सोलापूर हा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. आषाढ-श्रावणात पाऊस पडला नाही,की भाद्रपद महिन्यातील पुनवेला भल्या मोठ्या दुरडीत भातुकलीतल्या खेळातलं एक मातीचं घर बांधून,त्यात बेडूक ठेवून जोखमार लोक घरोघरी देवीच्या नावानं जोगवा मागत फिरत.पाऊस पडावा म्हणून देवीची करुणा भाकीत.
लहानपणी हे दृश्य मी अनेकदा पाहिलं आहे.कित्येकदा कुतूहलानं आम्ही पोरंदेखील त्यांच्या मागोमाग जात असू.पुढं पावसाला सुरुवात व्हायची. आमच्या घराजवळ माळरान होतं.वर्षभर कोरडं राहणारं तिथलं तळं पावसात भरून जाई.डबकीदेखील तुडुंब व्हायची.जिकडं-तिकडं चिखल होई.रात्री डरॉऽव डराँऽऽव असं बेडूक ओरडू लागायचे.आई म्हणायची,
'बेडूक ओरडतायत.आता खूप पाऊस पडेल.'
सकाळी उठून मी पहिल्यांदा तळं आणि डबकी पाहायला धाव घ्यायचा.पाच-पन्नास बेडूक पाण्यात बसलेले दिसायचे.मातकट रंगाचे हे बेडूक आपल्या लांब जिभेनं कीटक खाताना दिसायचे.
काही दिवसांनी कायापालट होऊन त्यांची कातडी पिवळी जर्द होई. डोळे सुवर्णमण्यासारखे चमकू लागत.एकेका बेडकीला पाठकुळी घेऊन बेडूक टुणटुणा उड्या मारीत चालायचे.पाठीवर बसलेला बेडूक खालच्या बेडकीच्या गळ्याभोवती हातांनी घट्ट धरून राही.काही दिवसांनी या जोड्या अलग अलग होऊन जिकडंतिकडं पांगत.
माझ्या बालमनात एक विचार येई.वर्षभर कधी न दिसणारे हे गलेलठ्ठ बेडूक आता पावसाच्या सुरुवातीला कुठून येत असतील?
माझी एक चुलत आजी तळ्याकाठच्या एका कुडाच्या घरात राहायची.त्या घरावर पत्र्याचं छप्पर होतं. तळ्याकडं भटकत गेलो,की मी तिच्या घरी जात असे. ती शकुन पाहायची.कोणी ना कोणी बायाबापड्या तिच्यासमोर बसलेल्या असायच्या.त्या आजीकडं शकुन बघायला आलेल्या असायच्या.प्रश्नार्थक मुद्रेनं त्या आजीच्या कवड्यांच्या माळेकडं पाहात असायच्या. आजीच्या हातातली हलणारी माळ हळूहळू निश्चल व्हायची.आजी त्या माळेकडं एकाग्रतेनं पाहात असायची.मात्र स्थिर झाली,की त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची ती उत्तरं द्यायची.आपलं मनोगत सांगायची. थोडा जरी पाऊस पडला,तरी पत्रे वाजायचे.कधी कधी माळ सारखी हलायची.स्थिर व्हायची नाही.तेव्हा आजी देवीवर संतापून काहीबाही बोलायची.तिची दोन्ही रूपं मला पाठ होती.
घरासमोरच्या छपरीत बसून एरवी ती पडणाऱ्या पावसाकडं आणि तळ्याकडं पाहात राही. अशी बसली,की ती खुशीत असायची.मी हळूच तिच्या शेजारी उगी बसून राहायचा.ती विचारी,
"काय,शाळेत गेला नाहीस वाटतं?अन् पावसात भिजलास किती ? तळ्यात हुंदाडला असशील.जा,घरी जाऊन कपडे बदल.नाही तर आजारी पडशील!"
मला तिला आज एक प्रश्न विचारायचा होता.तळ्याच्या कडेनं साबणाच्या फेसासारखे दिसणारे पुंजके मी प्रत्येक पावसाळ्याच्या सुरुवातीला अनेकदा पाहिले होते.त्याविषयी शंका विचारायची होती.
"आजी,एक विचारू?" मी लाजत तिच्या अंगाला बिलगत म्हटलं. "काय विचारणार आहेस पोरा?"
" तसं नाही ग.त्या तळ्याकाठी साबणाचा फेस आल्यासारखे पुंजके दिसतात.ते काय आहे?"
तो अपशकुनी प्रश्न विचारायचा नसतो."असं म्हणून ती बराच वेळ गप्प बसली.मी तिच्या सुरकुतलेल्या चेहेऱ्याकडं पाहात होतो.तिच्या नाकाजवळ,गालावर एक मोत्याएवढा मस होता.तो देखील आता हलत होता.
"पोरा,आभाळातून चांदण्या तुटून खाली पाण्यात पडल्या,की त्यांचा तसा फेस येतो."
पण तुटलेल्या ताऱ्याविषयी तिची इच्छा नसताना बोलावं लागलं हे तिला काही आवडलं नाही.ती स्वतःशीच काहीतरी पुटपुटत राहिली.नंतर माझ्या पाठीवर हळुवार धपका देत म्हणाली,
"अंधार होतोय् आता जा घरी."
दुसऱ्या दिवशी काठी टेकीत टेकीत आजी आमच्या घरी आली.
तळ्यापलीकडच्या आळीत आमचं घर होतं. तिला पाहताच आई म्हणाली,
"आलाव, मामी ? बसा."
काठी उजव्या हाताशी ठेवून ती खांबाला टेकून बसली. आईची तिच्यावर माया आणि श्रद्धा होती.आईबरोबर आजीही जेवली.
अंथरुणावर पडल्या पडल्या तिला झोप लागली.नंतर जाग आल्यावर ती आईला माझ्याविषयी सांगत होती,
"मला हा पोर अनेक शंकाकुशंका विचारून भंडावून सोडतो."
"होय?" आईनं विचारलं.
"हो,ग." आजी म्हणाली.
आई तिला म्हणाली-
"काल मला विचारीत होता,की रात्री ओरडणाऱ्या बेडकुळ्या आणि त्यांची पिलं आली कोठून? मी सांगितलं,ती आभाळातून खाली पडली म्हणून."
बेडकांविषयीचं बालपणी मनात असलेलं हे कुतूहल कधी गेलंच नाही.सृष्टीतील ही आश्चर्य घेऊनच मी वाढत होतो.
माझी आई आणि आजी या दोघींना निसर्गाविषयी किती ज्ञान असणार ? माझ्या कुतूहलाचं समाधान होईल अशी उत्तरं त्या द्यायच्या.त्यांनीदेखील ते कोणाकडून तरी असंच ऐकलं असणार.
या कुतूहलातील गूढतेमुळंच मला जीवशास्त्रात अधिक गोडी वाटली.विद्यार्थी दशेपासूनच त्याचा सखोल अभ्यास मी केला.पुढं योगायोगानंवन्यजीवशास्त्रज्ञ झालो.माझ्या मनात असलेल्या जिज्ञासेची उत्तरं शोधली,त्यांची उत्तरं मिळालीही.परंतु ती ऐकायला माझी आजी आणि आई हयात राहिल्या नाहीत.
अनेक वर्षांनी वनाधिकारी झाल्यावर रानावनात फिरताना पावसाळ्यात मला अनेक रंगांचे बेडूक आढळून येत.काही पिंगट हिरवे,तर काही तपकिरी वर्णाचे असायचे.क्वचितच चट्टेपट्टे असलेले बेडूक दिसायचे.पाखरांच्या रंगांत असलेली विविधता बेडकांच्या वर्णातही आढळून यायची.त्यांतले काही वातावरणाला योग्य असा रंगात बदल करायचे.अनेकदा मी त्यांना स्पर्शही करी,तेव्हा त्यांची कातडी मऊ आणि ओलसर लागे.माझी चाहूल लागताच डबक्याच्या काठावर बसलेला पाच-पंचवीस बेडकांचा समूह टुणटुणा उड्या मारीत पाण्यात प्रवेश करी.काही पाण्यात तरंगत,तर काही तोंड पाण्यावर काढून बसलेले असत.
डबक्याजवळच्या झाडाखाली बसून मी त्यांचं निरीक्षण करी.सारं काही सामसूम झाल्यावर ती सर्व बेडकं पुन्हा काठावर येऊन चरू लागत.लांब चिकट जिभेच्या साहाय्यानं गांडुळं,कृमि-कीटक,
गोगलगाई यांना गिळताना दिसत.त्यांच्या तोंडात दात असल्यामुळं भक्ष्याला निसटून जाता येत नसे.
काही दिवसांनी त्यांचा डराँऽडराँऽऽव असा आवाज येऊ लागे.साऱ्यांनाच ओरडता येत नसे.मोठ्या आकाराची बेडकी त्या ओरडणाऱ्या बेडकाजवळ येई.तो टुणकन् उडी मारून तिच्या पाठीवर स्वार होई.पुढच्या पायांनी तिला गळ्याजवळ घट्ट धरी.मग ध्यानात येई,की आवाज करणारे बेडूक नर होते आणि आकारानं मोठ्या असलेल्या माद्या होत्या.या काळात पाण्याच्या काठावर जिकडंतिकडं अशा बेडकांच्या जोडगोळ्या दिसतात. त्यांच्या विणीच्या काळाला सुरुवात झालेली असते. मादी मोत्याच्या माळेसारखी अंडी घालते.त्या अंड्यांच्या गोळ्यांवर नर शुक्राणू सोडतो.अंडी पाण्यात फुगून मोठी होतात.त्यांवर साबणाच्या फेसासारखं आवरण दिसू लागतं.एखाद्या आठवड्यानंतर या पुंजक्यातून बेडकांची अर्भकं बाहेर पडायची.या अर्भकांचं प्रौढ बेडकांशी साम्य नसतं.त्या अर्भकांना शेपटी आणि कल्ले असल्यामुळं ती माशाच्या पिलांसारखी पाण्यात संथपणे पोहताना दिसायची.ती अर्भकं पाच-सहा अवतारांतून जात.शेवटी दोन महिन्यांनी त्यांची शेपटी गळून पडे आणि त्यांचं पूर्ण बेडकात रूपांतर होई.
ही झाली राणा बेडूक म्हणजे फ्रॉगची कथा.
परंतु जंगलात भेक म्हणजे 'टोड' नावाचा बेडकाचा प्रकारही आढळून येई,भेक दिसायला बेडकासारखाच. परंतु भेकाची कुडी वेगळी आहे.चाराच्या सालीसारखी त्याची पाठ खडबडीत असते.त्यावर छोटे छोटे उंचवटे असतात.भेकाला दात नसतात.
त्याला चालता किंवा रांगता येतं.परंतु बेडकासारख्या उड्या मारता येत नाहीत.डिवचलं असता त्याच्या कानाच्या पूढील आणि मागील भागांतून विष स्रवतं.विणीच्या हंगामात भेक मोठ्यानं ओरडतात.ते स्वभावानं मोठे आक्रमक असतात.कित्येकदा त्यांच्यात लढाई जुंपली,तर एकमेकांना ते ठारही करतात.या दोहोंपेक्षा आणखी एक प्रकारचा उंच झाडाच्या फांद्यांवर राहणारा वृक्षमंडूक असतो.त्याचेही अनेक प्रकार आहेत.वृक्षमंडूकांचं विशेष लक्षण असं,की त्यांच्या पायांना वाटोळ्या गिरद्या असतात.त्यांच्या योगानं ते फांद्यांची चांगली पकड घेऊ शकतात.गिरद्या दाबल्यामुळं फांद्या आणि गिरद्या यांच्यामधली हवा निसटून जाते आणि पंज्यावरील बाहेरच्या हवेच्या दाबानंच मंडूक फांदीला चिकटून राहतो.
पावसाळ्यानंतर अन्नपाणी आणि हवा यांवाचून जमिनीखाली राहणाऱ्या बेडकांच्या जीवनक्रमाविषयी अठराव्या शतकापर्यंत जीवशास्त्रज्ञांना काही माहिती नव्हती.बेडूक दगडाच्या आतील थरात अनेक वर्षं राहतात असा लोकांचा समज होता.विल्यम बकलँड या जीवशास्त्रज्ञानं अथक प्रयत्नांनंतर त्यांच्या अज्ञात अशा जीवनक्रमाचं कोडं उलगडलं.त्यानं असं निदर्शनास आणलं की,बेडूक शाडूच्या दगडात एखाद्या वषर्षापेक्षा अधिक काळ जिवंत राहू शकत नाही.(सछिद्र नसलेल्या जमिनीत बेडूक गाडले गेले,तर ते मृत्युमुखी पडतात.) त्यांच्या जननग्रंथीजवळ वसापिंड असतो.बेडूक महानिद्रेत जाण्यापूर्वी हे वसापिंड मोठे होतात.या महानिद्रेत त्यांचा अन्न म्हणून उपयोग होतो.
प्राचीन काळापासून भारतीयांना मात्र बेडकांच्या जमिनीखालील जीवनक्रमाविषयी माहिती असल्याचं आढळून येतं.वराहमिहिराच्या बृहत्संहितेत 'उदकार्गल'वर (म्हणजे जमिनीखालील पाण्याचं ज्ञान ज्यामुळं होतं,ते शास्त्र) एक सविस्तर अध्याय आहे. वराहमिहिरानं हे प्रकरण सारस्वत मुनी आणि मनु या पूर्वाचार्यांच्या 'उदकार्गल' या ग्रंथावर आधारित असल्याचा उल्लेख केला आहे.
आपल्या पूर्वजांचं निसर्गज्ञान किती विस्तृत आणि सखोल होतं,याची प्रचीती भूगर्भातील पाणी ओळखण्यासाठी त्यांनी ज्या खुणा दिल्या आहेत, त्यांवरून होतं.पाणी व वनस्पती यांचा परस्परसंबंध आहे.वृक्ष,लता,वेली यांचं वारुळाशी सान्निध्य,तसंच सर्प, विंचू,घोरपड आणि बेडूक यांचं जमीन खोदताना दिसणारं अस्तित्व हे देखील जलविषयक ज्ञानाशी संबंधित आहे.त्यात राणा बेडूक आणि भेक यांच्या अस्तित्वाला अतिशय महत्त्व आहे.
'दागार्गल' विद्येमुळं आणखी एका अज्ञात अशा समस्येवर प्रकाश पडला आहे.पावसाळ्यानंतर बेडूक कुठं जातात? ते जमिनीखाली राहात असल्याची माहिती यामुळं मिळते.एवढंच नव्हे,तर रानावनांत बेडूक कोणकोणत्या वृक्षांच्या आधारानं राहतात,हे देखील ज्ञात होतं.बेडूक आणि भेक पावसाळ्यानंतर महानिद्रा घेतात;परंतु त्यांचा नेमका शोध कुठं घ्यायचा आणि त्यासाठी जमीन जास्तीत जास्त किती खोल खणायची, ती कोणत्या दिशेला खोदायची,हे देखील या शास्त्रात सांगितलेलं आहे.
पाखरमाया,मारुती चितमपल्ली, साहित्य प्रसार केंद्र, सीताबर्डी, नागपूर
विस्तारभयास्तव मूळ सर्व श्लोक उद्धृत करणं शक्य नसल्यामुळं जिथं बेडकाचा उल्लेख आहे, तेवढाच संक्षिप्त निर्देश केला आहे.
जलरहित देशी वेताचे झाड असेल,तर सुमारे दीड पुरुष खोलीवर पाणी असतं.हे खोदकाम करताना अर्धा पुरुष खोलीवर पांढरा बेडूक आढळून येतो.
चिह्नमपि चार्धपुरुषे मण्डूकः पाण्डुरोऽथ मृत् पीता। (७)
जलरहित प्रदेशात जांभळीच्या झाडाखाली पाणी असतं.त्या झाडाखाली खणत असताना एक पुरुष खोलीवर बेडूक दिसून येतो.
मृल्लोहगन्धिका पाण्डूरा च पुरुषेऽत्र मण्डूकः । (८)
जिथं बेल आणि औदुंबर ही झाडं अगदी जवळ असतात,अशा ठिकाणी जमीन खोदल्यास अर्धा पुरुष खोलीवर काळा बेडूक सापडेल.
पुरुषैस्त्रिभिरम्बु भवेत् कृष्णोऽर्द्धनरे च मण्डूकः । (१८)
ज्या सप्तपर्णी वृक्षाभोवती वारूळ असतं,तिथं निश्चितपणे पाणी असतं.अर्धा पुरुष खोल खणलं,तर तिथं हिरवा बेडूक दिसून येतो.
पुरुषार्धे मण्डूको हरितो हरितालसन्निधा भूश्व। (३०)
ज्या वृक्षाच्या मुळ्यांच्या जाळ्यात बेडूक आढळून येतो, तिथं जलाचं अस्तित्व असतं :
सर्वेषां वृक्षाणामधःस्थितो दर्दुरी यदा दृश्यः । (३१)
कदंब वृक्षाच्या जवळ वारूळ असेल,तर त्या ठिकाणी पाणी लागतं एक पुरुष खोलीवर सोनेरी रंगाचा बेडूक दिसतो :
कनकनिभो मण्डूको नरमात्रे मृत्तिका पीता । (३९)
पीलू (अक्रोड किंवा किंकणेलाचा) वृक्षाच्या अस्तित्वावरून जल असल्याचा सुगावा लागतो.त्या ठिकाणी एक पुरुष खोलीवर भेक मंडूक आढळून येतो.
चिह्नं दर्दुर आदै मृत्कपिला तत्परं भवेर्द्धारता । (६४)
करीर (कारवी किंवा वेळू) वृक्षामुळं जलाचं ज्ञान होतं. तिथं एक पुरुष खोलीवर पिवळ्या बेडकाचं अस्तित्व असतं.
दशभिः पुरुषैज्ञेयं पुरुषे पीतोऽत्र मण्डूकः । (६७)
यावरून एवढ कळून येतं की,बेडूक चार ते सात फूट खोलवर महानिद्रा घेत असलेला आढळून येतो. तसेच, बेडकांना आश्रय देणाऱ्या झाडांचाही उल्लेख दिसून येतो.
बेडूक अंदाजे आठ महिने जमिनीखाली कसा राहात असावा,याचं मला नेहमीच गूढ वाटत आलं आहे. बेडकाची फुफ्फुसं आदिम स्थितीत असल्यामुळं श्वसनक्रियेस अपुरी पडतात.त्यांना जोड म्हणून कातडीच्या द्वारे प्राणवायूची देवाणघेवाण होते.महानिद्रेत बेडकाचं तोंड बंद असतं.बेडूक ज्या वेळी जमिनीखाली महानिद्रेत असतो,त्या काळात त्याला प्राणवायू कसा आणि कोठून मिळतो,याचं स्पष्टीकरण कोणत्याही शास्त्रीय ग्रंथात केलेलं आढळत नाही.
वन्य जीव खरोखरीचं योगी असल्याचं महर्षी पतंजलीनं म्हटलं आहे.योगासनांची सुमारे ऐंशी ते नव्वद टक्के नावं वन्य जीवांच्या नावांवरून ओळखली जातात.'हठयोग साधने'त साधक खेचरी मुद्रेचा अवलंब करतो. या तंत्रात साधक आपल्या जिभेचा शेंडा मुखातील नाकाच्या द्वारात घालून तासन् तास बसतो.अर्थात या वेळी प्राणवायू घेणं बंद असतं.या अवस्थेत साधकानं स्वतःला जमिनीत पुरून घेतल्याचे अनेक दाखले मिळतात.जमिनीखाली महानिद्रेत असताना बेडूकदेखील हीच क्रिया करीत असावा.
माणसाच्या पिनियल तंत्रिकेत 'सिरोटोनिन' (serotonin) नावाचं रासायनिक द्रव्य तयार होतं. या रसायनाचा संबंध कुंडलिनी जागृत करण्यासाठी होतो. हे रसायन निसर्गात खजूर,केळी,आलुबुखार यांमध्ये आढळून येतं.तसेच,बडा-पिंपळाच्या पिंपरातही ते मोठ्या प्रमाणात आढळून येतं.तसेच,ते बेडकाच्या शरीरातही तयार होतं.बेडकाच्या शरीरातील 'सिरोटोनिन'चा उपयोग त्याला महानिद्रावस्थेत होत असावा,असं अनुमान करता येईल.
पावसाळा संपल्यावर सर्वच प्रकारचे बेडूक काही जमिनीखाली जात नाहीत.काही खंदकातील भेगांत निवारा शोधतात.पर्वताच्या कडेकपारीवर राहणारे बेडूक दगडाच्या छिद्रांत आणि फटींमध्ये आसरा घेतात. वृक्षमंडूक झाडाच्या ढोलीत,तसेच छिद्रांत महानिद्रा घेतात.
अकराव्या शतकात होऊन गेलेल्या सु तुंग पो या प्रसिद्ध जपानी कवीचं सुंदर चरित्र लिन युतांग यानं लिहिलं आहे.त्यात एका आशयघन प्रसंगाचा उल्लेख केला आहे,तो असा :
'लोयांग नावाचा एक गृहस्थ एकदा चुकून खंदकात पडला.
त्या खंदकातील भेगांत बेडकांनी आश्रय घेतलेला होता.सूर्य उगवताच त्या बेडकांनी भेगांतून तोंड बाहेर काढलं आणि सूर्याचं किरण खावे,तशी ते बेडूक तोंडाची हालचाल करीत असल्याचं त्या गृहस्थानं पाहिलं. भुकेलेल्या त्या गृहस्थानं बेडकाचं अनुकरण केलं आणि आश्चर्य म्हणजे,त्याची भूक नाहीशी झाली.त्या खंदकातून नंतर लोयांगची सुटका करण्यात आली. त्याला पुन्हा कधीच भूक लागली नसल्याचं कवी सांगतो.'
कोळी या कीटकाची पिलं सूर्यशक्तीवर लहानाची मोठी होताना मी पाहिली हेत.बेडकाच्या बाबतीत असंत घडत असावं.