१४.०८.२४ या लेखातील पुढील भाग…
अलेक्झांडरने जोसेफना मौसमी पावसाचा चेरापुंजीपर्यंत पाठलाग करण्याची कल्पना सांगितली.त्यांनी अविश्वासाने अलेक्झांडरकडे बघितलं.त्यांच्या म्हणण्यानुसार अलेक्झांडरला चेरापुंजीला जायची परवानगी मिळण्याची खात्री नव्हती.(त्या वेळी ईशान्य भारतात वेगवेगळी आंदोलनं आणि भूमिगत चळवळींचा जोर होता.)मात्र मौसमी पावसाच्या गुंतागुंतीच्या प्रक्रियेची त्यांनी अलेक्झांडरला अगदी बारकाईने माहिती दिली "मॉन्सून हा शब्द मौसम या अरेबिक शब्दाचा अपभ्रंश आहे.मौसम म्हणजे सीझन (ऋतू).मौसमी पावसाचा अभ्यास सतराव्या शतकात सुरू झाला.त्यावेळचे रॉयल सोसायटीचे अध्यक्ष,'धूमकेतू' फेम एडमंड हॅली यांनी मौसमी पावसाच्या प्रवासाचा एक अद्भुत नकाशा प्रसिद्ध केला.त्या काळातल्या सोयीसुविधा पाहता ते काम खरोखरच अद्वितीय होतं.त्यानंतरच्या काळात मौसमी पावसावर भरपूर संशोधन झालेलं आहे,याचं कारण पृथ्वीच्या वातावरणातील ही सर्वांत महान जलवायुमान प्रणाली आहे (जलवायुमान म्हणजे क्लायमेट).गेली तीनशे ते साडेतीनशे वर्षं संशोधन होऊनसुद्धा या रहस्याचा उलगडा अजून झालेला नाही.
मौसमी पावसाबद्दल दरवर्षी नवी माहिती पुढे येते.ही प्रणाली मानवी मेंदूसारखंच एक रहस्य आहे." जोसेफ यांचं हे बोलणं अखंड नव्हतं. त्यांना सतत फोन येत होते. यातून वेळ मिळेल तेव्हा ते संभाषणाचा आधीचा धागा पकडून अलेक्झांडरला माहिती देत होते.या रहस्यात आणखी एक तिढा आहे.मौसमी पावसाचे ढग दोन मार्गांनी जातात.एक अरबी समुद्रावरचा आणि दुसरी बंगालच्या उपसागरातला.अरबी समुद्राच्या मार्गाने जाणारा मॉन्सून पश्चिम घाटाला अडतो.त्या ढगांतलं बहुतेक सर्व पाणी पावसाच्या रूपाने कोसळतं.पश्चिम घाट ओलांडून जे ढग पलिकडे जातात त्यात अत्यल्प बाष्प असतं.बंगालच्या उपसागरातील शाखाही याचवेळी कार्यरत होते.आमच्याकडे पाऊस सुरू होतो,त्यानंतर काही दिवसांतच चेरापुंजीत पाऊस पडायला सुरुवात होते.' ते ऐकून अलेक्झांडर म्हणाला,म्हणजे दर उन्हाळ्यात भारताला या दोन ओल्या हातांचा विळखा पडतो तर..."जोसेफना ती भाषा पीत पत्रकारितेची वाटली.त्याबद्दल त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
निसर्गाच्या या भव्य आविष्काराबद्दल असं बोलणं त्यांना अयोग्य वाटलं.मात्र त्यांनी आपलं माहिती देण्याचं काम पुढे सुरू ठेवलं. हे दोन्ही मॉन्सूनचे प्रवाह अखेरीस एकत्र येतात. बंगालच्या उपसागरातील शाखा पश्चिमेकडे वळते,कारण ती हिमालयाला अडते.जेव्हा गंगेच्या खोऱ्यात पाऊस सुरू होतो त्यावेळी तो पश्चिमेकडून आलाय की नैऋत्येकडून हे सांगणं अवघड जातं.हे जलवायुमानाचं चक्र प्रचंड गुंतागुंतीचं आहे; त्यावर बऱ्याच गोष्टींचा परिणाम होत असतो.तिबेटच्या पठाराचं तापणं,दक्षिण गोलार्धातील व्यापारी वारे,जेट प्रवाहाचा मार्ग, सोमाली जेट प्रवाहाची सुरुवात,सहाराच्या दक्षिणेकडून ९० अंशाचा कोन करून आफ्रिकेचा किनारा पार करून या जेट प्रवाहाचा पूर्वेकडे प्रवास सुरू होतो.त्याची उंची आणि वेग हेसुद्धा मौसमी पावसावर परिणाम करतात;असे आणखीही अनेक घटक आहेत.
मुख्य म्हणजे भूमीचं तापमान सागराच्या तापमानापेक्षा जास्त असायला हवं.इतकी माहिती दिल्यानंतर जोसेफ यांनी अलेक्झांडरला बाहेरच्या बागेतलं 'वेदर बलून' दाखवलं.असे बलून्स वातावरणाच्या अभ्यासासाठी हवेत सोडले जातात.त्यांच्यामार्फत हवेच्या प्रवाहाची दिशा, वाऱ्यांचा वेग आणि जेट प्रवाहाचं स्थान आणि वेग,यांची माहिती मिळते...ते म्हणाले,सोमवार,बुधवार,शुक्रवार आयात केलेले परदेशी बलून सोडतात;तर मंगळवार,
गुरुवार,शनिवारी भारतीय बनावटीचे बलून आम्ही वापरतो.भारतीय हवामानाप्रमाणेच हे भारतीय बनावटीचे बलून कधी दगा देतील सांगता येत नाही अशी टिप्पणीही त्यांनी केली. हे बलून्स २५ ते ३० कि.मी.उंच जातात आणि फुटतात.मौसमी पावसाच्या काळात भारतातील ४० वेधशाळा रोज चार बलून आकाशात सोडतात.जे बलून्स समुद्रात जातात,ते परत मिळवता येत नाहीत. जमिनीवर पडण्याची शक्यता असलेल्या बलूनना एक सूचना चिकटवलेली असते- ही भारत सरकारची मालमत्ता आहे.सापडल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात नेऊन द्यावी.पण ते अगदी क्वचित घडतं.
कलकत्त्याच्या डमडम विमानतळावरून सोडलेले बलून्स लोकांनी परत करावेत म्हणून त्यांना तर पेनं,खेळणी,
कोऱ्या कॅसेट आणि भारतीय हवामान खात्याची अधिसूचना असलेली स्टिकर्स असलेली छोटी पिशवी बांधण्यात येते.पण तिथले लोक या वस्तू ठेवून घेतात,
बलूनचं कापड गोठ्यावर घालतात आणि खालचा कंटेनर स्वयंपाकासाठी वापरतात ! बलून कुठून कसा जाईल हे सांगणं अवघडच असतं.तैवान सरकार चीनविरुद्धचं प्रचारसाहित्य असलेले बलून्स सोडतं.त्यांतले काही आसाम आणि बंगालमध्ये सापडले आहेत." जोसेफ माहिती देत होते. "१० मेच्या आधी पडलेला पाऊस मौसमी पावसात गणला जात नाही. केरळातील पाच ठिकाणच्या पाऊसमापन केंद्रांमध्ये सतत दोन दिवस कमीत कमी एक मि.मी.पाऊस पडला की त्याच्या दुसऱ्या दिवशी मौसमी पावसाचं आगमन झाल्याचं जाहीर केलं जात.अर्थात,तेरा अक्षांशापर्यंत म्हणजे पश्चिम घाटाच्या एक तृतियांश भागापर्यंत मौसमी पावसाचे ढग बरसू लागले,की मगच भारतीय लोक सुटकेचा निःश्वास टाकतात.प्रचंड उकाड्यात तग धरून अलेक्झांडर रोज वेधशाळेत जात होता.दोन जूनला त्याच्या तपश्चर्येला यश आलं.जोसेफनी 'उद्या कोचीनला बहुतेक पाऊस येईल असं त्याला सांगितलं. त्यावर अलेक्झांडरने कोचीनला जाण्याचा मनसुबा बोलून दाखवला.पण जोसेफनी त्याला अडवलं आणि ते त्याला म्हणाले,तुला या पावसाची आणि वाऱ्यांची माहिती नाही.तुला तिथे कुणी नेणारही नाही.तू पावसाची वाट बघत इथंच थांब.कोवालम् चौपाटीवर तुला तो पहिला पाऊस अनुभवता येईल.
अलेक्झांडर तिथून बाहेर पडला.शहरातलं वातावरण पूर्णपणे बदललेलं होतं.रस्त्यात लोक गटागटाने उभे राहून आकाशाकडे बघत होते.दरम्यान फ्रेटरला परत त्रास व्हायला सुरुवात झाली होती.त्याच्या दोन्ही हातांना मुंग्या येत होत्या.तो स्थानिक उपचार केंद्रात गेला.मात्र तिथे आपल्याला बराच काळ रहावं लागेल हे त्याच्या लक्षात आलं आणि त्याने तो नाद सोडून दिला.त्याला मौसमी पावसाचा पाठलाग जास्त महत्त्वाचा वाटत होता.तीन जूनला सकाळी तो उठला.रात्रीच मौसमी पावसाची पहिली सर पडून गेली होती.जोसेफ यांच्या कार्यालयातल्या एका अधिकाऱ्याने त्याला सांगितलं,
मौसमी पाऊस त्याच्या सोयीनं येतो,तू कोचीनला जा,तिथे नक्की भिजशील.या टप्प्यावर या पुस्तकातली सर्वांत मोठी चूक आढळते.अलेक्झांडर आपल्याला मौसमी पावसाची सुरुवात हिमालयाच्या उत्थानामुळे झाली हे बरोबर सांगतो,पण हिमालयाचं उत्थान साठ ते ऐंशी कोटी वर्षांपूर्वी झाल्याचं सांगतो,हे चूक आहे. मायोसीन कालखंडात हिमालयाचं उत्थान व्हायला सुरुवात झाली,हे बरोबर आहे;पण हा कालखंड खूपच अलीकडचा म्हणजे साधारणपणे तीन ते एक कोटी वर्षांपूर्वीचा आहे. हिमालयाच्या उत्थानाला याच्या थोडी आधी सुरुवात झाली आणि त्याला आजचं रूप अडीच ते दोन कोटी वर्षांपासून प्राप्त झालं असावं,असं मानलं जातं.यात पाच-पंचवीस लाख वर्षं इकडे-तिकडे होऊ शकतात,पण अलेक्झांडर म्हणतो त्याप्रमाणे सहाशे मिलियन ते आठशे मिलियन (साठ कोटी ते ऐंशी कोटी) हे आकडे चुकीचे आहेत.ही एक बाब वगळली तर अलेक्झांडरचं हे पुस्तक अगदी आवर्जून वाचावं.
असं आहे.अर्थात,वाचताना अलेक्झांडरचा एक ब्रिटिश म्हणून भारताकडे आणि भारतीयांकडे बघण्याचा विशिष्ट दृष्टिकोन वारंवार प्रत्ययास येतो.अलेक्झांडरने त्याच्या वास्तव्याच्या हॉटेल्सची वर्णनं केलेली आहेत,ती अतिशयोक्तिपूर्ण वाटतात.ब्रिटिश माणूस एखाद्या वृत्तपत्राचं प्रायोजकत्व मिळवून भारतात आल्यावर अशा प्रकारच्या हॉटेलातून वास्तव्य करेल,हे खरं वाटत नाही.
पण त्याने हे पुस्तक पाश्चात्त्य वाचक डोळ्यांसमोर ठेवून लिहिलं आहे,ही बाब इथे लक्षात घ्यायला हवी.भारतीय कारकूनशाही त्याला नडली,असं तो लिहितो.ती कारकूनशाही ब्रिटिशांनी भारतावर लादलेली देणगी आहे,हेही लक्षात घ्यायला हवं.तरीही तो ज्या पद्धतीने मौसमी पावसाचा पाठलाग करत हिंडला आणि अखेरीस चेरापुंजीला जाऊन त्याने पाऊस उपभोगला,त्याला दाद द्यायलाच हवी.या प्रवासादरम्यान अलेक्झांडर ज्या ज्या माणसांना भेटला त्यांच्याशी झालेल्या 'गॉसिप' स्वरूपाच्या गप्पाही पुस्तकात वाचायला मिळतात.त्याचं वर्णन इथे मी मुद्दाम टाळलंय.मात्र,त्याने सांगितलेली ऐतिहासिक माहिती बरीच तथ्य असलेली आणि मनोरंजक आहे. वानगीदाखल एक उदाहरण देतो.कोचीन
बंदरात मौसमी पावसाची वाट बघत असताना अलेक्झांडरला एक इटालियन जहाज दिसलं.तो धागा पकडून 'रोमनांचा मॉन्सूनशी संबंध होता' हे तो आपल्याला सांगतो.मौसमी वाऱ्यांच्या साहाय्याने शिडाची जहाजं भारतात नेणं सोपं आहे,हे लक्षात आल्यावर रोमचा भारताशी व्यापार वाढला. (खरं तर भारतीय नाविक त्याआधीपासूनआफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावर जात होते.) मात्र,हा व्यापार अरब नावाड्यांच्या मार्गदर्शनाखाली होत होता,हे सांगायला अलेक्झांडर विसरतो.मलबार किनाऱ्यावर जे अवशेष सापडतात त्यात प्राचीन रोमन नाणी सापडतात.भारतातून काळी मिरी,तलम कापड, रेशमी वस्त्रं,मोती,हस्तिदंत,चंदन,
रक्तचंदन, शिसवी लाकूड,सुपारी,खायची पानं,हिरे,
कासवांच्या पाठी,तांदूळ,तूप,मध,दालचिनी,धने, आलं,नीळ आणि इतरही बरेच पदार्थ रोमला जात;याशिवाय अनेक मौल्यवान आणि अर्ध मौल्यवान रत्नांचे खडेही रोमला जात;नीरोच्या काळात कोचीनला रोममध्ये बरंच महत्त्व प्राप्त झालं होतं;भारतीय वस्तूंचं अंगभर प्रदर्शन हा श्रीमंतीची प्रसिद्धी करण्याचा राजमार्ग होता; रोमच्या सिनेटमध्ये त्यामुळे भारतीय महाराजांचं संमेलन भरल्याचा भास होत असे,असं तो नमूद करतो.
अलेक्झांडरने आपल्या प्रवासात दिल्लीत हवामान
खात्याच्या महासंचालकांची भेट मिळवली.तिथे त्याला भारतीय हवामान खात्यातर्फे मौसमी पावसाचा माग काढण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांबद्दलची माहिती मिळाली.तसंच तोपर्यंत काढल्या मौसमी पावसाच्या अभ्यासाच्या आंतरराष्ट्रीय प्रयत्नांचीही माहिती मिळाली.डॉ.आर.पी. सरकार हे त्या वेळी भारतीय हवामानखात्याचे प्रमुख होते.त्यांनी अलेक्झांडरला सांगितलं, मौसमी पाऊस ही एक जागतिक प्रणाली आहे. सर्वच राष्ट्रांना मौसमी पावसाच्या अभ्यासात रस आहे,
कारण ती एक जागतिक समस्याही आहे. आम्ही जगभर कुठे काय घडतंय याची नोंद ठेवतो.कारण दोन-तीन दिवसांनी ती बाब आमच्यावर परिणाम करू शकते.
ऑस्ट्रेलियावरील हवेचा दाब,ब्यूनोस आयर्स आणि ताहितीमधलं हवामान,रशियावरील वातावरणाच्या वरच्या थरातील हवेच्या प्रवाहाची दिशा,अंटार्क्टिकावर या वर्षी झालेला हिमपात, अशा अनेक घटकांचा आम्ही विचार करत असतो.त्यांनी अलेक्झांडरला एल निनोची माहिती दिली.भारत 'वर्ल्ड मेटिऑरॉजिकल ऑर्गनायझेशन'चा सदस्य असल्याचं सांगून ते म्हणाले,या जागतिक संस्थेचे एकशे साठ सदस्य आहेत.ते सतत एकमेकांच्या संपर्कात असतात. त्यांनी मॉन्सूनच्या उन्हाळी हालचालींचा आढावा घेणारं केंद्र दिल्लीत स्थापन केलेलं आहे (समर मॉन्सून ॲ क्टिव्हिटी सेंटर- 'स्मॅक'). मॉन्सूनच्या अभ्यासासाठी अनेक आंतरराष्ट्रीय प्रयत्न झाले आहेत.
मोनेक्स एकोणऐंशी,मॉन्सून-सत्त्याहत्तर, इस्मेक्स त्र्याहत्तर आणि आयआयओई (इंटरनॅशनल इंडियन ओशन एक्स्पिरिमेंट) हे त्यातले काही आंतरराष्ट्रीय प्रयत्न."
भारतीय हवामानखात्याच्या पहिल्या महासंचालकपदी इ.स. १८७५ मध्ये एच.एफ. ब्लँडफोर्ड यांची नेमणूक झाली. ईस्ट इंडिया कंपनीने अठराव्या शतकात या खात्याची स्थापना केली होती.मात्र,मौसमी पावसाचा अंदाज घेण्याच्या त्यांच्या पद्धती अगदीच प्राथमिक स्वरूपाच्या होत्या.ब्लॅडफोर्डनी मौसमी पावसाच्या अभ्यासाचा शास्त्रीय पाया घातला. त्यांचं सारं आयुष्य त्यांनी या नैसर्गिक घटनेच्या अभ्यासाला वाहिलं.मौसमी पाऊस ही एक गुंतागुंतीची प्रणाली असल्याचं त्यांनी प्रथम जगासमोर आणलं.त्यांच्यावर मॉन्सूनने जी मोहिनी घातली ती कायमस्वरूपी होती.त्यांनी आशिया खंडात हवामानाच्या नोंदी ठेवणारी केंद्रं आणि वेधशाळांचं जाळंच उभारलं.भारत आणि ब्रह्मदेशातून (आता म्यानमार) दैनंदिन नोंदींच्या तारा रोजच्या रोज त्यांच्या कचेरीत पोहोचू लागल्या.त्यांनी पर्वतशिखरांवरही वेधशाळा बांधल्या.याशिवाय पतंगांच्या साहाय्याने वातावरणाचा अभ्यास करणारी केंद्रं जागोजाग निर्माण केली.अनेक भारतीय तरुणांना त्यांनी हवामानखात्यात भरती केलं. त्यांच्या निवृत्तीच्या सुमारास त्यांनी 'द रेनफॉल इन नॉर्दर्न इंडिया' हा ग्रंथ लिहिला. 'द इंडियन मेटिऑरॉलॉजिस्ट्स व्हेड मॅक्कम' या ग्रंथाने त्यांच्या सेवेची सांगता झाली.एकोणिसावं शतक आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात हे ग्रंथ मौसमी पावसाचे बायबल मानले जात.ब्लॅडफोर्डच्या निवृत्तीनंतर सर जॉन एलियट हे भारतीय हवामानखात्याचे प्रमुख बनले.त्यांच्या काळात मॉन्सूनच्या अभ्यासासाठी आंतरराष्ट्रीय सहकाराची सुरुवात झाली. इ.स.१८९७ मध्ये पहिलं 'आंतरराष्ट्रीय मेघ अभ्यास वर्ष' जाहीर झालं,त्यात भारताचा सहभाग होता.एलियटनी फ्रेंच शास्त्रज्ञ तिसेराँस द बोर्ट यांच्या सहकार्याने भारतात मोठ्या प्रमाणावर वातावरणाचा अभ्यास सुरू केला.द बोर्टनी वातावरणातील स्तरितांबराचा शोध लावला होता.मौसमी पावसाचा अंदाज जाहीर करायची कल्पनाही सर जॉन एलियट यांचीच. (अगदी सुरुवातीला हा अंदाज गुप्त ठेवण्यात येत असे. तो फक्त वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांना पाहावयास मिळे.)एलियटनंतर त्यांचा एक सहायक गिल्बर्ट वॉकर यांच्याकडे हवामानखात्याची सूत्रं आली. वॉकरनी मौसमी पावसाच्या अभ्यासास गती दिली.मौसमी पावसाच्या अभ्यासामुळे ते जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ म्हणून ओळखले जाऊ लागले.भारतीय हवामानखात्याच्या इतिहासातही त्यांचं नाव अग्रणी हवामानशास्त्रज्ञ म्हणून आदराने घेतलं जातं. वॉकर यांना प्रत्येक वैज्ञानिक घटनेचं कुतूहल वाटत असे.प्रत्येक घटनेची कारणमीमांसा केल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे.सर विल्यम विल्कॉक्स या इजिप्तमधल्या जलसाठा नियोजन प्रकल्पाच्या महासंचालकांनी नाइल नदीला येणाऱ्या पुरांचा आणि भारतात पडणाऱ्या पावसाचा काही तरी संबंध असल्याचं म्हटलं होतं.त्या विधानाची सत्यता सिद्ध करण्यासाठी वॉकरनी आकडेवारी गोळा केली.वृक्षतोड आणि मौसमी पाऊस यांचाही त्यांनी अभ्यास केला.सौर डागांचं चक्र आणि मौसमी पाऊस यांचा परस्परसंबंध त्यांनी तपासून बघितला.तसंच भारतातील मौसमी पाऊस आणि जागतिक हवामानचक्राचा संबंधही त्यांनी सर्वप्रथम तपासला. वॉकर यांच्या संशोधनाने त्या काळात बऱ्याच वेळा खळबळ माजली.सिडनी (ऑस्ट्रेलिया) आणि ब्यूनोस आयर्स (अर्जेंटिना) अशा जगाच्या दोन टोकांच्या शहरांच्या हवेचा दाब आणि पश्चिम घाटातील पाऊस,अंटार्क्टिकातील हिमखंड आणि भारतातील पाऊस यांचाही संबंध असावा,असं वॉकर म्हणत.ते सिद्ध व्हायला पुढे शंभर वर्षं लोटावी लागली.
वॉकरनी सर्वप्रथम पॅसिफिक महासागराचा आणि मौसमी पावसाचा संबंध असल्याचं विधान केलं.पॅसिफिक महासागरावरील हवेचा जास्त दाबाचा पट्टा आणि त्याच वेळी हिंदी महासागरावर कमी दाबाच्या पट्ट्याची निर्मिती,हा कमी दाबाचा पट्टा हिवाळ्यात टिकून राहणं यांचा आणि भारतीय उपखंडात पाऊस मुबलक प्रमाणात पडण्याचा संबंध असावा,असंही वॉकरचं म्हणणं होतं.'सर गिल्बर्ट वॉकर इज फादर ऑफ मॉन्सून स्टडीज' असं यामुळेच म्हटलं जातं. या सर्वच इंग्रज मॉन्सून अभ्यासकांच्या कार्याचं सार अलेक्झांडरच्या शब्दांत सांगायचं तर ते असं सांगता येईल- मॉन्सून कळायला अनेक जन्म घेतले तरी तो कळेल याची खात्री देता येत नाही.जरा काही नवा पैलू उघड करावा तर त्याच्या आड आणखी बरंच काही दडलंय हे लक्षात येतं.' अलेक्झांडरचं पुस्तक अशा माहितीचा खजिनाच आहे.शिवाय ते एक चांगलं प्रवासवर्णन आहे.पुस्तकात शास्त्रीय माहितीबरोबर मौसमी पावसावर अवलंबून असणाऱ्या भारताच्या विविध भागांतील सामाजिक चालीरीतींचंही चित्रण आहे.अशा रंजक वर्णनाच्या साथीने आपणही नकळत केरळ ते चेरापुंजी प्रवास करतो.वाटेतला आपल्या परिचयाचा मॉन्सून अलेक्झांडरच्या नजरेतून नव्याने अनुभवतो.
अलेक्झांडर अखेर चेरापुंजीला कसा पोहोचला ही पुस्तकातली गमंत तर मुळातूनच वाचण्याजोगी आहे. बीबीसीने या पुस्तकावर आधारित माहितीपट तयार केला आहे.ज्यांना मौसमी पावसाबद्दल कुतूहल आहे त्यांनी अलेक्झांडरने केलेला हा आगळावेगळा 'मॉन्सून पाठलाग' अवश्य वाचायला हवा.
लोकांकडे कल्पना नसतात,कल्पनांना लोक असतात.- पॉल बी. रेनी.