बेटावर पोचल्यावर तिच्या आणखी गोष्ट लक्षात आली.सेंट हेलेनामध्ये लोकांच्या मुलाखती घेताना सावधगिरीने बोलणं गरजेचं होतं.बेटावर नेपोलियनच्या बाजूने बोलणारे फ्रेंच होते आणि नेपोलियन ज्यांच्या खिजगणतीतही नाही असे स्थानिकही होते.नेपोलियन जिथे वास्तव्यास होता तो बेटावरचा भाग म्हणजे 'लॉगवुड'.फ्रेंच प्रतिनिधी आताही तिथे राहत होते.त्यांचा जेम्सटाऊनमधील ब्रिटिश राज्यपालांशी अत्यल्प आणि आवश्यकतेपुरताच संवाद आहे.बेटावरचे छोटे छोटे भूभाग फ्रेंचांच्या मालकीचे,तर उरलेलं बेट ब्रिटिशांचं अशी परिस्थिती होती.या सगळ्या गोंधळातून माहिती काढत ज्युलिया नेपोलियनच्या आगमनाचं आणि वास्तव्याचं चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभं करते.
सतराव्या शतकात हे बेट ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात जाऊन तिथे वसाहतीस सुरुवात झाली होती.
अर्थात तिथे राहणाऱ्या लोकांची संख्या अगदीच थोडी होती.रशिया,पुशिया आणि ऑस्ट्रिया यांच्या मदतीने ब्रिटिशांनी १८ जून १८१५ मध्ये वॉटर्लू इथे नेपोलियनचा निर्णायक पराभव करून त्याला बंदी बनवलं.त्याआधीच्या वर्षी नेपोलियनला युरोप
जवळच्याच एल्बा बेटावर बंदी बनवून ठेवण्यात आलं होतं;पण तिथून आपली सुटका करून घेण्यात त्याला यश आल्यामुळे या वेळी ब्रिटिशांनी दक्षिण अमेरिका आणि आफ्रिकेच्या मध्यावर असणाऱ्या दुर्गम सेंट हेलेना बेटाची निवड केली.नेपोलियनला त्याच्याबरोबर वास्तव्यासाठी तीन अधिकारी निवडायचे होते.त्याचा वैयक्तिक डॉक्टर त्याच्याबरोबर येणार होता.शिवाय आणखी बाराजण घरकामासाठी त्याच्या बरोबर असणार होते.नेपोलियनला कुठल्याही परिस्थितीत सेंट हेलेना बेट सोडता येणार नव्हतं.
नेपोलियनच्या नजरकैदेसाठी निवड झाल्यामुळे सेंट हेलेनाचं जागतिक महत्त्व अचानक वाढलं. बाजारातील सर्व वस्तूंचे भाव दुपटी-तिपटीने वाढले.नेपोलियन इथे पोहोचण्याआधी जेम्सटाऊनमध्ये अनेक फर्मानं निघाली.
त्यात कुणालाही पूर्वपरवानगीशिवाय जेम्सटाऊन बंदरात जाता येणार नाही,असं एक फर्मान होतं. नेपोलियनच्या आगमनाची बातमी आणणाऱ्या जहाजातून आणखी एक सरकारी फतवा आला होता.
तो म्हणजे हे बेट आता ईस्ट इंडिया कंपनीच्या मालकीचं राहिलेलं नव्हतं,तर ते आता ब्रिटिश साम्राज्याचा भाग बनलं होतं.इथे आता ब्रिटिश राजवटीचे कायदे लागू झाले होते.ब्रिटिश कायद्यानुसार पुढील सूचना निघेपर्यंत या बेटाला तुरुंगाचा दर्जा देण्यात आला.
(ही अधिसूचना नेपोलियनचं प्रेत फ्रान्सला पोचल्यानंतर रद्द झाली आणि हेलेना पुन्हा ब्रिटिश वसाहत बनलं.)
कुठलंही जहाज या बेटाच्या कुठल्याही भागाजवळ थांबवण्यास मनाई करण्यात आली. ज्या जहाजांना अधिकृत परवानगी असेल तीच जहाजं जेम्सटाऊनच्या बंदरात नांगर टाकू शकत होती.त्यावरची कुणीही व्यक्ती ते जहाज सोडून जेम्सटाऊनमध्ये पाय ठेवू शकत नव्हती.ज्यांना तिथे काही कारणासाठी उतरायचं असेल त्यांनी राज्यपालांची पूर्वपरवानगी घेणं आवश्यक होतं. बेटावर उतरल्यावर ते नक्की काय करणार, कुणाला किती वेळ भेटणार आणि जहाजावर केव्हा परतणार हे लिहून देणं आणि त्यानुसार वागणं आवश्यक होतं.
स्थानिक मच्छिमारांना मासेमारीसाठी सागरात केव्हा जायचं आणि केव्हा परतायचं यासाठी वेळा ठरवून देण्यात आल्या होत्या.दर दिवशी सागरात उतरण्यापूर्वी नियोजित अधिकाऱ्याकडून त्या तारखेचा परवाना घेणं त्यांना सक्तीचं करण्यात आलं होतं. रात्री नऊ ते सकाळी सहा या काळात कुणीही कुठल्याही कामासाठी घराबाहेर पडू शकत नव्हतं.असे अनेक जाचक नियम या बेटावर नव्याने जारी झाले.त्यावरून ब्रिटिशांच्या मनात नेपोलियनबद्दल किती धास्ती होती हे दिसून येतं. नेपोलियन इथून पळून जायचा प्रयत्न करणारच,असं त्यांना खात्रीपूर्वक वाटत होतं.प्रत्यक्षात मात्र तसं घडलं नाही.नेपोलियनला बेटावर आणायचं ठरल्यावर तिथे एकाएकी अनेक नवे चेहरे दिसू लागले. इंग्लंडहून दोन हजार सशस्त्र सैनिक बेटावर दाखल झाले.त्या सैनिकांचा आणि नागरिकांचा परस्पर संबंध येणार नाही याचीही व्यवस्था केली गेली.बंदरात पाचशे नौसैनिकांनी भरलेल्या जहाजांचा ताफा गस्त घालू लागला. याशिवाय अनेक मुलकी अधिकारी या बेटावर आपल्या कुटुंबीयांसह दाखल झाले.
मात्र,यातल्या कुणालाही नेपोलियनचं नखसुद्धा दिसणार नाही याची काळजी घेण्यात आली होती.अशा जय्यत तयारीनंतर १४ ऑक्टोबर १८१५ रोजी नेपोलियनचं जहाज सेंट हेलेनाच्या बंदराला लागलं.पण त्याच्या मुक्कामाच्या तयारीची खातरजमा करून घ्यायची असल्याने तीन दिवस नेपोलियनचा मुक्काम जहाजावरच होता.जहाज पोहोचलं त्या दिवशी दुपारी त्या जहाजाचा कॅप्टन असलेला अॅडमिरल,बेटाचे राज्यपाल,बेटावरचा डॉक्टर आणि एक व्यापारी नेपोलियनला भेटायला आले.नेपोलियनच्या आणि त्याच्या साथीदारांच्या वास्तव्याबद्दल त्यांच्यात चर्चा झाली.या बेटावर राहण्याचा खर्च किती येईल,वस्तूंचे भाव काय वगैरे प्रापंचिक गोष्टींबद्दल नेपोलियनने राज्यपालांशी चर्चा केली;तर डॉक्टरला तिथला जन्मदर,
मृत्युदर,स्थानिक लोक कुठल्या आजारांना बळी पडतात.कुठले रोग जास्त प्रमाणात आढळतात वगैरे प्रश्न विचारले.तसंच, नेपोलियनकडची दोन सोन्याची घड्याळं बंद पडली होती ती या बेटावर दुरुस्त होतील का, अशी त्याने त्या व्यापाऱ्याकडे चौकशी केली.
जहाजावरून दिसणारे ते काळेकभित्र नैसर्गिक खडकांचे तट पाहून नेपोलियन निराश झाला.'इथे राहण्यापेक्षा मी इजिप्तमध्ये राहिलो असतो तर फार बरं झालं असतं.'असे उद्रार त्याने सेंट हेलेना पाहून काढले अशी नोंद आहे. १७ ऑक्टोबरला नेपोलियनला सेंट हेलेनावर उतरवण्याचं ठरलं.लोकांच्या गराड्या
पासून सुटका व्हावी यासाठी रात्री बंदरावर उतरावं, असं त्यानेच अॅडमिरलला सुचवलं होतं.त्याच्या सूचनेमुळे एका छोट्या बोटीने नेपोलियनला जेम्सटाऊनच्या बंदरावर नेण्यात आलं.रात्र असली तरीही या प्रख्यात योद्ध्याला पाहण्यासाठी सेंट हेलेनातले नागरिक मोठ्या संख्येने गोळा झाले होते.
तोफ झाडून नेपोलियनच्या आगमनाची वार्ता जाहीर करण्यात आली.त्या रात्री नेपोलियनचा मुक्काम जेम्सटाऊनमध्येच होता.दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे नेपोलियन तयार झाला.ब्रिटिश अॅडमिरल त्याच्यासाठी एक काळा घोडा घेऊन आले होते. ते,नेपोलियन,एक फ्रेंच जनरल आणि दोन फ्रेंच हुजरे असे तिथून नेपोलियनच्या नियोजित निवासस्थानी जायला निघाले.
यानंतर नेपोलियन पुन्हा जेम्सटाऊनमध्ये परतलाच नाही.नेपोलियनने या बेटावर पहिलं पाऊल ठेवलं तेव्हा इथली शांतता आणि अतीव एकटेपणाची भावना निर्माण करणारं वातावरण यांनी त्याला हादरवलं होतं.या बेटाबद्दल त्याच्या मनात प्रथम
दर्शनीच जी द्वेषभावना पैदा झाली ती अखेरपर्यंत टिकून होती.
नेपोलियनच्या मुक्कामासाठीची जागा तयार होत असल्याने तोपर्यंत त्याने तिथून जवळच राहणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनीच्या बेलकॉम्ब नावाच्या एका अधिकाऱ्याच्या आऊटहाऊसमध्ये काही महिने मुक्काम ठोकला.या घरातल्या मुलांसोबत तो खेळत असे.
विशेषतः त्यांच्या बेट्सी नावाच्या किशोरवयीन मुलीसोबत त्याची दोस्ती झाली होती.पुढे या बेट्सीने आपल्या चरित्रात या खास पाहुण्यासोबतच्या दिवसांचं वर्णन केलं आहे.
नेपोलियनच्या हेलेना येथील सहा वर्षांच्या मुक्कामात बेटावरील व्यक्तींचे त्याच्याशी कोणत्या ना कोणत्या प्रकारे संबंध आले. त्यातल्या अनेकांनी या भेटींची वर्णनं नोंदवून ठेवली आहेत.ज्युलियाने हे पुस्तक लिहिण्यासाठी या सर्व नोंदी अभ्यासल्या, त्यातील रोचक माहिती आपल्यासमोर मांडली आहे.त्यातून अज्ञातवासातल्या या योद्ध्याचं दर्शन तर होतंच,पण त्याच्याभोवती असणारी असामान्यत्वाची प्रभा बाजूला ठेवून एक माणूस म्हणून नेपोलियनला समजून घेण्याची संधीही आपल्याला मिळते.
अर्थात,दोनशे वर्षांपूर्वीच्या या नोंदींमध्ये कधी विरोधाभास,तर कधी अपुरेपण आहे,हेही आपल्याला सांगायला ज्युलिया विसरत नाही.
बेलकॉम्ब यांच्या घरून लाँगवुड या आपल्या मुक्कामी पोहोचल्यावर मात्र नेपोलियन काहीसा एकटा पडला.
शय्यागाराच्या खिडकीतून बेटावरची शिखरं पाहत बसणं हा त्याचा आवडता उद्योग होता.
सहा वर्षांनंतर पाच मे १८२१ या दिवशी नेपोलियनचं निधन झालं.नेपोलियन जिवंत असताना काय करायचं याच्या स्पष्ट सूचना अधिकाऱ्यांना होत्या;पण तो मेल्यानंतर त्याच्या मृतदेहाचं काय करावं याबद्दल कसल्याही शासकीय सूचना नव्हत्या.त्यामुळे गोंधळाचीच परिस्थिती होती.नेपोलियन मेल्याचं राज्यपालांना कळवून त्याच्या शवविच्छेदनाची परवानगीही विचारण्यात आली.मृत्यूबद्दल कुठल्याही शंका उद्भवू नयेत यासाठी शवविच्छेदनाचा अहवाल जाहीर करण्याचं ठरलं.या प्रक्रियेची माहिती अद्भुत म्हणावी अशीच आहे.
एका शासकीय चित्रकाराने नेपोलियनचं अधिकृत असं अखेरचं पोर्ट्रेट चितारायला सुरुवात केली.त्याच्या मृतदेहाला अंघोळ घालण्यात आली.त्याची दाढी केली गेली. शवविच्छेदनाच्या वेळी आठ डॉक्टर उपस्थित होते.प्रत्यक्ष शवविच्छेदन डॉक्टर अँटोमार्ची यांनी केलं.त्यांना रटलेजनी मदत केली.व्हिन्याली या फ्रेंच डॉक्टरने फ्रेंच शासनासाठी,तर डॉ.हेन्री यांनी ब्रिटिश प्रशासनासाठी टिपणं घेतली.
नेपोलियन जिवंत असताना तो अँटोमार्चीना अनेक प्रश्न विचारत असे.आतड्यात काय घडतं,नखं आणि केसांची योजना कशासाठी आहे अशा अनेक गोष्टींबद्दल त्याला उत्सुकता होती. अँटोमाचींनी नेपोलियनच्या डोक्याची मोजमापं घेतली.त्या काळात 'कॅनिऑलॉजी' म्हणजे कवटीवरून मनुष्यस्वभाव सांगणारं शास्त्र जोरात होतं.आक्रमकता,महत्त्वाकांक्षा, चतुराई,दयाळूपणा हे कवटीच्या मोजमापांवरून सांगणं शक्य आहे,असा तेव्हा समज होता.त्यासाठी अँटोमाचींना नेपोलियनचा मेंदूही तपासून बघायचा होता;पण त्याला प्रतिबंध करण्यात आला.मात्र,इंग्रज डॉक्टरांचं लक्ष नाही हे पाहून त्यांनी नेपोलियनच्या बरगड्यांचे दोन तुकडे काढले.एक व्हिन्यालींना तर दुसरा नेपोलियनच्या कुर्सो नावाच्या बटलरला दिला.नेपोलियनच्या जठराच्या अस्तरासकट एक अल्सरग्रस्त तुकडा त्यांनी डॉ. ओ-मीअरा या इंग्रज शल्यशास्त्रज्ञाला दिला.तो 'रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स'च्या संग्रही होता. दुसऱ्या महायुद्धात जर्मन बॉम्बफेकीत तो नष्ट झाला.
नेपोलियनचं शव शिवल्यावर त्याला परत गणवेश चढवण्यात आला.त्याची सर्व पदकं त्या गणवेशाच्या कोटावर लावली गेली आणि तो मृतदेह आता दर्शनासाठी खुला केला गेला.एकात एक व्यवस्थित बसणाऱ्या चार शवपेट्यांच्या आत ठेवून नेपोलियनचं बेटावरच दफन झालं दर्शनायाच्या आत ठेवून नेपोलियनचं बेटावरच दफन झालं.पुढे १८४० मध्ये त्याचा मृतदेह इथून फ्रान्समध्ये नेण्यात आला आणि पॅरिसमध्ये त्याचं पुन्हा सन्मानपूर्वक दफन करण्यात आलं.नेपोलियनच्या मृत्यूनंतर बेटावर प्रचंड धावपळ झाली.बेटाची संपूर्ण अर्थव्यवस्थाच ढवळून निघाली.
नेपोलियनच्या घरावरचे पहारेकरी काढून घेतले गेले;
बेटाच्या आणि नेपोलियनच्या रक्षणासाठी ठेवलेली फौज इंग्लंडला परत जायची तयारी करू लागली;
बेटाची लोकसंख्या आता काही हजारांनी कमी होणार हे स्पष्ट होताच वस्तूंचे भाव कोलमडले;अशा अनेक नोंदी ज्युलियाने या पुस्तकात केल्या आहेत.एवढंच नव्हे,तर नेपोलियनच्या सुरक्षेसाठी तैनात ब्रिटिश अधिकाऱ्यांनी या बेटावरील पर्यावरणाच्या नोंदीही केल्या,त्याबद्दलही ज्युलियाने लिहिलं आहे.अशा प्रकारची किती तरी रोचक माहिती या पुस्तकातून समोर येते.
इतरांसोबत होणाऱ्या संवादामधून नेपोलियनला या बेटाच्या इतिहासाबद्दल आणि फर्नांडो लोपेझबद्दलही नक्कीच कळलं असेल.दोन शतकांपूर्वी लोपेझ या निर्जन बेटावर अक्षरशः एकटा राहिला होता.या बेटावर अडकलेला नेपोलियनही माणसांनी वेढलेला असूनही एकटाच होता.अशा या एकान्तवासी बेटाचा सोळाव्या शतकापासूनचा इतिहास आपल्यासमोर उलगडणाऱ्या ज्युलियाचं आणि तिच्या पुस्तकाचं कौतुक करावं तितकं कमी, असं वाटत राहतं.
२०.११.२३ या लेखातील पुढील व शेवटचा भाग..