* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२१/९/२४

रेग्रियर दे ग्राफ / regrier de graph

पण लेव्हेनहूक तर स्वतः वैज्ञानिक तर नव्हताच,पण त्याला लॅटिन भाषाही माहीत नव्हती.शिवाय,

सूक्ष्मदर्शकाखाली त्यानं सूक्ष्मजीवांचं जे विश्व पाहिलं ते नेमके काय आहे हेही त्याला कळत नव्हतं,पण या सगळ्या सूक्ष्मजीवांचा अभ्यास करायला तो प्रचंड उत्सुक होता.१६७३ साली रेग्रियर दे ग्राफ (१६४१ ते १६७३) यानं लेव्हेनहुकला लंडनच्या रॉयल सोसायटीलाच हे सगळं लिहून पाठवण्याचा सल्ला दिला.रेग्रियर दे ग्राफ यानं त्या आधी मायक्रोस्कोपखाली टेस्टिकल्स आणि ओव्हम तपासाले होते. त्यातून त्यानं स्त्रियांमधल्या ग्राफायन फॉलिकलचा शोध लावला होता.


त्यावेळाचे सगळे मोठे वैज्ञानिक याच संस्थेचे सदस्य होते.१६७३ मध्ये त्यानं या संस्थेला आपलं पहिलं पत्र लिहिलं,त्यात त्यानं आपण सूक्ष्मदर्शकाखाली पाहिलेल्या लहान जिवांचं वर्णन केलं आणि त्यात सूक्ष्मजीवांची सुबक चित्रंही काढली होती.हे पत्र वाचून,रॉयल सोसायटीच्या अधिकाऱ्यांना खूपच आश्चर्य वाटलं आणि ते हसायलाच लागले.उत्तरादाखल त्यांनी लेव्हेनहुकला अजून तपशिलांसहित पत्र लिहायला सांगितलं.आणि तो खरोखर आयुष्यभर आपले नवनवे शोध पत्राद्वारे लंडनच्या रॉयल सोसायटीला कळवत राहिला.


त्यामुळेच लेव्हेनहूक काहीतरी महत्त्वाचं आणि वेगळं करतोय हे रॉयल सोसायटीला पटलं आणि तो ब्रिटिश नसूनही जानेवारी १६८० मध्ये रॉयल सोसायटीनं त्याला सभासदत्व बहाल केलं। लेव्हेनहूकनं पुढच्या पन्नास वर्षांत त्याच्या रांगड्या भाषेत गंमतशीर पद्धतीनं ३७२ पत्रं रॉयल सोसायटीला लिहिली.१६७३ मध्ये लिहिलेल्या पहिल्या पत्रानंतर तीनच वर्षांत त्यानं कीटक,कुत्रा आणि माणूस यांच्या वीर्यातल्या शुक्रजंतूंचा शोध लावला होता.

सूक्ष्मदर्शीखाली त्यानं जे पाहिलं त्याचं वर्णन तो डच भाषेतल्या शेलक्या शब्दांमध्ये करायचा.दाताच्या मागच्या बाजूच्या घराचं वर्णन करताना १७ सप्टेंबर १६८३ साली रॉयल सोसायटीला लिहिलेल्या पत्रात तो म्हणतो,सगळ्या पृथ्वीवर जितकी माणसं असतील त्यापेक्षा जास्तच प्राणी दाताच्या मागच्या बाजूच्या घरामध्ये असतात !


एकदा लेव्हेनहूकला एक विचित्र माणूस भेटला. त्यानं म्हणे आयुष्यात कधीच दात घासले नव्हते। याच्या तोंडात तर आपल्याला फक्त भिंगामधून दिसणाऱ्या सूक्ष्मजीवांचं एक संग्रहालयच असलं पाहिजे अशी लेव्हेन‌हूकची खात्री झाली! त्यानं मग आपलं भिंग त्या माणसाच्या तोंडासमोर धरून त्याचं नीट निरीक्षण केलं.अर्थातच त्याला तिथं कित्येक सूक्ष्मजीव आढळले.नंतर लेव्हेनहुकनं आपलं भिंग बेडकं आणि घोडे यांची पोर्ट आणि जेव्हा त्याला स्वतःला बद्धकोष्ठाचा त्रास व्हायचा तेव्हा तर आपल्या विष्ठेकडे वळवलं,सगळीकडेच त्याला हे सूक्ष्मजीव दिसले. एकदा त्यानं चुकून गरम कॉफीचा कप तोंडाला लावला आणि त्यात तोंड भाजल्यावर त्यानं पुन्हा आपलं भिंग आपल्या तोंडाजवळ नेलं.त्या वेळी त्याला त्याच्या तोंडातले सगळे सूक्ष्मजीव मरून गेलेले आढळले.२६ ऑगस्ट १७२३ रोजी वयाच्या ९१ व्या वर्षी मरण पावेपर्यंत त्याचा हा पत्रव्यवहार चालूच होता.या पत्रात तो त्याच्या सूक्ष्मदर्शकांबरोबरच डेल्फ्टमधल्या जीवनाविषयी,

त्याच्या वैयक्तिक सवयींविषयी, त्याच्या कुत्र्यांविषयी,

त्याच्या उद्योगधंद्यातल्या चढउताराविषयीही उगीचच मजेशीर वर्णनं करून पाल्हाळ लावे।


त्याच्या सुरुवातीच्या काही पत्रांनंतरच रॉयल सोसायटीला त्याच्या शोधांबद्दल हसू न येता त्याच्याबद्दल आदर आणि उत्सुकता वाटायला लागली.तेव्हा त्यांनी त्याला त्याच्या भिंगांचं आणि सूक्ष्मदर्शकाचं रहस्य विचारलं,म्हणजे ते स्वतःच तसे सूक्ष्मदर्शक तयार करून आपल्या डोळ्यांनी सूक्ष्मजीव बघू शकतील असा त्यांचा हेतू होता.पण लेव्हेनहुकनं "मी माझे मायक्रोस्कोप माझ्या घरच्यांनाही दाखवत नाही असं उत्तर देऊन आपलं रहस्य सांगायला नकार दिला.त्यामुळे लेव्हेनहूकनं पत्रात जे लिहिलं त्यावरच त्यांना विश्वास ठेवावा लागत होता


लेव्हेनहूक यानं ब्लडसेल्स,वीर्यामधले स्पर्माटोझोआ पाहिले,गढूळ पाण्यात प्रोटोझुआ (ग्रीक :फर्स्ट ॲनिमल्स) पाहिले.१६८३ साली त्यानं प्रोटोझुआपेक्षाही लहान बॅक्टेरिया पाहिले.लेव्हेनहूक एका पत्रात म्हणतो,अनेक वर्षांपासून मी जे काम करतोय त्यामागे मला प्रसिद्धीची अपेक्षा नाही.मी हे केवळ जिज्ञासेपोटी करतोय. इतर माणसांपेक्षा मला निसर्गाबद्दल जास्त जिज्ञासा आहे याची मला जाणीव आहे आणि त्या जिज्ञासेतून मला जर काही वेगळं आणि महत्त्वाचं सापडलं तर त्याची भावी पिढीसाठी नोंद करून ठेवणं हे मी माझं कर्तव्य समजतो.


हे पत्र त्यानं १२ जून १७१६ या दिवशी लिहिलं होतं.

तो इ.स.१७२३ सालापर्यंत म्हणजे त्याच्या मृत्यूपर्यंत सक्रिय राहिला.त्याचं शेवटचं पत्र त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलीनं रॉयल सोसायटीला पाठवलं आणि त्याचबरोबर त्याच्या अत्यंत आवडीचे आणि उत्कृष्ट २६ सूक्ष्मदर्शकही तिनं एका पेटाऱ्यात घालून रॉयल सोसायटीला पाठवून दिले.राहिलेल्या सूक्ष्मदर्शकांचा तिनं नंतर लिलाव केला.त्यापैकी काही आज ॲमस्टरडॅम म्युझियममध्ये ठेवलेले आहेत


लेव्हेनहूकनं पाठवलेल्या या पत्रांमुळेच आज आपल्याला त्यानं काय काय शोध लावले हे कळतात.लेव्हेन‌कहूला मानसन्मान खूपच मिळाले.रॉयल सोसायटीचा तो सदस्यही बनला. त्याच्याकडे भेट देण्यासाठी लोकांची सतत रीघ लागलेली असे.एके दिवशी तर तो एका पाठोपाठ एक असं २६ लोकांना भेटला । म्हणजे आजच्या सीईओच्याही वरताण । एका एके दिवशी रशियाचा पीटर दी ग्रेटही त्याला भेटायला आला होता.लेव्हेनह्‌कनं सूक्ष्मदर्शीचा शोध लावला नव्हता, त्यानं जीवनाचं मूलभूत एकक असणाऱ्या पेशीचाही शोध लावला नव्हता,तरीही त्यानं सूक्ष्मदर्शीमध्ये प्रचंड सुधारणा केल्या आणि सगळ्या जगाला सूक्ष्मजंतूंचं विश्व खुलं केलं. 


त्यामुळेच अँटोनी वॉन लेव्हेनहूक याला आधुनिक बॅक्टेरिओलॉजी आणि मायक्रोबायॉलॉजी या दोन विज्ञान शाखांचा प्रणेता मानलं जातं.यातूनच पुढे सेल बायॉलॉजी आणि मोलेक्युलर बायॉलॉजी याही शाखांचा उगम झाला.या काळानंतर सूक्ष्मदर्शकं रसायनशास्त्रात,

भूगर्भशास्त्रात आणि विज्ञानाच्या इतरही अनेक शाखांमध्ये वापरली जायला लागली.१७४७ साली अँड्रेस मार्गग्राफ यानं बिटाच्या साखरेच्या स्फटिकांमध्ये आणि उसामधल्या साखरेच्या स्फटिकांमध्ये बरंच साम्यं असतं हे सूक्ष्मदर्शकाच्या आधारेच दाखवलं.


ओट् टो फ्रेडरीच म्यूलर


अठराव्या शतकात सूक्ष्मदर्शक यंत्रात बऱ्याचशा सुधारणा झाल्या,पण तरीही दोन भिंगं असलेल्या कंपाऊंड सूक्ष्मदर्शकांमध्ये काही बारीक त्रुटी होत्याच.यामधून बघताना चित्राच्या भोवती वेगवेगळ्या रंगांच्या अनावश्यक रेषा दिसायच्या. लेव्हेनहूकलाही या समस्येचा सामना करावा लागला होता.त्यामुळे त्यानं एकच भिंग असलेलं सूक्ष्मदर्शक तपार केलं होतं.मायक्रोस्कोपमध्ये आणि टेलिस्कोपमध्ये बसवलेली सुरुवातीची भिंगं ही काही प्रमाणात प्रकाशाचं पृथक्करणही करायची.एकाच वेळी ती लोलक आणि भिंग या दोन्हींसारखी काम करायची! त्यामुळे त्यातून पाहायच्या गोष्टीभोवती लाल आणि निळ्या रंगांची कडी दिसायची.याला 'क्रोमॅटिक

ॲबरेशन'असं म्हणतात.


सुरुवातीच्या या उपकरणांमधून जाताना प्रकाशकिरण वाकत होते.आणि मग पांढऱ्या प्रकाशातले घटक रंग वेगवेगळ्या रंगांमध्ये विभागले जाऊन मायक्रोस्कोपमधून पाहिले की जीवाणू- विषाणू दिसण्यापेक्षा याच आगंतुक रंगांच्या कड्या दिसायच्या.हे क्रोमॅटिक ॲबरेशन'

जोसेफ जॅक्सन लिस्टर यानं १८३० साली पहिला क्रोमॅटिक मायक्रोस्कोप तयार करून दूर केलं.त्यामुळे सूक्ष्मदर्शकातून दिसणारी प्रतिमा अधिक स्पष्ट दिसायला लागली. त्यानंतरच सूक्ष्मजीवशास्त्राची प्रगती वेगात सुरू झाली.या मायक्रोस्कोपमध्ये मग अक्रोमॅटिक भिंग वापरायला लागले.यामध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारच्या काचांची भिंगं वापरली जायला लागली.दोन्ही भिंगांची रिफ्रँक्शन इंडेक्स वेगळी असायची.त्यामुळे एका भिंगानं प्रकाश संकुचित केला तरी दुसरं भिंग तो पसरवत होता.

त्यामुळे मिळणारी प्रतिमा स्वच्छ दिसायला लागली.पण तरी अजूनही कोणत्याही गोष्टीचं सुक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण करून अभ्यास करण्याआधी सूक्ष्मदर्शकं,

त्यातली भिंगं,त्यांची आपापसातली अंतरं,अशाच इतर अनेक गोष्टींच्या ॲडजस्टमेंट्स नीट कराव्या लागत होत्या.त्या करून झाल्यावर कुठे सूक्ष्मदर्शकाखाली ती वस्तू नीट दिसायला लागायची आणि त्यानंतर मग तिचा अभ्यास सुरू व्हायचा आणि त्यातून जर काही नवीन हाती लागलं तर त्याची गणना नव्या शोधात किंवा संशोधनात व्हायची! म्हणजे आपल्या भाषेत नमनालाच घडामर तेल लागल्यासारखं होतं हे! पण अर्न्स्ट ॲबे या गणिती आणि ऑप्टिक्सचा अभ्यास करणाऱ्या वैज्ञानिकानं या सूक्ष्मदर्शकामध्ये भिंगाची वक्रता, त्याची जाडी आणि त्याचं माप या प्रत्येक गोष्टीमध्ये प्रमाणबद्धता आणली.कोणत्याही भिंगानं आपल्याला नेमके किती रिझोल्युशन वापरल्यावर सुस्पष्ट प्रतिमा मिळेल याची त्यानं गणिती सूत्रंच तयार केली.

त्यांचा वापर करून नंतर तयार झालेली सूक्ष्मदर्शक यंत्रं आणि टेलिस्कोपही अधिक चांगली आणि सुस्पष्ट प्रतिमा द्यायला लागले.हे सगळं संशोधन त्यानं कार्ल झेईस च्या कंपनीत काम करताना केलेलं होतं.नंतर त्या दोघांनी मिळून ऑप्टिक्स या शाखेत खूपच भर घातली आणि आधुनिक प्रकारचे सूक्ष्मदर्शक यंत्र आणि टेलिस्कोप्स तयार केले.त्यानंतर सूक्ष्मदर्शक यंत्र तयार करताना आणि वापरताना ट्रायल आणि एररची वेळखाऊ आणि बेभरवशाची पद्धत जाऊन त्या जागी गणिती प्रमाणबद्धता आणि शिस्त आली. त्याच्या या संशोधनाला सलाम म्हणून जर्मन सरकारनं १९६८मध्ये या गणिती सूत्रावर आधारित पोस्टाचं तिकीटही काढलं होतं!


ग्रॅम स्टेनिंग : हॅन्स ख्रिश्चन जोहाचिम ग्रॅम (१८५३ ते १९३८) - इतकी सगळी प्रगती झाली तरीही काही सूक्ष्मजीव मायक्रोस्कोपखाली दिसतच नव्हते,कारण त्यांना कोणताच रंग नव्हता.त्यामुळे इतक्या लहान सूक्ष्मजीवांना बघायला त्यांना कोणत्यातरी रंगात रंगवणं गरजेचं होतं.पण जे सूक्ष्मजीव दिसतच नाहीत ते रंगवणार कसे? हा तिढा हॅन्स ख्रिश्चन जोहाचिम ग्रॅम या वैज्ञानिकानं सोडवला.डेन्माकचा ग्रॅम हा खरं तर वनस्पतिशास्त्राचा आणि वैद्यकशास्त्राचा पदवीधर होता.त्यानं जीवाणू पेशींना निळा किंवा लाल रंग देऊन मग त्या सूक्ष्मदर्शकाखाली बघायची पद्धत विकसित केली.त्यामुळे अनेक जीवाणूंची ओळख व्हायला आणि त्यांचं वर्गीकरण करायला मदत झाली.या सूक्ष्मदर्शकांनी डॉक्टर्स आणि वैज्ञानिकांना खूपच मदत केली.१८३१ साली ब्राऊन यानं प्रथमच पेशीचा गाभा हा सूक्ष्मदर्शकाखाली बघितला.१८८० ते १८९० च्या दशकात लुई पाश्चर आणि रॉबर्ट कॉक यांनी या यंत्राचा वापर करून विज्ञानात अक्षरशः धुमाकूळच घातला.


३.४ मायक्रोस्कोप - १ व ३.५ मायक्रोस्कोप - २ 

हे दोन्ही लेख या ठिकाणी संपले…! धन्यवाद



१९/९/२४

३.४ मायक्रोस्कोप - 3.4 Microscope

१७.०९.२४ या लेखातील पुढील भाग….


यानंतर नेहेमियाह ग्र्यू या इंग्रजी डॉक्टरनं आपल्या ७१ वर्षांच्या आयुष्यात (१६४१ ते १७१२) अनेक वनस्पतींचं आणि फुलांचं आणि त्यातल्या परागांचं सूक्ष्मदर्शकातून निरीक्षण करून वनस्पतींच्या पुनरुत्पादनाविषयी खूप महत्त्वाची माहिती लिहून ठेवली. 


याच काळात स्वामेरडॅम (१६३७ ते १६८०) या डच माणसानं कीटकांकडे आपला सूक्ष्मदर्शक वळवला. ३००० हून अधिक किड्यांचं त्यानं निरीक्षण केलं. स्वामेरडॅम १६३७ साली डॉक्टर झाला खरा,पण त्यानं प्रॅक्टिस केलीच नाही! त्यानंच लाल रक्तपेशींचाही शोध लावला.रक्त हे एकसंघ द्रव नाही हे त्यानंच सांगितलं.तो जगातला पहिलाच कीटकतज्ज्ञ म्हटला पाहिजे. 


ॲनॅटॉमीचा तर तो विशेषज्ञच होता.त्यांचं विच्छेदन करण्याच्या अनेक पद्धती त्यानं शोधून काढल्या आणि त्यासाठी अनेक उपकरणंही तयार केली.मधमाश्यांमध्ये राणी माशी असते हे त्यानंच शोधून काढलं.तोपर्यंत सगळ्यांना राजा माशी असते असंच वाटत होतं!त्यानं राणी माशीच्या पोटातली अंडी सूक्ष्मदर्शकाखाली पाहिली होती आणि नर माश्यांची वृषणं आणि लिंगंही त्यानंच पहिल्यांदा पाहिली होती.१६७३ साली तो एका विक्षिप्त धार्मिक गटात सामील झाला आणि तेव्हापासून त्याचं वैज्ञानिक काम बरंचसं संपलंच.सतत काम करणं,

आजारपण आणि या विचित्र धार्मिक गटातला त्याचा भावनिक गुंता या सगळ्यामुळे फक्त ४३ वय असताना १६८० साली तो मरण पावला! त्याच्या जन्मानंतर शंभरएक वर्षांनी त्याचं लिखाण 'बायबल ऑफ नेचर' या नावानं प्रसिद्ध झालं तेव्हा जगाला त्याच्या कीटकां

विषयीच्या ज्ञानानं खूपच चकित करून सोडलं होतं !


रॉबर्ट हुक


इंग्लंडमध्ये १६३५ साली जन्मलेला रॉबर्ट हूक हासुद्धा एक प्रसिद्धच मायक्रोस्कोपिस्ट होता. यानंही इतर अनेक उद्योग करता करता सूक्ष्मदर्शकही तयार करून त्यात अनेक चांगल्या सुधारणा केल्या.त्यामुळे आता गोष्टी तीसपट मोठ्या दिसायला लागल्या होत्या.हुक खरं तर एक आर्किटेक्ट होता. १६६६ साली लंडनमध्ये लागलेल्या मोठ्या आगीनंतर पुन्हा लंडनची रचना करण्यात आली त्यात हुकचा खूप मोठा वाटा होता.त्यानं वाफेच्या इंजिनाची कल्पना सर्वप्रथम मांडली.बिनतारी संदेश यंत्रणेची रचनाही प्रथम त्यानंच केली.न्यूटनबरोबर त्याचे सतत वाद चालत असत.रॉयल सोसायटीमध्ये तो भूमितीही शिकवत असे.त्यानं भौतिकशास्त्रात खूप मोठं काम केलं.स्प्रिंगवर त्यानं संशोधन केलं त्याविषयीचा 'हूक्स लॉ' प्रसिद्धच आहे.त्यानं प्रकाश या विषयावर बरंच संशोधन केलं होतं. प्रकाशाची 'वेव्ह थिअरी ऑफ लाईट'ही त्यानंच सांगितली.त्यानं अनेक लहानमोठी यंत्र तयार केली.सूक्ष्मदर्शक यंत्र हे जीवसृष्टीचं निरीक्षण करायला जरी वापरलं गेलं असलं तरी ते निर्माण करायला मात्र भौतिकशास्त्राचं ज्ञान आवश्यक होतं.खरं तर हुकवर त्या काळचा मोठा वैज्ञानिक ख्रिश्चन हायगेन (१६२९ ते १६९३) याचा प्रभाव होता.टेलिस्कोप आणि मायक्रोस्कोप या दोन्हींमध्ये जरी दोन भिंगं असली तरी दोन्हींच्या कार्यात फरक होता.तेव्हा सूक्ष्मदर्शकाखाली जी वस्तू बघायची आहे त्याजवळ असलेल्या भिंगाच्या आकारावरच त्या सूक्ष्मदर्शकाची क्षमता बरीचशी अवलंबून असते हे हायगेननं सांगितलं होतं.यावरूनच हुकनं पुढे आपली सूक्ष्मदर्शक यंत्र तयार केली होती.

सूक्ष्मदर्शकाखाली जे बघायचंय ती वस्तू नीट दिसण्या

साठी त्यावर प्रकाश पडावा म्हणून त्यानं स्लाइडखाली आरसा बसवला.त्यामुळे प्रकाशाच्या स्रोतापासून प्रकाश आरशावर घेऊन तो वस्तूवर पाडता यायला लागला,

त्यामुळे सूक्ष्मदर्शकातून दिसणारं चित्र स्पष्ट दिसायला लागलं.हुकनं जिवंत प्राणी आणि वनस्पतींबरोबरच पुरातन काळातल्या खडकांमध्ये गाडले गेलेले प्राणी आणि वनस्पती यांचे अवशेषसुद्धा सूक्ष्मदर्शकाखाली तपासले आणि त्यांच्यात काही साधर्म्य किंवा फरक आहे का ते तपासले.त्यावरून त्यानं हे अवशेष म्हणजे निसर्गात आपोआप तयार झालेली चित्रं नसून ती पूर्वी जिवंत असलेल्या प्राण्यांची मृत शरीरं आहेत आणि याचा आपल्याला आपलाच इतिहास आणि जीवशास्त्र यांचा अभ्यास करण्यासाठी उपयोग होणार आहे,हे विचार मांडले.या विचारांतून त्यानं खरं तर जीवाश्मशास्त्राचाच पाया घातला होता. इ. स. १६६५ साली त्याचं 'मायक्रोग्राफिया' नावाचं पुस्तक प्रकाशित झालं.त्या वेळचं ते सर्वात जास्त विकलं गेलेलं आणि प्रसिद्धी मिळालेलं पुस्तक होतं.मायक्रोग्राफिया म्हणजे अतिसूक्ष्म चित्रं.या पुस्तकात स्वतः हुकनं काढलेली सुंदर, अचूक आणि सूक्ष्म अशी ५७ चित्रं होती. वनस्पती किंवा प्राण्याचा एखादा भाग सूक्ष्मदर्शकाखाली बघायचा आणि लगेच त्याचं चित्र रेखाटायचं हाच त्याचा उद्योग चाले. माशीचा डोळा,मधमाशीची नांगी,माणसाचा केस, मुंग्यांची अंडी,रक्ताचा थेंब,शेवाळं,फुलांचे पराग वगैरे बऱ्याच गोष्टींची झकास चित्रं आपल्याला यात बघायला मिळतात.

त्यानंच बुचाच्या झाडाच्या खोडाचं निरीक्षण केलं आणि त्यातल्या बारीक बारीक कप्प्यांना त्यानं 'सेल' असं नाव दिलं.कुठल्याही धार्मिक मठात धर्मगुरूंना राहायला वेगवेगळ्या खोल्या असत,तसंच त्याला ते वाटलं होतं.त्या खोल्यांना त्या काळी 'सेल' असं म्हणत असल्यामुळेच हुकनं पेशीला हे नाव ठेवलं होतं.गंमत म्हणजे त्यानं निरीक्षण केलेलं हे बुचाच्या झाडाच्या खोडाचा भाग मृतपेशींचा असल्यामुळे आणि तो वनस्पतींचा असल्यामुळे त्याला वनस्पती पेशींच्या सेल वॉल्स म्हणजेच पेशी भित्तिका दिसल्या असाव्यात आणि त्या पेशी जर जिवंत असत्या तर त्याला कदाचित त्या पेशींमधले अवयव म्हणजेच सेल ऑर्गानेल्सही दिसू शकले असते असंही नंतरच्या काही वैज्ञानिकांना वाटतं.वनस्पतींच्या निरीक्षणावरूनही हुकला असे अनेक सेल्स सापडले होते.या पुस्तकाचं अनेक लोकांकडून प्रचंड कौतुक झालं तसंच काहींनी चीजमधले किडे आणि घरमाश्यांचे पंख बघायला प्रचंड पैसा खर्च करणारा 'वेडा माणूस' अशी त्याची चेष्टाही केली होती. १७०३ साली रॉबर्ट हूक वारला.आतापर्यंतच्या लोकांनी खरं तर इतर अनेक उद्योग करता करता सूक्ष्मदर्शकंही निर्माण केली होती.आपलं संपूर्ण आयुष्य पणाला लावून सूक्ष्म

दर्शकातून दिसणाऱ्या निरनिराळ्या सूक्ष्मजीवांचा कोणीही अभ्यास केला नव्हता. पण हूकच्या 'मायक्रोग्राफिया' या पुस्तकामुळेच पुढे हे घडणार होतं !


३.५ मायक्रोस्कोप - २


अँटोनी फॉन लेव्हेनहूक (१६३२-१७२३) हा 'मायक्रोस्कोपिस्ट्स' परंपरेतला शेवटचाच. पण हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा आणि प्रभावी ठरला.त्याच्या वडिलांचा परड्या आणि कुंड्या तयार करण्याचा उद्योग होता.अँटनीचं शालेय शिक्षण बेताचंच होतं.कापड उद्योग, मद्यार्क तपासनीस,मद्यार्क परीक्षक,शासकीय नोकरी असे त्यानं बरेच उद्योग केले.शेवटी १६ व्या वर्षी त्यानं ॲमस्टरडॅम इथे एका दुकानात खजिनदार म्हणून काम सुरू केलं.कालांतरानं त्यानं डेल्फ्ट या सुंदर गावी परतून स्वतःचा छोटासा उद्योग सुरू केला.त्यानं वयाच्या २२ व्या वर्षी लग्न केलं.त्याचा उद्योगही वाढला.१६३२ साली जन्म झालेला लेव्हेनहूक हा कापडाच्या दुकानात भिंगांनी कापडाच्या गुणवत्तेचं निरीक्षण करत असे.कामाच्या वेळा संपल्या,की त्याला भिंग आणि सूक्ष्मदर्शक तयार करायचा छंद होता.तो भिंगांना फारच काळजीपूर्वक घासत असे.या कामासाठी तो जी भिंगं वापरायचा ती अगदी लहान असायची.इतकी की त्यातल्या काहींची जाडी दीड मिलिमीटर आणि वक्रता एका मिलिमीटरपेक्षाही कमी असे.त्यामुळे त्यांचा आकारही लहान गोटीसारखा व्हायचा.त्यातल्या सगळ्यात लहान भिंगाची जाडी १.२ मिलिमीटर तर वक्रता ०.७ मिलिमीटर होती!या भिंगाचा आकार साधारणपणे आपल्या वाटाण्यासारखा असणार.

पण गंमत म्हणजे त्यामुळेच त्या भिंगाची मॅग्निफिकेशन पॉवर २७० पट इतकी जास्त होती! त्यावेळी उपलब्ध असलेल्या भिंगांपैकी हे सर्वात शक्तिशाली भिंग तर होतंच, पण एकोणिसाव्या शतकापर्यंत इतकं शक्तिशाली भिंग तयार करता आलं नव्हतं,हे विशेष! पण या एकच भिंग असलेल्या सूक्ष्मदर्शकांमध्ये काही अडचणीही होत्या.त्यातून बघायची वस्तूही तितकीच लहान आणि विशिष्ट अंतरावरच ठेवावी लागे.शिवाय,भिंगाचा कडेचा भाग झाकावा लागे नाहीतर त्यातून बघायची वस्तू तितकीशी स्पष्ट दिसत नसे.


मायक्रोग्राफिया हे पुस्तक १६६८ साली अँटोनी फॉन लेव्हेनहूक याच्या हातात पडलं आणि त्यानं नंतर सूक्ष्मदर्शक आणि सूक्ष्मजीवशास्त्रात किमयाच केली.त्यानं अक्षरशः शेकडो अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट असे सूक्ष्मदर्शक तयार केले. त्यात त्यानं प्रत्येकी एकच भिंग वापरलं होतं. दोन भिंगांच्या सूक्ष्मदर्शकातून बघितलं तर त्या वस्तूभोवती काही विचित्र रंगीत रेषा दिसत. त्यामुळे त्या काळी दोन भिंगांचे कंपाऊंड मायक्रोस्कोप फारसं कुणी वापरत नसे.मग एकाच भिंगातून कंपाऊंड सूक्ष्मदर्शकाची शक्ती कशी आणायची? यावर मग लेव्हेन‌कनं लक्ष केंद्रित केलं.शेवटी मूळ गोष्टीच्या २७५ पट मोठी प्रतिमा दिसू शकेल असा सूक्ष्मदर्शक त्यानं बनवला. त्या वेळी कोणतीही वस्तु इतकी मोठी करून दाखवणं कोणत्याच सूक्ष्मदर्शीला जमलं नव्हतं.त्यानं आपल्या आयुष्यात एकूण ५०० सूक्ष्मदर्शक बनवले.आता त्यातले फक्त दहाच शिल्लक आहेत.असंच एकदा त्यानं पावसाच्या पाण्यातल्या एका थेंबाकडे आपल्या भिंगातून निरखून पाहिलं आणि त्याचा स्वतःवर विश्वासच बसेना! खरं म्हणजे पाण्याच्या थेंबात काय असणार असं त्यालाही इतरांसारखंच वाटायचं. पण त्याला पाण्याच्या त्या थेंबात अनेक सूक्ष्मजीव वळवळताना दिसले होते!आपल्या नेहमीच्या नजरेला दिसू न शकणारे आणि त्यापेक्षा हजार पटींनी लहान असलेले हे जीव पाहून तो साहजिकच अतिशय भारावून गेला! आता हे जीव नक्की कुठून आले असावेत या प्रश्नाकडे ती वळला.ते पावसाच्या पाण्याच्या या थेंबात आधीपासूनच होते की काय? का तो थेंब जमिनीवर पडल्यावर ते दुसरीकडून त्यात आले असावेत? मग त्यानं अनेक ठिकाणच्या पाण्याचं निरीक्षण करून सगळीकडेच असे जीव असतात याची खात्री करून घेतली.त्यानं पाण्याच्या थेंबात वेगवेगळ्या आकारांचे शेकडो लहान लहान जीव तरंगताना पाहिले.


लेव्हेनहूकनं टॅडपोलच्या शेपटीतल्या कॅपिलरीजमधून लाल रक्तपेशी वाहताना पाहिल्या होत्या!हार्वेची थिअरी यानं प्रत्यक्षात काम करताना पाहिली होती.

थोडक्यात,हार्वेची रक्ताभिसरणाची पटकथा लेव्हेनकनं व्हिडिओ स्वरूपात पाहिली! त्यानं माल्पिघीच्या (सजीव,

अच्युत गोडबोले,अमृता देशपांडे,मधुश्री पब्लिकेशन) कॅपिलरीज पडताळून पाहिल्या.त्यानं पुरुषाचं वीर्य,दातामागची जागा,या सगळ्या गोष्टी मायक्रोस्कोप

खाली तपासल्या तेव्हा त्याला तिथं अतिशय लहान लहान प्राण्यांसारखे जीव आढळले.त्यांनाच तो'ॲनिमलक्युल्स' म्हणे. माणसानं चक्क प्रथमच सूक्ष्मजंतू पाहिले होते !

पण त्या काळी वैज्ञानिक व्हायचं म्हणजे आपले शोध लॅटिन भाषेत लिहून काढावे लागत होते.इतर देशांच्या स्थानिक भाषांमधून लिहिलेल्या गोष्टी सगळ्यांनाच समजत नव्हत्या.


राहिलेला शेवटचा भाग पुढील भागात….


१७/९/२४

३.४ मायक्रोस्कोप /3.4 Microscope

हार्वेनं रक्ताभिसरणाचं कोडं सोडवायचा प्रयत्न केला असला तरी धमन्या आणि शिरा एकमेकींना कुठेतरी जोडलेल्या असाव्यात का, या प्रश्नाची उकल काही तो करू शकला नव्हता. त्यांच्यामध्ये काहीतरी जोडणी किंवा मध्यस्थी असावी असं त्याला वाटत होतं,पण ती नेमकी काय आहे हे त्याच्या लक्षात आलं नव्हतं.हार्वेचा मृत्यू झाला तरी हे कोडं मात्र अजून सुटलेलं नव्हतं.याच वेळी मायक्रोस्कोपचा शोध लागला आणि माणसाला आपल्या दृष्टीच्या क्षमतेच्या कित्येक पटींनी लहान असलेल्या गोष्टी पाहता यायला लागल्या.


पहिली सूक्ष्मदर्शक यंत्रं नेमकी केव्हा तयार झाली हे आज निश्चित माहीत नाही,पण सूक्ष्मदर्शकाच्या या शोधानं माणसाला सगळ्या पृथ्वीवरच्याच अनेक सूक्ष्मजीव,

सूक्ष्मकण, वेगवेगळ्या रेणूंची रचना यांच्या अस्तित्वाचा आणि त्यांच्या महतीचा शोध लागणार होता.या आधीच्या हजारो वर्षांपासून माणसांना आणि जनावरांना प्रचंड विध्वंसक ठरणाऱ्या अनेक रोगांवर यामुळेच उपचार किंवा प्रतिबंधाचे उपाय सापडणार होते.यातूनच पुढे सजीवांच्या शरीरात असलेल्या सूक्ष्म गोष्टींचा पत्ता लागणार होता. पण यासाठी अक्षरशःअनेक वैज्ञानिकांचं योगदान मोलाचं ठरणार होतं.


चार हजार वर्षांपूर्वी चीनमध्ये चाऊ फू राजाच्या काळात एका नळीमध्ये पाणी भरून त्यातून पलीकडचं पाहिलं की वस्तू मोठ्या दिसत होत्या असा उल्लेख आहे. आता त्याला 'पाण्याचे मायक्रोस्कोप' म्हणतात.ख्रिस्तपूर्व आठव्या शतकातही कोणीतरी असली भिंगं वापरल्याचे पुरावे ॲसिरियामधल्या उत्खननात मिळाले होते! 


यानंतर मग बऱ्याच लोकांनी सूक्ष्मदर्शकाच्या प्रगतीत हातभार लावला. इ.स. ६५ मध्ये 'ल्युशियस ॲनेएस सेनेका' यानं पाण्याच्या स्तंभाखाली धरल्यास कुठलीही गोष्ट मोठी दिसते हे ताडलं होतं.टॉलेमीनंही (इ.स. १२७ ते १५१) त्याच्याविषयी लिहून ठेवलंय.त्यानंही काचेचा वापर केला होता.ॲलहॅझेन या अरबी लेखकानंही त्यांच्याविषयी चर्चा केली होती. कुठल्याही गोष्टीची प्रतिमा मोठी करण्यासाठी भिंगं उपयोगी पडतात हे पूर्वी ग्रीकांना आणि अरबांनाही माहीत होतं.युक्लिडनं परिवर्तन करणाऱ्या सपाट आणि वक्र पृष्ठभागांविषयी आपल्या 'ऑप्टिक्स' या ग्रंथातही लिहून ठेवलं होतं.सर्का या तत्त्वज्ञानं सर्वप्रथम भिंगं म्हणजेच लेन्स हा शब्द वापरला असावा असं म्हटलं जातं. गंमत म्हणजे भिंग डाळीसारखं दिसतं म्हणून लेन्स हा शब्द लेंटिल म्हणजे डाळ या शब्दावरून आला आहे!यानंतर बरीच शतकं या संदर्भात काहीच घडलं नाही.१३ व्या शतकात अल्केमिस्ट आणि लेखक रॉजर बेकन यानं भिंगांच्या गुणधर्मांविषयी लिहून ठेवलं होतं. त्यानंच पहिल्यांदा चश्मे तयार केले.पूर्वी चश्मा करताना पातळ पत्र्याच्या चौकटीत भिंगं बसवून त्यांना दोरीनं बांधून ती दोरी कानामागे बांधायची पद्धत होती.त्यात हळूहळू सुधारणा होत होत आता चश्मे हलके आणि प्लॅस्टिकच्या फ्रेमचे तयार होतात.याच्या पुढची पायरी म्हणजे डायरेक्ट लेन्सच डोळ्यांत बसवायचे.म्हणजे पातळ रबराचं किंवा सिलिकॉनचं भिंग कॉन्टॅक्ट लेन्स म्हणून डोळ्यांत बसवलं जातं.त्यामुळे या माणसाच्या डोळ्याला नंबर आहे याची कल्पनाही कुणाला येत नाही.पण काही शतकांपूर्वी हे शक्यच नव्हतं.यातूनच पुढे ऑप्टिक्स ही अप्लाइड सायन्सची शाखा निर्माण झाली.भिंग तयार करायच्या या सगळ्या कामात डच मंडळी खूपच आघाडीवर होती.यानंतर दुर्बिणीचा शोध लागला.दुर्बिणीनं लांबचं दृश्य आणि तारे आपण स्पष्टपणे पाहू शकतो हे गॅलिलिओच्या निरीक्षणांनी सगळ्या जगाला समजलं होतं.त्याचप्रमाणे मग जवळच्या वस्तू अजून मोठ्या आणि स्पष्ट दिसण्यासाठी टेलिस्कोपच्याच धर्तीवर मायक्रोस्कोप म्हणजेच सूक्ष्मदर्शक हे उपकरण तयार करण्याची कल्पना निर्माण झाली असावी असं मानलं जातं.काही वेळा तर टेलिस्कोप आणि तो उलटा करून तयार झालेलं उपकरण म्हणजेच 'मायक्रोस्कोप', या दोन्हींच्या शोधाचं श्रेय गॅलिलिओला दिलं जातं. पण ही दोन्ही उपकरणं साधारणपणे एकाच काळात पण वेगवेगळ्या ठिकाणी तयार झाली असल्यामुळे नक्की कोणी कोणतं उपकरण आधी तयार केलं हे तंतोतंत बरोबर सांगता येत नाही.या सगळ्यातून सूक्ष्मदर्शकाच्या शोधाकडे वेगानं आगेकूच सुरू झाली.विशेष म्हणजे या मोहिमेत १५ व्या आणि १६ व्या शतकात लिओनादों दा विंची आणि कोपर्निकस यांचाही समावेश होता.सूक्ष्मदर्शकाचा शोध हा गेल्या चारशे वर्षांतला सर्वात मोठा आणि महत्त्वाचा शोध होता. त्याशिवाय बायॉलॉजी, सूक्ष्मजीवशास्त्र,पॅथॉलॉजी,

ऑप्टिक्स आणि आणखीही अनेक विज्ञानाच्या शाखांची पुढे प्रगतीच झाली नसती.मायक्रोस्कोपच्या अभ्यासाशिवाय आपण या विज्ञान शाखांचा अभ्यासच करू शकत नाही.१७ व्या शतकात युरोपात सिलिका कुटून काचा तयार करणं हा अनेक लोकांचा व्यवसाय होता. त्या काळी या व्यवसायात खूपच स्पर्धा होती. त्यातच नेदरलँडमध्ये जकॅरिअस जॅन्सन नावाचा चश्मे तयार करणारा एक माणूस राहत होता.या व्यवसायात येण्याआधी तो रस्त्यावरच लहानसहान वस्तू विकून आपली गुजराण करायचा.त्यानं कॅथरिना नावाच्या मुलीशी लग्न केलं.नंतर त्यांना एक मुलगाही झाला.त्याचं नाव त्यांनी जोहानेज झकॅरिअनेस असं ठेवलं. १६१५ साली त्याला लॉइज लॉयसीन नावाच्या एका काचा तयार करणाऱ्या माणसाची दोन मुलं सांभाळण्याचं काम मिळालं.तिथंच झकॅरिअसनं चश्मे तयार करायचं तंत्र शिकून घेतलं आणि लॉयसीनचीच उपकरणं वापरून तो बेकायदेशीरपणे लोकांना चश्मे तयार करून द्यायला लागला.त्यामुळे तिथून त्याची हकालपट्टी झाली आणि तो अर्नेम्युदेन नावाच्या गावाला गेला.तिथेही त्यानं असेच बेकायदा चश्मे तयार करून विकल्यामुळे त्याला शिक्षा झाली आणि तो परत मिडेलबर्गला आला.


त्यातच १६२४ साली त्याची बायको वारली. त्यानंतर त्यानं नात्यातल्याच ॲना नावाच्या विधवा बाईशी लग्न केलं आणि त्याच वर्षी तो ॲमस्टरडॅमला राहायला गेला.तिथेही त्यानं पुन्हा चश्मे तयार करायला सुरुवात केली,पण त्याचा हाही धंदा बुडाला.चश्मे तयार करता करता त्यानं सूक्ष्मदर्शकही तयार केला होता.त्याचदरम्यान मिडेलबर्गमध्ये राहत असताना तो टांकसाळीच्या जवळच राहत होता.त्याचा मेहुणा तिथे काम करत होता.तेव्हा त्याच्यासोबत त्या टांकसाळीत जाऊन त्यानं नाणी कशी पाडतात ते पाहिलं आणि आपल्या घरीच अशी खोटी नाणी पाडायचा उद्योग सुरू केला.या गुन्ह्याला खरं तर त्या काळी मृत्युदंडाची शिक्षा होती,पण याही वेळी तो पळून जाण्यात यशस्वी झाला.१६३२ साली झकॅरिअसचा मृत्यू झाला.या सगळ्या उद्योगांमध्ये १५९० ते १६१८ च्या दरम्यान कधीतरी त्यानं सूक्ष्मदर्शक तयार केल्याचे उल्लेख आहेत.आणि खुद्द त्याच्याच मुलानं म्हणजे जोहानेज झकॅरिअनेस यानं १५९० साली सूक्ष्मदर्शी तयार केल्याचा दावा केला होता.पण हे जर खरं असेल तर त्याच्या जन्माच्या तारखेपासूनच काहीतरी घोळ असल्याचं लक्षात येतं आणि गंमत म्हणजे मिडेलबर्गमध्ये झकॅरिअनेस जिथे राहत होता तिथे त्याच्याच शेजारी मायक्रोस्कोप आणि टेलिस्कोप तयार करणारा हान्स लिपरशे हासुद्धा राहत होता!


निरीक्षणात्मक विज्ञानाचा पाया घालणाऱ्या गॅलिलिओ गॅलिली याचा जन्म १५६४ साली झाला होता.त्यानं टेलिस्कोपबरोबरच मायक्रोस्कोपही तयार केल्याचे उल्लेख आहेत. मायक्रोस्कोप तयार करण्यात त्यानं जवळपास पंधरा वर्ष घातली होती.याच कल्पनेत सुधारणा करून गॅलिलिओनं दुर्बीण बनवली होती.डच लोक इटलीला आपली दुर्बीण दाखवायला घेऊन येताहेत हे समजल्यावर गॅलिलिओनं वरिष्ठ अधिकाऱ्यांवर छाप पाडण्यासाठी डचांपेक्षा तिप्पट शक्तिशाली दोन भिंगांची दुर्बीणही अक्षरशःरातोरात बनवली तेव्हा डचमंडळी थक्कच झाली होती! 


वैज्ञानिक निरीक्षणासाठी पहिला कंपाऊंड मायक्रोस्कोपही गॅलिलिओनंच बनवला आणि इ.स. १६१०च्या सुमारास त्यातून अनेक कीटकांच्या अवयवांचं निरीक्षणही केलं.त्यातून पाहिल्यावर उडणाऱ्या माश्या त्याला मोठ्या जनावरांसारख्या दिसल्या होत्या! पण सूक्ष्मदर्शकाची खरी प्रगती झाली ती १७ व्या शतकात पाच महत्त्वाच्या वैज्ञानिकांमुळे. म्हणूनच त्यांना मायक्रोस्कोपिस्ट्स असंच म्हणतात.

माल्पिघी,ग्र्यू,स्वामेरडॅम,रॉबर्ट हुक आणि लेव्हेनक ही ती पाच मंडळी होती.या मंडळींशिवाय आपल्या आयुष्याचा बराचसा भाग हॉलंडमध्ये घालवणारा मूळचा फ्रेंच तत्त्वज्ञ, गणितज्ञ आणि वैज्ञानिक रेने देकार्त (१५९६-१६५०) यालासुद्धा सूक्ष्मदर्शीमध्ये विशेष रस होता.त्यानंही जीवशास्त्रामध्ये बरंच संशोधन केलं आहे.यातला मार्सेलो माल्पिघी (१६२८ ते १६९४) हा इटलीतल्या बोलोना विद्यापीठातून वैद्यकशास्त्र शिकला होता.बोलोनामधलं वातावरण त्या काळी खूपच धार्मिक आणि कोंदट होतं.इतकं की जो मनुष्य कट्टर कॅथॉलिक नसेल अशा माणसाला साधा औषधोपचार जरी केला तर त्या डॉक्टरची चक्क पदवी रद्द करण्यात येई ! माल्पिघीला हे सगळं आवडत नसे.त्यानं बोलोना सोडलं आणि पिसा विद्यापीठात तो प्राध्यापक म्हणून रुजू झाला.तिथेच १६५६ मध्ये त्याची गिओव्हानी बोरेली याच्याबरोबर दोस्ती झाली. बोरेली हा एक प्रगतिशील विचारांचा गणितज्ञ आणि शरीरशास्त्रज्ञ होता.ते दोघं मग अनेक प्राण्यांची विच्छेदनं करत बसत आणि त्यावर तासन्तास चर्चा करत बसत.गॅलिलिओ आणि देकार्त यांच्यामुळे दोघंही भारावलेले होते.


यादोघांनी मिळून 'डेलसिमेंटो' नावाची विज्ञानाला वाहिलेली ॲकॅडमी ही काढली होती.पण ती फार काळ चालली नाही.बोरेलीनं प्राण्यांच्या हालचाली कशा होतात यावर खूपच अभ्यास केला होता.त्यावर त्यानं 'दि मोटू अनिमेलियम' (द मुव्हमेंट्स ऑफ ॲनिमल्स) या नावाचं पुस्तकही लिहिलं होतं.पण त्याच्या हयातीत हे पुस्तक प्रकाशित होऊ शकलं नाही.त्यानं वनस्पतींच्या हालचालींचाही बराचसा अभ्यास केला होता,त्यातूनच त्यानं 'बायोमेकॅनिक्स' या बायॉलॉजीच्या शाखेचा पाया रचला.त्यामुळे त्याला आयोमेकॅनिक्सचा प्रणेता' म्हटलं जातं. बायोमेकॅनिक्समध्ये केलेल्या कामगिरीबद्दल सर्वोच्च पुरस्कारही बोरेलीच्याच नावाचा आहे.


या काळात माल्पिघीनं प्राणिशास्त्र आणि वनस्पतिशास्त्र या दोन्हींमध्ये खूप मोलाचं संशोधन केलं.त्याचे बरेचशे शोध हे सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्यानं केलेल्या अभ्यासातून लावले होते.त्या वेळच्या वैद्यकीय समस्यांवर तोडगा काढण्यासाठी तो कायम प्रयत्नशील होता.कौटुंबिक जबाबदारी आणि आपली ढासळती तब्येत यांच्यामुळे माल्पिघीला बोलोनाला परतावं लागलं असलं तरी त्यानं सूक्ष्मदर्शकाच्या मदतीनं आपलं संशोधनाचं काम मात्र चालूच ठेवलं.संशोधनाच्या व्यतिरिक्त त्याला शिकवण्यात प्रचंड रस होता आणि त्यात त्याचा हातखंडाही होता.


विल्यम हार्वेनं रक्ताभिसरणाविषयी सिद्धान्त आधीच मांडून ठेवले होते.माल्पिघी त्यामुळे भारावून गेला होता.

पण हार्वेच्या थिअरीमध्ये एक मोठी उणीव अजून राहिली होती. धमन्यातून (आर्टरी) शुद्ध रक्त वाहतं,नंतर ते रक्त अशुद्ध होतं आणि मग ते शिरांतून (व्हेन) वाहायला लागतं,हे त्यानं सांगितलं होतं.पण हे रक्त धमन्यांतून शिरांमध्ये कसं जातं ? थोडक्यात,धमन्या आणि शिरा यांना कोण जोडतं? हा प्रश्न अजून सुटायचाच होता. इ. स. १६६० ते १६६१ च्या दरम्यान माल्पिघीनं सूक्ष्मदर्शकांखाली निरीक्षणं करून हे कोडं सोडवलं.

यासाठी त्यानं अक्षरशः शेकडो,हजारो बेडकं आणि वटवाघुळं यांची विच्छेदनं केली. फुफ्फुसांच्या वरून जाणाऱ्या गुंतागुंतीच्या रक्तवाहिन्या,आपली श्वसनप्रक्रिया आणि रक्ताच्या शुद्ध/अशुद्ध होण्याच्या प्रक्रिया यामध्ये काहीतरी संबंध आहे हे त्याला सूक्ष्मदर्शीनं केलेल्या निरीक्षणांवरून कळून आलं.यानंतर त्यानं सूक्ष्मदर्शकाच्या मदतीनं एका जिवंत बेडकाच्या फुफ्फुसाचं निरीक्षण करत असताना अगदी लहान धमन्यांना आणि अगदी लहान शिरांना जोडणाऱ्या त्याहीपेक्षा लहान रक्तनलिकांमधून (कॅपिलरीज) रक्त वाहताना बघितलं आणि हार्वेचं कोडं सोडवलं ! यातूनच रक्ताभिसरण कसं होतं याचं कोडं सुटलं होतं. माल्पिधीनं कॅपिलरीजचा शोध १६६० साली हार्वेच्या मृत्यूनंतर ३ वर्षांनी लावला आणि रक्ताभिसरण पूर्ण झालं..!!


पुढे माल्पिघीनं अनेक वनस्पतींची सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षणं केली.त्याचं एक मात्र चुकलं.त्याला पुनरुत्पादनाची प्रक्रिया नीटशी कळलीच नाही.कोंबडीच्या अगदी सुरुवातीच्या एका पेशीच्या अंड्यातही चक्क कोंबडीचं पूर्ण तयार झालेलं पण लहान असं पिल्लू असतं.ते तिथेच वाढतं आणि शेवटी अंड फोडून बाहेर येत अशी त्याची कल्पना होती.पुरुषाच्याही विर्यात अशीच अतिसूक्ष्म पण संपूर्ण तयार माणसं तरंगत असतात असे त्याला वाट!पण हेही त्याकाळी खूपच प्रगतशील म्हणावे लागेल त्यामुळेच मल्पिघीला गर्भशास्त्राचा प्रणेता मानले गेलं आहे.(उर्वरित भाग १९.०९.२४ या दिवशीच्या पुढील भागात..)

१५/९/२४

पाठलाग रानडुकराचा Chasing the wild boar

आपला तो जुना म्हातारा मित्र-ओझीवाला फिरस्ता त्या पूर्वीच्याच काटेरी कुंपण असलेल्या शेतात आदल्या रात्रीच मुक्कामाला आला होता. यावेळी त्याने हरिद्वारवरून मीठ व गुळाची पोती आणली होती.एखाददुसरा दिवस इथे मुक्काम करून तो बद्रीनाथ पलीकडच्या गावांमध्ये जाणार होता.त्याच्या शेळ्यामेढ्यांच्या पाठीवर जरा जास्तच वजन असल्याने आणि शेवटची मजल जरा मोठी मारल्याने त्याला काल इथे पोचायला जरा उशीरच झाला होता.साहजिकच काल त्याला त्या कुंपणातल्या कच्च्या जागांची दुरुस्ती करायला वेळ मिळाला नव्हता.त्याचा परिणाम असा झाला त्याचे काही बोकड कुंपणाच्या बाहेर भरकटले होते व त्यातला एक पहाटे पहाटेच रस्त्याच्या कडेला बिबळ्याने मारला होता.कुत्र्यांच्या भुंकण्याने त्याला जाग आली आणि जरा उजेड पडल्यावर त्याला दिसलं की त्याचा सर्वात चांगला,एखाद्या शेटलँड पोनीच्या आकाराचा, पोलादी रंगाचा बोकड काहीही कारण नसताना बिबळ्याने मारला होता.हा बोकड रस्त्याच्या कडेलाच मरून पडला होता.


काही वर्ष नरभक्षक राहिल्यानंतर एखाद्या बिबळ्याच्या सवयी किती बदलू शकतात हे या बिबळ्याच्या आदल्या रात्रीच्या वागणुकीवरून समजत होतं.


अचानक जिनट्रॅपमध्ये अडकल्यामुळे,तो ट्रॅप पायाला लटकत काही अंतर ओढून नेल्यामुळे त्याला किती मोठा धक्का बसला असेल याची कल्पना करा;ज्या पद्धतीने रागारागाने त्याने डरकाळ्या मारल्या होत्या त्यावरूनच ते सिद्ध होत होतं.साहजिकच एखाद्याला वाटेल की ट्रॅपमधून सुटल्यावर तो मनुष्यवस्तीपासून शक्य तेवढा दूर जाईल आणि परत खूप भूक लागेपर्यंत लांब कुठेतरी विश्रांती घेईल.पण असं काही करण्याऐवजी तो भक्ष्याच्या जवळपास राहिला आणि आम्हाला मचाणावर चढताना पाहिल्यावर शोध घेण्यासाठी झाडापर्यंतही आला.सुदैवाने झाडाभोवती काटेरी तारा गुंडाळण्याचं भान इबॉटसनला होतं.आपली शिकार करायला आलेल्या शिकाऱ्यांचाच नरभक्षकाने बळी घेतल्याची उदाहरणं काही कमी नाहीत.सध्याही मध्यप्रांतात एक असा नरभक्षक वावरतोय की ज्याने त्याला मारायला आलेल्या चार भारतीय शिकाऱ्यांचा बळी घेतलाय.माझ्या माहिती

प्रमाणे त्याने आजपर्यंत चाळीस माणसं मारली आहेत.स्वतःच्याच मारेकऱ्यांना खाण्याच्या सवयीमुळे तो कधी माणसं,कधी पाळीव जनावरं तर कधी जंगली जनावरं असं 'व्हरायटी डाएट' करत अगदी मजेत दिवस घालवतोय.


असो... आंब्याच्या झाडाला भेट दिल्यानंतर तो गावाकडून येणाऱ्या वाटेवरून मुख्य पायवाटेवर आला व तिथून उजवीकडे वळून एक मैलानंतर यात्रामार्गावर आला.

त्यानंतर भर बाजारातून चालत अर्ध्या मैलावरच्या बंगल्याच्या फाटकाजवळ येऊन तिथल्या पिलर्सखालची जमीन खरवडली.आदल्या रात्रीच्या पावसामुळे जमीन ओली व मऊ झाली होती... त्यावरच्या पगमार्कवरून स्पष्ट दिसत होतं की ट्रॅपमध्ये अडकल्यामुळे त्याला कोणतीही मोठी जखम झाली नव्हती.ब्रेकफास्टनंतर मी त्याचे माग फाटकाजवळच उचलले आणि त्याच्या

बरोबरच सरळ त्या म्हाताऱ्या ओझीवाल्याच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोचले.या ठिकाणी रस्त्याला वळण होतं.या वळणावरूनच कुंपणापासून १०-१५ यार्डावरून त्याला भरकटलेल्या शेळ्यामेंढ्या दिसल्या होत्या. रस्त्याच्या बाहेरच्या कडेकडून आतल्या कडेला ओलांडून येऊन आणि डोंगराच्या आड आडोशाने दबकत येऊन त्यातला एक बोकड त्याने मारला होता पण त्याचं साधं रक्तही पिण्याची तसदी न घेता तो परत रस्त्याकडे परतला होता.


मालाची रचून ठेवलेली पोती व मेलेला बोकड यावर त्या ओझीवाल्याचे दोन धनगरी कुत्रे पहारा देत होते.त्यांना छोट्या साखळ्यांनी लाकडी मेखांना पक्कं बांधलं होतं.हे काळे,मोठे व ताकदवान कुत्रे जे काम या ओझीवाल्यांसाठी करतात तशा कामांसाठी युरोपातल्या धनगरी कुत्र्यांना वापरलं जात नाही. मजल मारताना हे कुत्रे कळपाबरोबर चालत राहतात आणि त्यांचं खरं काम हे मुक्काम ठोकल्यानंतर सुरू होतं. रात्री ते जंगली जनावरांपासून कळपाचं रक्षण करतात तर दिवसा मालक शेळ्यामेंढ्या चारायला बाहेर गेला की ते चोरांपासून मालाचं रक्षण करतात.

रात्रीच्या राखणीच्या वेळी एका बिबळ्याला अशा कुत्र्यांनी मारल्याचं मला माहीत आहे व मुक्कामावर चोरी करायचा प्रयत्न करणाऱ्या एका माणसालाही त्यांनी ठार मारल्याची नोंद आहे.


बोकडाला मारून तो बिबळ्या परत रस्त्यावर ज्या ठिकाणी आला तिथून मी त्या बिबळ्याचे माग उचलले व त्याच्या मागोमाग गुलाबराईतून जाऊन पुढे एका घळीपर्यंत गेलो.या घळीतून मात्र तो निघून गेला होता.आंब्याच्या झाडापासून घळीपर्यंत जवळजवळ आठ मैलांचं अंतर त्याने तोडलं होतं.दुसरा कोणताही सर्वसाधारण बिबळ्या वरकरणी काही कारण नसताना इतकं लांब अंतर चालत गेला नसता.

त्याचप्रमाणे भूक लागलेली नसताना सर्वसाधारण बिबळ्याने उगीचच त्या बोकडाला मारलं नसतं.

घळीपलीकडे पाव मैल अंतरावर रस्त्याच्या कडेच्या एका मोठ्या दगडावर तो म्हातारा आसपास चरणाऱ्या शेळ्यामेंढ्यांवर नजर ठेवत बसला होता.लोकर विणण्याची टकळी व लोकरीचा गुंडा आपल्या भल्या मोठ्या खिशात टाकून मी दिलेली सिगरेट घेताना त्याने मला विचारलं की मी त्याच्या कॅम्पवरूनच इथे आलोय का? मी त्याच्या कॅम्पवरूनच आलोय व त्या सैतानाने काय करून ठेवलंय हेही बघितलंय असं मी त्याला सांगितलं आणि पुढे म्हणालो की त्याचे कुत्रे आता पहिल्यासारखे शूर राहिले नसल्याने पुढच्या हरिद्वारच्या भेटीत त्या कुत्र्यांना उंटवाल्यांना विकायला हरकत नाही.माझं म्हणणं पटलं असल्यासारखी त्याने मान हलवली व म्हणाला,'साहेब,आमच्यासारखी पिकल्या केसाची माणसंही कधीकधी चुका करून बसतात व त्यांना परिणामही भोगावे लागतात. मलाही आज तसे भोगावे लागतायत, मी माझा सर्वात चांगला बोकड गमावलाय.पण माझे कुत्रे वाघासारखे शूर आहेत आणि आख्ख्या गढवालमधल्या कुत्र्यांना ते भारी आहेत


ते उंटवाल्यांना विकण्याच्या लायकीचे आहेत असं म्हणणं म्हणजे त्यांचा अपमान आहे.तुम्ही पाह्यलंच असेल की माझं मुक्कामाचं ठिकाण रस्त्याच्या अगदी जवळ आहे.

जर चुकून कोणी रात्री जवळून गेला तर कुत्र्यांकडून त्याला धोका होईल अशी भीती वाटल्यामुळे मी त्यांना साखळीने बांधलं होतं व हीच माझी चूक झाली. त्याचा परिणाम तुम्ही पाह्यलाच आहे पण साहेब माझ्या कुत्र्यांना दोष देऊ नका कारण बोकडांना वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांच्या मानेत साखळी रूतून जखमा झाल्यात त्या भरायलाही काही दिवस लागणार आहेत.'


आम्ही बोलत असतानाच गंगेच्या पलीकडच्या डोंगराच्या माथ्यावर एक जनावर अवतीर्ण झालं. त्याच्या रंगावरून व आकारावरून मला प्रथम ते हिमालयातलं काळ अस्वल वाटलं पण जेव्हा ते डोंगर उतरून नदीकडे यायला लागलं तेव्हा मला दिसलं की ते एक मोठ्ठ रानडुक्कर होतं.त्याच्या पाठलागावर काही गावठी कुत्रे होते आणि त्यांच्या मागे हातात काठ्या घेतलेली पोरं व माणसं पळत होती.सर्वात शेवटच्या माणसाकडे बंदूक होती.जेव्हा हा बंदूकवाला डोंगराच्या माथ्यावर पोचला तेव्हा त्याने बंदूक उंचावली आणि आम्हाला लगेचच धूर दिसला व पाठोपाठ ठासणीच्या बंदूकीचा बार ऐकू आला.त्या बंदूकीच्या रेंजमध्ये फक्त ती पोरं आणि माणसंच येत होती आणि त्यांच्यातला कोणीच धारातीर्थी पडला नसल्याने बघणाऱ्याला असं 'वाटत होतं की त्या माणसाचा नेम जणू काही चुकला आहे.डुकराच्या समोर एक उभा गवताळ उतार होता आणि त्याच्यावर इथेतिथे छोटी झुडुपं विखुरली होती. ह्या उताराखाली थोडी ओबडधोबड जमीन होती आणि त्याखाली खुरट्या झुडुपांचा एक पट्टा होता.हा पट्टा थेट नदीला भिडला होता.


त्या ओबडधोबड भागात डुकराचा वेग जरा कमी पडला.

त्यामुळे डुक्कर व कुत्रे एकत्रच खुरट्या झुडुपांच्या पट्ट्यात घुसले.दुसऱ्याच क्षणाला सर्वात पुढे असलेल्या फिक्कट रंगाच्या कुत्र्याचा अपवाद सोडला तर इतर सर्व कुत्रे झुडुपांच्या बाहेर मागे पळत आले.मागून येणारी माणसं त्या कुत्र्यांनी,डुकरामागे परत जावं म्हणून प्रयत्न करायला लागली.पण रानडुक्कर त्याच्या सुळ्यांनी काय प्रताप करू शकतं हे पाहिल्यामुळे कुत्रे काही पुढे जाईनात.तो बंदूकधारी पण आता त्यांच्यात आला व त्याला लगेच सर्वांनी गराडा घातला.ते दृश्य व आम्ही यांच्यामधून नदी वाहत होती पण नदीच्या वेगवान प्रवाहाच्या आवाजामुळे इतर कुठलेही आवाज ऐकू येत नव्हते.त्यामुळे त्या 'ग्रँडस्टँड'वर बसून हे दृश्य बघताना आपण एखादा मूकपट बघतोय असं वाटत होतं. एक बंदुकीचा बार सोडला तर आम्हाला कोणताच आवाज आला नव्हता.कुत्र्यांप्रमाणेच त्या बंदूक्याची सुद्धा झुडुपात शिरायची इच्छा दिसत नव्हती कारण आता तो त्यांच्या घोळक्यातून दूर झाला आणि बाजूलाच एका खडकावर बसला. "मी माझं काम केलंय, आता तुम्ही तुमचं काम करा." असं काहीसं तो म्हणत असावा.अगदी काठ्यांनी मारूनसुद्धा रानडुकराला सामोरं जाण्याची कुत्र्यांची हिंमत होत नव्हती.आता अशा दोलायमान अवस्थेत प्रथम पोरं व नंतर बाप्यांनी झुडुपांमध्ये दगड फेकून मारायला सुरुवात केली.हे सर्व होत असताना आम्हाला ते डुक्कर झुडुपांच्या पट्ट्यातून बाहेर पडून नदीकाठच्या वाळूवर येताना दिसलं.दोनचार पावलं भराभर टाकून ते उघड्यावर आलं,काही क्षण स्तब्ध उभं राहिलं,परत काही पावलं टाकून उभं राहिलं व शेवटी एका धावेत पळत येऊन त्याने धाडकन नदीत उडी मारली.या ठिकाणी प्रवाहाला चांगलीच ओढ होती.पण रानडुक्करं तशी निधड्या छातीची असतात आणि आम्ही शेवटचं पाहिलं तेव्हा ते डुक्कर प्रवाहाबरोबर पाव मैल पुढे वाहत गेलं होतं पण तरीही दम काढून पोहतच होतं.माझी खात्री आहे की त्याने किनारा गाठलाच असणार.ओझीवाल्याने मला विचारलं, "ते रानडुक्कर तुमच्या रायफलच्या रेंजमध्ये होतं का साहेब?" मी उत्तर दिलं "हो... पण जीव वाचवण्या

साठी पळत असलेल्या रानडुकरांना मारायला मी गढवालमध्ये ही रायफल आणलेली नाही,तर तुम्ही ज्याला 'सैतानी शक्ती' म्हणता, पण जो बिबळ्या आहे हे मला माहीत आहे त्याला मारायला आणली आहे.


"ठीक आहे साहेब... तुम्ही तुमच्या मार्गाने जावा. आता तुम्ही निघाल्यावर कदाचित आपली भेट कधीच होणार नाही.तेव्हा काळच दाखवेल की तुमचं म्हणणं खरं ठरतं की माझं !"


या त्याच्या उत्तरानंतर आमची भेट दुर्दैवाने पुन्हा कधी झाली नाही हे खरं.पण तो एक मस्त,रंगेल म्हातारा होता,मानी आणि आनंदी ! कदाचित अशा दिवसाची वाट बघणारा,की जेव्हा बिबळे त्याच्या सर्वोत्कृष्ट बोकडाला मारणार नाहीत आणि त्याच्या कुत्र्यांच्या शूरपणावर कोणीही शंका घेणार नाही !


२७.०८.२४ या लेखमालेतील पुढील लेख..