डॉ.सॅम्युएल जॉन्सनची 'डिक्शनरी' हे जगातलं एकमेव एकहाती काम आहे.ही डिक्शनरी पुढे फ्रेंच आणि जर्मन भाषांमध्ये भाषांतरित केली गेली.प्रत्येक शब्दाचा अर्थ,त्याची व्युत्पत्ती आणि त्याचा उच्चार याचा खूप सखोल विचार प्रथमच सॅम्युएल जॉन्सनच्या डिक्शनरीमध्ये करण्यात आला.'न्यूटनचं विज्ञान आणि गणित यामधलं जे योगदान आहे,तितकंच मोठं योगदान डॉ. सॅम्युएल जॉन्सनच्या डिक्शनरीचं इंग्रजी भाषेसाठी आहे'असं अमेरिकन भाषाकार आणि भाषातज्ज्ञ नोह क्वेस्टरनं म्हटलं.आदिम काळातल्या भटक्या माणसानं जंगलातल्या गुहा,झाडाच्या ढोली अशा निवाऱ्याच्या जागा सोडून हळूहळू शेती करायला सुरुवात केली.आणि त्याच्या आयुष्याला स्थैर्य लाभलं.तो शेतजमिनीच्या ठिकाणीच आपली घरं बांधून राहायला लागला.हळूहळू तो सुसंस्कृत होत गेला;तसंच सतत नावीन्याचा शोध घेत राहिला.या सगळ्या प्रवासात संवादानं खूप मोलाची भूमिका बजावली आणि संवाद म्हटलं की त्यात भाषा आलीच.देश,प्रांत,प्रदेश,ठिकाण बदललं की भाषा बदलते.खरं तर बारा कोसांवर भाषा बदलते म्हणतात ते उगाच नाही.जग जसं बदलत गेलं तसतशी जगाला वेगवेगळ्या भाषांच्या भाषांतराची गरज भासायला लागली.आपल्या भावना,आपलं म्हणणं आणि आपले
विचार परक्या माणसांबरोबर वाटताना आपल्याला जे म्हणायचंय त्या शब्दांचे अर्थ त्याच्यापर्यंत पोहोचवण्याची म्हणजेच त्याच्या भाषेत रूपांतरित करण्याची आवश्यकता वाटायला लागली.याच खटाटोपीतून जन्म झाला शब्दकोशाचा म्हणजेच डिक्शनरीचा !
'आत्तापर्यंत अनेक भाषाकारांनी अनेक शब्दकोश जगासमोर मांडले असले तरी या सगळ्यांमधला अत्यंत परिणामकारक असा समजला जाणारा शब्दकोश म्हणजे 'अ डिक्शनरी ऑफ द इंग्लिश लँग्वेज' ही डिक्शनरी तयार केली होती सॅम्युएल जॉन्सननं,सॅम्युएल जॉन्सन हा एक इंग्रजी लेखक त्याच्या जगभरात नावाजल्या गेलेल्या इंग्रजी भाषेतल्या डिक्शनरीमुळे ओळखला जातो.गूगलनं त्याच्या ३०८ व्या जन्मदिनाचं औचित्य साधून त्याचं डूडल बनवलं आणि त्याच्याविषयी आपली कृतज्ञता व्यक्त केली.सॅम्युएल जॉन्सन हा एक कवी,निबंधकार,
समीक्षक,चरित्रकार आणि संपादकदेखील होता. खरं तर या डिक्शनरीच्या आधीही काहींनी डिक्शनरीज तयार केल्या होत्या.डिक्शनरी तयार होण्याचं मूळ आपल्याला ११ व्या शतकात सापडतं.अकराव्या शतकात लिहिल्या गेलेल्या डिक्शनरीज या चिनी आणि जपानी भाषांमध्ये सर्वप्रथम लिहिल्या गेल्या.त्यानंतर युरोपात म्हणजेच इंग्लंडमध्ये डझनावारी डिक्शनरीजची निर्मिती झाली.मात्र डॉ.सॅम्युएल जॉन्सन याच्या डिक्शनरीची सर कशालाही नव्हती.खरं म्हणजे डॉ.सॅम्युएल जॉन्सन याच्या 'डिक्शनरी'च्या छायेतच पुढे ऑक्सफर्ड 'डिक्शनरीची-देखील निर्मिती झाली.आधी प्रकाशित झालेल्या लॅटिन-इंग्लिश डिक्शनरीमध्ये डब्ल्यू,एक्स आणि वाय या अक्षरांवरून सुरू होणाऱ्या शब्दांचा समावेश केलेला नव्हता.मात्र डॉ. सॅम्युएल जॉन्सन याच्या डिक्शनरीमध्ये याही अक्षरांवरून सुरू होणान्या शब्दांचा समावेश केला गेला होता. खरं तर हा असा काळ होता,की ज्या काळात डिक्शनरीमधल्या शब्दांचे अर्थ कुठल्या तरी आख्यायिकां
-वर आधारलेले असायचे.त्यांना कुठलंही ठोस प्रमाण असायचं नाही.१७३६ साली नाथन बेटली या कोशकारानं तयार केलेल्या डिक्शनरीमध्ये २५०० शब्दांची यादी दिलेली होती.सॅम्युएल जॉन्सन यानं ही डिक्शनरी उदाहरणादाखल वापरली.प्रत्येक शब्दाचा अर्थ,त्याची व्युत्पत्ती आणि त्याचा उच्चार याचा खूप सखोल विचार प्रथमच सॅम्युएल जॉन्सन याच्या डिक्शनरीमध्ये करण्यात आला.अमेरिकन भाषाकार आणि भाषातज्ज्ञ नोह क्वेस्टर असं म्हणतो,'न्यूटनचं विज्ञान आणि गणित यांच्यातलं जे योगदान आहे,तितकंच मोठं योगदान हे डॉ.सॅम्युएल जॉन्सन याच्या डिक्शनरीचं इंग्रजी भाषेसाठी आहे.' १८ सप्टेंबर १७०९ या दिवशी इंग्लंडमधल्या लिचफिल्ड इथे डॉ. सॅम्युएल जॉन्सन याचा जन्म झाला.सॅम्युएलच्या आईचं नाव सारा आणि वडिलांचं नाव मायकेल जॉन्सन असं होतं. मायकल जॉन्सन यांचं पुस्तकविक्रीचं दुकान होतं.खालच्या मजल्यावर पुस्तकांचं दुकान होतं आणि वरच्या मजल्यावर जॉन्सन कुटुंब राहत असे.सारा आणि मायकेल यांनी अनेक वर्षं प्रतीक्षा केल्यावर सॅम्युएल हे पहिलं अपत्य जन्मलं होतं.सॅम्युएलच्या जन्माच्या वेळी साराचं वय ४० वर्षांचं होतं.खरं तर वयाच्या दृष्टीनं मूल जन्माला घालण्यास तसा उशीर झाला होता.आणि साराचं बाळंतपणही कठीण झालं होतं.सॅम्युएलच्या जन्माच्या वेळी इंग्लंडमधल्या तज्ज्ञ सर्जनांना बोलावण्यात आलं होतं.बाळाचा जन्म सुखरूप झाला,पण जन्मल्यानंतर बाळानं रडायला हवं,तर बाळ रडलंच नव्हतं.सगळ्यांचं धाबंच दणाणलं.शिवाय बाळ दिसायला अगदीच किडकिडीत होतं.हृदयाचे ठोके मात्र व्यवस्थित सुरू होते इतकंच काय ते त्या बाळाचं नशीब! बाळाची ही अवस्था बघून त्याची आत्या तर तिथेच मागचापुढचा विचार न करता म्हणाली, 'किती मरतुकड बाळ आहे हे,हे रस्त्यावर जर पडलं तर मी उचलणारदेखील नाही.'
आपल्या अशा नाजूक बाळाकडे बघून होणाऱ्या प्रतिक्रियांमुळे सारा आणि मायकेल यांना सॅम्युएलची खूप काळजी वाटायची.खरं तर पुढे सॅम्युएलची ज्या जगप्रसिद्ध आयझॅक न्यूटन या शास्त्रज्ञाशी तुलना केली गेली,त्या न्यूटनचीही अवस्था जन्मल्यानंतर सॅम्युएल-सारखीच होती.मायकेल आणि सारा सॅम्युएलला लहानपणी 'सॅम' या नावानं हाक मारत असत.सॅम जेव्हा पाच वर्षांचा झाला,तेव्हा आपल्या आईबरोबर तो पहिल्यांदा चर्चमध्ये गेला.आईबरोबर त्यानं तिथे प्रार्थनेतही भाग घेतला.घरी आल्यावर सॅमनं चर्चमध्ये ऐकलेली प्रार्थना जशीच्या तशी शब्दन्शब्द सुरात गाऊन दाखवली.साराला ते ऐकून आश्चर्याचा धक्काच बसला.
आपल्या मुलाची स्मरणशक्ती बघून ती चकित झाली. आपला मुलगा इतरांपेक्षा वेगळा आहे ही गोष्ट लक्षात येताच तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहायला लागले.
खरं तर वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच सॅमला त्याच्या आईनं घरीच शिकवायला सुरुवात केली. वयाच्या सहाव्या वर्षी बूट बनवणाऱ्या एका निवृत्त माणसाकडे तिनं सॅमला व्याकरण शिकायला पाठवल.वयाच्या नवव्या वर्षापर्यंत सॅमला लॅटिन भाषाही अवगत झाली होती. त्यानंतर त्याचं पुढलं शिक्षण सुरू झालं खरं,पण तोपर्यंत त्यांच्या घरची आर्थिक स्थिती डबघाईला आली होती.त्यातच भरीस भर म्हणून सॅमला टॉरेट सिंड्रोम नावाचा विकार जडला.या विकारात त्या रुग्णाचं त्याच्या ठरावीक मांसपेशींच्या हालचालींवर नियंत्रण राहत नाही.उदा.खोकला,शिंकणं,
डोळे मिचकावणं,मानेच्या निरनिराळ्या हालचाली.तसंच या विकारावर त्या वेळी कुठलाच उपाय नव्हता.
लहानपणी तो खूपच अशक्त आणि किडकिडीत असल्यानं त्याला दूध पाजण्यासाठी एका नर्सची व्यवस्था करण्यात आली होती.सॅमला दूध पाजणाऱ्या या नर्सला टीबी झाल्यानं त्या दुधातून सॅमला इन्फेक्शन झालं,असंही म्हटलं जातं.सॅमनं अशाही परिस्थितीत पुढलं शिक्षण घेण्यासाठी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश घेतला;पण घरच्या कर्जबाजारीपणाच्या परिस्थितीमुळे त्याला जेमतेम वर्षभरच तिथे शिक्षण घेता आलं. त्यातच १७३१ साली मायकेलचा मृत्यू झाला.ऑक्सफर्डमधून बाहेर पडला तेव्हा सॅमची वेगवेगळ्या भाषांमधली गती विलक्षण होती.
तसंच त्याला विज्ञान हा विषयदेखील खूपच आवडायचा.
वडिलाचा मृत्यू आणि हातात कुठलीच पदवी नाही.अशा अवस्थेत सॅम नोकरीसाठी वणवण भटकायला लागला.या प्रयत्नांमध्ये त्याला स्टॉरब्रिज ग्रामर स्कूलमध्ये शिक्षक म्हणून नोकरी मिळाली.सॅमची तिथली अवस्थाही वाईटच होती.त्याला शिक्षक म्हणून मान देणं सोडाच,पण एखाद्या नोकरापेक्षाही वाईट वागणूक दिली जात असे.असं असलं तरी सॅम मात्र शिकवताना अतिशय मन लावून आपल्या विद्यार्थ्यांना शिकवत असे.वर्षभरात या नोकरीवरही त्याला पाणी सोडावं लागलं. त्यानंतर हेक्टर नावाच्या त्याच्या एका मित्रामुळे त्याला एका जर्नलमध्ये लिहिण्याची संधी मिळाली.याच दरम्यान त्यानं फ्रेंच आणि लॅटिन भाषेतल्या अनेक कवितांचं इंग्रजी भाषेमध्ये भाषांतर केलं होतं.मात्र ते अप्रकाशितच राहिल. हॅरी पॉर्टर नावाच्या एका मित्राला त्याच्या आजारपणात सॅम्युएलन साथ दिली.फक्त साथसोबतच नाही,तर सॅमन हॅरीची त्याच्या मृत्यूपर्यंत देखभाल आणि सेवाशुश्रूषा केली.३ सप्टेंबर १७३४ या दिवशी हॅरीचा मृत्यू झाला. हॅरीच्या पश्चात त्याची पत्नी एलिझाबेथ आणि त्याची तीन मुलं होती.पुढे १७३५ साली सॅम्युएल जॉन्सन आणि एलिझाबेथ पॉर्टर यांनी लग्न केलं.त्या वेळी सॅम्युएलचं वय २५ तर एलिझाबेथचं वय ४६ वर्षांचं होतं! याच दरम्यान इतर ठिकाणी,इतर शाळांमध्ये नोकरी करून शिकव-ण्यापेक्षा आपण आपलीच शाळा सुरू करावी,असा विचार सॅम्युएलच्या मनात आला.त्यानं "एडिअल हाल' नावाची एक शाळा सुरू केली.सुरुवातीला या शाळेत फक्त तीनच विद्यार्थी होते.ही शाळादेखील फार काळ तग धरू शकली नाही.तसंच त्याच्या कौटुंबिक आयुष्यातही कटकटी सुरू झाल्या होत्या.एलिझाबेथ आणि सॅम्युएल यांचे आपसांत वारंवार खटके उडायला लागले. त्यामुळे १७३७ साली अखेर सॅम्युएलनं लंडन शहराचा निरोप घेतला आणि तो ग्रिनीच इथे जाऊन पोहोचला.याच काळात सॅम्युएलचा टॉरेट सिंड्रोम हा विकार बळावत चालला होता. त्यामुळे कुठेही काम करणं त्याला अशक्य झालं होतं. 'द जंटलमेन्स मॅगेझिन' या नियतकालिकात लेखक म्हणून काम करण्याची नोकरी सॅमला ग्रिनीच इथे मिळाली.१७३८ साली सॅम्युएलनं केलेलं भरीव काम लोकांच्या प्रथमच लक्षात आलं.ते काम म्हणजे सॅम्युएलने त्या वेळच्या लंडनच्या परिस्थितीवर केलेली 'लंडन' ही कविता ! या एका कवितेमुळे सॅम्युएलला लोक आता सॅम्युएल जॉन्सन असं आदरानं ओळखायला लागले.
'लंडन' ही कविता इतकी गाजली की काही लोकांनी तर ती त्यानं लिहिलीच नसून त्यानं ती कोणाची तरी नक्कल करून लिहिली,असे आरोपही केले.काही काळानंतर सॅम्युएल आणि एलिझाबेथ यांचा पुन्हा सलोखा झाला.
खरं तर एलिझाबेथचं सॅम्युएलवर प्रेम होतं.
१७४६ साली काही प्रकाशकांचा गट सॅम्युएल जॉन्सन याच्याकडे आला आणि त्यानं डिक्शनरी लिहावी,असा प्रस्ताव त्यांनी त्याच्यासमोर ठेवला.या प्रकाशकांनी सॅम्युएल जॉन्सन यानं ही डिक्शनरी तीन वर्षांच्या कालावधीत पूर्ण करावी असा करारही केला.या करारानुसार प्रकाशकांनी सॅम्युएल जॉन्सनला १५७५ युरोज इतकं मानधनही दिलं. (त्या वेळच्या करन्सीमध्ये!) आताच्या हिशोबानं ते २ लाख ४० हजार युरोज इतकं होईल.खरं तर हे काम तीन वर्षांमध्ये पूर्ण होण्याइतकं लहान नव्हतंच.या कामाचा पसारा किंवा आवाका इतका मोठा होता की,प्रत्यक्षात डिक्शनरीचं काम पूर्ण होण्यासाठी तब्बल एक दशक लागलं.डिक्शनरीच्या कामानं सॅम्युएल जॉन्सनला झपाटून टाकलं होतं.
रात्रंदिवस शेकडो पुस्तकांच्या गराड्यामध्ये सॅम्युएल जॉन्सन घेरलेला असायचा.जमेल तिथून या माणसानं जमेल तितकी पुस्तकं गोळा केली होती.आवश्यक ती पुस्तकं मिळवण्याचा त्याला या काळात जणू ध्यास लागला होता.खरं तर तो काळ संगणकाचा नव्हता.
हाताखाली मदत करायला फक्त एक टायपिस्ट तो काय त्याच्याजवळ होता.अशा परिस्थितीत अनेकांनी त्याच्यावर टीकाही केली.जॉन हॉर्न यानं तर 'हे काही एका व्यक्तीनं करण्याचं काम नाही,असं म्हणून टोमणाही मारला होता.
काहींनी तर अतिशय वाईट कोशाकार म्हणून सॅम्युएल जॉन्सन याला हसायला आणि हिणवायलाही सुरुवात केली होती.एकीकडे शारीरिक दुर्बलता तर दुसरीकडे आर्थिक परिस्थितीचीही साथ नाही अशा अवस्थेत लोकांचे टोमणे आणि टीका सहन करत करत सॅम्युएल जॉन्सननं १७५५ साली अथक परिश्रमानंतर डिक्शनरी प्रकाशित केली. हेन्री हिचिंग या इतिहासकारानं असं म्हणून ठेवलंय,'सॅम्युएल जॉन्सनच्या 'डिक्शनरी' ने लोकांना इंग्रजी भाषेचं महत्त्व आणि तिची जगभरात असलेली आवश्यकता यांची जाणीव करून दिली.'कारण त्या काळात फ्रेंच भाषा ही युरोपियन किंवा राज्य करणारी भाषा समजली जात असे.इंग्रजी भाषेला कुठलाही साचाढाचा नसलेली आणि वरवरच्या संवादाची भाषा समजली जात असे.तिला कुठलाही प्रतिष्ठेचा दर्जा नव्हता.त्यामुळे हिचिंगचं हे म्हणणं खूप महत्त्वाचं ठरतं.
यातला एक हृदयद्रावक भाग म्हणजे ज्या एलिझाबेथनं सॅम्युएलला त्याच्या पडत्या काळात साथ दिली होती;पण सॅम्युएलचं डिक्शनरीच्या निर्मितीच्या काळात तिच्याकडे साफ दुर्लक्ष झालं.या काळात तिची तब्येत बिघडली असतानाही सॅम्युएलनं तिच्याकडे जराही लक्ष दिलं नाही.
त्यामुळे अखेर कंटाळून आणि निराश होऊन ती त्याला सोडून लंडनला निघून गेली.याचा कुठलाही परिणाम सॅम्युएलवर किंवा त्याच्या कामावर झाला नाही.तो आपल्याच धुंदीत होता.काहीच काळानंतर म्हणजे १७५२ साली एलिझाबेथच्या मृत्यूचीच बातमी त्याच्यापर्यंत येऊन धडकली.तेव्हा मात्र तिनं त्याला दिलेली साथ आठवून सॅम्युअलला खूप वाईट वाटलं.त्यानं एलिझाबेथच्या आठवणीदाखल एक कविता रचली आणि आपल्या मित्राला तिच्या दफन करण्याच्या वेळी हजर राहून ती गाऊन दाखवावी असं सुचवलं; पण सॅम्युएलचा मित्र त्याच्या या वागणुकीवर इतका चिडलेला होता की,त्यानं ही गोष्ट साफ नाकारली.सॅम्युएल जॉन्सन याची 'डिक्शनरी' बाजारात येण्याआधी इंग्रजी भाषेला काही आकार आणि रूप नव्हतं.या डिक्शनरीमध्ये ४२७७३ शब्दांचा अर्थ,त्यांची व्युत्पत्ती आणि त्यांचे उच्चार समाविष्ट करण्यात आले होते. १८ बाय २० इंच अशा आकाराची ही डिक्शनरी होती.या डिक्शनरीत त्यानं प्रत्येक शब्दाचा समानार्थी शब्द अवतरण चिन्हांमध्ये दिला आहे आणि त्याचबरोबर त्याच शब्दाचे समानार्थी अनेक शब्द असतील तर तेही वेगळ्या अवतरण -
चिन्हांमध्ये दिलेले आहेत.अशा अवतरणचिन्हांच्या मधल्या शब्दांची संख्या १,१४,००० इतकी होते,हेही या डिक्शनरीचं वैशिष्ट्य! डिक्शनरीच्या प्रकाशनानंतर सॅम्युएल जॉन्सनला ट्रिनिटी स्कूल ऑफ लंडनकडून एमए (मास्टर ऑफ आर्टस इन इंग्लिश लँग्वेज) पदवीनं सन्मानित करण्यात आलं आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीकडून त्याला डॉक्टरेटही जाहीर करण्यात आली.आता लोक सॅम्युएल जॉन्सनला डॉ.सॅम्युएल जॉन्सन म्हणून संबोधायला लागले.असं असलं तरी सॅम्युएल जॉन्सन मात्र स्वतः कधीही स्वतःच्या नावाआधी डॉक्टर असं संबोधन लावत नसे.
डॉ.सॅम्युएल जॉन्सनची 'डिक्शनरी' हे जगातलं एकमेव एकहाती काम आहे.ही डिक्शनरी पुढे फ्रेंच आणि जर्मन भाषांमध्ये भाषांतरित केली गेली.'ही डिक्शनरीच खुद्द त्या लेखकाचं स्मारक बनून जगात कायमस्वरूपी अस्तित्वात राहील,' असं प्रेसिडेंट ऑफ फ्लोरेन्टाईन यांनी जाहीर केलं. पुढे १५० वर्षांनंतर ऑक्सफर्डच्या निरनिराळ्या शब्दकोशांचं प्रकाशन झालं.त्यातही डॉ.सॅम्युएल जॉन्सन याच्याच डिक्शनरीतल्या व्याख्या पुन्हा वापरात आणल्या गेल्या.त्या 'जे' या नावानं वापरल्या गेल्या.सॅम्युएल जिथे जायचा तिथे तो अनेक मित्र जमवायचा.त्याची अनेक स्तरांतल्या लोकांशी मैत्री व्हायची.सॅम्युएल जॉन्सन चहाचा खूपच शौकीन होता.एकदा का तो चहा प्यायला लागला की,चक्क २५-२५ कप चहा तो सहजपणे रिचवायचा.तो जेवत असताना कोणी काही सांगायला लागला,तर तो त्याचा एकही शब्द जेवण पूर्ण होईपर्यंत ऐकून घेत नसे. इतकंच काय,पण जेवताना त्याच्या कपाळावरच्या नसा टम्म फुगत असत आणि त्याचं संपूर्ण शरीर घामानं डबडबून जात असे.व्यसनी माणसामध्ये आणि आपल्यामध्ये काही फरक नाही,असं सॅम्युएल जॉन्सन विनोदानं म्हणायचा.
खाणं-पिणं आणि वाचन या गोष्टींपुढे त्याला दुसरं काही सुचत नसे.विख्यात नाटककार शेक्सपिअर आणि कवी वर्डस्वर्थ यांनी वापरलेल्या अनेक शब्दांचा अर्थही सॅम्युएलच्या डिक्शनरीमध्ये देण्यात आला आहे हे विशेष ! शेक्सपिअर,जॉन मिल्टन,ॲलेक्झांडर पोप,एडमंड स्पेन्सर यांचीही प्रसिद्ध कोटेशन्स त्यानं डिक्शनरीमध्ये सामील केली होती. कुठल्याही समाजाच्या दृष्टीनं आक्षेपार्ह अथवा अश्लील समजल्या जाणाऱ्या शब्दांचा अर्थ देण्यातही सॅम्युएल जॉन्सन मागे हटला नाही हेही विशेष ! काळाच्या पुढे जाणारी ही गोष्ट होती.'आपला ज्या गोष्टीत कल आहे,त्याच गोष्टींबद्दलचं वाचन आपण केलं पाहिजे,'असं सॅम्युएल जॉन्सन म्हणत असे.
अखेरच्या दिवसांत सॅम्युएलचा एक डोळा अधू झाला होता आणि त्याला ऐकायलाही येईनासं झालं होतं.तसंच त्याला नैराश्यानंही ग्रासलं होतं. त्याच्या जवळच्या दोन मित्रांच्या मृत्यूनं त्याला जास्तच एकाकी वाटायला लागलं होतं.
सॅम्युएलचा मृत्यू १३ डिसेंबर १७८४ या दिवशी वयाच्या ७५ व्या वर्षी अनेक विकारांनी ग्रस्त झाल्यामुळे झाला.
सॅम्युएल जॉन्सनला वेस्टमिन्स्टर ॲबेमध्ये शेक्सपि -
अरच्या स्मारकाजवळच दफन करण्यात आलं.(जग बदलणारे ग्रंथ,दीपा देशमुख) पुढे त्याचा मित्र जेम्स बोसवेल यानं सॅम्युएल जॉन्सनचं चरित्र लिहून प्रसिद्ध केलं. 'डिक्शनरी' ही जगातली पहिली डिक्शनरी नसलीतरी डॉ.सॅम्युएल जॉन्सन याच्या अथक परिश्रमामुळे ती जगभरात सर्वाधिक लोकप्रिय झाली हे मात्र खरं. !
समाप्त...