बंडखोर (आणि साहजिकच खडतर ) अशा सामाजिक सुधारणा करण्याच्या प्रवासावर जोतीराव फुले आपली जीवनसहचरी सावित्रीबाई फुले हिच्यासह निघाले तेव्हाच सनातनी पुण्यातल्या एका भाजीवाल्याचा 'मुलगा' आणि माळ्याचा 'नातू' म्हणून येणाऱ्या सामाजिक बेड्या त्यांनी तोडून टाकलेल्या होत्या.
या मुलाचं प्राथमिक शिक्षण मराठीत झालं होतं आणि वयाच्या तेराव्या वर्षीच त्याचं दहा वर्षांहून लहान मुलीशी लग्नही झालं होतं.त्यानंतर एका मुस्लीम शेजाऱ्याच्या आग्रहाखातर त्यानं ख्रिश्चन मिशनरी शाळेत पुढील शिक्षणास सुरुवात केली. खरंतर त्याच्यासाठी समाज
मान्य वर्तन असं होतं की,निमूटपणे रोजच्या डाळी-साळी आणि भाज्यांचा गोदामातला साठा किती आहे ते पाहायचं आणि कुटुंबाचा व्यवसाय चालवायचा. परंतु त्याऐवजी फुल्यांनी थॉमस पेने यांचं 'राइट्स ऑफ मॅन' आणि 'द एज ऑफ रिझन' ही पुस्तकं वाचली आणि त्यानंतर स्वतःचा मार्ग स्वतःच निर्माण केला.मग विवेकी लोकांच्या मनात तर्कामुळे जे प्रश्न निर्माण होतात, तेच गैरसोयीचे प्रश्न फुले समाजाला विचारू लागले.
आपण समजून घेतलेल्या संकल्पना आपल्या पत्नीला सांगणारे जोतिबा हे त्या काळातले 'असामान्य' पुरुषच म्हणावे लागतील. खरोखरच,त्यांनी आपल्या पत्नीला स्वतः शिकवलंच;पण ती घरापासून दूर अहमदनगर येथे शिक्षिकेच्या प्रशिक्षण अभ्यासक्रमाला गेली तेव्हाही तेच तिच्या पाठीशी उभे राहिले.१८४८ साली स्त्रीशिक्षणाकडे वळले,तेव्हा ते दोघेही विशीच्या आतबाहेर होते.
'मूर्खपणाच्या समजुती' म्हणून सनातनी लोकांनी केलेली आदळआपट त्यांनी कानाआड केली होती.ज्योतिबांनी नंतर एका सरकारी आयोगाला सांगितलं,"देशी म्हणता येईल अशी मुलींची शाळाच नव्हती, तेव्हा इथं.त्यामुळेच शाळा उभारण्याची प्रेरणा मला मिळाली, त्या शाळेत मी आणि माझी पत्नी कित्येक वर्ष काम केलं." सुरुवातीला काही काळासाठी त्यांना सगळं काम थांबवावं लागलं असलं तरी लवकरच म्हणजे १८५१ साली त्यांनी एकच नव्हे;तर मुलींच्या तीन शाळा काढून ते पुन्हा कार्यरत झाले.त्यानंतर फुले यांनी परीक्षेसाठी चक्क २३७ मुलींना तयार केलं ही घटनाच एवढी सनसनाटी होती की,
अभ्यासक हरी नरके म्हणतात,"परीक्षेला जाणाऱ्या मुली पाहायला ३००० हून अधिक लोक जमले होते."
१८५२ सालच्या उन्हाळ्यात एका वृत्तपत्र वार्ताहराने अहवाल दिला की,सरकारी शाळांत शिकणाऱ्या मुलग्यांपेक्षा जोतीरावांच्या शाळेत शिकणाऱ्या मुलींची संख्या दहा पट अधिक आहे.जर सरकारी शिक्षण मंडळाने आपल्या शाळांच्या निकृष्ट दर्जाविषयी काही केलं नाही तर लवकरच या मुली मुलांना शिक्षणात मागे टाकतील आणि त्यामुळे आपल्याला लाजेने माना खाली घालाव्या लागतील."
हे सगळंच क्रांतिकारकच होतं,परंतु जॉर्ज वॉशिंग्टन यांचेकडून प्रेरणा घेतलेल्या जोतीबांनी पुढे 'गुलामगिरी' हे महत्त्वाचं पुस्तक १८७३ साली लिहिलं आणि अमेरिकेतील गुलामगिरीची प्रथा नष्ट करणाऱ्या सज्जन अमेरिकनांना अर्पण केलं.त्यानंतर ते सावित्रीबाईंसह अस्पृश्यांसाठी शाळा काढण्याच्या कामी लागले.तेही अशा शहरात जिथं अगदी आत्ताआत्तापर्यंत ब्राह्मण पेशवे सरकारने फतवा काढला होता की अस्पृश्यांनी कमरेला झाडू बांधून फिरावं अन्यथा शहर विटाळेल.
अशा बंडखोरीचे परिणामही तसेच गंभीर होते. १८५३ सालच्या एका मुलाखतीत जोतिबांनी सांगितलं आहे की,त्यांच्या या अशा विवादास्पद कृत्यांमुळे त्यांच्या खुद्द वडिलांनीच त्यांना आणि त्यांच्या पत्नीला घराबाहेर काढलं होतं. सनातन्यांचा राग अगदी क्षुल्लक बाबींतूनही व्यक्त होत असे : उदाहरणार्थ,जोतिबांना एका सार्वजनिक सोहळ्यात शाल देऊन गौरवण्यात आलं तेव्हा बरेच लोक हटून बसले की माळ्याच्या पोराची असला मान स्वीकारण्याची योग्यता नाही.मग त्याची वैयक्तिक किंवा व्यावसायिक कामगिरी काहीही असो.एवढं होऊनही फुले दंपतीला लोकांकडून सातत्याने मान्यता मिळत होतीच.
'पुणे ऑब्झर्व्हर' आणि 'डेक्कन वीकली' या दोन वृत्तपत्रांनी नोंद केली,की त्यांचं काम " हिंदू संस्कृतीच्या इतिहासातील एका युगाची सुरुवातच आहे."
परंतु हे जोडपं लोकांकडून प्रशंसा मिळाली म्हणून तेवढ्यावरच थांबले नाहीत.बाँबे येथील सरकारकडून मानमरातब मिळाला तेव्हा जोतीबा केवळ पंचवीस वर्षांचे होते.त्यांनी जाहीर केलं की,एतद्देशीय स्त्रियांना शिक्षणाच्या देण्याच्या कार्यासाठी मी थोडंफार जे केलं आहे ते खूपच कमी आहे आणि प्रिय मायभूमीचा सुपुत्र या नात्याने माझे कर्तव्य मी केले तेही खूप अपुरेच आहे असं म्हणावं लागेल.शाश्वत बदल घडून येण्यासाठी खूपच अधिक ऊर्जा आणि धडाडी दाखवावी लागणार होती आणि सामाजिक रचना व भारतीय कुटुंबे यांच्यात सुधारणा घडवून आणायची,तर ती मुलींना अग्रक्रम देण्यानेच होऊ शकेल अशी फुले दंपतीची ठाम धारणा बनली होती.त्यामुळे मग ज्या ज्या सार्वजनिक उपक्रमात ते हजर राहत त्या व्यासपीठाचा वापर ते आपल्या बंडखोर विचारांचा प्रसार करण्यासाठी करू लागले.अर्थात आपले विचार मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्षात आणण्यासाठी साधनांचं आणि पैशांचं पाठबळ त्यांच्यापाशी नव्हत.
उदाहरणार्थ,१८५३ साली त्यांनी ब्राह्मणी कर्मठपणा स्त्रीशिक्षणाच्या आड येतो म्हणून त्याच्यावर टीका करताना म्हटलं, "सनातनी ब्राह्मणांच्या मते स्त्रियांनी कायम आज्ञेतच राहिलं पाहिजे,त्यांना काहीही ज्ञान मिळता कामा नये, त्यांनी सुशिक्षित बनता कामा नये,
त्यांना धर्माविषयी काहीही माहिती असता कामा नये, त्यांनी पुरुषांसमवेत मिसळता कामा नये असं आहे.
त्यासाठी ते आपल्या जुन्या शास्त्रांचे दाखले देतात ज्यात स्त्रियांची खूपच नालस्ती केलेली असते आणि या मूर्खपणाच्या श्रद्धांना समर्थन देत ते विचारतात की,एवढ्या महान आणि विद्वान ऋषिमुनींनी लिहिलेली कुठलीही गोष्ट असत्य कशी असू शकेल ?'
पूर्णतया विरुद्ध बाजूने बोलणारे जोतिबा मुख्यत्वेकरून उच्च जातीय विरोधकांशी बौद्धिक पातळीवरही लढायला तयार होते.तसं करताना सडेतोडपणे स्वतःचा राग जराही न दडवता बोलायलाही ते मागेपुढे पाहत नव्हते.
जिला गावंढळ समजली जात होती,त्या गरिबांच्या बोलीभाषेवरील धूळ त्यांनी झटकली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याच्या कहाण्या सांगितल्या.
शिवाजी महाराज कुणब्यांचे त्राते आणि दुर्बळांच्या हक्कांचे पुरस्कर्ते होते असं त्यांच चित्र त्यांनी त्यात रंगवलं होतं.त्यावर क्रुद्ध झालेल्या सनातन्यांनी दीर्घकालीन प्रचार केला की- नाही,शिवाजी महाराज हे पवित्र गाईचं आणि संस्कृतातल्या उच्च परंपरांचं संरक्षण करणारे होते.पण जोतिबांना त्याची पर्वा नव्हती,त्यांनी टीका चालूच ठेवली.
जेव्हा ब्राह्मणांनी दावा केला की आम्ही उच्च आहोत कारण आमचा जन्म ब्रह्मदेवाच्या मुखातून झाला आहे.
त्यावर जोतिबांनी विचारलं की तुमचा जन्म तिथून झाला होता,तर मग त्या जगन्निमार्त्याच्या पाळीचा स्रावही तिथूनच बाहेर पडला होता का? हा प्रश्न विचारल्यामुळे हादरलेल्या विरोधकांना त्यांनी मग डार्विनचा सिद्धान्त सांगितला होता.
जोतिबा पुरुष होते,शिवाय ब्रिटिशांशी जवळीक असलेले वजनदार असामीही होते त्यामुळे त्यांच्याऐवजी सावित्रीबाईंनाच सनातनी मंडळी लक्ष्य करू लागली.
शाळेत शिकवायला जाताना त्यांच्या अंगावर सनातनी शेणगोळे आणि दगड फेकायचे.परंतु जराही न विचलित होता त्या आपल्या पतीला आणि असंख्य लोकांना प्रेरणा देत राहिल्या.
एकदा पुण्याबाहेरील खेड्यात एक घटना घडली. तिथं एका अस्पृश्य मुलीला उच्च जातीय प्रियकरामुळे दिवस राहिले.तेव्हा त्या मुलाने घराण्याची बेअब्रू केली म्हणून आणि मुलीवर चवचालपणा आरोप ठेवून दोघांना दगडांनी ठेचून मारायचा विचार पुढे आला.तेवढ्यात सावित्रीबाई तिथं पोहोचल्या.त्यानंतर त्यांनी जोतिबांना लिहिलेल्या पत्रात आपण तो प्रसंग कसा टाळला ते लिहिलं." मी धावत धावत तिथं पोहोचले आणि या प्रेमिकांना अशा प्रकारे ठार मारण्याचे ब्रिटिश कायद्याखाली भयंकर परिणाम होतील अशी भीती घालून त्या जमावाला पळवून लावलं." साहजिकच,बरेच लोक कुरकुरू लागले की,जोतिबा पाश्चात्त्यांपुढे लोटांगण घालतात. वसाहतवादी कायद्यात मिळालेल्या नव्या स्वातंत्र्यावर त्यांचा फारच भरवसा आहे त्यामुळे ते देशाभिमान दाखवत नाहीत,त्यांची बायकोही त्यांच्या
सारखीच आहे.परंतु प्रत्यक्षात असं घडलं होतं की,फुले तेवढ्याच ताकदीने ब्रिटिशांनाही त्रस्त करून सोडत होते.
१८८८ साली ब्रिटिश अधिकाऱ्यांनी ड्युक ऑफ कनॉट,
प्रिन्स आर्थर यांच्या सन्मानार्थ आयोजित भोजन समारंभाचं आमंत्रण जोतिबांना दिलं. ते जोतिबांनी स्वीकारलं खरं पण तिथं शेतमजुराच्या पोशाखात जाऊन त्यांनी व्हिक्टोरियन मंडळींना थक्क करून सोडलं.एक फाटकी शाल हेच त्यांचं अंगावर ओढायचं एकमेव वस्त्र होतं.(इंग्लंडच्या राजाला भेटायला गांधीजी पंचा नेसून उघडेच गेले होते त्याआधीचा हा प्रसंग आहे.) मग त्यांनी त्या राणी व्हिक्टोरियापुत्राला प्रवचन द्यायला सुरुवात केली की,आजच्या सायंभोजनासाठी बोलावलेले अभ्यागत भारताचं प्रतिनिधित्व करतात असं कृपया समजू नका.ज्यांचा आवाजच दबला गेला आहे असे गरीब हेच या भूमीचे खरे प्रतिनिधी आहेत.
आणखी एके प्रसंगी स्थानिक नगरपालिकेने ठरवलं की,बाँबेच्या गव्हर्नरना हजार रुपयांची भलीमोठी भेट देऊन आपली निष्ठा दाखवायची. तेव्हा ३२ सदस्यांपैकी फक्त एकट्या जोतिबांनी त्या संकल्पनेला विरोध केला होता.ते म्हणाले होते की आणखी एका इंग्रजाचा मुळातच गर्वाने फुगलेला तोरा आणखी का वाढवायचा? त्यापेक्षा शिक्षणासारख्या अधिक उपयुक्त कामासाठी ते पैसे खर्च करता येतील.
भारतीय समाजातील दांभिकतेवर तीक्ष्ण कोरडे ओढत असतानाच भारतीय उच्च वर्गीयांना पाश्चात्त्य संस्थांमध्ये खास सुविधा देण्याच्या ब्रिटिशांच्या प्रवृत्तीमुळेही जोतिबा तेवढेच अस्वस्थ होत होते.ते विचारायचे, "आपल्या बांधवांना दारिद्र्यातून बाहेर काढण्यासाठी या अभिजनांनी असं काय योगदान दिलं आहे? ते सामान्य जनांशी कसे वागतात? त्यांच्याहून कमी सुदैवी किंवा कमी शाहण्या देशबांधवांसाठी शिकवण्यासाठी त्यांनी त्यांच्या घरात किंवा अन्यत्र शिकवण्याचे वर्ग सुरू केले होते का? त्यांनी तर त्यांचं ज्ञान स्वतःपुरतंच ठेवलं होत. जणू ती त्यांचीच मिरासदारी होती आणि अज्ञानी,
ओवळ्या लोकांशी संपर्क येऊन ती विटाळणारच होती.
त्यांनी सर्वसामान्यांच्या मनात ज्ञानाची ओढ निर्माण होईल याची आपल्याला आच आहे असं कुठल्याही प्रकारे दाखवलं होतं का? परोपकाराची फेड देशभक्तीने केली होती का? लोकांचे नैतिक आणि बौद्धिक कल्याण व्हायचं असेल तर उच्च वर्गाच्याच शिक्षणाचा दर्जा वाढवला पाहिजे असं कुठल्या आधारावर ठरवलं गेलं ? "
याचा अर्थ,अभिजनवर्गाला पटेल असंच धोरण इंग्रजांनी राबवलं होतं आणि अभिजनांनीही वाऱ्याचा रोख ओळखून पाश्चात्त्य शिक्षणाचा मार्ग धरून स्वतःचे हक्क सांभाळून ठेवले होते. परंतु स्वतःच्याच दुय्यम बांधवांनाही सक्षम केलं पाहिजे याबद्दल मात्र त्यांच्या मनात कसलीही तळमळ नव्हती.मागील काळात मोगल अथवा अन्य राजवटीत त्यांना मिळायचे,तसेच विशेषाधिकार शाबूत कसे राहतील याचीच काळजी त्यांना जास्त पडली होती.
सगळी शक्ती हिरावून घेणारा हृदयविकाराचा मोठा झटका आल्यानंतर काही वर्षांनी जोतिबांचं निधन झालं,तेव्हा बऱ्याच लोकांना वाटलं की,हे शुक्लकाष्ठ कायमचं गेलं.त्यांचं दहन झालं, प्रत्यक्षात त्यांना पुरण्याचा विधी हवा होता.तसं घडलं नाही तरी ज्येष्ठ मंडळींचा राग झेलून आणि रूढीपरंपरेचा भंग करून सावित्रीबाई आपल्या पतीच्या दहनाच्या वेळेस उपस्थित राहिल्या आणि त्यांनी त्यांच्या चितेला अग्नीही दिला.त्यानंतर सात वर्षांनी म्हणजे १८९७ सालची प्लेगची मोठी साथ येऊन गेली त्यानंतर सावित्रीबाईचं निधन झालं.मृत्यूपूर्वी त्यांना आर्थिक संकटं,तसंच अनेक वैयक्तिक आणि व्यावसायिक अडचणींना तोंड द्यावं लागलं;पण तरीही संपूर्ण पश्चिम भारत आणि त्याही पलीकडे सावित्रीबाईंची आठवण त्यांनी मागे ठेवलेल्या या जागृतीपर गीतातून अजूनही स्मरली जाते आहे.
" राज्यात बळीच्या आम्हास विद्या घडो,यशाचि अमुच्या दुंदुभी नगारे झडो,'इडा पीडा टळो', या कार्य भट ना पडो,असे गर्जुनी विद्या शिकण्या जागे होऊन झटा,
परंपरेच्या बेड्या तोडुनी शिकण्यासाठी उठा "
गणिका,महात्मा आणि एक इटालियन ब्राह्मण,मनू एस.पिल्लई,अनु-सविता दामले,
मधुश्री पब्लिकेशन
आणि खरंच,त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही.कारण त्यानंतर पुण्याच्या फुले दांपत्यावर अक्षरश: शेकडो पुस्तकं लिहिली गेली आहेत. खरोखरच,या दांपत्याने दिलेल्या लढ्याचा भर केवळ राजकीयच नव्हता;तर पांरपरिक सामाजिक संरचनेत जे काही सडकं कुजकं होतं तेही उघड्यावर आणताना त्यांनी कसलीही क्षिती बाळगली नव्हती.खरोखरच त्यांनी भारतीय संस्कृतीच्या वर्मावरच बोट ठेवलं होतं-प्रश्न विचारण्याचं धाडस त्यांनी जे केलं,ते करण्याची त्यांच्या आधी किंवा नंतर कुणाचीही टाप नव्हती.