सिझर…!!
रोमनांनी कार्थेजची राखरांगोळी करून टाकली ! पण असला हा रानवटपणा त्यांच्या हातून चुकून झाला,असे समजण्याची मुळीच गरज नाही.व्यवस्थित रीतीने व विचारपूर्वक ठरविलेली अशी ती विध्वंसक योजना होती.आंतरराष्ट्रीय खुनाची व दुसऱ्यांचे देश बळकावण्याची ती उन्मत अशी साम्राज्यशाहीची राष्ट्रीय वृत्ती होती.रोमन सेनेचा एक भाग कार्थेजचे भस्म करीत असता,दुसरा भाग कॉरिथचा विनाश करण्यात गुंतला होता,तिसरा पूर्वेकडील देशांत रक्तपात करून साम्राज्यविस्तार करण्यात दंग होता व उरलेले सारे सैन्य उत्तरेकडे व पश्चिमेकडे रोमन सत्ता पसरविण्यात गुंतले होते.अशा रीतीने चोहो बाजूंनी साम्राज्याचा विस्तार होत असता खुद्द रोममध्ये काय आलले होते? राज्यसत्ता बळकावण्यासाठी तिथे सारखी भांडणे सुरू होती.रोज रोज कटकटी व काटाकाटी,रोज रोज दंगे व बंडे! जवळजवळ शंभर वर्षे पराक्रमी;पण हडेलहप्पी गुंडांनी रोमवर सत्ता चालविली.
मॅरियस,सल्ला,पॉप,सीझर, कॅशियस,ॲन्टोनी,ऑगस्टस,अशी ही नावे चमकताना आढळतात.प्रत्येक जण जनमताने श्रेष्ठ स्थानावर चढला.पण केवळ जनमताने मात्र श्रेष्ठ नव्हे;हुंदके, दगड,खंजीर यांच्या साह्याने त्यांची मते मिळवून ते सर्वश्रेष्ठ अधिकारी बनले.
रोममधील प्रत्येक निवडणूक म्हणजे लढाईच असे. ज्याच्यामागे अधिक गुंड व पुंड,ज्यांच्या पाठीमागे अधिक मानकापू व गळेकापू,
तोच निवडणूक जिंकी, जो तो स्वतःसाठी,रिपब्लिकसाठी कोणीही नाही,असेच त्या दिवशी दिसे.मॅरियसपासून ऑगस्टपर्यंत सर्वांच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षांमुळे रोम शहर अखंड यादवीने त्रस्त झाले होते.सभ्य इतिहासकारांनी या प्रकारांना यादवी युद्धे हे नाव दिले असले,तरी खऱ्या अर्थाने ते रानटी खाटिकखान्याचेच प्रकार होते.अधूनमधून एकदा प्रामाणिक पुरुष जन्मला येई;
त्याला स्वतःपेक्षा रोमचे कल्याण अधिक महत्त्वाचे वाटे, स्वतःच्या फायद्यापेक्षा रिपब्लिकची चिंता अधिक असे. पण धंदेवाईक मुत्सद्दी व राजकारणी लोक अशा प्रामाणिक पुरुषाचा केव्हाच चेंदामेंदा करून टाकीत, त्याला केव्हाच उडवून देत ! टायबेरियस ग्रॅच्चसने जेव्हा गरिबांपासून बळकावलेल्या जमिनींची फेरवाटणी करण्याचा प्रयत्न केला.तेव्हा सीनेट हाऊसमध्येच त्याचा मुडदा पाडला गेला.त्याच्या डोक्यावर सोटे बसले व तो मेला.त्याचा भाऊ गायस ग्रॅच्चस तसलेच जनहिताचे कायदे करू लागताच त्याचीही तीच गत झाली.प्रामाणिक माणसांना राहण्याला रोम ही सुरक्षित जागा राहिली नव्हती.
दोघाही ग्रॅच्चस-बंधूंना अशा प्रकारे दूर करण्यात आले! त्यानंतर मॅरियस व सुल्ला या दोघांमध्ये रोमच्या नेतृत्वाविषयी स्पर्धा सुरू झाली.सुल्ला हा मॅरियसच्या सैन्यात लेफ्टनंट होता;पण आपण आपल्या सेनापतीपेक्षा अधिक पराक्रमी शिपाई व अधिक योग्यतेचे गृहस्थ आहोत,असे त्याला वाटे.तो बड्या घराण्यात जन्मलेला पॅट्रिशियन होता;मॅरियस गरीब वर्गातला अर्थात प्लिबियन होता.त्यांच्या भांडणाची साद्यंत हकिकत सांगत बसण्यात फारसा अर्थ नाही.त्यांचे परिणाम काय झाले,तेवढे पाहिले म्हणजे झाले.प्रथम मॅरियसच्या हाती सत्ता असता त्याने सुल्लाच्या बऱ्याच अनुयायांना ठार केले; पुढे सुल्लाच्या हाती सत्ता येताच त्याने मॅरियसचे पाच हजार मित्र यमसदनास पाठविले.
प्रत्येकाला वाटले, "जितं मया!" पण रोमला मात्र दोन पराभव सोसावे लागले.त्या दोघांचे आलटून पालटून विजय,पण मधल्यामध्ये रोमचे मात्र मरण! मॅरियस व सुल्ला यांच्यातील ही मारामारी पराकोटीला पोचली असता रोममध्ये तिच्याकडे लक्ष लावून पाहणारे तिघे तरुण होते.या यादवीत पुढे काय होते,इकडे त्यांचे डोळे सारखे लागलेले होते.रोमच्या नेतृत्वाखाली लढत असलेले ते दोघे जुने कसलेले वीर पाहून या तिघा तरुणाच्याही मनात महत्त्वाकांक्षा जागृत झाली व पुढे-मागे रोम आपल्या हाती यावे;आपणच रोमचे सर्वसत्ताधीश व्हावे म्हणून ते प्राणांचा जुगार खेळू लागले.त्या तीन तरुणांची नावे ऐका क्रॅशस,पॉप,सीझर.
सुल्लाने ठार मारलेल्या लोकांच्या लिलावात निघालेल्या इस्टेटी विकत घेऊन क्रॅशस अत्यंत श्रीमंत झाला.पॉपे सुल्लाच्या सैन्यात दाखल झाला व त्याच्या मरणोत्तर तो त्याच्या सेनेचा अधिपती झाला.त्याने रोमविरुद्ध पुन्हा बंड करून उठणारे स्पेनमधले व आफ्रिकेतील प्रांत पुन्हा जिंकून घेतले.तद्वतच पूर्वेकडीलही आर्मीनिया, सीरिया,कॅप्पाडोसिया,पॅलेस्टाईन,पॉन्टस,अरेबिया, फोनिशिया,पॅफ्लागोनिया,इत्यादी कितीतरी प्रदेश पादाक्रांत केले,लुटले,बेचिराख केले!परत येताना पॉपेने चार कोटी डॉलर संपत्ती लूट म्हणून बरोबर आणली होती."पैशाला कधीही घाण नसते"अशी रोमन लोकांत प्रचलित असलेली एक विशिष्ट म्हण आहे.पैसा कसाही मिळविला तरी तो पवित्रच ! पैसा कसा मिळविला ही गोष्ट महत्त्वाची नसून किती मिळविला,ही गोष्ट महत्त्वाची आहे.
रोमन लोक क्रॅशस व पॉपे यांची पूजा करू लागले. रोमचे सर्वांत थोर दोन सुपुत्र अशी त्यांची ख्याती झाली. क्रॅशस व पॉपे.
परस्परांचा द्वेष करीत.शहराची सर्व भक्ती व प्रीती फक्त आपणासच मिळावी यासाठी ते हातघाईवर आले.त्यांची उघड लढाई होणार असे दिसू लागले.पण सीझरने मध्यस्थी केली व त्यांचे भांडण तात्पुरते थांबले.सीझरच्याही मनात स्वार्थी महत्त्वाकांक्षा होत्याच व त्यांच्या पूर्ततेसाठी कॅशसची संपत्ती व पाँपेचे वजन दोहोंचीही त्याला जरुरी होती.म्हणून त्या दोघांनी परस्परांशी न लढता एकत्र यावे,असे त्याने सुचविले.
'जगाला लुटण्यासाठी आपण तिघे मिळून करार करू या,'असे त्याने सुचविल्यावरून 'पहिले त्रिकूट' या नावाने इतिहासात प्रसिद्ध पावलेला जगातील पहिला त्रिमूर्तीचा संघ स्थापन झाला.
या तिघांत सीझर वयाने सर्वांत लहान.पण सर्वांत समर्थ व साहसी होता.लहानपणी त्याला चाचेगिरी करणाऱ्या लुटांरूनी पळवून नेले असता तो मोठमोठ्याने कविता म्हणून त्या चोरांना त्रास देई व थट्टेने म्हणे,कोणीतरी खंडणी भरून मला सोडवील.पण मुक्त होताच मी सैन्य घेऊन परत येईन व तुम्हा सर्वांना क्रॉसवर चढवीन." त्याने हा शब्द पाळला.तो मागेपुढे पाहणारा नव्हता, तेजस्वी व साहसी होता.त्याचे देशबांधव त्याच्या कर्तृत्वाने चकित व भयभीत झाले.या वेळी तो फक्त वीस वर्षांचा होता;पण मुख्य धर्माचार्याच्या जागेवर त्याने सक्तीने स्वतःची निवड करून घेतली,तेव्हा त्याच्या हेतूंविषयी प्रसिद्ध वक्ता सिसरो याला व इतर पुष्कळांना शंका आली.राजसत्ता हाती घेण्याचा त्याच विचार असावा,असे त्यांना वाटले. सिसरो लिहितो, "त्याचे केस अत्यंत व्यवस्थित रीतीने विंचरलेले असतात.एका बोटाने तो नेहमी आपले केस नीट करीत असतो.असल्या माणसाच्या डोक्यात रोमन सरकार उलथून टाकण्याचा विचार येईल अशी कल्पानाही मी करू शकत नसे." पण सीझरच्या मनातील विचार आपणास नीट वाचता आले नाहीत असे पुढे सिसरोला आढळून आले..सीझर केवळ राजकीय महत्त्वाकांक्षा व राजसत्ता यांचाच नव्हे;तर प्रेमाचाही आचार्य होता.रोममधील कितीतरी तरुणींना त्याने मोह पाडला होता;आणि ही गोष्ट सर्वांना माहीत होती.त्याला 'प्रत्येक स्त्रीचा नवरा' अशी पदवी मिळाली होती! पण त्याने स्वतःच्या पत्नीचा मात्र त्याग केला होता.कारण,त्याच्याच एका मित्राने तिच्याजवळ प्रेमयाचना करण्याचा लाळघोटेपणा चालविला होता.आपली पत्नी आपल्या मित्राच्या प्रेमयाचनेला बळी पडली,असे समजावयाला त्याला काहीही कारण मिळाले नव्हते;तरीही त्याने तिचा त्याग केला.कारण,'सीझरची पत्नी संशयातीतच असली पाहिजे'असे तो म्हणे.कारकिर्दीच्या प्रारंभी त्याच्याजवळ पैसा नव्हता;पण दुसऱ्यांचे पैसे घेऊन तो खूप उदारपणा दाखवी.एकदा त्याला चाळीस-पन्नास लाख रूपये कर्ज झाले.क्रॅशसशी संधान बांधण्यात हे कर्ज फेडून टाकण्याला त्यांचे पैसे मिळावेत असा सीझरचा हेतू होता.
सीझर,पाँपे व क्रॅशस यांनी आपापल्या वर्चस्वाची तीन क्षेत्रे मुक्रर केली.एखाद्या खुसखुशीत भाकरीप्रमाणे त्यांनी जगाचे तीन तुकडे केले व सर्व जग आपसांत विभागून घेतले.सीझरने स्पेनचा कब्जा घेतला, क्रॅशसला आशियात पाठविण्यात आले,पाँपे रोममध्येच राहिला.पुढे लवकरच एका लढाईत कॅशस ठार झाला, तेव्हा एक ब्याद आपोआपच दूर झाली म्हणून सीझर व पाँपे यांना आनंद झाला.कारण,आता रोमवरील प्रभुत्वासाठी उघडपणे नीट लढता आले असते;तिसरा कोणी मध्ये पडण्याला उरला नव्हता.पण सीझरसमोर दुसरी एक अधिक मनोवेधक योजना सध्या होती.
अलेक्झांडरप्रमाणे त्यालाही जग जिंकण्याची महत्त्वाकांक्षा होतीच.आपल्या हयातीत माणसाला जगाचा किती भाग जिंकून घेता येतो हे पाहण्याचे त्याने ठरविले;व पाँपेशी अधिकच आत्मीयता जोडली.त्याने आपली जुलिया नामक मुलगी पाँपला दिली.आपण दिग्विजयावर असताना पाँपेने इकडे कपट कारस्थाने करून रोमचा कब्जा घेऊ नये,म्हणून त्याने ही योजना केली व नवीन अज्ञात प्रदेश जिंकण्यासाठी तो निघाला. तो स्पेनमधून फ्रान्समध्ये उतरला.फ्रान्सचे तेव्हाचे नाव गॉल होते.तिथे मोठमोठे विजय व खूप लूट मिळवून तो खाडी ओलांडून ब्रिटनमध्ये गेला.
पुष्कळांना ब्रिटन एक काल्पनिक देश वाटत असे.त्याचे शिपाई म्हणाले, "या खाडीपलीकडे देश नसेल;तेव्हा आम्हाला कोठेतरी अंधारात नेत आहात.तुम्ही आम्हास पृथ्वीच्या कडेला न्याल व तिथे अथांग खड्यात पडून आम्ही गडप होऊ." पण असल्या भ्याड व भोळसट कल्पनांमुळे न गांगरता त्यांकडे दुर्लक्ष करून तो निघाला व त्यांना खराखुरा देश दिसला.तिथेही पुन्हा नवीन विजय व नवीन लूट मिळेल असे मग सर्वांस वाटले.पण ब्रिटनवरील ही स्वारी निराशाजनक ठरली.प्ल्युटार्क लिहितो,'तिथे सीझरने ज्या अनेक लढाया केल्या,त्यामुळे शत्रूचे जरी पुष्कळ नुकसान झाले.तरी सीझरचाही फारसा फायदा झाला नाही.ब्रिटनमधील लोक अत्यंत दरिद्री होते.लुटून नेण्यासारखे त्यांच्याजवळ काहीही नव्हते.
सीझर परत गॉलमध्ये आला.फ्रान्सच त्याच्या लुटारू वृत्तीला व बुद्धीला अधिक योग्य होता.तो दहा वर्षे आसपास लूटमार करीत राहिला,हेल्वेटियन,बेल्जियन, जर्मन,ॲक्विटेनियन वगैरे लोकांना जिंकून त्याने यथेच्छ लुटले ! तो कुबेर बनला.त्याने आपले वैभव व आपली कीर्ती वाढविली.'सीझरच्या गॅलिक लढाया' हे पुस्तक बायबलखालोखाल शाळांमध्ये वाचले जाते;पण त्यांत सीझरने केलेल्या लुटालुटीच्या,वाटमाऱ्यांच्या व खुनांच्या रद्दी व रानवट गोष्टींशिवाय दुसरे काय आहे? असले भिकार व विषारी वाड् मय मुलांच्या हाती पडणे अयोग्य नव्हे काय ? असल्या रानवट प्रचारापासून आपण आपल्या मुलांचे रक्षण केले पाहिजे.अजूनही तसे करण्याची वेळ नाही का आली?
प्ल्युटार्कने एकाच वाक्यात फ्रान्समधील विजयांचे वर्णन केले आहे.तो लिहितो,दहा वर्षांहूनही कमी काळात त्याने आठशे शहरे जिंकली व तीनशे लहान लहान राज्यांना शरण यावयास लावले.या दहा वर्षांत तो ज्या ज्या लोकांशी लढला,त्या सर्वांची संख्या तीस लाख धरली,तर त्यांपैकी दहा लाख त्याने ठार मारले व आणखी दहा लाख कैद केले!"
याप्रमाणे इकडे सीझर गॉल लोकांच्या धुव्वा उडवीत असता,त्यांना पायाखाली चिरडून टाकीत असता, रोममधील त्याचे महत्त्व कमी व्हावे म्हणून पॉपे खटपट करीत होता.त्याच्या कृत्रिम मैत्रीतील शेवटचा दुवा तुटला;पाँपेची पत्नी (सीझरकी मुलगी जुलिया) बाळंतपणात मरण पावली.त्या दोघांत उघड वैर पेटले. आपणाली सर्वाधिकारी केले जावे,यासाठी पाँपे कारस्थाने करू लागला.
सीझरच्या कानी ही वार्ता पडताच तो झपाट्याने इटलीत आला.व स्वतःच्याच रोम शहरावर त्याने आपल्या सैन्यानिशी स्वारी केली रूबिकॉन नदी ओलांडून इटलीत शिरण्यापूर्वीच्या रात्री त्याला एक दुष्ट व अपवित्र स्वप्न पडले होते.सीझर रोमवर चालून येत आहे असे ऐकताच पाँपे पळाला, इतर अधिकारी,कॉन्सल्स,सिनेटर्स,सारे पळाले! 'कर्णधाराने सोडून दिलेल्या नावेच्या प्रमाणे रोमची स्थिती होती.'सीझर दरवाज्यातून आला व रोममध्ये अराजक आहे असे जाहीर करून शांतता व सुव्यवस्था टिकविण्यासाठी त्याने स्वतःला हुकूमशहा केले.त्यानंतर त्याने शहराची तिजोरी फोडली व तिच्यातील सार्वनिक पैशाचा उपयोग केला.आपल्या देशबांधवांसमोर केलेल्या सुंदर भाषणात तो म्हणाला,
"मी हे सारे तुमच्यासाठी करीत आहे व जर कोणी मला या लोककल्याणाच्या कार्यात विरोध करील,तर त्याला मी ताबडतोब यमसदनास पाठवीन."
रोममध्ये आपले आसन स्थिर करून व तिथे काही संरक्षक शिबंदी ठेवून तो पाँपेचा पाठलाग करीत निघाला.आपल्या शत्रूचा निःपात करण्यात तो इतका अधीर झाला होता की,तो अत्यंत वेगाने निघाला.त्याचे शिपाईही या अती धावपळीला कंटाळून जरा कुरूकुरू लागले.ते आपसांत म्हणत.सीझर आम्हाला थोडासा विसावा केव्हा व कोठे देणार? जरा तरी विसावा हा देईल का? आम्हा मानवांविषयी त्याला काही सहानुभूती नसेल वाटत तर न वाटो;पण निदान ही आमची चिलखते,हे आमचे पट्टे यांवर तरी त्याने करुणा नको का करायला? सीझरच्या या अघोरी महत्त्वाकांक्षेपेक्षा वर्षांनुवर्षे ज्या लढाया अखंड चालल्या आहेत,त्या लढतालढता ही आमची चिलखते झिजून गेली,ही आमची शिरस्त्राणे निस्त्राण झाली!"
पण रोमन सैन्याची शिस्त कडवी होती.शिस्तीत वाढलेले असल्यामुळे शिपाई पुन्हा शांत झाले,तक्रारी मिटल्या व ते सीझरबरोबर ग्रीसच्या उत्तरेकडील थेसिली भागात गेले.सीझरने पाँपेच्या जीर्ण-शीर्ण-विदीर्ण सेनेला गाठून पाँपेचा मोड केला.पाँपे पळाला;गलबतात बसून तो इजिप्तमध्ये निसटून गेला.
शिल्लक भाग दुसऱ्या लेखामध्ये…