निव्वळ कुतुहलापोटी एखाद्या प्राण्याच्या अधिवासाचा माग काढणं,त्यासाठी पडतील ते कष्ट झेलणं,ती अभ्यासपूर्ण निरिक्षणं इतरांनाही सांगण्याच्या ऊर्मीपोटी सकस लेखन करणं,या सगळ्याचं एक नाव म्हणजे डायेन ॲकरमन. तिने वटवाघुळं,सुसरी अशा विशेष प्रसिद्ध नसणाऱ्या प्राण्यांसंबंधी संशोधन केलं.तिच्या रंजक मोहिमांच्या गोष्टी सांगणारं हे पुस्तक.
वैज्ञानिक बनण्यासाठीचा एक अत्यावश्यक गुण म्हणजे कुतूहल,आणि ते कुतूहल शमवण्यासाठी लागणारी अफलातून चौकसबुद्धी.अशा व्यक्ती ज्ञानसंपादनाने झपाटलेल्या असतात;मधमाश्यांप्रमाणे दिसेल तिथे अक्षरशःनाक खुपसतात आणि आपला ज्ञानसंग्रह समृद्ध करतात.डायेन ॲकरमन ही अशाच खास व्यक्तींपैकी एक.ती स्वतः ज्ञानसंग्राहक तर आहेच;ती तिचं ज्ञान ग्रंथबद्धही करते.तिने अनेक विषयांसंबंधी लिहिलेली पुस्तकं गाजली;बऱ्याच ज्ञानशाखांत ती संदर्भग्रंथ म्हणून वापरली जातात.तिचं ज्ञान त्या-त्या ज्ञानशाखेत क्षेत्रपरीक्षण करून मिळवलेलं ज्ञान असतं;विज्ञानाच्या प्रगतीला ते हातभारच लावतं.यामुळेच ॲकरमनला विज्ञानजगतात देखील आदराचं स्थान मिळालं आहे.'द मून बाय द व्हेल लाइट अँड अदर ॲडव्हेंचर्स अमंग बॅट्स,पेंग्विन्स, क्रोकोडिलियन्स अँड व्हेल्स.' हे तिचं १९९४ सालचं पुस्तक म्हणजे लोकार्थी विज्ञानाचा (पॉप्युलर सायन्स) एक उत्कृष्ट नमुना मानला जातो.मुळात डायेन ॲकरमन ही कवी.तिने पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून कलाशाखेतील पदवी मिळवल्यावर कॉर्नेल विद्यापीठातून 'मास्टर ऑफ फाइन आर्ट्स' आणि पीएच.डी. मिळवली.तिचे पाच कवितासंग्रह प्रसिद्ध झाले. ती 'न्यूयॉर्कर' या नियतकालिकामध्ये स्तंभलेखक म्हणून काम करू लागल्यावर तिने विज्ञानशाखांकडे लक्ष वळवलं.
वेगवेगळ्या मानवी समूहांतील प्रेमासंबंधीच्या कालच्या आणि आजच्या कल्पना,प्रेमभावनेचे वेगवेगळे पदर,
विविध देशांमधल्या प्रेम व्यक्त करण्याच्या भावना,
आख्यायिका आदींचा सखोल अभ्यास करून तिने 'नॅचरल हिस्टरी ऑफ लव्ह' (१९९४) हा मानवशास्त्रीय ग्रंथ लिहिला.त्यासाठी ती बऱ्याच देशांत हिंडली.अनेक ग्रंथालयांतून तिने संदर्भ गोळा केले;पुराणं,मिथकं,
आख्यायिका समजावून घेतल्या;पाळीव प्राण्यांपासून ते खेळणी,वस्तू,मित्र- मैत्रिणी अशा विविध प्रकारच्या प्रेमाबद्दलचं संशोधन गोळा केलं.तिने या क्षेत्रातील शास्त्रज्ञांची भेट घेतली. त्याशिवाय तत्त्वज्ञान आणि मानसशास्त्रीय अभ्यासाचा धांडोळा घेऊन मगच तिने हा ग्रंथ लिहिला.हा ग्रंथ लिहिण्याआधी तिने 'अ नॅचरल हिस्टरी ऑफ सेन्सेस' हा ग्रंथ १९९० मध्ये लिहून पूर्ण केला होता.त्यातूनच 'नॅचरल हिस्टरी ऑफ लव्ह' लिहायची प्रेरणा तिला मिळाली होती. पंचेंद्रियांमुळे आपल्याला होणाऱ्या जाणिवांमध्ये आपण 'स्पर्श' या भावनेचा कधी झटकन समावेश करत नाही.खरं तर आपली त्वचा हीदेखील एक ज्ञानेंद्रियच आहे.चुंबन ही मानवी व्यवहारातील आणि जोडीदार टिकवण्यातील एक महत्त्वाची घटना;पण तितकंच तिचं महत्त्व नाही,तर अजाण बालकालाही आईचं ममत्व कळतं ते चुंबनामुळेच.
हे चुंबन कसं उत्क्रांत झालं हे 'अ नॅचरल हिस्टरी ऑफ सेन्सेस' वाचताना आपल्या कळतं. हा ग्रंथ लिहिताना ॲकरमननी जे परिश्रम घेतले ते वाचूनसुद्धा आपण थक्क होतो.मुख्य म्हणजे स्वतः विज्ञानाचं शिक्षण घेतलेलं नसताना असे वैज्ञानिक ग्रंथ लिहिणं हे सोपं काम नव्हे.'द मून बाय द व्हेल लाइट...' हे पुस्तक देखील शास्त्रीय माहिती सुलभ आणिरंजक करून कशी सांगावी याचा आदर्श नमुना आहे.पुस्तकाचं हे शीर्षक डायेनबद्दलही काही सांगतं.मुळातच अतिशय चौकस अणि तितक्याच उपद् व्यापी असलेल्या डायेनला एका जागी टेबल-खुर्चीवर बसून काम करण्याचा कंटाळा.त्यामुळेच ती कधी वाघुळं,तर कधी पेंग्विन,काही वेळा सुसरी आणि तत्सम प्राणी,तर कधी देशमाशांचा अभ्यास करणाऱ्या पथकांमध्ये स्वयंसेवक म्हणून सामील झाली होती.हे पुस्तक त्याचाच परिपाक आहे.
'मुलाचे पाय पाळण्यात दिसतात' ही म्हण डायेनच्या बाबतीत १०० टक्के लागू पडते. तिच्या निरागस बाल
सुलभवृत्तीतून तिचा चौकस स्वभाव आणि कुतूहलक्षम बुद्धी प्रकट होते. कुतूहल भागवण्याच्या प्रयत्नात ती बदनामही होते.याची एक-दोन उदाहरणं फारच मजेशीर आहेत.शिकागोच्या सीमेवरील वॉकेगॉन या खेड्यात ॲकरमन कुटुंबाचं बैठं घर होतं. (आश्चर्याची गोष्ट म्हणजे या खेड्यात जन्मलेली ८० बालकं पुढे लेखक /पत्रकार बनली.'हा तिथल्या मातीचा गुण आपल्याला चिकटला' असं डायेन म्हणते.) त्याच गावात व्हिक्टर हा डायेनचा चुलत भाऊ राहत होता.डायेन त्याला टिकटॉक म्हणायची.टिकटॉक हा तिचा सर्वोत्तम मित्र होता. एकदा डायेनने टिकटॉकला मानेभोवती टॉवेल बांधून त्याच्या बैठ्या घराच्या छपरावरून खाली उडी मारायला जवळजवळ तयार केलं.माणसं खरच उडू शकतात की नाही हे तिला बघायचं होतं.दुर्दैवाने हा बेत तिच्या काकूच्या कानावर पडला.मग एकदा डायेन आणि टिकटॉकने बरेच वेगवेगळे नको ते पदार्थ गोळा करूर पडला,उकळवून त्याचा बाटलीभर रस तयार केला.जवळ राहणाऱ्या नॉर्मी वुल्फ नावाच्या एका स्कॉलर पण आगाऊ मुलाला तो पाजून काय परिणाम होतो हे बघायचा त्या दोघांचा बेत होता;त्याचाही काकूला पत्ता लागलाच.एकदा डायेनच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना आली.घरातल्या जमिनीला स्पर्श न करता संपूर्ण घरभर फिरता येणं शक्य आहे का, हे बघायचं तिने ठरवलं.तिच्या आणि टिकटॉकच्या या माकड उद्योगात काही खुर्चा आणि इतर वस्तू आडव्या झाल्या.आपण आर्क्टिक सागरात अडकलो तर बर्फाच्या तरंगणाऱ्या तुकड्यांवरून जमिनीपर्यंत पोहोचणं शक्य होईल का हे पाहणं,हा या उद्योगामागचा डायेनचा उद्देश काकूमुळेच फसला.'पुन्हा हिच्या नादी लागलास तर बघ !' अशा काकूच्या दमदाटीनंतर व्हिक्टरची आणि तिची दोस्ती कायमची संपली.डायेनच्या मते,तिचं कुतूहल तिला कधीच स्वस्थ बसू देत नसे.शिवाय तिचा अनुभवसिद्ध ज्ञानावर विश्वास होता.ही बालपणीची सवयच तिला आयुष्यभर नवनव्या विषयांकडे आकर्षित करत राहिली.उदा.१९८९ मध्ये ती दक्षिण ध्रुवीय प्रदेशात शिडाच्या गलबतातून भटकायला गेली. ती या उद्योगाकडे का वळली? याआधीच काही महिने तिने सॅन डिएगो प्राणि
संग्रहालयात स्वयंसेवक म्हणून काम केलं होतं.तिथे तिच्यावर पेंग्विनची पिल्लं वाढवायची जबाबदारी सोपवण्यात आली होती.प्राणिसंग्रहालयात पेंग्विनांची कशी काळजी घेतली जाते याचे बारकावे डायेन नमूद करते - सर्व वातावरण हुबेहूब आर्क्टिकसारखं.या स्वयंसेवकांना 'पेंग्विन घरा'त प्रवेश करण्यापूर्वी एक खास पोषाख परिधान करावा लागतो.त्यानंतर पाय जंतुरोधक द्रवात बुडवून झाले की नंतरच पेंग्विन घराचं दार उघडलं जातं.पेंग्विनांचा उबदार प्रदेशातील कुठल्याच प्रकारच्या सूक्ष्म जीवांशी कधीच संबंध येत नाही.त्यामुळे ही काळजी घ्यावी लागते. डायेन पेंग्विन घरात शिरल्याबरोबर अतिशय थंड झोंबऱ्या हवेच्या स्पर्शाने दचकली.तिथे खूप कल्ला सुरू होता.समोर २० पाळण्यांत पेंग्विनांची पिल्लं उभी होती.हे रूढार्थाने पाळणे नव्हते.तसे ते जमिनीवरच होते.त्यांत मोठे गुळगुळीत गोटे होते.पेंग्विनच्या घरट्यांची ही नक्कल होती.त्यावर टर्किश टॉवेल पसरले होते. बालपेंग्विन सारखे पडत असतात.त्यांना इजा होऊ नये म्हणून ही काळजी घेण्यात आली होती.जवळच्या स्वयंपाकघरात पिलांसाठीचं खास अन्न बनवलं जात होतं.ते अगदी छोट्यांना पाच वेळा,तर मोठ्या पिलांना दर दिवशी चार वेळा भरवण्यात येत होतं.पिलांच्या खोलीत कायम मंद उजेड असेल याची काळजी घेतलेली होती.
पेंग्विनांना माणसांची भीती वाटत नाही.उलट,हा प्राणी कोण याबद्दल त्यांच्या मनात खूप कुतूहल असतं.त्यांच्या जवळ गेलेल्या माणसाकडे ती दोन वर्षांच्या मानवी मुलांप्रमाणे डगमगत चालत येतात.बुटांच्या नाड्या चोचीत धरून खेचतात.स्वेटरच्या बाहीत चोची खुपसून त्याची तपासणी करतात,नाही तर त्या माणसांना बिलगून जवळीक साधायचे प्रयत्न सुरू करतात.इथल्या अनुभवामुळे डायेनच्या मनात अंटार्क्टिकाला जाण्याची इच्छा निर्माण झाली.डायेनची अंटार्क्टिकाची सफर 'न्यूयॉर्कर'नेच घडवून आणली होती.
तिथल्या स्मशानशांततेने ती अतिशय प्रभावित झाली.
अधून मधून ही शांतता भंग करणारे,प्रचंड संख्येने असलेले पेंग्विनांचे कळप पाहून,हे पाहणाऱ्या काही मोजक्या लोकांत आपण आहोत,या विचाराने ती स्वतःला भाग्यवान समजू लागली,आणि अजूनही समजते.तिथले तिने टिपलेले अनुभव खरं तर इतरांनाही आले असणार,
पण कुणीही ते लिहून ठेवलेले नसावेत,कारण माझ्या वाचनात ते प्रथमच आले.अंटार्क्टिकवर जाणं सोपं नाही. अगदी अमेरिकेतूनही वर्षाला दोन ते तीन वेळा तिथे विमानं जात असतात.दुसरा मार्ग म्हणजे चिलीतल्या केप हॉर्न इथून जहाजाने जायचं. इथले सागरी प्रवाह हृदयात धडकी भरवणारे आहेत.द.अमेरिका आणि द.ध्रुवीय प्रदेश या दरम्यान दुसरा भूभाग नाही.डायेन या मार्गाने निघाली.प्रवासात त्यांचं जहाज चांगलंच हलत होतं.लाटांच्या विरोधात झुंजताना दारूड्यासारखं झुलत होतं.त्यामुळे डायेनचं पोटही ढवळून निघालं होतं.
अंटार्क्टिकाच्या जवळ आल्यावर तिने पोर्टहोलमधून बाहेर बघितलं.एकही वनस्पती नसलेल्या डोंगररांगा दूरवर पसरल्या होत्या.त्या तिला भयाण वाटल्या.हे दक्षिण ध्रुवीय प्रदेशाचं डायेनला घडलेलं पहिलं दर्शन.जहाज नेल्सन बेटातल्या हार्मनी नावाच्या छोट्या खाडीत उभं करण्यात आलं.छोट्या होड्यांतून ही मंडळी बेटाच्या किनाऱ्याच्या दिशेने निघाली.त्यांच्या स्वागताला किनाऱ्यावर जेंटू पेंग्विनांची एक टोळी उभी होती.ही मंडळी किनाऱ्यावर उतरताच 'हे कोण पाहुणे आले आपल्याकडे' अशा कुतूहलाने ते पुढे आले.सर्वच प्रकारचे पेंग्विन हे काळे-पांढरे असतात.याला काउंटर शेडिंग (विरुद्ध रंगी) असं म्हटलं जातं.हटके भटके -निरंजन घाटे,
समकालीन प्रकाशन)
त्यांचं पांढरं पोट आणि पांढरी हनुवटी पाण्याखालून बघितली तर वरून पाण्यात येणाऱ्या पांढऱ्या प्रकाशात एकरूप झाल्याने दिसायला अवघड जातात.यामुळे त्यांना मासे पकडणं सोपं जातं.त्याचप्रमाणे पाण्याखालून पोहणाऱ्या शिकारी लिओपर्ड सीलनाही पेंग्विन दिसू शकत नाहीत.त्यांच्या काळ्या पाठीमुळे हिमखंडांवर बसलेल्या लिओपर्ड सीलना ते वरून लक्षात येत नाहीत. संशोधकांनी पेंग्विनांचा माग घेण्यासाठी काही पेंग्विनांच्या गळ्यात ॲल्युमिनिअयमची कडी अडकवली असता ती कडी सूर्यप्रकाशात चमकल्यामुळे लिओपर्ड सीलना ती दिसली, तेव्हा त्या सीलनी नेमकी कडी अडकवलेली पेंग्विनच टिपून मारली.तेव्हा त्या संशोधकांनी पेंग्विनांच्या गळ्यात काळी कडी अडकवायला सुरुवात केली.
(निसर्गात रमलेली पत्रकार-लेखिका डायेन ॲकरमन)
(उर्वरित राहिलेला भाग ०९.०९.२४ या दिवशीच्या लेखामध्ये..)