* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२९/३/२३

Law of Diminishing Marginal Utility "घटत्या उपभोग्यतेचा सिद्धांत"

एका जंगलात एक शिकारी आपल्या सावजाचा पाठलाग करता करता रस्ता चुकला.सावज तर पळूनच गेले आणि ह्या शिकाऱ्याला जंगलाच्या बाहेर पडायचा मार्ग मिळे ना! मार्ग शोधता शोधता तो आणखीनच जंगलाच्या आतल्या भागात गुंतत गेला.एक दिवस गेला,दोन दिवस गेले,तीन दिवस गेले तरी हा शिकारी जंगलाच्या बाहेर पडू शकला नाही.भुकेने व्याकूळ झालेला हा माणूस कुठे काही खायला मिळतेय का ते शोधू लागला.तेवढ्यात एक सफरचंदाचे झाड त्याच्या दृष्टीस पडले.धावतच तो त्या झाडाकडे गेला आणि त्याने सफरचंद काढण्यास सुरुवात केली.दहा सफरचंद काढल्यानंतर त्याने एका जागी बसून ती खायला सुरुवात केली.तीन दिवसांचा उपास घडलेल्या त्या शिकाऱ्याने पहिले सफरचंद मोठ्या आवडीने खाल्ले आणि त्याच बरोबर ते सफरचंद मिळाल्याबद्दल परमेश्वराचे मनापासून आभारही मानले.दुसरे सफरचंद खाताना त्याला पहिल्या सफरचंदाएवढा आनंद मिळाला नाही.तरीही त्याने भुकेपोटी ते खाल्लेच;आणि देवाप्रति कृतज्ञता व्यक्त केली.जसजसे त्याचे पोट भरू लागले तसतशी त्याला त्या पुढच्या सर्व सफरचंदांमधील गोडी कमी वाटू लागली.दहावे सफरचंद तर त्याने टाकून दिले.

ह्या मानवी वृत्तीला अर्थशास्त्रामध्ये Law of Diminishing Marginal Utility म्हणजेच "घटत्या उपभोग्यतेचा सिद्धांत" असे म्हणतात.ही केवळ घटती उपभोग्यता नसते तर ती " घटती कृतज्ञता " असते.! आयुष्यात आपल्याला मिळालेल्या विविध सुखसोयींबद्दल विधात्याप्रति ऋण व्यक्त करण्याची आपली मानसिकताही घटतीच असते.आणि सर्व काही मिळाल्यानंतर तर ती शून्य होऊन जाते.कारण आपल्याला जे काही मिळाले आहे तो तर आपला हक्कच आहे,त्यात कुणाचे ऋण कसले व्यक्त करायचे,अशी वृत्ती होऊन जाते.ह्या कथेत तो शिकारी म्हणजे आपण सर्वजण आहोत आणि ती सफरचंदं म्हणजे आपल्याला आपल्या आयुष्यात मिळालेल्या सर्व सुखसोयी !आपल्याकडे ह्या सर्व सोयी उदंड असताना आपल्याला कुणाच्या ऋणाची जाणीवही होत नव्हती.उलट आपण सतत कुठल्या ना कुठल्या कारणांनी उदा.नोकरीतील काम,वाढत्या किंमती,सरकारी धोरण,वाढलेला ट्रॅफिक,प्रदूषण ह्यांबाबत तक्रारीच करीत होतो.पण

आज आपण ' तक्रार  मोडवरून ' एकदम 'कृतज्ञता मोडमध्ये' आलेले आहोत.

आज 'मला भाजी मिळाली','मला दूध मिळालं', 'मी सुरक्षित आहे','मी तंदुरुस्त आहे.'असल्या गोष्टींसाठी आपण देवाचे आभार मानतो.दोन महिन्यांपूर्वी जर कुणी आपल्याला सांगितलं असतं की ह्या सर्व गोष्टी हा आपला हक्क होऊ शकत नाही,त्या आपल्याला कुणामुळे तरी मिळताहेत;तर ते पटलंही नसतं.ह्या परिस्थितीनं आपल्याला कृतज्ञ व्हायला शिकवलं हे निश्चित ! आता पुढल्या आयुष्यात आपण 'कृतज्ञ' म्हणून वागायचं की 'उद्विग्न' म्हणून वागायचं हे प्रत्येकाने ठरवायचे आहे.कृतज्ञ म्हणून वागण्याने आपला आनंद वाढतो; कारण आपल्याला काय काय मिळालं आहे याचेच विचार आपल्या मनात घोळत असतात.पण उद्वेग धारण करून वागण्याने आपल्या दुःखात भर मात्र पडते.


ह्याचे एक फारच सुंदर उदाहरण म्हणजे गेल्या महिन्यात इटलीमध्ये घडलेली कथा.


साठ वर्षे वयाचा एक रुग्ण बरा होऊन दवाखान्यातून घरी जायला निघतो.दवाखान्याचे बिल बघून तो ओक्साबोक्शी रडायला लागतो. डाॅक्टर मंडळी त्याला धीर देतात आणि त्याचे बील कमी करण्याची तयारी दाखवितात.पण त्याचे रडण्याचे कारण ऐकल्यावर डाॅक्टरांच्या डोळ्यातही पाणी येते.तो म्हणतो "मी बिलाची रक्कम पाहून नाही रडलो.माझी आर्थिक स्थिती खूपच चांगली आहे. पण ह्या बिलामध्ये शेवटच्या रकान्यात एक दिवसाच्या ऑक्सिजनचा आकार जो ५००० युरो लावलेला आहे,ते पाहून माझ्या मनात विचार आला की मी निसर्गाचे (परमेश्वर)किती देणे लागतो; कारण हा एवढा महागडा प्राणवायू मी गेली साठ वर्षे निसर्गाकडून विनामूल्य मिळवतोय."

अशी कृतज्ञता असेल तर जीवनात फक्त आनंदच दिसणार आहे.आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी फक्त 'धन्यवाद' ह्या शब्दाची पारायणं करायची आहेत.अन्य काहीच नाही.जेवढ्या जास्त वेळा कृतज्ञता व्यक्त कराल तेवढ्या जास्त घटना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी घडतच जातील.कृतज्ञता निसर्गाप्रती आणि व्यक्तींप्रती हे जे विनामूल्य आहे तेच सर्वात मौल्यवान आहे.झोप,शांतता,आनंद,हवा,पाणी,प्रकाश आणि सर्वात जरूरी आपला श्वास,नेहमी आनंदी रहा.


..अनामिक

२६/३/२३

द ओरिजिन ऑफ स्पीशीज - चार्ल्स डार्विन ( १८५९ )

डार्विन जिवंत असेपर्यंत 'ओरिजिन ऑफ स्पीशीज'च्या प्रत्येक आवृत्तीत अनेक बदल होत गेले आणि दर वेळी त्यात नवीन माहिती लिहिली गेली;त्यातल्या चुका दुरुस्त करत नवीन पुरावेही जोडले गेले आणि काही रेखाटनंही काढली गेली.दर वेळी हे पुस्तक अधिकाधिक चांगलं आणि वाचनीय होत गेलं.या पुस्तकात डार्विननं उत्क्रांतीची थिअरी अतिशय सोपी उदाहरणं देऊन स्पष्ट केली.आजही त्याचं 'द ओरिजिन ऑफ स्पीशीज' हे पुस्तक प्रचंड लोकप्रिय आहे, जितकं तो जिवंत असताना होतं.


पृथ्वी कधी आणि कशी निर्माण झाली,सजीव कधी आणि कसे निर्माण झाले किंवा मानवाची उत्क्रांती नेमकी कशी झाली या विषयांबद्दल लोकांच्या मनात पूर्वीपासून नेहमीच कुतूहल होतं.१८ व्या शतकाच्या आधी मानवाची किंवा कुठल्याही सजीवांच्या उत्क्रांतीमागे दैवी शक्तीचाच हात आहे आणि त्यानं निर्माण केलेला प्रत्येक जीव हा सुरुवातीला जसा निर्माण केला होता तसाच कायम आहे,असा समज अनेक लोकांचा होता;पण चार्ल्स डार्विनच्या 'द ओरिजिन ऑफ स्पीशीज' या पुस्तकानं मानवाची उत्क्रांतीबाबतची विचारधाराच बदलून टाकली! हा चार्ल्स डार्विन होता कोण ? त्यानं 'द ओरिजिन ऑफ स्पीशीज' कधी आणि का लिहिलं? डार्विनच्या आधी सजीवांच्या उत्क्रांतीबाबत जाणून घेण्यासाठी कोणी कोणी खूपच प्रयत्न केले? सजीवांच्या उत्क्रांतीमध्ये कुठलेच बदल झाले नाहीत,कारण सजीवांची निर्मिती परमेश्वरानं निर्माण केलीये,असं ग्रीसमधल्या ॲरिस्टॉटलनं म्हणून ठेवलं होतं आणि ॲरिस्टॉटल जे म्हणेल ते चर्चसाठी प्रमाण होतं.रोमचा लुक्रेटिअससह अनेकांनी ॲरिस्टॉटलचं समर्थन केलं होतं.इतकंच काय, पण खुद्द चार्ल्स डार्विनचे आजोबा इरॅस्मस डार्विन यांचंही ॲरिस्टॉटलसारखंच मत होतं. उत्क्रांतीवादात चर्चच्या विरोधात जाऊन आपली लॅमार्किझमची थिअरी फ्रेंच शरीरतज्ज्ञ आणि वनस्पतिशास्त्रज्ञ जाँ बॉप्तिस्ट द लॅमार्क यानं मांडली.लॅमार्काचा कट्टर शत्रू असलेला जॉर्ज कॅव्हिए यानदेखील ॲरिस्टॉटलच्या विचारांना विरोध केला होता.लॅमार्कन सविस्तर मांडणी करत 'झुऑलॉजिकल फिलॉसॉफी' हे पुस्तकही लिहिलं.'प्रत्येक जीव शिडीच्या खालच्या टोकापासून वरपर्यंत जायच्या प्रयत्नात जास्त गुंतागुंतीचा बनत जातो.आजूबाजूच्या परिस्थितीनुसार प्रत्येक जीव आपल्या काही अवयवांचा जास्तीत जास्त उपयोग करतो (उदाहरणार्थ, जिराफाची मान) आणि हे अवयव कालांतरानं बळकट होतात आणि परिस्थितीमुळं झालेले हे बदल म्हणजेच गुणधर्म पुढच्या पिढीकडे आपोआप 'जातात' असे मुद्दे त्यानं मांडले होते.खरं तर 'पृथ्वीवरचे जीव हे स्थिर नसून त्यांच्यात कालांतरानं हळूहळू बदल घडत जातात' हे लॅमार्कनंच सर्वप्रथम ओळखलं होतं. त्याच्या आधी ही थिअरी कुणीही मांडली आणि ही थिअरी चक्क देवाला आव्हान देणारी असल्यानं लॅमार्कला चर्चचा नसल्यान आणि रोष पत्करावा लागला होता.!यानंतर आला तो चार्ल्स डार्विन ! 


चार्ल्स डार्विनचा जन्म १२ फेब्रुवारी १८०९ या दिवशी इंग्लडमधल्या श्रॉप्शायर शहरातल्या श्रुसबरी गावात  एका सधन आणि सुशिक्षित कुटुंबात झाला.चार्लसचे आजोबा इरॅस्मस डार्विन आणि वडील रॉबर्ट डार्विन दोघंही प्रसिद्ध डॉक्टर होते.आपल्या सह मुलांपैकी चार्ल्सनं आपले आजोबा आणि वडील यांच्याप्रमाणे डॉक्टर व्हावं,अशी चार्लसच्या वडिलांची इच्छा होती.

चार्ल्स डार्विनची आई त्याच्या वयाच्या आठव्या वर्षी वारली.त्यामुळे घरात धाक दाखवायला कोणी न उरल्यामुळे लहानपणी चार्ल्सला शाळेपेक्षा निसर्गामध्ये रमायला जास्त आवडायचं.किडे,भुंगे पकडणं आणि त्याच तासन् तास निरीक्षण करण हा त्याचा आवडता उद्योग असायचा.त्याच्या या उद्योगांमुळ त्याचे वडील नेहमीच त्याच्यावर वैतागायचे शालेय शिक्षण संपल्यावर काही दिवस चार्ल्सनं आपल्या वडिलांना त्यांच्या दवाखान्यात मदत केली होती. त्यानंतर डॉक्टर होण्यासाठी चार्ल्स एडिंबर विद्यापीठात दाखल झाला.रुग्णांचे रक्त शस्त्रक्रियेदरम्यान होणाऱ्या वेदनांमुळ किंचाळणारे रुग्ण आणि एकूणच हॉस्पिटल वातावरण चार्ल्सला आवडायचं नाही.रक्त बघितलं की त्याला मळमळून यायचं.तसंच तिथलं शिक्षणही त्याला कंटाळवाणं वाटायच मग तिथे असलेल्या प्लिनियन सोसायटीचं त्यानं सदस्यत्व घेतलं.इथे विज्ञानातल्या जुन्या विचाराना आव्हान देणाऱ्या चर्चा होत.धर्मातल्या अनेक गोष्टींवर वादचर्चा होत.ही गोष्ट कानावर पडताच चार्ल्सच्या वडिलांनी त्याची एडिंबरो विद्यापीठातून उचलबांगडी केली आणि चक्क त्याला पाद्री बनवण्याचा निर्णय घेतला.! पण धर्मोपदेशक होण्यासाठी चार्ल्स डार्विनला बीएची पदवी मिळवणं भाग होतं.त्यासाठी त्यानं केंब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतला. इथे धर्मशास्त्रासोबतच,भूशास्त्र, प्राणिशास्त्र,

वनस्पतीशास्त्र यांच्यासारखे विषयही शिकवले जायचे;पण डार्विन धर्मशास्त्र सोडून भूशास्त्र,

प्राणिशास्त्र,वनस्पतीशास्त्र या विषयांमध्येच जास्त रमायला लागला! इथे असताना डार्विनला फॉक्स नावाचा तरुण भेटला.त्याला फुलपाखरं जमवण्याचा नाद होता. त्याच्या नादामुळे मग डार्विननंही फुलपाखरासह अनेक कीटक जमवणं सुरू केलं.याच दरम्यान केंब्रिज विद्यापीठातल्या जॉन स्टीव्हन्स हेन्स्लो या वनस्पती शास्त्रज्ञाची ओळख फॉक्सनं करून दिली आणि त्यांच्या हाताखाली शिकण्याची संधी डार्विनला मिळाली.या काळात दोघांचं चांगलंच सूत जमलं.त्या जोडीला बघून तिथले टारगट विद्यार्थी हेन्स्लोची फोड करत हेन स्लो म्हणजेच मंद कोंबडीबरोबर फिरणारा,असं म्हणत डार्विनला चिडवत असत.विलियम पॅले या ब्रिटिश नॅचरलिस्ट आणि थिऑलॉजिस्टनं लिहिलेल्या 'नॅचरल थिऑलॉजी' या पुस्तकाचा डार्विनवर चांगलाच प्रभाव पडला.इथे असताना सजीवांची उत्क्रांती या विषयाबद्दलचं डार्विनचं कुतूहल आणखीनच वाढलं होतं.याच सुमारास डार्विनच्या आयुष्याला वळण देणारी एक घटना घडली.त्या काळी वेगवेगळ्या बेटांवरचा अभ्यास आणि वैज्ञानिक संशोधन करण्यासाठी अनेक जलमोहिमा निघायच्या.

ब्राझीलमध्ये झालेल्या अशाच मोहिमांची प्रवासवर्णनं डार्विननं वाचली आणि आपणही अशीच कोणती तरी धाडसी मोहीम करावी असं त्याला वाटायला लागलं. १८३१ साली तो पदवीधर झाला आणि पुढचं शिक्षण घेण्याऐवजी त्यानं चक्क एक धाडसी जलप्रवासी मोहीम आखली;पण काही कारणांमुळे त्याची ही मोहीम बारगळली.मात्र लवकरच एक चांगली संधी चालून आली. १८३१ साली कॅप्टन रॉबर्ट फिट्झरॉयच्या नेतृत्वाखाली रॉयल नेव्हीची एक (एच.एम.एस. बीगल) बोट मोहिमेवर निघणार होती.चिली,पेरू, इंडियन द्वीपसमूह यांचा अभ्यास,

सर्वेक्षण,नकाशा तयार करणं,घड्याळं तपासणं अशी अनेक कामं ते करणार होते.आपल्याबरोबर एका जीवशास्त्रज्ञानं याव म्हणून फिट्झरॉय यांनी हेन्स्लो म्हणजेच डार्विनच्या गुरूला प्रस्ताव दिला.त्यांना जाण शक्य नसल्यानं त्यांनी तो प्रस्ताव डार्विनसमोर ठेवला आणि २३ वर्षांच्या डार्विननं आनंदानं होकार दिला,पण गंमत म्हणजे बीगलच्या कॅप्टननं मात्र डार्विनकडे बघून 'याचं नाक मला आवडलं नाही,'असं' म्हणत चक्क आपल्या बरोबर घ्यायला सुरुवातीला नकार दिला होता.मग हेन्स्लोन कॅप्टनची कशीबशी समजूत काढून त्याला राजी केलं. पुढे या प्रवासात कॅप्टन डार्विनचा जबरदस्त फॅन झाला हेही तितकंच खरं! खरं तर या जलमोहिमेत डार्विनची काही वर्ष वाया जाणार होती आणि दुसरं म्हणजे डार्विनला या प्रवासाचा आपला खर्च स्वत:लाच उचलावा लागणार होता! त्यातच त्याच्या वडिलांनी त्याला या प्रवासासाठी एक दमडीही देणार नाही,असं सांगितलं होतं.या जलप्रवासाची मोहीम दोन वर्षांची आखण्यात आली होती,पण प्रत्यक्षात मात्र पुन्हा इंग्लंडला परतायला या बोटीला चक्क पाच वर्ष लागली.या प्रवासात डार्विननं टेनेराईफ, केप वर्दे,ब्राझील,गॅलापोगॅस अशा अनेक बेटांना भेटी दिल्या.प्रत्येक ठिकाणच्या वनस्पती,पक्षी, समुद्री जीव आणि किडे यांची तो माहिती गोळा करत असे.अनेक ठिकाणचे जीवाश्मही त्यानं गोळा केले होते.कधीकधी समुद्री प्राण्यांचं विच्छेदन करून त्याची निरीक्षणंही तो लिहून ठेवायचा.तो काही नमुने आणि त्यांच्याविषयीची निरीक्षण केंब्रिज विद्यापीठातही पाठवायचा.विद्यापीठात आपली निरीक्षणं पाठवताना तो त्याची एक कॉपी आपल्या घरच्यांसाठीही पाठवायचा.त्याला या प्रवासात विविध बेटांवरची भूशास्त्रीय विविधतेची माहितीही झाली.

भूकंप,ज्वालामुखी,वादळं,स्थानिक लोकांचे हल्ले यांसारख्या अनेक संकटांचाही त्याला अनुभव आला.या प्रवासादरम्यान त्यानं दक्षिण अमेरिकेतल्या बेटांवर होणारी गुलामगिरीही बघितली आणि ती बघून तो प्रचंड अस्वस्थही झाला.जलप्रवासादरम्यान जितकी बेटं डार्विन फिरला त्या सगळ्या बेटांमध्ये त्याला सगळ्यात भावलेलं बेट म्हणजे गॅलापाँगास.या बेटावर त्याला जी विविधता दिसली ती इतर कुठल्याही बेटावर दिसली नाही.या ओसाड बेटावर त्याच्या अपेक्षेपेक्षा जास्त वैविध्य दिसलं.या बेटावरचे प्राणी इतर बेटांवरच्या प्राण्यांपेक्षा प्रचंड मोठे होते.मोठमोठ्या पाली,कासवं,सी लायन,खेकडे यांसारखे बलाढ्य प्राणी त्यानं याआधी कुठेच पाहिले नव्हते.डार्विनला बोट लागत असल्यान त्याला या प्रवासात चांगलाच त्रास झाला,तसचं तो वारंवार आजारी पडायचा.त्यातच परतीच्या प्रवासात डार्विन सपाटून आजारी पडला,इतका की त्याला चक्क व्हीलचेअरवर खिळून राहावं लागलं.या वेळी त्यानं ल्येल या भूवैज्ञानिकानं लिहिलेलं 'प्रिन्सिपल्स ऑफ 'जिऑलॉजी' नावाचं भूशास्त्रावरचं पुस्तक वाचलं आणि या पुस्तकाचा खूप मोठा प्रभाव त्याच्यावर पडला. ल्येल यानं पृथ्वीच्या भूरचनेत शतकानुशतकं कसकसे बदल होत गेले याविषयी लिहिलं होतं.या जलप्रवासामुळं डार्विनची तब्येत खराब झाली असली तरी डार्विनला या जलप्रवासातून दोन मोठे फायदे मात्र नक्कीच झाले होते.एक तर त्यानं या प्रवासात केलेलं काम आणि जमा केलेले नमुने बघून डार्विनला हे संशोधन असंच पुढं चालू ठेवता यावं यासाठी त्याला दरवर्षी ४०० पौंड देण्याचं त्याच्या वडिलांनी कबूल केलं. प्रत्येक जीव वेगळा असला तरी त्या प्रत्येकाची एकाच पूर्वजाकडून उत्पत्ती झाली असली पाहिजे,असं डार्विनला नेहमी वाटायचं,पण धर्मात प्रत्येक जीव वेगळा निर्माण झाला आहे आणि तो पहिल्यापासूनच आता जसा दिसतो तसाच निर्माण केलेला आहे असं मानलं जायचं.देवानं त्याला हव तसंच प्रत्येक जीवाला निर्माण केलं आणि नंतर त्यांच्यात कधीही बदल झालेले नाहीत,अस सांगून ठेवल्यामुळं आणि लोक पापभीरू असल्यानं हाच विचार अनेक पिढ्या चालत आला होता. डार्विनलाही लहानपणापासून हेच शिकवलं गेलं होतं;पण त्या वेळीही त्याला हे विचार मनापासून कधीच पटले नव्हते पण आपल्या मनाला पुष्टी मिळेल असं ठोस त्याला आतापर्यंत काहीच सापडत नव्हतं, ते त्याला या जलसफरीत सापडल. इथूनच त्याचं उत्क्रांतीवादाचं आकर्षण वाढणार होतं आणि ही खरी त्याची 'द ओरिजिन ऑफ स्पीशीज' या पुस्तकाची सुरुवात असणार होती.डार्विननं आपल्या प्रवासात जीवाश्मांचे जे नमुने गोळा केले होते ते त्यानं मोहिमेवरून परत आल्यावर निरीक्षणासाठी काढले.त्यातली पक्ष्यांची पिसं आणि चोची त्यानं जॉन गूल्ड या प्रसिद्ध पक्षितज्ज्ञाकडे निरीक्षणासाठी दिली. डार्विनला हे नमुने १३- १५ वेगवेगळ्या पक्ष्यांचे असतील असंच वाटलं होतं;पण त्याला गूल्डन या नमुन्यांच्या निरीक्षणानंतर जे सांगितलं, ते ऐकून डार्विन चक्क उडालाच. गूल्डनं हे नमुने फ्लिंच या एकाच पक्ष्याच्या विविध जातींचे आहेत,असं डार्विनला सांगितलं.!नमुन्यातली पिसं आणि चोची यांच्यामध्ये इतकी विविधता होती की,ही एकाच पक्ष्याची विविध रूपं आहेत यावर सुरुवातीला विश्वास बसणं थोडं कठीण होतं.बरं,डार्विननं प्रत्येक बेटावर या पक्ष्यांच्या सवयी,त्यांचं वागणं अशा अनेक गोष्टींची निरीक्षणंही केली होती.त्यांच्या सवयी थोड्याफार सारख्या असल्या,तरी त्या वेगळ्या पक्ष्यांच्या असाव्यात इतपत वेगळ्या होत्या. त्यांच्या चोचीही एकसारख्या नव्हत्या.त्यामुळंच तर डार्विनला या एकाच पक्ष्याच्या विविध जाती आहेत,अशी शंका येणं शक्यच नव्हतं.बरं यातली कोणतीही बेटं फार प्राचीन अशी नव्हतीच. त्यातल्या त्यात इतर बेटांपेक्षा गैलापागास बेटांवर तर त्याला अनेक विविध प्रकारचे पक्षी आणि प्राणी आढळले होते.एकाच पक्ष्याचे इतके विविध प्रकार का असावेत ? जर धर्मानुसार देवानं प्रत्येकाला निर्माण केलं असेल तर देवाने त्यांच्यात इतक्या जाती कशासाठी निर्माण केल्या असाव्यात ? असे प्रश्न त्याला आता भंडावून सोडत होते.या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी डार्विनन या विषयाच्या आणखीन खोलात जायचं ठरवलं.त्यानं उत्क्रांतीविषयी अधिक माहिती मिळवायला सुरुवात केली;पण अजून अनेक प्रश्नांची उत्तरं त्याला शोधायची होती. उदाहरणार्थ,दोन रंगांचं गुलाब तयार करायचं असेल तेव्हा दोन रंगांच्या गुलाबाच्या झाडांना कलम करून दोन रंगांचे गुलाबाचं फूल मिळवणे शक्य आहे.हाच प्रयोग पाळीव प्राणी,पक्षी किंवा वनस्पती यांच्यावरही करता येतो.एकदा हा प्रयोग यशस्वी झाला की,याच प्रकारे या नवीन जातींची संख्याही वाढवता येते.अगदी पिकांमध्येही हे शक्य होतं.यालाच 'सिलेक्टिव्ह ब्रीडिंग' असं म्हणतात.हे डार्विनला माहीत होतं. याचाच अर्थ गुणधर्म हे एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे जातात,ही लॅमार्कनं सांगितलेली थिअरी बरोबर आहे,असं डार्विनच्या लक्षात आलं;पण हे मानवी कृतीमुळे झालेले बदल होते. हीच थिअरी जर नैसर्गिकरीत्या बदलांना लागू होत असेल तर मुळात प्राण्यांना किंवा पक्ष्यांना हे बदल करावेच का लागत असतील ? अनैसर्गिक पद्धतीनं होणाऱ्या या 'सिलेक्टिव्ह ब्रीडिंग'ला माणूस जबाबदार असतो,मग निसर्गात होणाऱ्या 'सिलेक्टिव्ह ब्रीडिंग'ला निसर्ग जबाबदार असेल का? जसं माणूस आपल्याला हवी ती जात तयार करून घेतो तसंच काहीसं निसर्ग आपल्याला हवे तसे प्राणी,पक्षी किंवा वनस्पती निर्माण करत असेल का? असे अनेक प्रश्न त्याला पडले.या प्रश्नांची उत्तरं डार्विनला १८३८ साली थॉमस माल्थस यानं १७९८ साली लिहिलेल्या 'अँन एसे ऑन द प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन' या निबंधातून मिळाली.माल्थसनं लोकसंख्या आणि अन्नपुरवठा यांच्यातला संबंध कसा असतो हे सांगितलं होतं.'माणसं सतत लैंगिक सुखाच्या मागे वेड्यासारखी धावत असल्यामुळे लोकसंख्येवर नियंत्रण ठेवणं जवळपास अशक्यच आहे,'असं माल्थसनं मांडलं.त्याच्या मते लोकसंख्या जिओमेट्रिक प्रपोर्शननं वाढते. म्हणजे ती दर ठरावीक काही वर्षांनी दुप्पट होते आणि ती मग १, २, ४, ८, १६... अशा पटीनं वाढते; पण त्याच काळात वाढत्या लोकसंख्येला अन्न पुरवण्यासाठी नवनवीन जमीन लागवडीखाली येते;पण नवीन जमीन जुन्या सुपीक जमिनीपेक्षा कमी सुपीक असल्यामुळे तिची उत्पादकता कमी कमी होत जाते आणि त्यामुळे धान्योत्पादन हे आरिथमेटिक प्रपोर्शननं वाढतं.

म्हणजे ते १, २, ३, ४, ५... अशाच तऱ्हेनं वाढतं.(अमेरिकन वसाहतीत त्या वेळी असंच घडत होतं.) त्यामुळे काही काळानं लोकसंख्येला पुरेसं अन्न न मिळाल्यानं उपासमार सुरू होते, असं त्यानं मांडलं.मग सुरू होतो, 'जगण्याचा संघर्ष'आपल्याला अन्न मिळावं यासाठी मग प्रत्येक जण दुसऱ्यावर मात करायचा प्रयत्न करायला लागतो.जे लोक या सगळ्या संकटांवर मात करून जगतात तेच अस्तित्वात राहू शकतात; पण जे या संकटांवर मात करू शकत नाहीत,त्यांचं अस्तित्वच नष्ट होतं.

माल्थसचे मुद्दे प्राणी आणि वनस्पतींच्या बाबतीतही खरे ठरतात,असं डार्विनला लक्षात आलं.यालाच 'स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स' किंवा 'नॅचरल सिलेक्शन' असं म्हणतात.माल्थसचं मत वाचल्यावर डार्विनला अनेक गोष्टी चांगल्याच लक्षात यायला लागल्या.

वातावरणात आपला लढा देण्याच्या दृष्टीनंच त्या त्या बेटावरच्या नैसर्गिक परिस्थितीनुसार आपल्याला सापडलेल्या फ्लिंच जातीच्या पक्ष्यांच्या आपल्या चोचींमध्ये बदल झाले असावेत असं डार्विनच्या लक्षात आल.एखाद्या बेटावर जर दुष्काळी परिस्थिती असेल तर पक्ष्यांना त्यांच अन्न शोधण्यासाठी आखूड आणि जाड चोचींचा काहीच उपयोग होत नाही. अशा ठिकाणी बारीक आणि लांब असलेली चोच कामाला येईल.यामुळे जरी दोन्ही प्रकारचे पक्षी त्या ठिकाणी असले तरीही ज्या पक्ष्यांची चोच बारीक आणि लांब असेल,तेच पक्षी या जीवनाच्या संघर्षात तग धरतील आणि आपला वंश वाढवतील;पण ज्या पक्ष्यांच्या चोची आखूड आणि जड़ असतील ते पक्षी जीवनसंघर्षात अन्न न मिळाल्यामुळे तग धरू शकणार नाहीत आणि हळूहळू त्यांचा वंशच नष्ट होईल.याउलट एखाद्या बेटावर जर कठीण कवचाची फळं हेच अन्न असेल तर तिथे बारीक आणि लांब चोचीचा काहीच उपयोग होणार नाही.तिथं आखूड आणि दणकट चोचीचीच गरज भासणार.अशा परिस्थितीत बरोबर वरच्या उलटआखूड,जाड आणि दणकट चोचींचेच पक्षी तग धरतील आणि बारीक आणि लांब चोच असणारे पक्षी कालांतरानं हळूहळू नष्ट होतील. थोडक्यात,एका बेटावरचे पक्षी त्या बेटाच्या विरुद्ध वातावरण असलेल्या दुसऱ्या बेटावर तग धरतीलच असं नाही.असं होत होतंच.

नैसर्गिक परिस्थितीप्रमाणे त्यात तग धरू शकणारे आणि वाढणारेच जीव टिकले आणि वाढले असणार.शिवाय या नैसर्गिक परिस्थितीत टिकण्यासाठी त्या सजीवांमध्ये योग्य ते बदल घडत गेले असणार.असं डार्विनला वाटलं मात्र हे बदल नक्कीच एका दिवसात झाले नसतील हे बदल होण्यासाठी अनेक शतक /सहस्त्रकं लागली असतील असं डार्विनला वाटलं.

अपुर्ण..

जग बदलणारे ग्रंथ-दीपा देशमुख

मनोविकास प्रकाशन

२५/३/२३

देवरायणदुर्गची विक्षिप्त वाघीण नरभक्षकाच्या मागावर

सकाळ उजाडली,तेव्हा गोठवणारी थंडी आणि जागरण यामुळे मी आणि ती बकरीही पार थकून गेलो होतो.

आदल्या दिवशी ती बकरी एवढी ओरडली होती,की आता तिच्या घशातून आवाजच फुटत नव्हता.दुपारी दोन तास मी वाघिणीचा शोध घेण्यात घालवले,पण ते व्यर्थ ठरले.त्यानंतर मी आजूबाजूला कुठे चढ नाही ना हे पाहिलं,मग एक जरा पानांनी जास्त डवरलेलं झाड निवडून त्यावर माझं मचाण बांधलं,आणि दुपारी चार वाजता मी वर चढलो.ह्यावेळी मी दुसरी बकरी बांधली होती,पण ही आदल्या रात्री बांधलेल्या बकरीच्या अगदी विरुद्ध होती.जसे तिला बांधून लोक गेले,तशी ती खाली बसून निवांतपणे रवंथ करू लागली.ह्या रात्री मी व्यवस्थित गरम कपडे आणले होते. मध्यरात्रीनंतर मी अंगाभोवती छान ब्लॅकेट गुंडाळलं आणि मला इतकी मस्त झोप लागली,की थेट पहाटेच जाग आली.मी खाली बकरीकडे नजर टाकली;तर ती तेव्हाही काहीतरी चघळत एवढी निवांत बसली होती की,जगात जणू एकही शिकारी प्राणी नाही.मी दुपारी पुन्हा एकदा वाघिणीचा शोध घेतला,पुन्हा माझ्या पदरी निराशाच पडली.दुपारी तीन वाजता मी परत मचाणावर चढलो.ह्या वेळी आमिष म्हणून मी एक जवान बैल बांधला होता.

संध्याकाळचे सात वाजले.अंधार पडू लागला होता,तेव्हा अनपेक्षितपणे गावकऱ्यांचा एक घोळका हातात कंदील घेऊन आला आणि वाघिणीनं अर्ध्या तासापूर्वी एका छोट्या तलावाच्या भिंतीशी एक गाय मारल्याची व ती तिला खात बसल्याची खबर मला दिली.हे ठिकाण विरुद्ध दिशेला गावाच्या पलीकडे फर्लांगभर अंतरावर होतं.आता मचाणावर बसण्यात काहीच अर्थ नव्हता.मी मचाणावरून खाली उतरलो.तिथे बांधलेल्या बैलाला तसेच ठेवून मी गावकऱ्यांसोबत निघालो.गावापाशी पोहोचल्यावर मी त्यांना कंदील विझवायला सांगितले आणि त्यांच्यापैकी फक्त एकाला घेऊन मी त्या तलावाकडे निघालो.ती गाय रस्त्याच्या डाव्या बाजूला गावापासून एक फर्लांगावर आणि रस्त्यापासून पन्नास यार्डावर आहे,असं मला सांगण्यात आलं होतं.आता पूर्ण अंधार पडला होता.तो गावकरी माझ्यामागून येत होता.आम्ही रस्त्याच्या मधून चालत होतो.मी रायफलच्या नळीवर बसवलेला टॉर्च पेटवला आणि तो माझ्या डाव्या बाजूला फिरवू लागलो.

लगेचच गुरगुराट ऐकू आला आणि लालपांढरे डोळे चमकले.माझ्या अंदाजानं ते अंतर दोनशे यार्डाच्याही आतच होतं.डोळे चमकले,ते ठिकाण थोडं उंचावर होतं,असं कसं? मला प्रश्न पडला,परंतु मागून त्या गावकऱ्यानं माझ्या कानाशी लागत,वाघीण तलावाच्या भिंतीवर उभी असल्याचं सांगितलं.माझ्या बुटांचा तळ रबरी होता आणि तो गावकरी अनवाणी होता,त्यामुळे आम्ही चालताना आवाज येत नव्हता.वाघीण टॉर्चच्या झोताकडे पाहात उभी होती.आम्ही चालत पुढे जात राहिलो.इथे तलावाची भिंत येऊन रस्त्याला मिळत होती. आम्ही डावीकडे वळून एक चढ चढत,भिंतीवर आलो.

वाघीण आता गुरगुरू लागली.मी थांबून रायफल उचलायच्या बेतातच होतो,तेवढ्यात त्या वाघिणीचं अवसान गळालं आणि ती भिंतीवरून चारपाच झेपा घेत,तलावाच्या बाजूला खाली उतरली आणि दिसेनाशी झाली.त्यानंतर आम्ही भिंतीवरून चालत,आजूबाजूच्या झुडुपांवर टॉर्चचे झोत टाकत पुढे गेलो.तिथे आम्हाला मोठ्ठे वडाचं एक झाड दिसलं आणि आश्चर्य म्हणजे त्याच्या फांद्यांमधून त्या वाघिणीचे डोळे लकाकले.हे एक मोठं नवल होतं.कारण वाघ सहसा झाडावर चढत नाहीत आणि एवढ्या उंचावर तर नक्कीच नाही.ती एवढ्या वर होती,तरी आम्ही भिंतींवर असल्यानं आम्ही समपातळीत आणि समोरासमोर होतो.मला फांद्यांच्या दुबेळक्यात बसलेली वाघीण स्पष्ट दिसत होती.मी काळजीपूर्वक नेम धरून चमकणाऱ्या त्या दोन डोळ्यांच्या मधोमध गोळी झाडली.'धप्प'असा आवाज करत ती वाघीण खाली कोसळली.तिनं एकदा घरघर केली,पण नंतर मात्र शांतता पसरली.माझ्या गोळीनं त्या वाघिणीचा वेध घेतल्याचं पाहून मी गावात जाऊन जरा झोप काढून सकाळी परत यायचं ठरवलं आणि आम्ही गावात आलो.तिथून मैलभर पुढे जिथे तो बैल बांधला होता,तिथे उभी केलेली माझी गाडी घेतली आणि तुमकूरला आलो.तिथे थोडंसं खाल्लं,त्यावर कडक चहा प्यायला,माझा पाईप भरून धूम्रपान केलं आणि सकाळी उठून त्या मेलेल्या वाघिणीला घेऊन यायचं ठरवून मस्त झोपी गेलो.सकाळी दिवस उजाडला,तसा मी परत गावात दाखल झालो.आदल्या दिवशी माझ्याबरोबर असलेल्या साथीदाराला घेतलं आणि त्या तलावाच्या भिंतीवरून जाऊन सावधपणे उतरत,ज्या वडाच्या झाडावर बसलेल्या वाघिणीला मी गोळी घातली होती,त्या झाडाशी गेलो.

वाघीण जिथे झाडावरून खाली पडली होती,तिथे रक्ताचा सडा पडला होता.तिथे आम्हाला साधारण एक चौरस इंचाचा हाडाचा तुकडा मिळाला.त्या हाडात मी झाडलेल्या गोळीतल्या शिशाचा एक तुकडाही घुसलेला दिसला.झाडाच्या बुंध्यावर झालेल्या धारदार नखांच्या खुणा बघून हे वजनदार जनावर झाडावर कसं चढलं असेल,याची कल्पना येत होती.माझा जोडीदार वर चढला,त्याला फांद्यांच्या दुबेळक्यात काही रक्ताचे थेंब दिसले.त्यानंतर आम्ही अत्यंत सावधगिरी बाळगत वडाच्या झाडापासून सुरू झालेल्या रक्ताच्या मागावर निघालो.आमच्या लवकरच लक्षात आलं की,वाघिणीच्या डोक्यात गोळी लागली आहे आणि ती चांगलीच जखमी अवस्थेत आहे.तो रक्ताचा मागही वेडावाकडा,कधी एकात एक मिसळलेला,कधी गोलाकार - असा होता.आपण कुठे जातोय हेही तिला नीटसं कळत नाही आहे असं दिसत होतं.आम्हाला बरेच ठिकाणी रक्ताची थारोळी दिसली.बहुधा विश्रांती घ्यायला वाघीण तिथे पहुडली असावी,तिथून पुढच्या दाट झुडुपाच्या पट्याच्या दिशेला आम्हाला रक्ताचा एखाददुसरा थेंब पडलेला सापडत होता.प्रथम आम्ही त्या झुडुपांच्या पट्याभोवती फिरून पार दोनशे यार्डावर असलेल्या भिंतीपर्यंत जाऊन तपास केला पण आम्हाला कुठेच रक्त सांडलेलं दिसलं नाही.हा दाट झुडुपांचा पट्टा दोनशे यार्ड लांब व साधारण सत्तर यार्ड ते दहा यार्ड अशा कमीजास्त रुंदीचा होता.वाघीण खात्रीनं या पट्यातच होती.पण ती जिवंत आहे का मेली होती,हे कळायला मार्ग नव्हता.ज्या ठिकाणी आम्हाला ती वाघीण या झुडुपांच्या दाटीत शिरताना सांडलेल्या रक्ताचे थेंब दिसले होते,तिथे आम्ही परत आलो आणि त्या झुडुपांच्या दाटीत दगड फेकू लागलो.पण तिथे संपूर्ण शांतता नांदत होती.आम्ही त्या झुडुपांच्या कडेनं तसेच पुढे पुढे जात राहिलो.मी त्या गचपणात पाच गोळ्याही झाडल्या,पण आम्हाला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही.आम्ही पाऊणएक लांबी पार केली.तिथे झुडुपांच्या वर बारा फूट उंच वाढलेलं एक झाड आम्हाला दिसलं.आजूबाजूला टेहळणी करावी, म्हणून माझा साथीदार जाऊन झाडावर चढू लागला तेव्हा अचानक एक डरकाळी फोडत ती वाघीण त्याच्या मागे आली.त्या माणसानं घाबरून किंकाळी फोडली,तेव्हा मी तिथून जेमतेम वीस यार्डावर होतो.मी एकापाठोपाठ एक तीन गोळ्या तिच्यावर झाडल्या,तशी ती मागच्यामागे कोसळली.सरतेशेवटी वाघिणीचा अंत झाला होता.

मी नंतर तिला जेव्हा तपासलं,तेव्हा मला दिसलं की त्या वाघिणीचे सुळे बोथट झाले होते,त्यामुळे ती मनुष्यवस्तीजवळ राहून मारायला सोपे अशा कुत्री,बकऱ्या व गाईगुरांवर गुजराण करत होती.

मनुष्यप्राण्यांबद्दल एकीकडे वाटणारी भीती व दुसरीकडे वाटणारा तिरस्कार यामुळेच केवळ ती नरभक्षक झाली नव्हती; परंतु ती वेळीच मारली गेली नसती,तर आज ना उद्या ती नक्कीच नरभक्षक झाली असती.भूक आणि वय यामुळे ती एवढी माथेफिरू आणि हिंसक झाली होती की काय कोण जाणे.

दरम्यान माझी अगदी पहिली गोळी त्या वाघिणीच्या नाकाच्या हाडाच्या थोडी वर लागली होती,त्यानेच उडालेल्या हाडाचा तुकडा आम्हाला झाडाखाली मिळाला होता.म्हणजे मी झाडलेली गोळी तिच्या डोक्यात पुरेशी घुसली नव्हती, म्हणूनच एव्हढा रक्तस्त्राव होऊनही ही वाघीण जिवंत राहिली असावी.माझा साथीदार झाडावर चढताना ती त्याच्यावर धावून गेली नसती.तर तिला मारता येणं अजूनच अवघड झालं असतं.


२३ मार्च २०२३ या कथेतील पुढील व शेवटचा भाग.. समाप्त


२३/३/२३

देवरायणदुर्गची विक्षिप्त वाघीण नरभक्षकाच्या मागावर - केनेथ अँडरसन

ह्या वाघिणीला विक्षिप्त म्हणायच कारण म्हणजे हिनं वास्तव्यासाठी निवडलेलं ठिकाण,हिचं तऱ्हेवाईक वागणं आणि विक्षिप्त सवयी,ही वाघीण जरा वेगळीच होती.ती नरभक्षक नव्हती. किंबहुना हिनं कधीच नरमांस खाल्लं नाही.मात्र ती जरा हिंस्त्र प्रवृत्तीची होती आणि तिचं मनुष्यजातीशी विशेष शत्रुत्व होतं. 


तिनं तीन जणांना मारलं.एक महिला व दोन माणसं.हा हल्ला तिनं केवळ त्याक्षणी आलेला आवेग आक्रमकतेतून केला होता.हिच्या सवयीही वाघांसारख्या नव्हत्या.ही वाघीण शेळ्या व गावातली कुत्री मारून खायची,वाघ जसं कधीच करत नाहीत.क्वचित ते एखादी शेळी मारतील,पण कुत्री कधीच नाही.


बंगलोरपासून पन्नास मैलांच्या आत आणि तुमकूरपासून सहा मैलांवरच्या देवरायणदुर्गच्या डोंगरामध्ये ही वाघीण एक दिवस अचानक अवतीर्ण झाली.देवरायणदुर्गमध्ये कितीतरी दशकांत वाघानं वास्तव्य केलेलं नव्हतं.इथे म्हणण्यासारखं जंगलही नव्हतं,फक्त खुरट्या झुडुपांनी आच्छादलेला एक बेटासारखा भाग होता,जिथे काही रानडुकरं व मोर सोडले,तर इतर प्राणीही नव्हते.बाकी सर्वदूर शेतं पसरलेली होती.इथला डोंगर अत्यंत खडकाळ होता व त्यात काही गुहाही होत्या,पण वाघासारखा एखादा मोठा प्राणी राहू शकेल एवढ्या त्या मोठ्या नव्हत्या.कधीतरी तिथे राहणाऱ्या साळिंदरासारख्या प्राण्याला हाकलून देऊन एखादा बिबळ्या तिथे मुक्काम करायचा.अशा ठिकाणी राहाण्याचा धोका कुठल्याही सर्वसाधारण वाघानं पत्करला नसता.ह्या वाघिणीनं मात्र हीच जागा निवडली होती.शेतं ओलांडल्याशिवाय तिथल्या डोंगरावरच्या झुडुपांच्या तुटपुंज्या आडोशाला जाता येणंही शक्य नव्हतं.


ह्या परिसरातील बकऱ्या आणि कुत्री लक्षात येण्याएवढी गायब होऊ लागली.सुरुवातीला हे काम बिबळ्याचं असावं असंच सर्वांना वाटलं, परंतु जेव्हा नांगरलेल्या शेतात हिच्या पंज्यांचे ठसे दिसले,तेव्हा हे वाघिणीचं काम आहे हे लक्षात आलं.त्यानंतर दोनच दिवसांनी रात्री चरायला सोडलेली एक मोठी गाय गावाच्या वेशीवर मारली गेली.त्या गाईची मालकीण एक म्हातारी बाई होती.तिची ही गाय अत्यंत लाडकी होती.गाय मारली गेल्याचं कळताच तिनं गाईकडे धाव घेतली,व तिच्या शेजारी बसून तिनं मोठ्यानं गळा काढला.तिचे कुटुंबीय पण तिथे येऊन तिचं सांत्वन करू लागले.थोडा वेळ थांबून एकेकानं काढता पाय घेतला.


ती बाई तिथे एकटीच उरली,पण तिचं भोकाड पसरून रडणं काही थांबेना.सकाळचे अकरा वाजले,सूर्य माथ्यावर यायच्या बेतात होता अशा तळपत्या उन्हात कुठलाही सामान्य वाघ भक्ष्याच्या जवळ जाणं तर सोडाच,बाहेरही पडला नसता.पण ही वाघीण सामान्य नव्हतीच.ती त्या मेलेल्या गाईपाशी आली.तिनं गाईजवळ बसून मोठ्यानं रडणारी बाई पाहिली.ते मोठ्याने रडणं न आवडून,हे आता थांबवलंच पाहिजे,असं बहुतेक ठरवून तिनं त्या बाईवर उडी घेतली आणि पंजाच्या एका फटक्यात तिचा प्राण घेतला.त्यानंतर तिनं गाईला ओढून थोडं लांब नेलं आणि त्या मेलेल्या बाईकडे संपूर्ण दुर्लक्ष करत भरपेट जेवण केलं.


दुपारी चार वाजले,तरी म्हातारी घरी आली नाही.एवढा वेळ रडून दमल्यानं तिला झोप लागली असावी,म्हणून तिला घरी आणायला तिच्या घरचे त्या जागेवर गेले.तेथील दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला.म्हातारी मरून पडली होती.आणि थोड्याच अंतरावरच्या गाईला खाऊन वाघीण निघून गेली होती.ते पाहून धावत पळत ते गावात गेले आणि ती दुःखद बातमी सगळ्यांना सांगितली.थोड्याच वेळात गावचा सरपंच त्याच्याकडची ठासणीची बंदूक घेऊन निघाला.त्याच्याबरोबर अजून दोन डझन लोक हातात निरनिराळी शस्त्रं घेऊन त्या ठिकाणी पोहोचले.

त्यांनी वाघिणीचा माग काढायचा प्रयत्न केला,पण वाघीण जवळच असलेल्या झुडुपांच्या दाटीत शिरली होती.त्यात शिरायची भीती वाटल्यानं त्यांनी दुरूनच आरडाओरडा केला,दगड मारले.सरपंचानं हवेत दोन बार काढले.काहीच घडलं नाही,म्हणून म्हातारीचा मृतदेह घेऊन जायला सगळे वळले आणि वाघीण झाडीतून धावत बाहेर आली.तिनं सर्वात मागच्या माणसावर हल्ला चढवला.तो माणूस नेमका सरपंच होता.काही कळायच्या आत तो जागेवरच ठार झाला.त्याच्या एकट्याकडेच बंदूक असल्यानं सगळे लोक पळत सुटले,ते थेट दुसऱ्या दिवशी सकाळी प्रेतं आणण्यासाठी परत तिथे गेले, तेही जास्त संख्येने.दोन्ही प्रेतं जशीच्या तशी पडलेली होती.वाघानं गाईवर मात्र ताव मारला होता.


पुढचे दोन दिवस संपूर्ण गावावर भीतीचं सावट होतं.

तिसऱ्या दिवशी एक वाटसरू आपल्या दोन गाढवांवर सामान लादून तुमकूरकडून येत होता. तो गावापासून मैलभर अंतरावर असताना वाघिणीनं पुढच्या गाढवावर झडप घातली. ते गाढव खाली कोसळलं.दुसरं गाढव तसंच उभं राहिलं,पण तो वाटसरू भीतीनं किंकाळी फोडत आल्या दिशेनं पळत सुटला.त्याला पळताना बघून वाघीण बिथरली असावी,कारण त्या माणसाचा पाठलाग करत वाघिणीनं त्याला मारलं आणि ती मारलेल्या गाढवाकडे परत आली.गाढवाला उचलून नेऊन तिने त्याला खाल्लं.हे सर्व करताना तिनं त्या दुसऱ्या गाढवाला किंवा त्या मरून पडलेल्या वाटसरूला स्पर्शही केला नव्हता.


या सर्व घटना बंगलोरच्या इतक्या जवळ घडल्यानं सर्व स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये त्याच्या बातम्या मोठ्या मथळ्यांमध्ये छापून आल्या होत्या.त्या वाचून दुसऱ्याच दिवशी मी कारनं निघून दोन तासांत देवरायणदुर्गमध्ये दाखल झालो.भेदरलेल्या गावकऱ्यांनी वर घडलेल्या घटना मला सांगितल्या.धुळीनं भरलेले रस्ते आणि कोरडी हवा असल्यामुळे वाघिणीच्या पंजाचे सर्व ठसे पुसले गेले होते.काही काळ हे काम वाघिणीचंच आहे की एखाद्या मोठ्या आणि आक्रमक बिबळ्याचं आहे,असा संभ्रम माझ्या मनात होता;पण सरपंचासोबत असणाऱ्या लोकांनी घडलेली घटना प्रत्यक्ष पाहिल्यानं,ती वाघीणच असल्याचं ते छातीठोकपणे सांगत होते.गावकऱ्यांना अतिशयोक्ती करण्याची सवय असल्यानं त्यांनी एवढं सांगूनही माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकत होतीच.

दुपारचं जेवण पटकन आटोपून,माझ्याबरोबर यायला अत्यंत अनुत्सुक असलेल्या एका वाटाड्याला घेऊन मी तो सर्व परिसर धुंडाळला.त्या गुहांमध्येही डोकावलो, पण आम्हाला कुठेही एखादी खूणही दिसली नाही.आम्ही दमून भागून चार वाजता गावात परत आलो.तिथे म्हैस न मिळाल्यानं मी एक अर्धवट वयाचा बैल मिळवला.

गावापासून पाऊण मैलावर रस्ता जिथे एका खडकाळ, काट्याकुट्यांनी भरलेल्या नाल्याला छेदून जातो, तिथे मी तो बैल बांधला.जवळजवळ सहा वाजत आले होते.

मचाण बांधायला वेळ नव्हता.त्यामुळे सहा मैलांवर असलेल्या तुमकूरच्या प्रवासी बंगल्यात रात्र काढून मी सकाळी इथे यायचं ठरवलं.तोपर्यंत वाघिणीनं बैल मारलेला असेल, अशी मला आशा होती.मी पहाटे पाच वाजताच उठलो.साडेपाच वाजेपर्यंत बैल जिथे बांधला होता,तिथून अर्ध्या मैलावर गाडी उभी केली आणि अत्यंत सावधपणे चालत पुढे गेलो.बैल गायब होता.नीट पाहाणी केल्यावर लक्षात आले की,बैल मारला गेला आहे.त्याला बांधलेला दोर जोरदार ओढाओढी करून अगदी प्रयत्नपूर्वक तोडला गेला होता. तिथं ठसेही स्पष्टपणे दिसत होते,ज्यावरून हे काम वाघाचं नसून एका प्रौढ व आकारानं मोठ्या वाघिणीचं आहे,हे कळत होतं. या जनावराचा विक्षिप्त स्वभाव आणि अचानक हल्ला करण्याची सवय लक्षात घेऊन मी अतिशय सावधपणे बैलाला ओढत नेल्याच्या खुणांवरून पुढे जाऊ लागलो.

मागे पुढे आणि दोन्ही बाजूंना लक्ष ठेवत मी जात असल्यानं माझा वेग मंद होता.साधारण दीडशे यार्ड गेल्यावर मी त्या मेलेल्या बैलापाशी आलो. वाघीण मात्र तिथे नव्हती,ती निघून गेली असावी.


वाघ ज्या पद्धतीनं जनावराला मारतात अगदी तशाच पद्धतीनं तो तरुण बैल मारला गेला होता. त्याची मान मोडली होती,त्यानंतर तिनं त्याला ओढत आणलं होतं.बैलाच्या गळ्यावरच्या सुळ्यांच्या खोलवर घुसलेल्या जखमांवरून तिनं त्याच्या नरडीचा चावा घेऊन त्याचं रक्तप्राशन केलं होतं.त्या बैलाची शेपटी चावून धडापासून अलग करून सुमारे दहा फूट अंतरावर टाकली गेली होती,तर पोट फाडून आतली आतडी व घाणही बाहेर काढून लांब नेऊन टाकली होती. त्यानंतरच तिनं भोजन सुरू केलं होतं.वाघ खातात त्या पद्धतीनं,म्हणजे मागून सुरुवात करून तिनं बैलाचा अर्धाअधिक फडशा पाडला होता.या सर्व गोष्टींवरून मला जे सांगण्यात आलं होतं,तशी मला तरी ती विक्षिप्त वाटली नाही.असली तर भडक डोक्याची असावी.वाघीण परत येईल,या आशेनं मी वीस यार्डावर असलेल्या एका हडकुळ्या झाडावर चढून बसलो.बसण्याजोगी तेवढी एकच जागा जवळपास उपलब्ध होती.तिथे मी साडेनऊपर्यंत थांबलो,वाघीण काही आली नाही;परंतु तीक्ष्ण नजरेच्या गिधाडांना मृतदेहाची खबर लागली आणि ती घिरट्या घालत मेजवानीवर ताव मारायला खाली खाली येऊ लागली. गिधाडांपासून त्या मृतदेहाचं संरक्षण करण्यासाठी मला झाडावरून खाली उतरावं लागलं.आजूबाजूच्या झुडुपांच्या फांद्या तोडून मी त्या बैलाचा मृतदेह झाकला.

माझी गाडी घेऊन मी नंतर गावात आलो आणि चार जणांना घेऊन परत त्या जागेवर गेलो.माझ्याबरोबर नेहमी गाडीत असणारं मचाण मी त्यांना झाडावर चढवायला सांगितलं.त्यातल्या एका माणसानं मला,मी तिथे एक बकरीपण बांधावी,असं सुचवलं.त्याच्या म्हणण्याप्रमाणे या वाघिणीला एकतर बकऱ्या खायला आवडायचं,दुसरं म्हणजे तिचं ओरडणं ऐकून वाघीण तिथे यायची शक्यताही वाढेल.मला त्याचं हे म्हणणं पटलं.मी परत गावात जाऊन एक बकरी मिळवली.


थोडी बिस्किटं व चहा पिऊन मी मचाणावर चढलो की,मगच त्या बकरीला बांधून तिथून निघून जाण्याच्या सूचना मी माझ्या माणसांना दिल्या,म्हणजे ते तिथून निघून गेले,की तिला एकटं वाटून ती ओरडू लागेल.ती माणसं तिथून निघेपर्यंत दोन वाजले.ते गेल्यावर ती बकरी खरंच जोरात बें बें करत ओरडू लागली.साधारण पावणेसहापर्यंत ती बकरी ओरडत होती.त्याच सुमारास मला ती वाघीण येत असल्याची चाहूल लागली.ती हळू आवाजात अधेमधे कण्हल्यासारखे आवाज काढत येत होती. बकरीनंही ते ऐकलं आणि ती बिचारी भीतीनं नखशिखांत थरथरू लागली.दुर्दैवानं ती वाघीण माझ्या मागच्या बाजूनं येत होती.माझ्या खाटेच्या मचाणावरून मला मागे पाहाता येत होतं,पण मागच्या बाजूला दाट झुडुपं होती आणि माझ्या मागे झाडाचं खोड होतं,त्यामुळे मला काहीच दिसत नव्हतं.शिवाय मागच्या बाजूची जमीन वरून खाली उतरत आली होती.वाघीण वरून खाली उतरताना तिला माझं मचाण थेट समोर दिसलं म्हणा किंवा वाघासारख्या प्राण्यांना असणाऱ्या तीव्र अशा सहाव्या इंद्रियामुळे तिला पुढे धोका असल्याची जाणीव झाली म्हणा, तिला शंका आली हे खरं,कारण तिनं एक जोरदार डरकाळी फोडली आणि पुढे न येता ती त्या परिसराभोवती घिरट्या घालू लागली.बिचारी बकरी भीतीनं अर्धमेली झाली होती. अंधार पडू लागला,तशी ती थरथरत अंगाची जुडी करून खाली बसली.ती वाघीण रात्री नऊ वाजेपर्यंत डरकाळ्या फोडत फिरत होती.शेवटी

निषेध नोंदवणारी एक डरकाळी फोडून ती निघून गेली.त्यानंतर काहीच घडलं नाही.पहाटे पारा खाली उतरून एवढी थंडी पडली की,मी पार गारठून गेलो.


कथा अजून शिल्लक आहे.ती लेखातील दुसऱ्या भागात..


अनुवाद - संजय बापट 

राजहंस प्रकाशन

२१/३/२३

बोधकथा - क्षमा

नाशिकला आमच्या बागेत अनेक प्रकारच्या जास्वंदी फुललेल्या होत्या.रस्त्याने जाणारा-येणारा थोडावेळ थबकून त्यांच्या कडे न बघता गेला असं कधी होत नव्हतं.श्रावण महिना होता.माझ्या दारा समोरच पिवळ्या रंगाची पण आत लालसर –(गर्द गुलाबी) रंगाचा चांदवा असलेली जास्वंद खूप बहरली होती.साधारण दहा बारा फुट उंचीचे झाले होते ते झाड.रोज किमान ५६-६० हून अधिक फुले झाडावर असायची.फार लाडकी जास्वंद होती ती माझी.तिने शेजारच्या सोनार काकांच्या बागेत अतिक्रमण करायला कधी सुरवात केली,समजलंच नाही.तिच्या फांद्या त्यांच्या बागेत जरा जास्तच पसरायला लागल्या. झाडाची फुले कोमेजून दुसऱ्या दिवशी खाली पडून त्याचा खूप कचरा व्हायचा.कोमेजलेल्या फुलांवर असंख्य चिलटे बसायची.ती मग दिवस भर घरात देखील फिरायची.कोमेजल्यावर फुले चिकट होत.त्यावर चुकून पाय पडलाच तर पाय सटकून माणूस खाली पडायची पण शक्यता असायची.शेजारचे सोनार काका मला रोज सांगत,"अगं भारती,आमच्या बागेत आलेल्या या जास्वंदीच्या फांद्या कापून टाक बरं.मला त्रास होतो त्याचा." मला त्यांचा त्रागा समजत असे. पण त्या फांद्यांवरच्या असंख्य कळ्या पाहिल्या की मी त्यांना प्रॉमिस करायची," काका, एवढ्या कळ्यांची फुले होऊन जाऊ देत ना.काही दिवसांनी असाही त्याचा बहर कमी होईल.


मग कापतेच मी त्याच्या फांद्या.चालेल ना ?" "ठीक आहे.पण लवकर काप.मी पडलो पाय घसरून तर ?" इति काका.

"हो, हो, लवकरच कापीन मी फांद्या.प्रॉमिस काका !" माझे ठरलेलं उत्तर एके दिवशी मी ऑफिसमधून घरी परतले तर काका बाहेरच उभे."त्या फांद्या आत्ताच्या आत्ता काप,फार दिवसापासून ऐकतोय तुझं,आज कापते-उद्या कापते.आज आत्ता माझ्या समोर काप फांद्या."एरवी अत्यंत प्रेमळ असे सोनार काका त्यादिवशी इतके का संतापले होते मलाही समजलं नाही.माझाही राग जरा अनावर झाला.घरात जाऊन मी झाडे कापायची कात्री आणि चांगला धारदार कोयता आणला.फक्त  त्यांच्या बागेतल्याच नाही तर माझ्याही बागेतल्या  जास्वंदीच्या झाडाच्या फांद्या कापल्या.दहा बारा फुट उंचीचे ते झाड मी अगदी अडीच तीन फुटी करून टाकलं.कंपाऊंड वॉलच्या पलीकडून सुद्धा ते आता काकांना दिसणार नव्हतं.

ती माझी कृती म्हणजे राग अनावर झाला की  माणूस किती विकृतपणे वागतो याचं ते मूर्तिमंत उदाहरण होतं.पश्चाताप तर लगेचच झाला.पण आता पश्चाताप करून काही उपयोग पण नव्हता.त्या फांद्या पुन्हा थोडीच जोडता येणार होत्या ? त्या रात्री जेवलेही नाही आणि झोपलेही नाही.पावसाचे दिवस होते.झाड पुन्हा भराभर वाढलं.आश्चर्य म्हणजे एकही फांदी सोनार काकांच्या बागेच्या दिशेने वाढली नाही.पुन्हा दहा -बारा फुट झाड वाढलं.पाने हिरवीकंच आणि टवटवीत.पण फूल मात्र एकही नाही.त्याच्या आसपासच्या झाडांवर असंख्य फुले पण याला मात्र एकही नाही.खतं-औषधे सर्व काही प्रयोग झाले.सहा महिने उलटले आणि माझी अस्वस्थता वाढली.

काय करू मी ? सोनार काकांना पण ही घटना सांगितली.

त्यांनाही खूप वाईट वाटलं.एक दिवस कन्याकुमारीच्या विवेकानंद केंद्रातल्या ज्येष्ठ कार्यकर्त्या सरस्वती दीदी यांचा फोन आला.त्यांनी वयाची पंच्याहत्तरी गाठली होती.

झाडा झुडपांची आणि बागेची सरस्वती दिदीना खूप आवड होती. कन्याकुमारीच्या समुद्र किनाऱ्यावर -अगदी समुद्राच्या रेतीत सुंदर असे Beach Garden त्यांनी बनवलेले मी पाहिले होते.झाडांवरचे त्यांचे प्रेमही मला ठाऊक होते.त्यांचा फोन येताच मी जास्वंदीच्या झाडाची कथा अगदी अथपासून त्यांना सांगितली.'दीदी,त्या झाडाला आता कुठलं खत घालू म्हणजे त्याला पुन्हा छान फुले येतील?" मी अक्षरश: रडवेली झाले होते.


"There is no need for any fertilizer. Did you say sorry to that plant Bharati ? And say it honestly till it responds to you."  


"काय ? झाडाला सॉरी म्हणू ?" खरं तर डॉ जगदीश चंद्र बोस यांनी लावलेले वनस्पतींच्या बाबतीतले सर्व शोध माहीत होते.वनस्पतींना भावना असतात,ते प्रतिक्रिया व्यक्त करतात वगैरे. Secret of plants सारखी अनेक पुस्तकेही वाचली होती.पण प्रत्यक्षात आपल्याला स्वत:ला असा काही अनुभव येईल असा कधी विचारही मनात आला नव्हता. सरस्वती दिदी पुढे म्हणाल्या की अगदी रोज ठराविक वेळेला क्षमा मागायची.झाडाला कुरवाळायचं,इतरही गप्पा मारायच्या,झाडाची क्षमा मागण्याचा माझा दैनिक कार्यक्रम सुरू झाला.

पहिल्या दिवशी थोडं कृत्रिम वाटलं पण जसजसे दिवस वाढत गेले,एक व्याकुळता माझ्या बोलण्यात - स्पर्शात आपोआपच यायला लागली. 

 जास्वंदीशी बोलणं,तिला कुरवाळणं मलाही आवडायला लागलं.तिला फुले कधी येतील या उत्सुकतेपेक्षा आमच्या दोघींमध्ये एक वेगळं नातं तयार झालं ते मला अधिक महत्त्वाचं वाटलं.दहा-बारा दिवस होऊन गेले.एके दिवशी सकाळी जास्वंदीच्या पानामागे एक कळी लपून बसलेली दिसली.जणू म्हणत होती,"शोध मला.बघ मी आलेय.

"आनंद गगनात मावेना म्हणजे काय असतं ते प्रत्यक्ष अनुभवलं. पण थोडा वेळच. शेवटी मन शंकेखोर.हा निव्वळ योगायोग तर नाही ? पण चार दिवसातच जास्वंदी कळ्यांनी  पानोपान बहरली.फुलेही उमलू लागली.मग मात्र खात्री पटली की जास्वंदीने मला खरोखर क्षमा केली आहे.पहिला फोन सरस्वती दीदींना केला.  माझ्या या आनंदात त्यांच्या इतकं दुसरं कोण सामील होऊ शकलं असतं?त्या दिवशी जास्वंदीशी हितगुज करताना मी म्हणाले,"आता जन्मात कधी मी असे वागणार नाही. पण तू सुद्धा माझ्याशी पुन्हा कधी कट्टी घ्यायची नाही बरं का!"


भारती ठाकूर 

नर्मदालय,

लेपा पुनर्वास (बैरागढ)

जिल्हा खरगोन 

मध्य प्रदेश..