तसं असेल तर मग त्या फेब्रुवारीतल्या दुपारी रुबेन,
रायनर,रिंक आणि वित्झे यांनी अँमस्टरडॅममधल्या बर्फासारख्या थंडगार कालव्यात का उडी मारली यात काहीच रहस्य नाही की! हा तर त्यांचा नैसर्गिक प्रतिसाद होता. आता प्रश्न असा आहे की,१३ मार्च १९६४च्या रात्री किटी जिनोवेजेचा खून झाला तेव्हा काय घडलं? त्या सर्वज्ञात कहाणीतलं नक्की काय काय खरं आहे?साक्षीदारांनी दाखवलेल्या बेफिकिर वृत्तीबद्दल प्रश्न उपस्थित करणाऱ्या सुरुवातीच्या लोकांमधील जोसेफ डी मे हा क्यू गार्डन येथे नव्यानं राहायला आलेला रहिवासी होता.तो नवागत इतिहासकार होता आणि किटीच्या मृत्यूनंतर दहा वर्षांनी तिथं राहायला आला होता.त्या वस्तीला बदनाम करणारी ती हत्या झाली तरी कशी असावी,याबद्दल त्याला कुतूहल वाटलं म्हणून त्याने स्वतःच शोध घ्यायचं ठरवलं.त्यासाठी तो वेगवेगळ्या माहिती संग्रहांतली माहिती शोधू लागला.पुसट झालेले फोटो,जुनी वृत्तपत्रं,पोलीस अहवाल वाचू लागला.मग सगळ्या गोष्टी एकत्र केल्यानंतर नक्की काय घडल होत ते चित्र त्यांच्या नजरेसमोर उमटलं.आपण पुन्हा अगदी पहिल्यापासून सुरुवात करू.या वेळेस डी मे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी खूप मेहनत घेऊन केलेल्या चौकशीवर १३ मार्च,१९६४ रोजी घडलेल्या वा घटना आधारलेल्या आहेत.पहाटेचे ३.१९ - एका काळीज गोठवणाऱ्या किंकाळीनं ऑस्टीन रस्त्यावरील शांतता भंग पावली;परंतु बाहेर तर खूपच थंडी होती आणि बहुतेक रहिवाशांच्या घरांच्या खिडक्या बंद होत्या.रस्त्यावर फारसे दिवेही नव्हते.ज्या लोकांनी खिडकीबाहेर पाहिलं,त्यातील बहुतेकांना तिथं काही विचित्र होतंय असं वाटलंच नाही.
काहींना रस्त्यावरून दिव्याच्या अंधुक उजेडात एक स्त्री ओझरती दिसली;परंतु त्यांना वाटलं की ती बहुतेक दारू पिऊन झिंगली आहे.तेही काही विचित्र नव्हतं.कारण,
त्याच रस्त्यावर पुढे एक बारही होता.तरीही कमीत कमी दोन रहिवाशांनी फोन करून पोलिसांना बोलावलं.त्यातले एक होते मायकेल हॉफमनचे वडील,मायकेल हॉफमन नंतर पोलीस दलात भरती झाले.दुसरी होती हॅटी ग्रुंड.ती जवळच्याच इमारतीत राहत होती.'आम्हाला आधीच फोन आलेत,'असं पोलिसांनी म्हटल्याचं तिने काही वर्षांनी सांगितलं.पण पोलीस तर आलेच नाहीत.पोलीस का नाही आले? त्यांनी ठाण्यातून सुसाट धाव घेत जोरजोरात सायरन वाजवत खरं तर यायला हवं होतं.त्या स्थळी पोलिसांची मदत धाडणाऱ्या वरिष्ठांना वाटलं की,हा काहीतरी वैवाहिक भांडणाचा प्रकार आहे.आता पोलीस दलातून निवृत्त झालेल्या हॉफमनना वाटतं की म्हणूनच ते प्रत्यक्ष हत्येच्या ठिकाणी एवढे उशिराने पोहोचले.हेही लक्षात घेतलं पाहिजे की, त्या काळात एखादा नवरा बायकोला मारत असेल तर लोक फार लक्ष देत नसत आणि विवाहातील बलात्कारास तर गुन्हा मानण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता.
पण मग या ३८ साक्षीदारांचं काय ?
हा नाठाळ आकडा आला तरी कुठून? गाण्यांतून,नाटकांतून,प्रसिद्ध चित्रपटांतून,सर्वाधिक खपाच्या पुस्तकांत सातत्यानं सांगितला.गेलेला हा आकडा पोलीस खात्यातील हेरांनी प्रश्न विचारलेल्या लोकांच्या यादीतून आला.या यादीतील बहुसंख्य लोक प्रत्यक्ष गुन्हा पाहणारे साक्षीदार नव्हते.त्यातील बहुतेकांनी 'काहीतरी'आवाज ऐकला होता आणि त्यातल्या काही जणांना तर झोपेतून जागही आली नव्हती.फक्त दोन जण त्यास अपवाद होते.त्यातला एक जण होता जोसेफ फिंक हा त्याच इमारतीतला शेजारी होता.तो विक्षिप्त,माणूसघाणा होता.तो ज्यूद्वेष्टा म्हणून लोकांना माहिती होता (स्थानिक मुलं त्याला अँडॉल्फ असं म्हणायची).जेव्हा तो प्रसंग घडला तेव्हा तो टक्क जागा होता.त्याने किटीवरला पहिला हल्ला पाहिलाही होता आणि तरीही काही केले नव्हतं.किटीला तिच्या कमनशिबावर सोडून देणारा दुसरा माणूस होता.कार्ल रॉस हा शेजारी तिचा आणि मेरी अँनचा मित्र होता. तिच्यावर जिन्यापाशी झालेला दुसया हल्ला त्यानं स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला होता. (प्रत्यक्षात तिच्यावर तीन नव्हे,दोन हल्ले झाले.)परंतु तो घाबरला आणि तिथून पळूनच गेला.रॉसनेच पोलिसांना सांगितलं होतं की,मला या लफड्यात पडायचं नाही.परंतु त्याच्या म्हणण्याचा अर्थ असा होता की,त्याला प्रसिद्धी नको होती.त्या रात्री तो प्यायलेला होता, त्याशिवाय तो समलिंगी आहे हेही बाहेर येईल की काय अशी त्याला भीती वाटली होती.त्या काळात समलैंगिकता पूर्णपणे बेकायदेशीर होती.रॉसला पोलिसांची आणि न्यू यॉर्क टाइम्ससारख्या वृत्तपत्रांची भयंकर भीती वाटत होती.
कारण,समलैंगिकता हा धोकादायक आजार आहे.असा कलंक त्या दोघांनीही समलैंगिकतेस लावला होता.
समलैंगिक पुरुषांना पोलीस छळत असतच,त्याशिवाय समलैंगिकता हा प्लेगच आहे.असं चित्र वृत्तपत्रेही रंगवत असत (खास करून किटीचं नाव सर्वतोमुखी करणाऱ्या एब रोझेन्थाल या संपादकास समलैंगिक लोकांबद्दल तीव्र नापसंती होती.किटीच्या खुनाच्या थोडंसं अगोदर त्याने आणखी एक लेख लिहिला होता त्याचा मथळा असा होता - शहरामध्ये राजरोसपणे चाललेल्या समलैंगिकतेत वाढ झाल्यामुळे लोकांना चिंता वाटू लागली आहे).अर्थात यातल्या कुठल्याही सबबीमुळे कार्ल रॉसच्या बेजबाबदारपणावर पांघरूण घालणं शक्य नाही.जरी तो दारू प्यायलेला असला,घाबरलेला असला तरी मैत्रिणीला वाचवण्यासाठी त्याने अधिक काहीतरी पावलं उचलायला हवीच होती.तसं काही करण्याऐवजी त्याने आणखी एका मित्राला फोन केला.त्या मित्राने ताबडतोब पोलिसांना बोलवायला सांगितलं;परंतु रॉसला स्वतःच्या घरातून तो फोन करण्याचे धैर्य झालं नाही म्हणून त्याने गच्चीवर जाऊन शेजारच्या घरातील महिलेला सांगितलं,तिथं राहणान्या बाईनी तिच्या शेजारी राहणाऱ्या दुसऱ्या महिलेला उठवलं.ती दुसरी महिला होती.सोफिया फॅरार किटी खाली जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडली आहे.हे ऐकताक्षणी ती क्षणभरही थांबली नाही. ती धावत घराबाहेर पडली तेव्हा तिचा नवरा पँट चढवत होता आणि 'थांब थांब,मी आलो,' असं तिला सांगत होता.सोफियाला जे काही कळलं होतं,
त्यानुसार कदाचित तीही थेट त्या खुन्याच्या विळख्यात सापडू शकत होती;परंतु त्यामुळेही ती थांबली नाही.तिने नंतर सांगितलं,"मी मदतीसाठी धावले.तेच करणं त्या परिस्थितीत स्वाभाविक होतं.
किटी पडली होती त्या जिन्याचा दरवाजा उघडून ती गेली तोवर खुनी पळून गेलेला होता. सोफियाने आपल्या मैत्रिणीला मिठी मारली तेव्हा किटी तिच्या कुशीत शिरत क्षणभरासाठी विसावली.अशा प्रकारे,कॅथरिन सुसान जिनोवेजे आपल्या शेजारणीच्या मिठीतच मरणाला सामोरी गेली.ही कहाणी पुष्कळ वर्षांनी कळली तेव्हा किटीचा भाऊ बिल म्हणाला की,'किटी तिच्या मैत्रिणीच्या मिठीत असताना मृत्यू पावली हे तेव्हा कळल असतं तर आमच्या कुटुंबाला कितीतरी फरक पडला असता.'
मग सोफिया विस्मृतीत का गेली असावी ?
कुठल्याही कागदपत्रात तिचा उल्लेख का नसावा?त्यामागचं सत्य अगदीच निराश करणारं होतं.सोफियाच्या मुलाच्या म्हणण्यानुसार,'माझी आई तेव्हा एका वृत्तपत्रातील महिलेशी बोलली होती.'परंतु जेव्हा तो लेख दुसऱ्या दिवशी छापून आला तेव्हा त्यात लिहिलं होतं की,'सोफियाला त्या भानगडीत पडायचं नव्हतं.'तो भाग वाचून सोफिया खूपच भडकली होती आणि 'यानंतर कुठल्याही पत्रकाराशी आपण बोलणार नाही' अशी तिने प्रतिज्ञाच केली होती.तसं म्हणणारी सोफिया एकटीच नव्हती.खरं सांगायचं तर क्यू गार्डनच्या डझनावारी रहिवाशांनी तक्रार केली होती की,पेपरवाले लोक आमचे शब्द सोईस्करपणे आहेत.त्यातील कित्येक जण नंतर ती वस्ती सोडूनही गेले.दरम्यानच्या काळात पत्रकार मंडळी मात्र येतच राहिली.११ मार्च, १९६५ रोजी म्हणजे किटीच्या मृत्यूला होण्याच्या दोन दिवस अगोदर एका वार्ताहराला वाटलं की, आपण क्यू गार्डन परिसरात जाऊन मध्यरात्रीच्या वेळेस 'खून होतोय खून' अशी बोंब ठोकून 'विनोद' करावा,तेव्हा छायाचित्रकार आपले कॅमेरे तयार ठेवून रहिवाशांच्या प्रतिक्रिया फोटोबद्ध करण्यासाठी सज्ज होऊन उभे होते.
हा सगळा प्रकारच वेडेपणाचा होता.त्याच कालखंडात न्यू यॉर्क शहरात चळवळीचा जोर वाढू लागला होता.मार्टिन ल्युथर किंग यास नोबेल शांतता पुरस्कार मिळाला होता,त्यामुळे लाखो अमेरिकन लोक रस्त्यांवरून मोर्चे काढू लागले होते आणि न्यू यॉर्क शहराच्या क्वीन्स भागात तर २००हून अधिक सामाजिक संस्था उभारल्या गेल्या होत्या. 'बेपर्वाईची साथ' या विषयाचं वृत्तपत्रांना वेडच लागलं होतं आणि ते त्याच विषयाची रेकॉर्ड वाजवत बसले होते.डॅनी मीनान नावाचा एक पत्रकार आणि रेडिओ वार्ताहर होता.त्याला 'निष्क्रिय' बघ्यांच्या कहाणीबद्दल शंका वाटत होती.जेव्हा त्याने खऱ्या गोष्टी तपासून पाहिल्या तेव्हा कळलं की,बहुतेक साक्षीदारांना त्या रात्री वाटलं होतं की,आपण एका दारू प्यायलेल्या स्त्रीला पाहिलं आहे.मग मीनानने न्यू यॉर्क टाइम्सच्या वार्ताहराला विचारलं की,'तू ही माहिती तुझ्या बातमीत का दिली नाहीस?' त्यावर त्याने उत्तर दिलं की,'त्यामुळे माझ्या बातमीचीच वाट लागली असती.' पण मग मीनानने ती गोष्ट स्वतःकडेच का ठेवली ? स्वतःचं नुकसान होऊ नये म्हणून त्याने तसं केलं.त्या काळात एकट्या दुकट्या पत्रकाराला स्वतःची नोकरी टिकवायची असेल तर जगातील सर्वांत शक्तिमान वृत्तपत्राच्या विरोधात जाणं शक्य नव्हतं.काही वर्षांनी आणखी एका पत्रकाराने त्याविरुद्ध बोलण्याचा प्रयत्न केला,तेव्हा त्याला न्यू यॉर्क टाइम्स वृत्तपत्रातून एब रोझेंथालने रागारागाने फोन केला.'ही कहाणी म्हणजे अमेरिकेतील परिस्थितीचं प्रतीकच बनली आहे हे तुला माहितीय का? ती तर समाजशास्त्राचे अभ्यासक्रम,पुस्तकं आणि लेखांचे विषयही बनली आहे आणि तिच्याविरुद्ध तू टिप्पणी करतोस.?"प्रत्यक्षात त्या मूळ कथेचा किती छोटा भाग राहिला ते पाहून धक्काच बसतो.त्या दुर्दैवी रात्री सर्वसामान्य न्यू यॉर्कवासी कर्तव्याला चुकले नाहीत,तर अधिकाराच्या जागेवरील लोक कर्तव्याला चुकले.किटी एकाकी अवस्थेत मेली नाही तर आपल्या मैत्रिणीच्या मिठीत तिनं प्राण सोडला.अगदी मुळाशीच जायचं म्हटलं तर विज्ञान सांगतं तसा बघ्यांच्या उपस्थितीचा निष्क्रिय परिणाम होत नाही तर त्याच्या विरुद्धच परिणाम होतो.आपण मोठ्या शहरात,सबवेवर,गर्दीच्या रस्त्यांवर एकटे नसतो,
आपण एकमेकांना असतो.आणि किटीची कहाणी तिथेच संपत नाही.त्या कहाणीला एक शेवटचं,विचित्र वळणही आहे.किटीच्या मृत्यूनंतर पाच दिवसांनी क्वीन्स परिसरातील रहिवासी राऊल क्लिअरी याला रस्त्यावर एक अनोळखी माणूस दिसला. तो दिवसाढवळ्या एका शेजाऱ्याच्या घरातून बाहेर येत होता,त्याच्या हातात टीव्ही सेट होता. राऊलने त्याला अडवलं तेव्हा त्याने म्हटल की, मी सामान हलवणारा माणूस आहे.परंतु राऊलला शंका आली म्हणून त्याने जॅक ब्राऊन नामक शेजाऱ्याला फोन केला. "बॅनिस्टर्स घर सोडून चालेलत का?" त्याने विचारलं."छे,नाही हो,"ब्राऊनने उत्तर दिलं.मग त्या दोघांनी अजिबात वेळ दवडला नाही.जॅकने त्या माणसाच्या गाडीच्या चाकातली हवा काढली आणि राऊलने पोलिसांना फोन केला.पोलीस घरफोड्याला पकडायला आले आणि ज्या क्षणी तो माणूस पुन्हा बाहेर आला त्या क्षणी त्यांनी त्याला पकडलं.त्यानंतर काही तासांनी त्या माणसाने कबुलीजबाब दिला.
म्हणजे ते घर फोडून तो आत घुसला होताच शिवाय त्याने क्यू गार्डन परिसरात एका तरुणीचा खूनही केला होता.बरोबर! म्हणजे किटीच्या खुन्याला पकडलं होतं तर खरं तर दोन बघ्यांच्या हस्तक्षेपामुळे तो पकडला गेला होता;परंतु एकाही वृत्तपत्राने ती बातमी दिली नव्हती.किटी जिनोवेजेची ही खरी कहाणी आहे.ही कहाणी मानसशास्त्राच्या पहिल्या वर्षांच्या विद्यार्थ्यांनीच नव्हे तर पत्रकार होऊ इच्छिणाऱ्यांनीही वाचली पाहिजे.
कारण,ही कहाणी आपल्याला तीन गोष्टी शिकवते.एक म्हणजे मानवी स्वभावाबद्दल आपला दृष्टिकोन किती ठाकून ठोकून विचित्र बनवलेला आहे. दुसरी म्हणजे सनसनाटी बातम्या विकण्यासाठी पत्रकार मंडळी किती सहजगत्या अचूक बटणं कशी दाबतात आणि तिसरी पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे संकटाच्या वेळी आपण एकमेकांवर कसे अवलंबून राहू शकतो.आम्ही अँमस्टरडॅममध्ये पाण्याकडे पाहत होतो तेव्हा मी रुबेन अब्राहम्सला विचारलं की,पाण्यात उडी मारल्यामुळे तुला आपण 'हिरो' बनलो असं वाटलं का? त्याने खांदे उडवत म्हटलं,
'नाही हो,त्यात विशेष काय? लोकांनी जीवनात एकमेकांची काळजी घेतलीच पाहिजे ना.'
संपली एकदाची गोष्ट