* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

८/३/२५

तुम्हीच लाविले जी झाड ! You planted the tree!

दिनांक ११-२-८२ त्या दिवशी माझा मुक्काम पंढरपूरला होता.ब्राह्ममुहूर्तावर चंद्रभागेच्या वाळवंटावर आलो.

मावळत्या चंद्रप्रकाशात वाळवंटातल्या रेतीतून चालत होतो.

नक्षत्रांचं गूढ प्रतिबिंब पाण्यात डोकावत होतं.नदीचं शांत वाहतं पाणी.आंघोळ केली अन् परत मठाची वाट धरली.चालताना मनात म्हणत होतो,"माझी शैक्षणिक रजा सुरू झालीय.साहित्य मंडळाकडून पुरस्कार मिळालाय.आता लवकर नांदेडला जायचं. प्राचार्य नरहर कुरुंदकरांना भेटायचं.सरांना भेटून किती वर्षे झालीत!" पंढरपूरला जाण्यापूर्वी नवेगावला साहित्य प्रसार केंद्राचे श्री.राजाभाऊ कुळकर्णी भेटले होते.'पक्षी जाय दिगंतरा'हा माझा ग्रंथ त्यांनी प्रकाशनासाठी घेतला होता.त्यांनी विचारले,


"ग्रंथाला प्रस्तावना कोण लिहील?"


माझ्या मनात सरांचं नाव होतं. मी म्हटलं, "कुणाची हवी?"


"प्राचार्य नरहर कुरुंदकरांची!"


मी लगेच होकार दिला होता.


या आठवणीतच मी नदीकाठ चढून मठात आलो. ज्ञानेश्वरी पुढ्यात ठेवून वाचू लागलो.


नंतर कुणीतरी 'तरुण भारत'चा अंक पुढं ठेवून गेला. पहिल्याच पानावर सरांचं छायाचित्र आणि त्यांच्या निधनाची शोकवार्ता! ज्ञानेश्वरी नीट बांधून पिशवीत ठेवली.जवळच खांबाला टेकून थंडगार फरशीवर बसलो.समोर नदीचं पात्र दिसत होतं.चंद्रभागा वाहत होती.माझ्या आयुष्यात मी एकदा दुःखी झालो तो वडिलांच्या मृत्यूनंतर अन् आता दुसऱ्यांदा !


मला नांदेडच्या गोदातीरावरील दिवस आठवले. मराठवाड्यात गोदावरीला गंगा म्हणतात.माझं घर गंगेच्या काठी होतं.दहा-बारा वर्षांपूर्वी सर होळीत राहत होते.अरुंद गल्ली-बोळांतून चालत गेलं आणि तीन-चार वाडे ओलांडले की सरांचं घर यायचं.अंगणात पारिजातक.पायऱ्या चढून वर गेलं की,सोप्यात सतरंजीवर बसून सर लिहीत वाचीत असताना दिसायचे. पुढ्यात तक्क्या,टेकायला लोड.आता पुन्हा त्यांची मूर्ती उभी राहिली.उंच,सडपातळ,सावळा रंग.पांढरे शुभ्र धोतर,साधा शर्ट,गहिरे डोळे,रुंद कपाळ,विचारमग्न व किंचित हसरा चेहरा.अन् ही मूर्ती आता एकाएकी कापरासारखी नामशेष झाली! सर लौकिकाच्या व साहित्याच्या संसारातून अचानक निघून गेले.ते असे एकाएकी निघून जातील,असं आम्हाला स्वप्नातदेखील खरं वाटलं नसतं.पन्नाशीतला माणूस म्हणजे म्हातारा नव्हे.त्यांची प्रकृती निकोप होती.काही आजार असल्याचं ऐकिवातही नव्हतं.सदा प्रसन्न मुद्रा.


प्राचीन संगीतशास्त्रावर त्यांचं प्रेम होतं.राजा उदयनविषयी ते आम्हांला कितीतरी सांगायचे.संगीताचे सात सूर,त्यांची व्युत्पत्ती,तंतुवाद्यं,चर्मवाद्यं व अंगुष्टी याविषयी तासन् तास बोलायचे.भरतमुनीच्या नाट्यशास्त्रावर त्या वेळी त्यांचं लेखन चालू होतं.


अन् या संगीताविषयी बोलायला जातानाच औरंगाबादला त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन श्री.अनंत भालेरावांसारख्या अनेक मित्रांच्या समोर ते व्यासपीठावर कोसळले आणि परत उठलेच नाहीत.त्यांच्या जीवनाचे संगीत व्यासपीठावरच संपलं.!


नांदेडमधील वास्तव्यात आम्ही वेळोवेळी त्यांच्या दारात उभं राहून विचारायचो,


"सर,आत येऊ काय?"


औरंगाबादचे कथाकार मुकुंद कृष्णा गायकवाड बरोबर असायचे.सरांशी त्यांनी परिचय करून दिला होता. आतून उत्तर यायचं,"नको."


गायकवाड डोकं खाजवीत उभे राहायचे.मी हळूहळू पायऱ्या उतरू लागे.


पुन्हा आवाज येई," स्त्री मासिकाकरिता तातडीनं लेख लिहितोय.थोड्या वेळानं या म्हणजे निवांत बसू."


आम्ही जेवणं उरकून रात्री पुन्हा वाड्याची वाट धरत असू.


सर लोडाला टेकून वाचीत बसलेले दिसायचे.त्यांचं असं अखंड वाचन,लेखन,मनन व चिंतन चालू असे.


आम्हाला पाहून हसतमुखानं म्हणायचे,"या हो आत. बसा.लिहून झाला एकदाचा लेख."


मग साहित्यिक गप्पा चालू व्हायच्या.शरदबाबू, रवींद्रनाथ टागोर व चेखोव हे माझे अत्यंत आवडते लेखक.


त्यांनी विचारलं,"चितमपल्ली,तुम्ही टागोरांची 'नष्टनीड' ही कथा वाचली?"


"होय." मी.


ते पुढं सांगू लागले - "रवींद्रनाथांचं नाव घेताच 'काबुलीवाला' ही गोष्ट समोर येते.हिंदु-मुसलमानांच्या ऐक्यावरील ती कथा म्हणून जगप्रसिद्ध झाली,पण त्यांची उत्कृष्ट कथा 'नष्टनीड' आहे.तसंच चेखोवचं.तो रशियन साहित्यातला श्रेष्ठ कथाकार,

पण त्यानं लिहिलेली डॉक्टरांची कथा अद्वितीय आहे.त्यात मानवी मनाचे कंगोरे अतिशय हळुवारपणे कोरले आहेत.तशा ह्या दोन्ही कथा सारख्याच. 'चारुलता व तिचा दीर एकत्रित येतात.कळत नकळत ती एकमेकांच्या प्रेमात पडतात.घडू नये ते घडत असतं.कुठं चुकलं ते त्यांना कळतच नाही.जेव्हा कळतं तेव्हा वेळ निघून गेलेली असते.अन् अपार व्यथेशिवाय जीवनात काही शिल्लक राहत नाही.'


'तीच तऱ्हा डॉक्टर व त्याच्या प्रेयसीची.डॉक्टर आपल्या प्रेयसीला बागेत भेटायला बोलावतो.ती येण्याचं टाळते. तिला त्याचं महत्त्व वाटत नाही.अन् डॉक्टरांच्या आयुष्याचं दुसरं पर्व.ती त्याला त्याच बागेत बोलावते. तो जात नाही.काय व कुठं चुकलं हेच त्यांना उमजत नाही.अन् ते आयुष्याची गोडी घालवून बसतात!'


रवींद्रनाथ व चेखोव्हच्या गोष्टी मी अनेकदा वाचल्या होत्या.त्या कथांतील सहजसुंदर मर्म त्या दिवशी त्यांनी सांगितलं.एकदा ते शरदबाबूंविषयी म्हणाले, 


"शरदबाबूंच्या कथा-कादंबऱ्या शोकान्तिका आहेत. विधवा व परित्यक्ता-स्त्रीजीवनाचं त्यांनी चित्रण केलं आहे.पण त्यांनी त्यांच्या कथा-कादंबऱ्यांत त्यांचा विवाह लावून दिला नाही!त्यांना तसंच नियतीवर सोपवून दिलं. मिलन नाही.विरहाची व्यथा आहे."


रशियन कादंबरीकाराचा विषय निघाल्यावर ते म्हणाले, "रशियन कादंबरीचा व्याप फार मोठा असतो.शेकडो पात्रं असतात.हजारो पानांचं लेखन असतं.टॉलस्टॉयची 'ॲना कॅरोनिया' घ्या किंवा मिखिल शोलोखव्हची 'ॲण्ड क्वाइट फ्लोज दि डॉन' घ्या.

अनुभव घेणं व त्याला साहित्यिक लेखनाचं रूप देणं त्यांना जमलं आहे.ते जे आयुष्य जगले ते आम्हा मराठी लेखकांच्या कुणाच्या नशिबी आलं नाही.अंशतः आलं तरी ते समर्थपणे लिहिता आलं नाही!" त्यांचं वाचन अफाट होतं.कधी मोपासा-मॉम व जॉन गुंथरचा विषय निघे.पु. शि.रेगे यांच्या 'सावित्री' विषयी ते बोलत.विश्राम बेडेकरांच्या 'रणांगण' विषयी सांगत.


र.वा.दिघे,श्री.ना.पेंडसे व गोनीदांच्या कादंबऱ्यांविषयी बोलत.

चि.त्र्यं.खानोलकरांच्या साहित्याविषयी चर्चा होई. गदिमा व व्यंकटेश माडगूळकरांच्या साहित्याची वैशिष्ट्यं सांगत.त्यांच्या बोलण्याचा अखंड ओघ चालू राही. आम्ही देहभान विसरून ते शांतपणे ऐकत असू.रात्रीचा दुसरा प्रहर संपून पहाट झालेली असे.सर घटका दोन घटका पलंगावर पडून राहत.


कार्तिक महिन्याचे ते दिवस.वर निरभ्र आकाशात आकाशगंगेच्या उजळ प्रकाशात बगळ्यांच्या रांगा उडतानाचं सुंदर दृश्य दिसायचं.

भक्तगण गात गात गंगेवर कार्तिक स्नानाला जाऊ लागलेले असत.

आम्ही घरी न परतता ती भजनं ऐकत घाटावर जात असू.ती जागा फार सुंदर आहे.विस्तीर्ण घाट आहेत.तिथून खाली नदीचं पात्र दिसे.गुलाबी थंडीला नुकतीच सुरवात झालेली असे.नदीच्या पात्रावर लाटा उठत.नक्षत्रांचं सुंदर प्रतिबिंब पाहता पाहता आकाशगंगेत उडणाऱ्या बगळ्यांच्या रांगा नदीतीरावर उतरू लागत.सरांची आठवण अशी लख्ख आकाशगंगेसारखी मनात भरून आहे.नदी,आभाळ,नक्षत्र व पाखरांशी नातं जोडणारी आहे.त्या वेळी मी भारतातील पक्षिसृष्टीचा अभ्यास करीत होतो.तेवढ्यासाठी मी संस्कृत साहित्यसृष्टी धांडोळीत होतो.कधी कधी राम शेवाळकरांकडं गेलो की,त्यांच्या संस्कृत पाठांतरानं व अमोघ वाणीनं मी मोहित होई.सरांच्या बोलण्यात वेदोपनिषदां

पासून रामायण-महाभारतापर्यंत आणि चरक, सुश्रुत,

कौटिल्यापासून संस्कृत महाकाव्यांपर्यंतचे उल्लेख येत.मुळातून संस्कृतचं अध्ययन करावं,असं या काळात वाटू लागलं.

नांदेडमधल्या यज्ञेश्वरशास्त्री कस्तुरे यांच्या संस्कृत पाठशाळेची वाट धरली.त्यांना भेटलो. एवढा मोठा प्रौढ विद्यार्थी त्यातून बदनाम अशा वनखात्याला.शास्त्रीबुवांना माझ्या संस्कृत अध्ययनातील हेतू ध्यानात येईना.शेवटी सरांना भेटून सारं विस्तारानं सांगितल्यावर मला पाठशाळेत प्रवेश मिळवून लहान मुला-मुलींबरोबर बसून अध्ययन करण्याची परवानगी मिळाली ! आकाशवृत्तीनं राहणाऱ्या एकनाथमहाराज खडकेकर यांच्यासारख्या गुरूजवळ मी संस्कृतच्या अध्ययनाला सुरवात केली.


"कविता आणि निसर्गशोभा यांचा संबंध कितीही जवळचा असला,

तरी ते प्रकरण जंगलखाते,सागवान लाकूड,लाकूड चोरणारे चोर या कक्षेत सामावणारं नाही," सर मला नेहमी म्हणायचे, "चितमपल्ली, जंगलखातं हे काही तुमचं खातं नव्हे!"


मराठीतले कादंबरीकार नाथमाधव व बंगालमधील प्रख्यात लेखक शरदबाबू हे दोघंही एके काळी जंगलखात्यातच नोकरीला होते,असा बादरायण संबंध लावून मी मनात समाधान मानी.


त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग दिसेना.शेवटी सरांनी माझ्याविषयी दिलेल्या शिफारस दाखल्यासह त्या वेळचे महाराष्ट्राचे मुख्य वनसंरक्षक श्री.बाबासाहेब बूट यांना विनंती अर्ज केला.त्यांनी माझी बदली पुण्यातील वनसंशोधन केंद्रात केली.


पुण्यातील वास्तव्यात मला अभ्यास व संशोधनासाठी अनुकूल परिस्थिती प्राप्त झाली.वाईट अनुभवल्यावर चांगलं काय ते कळतं,तसं मला श्री.एम.डी.जोशी व मरबल्लीसाहेबांसारखी देवमाणसं अधिकारी म्हणून मिळाली.तिथं मी संस्कृत,जर्मन व रशियन भाषेचा अभ्यास केला.तेथील भांडारकर प्राच्य संशोधन संस्था व डेक्कन कॉलेजच्या ग्रंथालयात जाण्याची परवानगी मिळाली.पुण्यातील तीन वर्षांच्या वास्तव्यात मी ज्ञानभिक्षुकी स्वीकारली.त्याचा पुढच्या आयुष्यात खूप उपयोग झाला.


पक्षिशास्त्रातील माझा अनुभव व संस्कृत वाङ्मयातील पक्ष्यांचे संदर्भऐकून सर म्हणायचे,"चितमपल्ली,तुम्ही पक्षिशास्त्रातले चालतेबोलते ज्ञानकोश आहात.पण कोश म्हणजे शास्त्र नव्हे,साहित्य नव्हे !"


त्यांना मी लावा पक्ष्याविषयी संदर्भासहित माहिती पाठवून दिली.

तोच मजकूर वापरून त्यांनी लावा पक्ष्यावर एक सुंदर लेख लिहून पाठविला.त्यासोबतच्या पत्रात लिहिलं होतं : " पुनर्लेखन केलेला लेख काळजीपूर्वक वाचा.अभ्यासा,लिहिण्याचा क्रम व मुद्दे लक्षात ठेवा."त्यानंतर काही महिन्यांनी त्यांनी महाराष्ट्र टाइम्स (२४ ऑक्टो. १९७१) मध्ये 'पक्षिवेडा मारुती चितमपल्ली' हा परिचयलेख लिहून महाराष्ट्रातील विचारवंतांचं व साहित्यिकांचं लक्ष माझ्याकडे वेधलं! त्यानंतर मी 'संस्कृत वाङ्मयातील पक्षी' ही लेखमाला 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये प्रकाशित केली.त्यातील नावीन्यपूर्ण माहिती व बारीकसारीक संदर्भामुळं साऱ्यांचं लक्ष वेधलं.सर कुणी पक्षिशास्त्रज्ञ नव्हते,पण त्यांनी मला पक्षिशास्त्रज्ञ म्हणून महाराष्ट्रापुढे आणलं. सूत्रबद्ध लेखन कसं करावं,तर्कशुद्ध विचार कसा मांडावा,नेमके महत्त्वाचे संदर्भ कसे टिपावेत,यांचं त्यांनी मार्गदर्शन केलं.पक्षिशास्त्रावरील लेखनाकडून श्री.उमाकांत ठोमरे या चतुरस्र संपादकानं मला पक्ष्यांवरील ललित लेखनाकडे वळवलं.ते नवीन लेखन महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरच्या वाचकांना आवडलं.पक्ष्यांना मानवी संदर्भ देऊन कसं लेखन करावं,याचं मार्गदर्शन सत्यकथेच्या राम पटवर्धन यांनी केलं.

त्यातूनच निरगू गोंड व चांदी कवडी (सत्यकथा,दिवाळी ७८) हे लेखन प्रसिद्ध झालं. सत्यकथेतील तो लेख वाचून सरांनी लिहिलं,"लेख सुंदर वठला आहे.शैली घाटदार आहे.तुम्हाला शून्यातून वर आलेला पाहून मला खूप आनंद झाला!"


एकदा माझ्या हातून लेखनात तांत्रिक चूक झाली. संपादकानं प्रतिष्ठेचा प्रश्न केला.पत्रव्यवहार चालू झाला. मी सरांकडे धाव घेतली.उत्तरात त्यांनी लिहिलं होतं :


'खुलाशांविषयीचा कच्चा खर्डा सोबत लिहून पाठवला आहे.असा खुलासा कुणाकडूनही घेतला जात नाही. आता तुमची प्रतिष्ठित लेखकांत गणना होतेय.यापुढं असं करू नका.जबाबदारीनं वागा.'


१९७५ साली पुण्याहून विदर्भात जाण्यापूर्वी त्यांची भेट देशमुखवाड्यात झाली.त्या वेळी मी 'मृगपक्षिशास्त्र' ह्या संस्कृत ग्रंथावर टीका लिहीत होतो.सरांना ती दाखविली.त्यांनी ती वाचून काही महत्त्वाच्या सूचना दिल्या.नंतर तेथून चालत चालत गप्पागोष्टी करीत शनिवारवाड्यावरून श्री.रा.चिं.ढेरे यांच्या घरी गेलो.श्री. ढेरे मला नावानं ओळखत होते.सरांनी त्यांच्याशी माझा समक्ष परिचय करून दिला.जरूर लागेल तेव्हा मला मार्गदर्शन करण्याविषयी सरांनी त्यांना विनंती केली.


पुण्यातली ही त्यांची शेवटची भेट! आमच्यात पत्रव्यवहार होता.त्यांची कार्डावर लिहिलेली पत्रं त्रोटक असत.नागपूरला येण्यापूर्वी त्यांचं पत्र यायचं.पण जंगलातून दौरा संपवून परत येईपर्यंत ते व्याख्यान देऊन नागपुरातून परत गेलेले असायचे!


पक्षिशास्त्रज्ञ,ललित लेखक व कथाकार म्हणून सरांनी मला पुढं आणलं.जंगलात भटकताना (शब्दांचं धन,मारुती चितमपल्ली,

साहित्य प्रसार केंद्र, सीताबर्डी,नागपूर) पक्षिनिरीक्षणापासून सुरवात करून मी कुठचा कुठं पोचलो! जंगलात वाढत असलेल्या ह्या रोपाचं वृक्षांत रूपांतर केलं.ज्ञानेश्वरांनी आपल्या गुरुमाऊली

विषयी लिहिलंय-


हे सारस्वताचे गोड।

तुम्हीच लाविले जी झाड। 

तरी आता अवधानामृते वाड। 

सिंपोनि की जो ॥


मला सरांविषयी असंच म्हणावं लागेल.जंगलात अहोरात्र भटकणाऱ्या ह्या वनवासी झालेल्या माणसाकडून साहित्यक्षेत्रातील अल्प-स्वल्प सेवेचं श्रेय त्यांनाच द्यावं लागेल.

६/३/२५

तज्ञ / expert

झाडं अतिशय प्रतिकूल परिस्थितीत वाढू शकतात. खरच वाढू शकतात का?त्यांना वाढावेच लागते! एखादी बी जेव्हा जमिनीवर पडते तेव्हा तिची जागा फक्त वाऱ्याने किंवा एखाद्या जनावरामुळे बदलू शकते.आणि एकदा का ती तिथे रुजली की मग आयुष्यभर तिथेच जखडली जाते.आता तिला तिथे जे काय मिळेल त्यावरच समाधान मानायचे असते. बहुतांश रोपट्यांना पुढील काळात मोठी आव्हाने पेलावी लागतात कारण अनेक वेळा बी रुजण्याची जागा फार अनुकूल नसते.


उदाहरणार्थ,एखादी जागा फार सावलीत असेल, जसे भल्यामोठ्या बीच वृक्षाखाली,तर लख्ख सूर्यप्रकाशात वाढणाऱ्या बर्डचेरीच्या रोपट्याला ते प्रतिकूल ठरते.किंवा एखादी जागा प्रखर प्रकाशात असते त्या वेळेस बीचच्या रोपट्यांची पालवी जळून जाते.दलदलीच्या जागेत मुळं कुजून जातात आणि कोरडी वाळू असलेल्या जमिनीत तहानेने मरून जातात.काही जागा उदाहरणार्थ,निकृष्ट जमीन,दगड किंवा मोठ्या झाडांच्या फांद्यांतील बेचकी या बी रुजण्यासाठी अंत्यत दुर्देवी जागा म्हणता येतील.आणि अनेकदा नशीब साथ देत नाही. समजा तुटून जमिनीवर पडलेल्या झाडाच्या लाकडात एखादी बी पडली तर काही दिवसांनी त्याचे रोपटे होईल आणि मूळ कुजणाऱ्या लाकडात शिरतील.पण जेव्हा कोरडा उन्हाळा येतो तेव्हा ते लाकूड सुके पडते आणि रोपट्याचे आयुष्य संपते


अनेक मध्य युरोपीय झाडांच्या प्रजातींच्या बिया रुजण्याचे अनुकूल ठिकाण साधारण एकसारखेच असते.त्यांना पोषणयुक्त,मोकळी,हवेशीर आणि आर्द्रता टिकविणारी माती आवडते.जमीन कोरड्या हवेतही ओलसर राहिली पाहिजे.

उन्हाळ्यात फार तापू नये किंवा थंडीत गारठू नये.बेताचा हिमवर्षाव चालेल कारण त्यातून बर्फ वितळल्यावर जमिनीला पाणी मिळते.तिथे डोंगरामुळे वादळी वारे अडवले गेले पाहिजेत आणि बुरशी किंवा कीटकांचा प्रादुर्भाव कमी असावा.(द हिडन लाईफ ऑफ ट्रीज,पी ट र वो ह्ल ले बे न अनुवाद - गुरुदास नूलकर,अरविंद घनश्याम पाटकर मनोविकास प्रकाशन)


झाडांच्या स्वप्नातले 'स्वर्ग' हे असेच असेल.पण काही तुरळक ठिकाणे सोडली तर अशी परिस्थिती फार क्वचित मिळते.पण हे जैवविविधतेसाठी असंच असणं चांगलं आहे.कारण जर मध्य युरोप हा सगळ्या प्रकारच्या झाडांसाठी असा स्वर्गीय प्रदेश असता तर बीच वृक्षांनी एकट्याने जगण्याची स्पर्धा एकहाती जिंकली असती आणि हा सगळ्या प्रकारच्या झाडांमध्ये फक्त बीचचे वृक्षच दिसले असते.स्पर्धकांना मागे टाकून आपल्याला हवे ते भरपूर ओरबाडून घेऊन अनुकूल परिस्थितीचा फायदा कसा घ्यायचा हे बीच वृक्षांना बरोबर कळते. झपाट्याने वाढून आपल्या पालवीचे आच्छादन केले की खालच्या स्पर्धकांना सूर्यप्रकाश कमी मिळतो.अशा परिस्थितीत जर त्या स्पर्धकाला जीव वाचवायचा असेल तर काहीतरी वेगळी युक्ती लढवायला लागते.पण हे सहज शक्य नसते म्हणून जर बीच वृक्षाशेजारी स्वतःसाठी पर्यावरणीय कोनाडा (इकॉलॉजिकल निश),जागा तयार करायची असेल.

आणि आपली वाढ करून घ्यायची असेल तर त्या झाडाला स्वतःच्या गरजा कमी कराव्या लागतात.काही सोडून द्याव्या लागतात, जगण्यासाठी पर्यायी धोरण आखावे लागते. 


एकूणच बीच वृक्षाखाली अशी स्वतःची जागा तयार करण्याच्या प्रयत्नात झाडाचे जीवन दुष्कर होऊन जाते.पण कोणत्याही अधिवासात असा अनुकूल इकॉलॉजिकल निश मिळत नसल्यामुळे खरंतर आपण झाडांना हव्या असलेल्या अनुकूल परिस्थितीबद्दल बोलणं,आग्रही असणं बरोबर होईल का? आहोत अशा प्रकारच्या प्रतिकूल जागा तर सर्वत्र सापडतात.ज्या झाडांना यात तग धरता येतो ती प्रजाती आपला भौगोलिक विस्तार करू शकते.म्हणजेच आपण झाडांच्या जुळवून घेण्याच्या,प्रतिकूल परिस्थितीतही मार्ग काढून तग धरून राहण्याच्या विजीगीषू वृत्तीबद्दल बोलतोय, नाही का? आणि स्प्रूसच्या झाडाने नेमके हेच केले आहे.कमी उन्हाळा आणि बोचऱ्या थंडीत,उत्तरे पासून ते मध्य युरोपपर्यंत असा या स्प्रूसचा प्रसार आहे.सायबेरिया कॅनडा आणि स्कँडिनेव्हियामध्ये स्प्रूस वाढण्याचा मौसम फक्त काही आठवड्यांचा असतो.अशा परिस्थितीत बीचची पालवीसुद्धा उमलत नाही.आणि त्या कडक थंडीमुळे बीचला हिमबाधा होऊन त्याची वाढ खुंटेल.या प्रतिकूल परिस्थितीत फक्त स्प्रूस तग धरतो.


स्प्रूसच्या सूचीपर्णी पानांमध्ये आणि खोडांमध्ये काही विशिष्ट तेलं असतात ज्यामुळे त्यांच्या शरीरातली द्रव्ये गोठून जात नाहीत.म्हणूनच त्यांची पानं झडत नाहीत आणि ते फांद्यांना ऊब देऊ शकतात.वसंतातल्या सूर्यप्रकाशाचे किरण अंगावर पडताक्षणी ते प्रकाश संश्लेषण सुरू करतात. एकही दिवस वाया घालवला जात नाही आणि साखर आणि लाकडाच्या उत्पादनासाठी काही आठवड्यांचा थोडासा कालावधी जरी मिळाला तरी यामुळे झाड वर्षाला इंच दोन इंच वाढत राहते.


पण अशाप्रकारे पान झडू न देणे हेसुद्धा झाडाला धोकादायक आहे.कारण फांद्यांवर बर्फ साठतो आणि वजनदार झाल्यावर झाडाची फांदी मोडू शकते.असे होऊ नये यासाठी स्प्रूस कडे दोन उपाय असतात.पहिलं म्हणजे स्त्री-पुरुष आपलं खोड सरळ सोट वाढविते.उभ्या अवस्थेत वजन समतोल राहते आणि संतुलन सहसा बिघडू शकत नाही. दुसरं म्हणजे उन्हाळ्यात फांद्या आडव्या वाढतात, आडव्या फांद्यांवर बर्फाचे वजन जमले की त्या खाली झुकू लागतात आणि खालच्या फांदीचा त्यांना आधार मिळतो.फांद्यांची रचना घराच्या कौलांसारखी होते आणि त्या एकमेकांच्या मदतीने स्वतःला सांभाळतात.या रचनेमुळे वरून पाहिल्यास हे झाड एकदम लुकडे दिसते.यामुळे बर्फ झाडाभोवती पडतो,

त्याच्यावर नाही.उंचीवर किंवा उत्तरेकडे अतिशय बर्फाळ प्रदेशात वाढणारे स्प्रूस आपल्या शिरेच्या फांद्या छोट्या ठेवत डोक्याचा मुकुट लांब निमुळता ठेवतात आणि स्वतःचा अधिक बचाव करू शकतात.


पानझड न करण्याचा अजून एक धोका असतो. सुयांसारख्या पालवीमुळे पृष्ठभाग वाढतो आणि वादळी वाऱ्याला अडथळा होतो आणि त्यामुळे हिवाळी वादळात झाड पडू शकते.एकच गोष्ट त्यांचा यापासून बचाव करते,ती म्हणजे त्यांची संथपणे होणारी वाढ.शेकडो वर्षं वयाचे झाडही जेमतेम तीस फुटापर्यंत वाढते,ज्यामुळे वादळी वाऱ्यामध्ये ते मोडण्याची शक्यता कमी राहते.तो धोका झाड साधारण ऐंशी फुटाच्या वर गेल्यावर वाढतो.


मध्य युरोपीय जंगलात बीच वृक्षांची सर्वाधिक संख्या असते.यांच्या घनदाट पालवीमुळे फार थोडा सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचतो.यू हा वृक्ष अत्यंत चिकाटीने आणि काटकसरीने वाढतो अशी त्याची ख्याती आहे.आपण बीच वृक्षाशी वाढीमध्ये स्पर्धा करू शकत नाही हे यू (भारतीय बारमी किंवा मंदुपर्णीची प्रजात) वृक्षाला चांगलेच माहिती असते.म्हणून त्याने जंगलाचा दुय्यम स्तर पकडलेला असतो.केवळ ३ टक्के सूर्यप्रकाश पोचणाऱ्या या स्तरांमध्ये 'यू'ची वाढ होते.पण या परिस्थितीत वीस ते तीस फूट उंची गाठून प्रौढ अवस्थेत पोचण्यासाठी त्याला कमीत कमी एक शतक लागते.या कालावधीत त्यावर अनेक संकटे येतात.



शाकाहारी जनावरे त्याची पालवी कुरतडून वाढ एखाद दोन दशके मागे टाकू शकतात किंवा एखादा मरणपंथाला लागलेला बीच वृक्ष त्याच्या अंगावर पडू शकतो.पण हे कणखर झाड आधीपासूनच पुरेशी सावधगिरी बाळगून तयारी सुरू करत असतो.इतर झाडांच्या मानाने अगदी सुरुवातीपासून आपली मुळे सक्षम करण्यात यू बरीच ऊर्जा खर्च करतो.मुळातून ते पोषणद्रव्यांचा साठा करून ठेवतो म्हणजे आपत्ती आलीच तर यातून परत पोषण मिळू शकते.

पण यामुळे झाडाला एकापेक्षा जास्त खोडं येऊ शकतात.प्रौढ अवस्थेत ही खोर्ड जुळून येऊ शकतात ज्यामुळे झाड थोडं विचित्र अस्ताव्यस्त दिसतं.यू चे वृक्ष इतर कोणत्याही झाडापेक्षा जास्त म्हणजे हजार वर्षापर्यंतही जगू शकतात.त्यामुळे आसपासची झाडं तुलनेने लवकर वठून पडून जातात.मग मिळणाऱ्या सूर्यप्रकाशाचा पुरेपूर वापर ते करून घेतं.असे असूनही त्यांची उंची पासष्ट फुटांपेक्षा जास्त नसते.त्यांना यापेक्षा जास्त उंच होण्यात काहीच रस नसतो.


हॉर्नबीम नावाचा वृक्ष या यू वृक्षाचे अनुसरण करायचा प्रयत्न करतो.नावात साम्य नसले तरी हे झाड बर्च वृक्षाचे नातेवाईक आहे.पण याच्या सवयी यू इतक्या काटकसरीच्या नसतात आणि त्याला जास्त सूर्यप्रकाश लागतो.तरीही ते बीच वृक्षाखाली जगू शकते पण त्याचा मोठा वृक्ष होऊ शकत नाही. 


हॉर्नबीम पासष्ट फुटांपेक्षा जास्त वाढत नाही आणि ही उंची ओकच्या जंगलात होऊ शकते कारण तिथे बीच जंगलापेक्षा जास्त सूर्यप्रकाश मिळतो.या जंगलात त्याची मोकळेपणाने वाढ होते कारण दोन्ही प्रजातींना भरपूर जागा असते.पण या जंगलातही एखादा बीच वृक्ष उगवतो आणि हॉर्नबीमना मागे टाकायला लागतो.सावली,कोरडी हवा आणि उष्णता असली तरीही हॉर्नबीम बीच झाडाशी स्पर्धा करू शकतो.अशा परिस्थितीत बीच तग धरू शकत नाहीत.ही परिस्थिती पश्चिमेकडे तोंड केलेल्या उतारावर असते आणि इथे हॉर्नबीम वृक्ष राज्य करू शकतात.दलदलीच्या प्रदेशात प्राणवायू कमी असतो आणि बहुतांश झाडांची मुळं तिथे तग धरू शकत नाहीत. अशी परिस्थिती झरे किंवा ओढे यांच्याकडेला आणि पूर पठारांवर तयार होते.समजा एखाद्या बीच वृक्षाचे बीज तिथे पडले आणि रुजले तर ते काही प्रमाणात वाढू शकते पण कुजलेल्या मुळामुळे उन्हाळी वादळात ते पडू शकते.

मुळांना भक्कम जमिनीचा आधार मिळाला नाही तर स्प्रूस,

पाईन, हॉर्नबीम आणि बर्च वृक्षांची अशीच परिस्थिती होते. पण अल्डर वृक्षांचे मात्र याच्या उलट असते. 


आपल्या स्पर्धकांपेक्षा जास्त उंच होऊ शकले नसले तरी त्यांना दलदलीच्या प्रदेशात भक्कमपणे उभं राहता येतं.

त्यांच्या मुळांमध्ये हवेच्या नलिका असतात ज्यामुळे प्राणवायू खालपर्यंत पोचू शकतो. समुद्रात पोहणाऱ्या डायव्हर्स जसे समुद्रात श्वास घेण्यासाठी 'श्वासोच्छवासाची नळी' घेऊन समुद्रात खोलवर जातात,ही नळी पाण्याच्या पृष्ठभागाबाहेर राहून त्यांना 'प्राणवायूचा पुरवठा करत राहते, त्याचप्रमाणे या हवेच्या नलिकांचे काम असते. या व्यतिरिक्त अल्डर झाडाच्या बुंदियाच्या खालच्या भागात कॉर्क पेशी (या सच्छिद्र असतात,ज्यातून हवा आत शोषली जाते) असतात. जर पाण्याची पातळी या पेशींच्या वर फार दिवस राहिली तर अल्डर वृक्षाची मुळं कुजायला लागतात.

४/३/२५

मॅनइटींग लेपर्ड ऑफ रुद्रप्रयाग - Maneating Leopard of Rudraprayag 

राजहंस प्रकाशन पुणे यांनी प्रकाशन केलेले..२०७ पानांचे 'नरभक्षकाच्या मागावर' या पुस्तकाचे मुळ लेखक केनेथ अँडरसन हे आहेत,तर या पुस्तकाचा मराठी अनुवाद लेखक संजय बापट यांनी केला आहे.(त्यांच्याशी सहजच वरील पुस्तका संदर्भात बोलत असताना) जे मूळ इंग्रजी पुस्तक त्यांनी त्यांच्या आयुष्यात ५० वर्षांपुर्वी वाचले होते.त्यांनी ते पुस्तक मला आवर्जून वाचण्यास सांगितले होते.ते पुस्तक म्हणजेच मॅनइटींग लेपर्ड ऑफ रुद्रप्रयाग मूळ लेखक - जिम कॉर्बेट,अनुवाद - विश्वास भावे) 


...दिसेना. परत मचाणापर्यंत उतरून मी आडव्या पसरलेल्या फांद्याच्या टोकापर्यंत गेलो पण तिथून सुद्धा बिबळ्या गेल्याच्या दिशेला काहीच दिसत नव्हतं. यावेळी तीन वाजले होते.दोन तासानंतर चंद्रप्रकाश फिका होऊ लागला व जवळच्या वस्तू अस्पष्ट दिसू लागल्या तसा मी झाडावरून उतरलो.बोकडाने माझं बें बें करून स्वागत केलं.बोकडाच्या पलीकडे रस्त्याच्या कडेला एक बसका लांबुळका खडक होता व 


त्यावर इंचभर जाडीचा रक्ताचा माग होता.अशाप्रकारे रक्त अंगातून गेल्यावर कोणताही बिबळ्या दोन मिनिटांच्या वर जगू शकत नाही.

त्यामुळे शिकारी प्राण्यांच्या मागावर जाताना घेतल्या जाणाऱ्या कोणत्याही खबरदाऱ्या मुळीच न घेता मी रस्त्यावरून खाली उतरलो आणि खडकापलीकडे रक्ताचा माग काढायला सुरूवात केली.तसाच पुढे पन्नास यार्ड माग काढल्यावर मला तो बिबळ्या मरून पडलेला दिसला. जमीनीवरच्या एका उथळ खळग्यात मागे घसरून तो पडला होता व त्याची हनुवटी खळग्याच्या कडेवरती स्थिर झाली होती.


हा नरभक्षकच आहे हे ओळखण्यासाठी कोणतीच खूण समोर दिसत नव्हती तरी यावेळी क्षणभरसुद्धा मला शंका नव्हती ! पण इथे तर कोणताही सैतान,भूत किंवा दुष्टात्मा नव्हता.माझी सर्व धडपड लपून बघत,सैतानी हास्य करत मी केव्हा बेसावध राहतोय याची वाट पहात जिभल्या चाटणारं दृष्ट जनावर नव्हतं... इथे एक साधा वयस्क बिबळ्या होता... इतर जातभाईपेक्षा थोडे फार फरक असलेला ! त्याच्या मानेवरचे केस राखाडी झाले होते,मिशा नव्हत्याच.सर्वांकडून भीती व तिरस्काराला पात्र झालेल्या ह्या जनावराचा एकच गुन्हा होता, निसर्गाच्या दृष्टीने फारसा नव्हे तर माणसाच्या दृष्टीकोनातून कारण त्याने माणसाचं रक्त वाहवलं होतं. पण ते माणसावर वर्चस्व गाजवण्यासाठी किंवा त्याला दहशतीखाली ठेवण्यासाठी नव्हे तर जगण्यासाठी, स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि आत्ता तो हनुवटी जमीनीला लावून चिरनिद्रा घेत होता ! ज्या रायफलच्या एका बुलेटमुळे माझे व त्या बिबळ्यामधले आजपर्यंतचे सर्व हिशेब चुकते झाले होते त्या रायफलमधल्या उरलेल्या बुलेट्स मी काढून ठेवत होतो. 


तेवढ्यात मला खोकल्याचा आवाज आला.वर पाहिलं तर रस्त्याच्या कडेवरून वाकून पाहणरा पंडित दिसला.मी त्याला खुणेनेच बोलावलं तसा तोही लगबगीने खाली आला पण त्याला बिबळ्याचं डोकं दिसताच तो जागीच थबकला आणि मला अगदी दबक्या आवाजात विचारलं की तो मेलाय का? व ते काय आहे? तो मेला आहे व पाच वर्षापूर्वी त्याचा गळा धरणारा तोच सैतान आहे असं उत्तर दिल्यावर त्याने हात जोडले व माझ्या पायावर डोकं ठेवण्याचा प्रयत्न केला.तेवढ्यात रस्त्यावरून "साहेब,तुम्ही कुठे आहात?" अशी हाक आली.आमच्याच एका माणसाचा आवाज होता.मी जेव्हा 'ओ-दिली तेव्हा रस्त्यावर चार डोकी उगवली आणि आम्हाला पाहातच घाईघाईने डोंगर उतरून आली.त्यातल्या एकाच्या हातात पेटलेला कंदील होता... तो विझवायला विसरला होता.


त्या खळग्यात बिबळ्याचं अंग ताठ झालं होतं त्यामुळे तिथून त्याला बाहेर काढताना बरीच खटपट करावी लागली.आमच्या माणसांनी येताना बांबूही आणले होते आणि त्या बांबूला आम्ही बिबळ्याचं धूड बांधताना माणसं म्हणाली की रात्री त्यांना झोप लागली नव्हती. बंगल्याच्या जमादाराच्या घड्याळात ४.३० वाजलेले पहाताच त्यांनी कंदील पेटवला आणि बांबू व दोऱ्या घेऊन ते मला भेटायला निघाले.त्यांना वाटलं होतं की मला काहीतरी मदतीची गरज आहे.पण इथे मचाणावरही मी नाही,

बोकडही सुरक्षित आहे हे पाहिल्यावर त्यांना वाटलं की बिबळ्याने माझाही बळी घेतलाय व आता पुढे काय करायचं हे न कळल्याने त्यांनी मला हाका मारल्या होत्या.माझा रग मचाणावरून आणण्यासाठी व काल रात्रीची घटना यात्रेकरूंना तिखटमीठ लावून सांगण्यासाठी पंडितला तिथेच ठेवून मी,ती चार माणसं व दुडक्या चालीने चालणारा तो बोकड असे सर्वजण आम्ही बंगल्याकडे निघालो. बिबळ्याने ज्या क्षणी झडप मारली त्या क्षणीच त्याला माझी गोळी लागल्याने तो बोकड छोट्या जखमेनिशी बचावला होता.त्याला आता जाणीवही नव्हती की त्याच्या काल रात्रीच्या साहसामुळे तो उर्वरित आयुष्य एखाद्या 'हिरो' सारखं जगणार आहे त्याला एक सुंदर पितळी कॉलर बक्षीस मिळणार आहे आणि त्याच्या मालकासाठी तो एक उत्पन्नाचं साधन बनणार आहे.


मी दरवाजा खटखटवला तेव्हा इबॉटसन झोपला होता. काचेतून मला पाहताच तो बेडवरून उडी मारून उठला व दरवाजा उघडला.त्याने मला आनंदाने मिठीच भारली आणि दुसऱ्या मिनिटाला व्हरांड्यावर ठेवलेल्या बिबळ्याच्या धूडाभोवती नाचायला लागला.जोरजोरात ओरडून त्याने माझ्यासाठी चहा व गरम पाणी काढायच्या ऑर्डर्स दिल्या,स्टेनोग्राफरला बोलावलं, आणि शासन,प्रसारमाध्यमं,जीन व माझी बहीण यांच्यासाठीच्या टेलिग्रामच डिक्टेशन देऊ लागला.


त्याने मला अक्षरशः एकही प्रश्न विचारला नाही.त्याला माहीत होतं की इतक्या सकाळी मी इथे आणलेला तो बिबळ्या नरभक्षकच होता.मग प्रश्नांची गरजच काय होती?मागच्या वेळेला सर्व पुरावे समोर दिसत असूनही मी ठाम राहिलो होतो की आम्ही जिनटॅपमध्ये मारलेला बिबळ्या नरभक्षक नाही आणि यावेळी मी काहीच बोललो नव्हतो !


मागच्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यापासून त्याच्या खांद्यावर फारच मोठी जवाबदारी येऊन पडली होती. मतदारांना खूष ठेवायला बघणाऱ्या राजकारणी लोकांना,दररोजच्या वाढत्या नरबळींमुळे दबाव आलेल्या सरकारी अधिकाऱ्यांना,वरिष्ठांना आणि प्रसारमाध्यमांना त्यालाच तोंड द्यावं लागत होत.एखादा गुन्हेगार माहीत आहे पण तो गुन्हे मात्र थाबवू शकत नाही आणि त्यामुळे सगळीकडून थपडा खाव्या लागणाऱ्या पोलीस ऑफिसरसारखी त्याची अवस्था झाली होती.त्यामुळे २ मे १९२६ रोजी इबॉटसन हा जगातला सर्वात आनंदी माणूस होता यात नवल नव्हतं ! आता तो सर्वांना छाती ठोकून सांगू शकणार होता की त्या नरभक्षकाचा आता खातमा झालाय. त्याचप्रमाणे आसपासच्या गावातल्या लोकांना, यात्रेकरूंना,बंगल्याच्या कंपाऊंडमध्ये हळूहळू जमणाऱ्या लोकांना तो सांगू शकणार होता की त्यांना सतत आठ वर्ष छळणारी 'सैतानी शक्ती' आता नष्ट झाली आहे.चहाचं भांडं रिकामं केल्यावर आणि गरम पाण्याने आंघोळ केल्यावर मी थोडा झोपायचा प्रयत्न केला,पण नाही! माझ्या पायाला पेटके आले होते व पाय मुरगळल्यासारखा झाला होता.केवळ इबॉटसनने केलेल्या मसाजमुळेच जरा बरं वाटतं होतं.तसे पेटके परत येतील या भीतीने मी झोपू शकलो नाही.


शेवटी मी उठलो आणि आम्ही दोघांनी बिबळ्याची मोजमापं घेतली,काळजीपूर्वक निरीक्षण केलं. ही निरीक्षणं खाली देत आहे.


मापं…


लांबी : बिटवीन द पेग्ज -  ७ फूट ६ इंच


लांबी : ओव्हर द कर्व्हज - ७ फूट १० इंच


(बिबळ्या मेल्यानंतर १२ तासांनी ही मापं घेतली आहेत.)


निरीक्षणे


रंग: फिक्कट गवती


केस : आखूड व गळणारे


मिशा : नाहीत


जीभ व तोंड : काळा रंग


जखमा : उजव्या खांद्यावर ताजी बुलेटची जखम


मागच्या डाव्या पंजाला जुन्या रायफलच्या गोळीने झालेली जखम व एक चवडा व नख गायब.


डोळ्यावर बऱ्याच खोल पण अर्धवट भरलेल्या जखमा


शेपटीवर बऱ्याच पण अर्धवट भरलेल्या जखमा


मागच्या डाव्या पायाच्या स्टीफलवर एक छोटीशी जखम.


तोडांच्या व जिभेच्या काळ्या रंगाबाबत मी काही स्पष्टीकरण देऊ शकत नाही,कदाचित सायनाईडमुळे पण तसं झालं असावं असं काहींचं म्हणणं आहे. अर्धवट भरलेल्या जखमांपैकी डोकं,उजवा मागचा पाय आणि शेपटीला झालेल्या जखमा त्याच्या भैंसवाड्याला झालेल्या लढाईत झाल्या होत्या.डाव्या मागच्या पायाच्या स्टीफलला झालेली जखम जिनट्रॅपमध्ये अडकल्यामुळे झाली होती,कारण ट्रॅपमध्ये सापडलेला कातडीचा तुकडा व केस यात चपखल बसले.मागच्या डाव्या पायाची जखम १९२१ मध्ये त्या तरूण आर्मी ऑफिसरने ब्रिजवरून झाडलेल्या गोळीमुळे झाली होती.बिबळ्याची कातडी काढताना मला बंदुकीचा एक छर्रा त्याच्या छातीजवळच्या कातडीत अडकलेला मिळाला.जवळ जवळ वर्षभरानंतर एका भारतीय ख्रिश्चन माणसाने तो छर्रा ज्यावर्षी बिबळ्या नरभक्षक झाला त्या वर्षी त्याने मारलेल्या गोळीतला आहे हे कबूल केलं.ही सर्व मोजमापं व निरीक्षण झाल्यावर त्याचं धूड एका झाडाच्या सावलीत ठेवण्यात आलं आणि संपूर्ण दिवसभर हजारो माणसं,बायका व मुलं त्याला बघायला येत राहिली.जेव्हा आमच्या भागातली पहाडी लोकं एखाद्याला काही विशिष्ट उद्देशाने भेटतात उदा.आभार मानण्यासाठी वगैरे,तेव्हा या मोहिमेवर रिकाम्या हाताने जाऊ नये असा रिवाज पाळला जातो.


एखादं गुलाबाचं,चमेलीचं फूल किंवा पाकळ्या पुरेशा असतात व हाताची ओंजळ करून ही भेट दिली जाते. भेट स्वीकारणाऱ्याने उजव्या हाताच्या बोटांचा स्पर्श त्या वस्तूला केला की देणारा माणूस ओंजळ सोडून घेणाऱ्याच्या पायावर ती फुलं टाकतो,जसं ओंजळीने पाणी टाकावं तसं !


मी इतरही अनेक प्रसंगात असे आभार स्वीकारले आहेत.पण त्या दिवशी रुद्रप्रयागमध्ये मात्र प्रथम बंगल्यावर आणि नंतर बाजारात भरलेला सोहळा केवळ अविस्मरणीय होता.


"त्याने माझ्या एकुलत्या एका पोराला मारलंय साहेब आणि आता म्हातारपणी आम्हाला कोणी नाही."


"माझ्या पाच पोरांच्या आईचा त्याने बळी घेतला,सर्वांत धाकटा तर फक्त काही महिन्यांचा आहे.आता पोरांचा सांभाळ करायला,जेवण करायला घरात कोणी नाही."


"माझा पोरगा रात्री खूप आजारी पडला पण रात्री दवाखान्यात जायची कोणाचीच छाती झाली नाही आणि त्यातच तो दगावला."


एकापेक्षा एक शोकांतिका... पण ते दुःस्वप्न आता संपलं होतं. आणि त्या ऐकत असताना माझ्या पायावर फुलांचा व पाकळ्यांचा सडा पडत होता !


भरतवाक्य…


या पुस्तकात मी सांगितलेली गोष्ट १९२५ ते १९२६ या काळातली आहे.त्यानंतर १९ वर्षांनी म्हणजे १९४२ साली मी मीरत येथे युद्धासंदर्भातल्या कामात होतो. मला आणि माझ्या बहिणीला एक दिवस जखमी सैनिकांची करमणूक करण्यासाठी कर्नल फ्लायनी एका गार्डन पार्टीला येण्याचं निमंत्रण दिलं.


भारताच्या सर्व भागातून आलेली पन्नास-साठ माणसं एका टेनिस कोर्टवर नुकताच चहा संपवून बसली होती आणि आता जरा हास्यविनोदाच्या व धूम्रपानाच्या मूडमध्ये होती.अशातच आम्ही पोचलो आणि कोर्टाच्या पलीकडच्या बाजूने मी व माझ्या बहिणीने बाहेरच्या रांगेतून हळूहळू फिरायला सुरुवात केली.


सर्वच लोक मध्यपूर्वेकडचे होते आणि थोडी विश्रांती घेऊन त्यांच्या त्यांच्या घरी जाणार होते;काहीजण रजेवर तर काही डिस्चार्जवर.

फ्लायमॅडमने भारतीय संगीताच्या रेकॉर्ड ग्रामोफोनवर वाजवण्याची व्यवस्था केली होती. पार्टी संपेपर्यंत आम्ही दोघांनी तिथे रहावं अशी त्यांनी विनंती केल्याने आम्हाला जखमी सैनिकांशी बोलायला बराच वेळ उपलब्ध होता.


फिरत फिरत आम्ही एक अर्धवर्तुळ पूर्ण केलं असेल तसा आम्हाला एक पोरगेलेसा सैनिक छोट्या खुर्चीवर बसलेला दिसला.तो जबर जखमी झाला होता.त्याच्या खुर्चीशेजारी दोन कुबड्याही होत्या.मी जवळ आल्यावर तो मोठ्या कष्टाने खुर्चीवरून उठला आणि माझ्या पायावर डोकं ठेवण्याचा प्रयत्न करू लागला.बरेच दिवस हॉस्पिटलमध्ये काढल्याने त्याचं वजन बरंच घटलं होतं.मी त्याला उचलून परत खुर्चीवर ठेवलं तेव्हा तो म्हणाला,"मी मघाशी तुमच्या बहिणीशी बोलत होतो आणि जेव्हा मी त्यांना मी गढवाली आहे असं सांगितलं तेव्हा त्यांनी मला तुम्ही कोण आहात हे सांगितलं."तुम्ही त्या बिबळ्याला मारलेंत तेव्हा मी खूप छोटा होतो.माझं गाव रुद्रप्रयागपासून बरंच दूर दूर होतं.

मलाही त्यादिवशी रुद्रप्रयागला यायचं होतं.पण मी इतकं अंतर चालू शकणार नव्हतो.माझे वडील मला खांद्यावरून घेऊन जाऊ शकतील इतके ताकदवान नव्हते.घरी परतल्यावर त्यांनी मला सांगितलं की त्यांनी बिबळ्याला बघितलं आणि त्याला ज्या साहेबाने मारलं त्याला स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं.त्या दिवशी सर्वांना मिठाई वाटण्यात आली होती आणि त्यांच्या वाट्याची मिठाई त्यांनी माझ्यासाठी आणली होती.


आता मीही घरी जाऊन सांगू शकेन की मी माझ्या डोळ्यांनी तुम्हाला पाहिलंय ! दरवर्षी रुद्रप्रगाला नरभक्षकाचा मृत्यू साजरा करण्यासाठी मोठी जत्रा भरते.त्या जागेवर मला घेऊन जाणारा कोणी भेटला तर मी सर्वांना सांगेन की तुम्ही मला भेटलात !


असा आहे आमचा गढवाली माणूस ! हा मुलगा ऐन जवानीच्या उंबरठ्यावरचा होता आणि एक युद्ध गाजवून जखमी होऊन आला होता.पण स्वतःच्या शौर्याच्या कथा सांगण्याऐवजी १९ वर्षापूर्वी रुद्रप्रयागच्या एका बिबळ्याला मारणाऱ्या माणसाला त्याने पाहिलंय एवढंच तो त्याच्या बापाला व इतर सर्वांना सांगणार होता.


१२.०२.२५ या लेखातील शेवटचा भाग..।


'रुद्रप्रयागचा नरभक्षक बिबळ्या' या लेखापासून व ०९.०७.२३ या तारखेपासून आपण हे पुस्तकच क्रमशः प्रकाशित करीत आलेलो आहोत.दोन मोकळ्या पानासहीत १६० पानांचे हे पुस्तक आज संपले.'अंधारातील नेम' या लेखातील हा तिसरा व पुस्तकातील शेवटचा भाग .. या बद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार…- विजय गायकवाड..!!



२/३/२५

खारट पोहे / Salty swim २

"हो रे, लंचसाठी डबापण देणार होती;पण मीच म्हटलं,

सकाळी पाच वाजता उठून बनवणार त्यापेक्षा आज दुपारी बाहेर जातो जेवायला."


"आज बाहेरच जावं लागणार आहे.मीपण आणला नाही डबा.चल बॉस यायच्या आधी उरकून घेऊ." असं म्हणत अनिरुद्ध उठला.


आज अनिरुद्धला डबा द्यायचाच आहे,तर फक्त चपाती-भाजी न देता आमटी-भात आणि सॅलडपण करू म्हणून राधिकानं सगळा स्वयंपाक आवरला. जायच्या आधी फोन करून सांगूया,नाही तर तो बाहेर जाईल म्हणून राधिकानं फोन केला.पूर्ण रिंग वाजली;पण अनिरुद्धनं फोन काही उचलला नाही. मीटिंग सुरू असेल म्हणून डबा भरून पार्किंगमध्ये आल्यावर परत फोन केला.त्यावेळीपण त्यानं फोन उचलला नाही.अजून राग कमी झाला नसणार. म्हणजे डबा घेऊन गेलं तर तिथंच ओरडणार तर नाही ना? राधिकानं दोन मिनिटं विचार केला आणि जायचं ठरवलं.ओरडला तर ओरडला.पुढचं पुढं बघू, म्हणत तिनं स्कुटी बाहेर काढली.

बरेच दिवस न वापरल्यानं गाडी चालूच होत नव्हती.किका मारून मारून पाय भरून आलं;पण गाडी काही चालू झाली नाही.जरा गुड गुड केली की बंद व्हायची. तेलाची टाकी उघडून बघितली तर त्यात खडखडाट. मग तिनं गाडी साईड स्टँडला लावली आणि कॉर्नरवरच्या पेट्रोल पंपावर जाऊन बाटलीतून पेट्रोल आणलं.इतक्या मेहनतीनं चाललीय खरी; पण हा बाबा बाहेर गेला नसला म्हणजे बरं. सकाळी सासूबाईंनी मुलगी झाली म्हणून बोललेलं शब्द कानात घुमत होतं.पोह्यात मीठ नीट मिक्स झालं नाही म्हणून पोहे अंगावर फेकून दिलं.इतका पुरुषी अहंकार.नोकरी करणारी बायको पाहिजे आणि लग्न झालं की मुलं सांभाळून,घर, स्वयंपाक, सासू-सासरे, पैपाहुणे यांची सरबराई करून नोकरी सांभाळा म्हणे; बाई आहे की मशीन ? स्वतःच स्वतःशी पुटपुटत तिनं गाडीच्या टाकीमध्ये पेट्रोल घातलं आणि गाडी सुरू केली.

दोन-तीन किका मारताच गाडी चालू झाली आणि तिनं समाधानाचा सुस्कार सोडला.इतक्या दिवसांनी गाडीवरून जाताना लागणारा वारा राधिकाच्या गालाला गुदगुल्या करू लागला.हेल्मेटची काच वर करून ती वाऱ्याचा आनंद घेत निघाली.


दुपारी लंचला बाहेर जायचा अनिरुद्धचा बेत आधीच ठरला होता.हॉटेलला जाऊन ऑर्डर करून जेवण मिळायला उशीर होईल म्हणून फोन करून टेबल बुक केलं आणि ऑर्डर दिली होती.संदेशच्या कारमधून दोघं ऑफिसमधून बाहेर पडले.


चौकात सिग्नलला चांगलीच गर्दी होती. हळूहळू वाट काढत संदेश पुढं सरकला.उजवीकड वळण बंद केलं होत.परत पुढच्या चौकातून यू टर्न घ्यावा लागणार म्हणून अनिरुद्ध वैतागला."अरे ट्रॅफिक म्हणजे ना डोक्याला ताप आहे.अस अचानक डायव्हर्ट करतात.आधी माहिती असतं तर पढ आलोच नसतो." "चिल यार.. काहीतरी कारण असणार नाही तर उगाच कशाला डायव्हर करतील;पण तू सकाळपासून इतका चिडचिड का करत आहेस?"


"अरे,काल एकतर बॉसनं उशिरापर्यंत डोकं फिरवलं.त्यात रात्री आमटीत मीठ कमी,तर सकाळी राधानं पोहे खारट केलेलं.डबापण तयार नव्हता."


"तू रात्री वहिनींना सांगितलं नव्हतंस का लवकर डबा बनव म्हणून?"


"नाही ना यार.बॉसच्या टेन्शनमध्ये विसरलो सांगायला."


"मग तू ऑफिसचा राग बायकोवर का काढतोस?"


"अरे पण स्वयंपाक नीट नको का बनवायला?"


"तू जसं सांगायला विसरलास तसं ती मीठ टाकायला विसरली असेल.त्यात इतकं काय चिडण्यासारखं आहे? घ्यायचं आमटीत थोडं मीठ वरून..."


"घरात बसून तिला तेवढंच काम आहे; तेपण नीट करता येत नाही. नोकरी सोडून घरी बसलीय, तर घर तरी सांभाळता आलं पाहिजे."


"त्यांनी का नोकरी सोडली?"


"बाळाला कोण सांभाळणार?"


"तुझी आई असते ना घरी ?"


"ती थकलीय आता.तिच्यानं नाही होत पळापळ."


"ऑफिसचं टेन्शन आणि बायकोची नोकरी याचा राग राधिका वहिनींवर काढून कशाला त्रास करून घ्यायचा?"


"आता तू तिची वकिली करू नकोस.बघ लवकर मरणार नाही ती.विषय काढला आणि तिचा फोन आला.आता पकवणार.आईबरोबर वाद झाला असणार,नाही तर घरी काहीतरी संपलं असणार?"


"तुला सगळं माहीत आहे रे?"


"म्हणूनच फोन कट केला;पण तिचा आत्मा शांत होतोय का बघ,दोन वेळा कट केला तरी तिसऱ्यांदा लावला. आता पूर्ण रिंग होऊदे.बसूदे कानाला फोन लावून."


बघ तर काय म्हणायचं आहे ते.दोन मिनिटंच लागतील,किती वेळा अस टाळणार?"


"बघ ना. कळत कसं नाही या लोकांना समोरचा माणूस फोन उचलत नाही णजे काहीतरी कामात असेल,बीझी असेल.

यांना मॅनर्सच नाहीत..." असं म्हणत अनिरुद्धनं रागानं फोन कट केला.


" तुझ्या बाजून तू बरोबर आहेस रे,पण असंही असेल की,

समोरची व्यक्ती काहीतरी अडचणीत असेल.इमर्जन्सी असेल.बघ तरी काय म्हणायचं आहे त्यांना..." संदेश हसत हसत बोलला.


"ठिक आहे,तू म्हणतोस म्हणून उचलतो." येऊदे परत म्हणत अनिरुद्धनं फोन हातातच धरला;पण फोन आला नाही.थोडा वेळ वाट बघून फोन खिशात ठेवला.रिलॅक्स होत केसातून हात फिरविला.दोन मिनिटांनी परत फोन वाजला."बघ इतका वेळ फोन हातात होता तोवर वाजला नाही.जरा डोळा लागला तर फोन आला.ही बया पाठ सोडणार नाही आणि सुखात जगू देणार नाही." असं म्हणत अनिरुद्ध मिश्कीलपणं हसला.


"उचल फोन आणि विषय संपव.बघ काय काम आहे."


रागानं फोन उचलून अनिरुद्ध खेकसला,"इतक्या वेळा फोन करायला काय झालंय.घरी येईपर्यंत वाट बघता येत नाही का? जीव जातोय का?"


समोरून आवाज आला, "जीव जात नाही.जीव गेलाय..!"


"काय..?" राधिकाच्या फोनवर अनोळखी आवाज ऐकून अनिरुद्ध घाबरला.


✓ "ज्या नंबरवरून तुम्हाला फोन आलाय त्या व्यक्तीचा आताच अपघात झालाय.त्यांच्या फोनवर तुमचा नंबर लास्ट डाईलमध्ये आहे आणि हब्बी नावानं सेव्ह आहे म्हणून तुम्हाला फोन केला. समोरून निर्विकार आवाज आला.

बोलणं ऐकून संदेशनं गाडी बाजूला थांबवली.


घाबरलेल्या अनिरुद्धनं विचारलं,"कधी? कुठे? कसा? ती तर घरीच असते!"


"पंधरा मिनिटे झाली.चौकात सिटी बसला स्कुटी धडकली.

सोबत जेवणाचा डबा आहे.चौकात या.ओळख पटवून बघा.बराच वेळ अनि,अनि म्हणून तळमळत होती;पण तुम्ही फोन उचलला नाही. तोवर जीव सोडला."


२८.०२.२५ या लेखातील शेवटचा भाग…