सर्जरी हा शब्द साधारण १३०० साली ग्रीकमधल्या केर (हात) आणि अर्गन (काम करणं) यांच्यापासून बनलेल्या कीसर्गीमधून आला आहे.खरं म्हणजे शस्त्रक्रियांना खूप आधी सुरुवात झाली असं मानलं जातं.ख्रिस्तपूर्व ३००० ते २००० या काळात माणसाच्या कवटीला भोक पाडायची शस्त्रक्रिया केली जायची.ही शस्त्रक्रिया का केली जायची यामागची कहाणीही गमतीशीरच आहे.
माणसाला कुठलाही आजार व्हायचं कारण म्हणजे त्याच्या डोक्यात भूतं घुसतात असं मानलं जायचं.मग ती भूतं बाहेर काढण्यासाठी माणसाच्या कवटीला भोक पाडलं जायचं.गंमत म्हणजे त्या भोकातून बाहेर काढलेलीही भूतं पुन्हा त्याच भोकातून माणसाच्या कवटीमध्ये घुसतील हे कुणाच्या लक्षात कसं यायचं नाही कोण जाणे! त्या काळात शस्त्रक्रिया करण्यासाठी टोकदार दगड,हातोडी अशी आयुधं वापरली जात असावीत असं मानलं जायचं.पण त्यात होणारा रक्तस्राव कसा थांबवला जायचा हे एक गूढच आहे.
पुराणकाळात हम्मुराबी नावाचा सम्राट होऊन गेला.त्यानं बनवलेल्या नियमावलीत शस्त्रक्रियांसंबंधीचेही उल्लेख होते.त्यानुसार शस्त्रक्रिया करून रुग्णाचा आजार बरा करणाऱ्या डॉक्टरला चांदीची १० नाणी इतका मोबदला मिळायचा.पण हा रुग्ण गुलाम असेल तर मात्र डॉक्टरला फक्त पाचच नाणी दिली जायची.त्या काळी डॉक्टरला कुणावरही शस्त्रक्रिया करताना धडकीच भरायची.कारण त्याच्या हातून शस्त्रक्रियेच्या वेळी रुग्ण दगावला किंवा त्याचा एखादा महत्त्वाचा अवयव निकामी झाला तर मात्र त्या डॉक्टरचे हात छाटले जायचे! इजिप्शियन काळातल्या शस्त्रक्रियांमध्येही गमतीजमती असायच्या. कुणाला माणूस किंवा सुसर चावली तर त्या माणसावर शस्त्रक्रिया करण्याऐवजी त्याच्या जखमांवर कच्चं मांस जोरानं दाबून धरावं असं मानलं जायचं.तसंच कुणाला भाजलं तर आज आपण तो भाग लगेच गार पाण्याखाली धरून त्यावर बरनॉलसारखं मलम लावतो तसं त्या काळात त्या ठिकाणी मंदाग्नीवर तळलेला बेडूक चोळावा किंवा बुरशीत कुजलेल्या लेंड्या लावाव्यात असलाही विचित्र उपाय केला जाई. हे सगळं निरुपयोगी ठरलं तरच शस्त्रक्रियेची वेळ येई.हिप्पोक्रॅटसनंही शस्त्रक्रियेविषयी विवेचन केलं होतं.ख्रिस्तपूर्व ८०० ते २०० या काळात भारतात सुश्रुत हा तर शस्त्रक्रियेच्या बाबतीत अतिशय गाजलेला तज्ज्ञ होऊन गेला.
आठव्या शतकात वैद्यकशास्त्राची खूप पीछेहाट झाली आणि त्याची जागा दैववाद,धर्माचं अवडंबर वगैरे गोष्टींनी घेतली.थिओडोरिक नावाच्या एका राजानं तर अतिशय चमत्कारिक पद्धतच सुरू केली.त्यानुसार जर डॉक्टरचा उपचार लागू न पडल्यामुळे एखादा रुग्ण दगावला तर त्या डॉक्टरला चक्क त्या रुग्णाच्या नातेवाइकांच्या स्वाधीन केलं जायचं.मग त्या डॉक्टरचं पुढे काय करायचं ते त्या नातेवाइकांनी ठरवायचं म्हणे! त्यामुळे अवघड शस्त्रक्रिया करायला डॉक्टर्स धजावायचेच नाहीत! अकराव्या शतकात धार्मिक कारणांवरून मठांमध्ये राहणाऱ्या लोकांना दाढी वाढवायला बंदी घालण्यात आली.त्यामुळे न्हाव्यांची चांगलीच चांदी झाली.इतकंच नव्हे तर हळूहळू आपला वस्तरा हे न्हावी लोकांच्या दाढ्या आणि डोक्यावरचे केस साफ करण्याबरोबरच त्यांच्यावर आपल्या अर्धवट ज्ञानाच्या आधारावर घेडगुजऱ्या शस्त्रक्रिया करण्यासाठीसुद्धा वापरायला लागले! असे हे बार्बर सर्जन पुढची ६ शतकं आपला दुहेरी व्यवसाय बिनबोभाटपणे चालवायचे.बोलोना नावाच्या गावात ह्यूज नावाच्या सर्जननं शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या जखमा कोरड्या ठेवल्या तर त्या लवकर भरून येतात असा सिद्धान्त मांडून गेलनच्या पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या संकल्पनांना मोठा धक्काच दिला.गेलननं जखमा नेहमी ओल्या ठेवाव्यात आणि त्यात पू साठू द्यावा म्हणजे त्या पटकन भरून येतात असं म्हणून ठेवलं होतं! ह्यूज आणि त्याचा शिष्य थिओडोरिक यांनी शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णांना भूल द्यायचे प्रकारही करून बघितले होते.
पंधराव्या शतकात न्हाव्यांनी शस्त्रक्रिया कराव्यात का नाही यावरून फ्रान्समध्ये गदारोळ माजला.याची सुरुवात न्हाव्यांनी आपल्या शस्त्रक्रिया रुग्णाच्या जखमांमधून वाहणारं रक्त त्या ठिकाणी जळवा चिकटवून थांबवणं,
दुखरा दात उपटणं,तसंच गळू फोडणं यांच्यापुरतं मर्यादित ठेवावं असा नवा नियम बनण्यातून झाली.न्हाव्यांनी साहजिकच आपल्या पोटापाण्यावर गदा आली असल्याच्या भावनेतून या नियमाला तीव्र विरोध केला.
त्यामुळे प्रकरण पाचव्या चार्ल्स राजापर्यंत गेलं.चार्ल्सकडे त्याच्या खास न्हाव्यानं वशिला लावला आणि आपल्या संघटनेच्या बाजूनं निर्णय मिळवला !
हिप्पोक्रॅट्सच्या काळातले उपचार त्या मानानं फारच अघोरी प्रकारातले होते.त्यात उपायांपेक्षा अपायच अनेकदा व्हायचे.शिवाय,सर्जरी करणं हे सर्जनचं काम नसून,न्हाव्याचं काम होतं अशा समजुतीमुळे सर्जरीज ह्या अशिक्षित न्हाव्यांच्या गंजलेल्या,आधी इतरांनी वापरलेल्या हत्यारांनी आणि अंधाऱ्या खोलीत केल्या जायच्या. बंदुकीची गोळी लागून झालेल्या जखमांवर त्या निर्जंतुक करण्यासाठी त्यावर गरम तेल ओतलं जायचं.
इतर कारणांनी झालेल्या जखमा त्यातल्या रक्तवाहिन्या बंद करण्यासाठी त्यावर तापलेल्या लोखंडाच्या सळईच्या डागण्या देऊन बंद केल्या जायच्या.शिवाय ज्या वेळी रक्त वाहात नसेल त्या वेळी जळवा लावून किंवा मुद्दाम जखमा करून रक्त वाहू दिलं जायचं ही गोष्ट तर वेगळीच! हे सगळं आता बदलायला हवं होतं.अँब्रोसी पारे हे करणार होता.१५१० साली फ्रान्समधल्या बुर्ग-हन्सेंट परगण्यात जन्मलेल्या अँब्रोसी पारे या मुळातच प्रज्ञावंत मुलाच्या मनावर जे जे बघू त्या त्या गोष्टींचा खोलवर परिणाम होत होता.हाच मुलगा पुढे बायॉलॉजीच्या विज्ञानामध्ये प्रगतीचा मैलाचा दगड ठरणार होता.!
त्या काळी अंधश्रद्धांनी आणि जादूटोण्यांनी लोकांच्या मनाचा चांगलाच ताबा घेतला होता.तेव्हा काही दगडांच्या उपचारांनी चक्क विषही उतरतं ही त्यातलीच एक समजूत होती.अँब्रोसीचा असल्या थोतांडावर विश्वास नव्हता.हे सिद्ध करायची संधीही त्याला चालून आली.त्या काळी एका श्रीमंत घरातला आचारीच त्या घरातल्या चांदीच्या वाट्या-चमच्यांची चोरी करतोय असा संशय त्याच्या मालकाला आला होता.त्यावर त्याला त्या काळच्या न्यायाधीशांनी फासावर लटकवण्याची शिक्षा सुनावली होती.पण या आचाऱ्याचा या विष उतरवणाऱ्या दगडावर विश्वास होता.तेव्हा त्यानंच मी फासावर जाणार नाही,
त्याऐवजी विष पिईन.पण मला लगेचच विष उतरवणारा खडा गिळायची परवानगी द्यावी.मी जर त्यातून वाचलो तर मला या आरोपातून मुक्त करावं अशी विनंती त्यानं केली. तेव्हा हा प्रयोग अँब्रोसीच्या देखरेखीखाली करण्याचं ठरलं.आणि त्या आचाऱ्याला विष प्यायला दिलं आणि लगेचच त्यानं तो विष उतरवणारा खडाही गिळून घेतला.पण दुर्दैवानं पुढच्या सातच तासांत त्या आचाऱ्याचा मृत्यू झाला आणि असले विष उतरवणारे दगड खोटे असतात हे अँब्रोसीनं सिद्ध केलं! या आणि अशा अनेक न्यायविषयक प्रयोगांतून अँब्रोसीनं मॉडर्न फॉरेन्सिक पॅथॉलॉजीचा पाया घातला.खरं तर अशाच सत्यावर आणि प्रयोगांवर विश्वास ठेवणाऱ्या वैज्ञानिकांमुळे विज्ञानाची आणि माणसाची प्रगती झाली आहे.लहान असताना अँब्रोसी हा आपल्याच सर्जन असलेल्या मोठ्या भावाच्या हाताखाली लुडबुड करत चक्क सर्जरी शिकला आणि नंतर त्याचाच मदतनीस झाला.त्यात त्यानं लवकरच प्रावीण्य मिळवलं.
त्याच वेळी मात्र त्यानं 'हॉटेल दियू' या फ्रान्समधल्या सगळ्यात जुन्या हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय शिक्षण घेतलं.नंतर तो सैन्याचा सर्जन म्हणून फ्रेंच सैन्यात दाखल झाला.आधी त्यानं रुग्णांच्या वेदना पाहिल्या होत्या.
त्यामुळे त्यानं सैनिकांवर जरा कमी वेदना होतील असे उपचार करायला सुरुवात केली.यासाठी त्यानं प्रयोग केला.एकदा बऱ्याच सैनिकांना जखमा झाल्या होत्या.
त्यापैकी अर्ध्यांना त्यानं पूर्वीप्रमाणे तापलेल्या लोखंडी सळईच्या डागण्या दिल्या आणि अर्ध्यांना जखमा बांधून टाकून टर्पेटाइन असलेलं ऑइंटमेंट लावलं.दुसऱ्या दिवशी येऊन पाहिल्यानंतर डाग दिलेले रुग्ण अजूनही वेदनेनं विव्हळत होते,तर ऑइंटमेंट लावलेले सैनिक शांत होते.
डाग दिलेल्या सैनिकांना पुढे जखमा अजूनच चिघळल्यामुळे त्यांना इन्फेक्शन झालं होतं तर ऑइंटमेंटमध्ये असलेल्या टर्पेटाइनच्या अँटिबायोटिक परिणामांमुळे ऑइंटमेंट लावलेल्या सैनिकांच्या जखमा भरून येण्याचं प्रमाण लगेचच वाढलं होतं.
बंदुकीच्या गोळ्यांच्या जखमांवर पारे घरातल्या तापमानाचंच मलम लावत असे आणि रक्त वाहणाऱ्या रक्तवाहिन्या बांधून टाकत असे. या उपायांनी रुग्ण बरे होण्याचं प्रमाण जास्त होतं. त्यामुळे पारेला यशही मिळायला लागलं होतं.पारेनं सैनिकांचे हात आणि पाय तुटलेले पाहिले होते.त्यातून त्यानं अशा प्रकारे अपंग झालेल्या व्यक्तींसाठी पहिल्यांदाच कृत्रिम हात आणि पाय हे अवयव तयार केले होते.त्या काळी एखाद्या स्त्रीची प्रसूती होताना पोटात बाळ जर आडवं असेल किंवा एकच हात किंवा एकच पाय आधी बाहेर येऊन बाळ अडकलं असेल तर त्या काळी पोटातच त्या बाळाचे एक एक अवयव कापून टाकून मग एक एक अवयव पोटातून बाहेर काढावे लागत होते.अर्थातच,अशा अवस्थेत असलेल्या अर्भकांना निर्दयीपणे मारावं लागत होतं.
नाहीतर प्रचंड रक्तस्रावानं त्या स्त्रीचा बळी जायचा.
अँब्रोसीनं अशी बाळंतपणं कशी करावीत याचंही तंत्र त्या काळी विकसित केलं होतं.बाळंतपणातल्या पद्धतींमध्ये त्यानं अनेक सुधारणा केल्या.त्याची हीच परंपरा पुढे चालवत त्याचा शिष्य जॅकस गुलीमाऊ यानं पुढे स्त्रीरोगशास्त्र आणि प्रसूतिशास्त्रात फारच प्रगती घडवून आणली.अँब्रोसीच्या याच शिष्यानं त्याचं काम लॅटिनमध्ये अनुवादित केलं.अँब्रोसीनं व्हेसायलियसच्या कामाचा फ्रेंचमध्ये अनुवादही केला.याचा त्या वेळच्या लॅटिन न शिकलेल्या अशिक्षित बार्बर सर्जन्सना मानवी शरीराबद्दल माहिती मिळावी असा त्याचा हेतू होता.अशा प्रकारे अँब्रोसी पारेनं सर्जरीचं शास्त्र पुढे नेलं.
रेनायसान्सच्या काळात इटलीमध्ये गॅस्पर ताग्लियाकोझी (१५४७ ते १५९९) यानं प्लॅस्टिक सर्जरीच्या बाबतीत खूप मोठी कामगिरी केली.
एखाद्या माणसाची नैसर्गिकरीत्या असलेली किंवा काही कारणांनी त्याच्यात निर्माण झालेली व्यंगं आणि वैगुण्य दूर करण्यासाठी दुसऱ्या माणसाच्या त्वचेचं त्या वैगुण्य असलेल्या माणसाच्या त्वचेवर रोपण करावं असं ताग्लियाकोझीनं सुचवलं.
यामुळे अनेक लोकांना आपापली व्यंगं झाकता आली.
पण त्याचबरोबर माणसाच्या मूळ रूपात बदल करायच्या या कल्पनेवर धार्मिक वृत्तीच्या लोकांनी आणि चर्चनं जोरदार शाब्दिक हल्ला चढवला.तो इतका भयानक होता,की ताग्लियाकोझी दगावल्यावर त्याचं प्रेत जिथं पुरलं होतं तिथून ते उकरून काढण्यात आलं आणि ते एका घाणेरड्या ठिकाणी पुन्हा एकदा दफन करण्यात आलं.याच सुमाराला फ्रान्समध्ये मूळचे सर्जन्स असलेले आणि न्हावीकाम करत करत सर्जन झालेले बार्बर-सर्जन्स यांच्यात चांगलीच चढाओढ निर्माण झाली.आपल्या हातून काही चूक झाली तर आपल्या अब्रूचे धिंडवडे निघतील या भीतीनं सर्जन लोक हर्निया,
मूतखड्याची शस्त्रक्रिया वगैरे कामं करायला बिचकायचे.पण बार्बर-सर्जन्स मात्र बेधडकपणे या शस्त्रक्रिया करत गावोगाव फिरायचे.सतराव्या शतकात अचानकपणे आपल्या शरीरात दुसऱ्या माणसाचं रक्त भरून घ्यायची विचित्र प्रथा एकदम लोकप्रिय झाली! सुरुवातीला रोगांवर उपचार म्हणून या पद्धतीचा वापर केला जायचा.पण नंतर धडधाकट माणसंसुद्धा विनाकारणच आपल्या शरीरात रक्त भरून घ्यायला लागली.काही काळात ही एक फॅशनच बनली.
राजघराण्यातल्या माणसांनाही या गोष्टीचं आकर्षण वाटायला लागलं.त्यामुळे शरीरात रक्त भरून देणाऱ्या शस्त्रक्रिया करणाऱ्या लोकांचं चांगलंच फावलं.एका माणसाच्या शरीरातून रक्त काढून ते दुसऱ्या माणसाच्या शरीरात भरण्यासाठी वेगवेगळी उपकरणं निघाली. १६६७ साली जाँ डेनिस या माणसानं एका मेंढीच्या शरीरातलं रक्त काढून ते १५ वर्षं वयाच्या एका मुलाच्या शरीरात भरलं. सुदैवानं त्या मुलाला काही अपाय न झाल्यामुळे सगळीकडे हा उद्योग मोठ्या प्रमाणावर सुरू झाला.त्या काळात माणसाच्या शरीरातल्या रक्ताचे वेगवेगळे रक्तगट असतात आणि कुठल्याही रक्तगटाचं रक्त दुसऱ्या कुठल्याही माणसाच्या शरीरात भरून चालत नाही ही महत्त्वाची माहिती कुणाला नसल्यामुळे साहजिकच रक्त भरायच्या या प्रकारांमधून अनेक दुर्घटना घडल्या.
१७१५ साली फ्रान्समधला चौदावा लुई राजा पायाला गँगरिन होऊन मेला.पण त्याच्या अखेरच्या काळात मारेशा आणि फिगो या दोघा वैज्ञानिकांनी केलेल्या शस्त्रक्रियांची आणि उपचारांची सगळ्यांनीच स्तुती केली.यामुळे शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांची प्रतिमा उजळायला मदत झाली.मारेशानं या परिस्थितीचा फायदा उठवून द पेरोनी या आपल्या शिष्याच्या मदतीनं राजदरबारातलं आणि एकूणच समाजातलं आपलं महत्त्व वाढवून घेतलं.पंधराव्या लुई राजाच्या काळापर्यंत त्यांनी शस्त्रक्रियेला खूपच मानाचं स्थान मिळवून दिलं.मरताना पेरोनी यानं आपली तब्बल ...
१५ लाख फ्रैंक्स इतकी संपत्ती पॅरिसमधल्या सर्जनच्या संघटनेला दान केली.सर्जन्स हे इतर शाखांमधल्या डॉक्टर्सप्रमाणेच अतिशय गुणवान असतात हे सिद्ध करण्यासाठी पेरोनीची धडपड सुरू होती. त्यामुळे त्यानं पॅरिसमधल्या वैद्यकीय महाविद्यालयात शिकवण्यासाठी सर्जन्स नेमले जावेत अशी मागणी केली.राजानं ती मान्य करताच सर्जन्स सोडून इतर डॉक्टर्सचा जळफळाट झाला.
त्यांनी या निर्णयाविरुद्ध मोर्चा काढला,पण त्यामुळे त्यांच्या हाती काही लागलं नाही.