्षा होती ती परराष्ट्रसेवेत नाव कमावायची.मात्र प्रत्येक वेळी आपण ठरवितो तसं होतंच असं नाही.काही गोष्टी नियतीने आपल्यासाठी आधीच आखून ठेवलेल्या असतात हेच खरे.नियतीनेही व्हर्जिनियासाठी काहीतरी ठरवून ठेवले असावे. नाहीतर अमेरिकेत दूरवर राहणाऱ्या व्हर्जिनियाला युरोपातील तीन वेगळ्या भाषा शिकून घ्यायची इच्छा का व्हावी? त्यानंतरही एक मोठा पण दुर्दैवी योगायोग घडला.या योगायोगाने तिचं आयुष्यच बदलून गेलं असं मानायला हरकत नाही.त्याचं झालं असं की, एकदा व्हर्जिनिया शिकारीसाठी तुर्कस्तानांतील इझमीर या ठिकाणी गेली होती.मात्र तेथे शॉटगनची गोळी आपल्या शिकारीवर झाडण्याऐवजी चुकून आपल्या डाव्या पायावरच झाडून बसली.दुर्दैवाने तिच्यावर लवकर औषधोपचार झाले नाहीत.औषधोपचार होईपर्यंत वेळ निघून गेला होता.तिच्या पायाला गैंग्रीन झाल्यामुळे गुडघ्याखालून कापावा लागला.पण म्हणून व्हर्जिनिया निराश झाली नाही.पाय बरा होऊन ती कृत्रिम पाय वापरू लागल्यानंतर तिने फॉरिन सर्व्हिस बोर्ड एक्झेंमसाठी अर्ज केला.मात्र तिच्या अपंगत्वाचे कारण पुढे करत तो अर्ज फेटाळण्यात आला. परराष्ट्र सेवेत काहीतरी करून दाखविण्याच्या तिच्या आशेवर पाणी पडलं.पुढे प्रगती करण्यास वाव नाही,हे पाहून १९३९ च्या मे महिन्यात तिने अमेरिकी दूतावासातील आपल्या पदाचा राजीनामा दिला.नंतर फ्रान्समध्ये जाण्याचा निर्णय व्हर्जिनियाने घेतला.या वेळेपर्यंत युरोपात युद्धाचे पडघम वाजू लागले होते.जर्मनीची घोडदौड़ वेगाने सुरू झाली होती. व्हर्जिनिया त्यावेळी फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये वास्तव्याला होती.मानवतेच्या नात्याने तिने फ्रेंच ॲम्ब्युलन्स सर्व्हिसमध्ये प्रायव्हेट सेकंडक्लास म्हणून जाण्याचा निर्णय घेतला.


तेथे खूप काळ तिला सेवा करता आली नाही. १९४० च्या जून महिन्यात संपूर्ण फ्रान्स जर्मनांच्या टाचेखाली आला आणि व्हर्जिनियाला इंग्लंडमध्ये पळून जावे लागले.मात्र येथेही ती गप्प बसली नाही.आपल्या देशाच्या युद्धप्रयत्नांना मदत म्हणून तिने अमेरिकी दूतावासातील मिलिटरी ॲटशेची कोडक्लर्क म्हणून नोकरी पत्करली.

मात्र लवकरच ती घातपाती कारवाया करण्यासाठी ब्रिटिशांनी नुकत्याच स्थापन केलेल्या स्पेशल ऑपरेशन्स एक्झिक्युटिव्ह (SOE) या संस्थेत दाखल झाली.


युद्धकाळात चालविण्यात येणाऱ्या घातपाती कारवायांचं सगळं प्रशिक्षण तिला देण्यात आलं.या प्रशिक्षणांत निरनिराळी शस्त्रास्त्रं चालविण्यापासून संपर्कसाधने चालविणे तसेच सशस्त्र प्रतिकार करण्याच्या योजना आखून त्या कार्यान्वित करण्यापर्यंतच्या सगळ्याच बाबींचा समावेश होता.आपल्या अपंगत्वावर मात करून व्हर्जिनियाने हे खडतर प्रशिक्षण नेटाने पूर्ण केले. १९४१ च्या ऑगस्टमध्ये फ्रान्समधील व्हिची (Vichy) या ठिकाणी तिला मोहिमेवर पाठविण्यात आले.तेथे तिला शिरकाव करता यावा म्हणून 'न्यूयॉर्क पोस्ट' या वर्तमानपत्राची वार्ताहर असल्याचं कव्हर देण्यात आलं.



वार्ताहराच्या या खोठ्या ओळखीखाली राहून तिला दोस्तांसाठी गुप्तहेरांचं जाळं उभं करायचं होतं.असं कार्यक्षम हेरांचं जाळं तिने तेथे उभारलंचं,पण त्याचबरोबर युद्धकैद्यांना, वैमानिकांना पळून जाण्यात मदत करणे,फ्रेंच भूमिगत क्रांतिकारकांबरोबर काम करणे,अशी कामेही तिने प्रभावीपणे केली.तिच्या या कारवायांचा प्रचंड फटका जर्मनांना बसू लागला तेव्हा तिला पकडण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात शोधमोहीम सुरू केली.


ही शोधमोहीम १९४२ नंतर तीव्र करण्यात आली.एका शोधमोहिमेदरम्यान ती जर्मनांच्या हातात सापडणारच होती;पण काहीतरी उचापत करून निसटून जाण्यात ती सफल झाली. ती 'पायरिनीज माऊंटनस' हा पहाडी प्रदेश ओलांडून स्पेनमध्ये गेली.या तिच्या पलायनाचं वैशिष्ट्य म्हणजे,भल्याभल्या गिर्यारोहकांनाही थकविणारा हा प्रवास तिने आपल्या कृत्रिम पायांसह आणि हाडे गोठविणाऱ्या थंडीत केला होता. जिद्दीने तो पूर्णही केला.


मात्र ती स्पेनमध्ये पोहोचली तेव्हा तिला तुरुंगाची हवा खायला लागली.स्पेनमधील अमेरिकन दूतावासाने विनंती केल्यानंतर तिची सुटका झाली.येथेही तिच्या हेरगिरी

कारवायांना सुरुवात झाली.येथे तिचे कव्हर होते 'शिकागो टाइम्स'ची वार्ताहर त्यासाठी ती काही महिने स्पेनची राजधानी माद्रिद येथे तळ ठोकून होती.तिचं येथील काम जोरात सुरू असतानाच तिला परत इंग्लंडला बोलविण्यात आलं. इंग्लंडमध्ये पोहचल्यावर तिला इंग्लंडचे राजे पाचवे जॉर्ज यांच्या हस्ते 'मेम्बर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी ब्रिटिश एम्पायर' हा किताब देण्यात आला.इंग्लडला तिला परत बोलवण्यामागचा खरा उद्देश वायरलेस ऑपरेटर म्हणून प्रशिक्षण देणे हा होता.तिचं हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तिची बदली अमेरिकेच्या OSS मध्ये करण्यात आली. त्यानंतर नोव्हेंबर १९४३ मध्ये ती नाझीव्याप्त फ्रान्समध्ये परत गेली.


मात्र त्या वेळी तिने वार्ताहराचा वेष धारण केला नाही.

त्याऐवजी तिने निरुपद्रवी सहज लक्षात न येणाऱ्या गौळणीचा वेष धारण करणे पसंत केले.सकाळी गौळण बनलेली व्हर्जिनिया सर्वत्र फिरून बातम्या गोळा करीत असे आणि रात्री बिनतारी संदेशाद्वारे इंग्लडला पोहचवत असे.तिच्या या कारवायांच्या खबरा जर्मनापर्यंत पोहचल्या.गेस्तापो तिच्या मागावर निघाले.संपूर्ण फ्रान्समध्ये ती हवी असल्याची पोस्टर्स झळकविण्यात आली.त्यात 'लंगडत चालणारी दोस्तांची हेर' असा खास उल्लेख होता.त्यावर सरळ सामान्य माणसांसारखं चालायला शिकून,वेषांतर करून तिने जर्मनांना गुंगारा दिला.गुप्त माहिती गोळा करणे व ती आपल्या राष्ट्रापर्यंत पोहचविणे हे तर तिचं मोठं काम होतंच,पण या कामाव्यतिरिक्त तिने दोस्त राष्ट्रांना आणखी बऱ्याच मार्गांनी मदत केली.जून १९४४ मध्ये दोस्तांनी नॉर्मडीवर हल्ला चढविला.तेव्हा हवाई मार्गाने रसद,शस्त्रास्त्रे व सैनिक पोहोचावेत म्हणून तिने साहाय्य केलं.


त्याचबरोबर फ्रेंच प्रतिकार दलं उभारून त्यांना घातपाताचं प्रशिक्षण देणं व स्वतः त्यांचं नेतृत्व घेऊन अनेक घातपाती मोहिमा व्हर्जिनियाने तडीस नेल्या.

युद्धकाळात व्हर्जिनियाने निरनिराळी नावे धारण केली होती.त्यांतली काही मारिया,मोनिन,जर्मेन,डायनी,कॅमिली, निकोला तर जर्मनांनी तिला दिलेलं लिम्पिंग लेडी (लंगडणारी बाई) हे.


महायुद्धाच्या दरम्यान व्हर्जिनियाने आपल्या देशाची अन् मानवतेची फार मोठी सेवा केली.या सेवेची आठवण अर्थातच अमेरिकेने ठेवली. महायुद्ध संपल्यानंतर जेव्हा ती अमेरिकेत परत गेली तेव्हा तिला डिस्टिंग्विश सर्व्हिस क्रॉस देऊन सन्मानित केलं गेलं.


अमेरिकेच्या आतापर्यंतच्या इतिहासात हे पदक मिळविणारी ती एकमेव महिला आहे,याची नोंद आपण घेतली पाहिजे.तिच्या कार्याचं महत्त्व समजायला तेवढं पुरेसं आहे.


महायुद्धानंतर तिने आपल्या या हेरगिरीच्या उद्योगाला रामराम ठोकला.मात्र केवळ चार-पाच वर्षेच ती या उद्योगातून दूर राहिली. १९५७ मध्ये ती एजन्सीमध्ये रुजू झाली.एजन्सीच्या ऑफीस ऑफ पॉलिसी कोऑर्डिनेशन विभागात विश्लेषक म्हणून काम करू लागली.१९५२ मध्ये तिची नेमणूक नवीन स्थापन करण्यात आलेल्या ऑफिस ऑफ डेप्युटी डायरेक्टर ऑफ प्लॅन्स(ऑपरेशन्स) या ठिकाणी करण्यात आली.या विभागात काम करणारी ती पहिली महिला होती.या विभागात काम करताना ती राजकीय मोहिमा आखणे,विस्थापितांच्या मुलाखती घेणे आणि यदाकदाचित तिसरे महायुद्ध झालेच तर सोव्हिएत संघाविरुद्ध सुनियोजित प्रतिकार तसेच घातपात कारवाया करणारं जाळं उभारणं अशी काम करत होती.एजन्सीसाठी तिने पुढील १४ वर्षे काम केलं.या काळात परदेशांतही काही मोहिमा तिने पार पाडल्या.मात्र त्या कोणत्या, त्यांचे स्वरूप,ठिकाण यांविषयी कोणतीही माहिती उपलब्ध नाही.१९६० मध्ये वयाच्या ६० व्या वर्षी ती एजन्सीमधून निवृत्त झाली.


आयुष्याचा पुढील काळ व्हर्जिनिया यांनी बागकामात व्यतीत केला.१९८२ मध्ये वयाच्या ७६ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.अशा रितीने हेरगिरीच्या विश्वातील तेजाने तळपणारा तारा निखळला.व्हर्जिनियाबाईच्या त्या तेजस्वी कारकिर्दीस अंतःकरणपूर्वक प्रणाम !


१८/५/२४

सुख म्हणजे…Happiness is…

सुख म्हणजे नक्की काय असतं...???


सोहम ट्रस्टचे हितचिंतक आणि माझे मित्र यांनी एके दिवशी व्हाट्सअप वर एका कुटुंबाची माहिती दिली आणि यांच्या संदर्भात काही करता यईल का ? असं विचारलं.आज दि १४ मे २०२४ रोजी मी या कुटुंबाला भेटायला त्यांच्या घरी गेलो. 


घर कसलं ? दोन इमारतींमध्ये एक मोकळी जागा... तिथे या कुटुंबाने संसार मांडला होता...! 


एक चिमणा...एक चिमणी... चिमण्याची वृद्ध आई आणि चिमणा चिमणीची दोन लहान पिल्लं एवढा हा संसार...! 


चिमणा धडधाकट होता, तो रिक्षा चालवायचा...  बाहेर जाऊन, वृद्ध आई आणि लहान पिल्लांसाठी दाणे गोळा करून संध्याकाळी घरी परत यायचा....! 


चिमणी सुद्धा चिमण्याला मदत करायची... तिच्या परीने संसाराला हातभार लावायची.... 


चिमण्याची वृद्ध आई घरट्यात दिवसभर एकटी असायची.... पिल्लं शाळेतून घरी आली की त्यांना पंखाखाली घेऊन गोष्टी सांगायची....


एकंदर सगळं कसं दृष्ट लागण्यासारखं चाललं होतं.... आणि एके दिवशी खरंच दृष्ट लागली...


काही वैद्यकीय परिस्थितीमुळे चिमण्याचा डावा पाय अक्षरशः खुब्यातून कापून काढावा लागला...


घरचा कर्ता पुरुष खाटेवर असहायपणे पडून होता... खंबीर नवऱ्याची असहाय्य अवस्था पाहून, खांबा आड लपून चिमणी मनसोक्त रडून घ्यायची...


चिमण्याच्या वृद्ध आईचा डावा डोळा पूर्ण निकामी,त्याही अवस्थेत ती पिलांना धीर द्यायची....होईल बाळांनो,सगळं व्यवस्थित काळजी नका करू,चला तुम्ही अभ्यासाला लागा....! ती धीर द्यायची. 


अभ्यासाचं नाटक करत पिलंही मग पुस्तकाच्या आड लपून पोटभर रडून घ्यायची...


आपण खचलो नाही,हे नाटक दिवसभर म्हातारी उत्तम वठवायची.... पण रात्री सर्व सगळे झोपले की पाय तुटलेल्या पोराकडे पाहून हिला जोरात रडावसं वाटायचं... पण रडायचीही चोरी.... कारण ती जर रडली तर बाकीचे सगळे तुटून जातील....!


मण्यांना जोडणारा आपण धागा आहोत.... हा धागा तुटला तर मणी निखळतील,याची म्हातारीला पुरेपूर जाणीव होती....


एक डोळा अधु ...तरीही ही म्हातारी धडपडत चाचपडत दाराची कडी हळूच काढून घराबाहेर जायची... बाहेर रस्त्यावर एकही माणूस नसायचा....  


बेवारस कुत्री,मांजरं,अगोदरपासूनच आकाशाकडे तोंड करून कोणालातरी ओरडून त्यांच्या भाषेत काहीतरी सांगत असायची... ही भाषा करुण असते.... 


म्हातारी मग त्यांच्याच आवाजात आवाज मिसळून त्यांच्यातलीच एक व्हायची...


जनावर आणि माणूस यांच्यात मग फरकच उरायचा नाही...! 


दुःखाला जात पात धर्म लिंग काहीही नसतं...! 


कुत्र्या मांजराच्या साथीने रडून घेऊन ती मन मोकळं करायची .... हळूच घरात येऊन चिमण्याच्या डोक्यातून हात फिरवायची... जिथून पाय तोडला आहे,त्या जखमांवरच्या पट्ट्यांवर खरबरीत हात फिरवायची... 


वेदनेनं तळमळत असलेल्या चिमण्याला झोप तरी कशी यावी ? तो जागाच असायचा...


तो आईला विचारायचा ,'आई इतक्या रात्री दिसत नसतानाही बाहेर कुठे गेली होतीस ?? 


'अरे बाळा, आज दिवसभर नळाला पाणीच आलं नाही.... आता रात्री तरी पाणी येतंय का ? हे बघायला बाहेर नळावर गेले होते... तू झोप !'


तो इतक्या त्रासातही गालात हसायचा आणि विचारायचा,'नळाला पाणी येतंय की नाही,हे बघायला दोन तास लागतात आई ?' 


'अरे तसं नव्हे,आपल्या दारासमोर इतकी कुत्री मांजरं रडत होती...  मलाही झोप येईना,मग बसले त्यांच्याच सोबत जरा वेळ....' 


'त्यांच्यासोबत तू सुद्धा रडत होतीस ना आई ?  कुत्र्या मांजरांच्या आवाजाबरोबर मिसळलेला मला तुझा आवाज सुद्धा कळतो की गं आई ...'


कापलेल्या पायाच्या वेदनेपेक्षा,डोक्यात उठलेली ही सणक जास्त वेदनादायी होती....! 


म्हातारी तेवढ्यातून सुद्धा हसायचं नाटक करत म्हणायची, 'मला मेलीला काय धाड भरली रडायला..भरल्या घरात?' 


एक डोळा नसलेल्या आजीचा,दुसरा डोळा मात्र यावेळी दगा द्यायचा... या दोघांचं संभाषण ऐकून.... तो स्वतःच पाणी पाणी व्हायचा ...


आणि हेच पाणी मग चिमण्याच्या गालांवर अभिषेक करायचे.... म्हातारीच्या नकळत....! 


चिमणा मग तोडलेल्या पायाच्या पट्ट्यांवर दोन्ही हात ठेवून वेदनेनं कळवळत आईला म्हणायचा, 'आई बहुतेक नळाला पाणी आलंय बघ आत्ता...' 


हो रे हो,म्हणत म्हातारी पुन्हा धडपडत घराबाहेर जायची आणि दोन तास घरात परत यायचीच नाही...!


दिवसभर थांबवून ठेवलेलं पाणी,आता मध्यरात्री कोसळायचं एखाद्या धबधब्यासारखं...! 


घराबाहेर नळाला पाणी येत असेलही... नसेलही.... परंतु चिमण्याची उशी मात्र रोज सकाळी ओली चिंब भिजलेली असायची.... कशामुळे काही कळलं नाही बुवा ! 


हा मधला काळ गेला.... या काळामध्ये चिमणीने आणि वृद्ध आजीने घरटं सांभाळलं.... 


काही काळानंतर,हा सुद्धा जिद्दीने उठला.... म्हणाला, 'फक्त डावाच पाय कापला आहे.... रिक्षा चालवायला अजून माझे दोन हात शिल्लक आहेत.... रिक्षाचे ब्रेक दाबायला उजवा पाय लागतो, तो ही माझ्याकडे शिल्लक आहे.... इतकं सगळं शिल्लक आहे, तर मग मी गमावलंच काय... ?


त्याच्या या वाक्यावर आख्य्या घरात चैतन्य पसरलं...! 


याही परिस्थितीत काही काळ सुखाचा गेला.... पण,अशी काही परिस्थिती उद्भवली की त्याच्या चिमणीला गुडघ्याचे आजार उद्भवले आणि ती कायमची अपंग झाली....! 


स्वतःचा पाय कापला जाताना जितका तो व्यथित झाला नसेल,तितका तो चिमणीला अपंग अवस्थेत पाहून व्यथित झाला.... कोलमडला...! 


एक पायाचा चिमणा आणि दोन्ही पाय असून नसलेली चिमणी.... दोघांच्याही डोक्यावर घरटं सांभाळण्याची जबाबदारी....! 


नळाला पाणी आलंय का बघते म्हणत,म्हातारी मात्र रोज रात्र रात्रभर घराबाहेर राहू लागली.... उश्या भिजतच होत्या... पुस्तका आड दोन्ही पिलांचे डोळे सुजतच होते.... 


याही परिस्थितीत तो खचला नाही... नेहमी तो म्हणायचा, 'माझे दोन हात आहेत आणि उजवा एक पाय आहे मी काहीही करू शकतो....!' 


ज्यांच्याकडे सर्व काही आहे आणि तरीही ज्यांना काही करायचं नसतं,अशांसाठी ही चपराक आहे. 


या सर्व अवस्थेत या जिद्दी कुटुंबाने परिस्थितीशी सामना केला.... जुळवून घेतलं....! 


परंतु आता मात्र या परिस्थितीला सुद्धा खरोखर दृष्ट लागली....


चिमण्याच्या हाताला काहीतरी इन्फेक्शन झालं..


ते वाढलं.... आणि डॉक्टरांनी उजवा हात कापावा लागेल असं सांगितलं....! 


या वाक्याबरोबर मात्र पहिल्यांदाच चिमणा कोसळला आणि त्यानंतर म्हातारी....! 


चिमणीला तर पायच नव्हते,ती खाटेवरच पडून होती.... म्हणून तिच्यावर कोसळायची वेळ आलीच नाही... पण आता मात्र ती पूर्णतः ढासळली....!


दोन्ही लहान पिलं आजीच्या थरथरत्या पंखाखाली निपचित पडली.... ! 


हीच ती वेळ.... माझ्या मित्राने मला सांगितले या कुटुंबासाठी काही करता येईल का ते बघ.... 


आणि म्हणून आज मी इथे होतो....! 


गेले तीन तास मी इथे आहे.... आयुष्यातले चढ उतार रोज बघायची मला सवय आहे... 


तरीही चिमणा चिमणी आणि म्हातारीच्या वेदना ऐकून.... एक फोन येतोय हं... असा बहाणा करत, मी किती वेळा घराबाहेर आलो असेन याची गणती नाही....! 


इतक्या वेळा घराबाहेर आलो,पण म्हातारीच्या घराबाहेर मला कुठेही नळ मात्र दिसला नाही...! 


म्हातारीच्या मनातला तो नळ,मला किती वेळा भिजवून गेला.... कसं सांगू...? 


शेवटी चिमण्याला आणि म्हातारीला हात जोडून म्हणालो,'आम्ही तुम्हाला काय मदत करू ?' 


ते स्वाभिमानी कुटुंब यावेळी निःशब्द झालं... आणि मला माझीच लाज वाटली.... ! 


'चिमण्या,जोपर्यंत तू "समर्थ" होत नाहीस तोपर्यंत किराणा भरून देऊ...?' मी निर्लज्जपणे विचारलं. 


'नको माऊली', चिमण्या अगोदर म्हातारी हात जोडत बोलली. 


'पोरांच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊ ?' 


'नको काका;आम्हाला दोघांनाही स्कॉलरशिप मिळते त्यात आमचं शिक्षण होतं...' मोठी पोरगी चिवचिवली...


खाटेवर अगतिकपणे पडलेल्या ताईकडे मीच पाय तुटलेल्या माणसासारखा गेलो आणि तिला म्हणालो,'अगं ताई, तुझ्या उपचारांचा खर्च करूया का आपण...?'


ती म्हणाली,'नको दादा माझा सगळा उपचार ससून मध्ये सुरू आहे,तिथं काही पैसे लागत नाहीत... शिवाय ससून मध्ये एक समाजसेवी संस्था आहे ती आम्हाला मदत करते आहे....' 


शेवटी पाय ओढत, चिमण्याकडे गेलो आणि म्हणालो, 'अरे बाबा, तू तरी सांग,आम्ही कशी मदत करू तुम्हाला...?' 


माझे जोडलेले हात हाती घेऊन डोळ्यात अश्रू आणून तो म्हणाला,'डॉक्टर,माझा उजवा हात कापला जाऊ नये इतकीच प्रार्थना करा... 


'मी परत रिक्षा चालवून माझं संपूर्ण कुटुंब पुन्हा चालवू शकेन,इतकीच प्रार्थना करा...' 


'मी आणि माझं कुटुंब कोणावर सुद्धा अवलंबून राहणार नाही इतकीच प्रार्थना करा...'


'आणखीही काही दुःख मिळाली तर ती सहन करण्याची ताकद मला मिळो,इतकीच प्रार्थना करा....'  


'बस आणखी तुमच्याकडून दुसरं काहीही नको...!!!'


त्याने नमस्कारासाठी हात जोडले...


त्याच्या या वाक्यावर मला रहावलं नाही.... आपोआप त्याच्या खांद्यावर मी डोकं टेकवलं आणि माझा बांध फुटला... 


त्याचा खांदा माझ्या अश्रूंनी भिजला.... 


या उपरही माझ्या खांद्यावर हात थोपटून तोच म्हणाला,'काळजी करू नका डॉक्टर...सगळं काही होईल व्यवस्थित.... !!! 


कोण कोणाला मदत करत होतं ...हेच कळत नव्हतं...! 


यानंतर म्हातारी लगबगीने उठून बाहेर जायला निघाली.... अस्तित्वातच नसलेल्या नळाला पाणी येतंय की नाही,हे बघण्यासाठी म्हातारी कदाचित बाहेर गेली असावी...

आता ती दोन तास येणार नाही, हे मला माहीत होतं....!!! 


एका गरीब कुटुंबाला मदत करायला गेलेलो मी, तिथून बाहेर पडताना आज मीच खूप श्रीमंत झालो... 


सुख म्हणजे नक्की काय असतं,हे मलाही आजच समजलं... !!! 


डॉ.अभिजीत सोनवणे 

डॉक्टर फॉर बेगर्स 

सोहम ट्रस्ट पुणे.


अत्यंत महत्त्वाची टीप : हे स्वाभिमानी कुटुंब स्वतःच्या तोंडाने काहीही मागत नसलं,तरी सुद्धा यांच्या घराला छप्पर नाही,फाटकी ताडपत्री आहे,येत्या पावसाळ्यात ही फाटकी ताडपत्री आणखी फाटून घराचा चिखल होणार आहे.  घरात दोन अपंग व्यक्ती,वृद्ध आई आणि दोन लहान मुलं राहतात.... सबब या कुटुंबाने काहीही मागितले नाही तरी आपण त्यांच्या घराला पत्रे लावून देणार आहोत.बघू त्याच्या घरून निघताना तो माझ्या खांद्यावर थोपटून म्हणाला होता,'डॉक्टर,काळजी करू नका, होईल सगळं व्यवस्थित.... त्याच्या याच शब्दांवर माझाही विश्वास आहे ....!!!


सुख म्हणजे नक्की काय असतं ?  उत्तरार्ध...!


"सुख म्हणजे नक्की काय असतं" या माझ्या लेखातील कुटुंब भीक मागत नाही,परंतु त्यापेक्षा त्यांची अवस्था वेगळी नाही.समाजात अशा स्वावलंबी लोकांची ओळख व्हावी म्हणून लिहिले,अर्थात त्यांची कोणतीही ओळख न देता! 


भीक मागणाऱ्या लोकांच्या पुनर्वसनासाठी माझी संस्था काम करते,टेक्निकली भिक न मागणाऱ्या कुटुंबाला मी मदत करू शकत नाही.... 


परंतु,भिक मागायला लागल्यानंतर त्याचे पुनर्वसन करणे यापेक्षा त्याला भीकच मागू न देणे यात शहाणपणा नाही का ? अशा प्रकारचा युक्तिवाद करून संस्थेमार्फत मदत करण्याची परवानगी घेतली. 


सुरुवातीला या कुटुंबाच्या घरावर पत्रे टाकून देणे,इतकाच मर्यादित हेतू होता... परंतु माझ्या या मेसेज नंतर मदतीचा ओघ इतका वाढला की मला शेवटी सांगावे लागले आता पुरे....बास...!


आता मला सांगायला खूप आनंद वाटतोय,की या संपूर्ण कुटुंबाला आपल्या सर्वांच्या वतीने आपण दत्तक घेतले आहे.आपण म्हणजे "आपण सर्व" मी किंवा मनीषा नव्हे...! 


जो निधी आणि वस्तू मिळाल्या आहेत त्यात,या संपूर्ण कुटुंबाचे टप्प्याटप्प्याने आपण पुनर्वसन करणार आहोत. 


सर्वप्रथम गुरुवारी १६ मे रोजी या कुटुंबाच्या घराच्या पत्र्याची सोय केली आहे, (एकूण २५ ते ३)पत्रे लागणार होते,त्यापैकी १५ पत्रे कन्स्ट्रक्शन व्यवसायातील माझे मित्र श्री.राहुल उंडे यांनी मोफत  दिले.) आपण सर्वांनी दिलेल्या निधीतून घराचे पत्रे लावणाऱ्यांची मजुरी दिली आहे,त्यानंतर पुढे चार महिने पुरेल इतका शिधा / किराणा दिला आहे.आजी व त्या ताई साठी डॉ.मनीषा हिच्या हस्ते नवीन साड्या दिल्या आहेत.त्याचप्रमाणे लागतील ती सर्व वैद्यकीय साधने सुध्दा दिली आहेत,याशिवाय हात खर्चासाठी रुपये पाच हजार रोख दिले आहेत.


सुधीर आदमने हे माझे जेष्ठ स्नेही,यांना हे कळल्यानंतर त्यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या संपूर्ण खर्च वजा करून त्यांच्या वजनाइतके धान्य दिले आहे...


या व्यतिरिक्त ज्यांनी आर्थिक स्वरूपात मदत केली त्यांची नावे लिहिणे इथं केवळ अशक्य आणि अशक्य आहे....!


हा लेख वाचून शेकडो जणांचे मला रडत फोन आले... 


मी सुद्धा असा जेव्हा काही एखादा लेख लिहितो त्यावेळी मी शेकडो वेळा रडतो... 


कुणाच्या धर्म जाती पंथ यावर भावनेच्या भरात माझ्याकडून काही लिहिले गेले नाही ना ? 

याचा हजार वेळा विचार करावा लागतो.  


आधीच ते उघडे झाले आहेत, त्याच्यात माझ्याकडून त्यांना अजून उघडं केलं जाणार नाही ना ? याचाही विचार करावा लागतो.... 


ते जिथे राहत आहेत,तिथेच त्यांना राहायचे आहे.... माझ्या लिखाणामुळे,त्यांना काही अडचण येणार नाही ना ? याचा विचार करावा लागतो. 


त्यांचे अनेक हितशत्रू असतात.... या हितशत्रूंपासून त्यांना काही त्रास होणार नाही ना ? याचाही विचार करावा लागतो


अशाप्रकारे,शेकडो वेळा लिहितो आणि शेकडो वेळा खोडतो...


आणि मग आत्ता लिहायला घेतलेला लेख,१२ते १४ तासानंतर पूर्ण होतो... ! 


यामध्ये तहान भूक आणि झोप या कोणत्याही गोष्टीचा विचार डोक्यात येत नाही.... ! 


यावेळी डोकं फिरलंया .... बयेचं डोकं फिरलंया.... हाच भाव घरातल्या सर्वांचा असतो...


लेखाजोखाचं सुद्धा असंच... बसलोय,दहा मिनिटात काहीतरी खरडलं;आणि तुम्हाला पाठवलंय असं होत नाही...! 


यात शुद्धलेखनाच्या अनंत चुका असतात....माझे अनेक स्नेही या चुका माझ्या लक्षात आणून देतात... 


पण मी दहावीत दोनदा नापास आहे आणि त्या अगोदर सुद्धा माझं शालेय शिक्षण मी काही मन लावून केलं नाही,त्यामुळे माझा पाया कच्चा आहे.... शुद्धलेखनाच्या चुका होणारच.... !


पण माणसांना समजून घेताना मी कोणतीही चूक करत नाही हे मात्र नक्की!!! 


शेवटी शाळेत आणि कॉलेजात पडलेल्या "मार्कांपेक्षा" अंगात असलेले "गुण" महत्त्वाचे.... नाही का ???


असो.... एखादा लेख लिहिणं हे खऱ्या अर्थानं हे एक बाळंतपण असतं.... 


१२-१४ तास मी सुद्धा अडलेला "गर्भार पुरुष" असतो,जोपर्यंत डिलिव्हरी होत नाही,तोपर्यंत कळा सोसायच्या..... यानिमित्ताने आईपण भोगता येतं...! 


असो,सांगायला अजून लय काही आहे.... आता बास.... तुम्ही असंच वाचत जाता आणि मंग माजेही लेख लांबत जातात.... आमी नाय खेळत ज्जा...! 


तर,यापुढील टप्प्यात त्या नवरा बायकोचे ऑपरेशन करणार आहोत. 


त्या पुढील टप्प्यात दोन्ही मुलांना शैक्षणिक मदत करून त्यांचे पालकत्व स्वीकारत आहोत. 


याबाबत केलेल्या आजच्या कामाचे प्रातिनिधिक फोटो सादर करीत आहे.


हे सर्व करण्याची हिंमत केवळ आपल्यामुळे आली... यात आमचं कोणतंही श्रेय नाही..... 


आम्ही आपल्या समोर नतमस्तक आहे...!


डॉ अभिजीत आणि डॉ मनीषा सोनवणे 

Doctor for Beggars


(टीप : आमच्याकडे कोणीही व्यक्ती कामाला नाही.... जीवन माझा सहकारी,,त्याने डोक्यावरून पत्रे आणले....डोक्यावरून पोती वाहिली.... तो सेवा म्हणून हे करतो... मी त्याच्याही पुढे नतमस्तक आहे, ही अशी माणसं माझ्यासोबत आहेत म्हणून मी जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे....! )

१६/५/२४

कृत्रिम निर्मितीचे विश्व A universe of artificial creation

अनेक पशु-पक्षी कृत्रिम वस्तू घडवतात.मुंग्या-वाळव्यांची वारुळे,कागदमाशांची कागदाची,मधमाशांची मेणाची पोळी,बीव्हर ह्या उंदरांच्या जंगी भाईबंदांचे पाण्यात बांधलेले बांध,सुगरिणीची डौलदार घरटी.सामान्यतः ह्या कृत्रिम निर्मिती उपजत प्रेरणांतून ठरलेल्या साच्यांतल्या रचना असतात.पण कोणी,कोणी त्यांतही आपली काही तरी खासियत,सौंदर्यदृष्टी दाखवतात.ह्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे न्यू गिनीतले कुंजविहारी - बॉवरबर्ड.ह्या पक्ष्यांचे नर रानात जमिनीवर आपले घरटे थाटतात आणि त्याला आकर्षक करण्यासाठी रंगीत गोटे,शंख - शिंपले,

पिसे अशा नानाविध शोभेच्या वस्तूंनी सजवतात.हे मोठ्या चुषीने करतात आणि ह्यातही काही फॅशनी सुरू होतात.

ह्या फॅशनींचा अभ्यास करण्यासाठी शास्त्रज्ञांनी त्यांना वेगवेगळ्या रंगांच्या चकचकीत कचकडी चकत्या पुरवल्या.मग एका दरीत जांभळ्या चकत्यांची फॅशन सुरू झाली.सगळे नर जांभळ्याच चकत्या वापरायला लागले,

तर दुसऱ्या दरीत गुलाबी चकत्यांची चलती सुरू झाली !


प्राण्यांचे कृत्रिम वस्तुविश्व तसे अगदी मर्यादित आहे.माणसाने मात्र त्याला अगडबंब बनवले आहे.

मानव कार्यकारणसंबंध लक्षात घेऊन, विचारपूर्वक अनेक कृत्रिम वस्तू अथवा निर्मुके घडवून त्यांना हरत-तऱ्हेची उपकरणे,आयुधे म्हणून वापरतो.म्हणून एका बाजूने मानवाच्या संकल्पना,त्याचे ज्ञान विकसित होत राहते,तर ह्या स्मरुकविश्वाशी हातात हात मिळवून कृत्रिम वस्तूंचे विश्वही समृद्ध होत राहते.जनुक व स्मरुकांप्रमाणेच निर्मुकांच्याही नकला केल्या जातात.अशा नकला करताना त्यांच्यात बदल घडवले जातात.त्यातून नवनिर्मिती होत राहते.जीवसृष्टी व कल्पसृष्टीप्रमाणेच ही निर्मुकांची, आयुधांची सृष्टीही सतत वर्धिष्णु, नवनवोन्मेषशालिनी भासते.पृथ्वीचा जन्म झाला एका शिलावरणाच्या रूपात.मग ह्या शिलावरणाला पाण्याच्या

जलावरणाने व वायूच्या वातावरणाने झाकले. जिथे शिलावरण - जलावरण - वातावरण एकत्र येतात त्या परिसरात जीवसृष्टी पसरत जाऊन तिचे एक जीवावरण निर्माण झाले.मग प्राणिसृष्टीच्या आणि प्रामुख्याने मानव जातीच्या उत्पत्तीनंतर स्मरुकांची भरभराट होऊन एका बोधावरणाने आणि त्याच्याच जोडीला निर्मुकांची भरभराट होऊन एका आयुधावरणाने पृथ्वी आच्छादली आहे.माहिती व सदेश तंत्रज्ञानाच्या आजच्या झपाट्याच्या प्रगतीने जे एक संगणक - दूरसंदेश ही निर्मुके व संबंधित सॉफ्टवेअरची स्मरुके ह्यांच्या युतीतून सायबरस्पेसमधील विश्व साकारते आहे ते ह्याच उत्क्रान्तीचा अगदी अलीकडचा आविष्कार आहे.


सॅम्युएल बटलरचे एरेव्हॉन


चार्ल्स डार्विनने जीवसृष्टीच्या पातळीवर उत्क्रान्तितत्त्वाची मांडणी करताच त्याच्या सॅम्युएल बटलर ह्या समकालीन प्रतिभाशाली कादंबरीकाराला सुचले की मानव निर्मित कृत्रिम वस्तूही अशाच उत्क्रान्तिपथावर आहेत,आणि ह्यातूनही पुढे काय होईल ह्याचा विचार करणे अत्यावश्यक आहे.असा कल्पनेचा खेळ करत त्याने १८७२ साली 'एरेव्हॉन' नावाची एक कादंबरी लिहिली.

त्या वेळी युरोपीय दक्षिण अमेरिका खंड हळूहळू व्यापत होते.ह्या खंडात एका दुर्गम्य गिरिप्रदेशात एरेव्हॉन ह्या देशात ह्या कादंबरीचा नायक वाट चुकून पोचतो.ह्या देशात काही दशकांपूर्वी यंत्रांची पुढील प्रगती पूर्णपणे रोखायची असा निर्णय घेतला गेलेला असतो. ह्या निर्णयामागचे तत्त्वविवेचन हा ह्या कादंबरीचा गाभा आहे.त्यातील काही उतारे :


◆आम्ही यांत्रिक जीव,यंत्रांचे राज्य आणि यंत्रसृष्टी असे शब्द जाणूनबुजून वापरतो,कारण जशी वनस्पतिसृष्टी खनिजसृष्टीतून निर्माण झाली आणि त्यातून यथावकाश प्राणिसृष्टीची उत्क्रान्ती झाली,तशीच गेल्या काही तपांत एक नवीच सृष्टी आपल्यापुढे प्रगटली आहे.ह्या सृष्टीचे काही अप्रगत प्रतिनिधीच अजूनपर्यंत आपल्या डोळ्यासमोर आले आहेत.


◆आज ह्या यंत्रसृष्टीचा आपला समज फारच अपुरा आहे.अजून आपण ह्यांचे वेगवेगळे वंश,कुळे,प्रजातु,वाण ह्यांच्यात नेटके वर्गीकरण करू शकत नाही किंवा गुणवैशिष्ट्यांच्या यंत्रांतले दुवे समजू शकत नाही.हे तर उघड आहे की वनस्पतिसृष्टीत व प्राणिसृष्टीत नानाविध जशी नैसर्गिक निवड होते तशीच मानवाला यंत्रांचा कसा उपयोग होतो याची निवड समितीत उत्क्रान्ती घडवते आहे,पण ह्या उत्क्रान्तीची नक्की दिशा अजून आपल्याला समजलेली नाही.


◆आपण खूपदा मानवानंतर पृथ्वीवर कोणत्या प्रकारच्या प्राण्याचे वर्चस्व प्रस्थापित होईल ह्याची चर्चा करत राहतो.

पण खरे तर आपणच आपले वारस घडवतो आहोत.

आपण रोज त्यांचे साँदर्य,त्यांच्या रचनेतल्या खुब्या,त्यांची शक्ती जोपासत आहोत हळूहळू त्यांच्यात स्वत:चे नियंत्रण करण्याची,स्वतःच्या कामकाजाची दिशा ठरवण्याची शक्तीही वाढते आहे.ही यंत्रांची स्वयंचलनाची,

स्वनियंत्रणाची शक्ती मानवाच्या बुद्धीची जागा घेत आहे.


◆काळाच्या ओघात यंत्रांपुढे मानवच खालच्या पातळीचा प्राणी ठरेल.दुर्बल,स्वतःवर काबू ठेवू न शकणारा मानव यंत्रांनाच सर्वगुणसंपन्न मानू लागेल.यंत्रांच्या विश्वात क्रोध,लोभ,मद,मोह,मत्सरांचा शिरकाव होणार नाही;त्यांना पाप,शरम आणि दुःख ठाऊक नसेल.ती नितांत स्थितप्रज्ञ असतील.


हे घडले की आज घोड्याचे किंवा कुत्र्याचे व मानवाचे जे नाते आहे,तेच नाते मानवात आणि यंत्रांत प्रस्थापित होईल.कदाचित यंत्रांनी माणसाळलेला मानव आजच्या रासवट मानवाहूत सुखाने जगू लागेल.जसे आपण घोड्या-कुत्र्यांना प्रेमाने सांभाळतो,तशीच यंत्रे मानवाला मायेने पाळतील.


◆आपण भोगवादी दृष्टिकोनातून म्हणू शकू की जेव्हा जेव्हा यंत्रांचा उपयोग आपल्याला लाभदायक आहे,तेव्हा तेव्हा तसा वापर करणे शहाणपणाचे आहे.पण ही तर यंत्रांची हुषारी आहे;आपली सेवा करत करत ती आपल्यावर हुकमत गाजवू लागली आहेत.मानवाने दुसरी अधिक गुणवान कुळी निर्माण करत एका कुळीचा निःपात केला तर त्यांना काहीच दुःख नाही.उलट त्यांना विकासाच्या वाटेने पुढे नेण्याबद्दल ती मानवाला शाबासकीच देतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष केले,त्यांना सुधारण्यासाठी सारखे झटत राहिले नाही तर मात्र ती रागावतात.पण आपण खरे तर हेच केले पाहिजे. यंत्रांच्या उत्क्रान्तीच्या आजच्या प्राथमिक अवस्थेत ह्यातून आपल्याला खूप त्रास सोसावा लागेल,पण आपण जर आज यंत्रांविरुद्ध बंड पुकारले नाही तर भविष्यकाळात मानवाला आणखीच दारुण यातना सोसाव्या लागतील.पण काळाच्या ओघात यंत्रे ह्या जगावर आपली पकड अधिकाधिक बळकट करत राहतील हे तर निःसंशय.तेव्हा आज एकच मार्ग शहाणपणाचा आहे:मानवाच्या भवितव्याची चाड असणाऱ्यांनी तातडीने सगळ्या यंत्रांविरुद्ध जिंकू किंवा मरू असे युद्ध पुकारावे.ह्यात कोणतेही अपवाद नकोत.

आपण थेट आदिमानवाच्या पातळीवर पोचायची आवश्यकता आहे.जर आज मानवाला हे शक्य नाही असे कोणी म्हणत असेल तर त्यातून आपली किती अधोगती झाली आहे.आपणच निर्माण केलेली यंत्रकुळी नष्ट करणे कसे आपल्या हाताबाहेर गेले आहे,आपण कशी गुलामगिरी पत्करली आहे,हेच सिद्ध होते


आदिमानव..


रानकुत्रे,तरस टोळीने शिकार करताना आपल्याहून आकाराने खूप मोठ्या पशुंनाही सावज बनवतात.

माकडे,वांदरे हिंस्र पशूपासून बचाव करण्यासाठी एकमेकांना धोक्याच्या सूचनां देतात.मानवी कंपू सामूहिक प्रतिकारही करतात आणि शिकारही.चिंपांझी असेच आहेत. व्हेव्हेंट माकडाची शिकार करताना सावज पळत जाऊन झाडावर उंच जाऊन बसले,तर चिंपांझी ते कोणत्या कोणत्या झाडांवर उडी मारत जाऊन तेथून खाली उतरून निसटू शकेल ह्याचा आजमासच घेतात.मग अशा सगळ्या वाटा रोखण्यासाठी त्या त्या झाडांच्या बुंध्यांशी जाऊन उभे राहतात आणि त्यांच्यातला एक वर चढून सावजाला हुसकावतो.मनुष्यप्राणी अशी व्यूहरचना करून शिकार करण्यात आणखी खूपच पुढे गेला आहे.काही ठिकाणी उभ्या कड्यांखाली मॅमथसारख्या हत्तीच्या भाऊबंदांची चिक्कार हाडे सापडली आहेत.

शिकारी टोळ्या ह्या महाकाय पशूना हुशारीने कड्यांकडे पळवत आणून कडेलोट घडवून आणायच्या.मग सावकाश खाली उतरून मांसावर ताव मारायच्या अशी कल्पना आहे.( 'वारुळ पुराण',माधव गाडगीळ',

ई.ओ.विल्सन,अनुवाद - नंदा खरे,मनोविकास प्रकाशन ) प्राण्यांचे संदेश सामान्यतः आता व इथल्या मर्यादांना घुटमळत असतात. पण मानवी भाषा यांना पार करून भविष्यात किंवा भूतकाळात आणि अगदी दूरसुद्धा काय घडते आहे किंवा घडू शकेल ह्याचा ऊहापोह करते.

कदाचित मॅमथ कड्यावरून कोसळून कुठे पडताहेत हे बिलकूल दिसत नसेल,तिथे पोचायला दोन दिवस लागणार असतील,तरी त्याची चर्चा करून हाका केला जात असेल.असे हाके करायला अनेक जण हवेत.टोळक्या-टोळक्यांनी अशा मोठ्या सावजांच्या शिकारी करत - करत माणसाची सामाजिक जडण-घडण झाली असावी.आफ्रिकेच्या शुष्क माळरानांवर, दोन पायांवर पळत,हाताचा वापर करत, गारगोट्यांची,हाडांची हत्यारे वापरत आपले पूर्वज सर्व जीवसृष्टीवर कुरघोडी करण्यात यशस्वी झाले असे दिसते.आरंभी मनुष्यप्राणी निसर्गप्रणालींशी,जलचक्रांशी जुळवून घेत एका साध्या सोप्या जीवनाला आकार देत होता.तो टोळी-टोळीने आफ्रिकेच्या माळरानांवर भटकत फळे,कंदमुळे,खेकडे,

शंख-शिंपले गोळा करत, शिवाय छोट्या- मोठ्या सावजांची शिकार करणारा एक प्राणी होता.इतर पशूहून अवजारे वापरण्यात व आगीवर काबू ठेवण्यात काकणभर सरस होता एवढेच.आगीवरील नियंत्रण तर आधुनिक मानवजातीच्या उत्पत्तीआधीच,सुमारे चार लक्ष वर्षांपूर्वीपासून सुरू झाले असा अंदाज आहे. दीड-दोन लाख वर्षांपूर्वी आधुनिक मनुष्यजातीने पृथ्वीवर पदार्पण केले.पण मानवजातीच्या स्मरुक-निर्मुकांच्या विश्वात भराभर प्रगती होण्याच्या प्रक्रियेची सुरुवात झाली पन्नास- साठ हजार वर्षांपासून.ह्या सुमारास माणूस आजच्या धर्तीची समृद्ध भाषा वापरायला लागला असावा. या कालापासून मानवसमाज दगड- हाड - लाकडांची उपयुक्त उपकरणे बनवण्यासोबत शंख-शिंपल्यांचे दागिने बनवू लागला असावा, छोट्या छोट्या मूर्ती घडवू लागला असावा,प्रेते पुरू लागला असावा.ह्याच वेळी मानव समूहांनी गोष्टी रचायला,गायला,नाचायला आरंभ केला असावा.ह्या माध्यमांतून निसर्गप्रणालीचे, ऋतुचक्राचे,शिकारीच्या डावपेचांचे ज्ञान संकलित करायला,त्यात सतत भर घालायला सुरुवात केली असावी.ह्या साऱ्या कृतींतून माणसांच्या वेगवेगळ्या टोळ्या,निरनिराळे समूह आपापल्या परिसराला समर्पक असे ज्ञान, अनुरूप अशी तंत्रे विकसित करू लागले असावेत.कारण ह्या कालानंतर मानवसमूह खूप विस्तृत अशा भौगोलिक परिसरात, आफ्रिकेबाहेरच्या आशिया,

युरोप,ऑस्ट्रेलिया खंडांत पसरायला आरंभ झाला.हे समूह नदीकिनारे,समुद्रतट,डोंगरपठारे,शुष्क माळराने, घनदाट जंगले,प्रवाळांची बेटे अशा वेगवेगळ्या अधिवासांत राहू लागले.नानाविध परिसरांशी जुळवून घेत ते आपापली वैशिष्ट्यपूर्ण अशी संस्कृती घडवू लागले.जीवसृष्टीच्या वैविध्याला मानवी संस्कृतींच्या वैविध्याची जोड मिळू लागली.या साऱ्या उलाढालींतून मानवाने आज जड,तसेच चेतन सृष्टीवरची आपली पकड घट्ट केली आहे.ह्याचा आरंभ लाखो वर्षांपूर्वी आगीवरील नियंत्रणातून,नंतर काही दशसहस्र वर्षांपासून हाडे,दगड,लाकडाची अधिकाधिक प्रगत आयुधे बनवण्यातून झाला.मग टप्प्याटप्प्याने गेल्या काही हजार वर्षांपासून धातूंचे उत्पादन सुरू झाले.नवनव्या रसायनांची, पदार्थांची निर्मिती केली गेली.घरे उभारली गेली, नद्यांना पाट काढले गेले,बंधारे,धरणे बांधली गेले.जोडीने मानवाने विरजणातल्या जिवाणूंपासून तूर,भात,रेशमाचे किडे,रोहू- कटलांसारखे मासे,कोंबड्या,गायी,घोडे इथपर्यंत विविध जीवजाती आपल्या काबूत आणल्या. 


आज मानवी नियंत्रण जीवांच्या शरीरातील रेणूंच्या पातळीवर पोचले आहे.आपण जिवाणूंतले जनुक उचलून कपाशीत भरतो आहोत.असेच नवे जनुक ठासलेले मासेही निर्माण करत आहोत.सध्या भूतलावरील एकूण जैविक उत्पादनातील अर्धे उत्पादन एकटा माणूस,कोटी जीवजातींतील केवळ एक जात,पटकावतो आहे.