* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१३/६/२३

देवांचे स्वर्गीय देदीप्यमान रथ

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला पुराणवस्तू संशोधनात एक अत्यंत खळबळजनक शोध लागला.तो म्हणजे बारा मृत्तिकापत्रांवर लिहिलेल्या गिलगामेशच्या अप्रतिम महाकाव्याचा.अक्काडियन भाषेत लिहिलेले हे महाकाव्य असीरियन राजा असुरबानिपालच्या पौराणिक ग्रंथसंग्रहालयात मिळाले.


गिलगामेशच्या महाकाव्याचा उगम सुमेरियन संस्कृतीत झाला ही गोष्ट सिद्ध झालेली आहे. तेच रहस्यमय सुमेरियन लोक,कुठून आले ते कळत नाही.पण १५ आकडी संख्या आणि खगोलशास्त्राच्या अफाट ज्ञानाचा वारसा जगाला देऊन गेले.गिलगामेशच्या महाकाव्याचा मुख्य धागा आणि बायबलमधील विश्वाची उत्पत्ती हा भाग अगदी समान आहे.


पहिल्या मृत्तिकापत्रात विजयी गिलगामेशने बांधलेल्या राजेशाही प्रासादाचे वर्णन आहे. गिलगामेश म्हणजे देव आणि मानव यांचा संगमच ! दोन तृतीयांश देवाचा अंश आणि एक तृतीयांश मानवाचा अंश.महाकाव्याच्या सुरुवातीलाच देव आणि मानव यांच्या संयोगाचा

उल्लेख पुन्हा आलाच आहे.याचा प्रासाद उरूक येथे होता.सभोवती तटबंदी आणि पहारेकरीही असत. येणारे यात्रेकरू त्यांच्याकडे पाहूनच भयभीत होत.त्यांची अफाट ताकद त्यांच्याकडे पाहताच ध्यानात येत असे.


दुसऱ्या मृत्तिकापत्रात अरूरू या स्वर्गीय देवतेने निर्माण केलेल्या एन्किडूचा उल्लेख आहे पण हा एन्किडू तसा विचित्रच प्राणी होता.त्याच्या सर्वांगावर केस होते.तो जनावरांच्या कातड्यांची वस्त्रे घालायचा,शेतातले गवतच खायचा आणि एकूण गुराढोरातच असायचा.एन्किडूबद्दल ऐकल्यावर गिलगामेश सुचवतो की त्याला एखाद्या सुंदर स्त्रीच्या पाशात गुंतवावा म्हणजे तो आपोआप इतर प्राण्यांचा नाद सोडेल म्हणून आणि एन्किडू सहा दिवस आणि सहा रात्री एका सुंदरीबरोबर काढतोही.


तिसऱ्या मृत्तिकापत्रात दूरवरून धुळीच्या ढगातून प्रचंड गडगडाट करीत आणि धरणी हलवत येणाऱ्या सूर्यदेवाचे वर्णन आहे.सूर्यदेव आपल्या पंखात आणि नखात एन्किडूला पकडतो आणि वेगाने आकाशात झेप घेतो.

त्यावेळी एन्किडूला आपल्या शरीरावर सूर्यदेवाचे वजन शिशाच्या गोळ्याप्रमाणे जड जड वाढल्यासारखे वाटते.


आज आपल्याला गुरुत्वाकर्षणाच्या विरूद्ध दिशेने अंतराळात उडताना गुरुत्वाकर्षणाचा परिणाम म्हणून अंतराळवीर अंतराळयानातून पृथ्वीच्या कक्षेबाहेर जाईपर्यंत त्यांच्या शरीरावर गुरुत्वाकर्षणाने किती वजनाचा दाब येतो हे आधीच मोजता येते आणि त्याप्रमाणे संरक्षक व्यवस्था करता येते.पण या दाबाची माहिती हजारो वर्षांपूर्वी कुणाला होती? जुन्या लेखकांची प्रगल्भ कल्पनाशक्ती,भाषांतरकर्ते व प्रती काढणारे यांनी घातलेली भर सोडून देऊ या.पण या जुन्या वृत्तांतात ठराविक वेगाने आकाशात जायला लागल्यावर शरीराचे वजन शिशासारखे जड होईल ही माहिती आली कशी हे आश्चर्यच आहे.ही गोष्ट कल्पनेला ताण देऊन लिहिली असणे.अशक्य आहे.कोणी तरी खरा अनुभव घेतला असल्याशिवाय असे लिहिता येणे कधीही शक्य नाही.


पाचव्या मृत्तिकापत्राप्रमाणे गिलगामेश आणि एन्किडू देवाच्या शोधासाठी निघतात.ज्या मनोऱ्यात इर्निसीस ही देवता राहत असते तो लांबवरूनच झगमगताना दिसत असे.ते देवांच्या राहण्याच्या ठिकाणी पोहोचतात तर गर्जनेसारखा आवाज येतो 'परत फिरा! कोणत्याही मर्त्य मानवाने आमच्याकडे पाहिले तर तो जिवंत राहणार नाही. '


सातव्या मृत्तिकापत्रात अंतराळ प्रवासाचा पहिला उल्लेख आहे.एन्किडू याने स्वतः केलेल्या अंतराळ प्रवासाचे ते वर्णन आहे.गरुडाने एन्किडूला आपल्या नखात घट्ट पकडून हा प्रवास घडवला होता.घडलेला वृत्तांत जवळ

जवळ शब्दश: असा आहे.तो मला म्हणाला, 'आता खाली जमिनीकडे बघ. जमीन कशी दिसते? समुद्र बघ.तो कसा दिसतो? जमीन टेकडीसारखी तर समुद्र एखाद्या सरोवरासारखा वाटत होता.आणखी चार तास भ्रमण केल्यावर तो पुन्हा म्हणाला,खाली जमिनीकडे बघ.कशी दिसते? समुद्राकडे बघ, कसा दिसतो? जमीन एखाद्या बागेसारखी आणि समुद्र बागेत काम करणाऱ्या माळ्याने काढलेल्या पाण्याच्या पाटासारखा वाटत होता. आणखी चार तास भ्रमण करून खूप उंच गेल्यावर तो म्हणाला, खाली जमिनीकडे बघ. आता ती कशी वाटते तुला? समुद्राकडे बघ.तो कसा भासतो आता? जमीन आता लापशीसारखी तर समुद्र पाण्याच्या उघड्या टाकीसारखा वाटत होता. '


खूप उंचीवरून पाहिलेल्या पृथ्वीचे वर्णन आपले अंतराळवीर आज अगदी याच शब्दात करतात. वेगवेगळ्या उंचीवरून कोणी तरी खरोखर पृथ्वी बघितली असल्याशिवाय अशा तऱ्हेचे वर्णन करता येणे शक्य नाही.

हा वृत्तांत इतका अचूक असल्यानेच केवळ कल्पनेने तो लिहिला असणे अशक्य आहे.


आणि त्याच मृत्तिकापत्रात एक दरवाजाच माणसासारखा बोलतो,असा उल्लेख आल्यावर तिथे लाऊडस्पीकर -

शिवाय दुसऱ्या कशाचाही उल्लेख असणे शक्य नाही हे आपल्याला कळते.


आणि मग ज्या एन्किडूने खूप उंचीवरून पृथ्वी बघून तिचे अचूक वर्णन केलेले असते.तो एन्किडू अत्यंत रहस्यमय अशा रोगाने मरण पावतो.आपल्या अचूक वर्णन मित्राच्या मरणाचे गिलगामेशला फार दुःख होते.अंतराळातील कुठल्या तरी विषारी प्राण्याच्या फुत्कारानेच आपला मित्र मरण पावला आहे आणि नंतर आपलीच पाळी येणार आहे असे गिलगामेशला वाटायला लागते.नवव्या मृत्तिकापत्रात या सर्व गोष्टींचा उल्लेख आहे.गिलगामेश ठरवतो की आता देवाचीच गाठ घ्यायची नाहीतर आपला मृत्यू अटळ आहे.अखंड प्रवास करीत तो दोन पर्वतांशी येतो.त्या दोन पर्वतांनीच स्वर्ग पेलून धरलेला असतो.

त्यांच्यामध्ये सूर्यद्वारही दिसत असते.पण तिथले दोन पहारेकरी त्याला अडवतात.त्यांच्याशी तो खूप हुज्जत घालतो. शेवटी त्याला ते आत सोडतात.नाही म्हटले तरी गिलगामेशमध्ये दोन तृतियांश तरी देवाचा अंश असतोच.

गिलगामेश शेवटी एका सागर किनाऱ्यावर येतो.देव सागरापलिकडे राहत असतो आणि देवाशिवाय कोणाचेही वाहन या सागरावरून जात नसते.


त्यावेळी गिलगामेशला दोन वेळेला देव गंभीर परिणामांची धमकी देतो आणि सांगतो 'अरे गिलगामेश! तू जे अमरत्व शोधत आहेस ते तू तुला कधीच मिळणार नाही.देवाने मानव निर्माण केला.तेव्हा त्याचे मरणही लिहून ठेवले

आहे.अमरत्व देवाने स्वतःकडेच राखून ठेवले आहे.'


पण देवाला भेटण्याचा गिलगामेशचा निर्धार अटळ

असतो.अनेक संकटांना तोंड देत तो सागर पार करून जातोच आणि शेवटी त्याची आणि मानवाच्या निर्मात्याची गाठ पडते.त्यांची गाठ पडल्यावर गिलगामेशला कळते की त्या दोघात तसा काहीच फरक नाही.देव त्याच्यासारखाच उंच आणि धिप्पाड असतो.पिता-पुत्र शोभावेत असेच ते दोघे दिसत असतात.


देव त्याला स्वतःच्या आयुष्याबद्दल माहिती देतो. 'मी' म्हणून एक वचनात.आत्यंतिक आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो गिलगामेशला झालेल्या महान जलप्रलयाचीही माहिती देतो.देवांनी नोहाला या जलप्रलयाची आगाऊ सूचना कशी दिली होती, त्याने बोट कशी बांधली,त्यात सर्व तऱ्हेचे प्राणी, नातेवाईक,स्त्रिया,मुले,प्रत्येक जातीचा कारागीर यांना कसे घेतले हे तो सर्व सांगतो.तुफान वादळ आणि पाऊस,काळाकुट्ट अंधार,पूर,ज्यांना तो वाचवू शकत नव्हता.त्यांच्या किंकाळ्या, जगण्याची धडपड हे सर्व वर्णन त्यात इतके अप्रतिम आहे की वाचायला घेतल्यावर खाली ठेववत नाही.


पूर ओसरला की नाही हे कळण्यासाठी आधी एक गिधाड सोडणे आणि मग कबूतर सोडणे अशी गोष्ट गिलगामेशच्या महाकाव्यात आहे, तशीच ती बायबलमध्येही आहे.गिलगामेशच्या महाकाव्यातील जलप्रलयाचे वर्णन आणि बायबलमधील वर्णन यात फारच साम्य आहे ही गोष्ट विद्वान लोक मान्य करतात.

नवलाची गोष्ट म्हणजे आपण वेगवेगळे देव लक्षात घेतो आहोत. हा प्रकार विलक्षण नाही का?


गिलगामेशच्या महाकाव्यातील हे वर्णन त्या संहारातून वाचलेल्या माणसानेच केले आहे,ती चक्षुर्वैसत्य हकिगत आहे यात शंकाच नाही. याच्या उलट बायबलमधील वर्णन हा दुसऱ्याने सांगितलेला वृत्तांत आहे.


हजारो वर्षांपूर्वी प्राचीन पूर्वेत अचानकपणे जलप्रलयाने थैमान घातले होते,हे ऐतिहासिक सत्य आहे,सिद्ध झालेली गोष्ट आहे. महाप्रलयातून वाचण्यासाठी मुख्यतः लाकडाचा वापर करून बांधलेल्या बोटीचे अवशेष कमीत कमी ६००० वर्षांनी सापडतील ही गोष्ट खरी म्हणजे अशक्य असली तरी बाबिलोनियातील मृत्तिकापत्रे या बोटीचे अवशेष कुठे सापडतील याच्या स्पष्ट खाणाखुणा सांगतात. त्याचप्रमाणे अरारत पर्वतावर संशोधकांना ज्या जागी पुरानंतर बोट लागली असेल असा संशय होता त्याच ठिकाणी लाकडाचे तीन तुकडेही सापडले होते.


आजच्या विज्ञान युगाच्या दृष्टीने विचार केला तर गिलगामेशच्या महाकाव्यात अशा कित्येक गोष्टींचा समावेश आहे की अत्यंत प्रगल्भ बुद्धीच्या हुशार माणसालाही मृत्तिकापत्रे लिहिली गेली;त्या काळात या गोष्टींची माहिती असणे सर्वस्वी अशक्य आहे.ज्यांनी या महाकाव्याच्या फक्त प्रतीच काढल्या किंवा भाषांतर केले त्यांनीही अशा गोष्टींची नंतर त्या महाकाव्यात भर घातली असेल असे म्हणता येत नाही. कारण सरळ आहे.ते त्यांच्या आवाक्याबाहेरचे काम होते.


पण आजपर्यंत आपण समजत आहोत त्याप्रमाणे गिलगामेशच्या महाकाव्याचा उगम समजा प्राचीन पूर्वेत झालाच नसला आणि टिआहुआन्को येथे झाला असला तर? गिलगामेशच्या वंशजांनी दक्षिण अमेरिकेतून येताना ते महाकाव्यही बरोबर आणले असले तर? या प्रश्नांची उत्तरे होकारार्थी असतील तर अनेक गोष्टींचा उलगडा होतो.सूर्यद्वाराचा उल्लेख,सागर पार करून जाणे आणि सुमेरियन संस्कृतीचा अचानक उगम या गोष्टींचा शोध मग नक्कीच लागतो.त्याच भागातील बाबिलोनियन संस्कृती ही सुमेरियन लोकांच्या नंतरची आहे. त्यांच्या बहुतेक सर्व निर्मितीचा उगम सुमेरियन संस्कृतीतच आहे ही गोष्टही वादातीत आहे. गिलगामेशच्या महाकाव्याचा प्रवास मग सुमेरिया,बाबिलोनिया,इजिप्त असाच होऊ शकतो.

इजिप्शियन संस्कृती अत्यंत पुढारलेली होती.फॅरोह राजांची ग्रंथालये प्रचंड होती आणि त्यांनी सर्व जुन्या गुप्त ज्ञानाचा साठा जतन करून ठेवला होता.मोजेस इजिप्तच्या राजदरबारातच लहानाचा मोठा झाला.या ग्रंथालयांचा उपयोग त्याने हक्काने केला असणार.अशा दृष्टीने विचार केला तर गिलगामेशच्या महाकाव्यातील जलप्रलयाचा वृत्तांत मूळ वृत्तांत ठरतो,खरा वृत्तांत ठरतो, बायबलमधला नव्हे!आणि या टप्प्यापर्यंत विचार करीत आलो तर प्राचीन इतिहासाचे संशोधन नीट का होत नाही.

याची खरी मेख इथेच असावी असा संशय घ्यायला निश्चित जागा मिळते.प्राचीन काळाबद्दलच्या संशोधनाची परिस्थिती तरी कशी आहे? आजपर्यंत सांगण्यात आलेल्या इतिहासामध्ये अनेक कालखंडांची माहिती मिळतच नाही.त्या काळात 'अशक्य' अशा गोष्टींचे अस्तित्व कसे होते याचे उत्तर मिळत नाही.साचेबंद पद्धतीने केलेले कोणतेही संशोधन एकही नवीन गोष्ट सांगू शकत नाही,कोणत्याही नवीन गोष्टीवर प्रकाश पाडू शकत नाही. तेच तेच विचार,त्याच त्याच संशोधनाच्या पद्धती कुचकामी ठरत आहेत;कारण कोणत्याही तऱ्हेची नवीन कल्पना,नवीन तर्क,नवीन सिद्धान्त या गोष्टींना थाराच मिळत नाही.प्राचीन पूर्वेबाबतच्या संशोधनाच्या अनेक संधी आजपर्यंत वाया गेल्या कारण बायबलसारख्या अति पवित्र ग्रंथात सांगितलेल्या गोष्टींबद्दल वेगळ्या तऱ्हेचे विचार उघडपणे मांडण्याची कुणाचीच प्राज्ञा नव्हती.


एकोणिसाव्या विसाव्या शतकातील विद्वानांनी अनेक जुन्या समजुती आणि रूढी यांच्यातून आपली मुक्तता करून घेतली.तरी बायबलमध्ये म्हटले की मनावर येणाऱ्या शेकडो वर्षांच्या मानसिक दडपणातून त्यांचीसुद्धा सुटका झाली नाही.


बायबल संबंधात कुठलाही प्रश्न निर्माण करण्याचे,

विचारण्याचे धैर्य त्यांनाही झाले नाही.याचमुळे प्राचीन काळाबद्दलचे कुठलेही संशोधन बायबलपर्यंत पोहोचले की तिथेच त्याला पूर्णविराम मिळत होता.पुढल्या संशोधनात बायबलच्या काही भागांबद्दल तरी अविश्वास दाखविणे अपरिहार्य ठरत होते आणि हीच गोष्ट कुणाला जमत नव्हती.


पण अगदी धार्मिक ख्रिस्ती विद्वानांना सुद्धा कधी जाणीव झाली नसेल की सर्वज्ञ,सर्वसंचारक देवाच्या प्रतिमेस विसंगत अशा गोष्टी बायबलमध्ये आहेत म्हणून?अगदी कर्मठ, बायबलवर संपूर्ण विश्वास ठेवणाऱ्या माणसाला प्राचीन काळातील आपल्या पूर्वजांना आधुनिक तंत्रज्ञान कुणी दिले,स्वच्छतेचे,समाजसुधारणेचे प्राथमिक नियम कोणी घालून दिले,मानव जातीचा विनाश एकदा कोणी घडवून आणला, या प्रश्नांबद्दल आणि त्यांच्या उत्तरांबद्दल कधीच कुतूहल निर्माण झाले नसेल?


अशा तऱ्हेचा विचार करण्याने खरे म्हणजे आपल्यावर नास्तिकपणाचा शिक्का बसण्याचे मुळीच कारण नाही.

आपल्या भूतकाळातील सर्व प्रश्नांची उत्तरे ज्या क्षणी मिळतील त्या क्षणापासून दुसरे कुठले नाव देता येत नाही म्हणून आपण 'देव' मानतो ते 'काही तरी' अनंत काळापर्यंत अस्तित्वात राहणारच आहे.


ज्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी अंतराळयानासारख्या वाहनाची जरुरी लागत होती,प्राचीन मागासलेल्या स्त्रियांशी संबंध ठेवून ज्याने नवीन प्रजा निर्माण केली,जो आपला मुखवटा कधीही दूर करून स्वतःचा चेहरा दाखवायला तयार नव्हता असा देव तरी नक्कीच अस्तित्वात होता या सिद्धांताला 'पुरावा' देणारी,दुजोरा देणारी एक तरी गोष्ट आहे का? मुळीच नाही.


देव कुणाला कुठल्या स्वरूपात दर्शन देईल आणि कुणाचा नक्षा कसा उतरवील हे सांगता येत नाही,हे ब्रह्मज्ञानी आणि धर्मज्ञानी लोकांचे उत्तर मूळ मुद्दा डावलणारे आहे.म्हणूनच या उत्तराने आपले समाधान होऊ शकत नाही. काही वर्षांतच मानव कुठल्या तरी ग्रहावर पाय ठेवील.त्या ठिकाणी ओळखता येईल असे एखादेच खडकावर कोरलेले चित्र,अज्ञात, बुद्धिमान जमातीचे अस्तित्व दर्शवणारी एखादीच खूण,एखादीच भव्य,प्राचीन वास्तू मिळाली तर आपल्या सर्व धर्मांचा पायाच ढासळून पडेल आणि आपल्या भूतकाळाच्या इतिहासाबद्दल अपरिमित गोंधळ माजेल.असा फक्त एकच शोध मानवाचा सर्व इतिहासच संपूर्णपणे बदलण्याइतका क्रांतिकारक ठरेल.


नवनवीन सत्यांकडे डोळेझाक करूनही भविष्यकाळातील नव्या-जुन्या विचारांचा संघर्ष आता टळू शकणार नाही.आपण नास्तिक असण्याचे कारण नाही.

पण म्हणून काय सर्व खुळचट गोष्टींवर अगदी भोळसटपणे अंधविश्वास ठेवायचा? प्रत्येक धर्माची काही वैशिष्ट्ये आहेत आणि त्याचमुळे त्या धर्माचे विचार त्या वैशिष्ट्यांभोवती घुटमळतात.हे अपरिहार्यपणे घडत आहे.


आजच्या अंतराळ युगात आपली बौद्धिक कसोटी लागण्याचा दिवस जवळ येत आहे आणि त्याच दिवशी सर्व ब्रह्मज्ञान व्यर्थ ठरेल. आतापर्यंतचे मानवाच्या प्राचीन इतिहासाबद्दलचे चित्र कसे आहे याबद्दलचा आपला सिद्धान्त काय म्हणतो?


नक्की सांगता येत नाही अशा आपल्या प्राचीन इतिहासकाळात एका अज्ञात अंतराळयानाने पृथ्वीचा शोध लावला.पृथ्वीवर जीवन निर्माण होण्यासाठी आवश्यक अशा सर्व गोष्टी उपलब्ध आहेत याची जाणीवही त्या अज्ञात अंतराळवीरांना अभ्यासपूर्वक विचार केल्यावर झाली.


अर्थात,त्यावेळी मानवसदृश प्राणी अस्तित्वात नव्हता तर काही वेगळ्या तऱ्हेच्या प्राण्यांचेच अस्तित्व होते.अशा या जमातीतील स्त्रियात त्यांनी कृत्रिम गर्भधारणा केली व ते निघून गेले. हजारो वर्षांनी ते परत आले त्यावेळी त्यांना विखुरलेल्या मानवसदृश प्राण्यांचे अस्तित्व आढळायला लागले होते.पुनः पुन्हा तसेच प्रयोग करून या अंतराळवीरांनी समाजव्यवस्थेची दीक्षा देण्याइतका बुद्धिमान मानवसदृश प्राणी शेवटी या पृथ्वीवर निर्माण केला.तरीही त्यावेळी तो जंगली प्राण्यांत गणना व्हावी इतपतच होता. इतर जनावरांशी संबंध ठेवून त्याची पिछेहाट होऊ नये व त्याचे प्रगतीचे पाऊल मागे हटू नये या हेतूने त्यांनी अशा इतर प्राण्यांचा एक नाश तरी केला किंवा त्यांची इतरत्र तरी रवानगी केली.मानवाच्या प्रगतीला कोणताही धोका निर्माण होऊ नये याची ते सतत काळजी घेत राहिले.


मग पहिला समाज अस्तित्वात आला,पहिले कुशल कारागीर निर्माण झाले.काहींनी गुहेत चित्रे रंगवली,

काहींनी मातीची भांडी तयार करण्याची कला आत्मसात केली,तर कोणी बांधकामांना हात घालण्याचा प्रयत्न सुरू केला.


या पहिल्या जमातींना अंतराळवीरांबद्दल अगदी जबर लोकविलक्षण असा आदर होता.ते कुठल्या तरी अज्ञात ठिकाणाहून येत होते आणि परत जात होते.

अंतराळयानातून,दैदिप्यमान रथातून संचार करणाऱ्या या अज्ञात अंतराळवीरांनाच पृथ्वीवरील जमातींनी देव मानले.कोणत्या गूढ, रहस्यमय कारणाने ते कळत नाही.

पण आपले ज्ञान पृथ्वीवरील जमातींना द्यायची इच्छा त्या अंतराळवीरांना निश्चित होती.अंतराळवीरांनी त्यांनी निर्माण केलेल्या प्रजेचे सर्व वाईट गोष्टींपासून संरक्षण केले.या समाजाची सुधारणा व्हावी हा त्यांचा कायमचा प्रयत्न होता.जेव्हा जेव्हा चांगला मानव निर्माण करण्याच्या प्रयत्नात विचित्र,अनैसर्गिक नमुने जन्माला आले,त्यांचे प्रयत्न फसले,तेव्हा त्यांचा तात्काळ नाश करण्यात आला.


हा सिद्धान्तही अनेक तर्कावरच आधारित आहे हे मान्य आहे आणि तसा सबळ पुरावा नसल्याने तो संपूर्ण सत्य नसेलही.पण निरनिराळ्या धर्मांच्या सिद्धांतांच्या छायेखाली निरनिराळ्या धर्मांचे लोक सुखाने हजारो वर्षे वावरताना पाहिल्यावर देव हे परग्रहांवरील अंतराळवीरच होते या सिद्धान्ताला तशी थोडी यशाची आशा दिसते.


प्रत्येक धर्म 'सत्य' हे त्याच धर्माच्या शिकवणुकीत आहे असे प्रतिपादन करतो. ईश्वराचा साक्षात्कार घडवून आणणारे तत्त्वज्ञानी, धर्मज्ञ,त्यांच्या गुरुंची,त्यांच्या शिकवणीची भलावण करीत असतात.खरे 'सत्य' त्यांनाच उमगले आहे या गोष्टीवर त्यांचा दृढ विश्वास असतो.

अर्थातच प्रत्येक धर्माला त्याचा इतिहास, त्याचे देव,देवांची वचने,देवांचे प्रेषित आहेत, धर्मगुरू आहेत.खरे म्हणजे कोणत्याही एका धर्माच्या शिकवणुकीतूनच फक्त सत्याचा शोध लागणार आहे ही वृत्ती संपूर्ण पक्षपाती आहे.

आणि तरीही लहानपणापासून आपल्या प्रत्येकाच्या मनावर बिंबवली गेली आहे. तरीसुद्धा पिढ्यान्पिढ्या सत्य फक्त आपल्यालाच गवसले आहे यावर पूर्ण विश्वासाने त्या जगल्या आहेत,जगत आहेत.


पण सत्य ही काही आपण 'पकडू' शकू अशी गोष्ट नाही.आपण त्यावर फक्त विश्वास ठेवू शकतो.


जुनी प्राचीन शहरे,खेडी वगैरे पुराणवस्तू संशोधकांनी शोधून काढली की आपल्याला कळत असतो तिथल्या लोकांचा इतिहास.ही खरी गोष्ट आहे.मेसापोटेमियात बायबलसंबंधी हेच घडत आहे.पण त्यामुळे असे सिद्ध होत नाही की बायबलमधला धर्म हाच त्यांचा धर्म होता किंवा बायबलमधला देवच त्यांचाही देव होता म्हणून! त्यांचा देव एखादा अंतराळवीरच असण्याची शक्यता आहे.


जगात सर्वत्र चाललेल्या उत्खननात जुन्या आख्यायिका त्या त्या काळातील वस्तुस्थिती खरी ठरवीत आहेत.पण एक तरी ख्रिस्ती माणूस खात्रीपूर्वक सांगू शकेल का ? की पेरूमध्ये उत्खननात मिळालेल्या अवशेषांमुळे इंका लोकांच्या आधीच्या ऐतिहासिक काळातील देव हाच ख्रिश्चनांचा एकमेव देव ठरत आहे म्हणून ?


केवळ आजपर्यंतच्या धर्माच्या चौकटीत बसत नाहीत,पिढ्यानपिढ्या ठेवलेल्या अंधविश्वासाला तडा जातो म्हणून कोणत्याही नवीन विचार प्रवाहाकडे दुर्लक्ष करून सत्य कधीच उजेडात येणार नाही.


आपल्या पूर्वजांच्या कारकीर्दीत अंतराळ प्रवास ही कल्पना,हा प्रश्न कधी उद्भवलाच नव्हता. त्याचमुळे त्यांच्याही प्राचीन काळातील पूर्वजांच्या मनात कोणत्या तरी परग्रहावरील अंतराळवीरांनी आपल्याला भेटी दिल्या होत्या असाच विचार निर्माण होण्याची सुतराम शक्यता नव्हती.गेल्या उद्भवलाच नव्हता. त्याचमुळे त्यांच्याही प्राचीन काळातील पूर्वजांच्या मनात कोणत्या तरी परग्रहावरील अंतराळवीरांनी आपल्याला भेटी दिल्या होत्या असाच विचार निर्माण होण्याची सुतराम शक्यता नव्हती. गेल्या ४० वर्षांत आपण जे ज्ञान प्राप्त करून घेतले आहे,जे अनुभव आपण स्वतः घेत आहोत, त्यामुळेच आपल्या मनात असे विचार येत आहेत ही गोष्ट खरी आहे.


समजा की मानवाच्या दुर्दैवाने अणुयुद्ध झालेच आणि आपल्या सर्व संस्कृती नष्ट झाल्या म्हणून. पाच हजार वर्षांनंतरच्या पुराणवस्तू संशोधकांना न्यूयॉर्क येथील स्वातंत्र्य देवतेच्या पुतळ्याचे अवशेष मिळाले.तर आपण आज करीत आहोत तसाच विचार तेही करतील.

पुतळ्याच्या हातातील मशाल बघून त्यांना वाटेल की ती कोणी अग्निदेवता आहे म्हणून! किंवा स्वातंत्र्य देवतेच्या डोक्याभोवतालचे किरण पाहून त्यांना वाटेल की कोणत्या तरी सूर्योपासक लोकांची ती देवता आहे म्हणून! कोणत्याही धर्माशी किंवा कोणत्याही पंथाशी संबंध नसलेला भव्य असा स्वातंत्र्य देवतेचा तो पुतळा होता,ही कल्पना मात्र त्यांच्या मनात येईल अशी अपेक्षा करणे व्यर्थ आहे.


आजपर्यंतच्या धार्मिक शिकवणीवर अंधविश्वास ठेवून भूतकाळातील सत्य बाहेर येऊ शकत नाही.ज्या धोपटमार्गाने आपण विचार करीत होतो त्या मार्गाचा त्याग करण्याचे,जुन्या सर्व गोष्टी सत्यच आहेत हे आंधळेपणाने खरे न मानता आवश्यक तिथे त्यांच्याही बाबतीत संशय दाखविण्याचे धैर्य आता तरी आपल्यात निर्माण व्हायला पाहिजे.डोळे आणि कान बंद ठेवून, बुद्धी गहाण ठेवून कोणत्याही नवीन कल्पना या पाखंडी आहेत,मूर्खपणाच्या आहेत हेच पुनः पुन्हा म्हणत राहून अंतिम सत्याचा शोध लागणार नाही.आणि आजच्या युगात ही गोष्ट आपल्याला परवडणारी नाही.


विचार करा ! पन्नास वर्षांपूर्वी चंद्रावर माणूस उतरेल ही कल्पना करणाऱ्या माणसाला जग वेडेच म्हणत होते की ! 


२ मार्च २०२३ या लेखमालेतील पुढील लेख


११/६/२३

१.२ पाश्चिमात्य वैद्यक : ग्रीस

ख्रिस्तपूर्व काही शतकांच्या दरम्यान भारतात आयुर्वेदानं चांगलीच प्रगती केली होती.पण याच वेळी पाश्चिमात्य देशांमध्ये आणि नंतरच्या काळात काही प्रमाणात भारतामध्येही सगळं विश्व हे सर्वशक्तिमान देवाच्या इच्छेनुसार आणि नियंत्रणानुसार चालतं ही समजूत मूळ धरायला लागली होती.त्यामुळे माणूस समोर दिसणाऱ्या जिवंत गोष्टींचं निरीक्षण करण्याऐवजी ध्यानधारणा,

भक्ती आणि उपासनेतून न दिसणाऱ्या अज्ञात देवाचा शोध घेत होता.या गोष्टींमध्ये सगळ्याच धर्मांतले धर्मगुरू,

साधू,संत आणि भोंदू बाबा आघाडीवर होते आणि सर्वसामान्य माणसांनी त्यांनी दाखवून दिलेल्या वाटेवरूनच जाणं अपेक्षित होतं.यामुळेच मग जो माणूस विज्ञानाची कास धरेल त्याला वाळीत टाकलं जाणं स्वाभाविकच होतं. त्यावेळच्या कायद्यानुसार विज्ञानवादी लोक पापी होते. त्यामुळे साहजिकच कोणत्याही गोष्टीचा असा अभ्यास करणारे लोक आणि त्यांच्या अभ्यासातून आलेली निरीक्षणं आणि निष्कर्ष कुणीही जपून ठेवायचा प्रयत्न केला नाही.


याला अपवाद म्हणजे प्राचीन ग्रीक लोकांनी हे बदलायचा प्रयत्न केला.ग्रीक लोक मुळातच कुतूहल असणारे,

बडबडे,वाद-चर्चा करणारे, हुशार,चुळबुळे आणि हे कधीकधी असंबद्ध वाटावेत असे होते! ग्रीकांमध्येही अनेक धार्मिक रूढी, परंपरा आणि अनेक देवदेवता होत्या. गंमत म्हणजे जगातल्या सगळ्याच धर्मांत अनेक खुळचट परंपरा आणि अंधश्रद्धा असूनही जगातल्या प्रत्येकच माणसाला आपलाच धर्म योग्य,लॉजिकल आणि प्रगत वाटतो! हिंदूंमध्ये देवीच्या कोपामुळे देवी हा रोग होतो.अशी समजूत होती तशीच ग्रीकांमध्ये अपोलो नावाच्या देवतेच्या कोपामुळे माणसाला रोग होतात अशी धारणा होती! त्यामुळे त्या त्या देवतेची पूजाअर्चा केल्यानं, तिला नैवेद्य दिल्यानं किंवा बळी चढवल्यानं रोग बरा होतो अशा अनेक समजुती जनमानसात घट्ट रुजल्या होत्या.


विशेष म्हणजे अशा पार्श्वभूमीवर त्याही काळात ग्रीकांमध्ये काही चांगले तत्त्ववेत्ते निर्माण व्हायला सुरुवात झाली आणि हळूहळू हे चित्र बदलायला लागलं.


 ख्रिस्तपूर्व ६०० मध्ये त्या काळातल्या आयोनियामध्ये म्हणजेच आताच्या तुर्कीमध्ये येणाऱ्या एजियन बेटांच्या भागांत अनेक तत्त्वज्ञ होऊन गेले.या लोकांनी अंधश्रद्धेचा पगडा झुगारून निखळ ज्ञान जगापुढे आणण्याचा मार्ग स्वीकारला.या सगळ्याची सुरुवात थेल्स या तत्त्वज्ञापासून होते.


थेल्स ऑफ मिलेट्स हा ख्रिस्तपूर्व सातव्या आणि सहाव्या शतकात होऊन गेलेला गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ होता.आजच्या तुर्कस्तानात तो राहात होता. त्याला वेगवेगळ्या वस्तू स्वतः तयार करून पाहायला आवडायच्या, त्यानं त्या काळी सूर्यग्रहणाचं आधीच भाकीत केलं होतं.हे जग कशाचं बनलेलं आहे? याचं उत्तर दैवी गोष्टींत नाही तर निसर्गनियमांमध्ये शोधा असा वैज्ञानिक दृष्टिकोन मांडणारा पाश्चिमात्य जगात तो पहिलाच तत्त्वज्ञ होता. आज आपल्याला या विचारामध्ये प्रचंड महत्त्वाचं काही वाटणारही नाही.पण या अचाट विश्वात फेकल्या गेलेल्या माणसानं पहिल्यांदाच भूतंखेतं, देवदेवता वगैरेंपेक्षा कारणमीमांसेनं या विश्वाच्या अस्तित्वाचा अर्थ लावायचा प्रयत्न केला होता हे त्या काळी खूपच धाडसाचं आणि विद्वत्तेचं होतं. ख्रिस्तपूर्व ५४६ साली भरलेले ऑलिम्पिक्स गेम्स बघताना त्याचा मृत्यू झाला.यानंतर ३० च वर्षांनी इथेच पायथॅगोरसचा जन्म झाला. त्यानंतर ३०० वर्षांनी युक्लिडचा जन्म झाला.


 थेल्सला ग्रीक परंपरेतला पहिला तत्त्वज्ञ म्हटलं जातं.दुर्दैवानं थेल्सनं स्वतः लिहिलेलं काहीही साहित्य आज उपलब्ध नाही.


प्रत्येक गोष्ट ही कोणत्या देवतेच्या इच्छेनुसार न होता कोणत्यातरी विशिष्ट कारणामुळे होते हे या ग्रीक तत्त्वज्ञांनी मांडलं आणि इथूनच विज्ञानाच्या पायाभरणीला सुरुवात झाली.यातूनच हे विश्व कसं निर्माण झालं?दिवस आणि रात्र कसे निर्माण होतात ? गतीला नियम आहेत का? अशा मूलभूत प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न सुरू झाला.या प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न करणारे हे पहिले काही ग्रीक तत्त्वज्ञ आणि त्यांनी केलेलं बरंचसं काम आज नामशेष झालंय. यापैकी काही लोकांची नावं आणि त्यांची काही मध्यवर्ती तत्त्वं इतिहासाला ज्ञात आहेत. यापैकी रॅशनॅलिझम (तर्कसंगतता) हे एक तत्त्व आहे. विश्व कसं चालतं याची आपण कारणमीमांसा करू शकतो असं तत्त्व नॅशनॅलिझममध्ये मांडलं आहे. त्या वेळी अस्तित्वात असलेली रोमन साम्राज्यंही नष्ट झाली,पण या तत्त्वज्ञांची नावं आणि शिकवण आजही पुनरुच्चारित केली जात. 


आयोनिया


आयोनियामध्ये असा एक माणूस होता, की ज्यानं प्राण्याच्या उपयोगापेक्षा प्राण्याच्या शरीराच्या आत नेमकं काय असतं आणि कोणता अवयव कसा काम करतो हे शोधण्यासाठी पहिल्यांदाच एक प्राणी काळजीपूर्वक कापला आणि त्यानं त्या प्राण्याचं निरीक्षण करायला सुरुवात केली.याच क्षणी कत्तलेचं रूपांतर शरीरविच्छेदनात (डिसेक्शन) आणि त्या माणसाचं रूपांतर पहिल्या बायॉलॉजिस्टमध्ये झालं.

आणि त्याच वेळी रॅशनॅलिझमनं पहिल्यांदा बायॉलॉजीत प्रवेश केला! आयोनियामधल्या या माणसाचं नाव होतं,अल्केमॉन!


ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकात होऊन गेलेल्या या अल्केमॉननं प्राण्याच्या डोळ्यांतल्या नव्हेजचं वर्णन करून ठेवलं आहे.त्यानं अंड्यात वाढणाऱ्या कोंबडीच्या पिलाचं निरीक्षण करून त्याबद्दल लिहून ठेवलं आहे. यामुळेच तो अॅनॅटॉमीचा आणि एंब्रियॉलॉजीचा पहिला विद्यार्थी मानला जातो. अल्केमॉननं कानापासून घशाला जोडणाऱ्या बारीक नळीचंही (युस्टेशियन ट्यूब) वर्णन करून ठेवलं आहे.याचा शोध तर सोळाव्या शतकातल्या बार्टोलोमियो युस्टॅशी यानं लावला असं आपल्याला माहीत असतं. पण खरं तर अनेक वर्ष अल्केमॉनचं हे ज्ञान हरवलं होतं आणि ते तब्बल दोन हजार वर्षांनी पुन्हा सापडलं !


तरीही तर्कसंगत (नॅशनॅलिस्टिक) बायॉलॉजीची सुरुवात खऱ्या अर्थानं केली ती हिप्पोक्रॅट्सनं. हिप्पोक्रॅट्सचा जन्म ख्रिस्तपूर्व ४६० मध्ये ग्रीसमधल्या कॉस बेटावर झाला.कॉसच्या बेटावर अस्क्लेपियस नावाच्या ग्रीक आरोग्यदेवतेचं मंदिर होतं. त्या काळचं ते मंदिर म्हणजे आजच्या मेडिकल कॉलेजसारखंच होतं. आणि तिथं शिकणारे प्रिस्ट्स हे आजच्यासारखे वैद्यकीय ज्ञान घेऊन बाहेर पडणारे डॉक्टर्सच असायचे!


यात हिप्पोक्रॅट्सनं मोलाची भर घातली. त्या वेळच्या अस्क्लेपियस मंदिराला हिप्पोक्रॅट्सनं खूप मोठ्या सन्मानपूर्वक पदावर नेऊन पोहोचवलं. पण हे करताना त्यानं अंधश्रद्धा किंवा देवभोळा ढोंगीपणा बाजूला सारून पूर्णपणे तार्किक दृष्टिकोन निर्माण केला. हिप्पोक्रॅट्सच्या मते निरोगी माणसाच्या शरीरात सगळे अवयव सुसंगतपणे वागत असतात.पण जेव्हा माणूस आजारी पडतो तेव्हा हा समतोल ढासळलेला असतो. त्या वेळी अशा माणसाला शुद्ध हवा,साधं सात्त्विक अन्न आणि विश्रांती हे सगळं देऊन त्याच्या शरीरातला ढासळलेला समतोल पुन्हा पूर्वपातळीवर आणणं हे वैद्यकाचं काम आहे असं हिप्पोक्रॅट्सचं म्हणणं होतं. ख्रिस्तपूर्व ४०० दरम्यान त्यानं 'ऑन द सॅक्रिड 'डिसीज' नावाचं पुस्तक लिहिलं. त्यात त्यानं 'कोणताही रोग होण्याशी देवदेवतांचा किंवा भूताखेतांचा काहीही संबंध नसतो. रोग होण्याला काहीतरी कारण नक्कीच असतं आणि प्रत्येक रोगाला काहीतरी उपचारही असलेच पाहिजेत' ठासून सांगितलं आहे.अर्थात,अनेक रोगांची कारणं आणि त्यावरचे उपाय त्या वेळी माहीत नसले तरी त्याही रोगांच्या उपचारावर हेच तत्त्व लागू पडतं हे त्यानं ठासून सांगितलं आहे.


थोडक्यात, त्यानं 'आपलं शरीर स्वतःच स्वतःला बरं करायचा प्रयत्न करत असतं आणि आपण त्या शरीराला बरं होण्यासाठी योग्य वातावरण निर्माण केलं पाहिजे' असं सुचवलं. हिप्पोक्रॅट्सनं नंतर स्वतःच एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू केलं. त्याच्या मृत्यूनंतरही ते अनेक शतकं चालू राहिलं. गंमत म्हणजे त्या काळातल्या डॉक्टर्सवर हिप्पोक्रॅट्सचा इतका प्रभाव होता, की त्याच्या मृत्यूनंतर काही वर्षांनी किंवा शतकांनी

इतरांनी लिहिलेल्या कागदपत्रांवर आणि पुस्तकांवरही त्याचंच नाव घातलं गेलं होतं ! 


आज प्रत्येकाला वैद्यकाची पदवी मिळते तेव्हा जी हिप्पोक्रॅट्स ओथ (शपथ) घ्यावी लागते तीही मुळी हिप्पोक्रॅट्सनं लिहिलेलीच नाहीये! त्याच्या मृत्यूनंतर ती किमान सहा शतकांनी ती लिहिली गेली असं लक्षात आलंय.गेल्या हजारो वर्षांमध्ये त्या शपथेत अनेक बदल झालेले असले,तरी आजही प्रत्येक डॉक्टरला या व्यवसायात पडण्यापूर्वी ही शपथ घ्यावी लागते. 


त्या मूळच्या शपथेचा सारांश असा : मी अपोलो देवतेची शपथ घेऊन सांगतो, की मी माझ्या वैद्यकीय व्यवसायाशी अतिशय प्रामाणिक राहीन. तसंच मी हे काम करत असताना ज्या ज्या लोकांशी माझा संबंध येईल त्या सर्वांशी मी सहानुभूतीनं वागेन. मी भ्रष्टाचार करणार नाही.मी माझ्या ज्ञानाचा वापर फक्त आजारी माणसांना बरं करण्यासाठी करेन.मी कुणालाही कधीही विषारी औषध देणार नाही.मी कुठल्याही स्त्रीला तिच्या गर्भाचा नाश होण्यासाठी कधीही कुठलंही औषध देणार नाही.मी रुग्णांच्या खासगी बाबींविषयी किंवा त्यांच्या आजारांविषयी दुसऱ्यांशी उगीच चर्चा करणार नाही.मी कोणत्याही घरात गेलो तर तिथे मी रुग्णाला बरं करण्याचा सर्वतोपरीनं प्रयत्न करेन.मी जाणूनबुजून काहीही वेडंवाकडं करणार नाही.


हिप्पोक्रॅट्सच्या नावावर इतकं लिखाण प्रसिद्ध झालं,की ते सगळं काम त्यानं एकट्यानं केलेलं असणं शक्यच नाही असं अनेकांचं मत आहे. किंबहुना त्यातला बराच भाग त्याचे विद्यार्थी आणि हिप्पोक्रॅट्सचे समकालीन असलेल्या समविचारी डॉक्टर्सनी लिहिलेला असला पाहिजे, असं म्हटलं जातं.त्याच्या नावावर इतकं लिखाण प्रसिद्ध आहे,की हिप्पोक्रॅट्सनं एकट्यानं ते करायला १०४ वर्ष लागली असती ! 


हिप्पोक्रॅट्स नावाचे सात जण एकाच कुटुंबात होते आणि त्या सगळ्यांनी मिळून हे काम केलेलं होतं असाही एक समज आहे! 


हिप्पोक्रॅट्स किती साली वारला याविषयीही गोंधळ आहे.काहीजणांच्या मते तो वयाच्या ८३ व्या वर्षी वारला,तर काही जणांच्या मते वयाच्या ९० व्या वर्षी.काही जण तर तो १०० वर्षांपेक्षा जास्त वयाचा असताना वारला असं मानतात.


दुसरी गोष्ट म्हणजे हे लिखाण हिपोक्रॅटसनंच लिहिलं असावं असं लिखाण चक्क एपिलेप्सी, म्हणजे फिट्स किंवा अपस्मार या आजाराबाबत बद्दल सापडतं.या आजारात रुग्णाचा स्वतःच्या स्नायूंवरचा ताबा जातो आणि बघणाऱ्याला विचित्र वाटावेत असे झटके रुग्णाला यायला लागतात. यात हा रुग्ण स्वतःच्या इच्छेन अशा हालचाली करत नाहीये हे स्पष्ट कळतं.मग अशा वेळी हे नक्की भूतबाधा किंवा तशाचकसल्यातरी दैवी गोष्टीचा

परिणाम असावा यावर त्या वेळच्या कुणाचाही विश्वास बसला असता.शिवाय हा मेंदूचा किंवा नव्र्व्हस सिस्टिमचा आजार असावा असे त्या काळी कुणालाही कळणं शक्यच नव्हतं.


अशा परिस्थितीत हिप्पोक्रॅट्सनं लिहिलेलं वर्णन,

त्यातला तर्क आणि सुसंगतपणा पाहिला की हिप्पोक्रॅट्स खरोखरच विज्ञानाच्या वाटेवरचा पहिल्या काही वाटसरूंमधला एक होता याची खात्रीच पटत जाते. 


या सगळ्यामुळे एखाद्याला आधुनिक बायॉलॉजीची सुरुवात कधी झाली याबद्दल एकच माणूस,एकच पुस्तक आणि एकच तारीख हवी असेल तर त्याचं उत्तर ख्रिस्तपूर्व ४०० मध्ये हिप्पोक्रॅट्सनं लिहिलेलं 'ऑन द सॅक्रिड डिसीज' हे असेल.! त्यामुळेच इतिहासात हिप्पोक्रॅट्सचा उल्लेख अनेकदा वैद्यकशास्त्राचा जनक म्हणून केला जातो.


हिप्पोक्रॅट्सच्या मते माणसाच्या विचारांचे तीन भाग पाडता येतात.वैचारिक गोष्टी माणसाच्या मेंदूत घडतात,

आत्मा माणसाच्या हृदयात असतो आणि विविध प्रकारच्या संवेदना आणि जाणिवा माणसाच्या यकृतात असतात.हिप्पोक्रॅट्सच्या अगोदर ख्रिस्तपूर्व ४९० ते ४३० मधल्या एम्पेडोकल्सनं म्हणून ठेवलं होतं,की जगातल्या सगळ्या गोष्टी आग,हवा,जमीन आणि पाणी या चार मूळ घटकांपासून बनलेल्या असतात.मग ती गोष्ट कुठलीही असू द्या,अगदी दगडासारखी साधी वस्तू असो की माणसाच्या शरीरासारखी विलक्षण क्लिष्ट बाब! अर्थातच, नंतर यात काही तथ्य नाही हे कळणार होतं.पण ते कळायला अनेक शतकांचा कालावधी पार करणं भाग असणार होतं.


एखाद्या रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरला त्या रुग्णाविषयी सगळी माहिती असली पाहिजे असं हिप्पोक्रॅट्सला वाटे.त्याच्या खाण्याच्या सवयी,तो राहतो तिथला परिसर,तो कुठे आणि काय काम करतो,वगैरे. ही खरंच महत्त्वाची कल्पना होती.आणि हे हिप्पोक्रॅट्सला त्या काळी सुचणं हेही खरंच ग्रेट होतं! पण त्या काळी ज्ञानाला मर्यादा होत्या.उदाहरणार्थ,


ज्या भागात मलेरियाची साथ यायची तिथं बहुधा ओलसर भाग असे आणि त्यात अनेक छोट्या छोट्या वनस्पती उगवलेल्या असायच्या,हे कळायचं. पण तिथं डासांची वाढ जास्त सुकर होते हे मात्र हिप्पोक्रॅट्सला उमगलेलं नव्हतं.त्यामुळे वनस्पती आणि रोग यांचाच काहीतरी संबंध असला पाहिजे असं त्याला वाटे!


 त्यातून गोंधळ म्हणजे हिप्पोक्रॅट्सचा ज्योतिषावर गाढ विश्वास होता.सूर्य,चंद्र,तारे आणि ग्रह यांच्या फिरण्याचा वगैरे मानवी आरोग्यावर खूप परिणाम होतो असं त्याला वाटे. किंबहुना ज्या डॉक्टरचा ज्योतिषावर विश्वास नाही त्याला डॉक्टर मानताच कामा नये,असं तो म्हणे.पण त्याचबरोबर धार्मिकतेचा आणि देवाचा आरोग्याशी काहीही संबंध नसतो असंही त्याला वाटे.त्या काळात त्याला असं वाटणं हे जबरदस्तच होतं।


हिप्पोक्रॅट्सचा ह्युमरिझम नावाच्या संकल्पनेवर दृढ विश्वास होता. या संकल्पनेनुसार माणसाच्या यकृतात चार प्रकारचे द्रव किंवा रस निर्माण होत असतात.त्यांचे रंग वेगवेगळे असतात. त्यांच्यापैकी रक्त हे लाल द्रव माणसाला जिवंत बनवतं.पिवळं द्रव माणसाला शूर बनवतं.काळं द्रव माणसाला उदास बनवतं.पिवळा किंवा हिरवा कफ माणसाला मंद करून सोडतो. प्रत्येक माणसाच्या शरीरात हे चारही द्रव असतात,आणि त्यांच्या मिश्रणानुसार माणसाचा स्वभाव आणि त्याचं आरोग्य या गोष्टी ठरतात. जेव्हा हे चार द्रव योग्य प्रमाणात मिसळलेले असतात तेव्हा माणसाचं सगळं ठीकठाक सुरू असतं.पण जेव्हा त्यांचं प्रमाण बिघडतं तेव्हा माणूस आजारी पडतो.

आज हे सगळं वाचून आपल्याला गंमत वाटली तरी हजारो वर्ष ही ह्युमरिझमची संकल्पना अतिशय लोकप्रिय होती.!


११ जानेवारी २०२३ लेखमालेतील पुढील लेख..




९/६/२३

बायबल - येशू ख्रिस्त (इ.स.पू.पहिलं शतक)

'बायबल' हा परमेश्वराच्या प्रेरणेतून निर्माण झालेला ग्रंथ समजला जातो.हा ग्रंथ ख्रिश्चन धर्माला प्रेरित करणारा,

धर्माची मूलतत्त्वं काय आहेत आणि परमेश्वर हा तारणकर्ता कसा आहे हे सांगणारा आहे.परमेश्वराचं अस्तित्व,त्याचं प्रकटीकरण कधी आणि कसं झालं याबद्दल या ग्रंथात विवेचन केलं आहे.जगभरात या ग्रंथाची सर्वाधिक विक्री झालेली आहे.लिओनार्दो दा व्हिंचीचं 'द लास्ट सपर' आणि मायकेल अँजेलोचं 'क्रिएशन ऑफ अॅडम' ही चित्रं बायबलवरच आधारित होती.


बायबल' हा ख्रिश्चन लोकांचा धर्मग्रंथ आहे. बायबलचा अर्थ 'ग्रंथसंग्रह' असा होतो. याच ग्रंथाला 'पवित्र शास्त्र' असंही म्हणतात. 'ता बिब्लिया' या मूळ ग्रीक शब्दांवरून 'बायबल' हा शब्द इंग्रजीत रूढ झाला असं मानण्यात येतं. बिब्लिया या शब्दाचा अर्थही अनेक पुस्तकांचा संग्रह असाच होतो.बायबल दोन भागांमध्ये असून पहिल्या भागाला 'जुना करार (ओल्ड टेस्टामेंट)', तर दुसऱ्या भागाला 'नवा करार (न्यू टेस्टामेंट)' असं म्हणतात. जुना करार हा ज्यू म्हणजेच यहुदी लोकांचा धर्मग्रंथ मानला जातो. बायबलमध्ये एकूण ११८९ प्रकरणं म्हणजे चॅप्टर्स आहेत.त्यातल्या जुन्या करारामध्ये ३९ पुस्तक (बुक्स) आणि ९२९ प्रकरणं, तर नव्या करारामध्ये २७ पुस्तक (बुक्स) आणि २६० प्रकरणं आहेत. त्यातलं साम ११९ हे सगळ्यात मोठं प्रकरण आहे, तर साम ११७ हे सगळ्यात लहान प्रकरण आहे. बायबलमध्ये एकूण ६११०० शब्द आहेत. दरवर्षी बायबलच्या १० लाख प्रती खपतात.चीनमध्ये बायबलची सगळ्यांत जास्त छपाई होते! पण जगामध्ये सगळ्यात जास्त चोरीला जाणारं पुस्तकही बायबलच आहे.! बायबल लिहायला ४० लोकांनी मदत केली. 'तू व्यभिचार (अॅडल्ट्री) करणार नाहीस' अशा ऐवजी १६३१ साली छापलेल्या बायबलमध्ये चुकून 'तू व्यभिचार करशील' असं छापलं गेल्यामुळे या बायबलला 'व्यभिचारी' किंवा 'पाप्यांचं बायबल' असं म्हटलं गेलं. या बायबलच्या बऱ्याचशा प्रती नष्ट करण्यात आल्या, पण काही 'कलेक्टर्स आयटम्स' बनल्या. त्यांची किंमत आज १ लाख डॉलर्स इतकी आहे.जुना करार लिहायला जवळजवळ १००० च्या वर वर्ष लागली,तर नवा करार ७०-७५ वर्षांत तयार झाला! 'बायबल' मध्ये ६००० भविष्यवाणी केल्या आहेत.आजही 'बायबल' वर हात ठेवून न्यायालयात खरं बोलण्याची प्रथा अनेक ठिकाणी आहे. 'बायबल' मधला शेवटचा शब्द 'आमेन' म्हणजे 'तथास्तु' हा आहे.


ज्यू लोकांच्या आयुष्यात परमेश्वरानं ख्रिस्ताचं आगमन होण्यापूर्वी कोणतं कार्य केलं याची माहिती जुन्या करारात मिळते.तसंच विश्वाच्या निर्मितीपासून ते ज्यू लोकांच्या इतिहासाबद्दल सर्व काही जुन्या करारात वाचायला मिळतं. बायबलमधल्या जुन्या कराराला ३००० वर्षांपेक्षा जास्त वर्ष झाली आहेत. ख्रिश्चन धर्मामध्येही दोन गट होते.एक कॅथलिक गटातले लोक,तर दुसरे प्रोटेस्टंट गटातले लोक. ख्रिश्चन धर्माच्या उदयाआधी येशू ख्रिस्त आणि त्यांचे अनुयायी हे यहूदी (ज्यू) धर्माचे होते.


नव्या करारात येशू ख्रिस्तासंबंधी माहिती आहे. नव्या कराराला २००० वर्षं झाली आहेत.यात येशू ख्रिस्ताचा जन्म,त्याचं आयुष्य,त्याची शिकवण,त्याच्या आयुष्यातली संकट आणि त्याचा क्रूसावर झालेला मृत्यू या सगळ्यांचा इतिहास वाचायला मिळतो.


बायबलच्या जुन्या करारामध्ये काय आहे? जग जेव्हा निर्माण झालं तेव्हा अॅडम आणि इव्ह हे पहिले स्त्री-पुरुष (मानव) कसे निर्माण झाले यांची एक गोष्ट सांगितली आहे.हे दोघं निर्माण होण्याचा काळ २० लाख वर्षांपेक्षाही जास्त जुना आहे. बायबलप्रमाणे हे जग ६००० ते ८००० वर्षांपूर्वी निर्माण झालं.त्या काळाला 'पेबल कल्चर' असंही संबोधलं जातं.यानंतर अब्राहमची कथा येते.

अब्राहम आपली पत्नी सारा हिच्यासह इस्त्रायल आणि तेव्हाचं कनान इथं (आताचं इराक) आला. त्या दोघांना मूल नव्हतं, मात्र त्याची दासी हागार हिच्यापासून त्याला इश्माएल नावाचा मुलगा झाला. पुढे अनेक वर्षांनी सारालाही इसहाक नावाचा मुलगा झाला. साराच्या छळाला कंटाळून हागार आपला मुलगा इश्माएल याला घेऊन अरबस्तानात निघून गेली. इसहाकपासून पुढे यहुदी (ज्यू) जमात आणि इश्माएलपासून अरबी जमात निर्माण झाली.इसहाक याला इसाब आणि याकोब अशी दोन मुलं झाली.इथून पुढे या जमातींचा वंश विस्तारतच गेला.आजच्या अरब-इस्रायल वादाचं मूळ इतकं जुनं आहे!


तिथे असणाऱ्या हिब्रू भाषिक लोकांनी मोशे नावाच्या व्यक्तीला आपला नेता म्हणून निवडलं. प्रत्यक्ष परमेश्वर त्याला आदेश देतो,अशी त्यांची समजूत होती.मोशेला सिनाय नावाच्या पर्वतावर परमेश्वराकडून दहा आज्ञा (टेन कमांडमेंट्स) मिळाल्या. यावरचा 'टेन कमांडमेंट्स' हा चित्रपट खूप गाजला होता.या आज्ञा बायबलमध्ये खूप प्रसिद्ध आहेत.सिनायच्या वाळवंटात या दहा आज्ञांच्या कराराचा कोश करण्यात आला आणि हिब्रू लोकांनी तो पाळणं बंधनकारक समजलं गेलं. काही काळानं मोशेचं निधन झालं.


नव्या कराराची गोष्ट आणखीनच विलक्षण आहे. इ.स. च्या सुमाराला पॅलेस्टाइन देशावर रोमन सत्तेचा ताबा होता. हेरोद हा त्या प्रदेशांवर राज्य करत होता. त्याला दहा बायका होत्या. त्यातली मरियम ही त्याची आवडती बायको होती. हेरोद कर्तव्यदक्ष असला तरी अत्यंत क्रूर आणि हलक्या कानाचा होता. त्याच्या बहिणीनं असूयेपोटी मरियमविरुद्ध हेरोदचे कान भरले आणि ते ऐकून हेरोदनं मरियम,तिची आई आणि आपली दोन मुलं अरिस्तंबुलास आणि अॅलेक्झांडर यांना ठार मारलं.


येशूचा जन्म झाला तेव्हा त्याला आपला प्रतिस्पर्धी समजून हेरोदनं त्या वेळी जी मुलं जन्मली होती आणि दोन वर्षांहून लहान होती त्यांनाही ठार मारलं.येशूच्या अनुयायांनी या सगळ्या घटना संकलित करून त्याची मांडणी केली.यालाच 'नवा करार' म्हणतात.येशू ख्रिस्त आणि त्यांचे शिष्य हे यहुदी (ज्यू) होते आणि 


त्या काळी धार्मिक नीतिनियमांचं खूपच अवडंबर माजलं होतं. येशू ख्रिस्ताचा अशा धार्मिक कर्मकांडाला विरोध होता.चांगल्या परोपकारी

कामांसाठी त्याचा विरोध नव्हता. त्यामुळेच त्यानं मानवतेच्या दृष्टिकोनातून जगण्याचे नियम करण्याचा आणि सांगण्याचा प्रयत्न केला.


येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून इसवीसन ही कालगणना सुरू झाली असं मानल जात. मेरी आणि जोसेफ यांचा येशू ख्रिस्त मुलगा ! त्याचा जन्म नेमका कधी झाला याबद्दल एकवाक्यता नाही. काहींच्या मते त्याचा जन्म इ.स.पूर्व मध्ये बेथलहेममध्ये झाला. २५ डिसेंबर हा येशूचा जन्मदिवस मानला जातो आणि नाताळ म्हणून तो जगभर साजरा करण्यात येतो.जोसेफ सुतारकाम करत असे.येशूचा जन्म हेरॉड द ग्रेट याच्या शासनकाळात झाला.जन्मलेल्या मुलापासून आपल्याला धोका असल्याचं समजल्यामुळे त्यानं दोन वर्षांखालील सगळ्या मुलांना ठार मारण्याचा आदेश दिला होता. मात्र एका देवदूतानं जोसेफला या धोक्याची पूर्वसूचना दिल्यामुळे त्यानं आपल्या कुटुंबाला घेऊन तिथून इजिप्तला हेरॉडचा मृत्यू होईपर्यंत स्थलांतर केलं होतं. हेरॉडचा मृत्यू झाल्यानंतर जोसेफ आपल्या कुटुंबाला घेऊन गॅलिलीमधल्या नाझरथ या गावात वास्तव्याला आला. खरं तर ख्रिश्चन लोक येशूला परमेश्वराचा अवतार मानतात. लोकांनी केलेल्या पापांसाठी त्यानं मरण पत्करलं,असं म्हटलं जातं.येशूच्या सुरुवातीच्या काळाबद्दल मॅथ्यू,मार्क,ल्यूक आणि जॉन यांनी लिहून ठेवलं होतं.


१२ वर्षांचा असताना येशू आपल्या आई- वडिलांबरोबर जेरुसलेमच्या यात्रेला गेला आणि तिथेच तो त्यांच्यापासून वेगळा झाला.अनेक दिवसांनी तो जेरुसलेममधल्या ज्येष्ठांबरोबर चर्चा करत असताना एका मंदिरामध्ये आढळला. येशून काही काळ सुतारकाम केल्याचेही उल्लेख सापडतात.मात्र वयाच्या ३० व्या वर्षी जॉन बॉप्टिस्ट यानं त्याचा बाप्तिस्मा केला आणि त्याच वेळी त्यानं येशू परमेश्वराचा पुत्र असल्याचं जाहीर केलं.हा बाप्तिस्मा झाल्यानंतर येशूने यहुदींच्या वाळवंटात जाऊन ४० दिवस आणि ४० रात्री उपवास करण्यात घालवल्या.


असं म्हटलं जातं की तीन वेळा राक्षस किंवा सैतानानं येशूला वेगवेगळी प्रलोभन दाखवली. एकदा दगडाचं रूपांतर ब्रेडमध्ये करता येईल म्हणून,तर दुसऱ्यांदा तो कितीही उंच पर्वतावरून खाली खोल दरीत कोसळला तर त्याला देवदूत वाचवतील म्हणून,तर तिसऱ्यांदा जगातल्या सगळ्या राज्यांवर तो आपली सत्ता गाजवू शकतो म्हणून पण येशून तिन्ही वेळेस ही प्रलोभनं नाकारली.


त्यानंतर येशू गॅलिलीमध्ये परतला आणि त्यानंतर त्याने अनेक आसपासची पिंजून काढली. या काळात अनेकांनी त्याचं शिष्यत्व पत्करलं. त्यात 


मेरी मेग्डलीन हीदेखील त्याची निस्सीम शिष्या होती.तिने अखेरपर्यंत येशूला साथ दिली.


पॅलेस्टाइन या भागातला सगळा परिसर येशून पिंजून काढला होता.त्याची प्रवचन ऐकण्यासाठी लोक दुरून दुरून येत असत.येशू मानवजातीला पापातून मुक्त करण्यासाठी आला आहे,असं बायबलमध्ये म्हटलं आहे.

येशूची कीर्ती आणि शिष्य दिवसेंदिवस वाढतच गेले.तसंच त्याच्या चमत्कारांनी गरीब,दीनदुबळ्या लोकांचे आजार बरे होऊ लागले,त्यांची संकट दूर होऊ लागली. येशूची कीर्ती सर्वदूर पसरल्यानं तत्कालीन सत्ताधारी चिडले आणि त्याला वयाच्या ३३ व्या वर्षी क्रूसावर चढवून खिळे ठोकून ठार मारण्यात आलं. त्याचं दफन करण्यात आलं.

मृत्यूपूर्वी येशूनं आपल्या बारा शिष्यांसह जे भोजन केलं, त्याला 'लास्ट सपर म्हटलं जातं.या वेळी त्याने आपल्या शिष्यांना उपदेश केला,असं म्हटलं जातं.


येशूला दफन केल्याच्या तीन दिवसांनंतर ज्या ठिकाणी त्याचं दफन करण्यात आलं होतं,ती जागा रिकामी असल्याचं आढळून आलं.


त्याच दिवशी येथून आपली शिष्या मेरी मेग्डलीन आणि आपली आई मेरी हिला दर्शन दिलं. ४० दिवसांनंतर येथून जेरुसलेमच्या पूर्वेकडे असलेल्या ऑलिव्हेट पर्वतावर आपल्या शिष्यांची भेट घेतली.एका ढगाद्वारे स्वर्गात जाण्यापूर्वी येथून आपल्या शिष्यांना आपण आता पवित्र आत्मा झालो असून मानवतेसाठी प्रयत्नशील राहू,असं सांगितलं.


'बायबल' मध्ये सांगितल्यानुसार खूप खूप पूर्वी या जगात अंधार,अन्याय असं काहीही नव्हतं; पण कालांतरानं लोकांमधली राक्षसी वृत्ती आणि अहंकार वाढला गेला आणि त्यामुळे जगभरात अंधार पसरला.या अंधाराला प्रत्यक्ष परमेश्वरानं बांधून ठेवलं आणि पृथ्वीवरचा पहिला मानव ज्याला म्हटलं जातं त्या आदमला पृथ्वीचा राजा बनवलं.मात्र आदमला सैतानानं गोड बोलून पाप करायला भाग पाडलं आणि तेच पाप संपूर्ण मानवजातीत पसरलं.

यामुळे सगळे लोक मृत्युमुखी पडले.त्यामुळे परमेश्वरानं जलप्रलय घडवून आणला आणि पापाचा विनाश केला. त्यानंतर परमेश्वरानं पुन्हा पृथ्वीची निर्मिती केली आणि पृथ्वीवर ऋतू निर्माण केले. त्या त्या ऋतूंचा कालावधीपण निश्चित केला. या ऋतूनुसार परमेश्वरानं माणसाकडे लक्ष ठेवलं. 


अब्राहमच्या काळात लोक सुळावर चढून परमेश्वरासाठी स्वतःचा बळी देत. ही प्रथा जवळजवळ मुसा नबीच्या काळापर्यंत म्हणजेच येशू ख्रिस्त जन्मण्याआधी यासाठी १२०० वर्ष सुरू राहिली. येशू ख्रिस्ताचा जन्म झाल्यानंतर लोकांना न्याय मिळावा तो वारंवार परमेश्वराच्या संपर्कात राहिला त्या पीडित लोकांच्या जीवनात येथून अंधार दूर करून आशेचा किरण आणला. त्यामुळे आजही ख्रिश्चन लोक येशू ख्रिस्ताच्या माध्यमातून परमेश्वराशी संपर्क साधतात आणि आपल्या सुखी जीवनाची अपेक्षा करतात.


 बायबलमध्ये येशू ख्रिस्ताची शिकवण दिली आहे.

त्यानुसार यशू म्हणतो, 'सत्य, मार्ग आणि जीवन म्हणजे मीच आहे.मीच जीवनात भूक मिटवणारं अन्न आहे.मी जगताना लागणारं पाणी आहे.मी या जगातला आशेचा किरण आहे.मी एक चांगला जगनियंता आहे.मी पहिला आणि शेवटचा अल्फा आणि ओमेगा आहे. मी या जगाचा आरसा आहे.'


इ. स. ३० ते ५० या कालावधीत येशू ख्रिस्ताच्या विचारांचा त्याचे अनुयायी मौखिक स्वरूपात प्रसार करत होते. त्यानंतर ते एकत्रित करून लिखित स्वरूपात मांडलं गेलं. येशू ख्रिस्त म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराचाच अवतार असून त्यानं माणसाचा जन्म घेऊन वाट्याला आलेलं दुःख भोगलं.अखेर त्याला समाजातल्या क्रूर लोकांनी क्रूसावर मारलं.येशू ख्रिस्ताच्या मृत्यूनंतर तो पुन्हा येईल आणि जगात न्यायाचं राज्य प्रस्थापित करेल याचा विश्वास त्याच्या अनुयायांना होता.


जुना करार हा मूळ हिब्रू भाषेत लिहिला गेला. हिब्रू ही प्राचीन भाषा असून ती उजवीकडून डावीकडे लिहिली आणि वाचली जाते. ६व्या शतकापर्यंत यहुदी लोक हिब्रू भाषा बोलत असत.जुना करार पपायरसच्या कागदावर लिहिला गेला.पपायरस म्हणजे लव्हाळ्याच्या लगद्यापासून बनवलेला कागद. हा कागद कोरड्या हवामानात अनेक दिवस टिकत असे. 


यात ३९ पुस्तकांचा समावेश होता,तर नव्या करारात २७ पुस्तकं सामील होती. त्यानंतर ग्रीक भाषेत बायबलचं भाषांतर झालं. इ.स.३९० मध्ये सेंट जेरोम यांनी लॅटिन भाषेत भाषांतर केलं आणि या 'भाषांतराला 'व्हलगेट' असं संबोधलं गेलं. त्यानंतरची १००० वर्षं कॅथलिक चर्चचं बायबल म्हणून त्याला मान्यता मिळाली. बायबलच्या प्राचीन हस्तलिखित प्रती आजही जतन करून ठेवलेल्या आहेत.


इस्लाम धर्मातदेखील 'बायबल'कडे खूप आदरानं बघितलं जातं.'कुरआन' (बोलीभाषेत 'कुराण' असं संबोधलं जातं) प्रमाणेच 'बायबल' हाही परमेश्वराच्या प्रेरणेतून निर्माण झालेला ग्रंथ समजला जातो.हा ग्रंथ ख्रिश्चन धर्माला प्रेरित करणारा,धर्माची मूलतत्त्वं काय आहेत हे सांगणारा आणि परमेश्वर हा तारणकर्ता कसा आहे हे सांगणारा ग्रंथ आहे.परमेश्वराचं अस्तित्व, तसंच त्याचं प्रकटीकरण कधी आणि कसं झालं याबद्दल या ग्रंथात विवेचन केलं आहे.जगभरात या ग्रंथाच्या इतर कुठल्याही ग्रंथांपेक्षा सर्वाधिक प्रतींची विक्री झालेली आहे.विख्यात चित्रकार लिओनार्दो दा व्हिंचीचं 'द लास्ट सपर' आणि मायकेल एंजेलोचं 'क्रिएशन ऑफ अॅडम' ही चित्रं 'बायबल' वरच आधारित होती.


१५५७ साली प्रोटेस्टंट पंथाचा मार्टिन ल्युथर किंग यानं बायबलचं इंग्रजीमध्ये भाषांतर केलं.त्यामुळे सर्वसामान्य लोकांना समजण्यासाठी त्याचा खूप उपयोग झाला.


आजही अनेक भाषांमध्ये भाषांतर करताना लोक आढळतात.संपूर्ण बायबल हे एकूण ६९८ भाषांमध्ये

भाषांतरित झालं असून,फक्त नवा करार हे १५४८ भाषांमध्ये, तर 'बायबल' मधल्या गोष्टींचा भाग ११३८ भाषांमध्ये आणि 'बायबल' मधला काही भाग घेऊन तो ३३८४ भाषांमध्ये आजवर भाषांतरित झाला आहे. इतर कोणत्याही ग्रंथाचं इतक्या भाषांमध्ये आजपर्यंत भाषांतर झालेलं नाही.१६१६ साली फादर स्टीफन यांनी 'ख्रिस्तपुराण' नावानं 'बायबल'चं मराठीतून भाषांतर केलं,तर डॉ. विल्यम कॅरी यांनी १८०७ साली ४० भाषांमध्ये 'बायबल'चं भाषांतर केलं.१९२४ साली पंडिता रमाबाई यांनी १८ वर्षं परिश्रम करून हिब्रू 'बायबल' मराठीत आणलं. 'बायबल' चं मराठीत भाषांतर करणाऱ्या पहिल्या महिला म्हणून त्यांच्याकडे तो मान जातो. ज्या दिवशी त्यांनी शेवटच्या वाक्याचं भाषांतर केलं,त्याच दिवशी (रात्री) त्यांचा मृत्यू झाला.फादर दिब्रिटो यांनी 'बायबल'चा सुबोध मराठी भावानुवाद केला आहे. तसंच मंगेश पाडगावकर यांनी देखील 'बायबल' मराठीत आणलं आहे. १५ व्या शतकात गटेनबर्ग यानं छपाईचा शोध लावला,तेव्हा प्रथम त्यानं 'बायबल'च छापलं होतं.


जगातल्या या पहिल्या छापील 'बायबल'मध्ये दर पानावर ४२ ओळी असल्यामुळे याला '४२ ओळींचं बायबल' असं म्हटलं गेलं. 


ख्रिश्चन धर्माचा पवित्र ग्रंथ म्हणून 'बायबल'ला अपार महत्त्व आहे. जगातल्या अत्यंत प्रभावशाली ग्रंथांमध्ये बायबल या ग्रंथाचा खूप वरचा क्रमांक आहे हे मात्र खरं!


" परमेश्वर तुमचा सोबती असल्यामुळे तुमचं ध्येय तितकंच विशाल ठेवा." - येशु ख्रिस्त


७ जून २०२३ भागातील पुढील भाग..