भर दुपारी उन्हाच्या वेळी पवनीचे माधवराव पाटील व मी एका झरीजवळ झुडपाआड बसून तिथल्या पाण्यावर उतरणाऱ्या हरोळीचं छायाचित्र घ्यावं म्हणून त्यांची प्रतीक्षा करीत होतो.ह्या वर्षी खूप उन्हाळा जाणवत होता. पतझडीनं सारी जंगलं शुष्क वाटत होती. अग्निदिव्यातून निघालेल्या टेंबुर्णीला कोवळी, लाल,लुसलुशीत,नितळ पानं फुटत होती.करू, ऐन व धावड्याला खूप डिंक येऊन बुंध्यावरून ओघळत होता.टेंबुर्णीच्या झाडाखाली पिकलेल्या फळांचा सडा पडलेला होता.मोहाच्या फुलांचा वास साऱ्या आसमंतात दरवळत होता.चार पाच हरोळ्या उडत उडत झरीजवळच्या चारोळीवर बसल्या.त्यांच्या नादमधुर मुग्ध आवाजानं सारा परिसर मुखरित झाला.
टेपरेकॉर्डर चालू करून तो आवाज ध्वनिमुद्रित करीत असता समोरच्या नाल्यातील झुडपाच्या बुडात काहीतरी हललं.मी त्या बुडाकडे निरखून पाहिलं.उन्हानं सुकलेल्या रेतीच्या थराशिवाय कुठल्याही जिवाचं तिथं अस्तित्व दिसलं नाही.टेप बंद करून मी हरोळीकडे पाहात होतो.
तो झुडपाच्या बुडातील वाळूचा थर खालून हातानं ढकलल्यागत हलला.माझा डोळ्यांवर विश्वास बसेना.
ह्या उत्पाताचं काय कारण असावं.?धरणीकंप? पण तो एवढ्या लहान क्षेत्रात होईल कसा ? चिचुंद्री?परंतु पाण्याचं दुर्भिक्ष्य असलेल्या अशा शुष्क जागेत ती राहणं शक्य नव्हतं.हा काय प्रकार असावा म्हणून मनात अटकळ बांधत असता वाळूचा ढीग झुडपाभोवती पसरला.मी त्या मातकट तपकिरी कवचाकडे पाहात होतो. कवच जसं जोरानं वर येत होतं,तशी वाळू बाहेर पडत होती.आणि सावधगिरीनं,हळूच कवचयुक्त डोकं रेतीतून बाहेर येताना दिसलं.त्यानंतर कातडीयुक्त लांब मान त्यानं बाहेर काढली. पिचके डोळे त्यानं एक दोनदा मिचकावले. एकदा माझ्याकडे पाहिलं आणि सन्नाट्यानं पाचोळ्यात दिसेनासा झाला.तळं सोडून आलेला उन्हाळ्यातला हा पहिला कासव असावा.
उन्हाळ्याच्या आगमनाबरोबर तळ्यातील चाम,बहर-फ्रेश वॉटर टरटल- डुंबरे व चिखल्या- पॉन्ड टॉरटाईज जातीचे कासव इथल्या डोंगरावर चढू लागले.वर्षातून आठ महिने इथल्या खोल पाण्यात राहणारे हे कासव उन्हाळ्यात डोंगरावर का चढू लागतात ह्या रहस्याचा उलगडा झाला नाही.पर्वत आहे म्हणून गिर्यारोहण करणारा माणूस हा एकमात्र प्राणी नाही !
थोड्याच दिवसात सारा डोंगर कासवांनी भरून गेला.एवढ्या मोठ्या प्रमाणात एकत्रित जमलेले कासव यापूर्वी माझ्या पाहण्यात नव्हते. परातीएवढे मोठे काळसर-तपकिरी रंगाचे चाम,ताटाएवढे वहर,थाळीएवढे डुंबर व चिखल्या जातीचेकासव,रखडत,खरडत,दगडगोटे व ऐनाडी- ऐनाच्या झुडपांतून डोंगर चढताना आढळून आले.भर उन्हाळ्याच्या वेळी ओढ्या-नाल्याच्या ओल्या रेतीत,जांभूळ व करंजाच्या सावलीत डोकं खुपसून चाम व कासव विसावा घेत.एखाद्या ठिकाणी तुम्ही तासभर बसलात की सहज दहा एक कासव जाताना दिसले असते. त्यांना पकडणं मोठे कठीण,चाहूल लागताच ती पाचोळ्याच्या जाड थरात दडून बसतात.
कवच ल्यालेले हे उन्हाळी पाहुणे ऐनाडीच्या डिंकावर आधाशाप्रमाणं तुटून पडायचे.कासव डोंगरातील जंगलात का येतात याचं हे एक कारण होतं.दिवसा डुंबरं व चिखल्या दिसायचे.चांदण्या रात्री चाम व वहराच्या पाठी डोंगर चढताना चमकत.
एकदा मला वीस पंचवीस फूट उंचीवर असलेल्या ऐनाच्या आडव्या फांदीवर एक भला मोठा कासव डिंक खाताना दिसला.त्याचं छायाचित्र काढण्यासाठी चोरपावलानं जवळ गेलो, तसं त्या कासवानं अकस्मात स्वतःला खाली लोटून दिलं. कासव धपकन् खाली पडल्याचा आवाज आला.
जलदगतीनं तो पाचोळ्यात घुसला.एकदा तर गिधाड पहाडावर; करूच्या गुळगुळीत बुंध्यावरून कासव डिंक खाण्याकरता चढताना मी पाहिला.चारी पायांच्या पंजांची नखं सालीत रोवून तो झाडावर चढत होता.बुंध्याला खाचा घातल्यानं डिंक खाली ओघळत होता. जमिनीपासून पांढऱ्या पिवळसर नितळ डिंकावर त्यानं यथेच्छ ताव मारला.तीन-चार फूट उंचावर असलेला तो कासव माझी चाहूल लागताच जलदीनं सरपटत खाली उतरला व पाचोळ्यात दिसेनासा झाला.
एकदा ऋद्धी धीवरानं भला मोठा चाम पकडून आणला होता.यापूर्वी एवढा मोठा चाम माझ्या पाहण्यात नव्हता.
त्याचं कवच मऊ,गुळगुळीत व घुमटाकार दिसत होतं.
कवचाची वाढलेली किनार लवचिक होती.त्याच्या नाकपुड्याचं रूपांतर दोन बारीक सोंडात झालं होतं.ह्या सोंडा पाण्यावर काढून तो बाहेरची हवा घेई.त्याच्या गळ्याला दोरीनं बांधलं होतं.इथं येईपर्यंत तो गळफास ठरून वाटेतच त्याचा अंत झाला होता.त्याची मान धडापासून वेगळी केल्यानंतर त्याच्या तोंडात लाकडाचा तुकडा घातला तेव्हा त्याच्या धारदार जबड्यानं लाकडाचे तुकडे तुकडे केले. चाम एवढ्या मोठ्या आकारापर्यंत वाढतात याची मला कल्पना नव्हती.त्याची लांबी मोजली तेव्हा तीन फुटांवर भरली.त्याला उचलायला दोन माणसं लागली.नवेगाव बांधच्या प्राणिसंग्रहालयासाठी मोठा जिवंत चाम मिळविण्याचा मी खूप प्रयत्न केला,पण माझी निराशा झाली.
डिंक खाण्याकरिता निघालेले कासव एकदा जंगलातील वणव्यात सापडले. पालापाचोळा पेट घेत होता.मला वाटलं,ते भाजून होरपळून निघेल.पण आगीची ऊब लागताच ते जागच्या जागी थिजले,
डोके पाय त्याने कवचात ओढून घेतले होते.आग त्यांच्या अंगावरून गेली.पोटाजवळच्या कवचाला आगीची झळ लागली होती.अग्निदिव्यातून निघालेले ते कासव हळूहळू वणव्याच्या विरुद्ध दिशेने निघून गेले.नवेगाव बांध जलाशयाच्या मध्यावर मालडोंगरी नावाचं छोटंसं बेट आहे.जलाशयाचं पाणी जसं आटू लागतं तसे उघडे पडू लागलेले तिथले काळे खडक पाणकावळे व करोते- दि इंडियन डार्टर- यांच्या शिटीनं पांढरेशुभ्र दिसू लागतात.एकदा त्या बेटाकडं डोंगीतून जाताना पाण्यावर डोकावत असलेल्या झाडाच्या थुटावर कासवाच्या जोडीचा समागम चाललेला दिसला. डोंगी जवळ येताच त्यांनी पाण्यात उड्या घेतल्या.बेटाजवळच्या खडकावर एक कासवाची जोडी अनुनयात मग्न होती.
तिथल्या उथळ पाण्यात मादीच्या पाठीवर बसलेला नरकासव प्रियेसह जलक्रीडा करताना दिसला.
जिकडेतिकडे खूप पाऊस पडला.एक दिवस एक कासवी जलाशयाच्या भातशेतीच्या बांधावर खड्डा करताना दिसली.पुढील पायांच्या नखांनी माती उकरू लागली.
पाठीच्या साहाय्याने ती माती एका बाजूला सारीत होती.माती उकरून ती काय साध्य करीत आहे,हे माझ्या ध्यानात न आल्यामुळे दूर अंतरावरील ऐनाडीच्या झुडपात बसून मी तिच्याकडे पाहात राहिलो.खड्डा उकरून झाल्यावर बाहेर मातीचा ढीग दिसत होता.खड्ड्याच्या चोहोबाजूनं निरीक्षण केल्यावर तिला समाधान वाटलं.ती स्वतःभोवती एकदा गोल फिरली.मागची बाजू खड्ड्यात ओणावून चेहऱ्यावर आनंदी भाव आणून तिनं खड्डा भरून अंडी घातली.आश्चर्य व आनंदाच्या संमिश्र भावनेनं तिच्या ह्या महत्कृत्याबद्दल मी मनोमन आभार मानले.शांत व स्निग्ध नजरेनं मला ती जणू पिऊन टाकीत होती.हा विधी उरकल्यावर अंड्यांनी भरलेला खड्डा तिनं मातीनं झाकला. त्यावर उभी राहून पोटानं माती थोपटली.वरून पाऊस पडत होता.त्यावर पुन्हा एकदा फिरून खड्डा नीट झाकला की नाही याची खात्री करून घेऊन खड्ड्यावर ती थोडा वेळ विसावली.
हे सारं इतक्या विलक्षण,गतीनं घडलं की मी अचंब्यानं तिच्याकडे पाहात राहिलो.आमच्या वस्तुसंग्रहालयासाठी तिचं एखादं अंड हवं होतं. पण ती जवळपास असेपर्यंत अंडं घ्यावं असं वाटेना.कारण मी थोडी जरी घाई केली असती, तरी तिनं घाबरून सर्वनाश केला असता.अंडी तिनं पुनश्च उकरून ती चट्ट केली असती.तेथून ती प्रयाण करीपर्यंत मला वाट पाहावी लागली. तळ्याकडे गेल्यावर थोड्या अंतरापर्यंत तिचा पाठलाग केला.न जाणो ती परत घरट्याकडे आली तर? ती जशी पाण्यात शिरली तसा मी धावत तिच्या घरट्याकडे गेलो.काळजीपूर्वक माती उकरून अंडी मोजली.ती एकूण वीस होती.त्यातील एक अंडं काढून घेतलं.ते कबुतराच्या अंड्याएवढं,
गोलाकार,पांढऱ्या रंगाचं होतं.तिला संशय येऊ नये म्हणून परत तो खड्डा मातीनं भरून थोपटला.पूर्वी दिसत होता तसा हातानं सारवला.(जंगलाचे देणं - मारुती चितमपल्ली,साहित्य प्रसार केंद्र,नागपूर)
कासवाची अंडी दोन महिन्यांत उबतात असे प्राणिशास्त्रावरील ग्रंथात नमूद केलं आहे.
पण माधवराव पाटलांचं म्हणणं असं की कासवाची अंडी उबवायला आठ ते नऊ महिन्यांचा काळ लागतो. कासव आपली अंडी उबवीत नाहीत. अंडी योग्य वेळी उबताच पिलं घरट्यातून बीळ करून बाहेर येतात आणि तळ्याकडे परत जातात.
याविषयी मात्र त्यांचं दुमत नव्हतं.त्यांच्या शेताच्या बांधावर कासव पावसाळ्यात दरवर्षी अंडी घालतात. बांधावर फिरून त्यांनी कासवाचं एक घरटं शोधून काढलं.नुकतीच कासवानं त्यात सहा अंडी घातली होती.ती उकरून काढून त्यांच्या वाड्यात पुरली.आठनऊ महिन्यांचा कालावधी लोटल्यावर जून महिन्यात ती उकरून पाहिली.अंडी जशी होती तशी सापडली.त्यातील एक अंडं प्रयोगादाखल फोडलं असता त्यातून लिबलिबीत मांसाचा गोळा बाहेर पडला.वाटलं,अंडं कुजलं असणार.त्यावर थंड पाणी ओतलं तर काय आश्चर्य? त्या गोळ्यातून एका जिवाची हालचाल दिसू लागली.एक-दीड तास त्यावर पाणी टाकीत राहिल्यावर तो जीव चालू लागला.त्याला पाण्यात ठेवले.दोन दिवसांत त्याचा रंग बदलून कासवासारखा आकार आला.कासवाचं पिलू दिवसादिवसांनी वाढत होतं.एकदा नवेगाव जलाशयाकाठच्या जंगलातून भटकताना मला जमिनीवर पडलेली कासवाची पाठ दिसली.ती हातात घेऊन खालीवर न्याहाळून पाहिली.
डोके,मान व पोटातील अवशेष दिसत नव्हते.नुसता पोटापाठीचा मोकळा सांगाडा राहिला होता.ते कवच माधवराव पाटलांना दाखवीत मी विचारलं,
'पाटील, हा काय प्रकार?'
'नीलगाईनं ते कासव खाल्लं आहे.'
मी त्यांच्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहू लागलो.
आपलं म्हणणं अधिक स्पष्ट करीत ते म्हणाले,
'तळ्यावर पाणी प्यायला आलेल्या नीलगाईला हे कासव दिसलं असावं.कासव दिसताच नीलगाय त्याच्या पाठीवर पुढचे पाय ठेवून जोराने दाबते.दाब बसताच कासवाची मान आपोआप बाहेर येते.ती तोंडात धरून नीलगाय तिला जोराने हिसडा देते.
हिसडा बसताच त्याचा सारा अंतर्भाग बाहेर येतो व तो लगेच अधाशीपणे ती खाऊन टाकते.' पवित्र मानलेल्या नीलगाईनं मांसाहार करावा याचं मला आश्चर्य वाटलं.