* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२१/१०/२४

मायक्रोबायॉलॉजी /Microbiology

आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये सूक्ष्मजीवांचा फार मोठा वाटा असतो,आपल्या शरीराच्या आतच नाही तर शरीरावरही लाखो सूक्ष्मजीव असतात.मातीमध्ये, वातावरणात,समुद्रात आणि जवळपास सगळीकडेच भरपूर प्रमाणात सूक्ष्मजीव असतातच.शिळ्या अन्नपदार्थांचं कुजणं,उघड्या राहिलेल्या ब्रेडवर बुरशी चढणं,जैविक कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार होणं, बायोगॅस तयार होणं,इडली-डोशाचं पीठ आंबणं, फळांच्या रसापासून वाइन तयार होणं,अशा प्रक्रियांमधून हे सूक्ष्मजीव आपल्याला त्यांचं अस्तित्व या ना त्या रूपात रोजच दाखवत असतात. खरं तर सूक्ष्मजीव हे आपल्या इकोसिस्टिमचा एक फारच महत्त्वपूर्ण भाग आहेत.सूक्ष्मजीव नसते तर आज कदाचित इतर सजीव ही पृथ्वीवर जगू शकले नसते इतके हे सूक्ष्मजीव महत्त्वाचे आहेत.जैविक कचरा,मृत प्राणी आणि वनस्पती यांचं पुन्हा मातीत रूपांतर हे या सूक्ष्मजीवांमुळेच होतं.याला विघटन (डिकम्पोझिशन) असं म्हणतात.आणि सजीवसृष्टीचं चक्र अबाधित राहतं. पण काही वेळा माणसांना होणाऱ्या आजारांसाठीही अनेक सूक्ष्मजीव कारणीभूत असू शकतात.

त्याचप्रमाणे सूक्ष्मजीवांचाच वापर करून आपण वेगवेगळ्या प्रकारची औषधं,लसी,अँटिबायोटिक्स तयार करू शकतो.काही सूक्ष्मजीव तर चक्क रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीमध्ये जीनची वाहतूक करणाऱ्या वाहकाचं (व्हेक्टर्सचं) ही काम करतात.त्यामुळे सूक्ष्मजीव हे आपल्यासाठी फारच महत्त्वाचे आहेत.त्यामुळे यांचा अभ्यास होणं गरजेचंच आहे. हा अभ्यास मायक्रोबायॉलॉजी (सूक्ष्मजीवशास्त्र) ही विज्ञानाची शाखा करते.मायक्रोबायॉलॉजी (सूक्ष्मजीवशास्त्र) ही साध्या डोळ्यांनी न दिसू शकणाऱ्या सजीवांचा आणि सजीव पेशींचा अभ्यास करणारी बायॉलॉजीची शाखा आहे.मायक्रोबायॉलॉजी ही जरी सूक्ष्म गोष्टींचा अभ्यास करत असली तरी या शाखेचा आवाका खूपच मोठा आहे.मायक्रोबायॉलॉजीमध्ये बॅक्टेरिया,अल्गी, प्रोटोझुआ,

फंगी (बुरशी) आणि व्हायरस या सगळ्या प्रकारच्या सूक्ष्म सजीवांच्या रचनेचा,त्यांच्यात चालणाऱ्या क्रियांचा आणि त्यांच्यामुळे मानवी जीवनावर होणाऱ्या एकूणच परिणामांचा अभ्यास केला जातो.मायक्रोबायॉलॉजीमध्ये फंगी आणि प्रोटिस्ट्स या युकॅरीऑट्सचा आणि बॅक्टेरिया या प्रोकॅरीऑटिक प्रकारच्या पेशींचा अभ्यास होतो.


मायक्रोस्कोप्सचा शोध १६ व्या शतकाच्या शेवटी शेवटी लागला.पण विज्ञानातली एक स्वतंत्र शाखा म्हणून मायक्रोबायॉलॉजीचा अभ्यास सुरू व्हायला मात्र १९ वं शतक उजाडावं लागणार होतं.आपल्या डोळ्यांना दिसू शकणार नाहीत असेही सजीव असावेत याची कुणकुण मात्र माणसाला चक्क १७ व्या शतकातच लागली होती. मायक्रोब्ज म्हणजे सूक्ष्मजंतू हा शब्दच मुळी १९ व्या शतकाच्या शेवटच्या २५ वर्षांतला आहे.

सूक्ष्मजीवांमध्ये प्रचंड वैविध्य आणि त्यातही त्यांचे अगणित प्रकार आहेत हे तेव्हा नुकतंच माणसाला समजायला लागलं होतं.तर अशा महत्त्वपूर्ण मायक्रोबायॉलॉजीची सुरुवात खरं तर मायक्रोस्कोप्सच्या निर्मितीनंतरच झाली. सुरुवातीच्या काळात अनेक मायक्रोस्कोपिस्ट्सही होऊन गेले.पण त्यातही अँटोनी फॉन लेव्हेनहूक यानं सूक्ष्मजीव २७० पट मोठे दिसतील असे मायक्रोस्कोप तयार केले आणि महत्त्वाचं म्हणजे त्यानं आपल्या निरीक्षणांचं खूप चांगलं वर्णन लिहून ठेवलं होतं. 


प्राण्यांच्या शरीरात आढळणारे प्रोटोझुआ,दाताच्या मागच्या जागेत सापडणारे बॅक्टेरिया,वीर्य,खराब पाणी अशा अनेक गोष्टी त्यानं आपल्या मायक्रोस्कोपमधून पाहिल्या होत्या आणि आपल्या निरीक्षणांचं वर्णन त्यानं चक्क रॉयल सोसायटीला पाठवून दिलं होतं.त्यामुळे त्याच वेळी त्याची दखल घेतली गेली.पण गंमत म्हणजे त्याच्या निरीक्षणांनी इतर वैज्ञानिकांचं भरपूर मनोरंजन केलं असलं तरी त्याच वेळी तसेच मायक्रोस्कोप कुणाला तयार करणं जमलं नव्हतं.त्यामुळे सूक्ष्मजीवांबद्दलचं हे ज्ञान पुन्हा लवकर कोणी तपासून पाहू शकलं नाही हेही खरं आहे.या सगळ्यामुळे लेव्हेनहूकला मायक्रोबायॉलॉजीचा प्रणेता मानलं जातं.याला कारण म्हणजे लेव्हेनहूकचा मायक्रोस्कोप हा एकाच भिंगाचा होता आणि त्या क्षमतेचा आणि एका भिंगाचा तसा मायक्रोस्कोप तयार करणं त्या काळी अवघडच होतं.पण त्यानंतर दोन भिंग असलेले मायक्रोस्कोप आले,पण त्यांच्यात मध्येच वेगवेगळ्या रंगांच्या रेषा किंवा वर्तुळं दिसायची आणि मग हाती काहीच लागायचं नाही.या प्रकाराला अबरॅशन्स म्हणतात.जोपर्यंत ही त्रूटी दूर होत नव्हती तोपर्यंत मायक्रोबायॉलॉजीचा अभ्यास पुढे जाणं शक्य नव्हतं.त्यातच जीवशास्त्रामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहिला.तो म्हणजे कचरा,घाण,दलदल अशा निर्जीव पदार्थात अळ्याकिडे तयार होतात हे सगळ्यांनाच माहीत असतं.त्यामुळे सूक्ष्मजीव हे याच निर्जीव पदार्थांतून निर्माण होत असले पाहिजेत असाही एक विचार पुढे आला.याचाच अर्थ सजीव प्राणी हे निर्जीव घटकांपासून निर्माण होत असले पाहिजेत असं सांगणारी 'अबायोजेनेसिस' नावाची थिअरी आली होती.काही वैज्ञानिकांना अबायोजेनेसिस खरं वाटत होतं तर काहींना ते खरं वाटत नव्हतं.त्यामुळे यावर अनेक वैज्ञानिकांनी खलबतं करायला सुरुवात केली.


निर्जीव गोष्टींतून सजीव अचानक तयार होतात ही संकल्पना सगळीकडेच इतकी घट्ट रुजलेली होती की तिच्या विरुद्ध बोलणं हे खूपच अवघड काम होतं.काही ग्रीक पुराणकथांमध्ये तर चक्क गिया नावाची देवता दगडांतून सजीव प्राणी निर्माण करते अशा प्रकारच्या कथा अस्तित्वात होत्या.अर्थात,खुद्द ॲरिस्टॉटलचा अशा कथांवर विश्वास नव्हता,पण मातीतून लहान किडे जन्म घेऊ शकतात यावर मात्र त्याचा विश्वास होता.तरीही ही 'स्पॉटेनियस जनरेशन'ची संकल्पना १७ व्या शतकापर्यंत मूळ धरून होती ! फ्रान्सिस्कोरेडी नावाचा मोठा वैज्ञानिक या थिअरीच्या बाजूनं होता.पण सतराव्या शतकाच्या शेवटी शेवटी जॉन निडहॅम आणि लझारो स्पलान्झानी यांनी अनेक प्रयोग आणि निरीक्षणांनी स्पॉटेनियस जनरेशनची संकल्पना धुडकावून लावली.अठराव्या शतकात फ्रान्झ शूल्झ आणि थिओडोर श्वान यांनीही या थिअरीला विरोध केला.मग लुई पाश्चर यानंच शेवटी अबायोजेनेसिस असा काही प्रकार नसतो हे आपल्या प्रयोगांनी सिद्ध केलं.सूक्ष्मजीवही आधीच्या सूक्ष्मजीवांपासूनच जन्म घेतात असं दाखवून दिलं.शेवटी प्रत्येकच सजीवाला आई-बाप असतात,कोणीही निर्जीव वस्तूपासून अचानक जन्म घेऊ शकत नाही या पाश्चरच्या सांगण्यामुळे अबायोजेनेसिस या थिअरीवर पडदा पडला.या वेळेपर्यंत अनेक ठिकाणी सापडणारे सूक्ष्मजीवांचे प्रकार अनेक असावेत असं वाटायला लागलं होतं.कारण प्रत्येकच वेळी अन्नात,मातीत,हवेत, पाण्यात आणि विष्ठेत वेगवेगळ्या प्रकारचे सूक्ष्मजीव सापडायचे.पण आतापर्यंत एखाद्या गोष्टीत सूक्ष्मजीव आहेत की नाहीत हेच शोधण्यात आणि त्यांच्या अस्तित्वाबद्दल आश्चर्य वाटण्यापर्यंतच माणसाची मजल गेली होती.पण हे सूक्ष्मजीव किती आणि कोणत्या प्रकारचे असू शकतात असा प्रश्न विचारला तो मात्र फर्डिनांड कोहन या वैज्ञानिकानं ! १८५३ ते १८९२ या दरम्यान त्यानं बॅक्टेरियांच्या अनेक जाती शोधून त्यांचं वर्गीकरण केलं.यानंतर खऱ्या अर्थानं या बॅक्टेरियांचा अभ्यास करण्यासाठी म्हणून वैज्ञानिक कामाला लागले.नाहीतर आतापर्यंत इतर गोष्टींची शक्यता आणि खरेखोटेपणा तपासण्यासाठी म्हणून फक्त बिचाऱ्या सूक्ष्मजीवांचा तेवढ्यापुरता उपयोग करून घेतलेला दिसतो.आता कोहनच्या वर्गीकरणामुळे खऱ्या अर्थानं सूक्ष्मजीवांचा म्हणजेच मायक्रोबायॉलॉजीचा अभ्यास सुरू झाला होता.


आतापर्यंत एखादा रोग एखाद्याला झाला की तो त्याच्या संपर्कात येणाऱ्या इतरांनाही होतो हे सगळ्यांनाच माहीत होतं.आतापर्यंत प्लेग,देवी अशा रोगांच्या साथींचा माणूस साक्षीदार होताच.पण हे रोग कशामुळे होतात याचं कारण मात्र आजवर कळलेलं नव्हतं.ते पाश्चर आणि रॉबर्ट कॉख या दोघांनी जर्म थिअरीच्या माध्यमातनं सांगितलं.त्यात त्यांनी कोणत्याही संसर्गजन्य रोगासाठी सूक्ष्मजीव कारणीभूत असतात आणि प्रत्येक रोगाचे सूक्ष्मजीव अगदी विशिष्ट आणि वेगळे असतात असं दाखवून दिलं होतं.


या सगळ्यातून मायक्रोबायॉलॉजी या बायॉलॉजीच्या शाखेचा पाया १८८० ते १९०० च्या सुमाराला भक्कम झाला.लुई पाश्चर,रॉबर्ट कॉख आणि इतर वैज्ञानिकांच्या विद्याथ्यर्थ्यांनी वेगवेगळ्या रोगांसाठी कारणीभूत असलेले सूक्ष्मजीव शोधून काढले.आता या सूक्ष्मजीवांची इतरही गुणवैशिष्ट्ये लक्षात यायला लागली होती.हे समजून घेण्यासाठी मग मायक्रोबायॉलॉजीमध्ये वेगवेगळी तंत्रं विकसित करण्यात आली.


पण हे सगळं युरोपात झालं.अमेरिकेत हे तंत्र यायला १९०० साल उजाडावं लागलं.अमेरिकेत ते तंत्र आणणारे एक तर कॉखचे विद्यार्थी होते किंवा ते पॅरिसमधल्या पाश्चर इन्स्टिट्यूटमध्ये शिकलेले होते. त्यानंतर मायक्रोबायॉलॉजी अमेरिकेत आल्यानंतर मात्र या विज्ञान शाखेत खूपच भराभर प्रगती झाली.यातूनच जेनेटिक्स आणि बायोकेमिस्ट्री या आणखी दोन बायॉलॉजीच्या शाखांचा उगम झाला. १९२३ मध्ये डेव्हिड बर्जे या अमेरिकन बॅक्टेरिओ लॉजिस्टनं त्या काळी उपलब्ध असलेलं मायक्रोबायॉलॉजीचं सगळं ज्ञान एकत्र आणलं, त्याची त्यानं संगतवार माहिती लिहून ठेवली आणि तो प्रसिद्ध केली. हीच पुस्तकं आजही मायक्रोबायॉलॉजीची रेफरन्स (संदर्भ) पुस्तकं म्हणून वापरली जातात. १९४० नंतर मात्र मायक्रोबायॉलॉजीची फारच वेगानं प्रगती झाली. वेगवेगळ्या आजारांचे सूक्ष्मजीव लक्षात आले, सूक्ष्मजीवांची वाढ कशी करायची आणि त्यांच्या वाढीवर नियंत्रण कसं करायचं याची नवनवी तंत्रं विकसित झाली,सूक्ष्मजीवांचा उपयोग वेगवेगळ्या उद्योगांतही व्हायला लागला.त्यातून अन्नपदार्थ,वाइनसारखी पेयं आणि अँटिबायोटिक्स अशा वेगवेगळ्या महत्त्वाच्या उत्पादनांची निर्मिती व्हायला लागली.


याच सूक्ष्मजीवांच्या अभ्यासामुळे कोणत्याही सजीवांमधल्या पेशी नेमक्या कशा काम करतात हे लक्षात येतं.शिवाय,याच ज्ञानाचा उपयोग शेती,आरोग्य, औषधनिर्माण आणि पर्यावरणाच्या ऱ्हासापासून संरक्षण यासाठीसुद्धा उपयोग करून घेता येतो. 


मायक्रोबायॉलॉजीच्या अभ्यासाशिवाय तर बायोटेक्नॉलॉजीचं पानही हलत नाही.यामुळे मायक्रोबायॉलॉजी हे एकाच वेळी फंडामेंटल आणि अप्लाइड अशा दोन्ही प्रकारचं विज्ञान आहे असं म्हणता येतं.

मायक्रोबायॉलॉजीमध्ये वेगवेगळ्या पातळ्यांवर सूक्ष्मजीवांचा अभ्यास केला जातो. सामाजिक पातळीवर मायक्रोबायॉलॉजी,

इकोलॉजी आणि एपिडेमॉलॉजी या दोन विषयांचा अभ्यास होतो. त्यात इकोलॉजीमध्ये पर्यावरणातल्या सूक्ष्मजीवांच्या कामाचा अभ्यास केला जातो तर एपिडेमॉलॉजीमध्ये सूक्ष्मजीवांमुळे संसर्गजन्य रोगांचा प्रसार कसा होतो याचा अभ्यास केला जातो.पेशीच्या पातळीवर पेशीमध्ये चालणाऱ्या प्रक्रियांचा आणि पेशी विभाजनाचा अभ्यास केला जातो.आणि त्याहीपेक्षा सूक्ष्मपातळीवर पेशीच्या आतल्या प्रोटीन्स आणि जीन्सचा अभ्यास केला जातो.याशिवाय मायक्रोबायॉलॉजीच्या अनेक उपशाखाही पडतात.


बॅक्टेरिऑलॉजी : बॅक्टेरियांचा अभ्यास,


एन्व्हायर्नमेंटल मायक्रोबायॉलॉजी : पर्यावरणातल्या सूक्ष्मजीवांचा अभ्यास.


इव्होल्युशनरी मायक्रोबायॉलॉजी : सूक्ष्मजीवांमधल्या साधर्म्य आणि वैविध्याचा उत्क्रांतीच्या दृष्टीनं अभ्यास.


फूड मायक्रोबायॉलॉजी : अन्नातल्या सूक्ष्मजीवांचा अभ्यास, 


इंडस्ट्रियल मायक्रोबायॉलॉजी : औद्योगिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण सूक्ष्मजीवांचा अभ्यास केला जातो.


क्लिनिकल मायक्रोबायॉलॉजी : यात रोगजंतूंचा अभ्यास केला जातो.


मायक्रोबियल जेनेटिक्स : यात सूक्ष्मजीवांच्या आनुवंशिकतेचा अभ्यास केला जातो.मायक्रोलॉजीत फंगीचा (बुरशी) अभ्यास तयार केला जातो आणि व्हायरॉलॉजीमध्ये व्हायरस म्हणजेच विषाणूंचा अभ्यास केला जातो.


सूक्ष्मजीवांच्या अभ्यासामुळे माणसांचं एकूणच सजीवांबद्दलचं ज्ञान वाढायला खूपच मदत झाली. सूक्ष्मजीवांच्या अभ्यासातून सजीवांच्या जीवनातल्या महत्त्वपूर्ण घटनांचा अभ्यास करणं शक्य झालं. मोलेक्युलर पातळीवर जाऊन चयापचयाचा अभ्यास करणं शक्य झालं.यातूनच अनेक रोगांवर औषधं आणि लसी निर्माण होण्यात आणि ते रोग आटोक्यात येण्यात मदतच झाली आहे.एकूणच मायक्रोबायॉलॉजी या विज्ञान शाखेचं माणसाच्या जीवनात खूपच मोठं योगदान आहे यात शंकाच नाही.


शेवटी मायक्रोबायॉलॉजी ही बायॉलॉजीची शाखा असली तरी तिचा प्रभाव बायॉलॉजीच्या इतर शाखांवरही खूपच पडला आहे आणि मायक्रोबायॉलॉजीमधूनच आपल्याला सूक्ष्मजंतू, रोगजंतू,पेशीरचना,जेनेटिक्स आणि चक्क उत्क्रांती या सगळ्यांची जास्त सखोल माहिती तर होतेच,पण या सगळ्यांचा एकमेकांशी आणि मानवी जीवनाशी किती जवळचा संबंध आहे तेही लक्षात येतं !



१९/१०/२४

एकीमध्ये शक्ती/Power in one

झाडे समाजशील असतात.एकमेकांना मदत करून त्यांचं जीवन सुरळीत चालू असतं.पण जंगल परिसंस्थेमध्ये फक्त एवढ्या गोष्टीने त्यांचा टिकाव लागणार नसतो.झाडाची प्रत्येक प्रजाती स्वतःला अधिक सूर्यप्रकाश मिळवण्याच्या प्रयत्नात असते. या स्पर्धेमुळे इतर प्रजातींना दाटीवाटीमध्ये राहावे लागणार असते.अधिक सूर्यप्रकाश मिळवण्याच्या, पाणी मिळवण्याच्या स्पर्धेनंतरच अतिंम जेता ठरणार असतो.

जमिनीतील आर्द्रता शोधून तिथंपर्यंत पोचण्याची क्षमता मुळांमध्ये असते. मुळांवर सूक्ष्म केस असतात ज्यामुळे त्यांचा पृष्ठभाग वाढतो आणि जास्त पाणी शोषण करता येते.

सर्वसाधारण परिस्थितीत या पद्धतीने त्यांना पुरेसं पाणी मिळतं पण जास्त पाणी कोणाला नको असतं? आणि याच कारणासाठी कोट्यवधी वर्षांपासून झाडांनी फंगस म्हणजे बुरशी बरोबर मैत्री केलेली आहे.


बुरशी हा एक अद्भुत प्रकार आहे.त्यांचं वर्गीकरण वनस्पती आणि प्राणी या मानवाने केलेल्या दोन गटांपैकी कुठेच चपखलपणे करता येत नाही.वनस्पतीच्या व्याख्येप्रमाणे झाडांना निर्जीव गोष्टीतून आपलं अन्न तयार करता येतं,त्यामुळे त्यांना स्वतंत्रपणे जगता येऊ शकतं. 


एखाद्या उजाड भूरूपात सुरुवात होते ती हिरव्या वनस्पतीने आणि मगच त्याच्यामागून जनावरं येऊ शकतात.खरंतर गवत आणि रोपट्यांना गुरांनी किंवा हरणांनी चरलेलं अजिबात आवडत नाही. एखाद्या कोल्ह्याने डुकराला खाल्लं काय किंवा हरणाने रोपट्याला खाल्लं काय,दोन्ही गोष्टीत यातना आणि मृत्यू आहेच. बुरशी प्राणी आणि वनस्पतींच्यामध्ये गणली जाते. त्यांच्या पेशींचे आवरण कायटिन नावाच्या पदार्थाने बनलेलं असतं,जे कधीही वनस्पतीत सापडत नाही. शरीरात कायटिन असल्यामुळे बुरशी वनस्पतींपेक्षा कीटक वर्गाच्या जवळ जाते.त्याचबरोबर त्यांना प्रकाश संश्लेषण करून आपलं अन्न बनवता येत नाही त्यामुळे ते इतर सजीवांबरोबर संधान बांधून जिवंत राहतात.


बुरशी पेशीतून असंख्य तंतू बाहेर निघतात,त्यांना पुढे आणखी फाटे फुटून या तंतूंचं एक सूक्ष्म जाळं तयार होतं.बुरशीचं हे जमिनीखालचं कापसासारखं जाळं अनेक दशकं वाढत असतं.या जाळ्याला 'मायसेलियम' म्हणतात.हे मायसेलियम झाडांच्या मुळांना चिकटून एक सहजीवी संबंध झाडांशी जोडतं.बुरशीचं मायसेलियम जाळं आणि झाडाच्या मुळांच्या तंतूचं मिळून जे जाळं तयार होतं त्याला 'मायकोरायझी' म्हणतात.स्वित्झरर्लंडमध्ये एका ठिकाणी 'मधाची बुरशी' नावाची बुरशी सापडते. एकशेवीस एकरात वाढलेली ही बुरशी सुमारे हजार एक वर्षं तरी जिवंत आहे.२३ ओरेगोनमध्ये अशीच एक बुरशी चोवीसशे वर्षं जुनी आहे आणि दोन हजार एकरावर पसरली आहे.तिचे वजन सुमारे ६६० टन असावे.म्हणजे बुरशी हा जीवसृष्टीतला सर्वांत मोठा सजीव मानला पाहिजे. 


स्वित्झर्लंड आणि ओरेगनमध्ये सापडलेली बुरशी ही झाडाशी अजिबात मैत्री करत नाही. किंबहुना जमिनीखाली हिंडताना ते खाण्यायोग्य ऊती शोधत असतात आणि झाडांना मारायचा प्रयत्न करतात. पण ते जाऊ दे! आपण बुरशी आणि झाडांमधल्या सलोख्याच्या जाळ्याबद्दल बोलू.

झाडाच्या प्रत्येक प्रजातीला बुरशीची एक मित्र प्रजाती असते. उदाहरणार्थ,ओकच्या झाडाला मिल्क कॅप नावाची बुरशी मदत करते.यामुळे झाडांच्या मुळाचा पृष्ठभाग वाढतो आणि त्याला जास्त पाणी व पोषणद्रव्यं शोषून घेता येतात.जी झाडं बुरशीशी मैत्री करतात त्यांना नायट्रोजन आणि फॉस्फरस दुपटीने मिळू लागतो.झाडाला जर बुरशीबरोबर भागीदारी करायची असेल तर त्याला अक्षरशः खुलं व्हावं लागतं.कारण बुरशीचे कापसासारखे धागे मायसेलियम झाडाच्या मुळाच्या केसांपाशी पोचायला हवेत.हे झाडाला त्रासदायक असतं का यावर संशोधन नाही,पण झाडाला मात्र हे हवं असतं.मला वाटतं की यामुळे झाडांमध्ये सकारात्मक भावना तयार होत असतील.पण झाडांना काहीही वाटलं तरी यानंतर ती बुरशीबरोबर भागीदारीतच काम करणार असतात. 


बुरशी आता झाडाच्या मुळांत शिरते आणि मुळांभोवती स्वतःला गुंडाळून घेते.अशा प्रकारे हे जाळं जंगलाच्या जमिनीतून मुक्तपणे दूरदूरवर पसरतं.बुरशीच्या भल्यामोठ्या जाळ्याच्या मदतीने झाडाची मुळे दूरपर्यंत पोहोचतात.आता ते झाड जमिनीखालून इतर झाडांच्या बुरशीबरोबर जोडलं जातं.यामुळे आता झाडांना पोषणद्रव्यांची देवाण-घेवाण करणं सोपं जातं.त्याचबरोबर कीटकांच्या आक्रमणाची बातमी एकमेकांपर्यंत पोचवली जाते.बुरशीचं जाळं म्हणजे जंगलातील इंटरनेट म्हणता येईल.पण हे जाळं बनवण्याची किंमत मात्र झाडाला चुकती करावी लागते.ही किंमत म्हणजे त्या बुरशीला अन्नपुरवठा करणं.इतर जनावरांसारखंच बुरशीला आपल्या अन्नासाठी दुसऱ्या सजीवांवर अवलंबून राहावं लागतं.त्यामुळे झाडाकडून बुरशीला साखर आणि कर्बोदके पुरवली जातात.ही बुरशी पण काही अल्पसंतुष्टी नसते.ती झाडांकडून त्यांनी बनवलेल्या अन्नाच्या एक तृतीयांश भागाची मागणी करते,त्यांच्या सेवेचा मोबदला म्हणून !पण जेव्हा आपण दुसऱ्या जीवावर अवलंबून असतो तेव्हा अशी गोष्ट केवळ नशिबावर टाकून चालत नाही.मुळाला जडलेली बुरशी झाडाला संदेश पाठवू लागते आणि त्यावर झाडाची प्रतिक्रिया काय आहे याचा अंदाज घेते. जर प्रतिक्रिया अनुकूल असेल तर बुरशी झाडाला उपयुक्त हॉर्मोन म्हणजे ग्रंथीरस पुरवते.यामुळे बुरशी हवी तशी झाडाची वाढ होऊ देते.आपलं पक्वान्न मिळालं की बुरशी झाडांसाठी अजूनही काही पूरक सेवा देते.त्यांच्याकडून मातीतले जड धातू काढून दिले जातात.झाडांच्या मानाने बुरशीला त्याचा कमी त्रास होतो.जे प्रदूषण झाडांपासून दूर ठेवलं जातं ते बुरशीच्या फळांना म्हणजे मशरूम्सना उपयुक्त असतं.१९८६ सालच्या चर्नोबिलच्या न्युक्लिअर रिॲक्टरच्या अपघातानंतर तिथल्या मशरूममध्ये सीझियम नावाचा किरणोत्सर्गी 

धातू सापडत होता.बुरशीकडून झाडाला काही आरोग्यसेवाही पुरवल्या जातात.त्यांचे नाजूक तंतू झाडांना त्रासदायक असलेल्या जंतूंना मुळांपासून दूर ठेवतात.झाडांशी भागीदारी करून बुरशीसुद्धा झाडांबरोबरच शेकडो वर्ष जगू शकतात.पण जर का तिकडे प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली,जसं की हवेतील प्रदूषण असह्य झालं,तर मात्र ते श्वास टाकतात.बुरशी मेल्यावर त्याला अनेक वर्षं साथ देणारे झाड फार काळ दुःख करत बसत नाही.आपल्या मुळाशी आलेल्या दुसऱ्या बुरशीबरोबर ते भागीदारी सुरू करतं.झाडाला बुरशीचे अनेक पर्याय उपलब्ध काईफ असतात.


सर्व पर्याय जेव्हा संपतात तेव्हा मात्र झाड धोक्यात येतं.झाडांपेक्षा बुरशी अधिक संवेदनशील असतात.ते आधी आपल्या साथीदाराची निवड करतात आणि एकदा का साथीदार झाडाला पसंत केलं की आयुष्यभर त्याची साथ देतात.ज्या बुरशींना फक्त बर्च किंवा लार्च अशा विशिष्ट झाडांच्या प्रजातीच लागतात,त्यांना 'यजमाननिष्ठ' असं संबोधलं जातं.चॅनतेरेल्स सारख्या काही बुरशीला ओक,बर्च किंवा स्प्रूस पैकी कोणीही चालतं.जमिनीत त्यांच्या वाढीसाठी जागा आहे की नाही,फक्त इतकंच ते बघतात.याचं कारण जमिनीखाली जागेसाठी स्पर्धा असते.उदाहरणार्थ, ओकच्या जंगलात जमिनीखाली एकाच झाडाच्या मुळापाशी बुरशींच्या शेकडो प्रजातींची स्पर्धा चालू असते.ओक वृक्षांना ही योजना अनुकूल असते. एक बुरशी काही कारणास्तव मेली तर दुसरी त्यांना साथ द्यायला उभीच असते.


संशोधकांना असं दिसून आलंय की,बुरशीसुद्धा आपल्या उपजीविकेचे दुसरे पर्याय बघून ठेवतात. सुझान सिमार्ड या संशोधकाने असा शोध लावला की,एका बुरशीच्या जाळ्याने झाडांच्या विविध प्रजातींना जोडून घेतलेले आहे.सिमार्डने इंजेक्शनचा वापर करून एका बर्च झाडात किरणोत्सर्गी कार्बन सोडला.त्यांना तो कार्बन जवळच्या 'डग्लस फर' मध्ये सापडला.जमिनीवरती जरी विविध प्रजातींची झाडं एकमेकांशी स्पर्धा करीत असली तरी त्यांच्या मुळांशी असलेल्या बुरशीचं जाळं मात्र त्यांच्यात तडजोड करण्यासाठी समन्वय घडवून आणण्यासाठी उत्सुक असतं. यातून त्यांना इतर झाडांना मदत करायची असते की आपल्यासारख्या दुसऱ्या बुरशीला हे अजून नक्की माहीत नाही.


मला वाटतं की बुरशी झाडांपेक्षा थोडे पुरोगामी असतात.

झाडांच्या प्रजातींमध्ये सतत स्पर्धा चालू असते.समजा,मध्य युरोपचे स्थानिक बीच वृक्ष तिथल्या बहुतेक जंगलात जास्त संख्येने आहेत तर हे फायद्याचे आहे का? जर एखादा विषाणू आला तर सर्वच बीच वृक्ष मरून जातील नाही का? अशा वेळेस तिथे ओक,मेपल,अश,फर अशा विविध प्रजाती असणं नक्कीच फायद्याचं ठरेल.कारण जरी त्या विषाणूंनी मारलं तरी इतर प्रजाती जिवंत राहतील आणि तिथल्या तरुण पिढीला (द हिडन लाईफ ऑफ ट्रीज,पी ट र वो ह्ल ले बे न,अनुवाद

गुरुदास नूलकर,अरविंद घनश्याम पाटकर,मनोविकास प्रकाशन)

जगण्यासाठी आणि वाढण्यासाठी मदत करतील. वैविध्यामुळे जंगलाला सुरक्षा येते.बुरशीला परिस्थिती अनुकूल आणि स्थिर हवी असते त्यामुळे ते जमिनीखालील इतर प्रजातींना संरक्षण देत असतात.असे केल्याने कुठल्या एका प्रजातीचे वर्चस्व जंगलावर राहात नाही.


जंगलातली परिस्थिती जर बुरशी आणि झाडांना बिकट झाली तर बुरशी निर्णायक भूमिका घेऊ शकतात.

उदाहरणार्थ,जर पाईनच्या जंगलात नायट्रोजनचा तुटवडा झाला तर पाईनची जोडीदार बुरशी,'लाकारिया बायकलर,' किंवा 'दुरंगीफसवे' ही मातीमध्ये एक विषारी द्रव्य सोडते ज्यामुळे स्प्रिंगटेल नावाचे कीटक मरून पडतात आणि त्यांच्यामध्ये असलेला नत्र मातीत मिसळतो. झाड आणि बुरशीला यातून खत मिळते.


मी तुम्हाला झाडांच्या सर्वांत महत्त्वाच्या मदतनिसांची ओळख करून दिली,पण यात अजूनही काही प्राणी गणले जातात.वूडपेकर नावाचा पक्षी झाडाला थेट उपयुक्त नसला तरी त्याच्यापासून फायदा नक्कीच होतो.स्प्रूसच्या खोडाला बार्क बीटल नावाचा कीटक जडला की स्प्रूस धोक्यात येतो.या कीटकांची संख्या झपाट्याने वाढते आणि झाडाच्या जीवनदायी 'कॅम्बियम' थराला खाऊन टाकून झाडाला मारून टाकू शकते. ग्रेट स्पॉटेड वूडपेकरला या कीटकाची चाहूल लागली की तो तिथे तातडीने येतो.बुंध्यावर अनेक वेळा वर खाली फेऱ्या मारून तो कीटकांच्या अळींचा शोध घेतो,त्यांचा शोध घेताना तो खोडाला टोचत राहतो आणि त्यांच्या पांढऱ्या अळ्या सापडल्या की खाऊन टाकतो.पण त्या खाताना वूडपेकर झाडाचा जरासुद्धा विचार करत नाही. त्याच्या जेवणाबरोबर झाडाच्या बुंध्याची सालंसुद्धा टोकरली जातात,कपचे खाली पडतात.तरीसुद्धा कधीकधी या प्रकाराने झाड कीटकांनी केलेल्या नुकसानीतून वाचूही शकतं.जरी ते झाड मेलं तरी इतर झाडांना या कीटकांपासून संरक्षण मिळतं, कारण आता या कीटकांचं प्रजनन बंद झालेलं असतं.कोरड्या ऋतूत झाडांवर वूड बोरिंग बीटलकडून आक्रमण होतं.पाणी नसलं की झाडांना या कीटकापासून स्वसंरक्षण करता येत नाही.अशा वेळेस काळ्या डोक्याचा कार्डिनल बीटल झाडाच्या मदतीला येतो.प्रौढ अवस्थेत हा बीटल झाडांना उपद्रवी नसतो पण बाल अवस्थेत तो वूड बोरिंग बीटलला शोधून शोधून खातो.काही ओक वृक्ष तर केवळ कार्डिनल बीटल मुळे जिवंत आहेत.पण जेव्हा वूड बोरिंग बीटल फस्त होतात,तेव्हा मात्र कार्डिनल बीटल स्वतःच्याच बच्च्यांना खायला सुरुवात करतो.



१७/१०/२४

औद्योगिक क्रांती/The industrial revolution

१५.१०.२४ या लेखातील शेवटचा भाग…!


साने गुरुजींनी ह्यांच्या १९३९ पर्यंतच्या जीवनाची कहाणी लिहिली आहे : केसरी कचेरीत सेनापती १९१५ साली काम करू लागले. १९१७ साल आले. 


रशियातील क्रांतीची पहिली बातमी आली होती.केसरी कचेरीतील काही म्हणाले,"कसली क्रांती नि काय, संस्कृतीची सारी होळी केली त्यांनी.शिमगा सुरू केला आहे बेट्यांनी." सेनापती म्हणाले, कोट्यवधी श्रमजीवींच्या संसारांची होळी होत होती तेथे आता दिवाळी येत आहे.प्रत्येकाचा विकास होईल.सर्वांच्या जीवनात आनंद व प्रकाश होईल. मी हा दिवस साजरा करतो." असे म्हणून त्यांनी डाळे मुरमुरे आणले. लोक हसले. ते म्हणाले, "हे लेनिनमिक्श्चर आहे. श्रमजीवी जनतेच्या क्रांतीच्या दिवशी असलाच खाना शोभतो." 


केसरी ऑफिस सोडून पुढे ते ज्ञानकोशात काम करू लागले. त्या वेळी पत्नी वारली.सेनापतींची पत्नी वारली तेव्हा तेथील मित्र म्हणाले,"आज ज्ञानकोश कचेरीला सुटी देऊ." ते म्हणाले,तुम्ही वाटले तर घ्या सुट्टी.मी येऊन काम करीन!"


घरचा संसार क्षणभर थाटलेला मिटला.श्रीहरि दुसरा महान संसार त्यांच्यासाठी मांडीत होता.साबरमतीच्या महात्म्याने सत्याग्रहाचा मंत्र राष्ट्राला दिला.हिंदुस्थानभर चैतन्याची प्रचंड लाट उसळली.

ब्रिटिश सत्ता क्षणभर जरा हादरली.इकडे महाराष्ट्रात कोट्यधीश टाटा मुळशी पेट्यात धरण बांधू लागले.बारा हजार मावळे भिकेस लागणार होते.ज्या मावळ्यांनी महाराष्ट्रास महान इतिहास दिला,ते हाकलले जाणार होते.सत्याग्रह करावा असे शब्द उच्चारले जाऊ लागले.सेनापती या वेळेस मुंबईला होते.भंग्यांचा संप लढवण्यासाठी ते गेले होते. राजबंदी सुटावे म्हणून राजबंदी सोडा अशा अक्षरांची फळी गळ्यात अडकवून सेनापती त्यासाठी हजारो सह्या गोळा करीत त्या वेळेस हिंडत असत.अशा वेळेस सत्याग्रहाची हाक आली.त्यांनी जाणलेले होते, जगावरची दुष्ट प्रवृत्तींची पकड बळकट आहे.त्याविरुद्ध लढत यश मिळाले तरी ते अशाश्वत ठरणार.पण आपण टक्कर दिलीच पाहिजे.


ह्या जगण्यांतुन,ह्या मरण्यांतुन

हसण्यांतुन अन् रडण्यांतुन ह्या 

अशाश्वताच्या मुठी वळूनी

अपाप वरती चढतिल बाह्या; 


अंतरंगातील श्रीहरींशी त्यांनी चर्चा केली,आणि बाह्या वर चढवल्या.त्यांची मते निश्चितच होती.स्वातंत्र्य रणाशिवाय मिळत नसते.मरणाशिवाय मोक्ष नाही. तरीही सामसत्याग्रहाचा प्रयोग करावयास ते उभे राहिले. सामसत्याग्रह व शुद्धसत्याग्रह असे दोन भेद त्यांनी केले आहेत.या दोहोंचे पुन्हा आणखी दोन प्रकार त्यांनी कल्पिले आहेत.प्राथमिक व प्रागतिक.प्राथमिक सामसत्याग्रह म्हणजे शत्रूच्या पायावर डोके ठेवून विनवणे,त्याला नम्रपणे सांगणे व तो देईल ती शिक्षा सोसणे.प्रागतिक सामसत्याग्रह म्हणजे शत्रूला न दुखवता त्याची मालमत्ता नष्ट करणे.शुद्ध सत्याग्रहांतील प्राथमिक प्रकार म्हणजे शत्रूला नुसते जखमी करणे आणि प्रागतिक म्हणजे शत्रूला ठार करणे.सामसत्याग्रहाचा प्रयोग करून पाहू या.नाहीतर असा शुद्ध सत्याग्रह मग अवलंबू, असे सेनापतींनी ठरविले. ते सांगतात.


हठ माझी दृढमति । 

जनकार्य अनल्प जे । 

तें न साधे साम वादें ।

 विपक्षमत जैं खुजें ।

 येतों मी बोललों मित्रां ।

 तुम्ही व्यर्थ मरा जरी ।

 मरणें तुमच्या संगें । 

योग्य वाटे मला तरी ।।


लहानसहान कामे कदाचित सामसत्याग्रहाने सिद्धीस जातील.परंतु जी महान स्वराज्य संपादनासारखी कामे आहेत ती याने साधणार नाहीत.कारण शत्रूचे मन मोठे दिलदार नसते.


क्षुद्र मनाच्या शत्रूजवळ आपल्या या बलिदानाचा काय उपयोग? परंतु जगात फुकट काही जात नाही.राष्ट्रात या बलिदानाने शुद्धी येईल.त्यागाचे वातावरण निर्मिले जाईल.शत्रूचीही खरी परीक्षा होईल.शत्रू परीक्षेत नापास झाला तर मग शुद्ध सत्याग्रह आहेच.

अशी सेनापतींची विचारसरणी होती.देशात कोठून तरी तेज प्रकट व्हावे यासाठी त्यांचा जीव तडतडत होता.महाराष्ट्रातील पक्षोपपक्ष मुळशीचा विचार करायला जमले हे पाहून सेनापती आनंदले.ते म्हणू लागले-


महाराष्ट्र मुळशीपरिषदीं तिन्ही पक्ष जमले । 

दक्षत्वाच्या वीरत्वाच्या सुविचारी रमले । 

विश्वसलें मन जिवंत आहे थोर महाराष्ट्र ।

 महाराष्ट्र निजतेजें उठविल अखिल हिंदराष्ट्र ।।


सेनापती शांत राहतील की नाही,सामसत्याग्रहाची शिस्त पाळतील की नाही,अशी काहींना शंका वाटली. सेनापतींसारखे पुरुष जे हाती घेतील ते नीट पार पाडतील एवढीही त्यांना खात्री वाटेना!परंतु पुढे या शंका गेल्या.सेनापतींजवळ लपंडाव नाही.घाव घालायचा झाला तर तसे जाहीर करून घाव घालतील. घाव शांतपणे शिरावर झेलावयाचा ठरले तर त्याप्रमाणे अक्षरशः

वागतील.सेनापती शिस्तमूर्ती आहेत.व्रतमूर्ति आहेत.मुळशीचा सत्याग्रह म्हणजे महाराष्ट्राच्या अर्वाचीन इतिहासातील एक तेजोमय प्रकरण आहे. स्त्रीपुरुषांनी त्या प्रसंगी जे तेज प्रकट केले ते अवर्णनीय आहे.आधणाचे पाणी वीरांनी व वीरललनांनी अंगावर घेतले.मावळे व मावळणी यांनी अद्भुत धैर्य व शौर्य प्रकट केले.या सत्याग्रहातच 'सेनापती' ही पदवी सेनापतींस मिळाली.

सेनापती पुनःपुन्हा तुरुंगात जात होते.तुरुंगात ते सर्वांना धीर देत.सर्वांची चौकशी करीत. सर्वांच्या भाकऱ्या एकत्र कुस्करून काला करीत. गोकुळातील गोपाळकृष्णाचा प्रेमधर्म ते तुरुंगात शिकवू लागले.प्रेमधर्माचे सेनापती आचार्य आहेत.भेदभाव जावेत म्हणून ते तडफडतात.तुरुंगातून बाहेरच्या सैनिकांस ते तेजस्वी संदेश पाठवीत. 


सत्याग्रहींना तुरुंगात ते कविता पाठ करायला सांगत. अशा रीतीने हे काव्य बाहेर येई.पुष्कळसे काव्य या वेळेस त्यांनी दिले.अरे,हा शिवबाचा महाराष्ट्र.त्या मावळ्यांनी पूर्वी रक्ताचे सडे घालून येथे स्वराज्य स्थापिले.आनंदवनभुवन निर्मिले.महाराष्ट्राला दिव्य इतिहास दिला.त्या मावळ्यांचे ते अनंत उपकार स्मरून आजच्या सर्व सुशिक्षितांनी उठून काही ऋण फेडावे. "तीन हजार सत्याग्रही नाही का महाराष्ट्र देणार? महाराष्ट्र का मेला?" अशा गर्जनांनी सेनापती महाराष्ट्राची सुप्त तेजस्विता जागवू बघत होते.कोणी म्हणू लागले,सेनापती वेडे आहेत.आज यंत्रयुग आहे. वीज निर्माण केली पाहिजे.धरणे बांधली पाहिजेत.

सेनापती यंत्रविरोधी नाहीत त्यांनाही बिजली पाहिजे आहे.


बिजलीयुग हैं व्हावी । बिजली परि भाकरी । 

बारा हजार दीनांची । काढणें न परी बरी ।।


एवढेच त्यांचे म्हणणे होते.सेनापतींच्या हाकेस ओ देऊन सत्याग्रही येत होते.त्यांना सेनापती शिस्तीचे धडे देऊन तयार करीत.शिस्तीची महती सुंदर कवितांतून त्यांनी गायिली आहे.राष्ट्रे चढतात व पडतात.का?


हें पडणें हें चढणें याला मूळ एक शिस्त ।

शिस्तयुक्त ते चढले पडलों आम्ही बेशिस्त ।


असे त्यांनी बजावले आहे.बावळट व बेशिस्त लोक कुचकामाचे.

संयमानीच स्वराज्य वा स्वाराज्य लाभते. संसार वा परमार्थ, उभयत्र शिस्तीला महत्त्व आहे. 


जी शिस्त तीच शाही । शिस्तीत राज्य राही ।।


शिस्त शिकलेत म्हणजे राज्य आलेच हा मंत्र त्यांनी पटविला.

सामसत्याग्रह जोपर्यंत आहे,तोपर्यंत शत्रूने कितीही जाच केला तरी सहन करा.ते म्हणत :-


अम्ही पांडवांसारखी शिस्त पाळू । मनींच्या मनीं आमुचा क्रोध जाळू ।

पुढें धर्मयुद्धी करूं दोन हात । परी तोंवरी राहणें शान्त शान्त ।। 


जेव्हा प्रकटपणे मारणमरण सुरू करू,तेव्हा दे घाव घे घाव अशी टिप्परघाई खेळू.त्या सत्याग्रहात कधीकधी जुलूम इतका असह्य होई की सेनापती बेभान होत. एकदा तर ते टाटांच्या लोकांच्या अंगावर धावून जाणार होते.परंतु मित्रांनी त्यांना आवरिले.


एकदां कोपलों भारी । भारी दुष्टत्व पाहुनी । 

मित्रं धरूनिया मातें । शान्त केलें तया क्षणीं ।।


सेनापती अत्यन्त शान्तपणे टाटांच्या लोकांजवळ जाऊन मुळशीच्या शेतकऱ्यांची दुःखे सांगत.त्या वेळेस सेनापती रडत असत.


आंसवें गळती माझ्या । नयनांतून याचितां ।

मुळशीकर दुःखाचा । पाढा दुःसह वाचितां ।।


परंतु त्या आसवांची दानवी सरकारला कदर वाटली नाही.द्रव्यान्ध भांडवलवाल्यांनी त्या अश्रूची टर केली. तीन वर्षे सामसत्याग्रह करून मग गीताप्रणीत शुद्ध सत्याग्रहाची सेनापतींनी वीरघोषणा केली.या शुद्ध सत्याग्रहातील शत्रूला नुसते जखमी करणे हा प्राथमिक भाग त्यांनी उचलला.त्यांना व त्यांच्या साथीदारांस शिक्षा झाल्या.सेनापती आपल्या कैफियतींत म्हणाले,


मला ठार मारावयाचे नव्हते.तसा आरोप मजवर करता येणार नाही.माझ्या मनात तसे असते तर मी त्या वेळेस त्यांना जखमी करण्याऐवजी ठार केले असते.परंतु शुद्ध सत्याग्रहाचा प्राथमिक मार्ग आम्ही आखला होता.


सेनापतींच्या स्पष्ट वाणीचा न्यायाधीशावरही परिणाम झाला.शेवटी सात वर्षे ते तुरुंगात गेले.


ह्या वेळीच मला वाटते,महात्मा गांधींच्या तत्त्वनिष्ठेची अग्निपरीक्षा झाली.ज्या हिंसक अर्थव्यवस्थेविरुद्ध ते लिहीत होते,जी पारंपरिक,

ग्रामीण,कृषिप्रधान अर्थव्यवस्था टिकवलीच पाहिजे असे म्हणत होते त्यांच्यातला हा संघर्ष होता.पण महात्मा गांधींनी मुळशीच्या शेतकऱ्यांना नव्हे,तर टाटांना पाठिंबा दिला आणि हा सत्याग्रह कोलमडला.महात्मा गांधींनी स्वातंत्र्य लढ्याला प्रभावी नेतृत्व निश्चितच पुरवले.पण स्वतंत्र भारतात एक नव्या प्रकारची अहिंसक अर्थव्यवस्था उभी करण्याच्या दिशेने प्रत्यक्षात आणता येईल असे काहीही ते सांगू शकले नाहीत.ते काम त्यांचे अनुयायी,अर्थतज्ज्ञ जे सी कुमारप्पा ह्यांनी करण्याचा प्रयत्न केला.

१५/१०/२४

औद्योगिक क्रांती/The industrial revolution

विज्ञानाधारित तंत्रज्ञानातून ऊर्जा,पदार्थ हाताळण्याची, त्यावर प्रक्रिया करण्याची नवनवी तंत्रे विकसित करता आली.वाफेवर चालणाऱ्या इंजिनाने मानवी श्रमांहून खूप जोरने काम करण्याच्या शक्यता निर्माण झाल्या, भराभर पाणी उपसून खूप जास्त खोलवर खणत कोळसा काढणे शक्य झाले तारयंत्राद्वारा भराभर दूरवर संदेश पाठवता येऊ लागले.ह्या साऱ्या तंत्रांतून औद्योगिक क्रान्ती होऊ शकली.तिच्या जोडीला एक नवी भांडवलशाही अर्थव्यवस्था रचली गेली.आर्थिक उत्पादनाचे तीन घटक आहेत.नैसर्गिक संसाधने,मानवी श्रम आणि भांडवल.अठराव्या शतकापर्यंत उत्तर आणि दक्षिण अमेरिका ही दोन प्रचंड खंडे पादाक्रान्त करून युरोपीयांनी भरपूर भांडवल व नैसर्गिक संसाधने आपल्या हातात आणली होती.दक्षिण अमेरिकेतील इन्का साम्राज्याचे सोन्याचे साठे लुटून युरोपात पैसाच पैसा पोचला,तर उत्तर अमेरिकेतील मूलवासीयांचे शिरकाण करत अफाट वनसंपत्ती,सुपीक शेतजमीन, खनिजे हाती आली.चणचण होती मानवी श्रमांचीच. बऱ्याच अंशी आफ्रिकेतील काळ्या लोकांना गुलाम करुन हीही भरून काढली.


युरोपीयांच्या ह्या साऱ्या भरभराटीमागे त्यांची आक्रमक वृत्ती होती.वाटेल तशी हिंसा करण्याची तयारी होती. देवाने मानवाला सारी पृथ्वी उपभोगासाठी निर्माण केली आहे ही ईसाई धर्माची शिकवण होती.अँटहिल कादंबरीतल्या काही संवादांत ह्या तत्त्वप्रणालीचे विवेचन पाहायला मिळते : ही देवाची इच्छा आहे.रेनी गंभीरपणे म्हणाला.तुम्हाला बायबलमध्ये भेटेल ते.त्यानं आपल्याला पृथ्वीचं राज्य दिलं - बसून आ वासून पाहायला नाही तर सुबत्ता वाढवायला,वंश वाढवायला.आपण राष्ट्रीय उद्यानांमध्ये बसून कविता लिहून नाही मोठे झालो.तू सेमीजपैकी आहेस.

तुझ्यात ते रक्त आहे! उगीच काहीतरी उदारमतवादी स्वप्नं पाहत भरकटू नकोस!"


हिन्द स्वराज


मुबलक भांडवल,मुबलक नैसर्गिक संसाधने ह्यांच्या आधारावर युरोपाने एक हिंसक अर्थव्यवस्था उभी केली.ही उभारत असताना एकीकडे युरोपात समता, बंधुत्व,स्वातंत्र्याचा उद्घोष चालला होता,तर दुसरीकडे अमेरिकेत मूलवासींची कत्तल चालू होती.

आफ्रिकेतील काळ्या गुलामांना अतिशय क्रौर्याने वागवण्यात येत होते.आशियात वेगळी रणनीती अवलंबिली गेली. आशियावर कब्जा करायला आल्या होत्या इंग्रज,फ्रेंच, डच व्यापारी कंपन्या.

त्यांना इथली नैसर्गिक संसाधने, कच्चा माल अगदी स्वस्तात हवा होता.आणि आपल्या मायदेशातल्या उत्पादनांसाठी बाजारपेठांवर कब्जा करायचा होता.नैसर्गिक संसाधनांवर पकड घट्ट करायला एक आधार होता,वसाहतवाद्यांचे खासे तत्त्व - विजेत्यांचा हक्क'. हा विजेत्यांचा हक्क गाजवत त्यांनी भारताच्या वनसंपत्तीवर कब्जा केला आणि ही वनसंपत्ती काळजीपूर्वक वापरणाऱ्या खेडुतांना, आदिवासींना हालअपेष्टेत लोटले.आपल्या 'शेतकऱ्यांचा आसूड' या रचनेत जोतिबा फुल्यांनी याचे मोठे हृदयस्पर्शी वर्णन केले आहे:पूर्वी ज्या शेतकऱ्याजवळ फारच थोडी शेती असत व ज्याचा आपल्या शेतीवर निर्वाह होत नसे,ते आसपासच्या डोंगरावरील दऱ्याखोऱ्यांतील जंगलांतून उंबर,

जांभूळ वगैरे झाडांची फळे खाऊन व पळस,मोहा इत्यादी झाडांची फुले,पाने आणि जंगलांतून तोडून आणलेला लाकूडफाटा विकून,

पेट्टीपासोडीपुरता पैसा जमा करत व गावच्या गायरानाच्या भिस्तीवर आपल्याजवळ एक दोन गायी व दोनचार शेरड्या पाळून त्यांच्यावर जेमतेम गुजारा करून मोठ्या आनंदाने आपल्या गांवीच राहात असत.परंतु आमचे मायबाप सरकारचे कारस्थानी युरोपीयन कामगारांनी आपली विलायती अष्टपैलू अक्कल सर्व खर्ची घालून भलेमोठे टोलेजंग जंगलखाते नवीनच उपस्थित करून,त्यामध्ये एकंदर सर्व पर्वत, डोंगर,टेकड्या,दरीखोरी व त्याचे भरीस पडीत जमिनी व गायराने घालून फॉरेस्ट खाते शिखरास नेल्यामुळे दीनदुबळ्या पंगु शेतकऱ्याच्या शेरडास या पृथ्वीच्या पाठीवर रानचा वारा सुद्धा खाण्यापुरती जागा उरली नाही.दुसऱ्या बाजूने आपल्यासाठी बाजारपेठा खोलण्यासाठी त्यांनी अनेक क्लृप्त्या लढवल्या. बंगालातल्या विणकरांचे कापड इंग्रजांच्या मँचेस्टरच्या गिरण्यांशी स्पर्धा करत होते.ते उत्पादन बंद पाडण्यासाठी त्यांनी ढाक्याच्या विणकरांचे अंगठे तोडले.

चीनवर इंग्रजांचा प्रत्यक्ष ताबा मिळू शकला नाही.तिथे लोकांना जबरीने अफूच्या व्यसनात पाडले. चीनच्या राज्यकर्त्यांनी अफूवर बंदी घालताच अफूचा व्यापार खुला करून घेण्यासाठी लष्करी बळाचा वापर केला आणि ह्या व्यापारातून भरपूर पैसे कमावले.ह्या साऱ्या करामतीत त्यांनी भारतातील वेगवेगळ्या घटकांशी हातमिळवणी केली.पुढे मोठे पैसेवाले झालेले अनेक भारतीय व्यापारी इंग्रजांच्या अफूच्या व्यापारात सामील होते.


हे सगळे महात्मा गांधींना जाणवत होते.म्हणून ते १९०९ साली लिहिलेल्या आपल्या 'हिन्द स्वराज' ह्या पुस्तकात विचारतात 'युरोपात सभ्यता आहेच कुठे? युरोपीयांनी जे काय कमावले आहे ते सारे हिंसेच्या पोटी.त्यातले काहीही आपल्याला नकोच नको.'

असे प्रतिपादन करत महात्मा गांधींनी आपल्याला विज्ञान,

तंत्रज्ञान,यंत्रे, औद्योगिक उत्पादन हे सारेच्या सारे टाकाऊ ठरवले.

पण ह्या तत्त्वविवेचनातून प्रत्यक्षात काय कारवाई केली पाहिजे,

आज भारतीय गिरणी मालकांनी काय केले पाहिजे,असे विषय जेव्हा पुढे येतात तेव्हा महात्मा गांधींच्या मांडणीची धार अगदी बोथट बनते.


सेनापती बापट


एका दृष्टीने महात्मा गांधींच्या तत्त्वविवेचनाची सत्त्वपरीक्षा झाली मुळशी आंदोलनात.सह्यगिरी महाराष्ट्राचे उदकभांडार आहे.

सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर आणि पश्चिम उतारांवर जो प्रचंड पाऊस कोसळतो त्याने गोदावरी,भीमा,कृष्णा ह्या पश्चिमवाहिनी नद्या आणि त्यांच्या उपनद्या भरभरून वाहतात.हे पाणी साठवून एक तर ते दक्खन पठारावरच्या कमी पावसाच्या प्रदेशाला पाणीपुरवठा करता येतो,किंवा झपाट्याने कोकणात खाली उतरवून त्यातून वीज निर्माण करता येते.शेतीसाठी,शहरांना पाणी पुरवण्यासाठी छोटे-मोठे बांध अनेक शतकांपासून बांधले गेले आहेत.दीड दोन हजार वर्षांपासून दक्षिण भारतात तलावांची जाळीच्या जाळी उभारण्यात आली. पेशव्यांनी कात्रज जवळ तलाव बांधून पुण्याला पाणी पुरवठा केला.पण इंग्रजांनी आधुनिक तंत्रे वापरून खूपच मोठी धरणे बांधणे सुरू केले.पुण्याला पाणी पुरवण्यासाठी आणि शेतीसाठी असे एक मोठे धरण पुण्याच्या पश्चिमेला १८७९ साली खडकवासल्याला बांधले.मग जशा मुंबईत गिरण्या आल्या,वस्ती वाढू लागली,तशी घाटमाथ्याजवळ साठवलेले पाणी पश्चिमेला उतरवून वीज निर्माण करण्याची कल्पना निघाली.पोलादाचे उत्पादन सुरू करणाऱ्या टाटांनी १९११ मध्ये जलविद्युत ऊर्जा कंपनी स्थापन करून लोणावळ्याजवळ दोन धरणे बांधून पाण्यापासून वीज उत्पादनाची मुहूर्तमेढ रोवली.


लोणावळ्याची धरणे जिथे बांधली,तिथे मुख्यतःराहात होते धनगर आणि ठाकर.टाटांनी ह्यांना ना विचारले,ना पुसले. नुकसानभरपाईची बातच सोडा.सरकारच्या पूर्ण पाठिंब्यावर जागा ताब्यात घेतली,धरणे बांधली.मूळचे मालक मुकाट्याने निघून गेले.मग तिसरे धरण बांधायला निघाले मुळशी पेट्यात.हा प्रदेश आंबेमोहोर तांदळाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध होता.इथली बरीचशी जमीन पुण्यातल्या सुशिक्षित वर्गातल्या लोकांच्या मालकीची होती.ती कसत होते स्थानिक कष्टकरी,मराठ्यांच्या इतिहासात शिवाजीचे सैनिक म्हणून मानाचे स्थान असलेले मावळे.इथेही टाटांचे इंजिनिअर सरकारी अधिकाऱ्यांच्या पाठिंब्याने मालकांना न पुसता - न विचारता सरळ शेतांत घुसले,चर खणू लागले.पण अनेक जमीन मालक होते भारतीय असंतोषाचे जनक समजल्या जणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या पुण्यातले. शेतजमीन अन्यायाने हिरावून घेतली जात आहे म्हणून आंदोलन उभे राहिले.त्याचे नेतृत्व केले सेनापती म्हणून लोकांनी पदवी बहाल केलेल्या पांडुरंग वामन बापटांनी. सेनापती होते संघटन कुशल,प्रभावी लेखक,वक्ते, विचारवंत.अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी (वारुळ पुराण,माधव गाडगीळ,ई.ओ.विल्सन,संक्षिप्त अनुवाद-नंदा खरे)निःस्वार्थीपणे जीव ओतून काम करणारे.

मढेकरांच्या शब्दात आयुष्य अक्षरशःवितळवून समाजाच्या भल्यासाठी झटणारे.


कुणि मारावे,कुणी मरावे, 

कुणी जगावे खाउनि दगड; 

वितळवून कुणि आयुष्यांना 

ओतावे अन् सोन्याचे घड.


राहिलेला शिल्लक भाग पुढील लेखामध्ये….!