प्राणी कोणता का असेना,पाळीव कुत्रा असो नाहीतर जंगली हत्ती,नुसते त्यांच्यासमोर उभे राहून संवाद साधला जात नाही,तर त्यांना प्रतिसाद देणे तितकेच महत्त्वाचे असते.त्यांना प्रतिसाद दिला,की तुमचा संवाद पूर्ण होतो.इतर सगळ्यांसारखाच प्राण्यांमध्ये संवाद हा दोन्ही बाजूंनी,विचारांची,संभाषणाची देवाणघेवाण करून होतो.जर तुम्ही त्यांना प्रत्युत्तर दिले नाहीत,तर संवाद पूर्ण होत नाही.इतकी ही साधी गोष्ट आहे,पण लक्षात लवकर येत नाही.प्रत्युत्तर द्यायला एखादी नजरदेखील पुरेशी असते.निकटचा संबंध असलेल्या प्राण्याकडे तुम्ही नुसता कटाक्ष जरी टाकला तरी पुरत असले,तरी तसाच कटाक्ष अनोळखी प्राण्यासाठी आव्हान दिल्यासारखा होऊ शकतो.तुम्ही बोलताना ज्या आविर्भावात आपले शब्द वापरता त्याच आविर्भावात,त्याच स्वरात तुम्ही चार शब्द बोललात तरी देखील पुरते.इतरही काही घटक विचारात घेण्यासारखे आहेत.माणसांसारखेच आदर दाखवणे महत्त्वाचे असते.तुमच्या मनातील भाव प्राण्यांना बरोबर कळतो,विशेषतः जर तुम्ही विरोधी किंवा आक्रमक असाल तर त्यांच्या लगेच लक्षात येते. खुल्या मनाने सामोरे जाणे, हे प्रगती करण्यासाठी आवश्यक आहे.
त्याबरोबरच संयम आणि चिकाटीदेखील तितकीच महत्त्वाची आहे.सगळ्यात गंमत म्हणजे तुम्ही योग्य मार्गावर आहात,हे तुम्हाला लगेच कळते.माझ्यावर विश्वास ठेवा,कोणालाही हे करता येईल आणि त्याने खूपच समाधान मिळते. त्यासाठी कोणत्या अतिमानवी शक्तीची आवश्यकता नाही.
शास्त्रज्ञांनी असा शोध लावला आहे,की प्राण्यांना केवळ पन्नासच्या आसपास शब्द कळू शकतात.पण म्हणून त्यांच्याशी न बोलणे किंवा संवाद साधण्याचा प्रयत्नदेखील न करणे चुकीचे आहे.केवळ मनुष्यच एकमेकांशी संवाद साधू शकतात,असा विचार करणे पूर्णपणे चूक आहे.दोन जीवांमधला संवाद हा भाषेच्या मर्यादा ओलांडून जातो शब्द पोहोचले नाहीत तरी भाव नक्की पोहोचतो.
काही पिल्लांच्या पायाचे ठसे खोल खाईच्या फारच जवळ होते,असे मला वाटले.हत्ती जेव्हा फिरत असतात,तेव्हा ते फारच कमी वेळा सरळ रेषेत चालतात.एकमेकांशी धक्काबुक्की करत, ढकलत त्यांचा खेळ सुरू असतो.
तरीही ह्या खोल खाईजवळदेखील ते अगदी आरामात आत्मविश्वासाने गेलेले दिसत होते.'कोबस राथ' नावाच्या पशुवैद्याने तो कळप आमच्याकडे आणला होता.त्याच्या बोलांची मला एकदम आठवण झाली.तो मला म्हणाला होता,की एखादे माकड ब्रीफकेस घेऊन जाऊ शकणार नाही,अशा ठिकाणी देखील हत्ती जातात.
हत्तींची एक अशी पक्की धारणा असते, की बाकी सगळ्या प्राणिमात्रांनी त्यांना मान दिला पाहिजे.ते कोठे जात असतील तर बाजूला होऊन त्यांना वाट करून दिली पाहिजे.स्विमिंग पूलच्या भोवती डिनरसाठी बसलेले परदेशी पाहुणे आणि जंगलातील एखाद्या तळ्याशेजारी बसलेली बबून माकडे ह्यात हत्तींच्या दृष्टीने काहीच फरक नाहीये.
हत्ती जरी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला असले तरी त्यांची वास घेण्याची शक्ती इतकी तीव्र असते की वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने आलेला अगदी मंद वास देखील ते ओळखू शकतात.
नर हत्तींना त्यांच्या इच्छेविरुद्ध काहीही करायला लावलेले आवडत नाही.
आयुष्याचा सगळ्यात मोठा विरोधाभास आहे तुम्हाला जेव्हा जंगलात काहीतरी खास बघायची वेळ येते तेव्हा तुम्ही कॅमेरा घरी ठेवलेला असतो.
जंगलाचा भाग होऊन जाणे आजूबाजूच्या वातावरणात मिसळून जाणे आणि कशाचीही अपेक्षा न करणे.माझी अंत:प्रेरणा मला सांगत होती,की हत्ती जवळच आहेत त्याचवेळी नाना जवळच्या झाडीतून बाहेर आली.तिच्या पाठोपाठ बाकीची हत्ती देखील बाहेर आले.ते मला प्रत्यक्ष दिसायच्या आधीच मला त्यांची उपस्थिती जाणवली होती.नंतर माझ्या असे लक्षात आले, की हा अनुभव उलट्या पद्धतीनेदेखील अनुभवायला येतो.कधी कधी त्यांचा शोध घेत असताना मला असे जाणवायचे,की ते आसपासच्या भागात अजिबात नाहीयेत. दुसरीकडे कोठेतरी आहेत.मला ते दिसायचे नाहीत म्हणून नाही,तर त्यांच्या अनुपस्थितीत जंगल एकदम रिकामे वाटायचे.
एक दोन आठवडे सवय झाल्यावर मला ह्याचा अंदाज येऊ लागला.काही दिवसांनी योग्य परिस्थितीत त्यांना शोधणे खूपच सोपे जाऊ लागले.हत्ती आजूबाजूच्या जागेत आपल्या उपस्थितीचा ठसा उमटवतात आणि त्यांचे ह्यावर पूर्ण नियंत्रण असते.जेव्हा त्यांना आपण कोठे आहोत हे कोणालाही कळू द्यायचे नसायचे तेव्हा मी अक्षरशः त्यांच्यामध्ये असलो,तरीही मला काहीही पत्ता लागायचा नाही.
काही वेळ ह्यावर थोडे संशोधन आणि प्रयोग केल्यावर काय घडते आहे,ते माझ्या लक्षात आले. सिंह गर्जना करतो ती आपल्या कानांना ऐकू येते;कारण ती आपल्या श्रवणक्षमतेच्या टप्यात असते.हत्तींच्या कळपाचे दीर्घ रेंगाळणारे आवाज मानवी श्रवणक्षमतेच्या खालच्या पट्टीत असल्याने ते आपल्याला ऐकू येत नाहीत. आजूबाजूच्या जंगलात ते मैलोन्मैल पसरतात. जरी मला ऐकू येत नसले तरी ते मला जाणवत होते.तिथे हत्ती आहेत,असे ते सगळ्या जगाला त्यांच्या भाषेत सांगत होते.
हत्तींच्या सहवासात असताना माझ्या मनात येणाऱ्या भावनांचे मला नवल वाटत असे,कारण या भावना माझ्या नसून त्यांच्या मनातल्या भावना आहेत असे मला वाटत होते.कोणत्याही भेटीचा भाव काय असावा हे ते हत्ती ठरवायचे.
अभ्यासपूर्ण महत्वाची नोंद - मी एका दिवशी काही कामासाठी डर्बनला गेलो होतो.मी परत आलो तेव्हा सातही हत्ती घराभोवती गोळा झालेले पाहून मला आश्चर्य वाटले.जणू ते स्वागतसमितीचे सभासद असून माझी अपेक्षेने वाट पाहत होते.योगायोग असेल म्हणून मी ह्या घटनेचा जास्त विचार केला नाही.पुढच्या ट्रीपच्या वेळी हे परत घडले.काही दिवसांनी माझ्या हे लक्षात आले,की मी केव्हा जाणार आणि केव्हा परत येणार आहे ते त्यांना पक्के ठाऊक असायचे.(एक यार्ड म्हणज ३ फुट)
(द एलेफंट व्हिस्परर - लॉरेन्स अँथनी ! ग्रँहम स्पेन - अनुवाद - मंदार गोडबोले - मेहता पब्लिसिंग हाऊस )
त्या रात्रीत कळप दोन गटात विभागला गेला होता.
अभयारण्यात पोचल्यावर त्या दोघांची एकत्र भेट झाली ते तिथे कसे भेटले असतील हे मानवाच्या आकलनाच्या बाहेर आहे.संपूर्ण काळोखात कोणतेही दिशादर्शक यंत्र किंवा रेडिओ बरोबर नसताना बरोबर एकाच ठिकाणी एकाच वेळी पोहोचणे अशक्यप्राय वाटते दोन्ही गट एकमेकांपासून जवळ जवळ सात मैल लांब जाऊन दाट जंगलात एका ठिकाणी एकावेळी एकत्र आले हा प्रसंग पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की हत्तीपाशी अनाकलनीय संपर्काची साधने आहेत.ते आपल्या पोटातून मानवाला ऐकू येणार नाही,अशा फ्रिक्वेन्सीचा ध्वनी काढतात. जो कित्येक मैलांपर्यंत ऐकू येतो.हत्तींना त्यांच्या मोठ्या कानांमुळे तो संदेश पकडता येतो.नव्या सिद्धांताप्रमाणे अशी शक्यता आहे की ते आपल्या पायांद्वारे जमिनीतील कंपने ऐकू शकतात जे असेल ते खरे,पण ह्या अफलातून प्राण्यांची काही इंद्रिये आपल्यापेक्षा फार अधिक प्रगत आहेत.काही दिवसांनी मात्र... सगळे जरा अतीच झाले. मी जोहान्सबर्गच्या विमानतळावर होतो आणि माझे परतीचे विमान चुकले.चारशे मैलांवर ( एक मैल म्हणजे सुमारे १.६ किलोमिटर म्हणजे जवळपास ६०० ) किलोमीटर' थुला थुला' मध्ये सगळा कळप माझ्या घराकडे निघाला होता तो अचानक थांबला,वळला आणि झाडीत नाहीसा झाला.नंतर आमच्या लक्षात आले,की माझे जेव्हा विमान चुकले त्याच वेळी हे घडले.दुसऱ्या दिवशी मी घरी पोहोचलो तेव्हा कळप परत घराभोवती जमा झाला होता.
ह्या सगळ्यामध्ये काहीतरी विलक्षण गोष्ट आहे, ह्याचा माझ्या मनाने स्वीकार केला होता.माझ्या मर्यादित बुद्धीला आकलन होण्यापलीकडची ही काहीतरी शक्ती होती.
हत्तींची एकमेकांशी संवाद साधण्याची शक्ती अतिशय अविश्वसनीय असते हे सिद्ध झाले आहे.हत्ती आपल्या पोटातून जो गुरगुरण्याचा आवाज काढतात,तो मानवी कानांच्या ऐकण्याच्या क्षमतेच्या खालच्या पट्टीत काढलेला असतो.तो आवाज पुष्कळ अंतरापर्यंत ऐकू येतो;पण आपल्या कानांना ऐकू येत नाही. देवमासे ज्या फ्रिक्वेन्सीमध्ये आवाज काढतात त्याच्या जवळचीच ही फ्रिक्वेन्सी आहे.काही लोक म्हणतात हे स्पंदन जगभर सगळीकडे पसरते,कोठेही ऐकू येऊ शकते.
हा कमी फ्रिक्वेन्सीतला आवाज कमीतकमी कित्येकशे मैल दूर ऐकू जातो,असे आता शास्त्रज्ञ मानू लागले आहेत.
हे जर खरे असले तर ह्याचा अर्थ हत्ती आफ्रिका खंडातील इतर अभयारण्यातील हत्तींबरोबर संवाद साधू शकतात.एक कळप दुसऱ्या कळपाशी संवाद साधतो,
दुसरा तिसऱ्याशी,असे करत संदेश त्यांच्या संपूर्ण भूभागात पसरू शकतो.जसा आपण दूरध्वनीवर लांबपर्यंत संवाद साधू शकतो तसे.
केटी पेन नावाच्या 'कॉर्नेल युनिव्हर्सिटी'तील 'एलेफंट लिसनिंग प्रोजेक्ट'वर काम करणाऱ्या (हत्तींच्या संभाषणाचे संशोधन करणारा प्रकल्प) शास्त्रज्ञ स्त्रीने हत्तींच्या पोटातून येणाऱ्या ह्या आवाजाच्या लहरींचा शोध लावला.हा शोध अतिशय महत्त्वाचा होता.हत्तींच्या वर्तणुकीविषयी आपला संपूर्ण दृष्टीकोन ह्या शोधाने बदलला.जन्मजात मिळणाऱ्या हुशारीमध्ये आणि लांबवर संभाषण करू शकण्याच्या क्षमतेमध्ये महत्त्वाचे नाते आहे. उदाहरणार्थ,एखाद्या बेडकाची संभाषण करण्याची क्षमता केवळ डराव करण्याची आहे, कारण त्याला फक्त आपल्या तळ्यापुरतीच संभाषण करण्याची गरज असते.
त्याला त्यापेक्षा जास्त आपला आवाज पसरवण्याची गरज नसते.पण हत्ती अतिशय दूरवर संवाद साधू शकतात,त्याने हे सिद्ध होते,की आपल्याला वाटले होते त्यापेक्षा हे महाकाय प्राणी जास्त पुढारलेले आहेत.
आपल्याला आधी वाटले होते त्यापेक्षा ते खूपच अधिक हुशार आहेत.जर तुम्हाला ह्याबद्दल शंका असेल तर पुढील गोष्टीवर विचार कराःहत्तींना काही निरर्थक गुरगुरण्याचा आणि हुंकारण्याचा आवाज दूरपर्यंत पाठवायची गरजच काय? केवळ त्यासाठी त्यांनी आपली ही संभाषणक्षमता विकसित केली असेल का? नक्कीच नाही. उत्क्रांती अतिशय निर्दयी आहे.जगण्यासाठी जे
गरजेचे नसेल ते केव्हाच जनुकातून नाहीसे होते. हत्ती ह्या अतिशय विकसित झालेल्या,दूरवर संभाषण करण्याच्या क्षमतेचा काही विशेष उद्देशाने उपयोग करतात- एकमेकांशी आणि दुसऱ्या कळपाशी सुसंगतपणे संभाषण करू शकण्यासाठी.मग त्यांच्या विश्वात काय घडत आहे,माणसे त्यांच्याशी कशी वागत आहेत,हे ते इतरांना सांगत असतील का? त्यांची बुद्धिमत्ता लक्षात घेता माझ्या मनात अजिबात शंका उरली नाहीये,नक्की असेच घडते आहे.
तुम्हाला हे लक्षात घ्यावे लागेल की प्राणीविश्वात 'संवाद' हा वाऱ्याच्या झुळुकीप्रमाणे एकदम सहज साधला जातो. मानवाने आपल्यावर लादून घेतलेल्या बंधनांमुळेच सुरुवातीला मला त्या प्राण्यांना समजावून घेणे जरा अवघड गेले.
आपल्या पूर्वजांना अंत:प्रेरणेने माहिती असलेल्या गोष्टी शहरातल्या गोंगाटात आपण विसरून जातो.जंगलात जीवनाचा प्रवाह अव्याहतपणे सुरू असतो आणि त्याची स्पंदने आपल्याला ऐकू येऊ शकतात; एवढेच नाही तर आपण त्यांना प्रतिसाददेखील देऊ शकतो.
आपण हे देखील लक्षात घेतले पाहिजे, की प्रत्येक गोष्ट आपल्याला समजेलच असे नाही. प्रगत विज्ञानाला उलगडा करून सांगता येणार नाही,अशा काही शक्ती हत्तींना अवगत आहेत. हत्ती एखादा कॉम्प्युटर दुरुस्त करू शकणार नाहीत,पण ते भौतिक आणि आधिभौतिकरीत्या अशा प्रकारे संवाद साधू शकतात,की ते पाहून बिल गेट्ससुद्धा आश्चर्याने थक्क होईल.काही गोष्टींमध्ये ते मानवाच्या खूपच पुढे आहेत.
वनस्पतींच्या आणि प्राण्यांच्या विश्वात काही अशा गोष्टी आहेत,ज्यांचे अवलोकन करणे अशक्य आहे.काही गोष्टी अशा असतात,ज्या तुमच्या डोळ्यांसमोर घडतात;पण तरीही तुम्हाला त्यांची कारणमीमांसा सांगता येत नाही.
पुष्कळ वर्षांपूर्वी मी एका शिकाऱ्याला शिकारीचा माग घेताना पाहिले होते.एखाद्या ब्रह्मचारी नरांच्या कळपातले एकुलते एक नर इम्पाला हरीण मारायचा त्याच्याकडे परवाना होता.पण त्या दिवशी त्याला फक्त माद्यांबरोबर फिरणारे नर दिसत होते.आश्चर्यकारक म्हणजे हे शिकार न करता येण्याजोगे नर त्याच्यासमोर अगदी बिनधास्तपणे उभे होते,त्यांना जगात कशाचीही फिकीर नव्हती.मागे ब्रह्मचारी कळपातले नर मात्र जिवाच्या भीतीने पळ काढत होते.हे कसे बरे घडत असेल? आपल्याला ह्याचे उत्तर ठाऊक नाही.आमच्यातले रुक्ष रेंजर ह्याला मर्फीचा नियम म्हणतात-मर्फीच्या नियमानुसार आपल्याबरोबर जे काही वाईट घडणार असेल ते घडतेच.जेव्हा तुम्हाला एखाद्या प्राण्याला भूल द्यायची असेल,तेव्हा ते कधीच सापडत नाहीत. हे थोडेसे गूढ रहस्य आहे.कदाचित वाऱ्याबरोबर त्यांना निरोप पोहोचत असेल.
माझ्या माहितीतल्या एका प्राण्यांचा माग काढणाऱ्या म्हाताऱ्या ट्रॅकरच्या मते,असेच काहीतरी घडते.त्याचे सगळे आयुष्य जंगलात गेले आहे.तो मला सांगत होता की त्याच्या गावातली माकडे जेव्हा फार धीट होऊन अन्न चोरायला लागतात किंवा मुलांना घाबरवायला किंवा चावायला लागतात तेव्हा बहुधा एखाद्या माकडाला गोळी घालून बाकीच्यांना घाबरवायचे ठरवले जाते."पण ही माकडे फार हुशार असतात." तो आपल्या कपाळावर बोटाने टकटक करत म्हणाला,"ज्या क्षणी तुम्ही बंदूक आणायला उठता,तेव्हा ती माकडे तिथून नाहीशी होतात.आम्ही आजकाल मोठ्याने 'बंदूक' किंवा 'माकड' असे शब्दही वापरायचे टाळतो,नाहीतर माकडे जंगलातून बाहेरदेखील येत नाहीत.जेव्हा धोका असतो, तेव्हा त्यांना न ऐकता सुद्धा कळते."
हे खरे आहे.पण थक्क करणारी बाब म्हणजे हे वनस्पतींच्या बाबतीतदेखील खरे आहे. 'थुला थुला'मधला आमचा लॉज हा आमच्या घरापासून साधारण दोन मैल अंतरावर आहे.ह्या लॉजच्या अवतीभवती बाभूळ आणि इतर स्थानिक वृक्षांची गर्दी आहे.जेव्हा एखादे हरीण किंवा जिराफ ह्या झाडांची पाने खातो तेव्हा त्या बाभळीला लगेच कळते,की आपल्यावर हल्ला होतो आहे.आणि मग ते झाड आपल्या पानांमध्ये 'टॅनीन' नावाचे एक द्रव सोडते, ज्यामुळे पानांची चव कडवट होते. मग ते झाड आपल्या
भोवतालच्या वातावरणात एक ठरावीक दुर्गंध सोडते,
ज्यामुळे बाकीच्या बाभळीच्या झाडांना पण धोका लक्षात येतो.मग बाजूच्या झाडांना लगेच तो धोका समजतो आणि ती देखील 'टॅनीन द्रव' निर्माण करायला सुरुवात करतात.आता तसे बघायला गेले तर झाडात काही मेंदू किंवा मज्जासंस्था नसते,मग हे गुंतागुंतीचे निर्णय कोण घेत असेल? अधिक महत्त्वाचे म्हणजे असा निर्णय का घेतला जात असेल? कोणतेही भावनाविरहित असलेले झाड आपल्या शेजाऱ्याच्या सुरक्षिततेबद्दल एवढ्या सगळ्या त्रासांतून का बरे जात असेल? जर मेंदूच नसेल तर त्याला आपले कुटुंब किंवा शेजारी हे सगळे कसे बरे कळत असतील?
सूक्ष्मदर्शकयंत्राखाली बघता प्रत्येक सजीव प्राण्यात केवळ काही रसायने आणि खनिजे एकत्र आलेली दिसतात.पण जे सूक्ष्मदर्शकाखाली दिसत नाही त्याचे काय? सगळ्या जीवित प्राण्यांत दिसणारी जी अमोघ ऊर्जा आहे-जी बाभळीपासून हत्तींपर्यंत सगळ्यांच्यात दिसते ती मोजता येईल का?
माझ्या कळपाने मला शिकवले,की ती ऊर्जा नक्कीच अनुभवता येते.चराचर सृष्टीतल्या प्रत्येक प्राणिमात्रातल्या आत्म्याबद्दलची जाणीव आणि त्याचे औदार्य हत्तींच्या जगात ओसंडून वाहत आहे.हत्ती हे भावनापूर्ण,एकमेकांची काळजी घेणारे आणि अतिशय बुद्धिमान प्राणी आहेत.माणसांबरोबर चांगले संबंध असलेले त्यांना हवे असतात.ही त्यांची गोष्ट आहे.त्यांनी मला शिकवले,की प्रत्येक प्राणिमात्राच्या जगण्याच्या आणि आनंदी राहण्याच्या यात्रेत प्रत्येक आयुष्य अनमोल आहे.आपण,आपले कुटुंब आणि आपली जमात,एवढ्या संकुचित मनोवृत्तीपेक्षा,आयुष्यात बरेच काही अधिक महत्त्वाचे असते.
हत्ती शांत उभे होते,फक्त मधूनमधून कान हलवत स्वतःला जमेल तेवढे थंड करत होते. एखाद्या जाड बाईच्या स्कर्टच्या आकाराएवढे हत्तींचे कान मोठे असतात.त्यामुळे त्यांच्या शरीराचे तापमान थंड राहायला मदत होते. त्यांच्या कानामागच्या त्वचेत त्यांच्या धमन्यांमध्ये कित्येक गॅलन रक्त वाहत असते आणि कान हलवल्यामुळे पंख्यासारखा परिणाम होऊन ते रक्त थंड होते,त्यामुळे शरीराच्या तापमानाचे नियमन होते.
जंगलात काम करणारा कोणीही रेंजर तुम्हाला सांगेल,की ज्या दिवशी तुम्ही एखाद्या गेंड्याला भूल देऊन दुसरीकडे घेऊन जाण्यासाठी बाहेर पडाल,त्या दिवशी कितीही शोधले तरी तुम्हाला एकही गेंडा दिसणार नाही. अगदी आदल्या दिवशीच तुम्हाला चहूकडे गेंडे दिसलेले असतील.जणू त्यांना ठाऊक असते की,तुम्ही त्यांच्या मागावर आहात,आणि ते नाहीसे होतात.पुढच्या आठवड्यात तुम्हाला जेव्हा एखाद्या गव्याला भूल द्यायची असेल,तेव्हा तो तुम्हाला न सापडलेला गेंडा तुमच्यासमोर उभा असेल.
पुस्तकातून वाचता …वाचता …वेचलेले..।