* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२१/१/२५

देव होणारा मनुष्य / Man Who Becomes God

सिझर…!!


रोमनांनी कार्थेजची राखरांगोळी करून टाकली ! पण असला हा रानवटपणा त्यांच्या हातून चुकून झाला,असे समजण्याची मुळीच गरज नाही.व्यवस्थित रीतीने व विचारपूर्वक ठरविलेली अशी ती विध्वंसक योजना होती.आंतरराष्ट्रीय खुनाची व दुसऱ्यांचे देश बळकावण्याची ती उन्मत अशी साम्राज्यशाहीची राष्ट्रीय वृत्ती होती.रोमन सेनेचा एक भाग कार्थेजचे भस्म करीत असता,दुसरा भाग कॉरिथचा विनाश करण्यात गुंतला होता,तिसरा पूर्वेकडील देशांत रक्तपात करून साम्राज्यविस्तार करण्यात दंग होता व उरलेले सारे सैन्य उत्तरेकडे व पश्चिमेकडे रोमन सत्ता पसरविण्यात गुंतले होते.अशा रीतीने चोहो बाजूंनी साम्राज्याचा विस्तार होत असता खुद्द रोममध्ये काय आलले होते? राज्यसत्ता बळकावण्यासाठी तिथे सारखी भांडणे सुरू होती.रोज रोज कटकटी व काटाकाटी,रोज रोज दंगे व बंडे! जवळजवळ शंभर वर्षे पराक्रमी;पण हडेलहप्पी गुंडांनी रोमवर सत्ता चालविली.

मॅरियस,सल्ला,पॉप,सीझर, कॅशियस,ॲन्टोनी,ऑगस्टस,अशी ही नावे चमकताना आढळतात.प्रत्येक जण जनमताने श्रेष्ठ स्थानावर चढला.पण केवळ जनमताने मात्र श्रेष्ठ नव्हे;हुंदके, दगड,खंजीर यांच्या साह्याने त्यांची मते मिळवून ते सर्वश्रेष्ठ अधिकारी बनले. 


रोममधील प्रत्येक निवडणूक म्हणजे लढाईच असे. ज्याच्यामागे अधिक गुंड व पुंड,ज्यांच्या पाठीमागे अधिक मानकापू व गळेकापू,

तोच निवडणूक जिंकी, जो तो स्वतःसाठी,रिपब्लिकसाठी कोणीही नाही,असेच त्या दिवशी दिसे.मॅरियसपासून ऑगस्टपर्यंत सर्वांच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षांमुळे रोम शहर अखंड यादवीने त्रस्त झाले होते.सभ्य इतिहासकारांनी या प्रकारांना यादवी युद्धे हे नाव दिले असले,तरी खऱ्या अर्थाने ते रानटी खाटिकखान्याचेच प्रकार होते.अधूनमधून एकदा प्रामाणिक पुरुष जन्मला येई;

त्याला स्वतःपेक्षा रोमचे कल्याण अधिक महत्त्वाचे वाटे, स्वतःच्या फायद्यापेक्षा रिपब्लिकची चिंता अधिक असे. पण धंदेवाईक मुत्सद्दी व राजकारणी लोक अशा प्रामाणिक पुरुषाचा केव्हाच चेंदामेंदा करून टाकीत, त्याला केव्हाच उडवून देत ! टायबेरियस ग्रॅच्चसने जेव्हा गरिबांपासून बळकावलेल्या जमिनींची फेरवाटणी करण्याचा प्रयत्न केला.तेव्हा सीनेट हाऊसमध्येच त्याचा मुडदा पाडला गेला.त्याच्या डोक्यावर सोटे बसले व तो मेला.त्याचा भाऊ गायस ग्रॅच्चस तसलेच जनहिताचे कायदे करू लागताच त्याचीही तीच गत झाली.प्रामाणिक माणसांना राहण्याला रोम ही सुरक्षित जागा राहिली नव्हती.


दोघाही ग्रॅच्चस-बंधूंना अशा प्रकारे दूर करण्यात आले! त्यानंतर मॅरियस व सुल्ला या दोघांमध्ये रोमच्या नेतृत्वाविषयी स्पर्धा सुरू झाली.सुल्ला हा मॅरियसच्या सैन्यात लेफ्टनंट होता;पण आपण आपल्या सेनापतीपेक्षा अधिक पराक्रमी शिपाई व अधिक योग्यतेचे गृहस्थ आहोत,असे त्याला वाटे.तो बड्या घराण्यात जन्मलेला पॅट्रिशियन होता;मॅरियस गरीब वर्गातला अर्थात प्लिबियन होता.त्यांच्या भांडणाची साद्यंत हकिकत सांगत बसण्यात फारसा अर्थ नाही.त्यांचे परिणाम काय झाले,तेवढे पाहिले म्हणजे झाले.प्रथम मॅरियसच्या हाती सत्ता असता त्याने सुल्लाच्या बऱ्याच अनुयायांना ठार केले; पुढे सुल्लाच्या हाती सत्ता येताच त्याने मॅरियसचे पाच हजार मित्र यमसदनास पाठविले.


प्रत्येकाला वाटले, "जितं मया!" पण रोमला मात्र दोन पराभव सोसावे लागले.त्या दोघांचे आलटून पालटून विजय,पण मधल्यामध्ये रोमचे मात्र मरण! मॅरियस व सुल्ला यांच्यातील ही मारामारी पराकोटीला पोचली असता रोममध्ये तिच्याकडे लक्ष लावून पाहणारे तिघे तरुण होते.या यादवीत पुढे काय होते,इकडे त्यांचे डोळे सारखे लागलेले होते.रोमच्या नेतृत्वाखाली लढत असलेले ते दोघे जुने कसलेले वीर पाहून या तिघा तरुणाच्याही मनात महत्त्वाकांक्षा जागृत झाली व पुढे-मागे रोम आपल्या हाती यावे;आपणच रोमचे सर्वसत्ताधीश व्हावे म्हणून ते प्राणांचा जुगार खेळू लागले.त्या तीन तरुणांची नावे ऐका क्रॅशस,पॉप,सीझर.


सुल्लाने ठार मारलेल्या लोकांच्या लिलावात निघालेल्या इस्टेटी विकत घेऊन क्रॅशस अत्यंत श्रीमंत झाला.पॉपे सुल्लाच्या सैन्यात दाखल झाला व त्याच्या मरणोत्तर तो त्याच्या सेनेचा अधिपती झाला.त्याने रोमविरुद्ध पुन्हा बंड करून उठणारे स्पेनमधले व आफ्रिकेतील प्रांत पुन्हा जिंकून घेतले.तद्वतच पूर्वेकडीलही आर्मीनिया, सीरिया,कॅप्पाडोसिया,पॅलेस्टाईन,पॉन्टस,अरेबिया, फोनिशिया,पॅफ्लागोनिया,इत्यादी कितीतरी प्रदेश पादाक्रांत केले,लुटले,बेचिराख केले!परत येताना पॉपेने चार कोटी डॉलर संपत्ती लूट म्हणून बरोबर आणली होती."पैशाला कधीही घाण नसते"अशी रोमन लोकांत प्रचलित असलेली एक विशिष्ट म्हण आहे.पैसा कसाही मिळविला तरी तो पवित्रच ! पैसा कसा मिळविला ही गोष्ट महत्त्वाची नसून किती मिळविला,ही गोष्ट महत्त्वाची आहे.


 रोमन लोक क्रॅशस व पॉपे यांची पूजा करू लागले. रोमचे सर्वांत थोर दोन सुपुत्र अशी त्यांची ख्याती झाली. क्रॅशस व पॉपे.

परस्परांचा द्वेष करीत.शहराची सर्व भक्ती व प्रीती फक्त आपणासच मिळावी यासाठी ते हातघाईवर आले.त्यांची उघड लढाई होणार असे दिसू लागले.पण सीझरने मध्यस्थी केली व त्यांचे भांडण तात्पुरते थांबले.सीझरच्याही मनात स्वार्थी महत्त्वाकांक्षा होत्याच व त्यांच्या पूर्ततेसाठी कॅशसची संपत्ती व पाँपेचे वजन दोहोंचीही त्याला जरुरी होती.म्हणून त्या दोघांनी परस्परांशी न लढता एकत्र यावे,असे त्याने सुचविले. 


'जगाला लुटण्यासाठी आपण तिघे मिळून करार करू या,'असे त्याने सुचविल्यावरून 'पहिले त्रिकूट' या नावाने इतिहासात प्रसिद्ध पावलेला जगातील पहिला त्रिमूर्तीचा संघ स्थापन झाला.


या तिघांत सीझर वयाने सर्वांत लहान.पण सर्वांत समर्थ व साहसी होता.लहानपणी त्याला चाचेगिरी करणाऱ्या लुटांरूनी पळवून नेले असता तो मोठमोठ्याने कविता म्हणून त्या चोरांना त्रास देई व थट्टेने म्हणे,कोणीतरी खंडणी भरून मला सोडवील.पण मुक्त होताच मी सैन्य घेऊन परत येईन व तुम्हा सर्वांना क्रॉसवर चढवीन." त्याने हा शब्द पाळला.तो मागेपुढे पाहणारा नव्हता, तेजस्वी व साहसी होता.त्याचे देशबांधव त्याच्या कर्तृत्वाने चकित व भयभीत झाले.या वेळी तो फक्त वीस वर्षांचा होता;पण मुख्य धर्माचार्याच्या जागेवर त्याने सक्तीने स्वतःची निवड करून घेतली,तेव्हा त्याच्या हेतूंविषयी प्रसिद्ध वक्ता सिसरो याला व इतर पुष्कळांना शंका आली.राजसत्ता हाती घेण्याचा त्याच विचार असावा,असे त्यांना वाटले. सिसरो लिहितो, "त्याचे केस अत्यंत व्यवस्थित रीतीने विंचरलेले असतात.एका बोटाने तो नेहमी आपले केस नीट करीत असतो.असल्या माणसाच्या डोक्यात रोमन सरकार उलथून टाकण्याचा विचार येईल अशी कल्पानाही मी करू शकत नसे." पण सीझरच्या मनातील विचार आपणास नीट वाचता आले नाहीत असे पुढे सिसरोला आढळून आले..सीझर केवळ राजकीय महत्त्वाकांक्षा व राजसत्ता यांचाच नव्हे;तर प्रेमाचाही आचार्य होता.रोममधील कितीतरी तरुणींना त्याने मोह पाडला होता;आणि ही गोष्ट सर्वांना माहीत होती.त्याला 'प्रत्येक स्त्रीचा नवरा' अशी पदवी मिळाली होती! पण त्याने स्वतःच्या पत्नीचा मात्र त्याग केला होता.कारण,त्याच्याच एका मित्राने तिच्याजवळ प्रेमयाचना करण्याचा लाळघोटेपणा चालविला होता.आपली पत्नी आपल्या मित्राच्या प्रेमयाचनेला बळी पडली,असे समजावयाला त्याला काहीही कारण मिळाले नव्हते;तरीही त्याने तिचा त्याग केला.कारण,'सीझरची पत्नी संशयातीतच असली पाहिजे'असे तो म्हणे.कारकिर्दीच्या प्रारंभी त्याच्याजवळ पैसा नव्हता;पण दुसऱ्यांचे पैसे घेऊन तो खूप उदारपणा दाखवी.एकदा त्याला चाळीस-पन्नास लाख रूपये कर्ज झाले.क्रॅशसशी संधान बांधण्यात हे कर्ज फेडून टाकण्याला त्यांचे पैसे मिळावेत असा सीझरचा हेतू होता.


सीझर,पाँपे व क्रॅशस यांनी आपापल्या वर्चस्वाची तीन क्षेत्रे मुक्रर केली.एखाद्या खुसखुशीत भाकरीप्रमाणे त्यांनी जगाचे तीन तुकडे केले व सर्व जग आपसांत विभागून घेतले.सीझरने स्पेनचा कब्जा घेतला, क्रॅशसला आशियात पाठविण्यात आले,पाँपे रोममध्येच राहिला.पुढे लवकरच एका लढाईत कॅशस ठार झाला, तेव्हा एक ब्याद आपोआपच दूर झाली म्हणून सीझर व पाँपे यांना आनंद झाला.कारण,आता रोमवरील प्रभुत्वासाठी उघडपणे नीट लढता आले असते;तिसरा कोणी मध्ये पडण्याला उरला नव्हता.पण सीझरसमोर दुसरी एक अधिक मनोवेधक योजना सध्या होती.


अलेक्झांडरप्रमाणे त्यालाही जग जिंकण्याची महत्त्वाकांक्षा होतीच.आपल्या हयातीत माणसाला जगाचा किती भाग जिंकून घेता येतो हे पाहण्याचे त्याने ठरविले;व पाँपेशी अधिकच आत्मीयता जोडली.त्याने आपली जुलिया नामक मुलगी पाँपला दिली.आपण दिग्विजयावर असताना पाँपेने इकडे कपट कारस्थाने करून रोमचा कब्जा घेऊ नये,म्हणून त्याने ही योजना केली व नवीन अज्ञात प्रदेश जिंकण्यासाठी तो निघाला. तो स्पेनमधून फ्रान्समध्ये उतरला.फ्रान्सचे तेव्हाचे नाव गॉल होते.तिथे मोठमोठे विजय व खूप लूट मिळवून तो खाडी ओलांडून ब्रिटनमध्ये गेला.

पुष्कळांना ब्रिटन एक काल्पनिक देश वाटत असे.त्याचे शिपाई म्हणाले, "या खाडीपलीकडे देश नसेल;तेव्हा आम्हाला कोठेतरी अंधारात नेत आहात.तुम्ही आम्हास पृथ्वीच्या कडेला न्याल व तिथे अथांग खड्यात पडून आम्ही गडप होऊ." पण असल्या भ्याड व भोळसट कल्पनांमुळे न गांगरता त्यांकडे दुर्लक्ष करून तो निघाला व त्यांना खराखुरा देश दिसला.तिथेही पुन्हा नवीन विजय व नवीन लूट मिळेल असे मग सर्वांस वाटले.पण ब्रिटनवरील ही स्वारी निराशाजनक ठरली.प्ल्युटार्क लिहितो,'तिथे सीझरने ज्या अनेक लढाया केल्या,त्यामुळे शत्रूचे जरी पुष्कळ नुकसान झाले.तरी सीझरचाही फारसा फायदा झाला नाही.ब्रिटनमधील लोक अत्यंत दरिद्री होते.लुटून नेण्यासारखे त्यांच्याजवळ काहीही नव्हते.


सीझर परत गॉलमध्ये आला.फ्रान्सच त्याच्या लुटारू वृत्तीला व बुद्धीला अधिक योग्य होता.तो दहा वर्षे आसपास लूटमार करीत राहिला,हेल्वेटियन,बेल्जियन, जर्मन,ॲक्विटेनियन वगैरे लोकांना जिंकून त्याने यथेच्छ लुटले ! तो कुबेर बनला.त्याने आपले वैभव व आपली कीर्ती वाढविली.'सीझरच्या गॅलिक लढाया' हे पुस्तक बायबलखालोखाल शाळांमध्ये वाचले जाते;पण त्यांत सीझरने केलेल्या लुटालुटीच्या,वाटमाऱ्यांच्या व खुनांच्या रद्दी व रानवट गोष्टींशिवाय दुसरे काय आहे? असले भिकार व विषारी वाड् मय मुलांच्या हाती पडणे अयोग्य नव्हे काय ? असल्या रानवट प्रचारापासून आपण आपल्या मुलांचे रक्षण केले पाहिजे.अजूनही तसे करण्याची वेळ नाही का आली?


प्ल्युटार्कने एकाच वाक्यात फ्रान्समधील विजयांचे वर्णन केले आहे.तो लिहितो,दहा वर्षांहूनही कमी काळात त्याने आठशे शहरे जिंकली व तीनशे लहान लहान राज्यांना शरण यावयास लावले.या दहा वर्षांत तो ज्या ज्या लोकांशी लढला,त्या सर्वांची संख्या तीस लाख धरली,तर त्यांपैकी दहा लाख त्याने ठार मारले व आणखी दहा लाख कैद केले!"


याप्रमाणे इकडे सीझर गॉल लोकांच्या धुव्वा उडवीत असता,त्यांना पायाखाली चिरडून टाकीत असता, रोममधील त्याचे महत्त्व कमी व्हावे म्हणून पॉपे खटपट करीत होता.त्याच्या कृत्रिम मैत्रीतील शेवटचा दुवा तुटला;पाँपेची पत्नी (सीझरकी मुलगी जुलिया) बाळंतपणात मरण पावली.त्या दोघांत उघड वैर पेटले. आपणाली सर्वाधिकारी केले जावे,यासाठी पाँपे कारस्थाने करू लागला.

सीझरच्या कानी ही वार्ता पडताच तो झपाट्याने इटलीत आला.व स्वतःच्याच रोम शहरावर त्याने आपल्या सैन्यानिशी स्वारी केली रूबिकॉन नदी ओलांडून इटलीत शिरण्यापूर्वीच्या रात्री त्याला एक दुष्ट व अपवित्र स्वप्न पडले होते.सीझर रोमवर चालून येत आहे असे ऐकताच पाँपे पळाला, इतर अधिकारी,कॉन्सल्स,सिनेटर्स,सारे पळाले! 'कर्णधाराने सोडून दिलेल्या नावेच्या प्रमाणे रोमची स्थिती होती.'सीझर दरवाज्यातून आला व रोममध्ये अराजक आहे असे जाहीर करून शांतता व सुव्यवस्था टिकविण्यासाठी त्याने स्वतःला हुकूमशहा केले.त्यानंतर त्याने शहराची तिजोरी फोडली व तिच्यातील सार्वनिक पैशाचा उपयोग केला.आपल्या देशबांधवांसमोर केलेल्या सुंदर भाषणात तो म्हणाला,


"मी हे सारे तुमच्यासाठी करीत आहे व जर कोणी मला या लोककल्याणाच्या कार्यात विरोध करील,तर त्याला मी ताबडतोब यमसदनास पाठवीन."


रोममध्ये आपले आसन स्थिर करून व तिथे काही संरक्षक शिबंदी ठेवून तो पाँपेचा पाठलाग करीत निघाला.आपल्या शत्रूचा निःपात करण्यात तो इतका अधीर झाला होता की,तो अत्यंत वेगाने निघाला.त्याचे शिपाईही या अती धावपळीला कंटाळून जरा कुरूकुरू लागले.ते आपसांत म्हणत.सीझर आम्हाला थोडासा विसावा केव्हा व कोठे देणार? जरा तरी विसावा हा देईल का? आम्हा मानवांविषयी त्याला काही सहानुभूती नसेल वाटत तर न वाटो;पण निदान ही आमची चिलखते,हे आमचे पट्टे यांवर तरी त्याने करुणा नको का करायला? सीझरच्या या अघोरी महत्त्वाकांक्षेपेक्षा वर्षांनुवर्षे ज्या लढाया अखंड चालल्या आहेत,त्या लढतालढता ही आमची चिलखते झिजून गेली,ही आमची शिरस्त्राणे निस्त्राण झाली!"


पण रोमन सैन्याची शिस्त कडवी होती.शिस्तीत वाढलेले असल्यामुळे शिपाई पुन्हा शांत झाले,तक्रारी मिटल्या व ते सीझरबरोबर ग्रीसच्या उत्तरेकडील थेसिली भागात गेले.सीझरने पाँपेच्या जीर्ण-शीर्ण-विदीर्ण सेनेला गाठून पाँपेचा मोड केला.पाँपे पळाला;गलबतात बसून तो इजिप्तमध्ये निसटून गेला.


शिल्लक भाग दुसऱ्या लेखामध्ये…

१९/१/२५

औषधांशिवाय आरोग्य / Health without drugs

आंतरिक आरोग्याची कसोटी


आंतरिक आरोग्याकडे लक्ष देताना प्रश्न येतो की त्याचं मोजमाप कसं करायचं ?


शारीरिक क्षमता मोजण्यासाठी जसं आपण चपळता,

वेग,लवचिकता,तोल सांभाळता येणे, वजन उचलता येणे असे मापदंड वापरू शकतो, तसे आंतरिक आरोग्याचे मापदंड कोणते ?


यामध्ये काही महत्त्वाचे मापदंड हे मोजता येण्यासारखे आहेत.इतर काही मोजायला अवघड पण अनुभवाने नक्की सांगता येण्यासारखे आहेत - दिवसभर उत्साही वाटणे,शांत झोप लागणे, चिडचिड कमी होणे इत्यादि.


आता मोजता येण्यासारखे जे सर्वमान्य मापदंड आहेत ते बघू. [३] हे १८ वर्षांवरील सर्वांना लागू आहेत.


१. पोटाचा घेर :


पुरुषांसाठी हा ४० इंचापेक्षा कमी,आणि स्त्रियांमध्ये ३५ इंचापेक्षा कमी असावा.हा घेर नाभीपाशी (बेंबीपाशी) मोजायचा आहे आणि ते करताना श्वास ओढून पोट आत घ्यायचं नाही!(आणि मुद्दाम फुगवायचंही नाही.)

शिवाय,पोटाचा घेर म्हणजे पँट साईझ नाही.बेंबीपाशी मोजलेला घेर घ्यायचा.


तुम्हाला लक्षात येईल की लहान चणीच्या,कमी उंचीच्या माणसांमध्ये धोकादायक पातळीचा लठ्ठपणा असेल तरी पोटाचा घेर ४० इंचाच्या आत असू शकतो.त्यामुळे उंची हा घटक लक्षात घेतला पाहिजे. उदाहरणार्थ, सहा फूट उंचीच्या आणि पाच फूट उंचीच्या अशा दोन व्यक्तीसाठी हा मापदंड थोडासा वेगळा असला पाहिजे.


म्हणूनच,हा मापदंड जास्त चांगल्या पद्धतीने असा सांगता येतो,की पोटाचा घेर हा उंचीच्या निम्मा किंवा त्याहून कमी असावा.(स्त्रिया आणि पुरुष दोघांसाठीही.)


उदाहरण म्हणून,जर कोणाची उंची ५ फूट ४ इंच असेल म्हणजे ६४ इंच असेल तर त्यांच्या पोटाचा घेर ६४ चा निम्मा म्हणजे ३२ इंच (किंवा त्यापेक्षा कमी) असावा.कोणी ५ फूट ८ इंच उंच असेल म्हणजे ६८ इंच उंच असेल तर पोटाचा घेर जास्तीत जास्त ३४ इंच असावा.


पोटाचा घेर हा आपल्या धडातला लठ्ठपणा (Cen- tral Obesity) दाखवतो.आपलं शरीर चरबी साठवताना दोन वेगवेगळ्या प्रकारे साठवतं. त्वचेखालील चरबी (Subcuta- neous Fat) आणि पोटाच्या आसपास,महत्त्वाच्या अंतर्गत अवयवांच्या आजूबाजूला साठवलेली चरबी (Visceral Fat).एका मर्यादेपलीकडे ही दुसऱ्या प्रकारची चरबी धोकादायक असते.ह्या चरबीचं घरच्या घरी करता येणारं सोपं मोजमाप म्हणजे पोटाचा घेर.


२. रक्तदाब :


साधारण स्थितीत मोजलेला रक्तदाब हा १३०/८५ पेक्षा कमी असावा.रक्तवाहिन्यांमधून वाहत असताना वाहिन्यांवर जो रक्ताचा दाब पडतो, तो म्हणजे रक्तदाब.हे दोन आकड्यांनी दर्शवलं जातं.


सिस्टॉलिक म्हणजे जेव्हा हृदयाचा ठोका पडतो आणि हृदय पंपाप्रमाणे शरीराकडे रक्त पाठवतं, तेव्हाचा रक्तदाब हा रक्तदाब १३० च्या खाली असावा.डायस्टॉलिक,म्हणजे हृदयाच्या दोन ठोक्यांच्या मधल्या काळात असलेला रक्तदाब,जो ८५ च्या खाली असावा.


१३०/८५ च्या वर रक्तदाब असेल तर उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. (Hypertension) असं मानलं जातं.यातून आपल्याला काही शक्यता दिसतात उदा.हृदयावर ताण येतो आहे,

रक्तवाहिन्या काही अंशी आकुंचन पावल्या आहेत,रक्ताचा पातळपणा (Viscosity) योग्य नाही,इत्यादि. म्हणून रक्तदाब मोजणं महत्त्वाचं आहे.


जर रक्तदाब १००/७० पेक्षा कमी असेल, तर कमी रक्तदाबाचा त्रास आहे. (Hypotension) असं साधारणतः मानलं जातं.


३. रक्तातील साखर (ग्लुकोज) आणि इन्सुलिन :


तिसरा मापदंड म्हणजे ३ मापदंडांचा गट आहे. ते असे


ⅰ) उपाशीपोटी रक्तातील साखरेची (ग्लुकोज) पातळी १०० पेक्षा कमी असावी. [२४, २५, २६, २७]


ii) उपाशीपोटी रक्तातील इन्सुलिनची पातळी ६ पेक्षा कमी असावी.


iii) HbA1C हे ५.६ किंवा त्याहून कमी असावं.


मुळात आपल्याला बहुतेक कुठेच इन्सुलिनची पातळी मोजायचा सल्ला मिळत नाही.ह्यात भर म्हणजे,

रक्तचाचणीच्या अहवालात इन्सुलिन हे २४.९ इतक्या पातळीपर्यंत असलं तरी चालेल अशी मर्यादा दिलेली असते.वास्तविक,६ ही पातळी योग्य आहे आणि त्यामागच्या शास्त्रीय कारणांवर मी वेगळा लेख लिहिलेला आहे. [४१] अडचण अशी आहे की इन्सुलिनच्या अमुकपातळीला शरीरात काय होत असतं हे विश्लेषण रक्तचाचणी अहवालात नसतं.जे आपण या पुस्तकात पुढे बघणार आहोत.त्यामुळे रक्त चाचणी अहवालात दिलेली मर्यादा बघून गाफील न राहता ६ ही योग्य पातळी आहे हे लक्षात घेतलं पाहिजे.


हे तीन मापदंड जर योग्य असतील तर तुम्हाला मधुमेह नाही असं म्हणता येतं.तुमच्या लक्षात येईल की फक्त साखरेच्या पातळीवरून मधुमेह,न ठरवता,त्यात इन्सुलिनची पातळीही जर लक्षात घेतली,तर अधिक परिणामकारक निदान करता येतं.पुढे आणखी खोलात आपण याचं महत्त्व बघणार आहोत.इन्सुलिन एक महत्त्वाचं संप्रेरक (Hormone) आहे, जे शरीरभर अनेक कामं करतं.त्यातलंच एक काम म्हणजे रक्तातील अतिरिक्त साखर आपल्या विविध पेशींपर्यंत पोचवणं.ह्याने रक्तातील साखरेची पातळी मर्यादित राहते.

साखरेबरोबर इन्सुलिनची पातळीही मोजल्याने हे काम करताना किती इन्सुलिनची गरज भासते आहे हे कळतं,ज्याने अधिक चांगल्या पद्धतीने तपासणी आणि रोगनिदान करता येतं.


४. रक्तातील स्निग्ध पदार्थ : वाक्य १ः


चौथा मापदंड हा देखील ३ मापदंडांचा गट आहे. ते असे


i) HDL ज्याला आपण रूढार्थाने "चांगलं कोलेस्टेरॉल" म्हणतो,ते पुरुषांमध्ये ४५ पेक्षा जास्त आणि स्त्रियांमध्ये ५० पेक्षा जास्त असावं.


ii) Triglycerides (TG) जे रक्तातले एक प्रकारचे स्निग्ध पदार्थ असतात ते १५० पेक्षा कमी असावेत.


iii) TG : HDL हे गुणोत्तर (Ratio) २ पेक्षा कमी असावं.


ह्या चौथ्या मापदंडाचा जवळचा संबंध हृदयरोगाशी आहे.कोलेस्टेरॉल जास्त असल्यामुळे हृदयविकारांचा धोका वाढतो असं विधान आपण अनेकदा ऐकतो.खरं तर,

हृदयरोगाच्या चर्चेमध्ये कोलेस्टेरॉल उगाचच बदनाम झालं आहे!


कोलेस्टेरॉल हा आपल्या शरीरातला एक अत्यंत महत्त्वाचा रेणू आहे.आपल्या शरीरातल्या बहुतेक सर्व पेशींचं आवरण हे कोलेस्टेरॉलने बनलेलं असतं.शरीरातली अनेक महत्त्वाची संप्रेरकं (Hormones) बनवायला कोलेस्टेरॉल लागतं. उदा.टेस्टोस्टेरॉन.कोलेस्टेरॉल हे इतकं महत्त्वाचं आहे की आपण जर पुरेसं कोलेस्टेरॉल आहारातून घेतलं नाही,तर आपलं यकृत (Liver) शरीरात ते बनवू शकतं आणि त्याची उणीव भरून काढली जाते.✓


हृदयरोगासाठी कोलेस्टेरॉलला का दोषी धरलं गेलं, ते आपण पुढे पाहूच.


सध्या एवढं लक्षात ठेवूया की,TG:HDL हे गुणोत्तर हृदयविकाराच्या धोक्याचं सर्वोत्तम निदर्शक आहे. जर ते २ पेक्षा जास्त असेल,तर ते खाली आणणे ही प्राधान्याने करण्याची गोष्ट होऊन जाते.पुढे आपण ते खाली कसं आणायचं ते ही पाहणार आहोतच.


HDL हे कोलेस्टेरॉल नसून,खरं तर ते एक प्रथिन (प्रोटीन) आहे. HDL = High-Density Lipoprotein.तसंच LDL = Low-Density Lipoprotein.


कोलेस्टेरोल हा स्निग्ध पदार्थ आहे आणि आपलं रक्त हे ५०% पाणी आहे. त्यामुळे, रक्तामधून कोलेस्टेरोल स्वतः प्रवास करू शकत नाही. त्याला प्रथिनांमधून प्रवास करावा लागतोः ही प्रथिनं म्हणजेच HDL, LDL, इत्यादि. कोलेस्टेरोल हा प्रवासी आहे आणि HDL, LDL ह्या त्याला रक्तामधून घेऊन जाणाऱ्या बसगाड्या आहेत.


HDL ला "चांगलं कोलेस्टेरॉल" आणि LDL ला "वाईट कोलेस्टेरॉल" हे शब्द रूढ झाले आहेत.ते तितकेसे बरोबर नाहीत,हे तुमच्या लक्षात येऊ लागलं असेल.हृदयरोगाच्या कारणांची चर्चा करताना याबद्दल अजून गमती बघूयात.


आंतरिक आरोग्याचे ४ मापदंड आपण पाहिले. त्यामागची कारणं खोलात जाऊन बघितली पाहिजेत. त्यासाठी आधी आपल्या शरीरातल्या काही मूलभूत प्रक्रिया,संप्रेरकांचं काम थोडंसं समजावून घेऊया.


१७.०१.२५ या लेखातील दुसरा शेवटचा भाग..।

१७/१/२५

औषधांशिवाय आरोग्य / Health without drugs

एक रुग्ण त्याच्या डॉक्टरांना लिहिलेल्या खुल्या पत्रात म्हणतो,करुणा म्हणजे फक्त हातात हात धरणे नाही.ते एक चांगले औषध आहे.याची आठवण करून देणारे हे पुस्तक आहे.लेखकांचे व प्रकाशकांचे आभार व धन्यवाद…


काही शब्द रोजच्या वापराने इतके गुळगुळीत झालेले असतात की पुन्हा नव्याने त्यांच्याकडे बघावं लागतं.आरोग्य हाही त्यातलाच एक.


आपल्या शारीरिक स्वास्थ्याचे दोन भाग आहेत : शारीरिक क्षमता ("Physical Fitness") आणि आंतरिक आरोग्य ("Health") हे दोन्हीही अत्यंत महत्त्वाचे आहेत,दोन्हींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे तरच परिपूर्ण स्वास्थ्य आपल्याला मिळेल.


शारीरिक क्षमता :

दूरवर चालणं-धावणं,वजन उचलणं,मैदानी खेळ, योगासनं करू शकणं,टेकडी चढणं ह्यांसारख्या गोष्टी शारीरिक क्षमतेमध्ये येतात.हे सहजपणे करणाऱ्या व्यक्तीला आपण  ते फिट आहेत असं म्हणतो.व्याख्या करायची झाली तर शारीरिक क्षमता म्हणजे आपले अवयव,स्नायू वापरून शरीराबाहेरच्या आव्हानाला तोंड देऊ शकणे.साधारणतः शारीरिक क्षमता ही डोळ्यासमोर सहजपणे दिसू शकते.अनेकदा अशा 'फिट' व्यक्तींमध्ये त्यांच्या-त्यांच्या क्षमतेप्रमाणे बळकट स्नायू,चपळता,दमश्वास टिकवता येणे,शारीरिक कौशल्य दिसून येतं.


आंतरिक आरोग्य :


शरीराच्या आतल्या सगळ्या यंत्रणा योग्य पद्धतीने काम करत असल्या तर आंतरिक आरोग्य चांगलं आहे असं म्हणता येईल.मेंदू व्यवस्थित विचार करू शकतो आहे, हृदय रक्ताभिसरण करतंय,

मूत्रपिंडं रक्तशुध्दी करतायत, पंचेंद्रियं आपापलं काम नीट करत आहेत असं सगळं असेल तर चांगलं आरोग्य आहे.शिवाय ह्यात पचनसंस्था योग्य पद्धतीने काम करते आहे,हे ही आलंच.


ही पचनसंस्था आपल्याला अन्नामधून दोन गोष्टी मिळवून देतेःऊर्जा आणि कच्चा माल.आपल्याला रोजच्या जगण्यात प्रत्येक क्षणी ऊर्जेची गरज असते. याखेरीज शरीरात अनेक प्रकारच्या पेशी-अवयवांची दुरुस्ती करावी लागत असते ज्यासाठी लागणारा कच्चा माल अन्नातून येतो.आपल्या शरीरात काही लाख कोटी पेशी असतात.त्यातल्या कुठल्या ना कुठल्या लाखो पेशी दररोज मरत असतात,तितक्याच पुन्हा बनवाव्या लागतात.हाडे,स्नायू यांची झीज भरून काढावी लागते. यासाठी ऊर्जा आणि कच्चा माल लागतो.आत आलेल्या अन्नाचं योग्य प्रकारे ऊर्जा आणि कच्च्या मालात रूपांतर होणं,आणि शरीरातल्या सर्व प्रक्रिया योग्य पद्धतीने चालू राहणं ही उत्तम आंतरिक आरोग्याची दोन प्रमुख लक्षणं आहेत.


आपण अनेकदा 'Metabolism' हा शब्द वापरतो. कोणाचं "Metabolism Slow" आहे म्हणून पटकन वजन वाढतं,कोणाचं "Fast" आहे म्हणून कितीही खाल्लं तरी वजन वाढायची चिंता नसते,असं आपण ऐकतो-बोलतो.यात Me- tabolism Slow असणं म्हणजे आपल्या शरीराचा Basal Metabolic Rate (BMR) हा कमी असणं.Fast असणं म्हणजे BMR जास्त असणं.


BMR हा अनेक गोष्टींवर अवलंबून असतो :


(१) साठवलेली चरबी सोडून उरलेलं वजन (ज्याला Lean Mass असं म्हणतात) (२) वजन, (३) वय आणि लिंग, (४) वाढीचं वय, (५) सध्या असलेला आजार, (६) आजूबाजूच्या हवेचं तापमान, (७) त्या व्यक्तीची अनुवांशिकता (Genetics).


Metabolism हे खरं तर एक फार लांब-रुंद, ढोबळ नाव आहे. शरीर चालवण्यासाठी जे जे करावं लागतं ते सगळंच Metabolism मध्ये येतं. दोन प्रकारच्या प्रक्रिया Metabo- lism मध्ये असतात.


१. Catabolism : शरीरात जे काही विघटन चालू

असतं ते ह्या प्रकारात मोडतं.उदा.अन्नाचं विघटन होऊन कच्चा माल तयार होणं.


२. Anabolism : शरीराला जे काही नवीन बनवावं

लागतं किंवा दुरुस्त करावं लागतं त्या प्रक्रिया यात येतात. उदा. नवीन पेशी बनवणे, पेशींची वाढ होणे, नवीन स्नायू बनवणे, हाडांची झीज भरून काढणे, इ.


शारीरिक क्षमता (Fitness) आणि आंतरिक आरोग्य (Health) या दोघांचंही महत्त्व एकमेकांशी जोडलेलं,पण तरीही वेगळं आहे.या दोन्ही गोष्टींवर लक्ष दिल्यानेच पूर्ण स्वास्थ्य अनुभवायला मिळू शकतं.


आपण वर बघितल्याप्रमाणे अन्नपचन,शरीरातल्या बाकी प्रक्रिया (ज्यात चरबी साठवणे / वापरणे हेही आलं.) ह्या सर्व आंतरिक आरोग्यामध्ये येतात.शारीरिक क्षमतेवर केलेल्या कामाने ह्या सर्वांना मदत जरूर होते,पण ह्याबद्दलचा एक मुद्दा स्पष्ट करणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी दोन उपमा बघूयाः


आपल्याकडे स्कूटर,कार असं जे वाहन असतं ते त्याच्या-त्याच्या आंतरिक रचनेप्रमाणे इंधनाची,तेलाची मागणी करतं.त्यात टाकलं जाणारं इंधन हे कुठलंही असून चालत नाही पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनात डिझेल टाकलं तर वाहन बिघडतं.म्हणजेच हे इंधन, आणि वंगणासाठी तेल हे वाहनाच्या आंतरिक आरोग्याशी संबंधित आहे.


आता जर कोणी म्हणाला की,आज मी माझ्या वाहनात पेट्रोल ऐवजी डिझेल टाकतो.आणि रोजच्या १० किलोमीटर ऐवजी २० किलोमीटर चालवतो.म्हणजे मग चुकीच्या इंधनामुळे निर्माण झालेली उणीव भरून निघेल." तर आपण त्याला वेड्यात काढू !


त्या वाहनासारखंच आपल्या शरीराचंही आहे.माझ्या आंतरिक प्रक्रियांसाठी अयोग्य इंधन (अन्न) मी खाईन पण आज दुप्पट व्यायाम करीन,जास्त अंतर चालीन आणि सर्व काही ठीक होईल ही आपली गैरसमजूत आहे !


शारीरिक क्षमतेवर नेहेमीपेक्षा जास्त काम करून आपण आंतरिकप्रक्रियांमधली उणीव भरून काढू शकतो असं आपल्याला सांगण्यात आलंय,पण ते खरं नाही.


 चार आग्रहाचे गुलाबजाम जास्त खा आणि नंतर मैलभर चालून ये किंवा व्यायामशाळेत जास्त घाम गाळ,म्हणजे मग काही होत नाही असं आपल्याला वाटतं.पण हे म्हणजे,जुळ्या भावांपैकी एकाची भूक भागवण्यासाठी दुसऱ्याला चार घास जास्त देण्यासारखं आहे !


आपल्या परिपूर्ण आरोग्याचे दोन भाग शारीरिक क्षमता आणि आंतरिक आरोग्य हे जुळ्या भावांसारखे आहेत.ते एकमेकांना मदत करू शकतात,पण त्यापैकी एकाकडे दुर्लक्ष करून चालत नाही.एवढंच नाही तर असं दुर्लक्ष केल्याची उणीव दुसऱ्याकडे जास्त लक्ष देऊन भरून काढता येत नाही !


आपण कदाचित "You cannot outrun a bad diet" असं वचन ऐकलं असेल.त्याचा अर्थ हाच आहे की अधिक शारीरिक क्षमता आंतरिक आरोग्याला थोडासा टेकू देऊ शकेल,पण त्यांची जागा घेऊ शकत नाही. Fitness cannot compensate for bad health.


शारीरिक क्षमतेचा संबंध आपल्याला रोजच्या जगण्यात शरीराबाहेर जी कामं करावी लागतात त्याच्याशी आहे. तुम्ही सहज जिने चढू शकता का ? थोडंसं धावून बस पकडू शकता का ? भाजीच्या पिशव्या,प्रवासाच्या बॅगा घेऊन निदान काही अंतर सहज चालू शकता का ? कुटुंबियांबरोबर,मित्रांबरोबर लांबवर फिरायला जाऊ शकता का? बसमध्ये विमानात बसताना आपापली बॅग वरच्या कप्प्यात ठेवू शकता का? मुलांबरोबर / नातवंडांबरोबर खेळू शकता का ? त्यांना कडेवर घेऊ शकता का ?आपलं वय जसं वाढत जाईल तसं हे सगळं करण्याची आपली इच्छा असतेच आणि ते करू शकण्याची क्षमता आपण राखली पाहिजे.त्यासाठी नियमित व्यायाम, खेळ हे गरजेचं आहे. आणि आपण आधी पाहिल्याप्रमाणे,हा विषय शारीरिक क्षमतेचा आहे.


दुसरा विषय आंतरिक आरोग्याचा


तुम्हाला जीवनशैलीचे आजार आहेत का किंवा त्याची सुरुवात झाली आहे का? वजन आणि पोटाचा घेर वाढलेला असणं,उच्च रक्तदाबासाठी औषध असणं, रक्तातील इन्सुलिनची किंवा ग्लुकोजची पातळी वाढलेली असणं,स्त्रियांमध्ये मासिक पाळी नियमित नसणं / पीसीओडी चा त्रास असणं,इ.लक्षणं चालू झाली आहेत का ? वेगळ्या शब्दातः जर तुम्हाला हे सर्व त्रास नियंत्रणात ठेवायचे असतील,उद्या त्यांचं रूपांतर गंभीर आजारात होऊ दयायचं नसेल आणि निरोगी दीर्घायुष्य जगायचं असेल तर आंतरिक आरोग्यावर काम करणं अत्यंत गरजेचं आहे.


नुसतं "मी रोज एक तास चालतो" अशी शारीरिक क्षमतेशी निगडित कारणं देऊन उपयोग नाही किंवा "मला आत्ता काही होत नाहीये" अशी वरवरची कारणं देऊनही चालणार नाही.आंतरिक आरोग्यावर स्वतंत्रपणे बारीक लक्ष दिलं पाहिजे.


आरोग्य म्हणजे नक्की काय ? आधुनिक भस्मासुर, जीवनशैलीच्या आजारांचं वास्तव आणि उपाय,मंदार गद्रे,औषधांपासून मुक्ती देणारा डॉक्टर


अनेकदा आपल्याला शारीरिकदृष्ट्या सक्षम व्यक्तींना जीवनशैलीचे आजार होताना दिसतात.आपण बोलून जातो,की "अरे, तिला कसा मधुमेह झाला? ती तर रोज चालायला जातेच,आणि योगासनंही करते." किंवा त्याला कसा उच्च रक्तदाब आणि हृदयविकार जडला? तो तर नियमित व्यायाम करतो,हिमालयात ट्रेकिंगलाही जातो.

शारीरिक क्षमता आणि आंतरिक आरोग्य हा फरक लक्षात घेतला तर आता ह्या प्रश्नांचं उत्तर मिळतं. वरून शारीरिकरीत्या सक्षम दिसणाऱ्या व्यक्तीच्याही शरीरातल्या प्रक्रिया बिघडलेल्या असू शकतात.अर्थात-उत्तम आंतरिक आरोग्य आहे म्हणून तुम्ही उद्या सहज १० किलोमीटर पळू शकाल,उत्तम वजनं उचलू शकाल,किंवा डोंगर चढू शकाल असंही नाही.त्या प्रकारच्या शारीरिक क्षमता कमवायला तुम्हाला त्यांचा सराव करावाच लागेल.म्हणजेच,Fitness & Health are different. One cannot compensate for the other हे आपल्या लक्षात येतं.


शिल्लक राहिलेला भाग पुढील लेखांमध्ये…!




१५/१/२५

अंधारातला नेम A name in the dark

भारतात लोकांच्या जेवणाच्या वेळा या ऋतू आणि व्यक्तीगत आवडीनिवडी यावर ठरतात.तरीही बऱ्याच भागात ठरलेल्या वेळा म्हणजे सकाळी ८ ते ९ न्याहारी, १ ते २ दुपारचं जेवण आणि ८ ते ९ रात्रीचं जेवण. रुद्रप्रयागमधल्या गेल्या काही महिन्यातल्या वास्तव्यात माझ्या जेवणाच्या वेळा अतिशय चमत्कारिक होत्या. सकाळचा नाश्ता दुपारी,दुपारचं जेवण रात्री किंवा दिवसभरात एकदाच दोन्ही वेळचं जेवण.पण 


" जेवणातील घटक आणि नियमितपणा यावर आरोग्य अवलंबून असतं." 


आणि ह्या समाजाला छेद देणारी गोष्ट म्हणजे या माझ्या अनियमित जेवणांमुळे माझ्यावर काहीही वाईट परिणाम झाला नाही... फक्त मी थोडासा सडसडीत मात्र राहिलो.


कालच्या ब्रेकफास्टनंतर सकाळपर्यंत मी काहीही खाल्लं नव्हतं आणि भला आजची रात्रसुद्धा बाहेर जागून काढायची असल्यामुळे मी चांगलं भरपेट खाऊन घेतलं आणि तासभर डुलकी काढून गुलाबराईला निघालो. तिथल्या पंडितला मला धोक्याची सूचना द्यायची होती की आता नरभक्षक त्याच्या गावाच्या आसपास आला आहे.पहिल्या वेळी मी रुद्रप्रयागला आलो होतो तेव्हाच माझी ह्या पंडितशी दोस्ती झाली होती आणि त्याच्याशी दोन शब्द बोलल्याशिवाय मी पुढे जायचो नाही.याची दोन कारणं होती;एक म्हणजे नरभक्षकाबद्दल आणि तिथून जाणाऱ्या-येणाऱ्या यात्रेकरूंबद्दल सांगण्यासारखे कित्येक मनोरंजक किस्से त्याच्याकडे होते आणि दुसरं म्हणजे नरभक्षकाच्या प्रत्यक्ष हल्ल्यातून बचावलेल्या दोन व्यक्तींपैकी तो एक होता.(दुसरी व्यक्ती म्हणजे हाताच्या जखमेसरशी थोडक्यात बचावलेली ती बाई) (मॅनइटींग लेपर्ड ऑफ रुद्रप्रयाग मूळ लेखक - जिम कॉर्बेट,अनुवाद - विश्वास भावे)अशीच एक गोष्ट त्याच्या माहितीतल्या आणि जवळच्याच खेड्यातल्या एका स्त्रीबद्दल होती.रुद्रप्रयाग बाजारातून घराकडे निघताना ती बाई गुलाबराई गावात जरा उशीराच पोचली.अंधार पडायच्या आत आपण आपल्या गावातपोचू शकणार नाही ह्या भीतीमुळे तिने पंडितला ती रात्र त्याच्या पिलग्रिम शेल्टरमध्ये काढू देण्याची विनंती केली.

त्यावर त्याने असं सुचवलं की यात्रेकरूंना लागणाऱ्या चीजवस्तू ठेवण्याचं त्याचं जे गुदाम होतं त्याच्या दरवाजासमोर ती झोपली तर एका बाजूने गुदामाची खोली आणि दुसऱ्या बाजूने त्या ठिकाणी झोपलेले ५० यात्रेकरू यामुळे ती सुरक्षित राहील.या झोपड्याची रस्त्याकडची बाजू उघडीच असायची,पण डोंगराकडच्या बाजूला मात्र भिंत होती. गुदामाची खोली या शेल्टर्सच्या मधोमध होती पण ती डोंगराच्या आत घुसल्याने त्याच्यापुढची जमीन सलग राह्यली होती.त्यामुळे ती बाई जेव्हा गुदामाच्या दरवाजासमोर झोपली तेव्हा तिच्या आणि रस्त्याच्या

मधोमध पन्नास यात्रेकरू होते.रात्री केव्हातरी यात्रेकरूंपैकीच एक बाई विंचू चावला म्हणून ओरडत उठली.तिथे कुठलाही दिवा नव्हता पण आगकाडीच्या प्रकाशात पाह्यलं तर त्या बाईच्या पायाला छोटा ओरखडा उठला होता.त्यातून थोडं रक्तही येत होतं.त्या बाईने छोट्या गोष्टीचा एवढा बाऊ केल्याबद्दल

कुरकूर करत आणि विंचवाच्या दंशातून तसंही रक्तबिक्त काही येत नाही.अशी काहीबाही बडबड करत सर्वजण परत झोपी गेले.

आंब्याच्या झाडाच्या वरच्या बाजूला असलेल्या आपल्या घरातून पंडित जेव्हा सकाळी तिथे आला तेव्हा त्याला त्या खेडेगावातल्या बाईची साडी शेल्टर समोरच्या रस्त्यावर पडलेली दिसली आणि त्यावर रक्त होतं.खरंतर पंडितने त्याच्या मते सर्वात सुरक्षित जागा त्या गाववाल्या बाईला दिली होती.तरीही पन्नास यात्रेकरूंच्या गर्दीतून बिबळ्याने तिलाच उचललं होतं आणि तिला तोंडात पकडून तिथून बाहेर पडताना चुकून यात्रेकरूंपैकी एकीच्या पायाला त्याचं नख लागलं होतं.पन्नास यात्रेकरूंना सोडून त्याच बाईला मारल्याबद्दल पंडितने जे स्पष्टीकरण दिलं ते असं की त्या सर्वांमध्ये तिचेच कपडे रंगीत होते. ह्या स्पष्टीकरणात तथ्य नाहीये.बिबळे वासाचा वापर करून शिकार करत नाहीत ते हे गृहीत धरूनही माझं स्पष्टीकरण असं आहे की त्या सर्व गर्दीत फक्त त्याच बाईच्या अंगाचा वास त्याला ओळखीचा वाटला असणार. आता हे फक्त तिचं दुर्दैव होतं, 'किस्मत' होती का फक्त त्या छपराखाली झोपण्यामधला धोका ओळखणारी ती एकच व्यक्ती होती आणि तिची ही भीती काहीतरी विलक्षण रीतीने बिबळ्यांपर्यंत पोचली असती व तो आकर्षित झाला असावा ?


या घटनेनंतर लगेचच पंडितची नरभक्षकाशी आमनेसामने भेट झाली.या घटनेचा अचूक दिवस काढायचा असेल तर तो रुद्रप्रयाग हॉस्पिटलच्या नोंदीमधून मिळू शकेल,पण त्याची या ठिकाणी आवश्यकता नाही.या गोष्टीच्या दृष्टीने महत्त्वाचं एकच सांगता येईल की ती उन्हाळ्याच्या दिवसात घडली.मी पंडितला भेटण्याच्या चार वर्ष आधी.. म्हणजे १९२१ मध्ये !


एकदा एका संध्याकाळी मद्रासवरून दहा यात्रेकरू तिथे आले व त्यांनी पंडितला ती रात्र त्याच्या शेल्टर्समध्ये काढू देण्याची परवानगी मागितली.गुलाबराईत आणखी एक नरबळी गेला तर त्याच्या पिलग्रिम शेल्टरचं नाव बदनाम होईल या भीतीने त्याने त्यांना तसंच पुढे दोन मैल चालत रुद्रप्रयागला जायला सांगितलं.

त्याच्या सांगण्याचा या यात्रेकरूंवर काहीही परिणाम होत नाहीये हे पाहिल्यावर मात्र त्याने त्यांना त्याच्या घरातच आश्रय दिला.मी मागे सांगितलंच आहे की हे घर यात्रामार्गावरच्या आंब्याच्या झाडापासून डोंगराच्या बाजूला पन्नास यार्डावर होतं.पंडितचं घरसुद्धा त्या भैसवाड्यातल्या घरांच्याच धर्तीवर बांधलेलं होतं, तळमजल्याच्या खोल्या सरपण व धान्य साठवण्यासाठी तर राहती घरं वरच्या मजल्यावर;अंगण,थोड्या पायऱ्या, त्यानंतर व्हरांडा आणि पायऱ्या संपताच समोरच राहात्या खोलीचं दार !


पंडित व त्याच्यावर आज लादल्या गेलेल्या दहा यात्रेकरूंचं रात्रीचं जेवण झाल्यावर त्यांनी त्या खोलीत स्वतःला बंद करून घेतलं.या खोलीत हवा आत बाहेर जायला काही वावच नव्हता आणि हवेत अतिशय उकाडा होता.उकाडा फारच असह्य झाला तसा पंडित रात्री केव्हातरी उठला आणि दरवाजा उघडून बाहेर व्हरांड्यांत आला.तिथे जिन्याच्या दोन्ही बाजूच्या खांबांना हात देऊन उभा राहतोय आणि बाहेरची ताजी हवा छातीत भरून घेतोय तेवढ्यात त्याचा गळा चिमट्यात पकडावा तसा पकडला गेला.खांबावरची हाताची पक्कड तशीच ठेवून त्याने त्याच्या पायाचे तळवे हल्लेखोराच्या छातीवर ठेवून जीव खाऊन लाथ मारली. त्यासरशी बिबळ्याची त्याच्या गळ्यावरची पक्कड सुटली आणि तो पायऱ्यांवरून खाली धडपडत गेला.


आता आपली शुद्ध हरपणार असं वाटल्याने पंडित जरा बाजूला सरकला व त्याने जिन्याच्या रेलिंगवर आधारासाठी हात ठेवले.त्याक्षणी बिबळ्याने दुसऱ्यांदा खालून झडप मारली.

पंडितच्या डाव्या दंडात त्याची नखं रूतली.रेलिंगचा आधार घेतल्याने पंडित खाली पडला नाही पण एकीकडे रेलिंगवर रोवलेले पंडितचे हात व खालून बिबळ्याचं वजन यामुळे त्याची नखं हाताला दंडापासून ओरबाडत ओरबाडत मनगटापाशी सुटली. एव्हाना पंडितचे भीतीदायक आवाज ऐकून यात्रेकरूंनी दरवाजा उघडला होता.बिबळ्याने तिसरी झडप मारण्याच्या आत त्यांनी पंडितला चटकन घरात ओढून घेतलं आणि मागे दरवाजा घट्ट लावून घेतला.रात्रभर त्या गरम उबट हवेमध्ये पंडित गळ्याला पडलेल्या भोकांमधून श्वास घेण्याचा प्रयत्न करत होता,बिबळ्या गुरगुरत दारावर नख्यांनी ओरखडे काढून दरवाजा फोडण्याचा प्रयत्न करत होता तर यात्रेकरू घाबरून किंचाळत होते ! दिवस उजाडल्यावर यात्रेकरूंनी पंडितला रुद्रप्रयागच्या काला कमलीवाला हॉस्पिटलमध्ये नेलं.तिथे गळ्यात नळ्या घालूनच त्याला अन्न द्यावं लागलं.सहा महिन्यानंतर तब्येतीची पार मोडतोड झालेल्या अवस्थेत पंडितला घरी आणलं गेलं.त्यानंतर पाच वर्षांनी त्याचे फोटो काढले गेले.त्याच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूचे व्रण आणि डाव्या हाताच्या ओरबाडल्याच्या खुणा प्रत्यक्षात स्पष्ट दिसत असल्या तरी फोटोत मात्र अस्पष्ट दिसतात.


पंडित नेहमी माझ्याशी बोलताना बिबळ्याचा उल्लेख 'सैतानी शक्ती' म्हणून करायचा व पहिल्याच दिवशी त्याने मला विचारलं होतं की त्याला आलेल्या अनुभवाचा विचार केला तर ही 'सैतानी शक्ती' एखाद्या प्राण्याचं रूप घेऊ शकत नाही याला मी काय पुरावा देऊ शकतो? त्यानंतर गंमतीने मीही त्याच्याशी बोलताना बिबळ्याचा उल्लेख 'सैतानी शक्ती' असाच करायचो.त्या संध्याकाळी गुलाबराईत आल्यावर मी पंडितला भेटलो आणि त्याला माझ्या भैंसवाड्याच्या फसलेल्या मोहिमेबद्दल सांगितलं.

आता हा सैतान गुलाबराईच्या जवळपासच वावरत असल्याने त्याने स्वतःसाठी आणि त्याच्या पिलग्रिम शेल्टर्समध्ये राहायला येणाऱ्या यात्रेकरूंसाठी जादा खबरदारी घ्यावी अशीही सूचना मी त्याला दिली.ती रात्र व त्यानंतरच्या तीन रात्री मी त्या यात्रामार्गावरच्या गंजीवर बसून रस्त्यावर लक्ष ठेवत घालवल्या.चौथ्या दिवशी इबॉटसन पौरीहून आला.इबॉटसन आला की मला नेहमी नव्याने उत्साह वाटायचा,कारण इतर स्थानिक लोकांप्रमाणे त्याचीही अशीच धारणा होती की नरभक्षक आज मारला गेला नाही तर कोणालाही दोष देण्यात अर्थ नाही,आज नाही तर उद्या तो संपणारच!माझ्याकडे त्याला सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी होत्या.मी त्याला छोट्यामोठ्या घटना पत्रातून नियमितपणे कळवायचो आणि त्यातलाच काही सारांश शासनाला द्यायच्या अहवालात तो टाकत असे.पुढे तो प्रसारमाध्यमांकडेही जात असे.पण छोटे छोटे तपशील मात्र प्रत्यक्षच सांगण्यात मजा असते आणि त्यालाही ते ऐकायची उत्सुकता होतीच.अर्थात इबॉटसनकडेही मला सांगण्यासारखं खूप काही होतं;ते जास्त करून प्रसारमाध्यमांनी जो या प्रकरणाचा गाजावाजा चालवला होता त्याबद्दल होतं.देशातल्या कानाकोपऱ्यात आवाहन करून इच्छुकांना नरभक्षकाला मारण्यासाठी बोलावलं जावं असा सर्वत्र दबाब होता.या प्रसारमाध्यमांच्या मोहिमेमुळे इबॉटसनकडे फक्त एक उत्तर व एक सूचना आली होती.उत्तर एका शिकाऱ्याकडून आलं होतं व त्याच्या म्हणण्यानुसार जर त्याच्या प्रवासाची व राहण्याजेवणाची समाधानकारक सोय झाली तर तो गढवालला येण्याचा विचार करेल.सूचना करणाऱ्याने असा सल्ला दिला होता की नरभक्षकाला मारण्याचा सर्वात सोपा व खात्रीचा उपाय म्हणजे एका बोकडाच्या अंगाला विष चोपडावं,ते विष त्यानेच चाटू नये म्हणून त्याची मुसकी आहे तसंच राहू द्यावं व नंतर त्याला बिबळ्यासाठी आमिष म्हणून बांधावं,म्हणजे मग बिबळ्या त्याला मारेल आणि विषबाधा होऊन तोही मरेल.त्या दिवशी आम्ही बराच गप्पा मारत बसलो आणि माझ्या आतापर्यंतच्या अपयशाचा संपूर्ण आढावा घेतला.जेवण करताना मी त्याला रुद्रप्रयाग-गुलाबराई रस्त्यावरून साधारण दर पाच दिवसांनी जाण्याच्या बिबळ्याच्या सवयीचा उल्लेख करत आणि त्या रस्त्यावर पुढच्या दहा रात्री बसायचा माझा इरादाही सांगितला.या दहा दिवसांमध्ये एकदा तरी तो त्या रस्त्यावरून जाणार असा माझा अंदाज होता.मी अगोदरच कित्येक रात्री जागून काढल्या होत्या आणि आता आणखी दहा रात्री काढायच्या म्हणजे माझ्यावर फारच ताण येणार होता त्यामुळे इबॉटसनने या योजनेला जरा नाखुषीनेच होकार दिला.पण मी आग्रहच धरला आणि त्याला सांगितलं की जर या काळातही मला अपयश आलं तर मात्र मी नैनितालला परत जाईन व ज्या कोणाला माझी जागा घ्यायची इच्छा असेल त्याला मी रणांगण मोकळं करून देईन.संध्याकाळी इबॉटसन माझ्यासोबत गुलाबराईला आला आणि त्याने मला त्या पिलग्रिम शेल्टर्सपासून शंभर यार्डावरच्या आंब्याच्या झाडावर मचाण बांधायला मदत केली.झाडाच्या बरोबर खाली आणि रस्त्याच्या मधोमध आम्ही मजबूत लाकडी खुंट ठोकला व एका बोकडाच्या गळ्यात घंटा बांधून त्याला या खुंटाला बांधून टाकलं.


पौर्णिमेच्या आसपासचीच रात्र होती तरीही गुलाबराईच्या पूर्वेकडच्या उंच पहाडांमुळे गंगेच्या खोऱ्यात चंद्रप्रकाश फारच कमी वेळ मिळणार होता. जर उरलेल्या अंधाऱ्या काळात बिबळ्या आला तर त्या बोकडाच्या गळ्यातल्या घंटेमुळे मला समजणार होतं.सर्व जय्यत तयारी झाल्यावर इबॉटसन परत बंगल्यावर गेला.दुसऱ्या दिवशी अगदी सकाळीच तो माझ्या दोन माणसांना पाठवून देणार होता.झाडाखालच्याच एका दगडावर बसून सिगारेट ओढत रात्र पडायची वाट बघत असतानाच पंडित आला आणि माझ्या शेजारी बसला. पंडित "भक्ती" (माळकरी) होता आणि त्यामुळे धूम्रपान करत नसे.संध्याकाळी मचाण बांधताना त्याने आम्हाला पाह्यलं होतं.आता तो मला पटवू लागला की पलंगावर आरामशीर पडून राहायचं सोडून रात्रभर कशाला जागायचं? मी त्याला सांगितलं की हीच नव्हे तर पुढच्या नऊ रात्री मी तेच करणार आहे.कारण जरी मी त्या 'सैतानी शक्ती' किंवा दुष्टात्म्याला मारू शकलो नाही तरी किमान त्याच्या घराचं आणि पिलग्रिम शेल्टर्सचं संरक्षण तरी करू शकेन.त्या रात्री एकदा एका भेकरानं डोंगरावर अलार्म कॉल दिला पण त्यानंतर रात्रभर विशेष काहीच घडलं नाही.सकाळी माझी माणसं आली तसं त्यांच्या हातात माझा रग आणि रायफल देऊन मी वाटेवर पगमार्कस दिसतायत का ते वघत बघत इन्स्पेक्शन बंगल्याकडे निघालो.पुढचे नऊ दिवस माझ्या कार्यक्रमात काहीही बदल नव्हता.संध्याकाळी लवकरच मी माझ्या दोन माणसांना घेऊन बंगल्यावरून निघायचो आणि मचाणावर जागा घेतल्यावर दोन माणसांना परत पाठवायचो.

कोणत्याही परिस्थितीत उजेड नीट पडल्याशिवाय बंगल्याबाहेर पडायचं नाही ही सक्त ताकीद मात्र त्यांना असे.सकाळी नदीपलीकडच्या डोंगरामागून सूर्य उगवत असतानाच माणसं परत येत.त्यानंतर आम्ही एकत्रच बंगल्यावर जायचो.


या दहा रात्रींमध्ये पहिल्या रात्रीचा भेकराचा अलार्म कॉल सोडला तर विशेष काहीच घडलं नाही. नरभक्षकाचा वावर मात्र आसपास होता याचे सबळ पुरावे मिळत होते.दोन रात्री त्याने घराचे दरवाजे फोडून एकदा एक बोकड आणि दुसऱ्यांदा मेंढी उचलली होती. बऱ्याच धडपडीनंतर मला ही दोन भक्ष्य मिळाली कारण त्यांना बरंच लांब ओढून नेलं गेलं होतं.पण त्या एकाच रात्री भक्ष्याचा संपूर्ण फडशा पडल्यामुळे त्याच्यावर बसण्यात काहीच अर्थ नव्हता.


शिल्लक भाग पुढील लेखामध्ये…!

१३/१/२५

३.८ मज्जासंस्था-१ / 3.8 Nervous system-1

शिवाय,मज्जातंतू हे हृदयातून न निघता ते मेंदूतून निघतात हे सांगून ॲरिस्टॉटल कसा चूक होता हेही सांगितलं.याबरोबरच हालचालींसाठी लागणारे मज्जातंतू (मोटर नर्व्हज) आणि संवेदनेसाठी लागणारे मज्जातंतू (सेन्सरी नर्व्हज) हे वेगळे असतात हेही हिरोफिलसनं दाखवून दिलं.त्यानं डोळ्यांतल्या दृष्टिपटलापासून (रेटिनापासून) निघणाऱ्या मज्जातंतूंचा

(ऑप्टिक नर्व्हज) शोध घेतला.हिरोफिलस सार्वजनिक शवविच्छेदन करे. दूरदूरहून अनेक लोक ते बघण्यासाठी येत.


नर्व्हज सिस्टिम (मज्जासंस्था)


ग्रीकांचा वारसा नंतर रोमनांनीही चालू ठेवला. हिरोफिलसनंतर जवळपास ५०० वर्षांनंतर म्हणजे इ.स. १३०-२०० च्या दरम्यान गेलन (Galen) नावाचा एक प्रसिद्ध डॉक्टर आणि वैज्ञानिक होऊन गेला.ग्रीस आणि रोम या दोन्ही ठिकाणी त्याचं वास्तव्य होतं.गेलन याला मात्र आपल्या मेंदूतच आपलं मन दडलेलं आहे याची खात्री होती.त्या काळी माणसाच्या मृतदेहाचं विच्छेदन करणं हा त्या माणसाचा मृत्यूनंतर होणारा अपमानच आहे असं मानलं जाई.त्यामुळे त्यानं अनेक डुकरं, माकडं आणि गुरंढोरं यांचं विच्छेदन केलं.त्यानं डुकराच्या मेंदूपासून त्याच्या अवयवांपर्यंत जाणारे त्या अवयवांच्या हालचालीसाठी उपयुक्त असणारे मोटर नर्व्हज आणि त्या अवयवांच्या संवेदनांसाठी उपयुक्त असे सेन्सरी नर्व्हज कापून टाकले आणि ते कापल्यावर त्यांच्यावर काय परिणाम होतात यांच्या निरीक्षणांची बारकाईनं टिपणं करून ठेवली.पाठीच्या कण्यापासून (स्पानयल कॉर्ड) निघणाऱ्या मज्जातंतूंप्रमाणे त्यानं अनेक मज्जातंतू एकएक करत कापायला सुरुवात केली.कुठला मज्जातंतू कापल्यावर शरीरातल्या कुठल्या भागावर काय परिणाम होतो हे गेलनला बघायचं होतं. स्वरयंत्राकडे जाणारा मज्जातंतू जर कापला तर आवाजच करता येत नाही हे त्यानं न्याहाळलं होतं. गेलननंतर साधारणपणे १३०० वर्षांनी लिओनार्दो दा विंची (इ.स.१४५२-१५१९) नं काही महत्त्वाची विच्छेदनं केली आणि मेंदूतल्या टिश्यूजचं महत्त्व दाखवून दिलं,त्यानं बैलाच्या मेंदूतल्या पोकळीमध्ये वितळलेलं मेण ओतलं,ते सेट होऊ दिलं आणि नंतर मेंदूचं विच्छेदन करून आजूबाजूच्या टिश्यूजचं निरीक्षण केलं.मज्जातंतू हे मेंदूपर्यंत येऊन संपुष्टात येतात हे त्यानं शोधून काढलं. मेंदूच्या या भागाला कालांतरानं

'बॅलॅमस' असं म्हणायला लागले.


लिओनार्डोच्याच काळी व्हेसॅलियस (इ.स.१५१४-१५६४) नावाचा एक शरीरशास्त्रज्ञ होऊन गेला.त्यानं नुकत्याच मारलेल्या अनेक प्राण्यांचे मेंदू तपासले.मेंदू हाच आपल्या सगळ्या कृतीच्या आणि भावनांच्या केंद्रस्थानी असतो या निष्कर्षापर्यंत तोही येऊन पोहोचला.


मेंदूच्या पोकळीत एक द्रवपदार्थ भरलेला असतो आणि तो मेंदूमधून संदेश पोहोचवण्यासाठी उपयोगी पडतो असं देकार्तनं सांगितलं.या मेंदूतल्या द्रवपदार्थाला तो 

ॲनिमल स्पिरिट असं म्हणे.मनात जेव्हा शरीरामधल्या एखाद्या विशिष्ट भागाची हालचाल घडवून आणायची इच्छा होते तेव्हा मेंदूचा त्या विशिष्ट द्रवपदार्थानं भरलेला भाग मन एका ठरावीक दिशेनं वाकवते.त्यामुळे मेंदूतलं द्रव त्या दिशेच्या मज्जातंतूंमधून वाहायला लागतं. 


त्यामुळे त्या मज्जातंतूंच्या आजूबाजूचे स्नायू फुगतात आणि हालचाल करायला लागतात अशी देकार्तची थिअरी होती.अशा तऱ्हेनं देकार्तनं त्याचं हायड्रॉलिक यांत्रिक मॉडेल मांडलं.शरीरातल्या नर्व्हजमध्ये असलेल्या झडपांच्या (व्हॉल्व्हज) मुळे हा द्रवपदार्थ मज्जातंतूंमध्ये किती येतो आणि त्यातून तो किती बाहेर पडतो हे नियंत्रित होतं अशी त्याची थिअरी होती. उदाहरणार्थ,आपण जर एखाद्या शेकोटीत पेटलेल्या आगीत हात नेला तर आपल्या त्वचेजवळचे रिसेप्टर्स हे उत्तेजित होऊन मेंदूतल्या पोकळीजवळची झडप उघडली जाते आणि त्यामुळे तो द्रवपदार्थ तिथल्या मज्जातंतूंमध्ये वाहायला लागतो.त्यामुळे आपल्या तिथल्या स्नायूंना सूचना मिळून आपण हात बाजूला घेतो असं देकार्तनं मांडलं.पण ही हात चटकन काढून घेण्याची क्रिया खूप विचारपूर्वक केलेली नसते.ती जवळपास क्षणार्धात म्हणजे आपोआपच होते.म्हणून यांना रिफ्लेक्स ॲक्शन म्हणायला लागले.देकार्तनं आपले स्नायू हे मज्जातंतूमध्ये शिरणाऱ्या द्रवपदार्थामुळे हालचाल करतात असं जे हैड्रॉलिक मॉडेल मांडलं ते चूक असल्याचं लुइगी गॅल्व्हनी (१७३७ ते १७९८) या इटालियन शास्त्रज्ञानं दाखवून दिलं.स्नायूंना किंवा त्यांना जोडलेल्या मज्जातंतूंना जर विद्युतप्रवाह दिला तर ते स्नायू हालचाल करू शकतात,त्यात गेलेल्या द्रवपदार्थामुळे नाही हे त्यानं बेडकांवर केलेल्या प्रयोगांवरून सिद्ध केलं.


मन आणि मेंदू यांच्यातला संवाद हा मेंदूतल्या पोकळीजवळ असणाऱ्या पिनियल ग्लँडमध्ये होतो असं देकार्तनं मांडलं.मेंदू हा बराच सममितीय (सिमिट्रिक) असतो.पण त्यात मध्यभागी असणारा पिनियल ग्लैंड नावाचा एक भाग मात्र एकटाच असतो.त्याला जोडीदार नसतो.फार पूर्वीपासून माणसाला याविषयी कुतूहल होतं.आत्मा इथंच वास्तव्य करतो असं पूर्वीच्या हिंदू साधूंना वाटायचं.पण देकार्तनं वेगळंच मत मांडलं.आज मात्र ४०० वर्षांनंतर देकार्तची थिअरी फारशी कुणी गंभीरपणे घेत नाही.


मेंदू हा एकसंध आहे की त्याचे अनेक भाग असून,ते शरीराच्या वेगवेगळ्या गोष्टी नियंत्रित करतात याविषयीचा एक वाद मेंदूविज्ञानात अनेक वर्षं रंगणार होता.त्या नाट्यातलं एक पात्र होतं थॉमस विलीस (Thomas Willis १६२१-१६७५).थॉमस हा देकार्तचा समकालीन होता.रॉयल सोसायटीचा संस्थापक असलेल्या विलीसनं रॉबर्ट हुकला आपला मदतनीस म्हणून नेमलं होतं.विलीसनं माणसाच्या मेंदूचे अनेक भाग किंवा कप्पे असतात असं मानलं.

स्मृती,इच्छा, कल्पनाशक्ती या वेगवेगळ्या गोष्टी मेंदूतल्या वेगवेगळ्या भागांमुळे नियंत्रित होतात असं विलीस म्हणे.विलीसनं ॲ्नॅटॉमी ऑफ द ब्रेन' नावाचं पुस्तक लिहिलं.त्या वेळचा प्रसिद्ध ड्राफ्ट्समन आणि आर्किटेक्ट आणि लंडनमधल्या सेंट पॉलच्या कॅथिड्रलचा रचनाकार ख्रिस्तोफर रेन यानं विलीसच्या पुस्तकाकरता चित्रं काढली होती.आजचं मेंदूविज्ञान विलीसनं मानलेले कप्पे जसेच्या तसे फारसे जरी मानत नसले तरी मेंदूतले वेगवेगळे भाग वेगवेगळ्या गोष्टी नियंत्रित करतात हे त्याचं म्हणणं मात्र मान्य करतं.यामुळेच न्यूरॉलॉजी हा विषय सुरू झाला आणि खरं म्हणजे हा शब्दही विलीसनंच पहिल्यांदा वापरला.यामुळेच मेंदूच्या तळाशी असलेल्या रोहिण्यांना विलीसच्या सन्मानार्थ 'सर्कल ऑफ विलीस' या नावानं ओळखलं जातं.


जोहॅन्स पुर्किंजे


मेंदूच्या रचनेविषयी आपल्याला जे समजलं त्यात चेकोस्लाव्हियाचा प्रोफेसर जोहॅन्स पुर्किजे (Johannes Purkinje) १७८७ -१८६९) याचा खूपच मोठा वाटा आहे.मेंदूकडे सूक्ष्मदर्शकातून बघून त्याबद्दल टिपणं करणारा तो पहिलाच शरीरशास्त्रज्ञ होता. माणसांच्या बोटांच्या ठशांचा अभ्यास केल्याबद्दलही त्याला प्रसिद्धी मिळाली होती.मेंदूच्या खालच्या आणि मागच्या बाजूला सेरेबेलम (Cerebellum) नावाचा एक भाग असतो.सेरेबेलममुळे आपण आपला तोल राखू शकतो आणि सगळ्या हालचालीचं सुसूत्रीकरण करू शकतो. सेरेबेलममधल्या एका पेशीचं वर्णन प्रथम पुर्किंजेनं केलं त्यानं वर्णन केलेली ही पेशी खूपच गुंतागुंतीची होती.ही पेशी इतर मज्जापेशींबरोबर चित्रविचित्र तऱ्हेनं जोडली गेलेली होती.पुर्किंजेनं ही पेशी शोधल्यामुळे या पेशीला 'पुर्किंजे पेशी' असं म्हणायला लागले.एका पुर्किंजे पेशीला इतर २ लाख पेशींकडून संदेश येत असतात.ही पेशी खूप मोठीही होती.मानवी केसाएवढी ती जाड होती.पुर्किंजेनं शोधलेली ही पेशी सेरेबेलममधल्या इतर पेशींपेक्षाही सहापट मोठी होती.ही पेशी मोठी असल्यामुळेच त्या काळीही पुर्किंजे ती न्याहाळून त्याचं वर्णन करू शकला होता.आपल्या शरीरात एकूण अशा २.६ कोटी पुर्किंजे पेशी असतात असा कोणीतरी अंदाज बांधला आहे.या पेशी मेंदूत इतर ठिकाणीही विखुरलेल्या असल्या तरी मुख्यत्वेकरून त्या सेरेबलमध्येच सापडतात.


या सगळ्या संशोधनामुळे पुर्किंजेला त्या काळात इतकी अफाट प्रसिद्धी मिळाली होती,की युरोपबाहेरील लोक त्याला पत्र पाठवताना पाकिटावर फक्त पुर्किंजे,युरोप एवढाच पत्ता लिहीत असत आणि अर्थातच पुर्किंजेला ती पत्रं मिळत असत..


११.०१.२५  या लेखातील शेवटचा भाग...