* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२०/१२/२४

रॅफची तडजोड / Raph's Compromise

नेटाने संपत्ती निर्माण करते आणि मग ही संपत्ती झिरपून सर्व समाजाची भरभराट होते.शासनाचे हस्तक्षेप ही बाजारहाटात केलेली अवाजवी,फाजील ढवळाढवळ ठरते.ती टाळावी.

शासकीय यंत्रणा फुगू देऊ नये, शासनाचा खर्च कमीत कमी राखावा.बेरोजगार भत्ता, ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा,शिक्षण,

विज्ञान ह्या सगळ्यांवरच्या खर्चाला कात्री लावावी.शासकीय खर्च वाचवून कर कमी करावे.विशेषतःश्रीमंतांवरचे प्राप्ती कर,संपत्ती कर,वारसा कर कापावे.कारण जास्त प्राप्तीतून धनिक अधिक बचत करतील,ती उत्पादनात गुंतवतील,

परिणामी अर्थव्यवस्था हळूहळू भरभराटीस येईल आणि सर्व थरावरचा समाज अधिकाधिक समृद्ध होईल.


ह्या कल्पनेच्या डोलाऱ्याने अनेक विचारवंत भारावून गेले आहेत.अमेरिकेच्या साम्यवादाविरुद्धच्या दीर्घ काल चाललेल्या शीत युद्धामुळे ह्या मांडणीची त्या देशातील सामान्य जनमानसावरही सहजी पकड बसली आहे.ह्या मनोवृत्तीचा धनिकांनी फायदा उठवला,आणि १९८० च्या दशकात रोनाल्ड रीगनच्या राजवटीत आपल्याला अनुकूल धोरणांची नेटाने अंमलबजावणी करून घेतली. अमेरिकी फेडरल रिझर्व बँकेचे गेल्या पंचवीस वर्षांतील प्रमुख झालेले मान्यवर अर्थतज्ज्ञ ग्रीनस्पॅन व बेर्नान्के हेही या बाजारपेठी पंथाचे कट्टर पुरस्कर्ते आहेत. त्यामुळे अमेरिकेची सारी अर्थव्यवस्था ह्या विचारधारेनुसार वळवली गेली आहे.पण स्टिग्लिट्झ दाखवून देतात की वास्तवात ह्या मांडणीत सुचवल्याहून फार वेगळे घडले आहे,घडते आहे.ह्या विपर्यासातून निर्माण झाली आहे एक डबघाईला आलेली अर्थव्यवस्था,अन्याय्य राज्यव्यवस्था,विषम, दुभंगलेला समाज – अन् अंती आजची सर्वांगीण दुर्दशा.


जर बाजारहाटाच्या माध्यमातून बळकट अर्थव्यवस्था निर्माण व्हायची असेल तर त्यासाठी सच्ची खुली स्पर्धा पाहिजे.ग्राहकांना एकमेकांशी चढाओढ करणाऱ्या अनेक उत्पादकांपैकीच्या कोण्या एकाचे उत्पादन विकत घेण्याची मुभा पाहिजे.जनतेला काय चालले आहे ह्याची परिपूर्ण माहिती पाहिजे.म्हणजे उत्पादकांना अद्वातद्वा फायदा उकळता येणार नाही.ते कसोशीने, काटकसरीने उत्पादन करतील.पण समाजधारणेसाठी केवळ अशी खुली स्पर्धा पुरेशी नाही.सगळ्या समाजाला,पुढच्या पिढीला चुकवावी लागणारी किंमत बाजारपेठेच्या माध्यमातून लक्षात घेतली जाणार नाही. यासाठी शासनाने नेटका हस्तक्षेप करून,

प्रदूषणाचा बोजा उद्योजक निश्चितपणे सगळ्या समाजावर लादत नाहीत ना,नैसर्गिक संसाधने उचित मोल देऊन वापरली जात आहेत ना,ह्यांची खात्री करून घेतली पाहिजे. 


तसेच मक्तेदारीला अजिबात वाव नसेल,खरोखरीची खुली स्पर्धा राबत असेल,शासन डोळ्यात तेल घालून नैसर्गिक संसाधने जपत असेल,पर्यावरण सांभाळत असेल,दूरदृष्टीने धोरणे राबवत असेल,

तरच मुक्त बाजारपेठेच्या माध्यमातून टिकाऊ आर्थिक विकास होऊन सर्व समाजाची भरभराट होईल.


पण अमेरिकेत प्रत्यक्षात काय घडते आहे,हे समजून घेण्यासाठी उद्योजकांना,व्यापाऱ्यांना ते समाजासाठी जे योगदान करताहेत त्याला समर्पक एवढाच प्रमाणबद्ध आर्थिक लाभ होतो आहे,का भरमसाट प्राप्ती होते आहे, हे नीट तपासून पाहिले पाहिजे.जर योगदानाच्या मानाने अयोग्य,अवाच्या सवा नफा होत असेल,तर अर्थशास्त्रज्ञ त्याला ही खंड वसुली (rent seeking ) चालली आहे असे म्हणतात.जमीनदार काहीही परिश्रम न करता पैसा कमावतात,तशी ही आधुनिक संदर्भातील खंड वसुली.अशी खंड वसुली पोसणाऱ्या अमेरिकी व्यवस्थेत आर्थिक,सामाजिक विषमता भडकते आहे,सत्ताधीश मूठभर लोकांचे हितसंबंध जपताहेत,कायदे खुंटीला टांगून ठेवले जात आहेत.ही खंड वसुली अनेक प्रकारे चालते,तेव्हा ह्या संज्ञेची फोड करणे आवश्यक आहे. ह्याचे चार पैलू आहेत : लाटा-लाट,लुटा-लूट,फसवेगिरी आणि फुकटबाजी स्टिग्लिट्झ ह्या चतुर्विध उपद्व्यापांचे सोदाहरण विवेचन करतात.


अमेरिकी शासन युद्धयंत्रणेवर प्रचंड खर्च करते.बुश पिता-पुत्रांनी इराक - अफगाणिस्तानच्या युद्धांवर अचाट खर्च केला,आणि त्या बोजाने अमेरिकी अर्थव्यवस्था व्याधिग्रस्त झाली.युद्ध सामुग्रीची खरेदी करताना काहीही पथ्ये पाळली जात नाहीत,उत्पादक जी काय मागणी करेल ती मान्य केली जाते.आंधळा दळतो,कुत्रे पीठ खाते,अशा थाटात सारा व्यवहार चालतो. 


साहजिकच युद्ध सामुग्रीचा पुरवठा करणाऱ्यांना भरमसाट किमती लावून बेसुमार नफा उकळण्याची चटक लागली आहे.अशा लाटालाटीत जॉर्ज बुशच्या काळी उपराष्ट्राध्यक्ष असलेल्या डिक चेनीनेही व्यवस्थित हात धुऊन घेतले.


अशीच लाटा-लाट औषधांच्या पुरवठ्यात चालते.अगदी जाणून बुजून जॉर्ज बुशच्या काळात शासनाने औषधांच्या किमती खुल्या बाजारात ठरवल्या जाव्या ही रूढी बंद केली व औषध कंपन्यांच्या मनमानीला दार मोकळे केले.ह्यामुळे अमेरिकी नागरिकांना औषधांसाठी निष्कारण अतोनात जास्त पैसे मोजावे लागतात.वर सरकारी आरोग्य विमा जास्त कार्यक्षम आहे असा स्पष्ट पुरावा असतानाही


खाजगी कंपन्यांना चरायला कुरण मोकळे करून दिले. साहजिकच इतर उद्योगप्रधान देशांशी तुलना करता अमेरिकेतील आरोग्य सेवा कमी प्रतीची आणि जास्त खर्चीक पडते,व अनेकांना परवडत नाही.


विकासाचे अनेक पैलू आहेत.मानवनिर्मित उत्पादन हा त्यातला एक पैलू झाला.पण त्या सोबतच नैसर्गिक संसाधनांचे जे भांडार आहे ते सांभाळणे,मानवी क्षमता, सामाजिक क्षमतांची भांडवले विकसित करणे हेही महत्त्वाचे आहे.तेव्हा आर्थिक वाढीचा हिशोब करताना जर नैसर्गिक संसाधनांत घट होत असेल तर ते उणेच्या बाजूत नोंदवलेच पाहिजे.न पेक्षा एकूण आर्थिक प्रगतीचे चुकीचे चित्र डोळ्यासमोर ठेवले जाईल.हे विचारात घेऊनच शासनाने उद्योजकांकडून नैसर्गिक संसाधनांचे मोल ठीकठाक वसूल केले पाहिजे.आज अमेरिकेत हे होत नाही व कोळशासारखी नैसर्गिक संसाधने खाण मालकांना फार स्वस्तात उपलब्ध करून दिली जातात.ही लुटालूट थांबवण्यासाठी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष क्लिन्टनच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष असताना स्टिग्लिट्झनी नैसर्गिक संसाधनांतील घटींचे सुव्यवस्थित लेखापरीक्षण सुरू व्हावे असा प्रस्ताव मांडला.पण कोळशाचे खाण मालक व त्यांचे राजकारणी पाठीराखे ह्यांनी तो हाणून पाडला.प्रदूषणातूनही नैसर्गिक संसाधनांची घट होते.तेव्हा अशा घटींचाही सुव्यवस्थित हिशोब करून प्रदूषकांकडून शासनाने त्याचे मोल वसूल करून घेतले पाहिजे. अमेरिकेत हेही होत नाही.ब्रिटिश पेट्रोलियम ह्या कंपनीच्या समुद्रातील तेल विहिरींच्या

गैरव्यवस्थापनामुळे २०१० साली अचाट तेल गळती होऊन सागरी नैसर्गिक संसाधनांचे,स्थानिक जनतेचे मोठे नुकसान झाले.

त्याबाबत कंपनीला जो दंड भरायला लागला तो अगदी जुजबी होता.त्यांच्याकडून खूप जास्त नुकसान भरपाई वसूल करणे आवश्यक होते.आज बाजारहाटातील व्यवहार अनेक दृष्टीने सदोष आहेत,तेव्हा त्यांवरच विसंबणारी धोरणे ठरवणे योग्य नाही हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ दिसत असले,तरी अमेरिकेतील अनेक प्रभावी अर्थतज्ज्ञ ह्याच विचारसरणीचा पुरस्कार करत,त्यावर आधारित धोरणे राबवीत आहेत.ह्या धोरणांतून अमेरिकेतील एक टक्का सर्वाधिक श्रीमंत राष्ट्रीय उत्पन्नाचा आज त्यांना मिळत असलेला अन्याय्य हिस्सा आणखीच वाढवत आहेत. ह्यांच्या पाठीराख्यांतील विशेष महत्त्वाच्या दोन व्यक्ती म्हणजे अमेरिकी फेडरल रिझर्व बँकेचे प्रमुख ग्रीनस्पॅन व बेर्नान्के.त्यांच्या आग्रहामुळे ही शासकीय बँक खाजगी बँकांना अत्यल्प व्याज दराने पैसे वाटते,आणि त्या बँका काहीही परिश्रम न करता तेच पैसे अधिक जास्त व्याज दरात सरकारकडे गुंतवतात व अगदी फुकटाफाकट अब्जावधी डॉलर खिशात घालतात.ह्या उफराट्या व्यवहाराला सर्व फेडरल रिझर्व्ह बँकेच्या सदस्यांचा पाठिंबा आहे असेही नाही,परंतु त्यांचे काही चालत नाही.आज अमेरिकेत व इतरत्रही जगात जो आर्थिक विकास होत आहे त्याचा पाया आहे आधुनिक तंत्रज्ञानातून सुधारणारी उत्पादकता.पण ह्यामुळे मनुष्यबळाची गरज सारखी घटत आहे.परिणामतः बेकारी भडकत आहे.तंत्रज्ञानाची व उत्पादकतेची प्रगती चालू राहणे अपरिहार्य आहे.ह्यातून मार्ग काढलाच पाहिजे व म्हणून शिगेला पोचलेल्या बेकारीवर मात करणे हे अमेरिकेच्या आर्थिक धोरणाचे महत्त्वाचे उद्दिष्ट मानले पाहिजे.पण आज ह्याकडे पूर्ण दुर्लक्ष होते आहे. 


केवळ व्याजाच्या दरांशी खेळ खेळत,शासकीय खर्च अधिकाधिक कापत,श्रीमंतांवरचे कर कमी कमी करत सगळे प्रश्न सोडवण्याचे अगदी चुकीच्या दिशेने प्रयत्न चालू आहेत.सरकारी अंदाजपत्रक तुटीचे नसावे असा अकारण बाऊ करत ज्या तंत्रज्ञान विकासातून गेल्या शतकाच्या उत्तरार्धात अर्थव्यवस्था भरभराटीस आली त्या विज्ञान - तंत्रज्ञानांना पोषक अशा कार्यक्रमांचे पैसे तोडले जाताहेत.इतरही विषमता आटोक्यात ठेवणारे सरकारी कार्यक्रम खच्ची होताहेत.पण धनिकांकडून नीट चोपून कर घेतला जात नाही.आज अमेरिकेत धनिक निर्धनांहून उत्पन्नाच्या कमी टक्के कर भरताहेत.मालकीच्या घरांतून बाहेर काढले गेले आहेत,चांगली आरोग्य सेवा,चांगले शिक्षण उपलब्ध नाही,बेकारीच्या खाईत लोटले गेले आहेत,पण बेरोजगारातील संरक्षणकवच नाही अशा विपन्नावस्थेत आज बहुसंख्य अमेरिकी नागरिक अडकले आहेत.मी Change you can believe in अशी आणून दाखवीन अशी आश्वासने देणाऱ्या ओबामांनीही जुनीच धोरणे राबवत त्यांची निराशा केली आहे.


परिणामी लोक हताश आहेत,मतदानाबाबत उदासीन झाले आहेत.उलट धनिकांना निवडणुकीसाठी वाटेल तेवढा पैसा ओतता येतो, त्यावरची बंधने शिथिल केली गेली आहेत.म्हणून 

पैशाच्या बळावर लोकप्रतिनिधींना सहज नाचवता येते.


लोकशाही म्हणजे एका व्यक्तीला एक मत असा सिद्धान्त आहे.पण आज अमेरिकेत एका डॉलरला एक मत अशी दुःस्थिती निर्माण झाली आहे.लोकशाही म्हणजे लोकांचे,

लोकांसाठी,लोकांतर्फे सरकार असाही सिद्धान्त आहे.पण आज अमेरिकेत एक टक्क्यांचे,एक टक्क्यांसाठी,एक टक्क्यांतर्फे सरकार असेच दारुण वास्तव दिसत आहे.


१८.१२.२४ या लेखातील शेवटचा भाग…



१८/१२/२४

रॅफची तडजोड / Raph's Compromise

युरोपातील साम्राज्यवादी देशांनी अमेरिका ऑस्ट्रेलियात मूलवासीयांना खच्ची करून नवयुरोप वसवले.त्यांत आफ्रिकेतील गुलाम राबवले,आणि दुसऱ्या महायुद्धापर्यंत आशिया आफ्रिका खंड पारतंत्र्यात खितपत ठेवले.

नवयुरोपाच्या मुबलक साधन-संपत्तीचा, आशिया आफ्रिका खंडांतून शोषून घेतलेल्या संसाधनांचा,आणि भराभर विकसित होणाऱ्या विज्ञान - तंत्रज्ञानाचा आधार घेऊन युरोप नवयुरोप आर्थिक भरभराटीत राहिले.आशियाई आफ्रिकी देशांची हळूहळू अधोगतीच होत होती.दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी भारताचे दरडोई अन्न उत्पादन रसातळाला पोचले होते. दुष्काळात मोठ्या प्रमाणावर भूकबळी पडत होते. एवढ्यात युरोपीय राष्ट्र,जपान यांच्या स्पर्धेतून दोन महायुद्धे झाली.

रशिया दुसऱ्या महायुद्धातील विजेत्या गटांत होता.पण समतेचे तात्त्विक प्रतिपादन करणाऱ्या रशियानेसुद्धा पूर्व युरोप - मध्य आशियात स्वतःचे एक साम्राज्यच प्रस्थापित केले होते. सर्वच तत्त्वप्रणालींचा विपर्यास करण्यात मनुष्यप्राणी तरबेज आहे.समाजात मूठभर भांडवलशहा श्रमिकांचे शोषण करतात,ते थांबवले पाहिजे.ह्यासाठी सर्व उत्पादन साधने समाजाच्या मालकीची केली गेली पाहिजेत असे प्रतिपादन करत रशियात एकोणीसशे अठरा सालची राज्यक्रांती झाली


त्यातून सत्तेवर आलेल्या कम्युनिस्ट पक्षाने काही वर्षांतच एक पक्षकार्यकर्त्यांची जुलमी यंत्रणा विकसित केली.प्रथम त्यांनी जवळजवळ गुलामांचे आयुष्य कंठणाऱ्याच शेतमजुरांना जमीनदारांच्या जुलमातून सोडवले,पण नंतर हळूहळू पक्षयंत्रणेच्या जुलमाखाली भरडले.अखेर ह्या सगळ्या विपर्यस्त व्यवस्थेच्या दुःखस्थितीतून चीन-क्युबासारखे अपवाद वगळता इतर कम्युनिस्ट राजवटी कोलमडल्या.


हा साम्यवादाचा विपर्यास खूप ठळकपणे लोकांच्या मनावर बिंबवणे हा अमेरिकी सत्ताधीशांचा आवडता उद्योग होता.कारण ह्या विपर्यासाबद्दल प्रचार करत आपण दुसऱ्याच बाजूने जो अत्याचार चालवला होता त्याचे समर्थन करता येत होते.हार्वर्डच्या विद्वानांत, विद्यार्थ्यांत हे वाद चालूच होते.वारूळ पुराणाचा नायक रॅफ स्वतःह्या वादात कसा सामील झाला आणि अखेर प्रस्थापित भांडवलशाही व्यवस्थेतच सहभागी होऊन मार्ग काढला पाहिजे ह्या निर्णयाप्रत कसा आला,हे अँटहिलच्या कथेचे महत्त्वाचे सूत्र आहे. विल्सननी स्वतःमान्य केलेली,त्यांचा कथानायक रॅफ जिला अनुसरून एका बांधकाम व्यावसायिकांच्या कंपनीसाठी काम करू लागतो,ती विचारसरणी सांगते की,खुल्या बाजारपेठेत जे व्यवहार चालतात,तीच जगातील सर्वोत्कृष्ट अर्थरचना आहे,त्यातूनच सर्वांचे भले होईल.पण अगदी उघड आहे की ह्या अर्थव्यवहारांतूनच निसर्गाचा मोठा विध्वंस चालला आहे.विल्सनना तर निसर्ग वाचवायचा आहे.तेव्हा रॅफच्या माध्यमातून ते तोड सुचवतात - श्रीमंतांच्या निसर्गप्रमाचा फायदा घेत-घेत हा निसर्ग वाचवावा.ह्याचे चित्रण रॅफच्या त्याच्या मामाबरोबरच्या संवादात केलेले आहे:


बघ, रॅफ, तुला जेप्सन-नोकोबी परगणे नेहमीच गांवंढळ राहून हवेत का? एक पाहा,सगळ्या भागात विकास होणारच.आपला भाग भरपूर सूर्यप्रकाशाचा, सौम्य हिवाळ्याचा आहे.त्याला सूर्यपट्टयां म्हणायला लागले आहेत! आणि मोबील,पेन्साकोला हे तर सूर्यपट्ट्यातही विकासाच्या वेगासाठी प्रसिद्ध होताहेत.राईट?


रॅफ दबला.हळूच उत्तरला, 'येस्सर!' त्याला सायरसमामाचं म्हणणं पटत नव्हतं,पण सभ्य,सौम्य असं उत्तरही नव्हतं त्याच्यापाशी,


"काय होतं पूर्वी,आणि आज काय आहे?" मामानं हल्ला सुरू ठेवला."तुझे आजोबा लहान असताना मोबीलच्या दक्षिणेला काहीच विकास झाला नव्हता.डॉग नदीपासनं सीडार पॉइंटला गेलात,तर दोनपाच घरं फक्त दिसायची. रस्त्याच्या शेवटच्या भागात तर डांबरीकरणही केलं नव्हतं,हो ना?"


रॅफनं नुसतीच होकारार्थी मान हलवली.


"आणि सीडार पॉइंटला धडपडत पोचलं,की डॉफिन बेट दिसायचं. शसुंदर होतं ते! छान वाळवंटी किनारपट्टी. एका टोकाला यादवीच्या काळातला किल्ला.पण बोट भाड्यानं घेऊन जावं लागायचं.बहुतेक बेट रिकामं होतं. आणि आज पाहा,सगळा इथून तिथला भाग विकसित झाला आहे.उद्योगधंदे बहरताहेत.डॉफिन बेटावर जायला पूल झाला आहे.ॲलाबामा राज्याच्या अर्थव्यवस्थेतला महत्त्वाचा भाग आहे तो.याला विकास म्हणतात,रॅफ ! प्रगती आहे ही!"


रॅफ हरला होता.


"अमेरिका बुडावर बसून थोर नाही झाली,रॅफ ! कठोर होऊन, युद्ध खेळून आपण मोठे झालो.इतिहास वाच तू -- शाळांमध्ये शिकवतात तो बायल्यांचा, डाव्यांचा इतिहास नाही.खरा इतिहास ! देवानं जे आपल्याला दिलं,ते घ्यायला रेड इंडियनांना हाकलावं लागलं.मेक्सिकोशी लढून पॅसिफिक किनारा गाठता आला.देश दुप्पट झाला त्या लढाईनं.चांगलं- वाईट ठरवत नाही मी. मी जग कसं चालतं ते सांगतो आहे तुला.वाढत जा,नाहीतर नष्ट व्हा! "


रॅफचा योजनेचा गाभा होता,नोकोबीच्या तीरावर मूठभर छोट्या इस्टेटी घडवणं,हा.प्रत्येक घराला तलावापर्यंत जाता येत होतं.सर्व घरांना एक रस्ता जोडत होता, आणि तो चौक्या बसवून पूर्णपणे खाजगी राखला होता. सगळ्या घरांना बोटींसाठी एकच सामायिक धक्का दिला होता.प्रत्येक घराला एकीकडे तलाव आणि दुसरीकडे राखीव जंगल होतं.मध्यमवर्गाला इथे जागा नव्हती,पण श्रीमंतांना श्रीमंती दरानं घरं देऊन कमी खर्चात मूळ अपेक्षित फायदा कमावता येत होता.


"आणि आणखीन एक बाब पाहा.आपण धोक्यातले कोणते परिसर वाचवले,कोणत्या जीवजाती वाचवल्या, याची भरपूर जाहिरात करू शकतो.नोकोबीला प्रसिद्ध करू शकतो.या राज्यात किती विकास कार्यक्रम असल्या कामाचा दावा करू शकतात?आणि किती जागी घरांमधून पायी जाऊन अशा जाती पाहता येतात ? आपण गव्हर्नरला बोलावू शकतो,उद्घाटनाला ! भरपूर फोटोज् काढल्यानं तोही खूष.आपण जर या योजनेला वनस्पती उद्यान म्हटलं,तर सांभाळेल सरकार,आणि आपल्याला कर कमी करा असं म्हणता येईल !


आणि मागे त्या मुंग्या मारण्यानं मिळालेली अपप्रसिद्धीही मिटवून टाकता येईल!"


अखेर कमी कटकटीत मूळ अपेक्षित नफा,या 'अल्टिमेट सेलिंग पॉइंट'वर रॅफचं म्हणणं त्याच्या मामाने व त्यांच्या भागीदारांनी मान्य केलं.


फुटताहेत हे बुडबुडे


अँटहिलच्या केन्द्रस्थानी आहे अमेरिकेतला बांधकाम व्यवसाय.हे पुस्तक प्रकाशित झाले २०१० साली. २००६ ते ११ ह्या कालावधीत स्थावर मालमत्तेच्या, घरांच्या किमती सतत चढत्या कमानीवर राहिल्या. १९९० नंतरच्या कालात संगणक,

आंतरजाल ह्यांतील क्रांतिकारी प्रगतीमुळे पैसा भराभर हलवणे,अगदी एक सहस्रांश सेकंदातसुद्धा शक्य झाले.ह्याचा फायदा उठवत बँका व इतर आर्थिक उलाढाली करणाऱ्या कंपन्यांनी नवनव्या क्लृप्त्या काढल्या, नवनवी हत्यारे पाजळली. ह्यातून सामान्य लोकांना काय चालले आहे,

आपण कोणत्या अटींवर कर्ज काढतो आहोत,किती व्याज भरतो आहोत हे समजणे अशक्यप्राय होऊन बसले. 


पण मालमत्तेच्या भडकत्या किमतींचा मोह पडून अनेकांनी ऐपतीपलीकडची घरकर्जे काढली.अशा कर्जाच्या फासात लोकांना अडकवत बँकांनी अतोनात पैसे कमावले.हा बुडबुडा काही टिकाऊ नव्हता,तो फुटल्यावर कर्जबाजारी लोकांनी घरे गमावली.

पण अशा बेघर झालेल्या लोकांना वाचवायला सरकारने काहीही पावले उचलली नाहीत.अर्थात ह्याच्या जोडीला लोकांना निष्कारण मोहात पाडणाऱ्या बँकांचेही पैसे बुडाले.जर बाजारपेठ खरीच मुक्त असती तर लोकांना दारिद्र्याच्या खाईत लोटणाऱ्या बँकांनाही बुडू द्यायला हवे होते.


( 'वारुळ पुराण',माधव गाडगीळ',ई.ओ.विल्सन,संक्षिप्त अनुवाद - नंदा खरे,मनोविकास प्रकाशन )


पण लोकांना काहीही मदत न देणाऱ्या ओबामांच्या सरकारने बँकांना मात्र बुडू दिले नाही.त्यांच्या घशात अब्जावधी डॉलर ओतले,बँकांना तगवले.मग बँक व्यवस्थापकांनी काय केले?


आधी बँकांचे उच्चाधिकारी कार्यक्षमतेसाठी प्रोत्साहन या गोंडस नावाखाली प्रचंड पगार,बोनस खात होते.


आता स्वतःला कार्यक्षम म्हणवून घेणे शक्य नव्हते. तेव्हा सरकारने बँकांत पैसे ओतल्यावर त्यांनी निर्लज्जपणे मोठमोठे बोनस स्वतःला देऊन घेतले, एवढेच की ह्या बोनसचे नाव बदलले.आता कार्यक्षमता प्रोत्साहन नाही - त्यांनी नोकरी सोडून जाऊ नये म्हणून खास प्रोत्साहन असे नाव दिले.तेव्हा अर्थव्यवस्था बुडबुडा फुगताना सुदृढ असल्याचा आभास होता, तेव्हाही बोनस,आणि या बँकर्सच्याच करामतीने ती डबघाईला आल्यावरही शिक्षा सोडाच,

उलट तेवढाच बोनस.हे काही सगळ्यांनीच खपवून घेतले असे नाही. ह्या साऱ्या गैरव्यवहारावर अतोनात जे संतापले त्यांचे एक म्होरके आहेत.जोसेफ स्टिग्लिट्झ हे दिग्गज अर्थतज्ज्ञ.२००१ सालचे नोबेल पारितोषिक विजेते; जोडीला आर्थिक धोरणे घडवण्यात,राबवण्यातही सक्रिय.अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिन्टनच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष,विश्व बँकेचे प्रमुख अर्थतज्ज्ञ,फ्रान्सचे अध्यक्ष सार्कोझी यांनी स्थापलेल्या आर्थिक विकास आणि सामाजिक प्रगती म्हणजे काय ह्याचा मागोवा घेणाऱ्या आंतराराष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष, असा त्यांचा प्रचंड अनुभव आहे.एक सर्वसमावेशक, विशाल दृष्टिकोन ही त्यांची खासियत आहे.ते केवळ अर्थकारणाचा ऊहापोह करत नाहीत,तर अर्थव्यवस्था, राजकारण,समाजकारण,पर्यावरण ह्या साऱ्यांचा साकल्याने विचार करतात.ह्या मुरलेल्या,अनुभवी विद्वानाने अनेक महत्त्वाची पुस्तके लिहिली आहेत.त्यातील सगळ्यात अलीकडच्या पुस्तकाचा विषय आहे विषमतेचे मूलस्रोत व दुष्परिणाम.गेल्या दोन वर्षांत आर्थिक अन्यायाचा,भ्रष्ट राज्यकर्त्यांचा निषेध करत अनेक देशांत अगणित लोक रस्त्यांवर उतरले.स्टिग्लिट्झनी मुद्दाम अरब देशांत जाऊन त्यांच्याशी संवाद साधला.नंतर अमेरिकेत वॉल स्ट्रीटवर उतरलेले लोक तर स्टिग्लिट्झनीच पुरवलेली घोषणा देत होते : हा आहे नव्याण्णव टक्के लोकांचा आक्रोश ! एक टक्का धनदांडग्यांनी अमेरिकेत जो हाहाकार मांडला आहे तो आवरलाच पाहिजे.स्टिग्लिट्झच्या The Price of Inequality पुस्तकाचा भर आहे अमेरिकेवर,

पण त्यांनी जागतिकीकरणाचेही मार्मिक विश्लेषण केले आहे.भौतिकशास्त्रात,जीवशास्त्रात ज्या वेगवेगळ्या संकल्पना मांडल्या जातात त्या पडताळणे तसे सोपे आहे.म्हणूनच डार्विनच्या प्रतिपादनानंतर लवकरच शास्त्रीय जगतात त्याचा सिद्धान्त सर्वमान्य झाला.पण अमेरिकेतल्या लोकमानसात अनेक पूर्वग्रहांमुळे तो अजून मोठ्या प्रमाणात नाकारला जातो.


समाजशास्त्रात,अर्थशास्त्रात भौतिकशास्त्राहून,जीवशास्त्राहून खूप वेगळी परिस्थिती आहे.ह्या शास्त्रांतले सिद्धान्त पडताळणे जास्त अवघड आहे.जोडीलाच ह्या शास्त्रांबद्दल केवळ सामान्य जनतेच्याच नाही,तर शास्त्रज्ञांच्या मनांतही अतोनात पूर्वग्रहांची पाळेमुळे अगदी घट्ट रुजलेली आहेत. अर्थशास्त्रातली अशीच पूर्वग्रहांनी व्यवस्थित पोसलेली विचारसरणी सांगते की मुक्त बाजारहाट अतिशय कार्यक्षम असते.(अपूर्ण उर्वरित भाग पुढील लेखामध्ये) 

१६/१२/२४

सरकणाऱ्या पाण्याचं गुपित / The secret of moving water

जमिनीतून उंच झाडाच्या टोकापर्यंत पाणी पोचतं तरी कसं? ज्या पद्धतीने याचं उत्तर दिलं जातं त्यातून आपली जंगलाची जाण लक्षात येते.झाडं एकमेकांशी कशी बोलतात किंवा त्यांना यातना होतात का,या अभ्यासापेक्षा झाडातून पाण्याचा प्रवाह कसा होतो हे कळणं त्यामानाने सोपं आहे. आणि हे सोपं वाटतं त्यामुळे अनेक शास्त्रज्ञांनी या प्रश्नाला उत्तरं दिली आहेत.माझ्या विद्यार्थ्यांबरोबर मला या विषयावर गप्पा मारायला मजा येते. झाडातून पाण्याचा प्रवाह कसा होतो याची दोन मुख्य कारणं दिली जातात - केशाकर्षण (कॅपिलरी ॲक्शन) आणि पानांतून होणारे बाष्पोत्सर्जन (ट्रांस्पिरेशन).


नाश्त्यामध्ये कॉफी पिताना आपल्याला केशाकर्षणचे प्रात्यक्षिक दिसते.केशाकर्षणामुळे कॉफीचा पृष्ठभाग कपाच्या कडेहून उंच राहू शकतो. केशाकर्षण  तर कपाच्या उंचीपर्यंतच कॉफी असती.या फोर्समुळे अरुंद भांड्यातले द्रव्य गुरुत्वाकर्षणाला झुगारून अधिक उंची गाठू शकते. पानगळ होणाऱ्या झाडात पाणी पोहोचविणारी नलिका ०.०२ इंच रुंदीची असतात आणि ती पाण्याला वर ढकलू शकते.

सूचीपर्णी वृक्षात तर नलिकांची रुंदी जेमतेम ०.०००८ इंच असते.पण फक्त नलिका अरुंद आहेत म्हणून पाणी वरती जातं असं म्हणणं चुकीचं आहे,कारण अत्यंत अरुंद नलिकेतही पाणी जमिनीपासून फार फार तर तीन फूट वरती चढवता येण्याइतकीच ताकद असते.


द हिडन लाईफ ऑफ ट्रीज,पी ट र वो ह्ल ले बे न

अनुवाद - गुरुदास नूलकर,अरविंद घनश्याम पाटकर

 मनोविकास प्रकाशन


आणि म्हणूनच ट्रांस्पिरेशन ही दुसरी प्रक्रिया झाडाच्या मदतीला येते.उबदार वातावरणात सूचीपर्णी आणि रुंद पानातून हवेची वाफ सोडली जाते.एखाद्या विशाल बीच वृक्षातून या पद्धतीने दिवसाला शेकडो गॅलन पाणी बाहेर पडतं.यामुळे झाडाच्या पाणी वाहतुकीच्या नलिकेतून जमिनीतलं पाणी शोषून घेतलं जातं.जोपर्यंत पाणीपुरवठा थांबत नाही तोपर्यंत शोषण होत राहतं,कारण पाण्याचे रेणू एकमेकांना चिकटून वरती खेचले जातात.पानातून वाफ बाहेर गेली की तिथे रिकामी जागा तयार होते आणि जागा भरण्यासाठी पुढचा रेणू वरती सरकतो.


ट्रांस्पिरेशनही कमी पडलं तर झाडात द्रवाभिसरण (ऑस्मॉसिसची) सोय असते.जर एखाद्या पेशीत आजूबाजूच्या पेशींपेक्षा साखरेची घनता जास्त झाली,तर त्या पेशीत शेजारच्या पेशीतून पाणी सरकतं आणि घनता एकसारखी करून घेतली जाते.असं जेव्हा मुळापासून शेंड्यापर्यंत सर्व पेशीतून होतं,तेव्हा पाण्याचा प्रवाह मुळापासून शेंड्यांपर्यंत होऊ लागतो.


वसंत ऋतूच्या आधीच्या कालावधीत पानं पूर्णपणे उघडण्याच्या आधी झाडात पाण्याचा दाब सर्वाधिक असतो.या काळात झाडाला जर स्टेथस्कोप लावला तर चक्क प्रवाहाचा आवाज ऐकू येतो. 


ईशान्य अमेरिका आणि कॅनडामध्ये याचा फायदा करून घेतला जातो.इथले लोक मॅपल झाडातून सिरप गोळा करतात.फक्त याच काळात झाडातून सिरप मिळते.

पानझडीच्या या काळात झाडांवर जास्त पाने नसतात,

त्यामुळे बाष्पोत्सर्जनही कमी असते.आधी पाहिल्याप्रमाणे केशाकर्षणाने पाणी जेमतेम तीन फूटच उंच चढू शकते.पण पूर्ण झाडाच्या खोडात पाणी तुडुंब भरलेले असते,मग आता फक्त 'द्रवाभिसरण' हेच एक कारण ठरते पाण्याच्या प्रवाहाचे.पण मला द्रवाभिसरण पुरेसं आहे असंही वाटत नाही.कारण 'द्रवाभिसरण' हे मुळांमध्ये आणि पानांमध्येच शक्य आहे,जिथे पेशी एकमेकांना खेटून असतात.झाडाच्या खोडात तर फक्त लांबच लांब,सलग नलिका असतात पाणी वाहून नेण्याकरता !


मग आता पाणी प्रवाहाचे नेमके उत्तर काय असेल? 


खरं तर आजही ते आपल्याला पुरेसं कळलेलं नाही. पण नवीन संशोधनामुळे बाष्पोत्सर्जन आणि केशाकर्षण यांवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. युनिव्हर्सिटी ऑफ बर्न,स्विस फेडरल इन्स्टिट्युट फॉर फॉरेस्ट,स्नो अँड लँडस्केप रिसर्च आणि स्विस फेडरल इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी,झुरिच संस्थांच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या एका संशोधनात रात्री झाडाच्या बुंध्यातून अगदी हळू अशी पाण्याची खळखळ ऐकू आली. 


रात्रीच्या वेळेस पानातून प्रकाश संश्लेषण थांबलेलं असल्यामुळे पाण्याची वाफ तयार होत नाही.म्हणून रात्री बहुतांश पाणी बुंध्यात स्तब्धपणे उभं असतं. पण मग हा आवाज कसला?शास्त्रज्ञांच्या मते हा आवाज कार्बन-डाय-ऑक्साईडच्या बुडबुड्यांचा असू शकतो.हे बुडबुडे खोडांच्या बारीक नलिकेत साठवलेल्या पाण्यामध्ये असतात.याचा अर्थ असा की,बुडबुड्यांमुळे नलिकेतून पाण्याच्या स्तंभ अखंड असत नाही.हे जर बरोबर असेल तर मग केशाकर्षण,बाष्पो

त्सर्जन,द्रवाभिसरण या कशाचं झाडामधील पाणी वाहतुकीत फार काही योगदान नाही असचं म्हणावं लागेल.


किती प्रश्नांची आपल्याकडे उत्तरं नाहीत!पाणी वाहतुकीच्या प्रक्रियेचं आपलं ज्ञान चूक ठरलं म्हणून असेल किंवा नवीन माहिती मिळाली म्हणून असेल,पण आपल्या ज्ञानात नक्कीच भर झाली आहे.किती प्रश्नांची आपल्याकडे उत्तरे नाहीत! पाणी वाहतुकीच्या प्रक्रियेचे आपलं ज्ञान तोडकं आहे.म्हणायचं की आपल्याला आणखी एका रहस्याचं उत्तर सापडवायचं आहे,असे म्हणू या! दोन्ही गोष्टी औत्सुक्य वाढवणाऱ्याच आहेत,नाही का? पण आपल्या ज्ञानात नक्की भर झाली आहे.

१४/१२/२४

सहयोग असा प्राप्त करा.Receive such cooperation

दुसऱ्या व्यक्तीच्या विचारांऐवजी आपल्या सगळ्यांनाच आपल्या विचारांवर जास्त विश्वास असतो.यात समजदारी नाही आहे की,आम्ही आपल्या विचारांना दुसऱ्याच्या गळ्याच्या खाली उतरवण्याकरता आपला पूर्ण जोर लावावा.

याच्याऐवजी हे चांगलं नाही होणार का की आम्ही फक्त सूचवावं आणि समोरच्या व्यक्तीला निष्कर्ष काढू दे.


एडॉल्फ सेल्ट्ज ऑटोमोबाईल शोरूमचे सेल्स मॅनेजर आहेत आणि माझ्या एका कोर्सचे विद्यार्थी आहेत.त्यांच्या समोर अचानक ही समस्या आली की, त्यांना हताश आणि विखुरलेल्या ऑटोमोबाईल सेल्समन्सच्या समूहात उत्साह निर्माण करावा लागला. त्यांनी एक सेल्स मीटिंग बोलावली आणि सेल्समनला विचारले की त्यांना कंपनीकडून काय काय हवं आहे? त्यांचे विचार ऐकण्याच्या वेळी त्यांनी सुचवलेले उपाय फळ्यावर लिहिले.

यानंतर त्यांनी सांगितलं,तुम्हाला माझ्याकडून जे हवंय,ते सगळं तुम्हाला मिळेल.आता मी तुमच्याकडून हे जाणू इच्छितो की,मला तुमच्याकडून काय अपेक्षा ठेवायला पाहिजे.उत्तरं लवकर आणि वेगाने आली - निष्ठा,इमानदारी,टीमवर्क,प्रत्येक दिवशी आठ तास मन लावून काम करणे,उत्साह,जोश इत्यादी. मीटिंग एक नवी प्रेरणा,एका नवीन आशेबरोबर संपली.


 एका सेल्समनने तर चौदा तास रोज काम करण्याचं वचन दिलं आणि मिस्टर सेल्ट्जने मला सांगितलं की, या मीटिंगच्या नंतर त्यांच्या कंपनीची विक्री खूप वाढली.


मिस्टर सेल्ट्ज सांगतात,या लोकांनी माझ्याबरोबर एक प्रकारचा नैतिक करार केला होता.जेव्हापर्यंत मी माझ्याकडून दिल्या गेलेल्या वचनाला जागेन,या लोकांनापण आपल्या वचनावर कायम राहावं लागेल. त्यांच्या इच्छांना विचारणं हा एक जादूचा उपाय होता, ज्यानी कमाल केली."


कोणीही या गोष्टीला पसंत नाही करत की,त्याला काही विकलं जातंय किंवा त्याला काही समजावलं जातंय. आम्ही सगळे या गोष्टीला पसंत करतो की,आम्ही स्वतः काही गोष्टीचा विचार करू किंवा आपल्या मनानी कोणतीही विकत घेण्याचा निर्णय घेऊ.आम्हाला आपल्या इच्छांनी, आपल्या विचारावर काम करणं आवडतं.


मिस्टर वेसनचं उदाहरण घ्या.त्यांनी हे सत्य ओळखण्याच्या आधी हजारो डॉलर्सचं कमिशन गमावलं होतं.मिस्टर वेसन स्टाइलिस्ट्स आणि टेक्सटाइल निर्मात्यांना स्केच विकत होते.मिस्टर वेसन तीन वर्षांपासून प्रत्येक आठवड्यात न्यू यॉर्कच्या एका नामी स्टाइलिस्टकडे जात होते.मिस्टर वेसननी सांगितलं खरं तर त्यांनी मला भेटायला कधी नाही म्हटलं नाही,पण त्यांनी माझं कोणतंच स्केच विकत घेतलं नाही.तो नेहमी माझं स्केच लक्षपूर्वक बघत असे आणि त्याच्या नंतर म्हणायचा : नाही,वेसन मला असं वाटतं की हे स्केच आमच्या काही कामाचे नाहीत.


दीडशे वेळा असफल झाल्यानंतर वेसनला असं जाणवलं की,बहुतेक त्याचं डोकं बरोबर काम नाही करत आहे म्हणून त्याने एक आठवडापर्यंत मानवीय व्यवहाराला प्रभावित करण्याच्या कलेवर होत असलेल्या एका कोर्समध्ये भाग घेतला म्हणजे त्याला नवीन विचार मिळतील आणि त्याच्यात नवीन उत्साह जागेल.

त्यांनी आपल्या शिकलेल्या नव्या उपायांवर अंमल करण्याचा निर्णय घेतला.एक दिवस तो आपल्या हातात अर्धा डझन अर्धवट स्केच घेऊन विकणाऱ्याच्या ऑफिसमध्ये पोचला आणि म्हणाला,मला तुमच्याकडून मदत हवीय.माझ्याजवळ काही अर्धवट स्केच आहेत. काय तुम्ही मला सांगाल की,तुम्हाला याला कोणत्या प्रकारांनी बनवायचं आहे?जेणेकरून तुमच्या हे कामास येतील? विकत घेणाऱ्याने काही न सांगता काही वेळ स्केचकडे बघितलं आणि शेवटी सांगितलं,तुम्ही या स्केचेसना इथेच सोडून जा आणि थोड्या दिवसांनंतर येऊन भेटा.वेसन तीन दिवसांनंतर भेटायला गेला.खरेदी करणाऱ्यांनी त्यांना जे सुचवलं होतं त्याप्रमाणे त्या हिशेबानी त्यानं स्केच पूर्ण केले आणि निकाल हा लागला की सगळेच स्केचेस स्वीकारले गेले.


यानंतर खरीददाराने वेसनला खूप साऱ्या स्केचेस्ची ऑर्डर दिली आणि मिस्टर वेसनने ते सगळे स्केचेसपण त्याच्याच विचारांच्या मदतीने बनवले.मिस्टर वेसनचं म्हणणं होतं की,मी तोपर्यंत याकरता असफल होत राहिलो कारण की मी त्याला माझ्या मनाची गोष्ट विकत होतो.मी ते विकायला बघत होतो,जे मला वाटत होतं की,त्याने विकत घ्यायला पाहिजे.मग मी माझी शैली पूर्णपणे बदलून टाकली.मी त्याला त्याचे मत विचारले. यामुळे त्याला असं वाटलं जसा तो स्वतःवर डिझाइन बनवतो आहे आणि एका प्रकाराने असंच होत होतं. मला त्याला स्केचेस विकावे नाही लागले.त्यांनी आपल्या मनानीच स्केच विकत घेतले.


समोरच्या व्यक्तीला हा अनुभव द्या की हे विचार त्याचेच आहेत.हे बिझनेसमध्ये आणि राजनीतीमध्येही काम करतं आणि कौटुंबिक जीवनामध्येसुद्धा. 


ओक्लाहामाच्या पॉल एम.डेविसने आपल्या क्लासला सांगितलं की,त्यांनी कोणत्या प्रकारे या सिद्धान्तावर अंमल केला.मी माझ्या कुटुंबासोबत सुट्टीमधल्या एका ट्रीपचा खूप छान आनंद घेतला.मी नेहमीच ऐतिहासिक जागेवर फिरण्याची स्वप्नं पाहत होतो.जसं गेटिसबर्गमध्ये गृहयुद्धाची रणभूमी,फिलाडेल्फिया मध्ये इंडिपेंडन्स हॉल आणि आमच्या देशाची राजधानी.मी जिथे जाऊ इच्छित होतो त्यात वॅली फोर्ज,जेम्सटाउन आणि विलियम्यबर्गही सामील होते.


मार्चमध्ये माझी पत्नी नॅन्सीने म्हटलं की,उन्हाळ्यात तिच्या हिशेबाने न्यू मेक्सिको पॅरिझोना,कॅलिफोर्निया,नेवाडा इत्यादी पश्चिम राज्यांचं भ्रमण करायला योग्य राहील.अनेक वर्षांपासून या जागांवर जाण्याची इच्छा होती.सरळच होतं की,या दोन्ही ट्रीप्स एकाच वेळी होऊ शकत नव्हत्या.


"आमची मुलगी ॲनने ज्युनियर हायस्कूलमध्ये अमेरिकेच्या इतिहासाचा कोर्स पूर्ण केला होता आणि ती आपल्या देशाला आकार देणाऱ्या घटनांमध्ये खूप रुची ठेवत होती.मी तिला विचारलं की काय ती आमच्या बरोबर पुढच्या सुटीत त्या जागांना भेट देऊ इच्छिते का, ज्याच्या बाबतीत तिने फक्त पुस्तकात वाचलं आहे.तिने म्हटलं जर असं होईल तर तिला खूप आनंद होईल.या चर्चेच्या दोन दिवसांनंतर जेव्हा आम्ही डिनर टेबलावर बसलो तेव्हा ॲनने घोषणा केली की,जर आम्ही सगळे सहमत असलो तर या उन्हाळ्याच्या सुट्टीत पूर्व राज्यांमध्ये फिरून येऊ शकतो,कारण हा ॲनकरता खूपच रोमांचकाही प्रवास होईल आणि आम्हाला सगळ्यांनापण यामुळे मजा येईल.आम्ही लगेच सहमत झालो.

याच मनोवैज्ञानिक तंत्राचा प्रयोग एका एक्स-रे निर्मात्याने केला.ब्रूकलिनच्या एका मोठ्या दवाखान्यात एक्स-रे मशिनची गरज होती.हा दवाखाना अमेरिकेमधील सगळ्यात चांगला एक्स-रे डिपार्टमेंट म्हणवण्याकरता अत्याधुनिक उपकरणं लावायचं म्हणत होता.एक्स-रे डिपार्टमेंटच्या प्रभारी डॉक्टर एलकडे खूप सारे सेल्समन येऊन आपल्या कंपनीच्या मशिन्सची तारीफ करायचे.

परंतु एक निर्माता जास्त चतुर होता.तो मानवी स्वभावाला आपल्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा जास्त चांगलं जाणत होता.त्याने डॉक्टर एल.ला या प्रकारे एक पत्र लिहिलं :


आमच्या फॅक्टरीने आताच एक नवीन एक्स-रे मशीन बनवली आहे.ही मशीन आत्ताच आमच्या ऑफिसमध्ये आली आहेत.आम्ही जाणतो की ही मशिन्स निर्दोष असणार नाहीत.आम्ही त्याच्यात सुधार करायचं म्हणतो आहोत.

आम्ही तुमचे आभारी राहू जर तुम्ही येऊन या मशिन्सला बघून आम्हाला सांगाल की,यांना आम्ही तुमच्या व्यवसायाकरता कोणत्या तऱ्हेने अधिक उपयोगी आणि उत्तम बनवू शकू.मला माहिती आहे की तुम्ही खूप व्यस्त आहात,याकरता मी तुम्हाला घ्यायला तुमच्या सांगितलेल्या वेळेला गाडी पाठवीन.


डॉ.एल.ने आमच्या वर्गासमोर ही घटना ऐकवताना म्हटले,हे पत्र मिळाल्यावर मला खूप आश्चर्य वाटले.मी आश्चर्यचकितही होतो आणि खूशही.पहिल्यांदाच कोणत्या तरी एक्स-रे मशीन निर्मात्याने मला सल्ला मागितला होता.यामुळे मला असं वाटलं की मी महत्त्वपूर्ण होतो.मी त्या आठवड्यात खूपच व्यस्त होतो; पण मी एक डिनर अपॉइंटमेंट कॅन्सल केली आणि मशीन बघायला गेलो.मशीनला मी जितके लक्षपूर्वक बघितलं,तितकाच मी या निर्णयाला पोहोचलो की हे मशीन खूपच चांगलं आहे.कोणीच मला ही मशीन विकायचा प्रयत्न केला नव्हता.मला जाणवलं की,जणू काही दवाखान्यात ते उपकरण विकत घ्यायचा विचार माझाच होता.मी त्याला चांगल्या क्वालिटीचं असल्यामुळे विकत घेतलं होतं.


राल्फ वॉल्डो इमर्सनने आपल्या निबंधात सेल्फ-रिलायन्समध्ये सांगितलं आहे की,प्रत्येक महान कामात आम्ही आपल्या नाकारलेल्या विचारांना ओळखतो.ते एक विशिष्ट ज्ञान घेऊन आमच्याकडे परततं.


जेव्हा वुड्रो विल्सन व्हाइट हाउसमध्ये होते,तेव्हा कर्नल एडवर्ड एम.हाउस राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मामल्यात बरीच दखल घेत होते. विल्सन कर्नल हाउच्या गोपनीय सल्ला आणि उहापोहावर जितके निर्भर होते,तितके आपल्या कॅबिनेटच्या मंत्र्यांवर नव्हते.(मित्र जोडा,आणि प्रभावशाली बना,डेल कार्नेगी,अनुवाद - कृपा कुलकर्णी, मंजुल प्रकाशन)


कर्नल प्रेसिडेंटला प्रभावित करण्याकरता कोणती पद्धत वापरत होते ? सौभाग्यानी आम्हाला ही गोष्ट माहीत आहे,कारण हाउसने स्वतः ही गोष्ट आर्थर डी.हाउडने स्मिथला सांगितली होती,ज्यांनी त्याचा उल्लेख द सॅटरडे इव्हनिंग पोस्टमध्ये छापलेल्या आपल्या लेखात केला आहे.


जेव्हा मी प्रसिडेंटशी चांगल्या प्रकारे परिचित झाले, तेव्हा मी हे ओळखलं की त्यांच्याकडून आपली गोष्ट मनवण्याचा सगळ्यात चांगला उपाय हा आहे की कोणताही विचार त्यांच्या समोर हलक्या फुलक्या ढंगांनी सांगा,ज्यामुळे त्यांच्या मनात याविषयी रुची निर्माण होईल म्हणजे ते स्वतः याच्या बाबतीत विचार करतील.पहिल्या वेळी तर असं संयोगाने झालं होतं.मी व्हाइट हाउसमध्ये गेलो होतो आणि मी त्यांच्या समोर एक अशा नीतीचा प्रस्ताव ठेवला होता ज्याबाबत ते त्या वेळी सहमत नव्हते.अनेक दिवसांनंतर डिनर टेबलवर त्यांनी माझ्या समोर माझ्याच विचारांना या प्रकारे ठेवलं जसा की तो उपाय त्यांच्याच डोक्यातून निघाला आहे. मी हैराण झालो.हाउसने प्रेसिडेंटला टोकून म्हटलं की, हा तुमचा विचार नाही आहे.हा तर माझा विचार आहे. नाही,हाउसनी असं काहीच केलं नाही.ते खूप बुद्धिमान होते.त्यांना श्रेय घेण्याची पर्वा नव्हती.त्यांना तर परिणाम हवा होता.याकरता त्यांनी विल्सनला हे वाटू दिलं जसा की,तो त्यांचाच विचार आहे.हाउस यापेक्षाही पुढे गेले. त्यांनी विल्सनना या विचारांबद्दल सार्वजनिक रूपानी श्रेय दिलं.आम्हाला हे लक्षात ठेवलं पाहिजे की,


आम्ही या लोकांच्या संपर्कामध्ये असतो ते सगळे तितकेच मानवीय आहेत जितके की वुड्रो विल्सन होते.

याकरता आम्हाला कर्नल हाउसच्या टेक्निकचा प्रयोग करायला हवा.


एकदा न्यू ब्रुन्सविकच्या सुंदर कॅनाडाई प्रदेशाच्या एका व्यक्तीने याच टेक्निकचा प्रयोग माझ्यावर केला आणि त्याने मला आपलं ग्राहक बनवलं.एकदा मी न्यू ब्रुन्सविकमध्ये फिशिंग आणि कॅनोइंग करण्याची योजना बनवत होतो.याकरता मी टुरिस्ट ब्यूरोकडून कॅपस् ची माहिती मिळवली.स्पष्ट होतं की माझं नाव आणि पत्ता मेलिंग लिस्टमध्ये टाकले गेले.माझ्याजवळ खूपशा कैंप मालकांची पत्रं,बुकलेट आणि छापलेल्या प्रसंशेचे कोटेशन आले.मी हैराण होतो.मला समजत नव्हतं की,मी आता काय करू? तेव्हा एका कँपच्या मालकाने चतुराईने काम केलं.त्याने मला न्यू यॉर्कच्या खूप लोकांची नावं आणि टेलिफोन नंबर लिहून पाठवून दिलं आणि मला सांगितलं की,मी त्यांना फोन करून विचारू शकतो की,त्यांची व्यवस्था कशी आहे.


योगायोगाने मी त्या सूचीमधल्या एका व्यक्तीला ओळखत होतो.मी त्याला फोन करून त्याचा अनुभव विचारला आणि यानंतर मी कँपच्या मालकाला आपल्या पोचण्याची तार केली.दुसरे लोक मला आपल्या सेवा विकण्याचा प्रयत्न करत होते.या व्यक्तीने मला त्याच्या सेवांना विकत घेण्याकरता विवश केलं,त्यामुळे तो कँपवाला जिंकला.


अडीच हजार वर्षांपूर्वी लाओत्से नावाच्या चिनी दार्शनिकाने अशी गोष्ट सांगितली होती,ज्यावर हे पुस्तक वाचणारे अंमल करू शकतात,नद्या आणि समुद्र शेकडो पहाडांवरच्या धारांचं पाणी याकरता ग्रहण करू शकतात कारण ते स्वतः खाली असतात.यामुळे ते पहाडावरच्या झऱ्यांवर अधिपत्य करू शकतात.या प्रकारे संतसुद्धा स्वतःला माणसांपेक्षा खालच्या पातळीवर ठेवतात म्हणजे ते त्यांच्यापेक्षा वर जाऊ शकतील.त्यांच्या पाठीमागे ठेवतात म्हणजे ते त्यांच्या आधी राहू शकतील.याच कारणामुळे संत माणसांपेक्षा वरच्या स्तरावर असतात;पण माणसांना त्याचा त्रास होत नाही,सामान्य माणसांना त्यापासून कुठलेच दुःख होत नाही."


दुसऱ्या व्यक्तीला असे वाटू द्या की,हा विचार तिचाच आहे.

१२/१२/२४

दोन बिबळ्यांचं युद्ध / The war of two leopards

एक म्हणजे तिथे जवळपास कुठेही बसण्यासाठी योग्य जागा नव्हती आणि दुसरं म्हणजे कुठेही बसायला माझी तयारी नव्हती.त्या जागेपासून सर्वात जवळचं,एका निष्पर्ण आक्रोडाचं झाड तिथून तीनशे यार्ड लांब होतं त्यामुळे तिथे बसण्याचा प्रश्नच येत नव्हता आणि स्पष्टपणे कबूल करायचं झालं तर जमीनीवर कुठेतरी बसण्याचं धैर्य माझ्याकडे नव्हतं.मी त्या गावात संध्याकाळी आलो होतो.चहा पिणं,त्या मुलाच्या आईची कथा ऐकणं,बिबळ्याचा माग काढणं या सर्व गोष्टींमध्ये बराच वेळ खर्च झाला होता आणि आता मला किमान सुरक्षित वाटेल असा आडोसा किंवा लपणं तयार करणं यासाठी हाताशी वेळच उरला नव्हता.त्यामुळे मी जमीनीवर बसायचं ठरवलं तरी अक्षरशः कुठेही बसावं लागणार होतं;त्यात निवडीला वावच नव्हता.त्यात परत माझ्यावर हल्ला झाला असता तर मला ज्या हत्याराचा सराव होता त्याचा,म्हणजे रायफलचा, काहीही उपयोग नव्हता कारण वाघ किंवा बिबळ्या यांच्याशी आमनेसामने संपर्क झाला तर बंदुकांचा काहीही उपयोग नसतो.


ही सर्व मोहीम उरकून अंगणात परतल्यावर मी मुखियाला एक पहार,मजबूत लाकडी मेख,हातोडा व कुत्र्याची साखळी एवढ्या वस्तू आणायला सांगितल्या. पहारीने अंगणातली एक फरशी मी उचकटून काढली, त्या खड्ड्यात ती लाकडी मेख खोलवर ठोकली आणि साखळीची एक कडी त्यात अडकवली.त्यानंतर मुखियाच्या मदतीने मी त्या मुलाचा मृतदेह तिथे आणून ठेवला आणि साखळीचं दुसरं टोक त्याला बांधून टाकलं.आपल्या आयुष्याचा शेवट ठरवणारी अदृश्य शक्ती - तिला काही लोक नशीब तर काही लोक 'किस्मत' म्हणतात- कधीकधी फार क्रूर खेळ करते. 


गेल्या काही दिवसात या अज्ञात शक्तीने एका कुटुंबाची रोटी कमावणाऱ्याचा बळी घेऊन त्यांना उघडं पाडलं होतं,

आयुष्यभर काबाडकष्ट करून शेवटची काही वर्ष त्यातल्या त्यात सुखासमाधानात घालवण्याची स्वप्न रंगवणाऱ्या म्हातारीच्या आयुष्याची दोरी अतिशय वेदनामयरित्या तोडली होती आणि आता...या छोट्या पोराच्याही आयुष्याचा दोर कापला होता.

त्याच्याकडे बघूनच समजत होतं की त्या विधवा स्त्रीने त्याचं पालनपोषण किती काळजीपूर्वक केलं होतं.त्यामुळेच रडता रडता ती मध्येच थांबून म्हणत होती,"देवा, माझ्या पोराने असा काय गुन्हा केला होता की इतक्या उमेदीच्या वयात त्याच्या वाट्याला इतका भयानक मृत्यू यावा ?


अंगणातली फरशी काढतानाच मी सांगितलं होतं की त्या मुलाच्या आईला आणि बहिणीला त्या इमारतीच्या अगदी शेवटच्या खोलीत नेलं जावं.माझी सर्व तयारी झाल्यावर मी झऱ्यावर जाऊन हातपाय धुतले, ताजातवाना झालो व गवताच्या थोड्या पेंढ्या आणायला एकाला पाठवून दिलं.ते कुटुंब राहत होतं त्या घरासमोरच्या व्हरांड्यावर मी त्यातल थोडं गवत पसरवून ठेवलं.आता अंधार पडला होता व आसपास जमलेल्या सर्वांना रात्रभर शक्य तेवढी शांतता ठेवा अशी शेवटची सूचना देऊन मी घरी पाठवून दिलं.


गवताच्या गादीवर आडवा पडून व पुढे गवताचा थोडा ढीग रचून मी समोर पाह्यलं तर मला मृतदेह अगदी स्पष्ट दिसत होता.

आदल्या रात्री कितीही गोंगाट केला गेला असला तरी मला खात्री होती की आज रात्री बिबळ्या भक्ष्यावर येणार आणि भक्ष्य त्याच्या जागी न सापडल्याने तो दुसरा बळी मिळवण्यासाठी गावात येणार.ज्या सहजपणे त्याला या नव्या गावात शिकार मिळाली होती त्यामुळे त्याची उमेद वाढली असणार. म्हणूनच आज रात्री मी बराच आशावादी होतो.


संध्याकाळभर आभाळात ढग जमत होते पण एकदा त्या बाईच्या रडण्याचा आवाज सोडला तर रात्री ८ वाजल्यापासनं सर्व काही चिडीचिप होतं.चमकणाऱ्या वीजा आणि दूरवरून येणारा ढगांचा गडगडाट मोठ्या वादळाची ग्वाही देत होते.जवळजवळ पुढचा एक तास हे वादळ घोंगावत होतं आणि चमचमणाऱ्या वीजांचा प्रकाश इतका प्रखर होता की अंगणात एखादा उंदीर जरी आला असता तरी मला दिसला असता.अगदी मी त्याला अचूक उडवूही शकलो असतो.पाऊस थांबला पण आभाळ अजूनही भरलेलंच असल्याने अगदी काही इंचापर्यंतही दिसत नव्हतं.आता मात्र जिथे कुठे पडून राहायला असेल त्या ठिकाणाहून तो बिबळ्या निघण्याची वेळ आली होती व तो येण्याची वेळ ही तो आडोशाला जिथे कुठे बसला होता त्या ठिकाणावर अवलंबून होती.


त्या बाईच्या रडण्याचा आवाजही बंद झाला होता आणि चहूकडे संपूर्ण शांतता पसरली होती.मला याच क्षणाची अपेक्षा होती कारण मला बिबळ्याच्या हालचाली कळण्यासाठी श्रवणशक्तीवर अवलंबून राहावं लागत होतं आणि याचसाठी मी कुत्र्याची साखळी वापरली होती.माझ्या अंगाखालचं गवत पूर्ण वाळलेलं होतं व अंधारात कानात तेल घालून मी ऐकत असताना कोणतं तरी जनावर माझ्या पायाजवळ आल्याचं मला ऐकायला आलं.

गवतातून काहीतरी सरपटत,अगदी दबकत येत होतं.मी यावेळी शॉर्टस घातली होती आणि माझा गुडघ्यापर्यंतचा पाय उघडा होता.याच भागाला त्या केसाळ जनावराचा मला स्पर्श झाला.


हा नरभक्षकच असणार आणि तो दबकत माझ्या गळ्यावर पकड घेण्यासाठी पुढे येत असणार.आता पाय रोवण्यासाठी डाव्या खांद्यावर थोडा दाब देणार आणि त्याचं लक्ष विचलित करण्यासाठी मी ट्रीगर दाबणार एवढ्यात एका छोट्या प्राण्याने माझे हात व छाती यांच्यामधल्या पोकळीत उडी मारली.ते एक छोटं मांजराचं पिल्लू होतं.वादळात सापडल्यानंतर प्रत्येक घराचा दरवाजा बंद आहे हे कळल्यावर ते माझ्याकडे उब आणि संरक्षणासाठी आलं होतं.


त्या पिल्लाने माझ्या कोटाच्या आत उब मिळवली आणि त्याने मला दिलेल्या क्षणिक भीतीच्या धक्क्यातून मी सावरतोय तेवढ्यात मला खालच्या शेतांमधून,खालच्या पट्टीतील गुरगुर ऐकू आली आणि तिचा आवाज हळूहळू वाढत जाऊन तिचं रुपांतर एका मोठ्या हिंस्त्र लढाईत झालं.असं युद्ध याआधी मी कधीही अनुभवलं नव्हतं. झालं होतं असं की बिबळ्याने काल जिथे भक्ष्य टाकून दिलं होतं तिथे तो आता आला होता,पण ते तिथे न मिळाल्याने फारशा चांगल्या मूडमध्ये नसतानाच त्या इलाक्याच्या मालकी हक्कावर दावा सांगणारा दुसरा बिबळ्या योगायोगाने नेमका तिथेच उपटला होता.अशा लढाया निसर्गात शक्यतो होत नाहीत.कारण शिकारी जनावरं स्वतःचा इलाका सोडून दुसऱ्याच्या राज्यात अतिक्रमण करत नाहीत. जर एकाच लिंगाची दोन जनावरं क्वचित कधी समोरासमोर आलीच तर ती एकमेकांची ताकद आजमावतात आणि जो कमी ताकदीचा आहे तो माघार घेतो.


आपला हा नरभक्षक जरी वयाने जास्त असला तरी ताकदवान होता आणि तो वावरत असलेल्या पाचशे चौ.मैल टापूत त्याला आजपर्यंत आव्हान मिळालं नसणार.पण इथे भैसवाड्यात मात्र तो आगंतुक - Tresspasser होता आणि आता हे स्वतः होऊन ओढवून घेतलेले युद्ध त्याला लढावंच लागणार होतं.तेच आता तो करत होता !


माझी ही संधी तर आता हुकल्यातच जमा होती.कारण जरी तो या लढाईत जिंकला तरी झालेल्या जखमांमुळे त्याला त्याच्या भक्ष्यामध्ये स्वारस्य उरणार नव्हतं. असंही होण्याची शक्यता होती की तो या लढाईत मारला जाईल... हा मात्र त्याच्या कारकीर्दीचा अनपेक्षित अंत ठरला असता,जेव्हा शासन आणि समस्त जनता यांचे एकत्रित प्रयत्नसुद्धा त्याला मारण्यात गेली आठ वर्षे अयशस्वी ठरले होते ! मॅनइटींग लेपर्ड ऑफ रुद्रप्रयाग मूळ लेखक - जिम कॉर्बेट, अनुवाद - विश्वास भावे


पाचसहा मिनिटं चाललेली ही पहिली 'राऊंड' संपली पण ती अनिर्णित राह्यली असावी.कारण मला अजूनही दोन्ही जनावरांचे आवाज ऐकायला येत होते.दहा-पंधरा मिनिटांच्या मध्यंतरानंतर शंभर ते चारशे यार्ड दूरवर ही लढाई परत एकदा सुरू झाली.ही फेरी छोटी होती पण तेवढीच हिंस्त्र आणि भयानक होती.बहुतेक स्थानिक इलाक्याचा मालक वरचढ ठरत असावा व तो हळूहळू आगंतुकाला 'रिंग'च्या बाहेर हाकलत नेत असावा. त्यानंतर बराच काळ शांततेत गेला.नंतर ते युद्ध डोंगराच्या कडेवर सुरू झालं आणि हळूहळू माझ्या कानांच्या टप्प्याच्याही बाहेर गेलं.अंधाराचे अजूनही पाच तास बाकी होते.पण माझी भैंसवाड्याची मोहीम फसली होती.त्याचप्रमाणे या लढाईत नरभक्षक बिबळ्याचा अंत होईल ही अपेक्षाही फोल ठरली होती.या लढाईत त्याला खूप जखमा झाल्या असणार,पण त्यामुळे त्याची नरमांसाबद्दलची हवस कमी होण्याचं काही कारण नव्हतं.मांजराचं ते पिल्लू रात्रभर शांतपणे झोपलं. जेव्हा पहाटेचा पहिला प्रकाश पूर्वेकडे दिसू लागला तसा मी अंगणात उतरलो,तो मृतदेह तिथून उचलला व जरा लांब एका छपराखाली सावलीत नेऊन ठेवला आणि त्यावर कांबळं पांघरून ठेवलं.मी दरवाजा ठोठावला तेव्हा मुखिया अजून झोपेतच होता.त्याने चहा करतो असं सांगितलं पण त्याला थोडातरी वेळ लागणार हे कळल्यामुळे मी नकार दिला आणि यापुढे नरभक्षक या गावी कधीही येणार नाही असं आश्वासन देऊन मृतदेहाची विल्हेवाट व्यवस्थित लावण्याचं वचन घेऊन मी रुद्रप्रयागच्या वाटेला लागलो.


आपण एखाद्या कामात कितीही वेळा अपयशी ठरलो तरी प्रत्येक अपयशानंतर आपल्याला नव्याने नैराश्य येतंच! मागच्या काही महिन्यात मी कित्येक वेळेला इन्स्पेक्शन बंगल्यातून,'या वेळेला तरी मला यश मिळेल' अशी आशा घेऊन बाहेर पडलो होतो आणि प्रत्येक वेळेला निराश होऊनच परतलो होतो.आणि आजही नव्याने मला निराशेने घेरलंच! माझं अपयश फक्त माझ्याशीच संबंधित असतं तर फारसं काही वाटलं नसतं,पण हा तर इतरांच्या जीवाशी खेळ चालला होता. केवळ दुर्भाग्य... मी माझ्या या सर्व अपयशाला खरोखर दुसरं काही कारणच देऊ शकत नव्हतो... हे दुर्भाग्य सातत्याने माझा पाठपुरावा करत होतं आणि त्याचा एकत्रित परिणाम म्हणजे आता मला वाटायला लागलं होतं की जे काम मी अंगावर घेतलंय ते माझ्याकडून व्हावं ही नियतीची इच्छा नसावी.आसपास कुठेही झाड नसलेल्या ठिकाणीच बिबळ्याने त्या मुलाला टाकावं, त्या स्थानिक बिबळ्याला फिरायला तीस चौ.मैल इतका प्रदेश उपलब्ध असताना बरोबर नरभक्षक ज्या ठिकाणी भक्ष्य शोधायला आला होता त्याच ठिकाणी तो तडमडावा ? याला दुर्दैवाशिवाय दुसरं काय म्हणणार ?


अठरा मैलांचं ते अंतर काल फार वाटलं होतं.पण आज ते जास्तच लांब वाटत होतं आणि डोंगरही जरा जास्तच उंच वाटत होते.वाटेत लागणाऱ्या प्रत्येक गावात लोक माझी वाट पाहत होते पण त्यांना सांगण्यासाठी माझ्याकडे काय होतं तर वाईट बातमी ! पण त्यांची अढळ श्रद्धा होती की या जगात कोणीही 'ठरवून दिलेल्या' वेळच्या आधी मरू शकत नाही. अशा श्रद्धा एखाद्या महाकाय पर्वतालाही हलवू शकतात !


सकाळचा संपूर्ण वेळ अशा नैराश्याला माझी सोबत करू दिल्याबद्दल मला स्वतःची लाज वाटत असतानाच मी शेवटचं गाव सोडलं.या गावात मला घटकाभर बसायला सांगून चहाही दिला गेला व आता परत एकदा ताजातवाना होऊन रुद्रप्रयागचे शेवटचे चार मैल चालायला सुरुवात केली.


 तसं अचानक माझ्या लक्षात आलं की आपण नरभक्षकाच्या ठशांवरूनच चालतो आहोत.


आपल्या मानसिक अवस्थेमुळे आपल्या निरीक्षणशक्तीवर कसा परिणाम होतो बघा!


नरभक्षकाने हीच वाट कित्येक मैल मागेच पकडली असणार,पण साध्याभोळ्या गावकऱ्यांशी जरा गप्पा मारल्यावर आणि त्यांनी दिलेला चहा घेतल्यानंतर जेव्हा मी नैराश्याच्या गर्तेतून बाहेर आलो तेव्हा आता प्रथमच मी हे ठसे बघत होतो.आदल्या रात्रीच्या पावसामुळे इथली लाल माती मऊ झाली होती आणि त्यावर ते माग स्पष्ट दिसत होते.त्यावरून समजत होतं की तो बिबळ्या त्याच्या सामान्य चालीने इथून गेला होता.अर्धा मैल पुढे गेल्यावर त्याने वेग वाढवला होता आणि याच वेगात तो गुलाबराईच्या जवळच्या घळीच्या तोंडाशी गेला होता. नंतर मात्र तो त्या घळीतून निघून गेला होता.


वाघ किंवा बिबळ्या जेव्हा त्यांच्या नेहमीच्या वेगाने चालत असतात तेव्हा मागचं पाऊल पुढच्या पावलावर पडतं आणि अशावेळी फक्त मागच्याच पायाच्या पंजाचे ठसे तुम्हाला पूर्ण दिसू शकतात.पण जर काही कारणामुळे त्यांनी वेग थोडा वाढवला तर मागचं पाऊल पुढच्याच्या थोडं पुढे पडतं व त्यामुळे त्याच्या चारही पावलांचे ठसे दिसू शकतात. मागच्या व पुढच्या पावलाच्या ठशांतील अंतरावरून मार्जारकुळातील जनावरांच्या चालण्याच्या वेगाचा अंदाज आपल्याला बांधता येतो.या वेळेला सकाळचा वाढत जाणारा प्रकाश हे त्याच्या वेग वाढवण्याचं कारण असणार.


मागच्या अनुभवावरून मला या नरभक्षक बिबळ्याच्या चालण्याच्या क्षमतेची कल्पना आलीच होती,पण ती फक्त सावजाच्या शोधात भटकताना ! त्या ठिकाणी मात्र इतकी मजल मारण्यामागे याहीपेक्षा सबळ कारण होतं. त्याला 'ट्रेसपासिंग' चा कायदा तोडल्याबद्दल अद्दल घडवणाऱ्या त्या बिबळ्यांपासून जास्तीत जास्त अंतर दूर जायचं होतं.ही शिक्षा किती भयंकर होती ते पुढे मला प्रत्यक्ष दिसणारच होतं….!! -