* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२२/११/२४

पाखरांची विश्रामगृह / Resting house of birds

 रशियन लेखक 'व्लादिमीर अर्सेनीव' यांनी 'देरसू उझाला' या प्रवासवर्णनात  पक्ष्यांची निरिक्षणे आणि नोंदी टिपल्या आहेत.झाडं जशी दाट होतात तशी खोली वाढत जाते.त्यापुढं माणसं खुप खुजी वाटतात. तशा खोलीत पाखरं निर्धास्तपणे झाडावर आसरा घेतात.   " सकाळी पक्षी भरभर खात होते.आता नाही.नाहीतर संध्याकाळी यावेळेला पक्ष्यांची नुसती गडबड उडालेली असते.पण आता जंगलात स्मशान शांतता पसरली होती.जणूकाही कोणाच्यातरी आज्ञेनुसार सर्व पक्षी लपून बसले होते.यामधून लेखकाला धोक्याची चाहूल लागली होती.त्यानंतर प्रचंड बर्फवृष्टी झाली.निसर्गातील संकटे अगोदर पक्ष्यांना कळतात त्यानंतर माणसाला.


माती झाडांना जीवनरस पुरविते म्हणून पानं,फुलं, फळं टवटवीत दिसतात.या झाडांवर पक्ष्यांचं गोकुळ  नांदत असतं.झाडं आणि पाखरं ही निसर्गातील काव्यचित्र.पाखरं बियांचा प्रसार करून जंगल वाढवितात.हीच झाडं पाखरांना भरवतात.झाडं आकाशाकडे झेपावतात अन् पाखरं झाडाकडे.वडा- पिंपळाच्या हिरव्या गर्द झाडीत हारोळ्या लपून बसतात. त्यांना पिकलेली रसाळ फळं खूप आवडतात.पाखरांच्या येण्यानं झाडंही सुखावत असतात.पाखरांना झाडांचा लळा लागला की,ती फार दूर जात नाहीत.झाडं ही पक्ष्यांची निवासस्थानं आहेत.सुगरण पक्ष्यांची घरटी झाडाच्या फांदीवर झुलताना अनेकदा पाहिली.हळदीनं माखलेल्या सुगरण तिथं नांदायला येतात.कवयित्री 'बहिणाबाई चौधरी' त्यांच्या घरट्याला 'बंगला' म्हणतात.बंगल्यातून वावरणारी ही पाखरं कुणाला आवडणार नाहीत!झाडांचं आणि या पाखरांचं एक अतूट नातं असतं. जिव्हाळा ओतपोत भरलेला असतो. पावसाळ्यातील दिवस या पक्ष्यांच्या सहवासाने मंतरलेले असतात. सप्टेंबर महिन्यातील त्यांच्या हालचाली घरट्यासह कागदावर उतरवणं सोपं जातं.काटेरी झाडावर त्यांची घरटी झुलू लागतात.विहिरी,जलाशयाच्या काठावरची झाडं त्यांच्या आवाजानं जागी होतात.त्या झाडावरच्या फांद्या घरट्यासाठी जागा देतात. (पक्षी येती अंगणी या पुस्तकाचे लेखक माणिक पुरी यांच्या निरीक्षणा खालील नोंदी..)

  

 एका झाडावर अनेक घरटी झुलताना दिसतात. 'सुगरणवस्ती' म्हणावी लागेल.पक्षीकुळातील घरट्यांचा एक उत्तम नमुना म्हणून या घरट्याचं बारकाईनं निरीक्षण केलं जातं.काही ठिकाणी या पक्ष्यांची दोन मजली घरटी पाहायला मिळतात.अवघड घरटं सोप्या पद्धतीने विणत जातात.इंद्रायणी माळावरील पळसाच्या झाडावरची घरटी सूर्यकिरणात स्वतःला न्याहाळतात.पावसाचं पाणी पिऊन गवताची पाती तरारून येतात.या गवतामुळे तिच्या पिलांना उब मिळते.झाडावरच्या झुलणाऱ्या पाळण्यात तिची लेकरं लहानाची मोठी होतात.पावसाळा आला की,या झुलणाऱ्या बंगल्याची आठवण येते.


 चोरट्या रानवाटा घाणेरीच्या झाडांनी झाकून जातात.त्यांची उग्र वासाची फूलं  कुणाला आवडत नाहीत.रंगीबेरंगी पाकळ्या डोकावत चित्रकाराला आकर्षित करतात.माळरानावरील या झाडाजवळ 'चंडोल' पक्ष्यांची घरटी दिसून येतात.तरोट्याचं पिक माजतं पण या पक्ष्याच्या पिलांना खेळवतं सुद्धा.निसर्गातील रंगसंगतीमुळे त्यांची वीण लवकर कळत नाही.

पोटाच्या साह्याने खोलगट भाग करून त्याभोवती रंगीत,मातकट खड्यांचा ढीग तयार करतात. उघड्यावरचं घरटं मोडून पडलेल्या संसारासारखं दिसतं.पण ती हिमतीनं संसार करते.त्या घरट्यात मऊ गवत आणते.बाळासाठी अस्तर बनविते.त्यात खड्याच्या रंगाची अंडी उबवते.घरट्याशेजारची झाडं हळूहळू मोठी होतात.त्यांची घरटी झाकोळून जातात. दोघेही अंडी उबवतात.पिलांना भरवतात.


काही चंडोल पक्ष्यांची घरटी उघड्या जागेवरही पाहायला मिळतात.ती गवताच्या आडोशानं वावरतात. रानवाटेवरची त्यांची छबी फारच मनमोहक असते.मी अनेक वेळा या पक्ष्यांना पाहिलय.त्यांच्या घरट्याचं निरिक्षण केलय.हे पक्षी सुगरण पक्ष्यासारखी साहित्याची जमवाजमव करत नसल्याचं दिसतं.


 पक्षीनिरीक्षक 'किरण मोरे' यांनी 'माळरानावरील चंडोल' या पुस्तकात चंडोल पक्ष्यांच्या घरट्याच्या नोंदी अचूकपणे केल्या आहेत.त्या पक्ष्याविषयीचा माहितीपट सुद्धा बनविला आहे.


 खुरटी गवताची रानं,माळरान,पडीक जमिनी या भागात  पक्ष्यांची घरटी आणि वीण पाहायला मिळते.जनावरांच्या पायांनी ही घरटी उध्वस्त होतात.माळरान म्हटलं की जनावरांचं कुरण.पण तिथे या पक्ष्यांचा संसार असतो हे कुणाच्या ध्यानीमनीही नसतं.'चंडोल' पक्ष्यापेक्षाही 'टिटवी' घरटं तयार करण्यासाठी आळशी असते. 'माळटिटवी' तर खड्यांच्या आश्रयाने घरटं बनविते.उन्हाळ्यातील दिवसात तिची पिलं अंड्यातून बाहेर येतात.तिला घरट्यासाठी झाडपाणाची गरजच भासत नाही. 'डॉ. संदीप साखरे' यांनी माळटिटवीच्या घरट्याचं बारकाईनं निरीक्षण करून नोंदी घेतल्या आहेत.मागील पाच वर्षापासून त्यांनी माळटिटवीचा पाठलाग केलाय.नर-मादा संबंध.नर-पिलं संबंध.नर-शेजारील कुटुंब.नर- टिटवी कुटुंब.नर-इतर पक्षी सहसंबंध.नर -प्राणी सहसंबंध.

माळटिटवीच्या पक्षीकुळाचा मोठा आवाका घेऊन त्यांनी काम कलं आहे. माळटिटवी-जंगली प्राणी सहसंबंध.माळटिटवी-

पाळीव प्राणी सहसंबंध. माळटिटवी- माणूस सहसंबंध. माळटिटवी- यंत्र सहसंबंध.


 टिटवी आपल्या घरट्यापासून दूर उभी राहते.तिचं परिसरातल्या घडामोडीवर बारकाईनं लक्ष असतं.कधी लंगडत चालते.कधी आरडा-ओरडा करते.कधी आक्रमक होते.घरट्याचं संरक्षण करते.या पक्ष्यांची घरटी पाहण्यासाठी एका जागेवर जास्त वेळ बसावं लागतं.एकदा घरटी सापडली की,पुढच्या नोंदी करणं सोपं जातं.

  

 घाणेरीची झाडं मोठी झाली की,बुलबुल पक्ष्यांना घरटी करायला जागा देतात.काशिद,करंज,कडूलिंब,डाळिंब, काही झुडपातून बुलबुल पक्ष्यांची घरटी दिसून येतात. वाटीच्या आकाराचं घरटं बनवितात.कापसाच्या झाडावरही त्यांची घरटी पाहता येतात.

कापसावरील हिरव्या आळ्या पिलांना भरवताना पाहिलय.त्यांची घरटी फांदीच्या दुबुळक्यात पक्की बसलेली.वानराच्या पिलानं आईच्या कुशीत चिटकुन बसावं अगदी तशीच ही घरटी दिसत होती.इंद्रायणी माळावर या पक्ष्यांची वीण पाहायला मिळते.


माझे मित्र 'भारत ठोंबरे' आणि 'नितीन बाभळे' यांच्यासोबत लोणावळ्याला जाण्याचा योग आला. पहाटेच्या वेळी डोंगर उतारावरून उतरताना झाडांची विविधता अनुभवत होतो.तेवढ्यात घरट्यातून 'बुलबुल' खाली उतरला.त्याने एका फुलपाखराचा पाठलाग केला. चोचीत पकडून घरट्याकडे झेपावला.मला वाटायचं परभणीतील बुलबुल आणि लोणावळ्यातील बुलबुल मध्ये काही फरक असेल.परंतु तसा फरक काही आढळला नाही.पक्षीतज्ञ 'विद्याधर म्हैसकर' यांनी बुलबुल पक्ष्यावर 'एक बुलबुल म्हणाला' ही कादंबरी लिहिली आहे.एखाद्या पक्ष्यावर स्वतंत्र अशी कादंबरी लिहिणारे लेखक फारच कमी.


   प्रसिद्ध लेखक 'धनगोपाल मुखर्जी' यांनी कबुतर पक्ष्याच्या जीवनाविषयी कादंबरी लिहिली आहे. त्याचा हिंदी अनुवाद 'तालेवर गिरि' यांनी 'चित्र-ग्रीव एक कबूतर की कहानी' या नावानं प्रसिद्ध केला आहे.ही वाचणीय कादंबरी.आपलं आयुष्य सुंदर करण्यासाठी पक्षी सुद्धा महत्त्वाचे आहेत.भौतिक सुविधा मिळवून माणसं श्रीमंत होत नसून पहाटेच्या किरणात पक्ष्यांचा किलबिलाट ऐकला की जीवन सार्थक झाल्याचं समाधान लाभतं.


गावातील वड,पिंपळ अशा झाडावर कावळे वास्तव्यास येतात.

काही गावालगतच्या  झाडावरही त्यांची वस्ती पाहायला मिळते.त्यास 'काकागार' असे म्हणतात. परंतू त्या झाडावर त्यांची काही घरटी दिसतात. विणीच्या काळात वेगवेगळ्या झाडावर घरटी करताना दिसतात.काड्या ओबडधोबड रचून घरटं बनवितात.घरट्याला आकर्षितपणा नसतो.


जसं सुगरण पक्ष्यांच्या घरट्याला 'खोपा' म्हटलं जातं तसं कावळ्याच्या घरट्याला कोटरे म्हणतात.अनुभवी कावळ्यांची कोटरे लवकर होतात.घरटी तयार करताना एक कावळा घराभोवती पहारा देतो.


अनेक वेळा निरीक्षण करूनही 'कोकिळा' कावळ्याच्या घरट्यात अंडी कशी घालते हे पाहता आलं नाही.हुशार कावळ्याला ती फसवते.


आंब्याच्या झाडावरची कावळ्याची घरटी अनेकदा पाहिली.त्यांची भांडणं व्हायची.एकदा घरट्याची जागा निश्चित झाली की त्यांचा संसार सुखानं चालतो.दुरूनही ही घरटी सहज ओळखता येतात.

'चिमणी' आणि 'कावळा' हे पक्षी सर्वपरिचित.या पक्ष्यांभोवती बालपणीच्या रंगीत आठवणी गुंतलेल्या असतात.त्यांची घरटी पाहताना बालपण आठवतं.गावालगत त्यांची घरटी आढळतात तशी जंगलातही. त्यांच्या घरट्याच्या उंचीवरून पावसाचा अंदाज बांधला जातो.म्हणून कावळ्याला 'हवामानशास्त्रज्ञ' असं नाव पडलं असावं.जशी 'काकागार' तशी 'सारंगागार'.बगळ्यांच्या रातनिवार्‍याला सारंगागार म्हटलं जातं.उजळ आंबा परिसरातील झाडं,नांदेड रेल्वे स्थानकाबाहेरील झाडं, परभणी बसस्थानकाशेजारील झाडं बगळ्याच्या आवाजानं आनंदून गेलीली.तिथं त्यांची घरटी पाहायला मिळतात.दिवसभर त्यांच्या आवाजानं तेथील वातावरणात हिरवेपणा जाणवतो.पक्ष्यांची सीट पडल्यामुळे झाडांचे खोड कोलाज केल्यासारखे भासतात.त्या परिसरात या सीटमुळे नाकाला झोंबणारा वास येतो.वर्षानुवर्षे या झाडावर त्यांची वस्ती पाहायला मिळते.जनावरांच्या पाठीमागे तुरुतुरु चालणारे जमिनीवरचे पांढरे ढगच! हिरव्या झाडांवर बगळ्यांची रांग उतरते तेव्हा वर्गातल्या हिरव्या फळ्यावरची पांढरी अक्षरं वाटतात.घरट्यातली  त्यांची पिलं माना वर उचलत तेव्हा मी बोटावर उभा असतो.आकाशातील पांढरी नक्षी पुढं सरकताना मी रस्त्याच्या कडेला एकटाच असतो.

   

लेखक 'आनंद विंगकर' यांच्या 'अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट' या कादंबरीत कावळ्याचे वेगवेगळे संदर्भ आणि टिपणं वाचून भारावून जातं. कादंबरी वाचकाला कवेत घेऊन पुढं सरकते.पक्षीतज्ज्ञ 'मारुती चितमपल्ली' यांच्या 'आनंददायी बगळे' या पुस्तकातून बगळे डोकावतात.


मी एकदा 'शिंजीर' पक्ष्याचं घरटं बघितलं.बाभळीच्या झाडावर लटकलेलं.वाऱ्यासोबत हेलकावे खात. चिमणीपेक्षा लहान असणारा पक्षी. या पक्ष्याने पुन्हा एकदा माझ्या आयुष्यात डोकावून पाहावं असं मला सारखं वाटतं.


 'गिधाड' पक्ष्यांची घरटी उंच झाडावर असतात.परंतू वृक्षतोडीमुळे त्यांची निवासस्थाने नष्ट होत आहेत. परिसरातील काही झाडं या पक्ष्यांसाठी राखीव ठेवणे काळाची गरज झाली आहे.लहानपणी पाहिलेले गिधाड पक्षी आज शोधूनही सापडत नाहीत.


 'शिंपी' पक्ष्याचं घरटं अनेकदा पाहिलय.वडाच्या पानात ती विसावतात.पानाला कापसासारख्या धाग्यापासून शिवतात.

आतील भागात मऊ अस्तर तयार करून त्यात अंडी उबवतात.एकदा वडाची फांदी तोडून शाळेच्या पाठीमागील बाजूस टाकली तेव्हा घरटं आढळलं.त्यात अंडी नव्हती.

नुकतच घरटं तयार केलं होतं.त्यानंतर शिंपीचा आवाज वडाभोवती घुटमळत राहिला.काही दिवसांनी तो आवाज कानावर आला.माझी नजर पानाकडं भिरभिरली.एक पान आतील बाजूस झुकलेलं दिसलं.त्यात शिंपी बसलेला होता.ते पाहून मला खूप आनंद झाला. एक घरटं पाहून आश्चर्य वाटलं. कापसाच्या झाडाचे ३ - ४ पानं एकत्रित शिवून घरटं तयार केलेलं.कापसाच्या आतील बाजूकडून प्रवेशद्वार होतं.पाखराची कारागिरी पाहून थक्क झालो. कापसाच्या पानाला ठराविक अंतरावर छिद्रे पाडून त्यांना धाग्यांनी एकत्रित केलं होतं.तो शिंपी आजही आठवतो.जशी काही पक्ष्यांची घरटी रानावनात पाहायला मिळतात तशी घरातही. घरात वावरणारी चिमणी आठवते.

फोटोच्या पाठीमागे,मातीच्या भिंती,परसातली झाडं चिमण्यांच्या आवाजानं जागी होतात. तिच्या पिलांचा चिवचिवाट घरभर पसरतो.तिचं घरटं करणं सुरू असतं तेव्हा घरभर कचरा पडलेला असतो. दुपारच्या वेळी घरातली चिमणी शाळेत असते तेव्हा या चिमण्यांची सोबत असते.घरातला फेकून दिलेला कचरा तिच्या घरट्याला सावरतो.सगळ्यांचं बालपण चिमणीच्या आवाजानं समृद्ध झालेलं.अशा चिमणीच्या विश्रामगृहाला शासकीय विश्रामग्रहासारखी घरघर लागलीय.मूठभर तांदळाच्या अनुदानावर तिचं जगणं सुसह्य होतं.सिमेंटच्या घरातही तिला राहायला आवडतं. डाळिंबाचं झाड घराच्या अंगणाची शोभा वाढवित होतं. त्या झाडावर सूर्यपक्ष्याचं घरटं झुलत होतं.नाव 'सूर्यपक्षी' पण घरट्यावर सूर्यकिरणं पडत नसत.


पिंपळ कुळातील काही झाडावर 'काळा शराटी' या पक्ष्याचं घरटं उठून दिसतं.मी वडाच्या झाडावर या पक्ष्यांची घरटी पाहिली आहेत.घरटी शेंड्यावर दिसायची.काड्यावर काड्या ओबडधोबड रचलेल्या. दरवर्षी त्याची डागडुजी करून तेच घरटं वापरत असत. बाभळीच्या झाडावरही एक घरटं आढळलं होतं.झाडं आणि पाखरं आयुष्यभराची सोबती असतात. आभाळातली नक्षी अलगदपणे झाडावर उतरते अन् झाडं प्रफुल्लित होतात.

सुतार,पोपट,पिंगळा,धनेश या पक्ष्यांच्या ढोली आकर्षित करतात.

तांबट वाळलेल्या फांदीला घरटं कोरतो.'रंगीत रायमुनिया' खुरट्या झाडाझुडपात घरटं विणते.'भिंगरी' चिखलाच्या गोळ्यापासून कपारीला घरटं बनविते.त्या चिखलात लाळ मिसळून मजबूत करते.'रोहित' पक्ष्यांची मातीची घरटी असतात.पण अजून बघितली नाहीत.मोर,तित्तिर,पक्ष्यांची घरटी गवतातून आढळतात. 'पारवा' इमारतीच्या आडोशानं घरटं तयार करतात. 'खंड्या' नदीच्या,ओढ्याच्या काठानं घरटं पोखरतो. 'ब्राह्मणी घार',

'कापशी घार','समुद्र गरुड','घार' अशा शिकारी पक्ष्यांची घरटी उंच झाडावर पाहायला मिळतात.टिबुकली,चांदवा,बदक यांची घरटी पाण्यातल्या वनस्पतीवर किंवा जलाशयाच्या काठानं पाहायला मिळतात. 'कोकिळा' घरटं तयार करतच नाही. कावळ्याच्या घरट्यात अंडी घालून मोकळी होते.पक्षीनिरीक्षकांना पाखरांची विश्रामगृह खुणावतात. पाखरं ही निसर्गातील विरामचिन्हे वाटतात.त्यांच्याजवळ थोडसं थांबल्याशिवाय पुढं जावसं वाटत नाही. पाखराशिवाय निसर्गचित्र पूर्ण होतच नाही.

२०/११/२४

स्वातंत्र्योत्तर विकासनीती / Post-Independence Development Policy


स्वातंत्र्य मिळाले.विकासाची दिशा काय असावी याची चर्चा सुरू झाली.सोव्हिएट रशियाचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून नियोजनबद्ध औद्योगिक विकासाची कास धरावी अशी जवाहरलाल नेहरूंची भूमिका होती.ह्या साऱ्या प्रक्रियेत महात्मा गांधींच्या ग्रामस्वराज्याच्या,आजूबाजूच्या निसर्गाशी संतुलन सांभाळणाऱ्या, स्वयंपूर्ण शेतीप्रधान समाजाच्या कल्पना बाजूला सारल्या गेल्या.मानवाने आपल्या गरजा अवास्तव भडकू देऊ नयेत,निसर्गाचे दोहन काळजीपूर्वक करावे,हे महात्मा गांर्धीचे जीवनविषयक तत्त्वज्ञानही अमान्य करण्यात आले. १९४९ साली आरंभी ह्या प्रक्रियेत महात्मा गांधींचे सहकारी अर्थतज्ज्ञ जे सी कुमारप्पा ह्यांना आमंत्रित करण्यात आले होते.


पहिल्या बैठकीसाठी ते एका टांग्यात बसून सभास्थानी पोचले. इथे फक्त मोटार गाड्या सोडतो,टांग्यांना प्रवेश नाही म्हणून खाली उतरवण्यात आले.ते नेहरूंना म्हणाले,हे काय चालले आहे? नक्कीच ह्या देशात बैलगाड्या, टांग्यांना रस्ते वापरण्याचा मोटार गाड्यांइतकाच अधिकार नाही का? नेहरू उत्तरले,आहे हो,पण मोटारगाड्यांपासून अपघात होण्याचा धोका आहे, म्हणून कुठे कुठे बैलगाड्या,टांग्यांवर निर्बंध आणावे लागतात.कुमारप्पा उत्तरले,जर मोटार गाड्या हे खतरनाक वाहन असेल,तर त्यांच्यावर निर्बंध आणावे, ज्यांना धोक्यात पाडले जाते त्या बैलगाड्या,टांग्यांवर नाही.कुमारप्पांचा गांधींसारखा विज्ञान - तंत्रज्ञान यांत्रिकीकरणाला विरोध नव्हता. परंतु,त्यांचे म्हणणे होते की,भारतात भांडवलही मुबलक नाही,आणि लोकसंख्येच्या मानाने नैसर्गिक संसाधनेही तुटपुंजी आहेत.तेव्हा आपल्या विकासाचा भर आपली मुबलक मानवी संसाधने काळजीपूर्वक वापरण्यावर असावा.ह्यासाठी आपल्या जनसंपत्तीला विकासनीतीचा केन्द्रबिंदू बनवावे.त्यांचा आधार असलेली स्थानिक नैसर्गिक संसाधने कार्यक्षमतेने वापरत त्यांना समाधानकारक रोजगार निर्माण करणारा आर्थिक विकास हाच खरा अहिंसक आर्थिक विकास ठरेल.त्या दिशेने स्वतंत्र भारतात काहीतरी नावीन्यपूर्ण करून दाखवावे.पण त्यांची भूमिका पूर्णपणे नाकारली गेली, आणि अखेर कुमारप्पा नियोजन प्रक्रियेतून बाहेर पडले.


हे साहजिक होते,कारण कुमारप्पांनी सुचविलेल्या दिशेने जाण्यात देशातील प्रभावी आर्थिक हितसंबंधांना काहीच लाभांश नव्हता.

त्या जागी तथाकथित समाजवादी समाजरचनेतून झपाट्याने औद्योगिक प्रगतिपथावर वाटचाल करण्याचा प्रयत्न सुरू झाला.

पण ह्या समाजवादात खऱ्याखुऱ्या सामाजिक,आर्थिक समतेचा पाठपुरावा करण्याचा इरादा बिलकूलच नव्हता.ह्या बेगडी समाजवादाचा अर्थ होता,लोकांच्या पैशाने, लोकांच्या जमिनी बळकावून,लोकांना निसर्गापासून आणखीनच दूर ढकलून ही सारी संसाधने सत्तेवर आता कब्जा केलेल्या वर्गांना अगदी स्वस्तात उपलब्ध करून देणे.कुमारप्पांच्या भाषेत हिंसक अर्थव्यवस्थेची घडी बसवणे.यातून नैसर्गिक संसाधनांच्या वापराची जी एक पद्धत बसवली गेली तिला राज्यशास्त्रात नाव दिले आहे,आयर्न ट्रायँगल.आपण मराठीत म्हणू शकू दुष्ट त्रिकूट.ह्या त्रिकूटाचे तीन घटक आहेत :पहिले म्हणजे लाभ लुटणारे : उद्योगपती,सधन शेतकरी,आणि संघटित क्षेत्रातील नोकरदार;दुसरे म्हणजे ह्या सर्व व्यवस्थेबद्दल निर्णय घेणारे राजकारणी,आणि तिसरे म्हणजे ही व्यवस्था अंमलात आणणारी नोकरशाही.ह्यांच्या हातमिळवणीतून नैसर्गिक संसाधने सत्ताधारी वर्गाच्या वेगवेगळ्या घटकांना प्रचंड सवलती देऊन पुरवण्याची व्यवस्था केली गेली.ह्या गैरव्यवस्थेचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे निसर्गसंपत्तीची नासाडी.ह्याचे दुष्परिणाम शेवटी सगळ्यांनाच भोगावे लागणार,पण सत्ताधारी वर्ग बऱ्याच प्रमाणात आपला बचाव करून घेतात.दुष्परिणाम ताबडतोब भोगायला लागतात बहुजनांना;ग्रामीण भागातील भूमिहीनांना व अल्पभूधारकांना,मच्छिमारांना,पशुपालकांना,

बुरुडकाम करणाऱ्यांना,आदिवासींना व यातूनच उठून शहरांत येऊन झोपडपट्ट्यांत राहणाऱ्या जनतेला.


ह्या त्रिकूटाच्या कार्यनीतीचे एक उदाहरण आहे पुण्याजवळच्या मुळशी खोऱ्याच्या दक्षिणेच्या अंबी खोऱ्यातल्या पानशेत धरणाची कहाणी.स्वातंत्र्यानंतर शहरांना,शेतीला पाणी पुरवण्यासाठी,

वीजनिर्मितीसाठी धरणे बांधण्याचा सपाटा सुरू झाला.या धरणांना पंडित नेहरूंनी आधुनिक भारताची तीर्थक्षेत्रे मानले.ही देवळे बांधली जात होती - डोंगराळ,वृक्षाच्छादित प्रदेशात.या धरणांच्या निमित्ताने तेथे पहिले रस्ते बांधले गेले. अशातले हे पानशेत धरण सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पडणारे भरपूर पावसाचे पाणी गोळा करून पुणे शहराला व शहराच्या पूर्वेला पर्जन्यछायेच्या प्रदेशात उसाच्या मळेवाल्यांना,सहकारी साखर कारखाने पळवणाऱ्या राजकारण्यांना पुरवते.त्याअगोदर पानशेत धरणात बुडालेल्या अंबी खोऱ्यात आणि त्याचे पाणलोट क्षेत्र असलेल्या डोंगर उतारांवर स्थानिक शेतकऱ्यांच्या मालकीच्या जमिनी होत्या.

नदीच्या चिंचोळ्या खोऱ्यात ते भातशेती करायचे,आणि डोंगर उतारावर फिरती शेती.दोन-तीन वर्षे नाचणी,सावा,तीळ पिकवून मग दहा-पंधरा वर्षे पडीत टाकायची अशी पद्धत होती.पण शेती करताना ते आंबा,हिरडा सांभाळून ठेवायचे. डोंगराच्या अगदी वरच्या चढांवर सरकारी राखीव जंगल होते.ज्यांची जमीन बुडली,त्यांचे पुनर्वसन पूर्वेच्या पर्जन्यछायेच्या प्रदेशात होणार होते.धरणाच्या बांधकामाला सुरुवात झाली.रस्ते झाले,गाड्या फिरू लागल्या आणि आतापर्यंत कधीही जास्त रोख पैसा न पाहिलेल्या शेतकऱ्यांना एक नवे जग सामोरे आले. १९५५-६० च्या दरम्यान पुण्यात लाकडी कोळशाला प्रचंड मागणी होती.हे वखारवाले,धरण बांधणारे इंजिनिअर,वनविभागाचे कर्मचारी एकदिलाने अंबी खोऱ्यातली वनसंपत्ती लुटायला तुटून पडले.धरण पुरे झाल्या- झाल्या १९७१ साली मी त्या भागात अनेक दिवस गावा-गावांत मुक्काम केला,लोकांशी बोललो. तोवर काही देवराया सोडल्या तर सारे डोंगर उघडे बोडके झाले होते.लोक सांगायचे की धरणाचे इंजिनिअर वखारवाल्यांबरोबर गावोगाव फिरले.तुम्ही आता हालणारच असे लोकांना सांगत पिढ्यान् पिढ्या जतन केलेली हिरडाआंब्याची मोठ-मोठी झाडे विकायला प्रोत्साहन देत.एक एक झाड आठ आण्याला अशा दरांनी विकून त्यांचा कोळसा केला गेला.वरच्या राखीव जंगलातही,लोकांच्या सांगण्याप्रमाणे प्रचंड भ्रष्टाचार होऊन जंगल साफ झाले.शेवटी विस्थापितांचे नीट पुनर्वसन झालेच नाही.त्यातले बहुतांश लोक आता उघड्या- बोडक्या झालेल्या,माती धुपून गेलेल्या डोंगरांवर सरकून उपजीविका करत आहेत.एकसष्ट साली घाईघाईने पाणी साठवल्यावर एकदा फुटून पुण्याचे भरपूर नुकसान केलेल्या ह्या धरणातून भरपूर सवलतीने पुरवल्या जाणाऱ्या पाण्याचा उपभोग पुण्याचे उद्योग,संघटित क्षेत्रातील नोकरदार,पुण्याच्या पूर्वेच्या मुलखातील सधन शेतकरी घेत आहेत.अर्थात याचे फायदे लुटणाऱ्या वर्गातून आजचे शासकीय अधिकारी, राजकीय पुढारी आले आहेत.आणखी अशाच अनेक प्रकल्पांना राबवत आहेत.ह्या सगळ्यांनी पाण्याबरोबरच स्वस्त लाकडी कोळसा आपल्या चुलीत जाळला.त्या व्यापारात आपले खिसे भरून घेतले.ह्यातून स्थानिक लोकांचे तर नुकसान झालेच,पण वन संपत्तीची, जल संपत्तीची प्रचंड हानी झाली.


डोंगर उतारांवर मातीची मोठी धूप होऊन धरण झपाट्याने गाळाने भरले.


ह्या पानशेतच्या धरणफुटीचा किस्साही बघण्याजोगा आहे.हे धरण फुटले तेव्हा मी पण पुण्यात होतो. काहीही पूर्वसूचनेशिवाय पुण्यात पोचलेला ह्या धरणातल्या पाण्याचा लोंढा पाहिला होता.

ह्या लोंढ्याने अधिकृत आकड्यांप्रमाणे निदान एकोणतीस जण मृत्यू पावले,सव्वीस हजार कुटुंबांचे सामानसुमान वाहून गेले,

छत्तीसशे दुकानांतील मालाची नासधूस झाली, बेचाळीस हजार पोती धान्य कुजून गेले.सर्वांना माहिती होते की पानशेतच्या धरणाला धोका होता.एकसष्ट सालच्या बारा जुलैला उजाडता-उजाडता धरणाला भगदाड पडले.हा पाण्याचा लोंढा पुण्यात पोचायला अडीच-तीन तास लागले.मग दुपारी खडकवासल्याचेही धरण फुटले;लोंढा आणखीच वाढला.आता पानशेतच्या, खडकवासल्याच्या इंजिनिअरांजवळ टेलिफोन होता, लष्कराच्या लोकांपाशी बिनतारी संदेश देण्याचीही सुविधा होती.तरी लोकांना ह्या दोनही धरणफुटीची धोक्याची सूचना कशी दिली गेली नाही? तेव्हाही गूढ होते.मी अलीकडे माझ्या चांगल्या परिवयाच्या, हा प्रसंग अनुभवलेल्या मुरब्बी अधिकाऱ्यांशी, इंजिनिअरांशी बोललो.कुणापाशीच काही उत्तर नाही.


मला वाटते याचे उत्तर पंचवीसशे वर्षांपूर्वीच दिले गेले आहे - ताओ-ते-चिंग ह्या राज्यकर्त्यास मार्गदर्शन करणाऱ्या चिनी ग्रंथात : सत्ताधीशा याचि मार्गे तु जावे । जनांना न काही कधी जाणु द्यावे ।। सुजाण प्रजा पार उधळे नि बाधे। अजाण प्रजा हाकणे काम साधे ।। म्हणोनी सदा वास्तवा छपवावे । खोटेपणाने नटावे, थटावे ।। जगभर आजपावेतो सगळेच राज्यकर्ते आपापल्या परीने ह्या उपदेशाचे पालन करताहेत. आपल्याकडून प्रजेला अंधारात ठेवून, खोटी नाटी आश्वासने देत,गलथानपणा,भ्रष्टाचार पचवताहेत.


पाश्चात्त्यांच्या परिसर चळवळी


मध्ययुगीन युरोपावर एकीकडून नैसर्गिक संसाधनांचा अनिर्बंध वापर,त्यातून झालेला वनांचा,वन्य जीवांचा विध्वंस,तर दुसरीकडून प्लेगच्या भीषण साथी आणि वाढती थंडी अशी संकटे येत असताना विज्ञान आणि विज्ञानाधारित तंत्रज्ञानाच्या बळावर त्यांनी जगावर घट्ट पकड बसवली.अमेरिका - ऑस्ट्रेलियात मूलवासीयांना खच्ची करून नवयुरोप वसवले.तिथली मुबलक सुपीक जमीन,वन व खनिज संपत्ती आपल्या काबूत आणली, ती आफ्रिकेतील गुलामांच्या श्रमांवर वाढवली.पण जोडीला युरोपाच्या परिसराचा नाश रोखून तो पुनश्च सुस्थितीत आणण्यास सुरुवात केली. 


स्वित्झर्लंडसारख्या डोंगराळ देशात १८६० पर्यंत जंगल जवळजवळ पूर्ण नष्ट झाले होते.यामुळे प्रचंड दरडी कोसळून हाहाकार होऊ लागला,तेव्हा लोकजागृती होऊन त्यांनी पुनश्च अरण्य वाढवायला सुरुवात केली. आज स्वित्झर्लंडची वनश्री विशेष सुस्थितीत आहे.पण ही संपूर्णतः गावसमाजांच्या मालकीची आहे.सरकारी वनखात्याच्या नाही.


अमेरिकेत गोऱ्या लोकांनी प्रथम पाऊल ठेवले,तेव्हा तेथे सायबेरियातून आलेले रेड इंडियन मूलवासी निदान दहा हजार वर्षे राहात होते.त्यांची मोठ-मोठी माया-इन्कांसारखी राज्ये होती.

साहित्य,कला,संस्कृती होती.याच्या जोडीलाच वन्य पशुपक्ष्यांचे वैपुल्य होते.अनेक निसर्गरम्य स्थळे त्यांनी सांस्कृतिक-धार्मिक श्रद्धेतून जतन करून ठेवली होती.गोऱ्यांनी बंदुकीच्या बळावर या साऱ्या संस्कृतीचा,समाजाचा,जीवसृष्टीचा नायनाट केला.माया समाजातील विद्वानांचे पुस्तक न् पुस्तक हुडकून नष्ट केले,हरेक पंडिताची हत्या केली.तसेच उत्तर अमेरिकेतील कुरणांवर बागडणारे लक्षावधी बायसन-गोवंशातील पशू नष्टप्राय केले. ह्या बायसनची बेफाम शिकार करताना इतके मांस मिळायचे की त्यातली सर्वात स्वादिष्ट म्हणून केवळ जीभ खाऊन बाकीचे कलेवर तसेच कुजत टाकून दिले जायचे.हे निसर्ग व मानवी जीवनाच्या विनाशाचे युगकर्म पूर्ण होत आल्यावर,संपूर्ण अमेरिकी खंडावर गोऱ्यांची वस्ती पसरल्यावर,म्हणजेच आरंभानंतर तब्बल अडीच-तीनशे वर्षांनी अमेरिकी वसाहतवद्यांना निसर्ग रक्षणाच्या कल्पना सुचायला लागल्या.त्यातून यलोस्टोनसारखी राष्ट्रीय उद्याने निर्माण झाली.ही राष्ट्रीय उद्याने पाश्चात्त्य जगतातल्या परिसर चळवळींतले एक महत्त्वाचे पाऊल मानली जातात.यलोस्टोन राष्ट्रीय उद्यान हे मूळ रेड इन्डियनांनी जतन केलेले निसर्गरम्य स्थळ होते. जेव्हा ते राष्ट्रीय उद्यान बनवले,तेव्हा तिथल्या जिवंत राहिलेल्या उरल्यासुरल्या मूलवासीयांना हाकलून देऊन ते गोऱ्या हौशी पर्यटकांच्या मनोरंजनाचे स्थळ बनवण्याची त्यांची इच्छा होती.तेव्हा त्यांनी मांडणी केली की राष्ट्रीय उद्यानात मानवाचा हस्तक्षेप मुळीच नको.मूलवासी रेड इन्डियनांच्या शतकानुशतकांच्या हस्तक्षेपातूनच यलोस्टोन समूर्त झाले होते हे सोईस्करपणे डोळ्याआड करून.ही अगदी चुकीची चौकट भारतातील आपल्या लोकांना शत्रू ठरवणाऱ्या वनविभागाच्या शासनाने व त्यांच्याबरोबर वन्यजीव संरक्षणाच्या कामात सहभागी झालेल्या राजे-महाराजांनीही स्वीकारली.इंग्लंड- अमेरिकेकडे डोळे लावून बसलेल्या भारतीय सुशिक्षित,शहरी, मध्यमवर्गानही हाच आदर्श मानला.हे आहे भारतात आज प्रभावी असलेल्या लोकविन्मुख पर्यावरणवादाचे मूळ.युरोपीयांची,व नव्याने विज्ञान व विज्ञानाधारित तंत्रज्ञान आत्मसात करून घेतलेल्या जपान सारख्या देशांतील आशिया आफ्रिकेचे शोषण कोणी,किती करायचे ह्या स्पर्धेतून पहिली व दुसरी महायुद्धे झाली. ह्यातल्या दुसऱ्या महायुद्धात आशियाच्या घनदाट,दमट जंगलात लढताना हिवतापाशी आणि विषमज्वराशी मुकाबला करण्यासाठी डी डी टी हे कीटकनाशक फारच प्रभावी आहे,हे १९३९ साली पॉल म्युलर ह्या स्विस रसायनशास्त्रज्ञाने दाखवून दिले.त्याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करण्यात आला,आणि ह्या शोधाबद्दल म्युलरला १९४८ साली नोबेल पुरस्कार देण्यात आला.दुसऱ्या महायुद्धानंतर शेतीसाठीही उपयुक्त असे एक कीटकनाशक म्हणून डी डी टीचा जगभर वापर होऊ लागला.पण डी डी टी हे फार चिवट रसायन आहे.ते पर्यावरणात खूप काळ टिकून राहते. त्याने प्रभावित किडे खाल्लेल्या पक्ष्यांच्या शरीरात साठत राहते.ह्याचे एकूणच जीवसृष्टीवर खूप दुष्परिणाम होतात. हे लक्षात येऊन राशेल कार्सन ह्या जीवशास्त्रज्ञाने 'सायलन्ट स्प्रिन्ग' अथवा पक्ष्यांचा गळा आवळलेला वसंत ऋतू ह्या नावाचे सुप्रसिद्ध पुस्तक लिहिले.ह्या पुस्तकामुळे पाश्चात्त्य जगतात पर्यावरणाच्या समस्यांबद्दल लोकांच्यात खूप जाणीव निर्माण झाली व ह्या जाणिवेतून १९७२ साली डी डी टी वर बंदी आणण्यात आली, दुसरेही अनेक कायदे करण्यात आले.अगदी ह्याच कालावधीत १९५५ ते १९७५ अशी तब्बल वीस वर्षे आशियावर पाश्चात्त्यांची पकड ठेवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून व्हिएटनामचे युद्ध झाले.एका बाजूने अमेरिकेत जीवसृष्टीला धोकादायक अशा रसायनांविरोधी पावले उचलली जात होती,तर दुसरीकडे व्हिएटनामच्या युद्धात व्हिएटनामच्या घनदाट वर्षावनांवर पानगळ करणाऱ्या रसायनांचे फवारे उडवले जात होते.म्हणजे मग ह्या निष्पर्ण,सुकू लागलेल्या,जगातल्या जैवविविधतेचे एक सर्वात महत्त्वाचे साठे आटू लागलेल्या,जंगलाच्या मुलखात व्हिएटकाँगचे सैन्य लवकर नजरेस येईल. (वारुळ पुराण,माधव गाडगीळ,

ई.ओ.विल्सन,संक्षिप्त अनुवाद नंदा खरे,मनोविकास प्रकाशन,)


व्हिएटनाममधले जैविक युद्ध लपून छपून चालले होते, आणि हार्वर्डचे एक वनस्पतिशास्त्रज्ञ अमेरिकी सैन्याबरोबर जैविक युद्धासाठी चुपचाप संशोधन करत होते.हार्वर्डचे बहुतांश विद्यार्थी युद्धाच्या विरोधात होते. त्यांच्यातल्या चळवळ्यांनी हे उपद्व्याप उघड्यावर आणून हार्वर्डच्या बेगडी उदारमतवादावर टीकेची झोड उठवली होती.आणि विल्सन ? एका बाजूने ते साऱ्या जैवविविधतेला जपा म्हणून जोरात प्रतिपादन करत होते,तर दुसऱ्या बाजूने ते अमेरिकेच्या आक्रमणाचे समर्थक होते.

अमेरिकेतल्या डी डी टी वरच्या बंदीचे उदाहरण वापरत अनेकदा आर्थिक समृद्धी आणि पर्यावरणाची जपणूक ह्यांबद्दल एक समीकरण मांडले जाते.जशी अमेरिकेची आर्थिक भरभराट झाली,तशी तिथे पर्यावरणाची जपणूक सुरू झाली.भारतासारख्या देशातही भरपूर आर्थिक विकास झाला की यथाकाल पर्यावरणाची जपणूक सुरू होईल.तोवर पर्यावरणाकडे दुर्लक्ष करत आर्थिक विकास साधणे श्रेयस्कर आहे अशी ही विचारसरणी आहे.पण हे विवेचन अमेरिकेचा प्रभाव सर्व जगभर आहे हा महत्त्वाचा मुद्दा सोईस्करपणे डोळ्याआड करत आहे.


कदाचित अमेरिका आपल्या परिसरातले पर्यावरण जपत असेल, पण ह्या आर्थिक भरभराटीनंतरही तो देश बेमुर्वतखोरपणे जगात इतरत्र पर्यावरणाचा विध्वंस करत आहे.अगदी ह्या शतकातही इराकवर तिथल्या तेल साठ्यांवरची आपली पकड कायम ठेवण्यासाठी खोटा-नाटा प्रचार करत युद्ध लादले.त्या युद्धात तेल जळून,समुद्रात पसरून पर्यावरणाची जबरदस्त नासाडी केली. तेव्हा आर्थिक समृद्धी आणि पर्यावरणाची जपणूक ह्या दोहोंत काहीही साधे समीकरण मांडणे फसवे आहे.

१८/११/२४

महत्व मतदानाचं,आवाहन याचकांचं/Importance of voting,Appeal of petitioner...!!!

दावणीला बांधलेला बैल,जवा दावं तोडून,वारं भरल्यागत,गावातनं मोकाट पळत सुटतो,त्यावेळी शंभर जणांना धडका देत तो विध्वंसच घडवतो... ! या बैलाला वेळीच आवर घातला... चुचकारत योग्य दिशा दाखवली... चारापाणी घातला ... याच्याशी प्रेमाने वागलं... की आपण म्हणू ते काम तो चुटकीसरशी करतो..! 


मग ती शेतातली नांगरणी असो,पाणी शेंदणं असो, बैलगाडीला जुंपून घेणं असो किंवा आणखी काही... ! 


पाण्याचंही तसंच... 


कशाही वाहणाऱ्या पाण्याला प्रेमानं थोपवून धरलं; की ह्येच पाणी भिंती आड गप गुमान धरण म्हणून हुबं ऱ्हातंय... प्रेमानं चुचकारून पायपात घातलं की घरात नळ म्हणून वाहतंय... पात्यावर गरागरा फिरून वीज बी तयार करतंय... 


अय बाळा... आरं हिकडं बग... आरं तकडं न्हवं ल्येकरा ... हिकडं बग... हिकडं रं... हांग आशी ... फलीकडल्या गल्लीत आपली साळू आजी ऱ्हाती... तिला कोनच  न्हाय रं... आत्ताच मका पेरलाय तिनं... अर्ध्या गुंट्याचं वावार हाय तिचं.... एक चक्कर मारून जरा मक्याची तहान भागवून यी की...इतक्या प्रेमाने पाण्याला सांगितल्यावर,हेच पाणी झुळू झुळू वाहत,शिट्टी वाजवत,मंग त्या मक्याला भेटायला जातंय... बोळक्या तोंडाची साळु आजी तोंडाला पदर लावून मंग आशीं हासती... अन डोळ्यात आस्तंय पाणी... हो पुन्हा पाणीच... ! 


अस्ताव्यस्त वाहणाऱ्या या पाण्याला मात्र दिशा दाखवून,त्याचा योग्य वापर करून घेतला नाही;तर पूर ठरलेला... विध्वंस हा ठरलेलाच आहे... ! 


सांगायचा मुद्दा हा की मस्तावलेला बैल असो किंवा अस्ताव्यस्त वाहणारं पाणी...! त्यांना आवरून - सावरून योग्य दिशा दाखवून, त्यांच्यातल्या जबरदस्त ताकदीचा उपयोग करून घेता यायला हवा... ! 


आमचा भिक्षेकरी - याचक समाज.... याचीही ताकद खूप जबरदस्त आहे... !


या सर्वांनी जर एकत्र येऊन ठरवलं... तर उभा डोंगर,ते आडवा करतील...!


बुलडोझर ला सुध्दा जे काम दोन दिवसांत जमणार नाही,ते काम हे लोक एकत्र आले तर दोन तासात करतील... ! गेल्या दहा वर्षापासून मी आणि मनीषा यांच्या या जबरदस्त ताकतीचा उपयोग विधायक कामांसाठी करुन घेत आहोत.... ! 


यांच्या ताकदीचा उपयोग;आम्ही यांच्याच विकासासाठी किंवा समाजाच्या भल्यासाठी करण्याचा प्रयत्न करत आहोत... ! 


पुण्यातील सार्वजनिक भाग,भीक मागणाऱ्या आज्या / मावश्या यांच्या टीममार्फत (खराटा पलटण - Community Cleanliness Team)  स्वच्छ करून घेणे असो की,


वैद्यकीय दृष्टीने फिट असणाऱ्या भिक्षेकर्यांकडून रक्तदान करून घेणे असो.... 


जे काही करतो आहोत;ते समाजानं यांना दिलेलं दान काही अंशी फेडण्यासाठी...


अर्थात् याचं श्रेय माझं किंवा डॉ.मनीषाचं नाही...  एकट्या दुकट्याचं कामच नव्हे हे... आपण सर्व साथीला आहात म्हणून हे शक्य होत आहे. 


'It's not "Me"... It's "We"...!!!'


तर,दान या शब्दावरून आठवलं,सध्या मतदानाचं वारं वाहत आहे... ! ज्यांना मतदानाचे अधिकार आहेत,असे अनेक सुजाण नागरिक मतदान करतच आहेत,मात्र काही लोक; मतदानादिवशी ऑफिसला / कामावर दिलेली सुट्टी हि vacation समजून,मतदान न करता फिरायला जातात. 


काही लोक जरा गर्दी कमी हुदे... थोडं ऊन कमी होऊ दे... म्हणत म्हणत मतदान करायचंच विसरून जातात...! 


अशा लोकांचं प्रबोधन कसे करता येईल ? असा विचार मनात आला आणि मला माझ्या मागे उभ्या असलेल्या ताकदीची आठवण झाली....! 


तर,आज शुक्रवार दिनांक १५ नोव्हेंबर २०२४ रोजी आम्ही पुण्यातील वर्दळीच्या ठिकाणी आमच्या किमान १०० याचकांना एकत्र केलं आणि "चला आपण सर्वजण मतदान करूया"अशा अर्थाचे  हातात बोर्ड दिले .... ! 


भिक्षेकर्‍यांना आम्ही रस्त्यात आणि चौका - चौकात हे बोर्ड घेऊन उभं केलं... आम्हाला जमेल त्या पद्धतीने आम्ही मतदानाचं महत्त्व आणि मतदान करण्याची विनंती समाजाला केली...  ! 


सांगतंय कोण... ? अडाणी भिक्षेकरी... ! 


ऐकणार का ... ? सुशिक्षित गावकरी... ?? 


असो; आम्ही प्रयत्न करतोय... बैलाला आवरण्याचा आणि पाण्याला सावरण्याचा.... ! 


यात अंध अपंग वृद्ध याचक या सर्वांनी सहभाग घेतला... मी या सर्वांचा ऋणी आहे !!!


मला माहित आहे,आमच्या या उपक्रमामुळे एका रात्रीत फार काही दिवे पेटणार नाहीत...पण एखादी पणती लावायला काय हरकत आहे ? 


बघू... जे सुचेल ते आपल्या सर्वांच्या साथीने प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करतोय...


शेवटी एक माहीत आहे... 


कोशिश करने वालों की हार नही होती... !!!


शुक्रवार दिनांक १५  नोव्हेंबर २०२४


ऑक्टोबर महिन्याचा लेखाजोखा..


सर्वप्रथम आपणास दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा !!


या महिन्यात घटस्थापना,दसरा,कोजागिरी पौर्णिमा, दिवाळी यासारख्या सणांची रेलचेल होती... ! 


या महिन्यात ज्या घटना घडल्या;त्यामुळे आयुष्याकडे बघण्याचा आणखी एक वेगळा दृष्टिकोन निर्माण झाला...! 


वाघ आणि हरिण दोघेही जीव खाऊन पळत असतात... एक भूक भागवण्यासाठी आणि दुसरा जीव वाचवण्यासाठी...!!! 


हातात पैसा नसतो,तेव्हा पोटात दुखते;कारण भूक सहन होत नाही.... खूप पैसा असतो,तेव्हाही पोटात दुखते; कारण अपचन सहन होत नाही... 


पैसा नसताना वणवण फिरावे लागते अन्न मिळवण्यासाठी...  पैसा असतानाही वणवण फिरावे लागते... अन्न जिरवण्यासाठी ...  


बीज उगवताना आवाज येत नाही... झाड मोडले तर मात्र प्रचंड आवाज होतो...


आवाज विनाशाला असतो,निर्मितीला नाही...!!! 


किती विरोधाभास आहे .... ! 


जगण्यातले विरोधाभास,जगणं शिकवून जातात...! 


पुनर्वसन- फुटपाथ वर पडून असलेली एक ताई...  थोड्यावेळात ती जाणार,हे गृहीत धरून तिच्या घरातल्या लोकांनी बाकीची सर्व तयारी सुरू केली होती... अक्षरशः तिरडी सुद्धा मागवली होती...! 


मी सहज पाहिलं,हि तिरडी म्हणजे अर्धी कापलेली शिडी होती... मधले एक दोन बांबू फक्त निखळले होते... गंमत काय,की शिडी उभी ठेवली तर तीला "शिडी" म्हणतात; त्यावरून वर चढता येते... हिच बांबू निखळलेली शिडी जर आडवी ठेवली तर तिला "तिरडी" म्हणतात...त्यावरून सुद्धा वर जाता येते,पण कायमचे ... 


पुन्हा विरोधाभास !!! 


जाणाऱ्या या ताईला ऍडमिट केले,ती बरी झाली... अगदी खरं सांगायचं तर;ती जगली यावर माझा सुद्धा विश्वास बसेना....! यानंतर तिच्या इच्छेनुसार,तीला खेळणी विकायचा व्यवसाय सुरू करून दिला...! 


काँग्रेस भवन पुणे येथे ती खेळणे विकते...!


ती तर जगलीच परंतु आता कुटुंबाला जगवते आहे !  


असाच दुसरा माणूस...रस्त्यावर पडून होता, यालाही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले.... पूर्णतः बरा झाला.... आता याला हात गाडी देऊन अनेक वस्तू विक्री करण्यासाठी दिल्या आहेत. 


येरवडा येथे याने व्यवसाय सुरू केला आहे. 


याच्या घरात सर्व लोक आहेत तरीही काही ना काही परिस्थितीमुळे याला घरातल्या लोकांनी दूर लोटले आहे...! एकदा मी त्याला छेडले,त्याला म्हणालो,घरातल्यांची आठवण येत नाही का रे तुला? तुला त्यांनी भेटायला यावं असं तुला वाटत नाही का ? तू त्यांची वाट कधी बघत असतोस  की नाही ?' 


तो माझ्याकडे पहात हसत म्हणाला, सर वाट हरवलेल्या लोकांची पहायची असते....  ज्यांनी स्वतःहून वाटच बदललेली आहे... त्यांची वाट कशी पहायची ?'चुकून दरवाजा बंद झाला असेल तर तो उघडता तरी येतो... आतल्या माणसाने आपल्यासाठी तो कायमचा बंदच करून ठेवला असेल तर तो दरवाजा कसा उघडावा ? 


आणि उघडला तरी उपयोग काय ? जबरदस्तीच्या नात्यात पूर्वीसारखा गोडवा थोडाच राहणार आहे..??? 


अंगावर शहारे आले माझ्या,हे ऐकून .. !


माझ्याशी बोलल्यानंतर चेहरा तिकडे करून तो डोळे पुसत होता... 


मी त्याला हळुवारपणे म्हणालो काय झालं रे ? 


तो म्हणाला, काही नाही सर डोळ्यात काहीतरी गेले वाटतं.... !' हं... खरंच आहे बाळा .. सध्या प्रदूषण खूप वाढलं आहे ....हवेत आणि नात्यातही... ! 


घटस्थापना - 


पहिली आई, दुसरी आज्जी , तिसरी मावशी,चौथी आत्या,पाचवी बहीण,सहावी पत्नी, सातवी *मुलगी, आठवी सून,नववी नात...हिच आहेत आपल्या आयुष्यातील देवीची नऊ रूपे...!!!*


या नऊ देवींची आम्ही "माऊली" म्हणून पूजन केले आणि नवीन साडी चोळी दिली... ! 


"तू आहेस गं माऊली, म्हणून मी आहे,तुझ्याशिवाय माझ्या आयुष्याला काही अर्थ नाही, तू मायेनं भरलेला "घट"* आहेस आणि आयुष्यभर मी माझ्या मनात तो "स्थापन" करूनच जगणार आहे... हाच माझा भाव... "भक्ती" म्हणून स्वीकार कर गं माऊली,असं म्हणून आम्ही घटस्थापना केली... !!! 


या निमित्ताने आम्ही कुमारी पूजन केले...  रस्त्यावरील वृद्ध मायमाऊलींना साड्या दिला...! 


त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसले... ! 


चंदनाचा टिळा आपण जेव्हा दुसऱ्याच्या कपाळावर लावतो, तेव्हा आपलीच बोटं सुगंधित होतात... 


आपण स्वतःसाठी घेतो तो आनंद आणि दुसऱ्याला देतो ते समाधान... !!! 


या समाधानी चेहऱ्यांची बेरीज कशी करावी...? 


जर कोणाला करता आलीच,तर यातून जे सार मिळेल,तितकंच आपलं आयुष्य समजावे ..!!! 


- चादर आणि पणत्या -  येणाऱ्या थंडीचे दिवस लक्षात घेऊन आम्ही आपल्या लोकांना सोलापुरी चादर द्यायचे ठरवले.


डॉ.श्री अनिल पटेल,यवतमाळ यांनी आम्हाला सोलापुरी चादर दिल्या,सौ जयश्रीताई नेटके या माझ्या छोट्या बहिणीने स्वतः तयार करून पणत्या दिल्या.अनेक लोकांना आम्ही या पणत्या विकायला दिल्या.... ज्यांच्या अंगावर काहीही नव्हते अशा लोकांच्या अंगावर आम्ही मशिदीत न जाता सुद्धा चादर चढवली....! 


देवासमोर उभे राहून आपण काय मागतो,यापेक्षा देवाकडे पाठ असताना,आपण काय देतो हे जास्त महत्त्वाचं असतं... ! 


हि खरी प्रार्थना... !!! 


प्रार्थना करण्यासाठी दोन हात एकत्र जोडावे लागतात... दोन हात एकत्र करूनच नमाज पढता येतो .... प्रेयर करण्यासाठी सुद्धा दोन हातच लागतात.


हेच दोन हात एकत्र येऊन सेवा करतात...त्यावेळी आपोआप प्रार्थना होते,नमाज पढला जातो,प्रेयर सुद्धा तिथेच होते...! 


तळागाळातल्या लोकांना आपण सर्वजण मदत करत आहात... 


आपण खऱ्या अर्थाने प्रार्थना,नमाज आणि प्रेयर जगत आहात..!!! 


आम्ही नतमस्तक आहोत आपल्यापुढे... !!! 


- उटणे - डॉ.मनीषा ही आयुर्वेद पारंगत आहे. दरवर्षीप्रमाणे आम्ही यावर्षी सुद्धा उटणे तयार केले... या विक्रीतून मिळणाऱ्या पैशातून आपण भीक मागणाऱ्या मुलांचे शिक्षण करत आहोत.... म्हणुन लोकांना हे उटणे विकत घेण्यासंबंधात आवाहन केले... ! 


केवळ पंधरा दिवसात ५००० उटण्याच्या ऑर्डर आल्या... 


आमची झोळी कमी पडली... आपले दातृत्व नाही...!!! 


आपल्या या प्रेमाची तुलना मी कशाशी करू ??? 


गुण माहित असताना एखाद्याला जवळ करणं हा स्वार्थ.... 


परंतु दोष माहित असताना सुद्धा एखाद्याला साथ देणं हे प्रेम... !!! 


गुण आणि दोषांसकट आपण मला स्वीकारलं आहे... हे फक्त एक आईच करू शकते... 


आपणा सर्वांना सुद्धा मी आईच्याच भूमिकेत स्वीकारलं आहे...


प्रणाम माऊली !!! 


- खराटा पलटण


आम्ही आमच्या खराटा पलटणच्या माध्यमातून तळजाई टेकडी स्वच्छ केली.खराटा पलटण म्हणजे ज्या आज्यांना भीक मागायची नाही,अशा आज्ज्यांना आम्ही एकत्र केलं आहे,त्यांना युनिफॉर्म दिला आहे या आज्ज्यांच्या मार्फत आम्ही सर्वजण मिळून एखादा सार्वजनिक भाग झाडून पुसून स्वच्छ करतो आणि त्या बदल्यात त्यांना पगार किंवा शिधा देतो.  


तळजाई टेकडी स्वच्छ केल्यानंतर,सद्गुरु श्री शंकर महाराज समाधी ट्रस्ट,चे श्री प्रतापराव भोसले यांनी माझ्या सर्व याचकांना दहा किलो साखर दिली, आम्ही यावेळी या सर्वांना चादरी आणि फराळाचे वाटप केले.महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष, आदरणीय श्री.शेखरजी मुंदडा,राज्यमंत्री हे आमच्या याचक समाजाला भेटायला आले आणि स्वहस्ते त्यांनी हजारो याचकांना दिवाळीनिमित्त फराळ दिला. आदरणीय मुंदडा साहेब मला म्हणाले अभिजीत मी तुला कशी मदत करू ? 


मी म्हणालो,आमचा याचक समाज म्हणजे सहावं बोट आहे... असून फायदा नाही नसून तोटा नाही...! परंतु हि फार मोठी ताकद आहे... 


या ताकदीचा जर उपयोग करून घ्यायचा असेल; तर त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणायला लागेल आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात जर आणायचं असेल तर त्यांना काहीतरी ओळखपत्र देऊन त्यांच्या शिक्षण आणि नोकरी च्या वाटा मोकळ्या केल्या पाहिजेत.


अत्यंत भावुकपणे माझ्या खांद्यावर हात ठेवून,  याबाबत मी नक्की काहीतरी भरीव करेन असं त्यांनी मला वचन दिलं. 


त्यांच्या या "वजनदार" शब्दांनी,माझ्या मनावरचा "भार" थोडा हलका झाला...! 


वैद्यकीय


या महिन्यात रस्त्यावर असहायपणे पडलेल्या अनेकांवर रस्त्यावरच उपचार केले. 


ज्या गोष्टी रस्त्यावर जमत नाहीत, उदा.एक्सीडेंट मुळे हात मोडणे,पाय मोडणे,डोके फुटणे अशांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊन उपचार केले आहेत. 


बरे झाल्यानंतर,भीक मागणे सोडून,काम करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करत आहे.रस्त्यावरच याचकांच्या रक्त लघवी तपासण्या करत आहे.सर्दी पासून कॅन्सर पर्यंत रस्त्यावरच ट्रीटमेंट देत आहे. 


अनेक वैद्यकीय साधने त्यांना देत आहे. 


अनेक वृद्ध याचकांच्या पायात चपला नाहीत,याचं मला नेहमीच वाईट वाटतं.इथून पुढे वैद्यकीय साधनांबरोबरच चपला सुद्धा विकत घेऊन सोबत ठेवणार आहे.*


असो....


जगणं हरलेल्या माणसांसाठी आपल्या सर्वांच्या मदतीने मला जे शक्य आहे ते करतो आहे.यासाठी आपणा सर्वांचेच हात उधार घेतले आहेत, अन्यथा माझ्या दोन हातांनी हे शक्य झालं नसतं...! 


हरणं मिठासारखं खारट असेलही...नव्हे असतंच... पण आयुष्याला चव त्यामुळेच येते ! 


ज्याने कधी हरणं अनुभवलं नाही;त्याला जिंकण्याची गोडी कशी समजेल ? 


आज हरलेली ही माणसं,उद्या नक्की जिंकतील... कारण सोबतीला तुम्ही सर्वजण आहात... !!! 


घड्याळ ही कधीतरी बंद पडतं... मागं पडतं पण म्हणून ते लगेच फेकून द्यायचं नसतं... कधी चावी द्यायचे असते ... कधी सेल बदलायचे असतात....


माझी हि चावी आणि सेल आपणच आहात....!!!


म्हणूनच या महिन्याचा लेखा जोखा आपणा सर्वांना सविनय सादर !!! 


१ नोव्हेंबर २०२४


डॉ.अभिजीत आणि डॉ मनीषा सोनवणे

डॉक्टर फॉर बेगर्स